नारद भक्तिसूत्रे

स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमाराः ॥ ३० ॥


अर्थ : ब्रह्मकुमार (ब्रह्मदेवाचे पुत्र सनकादिक तसेच नारद) भक्ती स्वयंफलरूप आहे (असे म्हणतात)


विवरण : भक्ती ही साधन मानली तर तिचे महत्त्व राहणार नाही. तसेच तिला ज्ञानादिकाचे साध्य मानले तरी पारतंत्र्य प्राप्त होते किंवा अन्योन्याश्रयत्व दोष प्राप्त होतो हे पूर्वीच्या सूत्रावरील विवरणात सांगितले आहे. ही दोन्ही मते नारदांना मान्य नसावीत म्हणून या सूत्रात नारद म्हणतात, ती स्वयंफलस्वरूप आहे.

या सूत्राचे दोन पाठ सापडतात. काही प्रतींमध्ये 'ब्रह्मकुमारः' असा पाठ आहे; काही प्रतीत 'ब्रह्मकुमाराः' असा बहुवचनी पाठ आहे. आमच्या दृष्टीने हा बहुवचनी पाठ योग्य वाटतो, नारद हे जसे ब्रह्मदेवाचे पुत्र तसेच सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार हेही ब्रह्मदेवाचे पुत्रच आहेत व त्यांचाही भक्तिमार्गात मोठा अधिकार मानला गेला आहे. म्हणून त्यांचे मत नारदांनी सांगितले आहे असे म्हणणे योग्य आहे. शिवाय भक्तीची स्वयंफलरूपता नारदांनी सूत्र सव्विसाव्यात 'फलरूपत्वात्' म्हणून सांगितलीच आहे. सनकादिक व नारद या उभय ब्रह्मकुमारांच्या मते भक्ती ही कोणाचे साध्य नाही व कोणाचे साधन नाही; ती स्वतःच फलस्वरूप आहे, तीच साध्य व तीच साधन, ज्ञानाने भक्ती किंवा भक्तीने ज्ञान हे मत त्यांना मान्य नाही.

ती स्वयंफलस्वरूपा कशी आहे याचे विस्तारपूर्वक विवरण, सव्विसाव्या सूत्रावर केले गेलेच आहे. कोणी म्हणेल की कोणते तरी साधन केल्याविना भक्ती तरी कशी प्राप्त होणार ? याचे उत्तर हे की, एका मनुष्यास पित्तदोषामुळे साखर कडू लागायला लागली, पण पित्तविकारावर उपायही साखर हाच आहे. ती योग्य प्रमाणात, योग्य अनुपानात उपयोगात आणा; तीच पित्तनाशाचे औषधही होईल. मधुर असल्यामुळे गोडही लागेल व पुन्हा पुन्हा खाण्याकडे प्रवृत्ती होईल.

याचप्रकारे भगवद्विमुखता, विषयवासना, अश्रद्धा हे रोग आहेत. यामुळे भक्ती गोड लागत नाही. पूजेत, भजनात, ध्यानात आनंद होत नाही; रुची निर्माण होत नाही. याचे औषधही हेच आहे की नामस्मरण सतत करीत राहणे. ते नाम ते विकार दूर करते, हृदयशुद्धी होते. तुकाराममहाराजांचा अनुभव पाहा.

नाम घेता मन निवे । जिव्हे अमृतचि स्त्रवे ।
होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥ १ ॥
म्हणजे नाम हेच नामाची गोडी लावते. भक्तीनेच भक्ती मधुर वाटावयास लागते. तुकाराममहाराजांनी प्रथम आपल्या वाणीस प्रेरणा दिली.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
सतत तिच्या मागे लागले, मनात नसेल तर नसो पण वाचे तरी वसो, म्हणून नामजप, भजन चालू झाले. पण त्याचा परिणाम पुढे कसा झाला याबद्दल तेच स्वानुभव सांगतात.

विषयी विसर पडला निःशेष । अंगी ब्रह्मरस ठसावला ॥ १ ॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ २ ॥
श्री ज्ञानेश्‍वरमहाराज या अवस्थेचे वर्णन करतात.
जयाचें वाचेपुढां भोजे । अखंड नाम नाचत असे माझे ।
जे जन्मसहस्री बोळगिजे । एक वेळ यावया ॥ ज्ञा. ९-२०६ ॥

भागवत एकादश स्कंध तिसर्‍या अध्यायातील जनक नवयोगेश्‍वर संवादात - भक्त्या संजातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकान्तनुम् ॥३१॥ 'साधन भक्तीपासून उत्पन्न झालेल्या साध्य-फल-स्वरूप भक्तीच्या अनुभवाने ज्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत' असे उभय भक्तीचे वर्णन आले आहे. या श्‍लोकावरील आपल्या प्रसादगर्भ टीकेत एकनाथमहाराज सांगतात -
ज्याचिया नामस्मरण करी । सकळ पातकाते हरि हरी ।
तो स्वयें प्रगटला अंतरी । पातका उरी उरे कैचीं ॥
साधनरूप भक्तीच्या युक्ती । पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ।
ते भक्तीची निजस्थिती । ऐक चक्रवर्ती सज्ञाना ॥
सदभावें निजभजन करी । हृदयी प्रगटता श्रीहरी ।
तव देहीची चिन्हें बाहेरी । क्षणामाझारी पालटती ॥
चित्त चैतन्या होतां भेटी । हर्षे बाष्प दाटे कंठी ।
पुलकांकित रोमांच उठी । उन्मिलित दृष्टी पुंजाळे ॥
तेणें कीर्तन कीर्ति गजरे । त्रैलोक्य सुखे सुभरे ।
परमानंदुही हुंबरे । सुखोदगारें तुष्टोनि ॥ ए भा. ५८८.६०१
स्वयंफलरूपता म्हणतात ती हीच एक अलौकिक अवस्था आहे.


GO TOP