नारद भक्तिसूत्रे

महत्संगस्तुदुर्लभोऽगम्योऽमोघश्‍च ॥ ३९ ॥


अर्थ : परंतु महात्म्या पुरुषाची संगती दुर्लभ, अगम्य व अमोघ - (कधीही व्यर्थ न जाणारी) आहे.


विवरण : मागील सूत्रात महात्म्याची कृपा हे भक्तीप्राप्तीचे अंतरंग साधन आहे असे सांगितले पण तो महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा आहे असे ते म्हणतात. एका सुभाषितकाराने म्हटले आहे, 'प्रत्येक पर्वतावर माणिक म्हणजे रत्न सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मौक्तिक (मोती) नसतो. प्रत्येक वनात उत्तम चंदनवृक्ष असतो असे नाही, त्याप्रमाणे सर्वत्र साधू दिसतात, सापडतात असे नाही.' बहुतेक संसारी जीव अनादि अज्ञानमूलक संस्काराने शुभाशुभ पापपुण्याचे फल भोगीत असतात. त्यातही बहुतेकांची ऐहिक पारत्रिक विषयभोगातच अधिक प्रवृत्ती असते. मनबुद्ध्यादिकाना तेच संस्कार असतात. म्हणून त्यांची धाव विषयापावेतोच जाते, विषयसंपादन हाच पुरुषार्थ होऊन बसतो. अशा बहिर्मुखतेमुळे हृदयस्थ सच्चितानंद भगवंताचे यथार्थ ज्ञानही नसते. म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती होत नाही. एखादाच सत्त्वसंपन्न विचारी पुरुष पूर्वसुकृताने परमार्थमार्गात प्रविष्ट होतो, कारण सद्‍बुद्धि दुर्लभ आहे असे भगवान अर्जुनाला सांगतात.

पार्थाबहुती परी । हेअपेक्षिजे विचारशूरी ।
जे दुर्लभ चराचरी सद्वासना ॥ २३९ ॥
आणिका सारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
का अमृताचा लेशु । दैव गुणे ॥२४०॥
तैसी दुर्लभ सद्‍बुद्धिं । जिये परमात्म्याची अवधिं ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥२४१॥ ज्ञानेश्वरी अ. २
ही सद्वासना, सद्‌बुद्धी दुर्लभ असल्याने तिची प्राप्ती ज्याना पूर्णरूपाने झाली आहे असे पुरुषहि समाजामध्ये दुर्लभ समजले जातात. श्रीकृष्णांनी गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये 'हजारो माणसात आत्मसिद्धीच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करणारा एखादाच असतो, अशा प्रयत्न करणार्‍यातही त्या प्राप्तीपावेतो जाणारा एखादाच असतो.' असे स्पष्ट म्हटले आहे. एखाद्या वस्तूची गरज नसेल, ज्ञान नसेल, साधनानुकूलता नसेल तर तिच्या प्राप्तीकडे प्रवृत्ती होत नाही. परमात्मा आत्यंतिक सुखरूप आनंदरूप आहे, म्हणून त्याची गरज नाही असे म्हणता येत नाही. साधने मानव देह, इंद्रिये, बुद्धी इत्यादी अनुकूल आहेत मग अपप्रवृत्ती का ? याचे उत्तर अज्ञान हेच आहे, भक्ताचा महिमा भक्तचि जाणती । दुर्लभ या गती आणिकासी ॥ असे तुकाराम महाराज म्हणतात. जगात संत साधू नाहीत किंवा नसतात असे नाही, पण त्याची भेट होणे कठिण आहे. सर्वच संतानी स्पष्ट म्हटले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
पूर्व जन्मी सुकृते थोर केली । ती मज आजी फळासी आली ।
परमानंदु आजि मानसी । भेटी झालिया संतासी ॥ ज्ञा. म.
पुण्यफळले बहुता दिवसा । भाग्य उदयाचा ठसा ।
झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलो ॥
भाग्याचा उदया । ते हे जोडी संत पाय ॥
असे संत तुकाराम महाराज म्हणतात.
हीच गोष्ट जनक नवयोगेश्वर संवादात भागवतामध्ये सांगितली आहे. राजा जनक त्या नवयोगेश्वराना म्हणतो -
ज्यांसी भगवद्‌भक्तीची अतिगोडी । त्यावरी भगवंताची आवडी ।
त्याची भेटी तै होय रोकडी । जै पुण्याच्या कोडी तिष्ठती ॥२४०॥
निष्कामता निजदृष्टी । अनंत पुण्ये कोट्यानुकोटी ।
रोकडया लाभती पाठोवाठी । तै होय भेटी हरि प्रियाची ॥२४३॥
व्याघ्र सिंहाचे दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे ।
परी हरि प्रियाची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या ॥२४४॥ एकनाथी भा. २

