नारद भक्तिसूत्रे
अन्याश्रयाणां त्यागोऽनन्यता ॥ १० ॥
अर्थ - (आपल्या प्रियतम भगवत्स्वरूपाला सोडून) दुसर्या आश्रयाचा त्याग (करणे) यासच अनन्यता म्हणतात.
विवरण- जीवाचा स्वभाव कोणाशी तरी अनन्य होण्याचा आहे. अनादि अज्ञानाच्या प्रभावाने संसारात देहादिक स्वभिन्न विजातीय पदार्थांचे ठिकाणी तो अनन्य असतो. 'देहोऽहं' असाच त्याचा प्रत्यय असतो. देहतादात्म्य संबंधामुळेच देहसंबंधी कलत्रपुत्र, इत्यादी अन्य वस्तूचे ठिकाणीही तो तादात्म्य ठेवीत असतो.
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि ।
जीव तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ - ज्ञा. ४. २१
असे त्याच्या सांसारिक अनन्यतेचे स्वरूप ज्ञानेश्वरमहाराजांनी सांगितले आहे. पण ही अनन्यता अज्ञानमूलक अतएव घातक आहे. या देहतादात्म्य संबंधात एका दृष्टीने जीवाचा आत्मघात आहे.
जया देह संबंधाआंतू । प्रतिपदी आत्मघातू ।
भुजता उसंतू । कांहीच नाही ॥ - ज्ञा १८ - १२७६.
ज्या देहादिकाशी जीव अनन्य असतो तेच जन्मजरामरणधर्मांनी युक्त आहेत. त्याच्याशी तादात्म्य ठेवल्यामुळे जीवाला या दुःखक्लेशयुक्त जन्ममरणादी अवस्थांचा अध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक अशा विविध दुःखांचा भोग घडत असतो.
म्हणून विचारी पुरुष विवेकाने देहादिकाहून आत्म्याला वेगळा जाणतो. एकदा देहादिकाशी असणारे तादात्म्य सुटले की उरला देवच.
देह नव्हे मी हे सरे । उरला उरे विठठल ॥ - तुकाराममहाराज.
अध्यात्ममार्गात मुमूक्षु साधक ज्ञानस्वरूप आत्म्याशी अनन्य होतो. आत्मव्यतिरिक्त दुसरी कोणतीच सत्तास्वरूप वस्तू नाही. आत्मा हा देशकाल-वस्तु-परिछेदरहित, अनंत, परिपूर्ण आहे व तोच मी आहे, अशा संशयविपर्ययरहित अवस्थेत तो असतो. भक्तिमार्गातील अनन्यता नारद महर्षींनी या सूत्रात स्पष्ट केली आहे. आपल्या प्रियतमाचाच आश्रय घ्या, अन्य आश्रयाचा त्याग करा. मनुष्य कोणाचा ना कोणाचा आश्रय घेत असतो. कोणी धनाचा, कुळाचा, विद्वत्तेचा, तपाचा, सत्तेचा, बलाचा इ. अनेक आश्रय संसारात घेतले जातात. एकाचा आश्रय घेऊन संसार होत नाही. पण प्रेम हे एकआलंबन स्वरूप असते, ते अव्यभिचारी असावे लागते.
अनादिकालीन देहादिकांच्या तादात्म्यसंस्कारामुळे भगवंतावाचून अन्य आश्रय पुढे पुढे येत असतात व ते याला आपल्याकडे ओढत असतात. अशा वेळी त्यांच्या यथार्थ स्वरूपाचा विचार करून त्याच्या क्षयातिशयरूपदोषांना ओळखून त्यांचा आपला यथार्थरीत्या कांही संबंध नाही असेच भक्त समजत असतो.
कोण सुख धरोनि संसारीं । राहो सांग मज पा हरी ।
अवघ्या नाशिवंता परी । थिता तूंही दुरी अंतरसीं ॥
असे तुकाराम महाराज देवालाच म्हणत आहेत.
