॥ श्रीराम समर्थ ॥

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत

अमृतघुटका

परिच्छेद १ ते ५

१- रामाला प्रार्थना

श्रीरामचिद्‍घन । गिरिजानंदन ।
गौरीकुमरा । गणनायका ॥
जयजयाजी सद्‍गुरुप्रसन्न । मना पाजूनि नामामृतरस ।
तोडी जन्मजन्माचा फांस । ऐसें करी रमाविलास ॥
जय जयाजी रघुनाथा । पूर्ण करी मनोरथा ।
चरणांवरी ठेवूनि मथा । प्रार्थितसे ॥ १ ॥


हे चैतन्यस्वरूप रामा, हे गजनना, गौरीपुत्रा, गणाधीशा, हे सद्‍गुरो, तुमचा जयजयकार असो. तुम्ही मजवर प्रसन्न व्हा. हे रामा, माझ्या मनाला तुझ्या नामाच्या अमृतवल्लीचा रस पाज, आणि जन्मोजन्मी माझ्या जीवाच्या गळ्याला लागणाऱ्या (जन्म-मृत्यु आदींच्या) फांसातून त्याला मुक्त कर. हे रमाविलासा रामा, तूं हे एवढे कर. रामा, तुझा जयजयकार असो. तूं एवढी इच्छा पूर्ण कर. अशी तुझ्या पायावर मस्तक ठेवून मी प्रार्थना करीत आहे.

श्रीसमर्थ रामदासस्वामी हे श्रीरामाचे परमभक्त होते. मूळ निर्गुण परमात्मा अखिल विश्वाच्या सगुण स्वरूपांत प्रकट होऊन त्यांत 'रममाण' होतो, म्हणून 'राम' शब्द श्रीसमर्थ सगुण-निर्गुण अशा दोन्ही स्वरूपार्थी वापरतात. अशा या परमात्म्याच्या इच्छेनें व सत्तेनेंच सर्व चराचर विश्वांतील यच्चयावत् घटना घडत असतात या जाणिवेची अखंड जागृति रहावी म्हणून लेखनाच्या आरंभी 'श्रीराम समर्थ' असे लिहिण्याचा प्रघात श्रीसमर्थांनी सुरू केला, आणि प्रस्तुत प्रकरणलेखक श्रीब्रह्मचैतन्य महाराज हे त्याच संप्रदायातले असल्यामुळें त्यांनी येथें तो अनुसरला आहे.
श्रीराम चिद्‍घन - म्हणजे सच्चिदानंद परमात्मा.
गिरिजानंदनसद्‍गुरु प्रसन्न - गणेश हा श्रीराम परमात्म्याचा प्रथम सगुण आविष्कार, ॐस्वरूप आहे. त्याचप्रमाणे सद्‍गुरुदेखील.
मना पाजूनि...फांस - वासना हीच जीवात्म्याचे मूलभूत बंधन असून तिच्यामुळेच तो जन्म-मरणाच्या चक्रांत सापडतो. घटसर्प या रोगाने पछाडलेल्या रोग्याच्या घशांत अवरोध होऊन गळा आवळल्या सारखा होत जातो. त्याचप्रमाणे वासनेचा गळफांस लागून जीवात्माही कासावीस होतो. विशिष्ट वनस्पतीचा रस पाजल्यानें जशी घटसर्पापासून मुक्तता होते तशी नामवल्लीचा रस पाजून जीवात्म्याला मुक्त करण्याची रामरूपी धन्वंतरीला विनंति केली आहे.


२ - वासनेमुळे निर्माण होणारे भवदुःख

वासना दुःख शोक मायादोष ।
आंधळे चित्त । कोठे नाही विश्रांत ।
समाधान नाही अंतरी । वृत्ति उठोनि पळे दूरी ।
परमार्थ नाही लेश । मायाभ्रमें कासावीस ।
त्या गुणें आला त्रास । दुःख भोगी श्वासोच्छ्वास ॥ २ ॥


