नारद भक्तिसूत्रे

अन्योन्याश्रयमित्यन्ये ॥ २९ ॥


अर्थ : अन्य कोणाचे मत भक्ती व ज्ञान यांत अन्योन्याश्रयत्व आहे (भक्तीस ज्ञान आश्रय व ज्ञानास भक्ती आश्रय आहे.) असे आहे.


विवरण : या विषयात आणखीही एक मत श्री नारद सांगतात. काही लोकांच्या मते भक्ती व ज्ञान हे परस्पर एकमेकांस आश्रय आहे. या संबंधात खालील पक्ष निर्माण होतात. १. ज्ञानभक्तीला आश्रय २. भक्तिज्ञानाला आश्रय ३. साधन ज्ञान साध्य भक्तीला आश्रय ४. साधन भक्ती साध्य ज्ञानाला आश्रय ५. साधन ज्ञान हे साधन भक्तीला आश्रय ६. साधन भक्ती साधन ज्ञानाला आश्रय. जसा साध्यसाधनांचा आश्रयीभाव संबंध असतो तसा साधना-साधनातही असतो. बहिरंग साधन हे अंतरंग साधनाचा आश्रय असते. मृत्तिका हे घटाचे साधन आहे. त्या मृत्तिकेला घटरूपाचा आकार देण्याकरितां चक्रदंड इत्यादी साधनेही लागतात. मात्र या दोन्ही साधनानी प्राप्त साध्य मात्र या दोहोहून वेगळे असावे लागते, चक्रदंड व मृत्तिका याच्यापासून घटाची उत्पत्ती होते त्याप्रमाणे कित्येक मतवादी भक्ती व ज्ञान यांत साध्यसाधनभाव मानतात. भक्तीने ज्ञान प्राप्त होते. मात्र ही जी भक्ती आहे ती पराभक्ती म्हटली जाणार नाही. कारण पराभक्ती ही साधनरूपा नाही. ती कर्मज्ञानयोग यांच्याहून श्रेष्ठ आहे असे मागील पंचविसाव्या सूत्रांत सांगितलेच आहे. जी भक्ती ज्ञानोत्पादक आहे ती साधनरूपाच मानावी लागते. या भक्तीचा विचार पुढे छप्पन्नाव्या सूत्रांत येणार आहे. भक्ती ज्ञानसाधन आहे या विषयात श्री एकनाथ महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.

भक्तिचे उदरी जन्मले ज्ञान । भक्तीनें ज्ञानासी दिधलें महिमान ॥
भक्ति ते मूळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथीचें फूल ॥
फूल फळ दोन्हीं एकएकापाठी । ज्ञान वैराग्य तेविं भक्तिच्या पोटीं ॥
भक्तिविण ज्ञान गिवसिती वेडे । मूळ नाहीं तेथे फळ केविं जोडें ॥
भक्तियुक्त ज्ञान तेथे नाहीं पतन । भक्ति माता तया करितसे जतन ॥
शुद्ध भक्तिभाव तेथे तिष्ठे देव । ज्ञानासी तो ठाव सुखवस्तीसी ॥
शुद्ध भाव तेथें भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनि अंगें समाधि समाधान ॥
एका जनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसें पाया ॥

'भक्तिर्जनित्री ज्ञानस्य भक्तिर्मुक्ति प्रदायिनी ॥' असे अध्यात्म रामायणातही वचन आहे. म्हणून भक्ती हे ज्ञानाचे अंतरंग साधन मानले आहे. वेदान्तशास्त्रात ज्ञान हे वेदान्त वाक्याने होते व ते शमादिषटक साधनसंपन्न अधिकारी मुमुक्षूसच होते असे सांगितले आहे. ज्ञान होणे म्हणजे असत्वापादक व आभानापादक आवरण जाणे असा अर्थ आहे. तसेच प्रमाणप्रमेय याच्याविषयाच्या असभावना विपरीत भावनादिकांची निवृत्ती हे त्या ज्ञानाचे फल आहे. जरी महावाक्य श्रवणाने ज्ञान होते तरी त्या योगे सर्वच प्रतिबंध दूर होत नाहीत, म्हणून जसे मनन, निदिध्यासन सांगितले जाते त्याप्रमाणे प्रतिबंध निवृत्तीकरिता भक्तीने प्राप्त होणारा भगवत्प्रसादही आवश्यक आहे असे म्हटले जाते. कारण
यावन्नानुग्रहः साक्षाज्जायतेपरमात्मनः ।
तावन्न सद्‌गुरूं कंचित्सच्छास्त्रमपिनो लभेत ॥
'जो पावेतो परमात्म्याची कृपा होत नाही तोपावेतो ज्ञान देणारा गुरू अथवा सच्छास्त्र यांचा लाभ होत नाही.' असे श्रुति वचन प्रसिद्ध आहे. याही कारणाने ज्ञान, भक्ति याचा असा आश्रय-आश्रयी भाव-संबंध आहे. मात्र ही ज्ञानास कारणस्वरूप भक्ती जिज्ञासू भक्ताची अतएव गौणीच समजली जाईल. एके ठिकाणी असे म्हटले आहे.