एखादा भक्त अन्य आश्रयाचा आपल्या तीव्र निष्ठेने सहज त्याग करू शकेल. पण प्रथमच भक्तिमार्गात प्रविष्ट झालेल्या साधकास तो कठीण असतो. कारण अनादी संस्काराने संसारातील विषय पुनः पुन्हा त्यास आपल्याकडे ओढीत असतात. एखाद्या वेळेला त्याचा विजय झालेलाही दिसून येतो. अशा वेळी त्या भक्तास पुन्हा विचारावर आरूढ होऊन आपली चित्तवृत्ती त्या विषयापासून परावृत्त करावी लागते. श्रीज्ञानेश्वरमहाराज सांगतात,
जे तो विषयाची दाट झाडी । माजी कामक्रोधाची सांकडी ।
चुकवोनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥
मग साधुसंगे सुभटा । उजू सत्कर्माच्या वाटा ।
अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ - ज्ञानेश्वरी, ७. १२७ - १२८
धन, भवन, वैभव, सत्ता ही मोठी नाहीत. त्यांचा निर्माता व उपभोग घेणारा मोठा म्हटला पाहिजे. कारण हे सर्व जड आहेत. त्याचा आश्रय घेणे म्हणजे जडाचा आश्रय घेणे होय. आश्रय घेणारा जीव चेतन आहे. त्याने चेतन परमात्म्यास सोडून जडाचा आश्रय घेणे कसे योग्य होईल ? काही लोक धनादिकाचा नाही तरी कर्माचा आश्रय घेतात. जीव स्वतःला कर्ता समजत असतो. तो कर्माश्रय द्विविध दिसून येतो. बहिरंग व अंतरंग, शेती, व्यापार, कारखाने, नोकरी इत्यादी बहिरंग कर्मे आहेत, त्याचा आश्रय हा बहिरंग कर्माश्रय होय. योगाभ्यास, जप, तप, आदी अंतरंग कर्मे होत, त्याचा आश्रय हा अंतरंग कर्माश्रय होय. खरा भक्त या दोहोंचाही आश्रय घेत नाही. तो हा भरवसा ठेवीत नाही की, माझ्या या जपाने, तपाने, अनुष्ठानाने, व्रतादिकाने भगवान आम्हास वश होऊ शकेल. परमात्मा कोणत्याही कर्माचे मूल्य देऊन विकत घेता येत नाही. जप, तप, दान, व्रतादी हे भगवंताचे मूल्य होऊ शकत नाही. साधनाच्या क्षेत्रात बहिरंग कर्मे दान, तप, यज्ञ विहितधर्माचरण इत्यादी आहेत. अंतरंग साधने कर्मयोग तथा उपासना ही होते. पण या दोन्हीहि प्रकारच्या कर्माने भगवान प्राप्त होत नाही. स्वतः श्रीकृष्ण अर्जुनास स्पष्ट सांगतात - "सर्व धर्मान्परित्यज्य मामेक शरणं व्रज ॥" "अर्जुना सर्व धर्माचा परित्याग करून मला एकटयालाच शरण ये." म्हणून धर्माश्रयाचा परित्याग करून भगवंतालाच शरण गेले पाहिजे. साध्य वा साधन म्हणून त्याचाच आश्रय घेतला पाहिजे. "श्रीकृष्ण शरणं मम ।" हीच भावना जागृत ठेविली पाहिजे. कोणी जीवाश्रय घेणारे दिसून येतात, अमुक एक व्यक्ती माझे कल्याण करील, अमका मला सोडवील इत्यादी, पण कोणीही जीव स्वतः बद्ध, परतंत्रच असतो. तो दुसर्यास काय देऊ शकणार ? कोणी स्वबलाश्रयावर अवलंबून असतात - मी इतका जप, तप, दान, व्रते इत्यादिकाच्या द्वारे भगवंतास प्रसन्न करून घेईन, अशी भावना ठेवतात. भगवद्व्यतिरिक्त स्वबलाश्रय ही अन्याश्रयच आहे. खरा भक्त असेही म्हणत नाही. श्रीतुकाराममहाराजांची भावना पाहा, ते देवास म्हणतात -
आता तुज कळेल तें करी । तारिसी तरी तारी मारी ।
जवळीं अथवा दुरी धरी । घाली संसारीं अथवा नको ॥
शरण आलो नेणतेपणे । भावभक्ति काहीच नेणे ॥
काही काही सकाम भक्त अन्य देवतांचा आश्रय घेत असतात. जसे गोकुळातील गोपमंडळी वर्षाव व्हावा म्हणून इंद्रदेवतेच्या प्रीत्यर्थ इंद्रयाग करीत होती. श्रीकृष्णांनी त्यांना सांगून इंद्रयाग बंद करविला. श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनास सांगतात.
कामैस्तैस्तैहृतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवता. ॥ ७ - २०.
'आपल्या आपल्या स्वभावाने विवश झालेले लोक अनेक कामनांच्या पूर्तीच्या लोभाने ज्ञानविमूढ होऊन कामनांच्या पूर्तीच्या अनुरूप नियमांचे पालन करीत अन्यान्य देवतांना शरण जात असतात.'
