नारद भक्तिसूत्रे

यो विविक्तस्थानं सेवते, यो लोकबन्धमुन्मूलयति,
निस्त्रैगुण्यो भवति, योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥


अर्थ : जो एकांतवासाचे सेवन करतो, लौकिक बन्धन तोडून टाकतो, जो तीन गुणांनी रहित होतो, आणि जो योग व क्षेमाचाही त्याग करतो (तो माया तरून जातो)


विवरण : साधनाचा विचार करीत असता त्याचे अंतरग व बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलेच आहे. अंतरंगसाधनांना बहिरंग-साधनाची आवश्यकता असते. संगत्याग हे साधन मागील सूत्रात सांगितले आहे ते सिद्ध होण्याकरिता या सूत्रात 'विविक्त स्थानं सेवते' म्हणजे निर्जन एकांतवासाचा आश्रय करतो असे सांगितले आहे. नगर-ग्राम-गृहादिकांत साधक राहून तो जरी आपल्या साधनाचरणात निमग्न राहील तरी इतर बहिर्मुख स्वार्थी, लोभी, दुष्ट माणसे त्याच्या साधनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे विघ्न आणण्याकरिता टपून बसले असतात. नाही नाही ते चांगले-वाईट प्रसंग त्याच्यावर आणून त्याच्या साधनाभ्यासात प्रतिबंध निर्माण करतात. त्याच्या त्या उपसर्गापासून वाचण्याकरिता पूर्वीपासून एकांतवास हेच साधन सर्व ऋषिमुनीनी स्वीकारलेले आहे. इतकेच नव्हे तर कित्येक सार्वभौम राजांनीही उतरत्या वयात सत्संगतीने वैराग्य झाले असता पुत्राच्या स्वाधीन राज्य करून आपण तपाचरणाकरिता अरण्याचा एकांतवासाचाच आश्रय केला. अशी किती तरी राजांची चरित्रे उपलब्ध आहेत. या विषयात श्रीएकनाथ महाराजांनी सांगितलेला श्रीगोरक्षनाथ व राजा भर्तृहरी यांचा संवाद प्रसिद्ध आहे. राजा भर्तृहरीने श्रीगुरू गोरक्षनाथास एकदा विचारले की, 'महाराज ! माझ्यासारखा सर्व राज्य टाकून परमार्थाला लागलेला कोणी आहे काय ? यावर गोरक्षनाथ म्हणाले, अरे, तूच काय पण या भारतात नव्याण्णव कोटी राजांनी राज्यत्याग करून पूर्वी वनवासाचा मार्ग पत्करला आहे.' (आनंदलहरी)

साधकाचे मन अद्यापि पूर्ण एकाग्र झालेले नसते, कोणतेही साधन, विचार, ज्ञान, ध्यान, भजन असो, मन एकाग्र पाहिजे. अनादिकालीन संस्कारामुळे ते चंचल असते हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरिता-एकाग्रतेकरिता काही साधने करावी लागतात. पाणी मूळचे शांत असले तरी आत असणार्‍या जलचराच्या हालचालींमुळे तसेच बाहेरील येणार्‍या-जाणार्‍याच्या पदाघातामुळे, मुले दगड टाकतात, त्यायोगाने, सोसाट्याच्या वार्‍यामुळे ते चंचल बनते. त्याकरिता आतल्या कारणांपासून चंचलता निर्माण न व्हावी म्हणून ती दूर केली पाहिजेत.

साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणेही दूर होणे आवश्यक आहे. ती विघ्ने म्हणजे स्वजन-परजनांकडून होणारा संसर्ग. तो अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटात राहून दूर करता येत नाही, सर्वावर नियंत्रण कसे ठेवता येईल ? याकरिता तो संसर्ग टाळणेच अवश्य आहे. या दृष्टीने विविक्त स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला घ्यावा लागतो.

