नारद भक्तिसूत्रे

नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ॥ १९ ॥


अर्थ : नारदाचे मत, आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला (भगवंताला) अर्पण करणे आणि त्या भगवत्स्वरूपाचे थोडेही विस्मरण झाले असता परमव्याकुल होणे (हीच भक्ती, असे आहे.)


विवरण : महर्षी व्यास, गर्ग, शांडिल्य यांचे मत सांगितल्यावर देवर्षी नारद आपलेही मत प्रदर्शित करीत आहेत. येथे नारद स्वतःच सूत्रकार आहेत. सूत्रग्रंथात अनेकांची नाना मते सांगितल्यानंतर स्वतः सूत्रकार आपलेही मत सांगत असतो, असे अनेक सूत्र ग्रंथावरून दिसून येते. नारदही येथे आपले मत या सूत्राच्या द्वारा प्रदर्शित करीत आहेत.

सूत्रातील 'तु' हे पद पूर्वीच्या अन्य मतापेक्षा नारदांच्या मताचा वेगळेपणा प्रदर्शित करण्याकरिता असावे. म्हणजे पूजाकथादिकांत अनुराग किंवा आत्मरत्यविरोधी गोष्टीबद्दल अनुराग हे लक्षण मानूनही नारद आपले विशेष लक्षण सांगतात. पूजा, कथा इत्यादी भक्तीची अंगे मानली तरी त्यात त्या त्या विशेष कर्माचाच समावेश होतो. नारदाचे लक्षण त्यापेक्षा व्यापक व सर्वाङगपरिपूर्ण असे आहे. जीव या देहाच्या द्वारे या लोकात येतो तेव्हा तो कर्ता बनून येतो, आपल्याच सत्तेने या देहेंद्रियादिकाकडून कर्म घडत असते असा अहंकारही तो बाळगीत असतो. व त्या कर्माच्या फलाची अपेक्षाही करत असतो. अहंकारामुळे त्या कर्मापासून प्राप्त झालेले सुखदुःखादिमूळ, जन्म, मृत्यू, इह, परलोक भोगीत असतो. यासच जीवाचा संसार असे म्हटले जाते. जीवाला असे वाटणे यासच अज्ञान म्हणतात. कारण जीव हा अंश आहे, तो स्वतः सत्ताशून्य आहे. अंश हा अंशीच्या सत्तेवर सर्व करीत असतो. तो परमात्मा अशी जीवाला सत्ता, ज्ञान, आनंद देणारा आहे. श्रीतुकाराम महाराज सांगतात.
चाले हे शरीर कोणाचिये सत्तें । कोण बोलविते हरीविण ॥ १ ॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुकू नका ॥ २ ॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्ता म्हणोनिया ॥ ३ ॥
वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥ ४ ॥
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्व मिदंततम् ॥ गीता १८. ४६

ज्याच्या मुळेच भुतांची सर्व कर्म प्रवृत्ति होते, व ज्याच्या योगे हे सर्व व्याप्त आहे असे गीतेमध्ये स्वतः भगवानच सांगतात, पण अज्ञ जीव सर्व कर्मे मीच करणारा आहे असे मानून संसारात अडकून पडतो. सत्संगतीने जीवाचे खरे स्वरूप ज्याला कळाले आहे, सर्व जगाचा सूत्रचालक जो परमात्मा त्याच्या सत्तेनेच जीवाचेही कर्म होत असते म्हणून जीवाने कर्माहंकार न घेता
करणें कां न करणे । हें आघवे तोचि जाणे ।
विश्व चळतसे जेणे । परमात्मेनि ॥ ज्ञा. १२ ॥
या भावनेने आपली सर्व दैहिक, मानसिक, वाचिक कर्मे भगवद्‌र्पण करण्यातच जीवनाची सार्थकता आहे असे समजावे. खरा भक्त कोणत्याही कर्माचा अहंकार घेत नाही. श्रीभगवान अर्जुनास हेच सांगतात.

