नारद भक्तिसूत्रे

पूजादिष्वनुराग इति पाराशर्यः ॥ १६ ॥


अर्थ : पराशरऋषीचे पुत्र श्रीव्यास महर्षी यांच्या मताप्रमाणे भगवंताच्या पूजा (व्रते पर्व महोत्सव) आदी विषयात अनुराग (प्रेम) म्हणजे भक्ती होय.


विवरण : श्रीनारदमहर्षी प्रथम पराशरसुत व्यासमहर्षींचे भक्तिलक्षण सांगतात. श्रीव्यास हे भगवदवतार समजले जातात. अनेक पुराणातून व्यासमहर्षींचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे.
कृष्णद्वैपायनं व्यासं विद्धि नारायणं प्रभु ॥
कोऽह्यनः पुंडरीकाक्षान्महाभारतकृद्भवेत ॥ - विष्णुपुराण, ३-४-५

'कृष्णद्वैपायन व्यास म्हणजे प्रत्यक्ष नारायणच होत. कारण त्याच्याशिवाय कोण बरे महाभारतासारखा ग्रंथ रचू शकेल ?'' व्यास शब्दाचा अर्थ महाभारतामध्ये खालीलप्रमाणे सांगितला आहे.

विव्यास वेदान्यस्मात्स तस्माद्‍व्यास, इति स्मृत ॥ - महाभारत आदिपर्व, ६३ - ८८.
'वेदाचा विस्तार ज्याच्यापासून झाला म्हणून त्यास व्यास असे म्हटले जाते. महाभारताच्या आदिपर्वात ६३ व्या अध्यायात व्यासांचे चरित्र आले आहे.

चालू वैवस्वत मन्वंतरात प्रत्येक चौकडीच्या द्वापारयुगात एक एक व्यास झाला असून अठ्‌ठाविसाव्या चौकडीत कृष्णद्वैपायन हा अठठाविसावा व्यास झाला आहे. पराशर ऋषीपासून सत्यवतीचे पोटी व्यासाचा जन्म झाला. जन्म होताच मातेची आज्ञा घेऊन ते तपश्चर्येला अरण्यात निघून गेले. तपश्चर्येने दिव्यज्ञान-संपन्न व सामर्थ्य-संपन्न होऊन आल्यानंतर त्यानी प्राप्त कलियुगात पुरुष मंदबुद्धीचे आहेत असे जाणून एका वेदवृक्षाच्या चार शाखा करून त्या आपल्या चार शिष्यास शिकवल्या. नंतर अठरा पुराणे, स्मृती, सूत्रे इत्यादी रचना केली. महाभारतासारखा सव्यालक्ष पद्यात्मक अलौकिक ग्रंथ रचला.

व्यासमहर्षी हे भगवदवतार आहेत, असे श्रीकृष्णच उद्धवास सांगतात.
वेदविभागी राजहंस । जो का द्वैपायन व्यास ।
तो मी म्हणे हृषीकेश । निवडुनि द्विजास दिधले वेद ॥ ना. भा. १६. २२४,
व्यासाना वेदव्यास ही पदवी कशी प्राप्त झाली याविषयी श्रीकृष्ण सांगतात -
हयग्रीव वेदमूर्ती । तेथे श्रीव्यासे करोनि भक्ति ।
वेदव्यास पदप्राप्ती । हे केली ख्याती तिही लोकी ॥ ना भा. १६ - २४८

श्रीनारदमहर्षीनीच व्यासांना भागवताचा उपदेश केला होता, हे प्रथम सांगितलेच आहे. तोच भागवताचा उपदेश व्यासानी आपला ज्ञानी पुत्र जो शुक त्याला केला.