वासना हे सर्व दुःखांचे आदिकारण आहे. मायेच्या, अज्ञानाच्या, भ्रमानें शोक निर्माण होतो. वासना दुःख, शोक ही मायेच्या योगानें, अज्ञानामुळे उत्पन्न झालेली आहेत. या मायेमुळे माझे चित्त आंधळे झाले आहे. बुद्धीला सत्य-असत्य, शाश्वत-अशाश्वत हा विवेक कळेनासा झाला आहे. या भ्रांतीमुळे माझ्या चित्ताला कोठें विश्रांती (शांतपणा, स्थिरपणा) नाही. अंतःकरणाला कोठेंही समाधान नाही, कारण माझी वृत्ति सारखी उठून उठून सुखाच्या शोधार्थ सैरावैरा धांवत असते, परमार्थाकडे लवमात्रही वळत नाही. अज्ञानाच्या भ्रमाने व्याकुळ होऊन मी कष्टी झालो आहे. श्वासागणिक, क्षणोक्षणी मी दुःख भोगीत आहे.

जीवाला प्राप्त होणारे सुख हे त्याच्या वांट्याला येणाऱ्या दुःखाच्या तुलनेनें अत्यल्प असते. "सुख पाहतां जवापाडे । दुःख पर्वता‍एवढे ॥' शिवाय हे 'सुख' काल, स्थल, परिस्थिति, उपभोग-क्षमता यांसारख्या अनेक बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. स्वतंत्र नसून परतंत्र असते, शिवाय टिकाऊही नसते. तरीदेखील त्याचा अनुभ्वव जीवाला हवाहवासा वाटतो. वास्तविक पाहता हे 'सुख' देखील बंधनकारक, पूर्वजन्माला कारणीभूतच असते, पण त्याची जाणीव नसल्यामुळे जीवाला त्याबद्दल तक्रार नसते. उलट दुःखामुळे त्याला पदोपदी,क्षणोक्षणी पीडा होत असते. अशा सामान्य जीवाची भूमिका धारण करून, स्वतः बंधमुक्त असलेले श्रीमहाराज, आमचे गार्‍हाणे पुढें मांडीत आहेत.
वासना - मनामध्ये कायमचा 'वास' करणारी, घर करून राहणारी, ते वासना म्हणजे इच्छा. वासना अखंड, अनंत, चंचल असते. विषयांत सुख शोधण्यासाठी तिचे अखंड हिंडणे चालूं असते. नाक, जिव्हा, डोळे, त्वचा व कान या पंचज्ञानेंद्रियांना अनुकूल संवेदना देणारे पदार्थ, विचार, कल्पना म्हणजे विषय. थोडक्यांत म्हणजे, श्रीमहाराजांनींच अन्यत्र म्हटल्याप्रमाणें "परमात्म्याचे विस्मरण करविणारी गोष्ट म्हणजे विषय."
दुःख - ज्ञानेंद्रियांना प्रतिकूल, नकोशा वाटणार्‍या संवेदना म्हणजे दुःख. शीतोष्ण, तहानभूक, व्याधी, दारिद्र्य, अपमान, अपकीर्ति, चिंत, भय, प्रबळ मनोविकार, कष्ट, दुसऱ्याकडून होणारा त्रास, अपघात, दुष्काळ, रोगाच्या साथी, दंगेधोपे, युद्धें, निसर्गप्रकोप इत्यादि दुःखाचे वैयक्तिक व सामूहिक प्रकार अनंत आहेत. शोक - प्रिय वस्तूच्या किंवा व्यक्तिच्या तात्पुरत्या किंवा कायमच्या वियोगानें, किंवा घडूं नये ती गोष्ट हातून घडल्याच्या पश्चात्तापाने, वाटणारे दुःख वा हुरहूर.
मायादोष - ममत्वाच्या पोटी, किंवा भ्रांतीमुळें हातून घडणारे नानाविध प्रमाद, पापें.
समाधान - सुख-दुःखाच्या हेलकाव्यांनी न ढळणारा चित्ताचा समतोलपणा. केवळ दुसऱ्यापेक्षां मी जास्त सुखांत आहे अशी सापेक्ष भावना म्हणजे खरे समाधान नव्हे. अनुकूल-प्रतिकूल अशा कोणत्याही प्रकारच्या परिस्थितींत मनाला तोल, स्वास्थ्य व शांती अभंग राहणे हें खरें समाधान. हें एक भगवद्‍भक्तिनेंच मिळूं शकते.
मायाभ्रम - माया म्हणजे अज्ञान; जे नाही ते आहे असे वाटणें किंवा जे आहे ते नाही असें वाटणें, अथवा जें जसे आहे तसें न दिसतां निराळेच भासणे. माझा देह, आप्तस्वकीय, इत्यादि विषय, यांपासून मला सुख मिळेल ही कल्पना हा मायाभ्रम होय.
कासावीस होणें - दमा, खोकला यांमुळे जशी हैराणगत होते तशी स्थिति होणे
परमार्थ - मनुष्य जन्माला येऊन साध्य करून घ्यावयाच्या गोष्टींना पुरुषार्थ असे म्हणतात. धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत. व्यक्तिचें व समाजाचें ज्याच्यामुळें कल्याण होईल अशा प्रकारे वागणें म्हणजे धर्म. धर्माला विरोध होणार नाही अशा रीतीनें द्रव्यादि सुखसाधनें मिळविणें म्हणजे अर्थ. धर्माला विरुद्ध नसणाऱ्या सुखाचा सदाचरणानें उपभोग घेणे म्हणजे काम. सर्व प्रकारच्या वासनांपासून मुक्त होऊन शाश्वत परमात्मसुखाचा अनुभव घेणे म्हणजे मोक्ष. पहिल्या तीन पुरुषार्थांपेक्षा परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असल्याने मोक्षाला परमार्थ असे म्हणतात.


