नारद भक्तिसूत्रे

तत्रापि न माहात्म्यज्ञानविस्मृत्यपवादः ॥ २२ ॥
तद्विहीनं जाराणामिव ॥ २३ ॥


अर्थ : त्या अवस्थेमध्येही (गोपिकांना) माहात्म्यज्ञानाची विस्मृती होती, असा अपवाद (कलंक) देऊ नये ॥ २२ ॥
तद्विहीन म्हणजे माहात्म्यज्ञानाविना (श्रीकृष्णास परमात्मा असे न जाणता केले जाणारे प्रेम) जार प्रेमाप्रमाणे होईल. ॥ २३ ॥


विवरण - भक्तिप्रेमाला महात्म्यज्ञानाची जोड असावी, नसता त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. भेदबुद्धी, व्यभिचार, फलकामना, स्वसुखाभिलाष इत्यादी निर्माण होतात. 'माहात्म्यज्ञानपूर्वक सुदृढ स्नेह विशेष म्हणजे भक्ती' असे नारदाचे पाञ्चरात्रातील मत पूर्वी उद्‌धृत केले आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराज हीच गोष्ट दृष्टांताने सांगतात -

पाहे पा शाखापल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे ।
परी पाणी घेणे मुळाचे । ते मुळीचि घापे ॥
का दहाही इंद्रिये आहाती । इथें जरी एकेचि देहीची होती ।
आणि इही सेविले विषय जाती । एकाचि ठाया ॥
तरी करोनि रससोय बरवी । कानी केवि भरावी ॥
फुले आणोनि बांधावी । डोळा केवी ॥
तेथ रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो घ्राणेचि घ्यावा ।
तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥ ज्ञानेश्वरी ९. ३४६ - ४९

म्हणून गोपिकांना जर भगवत्तत्वाचे यथार्थ ज्ञान नसते तर ते प्रेम भक्ती या संज्ञेस प्राप्त झाले नसते. तसेच मागील सूत्रात गोपिकांचे जे वर्णन केले आहे ते सर्व व्यर्थ झाले असते. सर्व ऋषी, मुनी, साधुसंत किंबहुना प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान त्याच्या दिव्य व अलौकिक प्रेमाचे वर्णन करतो त्या अर्थी ते अलौकिक व माहात्म्यज्ञानयुक्तच प्रेम होते. कित्येक बहिर्मुखाना संशय येणे शक्य आहे. श्रीमद्‌भागवतामध्ये प्रत्यक्ष परिक्षिती राजानेच अशी शंका घेतली होती, तिचे उत्तर शुकाचार्यांनी स्पष्ट दिले आहे.

कृष्णं विदुः परं कांतं न तु ब्रह्मतया मुने ।
गुणप्रवाहीपरमस्तासां गुणधियां कथं ॥ भागवत १० - २९ - १२

परिक्षिती म्हणतो, गोपिका कृष्णास कांत, पती समजत होत्या. त्यांना त्याच्या ब्रह्मरूपतेचे ज्ञान नव्हते, त्याचा गुणप्रवाहाचा बाध म्हणजे मोक्ष कसा झाला ? याचे उत्तर शुक्राचार्यानी दिले आहे. ते म्हणाले -
उक्तं पुरस्तादेतत्ते चैद्यः सिद्धिं यथा गतः
द्विषन्नपि हृषीकेशं किमुताधोक्षज-प्रियाः ॥ १३ ॥
'तुला पूर्वीच सांगितले आहे की, चैद्य शिशुपालही श्रीकृष्णाच्या द्वेषाने मुक्त झाला, या गोपी तर त्या अधोक्षजाला प्रिय होत्या.' मानवाच्या आत्यंतिक कल्याणाकरिता भगवान व्यक्त स्वरूप धारण करतो. गोपिकांना हे सर्व ज्ञात होते, म्हणून त्यांना माहात्म्यज्ञान होते असे नारद म्हणतात. माहात्म्यज्ञान म्हणजे भगवन्महत्त्व अनेक प्रकारचे असते. रूप, गुण, माधुर्य, सत्ता, सामर्थ्य, ऐश्वर्य, व्याप्ती, भक्तरक्षण, दुष्टनाश, दुरितनाश, शक्ती इत्यादि इत्यादि प्रकार संभवतात. त्या सर्वाचे गोपिकांना ज्ञान संपूर्ण होते, असे गोपीगीत व अन्य प्रसंगी त्याचे जे अनेक उद्‌गार व्यक्त झाले आहेत त्यावरून सिद्ध होते. श्रीकृष्ण सामान्य मानव नव्हता, तर परमेश्वर होता असे गोपिकांनी म्हटले आहे. (भा १० - २९ - ३३) तसेच गोपिका रासलीलाप्रसंगी वेणुनादाने मोहित होऊन श्रीकृष्णाकडे आल्या तेव्हा श्रीकृष्णानी त्यांना परत घरी जाऊन आपल्या पतीची सेवा करा असा उपदेश केला असता गोपिकांनी श्रीकृष्णास उत्तर दिले की -

