नारद भक्तिसूत्रे

तत्तु विषयत्यागात्संगत्यागाच्च ॥३५॥


अर्थ : ते (साधन) तर विषयत्यागापासून आणि संगत्यागापासून (सिद्ध होते.)


विवरण : जेव्हा भक्ती हे साधन मानले जाते तेव्हा ते साधन सिद्ध होण्याकरिता म्हणजे त्या साधनाची योग्यता सिद्ध होण्याकरिता त्या साधनाकरिता प्रतिकूल अशा गोष्टी तेथे नसल्या पाहिजेत. एखादे धातूचे रसायन बनवण्यापूर्वी काही विशिष्ट प्रक्रियेने त्यातील दोषभाग नाहीसा करावा लागतो, तो त्या धातूत प्रथम एकरूप झालेला असतो, त्याप्रमाणे परमात्मस्वरूपाची भक्ती सिद्ध होण्यासाठी ज्या अंतःकरणात ती भक्ती निर्माण होईल ते शुद्ध पाहिजे.
करुनिया शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥ - तुकाराम.

ते शुद्ध कसे होईल याचा विचार करताना ते अशुद्ध का झाले हेही पाहिले पाहिजे. तत्त्वविचारात अंतःकरण तत्व हे पंचभूतांच्या मिलित सत्त्वांशापासून झाले असे मानले आहे; म्हणून ते शुद्ध असणे योग्य आहे. तसेच, विषय हे तमो-गुणाचे कार्य आहे म्हणून ते अशुद्ध आहेत. अंतःकरण म्हणजे मन हे शरीरांतर्वर्ती तत्त्व आहे. जसे अंतःकरण तसेच पंच ज्ञानेंद्रिय ही पंचभूतांच्या पृथक सत्त्वांशाची कार्ये आहेत म्हणून एक एक इंद्रिय आपल्या नियत विषयालाच जाणते. उदाहरणार्थ, डोळा रूपाला, घाणेंद्रिय (नाक) गंधाला, रसना जिव्हा रसाला, कान शब्दाला व त्वचा स्पर्शविषयालाच जाणते. या मनाचा इंद्रियाशी निकटचा संबंध आहे म्हणजे शरीरांतर्वर्ती मन या इंद्रियाच्या साहाय्यावाचून बाह्य पदार्थापावेतो जाऊ शकत नाही.

इंद्रियांचा पंचविषयांशी अनादिकालीन संबंध आहे. या इंद्रियांमुळे मन बाह्य पंचविषयापावेतो जाते ते विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पाच आहेत. अनादिकालीन संबंधामुळे इंद्रिये या विषयात रंगून गेलेली आहेत. श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात.

या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ॥ ज्ञा. २-१२०

तसेच या विषयाच्या अनादिकालीन संस्कारामुळे इंद्रियतादात्म्याला पावलेले मनही पूर्ण विषयासक्त झाले. विषयप्रवृत्तीचे कारण विषयाच्या ठिकाणी भ्रममूलक सुखबुद्धी हे होय. अंतःकरणतादात्म्यामुळेच प्रमाता जीव हा कर्ता-भोक्ता बनतो व विषयांना भोग्य समजतो. आत्म्याला त्याच्या स्वरूपसुखाचे तो अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे भान नसते. म्हणजे खरे सुख विसरतो. अनादि संस्काराने अथवा अज्ञानाच्या विशेष शक्तीमुळे विषयासच सुख समजून त्याच्या मागे लागतो.

तैसे आपणपें नाहीं दिठे । जयाते स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासींचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ज्ञा. ५ - ११२

