नारद भक्तिसूत्रे

यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्ंवद्वो भवति ॥४८॥


अर्थ : (मायेतून कोण तरतो ?) जो कर्मफलाचा त्याग करतो. (इतकेच नव्हे तर) सर्व कर्मांचाही त्याग करतो नंतर (म्हणजे कर्मफल व कर्मत्यागानंतर) जो निर्द्वंद्व सुखदुःखादि द्वंद्वरहित होतो.


विवरण : मागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात. तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफलाचा आस्वादु । या दोहीचे नांव बंधु । कर्माचौकी ॥ ज्ञा. १८-२०५. या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे । वृत्ती ऐसे मन धरिती । मना ऐसी क्रिया करिती । केलिया ऐसे बरिती । मरोनि देहे ॥ ज्ञा. १७-५८

मानव कर्मफलासक्तीने भारला गेला की त्याला परमार्थ गोड लागत नाही. तो त्या बंधनात अंतर्बाह्य अडकून पडतो.
ऐसे इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ ।
जे केले भोगवी फळ । बांधोनिया ॥ ज्ञानेश्वरी १८-१०० असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच 'कर्मफलंत्यजति' याचा अंतर्भाव होतो. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनास अनेक अध्यायांतून फलत्याग सांगितला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । २-४७ अशा फलहेतुविवर्जित केलेल्या कर्माचे फल जन्ममरणात्मक बंधनिवृत्ती व निरामय पदप्राप्ती म्हणजेच मायातरण सांगितले आहे.

कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदंगच्छन्त्यनामयम ॥ २-५१
'बुद्धियोगाचा अवलंब करणारे पुरुष कर्मजन्य फलाचा त्याग केल्याने ज्ञानी होऊन जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व निरामय अशा मोक्षपदाला जातात.'

गीतेच्या दुसर्‍या अध्यायात चाळीस ते एक्कावन्न श्लोकापावेतो हा विषय सविस्तर सांगितला आहे, तसेच पाचव्या अध्यायात कर्मफलाचा त्याग करणारा योगी पुरुष हा नैष्ठिकी-श्रेष्ठ अशी शांती मिळवितो. युक्तःकर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् । ५-१२ असे म्हटले आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी आत्मयोगे आथिला । जो कर्मफळाशी विटला । तो घर रिघोनी वरिला । शांती जगी ॥ ७१ ॥ गीतेच्या बाराव्या अध्यायात या फलत्यागाचे फार श्रेष्ठत्व ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिले आहे.

आणि जेणे जेणे वेळे । घडती कर्मे सकळे ।
तयांची तिथे फळे । त्यजितु जाय ॥ १२८ ॥
वृक्ष कां वेली । लोटती फळे आली ।
तैसी सांडी निपजली । दानपुण्ये ॥ १२९ ॥
अगा आत्मजेच्या विषी । जीव जैसा निरभिलाषी ।
तैसाकर्मी अशेषी । निष्काम होये ॥ १३२ ॥
अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु ।
परियोगामाजी योगु । धुरेचा हा ॥ १३४ ॥ ज्ञा. १२
या फलत्यागाचे श्रेष्ठत्व एवढे मोठे आहे की श्रीकृष्ण भगवान त्याला सर्व योगामध्ये हा श्रेष्ठ योग आहे असे म्हणतात. किंबहुना 'त्याग' या शब्दाचा मुख्य अर्थ कर्मफलत्याग हाच आहे. सर्व कर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः । गीता १८-२ असे श्रीकृष्णच सांगतात. म्हणजे कर्मफलत्याग हे एक भक्तिमार्गात मायातरणाचे महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच श्री नारद 'यः कर्म फलं त्यजति' असे म्हणतात.

भक्तिमार्गामध्ये फलत्याग याचा थोडासा वेगळा अर्थ केला जातो, ते फळ ईश्वरार्पपण करणे, कारण सर्व कर्माचा यथार्थ रूपाने कर्ता जर तो आहे तर त्याचा भोक्ताही तोच आहे, समुद्रातूनच मेघांना पाणी मिळते व मेघांनी वर्षाव केल्यावर ते पाणी पुन्हा समुद्र आपल्या पोटात समाविष्ट करून घेतो, तद्वत भक्त सर्व कर्मांचा कर्ता जर भगवानच आहे असे समजतो तर फळभोक्ताही तोच आहे. म्हणून फळेही त्यालाच समर्पण करतो.

