प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२६ एप्रिल

संतांनीच भगवंताला सगुणात आणले.


    Download mp3

सर्वांत अर्पणभक्ति श्रेष्ठ आहे. पूजा करताना 'मी तुझा दास आहे' असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते. यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो, आणि इतक्यांत उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार; मग पूजेत अर्पणभक्ति कशी येणार ? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. नुसते शरीराने काबाडकष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते, आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते. जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे ? हे तेज फार विलक्षण असते. पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो.

एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे, आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे, वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले, आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की, आपल्याला सांभाळणार्‍या शक्ति आपल्या मागे असतात, त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, "ही दृश्य मूर्ति तुझी आहे, तुला हव्या असणार्‍या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे." ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे 'भगवंत दाता आहे' ही जाणीव उत्पन्न होईल. 'भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे,' ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल.


११७. आनंदरूप परमात्मा मिळविण्यासाठी सगुणोपासना पाहिजे.