वास्तविक सुख हे परमात्म्याचेच एकमेव स्वरूप आहे. पण अज्ञानामुळे ते दुरावले जाते. श्रीज्ञानेश्वरमहाराज दृष्टांन्ताने सांगतात - दूध पवित्र व गोड आहे व गाईच्या कासेत जवळ आहे पण गोचीड दूध टाकून रक्त पितो, कमलकंद व बेडकुळी जवळ आहेत पण कमळाचा पराग दुरून येणारा भ्रमर सेवन करतो व बेडकुळीस चिखल खावा लागतो. दुर्दैवी मनुष्याच्या घरात धनाच्या राशी पुरलेल्या आहेत. पण अज्ञानामुळे त्याला त्यापासून सुख न होता उपवास पडतात तद्वत श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ! सर्वांच्या हृदयामध्ये सर्वसुखाचा आराम असा मी असूनही या भ्रांत अज्ञानी जीवांना विषयात सुख आहे असे वाटते व ते विषयाच्या मागे लागतात. म्हणजे सुखबुद्धीने विषयभोग भोगण्याकडे प्रवृत्त होतात. (ज्ञा ९-५७-६०) किंबहुना विषयसुख भोगणे हाच पुरुषार्थ वाटतो. सामान्यांनाच काय पण मोठमोठ्या ऋषीमुनीनादेखिल विषयातून चित्त दूर काढणे कठीण जाते. श्रीकृष्णांनी उद्धवास सनकादिक ऋषी व ब्रह्मदेवाचा एतद्विषयक संवाद सांगितला आहे. सनकादिक ब्रह्मदेवास विचारतात -
गुणैष्वाविशते चेतो गुणाश्‍चेतसि च प्रभो
कथमन्योन्य सन्त्यागो मुमुक्षोरतितितीर्षोः ॥ ए.भा.अ. १३ - १७ ॥

'विषयांमध्ये स्वाभाविकपणे रागादि दोषामुळे चित्त आकृष्ट होते, ते विषय वासनारूपाने चित्तात प्रवेश करून घर करून राहतात, अशा स्थितीत मुमुक्षूस विषय आणि चित्त यांचा परस्परसंबंध कसा तोडता येईल ?

सनकादिक पुसत । विषयांचिया ठायी चित्त ।
स्वभावे असे विषयासक्त । ते विषयो सतत आवेशले ॥२७४॥
तैसेचि विषय पाही । प्रवेशले चित्ताच्या ठायी ।
वासनारूपे जडले तेही । निघो कही नेणती ॥ २७५ ॥
पर्णिली कांता माहेरा जाये । चित्ती रिघाली दूरी न राहे ।
यापरी विषयो पाहे । जडला ठाये चित्तासी ॥२७६॥ ए. भा. १३ याचे कारणही पुढे सांगितले आहे -
अनादि संसार माळेच्या ठायी । नित्य विषय भोगिले पाही ।
ते ठसावले चित्ताच्या ठायी । वारंवार देही सेविता ॥ ३७८ ॥
चित्तासी विषयाची अतिप्रीती । तेणे वाढली विषयासक्ती ।
ते प्रवेशले विषयांप्रती । न निगे मागुती सर्वथा ॥ ३७९ ॥
बुद्धीसी विषयांचे ध्यान । चित्ती विषयांचे चिंतन ।
विषयालागी तळमळी मन । विषयाभिमान तेणे झाला ॥ ३८० ॥

अशा रीतीने चित्तच तुष्टय म्हणजे जीव हा पूर्ण रूपाने विषयासक्त झालेला आहे. याचे कारण आरंभी सांगितल्याप्रमाणे अज्ञानामुळे देहतादात्म्य उत्पन्न होते, व त्यामुळे शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी हा देहाहंकार म्हणजे मी देहच आहे असा अभिमान उत्पन्न होतो.

कोणास वाटेल की विषय भोगले तर काय बिघडले ? अनुकूल विषयापासून जर सुख प्राप्त होते तर सुखाकरिता विषयभोग घ्यावयास काय हरकत आहे ? याचे उत्तर हे की, विषयात सुख प्राप्त होते हा भ्रम आहे, कारण सुख हा जड विषयाचा धर्मच नाही.

हे विषय तरी कैसे । रोहिणीचे जळे जैसे ॥ ज्ञा. २-२२१
मृगजळापासून तृष्णा शांत होईल काय ? अनित्य, जड, दुःखरूप विषय सुखास कारण कसे होतील ?

