नारद भक्तिसूत्रे

नास्त्येव तस्मिंस्तत्सुखसुखित्वम् ॥ २४ ॥


अर्थ : त्यात (जार प्रेमामध्ये व महात्म्यज्ञानावाचून होणार्‍या प्रेमामध्ये) प्रियतमाच्या प्रेमाने-सुखाने सुखी होणे हे नसते.


विवरण : काम व प्रेम यांतील भेद या सूत्राच्याद्वारे स्पष्ट केला जात आहे. कामामध्ये कामी स्त्री किंवा पुरुष स्वतःच्या सुखभोगाकडेच पाहत असतो. जारिणी जारापासून स्वतःला किंवा जार जारिणीपासून आपल्याला सुख व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करीत असतो, व जोपावेतो ते सुख मिळत राहते तोपावेतोच अनुकूल संबंध राहतो. जर दुसर्‍याची सुख देण्याची शक्ती संपली किंवा प्रतिबंध आला तर परस्परांचा संबंधविच्छेद होतो, हे कामाचे स्वरूप आहे. पण प्रेमात स्वसुख-सुखित्वापेक्षा तत्सुख म्हणजे जो प्रेमविषय आहे त्याच्या सुखाने प्रेम करणारा सुखी होत असतो, किंवा स्वतःला सुखी समजत असतो. कामी पुरुष दुसर्‍याला भोग्य समजून स्वतःला भोक्ता समजतो. तसेच त्याचे प्रेम प्रेमविषयाच्या आत्म्यापेक्षा बाह्य स्वरूपावरच असते व त्या बाह्य विषयापासून ऐंद्रियिक सुखाचा भोग होत असतो. त्यासच तो श्रेष्ठत्व देतो. तो स्वतःला अंगी व ज्याच्यावर प्रेम करतो त्याला अंग समजतो. पण खरा प्रेमी स्वतःला अंग व प्रेमविषयाला अंगी समजत असतो; म्हणूनच त्याच्या ठिकाणी तत्सुखसुखित्व हे प्रेमाचे खरे लक्षण लागू पडते. 'उज्ज्वल नीलमणि' या ग्रंथामध्ये एक श्लोक आला आहे.

स्यान्नः सौख्यं यदपि बलवत् गोष्ठमाप्ते मुकुंदे ।
यद्यल्पापि क्षतिरुदयते तस्य मार्गात्कदापि ॥
अप्राप्तेऽस्मिन्यदपि नगरादार्तिरुग्रा भवेन्नः ।
सौख्यं तस्य स्फुरति हृदिचेत्तत्र वासं करोतु ॥

भक्तवर्य उद्धव गोकुळात श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आला, काही दिवस तेथे वास्तव्य करून गोपिकांच्या दिव्य प्रेमाचा अनुभव घेतल्यावर परत जाताना वृषभानुकिशोरी राधेला त्याने संदेश मागितला, तेव्हा ती उद्धवाला म्हणाली, 'हे पाहा, प्रियतम शामसुंदर कदाचित येथे आला तर आम्हा सर्वांना अपार सुख होईल हे खरे. परंतु येथे येण्यामध्ये त्याला किंचितही क्लेश होत असतील तर त्याने येथे न आलेले बरे. त्याच्या न येण्याने आमच्या सर्वांच्या भीषण दुःखाला सीमा राहणार नाही, तरी तेथे वास्तव्य करण्यात त्याला सुख होत असेल तर तो आनंदाने तेथेच राहो. कारण त्याच्या सुखातच आम्ही सुखी होऊ.' हे वाक्य ऐकून भक्तवर्य उद्धवाचे तोंडून 'हे राधे, तुझ्या दिव्य प्रेमाचा विजय असो.' असे उद्‌गार निघाले.

अनेक भक्तांच्या मुखाने एक कथा ऐकण्यात येते ती अशी की, एकदा देवर्षी श्रीनारद द्वारकेत गेले, श्रीकृष्णाची भेट झाली, गोकुळातील काही जुन्या आठवणी निघाल्या, कारण श्रीकृष्णास त्या विसरणे शक्य नव्हते. नारद म्हणाले, 'देवा ! तुम्ही गोकुळवासी गोपिकांचे वारंवार स्मरण करीत असता त्यामुळे श्रीरुक्मिणीदेवी, सत्यभामादि आपल्या स्त्रिया या अप्रसन्न असतात, त्यांना वाटते आमचे श्रीकृष्णावर प्रेम नाही काय ? गोपिकांच्या प्रेमात अशी विशेषता काय आहे ?' यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 'देवर्षे ! तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढे केव्हा तरी देईन, पण सध्या माझ्या मस्तकात फार वेदना होत आहेत, मला फार क्लेश होतात.' नारद म्हणाले, 'मी एखाद्या वैद्याला बोलावून आणतो.'