पण या वरून कोणास निराश व्हायचे कारण नाही. जर अंतःकरणात त्यांच्या भेटीची दर्शनाची तळमळ असेल तर ती तळमळच त्या संतांची भेट करून देते. 'कै हे बिरड फिटेल' कै तो स्वामी भेटेल ॥ ज्ञा. १३ अशी भावना वृद्धिंगत झाली पाहिजे. श्री तुकाराम महाराजांना संत सद्‌गुरु भेटीची किती तळमळ होती हे त्याच्या अनेक अभंगातून स्पष्ट होते.

माझिये जातीचे मज भेटे कोणी । आवडी धणी फेडावया ॥
आवडे ज्या हरी अंतरापासुनि । ऐसियाचे मनी आर्त माझे ॥
अशा तळमळीत असताच त्यांना स्वप्नात श्री बाबाजी चैतन्य यांची गाठ पडली. व त्यांनी आवडीचा मंत्र त्यांना दिला हे प्रसिद्ध आहे. श्री निळोबारायाना तर तुकोबारायाचे निर्याण झाल्यानंतर तीव्र तळमळीने पुन्हा तुकोबारायांनी वैकुंठाहून येऊन दर्शन दिले असे त्यांच्या चरित्रात आहे. साधू केव्हा भेटतात हे तुकाराम महाराजानी एका अभंगातून सांगितले आहे.

अर्थकाम चाड नाही चित्ता । मानामान मोहमाया मिथ्या ।
वर्ते समाधानी जाणोनि नेणता । साधू भेट देती तया अवचिता ॥
मनी दृढधरी विश्वास । न करी साडीमाडीचा सायास ।
साधूदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणिवेस ॥

एवढा अधिकार सर्वांचा नसतो, म्हणून त्यांना संतांची संगती प्राप्त होत नाही. भागवताच्या दशमस्कंधात श्रीनारदाविषयीच एक कथा आली आहे. श्रीनारदमहर्षी एकवेळा हिमालयात प्रवास करीत होते, तेथे मंदाकिनीच्या तीरावरून ते ब्राह्मणवीणा वाजवित भगवन्नाम संकीर्तन करीत आनंदाने चालले असता धनाध्यक्ष कुबेराचे लाडके पुत्र नलकुबर व मणिग्रीव हे उन्मत्तपणे त्या मंदाकिनीत आपल्या स्त्रिया समवेत जलविहार करीत होते, त्याच्या स्त्रियांनी नारदांना पाहिले. व त्या लाजल्या त्यांनी काठावर येऊन आपापली वस्त्रे परिधानकेली; पण या दोघांना मात्र काहीच वाटले नाही. हे स्वैरजलक्रीडाच करीत राहिले. शेवटी नारदांनी त्यांचा अभिमान नष्ट करण्याकरिता त्यांना तुम्ही वृक्ष योनीस प्राप्त व्हाल असा शाप दिला व ते गोकुळात वृक्ष झाले. (मागाहून श्रीकृष्णानी त्यांचा त्या वृक्षयोनीतून उद्धार केला) ही कथा प्रसिद्ध आहे. सूत्रात 'महात्संग' असा शब्द आहे. भेट दर्शन असे शब्द नाहीत. एखाद्या वेळी भेट दर्शन होऊनही उपयोग होतोच असे नाही. महर्षी दुर्वास ऋषी मार्गक्रमण करीत असता ऐरावतावर बसून इंद्र येत होता. त्याने याना पाहून शापाच्या भीतीने खाली उतरून नमस्कार केला. ऋषीनाहि इंद्राने आपला आदर केला हे पाहून समाधान वाटून त्यांनी आपल्या गळ्यातील पुष्पमाला त्याला प्रसाद म्हणून दिली. ते थोडे पुढे जाताच इंद्राने ती माला हत्तीच्या सोंडेत दिली व हत्तीने चुरगळून फेकून दिली. दुर्वासानी मागे वळून पाहिले असता त्यांना तो अपमान सहन झाला नाही तेव्हा 'तुझी सर्व संपत्ती नष्ट होईल' असा त्यानी शाप दिला ही कथा प्रसिद्ध आहे. संग तोच की ज्याचा अंतःकरणावर परिणाम झाला पाहिजे. हृदयात भक्तिप्रेमाचा उदय झाला पाहिजे. त्याच्या संगतीविना भगवद्‌भक्ती निर्माण होणे अशक्य आहे.

