प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

flower5   maharaj   flower5
panati

२६ मे

भगवंताचे स्मरण ही सद्‍बुद्धी.


    Download mp3

परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते; कारण जी व्यक्ति नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते.

बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की, परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? याला उत्तर असे की, बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे; पण त्या बुद्धीची सद्‍बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश-काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्‍बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून, बुद्धीदाता परमेश्वर हे जरी खरे असले, तरी सद्‍बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे; आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे, हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे, ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणे, याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय, आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी की, "देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको."


१४७. नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे.
तेथे दुसरी एखादे गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा.