नारद भक्तिसूत्रे
कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुद्धिनाशसर्वनाशकारणत्वात् ॥४४॥
अर्थ : (तो दुःसंग) काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश (किंबहुना) सर्वनाशाला कारण असल्याने (टाकावा.)
विवरण : मागील सूत्रात दुःसंग हा सर्व प्रकारे त्याज्य आहे व तो दुःसंग अंतर व बाह्य असा दोन प्रकारचा आहे असे म्हटले होते. बाह्य संग जरी अनेक प्रकारचे आहेत तरी मुख्यतः पंचविषय तसेच इंद्रियाना भुरळ पाडणारी अशी स्त्री व स्त्रैणसंगती बाधक कशी आहे याचा विचार केला. ती का त्याज्य आहे याचे स्पष्ट कारण या सूत्रात नारद महर्षी सांगतात की, ती जीवाच्या सर्वनाशास कारण आहे. जीवाचा नाश म्हणजे तो पुरुषार्थापासून-स्वोद्धारापासून-च्युत होणे, आत्यंतिक दुःख अनुभवावे लागणे, इहपर सुखापासून दूर जाणे, दुर्गती प्राप्त होणे, नर्काला जावे लागणे इत्यादी. वास्तविक मनुष्यदेहातच जीव आपला उद्धार करून घेऊ शकतो, म्हणजे जन्ममरणात्मक संसार बंधनातून त्याची सुटका होऊ शकते. पण हा दुःसंग त्यास पुन्हा संसारातच अडकवितो. या सर्वनाशाला तो कसा कारण होतो, कोणाच्या द्वारा होतो हे या सूत्रातून स्पष्ट सांगितले आहे. जीव हा अनादि अविद्येच्या संस्काराने देहत्रयाशी तादात्म्य ठेवतो म्हणजे केवळ हा देह म्हणजेच मी असे समजतो. तसेच इंद्रिये अंतःकरण प्राणादिधर्माशी तादात्म्य ठेवतो त्या वेळी त्याचा सच्चिदानंद स्वरूप असा आत्मभाव हा तिरोहित होतो. त्यामळे तो बहिर्मुख होतो. म्हणजे पूर्वपूर्व संस्काराने त्यास इच्छावृत्ती निर्माण होते तिलाच काम असे म्हणतात.
विद्यारण्यस्वामीनी पंचदशीत हेच कामाचे लक्षण केले आहे.
अहंकारचिदात्मानौ एकीकृत्याविवेकतः ।
इदं मेस्यादिदं मे स्यादितीच्छाः कामशब्दितः ॥ पंचदशी १
'देहाहंकार आणि चैतन्यरूप आत्मा या उभयतामधील भेद न कळणे हाच अविवेक; त्यामुळे तो आत्मा देहाशी ऐक्याला प्राप्त होतो व हे मला पाहिजे, हे मला मिळावे अशी जी इच्छा धारण करतो तिलाच काम म्हणावे.'
श्रीकृष्ण अर्जुनाला या कामादिकापासून जीवाचा कसा नाश होतो हे सातव्या अध्यायात सांगतात -
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्व भूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ गीता ७-२७
'हे शत्रुतापना, इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या द्वंद्वंरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये सर्व मानव जन्ममरण भोगतात.'
या श्लोकावरील टीकेत श्रीज्ञानेश्वर महाराजानी रूपकद्वारा एक छोटीशी गोष्टच सांगितली आहे.