३ - विषयप्रेमामुळे दुःखाचे डोंगर

इच्छेचे पाहों जातां घर ।
विषयावरी प्रेम भारी । कीर्ति असावी महीवरी ।
अभिमान चढे येऊनि शिरीं । ऐसे संसारदुःखाचे डोंगर झाले ॥ ३ ॥


वासनेला सुखाचे वाटणारे ठिकाण पाहूं गेलें तर तें म्हणजे विषय; विषयांवर तिची अत्यंत प्रीति असते. त्याचे एक ठळक उदाहरण म्हणजे आपल्या हयातींत आणि मरणानंतरही आपली कीर्ति लोकांत रहावी अशी लौकिकाची लालसा सतत असते; आणि त्यासाठीं माणूस सतत धडपडत असतो. विषयासाठींच्या या सर्व खटाटोपांत शाश्वत सुख किंवा लौकिक हातीं लागत नाहींच, फक्त अभिमान मात्र प्रबळ होऊन डोक्यावर येऊन बसतो. अशा प्रकारें वासनेच्या अधीन झाल्याकारणानें संसारदुःखाचे डोंगर झाले आहेत.
इच्छेचें घर - स्वस्वरूप हें स्वतःचे सुखाचे घर सोडून एखाद्या व्यभिचारी स्त्रीप्रमाणे वासना सुखासाठी विषयरूपी परद्वारी रत होते. शारीरिक सामर्थ्य, द्रव्य, घरदार, स्त्रीपुत्रादिक आप्त व इष्टमित्र, सत्ता, लौकिक इत्यादि विषयांच्या प्राप्तीची लालसा धरून माणूस जन्मभर धडपडत असतो. आणि बऱ्या-वाईट, नीति-अनीतिच्या गोष्टी करण्यांत सर्व आयुष्य खर्च करतो.
कीर्ति असावी महीवरी - सामान्य माणूससुद्धा आपल्या आप्तेष्टांमध्ये नांवलौकिक असावा म्हणून शक्तिबाहेरही खर्च करतो, नीति-अनीतिकडे कानाडोळा करतो. बलवान्, धनाढ्य आणि सत्ताधारी माणसे तर त्यापायी दुसऱ्याचा घातपात करण्यासही मागेंपुढे पहात नाहींत असें सर्वकाळी आढळते. असल्या माणसांची कीर्ति तर रहात नाहींच, उलट ते स्वतःवर व इतरांवर दुःखांच्या राशी ओढवून घेतात हे आपण जगांत पाहतो.
अभिमान - अभिमान चांगल्या गोष्टीबद्दल तसाच वाईट गोष्टीबद्दलही असूं शकतो. 'मी बुवा दारूला स्पर्शही करीत नाही', तसेंच 'आपलें बुवा दारूशिवाय होत नाही'; 'विद्वत्तेबद्दल माझा सन्मान होऊन ही शाल मिळाली'; आणि 'मला हायकोर्ट जज्जाची जागा देऊं केली होती पण मी ती नाकारली'; 'मी आजपर्यंत कोणावर रागावलो नाही'; वा 'माझा राग कडक आहे बरं का'; 'मी देवबीव मानीत नाही'; किंवा 'रोजचा अमुक इतका जप झाल्याशिवाय मी झोंपत नाही' - या सर्व उक्तिंच्या बुडाशी अभिमानच दडलेला असतो, इतका तो सूक्ष्म आणि सर्वव्यापी आहे. अभिमानाला कांहीही कारण पुरते, किंवा कांहीही कारण लागत नाही. अभिमान, लौकिकाची लालसा, विषयेच्छा, आणि विकार, ही सर्व जीवावर दुःखाचे डोंगरच ओढवून आणतात.