यत्पत्यपत्यसुहृदामनुवृत्तिरंग
स्त्रीणां स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम् ।
अस्त्येवमेतदुपदेशपदे त्वयीशे
प्रेष्ठो भवान्स्तनुभृतां किल बंधुरात्मा ॥ भा १० - २९ - ३२

"हे श्रीकृष्णा ! पती, पुत्र, बंधू व स्वजनांची सेवा करणे हा स्त्रियांचा धर्म आहे असे तू म्हणतोस ते खरे आहे, पण हा उपदेश तर तुझीच सेवा करण्याची प्रेरणा देत आहे, तू भगवान आहेस, आमच्या पती, पुत्र, बंधू स्वजनादिकांचाही तूच आत्मा आहेस. तुझ्यामुळेच त्यांना पतीपणा प्राप्त झाला आहे."

क्षीरसागरनिवासी लक्ष्मीही तुझ्या चरणरजाची इच्छा करते. तुझा अवतार या व्रजात झाल्यापासून ही लक्ष्मी येथे कायमची वास्तव्य करून आहे. तू या व्रजातील सर्वांचेच भय दूर करीत आहेस, तुझ्या सौंदर्याने त्रैलोक्याला शोभा प्राप्त होत असते. तू केवल गोपिका (यशोदा) नंदन नव्हेस, तर अखिल प्राणिमात्रांचा अंतरात्मा साक्षी आहेस. जे तुला अनन्यशरण होतात त्यांना तू सर्व पातकांपासून मुक्त करतोस.

ब्रह्मदेवाने या विश्वाच्या रक्षणाकरिता तुझी प्रार्थना केली होती, त्या प्रार्थनेवरून तू हा अवतार धारण केला आहेस, हे देवाधिदेवा, अनेक भक्त या दुःखमय संसारापासून मुक्त होण्याकरिता तुझाच आश्रय घेतात. आणखीही गोपी असे वर्णन करतात की, हे श्रीकृष्णा ! तुझ्या लीलाकथाही अमृतस्वरूप आहेत. विरहाने तप्त झालेल्या लोकांना शांत करणार्‍या आहेत. मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांनी त्यांचे गायन केले आहे. त्यांच्या महात्म्याचे वर्णन केले आहे. त्या कथा सर्व पाप तर नष्ट करतातच, त्याबरोबर परम मंगल कल्याणाचे दानही करतात, जे तुमच्या या लीलाकथांचे गायन करतात. तेच या भूलोकात मोठे दान करणारे असे म्हणविले जातात. त्यांच्याच द्वारा जगावर सर्वांपेक्षा अधिक उपकार होतात. तुमच्या कथेचे जर हे माहात्म्य आहे तर प्रत्यक्ष संगसौख्याचे वर्णन कोण करू शकेल ?

श्रीमद्‌भागवत दशमस्कंध, अध्याय एकोणतीस ते तेहतीसमध्ये जे रासलीलेचे वर्णन आहे त्यावरून व्रजवासी गोपिकांना महात्म्यज्ञान किती पूर्ण होते हे सहज सिद्ध होते.