नारदांनी व्यासांना भक्तिमार्गाचा उपदेश केल्यामुळे एका दृष्टीने व्यास हे नारदाचे शिष्यच होत. असे असताही भक्तिलक्षणाचा विचार करताना व्यासाचे मत प्रथम सांगितले आहे. व्यासाच्या श्रेष्ठत्वाची नारदांना पूर्ण कल्पना होती हेच याचे कारण असावे. भक्तीमध्ये भज्य, भजक व भजन (सेवा) अशी त्रिपुटी मानली जाते. भक्ती करणारा भक्त आपल्या भावनेप्रमाणे भज्य, सेव्य जो असेल त्याच्या अधिकाधिक सेवेचा लाभ कसा मिळेल हे पाहून सेवेची पद्धती स्वीकारीत असतो. या दृष्टीने व्यासांना सेवेमध्ये पूजापद्धती श्रेष्ठ वाटली. कारण त्या सेवेत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मनबुद्धि, चित्तप्राणादि सर्वांचा समावेश होत असतो. सर्वांगाने सेवा घडते. एकादशस्कंधाच्या सत्ताविसाव्या अध्यायात उद्धवाने श्रीकृष्णास पूजामार्ग सांगण्याबहल प्रश्न केला आहे. त्यात या मार्गाचे प्रवर्तक कोणकोण होऊन गेले त्याचाही त्याने निर्देश करून त्यानीही हा पूजामार्ग सांगितला असे म्हटले आहे.
जो व्यास सत्यवती सुत । जो का नारायण मूर्तिमंत ।
जेणें प्रगट केला वेदार्थ । जो विख्यात महाकवि ॥ २० ॥
पुराण कविकर्ता तो सांग । यालागीं व्यासोच्छिष्टमिदं जग ॥
तेणें ही भगवत्पूजा मार्ग । हा क्रिया योग बोलिजे ॥ २१ ॥
या पूजेचे विविध प्रकार व्यासकृत पुराणादिकातून प्रतिपादिले आहेत.

भक्तिरसामृत सिंधुनामक चैतन्यसंप्रदायाचे श्रीरूपगोस्वामी याच्या भक्तिशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये भक्तीचे एकांगा व अनेकांगा असे दोन भेद दाखविले आहेत. पंधराव्या सूत्रावरील विवेचनात नवविधाभक्ती कोणी कोणी केली हे एका श्लोकाच्याद्वारे दाखविले आहे. तो प्रकार एकाङ्‍गभक्तीविषयक होय, म्हणजे कोणी कोणी केवल श्रवण, केवल कीर्तन, केवल स्मरण इत्यादी एका क्रियेला प्राधान्य देऊन भक्ती करतात. पण पूजा (अर्चन) भक्ती ही अनेकांगा आहे. म्हणजे वर लिहिल्याप्रमाणे सर्व अंतर्बाह्य साधनांचा उपयोग तिच्यात होतो. म्हणून तिला अनेकांगा म्हटले आहे. पूजा, अर्चन यांचे लक्षण भक्तिरसामृतसिंधूमध्ये सांगितले आहे.
शुद्धिन्यासादि पूर्वाङ्गकर्मनिर्वाहपूर्वकम् ।
अर्चनं तूपचाराणां स्यान्मंत्रेणोपपादनम ॥ २ - २७.

'देहशुद्धी, षडंगादिन्यासपूर्वक मंत्रोच्चारद्वारा सर्व उपचाराचे समर्पण म्हणजे अर्चन होय.'

श्रीहरी कोणाची पूजा घेत नाही याविषयी भागवतामध्ये नारदप्रचेतस संवादात नारदांनीच सांगितले आहे.
न भजति कुमनीषिणां सइज्यां हरिरधनात्मधनः प्रियोरसज्ञः ।
श्रुतधन कुलकर्मणां मदैर्ये विदधति पापमकिंचनेषु सत्सु । - भागवत, ४ - ३१ - २१.

