नारद भक्तिसूत्रे

तदेव साध्यताम् तदेव साध्याताम् ॥ ४२ ॥


अर्थ : तोच सत्संग साधावा. तोच सत्संग साधावा.


विवरण : मागील चौतिसाव्या सूत्रापासून भक्तिसाधनाचा विचार केला आहे. विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुणश्रवण, कीर्तन इ. साधने सांगितली. नंतर मुख्यत्वाने महत्कृपा हे साधन सांगितले व महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ आहे हेही स्पष्ट केले आणि भगवत्कृपेने सत्संग प्राप्त होतो, तत्त्वतः भगवान व हे महात्मे यांच्यात भेद नाही. ज्याना भक्तीचा लाभ व्हावा असे वाटत असेल त्यानी महत्संगच साधावा असे आदराने द्विवार सांगितले आहे. याचे कारण मागे सांगितलेली विषयत्याग संगत्याग इ. साधने ही महत्संगाच्या द्वाराच सिद्ध होऊ शकतात. महत्संगच का साधावा ? याची कारणे खाली दिली आहेत.

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. विषयात दोषदर्शन, विषयाची अनित्यता, क्षयातिशयादि दोष युक्तता, त्यातील परिणाम, ताप, संस्कार, दुःख, गुणवृत्ती, विरोधादिदोष सत्संगतीनेच यथार्थ स्वरूपाने कळत असतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, "बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥" तसेच संगत्याग, संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे.

तिसरे अव्यावृत भजन - जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते श्री नारदाच्या कृपेमुळेच. तुकाराम महाराज म्हणतात, 'कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥' म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल. सूत्रात द्विरुक्तीने सांगितले आहे त्याचे कारण 'भक्ती' हे येथे साध्य आहे व अन्य साधने आहेत, ते साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.


GO TOP