नारद भक्तिसूत्रे
तस्मिन्स्तज्जने भेदाभावात् ॥ ४१ ॥
अर्थ : त्या भगवंताचे ठिकाणी व तज्जन, त्याचे जे भक्त आहेत त्यांचे ठिकाणी (परस्पर) भेदाचा अभाव आहे. (म्ह. भेद नाही.) (म्हणून भगवत्कृपेने सत्संगाचा लाभ होतो.)
विवरण : मागील सूत्रात महत्संग दुर्लभ अगम्य अमोघ आहे पण तो भगवत्कृपेने प्राप्त होतो असे सांगितले, तेव्हा भगवत्कृपा व महात्म्या पुरुषाच्या संगती प्राप्तीत कार्य-कारण भाव संबंध कसा अशी शंका कोणी घेईल, त्याचे उत्तर या सूत्रात दिले आहे. येथेही 'तत्' शब्दाचा प्रयोग केला आहे तो 'भगवंत' वाचक आहे. (म्हणून मागील सूत्रातील 'तत्' शब्दही भगवद्वाचकच घेणे योग्य आहे.) त्या भगवंताचा व तज्जन म्हणजे सर्वस्वी त्याचेच झालेले (असलेले) भक्तजन यांचा भेद नाही. शास्त्रामध्ये अन्योन्याभावास भेद म्हणतात. अन्योन्याभावास प्रतियोगि व अनुयोगी लागतात. म्हणजे ज्याचा अभाव तो प्रतियोगी व ज्याचे ठिकाणी अभाव तो अनुयोगी म्हटला जातो. उदाहरणार्थ घट हा पट नाही, या वाक्यात घट हा प्रतियोगी पट हा अनुयोगी आहे. म्हणजे घटाचा अभाव पटाचे ठिकाणी दाखविला जातो. जर पट हा घट नाही अशी वाक्ययोजना केली तर पट हा प्रतियोगी व घट हा अनुयोगी होईल.
भेद हा अन्योन्याभावरूप असल्याने त्यातही हे असतातच. तत् शब्द वाच्य परमात्मा व तज्जन शब्द वाच्य संत ह्यांच्या ठिकाणी वरवर पाहाणार्यांना भेद प्रतीत होतो. कारण जसे पटत्वधर्माने युक्त पट व घटत्व धर्माने युक्त घट हे भिन्न धर्मी असल्याने त्यांच्यात भेद आहे तसे भगवान् व भक्त हेही भिन्न धर्मी असून त्यांच्यात भेद असणे योग्य आहे असे वाटेल. वास्तव भेद व प्रातीतिक भेद असे भेदाचे दोन प्रकार असतात. घट व पट यांच्यातील भेद व्यवहारातः वास्तव आहे पण घटाकाश आणि मठाकाश हा भेद वेदांत शास्त्रात वास्तव मानला नाही, जो पावेतो घट हा उपाधी आहे तो पावेतोच घटावच्छिन्न आकाश हे मठाकाशाहून वेगळे दिसेल पण जर घटाचा बाध झाला तर हे मठाकाशस्वरूपच असते, ज्यावेळी घट असतो व तदंतर्गत आकाश वेगळे दिसते त्याहीवेळी ते मठाकाशाहून अभिन्नच असते, तंतूपट, जलतरंग इ. भेदही प्रातीतिक आहे. तात्त्विक नाही. तसाच प्रकार परमात्मा व संत यांच्यात आहे 'ज्ञानीत्त्वात्मैव मे मत' हे गीतावचन प्रसिद्ध आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात -
परि जाणोनिया माते । जे पाहो विसरले मार्गाते ।
जैसे सागरायेऊनि सरिते मुरडावे ठेले ॥१२४॥
तैसी अंतःकरणकुहरी जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मिनली ।
तो मी हे बोली । फार करू ॥१२५॥ एर्हवी ज्ञानिया जो म्हणिजे ।
तो चैतन्यचि केवळ माझे । हे न म्हणावे परी काय कीजे । न बोलणे बोलो ॥ १२६ ॥' ज्ञानेश्वरी अ. ७.
बाह्य आकाराने प्रतीत होणारा भेद खरा नाही. एका सुवर्णाचेच अनेक अलंकार केले, त्यांच्यात नामभेद, रूपभेद, आकारभेद, व्यवहारभेद दिसून येतात. पण सुवर्ण या दृष्टीने त्यांचा भेद नाही. देव व भक्त यांच्यातील अभेदाचे स्वरूप भगवान श्रीकृष्णच सांगतात, 'ते वर्तत दिसती देही । परि ते देही ना माझ्या ठायी । आणि मी तयांचा हृदयी । समग्र असे ॥ सविस्तर वटत्व जैसे । बीज कणिके माजी असे । आणि बीज कणू वसे । वटी जेवी ॥ तेवी आम्हा तया परस्परे । बाहेरी नामाचीच अंतरे । वाचुनि आतुवट वस्तु विचारे । मी तेचि ते ॥' ज्ञानेश्वरी अ. ९. ४०९, १०, ११.
श्रीमद्भागवतामध्ये अंबरीष उपाख्यानांत प्रत्यक्ष भगवान महाविष्णू दुर्वास ऋषीस सांगतात.
"साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहं ॥
मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि ॥६८॥ भा. ९-४
भगवान म्हणतात 'हे दुर्वास ऋषे ! साधू हेच माझे हृदय आहे व मीच त्यांचेही हृदय आहे. माझ्या विना तेही काही जाणत नाहीत व त्यांच्या वाचून मीही अन्य कोणास जाणत नाही.' आणखीही दोन श्लोकांतून भक्त व भगवान या उभयतामधील अनन्य प्रेम स्पष्ट केले आहे.
