नारद भक्तिसूत्रे

यथा व्रजगोपिकानाम् ॥ २१ ॥


अर्थ : आपल्या भक्तिलक्षणाकरिता नारदमहर्षी उदाहरण देतात - जशी गोकुळातील गोपिकांची (अवस्था होती.)


विवरण : स्वतःचे भक्तिलक्षण नारद सोदाहरण पटवून देतात. कोणतीही महत्त्वाची भावना किंवा ज्ञान हे अमूर्तच असते. त्याच्या अभिव्यक्तीकरिता एखाद्या व्यक्त उदाहरणाची अपेक्षा असते. मूर्तात प्रविष्ट झाल्यावाचून अमूर्त प्रगट होऊ शकत नाही. नारदांनी ज्या भक्तीचे स्वरूप एकोणिसाव्या सूत्रात सांगितले, ती भक्ती उत्कटतेने पूर्ण रूपाने कोठे प्रगट दिसली असेल तर ती नारदांना गोकुळात दिसली. गोकुळातील पुरुष, स्त्रिया, गोप, बालक सर्वच भगवान श्रीकृष्णावर प्रेम ठेवणारेच होते. पण नारदोक्त भक्तिलक्षणाचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच ठिकाणी दिसला म्हणून त्यानी गोपिकांचेच उदाहरण घेतले आहे. नुसते 'गोपिकानाम्' म्हटले असते तर कोणत्याही मोठ्या नगरात गोप गोपिकाची वस्ती असते. पण ते भक्त नसतात. केवळ गोकुळातील व्रज भूमीतील गोपिकाच भक्त होत्या. म्हणून 'व्रजगोपिकानां' म्हटले आहे.

नारदांची सर्वत्र अप्रतिहत गती असल्यामुळे गोकुळात ते जातच होते. कारण त्यांच्या आराध्य दैवताचा गोकुळात अवतार झाला होता. ते वैभव, तेथील सर्वांचेच वात्सल्य, सख्य, मधुरभावातील प्रेम पाहिल्याविना त्यांना समाधान कसे होणार ? व तेथे गेल्यानंतर गोपिकांच्या अलौकिक दिव्य प्रेमाचे स्वरूप पाहावयास मिळालेच असणार, तसेच त्या प्रेमाची परीक्षाही नारदाविना कोण करू शकणार ? तसेच नारदांना अनेक भक्तांची भेट झाली असणार, पण सर्वांतून गोकुळातील गोपिकांची भक्तीच नारदांनी सूत्र एकोणीसमध्ये केलेल्या भक्तिलक्षणाच्या कसोटीस उतरली म्हणूनच गोपिकांचे उदाहरण घेतले आहे.

