नारद भक्तिसूत्रे

अव्यावृत भजनात् ॥ ३६ ॥


अर्थ : (ते भक्तिसाधन) अव्यावृत्त - अखंड भजनाने (सिद्ध होते.)


विवरण : मागील सूत्रात विषयत्याग व संगत्याग हे साधन सांगितले. आता या सूत्रात ती भक्ती सिद्ध होण्याचे 'अव्यावृत भजन' हे साधन सांगतात. भजन हे प्रसिद्ध साधन आहे. सर्वच भाविक कोणत्या ना कोणत्या प्रकारे भजन करीतच असतात. पण ते भजन अनन्यभक्ती निर्माण करीलच असे नाही.

भजन हे भक्तीचे महत्त्वाचे अंग आहे पण ते अव्यावृत-अखंड-झाले पाहिजे. भजनात खंड पडण्याची देहभोगप्रवृत्ती, विषयवासना, विकाराधीनता, अश्रद्धा इत्यादी अनेक कारणे असतात, ती दूर करून पूर्ण भावनेने ते भजन झाले पाहिजे.
आम्हा नामाचे चिंतन । रामकृष्ण नारायण ।
तुका म्हणे क्षण । खाता जेवीता न विसंबो ॥
असे अनेक उद्‌गार श्रीतुकाराममहाराजांचे प्रसिद्ध आहेत.

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥
असा आपला अनुभव श्रीज्ञानेश्वरमहाराज हरिपाठामध्ये सांगतात. या अव्यावृत अखंड भजनाकरिता दृढभाव व नामनिष्ठा आवश्यक असते.

अखंड भजन तेव्हाच होईल की जेव्हा सर्वेंद्रियांच्या अंतःकरणाच्या वृत्ती एका ठिकाणी येतील. त्या कशा आल्या पाहिजेत या विषयी श्रीएकनाथमहाराज सांगतात -
अकराही इंद्रियवृत्ति । कैशा लावाव्या भगवदभक्ती ।
ऐक राया तुजप्रती । संक्षेप स्थिती सांगेन ॥
मने करावे हरीचे ध्यान । श्रवणे करावे कीर्तिश्रवण ।
जिव्हेने करावे नामस्मरण । हरिकीर्तन अहर्निशी ॥
करी करावे हरिपूजन । चरणी देवालय गमन ।
घ्राणी तुलसी आमोद ग्रहण । जिही हरिचरण पूजिले ॥
नित्य निर्माल्य मिरवे शिरी । चरण तीर्थे अभ्यंतरी ।
हरिप्रसाद ज्याचे उदरी । त्या देखोनि दुरी भवभय पळे ॥
वाढतेनि सदभावे जाण । चढतेनि प्रेमे पूर्ण ।
"अखंड" ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥ भा. २.३००-४

तसेच पुढे अकराव्या अध्यायात स्वतः श्रीकृष्णच अखंड भजनाचे स्वरूप सांगतात.
माझेनि भजने कृतकृत्यता । दृढ विश्वास धरोनि चित्ता ।
भजनी प्रवर्तावे सर्वथा । अविश्रमता अहर्निशी ॥
माझ्या भजनाच्या आवडी । नुरेचि अराणुकेसी याडी ।
वाया जावो नेदी अर्धघडी । भजन परवडी या नाव ॥ ए. भा. ११. ६५२-५३

अखंड भजन होण्याकरिता कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य असाव्यात हे श्रीकृष्ण सांगतात -
आळस दवडूनि दुरी । अभिमान घालोनिया बाहेरी ।
अहर्निशी कीर्तन करी । गर्व न धरी जाणिवेचा ॥७३८॥
जाणीव जाणीव शहाणीव । वोवाळूनि सांडावे सर्व ।
सप्रेम सावडी कथागौरव । सुख अभिनव तेणे मज ॥७३९॥
विसरोनि आन आठवण । अखंडता हरिस्मरण ।
या नाव भक्तीसी विकला प्राण । इतर भजन अनुमानिक ॥१०८०॥ ए. भा. ११

अशा अखंड भजनानेच खरी प्रेमभक्ती उत्पन्न होते. ध्रुव-प्रल्हादादिकानी अव्यावृत भजनच केले. 'भजनं-भक्ति.' भजन म्हणजेच भक्ती असा भजन शब्दाचा अर्थ आहे. पण 'तुका म्हणे नाम । मागे मागे धावे प्रेम ।' असे श्रीतुकाराममहाराज म्हणतात. अंतःकरणात गुणकामनारहित परमप्रेम एकदम सहजासहजी उत्पन्न होणे कठीण आहे. ती भक्ती या अखंड भजनाने उत्पन्न होते 'आई आई' या नावाने हाका मारतामारताच बालकाच्या ठिकाणी मातृप्रेम वृद्धिंगत होत असते.

ही अनन्यता सिद्ध होण्याकरिता कामादि विकारांमुळे चित्त ज्या विषयासी तादात्म्याला पावलेले आहे त्याचा त्याग करूनच ती सिद्ध होते, असे श्रीज्ञानेश्वरमहाराजही सांगतात.

जे विषयांसि तिळांजळी देऊनि । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि ।
माते हृदयी सूनि । भोगिताती ॥१२४॥
परी भोगितया नाराणुका । भेटणे नाही क्षुधादिका ।
तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु ॥ १२५ ॥ ज्ञा. ८

श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, जे भक्त विषयांना तिलांजली देऊन म्हणजे विषयांवर पाणी सोडून, सवासना विषयत्याग करून, यावत् प्रवृत्ती म्हणजे व्यवहाराचा निरोध करून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा भोग घेतात, त्यांचे माझ्या स्वरूपाचा कितीही भोग घेतला तरी समाधान होत नाही,' जास्त काय, 'भूक, तहान याचा त्यांना पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादी इंद्रियाकडे कोण पाहील ?' असा वरील ओव्याचा आशय आहे. व्यावृत म्हणजे तेथून परतणे. भजन करता करता कोणत्याही अन्य कारणाने भजनापासून परत न फिरणे.

श्रीभानुदासमहाराज सांगतात -
जे हे आकाश वरपडो पाहे । ब्रह्मगोल भंगा जाये ।
वडवानळ त्रिभुवन खाय । तरि मी तुझीच वास पाहे गा विठोबा ॥
भलतैसे वर पडो भारी । नाम न टळो न संडो निर्धारी ।
जैसी पतिव्रताप्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥
अशा प्रकारे 'अव्यावृत्त भजन' हे त्या प्रेमस्वरूपा भक्तीचे साधन आहे.


GO TOP