नारद भक्तिसूत्रे

लोकेऽपि भगवतगुणश्रवणकीर्तनात् ॥३७॥


अर्थ - लोक व्यवहारातही भगवतगुण श्रवण अणि कीर्तनाने (भक्तीची प्राप्ती होते असे मानले जाते.)


विवरण : मागील छत्तिसाव्या सूत्राचेच हे अधिक स्पष्टीकरण आहे असे म्हटले तरी चालेल. तेथे 'भजन' असे पद आहे. भजनात श्रवण-कीर्तनादिकाचाही अंतर्भाव होतो. लोकव्यवहारात भक्ती उत्पन्न होण्याकरिता भगवद्‌गुण श्रवण-कीर्तनादि साधनाचा अवलंब केला जातो. सत्संगतीत श्रद्धापूर्वक हरिगुण श्रवण-कीर्तनादिकानेच अंतःकरणात भगवतभाव निर्माण होतो व प्रेमवृद्धी होत असते. असा सर्व भक्तिमान पुरुषाचा अनुभव आहे.

येथे गुणश्रवण व कीर्तन असे पद आहे. जगांत प्रत्येक चेतन (जीव) अचेतन वस्तूच्या ठिकाणी कोणता ना कोणता गुण असतो. किंबहुना प्रत्येक वस्तू गुणात्मकच आहे, परंतु जीव किंवा जडपदार्थाच्या गुणश्रवण-कीर्तनाने भक्ती निर्माण होणार नाही. किंबहुना ते गुणश्रवणकीर्तन भक्तीस प्रतिबंधक होत असते. याकरिता मूळ सूत्रांत 'भागवत्' हे पद योजिले आहे. तत्त्वतः परमात्मा जरी निर्गुण निराकार असा आहे, तरी तो आपल्या भक्तांकरिता सगुण साकार बनतो. गीतेच्या चौथ्या अध्यायांत श्रीकृष्ण स्वतःच सांगतात.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्‍वरोऽपि सन ।
प्रकृतिं स्वामिधिष्ठाय संभवाम्यात्म मायया ॥ ४-६
'अर्जुना ! मी जन्मविरहित, अव्ययस्वरूप आणि भूताचा अधिपती असूनही स्वकीय मायेचा अंगीकार करून आपल्या भक्तांकरिता अवतार घेतो.'

ते वेळी आपुल्याचेनि कैवारे । मी साकार होऊनि अवतरे ॥ ज्ञा. ४-५ पुढे भक्ति-सूत्र ऐशीमध्येही भगवंताचा आविर्भाव सांगितला आहे. सूत्रात 'भगवद्‌गुण' असा शब्द आहे. ईश्‍वरवाचक जी अनंत नामे अथवा विशेषणे योजिली जातात त्यांचा त्यांचा काही विशेष अर्थात उपयोग असतो. काही नामे गुणबोधक, काही क्रियाबोधक, काही सामर्थ्यबोधक, काही लीलावाचक अशी अनेक प्रकारची आहेत. येथे देव, परमात्मा असा शब्द न वापरता 'भगवत्' असा शब्द वापरला आहे, तो फार महत्त्वपूर्ण अर्थ प्रतिपादन करणारा आहे. गीतेमध्येही श्रीकृष्ण उवाच असे न म्हणता 'भगवानुवाच' असे म्हटले आहे. 'भगवत्' शब्दाची व्याख्या विष्णुपुराणामध्ये खालील प्रमाणे केली आहे.

शुद्धे महाविभूत्याख्ये परेब्रह्मणि वर्तते ।
मैत्रेय भगवच्छब्दः सर्वकारण कारणे ॥
'शुद्ध परब्रह्म जे सर्व कारणांचे कारण आहे, अशा त्या महाविभूती या नावाने प्रसिद्ध परमात्मस्वरूपाकरिताच 'भगवत्' शब्द योजिला आहे. या नंतर 'भगवत्' या पदातील प्रत्येक वर्णाचा स्वतंत्र अर्थ श्लोकांतून सांगितला आहे.

