नारद भक्तिसूत्रे
लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥ ४० ॥
अर्थ : त्या भगवंताच्या कृपेनेच (महापुरुषाचा) संगही मिळतो.
विवरण : मागील सूत्रात महात्संग दुर्लभ आहे असे सांगितले आहे. दुर्लभ म्हणजे अशक्य नव्हे, अशक्याचा विचारच करावयाचा नसतो. दुर्लभ म्हणजे सामान्य प्रयत्नाने प्राप्त न होणारा. ज्याकरिता काही विशेष अधिकार, विशेष साधन अपेक्षित असते, तसा महत्संग दुर्लभ म्हणजे अगदीच न प्राप्त होणारा असा म्हणता येत नाही, तर त्याचे जे साधन या सूत्रात सांगितले आहे त्यानेच प्राप्त होणारा तो आहे. ते म्हणजे भगवत्कृपा.
'यावन्नानुग्रहस्साक्षाऽजायते परमात्मनः ।
तावन्न सद्गुरुं कंचित्सच्छास्त्रमपि नोलभेत् ॥'
म्हणजे जोपावेतो भगवद्नुग्रह होत नाही तो पावेतो सद्गुरू अथवा सच्छास्त्र प्राप्त होत नाही असे एक वचन आहे. भगवद् अनुग्रह कधी तो अंतर्यामी असल्याने आतून प्रेरणा देऊन करतो. तर कधी तो प्रगट होऊन करतो. मिथिला नगरीत राहणार्या पिंगलेस आतून अनुग्रह केला. ती म्हणते,
'धन्य माझी भाग्य प्राप्ती । येचि क्षणी येचि राती ।
झाली विवेक वैराग्य प्राप्ती । रमापती तुष्टला ॥ २५५ ॥' एकनाथी भागवत अ. ८.
श्रीनामदेवरायांना श्रीपांडुरंगानेच विसोबा खेचर या संताची गाठ घालून दिली होती हे सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगांतून श्री पांडुरंगाचीच प्रार्थना सत्समागमाकरिता केली आहे.
'अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगती ।
मग मी कमळापती तुज बा नाणी कांटाळा ॥ १ ॥
कोणपुण्ये याचा होईन सेवक । जिही द्वंद्वादिक दुराविली ॥ १ ॥
ऐसे वर्म मज दावी नारायणा । अंतरीच्या खुणा प्रगटोनि ॥२॥
मागणे ते एक तुजप्रती आहे । देसील तरी पाहे पांडुरंगा ॥२॥"
या संतासी निरवी हेचि मज देई । आणीक दुजे काही न मागो देवा ॥२॥
असे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. म्हणून भगवत्कृपेनेच सत्संगतीचा लाभ होतो असे श्रीनारद म्हणतात.
येथे 'लभ्यते' हे क्रियापद सहेतुक वापरले आहे. 'प्राप्यते' 'साध्यते' असे न म्हणता 'लभ्यते' म्हटले आहे. म्हणजे यात 'लाभ' होणे हा अर्थ ध्वनित होतो. प्राप्ती या शब्दाचा उपयोग सुख-दुःख, लाभ-हानी या दोहोकडे करता येतो, पण लाभ हे शब्द अनुकूल व प्रयोजनयुक्त वस्तूच्या प्राप्तीकडेच केला जातो.' तुका म्हणे आतां । लाभ नाही या परता ॥' सत्संगतीपेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभच नाही. 'वैराग्याचे भाग्य । संतसंग हाचि लाभ ॥' असे तुकाराम महाराज सांगतात.
या सूत्राचा वरीलपेक्षा थोडा वेगळाही अर्थ होऊ शकतो. सूत्रांत "तत्" हे सर्वनाम वापरले आहे. 'तत्' म्हणजे संत हा अर्थ घेतला जातो. 'म्हणजे महापुरुषाच्या मनात एखाद्यावर कृपा करण्याची इच्छा निर्माण झाली, त्याच्या कृपा दृष्टिक्षेपात जो आला तो कोणीही असला तरी त्याला त्याच्या कृपेचा लाभ होतो पण वरील पहिला अर्थच घेणे ठीक आहे असे आम्हास वाटते. देवाची कृपा झाल्याविना संत भेट वा दर्शन झाले तरी ते कित्येक वेळा व्यर्थ जाते. याबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ उद्गार काढले आहेत. अर्जुन म्हणतो "हे श्रीकृष्णा, माझे येथे असित, देवल, नारद, व्यास हे सर्व येत असत पण त्यांच्या संगतीचा उपयोग झाला नाही. पण ज्यावेळी तुम्ही कृपा केली तेव्हा मला ते सर्व आठवू लागले. 'येर्हवी नारदु अखंड जवळी ये । तोही ऐसेचि वचने गाये । परि अर्थ न बुझोनि ठाये । गीत सुखचि ऐको ॥ ज्ञा. १० - १५५ ॥' 'हे देवा आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला, तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार. सूर्यप्रकाशाचा त्यांना अनुभव कोठून येणार ?' अर्जुन म्हणतो 'देवा, नारद ऋषी अध्यात्मावर गाणे गात असताना त्याच्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी वरवरची मधुरता, तीच आमच्या अनुभवाला येत होती, त्या गाण्यातील अध्यात्म चित्ताला काही कळत नव्हते. त्याचप्रमाणे असित व देवल या ऋषीच्या तोंडूनसुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून तुझ्याविषयी मी ऐकले परंतु त्यावेळी माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. महर्षी व्यासदेव हेही आमचे राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करीत असत, परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणी सारखा होय. याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे ही माझ्यापाशी ज्ञानरूपी रत्नाच्या खाणी होत्या, परंतु कृष्णा, तू जो सूर्य त्या तुझ्याविना त्यांचा अनादर केला जात होता, 'तैशी व्यासादिकाची बोलणी । तिया मजपाशी चिद्रत्नांचिया खाणी । परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥' ज्ञानेश्वरी अ. १२ श्लो. १६ भक्तवर्य अर्जुनासारख्या श्रेष्ठ पुरुषाच्या अनुभवावरून व अन्य सर्व प्रमाणावरून सत्संग हा भगवत्कृपेनेच प्राप्त होतो हे सिद्ध होते.
भगवत्कृपा व सत्संग याच्या प्राप्तीचा कार्यकारण संबंध सांगितला तो कसा सिद्ध होणार ? याचे उत्तर पुढील सूत्रात दिले आहे.
GO TOP
|