नैषांमतिस्तावदुरुक्रमाङिंघ्र स्पृशत्यनर्थापगमोयदर्थः ।
महीयसां पादरजोऽभिषेकं निष्किंचनानां न वृणोंतयावत् ॥३२॥ भागवत स्क. ७-५

भक्तश्रेष्ठ प्रल्हादाचे उद्‌गार आहेत, तो म्हणतो, ज्याची बुद्धिभगवच्चरण कमलाला स्पर्श करते. त्यांच्या जन्म मृत्युरूप अनर्थाचा सर्वथा नाश होतो, परन्तु जे लोक अकिंचन भगवतप्रेमी महात्म्याच्या चरण धूलीत स्नान करीत नाहीत त्याची बुद्धि काम्यकर्माचे आचरण करीत असताही भगवच्चरणाचा स्पर्श करू शकत नाही म्हणजे भगवच्चरणाचा लाभ होत नाही. हे प्रल्हादाचे उद्‌गार नारदांनीच सांगितले आहेत.

भक्तवर्य मुचकुंद याचे उद्‌गारही या विषयात मननीय आहेत.
भवापवर्गो भ्रमतो यदा भवेज्जनस्य तर्त्द्यच्चुत सत्समागमः ।
सत्संगमो यहिंतदैव सद्‍गतौ परावरेशेत्वयि जायते मतिः ॥५४॥ भागवत स्कं. १०-५१

'हे भगवन ! या संसारचक्रामध्ये भटकणार्‍या प्राण्याचा जन्ममरणाचा अंत निकट येतो, तेव्हा त्याला सत्संगाची प्राप्ती होते व सत्संग प्राप्त होताच सत्पुरुषाचा आश्रय व कार्यकारणाचा नियन्ता जो तू भगवंत त्या तुझ्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते.'

ज्ञानी विद्वान् पुरुषाच्या संगतीत ज्ञान, विद्या प्राप्त होते. धनवान् पुरुषाच्या संगतीने त्याच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. तद्वत् संत महात्म्याच्या संगतीत भगवद्‌भाव प्राप्त होतो. साधूचा अकिला हरिभक्त । असे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. असा सर्वोपकारी महात्म्या पुरुषाचा संग दुर्लभ आहे. तसेच दुसरे विशेषण 'अगम्य' असे दिले आहे. अगम्य म्हणजे तरी संत भेटले तरी त्यांना 'संत' या स्वरूपात जाणणे कठीण आहे. हे वर उदाहरणानी सांगितले गेलेच आहे. वास्तविक ते जगात राहून जगासारखेच वागत असतात. पण त्याचा अंतरातील अध्यात्मिक अधिकार फार श्रेष्ठ असतो. त्या अधिकाराचे दृष्टिने त्यांना ओळखणे कठीण असते. श्रीकृष्ण भगवानच म्हणतात
तैसा संसर्गामाजि असे । सकळा सारिखा दिसे ।
जैसे तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥७२॥
तैसा सामान्यत्वे पाहिजे । जरी साधारणुचि देखिजे ।
येखी निर्धारिता नेणिजे । सोय जयाची ॥७३॥ ज्ञानेश्वरी ३

या अगम्यतेचे थोडे वेगळ्या दृष्टीने श्री एकनाथ महाराजांनी व्याख्यान केले आहे.
ऐसे पवित्र आणि कृपामूर्ति । भाग्ये लाधलो हे संगती ।
सत्संगाची निज ख्याती । सांगता श्रुति मौनावल्या ॥२५२॥
ब्रह्मनिर्धर्म नेणे निजधर्मा । साधूमुखे ब्रह्मत्व ये ब्रह्मा ।
त्या सत्संगाचा महिमा । अति गरिमा निरुपम ॥२५६॥
सत्संग म्हणो निधिसमान । निधी जोडल्या हारपे जाण ।
सत्संगाचे महिमान । साधका संपूर्ण सद्रूप करी ॥२५७॥
इंद्रिया वीण स्वानंदु । विषयावीण परमानंदु ।
ऐसा करिती निजबोधु । अगाध साधु निजमहिमा ॥ २५८ ॥ एकनाथी भागवत अ. २.