संभर्तेति तथा भर्ता भकारोऽर्थ द्वयान्वितः ।
नेता गमयिता सृष्टा गकारार्थस्तथा मुने ॥
ऐश्‍वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस श्रियः ।
ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा ॥
वसन्ति तत्र भूतानि भूतात्मन्यखिलात्मनि ।
सच भूतेष्वशेषेषु वकारार्थ स्ततोऽव्यय. ॥ विष्णुपुराण ६।५।७२-७५
भगवच्छब्दातील प्रत्येक अवयवाचा अर्थ सांगण्याकरितां प्रथम 'भ' कार अर्थ पाहू. 'भू' धातूपासून 'ऊ' प्रत्यय लागला असता भू शब्द बनतो. त्याचा 'संभर्ता' 'भर्ता' अशा दोन अर्थात् प्रयोग होतो.

'संभंरणं उपकरण संविधानम'
प्रकृत्यादिकाना कार्योत्पत्तीयोग्य करणे म्हणजे संभरण, ते करणारा म्हणून संभर्ता व भर्ता म्हणजे स्वामी, सर्व जगाचे भरणपोषण करणारा. 'विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा एथ पंडुसुता ॥ ज्ञा. ९. भगवत् शब्दातील दुसरा वर्ण 'ग' आहे. या गकाराचे तीन अर्थ 'नेता, गमयिता, सृष्टा' असे आहेत. नेता म्हणजे स्थिती कर्ता. गमयिता म्हणजे संहारकर्ता. सृष्टा म्हणजे उत्पत्ती करणारा. गम धातू हा उत्पत्ती स्थिती लयार्थक आहे. 'भग' एवढा शब्द घेतला तर या दोन अक्षरांनी सिद्ध होणार्‍या पदाचा अर्थ तिसर्‍या श्लोकांत सांगितला आहे. समग्र पद सर्व विशेषणाकडे लावले जाते. समग्र ऐश्वर्य म्हणजे संपूर्ण नियमन-शक्ती. गुणवान् या रूपाने जी प्रसिद्धी त्यास यश म्हणतात. श्री म्हणजे सर्व प्रकारचे भाग्य संपत्ती. वैराग्य म्हणजे कोठेही आसक्ती नसणे. ज्ञान म्हणजे सर्व वस्तूचे यथार्थरूपाने विशेष ज्ञान, सर्वज्ञत्व तिसरा वर्ण 'व' आहे. वस धातूपासून 'व' शब्द सिद्ध होतो.

'वसन्ति तत्र भूतानि भूतात्मन्य-खिलात्मनि' भूतमात्राच्या आत अखिल शरीरामध्ये वास करणारा, असा 'व' शब्दार्थ आहे. शेवटचा 'त' "त्यजति हेय गुणान्," हेय म्हणजे त्याज्य अशा गुणाचा त्याग या अर्थी त्यज धातूस क्विप प्रत्यय लागून यकारादि भागाचा लोप होऊन व्यंजन मात्र "त" कार रूप अवशिष्ट राहते तो 'भगवत्' या शब्दातील अंतिम तकार होय. तात्पर्य भगवत् शब्द हा षड्गुणैश्वर्य संपन्नता वाचक आहे. आईका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसति जेथ ॥ म्हणोनि तो भगवंत जो निःसंगाचा सांगात ॥ ज्ञा ६-३७ असे श्री ज्ञानेश्वर महाराजही भगवंत शब्दाचे व्याख्यान करतात. विशेषतः निर्गुण, निराकार परमेश्वर स्वरूपास भगवंत हे विशेषण लावले जात नाही तर तोच जेव्हा भक्तांकरितां सगुण, साकार बनतो तेव्हां त्याला भगवान् अशी संज्ञा दिली जाते. परमात्म्याचा आविर्भाव अनेक अवतारांच्या रूपाने होतो, पण सर्वच अवतारांत पूर्णरूपाने षडगुण प्रगट झालेले नाहीत. रामकृष्णादि पूर्णावतारांतच हे सर्व गुण पूर्णरूपाने भक्तांना प्रचीतीस आले, म्हणून त्यांना भगवान् अशी संज्ञा आहे. किंवा ज्या ज्या भक्ताला ज्या ज्या अवतारस्वरूपापासून लाभ झाला तो त्याला भगवान् म्हणू शकतो. ज्या ठिकाणी मनुष्याची श्रद्धा, भावना असते त्याचे रूप, गुण, लीला, चरित्र इत्यादि त्याला आवडू लागते, जसे जसे ते प्रिय वाटते तसे तसे ते ऐकण्यांत अथवा त्याचे गुणानुवाद गाण्यांत अधिक रुची निर्माण होते. मातेला आपल्या प्रिय बालकाचे गुण आवडू लागतात व ती ते ज्याच्या त्याच्या जवळ गात असते, तसे परमात्म्याचे अनंत गुण आहेत. षडगुण हे आहेत पण त्याच्या गुणाचा पार कोणासही लागत नाही.