अहं भक्त पराधीनः ह्यस्वतंत्र इव द्विज ।
साधुभिर्ग्रस्तहृदयो भक्तैर्भक्तजनप्रियः ॥
नाहमात्ममानमाशासे मद्भक्तैः साधुभिर्विना ।
श्रियं चात्यन्तिकीं ब्रह्मन येषां गतिरहं परा ॥ भागवत स्कं. ९-४-६३, ६४
'मी सर्वथा भक्ताचे आधीन असून अस्वतंत्राप्रमाणे आहे. म्हणजे परतंत्र आहे. कारण माझ्या भक्तांनी माझ्या हृदयाचा ग्रास केला आहे. म्हणजे माझे हृदय त्यांच्या ताब्यात आहे. कारण त्यांना मी सदाच प्रिय आहे. माझ्या भक्तांचा एकमात्र आश्रय मीच आहे, त्यांना अन्य कोणाचा आश्रय नाही, अतएव अशा भक्तांना सोडून मी माझ्या स्वतःचीही अपेक्षा ठेवीत नाही, म्हणजे माझा देहही मला प्रिय नाही. तसेच माझी अर्धांगिनी लक्ष्मीही मला प्रिय नाही.' श्रीमद्भागवत, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथातून अनेक स्थळी असा देव भक्तांचा तादात्म्य संबंध सांगितला आहे. कोणास वाटेल भक्त तर देवाची सेवा करतात व देव सेव्य आहे. भेद नसेल तर सेवा कशी होईल ? याचे उत्तर श्रीकृष्ण अर्जुनास देतात. त्याचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराज करतात.
मग वाढतेनि प्रेमे । माते भजति जे महात्मे । परी दुजेपण मनोधर्मे । शिवतले नाही ॥ ऐसे मीचि होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परी नवलाव तो सांगवा । असे आईक ॥ ज्ञा. ९. १९५, ९६. देव ते संत देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा ॥ देव आणि भक्त दुजा नाही विचार ॥ इत्यादी तुकाराम महाराजांची वचने हेच सांगतात.
सूत्रामध्ये भक्ताकरिता अथवा संत महात्म्याकरिता 'तज्जन' हा शब्द वापरला आहे. केवळ संत भक्त भाविक महात्मा या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. श्री नारदांनी अभिप्रेत अर्थ दाखविण्याकरिता 'तज्जन' शब्दाचा उपयोग केला असावा असे वाटते. 'तज्जन - तस्य एव जनः तज्जनः' असा समास होतो. म्हणजे त्या भगवंताचाच जो असतो तो आपल्याला इतराचा कोणाचा समजत नाही. कोणी म्हणेल तसे तर सर्व जीव देवाचे अंशभूत आहेत. म्हणून सर्वच "तज्जन" आहेत. पण हे म्हणणे बरोबर नाही. सर्वच जीव देवाचेच अंशभूत आहेत हे खरे पण सर्वांना तसे वाटते काय ? 'देव माझा मी देवाचा' ही भाषा सर्व वापरीत नाहीत. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. 'तैसे भूत जात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव । दशे आले ॥ ६६ ॥ म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहं ममता भ्रांति । विषयांध झाले ॥६७॥' ज्ञानेश्वरी अ. ७. देवाचे जन येथे षष्ठी विभक्तीचा उपयोग केला गेला आहे. षष्ठी विभक्ती ही संबंध दाखविते. म्हणजे देवाशीच ज्याचा संबंध आहे असा जन. जरी सर्वांचा देवाशी अनादि नित्य संबंध आहे तरी वरील ओव्यात सांगितल्याप्रमाणे तो अज्ञात आहे. अज्ञात संबंध अकिंचित्कर, निरूपयोगी असतो. जो भक्त आहे तो आपला सर्वस्वी संबंध देवाशीच आहे असे समजत असतो. इतर मानव आपला संबंध देह, स्त्री, पुत्र, पिता, माता, बंधू, मित्र, तसेच गृह, क्षेत्र इत्यादिकांशी आहे असे समजतात, म्हणून त्यांच्याशीच तादात्म्य ठेवतात व काही अनुकूल फलाच्या अपेक्षेने त्याचीच सेवा करीत असतात. देवाला पूर्णपणे विसरून जातात. म्हणून याना 'तज्जन' म्हणता येत नाही. भक्त हा अन्य कोणाशीच ममत्व संबंध ठेवीत नाही. 'तुका म्हणे माझी नव्हती ही कोणी । एका चक्रपाणी वाचूनिया ॥' हे श्री तुकाराम महाराजांचे सर्व उद्गार याच भूमिकेवरील आहेत. असा भक्त भगवंताहून वेगळा कसा राहू शकेल ? श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात 'म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळीक पांडुसुता । तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरूप माझे ॥ जैसा दीपे दीपुलाविजे । तेथ आदील कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी होऊनि ठाके॥, ज्ञानेश्वरी ९-४२७, २८
ही अवस्था प्राप्त होणे ही 'तज्जन' होणे आहे. अशा भक्ताचा व देवाचा भेद राहील कसा ? उभयतांमध्ये असा तादात्म्य संबंध आहे म्हणूनच मागील सूत्रात सत्संग हा भगवत्कृपेने लाभतो असे नारद म्हणतात. पुढे ही 'तन्मया' असे सत्तराव्या सूत्रात म्हटले आहे.
GO TOP
|