नारद भक्तिसूत्रे

आत्मरत्यविरोधेनेति शांडिल्यः ॥ १८ ॥


अर्थ : आत्मरतीला अविरोधी (विरोधी नसलेल्या) विषयात अनुराग म्हणजे भक्ती, असे शांडिल्याचे भक्तिलक्षण आहे.


विवरण : महर्षी व्यास व गर्ग यांनी केलेले भक्तिलक्षण सांगून श्रीनारद आता शांडिल्याचे भक्तिलक्षण सांगतात. शांडिल्य या नावाचेही अनेक पुरुष होऊन गेले असे दिसते. उपनिषदातील शांडिल्यविद्येचा उल्लेख ब्रह्मसूत्र भाष्यात श्रीशंकराचार्यांनी केला आहे. लाटयायन श्रौतसूत्रे व शतपथ ब्राह्मणात शांडिल्य नावाचा उल्लेख आहे. महाभारत अनुशासनपर्वातही एका शांडिल्याचा उल्लेख सापडतो. पण वरील सूत्रात ज्याचा उल्लेख केला आहे, ते शांडिल्य वेगळे असावेत असे वाटते. बृहदारण्य उपनिषदाच्या चौथ्या अध्यायात वंशनिरूपक ब्राह्मणात 'कौण्डिन्यात कौण्डिन्य । शांण्डिल्यात शांण्डिल्य ।' अशा रूपाने शांडिल्याचे नाव सापडते. तसेंच शांडिल्यसंहिताप्रणेता ललितादेवीचा व व्यासाचा शिष्य मानला जाणारा एक शांडिल्यही आढळतो.' शांडिल्य सर्वधर्मज्ञो नंदादीना पुरोहितः ।' 'सर्व धर्म जाणणारा शांडिल्य हा नंदादिकाचा पुरोहित आहे,' असे स्कंदपुराणात म्हटले आहे. पांचरात्रमतामध्ये शांडिल्याचा ग्रंथकर्ता या नावाने उल्लेख सापडतो, भक्तिसूत्रप्रणेता शांडिल्य हा पांचरात्र मतानुसारी आहे असे काही अर्वाचीन विद्वानांचे मत आहे. पण पांचरात्रमत द्वैतसिद्धान्त सांगणारे आहे. शांडिल्याची भक्तिसूत्रे ही तत्त्वज्ञानात अद्वैतमतास प्राधान्य देणारी आहेत. असे शांडिल्यसूत्रावर भक्तिचंद्रिका नावाची जी विस्तृत टीका नारायणतीर्थनामक महान विद्वान अशा पंडिताने लिहिली आहे, तिच्यात सूत्रांतर्गत प्रमाणावरून सिद्ध केले आहे. जयानामक संहितेचा कर्ता एक शांडिल्य आहे असे म्हटले जाते, पण तो नारदानंतर व नारदाचा शिष्य या रूपाने प्रसिद्ध आहे. शांडिल्यसंहिता नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. नारद आपल्या भक्तिसूत्रात ज्याचा आदराने उल्लेख करतात, तो शांडिल्य नारदाच्या पूर्वीचा, श्रीमद्‍भागवत व गीता याच्यानंतरचा असावा असे वाटते. कारण शांडिल्यसूत्रात भागवत व गीता याचा उल्लेख सापडतो.

असे अनेक शांडिल्य होऊन गेले असता भक्तिसूत्रकार शांडिल्य यापैकी कोणता घ्यावा ? कित्येकानी बृहदारण्यामध्ये ज्या शांडिल्य वंशाच्या मूळ पुरुषाचा निर्देश केला आहे; तेच सूत्रे करणारे असावेत असे विधान केले आहे. या विषयात एकमत नाही.