गोपिकांच्या महात्म्यज्ञानाचे श्रीएकनाथमहाराज, श्रीकृष्ण-उद्धव संवाद प्रसंगी वर्णन करीत आहेत -
नवरसांचा रसिक । नवरंगडा मीचि एक ।
यालागी माझ्या कामी कामुक । भावो निष्टंक गोपिकांचा ॥
जीवा आतुलियें खुणें । मीचि एक निववू जाणे ।
ऐसें जाणोनि मज कारणें । जीवें प्राणें विनटल्या ॥
अंगी प्रत्यंगी मीचि भोक्ता । सबाह्य सर्वांगें मीचि निवविता ।
ऐसें जाणोनि तत्त्वतां । कामासक्तता मजलागी ॥
ऐसा सर्वकामदायक । पुरुषांमाजी मीचि एक ।
हा गोपिकी जाणोनि विवेक । भाव निष्टंक धरियला ॥ एकनाथी भागवत, अ. १२. १९७ - २००

श्रीतुकाराममहाराजही म्हणतात -
लोका गोकुळीच्या झालें ब्रह्मज्ञान । केलिया वांचून जपतपें ॥
जपतपे काय करावी साधनें । जंव नारायणें कृपा केली ॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाही नाही ॥
व्रजवासी गोपिकांना सामान्य समजणे हे घोर अज्ञान आहे. स्वतः चतुर्मुख ब्रह्मदेव श्रीकृष्णापुढे त्यांचे वर्णन करीत आहे -
अहोऽतिधन्या व्रजगोरमण्यः स्तन्यामृतं पीतमतीव ते मुदा ॥
यासां विभो वत्सतरात्मजात्मना यतृप्तयेऽद्यापि न चालमध्वराः ॥ - भागवत १० - १४ - ३१

'मोठमोठे यज्ञ तुमची तृप्ती करू शकत नाहीत, परंतु या व्रजातील गायी व गोपिकांची धन्य आहे, ज्यांची वासरे व बालके बनून तुम्ही मोठ्या आनंदाने त्यांचे दुग्ध प्राशन केले आहे.'

भक्तवर्य उद्धव तर आपली आत्यंतिक अभिलाषा प्रकट करून म्हणतो -
आसामहोचरणरेणुजुषामहं स्यां वृन्दावने किमपि गुल्मलतौषधीनाम ।
या दुस्त्यजं स्वजनमार्यपथं च हित्वा भेजुर्मुकुन्दषदवीं श्रुतिभिर्विमृग्याम ॥ - भागवत १० - ४७ - ६१

'माझ्याकरिता तर उत्कृष्ट गोष्ट हीच आहे की या वृंदावनामध्ये एखादे लहान झुडुप अवथा वेल बनून राहावे, म्हणजे या वृंदावनातील गोपिकांची चरणधूली माझ्यावर अखंड पडत राहील, या चरणधूलीत सुस्नात होऊन मी धन्य होईन, ज्याचा त्याग फार कठीण आहे, मर्व स्वजनांचा, लोक, वेद व आर्यमर्यादेचा सहज त्याग करून या गोपांगनांनी भगवान मुकुंदाच्या त्या पदवीची - प्रेममय स्वरूपाची - प्राप्ती करून घेतली आहे की ज्या स्थानाचा श्रुति अनादिकालापासून शोध घेत आहेत, पण त्यांना ते सापडले नाही.' शेवटी तर उद्धवाने त्या गोपिकांच्या पदरजासच नमन केले आहे.

वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः ॥
यासां हरिकथोद्‍गीतं पुनाति भुवनत्रयम् ॥ भागवत १० - ४७ - ६३

'नन्दाच्या व्रजामध्ये वास्तव्य करणार्‍या व्रजस्त्रियांच्या चरणरजांना मी वारंवार नमस्कार करतो, या गोपिकांनी भगवंताच्या लीलाकथांचे जे गायन केले आहे ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे.'

पूर्ण ब्रह्मस्वरूप स्थितीस प्राप्त झालेले श्रीशुकाचार्यही या गोपिकांच्या भाग्याचे वर्णन करतात -
नेमं विरिञ्चो न भवो न श्रीरप्यङ्गसंश्रया ।
प्रसादं लेभिरे गोपी यत्तत्प्राप विमुक्तिदात् ॥ भागवत. १० - ९ - २०

'जो प्रसाद यशोदादिक गोपिकांना मिळाला तो ब्रह्मदेव, श्रीशंकर व अर्धांगिनी लक्ष्मीलाही प्राप्त झाला नाही.' गोपिकांच्या श्रेष्ठत्वाची परिसीमा श्रीकृष्णानी रासलीला प्रसंगी गोपिकांशी बोलताना जी भाषा वापरली आहे त्यावरून पूर्णतया कळून येते.

