नारद भक्तिसूत्रे

राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्वात ॥ ३१ ॥
न तेन राजपरितोषः क्षुच्छांतिर्वा ॥ ३२ ॥


अर्थ : राजवाडा, भोजन इत्यादीच्या संबंधात (जसे) पाहण्यामुळे तसे ॥ ३१ ॥
त्यामुळे राजाचा आनंद होत नाही किंवा भुकेचे शमन होत नाही ॥ ३२ ॥


विवरण : ज्ञान हे भक्तीचे साधन आहे हे जे काही लोकांचे मत मागे सांगितले त्याचा प्रतिवाद करण्यासाठी व भक्ती ही स्वयं-फलरूपा आहे या आपल्या मताच्या पुष्टीसाठी सूत्रकार श्रीनारद येथे उदाहरणे किंवा दृष्टांत देतात. वरील दोन्ही सूत्रांचा अन्वय असल्यामुळे त्याचा येथे एकत्रच विचार केला आहे.

सूत्राचे एक लक्षण 'सारवत्' असे असल्यामुळे सूत्रांमधून शक्यतो सिद्धान्त सांगितले जातात. दृष्टान्त वगैरे बहुधा दिले जात नाहीत. तरीसुद्धा संदिग्धता दूर करण्यासाठी एखादेवेळी दृष्टान्त देणे आवश्यक होते. दृष्टान्ताचे यासंबंधातील महत्त्व योगवसिष्ठात वसिष्ठमुनी श्रीरामचंद्रांना सांगताना म्हणतात,
येनेहाननुभूतेऽर्थे दृष्टेनार्थेन बोधनम् ।
बोधोपकार फलदं तं दृष्टान्तं विदुर्बुधाः ॥
दृष्टान्तेन विना राम नापूर्वार्थोऽवबुध्यते ।
यथा दीपं विना रात्रौ भाण्डोपस्करणं गृहम् ॥ योगवसिष्ठ, १८-५०--५१

'ज्या दृष्ट पदार्थाने अननुभूत अशा पदार्थाचा बोध होतो त्या ज्ञानाचे सहाय्यक फल देणार्‍या पदार्थाला ज्ञाते दृष्टान्त म्हणतात. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी दिव्यावाचून घरातील भांडी वगैरे दिसत नाहीत त्याप्रमाणे दृष्टान्ताशिवाय, हे रामा, अदृष्ट अर्थाचा बोध होत नाही.' असे असल्यामुळे येथे राजगृह व भोजन याचा दृष्टान्त दिला आहे. उपनिषदामध्येही अशीच सिद्धान्त पटवून देण्यासाठी दृष्टान्त देण्याची पद्धती आहे.

या सूत्राचा अन्वयार्थ करण्यामध्येही मागच्या पुढच्या संदर्भाकडे लक्ष न गेल्यामुळे बर्‍याच टीकाकारांचा गोंधळ उडालेला आहे त्याचा अन्वय खालीलप्रमाणे केला तरच सूत्राचा एकमेकाशी संबंध व्यवस्थित लागतो. भक्तीच्या प्राप्तीचे साधन ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे कसे ते वरीलपैकी पहिल्या सूत्रात सांगतात. तसे म्हणणे म्हणजे "(यथैव) राजगृहभोजनादिषु दृष्टत्वात् तथैव'' याचा अर्थ, ज्ञानाने भक्ती प्राप्त होते असे म्हणणे म्हणजे राजगृह किंवा भोजन पाहिल्यामुळे त्याची प्राप्ती होते असे म्हणण्यासारखे आहे. राजवाडा किंवा अन्नपदार्थांनी भरलेले ताट याच्यासंबंधात (राजगृहभोजनादिषु) ते पाहिले गेल्यामुळे (दृष्टत्वात) त्याची प्राप्ती म्हणजे त्याचा भोग प्राप्त होतो असे म्हणण्यासारखे (तथैव) ज्ञानाने भक्तीची प्राप्ती होते असे म्हणणे आहे' पण तसे होत नसते. तेच पुढील सूत्रात सांगतात.