येहि संस्पर्शजा भोगाः दुःखयोनय एवते ।
आद्यान्तवन्तः कौंतेय नतेषु रमते बुधः ॥ गी.५-२२

श्रीकृष्ण म्हणतात 'अर्जुना ! विषयेंद्रिय संयोगापासून झालेले भोग दुःखासच कारण होतात. कारण ते उत्पत्ति विनाशवान आहेत. ज्ञाता त्या विषयात रममाण होत नाही.' या श्लोकावरील ज्ञानेश्वरमहाराजांची विस्तृत टीका मूळातच मननपूर्वक वाचणे योग्य आहे. अनेक दृष्टान्तांनी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी विषयाचे अनित्यत्व अनुभवसिद्ध दुःखरूपत्व व अज्ञानमूलकत्व पटवून दिले आहे. क्षणिक विषयात जो सुखाभास होतो तो अनुकूल विषयप्राप्तीमुळे क्षणिक इच्छावृत्ती अंतर्मुख होते व तिच्यात क्षणिक आनंदाचे भान होते. वास्तविक तो आनंद हृदयस्थ परमात्माच आहे. पण भ्रमाने, श्वान अस्थी चघळत असता त्याच्या हिरड्यातून रक्त येते पण त्याला वाटते की या अस्थितूनच ते आले व आपलेच रक्त अस्थीचे म्हणून प्राशन करून तो भ्रमाने समाधान मानतो. त्याप्रमाणेच हा विषयाचा आनंद जीव मानतो. म्हणून जोपावेतो भ्रममूलक विषयासक्ती आहे तोपावेतो जीव विषयावरच प्रेम ठेवील व तेच मिळविण्याकरिता तो अहर्निश कष्ट करील, कदाचित एखाद्या देवाची भक्ती तो करीत असलेला दिसला तरी ती देवाकरिता नसून ती विषयाकरिताच असते. श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात -
येर तंव बहुत जोडती किरीटी । जयाची भजनें भोगासाठी ।
ते आशा तिमिरें दृष्टी । मंद झाले ॥ ७-१३८. ज्ञा.

ज्याच्या भक्तीत देव हा साधन असतो, ती भक्ती खरी नसतेच. मागील सूत्रांतून अनन्यप्रेम म्हणजे भक्ती असे सांगितले आहे. विषयाकरिता भक्ती करणार्‍याच्या ठिकाणी अनन्यता असणे शक्य नाही. म्हणून विचाराने विषयांचे खरे स्वरूप लक्षात आणावे, त्याची अनित्यता, परिणामी प्राप्त होणारी दुःखरूपता जाणून त्यांचा त्याग करावा. कोणतीही भ्रमभावना विचारापुढे टिकत नाही. विचाराने विषयांचे दोषदर्शन होते. योगशास्त्रामध्ये विषयात विवेकी दुःख कसे जाणतो याबद्दल चांगले विवेचन आले आहे.

"परिणाम ताप संस्कार दुःखैर्गुणवृत्ति विरोधात् दुःखमेव सर्वं विवेकिनः ॥" साधनपाद १५
'परिणाम, ताप व संस्कार या दुःखाने व परस्पर अत्यंत विरुद्ध अशा ज्या सुखदुःखमोहरूप गुणांच्या वृत्ती त्यांनी विवेकी पुरुषाला सर्वच दुःख म्हणजे प्रतिकूल वाटते.'

काही विषे रुचीला प्रथम गोड लागतात. परंतु परिणामी मारक होतात तसेच विषयांचे आहे. श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
ते हे पंचविषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण ।
ब्रह्मादिक नाडले जाण । इतरांचा कोण पडिपाडू ॥ १६१ ॥
विषयाचे जे गोडपण । ते विखाहूनि दारुण ।
विष एकदा आणि मरण । पुन्हः पुनः मारण विषयांचे ॥ १६२ ॥
पुढती जन्म पुढती मरण । हे विषयास्तव घडे जाण ।
संसाराचे सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥ १६३ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ! अशा विषयाचा जो विवेकाने त्याग करील तो मला फार प्रिय आहे.