संगे वाढे शीण न घडे भजन । त्रिविध हे जन बहु देवा ॥
याचिमुळे आला संगाचा कंटाळा । दिसताती डोळा नाना छंद ॥
तुका म्हणे आता एकलेचि भले । बैसोनि उगले रहावे ते ॥
ते विविक्त (एकांत) स्थान तरी कोणते व कसे असावे हे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात -
आणि तीर्थे धौते तटे । तपोवने चोखटे ।
आवडती कपाटे । वसऊ जया ॥ ६११ ॥
शैलकक्षांची कुहरे । जळाशय परिसरे ।
अधिष्ठी जो आदरे । नगरा नये ॥ ६१२ ॥
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदावरी खंति ।
जाण मनुष्याकारे मूर्ती । ज्ञानाची तो ॥ ६१३ ॥' ज्ञा. १३

लोकांतात साधनाचरणात साधकांस फार विघ्ने येतात, तुकाराम महाराज त्यासाठी म्हणतात,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥ १ ॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥ २ ॥
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥ ३ ॥
कथा कमंडलू देहउपचारा । जाणवितो वारा अवसरू ॥ ४ ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपलाचि वाद आपणासी ॥ ५ ॥ एकांतवासाचे स्वरूप व त्याचे फल यावरून स्पष्ट कळू शकते.
'गोदातटे निर्मळे । देव देवतांची राऊळे । वैष्णवांचे मेळे । दिवस जाय सुखाचा ॥' असेही एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात.

पण मनुष्यास बालपणापासून लोकबन्धनातच राहण्याची सवय असते. मातापिता बंधू-बांधव, इष्ट मित्र, परिवार, स्वजन इत्यादिकांशी जन्मतःच संबंध येतो व तेच बरे वाटते, जया जनपदी सुख । गजबजेचे कौतुक । वानू आवडे लौकिक- ।' ज्ञा. १३-८२३. असे सामान्यांचे लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे ते यथार्थ आहे. पण भक्तिमार्गी साधकास या लौकिक व्यवहारापासून फार उपसर्ग होतो, अभ्यासात विघ्ने येतात याकरिता वर लिहिल्याप्रमाणे तो एकांताचाच आश्रय करीत असतो.

सूत्राच्या पुढील भागात 'या लोकबन्धमुन्मूलयति' असे नारद म्हणतात. भगवद्‌गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञानाची जी साधने सांगितली आहेत त्यांतही या दोन साधनांचा अंतर्भाव आहे. विविक्त देश सेवित्वमरतिर्जन संसदि । १‍३- १० एकांतात जरी एकादा साधक असला तरी तेथे जाऊनही त्याला उपसर्ग पोहोचविणारे असतात. ते भाविकपणाचे सोंग घेऊन तेथे जातात. त्याचे वर्णन करू लागतात.
जनस्तुती लागे मधुर । म्हणती हा उद्धारावया हरीचा अवतार ।
आम्हा लागी जाहला स्थिर । तेणे तो धरी फार शब्द गोडी ॥ १५ ॥
असे श्रीएकनाथ महाराज आपल्या चिरंजीवपदात सांगतात.

अशा प्रकारे तो हळूहळू लोकेषणेमध्ये अडकत असतो. पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा यापेक्षाही साधक-भक्ताला लोकेषणा बाधक असते. लोकानी स्तुती करावयास आरंभ केला की तीच प्रिय वाटावयास लागते. पण स्तुतीबरोबर हळूहळू निंदाही होण्याला सुरुवात होते, ज्याला स्तुतीने सुख वाटते त्याला निंदा ऐकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. हाच लोकबन्ध होय.

श्रीतुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतित पावना देवराया ॥ १ ॥
संसार करिता म्हणती हा दोषी । टाकिता आळसी पोट पोसा ॥२॥
आचार करिता म्हणती हा पसारा । न करिता नरा निंदिताती ॥ ३ ॥
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासी ज्ञान नाही ॥४॥
धन नाही त्यासी ठायीचा करंटा । समर्थासी ताठा लाविताती ॥ ५ ॥
बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ । न बोलता सकळ म्हणती गर्वी ॥ ६ ॥
लग्न करू जाता म्हणती हा मातला । न करिता झाला नपुंसक ॥ ७ ॥
लोक जैसा ओक धरिता धरवेना । अभक्ता जिरेना संतसंग ॥ ८ ॥
तुका म्हणे आता ऐकावे वचन । त्यजुनिया जन भक्ती करा ॥ ९ ॥
म्हणून शेवटच्या चरणात ते सर्वाना सांगतात की, जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय, परकीय, शिष्य, भक्त म्हणविणारे असोत का विरोधी असोत टाळून भक्ती करा.