४ - साधकाच्या मनांतील प्रश्न व त्यास उत्तर

'मन बुद्धि दुराचारी ।
देहबुद्धीचे सागरी । कैंचे पावेन पैलतीरीं ?" ।
आत्मज्ञान मुखीं बोलतां । अंगी न बाणें सर्वथा ।
साधनाविणें वृथा । आत्मज्ञान बोलूंचे नये ॥ ४ ॥


"अपार दुखेः अनुभवित असूनही माझें मन व बुद्धि वाईट आचरणापासून परावृत्त होत नाहींत. असहाय, केविलवाणा होऊन मी देहबुद्धीच्या सागरांत गटांगळ्या खात आहे. यांतून मी किनाऱ्यावर सुरक्षितपणें केव्हां व कसा पोहोंचेन ?"

साधकाच्या या प्रश्नाला सद्‍गुरूंचे उत्तर असे - केवळ तोंडाने कोरडें आत्मज्ञान बोलत राहिल्यानें तें कदापि अंगी बाणत नसतें. साधन न करतां आत्मज्ञानाची बडबड करणें फोल आहे; आत्मज्ञान ही बोलण्याची गोष्टच नव्हे.
मन बुद्धि दुराचारी - वाईट, म्हणजे विषयप्रवृत्तिच्या आचारा-विचारामुळें दुःख प्राप्त होतें हे ठाऊक असूनही मन पुनः पुनः तिकडेच धांव घेत राहतें, आणि अक्कलही त्यांत यश कसें मिळेल इकडेच खर्च होते, ते कां ? तर असें कीं मधून मधून सुखाचा कवडसा जो येत असतो त्याची जीवाला लालूच लागते. तात्पर्य देहबुद्धीच्या पगड्यानें त्याची विचारशक्ति आणि विवेकबुद्धि क्षीण झालेलीं असतात. व्यसनी माणूस जेव्हां भानावर असतो त्या वेळेपुरते त्यालाही व्यसनाचे घोर परिणाम दिसून येऊन आपण व्यसनांतून मुक्त व्हावें असें वाटतें. पण व्यसनाची वेळ झाली कीं त्याच्या पंजांत तो पुनः जातोच. तसेंच सामान्य माणसालाही 'स्मशानवैराग्य' येतें पण तें क्षणमात्रच टिकतें, आणि त्याचें मन व बुद्धि पुनः विषयवासनेनें झपाटलीं जाऊन भ्रष्ट होतात.
देहबुद्धि - 'दिह्' = अंगाला तेल लावणे. 'देह' म्हणजे लेप. शरीर म्हणजेच मी, ही कल्पना वारंवार होऊन, तिचे लेप बसून आत्मस्वरूप दृष्टिआड होणें म्हणजे 'देहबुद्धि'. या देहबुद्धीमुळेच जीवात्मा शरीर आणि त्याच्या सुखदुःखांत मग्न होतो, आणि वासना व विकार यांच्या अधीन होतो.
आत्मज्ञान मुखीं बोलतां । अंगी बाणें न सर्वथा ॥ - अखिल विश्वाचें अविनाशी आदितत्त्व म्हणजे खरें स्वस्वरूप; परमात्मा; आणि त्याचा प्राणिमात्रांत वसणारा अंश म्हणजे जीवात्मा. परमात्म्याचें म्हणजेच आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. वेदांतग्रंथांचे नुसतें वाचन, कथन किंवा श्रवण करणारे पुष्कळ लोक आढळतात, पण त्यानुसार साधनाचें प्रत्यक्ष आचरण निष्ठेने करणारें विरळाच. आत्मज्ञान ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्यामुळें आणि साधन हें अनुभवाला आधारभूत असल्यामुळे, नुसती तात्त्विक माहिती वाचली, ऐकली, आणि त्या आधारावर बैठकींत बडबड किंवा सभेंत रसाळ वक्तृत्व केलें तरी त्यापासून त्या माणसाला किंवा ऐकणारालाही लवमात्र लाभ होत नसतो. पोहण्याच्या कलेवरील कितीही उत्कृष्ट पुस्तकें वाचली तरी पाण्यांत उतरून पोहण्याचा अभ्यास केल्याशिवाय ज्याप्रमाणे माणसाला पोहतां येतच नाही, तद्वतच प्रत्यक्ष साधन केल्याशिवाय आत्मज्ञान होणें नाही. साखरेचा इतिहास, गुणधर्म, बनविण्याची कृति, यांचा कितीही सांगोपांग अभ्यास केला तरी, चिमूटभर साखर जिभेवर ठेवून तिच्या गोडीचे ज्ञान अनुभवणें हेंच खरे लाभदायी ज्ञान होय, त्यांतलाच हा प्रकार आहे.


