नारद भक्तिसूत्रे
लोके वेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधिषूदासीनता ॥ ११ ॥
अर्थ : (भक्ताच्या) लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्मे करीत राहणे (म्हणजेच) त्याच्या विरोधी (प्रतिकूल) विषयात उदासीनता (ठेवणे) होय.
विवरण - जीव मनुष्यदेहात आला म्हणजे तो लौकिक वैदिक कर्मांनी बांधला जातो. केवल दृष्टफलक जी कर्मे, स्नानपान, अन्नभक्षण, शेती, व्यापार, राजसेवा इत्यादी ती लौकिक कर्मे म्हणविली जातात व वर्णआश्रमांना उद्देशून वेदात जी दृष्ट-अदृष्ट उभय स्वरूपाची फले देणारी कर्मे सांगितली गेली आहेत व जी आवश्यक अशी मानली जातात, ती वैदिक कर्मे होत. या कर्मांचे विहित व निषिद्ध असे दोन प्रकार आहेत. वेदात जी कर्मे मानवाने करावीत असे सांगितले आहे, त्यांना विहित म्हणतात. जी कर्मे करू नयेत असे वेदात सांगितले आहे, ती निषिद्ध कर्मे होत. कारण ती अनिष्ट फळ देणारी असतात. सर्वसामान्य मानवदेह धारण करणार्यास हे कर्माचे विधान आहे. कारण देहधारी मनुष्य सर्वच कर्माचा त्याग करू शकत नाही. असे जरी आहे तरी सर्वच कर्मे सर्वांकरिता नाहीत. भक्तास इतर काम नसतेच. तो अनन्य असतो म्हणून तो काम्य कर्माचा अधिकारी नाही. पापनिवृत्तिकरिता भगवन्नाम हे साधारण प्रायश्चित्तशास्त्रात प्रतिपादिलें आहे. अशा प्रायश्चित्ताची त्यास आवश्यकता नाही, नित्यनैमित्तिक कर्मालाही फल आहे. ती कर्मे तो भगवदर्पणबुद्धीनेच करीत असतो. त्यातही एखादे कर्म जर भगवद्भक्तीत प्रतिबंधक होत असेल तर तेही भक्ताने टाकावे. जे भक्तीला अनुकूल नसेल, आणि कोणतेही व कितीही महत्त्वाचे आणि शास्त्रप्रतिपादित असेल तरी ते कर्म भक्त करीत नाही, अशी उदाहरणे आहेत. पुत्राकरिता मातापित्याची, स्त्री-करिता पतीची व शिष्याकरिता गुरूची आज्ञा प्रमाण मानणे लोकवेदधर्मानुसार अवश्य कर्तव्य आहे, पण जर ती आज्ञा भगवद्भक्तीस विरुद्ध असेल तर खरा भक्त त्याचा त्याग करतो. भक्तवर्य प्रल्हादाने पित्याची आज्ञा मानली नाही. भरताने मातेची, बळीने गुरु शुक्राचार्यांची आज्ञा मानली नाही.
मागील नवव्या सूत्रातही 'तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषूदासीनताच' असे सांगितले होते, पुन्हा हीच गोष्ट का सांगितली अशी शंका येईल. त्याचे उत्तर की, येथील उदासीनताही अकर्मण्यस्वरूप नाही, तर लौकिक-वैदिक कर्मे जी प्रेरक भक्तीस अनुकूल असतील ती करीत राहणे हीच तद्विरोधी कर्माविषयी उदासीनता आहे. जर ती लौकिक वैदिक कर्मे भक्तिप्रेमात प्रतिबंधक होतील तर ती केली पाहिजेत, असा आग्रह नाही. कारण पुराणात स्पष्ट म्हटले आहे -
स्मर्तव्यं सततं विष्णुः विस्मर्तव्यो न जातुचित् ॥
सर्वे विधिनिषेधाः स्युरेतयोरेव किंङकराः ॥
'सतत विष्णुस्मरण करावे, केव्हाही त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. सर्व विधिनिषेध आहेत ते याच सिद्धान्ताचे किंकर आहेत.'
या विषयाचाच विशेष विचार श्रीमद्भागवत एकादशस्कंधातील जनक नवयोगेश्वर संवादात केला आहे. मानव जन्माला येताना देव, पितृ, ऋषी ऋण घेऊन जन्मास येतो व ते त्याला यज्ञ, वेदाध्ययन व प्रजा निर्माण करून फेडावे लागते. याकरिता वेदात विहित कर्मांचे विधान सांगितले आहे. पण जो भक्त अनन्यतेने श्रीहरीस शरण गेला तो कोणाचाही ऋणी नाही व किंकर नाही, असे अध्याय पाच, श्लोक एकेचाळीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे. या श्लोकावरील टीकेत श्रीएकनाथमहाराज सांगतात -
जो विनटला हरिचरणी । तो कोणाचा नव्हें ऋणी ।
जेवी परिसाचिये मिळणी । लोह काळेपणी निर्मुक्त ॥
भावे करिता भगवद्भक्ति । सकळ पितर उद्धरती ।
ऋषीश्वरा नित्य तृप्ति । भगवद्भक्ति स्वानंदे ॥ -ए. भा. ५. ४६२ - ६४
इतकेच नव्हे तर अशा अनन्य भक्ताकडून कदाचित विकर्म झाले तरी त्यांच्या हृदयात असणारा हरी ते धुऊन नाहीसे करतो.
