नारद भक्तिसूत्रे
कस्तरति कस्तरति मायाम् ? यः सङगान्स्त्यजति यो
महानुभावं सेवते, निर्ममो भवति ॥ ४६ ॥
अर्थ : (प्रश्न) मायेतून कोण तरून जातो ? कोण तरून जातो ? (उत्तर) जो सर्व संगांचा त्याग करतो, जो महान (श्रेष्ठ) आहे अनुभव ज्यांचा अशा महात्म्या पुरुषांची सेवा करतो व जो निर्मम म्हणजे कोठेही माझेपणाचा अभिमान ठेवीत नाही. (तो मायेतून तरून जातो.)
विवरण : आतापावेतो मागील सूत्रातून दुःसंग हा कसा बाधक आहे व कामादिकांच्या द्वारे सर्वनाशास कारण आहे हे सांगितले. पण या सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे. केवळ कामक्रोधादिकांचा नाश झाला पण त्यांचे मूळ जी माया ती राहिली तर तिच्यापासून पुन्हा सर्व संसार निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून माया-तरण झाले पाहिजे. ते कोण करू शकतो याचा विचार या सूत्रात केला आहे. प्रथम माया म्हणजे काय पाहिले पाहिजे. उपनिषदे, पुराणे, स्मृती, गीता व संत-वाङ्मयातून, तसेच शास्त्रकारांच्या दर्शन-ग्रंथातून मायेचा फार विचार केला आहे. माया शब्दाचे अनेक अर्थ कोशातून सापडतात.
मायाविक्षिपदज्ञानमीशेच्छा वशवर्ति वा ॥
विक्षेप, अज्ञान, ईशेच्छा इत्यादी रूपाने माया शब्द वापरला जातो. तसेच ऐंद्रजालाप्रमाणे अघटित घडवून आणणार्या शक्तीसही माया म्हटले जाते. या मायेचीच अविद्या, प्रकृती, प्रधान, कल्पना, संसार, भ्रम इत्यादी नावे कार्याच्या सापेक्ष दिली आहेत. शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून संसारात अडकवणारी ती माया असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे.
'तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव ।
परि मायायोगे जीव । दशे आले ॥ ७-६६ ॥
मायेच्या दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत. आवरण आणि विक्षेप. आवरणशक्तीने चैतन्याच्या विशेष स्वरूपास झाकून ती त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पाडते हेच अज्ञान. 'आपुला आपणपया । विसरू जो धनंजया । तेचि रूप यया । अज्ञानासी ॥' ज्ञा. १४-७१. तसेच ही माया आपल्या विक्षेपशक्तीने ब्रह्मांडस्वरूप सर्व सृष्टी उत्पन्न करते. तसेच जीवाला देहद्वयाचा अहंकार घ्यावयास लावून त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोर्क्तृत्वादी धर्माचा तादात्म्य अध्यास निर्माण करते; असे वेदांतग्रंथांतून म्हटले आहे. माया ही भगवंताची सद्सद्विलक्षण अशी अनिर्वचनीय शक्ती आहे.
सत् म्हणो तरी तत्काळ नासे । असत् म्हणो तरी आभासे ।
जिणे नामरूपांचे पिसे । लाविले असे जगासी ॥ १०३ ॥
नातुडे संतासंत बोली । माया अनिर्वचनीय झाली ।
तिणे विद्या अविद्या इये पिली । पाढविली निजपक्षी ॥१०४॥' एकनाथी भागवत अ. ११.
जीवाला दुःख शोकात्मक संसार भोगण्याचे कारण केवळ मायाच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. 'दुःख शोकाचिया घाई । मारिलिया सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥' ज्ञा. ७-१०७ भागवत एकादश स्कंधाच्या तिसर्या अध्यायात राजा विदेहाने नव योगेश्वरांस मायेबद्दल प्रश्न केला आहे. त्याच्या उत्तरात मायेचे फार विस्तृत वर्णन अनेक श्लोकातून केले आहे.