"भगवान तर आपल्याला सर्वस्व मानणार्‍या निर्धन पुरुषावरच प्रेम करतो, कारण तो परम रसज्ञ आहे. त्या अकिंचन पण अनन्याश्रय भक्तांच्या अहैतुकी भक्तीमध्ये किती माधुर्य असते हे तो प्रभू चांगल्या प्रकारे जाणतो. जे लोक आपल्या शास्त्र, ज्ञान, धन, कुल व कर्माच्या मदाने उन्मत्त होऊन उपर्युक्त लक्षणाने युक्त संताचा तिरस्कार करतात अशा दुर्बुद्धी पुरुषाची पूजा भगवान स्वीकारीत नाही.' शुद्ध पवित्र अंतःकरणाने, परम श्रद्धेने पूजाविधीचे पूर्ण ज्ञान संपादन करून यथाशक्ती यथामिलित उपचाराने पूजा केली पाहिजे. तत्रग्रंथ पुराणग्रंथातून पूजाविधी अनेक प्रकारचा सांगितला आहे.

शांडिल्य भक्तिसूत्रावरील स्वप्नेश्वर भाष्यात एकोणसत्तराच्या सूत्रावरील टीकेत देवाच्या पूजेत बत्तीस अपराध वर्ज्य करावेत असे वराह पुराणातील एक वचन उद्‍धृत करून सांगितले आहे.
देवपूजापराधास्ते द्वात्रिशत्परिकीर्तिता. ॥ वराहपुराण, अ. १२४ - २५

तसेच या अपराधातून मुक्त होण्याकरिता प्रायश्चित्ते सांगितली आहेत. पण अंतःकरणात खरी भावना जर असेल तर कोणताही अपराध झाला तरी श्रीभगवान यातून मुक्त करतो. तसेच पूजेच्या उपचाराच्या बाबतीतही आहे. तत्रग्रंथातून ?? वतेच्या उपचाराचे कोठे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. तर कोठे कोठे अठरा, कोठे सोळा, कोठे पाचच सांगितले आहेत. पूजक ज्या अधिकाराचा असेल, त्याला जे जे संपादन करता येतील ते ते संपादन करून पूजाविधी पूर्ण केला पाहिजे. पंचोपचार : गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे आहेत. षोडशोपचार पाद्य, अर्घ्य, आचमनीय नानीय, वस्त्र, आभूषण, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, पुनः आचमनीय, स्तोत्रपाठ, तर्पण, वंदन इत्यादी आहेत. प्रत्येक उपचार समर्पणाचे मंत्रही आहेत. पूजाविधी सांगणार्‍या ग्रंथातून ते सर्व प्रसिद्ध आहेत.

या अर्चनभक्तीचा विशेष विचार श्रीमद्‌भागवताच्या एकादशस्कंधातील सत्ताविसाव्या अध्यायात श्रीकृष्ण-उद्धव संवादात व्यासानी केला आहे. भक्तवर्य उद्धवाने श्रीकृष्णास तुझी आराधना (पूजा) ज्या कर्माच्या आचरणाने होते तो क्रियायोग मला सविस्तर सांग अशी प्रार्थना केली. तेव्हा श्रीकृष्णाने वैदिक, तांत्रिक, मिश्र असा त्रिविध यज्ञ आहे असे म्हटले आहे. यज्ञ शब्दातील 'यज' धातू हा यज पूजाया पूजा या अर्थाचा आहे. हा पूजामार्ग तीन प्रकारचा सांगून त्या पूजेची अनेक स्थाने सांगितली आहेत. प्रतिमा, यज्ञकुंड, अग्नी, सूर्य, जल, हृदय, ब्राह्मण व गुरु अशी आठ स्थाने सांगितली आहेत. तसेच प्रतिमाही शिलाप्रतिमा, काष्ठाची, लोहादी धातूची, मृत्तिकेची, चित्राची, वालुकेची, मनाने हृदयात साठवलेली व रत्नाची अशा आठ प्रकारच्या सांगितल्या आहेत. पूजाविधीच्या आरंभी शरीरशुद्धी कशी करावी तेही स्पष्ट केले आहे. यानंतर पूजेचे उपचारही सर्व सांगितले आहेत. सर्व गोष्टीचा विस्ताराने विचार केला आहे. तेथे श्रीकृष्ण स्पष्ट म्हणतात, भक्ताने पूजेच्या निमित्ताने प्रेमाने केवळ पाणी जरी मला समर्पण केले तरी ते पुष्कळ आहे. पण अभक्ताने अनेक उपचाराने जरी माझी पूजा केली तरी ती व्यर्थ आहे, ती माझ्या संतोषाला कारण होत नाही. या दृष्टीने एकादशस्कंधाचा सत्ताविसावा अध्याय फार महत्त्वाचा आहे. विशेष माहितीकरिता तो मुळातून पाहावा.