जेथ विषयांचा विषयत्यागु । तेथे उन्मळे भवरोगु ।
त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषय भोगू नावडे ॥ १६४ ॥ ए. भा. २२

श्रीभगवद्‌गीतेच्या दुसर्‍या अध्यायात श्रीकृष्णांनी केवळ विषयध्यानाने संग(आसक्ती) निर्माण होऊन त्यापासून काम, क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश व प्रणाश होतो असे स्पष्ट सांगितले आहे. (गी. अ. २ श्‍लोक ६२-६३) अशा रीतीने सर्वत्र विषयाची बाधकता सांगितली आहे. म्हणून विषयत्याग करावयास पाहिजे असे श्रीनारद सांगतात. कारण जोपावेतो अंतःकरणात विषयप्रेम आहे तोपावेतो ईशप्रेम निर्माण होणे अशक्य आहे. पण तो विषयत्यागही सोपा नाही कारण अनादिकालापासून जीव कोणत्याही योनीत भ्रमण करीत असला तरी तेथे विषयसंबंध आहेच. त्यामुळे विषय संस्कार बलवान झालेले असतात. तसेच इंद्रिय तादात्म्यामुळेही इंद्रियविषयाचा संबंध अखंड असतो, हे जरी खरे आहे तरी ज्याप्रमाणे मधुमेहग्रस्त मनुष्यास साखर प्रिय असली तरी आरोग्यास घातक म्हणून ती सोडावीच लागते त्याप्रमाणे साधक भक्ताने विवेक-वैराग्यद्वारा हळूहळू प्रतिकूल विषयाचा त्याग करावा. सत्संगतीने विषयात दोषदर्शन होते, त्यांचे अनित्यत्व विचाराने पटते, त्याचप्रमाणे भगवत्प्रेमाचा अंतःकरणात अल्पही प्रवेश होऊ लागला म्हणजे विषयत्याग होणे सुलभ जाते. विषयत्याग कसा करावा याविषयी श्रीएकनाथ महाराज सांगतात -
धरिता विषयाची गोडी । भोगाव्या जन्ममरण कोडी ।
येणे भये विषय वोसंडी । इंद्रियाते कोडी अतिनेमें ॥
इंद्रिये कोंडिता न कोंडती । विषय सांडिता न सांडती ।
पुढत पुढती बाधू येती । या लागी हरिभक्ती द्योतिली वेदे ॥
इंद्रिये कोंडावी न लगती । सहजे राहे विषयासक्ती ।
एवढे सामर्थ्य हरिभक्ती । जात निश्चिती नृपवर्या ॥
योगी इंद्रिये कोंडती । भक्त ती लाविती भगवद्‌भक्ती ।
योगी विषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवंती ॥
योगी विषय त्यागिती । त्यागिता देह दुःखी होती ।
भक्त भगवती अर्पिती । तेणे होती नित्य मुक्त ॥ ए. भा. २.२९३-९७

अशाच रूपाने विषयत्याग करणे योग्य आहे. विषयातील सुख आभासमात्र अनित्य आहे, भगवत्प्रेम हेच जीवाला सुखमय बनविणारे आहे असे वाटल्याविना विषयासक्ती कमी होणार नाही.

विषयत्याग हा संपूर्ण विषयांचा होणे शक्य नाही, कारण काही विषयांचे सेवन शरीरनिर्वाहाकरिता होणे अवश्यच असते. अन्नपानादिकांचा संपूर्ण त्याग होणे शक्य नाही. विषयत्याग करणे म्हणजे निषिद्ध विषयत्याग असाही अर्थ केला जातो, पण ज्या विषयसेवनाने रागद्वेषादि दुष्ट विकार अधिक वृद्धिंगत होतात व जे शरीरधारणाला आवश्यक असतातच असे नाही अशा केवळ भोगवासना वाढविणार्‍या विषयांचा त्याग तर आवश्यकच आहे, कारण ती विषयासक्ती परमार्थाला विरोध आहे ती विषयासक्ती दूर होऊन; चित्त शुद्ध होऊन हृदयात भक्तीचा उदय होण्याकरिताच भागवतादि ग्रंथांत अनेक साधने सांगितली आहेत. गोपिकांबरोबर भक्तश्रेष्ठ उद्धवांचा संवाद झाला, त्या वेळी तो त्यांना म्हणतो -
दान व्रत तपो होम जप स्वाध्याय संयमैः ।
श्रेयोभिर्विविधैश्‍वान्यैः कृष्णे भक्तिर्हि साध्यते ॥ भागवत १०-४-२४