माया म्हणवी येणे भावे । जे मी कदा विद्यमान नव्हे ।
यालागी अविद्या येणे नावे । वेदानुभवे गर्जती शास्त्रे ॥ ४१ ॥
भ्रम तो मायेचे निजमूळ । भ्रांति हेचि फूल सोज्वळ ।
भुली ते इचे साजुक फळ । विषय रसाळ सदाफळित ॥ ४२ ॥
हे नसतेचि रूपे रूपा आली । सत्यासत्ये गरोदर झाली ।
तेथे असत्याची पिली । स्वये व्याली असंख्य ॥ ४३ ॥
वासना विषयगुणी । गुंफिली मिरवे लेणी ।
मीपणाच्या तरुणपणी । मदन मोहिनी चमके ॥ ४४ ॥
अहं मोह ममता योगे । जग विस्तारले अंगे ।
स्थूळ सबळ प्रयोगे । ममता निज अंगे वाढवी ॥ ४५ ॥
संकल्प विकल्पाची काकणे । बाणोनि मन दिधले आंदणे ।
घालोनि त्रिगुणाचे ठाणे । माया पूर्णपणे थोरावे ॥ ४६ ॥ एकनाथी भागवत अ. ३
आणखीही पुष्कळ वर्णन विस्तारपूर्वक केले आहे. दुसर्या अध्यायात मायेचे स्वरूप नवयोगेश्वर सांगतात, 'अज्ञानाचे मूळ माया । जे ब्रह्मादिकांनये आया । गुणमयी लागली प्राणिया । जाण ते राया अतिदुस्तर ॥४५९॥ त्या मायेचे मुख्य लक्षण । स्वस्वरूपाचे आवरण । द्वैताचे जे स्फुरे स्फुरण । मूळ माया जाण तिचे नाव ॥४६०॥ ते मायेच्या निजपोटी । भयशोक दुःखांचिया कोटी । ब्रह्माशिवादीचे लागे पाठी । इतराची गोठी ते कोण ॥४६१॥' एकनाथी भागवत २.
सूत्रात 'तरति' हे क्रियापद घेतले आहे ते महत्त्वाचे आहे. तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाणे, तिचे अतिक्रमण करणे या अर्थी होत असते. गीतेमध्येही सातव्या अध्यायात 'मायामेतां तरन्ति ते' असे म्हटले आहे. पोहणे ही क्रिया एखाद्या नदीतून, सामान्य जलाशय, तळे, विहीर, इत्यादिकांतून होत असते. ती अल्पकाळ श्रमपरिहाराकरिता होते. पण पोहणे व तरणे यांत अंतर मानावे लागते. जलाशय, तळे, विहीर इत्यादिकांत पोहणारा जेथे पोहण्यास प्रारंभ करतो तेथेच परत येतो. पण तरून जाणे म्हणजे एका तीराहून निघून मधला पाण्याचा भाग ओलांडून परतीराला जाणे. याकरिता महानदी किंवा समुद्रच घ्यावा लागतो. म्हणून अनेक ग्रंथांतून या मायेलाच मायानदी भवसागर असे म्हटले आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला या मायेचे स्वरूप स्पष्ट सांगितले आहे.
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरन्ति ते ॥ गीता ७-१४
श्रीकृष्ण म्हणतात, 'ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरून जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात ते ही माया तरून जातात.'
या श्लोकातील 'तरन्ति' या पदाचे महत्त्व पटवून देण्याकरिता श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या मायेवर नदीचे यथासांग असे रूपक विस्तारपूर्वक सांगितले आहे. त्या सर्व ओव्या महत्त्वाच्या आहेत. त्याचा भावार्थ खाली दिला आहे.
