नारद भक्तिसूत्रे

तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ॥ २८ ॥


अर्थ : त्या (भक्तीचे) ज्ञान हेच साधन आहे असे कोणी (आचार्य) म्हणतात.


विवरण : भक्ती ही कर्म, ज्ञान, योग यापेक्षा श्रेष्ठ आहे. ती फलरूपा आहे असे मागील सूत्रात स्पष्ट सांगितले गेले आहे. जर ती फल म्हणजे साध्यच असेल तर तिला कोणत्या तरी साधनाची अपेक्षा असणारच. साधनाविना साध्यप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून त्या भक्तीच्या साधनांचा विचार या सूत्रापासून केला जात आहे.

प्रथम अन्य आचार्यांचे मत सांगतात. कोणी एक या विषयाचा विचार करणारे म्हणतात की, या भक्तीचे ज्ञान हेच साधन आहे. कारण ज्याची भक्ती करावयाची त्याचे प्रमाणसिद्ध ज्ञान असणे अवश्य आहे. तसेच जी भक्ती करावयाची तिच्या स्वरूपाचे ज्ञान असणेही अवश्य आहे. आणि भक्तीचे प्रयोजन कळणेही अवश्य आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. त्यात ज्ञानी भक्तच श्रेष्ठ असे श्रीकृष्णांनीच म्हटले आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अनेक ठिकाणी या विषयाचा विचार केला आहे. ज्ञान नसेल तर भक्ती होणार नाही.

हें आंत बाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिले ।
की कैसें कर्म तया जालें । जें मीचि नाहीं म्हणतीं ॥
परि अमृतकुहां पडिजे । कां आपणियातें कडिये काढिजे ।
ऐसें आथी काय कीजें । अप्राप्तासि ॥
ग्रासा एका अन्नासाठी । अंधू धांवताहे किरीटी ।
आदळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥
तैसें ज्ञान जैं सांडूनि जायैं । तै ऐसी हें दशा आहे ।
म्हणोनि कीजे तें केलें नोहें । ज्ञानेविण ॥
आंधळेया गरुडाचे पाख आहाती । ते कवणा उपेगा जाती ।
तैसे सत्कर्माचे उपखे जाती । ज्ञानेवीण ॥ ज्ञा. ९.३०२-६
येर मातें नेणोनि भजन । तें वांयाचि गा आने आन ।
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । ते निर्दोष होआवे ॥ ३५० ॥ ज्ञा. ९.३५०

जर ज्ञान नसेल तर, भज्य तो भगवान त्याचे यथार्थ स्वरूप कळत नाही, महत्त्व पटत नाही. त्यामुळे व्यभिचारबुद्धी भेददृष्टी निर्माण होते. अन्य क्षुद्र देव-देवतांची भक्ती करू लागतो. फलेच्छा इत्यादि दोष निर्माण होतात. भक्ती निर्दोष होण्यास ज्ञान पाहिजे असे त्याचे म्हणणे असते.

येथे ज्ञान हा शब्द संदिग्ध वाटतो. भक्तीचे जसे स्वरूप घेतले जाईल तसे ते ज्ञान ठरणार. निराकार, निर्गुण परमात्मस्वरूपाची भक्ती मानली तर त्या स्वरूपाचे ज्ञान उपनिषदादी प्रमाणांवरून होते, व सगुण साकाराची मानली तर त्याचे अनंत गुण. अनंत लीला, माधुर्य, सौंदर्य तसेच रूप, आकार, त्याचे अनेक प्रकार इत्यादिकांचे ज्ञान मानावे लागते. मागे पूजा, कथा तसेच गोपिकांचे उदाहरण दिले आहे. पुढे सगुण-साकार भक्ती सांगितली आहे, त्यावरून सगुण साकार स्वरूपाचे ज्ञान हे साधन त्या भक्तीचे असे म्हणावे लागते. पण सगुणस्वरूपाच्या लीला, गुण, माधुर्य इत्यादिकांच्या ज्ञानानंतर भक्ती होते असे म्हणता येत नाही, तर भक्तीप्रेमाच्या स्वरूपातच वरील सर्व गोष्टीचा समावेश होतो. कारण सूत्र सोळा-सतरामध्ये पूजा-कथा इत्यादिकांत अनुराग म्हणजे भक्ती असे म्हटले आहे व व्यास-गर्ग-नारद याची मते म्हणून ती सांगितली आहेत. केवळ निर्गुण-निराकाराचे ज्ञान येथे अभिप्रेत असावे असे वाटत नाही. कारण त्या ज्ञानात मुक्ती हे साध्य आहे. भक्ती नाही.