श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात -
कर्मफळ ईश्वरी अर्पे । तत्प्रसादे बोध उद्दीपे ।
तेथ रज्जुज्ञाने लोपे । व्याळशका ॥ २२८ ॥
तेणे आत्मबोधे तैसे । अविद्येसी कर्मनाशे ।
पार्था त्यजिजे जै ऐसे । तै त्यजिले होय ॥ २२९ ॥
म्हणोनि इयापरी जगी । कर्मे त्यजीतो महात्यागी ।
येर मूर्छने नाव रोगी । विसावा जैसा ॥ २३० ॥ ज्ञा. १८
कर्मफळ ईश्वरास समर्पण करणे व त्याच्या प्रसादाने ज्ञान प्राप्त झाले असता मूळ अविद्येसह त्या कर्माचा जो त्याग तोच खरा त्याग आहे. वरवर झालेला त्याग म्हणजे रोग्याला मूर्च्छा आली व तो स्वस्थ पडला असता रोग्यास आता बरे वाटते तो विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

इतकेच नव्हे तर पुढे 'कर्माणि संन्यसति' असे म्हटले आहे. कर्तृत्वमद व फलास्वाद हे दोन कर्मबंध आहेत असे वर सांगितले आहे. फलापेक्षा जर गेली तर कर्तृत्वबुद्धीही हळुहळु मावळते व ती मावळल्यावर कर्मे कशी होतील ? कर्माचे २ प्रकार आहेत. एक देहनिर्वाहाकरिता केले जाणारे दृष्टफलक कर्म श्वासोच्छवासापासून ते दैहिक, ऐंद्रियिक, आहार-विहारदिक, व देहनिर्वाहापेक्षा अधिक ज्यांचे दृष्ट अदृष्ट फल आहे अशी श्रुति-स्मृतिप्रतिपादित विहित कर्मे साधक अथवा भक्त, ज्ञानी, योगी कोणीही असो, देहनिर्वाहाकरिता आवश्यक असणारी कर्मे तो करीतच असतो, ती तो टाकू शकत नाही व ती टाकावी असे कोणी विचारी पुरुष सांगूही शकणार नाही. कारण सांगणार्‍यालाही टाकणे शक्य नाही, तसेच मूळ सूत्रात 'कस्तरति मायां' म्हणजे मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न आहे. तो साधक विषयकच मानणे योग्य आहे, म्हणूनच न हि देहभृता शक्यं त्युक्तु कर्माण्यशेषत । गीता. १८ - ११ 'म्हणजे देह धारण करणार्‍यास संपूर्ण कर्माचा त्याग करणे शक्य नाही असे श्रीकृष्ण सांगतात. इतकेच नव्हे तर 'कोणीही क्षणभरही कर्माविना राहू शकत नाही' असे तिसर्‍या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात. तसेच कर्मत्यागही दोन प्रकारचा - साध्यप्राप्तीनंतर व साधकदशेत होणारा. येथे साधक दशेतील त्याग घेणे योग्य आहे.

सिद्धदशेत कर्म ब्रह्मरूप होते. तो कर्मे करूनही अकर्ताच असतो. पार्थां तयाचे ठायी । हे आघवेचि आथिपाही । परी कर्ता नव्हे काही । प्रतीति बळे ॥ ५-१४६ ॥ असे श्रीकृष्ण सांगतात. सर्व कर्मे करूनही तो कर्मत्यागीच नव्हे तर अकर्ताच असतो, हे गीतेमध्ये अनेक स्थळी स्पष्ट केले आहे. आता साधकाचा कर्मत्याग पाहू.

नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त असे चार प्रकारचे जे कर्म आहे त्यांत साधकाने काम्य कर्मे करावयाची नाहीत. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. उचित कर्मांचा त्याग करून नैष्कर्म्य होऊ पाहणार्‍यांचा गीतेमध्ये निषेध केला आहे. जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊ पाहती । परी कर्मेंद्रिय प्रवृत्ति । निरोधुनि ॥६४॥ तया कर्मत्याग न घडे । जे कर्तव्य मनी सापडे । वरी नटती ते पुढे । दरिद्र जाण ॥ ६५ ॥ ज्ञा. ३ तो कर्मत्याग नसून 'मिथ्याचार' आहे असे गीतेच्या तिसर्‍या अध्यायाच्या सहाव्या श्लोकात श्रीकृष्णानी म्हटले आहे. खरा कर्मत्याग कसा होऊ शकतो याचे श्रीज्ञानेश्वर महाराजानी विवेचन केले आहे.

जो अंतरी दृढु । परमात्मरूपी गूढु ।
बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥६८॥
जो इंद्रिया आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी ।
प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जे जे ॥६९॥
तो कर्मेंद्रिये कर्मी । राहटता तरी न नियमी ।
परी तेथीचेनि ऊर्मी । झाकोळे ना ॥७०॥ ज्ञानेश्वरी ३.