भक्तशास्त्रात व्रजमहात्म्य फार सांगितले आहे. व्रज शब्दाचे कोशात अनेक अर्थ आहेत. व्रजो गोष्ठाब्द वृन्देषु । पण येथे ज्या गोकुळात श्रीकृष्ण अवतार प्रगट झाला तेच मथुरासमीपवर्ती यमुनातीरावर असलेले गोकुळ व वृंदावन व्रज शब्दाने अभिप्रेत आहेत. अनेक पुराणांतून, पांचरात्रादिकांतून, रुद्रयामल तापनीयादिकांतून व्रजमहात्म्य विस्ताराने वर्णिले आहे. स्कंद पुराण, वैष्णव खंड, भागवत महात्म्यात, शांडिल्य ऋषी व परीक्षित यांचा संवाद आहे, तेथे परीक्षितीने प्रश्न केला की, 'मला व्रजमहात्म्य सांगा.' तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले की, 'हे परीक्षित आता मी तुला ते सांगतो. व्रज शब्दाचा अर्थ व्याप्ती असा आहे. सत्त्व, रज, तम यांहून अतीत जे परब्रह्म तेच व्यापक आहे म्हणून त्यास व्रज म्हणतात. ते सदानंदरूप परमज्योतिर्मय व अविनाशी आहे. जीवनमुक्त पुरुष त्यातच निवास करीत असतात. त्याच परब्रह्मस्वरूप व्रजात नन्दनन्दन भगवान श्रीकृष्णाचा निवास आहे. ते सच्चिदानंदस्वरूप आहेत, ते आप्तकाम आहेत. प्रेमरसात निमग्न रसिक भक्तच त्याचा अनुभव घेतात, काम शब्दाचा अर्थ कामना, अभिलाषा. व्रजामध्ये भगवान श्रीकृष्णाचे वांछित पदार्थ आहेत. तेथे गाई गोपि-बालक व गोपिका, यांच्याशी भगवान श्रीकृष्णाचा नित्य विहार होतो. श्रीकृष्णाची ही रहस्यलीला प्रकृतीहून पर आहे. भगवद्‍लीला दोन प्रकारची आहे. वास्तवी व व्यावहारिक. वास्तवी लीला स्वसंवेद्य आहे. कधी कधी भगवान व्यावहारिकी लीला करतात त्यावेळी भक्तजनाना तिचा अनुभव येतो. अठ्‌ठाविसाव्या द्वापारयुगाच्या शेवटी जेव्हा या रहस्यलीलाचे अधिकारी भक्तजन या लोकात एकत्र होतात, त्या वेळी त्यांच्याकरिता भगवान आपल्या अंतरंग प्रेमी जनाबरोबर अवतार घेतात, तेव्हा प्रेमीजनांबरोबर प्रगट रूपाने व्यावहारिकी लीलाही करीत असतात.' (स्कंद पुराण)
व्रजन्ति गो गोपावासार्थमत्रेति व्रजो गोपावासस्थानम ॥
जेथे गाई गोपाळ वास्तव्याकरिता राहतात, त्या स्थानाला व्रज असे नाव आहे. तरी रूढ अर्थाने पुराणादिकांतून मथुरेच्या परिसरात यमुनेच्या तटावर बृहद्वन नामक एक सुंदर वन होते. या वनात अनेक व्रज म्हणजे गौळवाडे वसले होते. त्यात अगणित गोप राहत असत व त्याच्याजवळ अगणित गोधनही असे. याच पैकी नंदराज नामक एका श्रेष्ठ गोपाने विभूषित अशा व्रजात श्रीकृष्ण अवतार झाला. याच पवित्र भूमीत श्रीकृष्णाच्या बाललीला झाल्या. ज्याचे वर्णन भारतातील सर्व प्रांतातील साधुसंत, हरिभक्तांनी, कवींनी अनेक रूपाने केले आहे. या गोकुलात श्रीकृष्णाच्या वात्सल्यरसाचा स्वाद नंदयशोदा यांनी पूर्ण रूपाने भोगला. सख्यभक्तीचा आनंद गोपाळास श्रीकृष्णाबरोबर यमुनातीरी गाई चारत असता भरपूर भोगावयास मिळाला. गोकुळात सर्वच भक्त होते; पण माधुर्य भक्तीचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच जीवनात झाला होता. म्हणून श्रीनारद महर्षीनी मुद्दाम आवर्जून 'यथा व्रजगोपिकानाम ।' म्हणून सूत्रात त्यांचे उदाहरण दिले आहे. या व्रज भूमीचे वर्णन सर्वच पुराणांतून तंत्रग्रंथांतून केले आहे. गौतमीय तंत्रात श्रीकृष्णमुखातीलच वचन सापडते.
भारते व्रजभूः श्रेष्ठा तत्र वृंदावनं परम् ।
पाच योजनांचा ज्याचा विस्तार आहे असे हे वृंदावन म्हणजे माझा देहच आहे असे भगवान म्हणतात. जेथे भगवान श्रीकृष्णाच्या सर्व वैभवाचा आविष्कार झाला होता अशी ही लीलाभूमी आहे. या व्रजाच्या अंतर्गत यमुनापुलिन, गोवर्धन पर्वत, गव्हरवन, कदम्बखंडिया, नंदग्राम, बरसाना कामवन, चरणाद्रि इत्यादी अनेक स्थाने लीलाभूमीस्वरूप मानली जातात. स्वतः ब्रह्मदेव या भूमीत आपल्याला जन्म प्राप्त व्हावा अशी अपेक्षा करतो. श्रीकृष्णाजवळच ब्रह्मदेवाने म्हटले आहे.

तद्‌भूरिभाग्यमिहजन्मकिमप्यटव्यांयद्‍गोकुलेऽपिकतमाङ्घ्रिरभिषेजोकम्
यज्जीवितं तु निखिलं भगवान्मुकुन्दस्त्वद्यापियत्पदरजः श्रृतिमृग्यमेव ॥ - भागवत स्कंध १० - १४ - ३४.