यथा ज्ञानं विना मुक्तिर्नास्त्युपायशतैरपि ॥
तथा भक्तिं विना ज्ञानं नास्त्युपायशतैरपि ॥
जसे शेकडो साधने केली तरी ज्ञानाविना मुक्ती प्राप्त होत नाही, तद्वत शेकडो उपाय केले तरी भक्तिविना ज्ञान प्राप्त होत नाही.' याप्रमाणे भक्ती ही ज्ञानास आश्रय आहे, हे सिद्ध होते. पण सूत्रातील शब्दयोजनेप्रमाणे ज्ञान हे भक्तीस आश्रय आहे असे म्हणावे लागते. ज्ञान व भक्ती याचा आश्रयआश्रयीभाव साध्य-साधनभावसंबंध कसा नियत असतो याचा विचार मागील अठ्‌ठाविसाव्या सूत्रात झाला आहे. उपास्याचे यथार्थ ज्ञान नसेल तर त्याची भक्ती होणार नाही. ते ज्ञान सामान्य रूपाने वा विशेष रूपाने असणे अवश्य आहे ? कित्येकांच्या मते उपास्याच्या माहात्म्याचे रूप, गुण, सत्ता, सामर्थ्य इत्यादी जर अलौकिक स्वरूप आहेत असें सत्संगतीने वा सच्छास्त्र श्रवणाने कळेल तर त्याच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते. अशा रीतीने पराभक्तीस ते ज्ञान कारण होते. अशी उभयविध प्रमाणे सापडतात म्हणूनच कित्येक लोक ज्ञान व भक्ती यांना अन्योन्याश्रयत्व आहे असे म्हणतात. म्हणजे ज्ञान हे भक्तीचे साधन व भक्ती हे ज्ञानाचे साधन. मात्र जेव्हा ज्ञान व भक्ती यांचा परस्पर आश्रयआश्रयीभाव संबंध येतो तेव्हा ज्ञान व भक्ती यांच्या व्याख्या भिन्न भिन्न कराव्या लागतात. नसता अन्योन्याश्रय दोष येतो. म्हणजे जे ज्ञान ज्या भक्तीस आश्रय तीच भक्ती त्याच ज्ञानास आश्रय असे म्हटल्यासारखे होईल; स्वस्कंधारोहणन्यायाप्रमाणे म्हणजे आपणच आपल्या खांद्यावर आरूढ व्हावे तसे ते आहे. म्हणून ज्या वेळी ज्ञान साधन त्या वेळी भक्ती साध्य व भक्ती साधन त्या वेळी ज्ञान साध्य असे म्हणावे लागते व प्रत्येक वेळी त्याच्या लक्षणांत भेद करावा लागतो. ज्ञान व भक्ती ही दोन्हीही साधने मानली तर त्यांचे तिसरेच एक साध्य मानावे लागते. पण भक्तिशास्त्रकार भक्ती हे एक साध्यच मानतात.

एखाद्या विषयाचा सांगोपांग विचार करताना त्या विषयात अन्याच्या मताचाही परामर्ष घेणे ही शास्त्रकाराची रीत आहे तिला अनुसरून नारदांनी ही मते सांगितली आहेत. नारदमहर्षीना ज्ञान व भक्ती यांतील असा साध्य-साधनभाव (अथवा अन्योन्याश्रयत्व) मान्य नाही. म्हणून पुढील सूत्रात ते आपले स्वतःचे मत सांगतात.


GO TOP