श्रीएकनाथमहाराज सांगतात -
राया म्हणसी भगवद्भक्त । विहितकर्मी नित्य निर्मुक्त ।
ते जरी विकर्म आचरत । तरी प्रायश्चित्त न बाधी त्यांसी ॥
जेवी पंचाननाचे पिले । न वचे मदगजांचेनि वेढिले ।
तेवी हरि प्रियी विकर्म केले । त्यासी नवचे बांधिले यमाचेनि ॥
हरिनामाचे ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण ।
मा जो हरीचा पढियता पूर्ण । त्यासी वेद विधान कदा न बाधी ॥
भक्तापासूनि विकर्म स्थिती । कदा न घडे गा कल्पांती ।
अवचटे घडल्या दैवगती । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युत स्मरणे ॥ -ए. भा. ५. ४७३ - ७९
इतकेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णही उद्धवाला सांगतात -
माझेनि भजनप्रेमे जाण । विसरला कर्माची आठवण ।
कर्म बापुडे रंक कोण । बाधक जाण नव्हें भक्ता ॥
सप्रेम करिता भजनविधी । सर्व कर्मातें विसरली बुद्धि ।
ते जाणावी भजन समाधी । तेथ कर्म त्रिशुद्धी बाधेना ॥
ज्याची श्रद्धा कर्मावरी । तोचि कर्माचा अधिकारी ।
ज्याची श्रद्धा श्रीधरी । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥
जो जीवें प्राणें भक्तीसी विकला । तो तेव्हांचि कर्मावेगळां झाला ।
त्याच्या भावार्था मी विकिला । तो कर्मी बांधला केवी जाये ॥ ए. भा. अ. ११ - १०८५ - ८८
लौकिक-वैदिक कर्मे सर्वच भक्तीला अनुकूल असतातच असे नाही. तसेच ती वर्ण, आश्रम, देह इत्यादिकांच्या अभिमानानेच होतात, बरीच अन्य फलासक्तीने होतात. भक्ताचा तो अहंकार व फलासक्ती नष्ट झालेली असते. तो केवळ भगवत्परायण असतो. जोपावेतो देह आहे तोपावेतो कर्मे होतच असली तरी ती भगवद्भक्तीस अनुकूल अशीच होतात. त्यामुळे प्रतिकूल विषयात किंवा ते प्राप्त करून देणार्या कर्मात सहजच उदासीनता निर्माण होते. भक्तांच्या ठिकाणी या सहा गोष्टी असतातच किंवा असाव्यात असे भक्तिशास्त्रकार सांगतात.
आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनं ।
रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृत्वेवरणं तथा ।
आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणागतिः ॥
१.भगवंताला अनुकूल असतील तीच करण्याचा संकल्प, २.भगवद्भक्तीस जे प्रतिकूल होईल ते कितीही मोठे असेल तरी त्याचा त्याग, ३.संकटकाली भगवान अवश्य रक्षण करील असा पूर्ण विश्वास, ४.कदाचित काही संकटे, आपत्ती आली तर त्या भगवंतालाच रक्षक म्हणून हाक मारणे, धावा करणे, ५.स्वतःला सदैव भगवत्चरणावर समर्पित करणे, ६.कोणत्याही गोष्टीचा अभिमान न धारण करणे, दीनता राखणे, या त्या सहा गोष्टी आहेत. यातच भगवद्भक्तिविरोधी गोष्टीत उदासीनता सहज साधत असते. सूत्रामध्ये लौकिक व वैदिक कर्मे सोडावयास सांगितली नाहीत. भक्ताला मुलगा असेल तर त्याचे उपनयन संस्कार, चौल आदी संस्कार केले पाहिजेत. जीविका चालविण्याकरिता शेती, व्यापार वा परंपराप्राप्त व्यवसाय केला पाहिजे. अनेक भक्त करीतच होते, पण करावयास पाहिजे ते केवळ भगवदाज्ञा म्हणून, शास्त्रमर्यादानुसार व भगवंताला अर्पण करण्याकरताच वेदामध्ये तर अनेक हिंसादि कर्माचे, सकाम कर्माचे, जारण-मारणादी कर्माचेही विधान आहे. 'त्रैगुण्य-विषयावेदा.।' असे गीतेमध्ये सांगितले आहे. त्रिगुणात्मक जीवांचा स्वभाव व अधिकार पाहून वेदाचे विधान असते. वेदाचे खंडण किंवा वेदाची निंदा ही भक्तांना अभिष्ट नसते, तर वेदामध्ये भक्तीला प्रतिकूल असे जर काही विधान प्रतीतीस आले तर ते आपल्याकरिता नाही, अन्य अधिकार्यांकरिता आहे असे समजून त्या कर्माविषयी त्याने उदासीन राहावे.
श्रीज्ञानेश्वरमहाराज सांगतात -
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।
तरी आपण हित आपुलें । तेचि घेपें ॥ ज्ञा. २. २६०.
श्रीतुकाराममहाराज सांगतात -
वाचा बोलू वेद नीती । करू संती केले तें ॥
याच आशयाने भक्तिविरोधी कर्माविषयी उदासीनता ठेवण्यास सूत्रात सांगितले आहे.
GO TOP
|