यत्करोषि यदश्‍नासि यज्जुहोषि ददासि यत ।
यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ - गीता ९. २७

'हे अर्जुना, तू जे करशील, जे भोगशील, जे हवन करशील, जे दान करशील जे तपाचरण करशील ते सर्व मला समर्पण कर.' या श्लोकावरील व्याख्यानात श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात -
जे जे काही व्यापार करिसी । का भोग हन भोगिसी ।
अथवा यज्ञे याजसी । नाना विधी ॥
ना तरी पात्र विशेषे दाने । का सेवका देसी जीवने ।
तपादि साधने । व्रते करिसी ॥
ते क्रियाजात आघवे । जे जैसे निफजेल स्वभावे ।
ते भावना करोनि करावे । माझिया मोहरा ॥
परि सर्वथा आपुला जीवी । केलियाची शंका काहीचि नुरवी ।
ऐसी धुवोनि कर्मे द्यावी । माझिया हाती ॥ ज्ञा. ९. ३९८. ४०१

गीतेमध्ये अनेक ठिकाणी कर्मसमर्पणाचा विचार सांगितला आहे. कोणास वाटेल अशा रीतीने सर्व कर्मे भगवदर्पण करण्याचा उपयोग काय ? अर्पण करण्याने कर्ता त्या कर्मफळापासून वंचित होतो व ज्याला समर्पण करावयाची तो असंग असल्याने त्यालाही उपयोग नाही. या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णानीच दिले आहे. जीव अहंकाराने मी कर्ता म्हणून कर्मे करतो व त्या कर्मफळात अडकून पडतो. कर्तृत्वमद व कर्मफलास्वाद हाच कर्मबंध आहे. सर्व संसार यामुळेच प्राप्त होतो. तसेच जीव खर्‍या रीतीने या कर्माचा कर्ता नाही.
अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥ गीता ३ - २७
'अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले आहे, तो पुरुष मीच कर्ता असे मानतो.' असे भगवान म्हणतात व यामुळेच तो कर्मबंधात अडकतो. पण ही सर्व कर्मे देवास अर्पण केली की जीवास फळ देऊ शकत नाहीत.
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ - गीता ९. २८
अर्जुना, कर्माची जी शुभाशुभ फले (बंधनकारक) आहेत, त्यापासून तू मुक्त होशील, व माझ्या स्वरूपास प्राप्त होशील.'
मग अग्नि कुडी बीजे घातली । तिथे अंकुर दशे जेवि मुकली ।
तेवी फळतीचि मज अर्पिली । शुभाशुभे ॥ ४०२ ॥
अगा कर्मी जै उरावे । तै तिही सुखदुःखी फळावे ।
आणि तयाते भोगावया यावे । देहा एका ॥ ४०३ ॥
ते उगणिले मज कर्म । तेव्हाचि पुसिले मरण जन्म ।
जन्मासवे श्रम । वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
सूत्रात 'अर्पित' शब्द आहे. दान, दक्षिणा, भीक, देणगी वेगळी व अर्पण वेगळे. दानादिक काही उद्देशाने ज्याला द्यावयाचे त्याला उपयुक्त म्हणून दिले जातात, पण येथे अर्पण करणे म्हणजे ज्याचे त्याला समर्पण करणे होय हे समर्पण कशाचे ? '

अखिलाचारता' या पदाने ते सांगितले आहे. केवळ स्थूल देहाने होणारेच आचार एवढेच नव्हे तर सूक्ष्म देह, मन, बुद्धि प्राणादिकाकडून होणारे व्यवहारही त्या भगवंतालाच समर्पण करणे ही भक्ती होय. कारण मुळात त्याचाही प्रेरक तोच आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनास 'मय्येव मन आधत्स्व मयिबुद्धि निवेशय' (१२ - ८) 'हे अर्जुना, तू आपले मन माझ्या ठिकाणीच ठेव, तसेच बुद्धीही माझ्या ठिकाणीच ठेव' असे अनेक ठिकाणी सांगतात. कोणास वाटेल की शारीरिक व मानसिक इत्यादी सर्व कर्मे समर्पण करणे ही भक्ती कशी होईल ? याचे उत्तर हे की विना प्रेमाच्या समर्पणाची क्रिया खरी होऊ शकत नाही. प्रेमावाचून काही कोणाला दिले तर ते दान, दक्षिणा असे होते व त्यात फलासक्ती असते. जमिनीत बीज पेरले जाते, तेथे अनेक पटीनी लाभाची अपेक्षा असते. दानादिकात ऐहिक, पारत्रिक फलाची कीर्ती, मान इत्यादिकाची अपेक्षा असते. पण प्रेमाने जे समर्पित केले जाते ते निरपेक्ष असते, प्रेमात स्वार्थ नसतो, याचा विशेष विचार पुढे केला जाणार आहे.