तसेच नारद ज्या गोपिकांचे उदाहरण देतात त्यांनीही व्रजाचे - गोकुळाचे - वर्णन केले आहे.
जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्‍वदत्र हि ॥ भा. १० - ३१ - १

गोपिका म्हणतात, "हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे." मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात. वास्तविक त्या गोपिका या सामान्य स्त्रिया नव्हेत ज्याचे वर्णन सर्व ऋषिमुनी, देवता, साधुसंत करतात. त्यांना सामान्य म्हणणे कसे शक्य आहे ? गोपी, गोपिका याचा शब्दार्थ खालील प्रमाणे केला आहे.
गाः इंद्रियाणि पान्ति इति गोप्यः ।
ज्या आपल्या इंद्रियांचे (विषयापासून) रक्षण करतात त्या गोपी.
गां दृष्टिं पान्ति रक्षन्ति (दुर्विषय गमन राहित्येनेति) गोप्यः गां म्हणजे दृष्टी (ज्ञान) तिचे दुष्ट विषयाकडे न जाऊ देता ज्या रक्षण करतात त्या गोपी. आणखीही एक चांगला अर्थ संभवतो.
गोभि. इन्द्रियैः पिबति श्रीकृष्णरसमिति गोपी ।
'गो' इंद्रियांनाही म्हणतात, आपल्या इंद्रियांच्या द्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.
'गोपायति' इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.
येथे 'व्रजगोपिकानाम्' असे अनेकवचन आहे. विशेष म्हणजे गोकुळवासी सर्व स्त्रिया, सुना, लेकी, सास्वा सर्वच श्रीकृष्णावर निरतिशय प्रेम करणार्‍या होत्या. पुराणातून त्यांची अनेक नावेही सापडतात. कित्येक पुराणादिकांतून गोपिकांचे पूर्ववृत्तही आले आहे. काही देवता तप करून गोपीरूपाने भगवत्प्रेमाचा अनुभव घेण्याकरिता आल्या होत्या. काही ऋषीही तप करून गोपिकारूपाने अवतरले होते, तसेच श्रुतीही गोपिका रूपाने भगवत्प्रेम सुख भोगण्यास अवतरल्या होत्या.

गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया. ऋषिजा गोपकन्यकाः ।
देवकन्याश्‍च राजेंद्र न मानुष्या कदाचन ॥
श्रीएकनाथ महाराज सांगतात -
त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती । श्रुतीरूपें नव्हें मत्प्राप्ती ।
तै परतल्या म्हणोनि नेति नेति । माझी सुखसंगती न पवेंचि ॥
विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असता मी न भेटे जाण ।
असता वेदोक्त जाण पण । तेणेंही संपूर्ण न भेटे मी ॥
जाणीव नेणीव गेलिया निःशेख । माझे पाविजे निजात्मसुख ।
श्रुति जाणोनि हे निष्टंक । गोकुळी त्या देख सुखार्थ आल्या ॥ - एकनाथी भागवत १२. १६३ - ६५

दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही शोक करू नका.'
द्वापारांते करिष्यामि भवतीनां मनोरथम् ।
श्रद्धया परया भक्त्या व्रजे गोप्यो भविष्यथ ॥
'द्वापारयुगाचे शेवटी श्रीकृष्ण अवतारात तुमचे मनोरथ पूर्ण करीन. तुम्ही परमश्रद्धावान आहात, त्या वेळी तुम्ही गोकुळात गोपी बनाल.'
पद्मपुराणात कथा आहे की, श्रीरामचंद्र दंडकारण्यात आले असता अनेक ऋषी त्यांच्या दर्शनास गेले. रामचंद्राचे अत्यंत सुंदर व लावण्यादिकाने युक्त स्वरूप पाहून त्यांच्या ठिकाणी स्त्रीभाव जागृत झाला. तेव्हा रामचंद्राने त्यांना गोकुळात तुम्ही गोपीरूपाने द्वापारयुगात जन्म घ्याल व माझे सुख भोगाल असा वर दिला. नंतर त्या वराप्रमाणे ते ऋषी स्त्रीभावास प्राप्त झाले, उदाहरणार्थ, उग्रतपानामक ऋषी अग्निहोत्री व तपस्वी दृढव्रती होता. त्याने पंचदशाक्षर मंत्राचा जप अनंत काल केल्यानंतर सुनंदनामक गोपाच्या पोटी सुनंदानामक कन्येच्या रूपाने जन्म घेतला. सत्यतपा नावाचा मुनी वाळलेल्या पानावर राहून दशाक्षर मंत्राचा जप करून दहा कल्पानंतर सुभद्रनामक गोपाची कन्या सुभद्रा नामक गोपी झाला. हरिधामा ऋषी निराहार राहून क्लींबीजयुक्त वीस अक्षरी मंत्राचा जप करून तीन कल्पानंतर सारंग नामक गोपाच्या पोटी रंगवेणी या नावाच्या गोपीच्या रूपाने अवतरला. तसेच जाबाली नावाचा ब्रह्मज्ञानी ऋषी विशाल अरण्यात विहरण करीत असता त्याने एक मोठी विहीर पाहिली. त्या विहिरीच्या पश्चिम तटावर एका वटवृक्षाखाली एक तरुण स्त्री कठोर तपश्चर्या करीत बसलेली त्याला दिसली. तिचा डावा हात आपल्या कमरेवर असून उजव्या हाताने तिने ज्ञानमुद्रा धारण केलेली होती. जाबाली ऋषीने तिला नम्रतेने तू कोण आहेस असे विचारले असता ती म्हणाली,
ब्रह्मविद्याहमतुलां योगींद्रैर्या च मृग्यते ।
साहं हरिपदाम्भोज काम्यया सुचिरं तप ॥
चराम्यस्मिन्वने घोरे ध्यायन्ती पुरुषोत्तमम् ।
ब्रह्मानंदेन पूर्णाहं तेनानंदेन तृप्तधीः ॥
तथापिशून्यमात्मानं मन्ये कृष्णरतिं विना ॥ पद्मपुराण.

ती म्हणाली, 'जिचा मोठमोठे योगी शोध करतात अशी मी ब्रह्मविद्या आहे. कृष्णप्रेमप्राप्तीकरिता या घोर वनामध्ये त्या पुरुषोत्तमाचे ध्यान करीत दीर्घकाल तप करीत आहे. मी ब्रह्मानंदाने पूर्ण आहे, पण श्रीकृष्णप्रेम मला अद्यापि प्राप्त झाले नाही म्हणून स्वतःस शून्य समजत आहे.' हे ऐकून ब्रह्मज्ञानी जाबालीने तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिच्यापासून श्रीकृष्णप्रेमदीक्षा घेतली. एका पायावर उभे राहून कठोर तप केले. त्या कल्पानंतर प्रचंड नावाच्या गोपाचे घरी चित्रगंधा या गोपीच्या रूपाने अवतार घेतला. अशा अनेक गोपिकांच्या पूर्व जन्माच्या कथा सापडतात.

श्रीशुकाचार्यांसारखे महान ज्ञानीही गोपिकांना गुरुस्थानी मानीत होते असे वर्णन आढळते.
एवढा विचार करण्याचे कारण असे की ज्या अर्थी श्रीनारद महर्षींनी गोपिकांचे उदाहरण आपल्या भक्तिलक्षणाकरिता आवर्जून घेतले आहे त्या अर्थी त्याचाही अधिकार तसा श्रेष्ठ असला पाहिजे.
नारदाच्याही आधी ज्यानी भक्तिविषयक सूत्राची रचना केली, ते श्रीशांडिल्य महर्षीही आपल्या भक्तिसूत्रातून गोपिकांचेच उदाहरण घेतात.
अतएव तद्‍भावाद्‍बल्लवीनाम ॥ २ - ५
'भक्ती ही सर्वसाधननिरपेक्ष अनंतफलस्वरूप आहे. यावर उदाहरण बल्लवी म्हणजे गोपिकांचेच आहे.'
या सूत्रावरील आपल्या विस्तृत संस्कृत टीकेत श्रीनारायणतीर्थ यती, ज्यांनी अनेक शास्त्रावरील मोठमोठ्या ग्रंथावर टीका केल्या आहेत व त्यावरून ते मोठे प्रकांड पंडित होते असे दिसून येते, यानी आदि पुराणातील गोपी महात्म्याचे-काही श्लोक उद्‌धृत केले आहेत
त्रैलोक्ये केभवद्भक्ता केत्वां जानन्ति मर्मणि ।
भक्त अर्जुन श्रीकृष्णास त्रैलोक्यात तुमचे भक्त कोण आहेत व कोण तुम्हाला यथार्थ जाणतो असा प्रश्न करतो, त्याचे श्रीकृष्ण त्याला उत्तर देतात-
न मां जानन्ति मुनयो योगिनश्च कथंचन ।
नच रुद्रादयो देवा यथा गोप्यो विदन्ति मां ॥
मन्माहात्म्यं मत्सपर्यां मच्छ्रद्धां मन्मनोगतिम ।
गोप्य एवहि जानन्ति नान्यो जानाति मर्मणि ॥
वेदान्तिनोऽपि मुनयो न मां जानन्ति तत्त्वत ।
यथा ता गोपसुदृशो मम जानन्ति वैभवम् ॥
अहमेव परं रुपं न्यान्ये जानन्ति केचन ।
गोप्य एवहि जानन्ति मद्रुपं मत्क्रियादिकम ॥ आदिपुराण