आता थोडी ऐसी । गोठी सांगजेल परियेसी ।
जे अहंकार तनुसी । वालभ पडिले ॥ ६५ ॥
तै इच्छा हे कुमारी झाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।
तेथ द्वेषेसी माडली । वराडिक ॥ ६६ ॥
तया दोघास्तव जन्मला । ऐसा द्वंद्वंमोह जाला ।
मग तो आजेयाने वाढविला । अहंकारे ॥ ६७ ॥
तो धृतीसी सदा प्रतिकूळ । नियमाही नागवे सळु ।
आशारसे दोदिलु । जाला साता ॥ ६८ ॥
असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होऊनि धनुर्धरा ।
विषयाचा वोवरा । विकृतीसी असे ॥ ६९ ॥
तेणे भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे काटे ।
मग चिरिले अव्हाटे । अप्रवृत्तीचे ॥ ७० ॥
तेणे भूते भाबावली । म्हणोनि संसाराचिया आडवा माजी पडिली ।
महादुःखाचा घेतली । दाडेवरी ॥ ७१ ॥
अर्थ स्पष्ट आहे. श्रीभगवद्गीतेच्या तिसर्या अध्यायात या विषयाचा विस्तृत विचार आला आहे. स्वधर्माचे महत्त्व श्रीकृष्णानी अर्जुनास पटवून दिले. स्वधर्मानेच सुख, स्वातंत्र्य सर्व काही प्राप्त होते. अधर्म अथवा परधर्म हा जीवाच्या सर्वनाशास कारण होतो असे स्पष्ट सांगितल्यावर अर्जुनाने प्रश्नच केला आहे की, "देवा ! असा अधर्म (पाप) सर्वनाशास कारण आहे तर स्वतःची इच्छा नसताही बलाने नियुक्त केल्याप्रमाणे हा पुरुष कोणाकडून प्रेरित होत्साता पापाचरण करतो व दुःख भोगतो ?
या प्रश्नावर जे उत्तर श्रीकृष्णानी अर्जुनास दिले आहे ते महत्त्वाचे आहे. कित्येकाना असे वाटते की, ईश्वरच सर्व कर्माचा प्रेरक असल्याने ईश्वरप्रेरणेनेच पाप होते. कित्येकाची अविवेकमूलक भावना अशी असते की अदृष्टाने पाप होते. ईश्वर जर पापप्रेरक होईल तर त्याचेवर विषमता व क्रूरता हे दोष येतील. ज्या ईश्वराच्या कृपेने जीव उद्धरून जातो तो ईश्वर जीवास पाप करावयास कसे लावील ? तसेच अदृष्टही पापास प्रेरक नाही. अदृष्ट हे भोगाला नियामक आहे. सुखदुःखादि भोग अदृष्टजन्य असतात.
कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे. 'स्वतंत्र कर्ता' असे पाणिनीचे सूत्र आहे. शुभसंस्काराने सद्बुद्धीचा जीव अंगीकार करतो तेव्हा त्याच्याकडून पुण्यकर्म होते व अशुभ संस्कार, दुर्बुद्धी व विकाराच्या स्वाधीन झालेला मानव पापकर्मात प्रवृत्त होतो म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात,
काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ गीता ३-३७
'श्रीकृष्ण म्हणतात, हा काम हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा आधाशी व महापापी आहे, या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण.' या श्लोकावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांची विस्तृत टीका फार मननीय आहे, त्या ओव्याचा भावार्थ खाली देत आहो.
"हे अर्जुना ! जीवाला पाप करावयास लावून दुःखात ढकलणारे हे कामक्रोध आहेत असे समज. याचेजवळ दयेचा साठा मुळीच नाही. हे प्रत्यक्ष यमधर्म (काळ) आहेत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले भुजंग आहेत. हे विषयदरीतील व्याघ्र आहेत. हे भजनरूपी मार्गावर वाटमारेपणा करणारे आहेत. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. याना भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही पुरत नाही. सहज मुठीत धरण्यास जिला चौदा भुवनेही थोडी आहेत अशी भ्रांती ती याची नव्या नवसाची बहीण आहे, जी खेळत असता त्रैलोक्यरूप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर ही तृष्णा जगली आहे. या कामक्रोधाना मोहाचे घरी मान आहे. आपल्या कौशल्याने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी असत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला. यानी पतिव्रता शांती तिला वस्त्रहीन केले, मग त्या वस्त्रानी मायारूपी मांगीण सजविली अशा या सजविलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या कामक्रोधानी भ्रष्ट करविले. यांनी विवेकाचा आधारच नष्ट केला. वैराग्याची तर कातडीच सोलून काढली व निग्रहाची जीवंतपणीच मान मुरगळून टाकली. या कामक्रोधानी संतोषरूप अरण्यच तोडून टाकले व धैर्यरूप किल्ले पाडले आणि आनंदरूपी रोपटे उपटून फेकून दिले. यानी बोधाची रोपेही उपटली, सुखाची तर भाषाही पुसून टाकली व हृदयात सर्वत्र त्रिविध तापाचे निखारे पसरले. हे पाण्यावाचून बुडविणारे, अग्निवाचून जाळणारे व न बोलता अकस्मात प्राणिमात्राना घेरणार आहेत. अर्जुना ! हे शस्त्राविना मारतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्याचाही प्रतिज्ञापूर्वक वध करतात. (ज्ञानेश्वरी अ. ३ ओवी २४० ते ५८ भावार्थ.)