'जी मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभुताचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला, जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने काळाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूप वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठाबाहेर वाहते, जी गुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते, जी द्वेषरूपी भोवर्याने दाट भरली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये प्रमदादी मोठे मासे चमकत आहेत, ज्या मायानदीत प्रपंचरूपी वळण आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहे आणि सुख-दुःखरूपी पुराड जिच्यावर तरत आहे, रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो, जिच्यात अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्या, धन व कुल या तीन मदाच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात, जिच्यात उदयअस्तांचे लोंढे जन्म-मृत्युरूप खळगे पाडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात व जातात. अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात, जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूपी गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला, अशा या मायानदीत तमोगुणाची एक मोठी धार असते. सत्त्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे, ही महानदी तरून जाण्यास फार कठीण आहे. जिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाही असा हा मायानदीचा पूर कोण तरून जाईल ?' एवढे वर्णन केल्यावर श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना या मायानदीसंधाने एक आश्चर्य आहे.
'येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो ।
तो तो अपावो । होय ते ऐक ॥ ज्ञा. ७-६९-८२.
असेच या मायेवर भवसागराचे विस्तृत रूपक एकनाथ महाराजांनी केले आहे ते अवश्य विचार करण्यासारखे आहे.
वसुदेव नारदाला म्हणतात,
मायाजळे भव-सागरू । भरला असे अति दुस्तरू ।
त्याचा उतरावया पैलपारू । होय तू तारू मुनिराया ॥ ९२ ॥
याचे सकळ जळ क्षार । माजी सावजे अनिवार ।
एकेएके चराचर गिळिले साचार निजशक्ती ॥ ९३ ॥
लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा ।
आदळती अविवेक तटा । धैर्याचिया काठा पाडित ॥ ९४ ॥
अहंकुवावो वाजता थोरू । अवघाचि खवळे सागरू ।
मी माझेनि गजरे घोरू । अतिदुर्धरू गर्जत ॥ ९५ ॥
नाना वासनांचा वळसा ॥ पाहेपा भवताहे कैसा ।
येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरवरा ॥ ९६ ॥
क्रोधाचे प्रबळ भरते । भरी द्वेषाचिया तरियाते ।
असूया तिरस्कारांची तेथे । चिडाणी उते अनिवार ॥ ९७ ॥
काम पर्वताची शिखरे । विषमे भासती अपारे ।
आशे इच्छेची वरी थोरे । झाडे विषांकुरे वाढली ॥ ९८ ॥
संकल्प विकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण ।
ब्रह्मद्वेषाचे नक्रपूर्ण । सागरी जाण तळपती ॥ ९९ ॥ एकनाथी भागवत २.
वरील ओव्यांवरून मायेची विशालता, भयानकता कळून येईल. अशा या मायेतून तरून जाणे सोपे नाही. यालाच संसारसिंधू म्हटले आहे.
तुकाराम महाराज म्हणतात,
संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे उल्लंघिता पार ।
बहुत वाहाविले दूर । नलगेचि तीर पैलथडी ॥ १ ॥'
'करिता विचार । तव हा दृढ संसार ।
ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्ये । तुकाराम ॥
अशी पुष्कळ प्रमाणे आहेत. मायेतून तरणे म्हणजेच मोक्ष, कैवल्य, निर्वाण, ब्रह्मप्राप्ती, बंधनाश, शोकतरण, मृत्यूल्लंघन, हृदय ग्रंथिभेद, संशयछेद, कर्मक्षय इत्यादी होय. सूत्राच्या आरंभी प्रश्नाच्या भाषेत श्रीनारद विचारतात, मायेतून कोण तरून जातो ? याचे उत्तरही पुढील पन्नासाव्या सूत्रापावेतो दिले आहे.