न पारयेऽहं निरवंद्यसंयुजां स्वसाधुकृत्यं निबुधायुषासि वः ।
या माभजन्दुर्जरगेंहश्रृंखलाः संवृश्‍च्य तद्व प्रतियातु साधुना ॥ भागवत १० - ३२ - २२

श्रीकृष्ण भगवान गोपिकांना म्हणतात, तुम्ही माझ्याकरता गृह व गृहस्थपणाच्या अभिमानाच्या सर्व अभेद्य बेडया तोडून टाकल्या आहेत. वास्तविक मोठमोठे योगी-संन्यासीही त्या तोडू शकत नाहीत. माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वस्वी निर्मल व निर्दोष आहे, मी जरी अमर अशा शरीराने अनंतकाल पावेतो तुमच्या प्रेमाचा, त्यागाचा नि सेवेचा मोबदला देण्याचा प्रयत्न करीन तरी ते शक्य नाही. मी जन्मजन्मांतरीचा तुमचा ऋणी आहे.' यापेक्षा त्या व्रजवासी गोपिकांच्या ठिकाणी असलेल्या परमात्मविषयक महात्म्यज्ञानाचे कोण विशेष वर्णन करू शकेल ? म्हणूनच श्रीनारद 'गोपिकांच्या ठिकाणी महात्म्य ज्ञानाची विस्मृती होती असा अपवाद देऊ नये, असा कलंक लावू नये' असे अट्टाहासाने सांगत आहेत.

संस्कृत भाषेत अपवाद शब्दाचा प्रयोग दोन अर्थात केला जातो असे व्याकरणामध्ये सामान्य विधि (उत्सर्ग) चा विशेष विधि द्वारा बाध वा संकोच होतो तेव्हा त्या विशेष नियमाला सामान्य नियमाचा अपवाद असे म्हटले जाते. पूर्व मीमांसा धर्मशास्त्रामध्येही अपवाद शब्दाचा याच अर्थामध्ये प्रयोग होत असतो असे वेदामध्ये 'मा हिंस्यात सर्वाभूतानि' (कोणाही भूताची हिंसा करू नये.) हा सामान्य नियम आहे, पण काही यज्ञात विधीने पशुहिंसा सांगितली आहे, तो तेवढ्यापुरता अपवाद (म्हणजे सामान्य नियमाचा बाध) समजला जातो. साहित्यशास्त्रात अपवाद शब्द दुसर्‍याच अर्थाने योजिला जातो. असे परापवाद, मिथ्यापवाद इत्यादी येथे अपवाद शब्द कलंक या अर्थाने योजिला आहे. एक कथा आहे - एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथी होती, त्या दिवशी सायंकाळी पूजापात्रात दूर्वा, पुष्पे, अक्षता, चंदन इत्यादी पूजासाहित्य घेऊन चंद्रावली नामक गोपी चंद्राला अर्घ्य देण्याकरिता निघाली, रस्त्यात अकस्मात नारदमहर्षी भेटले. त्यांनी विचारले की, "अग तू आज हे काय करीत आहेस ? तुला वेड तर लागले नाही ? आज चतुर्थी आहे, आज चंद्रदर्शन निषिद्ध आहे." चंद्रावली म्हणाली, महाराज 'आज चंद्रदर्शन केल्याने काय होते ? नारद म्हणाले, "निष्कारण कलंक लागतो - आळ येतो." चंद्रावली म्हणाली, "तेच तर मला पाहिजे आहे. माझ्या अन्य सख्यांकडे श्रीकृष्ण पाहतात, हसतात व बोलतात. त्यांच्या घरी जातात, पण या जगात मीच एकटी अशी भाग्यहीन कलंकिता आहे की माझ्याकडे ते पाहतही नाहीत. मी अशी अपेक्षा करते की, सत्य भाग्यात नाही, तर खोटा आळ तरी माझ्यावर यावा की श्रीकृष्ण भगवान माझ्याकडे पाहतात, बोलतात, माझा त्यांच्यांशी सबंध आहे. असा खोटा आळ आला तरी त्यात माझा गौरवच आहे !
मिथ्यापवादवचसाप्यभिमानसिद्धिः ।
असो. येथे सूत्रात जो अपवाद शब्द आहे तो व्याकरण व धर्मशास्त्रातील अर्थाने नसून व्यावहारिक कलंक (दोष) या अर्थाने घ्यावा. भक्ताच्या जीवनात प्रभूंच्या महात्म्यज्ञानास विसरणे हा कलंक आहे, पण असा कलंक गोपिकांच्या जीवनात मुळीच नाही, तर त्यांना पूर्ण महात्म्यज्ञान होते हे वरील विवेचनावरून सिद्ध होते. कित्येक वेळी गोकुळातील गोप-गोपी, नंद-यशोदा याच्या व्यवहारात त्यांना महात्म्यज्ञानाची विस्मृती झाली होती की काय असा भास होतो; पण तो भासच आहे, ती विस्मृती भगवानच मुद्दाम घडवून आणीत होता. असे जर न होईल तर दासबंधनादि लीलाच संभवल्या नसत्या. पण एवढ्याने महात्म्यज्ञानाचा अभाव मानता येत नाही. गोपिका वियोगावस्थेत जे गीत गायल्या त्यात पदोपदी महात्म्य ज्ञानाचा प्रत्यय येतो.