'श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, मला योगी, मुनी, रूद्रादिदेवदेखील गोपिकाप्रमाणे जाणू शकत नाहीत. माझे महात्म्य, पूजा, श्रद्धा, मनोगत केवळ गोपिकाच जाणतात. गोपिका जशा मला जाणतात तशा स्वरूपात वेदांती, मुनीही मला जाणत नाहीत. माझ्या खर्‍या रूपास व मद्विषयक ज्या क्रिया करावयाच्या त्या केवळ गोपिकाच जाणतात.

भारतातील सर्व प्रांतातील व सर्व भाषांतील भक्तिप्रधान काव्यातून व भक्तिमार्गीय संतांच्या काव्यातून गोपिकांच्या भक्तीचे विशेष वर्णन आढळून येते. महाराष्ट्रातील भागवतधर्मीय सर्व संतांनी आपआपल्या काव्यग्रंथातून, अभंगांतून गोपिकांचे, त्यांच्या भक्तीचे अत्यंत प्रेमपूर्वक रसाळ वर्णन केलेले आढळून येते. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनाची 'ज्ञानियाचा राजा,' 'ज्ञानियाचा शिरोमणि,' 'ज्ञानचक्रवर्ति,' "गुरुमहारावो" अशा अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ विशेषणांनी सर्वच साधुसंत विद्वानपंडितांनीही गौरव गाथा गाइली आहे. ज्ञानेश्वरी अनुभवामृतादिकांतून त्यांनी पूर्णाद्वैताचे तत्त्वज्ञान पटवून दिले आहे. आपल्या अभंगात गोकुळवासी गोपिकांचे वर्णन केले आहे. त्याचे गौळणी, विरहिणी, सौरी अंबुला हे अभंग सर्व या गोपीभावाच्या महात्म्यानेच भरले आहेत. त्याला मोठा अध्यात्माचा, प्रेमाचा साजही त्यांनी चढविला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ परोक्षरूपाने गोपिकांचे वर्णन केले नसून स्वतःच्या वृत्तीमध्ये गोपीभावाचा अंगीकार करून गोपिकांचे जीवन साकार केले आहे. ते म्हणतात,
निवृत्तिप्रसादे मी गोवळिये वो ।
माझा भाव तो विठ्ठलु न्याहाळिये वो ॥
अशी अनेक वचने आहेत. तसेच श्रीनामदेवराय, श्रीएकनाथ महाराज, श्रीतुकाराम महाराज, निळोबाराय यांच्या अभंगाच्या गाथ्यात प्रारंभीच बाळक्रीडा हे प्रकरण आहे व त्यात सर्व कृष्णलीलांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यात प्रामुख्याने गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले आढळते.