एकूणपन्नासाव्या सूत्राच्या शेवटी 'केवलं अविच्छिन्नानुरागं लभते' असे वाक्य आहे ते महत्त्वाचे आहे. मायेतून तरून जाण्याचे मुख्य साधन भक्तिप्रेम हेच आहे, याच भक्तीने भगवान प्रसन्न होऊन आपल्या भक्ताला आपण स्वतः तारून नेतो अशी त्याची, 'मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरन्ति ते ॥' गी. ७. 'तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात् ।' अनेक प्रतिज्ञा वाक्ये आहेत. त्या भक्तियोगाची पार्श्वभूमी तयार होण्याकरिता आणखीही काही साधने चार सूत्रांतून सांगितली आहेत. त्यात पहिले साधन, 'यः सङ्गान्स्त्यजति ।' जो सर्व संगाचा त्याग करतो हे आहे. संग, संबंध, उपाधी हे एकच. आपल्याहून स्वरूपाने भिन्न असून, प्रतिकूल असून, भिन्न व प्रतिकूल न वाटणारा असा जो विषय त्यालाच संग, संबंध अथवा उपाधी म्हणतात. त्या उपाधितादात्म्यामुळे, आसक्तीमुळे जीव हा तेथे अहंकार व ममत्व ठेवतो आणि त्यात अडकून पूर्णपणे बांधला जातो. हाच संसार होय.
अंतरंग व बहिरंग असे संगाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग स्त्री, पुत्र, वित्त, गृहक्षेत्रादी व अंतरंग काम-क्रोध, लोभ, अहंकारादि हे दोन्हीही जीवाला परमात्म्याकडे जाऊ देत नाहीत. वास्तविक वर पुत्र, वित्त, कलत्रादी विषय बहिरंग म्हटले आहेत. जोपावेतो देह आहे तोपावेतो यांचाही संबंध राहील, मग त्याग कसा होणार ? येथे संपूर्ण विषयांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत नाही. कारण स्वरूपाने ते बाधक नाहीत. बाधक अंश संग म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, अहंत्व, ममत्व, प्रियत्वबुद्धी होय. तीच साधकाला घातक असते, त्या आसक्तीचा त्याग म्हणजेच संगत्याग होय, पण या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी, अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच काय पण अंतःकरणचतुष्ट्य सर्व त्या विषयात रंगून जाते. असा हा संग दृढ झालेला आहे.
असे जरी आहे तरी जेव्हा अंतःकरणात विवेक निर्माण होतो तेव्हा अंतःकरण, बुद्धी, विषय यांचे अनित्यत्व पटते व एक वेळा अनित्यत्व, अनात्मत्व पटले म्हणजे तो साधक पुन्हा त्यात अडकला जात नाही. तो विवेक महात्म्यांच्या कृपेविना प्राप्त होऊ शकत नाही. 'चंद्र तेथे चंद्रिका । शंभू तेथे अंबिका । संत तेथे विवेका । असणे की जी ॥' ज्ञा. १८ असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून याच सूत्रात 'यो महानुभावं सेवते' असे नारद सांगतात.
येथे 'संगान्स्त्यजति' असे बहुवचन आहे.
संगाचे अंतरंग व बहिरंग असे दोन प्रकार वर सांगितले आहेत. बाह्यसंग काही अवांतर कारणाने म्हणजे दोषदृष्टीने सुटू शकतील पण फार बाधक असणारे अंतरसंग हे विना विवेक ज्ञानाच्या टाकले जाणार नाहीत. याकरिता ''यो महानुभावं सेवते" हे वाक्य सूत्रात आले आहे. येथे 'महानुभाव' हा शब्द महत्त्वाचा आहे. मागे अडतीस व एकूणचाळिसाव्या सूत्रात 'महत्' पद संतांच्याकरिता वापरले आहे. त्यांनाच येथे महानुभाव असे म्हटले आहे. महान म्हणजे मोठा आहे अनुभव ज्यांना, त्यांना महानुभाव म्हणावे. अनुभव हा एक जीवनाचा स्थायीभाव आहे. जीवनातून अनुभव वगळता येणार नाही. जीवन हे अनुभवस्वरूप असते. अनुभव हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. मुख्य ज्ञानाचे दोन प्रकार वेदान्तशास्त्रात सांगितले आहेत. स्मृती आणि अनुभव. प्रमाणापासून झालेल्या ज्ञानास अनुभव म्हणतात व अनुभवापासून जे संस्कार होतात त्या संस्कारांपासून जे ज्ञान होते ते स्मृतिज्ञान होय.