केवळ अखिल कर्मे समर्पण करणे एवढयावरच नारदांचे लक्षण पूर्ण होत नाही. याच्यापुढे 'तद्विस्मरणे परम व्याकुलता' म्हणजे भगवद्‌विस्मरण झाले असता चित्तात फार व्याकुलता म्हणजे दुःख निर्माण होते, असे भक्तीचे लक्षण नारद करीत आहेत. वास्तविक जो भक्त सतत सर्व कर्मे भगवंतास समर्पण करीत असतो, त्याला त्याचा विसर कसा पडेल ? तसेच विसर पडला तर परम व्याकुलता कशी होईल व व्याकुलतेत विसर कसा पडेल ? केवल विसराने व्याकुलता का ज्याचा सतत आठव असतो, त्याची भेट न झाली तर व्याकुलता अशी शंका येईल.
भक्ताला सतत आठव असतोच. ध्यानी, मनी देवाविना त्याला काहीच आठवत नसते.
श्रीएकनाथ महाराज सांगतात -
जाग्रती सुषुप्ती स्वप्न । तिही अवस्था होय भजन ।
तेथ अखंड अनुसंधान । निजबोधें पूर्ण ठसावलें अंगी ॥
एकनाथी भागवत, २. ३५५
'विस्मरणात व्याकुळता' म्हटले आहे, म्हणजे स्मरण असतेच असे सिद्ध होते. कारण जेथे विस्मरण असते तेथे विसरलेल्या विषयाबद्दल कोण व्याकुळ होईल ? सामान्य विषयासक्त जीवास देवाचे विस्मरण सहज असतेच, पण तो व्याकुळ होत नाही.
जे प्राणियाकामीं भरू । देहाचिवरी आदरू ।
म्हणोनि पडिला विसरू । आत्मबोधाचा ॥ ज्ञा. ४. २०
असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात. या विसरात देहादिकांचा आठव असतो, या विसरात बहिर्मुखता असते. या विसरात देवाची कल्पनाही नसते. म्हणजे 'महात्म्यज्ञान' नसते. आत्मीयता नसते. हा विसर जीवाला भोगासक्त बनवितो. भोगासक्तीमुळे जी कर्मे तो मनुष्य करील ती फलासक्तिपूर्वकच करील. त्यातही निषिद्धाकडेच अधिक प्रवृत्ति होत असते, जेथे फलासक्तिपूर्वक कर्मे होतात, तेथे सर्व कर्मे देवाला समर्पण करण्याची भावना कशी असू शकेल ?

विसराचे दोन प्रकार कल्पावेत, एक स्वाभाविक व एक नैमित्तिक. वरील अज्ञानमूलक जो विसर तो स्वाभाविक आहे. त्या विसरात जीवाची सर्व प्रकारे हानीच आहे.
विसरली तया थोर झाली हानि । पचतील खाणी चौर्‍यांशीच्या ॥ १ ॥ तुकाराममहाराज.
तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हानि ।
गेली विसरूनि । देवा म्हणता मी माझें ॥ १ ॥
असे त्या विसरापासून होणार्‍या हानीचे स्वरूप तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. अशा विसरात व्याकुलता होणे शक्यच नाही. कारण जीवन भ्रांतीने भरलेले असते. हा विसर म्हणजे आठवसापेक्ष नसतो, तर हा अखंड विसर म्हणजे अज्ञान होय. हा स्वाभाविक अनादिकालीन असतो. या विसराबद्दल संसारासक्तांना कधीच खेद होत नाही. किंबहुना हा विसर असतो, म्हणूनच आसक्तिपूर्वक संसार होत असतो. अशा चित्तात फार व्याकुलता म्हणजे दुःख निर्माण होते, असे भक्तीचे लक्षण नारद करीत आहेत. वास्तविक जो भक्त सतत सर्व कर्मे भगवंतास समर्पण करीत असतो. तिकडे दुर्लक्षच केले जाते.

'भजन नावडे श्रवण । धावे विषय अवलोकून ॥ २ ॥ (तु.) त्या विसराबद्दल मुळीच खंत वाटत नाही.