प्रत्यक्ष ब्रह्मदेव कृष्णस्तुती करताना म्हणतो -
गुणात्मनस्तेऽपि गुणान्विमातु हितावतीर्णस्य कईशिरेऽस्य ।
कालेन यैर्वा विमिताः सुकल्पै र्भू पांसव. खे मिहिका द्युभास; ॥ भागवत स्कं १० अ. १४-७
ब्रह्मदेव म्हणतो, 'गुणाचा आत्मा व जगद्‍हिताकरिता अवतार घेणार्‍या तुझ्या गुणांना कोण मोजण्यास समर्थ आहे ? पृथ्वीचे परमाणू मोजता येतील, आकाशातील नक्षत्रे मोजली जातील पण गुणांचा अंत लागणार नाही,' अशी पुष्कळ प्रमाणे आहेत जीवाच्या ठिकाणी काही गुण सांपडतात पण ते सर्व सद्‍गुणच असतात व टिकणारे असतात असे नाही. पण भगवंताच्या ठिकाणी सर्व सद्‌गुणांचा समन्वय असतो व ते सर्व नित्यच असतात. श्रीमद्‌भागवतामध्ये अशा महत्त्वाच्या काही गुणाचा निर्देश केला आहे.

सत्यं शौच दयाक्षान्तिस्त्यागः संतोष आर्जवम् । शमो दमस्तपः साम्यं तितिक्षोपरतिः श्रुतम् ॥ २६ ॥ ज्ञानं विरक्तिरैश्वर्य शौचं तेजोबलं स्मृतिः । स्वातन्त्र्यं कौशल कान्ति धैर्य मार्दवमेवच ॥ २७ ॥ प्रागल्भ्य प्रश्नयः शीलं सह ओजो बलं भगः । गांभीर्यम् स्थैर्यमास्तिक्यं कीर्तिर्मानोह्यहकृति ॥ २८ ॥ एते चान्येच भगवन्नित्या यत्र महागुणा । भागवत स्कंध १ अ. १६
अर्थ स्पष्ट आहे याना महागुण म्हटले आहे. जीव हा स्वरूपाने अंश - अल्प - असा असल्याने त्याच्या ठिकाणी नित्य असे हे महागुण असू शकत नाहीत.

भगवान श्रीकृष्ण आपल्या सगुण मूर्तीच्या ठिकाणी अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय कसा आहे हे उद्धवास सांगतात.
धैर्य वीर्य उदारकीर्ती । गुण गांभीर्य शौर्य ख्याती ।
यासी कारण माझी सगुणमूर्ती । जाण निश्चती उद्धवा ॥ १४९२ ॥

"भक्तिरसामृतसिंधु" नामक भक्तिशास्त्रावरील अपूर्वग्रंथात श्रवणाची व्याख्या । श्रवणं नामचरित गुणादीना श्रुतिर्भवेत् । २-३२ "श्रवण म्हणजे नाम, चरित्र, गुण इत्यादि श्रद्धेने ऐकणे अशी केली आहे."

अशा अलौकिक गुणाच्या श्रवणाने हृदयात भगवद्विषयक प्रेमभक्ती निर्माण होते.

भगवदगुण श्रवण हे अनेक अंगाने होत असते. कीर्तीश्रवण, चरित्रश्रवण, लीलाश्रवण, अवतारकथाश्रवण, भजनश्रवण, इ. श्रीमद्‌भागवत एकादश स्कंधामध्ये नवयोगेश्वर राजा जनकास श्रवण कोणते करावे व कसे करावे हे सांगतात.