अनुभवातही यथार्थ-अयथार्थ, प्रमा अप्रमा (भ्रम) असे प्रकार आहेत. योग्य प्रमाणाने योग्य विषयाचे जे यथार्थ ज्ञान होते त्यास प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान म्हटले जाते. जेव्हा प्रमाणात दोष शिरतो, विषय अयोग्य असतो म्हणजे बाधित असतो. त्याचे जे ज्ञान ते अप्रमा (भ्रम) म्हटले जाते. दोरीवर जर एखाद्याला सर्पज्ञान झाले तर तो भ्रम होय. कारण तो दोरीच्या अज्ञानाने इंद्रियदोषादिकांमुळे झालेला असतो व कालांतराने राहत नाही म्हणजे सर्पभ्रम बाधित होतो. म्हणून तो अनुभवही बाधित, अप्रमा, भ्रम म्हटला जातो. संसारात काही अनुभव प्रमाणभूत म्हणजे खरे असतात व काही अनुभव अप्रमा म्हणजे भ्रमरूप असतात, निष्फल नव्हे बाधक असतात. अनेक विषयांचा अनुभव मनुष्य घेत असतो पण तो टिकत नाही. सुखप्रद होत नाही. तसेच विषय कार्य असल्यामुळे अल्प आहेत. "यदल्पंतन्मर्त्य" जे अल्प ते मर्त्य म्हणजे विनाशी असते असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. सामान्यच काय पण इंद्रादिक देवांच्या स्वर्गीय अलौकिक अनुभवालाही तुच्छता आहे. तेही अनुभव घेणारे महान म्हटले जात नाहीत. महान अनुभव म्हणजे ज्या अनुभवाचा विषय मोठा, प्रमाण निर्दोष व अनुभव घेणारा अधिकारी योग्य तो महान एक परमात्माच आहे. याचा विचार मागे आला आहे. त्याचा प्रत्यक्ष तादात्म्याने अनुभव भक्तांना येत असतो.
श्रीज्ञानेश्वर महाराजानी नवव्या अध्यायावरील टीकेत महानुभाव या पदाचे विस्तृत व्याख्यान केले आहे. ते म्हणतात-
जयांचिये चोखटे मानसी । मी होऊनी असे क्षेत्रसंन्यासी ।
जयां निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥१८८॥
जयाच्या आस्थेचिया सद्भावा । आंत धर्म करी राणिवा ।
जयाचे मन वोलावा । विवेकासी ॥१८९॥
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले ।
जे शांतीसी झाले । पल्लव नवे ॥ १९० ॥
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्य मंडपाचे स्तंभ ।
जे आनंद समुद्री कुंभ । चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्याते परते सर म्हणती ।
जयांचिये लीलेमाजी नीती । जियाली दिसे ॥ १९२ ॥
जे आघवाचि करणी । लेइले शांतीची लेणी ।
जयांचे चित्त गवसणी । व्यापका मज ॥ १९३ ॥
ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचे दैव ।
जे जाणोनिया सर्व । स्वरूप माझे ॥१९४॥ ज्ञा. ९
तसेच गीतेच्या सातव्या अध्यायामध्येही श्रीकृष्ण सांगतात-
हे समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीति रसाचा वोतला भावो ।
म्हणोनि भक्तामाजी रावो । ज्ञानिया तोचि ॥ ज्ञा. ७-१३६ ॥
वरील लक्षणाने युक्त पुरुषालाच 'महानुभाव' म्हटले जाते. या श्रेष्ठ लक्षणावरच संत, साधू, महात्मा यांचे महत्त्व अवलंबून आहे. अशा महानुभवी संत सत्पुरुषांची सेवा ही साधक भक्ताला मायानदीतून तारून नेणारी आहे. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवास उपदेश करते वेळी याच रूपकाने सांगितले आहे -
निमज्जोन्मज्जतां घोरे भवाब्धौ परमायनम् ।
सन्तो ब्रह्मविदः शन्तानौर्द्दढेवाप्सुमज्जताम् ॥ भा. ११,२६,३२.