'दान, व्रत, तप, यज्ञ, जप, वेदाध्ययन, संयम (शमदम) तसेच अन्य अनेक प्रकारच्या कल्याणप्रद साधनानी श्रीकृष्णाच्या ठिकाणी भक्ती सिद्ध होते.' म्हणजे विषयत्यागपूर्वक भक्ती सिद्ध होण्याकरिता अधिकारपरत्वे व श्रद्धापरत्वे भक्तिसाधक स्वेच्छेने वरीलपैकी जे अनुकूल वाटेल त्या साधनांचा स्वीकार करीत असतो. विषयत्यागाकरिता जो इंद्रियनिरोध लागतो त्याकरिता या साधनांचा उपयोग होणे शक्य आहे. पुढे अठ्याहत्तराव्या सूत्रात नारदांनीही या साधनाचे पालन करावयास पाहिजे असे सांगितले आहे.

या विषयात श्रीमधुसूदनसरस्वती यांनी आपल्या भक्तिरसायन नामक भक्तिशास्त्रावरील अपूर्व ग्रंथात असे म्हटले आहे की, चित्तद्रव्य स्वभावतः लाखेप्रमाणे कठीण असून लाख जशी अग्नितापाने पघळते त्याप्रमाणे चित्त हे काम, क्रोध, भय, स्नेह, हर्ष, शोक इत्यादिक तापक विकाराच्या संयोगाने द्रवभावाला प्राप्त होते. आणि त्या अवस्थेत चित्ताला जो विषय दिला जातो त्याचा आकार चित्त ग्रहण करीत असते. अनादिकालीन कामादिकाच्या संसर्गाने द्रवत्वाला प्राप्त झालेले चित्त विषयाचाच आकारग्रहण करीत असते. यामुळे प्रिय-अप्रिय अशा अनेक विषयांनी व्याप्त होणे हा चित्ताचा स्वाभाविक धर्मच झाला आहे. अशा स्थितीत चित्तातून विषयाचा त्याग होणे कसे शक्य आहे, अशी शंका घेऊन त्याचे उत्तर दिले आहे ते असे : विषयाकार होणे हा चित्ताचा स्वाभाविक धर्म नाही. कारण ज्या कारणांनी विषयाकारता होते ती सर्व कारणे क्षणिक व आगन्तुक आहेत. जसे जागृत अवस्थेमध्ये इंद्रियसंबंधाने विषयाकारता प्राप्त होते, स्वप्नावस्थेमध्ये स्थूल विषयांशी इंद्रियसंबंध नसतो, केवळ मनोगत वासना राहिलेली असते म्हणून चित्ताची सूक्ष्मविषयाकारता असते. परंतु सुषुप्तीमध्ये इंद्रियसंबंधक आणि मनोगत वासना या दोहोंचाही अभाव असल्यामुळे चित्त निर्विषय असते. पुन्हा जागृतीत आल्यानंतर चित्ताला विषयाकारता प्राप्त होते. भगवदाकारता ही चित्ताला स्वाभाविक आहे. कारण चित्ताला हेतुभूत जी सूक्ष्म पंचभूते आहेत व त्यांचेही कारण अनिर्वचनीय रूप विचित्र अनेक शक्तीनी युक्त जी माया, तिचेही अधिष्ठान विभुसर्वांतर्यामी तो भगवान सर्वत्र अनुगत (व्याप्त) आहे. जसे घटाला जलादीकांनी पूर्ण करण्याकरिता कोणत्या तरी कारणाची (जल भरणार्‍याची) अपेक्षा असते पण आकाशाने तो स्वतः पूर्ण भरलेलाच असतो, कारण आकाश सर्वत्र व्याप्त आहे, तद्वत बुद्धीला सुखाकारता अथवा सुखसाधनाकारताही धर्माधर्मामुळे प्राप्त होते. परंतु स्वतःसिद्ध आत्मस्वरूपाची व्याप्ती वस्तूच्या स्वभावानुरोधानेच असते. अर्थात आत्मस्वरूप सर्वत्र व्याप्त असल्याने बुद्धीतही ते पूर्णपणे स्वाभाविक असतेच. पण यावरही अशी शंका येईल, जर चित्तामध्ये भगवदाकारता स्वाभाविकरूपाने असेल तर ती उत्पन्न करण्याकरता अन्य ध्यान, भजन इत्यादीक साधनांची आवश्यकता काय ? याचे उत्तर हे की, चित्तातील जी सामान्य, स्वाभाविक भगवदाकारता आहे ती विषयाकारतेशी संयुक्त होऊन असते व तिला साधक असते. म्हणून ती विषयाकारतेचा विरोध करीत नाही. परंतु भक्तिशास्त्रानुसार साधनाच्या आचरणाने ती वेगळी होते. क्रमाने अभ्यास करीत असता विषयाकारता हळूहळू लुप्त होऊन साधने संपूर्ण झाल्यानंतर ती भगवदाकारता विषयाकारतेला मुळासह उपटून फेकून देते. म्हणून भक्तिशास्त्रप्रतिपादित साधनाचा उपयोग आहे. शास्त्रानुसार जी भगवदाकारता चित्ताला प्राप्त होईल ती विषयाकारतेला पुन्हा चित्तात प्रविष्ट होऊ देत नाही. या अवस्थेसच 'विषयत्याग' असे म्हणणे योग्य आहे.