तरावया भाळे भोळे जन । मुख्य चित्त शुद्धीच कारण ।
जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरे ॥ ५२५ ॥
चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणे सादरे ऐके माता ।
तेणे सादरे हरिकथा । सार्थकता परिसावी ॥ ५२६ ॥
हरिची जन्मकर्मे अनंत गुण । म्हणाल त्याचे नव्हेल श्रवण ।
लोक प्रसिद्ध जे जे पुराण । ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे ॥ ५२७ ॥ एकनाथी भागवत २.

कोणी म्हणेल श्रद्धेविना श्रवण व्यर्थ आहे. पण श्रद्धा ही देखिल श्रवणाविना कशी निर्माण होईल ? भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात. हरिकथा अवघेचि ऐकती । परी माझी श्रद्धा नुपजे चित्ती । कोणाएक अभिनवगती । श्रद्धा उत्पत्ती श्रवणेचि होय ॥ ७८ ॥ आईक श्रद्धेचे लक्षण । जे करी कथा श्रवण । ते हृदयी वाढे अनुसंधान । सप्रेम मनन उल्हासे ॥ ७९ ॥ नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी । हृदयी स्वानंदाची उभवी गुढी एवढी गोडी श्रवणार्थी ॥ ८० ॥ - एकनाथी भागवत अ. २०

मुख्य भक्तीचे कारण । हरिचे जन्मकर्मगुण ।
पूर्णश्रद्धा करावे श्रवण हरिकीर्तन स्वानंदे ॥ ए. भा. ३-५४४ ॥ असे नवयोगेश्वरापैकी प्रबुद्ध हे विदेहराजा चक्रवर्तीस सांगतात.

नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्ती ही प्रथम सांगितली आहे. संसारातही एखाद्या वस्तूचे नाम व त्या वस्तूचे विशेष गुण याचे ज्ञान त्या त्या वस्तूचा वाचक जो शब्द त्याच्या श्रवणानेच होते. त्या वस्तूच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी असली म्हणजे त्या वस्तूचे प्रेम निर्माण होते, म्हणून कथाश्रवणानेच भगवदभक्ती निर्माण होत असते. श्रीभागवत अकराव्या स्कंधाच्या एकोणिसाव्या अध्यायांत श्रीकृष्णाने भक्ती निर्माण होण्याची अनेक साधने (जवळ जवळ पंधरा) सांगितली आहेत. त्याच्या शेवटी स्पष्ट म्हटले आहे -
एवं धर्मैनुष्याणां उद्धवात्मनिवेदिनाम
मयि संजायते भक्तिः कोऽन्योऽर्थोस्यावशिष्यते ॥ २४ ॥
'श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ! याप्रमाणे मन, बुद्धी, इंद्रियादि सर्व प्रकारांनी जे माझ्या धर्माचे आचरण करतात त्या योगाने त्यांची माझ्या ठिकाणी अनन्त भक्ती निर्माण होते. यापेक्षा त्याला कोणता मोठा पुरुषार्थ मिळवावयाचा राहिला ?

या भक्तिसाधनाच्या प्रकारांत प्रारंभीच भगवत्कथा श्रवण व कीर्तन हेच हृदयात भक्ति निर्माण होण्याचे साधन आहे असे म्हटले आहे. श्रद्धामृतकथाया मे शश्वन्मदनुकीर्तनम । भागवत ११ - अ, १९-२०
श्रीकृष्ण सांगतात, माझ्या अमृतासारख्या मधुर कथांवर श्रद्धा ठेवणे, सदैव माझे गुणकीर्तन करणे (हेच भक्तिउत्पत्तीचे प्रथम साधन आहे.) भागवत बाराव्या स्कंधात शुकाचार्य श्रीकृष्णाच्या ठिकाणी अमल भक्ती व्हावी याची अपेक्षा करणार्‍याला गुणानुवादाचे श्रवण हेच श्रेष्ठ साधन आहे असे स्पष्ट सांगतात.