तसेच याच एकादशस्कंधाच्या तिसर्‍या अध्यायात जनक-नवयोगेश्वर संवादातही हा पूजाविचार आला आहे. तेथे पूजकाने आपल्या गुरूपासून पूजाविधी समजावून घ्यावा, श्रीगुरू-अनुग्रहपूर्वक त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूजा करावी म्हणजे ती सफल होते असे म्हटले आहे. तसेच हा पूजाविधी करीत असता ज्याची पूजा करीत आहो तो सर्वभूतांतर्यामी आहे अशी भावना ठेवली पाहिजे, अशी भावना न ठेवता जी पूजा केली जाईल ती मला पोहोचत नाही असे भागवताच्या तृतीय स्कंधात स्पष्ट सांगितले आहे. 'जो सर्व भूतांतर्यामी अशा मला जाणत नाही, व भेददृष्टी ठेवून मूढपणाने माझी पूजा करतो, ती त्याची पूजा म्हणजे राखेत हवन केल्याप्रमाणे व्यर्थ होय, त्याचे ते कृत्य म्हणजे पूजा नसून ते विडंबन होय, असे स्पष्ट म्हटले आहे.' (भागवत स्कंध ३ - २९ - २१) पूजाविधीचा विचार फार विस्तृत आहे व अनेक ग्रंथातून तो सांगितला आहे, तसेच सांप्रदायभेदाने त्यात काही वेगळेपणाही दिसून येतो. तात्पर्य, पूजाअर्चन हे भक्तियोगाचे प्रधान अंग आहे. भक्तिमार्गीय सर्वच पंथात पूजापद्धतीचा अंगीकार केला आहे. सर्वांगाने होणारी ती भक्ती आहे.

अनेक भाविक श्रद्धावान म्हणविणारे आपआपल्या इष्ट देवतेची पूजा करीत असतात, पण ते विशिष्ट कामना ठेवून करीत असतात. लौकिक कामना चित्तात धरून केलेली पूजा ही भक्तीत समाविष्ट होत नाही. कारण यात पूज्यावर खरे प्रेम नसते. म्हणून 'पूजादिष्वनुराग' असे अनुराग पद सूत्रात घातले आहे. कारण परमप्रेम म्हणजेच भक्ती हे मागे सांगितलेच आहे. त्यावरून भक्तीविषयक कोणतीही क्रिया झाली तरी तिच्यात परमप्रेम अनुराग असणे अवश्यच आहे. अनुरागाविना पूजा करण्यात काही उपयोग नाही. कारण श्रीकृष्ण भगवान म्हणतात -
अर्जुना माझा ठायी । आपणपेनवीण सोरसु नाही ।
मी उपचारी कवणाही । नाकळे गा ॥ ३६७ ॥
म्हणोनि मद्याजी जे जहाले । ते माझिया सायुज्या आले ।
जिही उपचारमिषे दिधले । आपणपे मज ॥ - ज्ञानेश्वरी, ९. ३६६