विषयत्याग हा दोन प्रकारचा होऊ शकतो. काही अनावश्यक व निषिद्ध विषयांचा साक्षात त्याग करणे योग्य आहे. पण जे विहित व शरीरनिर्वाहास आवश्यक असे विषय आहेत, प्रारब्धबलाने प्राप्त आहेत, त्याचा त्याग कसा होणार ? तसेच कित्येक लोक विषयांचा बाह्यतः त्याग करीत असलेले दिसतात पण अंतःकरणातून ते विषय गेलेले नसतात. गीतेच्या तिसर्‍या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात -
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६
"कर्मेंद्रियांचे नियमन करून म्हणजे इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून जो मनात विषयाचे चिंतन करतो, तो अत्यंत मूढबुद्धी होय. त्याला मिथ्याचारी, दांभिक असे म्हणतात.' त्याचा तो त्याग मानला जात नाही.

ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ॥
ओळखावे तत्त्वता । येथे भ्रांति नाही ॥ ज्ञा.३-६६.
कारण बाह्य विषयाचा त्याग झाल्यासारखा दिसत असला तरी आत राग-द्वेष धुमसत असतातच.
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ॥ ज्ञा. २-३३१
येर्‍हवी बाह्य विषय तरी नाही । परी मानसी होईल जरी काही ।
तरी साद्यन्तूचि हा पाही । संसारु असे ॥
जैसा का विषाचा लेशु । घेतिलिया होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासि ॥
तैसी या विषयाची शंका । मनी वसती देखा ।
घातु करीं अशेंखा । विवेकजाता ॥ ज्ञा. २. ३१८-२०

एवढा विस्तार करण्याचे कारण सूत्रात 'विषयत्याग' एवढा शब्द आहे, पण तो त्याग सिद्ध होणे काही विषयांच्या दृष्टीने अशक्य व काही विषयांच्या बाबतीत कठीण आहे. म्हणून याच सूत्रात मध्ये 'च' घालून 'संगत्यागात्' असे म्हटले आहे. सूत्रात 'तु' असे एक पद आहे. त्याचे कारण, साधन हे बहुधा विधायक स्वरूपाचे असावे लागते, पण येथे ते त्यागस्वरूप सांगितले असल्याने निषेधस्वरूपात आहे. यासाठी 'तु' म्हटले असावे असे वाटते.