जलात बुडणार्यांना जशी बळकट नौका तारून नेते त्याप्रमाणे या घोर संसारात गटंगळ्या खाणार्या जीवास शांत चित्त असलेले ब्रह्मवेत्ते संतच या संसारसागरांतून तरून जाण्याला मोठा आधार असतात. या श्लोकावरील श्री एकनाथ महाराजांचे व्याख्यान पाहा.
प्रतिक्षणी अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी ।
तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्म बुद्धी जनासी ॥ ४१९ ॥
अधर्मे निमज्जन नरकात । स्वधर्मे उन्मज्जन स्वर्गात ।
ऐसे भोगिती आवर्त । स्वर्ग नरकात संसारी ॥ ४२० ॥
या परी संसारी जन । पावता उन्मज्जन निमज्जन ।
त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥ ४२१ ॥
पडल्या जळार्णवा माझारी । जेवी अच्छिद्र नाव तारी ।
तेवी बुडता भवसागरी । सुखरूप तारी सज्जन नाव ॥४१२॥
कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती ।
ब्रह्मज्ञाने सपुरती । सुखरूप निश्चिती या हेतू ॥ ४२३ ॥
नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांती ।
बुडऊ नेणे धारावर्ती । तारक निश्चिती उद्धवा ॥ ४२४ ॥
परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती ।
तळी राहिले ते तरती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ४२५ ॥ ए. भा. २६.
गीतेच्या सातव्या अध्यायात माया-तरणोपाय सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात. 'जया सद्गुरू तारू पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे । आत्मनिवेदन तरांडे । आकळले ॥' ज्ञा. ७-९८
संत, सद्गुरू हे एका अर्थीच शब्द आहेत. संत हे गुरूच असतात. लघु नसतात व गुरू हेही संतच असतात, असंत नसतात. असो. अशा संतांची सेवा करून त्यांच्या कृपेनेच जीव या माया नदीतून तरून जातो.
श्रीकृष्ण भगवान हेच सांगतात -
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया' गीता ४-३४ ॥ "ते ज्ञान श्रीसद्गुरूंना प्रणिपात करणे, प्रश्न करणे व सेवा करणे या प्रकारानेच प्राप्त
होते.
ते ज्ञान पैगा बरवे । जरी मनी आथि आणावे ।
तरी संता या भजावे । सर्वस्वेशी ॥ १६५ ॥
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६६ ॥
तरी तनुमनु जीवे । चरणासी लागावे ।
आणि अगर्वता करावे । दास्य सकळ ॥१६७॥' ज्ञा. ४
संत सद्गुरू सेवेचा पूर्ण प्रकार श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या अध्यायातील 'आचार्योपासनं' या पदावरील टीकेत फार विस्तृत रूपाने सांगितला आहे तो फार महत्त्वाचा आहे. पण विस्तारभयास्तव लिहिला नाही. जिज्ञासूंनी तो मुळात अवश्य पाहावा.