श्रीकृष्ण पुढे म्हणतात, त्यांनाही त्या उपासनेचे फल देणारा मीच आहे, पण त्यांना ते कळत नाही. अशा अन्य देवतांचा आश्रय घेणे भक्तीत बाधक आहे. कारण अन्य देव हे तत्त्वतः जीवच आहेत. देव एकच आहे. भगवान शंकराचा परम नैष्ठिक असा उपमन्यू भक्त होता. एकदा भक्ताची खरी निष्ठा व अनन्यता पाहण्याच्या इच्छेने भगवान शंकर हे उपमन्यूपुढे देवराज इंद्राचा वेष घेऊन गेले. उपमन्यूने अभ्यागत समजून त्याचा आदर केला. इंद्राने उपमन्यूला अनेक प्रलोभने दाखविली. शंकर हे तुला काही देऊ शकणार नाहीत, मी तुला वाटेल ते देण्यास समर्थ आहे. तुला वाटेल ते वरदान मागून घे असे ते म्हणू लागले. तेव्हा उपमन्यू म्हणाला,
अपिकीट पतंगो वा भवेयं शंकराज्ञया ॥
नत्विंद्राह त्वया दत्त त्रैलोक्यमपि कामये ॥
उपमन्यू म्हणतो, 'हे देवराज, माझा स्वामी जो भगवान चंद्रमौली, त्याची आज्ञा होईल तर त्याच्या प्रसन्नतेकरिता मी कीटपतंगादी कोणत्याही योनीमध्ये जाण्यास आनंदाने तयार होईन, पण तू दिलेले त्रैलोक्याचे साम्राज्यही मला नको.' हे उपमन्यूचे भाषण ऐकून भगवान शंकर हे इंद्राचा वेष टाकून त्रिनयन-गंगाधर-नीलकंठ अशा शिवरूपाने त्याच्यापुढे प्रकट झाले अशी पुराणात कथा आहे.
कोणी म्हणेल, अन्य आश्रयाचा त्याग झाल्यावर अनन्यता, का भगवंताशी अनन्यता झाल्यावर अन्याश्रयाचा त्याग ? खरे म्हणजे माणूस जसा एका पायाने पुढे जमीन पकडून मगच दुसरा पाय उचलतो, तद्वत अगोदर भगवंताचा आश्रय घेऊनच खर्या रीतीने अन्य आश्रयाचा त्याग होत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात
गा ऐसे करी । यया आठा पहारा माझारी ।
तरी मोटके निमिष भरी । देत जाई ॥
मग जे जे का निमिष । देखेल माझे सुख ।
तेतुले अरोचक । विषयी घेईल ॥
जैसे शरत्काळ रिघे । सरिता वोहटू लागे ।
तैसे चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥
तैसे भोगा आतूनि निगता । चित्त मज माजी रिगता ।
हळूहळू पंडुसुता । मीचि होसील ॥ ज्ञा. १२. १०५ - ९
हा एक अनन्यतेचा अभ्यासच होय. अन्य आश्रयाच्या ठिकाणी विवेकाने मिथ्यात्वबुद्धी झाली तरी त्याचा त्याग होणे शक्य आहे.
देवाचे ठिकाणी दृढ श्रद्धा निर्माण झालेल्या भक्तापुढे अनेक विषय प्रतिबंधरूपाने आले तरी त्याचे ठिकाणी -
येर ती मायिके दुःखाची जननी ।
नाही आदि अंती अवसानी' (तु म.)
अशी मिथ्यात्व भावना झाली तर त्यांची आसक्ती राहत नाही व अनन्यत्वात बाधा येत नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवान 'अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम ॥' ९ - ३३ असे अर्जुनास स्पष्ट सांगून ऐहिक विषयांचे अनित्यत्व व दुःखरूपत्व पटवून देत आहेत. प्रपंचाचे मायिकत्व पटले की त्याचे अधिष्ठान जो परमात्मा त्याचे सत्यत्व पटते व त्याचे ठिकाणी अनन्यता राहणे सुलभ जाते.
'विषय तो त्यांचा झाला नारायण ।
नावडे जनधन मातापिता ॥' (तु. म.)
अन्य आश्रयाचा त्याग या वाक्यातील अन्य पदात अतिनिकट व अपरोक्ष रूपाने प्रतीत होणारा देह हा देखील अन्यच ठरतो. पण देहाविना भक्ती कशी होणार ? याचे उत्तर देह हा साधन मानला जातो. अज्ञान स्थितीत 'देहोहं' असा प्रत्यय असतो, त्या देहावरही भक्त उदास असतो.
झालो उदासिन देही । एकाविणे चाड नाही ॥
हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे.