सूत्राचे दोन विभाग पडतात. विषयत्याग आणि संगत्याग. संग म्हणजे आसक्ती. ती इंद्रियात नसून अंतःकरणात असते. बीजात असणारा अंकुरदशेस येणारा धर्म अनुकूल वृष्टी, माती, वायू, प्रकाश याचा संबंध येताच जसा प्रगट होतो तद्वत् अंतःकरणात आसक्ती असेल तर विषयेंद्रियांच्या संयोगाने ती वेगाने प्रगट होते.
जरी हृदयीं विषयस्मरती । तरी निस्संगाही आपजे संगती ।
संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ज्ञा. २०.३२१

म्हणून संग म्हणजे आसक्तीचा त्याग सांगितला आहे. ही आसक्ती रागद्वेषादि विकारास निर्माण करते व ते भक्तीस पूर्ण विरोधी असतात. म्हणून त्यांचे मूळ जो संग तो टाळला पाहिजे
अनंत बुद्धीचे तरंग । क्षणक्षणा पालटे रंग ।
जो जो धरू जावा संग । तो तो होय बाधक ॥ तु० ॥
असे तुकाराममहाराजानी सांगितले आहे. भक्तमार्गात एक भगवदासक्तीच अभिप्रेत आहे.

मय्यासक्तमनाः पार्थ योगं यूञ्जन मदाश्रयः । गी. ७-१
असे श्रीकृष्णांनी सांगितलेच आहे. ही भगवदासक्ती अनेक रूपाने भक्तिप्रेमात कार्य करीत असते. तिचे अकरा प्रकार पुढे ब्याऐंशीव्या सूत्रात सांगितले आहेत. मन हे एकालंबनात्मक असते, म्हणजे एका वेळी एकाच विषयाशी संबद्ध होऊ शकते. भगवदासक्ती असेल तेव्हा विषयासक्ती 'संग' राहू शकत नाही. व विषय हे विजातीय असल्याने त्यांचा संग बाधकच असतो, तो भक्तीस विरोधी असतो म्हणून त्याचा त्याग सांगितला आहे. विवेक-वैराग्याने तो होणे शक्य आहे. संग ज्या ज्या विषयाचा होणे शक्य आहे त्यांच्या ठिकाणी असणार्‍या दोषाचे चिंतन करीत गेल्याने आसक्ती हळूहळू कमी होते. तसेच पूर्णत्वाने नाही तरी थोडे थोडे हे चित्त भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू विषयासक्ती कमी होईल असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात -

तरि गा ऐसे करी । यया आठा पहारा माझारी ।
मोटके निमिष भरीं । देतु जाय ॥१०५॥
मग जे जे का निमिख । देखेल माझे सुख ।
तेतुले अरोचक । विषयी घेईल ॥१०६॥
जैसा शरत्काळ रिगें । आणि सरिता वोहटू लागे ।
तैसा चित्त काढेल वेगे । प्रपंचौनि ॥१०७॥ ज्ञा. १२
यावर कोणी शंका घेईल की, विषयत्यागाने भक्ती का भक्तीने विषयत्याग ? भक्ती करिता विषयत्याग हे साधन व विषय त्यागाकरिता भक्ती हे साधन मानले तर अन्योन्याश्रय दोष येतो. याचे थोडक्यात उत्तर हे की, नारदांनी सांगितल्याप्रमाणे प्रथमतः विवेकाने विषयत्याग व संगत्याग हळूहळू करण्याचा प्रयत्न करावा. हा करीत करीत भगवद्‌भक्तीकडे मन वळवीत जावे. ते जसे जसे वळेल व ती गोडी लागेल तसा तसा सवासना विषयत्याग पूर्णरूपाने होईल. हेच सांगण्याकरिता पुढील छत्तिसाव्या सूत्राची रचना केली आहे. विषयत्यागास विवेक-वैरागादि साधने सांगितली आहेत. पण तीही कठीणच आहेत. त्यातही अनेक विघ्ने येत असतातच. ज्यांना ते शक्य आहे असे वाटते त्यानी आत्मविश्वासपूर्वक त्या साधनाचा अवलंब करावा पण ज्यांना अशक्य किंवा कठीण वाटेल त्यांच्याकरिता भक्तिसाधनाचा मार्ग बंद नाही. याकरिता पुढील सूत्रात आणखी एक महत्त्वाचे साधन सांगितले आहे.


GO TOP