जर ज्ञान हे त्या भक्तीचे साधन अवश्य म्हणून असते तर गीता व भागवत एकादश स्कंधामध्ये भक्तीमध्ये अन्य साधनांचा निषेध केला गेला नसता.

नाहं वेदैर्न तपसा न दाने न चेज्यया ।
शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥
भक्त्यात्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ गीता ११.५३,५४
'श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जसे तू मला पाहिले आहेस तसे वेद, तप, दान यज्ञ इत्यादिकांनी मी पाहिला जात नाही.

अनन्यभक्तीच्या द्वारेच याप्रकारे मला पाहता येते, तत्त्वतः जाणता येते, व माझ्यात प्रवेश करता येतो. उद्धवासही भगवान श्रीकृष्ण हेच सांगत आहेत -
न साधयति मां योगो न सांख्यं धर्म उद्धव ।
न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ॥ भागवत ११-१४-२०

जशी दृढ भक्ती मला वश करू शकते तसे मला योग, ज्ञान, धर्म, स्वाध्याय तप, त्याग इत्यादी साधने वश करू शकत नाहीत.' म्हणजे भक्ती ही निरपेक्ष आहे. ती स्वतंत्र आहे, ती अन्य साधनाची अपेक्षा ठेवीत नाही. असे जरी आहे तरी भगवत्स्वरूपाचे ज्ञान आशिक स्वरूपात का होईना आवश्यक असते. भक्ति-रसामृतसिंधू नामक भक्तिशास्त्रावरील ग्रंथात श्रीरूप गोस्वामी म्हणतात-
ज्ञानवैराग्ययोर्भक्ति प्रवेशायोपयोगिता ॥
ईषत्प्रथममेवेति नाङ्गत्वमुचितं तयो. ॥ १-२-४८
'ज्ञान,वैराग्य या साधनाना भक्तीमध्ये प्रवेश होण्यापुरतीच उपयोगिता थोडीशी प्रारंभी आहे, ती साधने अंग होऊ शकत नाहीत.' म्हणजे ज्ञान हे भक्तीचे साक्षात साधन नसून उपांग म्हणता येईल. ज्ञान शब्दाचे ब्रह्मज्ञान, ब्रह्मात्मैक्यज्ञान, सारासारविवेकज्ञान असे अनेक अर्थ संभवतात. सारासार विवेकज्ञान, आत्मज्ञान, अभेदज्ञान, नित्यानित्यज्ञान असा अर्थ घेतल्यास ते ज्ञान भक्तीला पोषक असू शकते. 'फळकट संसार । येथ सार भगवंत ॥' 'तुका म्हणे एक विठ्ठलचि खरा । येर तो पसारा वाउगाची ॥' इत्यादि वचने या ज्ञानाचे स्वरूप सांगणारी आहेत असे म्हणावयास काही हरकत नाही. श्रवणादिकाने, सत्संगतीने झालेले भगवत्स्वरूपाचे म्हणजे रूप-माधुर्य-सौंदर्य-गुणादिकाचे ज्ञान हृदयात प्रेम निर्माण करण्यास उपयोगी पडते. रुक्मिणीस एका ब्राह्मणाच्या मुखाने श्रीकृष्ण गुणाचे श्रवण झाले, त्यामुळेच तिच्या हृदयात श्रीकृष्णाविषयी अनुराग निर्माण झाला, नंतर तिने श्रीकृष्णास पत्रिका पाठविली असे भागवतात वर्णन आहे. असे परोक्ष ज्ञान भक्तीस पोषक होते, असा या सूत्राचा अर्थ केला तर चालेल.