माझ्या अनन्य भक्तांना मी अज्ञानी ठेवीत नाही, मीच त्यांना बुद्धियोग देतो व त्यांच्या हृदयातील अज्ञानांधकार ज्ञान-दीपाने दूर करतो असे श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतेच्या दहाव्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे.

श्रीमद्‌भागवत दशमस्कंध अध्याय ब्याऐंशीमध्ये श्रीकृष्णानी स्वतः गोपिकांना अध्यात्मज्ञान सांगितले.
अध्यात्मशिक्षया गोप्य एवं कृष्णेन शिक्षिता ॥
तदनुस्मरणध्वस्तजीवकोशास्तमध्यगन ॥ भागवत १० - ८२ - ४८

'श्रीकृष्णानी गोपिकांना अध्यात्म शास्त्राचा उपदेश केला, त्या योगाने गोपिकांचा जीवकोश (जीवदशा) नष्ट होऊन त्यांना श्रीकृष्णस्वरूपाची प्राप्ती झाली.' मात्र भक्ताना आत्मैक्यबोध झाला तरी यावदायुष्य प्रेमसुखाचा आस्वाद घेतच राहतात.

कोणी म्हणेल, महात्म्यज्ञान नसले म्हणून काय बिघडले, ज्या वेळी श्रीकृष्ण या अवनीतलावर मूर्तरूपाने (द्वापारयुगात) वास्तव्य करीत होता, तेव्हा तोच भगवान पूर्ण ब्रह्म होताच. त्याच्याशी काम, क्रोध, भय, स्नेह, द्वेष, सौहृद, ऐक्य कोणत्याही स्वरूपाने संबंध आला तरी त्याचा उद्धार होतो असे श्रीशुकाचार्यच म्हणतात.

कामंक्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च ।
नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हि ते ॥ भा. १० - २९ - १५
तमेव परमात्मानं जारंबुद्धयापि संगताः ।
जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबन्धना ॥ भा. १० - २९ - ११
'त्या परमात्म्याशी जारबुद्धीने जरी त्या रत झाल्या तरी त्यांची सर्व बंधने सुटून त्यांनी गुणमय देहाचा त्याग केला म्हणजे त्या मुक्त झाल्या.' देवाशी भिन्न भिन्न भावनेने ज्यांचा संबंध आला ते ते मुक्त झाले. त्यांची नावेही सांगितली आहेत. नारद युधिष्ठिर संवादात नारद म्हणतात -
गोण्यः कामाद्भयात्कंसो द्वेषाच्चैद्यादयो नृपाः ।
संबंधाद्वष्णय स्नेहाद्यूयं भक्त्या वयं विभो ॥ भा. ७ - १ - ३०
गोपिका कामभावनेने, भयाने कंस, द्वेषाने शिशुपालादी राजे, संबंधाने यादव, स्नेहाने तुम्ही पांडव व भक्तीने आम्ही मुक्त झालो.
हीच गोष्ट श्रीकृष्णमुखाने श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीही सांगितली आहे.
हेचि कवणें एकें मिसें । चित्त माझ्या ठायीं प्रवेशें ।
येतुलें हो मग आपैसे । मीचि होणे असे ॥
अगा वरी फोडावयालागी । लोहो मिळो का परिसाचे आंगी ।
कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेचि होईल ॥
पाहे पा वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांची निजे ।
मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हतीचि ॥
ना तरी भयाचेनिमिसें । मातें न पाविजेचि काय कंसे ।
की अखंड वैरवशे । चैद्यादिकी ॥
अगा सोयरेपणेचि पाडवा । माझें सायुज्य यादवा ।
की 'ममत्वे' वसुदेवा । दिकां सकळा ॥
नारदाध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।
इया भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥
तैसाचि गोपिकांशी कामे । तया कंसा भयसंभ्रमे ।
येरा घातकेया मनोधर्मे । शिशुपालादिका ॥
अगा मी येकु लाणीचे खागे । मग येवो ये भलतेनि मार्गे ।
भक्ती का विषये विरागें । अथवा वैरे ॥ ज्ञा. ९. ४६३ - ७०