भवतरावया उत्तम हे नाव । भिजो नेदी पाव हात काही ॥ असे संतवर्णनात्मक अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. अशा रीतीने माया नदीतून तरून गेलेला पुरुष श्री नारद म्हणतात. 'निर्मम' होतो किंवा मागील साधनातच या निर्ममत्वाचाही अंतर्भाव करावा. अनादि अज्ञानजन्य देहतादात्म्यामुळे या देहालाच जीव अहं (मी) म्हणतो, 'तै अज्ञान एक रूढे । तेणे कोहं विकल्पाचे मांडे । मग विवरूनि की जे पुडे । देहो मी ऐसे ॥' ज्ञा. ५-३४२
एकदा देहाला मी म्हटले की, देहसंबंधी जे जे जड, चेतन, स्थूल, सूक्ष्म पदार्थ असतील त्यांना माझे म्हणणे अपरिहार्य होते. 'हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझे हे ना ॥ ४२ ॥' ज्ञा. अ. १५. अहं (मी) प्रत्ययाचा विषय आत्मा आहे. देह हा त्या प्रत्यगात्म्याहून भिन्न भूतकार्य, संघातरूप असा 'हा' परोक्ष अनुभवाचा विषय आहे हे शास्त्रांतून व अनुभवांनी सहज पटण्यासारखे आहे. तसेच या अहं व मम भावनेत व्यभिचारही आहे. बहुतेक लोक माझा देह अशी देहाच्या ठिकाणी ममत्वभावना ठेवतात पण देहधर्म जे स्थूल, कृश, काळा, गोरा इ. आहेत तेथे मात्र मी स्थूल, कृश, गौर, शाम असा अहंत्वधर्म ठेवतात. तसेच इंद्रियाच्याही विषयात असते. डोळा, कान, हात, पाय यांना माझे म्हणतो पण त्याचे जे आंधळा, बहिरा इ. धर्म आहेत तेथे मीपणा वागवला जातो. वास्तविक देह धर्मी असून तो अहं प्रत्ययाचा मीपणाचा विषय होणे योग्य आहे, पण होत नाही. याचे कारण वेदान्तशास्त्रात अध्यास हा पूर्वसंस्कारानुसार होत असतो असे सांगितले आहे. अनादि कालापासून असेच संस्कार आहेत म्हणून ते भ्रमाने होणारे तादात्म्यही तसेच असते. अशा या देहाला मी म्हणणे हाच भ्रम आहे. निर्मम होण्याकरिता अगोदर 'अहं' गेला पाहिजे.
जोपावेतो तो 'मी' देहात आहे तोपावेतो देहसंबंधी जे सचेतन अचेतन विषय आहेत त्याच्या ठिकाणी ममत्व (माझेपणा) राहणारच. 'अहं मम' या दोन रुळावरूनच संसाराची गाडी जात असते. 'देही धरिता देहाभिमान । ते अहंता वाढवी मीपणा । मीपणे ममता जाण । वाढे संपूर्ण देह संबंधे ॥३२९॥ जे वाढली अहं ममता । ते वर्तवी महादुःखवार्ता ॥' एकनाथी भा. अ. २६ सर्व संसारदुःखे केवळ 'अहं' (मी) मध्ये नसतात तर ममतेमुळेच होतात. 'देह बुद्धीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा । संकल्प-विकल्पाचा मारा । ममता द्वारा अनिवार ॥' एकनाथ भा. २-२८८. अनादिकालीन दृढ संस्कारामुळे ही ममता नष्ट होणे फार कठीण आहे.
भागवतामध्ये भरतराजाचे चरित्र प्रसिद्ध आहे. तो सर्वसंगपरित्याग करून अरण्यात तपश्चर्येकरिता राहिला असता एका हरिणबालकावरच स्नेह जडला, ममता जडली, त्याचा परिणाम त्याला तो हरिणजन्म घ्यावा लागला. ममता जडली मृगापाशी । मृग वना गेला स्वइच्छेसी । त्याचा खेदु करिता भरतासी । काळ आकर्षी देहाते ॥१५९॥ या लागी सांचचि जाण । ममतेपाशी असे मरण । जो निर्मम संपूर्ण । त्यासी जन्ममरण स्पर्शेना ॥ १६० ॥' ए. भा. अ. २. वास्तविक जीव ज्याच्या ठिकाणी ममत्व ठेवतो म्हणजे ज्याना ज्याना म्हणून माझे म्हणतो ते खरे याचे नसतातच तेही परतंत्र व आपलाच स्वार्थ पाहणारे असतात, हे सर्वानाच ठाऊक आहे. म्हणून विवेकी भक्त ममत्व धर्म व त्याचें आश्रय जे जे काही पदार्थ आहेत हे क्षण विनाशी तुच्छ आहेत असे जाणून देहाहंता व ममत्व याचा त्याग करतो.