तसेच गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या शेवटी तर या कामक्रोधादिकाना नरकाचे द्वार म्हटले आहे.
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामःक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत ॥ गीता १६-२१
'काम-क्रोध-लोभरूपी तीन प्रकारचे हे नरकाचे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे आहे, म्हणून या तिघांचा त्याग करावा.'
यावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या टीकेचा अभिप्राय पाहा. 'अर्जुना ! काम-क्रोध-लोभ या तिघांचे बंड जेथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न झाले आहे असे समज. वाटेल त्यास आपली भेट होण्यास सुलभ जावे म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूक दाखविण्याकरता त्या कामक्रोधादिकांस वाटाडे म्हणून नेमून दिले आहे; अथवा पाप्याला नरकभोगात घालण्याकरता ही काम-क्रोध-लोभांची पातकांची पराक्रमी सभाच आहे. जोपर्यंत हे तीन विकार अंतःकरणात उठले नाहीत तोपर्यंतच रौरवादि भयंकर नरक आहेत असे पुराणादिकातून ऐकले जाते. याच्या योगाने अपाय सोपे आहेत. यातना स्वस्त आहेत. हे तिघे म्हणजे मूर्तिमंत हानीच आहे. या काम-क्रोध-लोभामध्ये जो उभा असतो तो नरकरूपी नगराच्या सभेमध्ये सन्मान पावतो. (ज्ञानेश्वरी अ. १६ ओवी ४२५ ते ३१ भावार्थ)
श्री एकनाथ महाराजांनी स्वतः कामाच्याच मुखाने आपला पराक्रम वदविला आहे. नरनारायणापुढे काम बोलत आहे.
मज कामाचे निघाये । ब्रह्मा कन्येसी धरू जाये ।
पराशरा केले काये । भोगिली पाहे दिवा दुर्गंधा ॥११७॥
ज्याते योगी वंदिती मुगुटी । तो तापसामाजी धूर्जटी ।
तो शिवू लागे मोहिनी पाठी । फिटोनी लंगोटी वीर्य द्रवले ॥ ११८ ॥
विष्णू वृंदेच्या स्मशानी । धरणे बैसे विषय ग्लानी ।
अहल्येची काहाणी । वेदी-पुराणी वर्णिजे ॥ ११९ ॥
नारदु नायके माझी गोठी । त्यासी जन्मले पुत्र साठी ।
माझी साहो शके काठी । ऐसा बळिया सृष्टी असेना ॥ १२० ॥
जो ब्रह्मचार्यामाजी राजा । हनुमंत मिरवी पैजा ।
तयास्तव मकरध्वजा । संगेवीण वोजा जन्मविला म्या ॥ १२१ ॥
कलंकिया केला चंद्र । भगांकित केला इंद्र ।
कपाटी घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमार महेशाचा ॥ १२२ ॥
मज मन्मथाचा यावा । न साहवे देवा दानवा ।
मा तेथ इतरा मानमा । कोण केवा सहावयासी ॥' ए. भा. अ. ४-
हा काम जसा घातक आहे तसाच क्रोधही आहे. काम अपूर्ण राहिला की त्याचे पर्यवसान क्रोध, द्वेष यात होते. 'पसरिला अभिलाष । अपूर्ण होय तोचि द्वेष॥' ज्ञा.