शाब्दिक आत्मज्ञान हें व्यर्थ आहे याची उदाहरणें पुढील बिंदूंत आहेत.


५ - शाब्दिक आत्मज्ञानाचा फोलपणा

स्वप्नामाजीं छत्रसिंहासनीं बैसला जाण ।
दुसरे दिवशी खावया न मिळे अन्न ।
कां राजपत्‍नीसी दासी अलंकार नेऊनि देतां ।
काय लागेल तिच्या हातां ।
पाळण्यासी बांधिले बाशिंग ।
त्या उभयतांसी आणिलें पालखींत मिरवीत ।
जयजयकार होत नगरांत ।
अज्ञान बालकां विवाह होत ।
वरात घेऊनि आले गृहांत ।
तेंचि क्षणीं झाला तयांसी सुत ।
ऐसी कोठें ऐकिली नाही वार्ता ।
तदुपरि साधनाविणें वृथा ।
आत्मज्ञान बोलूंचि नये ॥ ५ ॥


अशी कल्पना कर कीं एखाद्या भिकाऱ्याला रात्रीं सुखस्वप्न पडले कीं आपण छत्रयुक्त सिंहासनावर बसलो आहों; पण तेवढ्याने कांही तो खरा राजा होत नाही. दुसरे दिवशीं पुनः अन्न नाहीं ते नाहींच; भिक मागत हिंडावेच लागतें.

किंवा राणीकडे दासी अलंकार नेऊन देत असतांना ती कांही त्या अलंकारांची मालकीण होत नाही. ती गरीब पोटार्थी, भारवाहक दासीच राहते. किंवा समज कीं, अजून पाळण्यांतच असलेल्या बालक-बालिकेचे लग्न करण्यासाठी मारे त्यांच्या पाळण्यांना बाशिंगें बांधली, जयजयकार करीत त्या दोघांची पालखींतून गांवभर मिरवणूक काढली, त्या अजाण मुलांचा थाटाचा विवाहसोहळा केला, आणि वरात काढून मिरवीत त्यांना घरी आणलें; तर त्याच क्षणीं अर्भकांच्या त्या जोडप्याला मुलगा झाला, असें कधीं कोणी ऐकले आहे काय ? ही उदाहरणे ऐकल्यानंतर तरी साधन न करताच आत्मज्ञानाच्या गप्पा मारू नयेत. ॥५॥

टीप - वरील तीन दृष्टांतांनी पोकळ पांडित्याचा फोलपणा दाखवून साधन केल्याविना स्वस्वरूपाचा अनुभव कदापि येणें नाहीं हे ठामपणें सांगितले. ही उदाहरणें ऐकल्यानंतर तरी, साधन न करतांच आत्मज्ञानाच्या गप्पा मारूं नयेत.


* * * * *