प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२७ जानेवारी

नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे.


    Download mp3

सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय.

चार माणसे होती, त्या सर्वांना एकच रोग झाला होता. पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले, त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले, त्याच्याहीपेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले, आणि सर्वात जो श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावे, नाम वृत्ती सांभाळून घ्यावे, नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही, अशा दृढ भावनेने घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल.


२७. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे.