नारद भक्तिसूत्रे

भवतु निश्चयदार्ढ्‍यादूर्ध्वं शास्त्ररक्षणम ॥१२॥
अन्यथा पातित्याशङ्‍कया ॥१३॥


अर्थ : (अलौकिक अशा भगवत्प्रेमाचा मनात) निश्चय दृढ झाल्यानंतर शास्त्राचे रक्षण व्हावे. ॥१२॥
नसता पातित्याची संभावना आहे. ॥१३॥


विवरण : या सूत्राच्या अर्थात विवाद दिसून येतो. मागील सूत्रात लौकिक व शास्त्रीय कर्मामध्ये भगवद्‌भक्तीस अनुकूल कर्मे करावीत व भगवद्‌भक्तीविरोधी व्यवहारात उदासीनता राखावी, असे म्हटले आहे. त्याचा विचार त्या सूत्राच्या विवरणात झाला आहे. भक्ताचे विशेष कर्तव्य अंतःकरणात भगवान् व त्याच्या प्राप्तीचे साधन भक्तिप्रेम याच विषयाचा निश्चय दृढ राखणे हे आहे; हाच भक्तधर्म आहे. याविना अन्य धर्माचरणात भक्त बांधला जात नाही. श्रीतुकाराममहाराज हेच सांगतात -
निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ॥
निष्काम निश्चल विठ्‌ठली विश्वास । पाहो नये वास आणिकाची ॥

श्रीज्ञानेश्वरमहाराजही आपल्या अभंगातून सांगतात -
सकळ धर्माचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन ।
दया क्षमा समाधान । संतजन साधिती ॥
निजधर्म हा चोखडा । नाम उच्चारूं घडघडा ।
भुक्तिमुक्तीचा संवगडा । हा भावसिंधु तारक ॥

श्रीमद्‌भागवतामध्येही -
सवै पुंसा परोधर्म यतो भक्तिरधोक्षजे ।
अहैतुक्य व्यवहिता ययात्मा संप्रसीदति - भा. १ असेच म्हटले आहे.

भक्त याविना अन्य साधनांचा विचार करू शकत नाही.

मागील सूत्रात अनन्यतेचे महत्त्व सांगितलेले आहे. ती प्राप्त करून घेणे व ती घेण्याकरिता कोणत्याही इतर व्यवहारांत न पडता भगवद्‍नुकूल कर्माचरण हाच एकमेव पर्याय सांगितला आहे. त्या दृष्टीने अनन्यतेचा निश्चय दृढ होणे हे प्रथम कर्तव्य आहे. लौकिक-वैदिक कर्मे सर्व अनन्यतेला अनुकूल असतातच असे नाही, म्हणून अनन्यता विरोधी कर्मांत उदासीनता ठेवावी असे द्विवार सांगितले आहे. निश्चय दृढ होणे म्हणजे श्रीनामदेवराय म्हणतात, त्याप्रमाणे स्थिती होणे.

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥
वदनी तुझे मंगल नाम । हृदयी अखंडीत प्रेम ॥३॥
नामा म्हणे केशवराजा । केला निश्चय चालवी माझा ॥४॥

ही एकनिष्ठा राहणे कठीण आहे. त्यात इह वा पूर्वजन्मीचे अनेक प्रतिबंध आडवे येतात. अनेक प्रलोभने पुढे येतात. ते प्रतिबंध, ती प्रलोभने दूर सारून केवळ आपली भगवन्निष्ठाच सांभाळणे हे खर्‍या भक्ताचे लक्षण आहे. या स्थितीचे वर्णन भागवत एकादशस्कंधात जनक-नवयोगेश्वर संवादात केले आहे
त्रिभुवन विभव हेतवेऽप्यकुष्ठस्मृतिरजितात्म सुरादिभिर्विमृग्यात ।
न चलति भगवत्पदारविन्दाल्लवनिमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥ भागवत, ११ - २ - ५३

'त्रैलोक्याचे ऐश्वर्य प्राप्त होत असले तरी ज्याचे भगवत्स्मरण अखंड असते, ज्या भगवत्पद कमलाच्या शोधात इंद्रादिक देवही असतात, त्या भगवच्चरणकमलापासून जो लवमात्रसुद्धा दूर होत नाही तो वैष्णव श्रेष्ठ होय.'

या श्लोकावरील आपल्या रसाळ व्याख्यानात श्रीएकनाथमहाराज सांगतात -
सप्रेमभावें करितां भक्ति । हरिचरणी ठेविली चित्तवृत्ति ।
निजस्वार्थाचिये स्थिती । अतिप्रीती निजनिष्ठा ॥
तेथे त्रैलोकीच्या सकळ संपत्ति । कर जोडूनि वरूं प्रार्थिती ।
तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ति । भक्तपरमार्थी अति लोभी ॥
एवं हरिचरणापरते । सारामृत नाही येथे ॥
यालागी चित्ते वित्तें जीवितें । जडले सुनिश्चिते चरणारविंदीं ॥ एकनाथी भागवत २, ७४५ - ६०.

श्रीमद्‍भगवद्‌गीतेतील बाराव्या अध्यायात जी भक्तलक्षणे सांगितली आहेत, त्यांत 'यतात्मा दृढनिश्चयः' असे एक महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे भक्तजीवनात निश्चयदार्ढय हा महत्त्वाचा भाग येतो. येथे 'निश्चयदार्ढय' याचा भगवंताचे ठायी पराकोटीची अनन्यता असाच अर्थ आहे. परमात्मा हाच माझा खरा आश्रय, इतर कुणी नव्हेत असा मनाचा दृढ निश्चय होणे म्हणजे 'निश्चयदार्ढय.' असा निश्चय झाल्यानंतर सर्व आचरण भगवत्पर होते. मग शास्त्राने सांगितलेल्या आचरणाचे काय ? ते करावे की नाही ?

तो निश्चय झाल्यानंतर, नारदमहर्षी सांगतात, शास्त्ररक्षण व्हावे. म्हणजे करावे.

प्रेमाची पूर्ण अवस्था प्राप्त झाली आहे, म्हणून निश्चय दृढ झाला आहे. अशा अवस्थेत तो पुरुष भाविक जगाच्या पूज्यतेचा विषय होतो, जग त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहत असते, अशा वेळी तो नवीन भक्तांना अलौकिक न वाटता आदर्शस्वरूप वाटला पाहिजे, त्याकरिता भगवद्‍नुकूल अशी शास्त्रोक्त विहित कर्मे आचरली पाहिजेत. श्रीकृष्णभगवान सांगतात -
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ॥
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३. २१ ॥

'श्रेष्ठ पुरुष जसे वर्तन करतील तसेच सामान्य लोक त्याचे अनुकरण करीत असतात. तो जे प्रमाण मानून व्यवहार करतो, इतर लोक तदनुसार वागत असतात.
एथ वडिल जें जें करिती । तया नाम धर्मुं ठेविती ।
तेचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥
मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकाप्रति ॥ ज्ञा. ३. १५८ - ७१
भक्त, संत यांनीही लोकसंग्रह सांभाळला पाहिजे.

येथे श्रीनारदांनी 'भवतु....शास्त्ररक्षणम् ।' असा प्रयोग केला आहे. 'करोतु' असा केला नाही. त्याचा ध्वनी असा आहे की शास्त्राने सांगितलेल्या नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण भगवत्प्रेमात रंगल्यामुळे व त्यात देहभानही विसरल्यामुळे त्याच्याकडून होईल किंवा नाही हे सांगता येत नाही ! त्यामुळे ते त्याच्यावर बंधनकारकही नाही. त्याने भक्ती बाजूला ठेऊन शास्त्ररक्षण केलेच पाहिजे असे कुणी म्हणणार नाही. पण त्याच्याकडून ते होणे चांगले ! भगवदैक वृत्ती व आचरण झाल्यानंतरही शास्त्राने सांगितलेली व भक्तीला बाधक न होणारी कर्मे भक्ताकडून व्हावीत, होवोत, होणे चांगले, असा 'भवतु'चा आशय आहे ! का होवोत ? तर 'अन्यथा पातित्याशंकया !' हे त्याचे उत्तर होय.

निश्चय-दृढतेनंतर शास्त्ररक्षण होवो. म्हणण्यात त्या पूर्वी शास्त्राविरुद्ध वागावे असा आशय नाही. कारण पूर्वी सूत्र अकरामध्ये 'लौकिक व वैदिक कर्मात भगवतअनुकूल कर्मे करावीत' (काम्यादिक करू नयेत) असे स्पष्ट म्हटले आहे. शास्त्रानुसार भगवदर्पणबुद्धीने भगवद्‍नुकूल नित्यनैमित्तिक कर्मे व श्रवणकीर्तनादि करीत करीतच भगवत्प्रेम प्राप्त होऊ शकते.