यस्तूत्तमश्‍लोकगुणानुवादः संगीयतेऽभीक्ष्णममङ्ग लघ्नः ।
तमेव नित्यं श्रुणुयादभीक्ष्णं कृष्णेऽमलां भक्तिमभीप्समानाः ॥
'उत्तमश्लोक जो भगवान् त्याच्या गुणाचा अनुवाद तत्काल सर्व अमंगलांचा नाश करणारा आहे, म्हणून श्रीकृष्णाच्या ठिकाणी अमलाभक्तीची अपेक्षा करणार्‍यांनी त्या गुणांचेच अखंड श्रवण करावे' भगवद्‌गुण लीलादिकांचे श्रद्धापूर्वक श्रवण झाले म्हणजे हृदयशुद्धी होते. भागवतातील पहिल्या स्कंधाच्या दुसर्‍या अध्यायांत सूतानी म्हटले आहे, 'ज्याचे श्रवण व कीर्तन पुण्यरूप आहे असा भगवान श्रीकृष्ण आपल्या कथेचे श्रवण करणार्‍या पुरुषांच्या हृदयांत राहून त्यांच्या कामादि वासनांचा व तज्जन्य पापांचा नाश करतो.' तसेच दुसर्‍या स्कंधातही या विषयाचा विचार करतांना म्हटले आहे. शृण्वतः श्रद्धया नित्यं गृणतश्‍च स्वचेष्टितम् ।
कालेन नातिदीर्घेण भगवान्विशते हृदि ॥ ४ ॥
प्रविष्टः कर्णरन्ध्रेण स्वानां भाव सशेरुहम् ।
धुनोति शमलं कृष्णः सलिलस्य यथा शरत ॥ ५ ॥ स्कं. २-८

'आपले चरित्र प्रीतीने श्रवण किंवा कीर्तन करणार्‍या पुरुषाच्या हृदयामध्ये थोडक्याच कालात भगवान प्रवेश करतो आणि आपल्या भक्तांच्या हृदयकमलात कर्णाच्या द्वारे (म्ह. श्रवणाने) प्रविष्ट झालेला तो भगवान, जसा शरदृतू नदी तळी वगैरे सर्व ठिकाणच्या पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे त्या भक्तांच्या हृदयकमळातील कामक्रोधादि सर्व पापांचा नाश करून टाकतो.' <

हृदयशुद्धी हे भक्तिप्रेमाचे अधिष्ठान आहे. ती श्रवणानेच योग्यप्रकारे होते. म्हणून नारद लोकव्यवहाराचा अनुवाद करून भगवद्‌गुणश्रवण हे अंतःकरणांत भगवद्‌भक्ती निर्माण होण्याचे साधन आहे असे सांगतात.

गुणश्रवणाप्रमाणे कीर्तन हेही हृदयांत भक्ति निर्माण होण्याचे साधन आहे. भक्ति निर्माण झाल्यावरही नारदासारखे, शुक्राचार्यासारखे, भक्त कीर्तन करीतच असतात पण ती निर्माण होण्याकरिताही कीर्तन हे साधन सांगितले आहे. गुणलीलादिकांचे श्रवण झाले की वाणीच्या द्वारे ते कीर्तनरूपाने बाहेर पडतेच. श्रवणाप्रमाणे कीर्तनासही या मार्गात श्रेष्ठत्व आहे. नवविधा भक्तीत श्रवणानंतर कीर्तनाचाच क्रम सांगितला आहे. कीर्तनाची व्याख्या भक्तिरसामृतसिंधूमध्ये नामलीला गुणादीनामुच्चैभीषातुकीर्तनम् ॥ १-२-२९ 'नाम लीला गुणादिकांचे मोठ्याने गायन करणे म्हणजे कीर्तन होय.' अशी केली आहे, यावरून कीर्तनाचेही श्रवणाप्रमाणे नामकीर्तन, गुणकीर्तन, लीलाकीर्तन असे तीन प्रकार संभवतात. श्रीमद्‌भागवत स्कंध सहाव्यातील अजाधिलोपारख्यानांतही एतावतालमघनिर्हरणा पुंसा संकीर्तनं भगवतो गुणकर्मनाम्ना ॥ भा - ६.२ <
br> 'मनुष्यमात्राच्या संपूर्ण पापाच्या नाशाकरिता भगवंताच्या गुणकर्म व नामाचे संकीर्तन हेच साधन पुरेसे आहे, असे सांगितले आहे. श्रवणांत जसे गुणश्रवण तसेच कीर्तनांतही गुणकीर्तन हे महत्त्वाचे आहे. तसेच भगवंतांनी अनेक अवतार धारण करून ज्या अलौकिक अतर्क्य लीला केल्या त्यांचे कीर्तन हे भगवदभक्ती व भगवत्प्रीती निर्माण होण्याचे श्रेष्ठ साधन आहे; म्हणूनच भागवतधर्मीय सर्व संतानी श्रीकृष्ण भगवंताच्या बाललीला अत्यंत आवडीने गायिल्या आहेत.