विचाराने पाहिल्यास कर्मत्याग तीन प्रकारचा गीतेमध्ये सांगितला आहे. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो, पण असा त्याग विहित कर्माचा कोणी करू नये असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. की स्वभावे आले विभागा । ते कर्मचि वोसंडी पै गा । परी झणे आतळा त्यागा । तामसा तया ॥१८-१८३॥ तसेच ही विहितकर्मे करणे म्हणजे कष्टाचे आहे. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस म्हणतात. पण अशा भयाने केलेल्या कर्मत्यागाला खर्‍या त्यागाचे फळ प्राप्त होत नाही, तर कर्तव्य म्हणून जे विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून केले जाते त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.

कारणासहित कर्म संपले पाहिजे तरच त्या कर्मत्यागास मोक्ष हे फळ प्राप्त होते. तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्ष फळासी ॥ १८- १९० ज्ञा. असे श्रीकृष्ण सांगतात.

म्हणून 'कर्माणि संन्यसति' असे जे सूत्रात म्हटले आहे, तो कर्मसंन्यास वाटतो तेवढा सोपा नाही. भक्तिमार्गात कर्मत्यागाचा विचार करताना ती कर्मे भगवंताला समर्पण करणे यालाच महत्त्व दिले आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । गी. ३-३० 'चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून माझ्या ठिकाणी सर्व कर्मे समर्पण करून - असे श्रीकृष्ण सांगतात. गीतेच्या नवव्या अध्यायात स्पष्टच सांगितले आहे-
यत्करोषि यदश्‍नासि यज्जुहोषि ददासियत् ।
यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पपुणम् ॥२७॥
'हे अर्जुना, त् जे जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मला समर्पण कर' व अशा कर्मसमर्पणाचे फळही पुढील श्लोकात सांगितले आहे -
शुभाशुभ फलैरेवं मोक्ष्यसे कर्मबंधनैः ।
संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥२८॥

'अशा प्रकारे कर्म केले असता कर्माची शुभाशुभ फलरूप बंधने त्यापासून अर्जुना, तू मुक्त होशील. मगच खरा कर्मसंन्यास होईल, आणि कर्मबंधनापासून मुक्त झालास म्हणजे माझ्या समीप येशील.'

तसेच अठराव्या अध्यायातही,
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणी मद्व्यपाश्रयः ।
चेतसा सर्व कर्माणि मयि सन्यस्य मत्परः ॥ गी. १८ श्लोक ५६, ५७ इत्यादी श्लोकांतून हीच गोष्ट सांगितली आहे.

या कारणे गा तुवा । सर्वकर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपी धनंजया । संन्यास कीजे ॥ ज्ञा. १८- १२६०

अशा भगवदर्पण बुद्धीने सर्व कर्मे करणे हाच खरा कर्मसंन्यास होय, या कर्मसंन्यासाने कर्मच ब्रह्मरूप होते. कर्मफलत्याग, कर्मसंन्यास सांगितल्यानंतर त्याचे फल सूत्राच्या शेवटच्या वाक्यात नारद सांगतात. 'ततो निर्द्वंद्वो भवति' तो साधक भक्त "निर्द्वंद्व" होतो. मानवी जीवनात सुखदुःख, पापपुण्य, धर्माधर्म, शीतोष्ण, शत्रु-मित्र, आपपर, मानापमान, प्रियअप्रिय अशी अनेकविध द्वंद्वे अखंड व्यापून आहेत. किंबहुना द्वंद्वबाधा म्हणजेच मानवी जीवन असे समीकरण होऊन बसले आहे. या द्वंद्वात अडकल्यामुळे अनुकूल-प्रतिकूल बुद्धी होते. द्वंद्वे आली की ती सर्वांना सर्वच अनुकूल नसतात अथवा प्रतिकूल नसतात. त्यात अनुकूल जे असेल किंवा वाटेल त्याच्या स्वीकाराची व प्रतिकूल जे असेल त्याच्या त्यागाची प्रवृत्ती होत असते. त्या प्रवृत्तीमुळे जे प्रतिकूल ते सर्व टाकले जातेच असे नाही व अनुकूल सर्व संपादित होतेच असे नाही. त्यातून अनेक संघर्ष निर्माण होतात. तसेच सुखदुःख, लाभ-हानी यांच्या ठिकाणी कधी व्यभिचारही दिसून येतो. एकाला एका वेळी जे सुख ते अन्याला दुःख होते. किंबहुना ज्याचे त्यालाही स्थल-काल भेदाने विपरीत प्रत्ययाला येते. यातूनच शुभाशुभ कर्मप्रवृत्ती निर्माण होते, म्हणजे जे कर्म एकाला अनुकूल फलाकरिता कारण वाटते तेच अन्याला प्रतिकूल वाटत असते. जे एकाला प्रतिकूल तेच दुसर्‍याला अनुकूलही वाटणे शक्य आहे. यासच व्यभिचार दोष म्हणतात.