श्री एकनाथ महाराज सांगतात- 'तया अलब्ध कामासाठी । सर्वांगी क्रोधू उठी । जेवी परिपाकापाठी । धरी कडुवटी अंबिलकांजी ॥ २८ ॥ क्रोध काळिया नाग खरा । देतु द्वेषाचा फुंकारा । घाली पूज्यतेच्या आकारा । धुधुःकारा साधुनिंदेचा ॥९९॥ (एकनाथी भा. अ. ५)
कित्येक ऋषी, मुनी, तपस्वी कामाच्या तावडीतून सुटले पण क्रोधात अडकले,
क्षुत्तृट् त्रिकाल गुण मारुत जैव्ह्य शैश्न्यानस्मानपारजालधीनतितीर्यु केचित् ।
क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोर्मज्जन्ति दुश्चर तपश्च वृथोत्सृजन्ति ॥ भा. स्कं. ११ अ. ४ - ११
"कित्येक तपस्वी भूक, तहान, ऊन, पाऊस, थंडी, वारा इत्यादि सहन करून जिव्हा व विषयवासनांचा (कामाचा) प्रचंड सागर तरून जातात; परंतु क्रोधरूपी गायीच्या पावलाच्या ठशात साचलेल्या अल्प पाण्यात बुडून जातात व एवढी मोठी केलेली तपश्चर्या फुकट घालवितात. याकरिता कपिलऋषी, नारद, दुर्वास इत्यादिकांची उदाहरणे पुराणात प्रसिद्ध आहेत. (ए. भा. अ. ४ ओवी १२८ ते १३४ पाहणे) सर्वच पारमार्थिक वाङ्मयातून कामक्रोधांची बाधकता अनेक प्रकारे प्रतिपादिली आहे. श्रीशंकराचार्य तर यम व काम यांची तुलना करून सांगतात की, कामापेक्षा यम बरा.
यमस्य कामस्यच तारतम्यं विचार्यमाणे महदस्ति लोके ।
हितं करोत्यस्य यमोऽप्रियःसन् कामस्त्वनर्थं कुरुते प्रियःसन् ॥
यम व काम याचा विचार केला तर यम बरा म्हणावा लागतो. यम अप्रिय वाटतो पण तो मानवाचे हित करतो व काम हा प्रिय वाटतो पण फार अनर्थास कारण आहे. यम हा पापी माणसासच शिक्षा देतो पण काम हा सज्जनाच्याही गतीचा निरोध करणारा आहे.'
असे हे काम-क्रोध भक्तिमार्गातही प्रतिबंध करणारे आहेत म्हणून त्यांचा संगही दुःसंगच आहे. काम-क्रोधानंतर मोह म्हणजे अविवेक हा निर्माण होतो. योग्य-अयोग्य, ज्ञान-अज्ञान, पाप-पुण्य, सुख-दुःख, स्वपर, इहपर, आत्मा-अनात्मा, बंध-मोक्ष इत्यादिकातील भेद न कळणे हे मोहाचे लक्षण खाली दिले आहे. 'कर्माकर्म हिताहित । इष्टानिष्ट नाठवी चित्त । विवेकशून्यं स्तब्धता प्राप्त । मोह निश्चित या नाव ॥' ए. भा. २८- १८४
या अवस्थेत हिताहित काही कळत नाही. केवळ पिशाच्चाप्रमाणे भ्रांत होतो, व याच्या पुढची पायरी स्मृतिभ्रंश ही आहे. मनुष्याच्याजवळ असणारी स्मृतिशक्ती ही त्याला दुःख, दैन्य, दोष, अपघात यांपासून वाचवीत असते. मागे एखादे वेळी एखादे अनिष्ट कृत्य आपल्या हातून झाले असेल व त्यापासून काही अनिष्ट भोगावे लागले असेल त्याची स्मृती अंतःकरणात जागृत असेल तर ती स्मृती त्याला पुन्हा त्या अनिष्ट कृत्याकडे प्रवृत्त होऊ देणार नाही.
किंवा 'स्मृती'चा अर्थ भाष्यकार श्री जगद्गुरू शंकराचार्य यांनी असा केला आहे -
शास्त्रचार्योपदेशाहित संस्कार जनितायाः स्मृतेः ।
'शास्त्रगुरू याच्या उपदेशाने प्राप्त झालेले जे ज्ञानाचे संस्कार त्यांपासून झालेली त्या ज्ञानसाधनाची 'स्मृती' मोहामुळे ती स्मृती भ्रष्ट होते.
काम-क्रोधाच्या आधीन झालेल्या माणसास जरी काही पूर्वसंस्कार परमार्थाचे असले तरी मोहाने ते झाकले जातात हा मोहाचा प्रभाव आहे. या स्मृतिभ्रंशाच्या पुढची पायरी 'बुद्धिनाश' ही आहे. बुद्धिनाश म्हणजे दुसर्या अध्यायात गीतेमध्ये जी सद्बुद्धी म्हणून सांगितली आहे किंवा गीतेच्या अठराव्या अध्यायात तीन प्रकारची सात्त्विक, राजस, तामस, अशी बुद्धी सांगितली आहे त्यात 'प्रवृत्ती-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बंध-मोक्ष यांना यथार्थ रूपाने जी जाणते ती सात्त्विक बुद्धी होय.' असे श्रीकृष्णानी अर्जुनास सांगितले आहे. अशी आपल्या हिताला जी बुद्धी जाणत नाही तोच तिचा नाश होय. कारण वर सांगितलेली बुद्धी हीच मानवाना उद्धारास अनुकूल आहे, हिलाच सद्बुद्धी असे म्हणतात. अशा या बुद्धीचा नाश झाला म्हणजे पुढची पायरी सर्वनाशाचीच आहे असे नारद म्हणतात.