श्रवण आणि कीर्तन यांत थोडेसे अंतर आहे. गुणकीर्तिश्रवणांत योग्य असा वक्ता अपेक्षित असतो. सविवेक नैराश्य वक्ता । जोडल्या श्रद्धेने ऐकावी कथा ॥ ना. भा. - ११. कीर्तनांत अन्य अंगउपांगांची जोड असणे योग्य असते. म्हणजे राग, ताल, वाद्य, नृत्य गीत इत्यादि. श्रीकृष्णभगवान भक्तश्रेष्ठ उद्धवास सांगतात.

त्यजूनियां कामाचे बीज । सांडूनि लौकिकाची लाज ।
कीर्तनी नाचावे भोज गरुडध्वज स्मरोनि ॥
रामकृष्ण हरि गोविंद । ऐशिया नामाचे प्रबंध ।
गाता नाना पदें छंद बंध । करावा विनोद कीर्तनी ॥
श्रुति मृदंग टाळ घोळ । मेळऊनि वैष्णवाचा मेळ ।
कीर्तनी करावा गदारोळ । काळ-वेळ न म्हणावा ॥
दशमी दिंडी जागरणे । आळस सांडूनि गावे गाणे ।
हावभावो दाखवणे । कर्म स्मरणे माझेनि ॥ एकनाथी भागवत ११-७३१-३

अलीकडे भाविक म्हणविणार्‍या समाजातही कीर्तन हे एक करमणूकी साधन वाटते, कीर्तन हे भगवद्‌भक्ति निर्माण होण्याचे साधन न राहता ते एक कलेचे अंग मानले जात आहे, पण याला कीर्तन म्हणू नये.

श्रवणांत एकाच इंद्रियाचा म्हणजे श्रवणेंद्रियाचा उपयोग होतो, पण कीर्तनांत सर्वेंद्रियाचा विनियोग करता येतो. मुखाने कथालीलागुणगायन, हाताने टाळी, पायाने नृत्य अशा स्थितीत देहभाव विसरला जातो. । कीर्तनें स्वधर्मु वाढे । कीर्तनें स्वधर्मु जोडे । कीर्तने परब्रह्म आतुडे । मुक्ती कीर्तनापुढे लाजोनि जाय ॥ ए. भा. ५-४१८ अशी कीर्तनाची योग्यता आहे.

भक्तिशास्त्रांत कीर्तन हे साधन व साध्य असे दोन प्रकारचे सांगितले आहे. पराभक्तीची प्राप्ती होण्याकरितां जे कीर्तन, नामसंकीर्तन केले जाते ते साधन ती पराभक्ति प्राप्त झाल्यानंतर मग । 'माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥' तु. अशा स्थितीत सहज जे घडते ते कीर्तन पराभक्ती समाविष्ट होते. हीच गोष्ट श्रीकृष्ण उद्धवास सांगतात. 'आवडी हरिकथा ऐकता नाना चरित्रे श्रवण करिता । माझी आत्मचर्चा हृदयी धरिता । पालटू चित्ता ते ***** ? होय ॥ तेणेचि उपजें माझी भक्ती । माझ्या भजनाच्या अतिप्रीती । आवडी माझी नामे गाती । रंगी नाचती सदभावे ॥' (ए. भा. - १४-३०७,३०८.) या श्रद्धेने केलेल्या कीर्तनानेच अंतिम अशी पराभक्ती देखील उत्पन्न होते असे श्रीशुकाचार्यानी एकदशस्कंधाच्या शेवटच्या अध्यायात उपसंहारप्रसंगी सांगितले आहे । आवडी गातां श्रीकृष्ण कीर्ती । कीर्तिमंतां लाभे परम भक्ती । जीते परा ऐसे म्हणती । ते चौथी भक्ती घर रिघे ॥ आदरे जपता कृष्णकीर्ती । श्रीकृष्ण प्रकटे सर्वाभूती । सहजे ठसावे चौथी भक्ती । परमात्मा स्थिती समवेत ॥ ए. भा. ३१ - ३५५, ५६.