अर्चनभक्तीत पत्र-पुष्प-फळादी उपचार हा केवळ निमित्तमात्र आहे, त्याच्या आत भक्ती पाहिजे. श्रीकृष्णच सांगतात -
येर पत्र पुष्पफळ । हें भजावया मिस केवळ ।
वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ - ज्ञा. ९ - २६ - ३९५

अनुरागाविना भगवद्विषयक पूजा इत्यादी क्रिया होतील तर त्यात रस निर्माण होणार नाही. रोज तोच पूजा करणारा, तोच देव, तेच मंत्र, तीच पूजाक्रिया होत राहील तर ती क्रिया यंत्रवत् होईल. मन एकीकडे व नित्य क्रियेची सवय किंवा नियम म्हणून पूजा एकीकडे होत राहील. पण खर्‍या भक्तीत तिचा प्रवेश होणार नाही. तुकाराममहाराज म्हणतात -
देवापायी नाही भाव । भक्ती वरीवरी वाव ।
समर्पिला जीव । नाही तो हा व्यभिचार ॥

भागवत एकादशस्कंध दुसर्‍या अध्यायात जनक-नवयोगेश्वर संवादात स्पष्ट सांगितले आहे.

प्रेमेवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेवीण ध्यानपूजन ।
प्रेमेवीण श्रवणकीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥ - एकनाथी भागवत, २. ३३३

अनुराग म्हणजे जो रागाच्या पश्चात होतो तो असाही अर्थ केला जातो. रागाचे लक्षण योगसूत्रात 'सुखानुशायी राग.' असे आहे. जेथे सुख वाटेल तेथे राग, आसक्ती, प्रेम होते. वास्तविक खरा रागी भगवान आहे, तो जीवावर सतत प्रेमवर्षाव करीत असतो. जीव जरी त्याला विसरत असले तरी तो जीवाला कधीच विसरत नाही. जीवाला सत्ता-प्रकाश-आनंद देणारा तो आहे. म्हणूनच आपण जीवनात आनंद भोगत असतो, असे जाणून केवळ त्या भगवंतावर जे प्रेम केले जाते त्यास अनुराग म्हणावा. जेथे अनुराग असतो तेथे चित्ताची सहजप्रवृत्ती होते, आवड असते. स्नेह, प्रणय, प्रेम ही एका भावाचीच नावे आहेत. तरी एका उसाच्या रसापासून गूळ, राब, साखर, खडीसाखर बनते, याप्रमाणे त्यात थोडे तारतम्य आहे. पूजेमध्ये नित्यनवीन रस, नवीन उत्साह, नवीन सतत ओढ राहील तर तो अनुराग म्हटला जाईल, त्यात कंटाळा न आला पाहिजे.

यदाकदाचित पूजासाहित्य उपलब्ध न होईल, काही प्रतिबंध येईल, पण अंतःकरणात जर पूजाविषयक अनुराग असेल तर मनाने ही सर्व पूजा करता येते व ती देवाला फार गोड लागते, 'मनोमय पूजा । हेचि पढिये केशवराजा ॥' असे तुकाराममहाराज म्हणतात व 'करावी ते पूजा मनेचि उत्तम ।' असा आदेशही देतात. एका भक्ताची मानसपूजेमध्ये किती तन्मयता झाली होती याची कथा ब्रह्मवैवर्त पुराणात आली आहे.