मनुष्याचे मनुष्यत्व तोपावेतोच समजले जाते की तो जोपावेतो कार्याकार्य, ज्ञानाज्ञान, बंधमोक्ष, संसारपरमार्थ याचा विचार करणार्या बुद्धीने युक्त असतो. जर ती बुद्धी नष्ट झाली तर तो मानवाचा सर्वनाश होय. स्थूल देह मृत होणे हा नाश शास्त्रकार मानत नाहीत, कारण प्रारब्धाने पुन्हा जन्म प्राप्त होतो. 'नात्मानमवसादयेत्' या गीतेच्या सहाव्या अध्यायातील वचनाप्रमाणे आत्म्यास पुरुषार्थ अयोग्य बनविणे हाच आत्मनाश व हाच सर्वनाश मानला जातो. कारण मानवदेह हा केवळ भगवद्प्राप्ती हे मुख्य ध्येय ठेवूनच निर्माण झाला आहे, हे सर्व पुराणांनी व संतानी स्पष्ट सांगितले आहे; पण कामादी विकाराच्या दुस्संगामुळे तो वर सांगितल्याप्रमाणे सर्वनाश ओढवून घेतो. नित्य, शुद्धबुद्धमुक्त अशा जीवात्म्याला या देहाच्या खोड्यात अडकून गर्भवास, जन्ममरण, त्रिविधताप, अनंत दुःखे भोगावी लागणे हाच महान नाश होय व या नाशास मुळ कारण दुस्संग होय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास जीवाच्या नाशाची हीच परंपरा सांगत आहेत.
ध्यायतो विषयांपुन्सः संगस्तेषूपजायते ।
संगात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृति विभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥ गी. २
'श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, शब्दादी विषयविशेषांचे चिंतन केले असता त्याच्यापासून विषयाचा संग म्हणजे आसक्ती, प्रीती उत्पन्न होते व त्या संगापासून काम व कामापासून क्रोध निर्माण होतो, क्रोधापासून संमोह (मोह-अविवेक) व त्यापासून स्मृतिभ्रंश व त्यापासून बुद्धिनाश. आणि बुद्धीनाशाने सर्वनाश होतो.' यावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान पाहा. (ज्ञा. अ. २-३२१ ते २८)
'अंतःकरणात विषयांची नुसती आठवण असेल तरीही संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्यामुळे विषयेच्छा प्रगट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्हाड आधीच ठेवलेले असते, व जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे संमोह प्रगट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला असता प्राण्याची दशा होते. मग सर्वत्र केवळ अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते, अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. त्यामुळे जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते.' (ज्ञा. अ. २ श्लो. ६१-६२ वरील भावार्थ)
श्रीकृष्ण भगवान उद्धवास उपदेश करतेसमयी या विषयाचा विस्तृत विचार करून गेले आहेत.
विषयेषु गुणाध्यानात्पुंसः संगस्ततो भवेत् ।
संगात्संजायते कामः कामादेव कलिर्नृणाम् ॥ १९ ॥
कलेर्दुर्विषहः क्रोधस्तमस्तमनुवर्तते ।
तमसा जायते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम ॥ २० ॥
तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते ।
ततोऽस्य स्वार्थ विभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥ भागवत ११-२१
विषयाच्या ठिकाणी गुणबुद्धी ठेवून सतत त्याचेच चिंतन करीत राहिल्याने विषयाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते. त्यामुळे अभिलाष (काम) विषयानुराग होतो व त्या विषयभिलाषामुळे पुरुषामध्ये कली म्हणजे कलह उत्पन्न होतो. त्या कलहाचे पर्यवसान क्रोधात होते. त्यापासून मोह (सारासार विचार नष्ट होणे) होतो, त्यामुळे मनुष्याची सर्वव्यापिनी बुद्धी नष्ट होऊन जाते. अशी बुद्धी नष्ट झालेला जीव शून्यवत (असून नसल्यासारखा) होतो म्हणजे तो मूढ होऊन इहपर पुरुषार्थाला मुकतो, मृतवत होतो. त्यावरील श्री एकनाथ महाराजांचे व्याख्यान मननीय आहे.