असे जर न होईल तर 'अन्यथा पातित्याशंकया' असे तेराव्या सूत्रात नारदमहर्षी स्पष्ट सांगत आहेत. ज्या ईश्वराचे प्रेम संपादन करण्याचा प्रयत्न करावयाचा त्या ईश्वराचीच आज्ञा पाळणे म्हणजेच शास्त्ररक्षण. ते न केले जाईल तर पतनाचा संभव आहे. गीतेतच स्पष्ट म्हटले आहे -
यः शास्त्रविधीमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम ॥ गीता १६ - २३
'जो शास्त्रविधीचा त्याग करून मनाला वाटेल तसे वर्तन करतो, स्वेच्छाचारी होतो त्याला सिद्धी तर प्राप्त होत नाहीच; पण परलोकप्राप्ती किंवा परमगती प्राप्त होत नाही, इतकेच नव्हे तर सुखही मिळत नाही.'

जाणूनबुजून शास्त्रविहित कर्माचा त्याग करणे हा भक्तिप्रेमाचा आदर्श होऊ शकत नाही. उच्छृंखलता, स्वेच्छाचार हे नरकाचे साधन होत असते, असे गीतेमध्ये स्पष्ट म्हटले आहे.

भक्तिप्रेमाच्या निर्मितीपूर्वीही तदनुकूल विहितकर्माचरण विहितच आहे व निश्चयदार्ढ्यानंतरही ते विहितच आहे. शास्त्ररक्षण याचा अर्थ शास्त्रविहित कर्माचरण करीत राहणे. मात्र ते अनासक्त बुद्धीने, भावदर्पण बुद्धीने करीत राहणे हा भक्तियोगाचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रीकृष्ण अर्जुनास आपल्या बाराव्या अध्यायातील भक्तियोगाच्या विवेचनात हेच सांगतात.
येतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२ - ६.

'जे सर्व विहितकर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन अनन्य योगाने माझे ध्यान करीत उपासना करतात,' असे भक्तांचे लक्षण तेथे केले आहे, या श्लोकावरील व्याख्यानात श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात -
कर्मेंद्रिये सुखे । करिती कर्मे अशेखें ।
जियें का वर्णविशेखें । भागा आली ॥
विधी तें पाळीत । निषेधातें गाळीत ।
मज देऊनि जाळीत । कर्मफळें ॥
या परी पाही । अर्जुना माझा ठायी ।
सन्यसूनि नाही । करिती कर्मे ॥ - ज्ञानेश्वरी १२. ७६ - ७८

असे जर न होईल म्हणजे शास्त्रविहित कर्माचे भगवदर्पण बुद्धीने रक्षण (आचरण) न होईल तर पातित्य प्राप्त होण्याचा संभव आहे. तो भक्त पतित होईलच असे नाही, पण संभव मात्र आहे ! अशी जपून भाषा नारदमहर्षी वापरतात. मग साधक भक्ताने हा धोका स्वीकारावाच का ? त्यापेक्षा शास्त्राने सांगितलेली नित्यनैमित्तिक कर्मे व सदाचार याचे आचरण याद्वारे त्याचेकडून शास्त्ररक्षण होणेच चांगले. खरा भक्त जाणूनबुजून विहित कर्माचा त्याग कधीच करीत नाही. या विषयात संतश्रेष्ठ श्रीतुकनाथ महाराजांचा एक अभंग महत्त्वाचा आहे.
हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष ।
श्रवणस्मरण भक्ति तेणे पडली वोस ॥ १ ॥
हरिनामाचेनि बळे करिसी अधर्म ।
देवाचे नि तुमचे शुद्ध नोहे कर्म ॥ २ ॥
याच दृष्टीने नारद महर्षीनी 'अन्यथा पातित्याशंकया' असे सूत्रात म्हटले आहे. विहित कर्माचरण सुटले, अधर्मप्रवृत्ती वाढली तर कदाचित भक्तिमार्गापासूनही तो भक्त पतित होण्याचा संभव आहे; असाही अर्थ वरील सूत्राचा होतो.


GO TOP