ज्याला परमात्म्याच्या प्रेमबंधनाने बांधले जावयाचे आहे त्याने लोकबन्धन तोडून टाकलेच पाहिजे -
निंदा आणि स्तुति । मान करूनि एके पंक्ति ।
विचरे प्राणवृत्ति । जनीवनी ॥ ज्ञानेश्वरी ॥१२॥
असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

गोपिकाची अवस्था कशी झाली होती, याचे वर्णन तुकाराम महाराजानी विरहिणीच्या अभंगातून केले आहे. ते या लोकबन्ध उन्मूलन भूमिकेचेच आहे.

वाळो जन मज म्हणोत शिदळी । परि हा वनमाळी न विसंबे ॥ १ ॥
सांडोनि लौकिक जालिये उदास । नाही भय आस जीवित्वाची ॥ २ ॥
नाइके वचन बोलता या लोका । म्हणे जालो तुका हरीरता ॥ ३ ॥
असे सर्वच संतांचेही उद्‌गार पाहावयास सापडतात.
खरा भक्त लौकिक व्यवहारात अडकत नाही. त्याने आपले जीवित तृणप्राय केलेले असते. एक गोपिक आपल्या सखीस म्हणते -
जीवितं सखि पाणीकृतं मया किं गुरोश्‍च सुहृदश्‍च मेभयं ।
लभ्यते हि यदि कस्य वा भयं लभ्यते न यदि कस्य वा भयं ॥
'ती गोपिका म्हणते हे सखे ! मी माझे जीवित पणाला लावले आहे. आता मला गुरुजन वा सुहृदांचेही भय नाही, तो श्रीकृष्ण प्राप्त झालाच तर कोणाचे भय व न प्राप्त झाला तरी कोणाचे भय ? पण कोणीही मानव जोपावतो तीन गुणांत वावरत असतो तोपावेतो त्याला वरीलप्रमाणे लोकेषणा इत्यादी गोष्टीची बाधा होतच राहणार, म्हणून त्याचा आणि या गुणाचा संबंध तुटला पाहिजे, नव्हे, तो तोडला पाहिजे हे सांगण्याकरिता 'निस्त्रैगुण्योभवति' असे नारद म्हणतात. जसा लोकबंध आहे म्हणून तो नष्ट करावयाचा तसा गुण हाही बंधच आहे हे श्रीकृष्ण भगवान अर्जुनास स्पष्ट सांगून गेले.
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम ॥ १४-५
'सत्त्व, रज, तम हे गुण प्रकृतीपासून झालेले आहेत व हे देहातील जो देही अविनाशी आत्मा त्याला बांधून टाकितात.'

सत्त्वगुण सुखसंग व ज्ञानसंगाच्याद्वारा बांधतो, रजोगुण हा आसक्ती काम याच्या द्वारे बांधतो. तमोगुण पूर्ण अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवास बांधतो. हे बंधन वर दिसत नाही. तर आत अंतःकरणतादात्म्यापन्न जो जीव त्याला असते. जीवही आत म्हणून त्याला बाधणारे हे गुणही आतच असतात. गुण शब्दाचा दोरी असाही अर्थ होतो. दोरी हे बंधनाचे साधन आहे, हे प्रसिद्ध आहे. स्वतंत्र अशा जीवास बंधन केव्हाही आवडत नाही. पण पराधीनपण तो अज्ञानामुळे त्यात अडकतो.

जसा मासा हा आमिषाच्या आशेने स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणाच्या जाळ्यात अडकतो. या विषयाचा विशेष सविस्तर विचार गीतेच्या चौदाव्या अध्यायात केला गेला आहे. गुण म्हणजेच सर्व संसार आहे. कारण सचेतन-अचेतन सर्व सृष्टीही गुणात्मकचआहे, असेच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. भक्ताला गुणातीत बनावयाचे असते. त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्तियोगाचा आश्रय करावयाचा असतो. तसेच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात. तोही भक्तिमार्गाला प्रतिबंधक आहे म्हणून नारद 'निस्त्रैगुण्यो भवति' असे म्हणतात.

गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला 'निस्त्रैगुण्यो भवार्जुन' हे अर्जुना, तू निस्त्रैगुण्य त्रिगुणधर्मरहित हो' असेच सांगतात. कोणी म्हणेल, गुणबंधनात अडकलेला जीव स्वसामर्थ्याने गुणाच्या बंधनातून मुक्त कसा होईल ? इतकेच नव्हे तर मागे जी भक्तिप्राप्तीची श्रवण, कीर्तन, भजन, एकांतवास इत्यादी साधने सांगितली आहेत; ती साधने आचरणात आणण्याकरिताही गुणाची आवश्यकता आहे, हे खरे आहे. या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णानी उद्धवास उपदेश करते वेळी दिले आहे.
सत्त्वं रजस्तम इति गुणाबुद्धेर्नचात्मनः ।
सत्त्वेनान्यतमौहन्यात्सत्त्वं सत्त्वेन चैव हि ॥ १ ॥ ए. भा. १३

भगवान म्हणाले, सत्त्व, रज, तम हे गुण बुद्धीचे आहेत. केवळ आत्म्याचे नाहीत. सत्वगुणाची वाढ करून रजोगुण व तमोगुण याचा नाश करावा. नंतर सत्त्वगुणाचाही शुद्धसत्त्वाने निरास करावा इतकेच नव्हे साधनात्मिका भक्ती हीदेखील सत्त्वगुणाचा अवलंब करूनच होते.
सत्त्वाद्धर्मो भवेद्वृद्धात्पुंसो मद्‍भक्ति लक्षण ॥
सात्त्विकोपासया सत्त्वं तो धर्म प्रवर्तते ॥ २ ॥ भाग ११ - १३

'सत्त्वगुणाची वाढ झाली असता, श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते हेच खर्‍या धर्माचे लक्षण आहे, सात्त्विक पदार्थाच्या उपासनेने सत्त्वगुण वाढतो आणि तो वाढल्यानंतरच शुद्ध धर्माची प्रवृत्ती होते.'

सत्त्वगुणाची वृद्धी हाच श्रेष्ठ धर्म आहे. ती वृद्धी रज व तम या दोन गुणांचा नाश करते, व त्यामुळे अंतःकरणातील सर्व विकार दूर होतात आणि भगवद्‌भाव निर्माण होण्यास साहाय्य होते. असा सत्त्वगुण वाढण्यास खालील दहा गोष्टी कारणीभूत होतात. आगम, (शास्त्र) वाराणसी इत्यादी तीर्थे योग्य संतती, पवित्र देश, कर्मोचित काल, विहितकर्म, योग्य कुळात जन्म, भगवद्‌ध्यान, मंत्र तसेच उचित संस्कार या गोष्टी कारणीभूत होतात, म्हणूनच वर महानुभावसेवा, एकान्तवास इत्यादी साधने सत्वबुद्धीकरिताच सांगितली आहेत.

सात्त्विक द्रव्ये सेविता । सत्त्ववृद्धी होय तत्त्वता ।
सत्त्ववृद्धी पुरुषी होता । धर्म स्वभावता प्रवर्ते ॥ १६१ ॥
धर्मप्रवृत्ति माझे भजन । माझ्या भक्ति उल्हासे जाण ।
भक्तासी मी होय प्रसन्न । तैं स्वभावे ज्ञान प्रकाशे ॥ १६२ ॥ ए. भा. १३.

आता सत्त्वगुणही सुखसंग व ज्ञानसंग यांच्या द्वारे जीवाला बंधनात अडकवणाराच आहे हे जरी खरे असले तरी 'सत्त्वं सत्त्वेन चैवहि' असे वर म्हटलेच आहे त्याप्रमाणे त्या सत्त्वाचाही अहंकार साधकाने टाकून दिला की तोही बाधक होत नाही व तो सात्त्विक अहंकार टाकून तो भक्त 'निस्त्रैगुण्य' होतो. श्रीकृष्णानी गुणातीत म्हणजे गुणांचे अतिक्रमण करण्याचे साधन माझी भक्तीच आहे असे स्पष्ट सांगितले आहे.
मांचयोऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते ॥ गीता. १४-२६

'अर्जुना, अव्यभिचारी भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणाच्या पूर्ण पलीकडे जाऊन, त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त होते.' तरी व्यभिचारहित चित्ते । भक्तियोगे माते । सेवी तो गुणाते । जाकळू शके ॥ ३७१ ॥ ज्ञा. अशा रीतीने ज्याला मायेतून तरावयाचे त्याने गुणाचे अतिक्रमण केले पाहिजे कारण माया म्हणजेच गुण 'गुणमयी' हे तिचे स्वरूप आहे.