तो समजतो हे कोणी माझे नाहीत, हा देह जर मी अथवा माझा होण्यास योग्य नाही तर मग देहसंबंधी कोण माझे राहतील ? असा भक्त ममतेचा केवळ त्याग करतो इतकेच नव्हे तर 'निर्मम' होतो असे नारद म्हणतात. स्थूलरूपाने वर वर त्याग केला तरी मनात सूक्ष्मवासना, ममत्व राहतेच. निर्मम म्हणजे कोठेही ममत्वभाव निर्माणच न होणे हे आहे. या वाक्याच्या मागे 'यो महानुभावं सेवते' असे आहे, ज्या महात्म्याची हा भक्त सेवा करतो ते निर्ममच झालेले असतात. व यालाही निर्मम बनवितात. जेथे जेथे तुझे ममत्व जाईल ते ते पदार्थ ममत्वास कसे अयोग्य आहेत हे पटवून देतात. त्यांनी सांगितलेल्या विवेकाने हाही निर्मम होतो.
श्री एकनाथ महाराज सांगतात -
गुरुकृपा झालिया पूर्ण । माझ्या देहीचे जे मीपण ।
ते उकलोनिया दाविता जाण । जग संपूर्ण मी एक ॥ ३३१ ॥
ऐसे माझे मीपण पाहता । समूळ हरपली ममता ।
हे माझे म्हणावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥३३४॥
तेथ मीपणेसी मी माझे । नुरेचि तूपणेसी तुझे ।
ऐसे परब्रह्माचेनि निजे । झाले सहजे निर्मम ॥ ३६ ॥' ए. भा. २६
श्रीकृष्णानी अर्जुनास बाराव्या अध्यायात जी महत्त्वाची भक्तलक्षणे सांगितली आहेत त्यात, 'निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥' असे म्हटले आहे. 'निरहंकार आणि निर्मम' तो भक्त होय. 'आणि मी हे भाष नेणे । माझे काहीचि न म्हणे ॥' ज्ञा. १२-१४९
श्रीज्ञानेश्वर महाराजाचे निर्ममत्वाचे व्याख्यान पाहा.
हे ना तो भलतेणे व्याजे । तो जयाते म्हणे माझे ।
ते नोडवेचि का दुजे । अद्वितीय जाला ॥१०७४॥
पै आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळुनिया पंडुसुता ।
कही न लगती ममता । धाडिली जेणे ॥ १०७५ ॥' ज्ञा. १८.
ही 'निर्मम' (माझेपणारहित) होण्याची परिसीमा आहे. असा जो निर्मम होतो तोच मायेतून तरून जाऊ शकतो, यावरून ममत्व असणे हे मायानदीत बुडणेच आहे हे सहज सिद्ध होते. यासच संसार बंधही म्हणतात. 'अहं ममेत्ययं बंधः नाहं ममेति मुक्तता ।' देहादि मी आहे व देहसंबंधी जे ते सर्व माझे आहेत असे वाटणे हाच बंध व कोणी माझे नाही व मी देहादिक संघात नाही, अशी यथार्थ समजूत असणे हाच मोक्ष. या अवस्थेलाच मायातरण म्हणतात. जो संगत्याग करतो, संतसेवा करून निर्मम होतो तोच या मायेतून योग्य प्रकारे तरून जातो.
GO TOP
|