'न तेन (दृष्टत्वेन) राजपरितोषः क्षुतत् शान्तिर्वा ।'
त्या राजवाडा पाहण्याने राजाला मिळणारा त्या राजवाड्याच्या सौख्य-विलासादिकाचा भोग आपल्याला पहायला मिळत नाही किंवा भोजनपदार्थ पाहण्याने भूक शांत होत नाही.
'राजपरितोषः' या पदाचा अर्थ बहुधा सर्व व्याख्याकारांनी 'राजाची कृपा' किंवा 'राजाचा संतोष प्राप्त करणे' असा केला आहे. पण 'राजपरितोषः' याचा अर्थ 'राजाचा आनंद' म्हणजे राजा जो आनंद (राजवाड्यातील वास्तव्याने) मिळवतो तो' असा अर्थ करणेच मागील आणि पुढील सूत्रातील श्रीनारदांचे प्रतिपादन पाहता योग्य होईल.

भक्तीच्या ज्ञानाने किंवा ज्याची भक्ती करावयाची त्याच्या ज्ञानाने भक्तिसुखाची प्राप्ती होत नाही किंवा ती त्या ज्ञानावर अवलंबूनही नाही. भक्तीत ज्ञान असेल आणि असावे हे ठीक आहे पण ज्ञान झाल्याने किंवा ज्ञानाच्याद्वारे भक्तीची प्राप्ती होतेच असे नाही, म्हणून ज्ञान हे भक्तीचे साधन नाही. कारण भक्ती ही 'स्वयंफलरूपा' आहे. भक्तीच भक्तीचे साधन आहे. भक्ती केल्यानेच भक्तीप्रेमानंदाचा लाभ होतो. जे जे साध्य असते त्याचे साधन त्याच्यापेक्षा वेगळे असते असा सर्वसाधारण नियम असता भक्तीचे साधन भक्ती स्वतःच कशी असू शकेल अशी त्यावर शंका येईल. त्यावर श्रीनारदांचे उत्तर असे की ती परमप्रेमरूपा आहे आणि प्रेम हे अनुभवरूप आहे - म्हणजे अनुभवानेच कळणारे आहे, शब्दज्ञानाने नव्हे. कोणतेही सुख हा अनुभवाचाच विषय असतो, ज्ञानाचा नसतो. 'भक्ति-प्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियासी ॥' असे तुकाराममहाराजही त्यामुळेच म्हणतात. सुखाची साधने कळल्याने सुख होत नाही तर सुखाचा अनुभव घेतल्याने सुख होते. राजवाडा पाहून त्यातील सुखाच्या अनेक साधनाचे ज्ञान होऊन त्यापासून राजाला जे सुख होते ते आपल्याला होईल काय ? त्याचा अनुभव घेण्यानेच ते सुख आपणास कळेल. त्याचप्रमाणे भोजनाचेही. जेवणाचे ताट पाहून व त्यातील कोणते पदार्थ कसे करतात, त्यातील गुण कोणते हे केवळ कळून थोडीच तुष्टीपुष्टी होते ? त्यासाठी त्या पदार्थाचे सेवनच केले पाहिजे. त्याप्रमाणे भक्तीतील श्रेष्ठ प्रेमानंदाने तृप्त व शांत व्हावयाचे असेल तर भक्तीचाच आस्वाद घेतला पाहिजे. म्हणून पुढील सूत्रात 'तस्मात् सा एव ग्राह्या' - म्हणजे त्यासाठी तिचाच अंगिकार केला पाहिजे असे म्हटले आहे.

असे हे नारदमहर्षीचे प्रतिपादन आहे. त्यादृष्टीने सर्वप्रकारे वर केलेले या सूत्राचे अर्थच त्याचा हेतू योग्य प्रकारे व्यक्त करतात असे दिसून येईल.

भक्तिप्रेमाच्या संबंधात हाच सिद्धान्त सर्व संतांना मान्य आहे. ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात,
'हे अनुभवाचिजोगे, नव्हे । बोला ऐसे ॥'

तर तुकाराममहाराज सांगतात
प्रेम नये बोलता दाविता सांगता ।
अनुभव चित्ता, चित्त जाणे ॥


GO TOP