नारद भक्तिसूत्रे

तरङ्गायिता अपीमे सङ्गात्समुद्रायन्ती ॥ ४५ ॥


अर्थ : हे (कामक्रोधादि) आरंभी लहान तरंगाप्रमाणे भासत असले तरी (दुःसंगाने) समुद्राचा विशाल आकार धारण करतात.


विवरण : प्रथम प्रथम मनुष्याला या विकारांची बाधा कळून येत नाही. कारण ते अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. पण जसा त्यांना विषयांचा संबंध होत जाईल तसे तसे ते समुद्राप्रमाणे वाढत जातात. अग्नीची ठिणगी लहान असली तरी ती अनुकूल पेटवण मिळाल्याबरोबर तो वाढायला वेळ लागत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. 'देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सावरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥' ३-२०४ ॥

दुसरे उदाहरण त्यांनी विषाचे दिले आहे. विष अल्प प्रमाणात जरी पोटात गेले तरी ते प्राणाचा नाश करते. त्याप्रमाणे विषयाची शंका हीदेखील मनुष्याचा संपूर्ण विवेक नष्ट करते.
जैसा का विषाचा लेशु । घेतलिया बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाश । जीवितासि ॥ ३१९ ॥
तैसी या विषयांची शंका । मनी वसती देखा ।
घात करी अशेखा । विवेक जाता ॥ ३२० ॥' अ. ३

हे प्रथम तरंगासारखे लहान असतात. हे सांगण्यात विकार हे आरंभी बाधक वाटत नाहीत, म्हणजे त्याचे दोष कळत नाहीत.

हे सांगण्याचा हेतू आहे. तसेच त्याच्या आकर्षक गुणामुळे मनुष्य ओढला जातो.
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता ।
परि तो परिणाम विचारिता । प्राणु हरी ॥' ज्ञा. ३-॥२१२॥ असा प्रकार असतो.

पारध्यांनी पसरलेले जाळे हरिणास प्रथम बाधक वाटत नाही पण परिणामी त्यातच त्याचा सर्वनाश असतो. जोपावेतो हे विकार तरंगासारखे अल्प परिमाणात असतात तोपावेतो त्यांतील दोषदर्शन न झाल्यामुळे त्यांचा त्याग शक्य असूनही केला जात नाही. मग एकदा का ते समुद्रासारखे विशाल व्यापक झाले की आवरले जाणे शक्य नाही. सागराचा दृष्टांत देण्यात त्याची भयानकता, विशालता दाखविणे हा उद्देश असावा. सागर तरून जाणे जसे कठीण तसेच हे कामक्रोधादि विकार तरून जाणेही कठीण आहे.


GO TOP