कित्येक भोळे भाविक लोक एखादा बाह्यवेषधारी म्हणजे संत चिन्हे धारण करणारा दिसला की त्याला भक्त, संत असे समजू लागतात. कित्येक काही अलौकिक चमत्कार दिसले की त्यास संत म्हणून मागे लागतात. पण एवढ्याने त्याची फसवणूकही होत असते. तर कित्येक वरून सामान्य माणसासारखे भासतात पण अंतर्यामी ते फार श्रेष्ठ अशा अधिकाराप्रत पोहचलेले असतात. अशा स्थितीत त्यांना ओळखणे अशक्य होऊन जाते. कित्येक तर जगाने आपल्याला ओळखू नये, उपाधी वाढू नये म्हणून जाणून बुजून वेड्यासारखेही वागत असतात.

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकाचे काम नाही येथे ॥ १ ॥
बहुदुधड जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ ३ ॥
उदाहरणाने सांगावयाचे झाल्यास श्री ज्ञानेश्वर महाराजास अथवा श्री तुकाराम महाराजाना तत्कालीन किती लोकानी ओळखले. आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी ओळखले नाही. पैठण येथील लोकानीही प्रथम ओळखलेच नाही, कित्येकानी उपहासही केला. इतकेच नव्हे तर चांगदेवासारख्या आपल्या योगसामर्थ्याने चौदाशे वर्षे जगणार्‍या योगिराजानेही प्रथम ओळखलच नाही. श्री तुकाराम महाराजांचा देहूत किती छळ होत होता हे प्रसिद्धच आहे. रामेश्वर भट्टासारख्या विद्वान ब्राह्मणाने तरी प्रथम ओळखले का ? म्हणूनच सत्संग 'अगम्य' असे म्हटले आहे.

असा अगम्य असूनही भाग्यवशात् प्राप्त झाला तर तो 'अमोघ' म्हणजे व्यर्थ न जाणारा आहे. स्मृत्यादी ग्रंथातून अनेक साधने सांगितली आहेत, त्या त्या साधनात अनेक प्रतिबंध आडवे, येतात ते दूर न केले गेले तर त्या साधनाचे आचरण सर्व व्यर्थ जाते. सत्संगतीचे तसे नाही. ती साधने कशी व्यर्थ होतात या विषयी एकनाथ महाराजानी भागवत एकादश स्कंधाच्या बाराव्या अध्यायाच्या प्रारंभीच विस्तारपूर्वक सांगितले आहे. त्याचा भावार्थ खाली देत आहो.

एकनाथ महाराज सांगतात,
मागा बोलिली जी साधने । ती अवघीचि मलिन अभिमाने ॥
उदाहरणार्थ अष्टांगयोग कठिण, कारण त्यात पवन म्हणजे प्राणवायुचा जप करणे कठिण आहे. नित्यानित्यविवेकात पांडित्य अभिमान बाधक होतो, धन-मानाची वांछा निर्माण होते. ते ज्ञान हेच त्याला विघ्न होते. तप केले तर बडया बडया तपोनिष्ठाना क्रोधाने जर्जर केले व त्याचे तप व्यर्थ गेले. सर्वस्व त्याग करून संन्यास घेतला तर तेथेही देहाभिमान जळत नाही. विरजा होम व्यर्थ होत मानाभिमान तेथेहि बाधक होतो. श्रौतस्मार्त साग कर्म केले, इष्टापूर्त कर्मे केली तर तेथेही स्वर्गभोग आडवे येतात. तात्पर्य ही साधने अमोघ नाहीत, तसेच या प्रत्येक साधनांच्या पूर्वी कांही साधने करावी लागतात. सत्संगाचे तसे नाही. या सत्संगाने कोणा कोणाचा कसा कसा उद्धार झाला ते सांगतात.