पण यावरही शांडिल्यसूत्रात शंका आहे. या महात्म्य ज्ञानाने भक्ती निर्माण होतेच असे नाही, कारण कित्येक देवांच्या शत्रूनाही असे ज्ञान होते ? पण त्यापासून त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झाले नाही. ज्ञान असूनही काही प्रतिबंधामुळे शत्रूच्या ठिकाणी भक्ती निर्माण झाली नसेल असे अनुमान करता येईल. पण महात्म्यज्ञान असणे ठीक आहे. पण यावर असाही एक आक्षेप येऊ शकतो की, कित्येक भक्तांचा विचार केला तर त्याच्याजवळ ज्ञानसाधनाचा अभाव असूनही ते भक्तकोटीत समाविष्ट झाले.

वृंदावनासमीप अरण्यात यज्ञादी श्रौत कर्माचे अखंड आचरण करणारे ब्राह्मण रहात होते. त्यांच्या अंतःकरणांत कर्मठत्वाचा अभिमान असल्याने श्रीकृष्णाकरिता गोपालांनी अन्न मागितले असताही त्यांनी दिले नाही. त्यांच्या स्त्रिया मात्र अन्न घेऊन गेल्या व त्यांनी भगवंतास संतुष्ट केले, नंतर त्या ब्राह्मणांना पश्चाताप झाला व ते म्हणू लागले,
नासां द्विजाति संकारो न निवासी गुरावपि ।
न तपो नात्ममीमांसा न शौचं न क्रियाः शुभाः ॥
अथापि ह्युत्तमश्‍लोके कृष्णे योगेश्‍वरेश्‍वरे ।
भक्ति दृढा न चास्माकं संस्कारादिमतामपि ।
धिग्जन्म नस्त्रिवृद्विद्यां धिग्व्रतं धिग्बहुज्ञताम् ।
धिक्कुलं धिक क्रियादाक्ष्यं विमुखायेत्वधोक्षजे ॥ भागवत १०-२३

'या ब्राह्मण स्त्रियांचे द्विजातियोग्य संस्कारही झाले नाहीत, गुरुगृही वास करून काही ज्ञानही संपादन केले नाही, तप, आत्मनात्म विचारही केला नाही. इतकेच नाही, तर यांचे ठिकाणी पूर्ण पावित्र्य नाही व शुभकर्मही नाही. तथापि उत्तम श्‍लोक योगेश्‍वरेश्‍वर भगवंताचे ठिकाणी यांचे दृढ प्रेम आहे. आम्ही संस्कारवान आहो, गुरुकुलांत वास करून ज्ञान मिळविले, तप केले, आत्मानुसंधान केले पण त्याचे ठिकाणी आमचे प्रेम जडले नाही. आमचा ब्राह्मण जन्म, वेदाध्ययन, व्रते, यज्ञादिक याचा काय उपयोग आहे ? जे भगद्विमुख आहेत त्यांचे सर्व व्यर्थ आहे म्हणून आम्हांला धिक्कार असो.'

एवढा साधकबाधक विचार करण्याचे कारण हे की, भक्तीचे ज्ञान हे साधन आहेच असे श्रीनारदऋषी आपले स्वतःचे मत येथे सांगत नाहीत तर 'एके' म्हणून अन्य कोणाच्या मताचा अनुवाद करतात. भगवान श्रीकृष्णही उद्धवास सांगतात-
माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता ।
माझें भजनें नित्यमुक्तता । जाण मदभक्तां मदभावें ॥
ज्ञानेवीण भक्ति न घडे । म्हणती ते शब्दज्ञान धडफुडें ।
भक्तीस्तव जाण रोकडे । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥ एकनाथी भागवत ११,६५८-५९
असा जरी भक्तिशास्त्राचा सिद्धान्त आहे तरी ज्ञान हे भक्तीचे साधन आहे असे म्हणणार्‍यांचा या सूत्रात अनुवाद केला आहे.


GO TOP