प्रतिष्ठानपूर नामक गावात एक ब्राह्मण राहत होता, तो दारिद्र्याने पीडित झाला असताही आपल्या अदृष्टाप्रमाणेच सर्व होते असे समजून समाधानाने राहात असे. केवळ आपण दरिद्री असल्याने भगवत्सेवा आपल्याकडून योग्यप्रकारे होत नाही याचा त्याला सतत खेद होत असे. एके दिवशी एका विद्वान अशा ब्राह्मणाचे घरी त्याने वैष्णवधर्माचे श्रवण केले व ते धर्म मनाने आचरले तरी फलद्रूप होतात, असे ऐकून त्याने तसे मनानेच ह्या भागवतधर्माचे निष्ठेने आचरण करण्याचे ठरविले. नित्य गोदावरीचे स्नान व नित्यक्रम आटोपून एकान्तात शांतचित्ताने तो श्रीमहाविष्णूची मानसिक पूजा करीत असे. मनानेच पूजा करावयाची असल्याने तो त्यात कोणतीही उपचाराची न्यूनता ठेवीत नसे. मनाने श्रीविष्णूमूर्तीची एका सुंदर सुवर्णमंदिरात रत्नजडित सिंहासनावर स्थापना करून त्या मूर्तीस सुवर्णघटानी गंगादी सर्व तिर्थांच्या जलांनी अभिषेक करीत असे. अनेकानेक पूजाद्रव्यादिकांच्याद्वारा राजोपचाराप्रमाणे तो अर्चनसेवा करी. त्या आनंदात किती वेळ गेला हेही त्याला कळत नसे. असा नित्य पूजाविधी त्याचा चालू असता एके दिवशी त्या श्रीहरीच्या नैवेद्याकरिता मनानेच गोदुग्धाची उत्तम खीर, त्यात साखर, वेलदोडे, केशर इत्यादी द्रव्ये घालून आटवून तयार केली. त्या खिरीचा सुवर्णपात्रातून नैवेद्य समर्पण करीत असता त्याला ती फार उष्ण वाटली, म्हणून त्याने आपल्या उजव्या हाताची दोन बोटे सहज त्या पात्रात घालून पाहिली असता ती इतकी उष्ण लागली की त्याची दोन्ही बोटे भयंकर भाजली. त्याला त्याचे फार वाईट वाटले. इतकी उष्ण खीर मी देवाला नैवेद्यात खाऊ घातली, ती त्याला किती पोळली असेल, त्याला किती त्रास झाला असेल असे वाटून तो दुःख करू लागला. त्याचा परिणाम असा झाला की, तो ब्राह्मण त्या भावसमाधीतून बाहेर आला व पाहतो तो बाहेरून त्याची दोन बोटे भाजलेली दिसून आली. हे पाहून वैकुंठात लक्ष्मीसह बसलेले श्रीमहाविष्णू तेथेच हसले. श्रीलक्ष्मीदेवीनी त्यांना विचारले की, महाराज ! आपल्या अकस्मात हसण्याचे कारण काय ? तेव्हा त्या भावनातिरेकाने ब्राह्मणाची केलेली अर्चनभक्ती दाखविण्याकरिता महाविष्णूंनी विमान पाठवून त्यास वैकुंठास नेले व त्याची अवस्था दाखवली. नंतर आपल्याजवळ त्यास अखंड स्थान दिले. अशी अनुरागपूर्वक पूजा केवळ मनानेही होऊ शकते. सूत्रात 'पूजादिषु' असे म्हणून आदिपदाने स्तोत्र, जप, ध्यान याचाही पूजाविधीतच अंतर्भाव केला आहे.