पहाता केवळ जडमूढ । रजतम योनी जन्मले गूढ ।
सत्संगती लागोनिदृढ । माते सुदृढ पावले ॥६४॥
दैत्य दानव निशाचर । खग मृग गंधर्व अप्सरा ।
सिद्धचारण विद्याधर । नाग विखार गुह्यक ॥६५॥
जे सकळ वर्ण धर्मावेगळे । ज्याच्या नामास कोणी नातळे ।
छाया देखोनि जग पळे । अत्यंत मैळे अत्यज ॥६७॥
तिही धरोनि सत्संगती । आले माझिया पदाप्रती ।
देवद्विज तयाते वदिती । अभिनव कीर्ती संताची ॥६८॥
यमधर्म पाया लागती । तीर्थे पायवणी मागती ।
भावे धरिल्या सत्संगती । एवढी प्राप्ती पुरुषाशी ॥७२॥
यावरून महात्संग अमोघ कसा आहे हे लक्षात येईल.

वर ज्याची उदाहरणे दिली आहेत त्यांनी वेदाध्ययन केले नव्हते, गुरुसेवाही केली नाही. चांद्रायणादिव्रत अथवा उग्र तपश्चर्याही केली नव्हती. भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात.
तिही नाही केले वेदठपण । नाही गुरु केले केवळ शास्त्रज्ञ ।
व्रत तपादि नाना साधन । नाही जाण तिही केले ॥१०४॥
केवळ गा सत्संगती । मज पावल्या नेणो किती ।
एक भावे जे भावार्थी । त्यांसी श्रीपतीसुलभू ॥१०५॥ एकनाथी भागवत अ. १

एका क्षणाचाही सत्संग व्यर्थ जात नाही. 'निमीषार्थ होता सत्संग । तेणे संगे हो भवभग । यालागी सत्संगाचे भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥' २-२५० ॥ एवढा विचार करण्याचे कारण सत्संगाचे अमोघत्व, उपकारित्व पटावे हेच आहे.

वाल्याकोळ्यास क्षणभरच नारदाचा संग घडला होता, अजामिळाला ही भाग्याने मृत्युसमयी विष्णुदूताचे दर्शन झाले व त्याचा आणि यमदूताचा संवाद श्रवण करण्यास मिळाला, त्याचाच परिणाम त्याच्या जीवनात भगवद्‌भक्तीचा प्रवेश झाला. राज्याची उपेक्षा करणार्‍या ध्रुवास मधुवनात प्रवेश करताना क्षणभरच श्री नारदाची संगती घडून त्यांच्याकडून नारायण मंत्राची प्राप्ती झाली. तुकाराम महाराजाना तर स्वप्नात गंगा स्नानाला जाताना श्री बाबाजी सद्‍गुरूंची भेट झाली व त्यांनी 'रामकृष्णहरी' मंत्र दिला. पण त्याचाच परिणाम तुका म्हणे संती दाखविला तारू । कृपेचा सागरू पांडुरंग ॥' येथ पावेतो झाला. अशी सहस्रावधि उदाहरणे साहेत. 'संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्संगः शेवधिर्नृणाम ॥' 'या संसारात क्षणभर जरी सत्संग घडला तरी प्राणिमात्राना संपूर्ण कल्याणकारी होतो.' असे राजा जनक नवयोगेश्वराना म्हणतो. ए भा. २-३०

लौकिक उदाहरण द्यावयाचे तर विजेचा प्रखर दाब जेथे साठविला गेला आहे त्या विद्युत घटाशी दूरतः जरी स्पर्श झाला तरी ती सर्वांगात क्षणात प्रविष्ट होते, तसे संत हे ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेम यानी कायावाचामनाने संपूर्ण व्यापून गेलेले असतात. तसेच सर्वानी याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा व आपले जीवन भगवन्मय बनवावे हीच त्याची धारणा व खटपट असते. याकरिता त्याच्या संगतीत कोणी कसा जरी आला तरी "गुण दोष याति न विचारिती काही। ठाव दिला पायी आपुलिया ॥ तु ॥" या उक्तीप्रमाणे त्याचा ते उद्धार करतात. कोणी केवढाही अज्ञानी, दुष्ट, दुराचारी, पापी असला तरी त्याची ती पापशक्ती संतांच्या पापनाशक, तारक अशा करुणाशक्तीपुढे व्यर्थ होते म्हणून महत्संग 'अमोघ' आहे असे सूत्रात म्हटले आहे.


GO TOP