शांडिल्यभक्तिसूत्रे संख्येने १०२ असून ती चार अध्यायात व प्रत्येक अध्यायात दोन पाद अशी विभागली आहेत. त्यावर स्वप्नेश्वर भाष्य संस्कृतात प्रसिद्ध असून इतरही एकदोन टीका उपलब्ध आहेत. ती सूत्रे नारदीय भक्तिसूत्राहून पूर्वीची आहेत. नारदांनी या सूत्रात शांडिल्यमत सांगितले आहे, ते शांडिल्य भक्तिसूत्रापैकी एखाद्या सूत्राधारे सांगितले नसून त्याच्या सर्व भक्तिसूत्राचा निष्कर्ष म्हणून ते मत सांगितले असावे असे वाटते. आत्मरतीला विरोधी नसणार्‍या विषयात अनुराग म्हणजे भक्ती असे शांडिल्यमत नारद सांगतात. म्हणजे आत्मविषयक रतीही अनुरागस्वरूपच आहे. कारण आत्मा परमप्रेमास्पद आहे.

मी नसावे असे कोणालाही वाटत नाही, तर अखंड असावे असेच सर्वांस वाटते. याचे कारण निरतिशय प्रेमविषय आत्माच आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराज सांगतात,
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जे प्रियोत्तमा ॥
ते दुजे नोहे की आत्मा । ऐसेचि जाणावे । - ज्ञा १८. १३४६.
असे जरी आहे म्हणजे सर्वांना आत्मा निरतिशय प्रेमविषय म्हणून वाटतो, तरी त्या भावनेत अज्ञान मिसळलेले असते. शुद्ध आत्मबोध नसतो, म्हणून ती अवस्था आत्मरती म्हटली जाणार नाही. सर्वाना आत्मा म्हणून देहच प्रिय वाटतो.
तै अज्ञान एक रूढे । तेणें कोहं विकल्पाचे माडे ।
मग विवरूनि कीजे फुडे । देहो मी ऐसे ॥ - ज्ञा. १५. ३४२.

'देहखंडानाम आत्मा' अशीच सर्वांची प्रवृत्ती असते, म्हणूनच देहाला अनुकूल वाटणारे विषय आवडतात व त्यापासूनच सुख होते व प्रतिकूल विषयापासून दुःख होते असे मानीत असतो. तसेच या देहासंबंधानेच आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व-भोक्तृत्वादि धर्माचा आरोप केला जातो व देहाचे जन्ममरण आत्म्याच्या ठिकाणी आरोपित करतो म्हणजे आत्म्याच्या आनंदास अज्ञानाचे आवरण पडल्याने व अज्ञानाच्या विक्षेपशक्तीने विषयभोगच सत्य व प्रिय वाटल्याने विषयातच सुख मानून ते संपादन करण्याचा योग्य-अयोग्य प्रयत्न करीत असतो. अशा बहिर्मुखतेमुळे तो विषयरत अथवा संसाररत म्हणविला जातो. येथे 'आत्मरती' म्हटले आहे. आता आत्मरती म्हणजे पाहू. सच्छास्त्रश्रवणाने, सत्संगतीने, विवेक-वैराग्यादी साधनांनी विषयाचे दुःखरूपत्व देहाचे व देहधर्मादिकांचे मिथ्यात्व ज्यास पटले आहे व देहादिक दृश्य आहेत व आत्मा त्याहून भिन्न-द्रष्टा साक्षी आहे असे ज्याला कळते, त्यालाच आत्म्याचे यथार्थ ज्ञान होते. आत्मा सत्यज्ञानआनंदरूप, तसाच माझ्याहून भिन्न नाही, कारण परमप्रेमास्पंदत्वाचा अनुभव मला माझ्या आत्म्यात येतो. म्हणून अन्य अनात्मे असत, जड दुःखरूप असल्यामुळे काही काळ ते खरे व सुखरूप वाटले तरी अनादी अज्ञानामुळेच वाटतात, म्हणून खर्‍या रीतीने ते प्रेमाचे विषय नाहीत. अशा रूपाने ज्याच्या बहिर्मुखतेची बाधा होऊन जो अंतर्मुख होतो, आत्म्याला आनंदरूप परमप्रेमास्पंदत्वाने जाणतो त्याच्या त्या अवस्थेस 'आत्मरती' म्हणतात. अशा पुरुषाचे श्रीमद्‍भगवद्‌गीतेमध्ये वर्णन केले आहे -
यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्च मानव ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥ गीता ३. १७

'जो पुरुष आत्म्याच्याच ठिकाणी रत असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याला काही कार्य राहत नाही.' जो आत्मरत, आत्मतृप्त वा आत्मसंतुष्ट नसतो त्याला रति, तृप्ती, संतुष्टीकरिता इंद्रियद्वारे विषयापावेतो जावे लागते. पण सुख हा विषयधर्म नसल्यामुळे त्याला तृप्ती होत नाही. असंतुष्टताच राहते. पण खरा ज्ञानी भक्त हा आत्मरती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट असतो. श्री ज्ञानेश्वरमहाराज याचे स्वरूप सांगतात -
जया आपणपे सांडूनि कही । इंद्रियग्रामावरी येणे नाही ।
तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥
सहजे स्वसुखाचेनि अपारे । सुरवाडे अंतरे ।
रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ॥ १०६ ॥
सांगे कुमूद दळाचेनि ताटे । जो जेविला चंद्रकिरणें चोखटे ।
तो चकोर काई वाळवंटे । चुबितु आहे ॥ १०७ ॥
तैसे आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपाचि फावले ।
तया विषय सहज सांडवले । सांगो काई ॥ १०८ ॥
जयाते बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।
अंतरी सुख । एक आथि ॥ १३० ॥
परि तें वेगळेपणे भोगिजे । जैसे पक्षिये फळ चुंबिजे ।
तैसे नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥ १३१ ॥
भोगी अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अचळु लोटी ।
मग सुखेसि घे आठी । गाढेपणे ॥ १३२ ॥
तिये आलिंगनमेळी । होय आपेआप कवळी ।
तेथ जळ जैसे जळी । वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
का आकाशी वायु हारपे । तेथ दोनी हें भाष लोपे ।
तैसे सुखचि जरे स्वरूपे । सुरती तिये ॥ १३४ ॥ ज्ञानेश्वरी, ५. १०५ - १३४

आत्मरतीचे स्वरूप लक्षात येण्याकरिता एवढा विचार केला आहे. ही आत्मरती म्हणजे भगवद्‌तंद्रीच आहे, कारण आत्मा हा परमात्मस्वरूप आहे, वेगळा नाही.

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित ॥ - गीता १० - २०
श्रीकृष्ण म्हणतात, 'अर्जुना, सर्व प्राणिमात्राच्या अंतःकरणात राहणारा आत्मा मीच आहे' भक्तही भगवानच आपला आत्मा आहे असे मानतो व त्याच्याच ठिकाणी प्रेम ठेवतो हीच खरी आत्मरती होय.

अनादिकालीन देहवासनादिकाच्या संबंधाने कामादि विकार कधी कधी डोके वर काढीत असतात. काही प्रतिबंधही निर्माण होतात.
बहुजन्म दृढाभ्यासाद्देहादिष्वात्मधीः क्षणात ।
पुनः पुनरुदेत्येव जगत्सत्यत्वधीरपि ॥ १०३ ॥ - पंचदशी, प्र. ७
असे विद्यारण्यानी पंचदशीत म्हटले आहे. याचा अर्थ अनेक जन्माच्या दृढ संस्काराने, श्रवणादिकाने देहबुद्धीचा निरास झाला तरी ती पुन पुन्हा निर्माण होते. तशीच जगाची सत्यत्वबुद्धीही डोके वर काढते. देहात्मबुद्धी व जगत्सत्यत्वबुद्धी याच आत्मरतीला विरोधी आहेत. अज्ञानी पुरुषाचा यावर अनुराग असतो, पण तो घात करणारा आहे, आत्मरतीला विरोधी आहे. म्हणजे भगवद्विमुख करणारा आहे याचा परिणाम मागे सूत्र सहामध्ये भगवत्प्रेमाचे फल 'आत्मारामोभवति' असे सांगितले. त्या फलापासून च्युत करणारा आहे, नव्हे जीवनाचा सर्व नाश करणारा आहे म्हणून म्हणतात की,आत्मरतीला अविरोधी असलेल्या विषयात अनुराग म्हणजे भक्ती.