या सूत्रात जे 'विस्मरण' पद आहे त्याचा विशेष अर्थ घेतला पाहिजे. तो नैमित्तिक विसर म्हणावा लागेल. भगवद्‍भक्ताला सहसा विसर पडू नये व पडणारही नाही. पण ज्या अर्थी 'तद्‌विस्मरणे परम व्याकुलता' असे नारद म्हणतात, त्या अर्थी तो विसर गृहीत धरावा लागतो. श्रीतुकाराम महाराज देवाजवळच म्हणतात,
एकविध वृत्ति न राहे अंतरी । स्मरणीच हरी विस्मृति हे ॥
अनेक अभंगांतून त्यांनी देवाची करुणा भाकली आहे.
ध्यानी रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडो नेदी ॥
तुझा विसर नको माझिया हो जीवा । क्षण एक केशवा माय बापा ॥
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥

अशी पुष्कळ वचने सापडतात. देवाचा आठव होणे, देवाचे नाम मुखास येणे, देवाची भक्ती घडणे हे फार दुर्लभ आहे असे सांगितले जाते. श्रीकृष्ण भगवान उद्धवाम सांगतात
ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति का न करिती ।
देवो म्हणे भाग्येवीण माझी भक्ति । न घडे निश्चिती उद्धवा ॥ - एकनाथ भागवत ११. १५५०

अशा भाग्यवशात भगवत्स्मरणाकडे चित्तवृत्ती प्रवृत्त झाली, सर्व कर्मे त्यालाच अर्पण केली गेली, अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पूर्व संस्काराने, सदोष प्रारब्धाने, क्वचित निमित्तवशात विकाराचा अल्पही प्रादुर्भाव झाल्यामुळे विस्मृती होणे शक्य असते, अल्पही काळ ती विस्मृती झाली तरी सत्संस्काराने तत्काल पुन्हा तो भक्त स्मृतीवर येतो व आल्यानंतर क्षणैक का होईना जी विस्मृती झाली होती त्याबद्दल तो भक्त अतिशय व्याकुल होत असतो. भक्तवर्य श्रीनामदेव महाराज म्हणतात-
तुझिये चरणीचे तुटता अनुसंधान ।
जाईल माझा प्राण तत्क्षणी ॥ १ ॥
तुका म्हणे हानि । या वेगळी मना नाणी ॥
सा हानिस्तन्महच्छिद्रं सा चांधजडमूढता ।
यन्मुर्हूर्तक्षणं वाऽपि वासुदेवो न चिन्त्यते ॥
एक भक्त म्हणतो 'एक क्षण मुहूर्त श्रीवासुदेव चिंतनाविना रिकामा जाणे ही मोठी हानी आहे, ती जीवनातील मोठी हानी आहे, जीवनातील मोठे व्यंग आहे. ती अवस्था म्हणजे अंधपणा जडमूढपणाच होय.'

भक्ताला जसा भगवद्वियोग सहन होत नाही तसा विसरही खपत नाही. विस्मृती हाही एक मानसिक वियोगाचाच प्रकार आहे असे म्हटले तर काही बाधक नाही. तात्पर्य, मानापमान, लाभ, हानि, सुख-दुःख इत्यादिकांची पर्वा न करिता कर्तृत्वाभिमान व फलेच्छा टाकून, शरीर व शरीरसंबंधी असतील त्यांचे ठिकाणी अहंता, ममतेचा त्याग करून एकमात्र भगवंताला परमप्रियतम मानून त्यासच परमआश्रय, परमगती, परमसुहृद समजून अनन्य भावाने अत्यंत श्रद्धायुक्त होऊन प्रेमपूर्वक तैलधारेप्रमाणे त्याच्याच नामगुण प्रभाव व स्वरूपाचे चिंतन करीत परमानंदात निमग्न राहाणे व केवल त्या प्रियतमाकरिता त्याच्या इच्छेनुसार त्याच्याच करिता निःस्वार्थ भावाने समस्त दैहिक, वाचिक, मानसिक कर्माचे आचरण करीत राहाणे, काही प्रतिकूल निमित्ताने क्षणभरही त्याचे विस्मरण होईल तर पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीपेक्षाही अधिक व्याकुलता उत्पन्न होणे हीच भक्ती असे नारद महर्षी आपले स्वतःचे मत सांगतात.


GO TOP