विषयाचे गोडपण । सदाध्याय ज्याचे मन ।
त्यासी विषयासक्ती जाण । अतिगहन उल्हासे ॥ २१३ ॥
विषयासक्तीचा संभ्रम । तेणे निर्लज्ज खवळे काम ।
कामास्तव अतिविषम । सोशी दुर्गम उपाय ॥२१४॥
विषयकामार्थ जे उपाय । त्यासी प्रतिपदी अपाय ।
जेव्हा विषयकाम सिद्धी न होय । तेव्हा महाकलह विवादु ॥ २१५ ॥
जेथ अति जल्पाचा विवाद । तेथ खटाटोपेसी सन्नद्ध ।
खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥ २१६ ॥
क्रोध खवळल्या दारुण । बुद्धीचे तत्काळ नासे ज्ञान ।
तेव्हा विवेकाचे प्राशन । करी जाण महामोह ॥२१७॥
विवेकाचे लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण ।
तेव्हा कार्याकार्य आठवण । हेही स्मरण बुडाले ॥ २१८ ॥
विवेक शून्यस्तब्धवत । तेथ विषयी ना परमार्थ ।
न कळे सन्मार्ग पंथ । आत्मघात पदोपदी ॥२१९॥ ए. भा. अ. २१
वास्तविक या विषयाचा एवढा विस्ताराने विचार करण्याचे कारण काय असे कोणास वाटेल पण हे विकार न कळत मनात शिरतात, वाढतात व परिणामी घातक होतात. म्हणून 'त्याज्य ते त्यागावया लागी । सांगावे जरी अनुपयोगी ॥' असे श्री ज्ञानेश्वर महाराजानी म्हटले आहे. त्याचे जेवढे दोष विचाराने पटतील तसे त्याचा त्याग होणे सुलभ होईल. कारण श्री नारदांनी मागील सूत्रात 'दुःसंगः सर्वथैव त्याज्यः' असे म्हटले आहे. वैद्य औषध देण्यापूर्वी त्या व्याधीस प्रतिकूल जे पदार्थ आहारात असतील त्यांचा त्याग करण्याचे पथ्य स्पष्ट सांगत असतो. तसेच प्रथमतः मनुष्य या भक्तिमार्गात प्रवेश करणे कठीण, केला तर त्यास त्या मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हे विकार टपूनच असतात. अनेक साधकांचे आध्यात्मिक जीवन यानी उद्ध्वस्त केले आहे.
म्हणून श्रीकृष्ण भगवान अर्जुनास या विषयात स्पष्टच सांगतात.
एतैर्विमुक्तः कौंतेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचारत्यात्मनश्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ अ. १६-२२
अर्जुना ! नरकाची द्वारे असलेल्या या (काम, क्रोध, लोभ) तिन्हीपासून जो मुक्त होतो तो आपल्या आत्म्याचे कल्याण करतो, नंतर तो श्रेष्ठ गती पावतो.'
यावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान स्पष्ट आहे.
म्हणौनि पुढत पुढती । हे कामादि दोष त्रिपुटी ।
त्यजावीचि गा वोखटी । आघवा विषी ॥ ४३२ ॥
धर्मादिका चौही आतु । पुरुषार्थाची तैचि मातु ।
करावी जै संघातु । सांडील हा ॥ ४३३ ॥
हे तीन्ही जीवि जागती । तववरी निकियाची प्राप्ती ।
हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥ ४३४ ॥
जया आपणपे पढिये । आत्मनाशा जो बिहे ।
तेणे धरावी सोये । सावध होईजे ॥ ४३५ ॥'
आणखीही अनेक दृष्टान्ताच्या द्वारे या विषयाचा विचार केला आहे. ग्रंथविस्तार होईल म्हणून लिहिला नाही. वाचकांनी मुळात पाहणे योग्य आहे.
म्हणून श्री नारद या दोन सूत्रातून त्याचा त्याग व बाधकता सांगून गेले. पुढील पंचेचाळीसाव्या सूत्रात आणखी एका दृष्टीने या कामक्रोधादिकांची बाधकता दृष्टान्त द्वारा पटवून देतात.
GO TOP
|