नारद भक्तिसूत्रे
तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदात् ॥ १५ ॥
अर्थ - आता नाना मतानुसार त्या भक्तीची लक्षणे सांगितली जातात.
विवरण - कोणतीही गोष्ट लक्षणांनी सिद्ध झाली पाहिजे असा शास्त्रकारांचा दंडक आहे. लक्षणाविना लक्ष्य स्वरूपाचा बोध यथार्थ रूपाने होऊ शकत नाही. येथे भक्ती हे लक्ष्य आहे. कोणी म्हणेल भक्तीचे लक्षण तर पूर्वी सूत्र दोनमध्ये 'परमप्रेमरूपा' असे सांगितलेच आहे. पुन्हा लक्षण सांगण्याचे प्रयोजन काय ? लक्षण हे सामान्य; विशेष अशा दोन रूपाने कोठे कोठे सांगितले जाते. 'परमप्रेमरूपा' हे भक्तीचे सर्वसामान्य लक्षण आहे. पण तेच प्रेम अभिव्यक्त होण्यास कोणती तरी क्रिया कारण होत असते. त्या क्रियेच्या मागे काही विशिष्ट भावना असते. म्हणूनच भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचे विविध प्रकार सांगितले गेले आहेत. श्रीमद्भागवतामध्ये प्रल्हादचरित्रात नवविविधा भक्तीचा निर्देश आहे, तर कोठे आणखीही अनेक प्रकार ग्रंथांतरी वर्णिले आहेत.
भक्तिरसामृतसिंधुनामक भक्तिशास्त्रावरील ग्रंथात साधनभक्तीची चौसष्ट अंगे सांगितली आहेत. प्रेम हे एकच असले तरी त्याची अभिव्यक्ती अनेक अंगांनी होत असते. कोणी कोणी भक्त आपआपल्या आवडीनुसार एखाद्या अंगालाच महत्त्व देऊन ह्या क्रियेचाच प्रामुख्याने भक्तीमध्ये समावेश करतो. अनेक भक्तश्रेष्ठ, संतसत्पुरुष, ऋषिमुनी, भक्त्याचार्य होऊन गेले, त्यापैकी कोणी कोणी एका एका अंगाला महत्त्व दिले व त्याच क्रियेला प्रामुख्याने भक्तिस्वरूपात स्थान दिले आहे, अशा काही श्रेष्ठ भक्तवर्यांचा निर्देश करून त्यांनी कोणते अंग महत्त्वाचे मानले व त्याच क्रियेस भक्ती असे मानले त्याचा निर्देश पुढील सूत्रातून केला आहे. एकएका अंगाला महत्त्व दिले गेले म्हणून त्यात नाना मतभेद निर्माण झाले. हे मतभेद विरोधातून निर्माण झाले नाहीत, तर ज्याचा पुढे नामनिर्देश केला आहे, त्याच्या विशिष्ट भावनातून निर्माण झाले आहेत. कारण भक्तीचे मूळ रूप जे प्रेम त्यात कोणाचाही मतभेद नाही. वास्तविक खर्या प्रेमाचे स्वरूप अनिर्वचनीय आहे असे पुढे सूत्र एक्कावन्नमध्ये सांगितले आहे. असे मानले तर सामान्य जनास भक्तिप्रेमाचे यत्किंचितही ज्ञान होणार नाही. तसेच प्रेमाची अभिव्यक्ती कोणकोणत्या रूपाने होते हे न कळल्यामुळे सामान्य भाविकांचा भक्तिप्रेमाचा मार्ग कुंठित होण्याचाही संभव आहे. तसेच अनेक प्रेमी भक्त होऊन गेले, त्यानी विशिष्ट अंगाने भक्ती केल्याची उदाहरणे आहेत. श्रवण कीर्तनादी भक्ती कोणी कोणी केली त्याची नावे पुराणादिकातूनही आढळून येतात. जसे -
श्रीविष्णो श्रवणे परीक्षितभवद्वैयासकि कीर्तने ।
प्रल्हाद स्मरणे तदङ्घ्रिभजने लक्ष्मी पृथु पूजने ।
अक्रूरस्त्वभिवन्दने च हनुमान दास्ये च सख्येऽर्जून ।
सर्वस्वाऽऽत्मनिवेदने बलिरभूत् कैवल्यमेषा समम् ॥
'श्रीविष्णूच्या कथा श्रवणभक्ती परीक्षिताने केली. कीर्तन शुकाचार्याने, स्मरण प्रल्हादाने, चरणसेवा लक्ष्मीने, पूजाभक्ती पृथूने, वंदन अक्रूराने, दास्य हनुमंताने, सख्यभक्ती अर्जुनाने व आत्मनिवेदनभक्ती बळीने केली, पण या सर्वांना कैवल्याची प्राप्ती मात्र सारखीच.'
वरीलप्रमाणे अनेक अंगाने भक्ती होत असते, त्यात कित्येक भक्त म्हणविणार्याच्या काही विवक्षित स्वतंत्र भावना असतात, त्या भावनेप्रमाणेच तो तो त्या त्या क्रियांना भक्ती म्हणत असतो. म्हणून या विषयात नाना मते निर्माण झाली आहेत. या मतांचे प्रतिपादन करणारे सर्व मोठे भक्त पदवीप्राप्त झालेले पुरुषच आहेत. ते फार श्रेष्ठ पुरुष होते, म्हणून त्याच्या त्याच्या मताप्रमाणे त्यानी त्यानी प्रतिपादिलेल्या भक्तिस्वरूपाचा नारदऋषींनी अनुवाद केला आहे. श्रीनारदऋषींनीही ही भक्ती मूळ एकरूपा असूनही अकरा प्रकारची होते असे सूत्र त्र्याऐंशी मध्ये सांगितले आहे. नाना मतभेदाने त्या निश्चयदृढ झाल्यानंतर केलेल्या भक्तीची जी लक्षणे होतात ती सांगितली जातात, अशी या सूत्रात नारदमहर्षी प्रतिज्ञा करीत आहेत.
या सूत्राच्या अर्थाबद्दलदेखील मतभेद आहे. 'तल्लक्षणानि वाच्यन्ते' असे येथे म्हटले आहे. पण ती लक्षणे कुणाची, वर सांगितल्याप्रमाणे ती भक्तीची आहेत असे बहुसंख्य टीकाकारानी मानले आहे. पण काहीच्या मताने भक्तीचे लक्षण 'सातु अस्मिन् परमप्रेमरूपा' आणि 'अमृतस्वरूपा च' या दोन सूत्रामध्ये सांगितले आहे. या सूत्रामध्ये ज्याच्या लक्षणांचा उल्लेख केला आहे, ती लक्षणे प्रत्यक्ष भक्तीची नाहीत तर 'निश्चयदार्ढ्यां'ची म्हणजे भक्ती अंतःकरणात दृढ झाल्याची आहेत. पुढे जी वेगवेगळ्या आचार्यांची मते सांगितली आहेत ती मते अंतःकरणातील भक्तीचे व्यक्त स्वरूप सांगणारी आहेत. सूत्राचा हा अर्थही स्वीकारण्यासारखा आहे.
या पुढील सूत्रात प्रथमतः श्रीव्यासमहर्षींचे मत सांगतात.
GO TOP
|