नारद भक्तिसूत्रे

तस्याः साधनानि गायन्त्याचार्याः ॥ ३४॥


अर्थ : आचार्यगण त्या भक्तीची साधने प्रेमाने कथन करतात.


विवरण : त्या फलरूपा भक्तीची तसेच मागील सूत्रात मुमुक्षूने जिचे ग्रहण करावे असे सांगितले आहे त्या भक्तीची साधने भक्तीच्या यथार्थ स्वरूपाचा अनुभव घेणारे आचार्य सांगतात. येथे आचार्य म्हणजे शेवटी त्र्याशीव्या सूत्रात नारदांनीच जे भक्त्याचार्य म्हणून कुमार, व्यास, शुक, शांडिल्य, गर्ग इत्यादी तेरा आचार्यांची नांवे सांगितली आहेत ते व त्याच्याच योग्यतेचे आणखी काही भक्त्याचार्य पुराणादिकांमध्ये प्रसिद्ध असलेले होत. एखाद्या महत्त्वाच्या विषयाचे स्वरूप, साधन व फल सांगण्याचा अधिकार त्या विषयातील अनुभवी श्रेष्ठ पुरुषासच प्राप्त होतो व त्यांनी त्या साधनाचा स्वतः पूर्ण अनुभव घेतला असल्यामुळे त्याच्या सांगण्याला महत्त्वही प्राप्त होते. आचार्य शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे -

आचिनोतिच शास्त्रार्थ आचारे स्थापयत्यपि ॥
स्वयमप्याचरेद्यस्तु स आचार्य इति स्मृतः ॥
वेदांतील अनेक प्रमेयांचे एकत्रीकरण करून त्या सिद्धांताची जो स्थापना करतो म्हणजे बहुजन समाजाला पटवून देतो, व स्वतःही त्याचे आचरण जो करतो, त्यास आचार्य असे म्हटले जाते.'

सद्‌गुरूंनाही आचार्य म्हटले जाते. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्‌गुरू श्रीनिवृत्तिनाथांचे आचार्य म्हणून वर्णन केले आहे.
जय जय आचार्या । समस्त सुरवर्या ॥
प्रज्ञाप्रभात सूर्या । सुखोदया ॥ ज्ञा. १४ - १

यावरून आचार्य ही किती महत्त्वाची श्रेष्ठ पदवी आहे हे कळेल. एखादी महत्त्वाची गोष्टही योग्य अधिकारी पुरुषानी सांगितली तरच तिला लोकव्यवहारात महत्त्व येते. म्हणून या भक्तीची साधने भक्त्याचार्य सांगतात असे नारद म्हणतात. वास्तविक नारदाचा अधिकारही या विषयात श्रेष्ठ आहे. ते स्वतः सर्व साधने करून या श्रेष्ठ पदवीस पोहोचलेले 'भक्त्याचार्यच' आहेत, त्याच्याविषयी कोणाचाही अनादर नाही हे खरे पण संतांचा स्वभाव अन्य श्रेष्ठ पुरुषाचा आदर करावा, त्यांना श्रेष्ठत्व द्यावे असा असतो. तदनुसार आदराने आचार्य म्हणून निर्देश केला आहे. या साधनविचारात अनेकांची मते सांगितली नाहीत, तसे असते तर कोणी म्हणतात असे म्हटले असते व त्याची मते सांगून नंतर पूर्वीप्रमाणे नारदांनी आपलेही स्वतंत्र मत या विषयात सांगितले असते.

या भक्त्याचार्यांनी जे मत एकमुखाने सर्वमान्य असे सांगितले आहे, ते नारदांना मान्यच आहे असे पुढील सूत्रावरून म्हणावे लागेल. मागील सूत्रात भक्ती हेच साधन व भक्ती हेच फल असे सांगितल्यानंतर पुन्हा तिची साधने भक्त्याचार्य सांगतात - नव्हे गातात - असे म्हणण्याचे कारण काय अशी शंका येईल. भक्ती हेच साधन, भक्ती हेच फल जरी म्हटले आहे तरी साधनरूपा भक्ती अंतःकरणात प्रगट होण्याकरिता त्याच्या आड जे प्रतिबंध येतात ते दूर केलेच पाहिजेत. रोगनिवृत्तीकरिता योग्य औषध दिले तरी योग्य अनुपान व पथ्यकारक पदार्थांचे सेवन अवश्यच असते. वेदात, शास्त्रात मोक्षाचे साधन ज्ञान हे सांगितल्यावर त्या ज्ञानाकरिता श्रवण, श्रवणाधिकार प्राप्त होण्याकरिता विवेक-वैराग्यादी व इतर काही अंतरंग व बहिरंग साधने सांगितली आहेतच. फलस्वरूपा भक्तीचे पराभक्तीचे अपराभक्ती हे साधन मानले तरी ती भक्ती प्रत्येक मानवाच्या अंतःकरणात उत्पन्न होतेच असे नाही. 'नराणां क्षीणपापाना कृष्णे भक्तिर्हि जायते ।' 'ज्याची पापवासना नष्ट झाली आहे त्यांच्याच ठिकाणी कृष्णभक्ती उत्पन्न होते.' अशी अनेक वचने आहेत. तसे नसते तर मागील सूत्रात 'मुमुक्षुभिः' असे पद घालण्याचे कारण नव्हते. पामर विषयी पुरुष भक्तीकडे वळतच नाहीत. साधने दोन प्रकारची असतात. साध्यप्राप्तीत काही अडथळे आले तर ते दूर करणारी, आणि साध्याला पुष्टी देणारी. प्रतिबंध दूर करणारी दोन साधने पुढील पस्तिसाव्या सूत्रात सांगितली असून पुष्टी देणारी साधने छत्तीस व सदतिसाव्या सूत्रात दाखविली आहेत. तसेच आणखीही एका महत्त्वाच्या साधनाचा अडतीस ते चाळिसाव्या सूत्रात विचार केला आहे तो पुढे येईलच.

सूत्रात "गायन्ति" असे पद आहे ते महत्त्वाचे आहे. साधने सांगतात असे न म्हणता गातात असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे त्या साधनाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. साधनाची स्तुती केल्यासारखे होते. साधनात गोडी आहे हे सिद्ध होते. कारण जेथे गोडी, रुची निर्माण होते तेथेच गायन होते. तसेच साधनात उपदेश किंवा आज्ञा नसून सूचकता असावी असे वाटते. गायन हे श्रोत्यांच्या संतोषाप्रमाणे आत्मतुष्टीचेही साधन आहे असेही सूचित होते. म्हणून 'गायन्ति' या पदातून अनेक अभिप्राय प्रगट होतात. हृदयातील ज्या संवेदना असतात त्या जेव्हा प्रेमाचे स्वरूप धारण करून बाहेर पडतात तेव्हा त्यास गायन म्हटले जाते. प्रेमाची बोली संगीत म्हटली जाते व प्रेमाची चाल (गती) तिला नृत्य म्हणतात. हे भक्त्याचार्य भक्तीचे परमप्रेमी आहेत म्हणून भक्तिविषयक साधनाचे गायन करीत असतात.


GO TOP