श्रीनारद आपल्या भक्तिलक्षणाकरिता ज्या गोपिकांचे उदाहरण घेतात, त्याचे श्रेष्ठत्व आतापावेतो पाहिले. नारदाचे भक्तिलक्षण 'तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता' हे गोपिकांच्या चरित्रात त्यांना पूर्णरूपाने दिसून आले. स्वतः श्रीकृष्ण भगवानच गोपिकांच्या प्रेमनिमग्न अवस्थेचे वर्णन करतात.
तानाविदन्मय्यनुषङ्गः बद्धधिय स्वमात्मानमथस्तथेदम् ।
यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्य प्रविष्टा इव नामरूपे ॥ भा. ११ - १२ - १२

'समाधी अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे योग्याना दृश्य नामरूपाचे भान राहात नाही, महासागरामध्ये प्रविष्ट झालेल्या नद्यांना निराळे अस्तित्व राहात नाही, त्याप्रमाणे प्रेमातिशयाने ज्यांची अंतःकरणे माझ्याच ठिकाणी एकरूप झाली आहेत, अशा गोपींना आपला देह, आपला जीव, पतिपुत्रादिक लोक-परलोक याचीही जाणीव राहिली नव्हती. सर्वांचाच त्यांना पूर्ण विसर पडला होता.' त्यांचा सर्व आचार भगवत्पर कसा झाला होता याचे वर्णन श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या टीकेतून विस्तृत आणि सुंदर केले आहे.
ऐसिया मजलागी आसक्त । माझ्या ठायी अनन्यचित्त ॥
विसरल्या देहसुखें समस्त । अति अनुरक्त मजलागी ॥
करिता दळण कांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण ।
की आदरिल्या दधिमंथन । माझे चरित्रगायन त्या करिती ॥
करितां सडासंमार्जन । गोपिकासी माझे ध्यान ।
माझेनि स्मरणे जाण । परिये देणे बालका ॥
गाईचें दोहन करिता । माझें स्मरणी आसक्तता ।
एवं सर्व कर्मी वर्ततां । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥
करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन ।
आसन भोजन प्राशन । करिता मद्ध्यान तयासी ।
ऐसी अनन्य ठायीच्या ठायी । गोपिकांसी माझी प्रीति पाही ।
त्या वर्तताही देहगेही । माझ्या ठायी विनटल्या ॥
या परी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार ।
विसरल्या पुत्र भ्रतार । निज व्यापार विसरल्या ॥
विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्व दुःख ।
विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासे ॥
जेणें देहे पति-पुत्रांते । आप्त मानिले होतें चित्ते ।
तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनि ॥
विसरल्या इह-लोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख ।
विसरल्या नामरूप देख । माझे ध्यान सुख भोगितां ॥
जेवी का नाना सरिता । आलिया सिधूतें ठाकिता ।
तेथे पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥
तेवी गोपिका अनन्यप्रीती । माझी लाहोनिया प्राप्ती ।
नामरूपाची व्युत्पत्ति । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥ नाथ भागवत अ. १३ - १२

गोकुळामध्ये सहस्रावधी गोपिका होत्या त्याचे यूथ (संघ) होते. त्या प्रत्येकांची काही वैशिष्ट्ये होती. त्या त्या संघाच्या प्रमुख नायिका ज्या त्यांची नावे ही भक्तिशास्त्रीय ग्रंथातून दिली आहेत. गौडीय संप्रदायाचे एक श्रेष्ठ संत श्रीरूपगोस्वामी यांच्या 'उज्ज्वल नीलमणी' नामक भक्तिशास्त्रावरील अपूर्व ग्रंथात गोपिका प्रमुखाच्या काही नावाचा निर्देश केला आहे. राधा, चंद्रावली, विशाखा, ललिता, श्यामा, पद्मा, शैब्या, भद्रिका, तारा, विचित्रा, गोपाली, धनिष्ठा, पालिका, मंगला, विमला, लीला, कृष्णा, विशारदा, तारावली, चकोराक्षी, शंकरी, कुंकुमा, खञ्जनाक्षी, मनोरमा इत्यादी इत्यादी. एकएका यूथामध्ये अनेक गोपिका होत्या. त्यात राधादी आठ या यूथप्रमुख मानल्या आहेत. म्हणून श्रीकृष्णही सांगतात -

ज्यासी झाली माझी संगती । त्या एकदोन सांगो किती ।
शतसहस्त्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥ एकनाथी भागवत १२ - १३

स्वतः श्रीकृष्ण भगवान गोपिकांचा सर्व व्यवहार कृष्णमय कसा बनला होता हे उद्धवास गोकुळास निरोप देऊन पाठविताना सांगतात.
ता मन्मनस्का मत्प्राणा मदर्थे त्यक्त दैहिकाः ।
मामेव दयितं प्रेष्ठ मात्मानं मनसांगताः ॥ भागवत १०. ४६. ४

'हे उद्धवा ! गोपिकांचे मन अखंड सर्व व्यवहार करीत असताही माझ्याच ठिकाणी अनुरक्त आहे. त्यांचे प्राण, त्यांचे जीवनसर्वस्व मीच आहे, माझ्याकरिता त्यांनी देहसंबंधी पति-पुत्र, सोयरे या सर्वांचा त्याग केला आहे, त्यांनी बुद्धीनेही मला आपला प्रियतम, एवढेच नव्हे तर, आपला आत्मा मानला आहे.' खरा भक्त तोच आहे की तो ज्या भज्य अशा प्रभूची भक्ती करतो, त्याला ती प्रिय वाटली पाहिजे, या कसोटीस व्रजवासी गोपिकांची भक्ती पूर्ण रूपाने उतरते म्हणून नारदमहर्षीनी गोपिकांचे उदाहरण आपल्या भक्तीच्या लक्षणाकरिता स्वीकारले आहे. भगवद्‌भक्त श्रीतुकाराम महाराजांनी आपल्या बाळक्रीडा प्रकरणातील अभंगातून गोपिकांचा सर्व व्यवहार कृष्णमय कसा झाला होता याचे वर्णन केले आहे -
ज्यांचे कृष्णी तन-मन झाले रत । गृह-पति-सुत विसरल्या ॥
विष तया झाले धन-मान-जन । वसविती वन एकांती त्या ॥
क्षणभरी होता वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥
त्याचे ध्यानी मनी सर्व भावे हरी । देह काम करी चित्त त्याचे ।
कृष्ण तया ध्यानी, आसनी, शयनी । कृष्ण देखे स्वप्नी कृष्णरूप ॥
तटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरली ॥
विसरल्या तहान, भूक, घरदार । नाही हा विचार असो कोठे ॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णाही चहूंच्या एक झाल्या ॥

आणखीही अनेक अभंगातून गोपिकांच्या भक्तीचे वर्णन केले आढळते. अखिल आचार भगवदर्पित होणे हे जे भक्तीचे नारदप्रोक्त लक्षण आहे ते व्रजवासी गोपिकांच्या ठिकाणी पूर्णत्वाने प्रतीत होते, याबद्दल सर्व संतांची एकवाक्यता आहे. म्हणून सर्वांनी भक्तिमार्गात त्यांना फार श्रेष्ठ स्थान दिले आहे. तसेच नारदांच्या भक्ति-लक्षणाचे दुसरे अंग 'तद्विस्मरणे परम व्याकुलता' हेही गोपिकांच्या ठिकाणी पूर्ण दिसून येते. त्यांना कोणत्याही अवस्थेत श्रीकृष्णाचा विसर पडत नव्हता. मथुरानिवासी कुलाङगना गोपिकांच्या अवस्थेचे वर्णन करितात व त्यांना धन्य समजतात.
या दोहनेऽवहनने मथनोपलेपप्रेंङखेङखनार्भरुदितोक्षणमार्जनादौ ।
गायन्तिचैनमनुरक्तधियोऽश्रु कष्ठयो धन्या व्रजस्त्रिय उरुक्रमचित्तयानाः ॥ - भागवत, १० - ४४ - १५

'ज्या गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करतात, श्रीकृष्णाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त जडलेले आहे त्या धन्य आहेत.'

गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते. रासलीलाप्रसंगी गोपिकांच्या प्रेमाची परीक्षा पाहण्याकरिता श्रीकृष्ण गुप्त झाले तेव्हा त्यांना त्या विरहाने किती दुःख झाले हा सर्व प्रकार भागवत दशमस्कंध अध्याय एकोणतीस ते तेहतीस (ज्यांना रास पंचाध्यायी म्हणतात) यात विस्ताराने आला आहे. त्या वेळी त्यांची अवस्था कशी झाली होती याचे शुकाचार्यानी वर्णन केले आहे -
तन्मनस्कास्तदालापास्तद्विचेष्टास्तदात्मिका. ।
तद्‍गुणानेव गायन्त्यो नात्मागाराणि सस्मरुः ॥ भागवत १० - ३० - ४