आता अविरोधी कोणत्या गोष्टी आहेत त्याचाही विचार करणे अवश्य आहे. मागे व्यास व गर्गाचार्यांचे मत सांगितले की, पूजादिकात व कथादिकात अनुराग असणे म्हणजे भक्ति. शांडिल्याचे मत असे असावे की, अनुराग पूजा वा कथादिकात असो, तो आत्मरतीचा विरोध करणारा न झाला पाहिजे, म्हणजे पूजादि करीत असता पूजादिकाच्या ठिकाणी जे बाह्य अवडंबर, जी सजावट, जी शोभा, पुष्पधूपादिकांचा सुगंध तसेच कथादिकात मृदुमंजुल सुस्वर गायन, नर्तनादी क्रिया होतात, तिकडे लक्ष जाणे शक्य आहे. त्यावेळी त्या भक्तास जो आनंदरस प्राप्त होतो, तो त्या बाह्यसामग्रीपासून न होता अंतर्यामिचाच तो आनंद, तो रस आहे, ही पूजा त्या हृदयस्थाचीच आहे, तोच प्रेमस्वरूप आहे, हे त्याचेच त्याला समर्पण होत आहे, तोच करीत आहे व करून घेत आहे, अशी सद्‍भावना हीच आत्मरती, आत्मप्रीती होय. तेथे मीही पूजा करीत आहे व तो घेत आहे. मी कथा करीत आहे, तो ऐकत आहे, असा द्विधाभाव असेल तर ती परमात्मरती परमप्रेम म्हटले जाणार नाही. कारण मी तो या भावनेत जो अहंकार, जे द्वैत आहे ते या आत्मरतीस विरोधी आहे. तुकाराममहाराज म्हणतात -
तुका म्हणे देवा अवघे तुझें नाम । धुपदीप रामकृष्ण हरि ॥
तुका प्रेमे नाचे गाय । गाणियात विरुनि जाय ॥

अहंकार आला की, त्याच्या पोटात आत्मरतीस विरोधी आणखीही काही विकार निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणून आत्मरती सतत स्थिर राहिली पाहिजे. याकरिता शास्त्रात -
तच्चितनं तत्कथनं अन्योन्य तत्प्रबोधनं ।
एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यास विदुर्बुधाः ॥ - १३. ८३, पंचदशी.
'ह्या आत्मस्वरूपाचे चिंतन, कथन, परस्पराना त्याचेच विशेष ज्ञान करून देणे असे जे तदेकपरत्व यासच ज्ञाते ब्रह्माभ्यास म्हणतात.' श्रीज्ञानेश्वरमहाराजानीही सांगितले आहे -
बुद्धिनिश्चये आत्मज्ञान । ब्रह्मरूपभावी आपणा आपण ।
ब्रह्मनिष्ठाराखे पूर्ण । तत्परायण अहर्निशी ॥ - ज्ञा. ५. ८७.

अशी वृत्तीची सतत जागृती राहिली तर इतर कोणताही विकार आत्मरतीस विरोध करू शकणार नाही. म्हणून ज्या ज्या ध्यान, जप, धारणा, परमात्मस्वरूपाच्या, परमप्रेमास्पंदत्वाचे सतत अनुसंधान इत्यादी गोष्टी आहेत त्याच आत्मरतीस अविरोधी आहेत. इतकेच काय, या गोष्टीवरूनच खर्‍या आत्मरतीची कल्पना येऊ शकते. म्हणून या अंतरंगसाधनावरही अनुराग असावा, असे शांडिल्यऋषीचे मत आहे.

श्री शंकराचार्यानीही एके ठिकाणी भक्तीसंबंधी असेच म्हटले आहे.
मोक्षकारणसामग्र्‍या भक्तिरेव गरीयसी ।
स्वरूपानुसंधानं भक्तिरित्याभिधीयते ॥
'मोक्षाला कारण असणार्‍या साधनामध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे व अखंड आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवणे हीच भक्ती होय.'


GO TOP