श्रीकृष्ण - वैद्याला आणणे व्यर्थ आहे. त्याच्या औषधाचा काही उपयोग होणार नाही. नारद - मग कसे करावे ? आपणास बरे वाटण्यासाठी कोणता उपाय करावा ?
श्रीकृष्ण - उपाय आहे, औषध आहे, पण ते कोणी देईल तेव्हा ना ?
नारद - तुम्ही औषधाचे नाव तर सांगा, मी कोठूनही, कोणापासूनही आणीन.
श्रीकृष्ण - नारदऋषे, एखाद्या भक्ताची चरणधूली आणून ती मस्तकाला लावली तरच ह्या वेदना कमी होतील. ते औषध संपादन करण्याकरिता नारद बाहेर पडले. जो जो कोणी भक्त म्हणविणारा भेटेल त्याला नारदांनी श्रीकृष्णाची वेदना सांगावी व औषध मागावे. पण कोण असा सापडेल की आपली चरणधूळ देवाच्या मस्तकाला लावू देईल ? हे पाप करण्यास कोण तयार होईल 'द्वारकेत जाऊन पट्टराण्यांनाही विचारले की, तुम्ही श्रीकृष्णाच्या पूर्ण भक्त आहा, पतिव्रता प्रेमी आहा, त्याच्याकरिता तुम्ही तरी ते औषध द्या. चरणधूली द्या. पण त्या म्हणाल्या, 'हरीहरी आपल्या पायाची माती त्या परमात्म्याच्या कपाळास लावावी, ज्याच्या पायावर ब्रह्मा, शिव, इंद्रादी तेहतीस कोटी देव आपली मस्तके नम्र करतात, त्याच्या मस्तकास ही माती लावली तर कोणत्या नरकात जाऊन पडावे लागेल, नारदा, तुम्हाला विचारावे तरी कसे वाटते ?' शेवटी निराश होऊन नारद परत श्रीकृष्णाकडे आले व सांगितले की, 'देवा ! पुष्कळ भक्त भेटले, पण कोणी पदरज देण्यास तयार नाही.' श्रीकृष्ण म्हणाले, 'नारदा, तुम्ही वृंदावनात गेला होता का ?'

नारद - त्या अडाणी खेडयात राहणार्‍या लोकांकडे जाऊन काय उपयोग ?
श्रीकृष्ण - एक वेळ तेथे जाऊन तर या !
देवर्षी त्या व्रजभूमित पोहोचले. त्यांना पाहताच सर्व गोपिका एकत्र झाल्या व आतुरतेने विचारू लागल्या, 'देवर्षे, तुम्ही कोठून आला ? तुम्ही सर्वत्र संचार करता, अशात कधी द्वारकेला गेला होता का ? आमचा हृदयनाथ जो श्रीकृष्ण त्याचा काही समाचार सांगू शकता काय ?
नारद - अहो, मी थेट द्वारकेहूनच येथे आलो, श्रीकृष्णाच्या मस्तकात फार पीडा होते आहे.
गोपिका - अरेरे, तेथे कोणी उपाय जाणणारा वैद्य नाही काय ?
नारद - वैद्य आहे, पण त्यांनी सांगितलेले औषध उपलब्ध होत नाही.
गोपिका - असे न मिळणारे औषध तरी कोणते आहे ते ?
नारद - कोणी श्रीकृष्णाचा प्रेमी असेल त्याने आपली पदधूली दिली तर त्याची पीडा दूर होईल.
गोपिका - पाहिजे तेवढी धूली घेऊन जा.
सर्वांनी आपल्या पायाची धूळ काढून दिली.

नारद - तुम्ही फार भोळ्या दिसता. आपण काय करतो याची कल्पना तरी तुम्हाला आहे काय ? श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. आपली चरणधूली त्याच्या मस्तकाला लावली तर नरकात जावे लागेल याचा विचार केला काय ?
गोपिका - ह्या सर्व गोष्टीचा विचार नंतर, प्रथम तुम्ही लगेच द्वारकेला ही घेऊन जा, त्याची वेदना दूर होऊ द्या, त्याला सुख झाले तर आम्ही अनंतकाल पावेतो नरकात राहू, तो नरकच आम्हाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला दुःख होत असता आम्ही स्वर्गात राहिलो तर तो स्वर्गही नरकच आहे.'
हे खर्‍या प्रेमाचे स्वरूप आहे. 'प्रेमात औदार्य असते. तेथे सर्वच दान आहे, तृप्ती आहे. 'यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति' असे आरंभीच सूत्र पाचमध्ये म्हटले आहे. प्रेमी मागेल तरी प्रेमच मागेल, देईल तर सर्वस्व देईल.
हृदयात अन्य कामना धारण करणारा भिक्षुक असतो. तो मागतच असतो. आपल्यात तो अभावच अभाव म्हणजे अपूर्णता पाहत असतो. तेथे तृप्ती नसते. प्रेम प्राप्त झाले असता तो प्रेमी सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो, असे चौथ्या सूत्रात म्हटलेच आहे. कामी हा भोग्य वस्तूपासून स्वतःस भिन्न समजतो. प्रेमी त्या प्रेमविषयाला आपला आत्माच समजतो. म्हणून त्याच्याच सुखाने तो सुखी होतो. स्वसुख हे त्याच्या सुखाहून त्याला वेगळे वाटत नसते.


GO TOP