'श्रीकृष्णाच्या ठिकाणीच ज्यांचे मन लीन आहे, त्याचीच चर्चा, त्याच्याच लीलांचे अनुकरण करणार्‍या, त्याच्याच ठिकाणी चित्ताची एकात्मकता प्राप्त केलेल्या, त्याच्याच श्रेष्ठ गुणांचे अहर्निश गायन करणार्‍या त्या गोपिकांना आपल्या शरीराची किंवा गृहादिकाची स्मृतीही नव्हती.' श्रीकृष्णवियोगाने त्यांच्या चित्तात किती व्याकुलता झाली होती हे गोपिकांनी जे विरहगीत गायिले आहे, ज्यास भागवतामध्ये गोपीगीत अशी संज्ञा आहे त्यातून स्पष्ट होते. प्रेमाची उत्कटता विरहात प्रतीत होते.

त्या विरहाच्या व्याकुलतेत चिंता, जागर, उद्वेग, कृशता, मलिनागता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह, मृत्यू या दहा अवस्था प्रगट होतात. श्रीशुकाचार्यानी गोपिकांच्या ठिकाणी या सर्वाची उत्कटता किती झाली होती याचे विस्तृत वर्णन या पाच अध्यायात केले आहे. विरहाने व्यापलेल्या गोपी वृक्ष, पशू, पक्ष्यांशीच बोलू लागल्या. त्याच विरही अवस्थेतील श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,
धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥
चांदवो चांदणे चापे वो चंदनु ।
देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी ।
कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥
सुमनांची सेज शीतळ वो निकी ।
ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥

हा आहे. श्रीसंत नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळोबा यांच्याही गाथ्यातून अशा विरहिणी भूमिकेवरील गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले अभंग आहेत. याचे तात्पर्य गोपिकांच्या व्याकुळतेच्या भूमिकेस सर्वानीच महत्त्व दिलेले आहे. भगवान श्रीकृष्णच उद्धवाजवळ त्यांच्या व्याकुळतेचे वर्णन करीत आहेत.

बळिभद्रासमवेत तत्त्वता । अक्रूरें मज मथुरे नेता ।
तै गोपिकासी जे झाली व्यथा । ते सांगता मज न ये ॥
ते त्याची अवस्था सांगता । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता ।
ऐसे देवो सांगता । कंठी बाष्पता दाटली ॥
मज मथुरे जाता देखोनि । आसुवाचा पूर नयनी ।
हृदय फुटे मज लागुनि । प्रेमलोळणी घालिती ॥
पोटातील परमप्रीती । सारिता मागे न सरती ।
धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागी ॥
मजवीण अवघे देखती वोस । माझीच पुनः पुनः पहाती वास ।
थोर घालूनि निश्वास । उकसाबुकसी स्फुंदत ॥
माझेनि वियोगे तत्त्वता । त्यासी माझी तीव्र व्यथा ।
ते व्यथेची अवस्था । बोली सांगता मज न ये ॥ एकनाथी भागवत १२ - १२५ - ३०

भक्तिशास्त्रकारानी तर संयोगातही वियोगोपलालन होत असणे ही भक्तिप्रेमाची पराकाष्ठा सांगितली आहे. श्रीसंतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांनी नारदभक्तिसूत्रावरील आपल्या संस्कृत भाष्यात 'राधासुधानिधी' या काव्यातील एक श्लोक उद्‌धृत केला आहे.
अंकस्थितेऽपि दयिते कमपि प्रलापं हा मोहनेति मधुरं विदधात्यकस्मात् ।
श्यामानुरागमदविव्हलमोहनांगी श्यामामणिर्जयतिकापि निकुञ्जसीम्नि ॥
'एका वेळी राधादेवी ही श्रीकृष्णाच्या अंकावर असताही हे कृष्णा ! हे मोहना ! असा काही प्रलाप अकस्मात करू लागली. याचे कारण शाम जो श्रीकृष्ण तद्विषयक अनुरागमदाने विव्हल झालेले तिचे हृदय हेच होय.

या विव्हलतेत भक्तीची पराकाष्ठा आहे; व हिचा व्रजवासी गोपिकामध्येच पूर्ण आविष्कार झाला होता, म्हणून नारदांनी आपल्या भक्तिलक्षणाकरिता गोपिकांचे उदाहरण घेतले आहे.

यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का ? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल ? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.


GO TOP