भगवान श्रीकृष्ण भक्तवर्य उद्धवास भक्तिप्राप्ती कोणास होते व कोणत्या साधनाने होते हे स्पष्ट सांगतात.
तायें श्रृण्वन्ति गायन्ति ह्यनुमोदन्ति चादृताः ।
मत्पराः श्रद्दधानाश्‍च भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥ भागवत ११-२६

'या माझ्या कथांचे जे श्रवण करतात, कीर्तन करतात त्यांना पूर्ण श्रद्धेने जे अनुमोदन देतात त्यांना माझी भक्ती प्राप्त होते.' या श्लोकावरील टीकेत श्री एकनाथ महाराज म्हणतात, निजभावे भगवतकथा गाता । स्वयंभ उपजे सादरता । तेणें अत्यादरे हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥ जंव जंव कथा सांगे निवाडे । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे । प्रेमाचा पूर चढे । त्यामाजी बुडे निज श्रद्धा ॥ ए. भा. २६-३७८.३७९ बंगालमध्ये अवतरलेले अत्यंत नामप्रेमी महान संत भक्तवर्य श्रीगौराङ्ग ज्यांना 'चैतन्य महाप्रभु' अशी संज्ञा दिली गेली त्यांनी एका श्लोकांत श्रीकृष्ण संकीर्तनाचे माहात्म्य फार महत्त्वपूर्ण भाषेत सांगितले आहे.

चेतोदर्पणमार्जनं भवमहादावाग्नि निर्वापणं ।
श्रेयःकैरव चंद्रिका वितरणं विद्यावधू जीवनं ॥
आनंन्दाम्बुंधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतास्वादनं ।
सर्वात्मस्नपनं परं विजयते श्रीकृष्णसंकीर्तन ॥
'चित्तरूपी दर्पण म्हणजे आरसा त्यावर विषयवासनादि विकारांचा जो मळ अनादि कालापासून चढलेला आहे, त्या चित्तरूपी आरशास स्वच्छ करण्याचे सामर्थ्य या भगवन्नाम संकीर्तनात आहे. तसेच संसार हा महान दावाग्नी (अरण्यात लागलेल्या अग्नीस दावाग्नी म्हणतात) आहे यांत सापडलेले सर्व जीव त्रिविधी तापाने दग्ध होत आहेत. त्या दावाग्नीस शांत करणारे हे श्रीकृष्णनाम संकीर्तन आहे. तसेच श्रेय म्हणजे कल्याण हीच कोणी कुमुदिनी आहे. पण ती मिटलेली आहे. भगवन्नाम संकीर्तनरूपी चंद्रिका तिला प्रफुल्लित करते म्हणजे यावत् कल्याणाची नामधारकास प्राप्ती करून देते. तसेच विद्या (ज्ञान) हीच कोणी एक वधू आहे व तिचे जीवन आहे भगवन्नाम. भगवन्नामानेच तिला सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मविद्येचे भगवन्नाम सौभाग्यचिन्ह आहे. भगवन्नाम पावलोपावली आनंद सागराला भरती आणणारे आहे म्हणजे अपूर्व आनंदाचा लाभ करून देणारे आहे. इतकेच काय पण पूर्ण अमृताचा आस्वाद देणारे ते आहे. आत्म्यास सर्व प्रकारे पवित्र करणारे असे आहे, असे श्रीकृष्णसंकीर्तन आमच्या जीवनात विजयाला प्राप्त होवो !

तात्पर्य, जीवनांत भक्तिसिद्ध होण्याकरिता नारदमहर्षींनी या सूत्रांत सांगितल्याप्रमाणे भगवत् गुणश्रवणकीर्तन हेच सुलभ सर्वोपयोगी व सर्व संताना मान्य असे साधन आहे.


GO TOP