अलौकिक प्रतिभासंपन्न प्रज्ञाचक्षु थोर संत श्री गुलाबराव महाराज आपल्या 'नारदभक्तिसूत्रभाष्यम्' या संस्कृत भाष्यात या सूत्रावरील विवेचनात म्हणतात, 'पूजाभक्तीचा यद्यपि गौणी भक्तीत समावेश होतो, तरी सूत्रात अनुराग पद असल्यामुळे येथे पराभक्तीतच ती समाविष्ट केली पाहिजे. कारण अनुराग हा प्रेमस्वरूप आहे. गौणी भक्तीमध्ये पूजादिकात पूजकाची श्रद्धा, प्रेम असतेच पण ते फलावसायी असते.' या विषयावर आणखी एक शंका त्यांनी घेतली आहे. तिचा आशय असा की, 'पूजादिकांत अनुरागच संभवत नाही, पुष्पादी जडसामग्री अधिकृत पूजा ही एक बाह्य प्रवृत्ती आहे.' यावर ते उत्तर देतात की, 'असे नाही. ज्याप्रमाणे आनंदरूप अशी भगवन्मूर्ती ध्यानादिरूप अंतःकरणातील सात्त्विक गुणांनी अलंकृत होते तशीच बाहेरही उपलब्ध असणारी भगवन्मूर्ती ही भक्तदृष्टीने चिन्मात्रस्वरूप असून प्रेमाने संपादन केलेल्या सात्त्विक उपचारानी अलंकृत होते. ह्या अलंकरणासच पूजा म्हणतात. तिच्या ठिकाणी जो अनुराग तो बाह्य जडानुरागाप्रमाणे नाही. तसेच 'पूजादिषु' येथील 'आदि' पदाने पूजाभक्त्यनुकूल व्रत, उत्सव इत्यादिकांचे ग्रहण करावे. महाभारत व अन्यपुराणादिकांतून तापनीय श्रुत्यनुसार व्यासांनी भक्तिप्रेमपोषक असे अनेक व्रत-उत्सव सांगितले आहेत. श्रीमद्‌भागवत एकादशस्कंधामध्ये अकराव्या अध्यायात उद्धवास भक्तियोगाचा विचार श्रीकृष्णांनी चार श्लोकातून सांगितला आहे.
मज्जन्मकर्मकथनं मम पर्वानुमोदनम ।
गीतताण्डववादित्रगोष्ठीभिर्मद्‍गृहोत्सव ॥ ३६ ॥
यात्रा बलिविधानंच सर्ववार्षिकपर्वसु ॥
वैदिकी तांत्रिकी दीक्षा मदीयव्रतंधारणम ॥ ३७ ॥
ममार्चास्थापने श्रद्धा स्वतः सहृत्य चोद्यमः ॥
उद्यानोपवनाक्रीडपुरमंदिरकर्मणि ॥ ३८ ॥
संमार्जनोपलेपाभ्यां सेकमंडलंवर्तनैः ।
गृहशुश्रूषणं मह्यं दासवंद्यदमायया ॥ ३९ ॥
भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, माझ्या जन्माच्या त्याचप्रमाणे माझ्या लीलांच्या कथा सांगणे, माझे जयन्त्यादी उत्सव करणार्‍यांत आनंदाने सर्व प्रकारे भाग घेणे, गायन, नर्तन, वादन व कथा यांच्या साह्याने माझ्या मंदिरात उत्सव करणे, सर्व वार्षिक पर्वकालामध्ये तीर्थयात्रा करणे, मला तुळसी, फुले, नैवेद्य अर्पण करणे, वेदविहित व तंत्रोक्त दीक्षा घेऊन त्यात सांगितल्याप्रमाणे मत्प्रीत्यर्थ नाना प्रकारच्या व्रतांचे अनुष्ठान करणे, माझी मूर्तिस्थापना करण्याविषयी पूर्ण श्रद्धा ठेवणे, सामर्थ्य असल्यास स्वतः नाहीतर अनेक भक्तांनी मिळून फुलांची बाग, फळझाडाचा मळा, क्रीडास्थान, नगरात एखादे सुंदर मंदिर निर्माण करण्याविषयी उद्योग करणे, केर काढणे, सडा घालणे, सारवणे, चित्रविचित्र रांगोळ्या काढणे इत्यादिकांच्या योगे एखाद्या दासाप्रमाणे निष्कपटपणे माझ्या मंदिराची सेवा करणे, इत्यादी वर सांगितलेल्या गोष्टी सर्व पूजाभक्तीची अंगेच असल्यामुळे व श्रीव्यास महर्षीनीही ती अंगीकारली असल्याने 'आदि' शब्दाने वरील गोष्टीचे ग्रहण करावे.

यानंतर श्रीगर्गमहामुनीचे भक्तिलक्षण या पुढील सूत्रात सांगत आहेत.


GO TOP