एकादश स्कंधातही श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
अंधारी गूळ खाता । कडू न लगे तो सर्वथा ।
तेवी नेणोनि माझी सच्छिदानंदता ।
माते सविता मी झाल्या ॥
विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता ।
तेवी जारबुद्धी मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥ - एकनाथी भागवत, १२. २०५ - ६

वरील शंकेचा आशय हा की, महात्म्यज्ञान नसले तरी केवल कामसंबंधाने भक्ती केली तरी उद्धार होतो हे खरे आहे; पण नारदांनी जे प्रेमाचे लक्षण सांगितले आहे व पुढेही ज्या प्रेमाचा विचार केला जाणार आहे त्या दृष्टीने पाहिल्यास महात्म्यज्ञान असणे आवश्यक ठरते. केवल कामसंबंधाने निरतिशय प्रेम प्रकर्ष संभवणार नाही, जसे भय, द्वेष इत्यादीसंबंधाने केवळ कंस शिशुपालादिकांना मोक्ष मिळाला तसा कामसंबंधाने मोक्ष मिळेल, पण प्रेमयोगात मोक्षनिरपेक्षता असते. भगवत्प्रेम प्रकर्ष हाच पुरुषार्थ मानला जातो. पुढे भक्ती हीच शांतिरूप व परमानंदरूप आहे असे नारदांनी म्हटले आहे. श्रीमधुसूदन सरस्वती फार मोठे अद्वैततत्वज्ञानी तसेच भक्तिशास्त्रकार होऊन गेले. त्यांचा भक्तिरसायन नावाचा भक्तिशास्त्रावर अपूर्व विवेचन करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात भक्तीच्या अकरा भूमिका त्यांनी सांगितल्या आहेत. त्यात स्वरूपाधिगति म्हणजे परमात्मस्वरूपाचे यथार्थज्ञान ही सहावी भूमिका मानली आहे व 'प्रेमपराकाष्ठा' ही शेवटची अकरावी भूमिका मानली आहे. गोपिका या अंतिम भूमिकेवर आरूढ झालेल्या होत्या. अतएव त्यांना स्वरूपज्ञान यथार्थरूपाने झाले होते हे वरील विस्तृत विवेचनावरून समजण्यासारखे आहे.

जर त्यांना महात्म्यज्ञान नसेल तर ते वैषयिक प्रेम होईल व ते निकृष्ट समजले जाते, म्हणून या पुढील सूत्रात 'तद्विहीनं जाराणामिव' म्हणजे महात्म्यज्ञानविहीन (रहित) प्रेम जारप्रेमाप्रमाणे निकृष्ट होईल असे नारद म्हणतात. 'जरयति इति जार.' जो धर्माचा नाश करतो, पावित्र्याचा नाश करतो, नीतीचा नाश करतो तो जार. भगवत्प्रेमस्वरूप तर हृदयाला निर्मल पवित्र करणार आहे. 'जाराणा' हे अनेकवचन अनेक घातक गोष्टी येथे एकत्रित आल्याप्रमाणे होईल हे सांगत आहे. सूत्रातील 'इव' हे पदही दृष्टान्त जसाच्या तसा अक्षरशः घेऊ नये हे सुचवीत आहे. जार किंवा जारिणी हे केवल ऐंद्रिय सुखाची अपेक्षा करत असतात. ते सुख मिळत राहील तोपावेतोच त्यांचा समागम असतो, ते न मिळाल्यास परस्परांचा त्याग होतो, श्रीकृष्ण व गोपिकांचे अन्योन्य प्रेम अखंड, अबाधित व अव्यभिचारी होते, जार-प्रेम व वास्तव प्रेमातील भेद पुढील सूत्रामध्ये दाखविला आहे.


GO TOP