संसारामध्ये बहुतेक जीवाना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का व प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी व प्राप्त आणि अनुकूल वस्तूचा नाश न व्हावा, त्या आपल्या म्हणून आपणाजवळ अखंड राहाव्या या भावनेला योगक्षेम म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व प्राप्ताचे रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योग-क्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसे गढून गेलेली आहेत. तसेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत, व ते प्राप्त होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहावे लागते. नाना प्रकारची शुभाशुभ कर्मे करीत रहावे लागते आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरिताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधकदेखील या योग-क्षेमाच्या चिंतेने ग्रस्त होणे शक्य आहे. सर्वसामान्याचा येथे विचार नाही, ते तर 'चिंतामपरिमेया च प्रलयाता मुपाश्रिताः । आशापाशशतैर्बद्धा कामक्रोध परायणाः ॥' मरणानेही न संपणार्‍या अशा अमर्याद चिंतेने ग्रासलेले असतात. शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण असेच सर्व असतात.' (गीता अ, १६, ११, १२)

पण ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्या साधकाने आपल्या देहभरण - पोषणाची म्हणजेच लौकिक योग-क्षेमाची चिंता ठेवू नये. कारण देहाचे भरण - पोषण झाले तरी तेवढ्याने सर्व पुरुषार्थप्राप्ती झाली असे नाही. त्या भरण-पोषणातूनही पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते जीवन अशांत बनवीत असतातच. गीतेमध्येही 'निर्योग क्षेम आत्मवान्' 'तू योग-क्षेमाची चिंता न वहाणारा व आत्मवान बन' असे श्रीकृष्णानी अर्जुनाला सांगितले आहे. तसेच जो भगवद्‌भक्त आहे, तो भोजन-आच्छादन याची चिंता करीत नाही, त्याची ही दृढभावना असते की जगाची जो चिंता वहातो तो आमची उपेक्षा करील काय ?

भोजनाच्छादने चिंतां वृथा कुर्वन्ति वैष्णवाः ।
योऽसौ विश्वंभरो देवः सभक्तान्किमुपेक्षते ॥
अर्थ वर आलाच आहे. जन्म पावणार्‍या बालकाच्या जन्माच्या अगोदर तो मातेच्या स्तनात दुग्ध निर्माण करतो.

जो सर्व जगाचा गती, भर्ता, प्रभू असा तो आहे, त्याचे तर प्रतिज्ञावाक्य प्रसिद्ध आहे - योगक्षेमं वहाम्यहम् ॥ गी. ९-२२
'जे भक्त माझे अनन्य चिंतन करीत माझीच उपासना करीत असतात, असे अखंड माझ्या ठिकाणीच जे दृढ भावना ठेवून राहणारे आहेत, श्रीकृष्ण सांगतात अर्जुना ! त्यांचा योगक्षेम मी वहातो' "हा योगक्षेम आघवा । तयाचा मजचि पडला पांडवा । ज्याचिया सर्व भावा । आश्रय मी ॥ ज्ञा. ९-३४३.

अनन्य भक्त देवाने आपला योगक्षेम चालवावा असे म्हणत नाही. आपल्या अदृष्टानुसार जसा देहाचा व्यवहार होईल तसा होऊ दे, कारण त्याने संगत्याग केलेला असतो.

म्हणजेच तो स्वतः लौकिक व्यवहार चालण्यास कारण अशा योगक्षेमाची अपेक्षा करीत नाही. अन्न आच्छादन । हें तो प्रारब्धा आधीन । तुकाराम । भगवान आपल्या अनन्य भक्ताचा योगक्षेम चालवतो याचा अर्थ लौकिक देहनिर्वाहास लागणार्‍या वस्तू पुरवतो असा नाही.
तया माझिया सायुज्याची चाड । तरी तेचि पुरवी कोड ॥
कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुये ॥ ज्ञां. ९-३४१

सायुज्य मोक्ष अथवा भगवत्प्रेम यापैकी जे त्याला अपेक्षित असेल ते देणे व दिलेल्याचे रक्षण करणे या प्रकारचा योगक्षेम देव चालवितो व तो अनन्य प्रकारे चिंतन करणार्‍यांचा. जर लौकिक योगक्षेमाची भक्त अपेक्षा करील तर तो अनन्य कसा होईल ? म्हणून येथे 'योगक्षेमं त्यजति' या वाक्याचा अर्थ सर्व संसारी मानवमात्रांना जी देहनिर्वाहार्थ अन्नवस्त्रादिकाची अपेक्षा असते ती त्याला नसते.

निर्वाहापुरते अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोपी गुहा ॥
कोठेही नसावे चित्तासी बंधन । हृदयी नारायण आठवावा ॥ तुकाराम ॥


GO TOP