म्हणजे संसारी मनुष्य अशा द्वंद्वात सापडून कसा दुःखी होतो याचे उत्तम वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या अध्यायात केले आहे.
आणि मातलिया सागरी । मोकलिलिया तरी ।
लाटांच्या येरझारी । आंदोळे जेवी ॥८०४॥
तेवी प्रिय वस्तु पावे । आणि सुख जो उंचावे ।
तैसाचि अप्रियासवे । तळवटु घे ॥८०५॥
ऐसेनि जयाचिये चित्ती । वैषम्याची वोखळती ।
वाहे तो महामती । अज्ञान गा ॥८०६॥ ज्ञा.
यासच द्वंद्वबाधा म्हणजेच संसारधर्म म्हणतात. यातून अज्ञानी अभक्त जीवाची कधीच सुटका होत नाही. जे भगवद्‌भक्त असतात तेच या सर्व द्वंद्वातून बाहेर पडलेले असतात.

म्हणून गीतेमध्ये ज्ञानी तसेच भक्ताच्या लक्षणवर्णनात 'द्वंद्वैर्विमुक्तः सुखदुःखसंज्ञैः । १५-५ समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियोधीरस्तुल्य निंदात्म संस्तुतिः ॥२४॥ मानापमान योस्तुल्यः । तुल्योमित्रारिपक्षयोः । २५ गीता अ. १४ यावरील ज्ञानराजांची विस्तृत व भावगर्भ टीका मुळातून वाचणे.

भक्तलक्षणात बाराव्या अध्यायातही, समःशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः । शीतोष्ण सुखदुःखेषु समस्संग विवर्जितः ॥ १८ ॥ तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन केनचित ॥ १९ ॥ इ. निर्द्वंद्व होणे म्हणजे त्याच्या अंगी द्वंद्वे आढळत नाहीत असे नाही, कारण शरीर, इंद्रिये, विषयभोग हे सर्व त्याच्या ठिकाणी असतातच म्हणजे द्वंद्वाची कारणे आहेत पण तो निर्द्वंद्व होतो. याचे कारण सर्व द्वंद्वे ही कर्मफलस्वरूप असतात, कर्मजन्य असतात. सूत्राच्या आरंभी हा साधक कर्मफलाचा त्याग करतो (यः कर्मफलं त्यजति, कर्माणिसंन्यसति) कर्माचाही संन्यास करतो असे म्हटले आहे. म्हणजे द्वंद्वाचा आधारच नष्ट झाला म्हणून तो निर्द्वंद्व होतो, असे नारद म्हणतात. या निर्द्वंद्व अवस्थेचे वर्णन श्रीज्ञानेश्वर महाराजानी सदृष्टांत केले आहे ते पाहिल्यास योग्य कल्पना येईल. पै आयुष्य हीना जीवाते । शरीर सांडी जेवी अवचिते । तेवी निदसुरे द्वैते । सांडिले जे ॥ २९१ ॥ लोहाचे साकडे परिसा । न जोडे अंधार रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुष्काळ जया ॥ २९२ ॥ अगा सुखदुःखाकारे । द्वंद्वे देही जिये गोचरे । तिये जया का सामोरे । होतीचिना ॥ २९३ ॥ स्वप्नीचे राज्य का मरण । नोहे हर्ष-शोकासी कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥२९४॥ तैसे सुखदुःखरूपी । द्वंद्वी जे पुण्यपापी । न घेपिजती सर्पी । गरुड जैसे ॥ २९५ ॥ ज्ञा. अ. १५

जो द्वंद्वाच्या बाधकतेत सापडलेला आहे तो मायानदीत बुडत आहे असे समजावे. जो या सर्व द्वंद्वांचे अतिक्रमण करून जातो तो मात्र मायेत बुडू शकत नाही.
गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील पंचेचाळिसाव्या श्लोकात असे 'निस्त्रैगुण्योभव', 'निर्योगक्षेमवान् भव', 'आत्मवान भव', तसेच 'निर्द्वंद्वो भव' असेही श्रीकृष्णांनी सांगितले आहे ते मायेतून तरून जाण्याची अपेक्षा करणार्‍या सर्वच साधकांकरिता सांगितले आहे. मागील दोन सूत्रांतून संगत्याग, महानुभावसेवा, एकांतसेवन, लोकबंध उन्मूलन, निस्त्रैगुण्यता, योगक्षेमत्याग, कर्मफलत्याग, कर्मत्याग झाल्यानंतर (ततः) निर्द्वंद्व होतो असे नारद म्हणतात. म्हणजे निर्द्वंद्वता ही भूमिका मागील दोन सूत्रांत सांगितलेल्या साधनानंतर सिद्ध होणारी महत्त्वाची भूमिका आहे हे सिद्ध होते.


GO TOP