अनन्यतेचे खरे स्वरूप सांगणारा श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक प्रसिद्ध आहे. "अनन्याश्चितयंतो मा ये जना पर्युपासते । तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥" ९ - २२
या श्लोकातील 'पर्युपासते' व 'नित्याभियुक्तानां' ही दोन पदे अनन्यतेचे स्वरूप दाखविणारी आहेत. 'पर्युपासते' म्हणजे सर्वत्र भगवंतालाच पाहतो, तद्व्यतिरिक्त दुसरी वस्तूच नाही असे मानतो.
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
यो मा पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति । गीता - ६ - ३०.
'अर्जुना, जो भक्त सर्वत्र मलाच पाहतो व सर्वही माझे ठिकाणीच पाहतो, पर्युपासते पदाने सर्व देशात (देशपरिच्छेदरहित) व "नित्याभियुक्तानां" ??? दाने सर्व काळात (कालपरिच्छेदरहित) व अनन्य पदाने सर्व वस्तूमध्ये (वस्तुपरिच्छेदरहित) भगवद्दर्शन होत असते असे सांगितले आहे. कोणी म्हणेल, जर भक्त असे सर्वदा सर्वत्र भगवत्स्वरूपच चिंतू लागला, कोणतेही सांसारिक कर्म न करील तर त्याचा संसार किवा निर्वाह कसा होईल ? याचे उत्तरही श्लोकातच "योगक्षेमं वहाम्यहम्" या प्रतिज्ञावाक्याने दिले आहे. भगवान म्हणतात, मी त्याचा योगक्षेम वाहतो. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व त्याचे रक्षण म्हणजे क्षेम.
त्याचा भार वाहे माथा । करी योगक्षेम चिंता ॥ तुकाराममहाराज.
योगक्षेम त्याचा जाणे जडभारी ॥ - तुकाराममहाराज.
आवडीने भावे हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥ - एकनाथमहाराज.
अशी पुष्कळ प्रमाणे व उदाहरणेही आहेत. (योगक्षेम पदाचा विशेष विचार पुढे सत्तेचाळिसाव्या सूत्राच्या विवरणाच्या वेळी होईल.)
या अनन्यतेचे व्याख्यान श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी या श्लोकावरील टीकेत अनेक दृष्टांतपूर्वक उत्कृष्ट असे केले आहे.
पै सर्व भावेंसी उखितें । जें वोपिलें मज चित्ते ।
जैसा गर्भ गोळा उद्यमातें । कोणाही नेणें ॥
तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेचि नाही ।
मजचि नाम पाही । जिणेया ठेविलें ॥
ऐसें अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसातें माते ।
जे उपासिती तयांतें । मीचि सेवि ॥ - ज्ञानेश्वरी ९ - ३३५ - ३७
भगवान श्रीकृष्णानी उद्धवास उपदेश करतेवेळी अनन्यतेचे स्पष्ट लक्षण सांगितले आहे.
काया वाचा आणि चित्त । गृहदारा वित्त जीवित ।
निष्कामता मज अर्पित । अनन्यभक्त ते माझे ॥ एकनाथी भागवत - २९ - ४३
माझिया आवडी तत्त्वतां । सर्वस्वें वेंचित जीविता ॥
कदा पालट नव्हें चित्ता । भावार्थता विश्वासी ॥
मीच एक देवाधिदेवी । सर्वभूतीं माझाची भावो ।
विकल्प विकृती संदेहो । घालिता पहाहो उपजेना ॥
नवल त्याची भजनख्याती । सायुज्जादि चारी मुक्ति ।
माझ्या नावावरूनि ओवाळितीं । भक्ति पढियंती येणे पाडे ॥
माडल्या अति विघ्न साकडे । ग्लानी न करिती आणिकाकडे ।
जाणती रामनामापुढे । विघ्न बापुडे ते किती ॥
गगन पडो पाहे कडाडे । पृथ्वी उलथावया गडबडे ।
ऐसे माडिलिया साकडे । नाम पुढें श्रीहरीचे ॥
ऐंसी देखोनि अनन्य प्रीती । मी सर्वस्वें भुललो श्रीपती ।
मग न पहातां कुळजाती । त्याच्या घराप्रती मी धांवे ॥
त्यासी छळो ये जे जें दूषण । तें तें त्यासीं होय भूषण ।
माझें भक्तीचे प्रसन्नपण । जाण संपूर्ण या नाव ॥ - ए. भा. २४ - ३३७ - ४८
जसे जसे भगवन्महात्म्य कळू लागते, जसे जसे भगवंताचे अनंत अलौकिक् गुण पटू लागतात, भगवंताची प्रेममयता अनुभवास येऊ लागते, तशी तशी अन्य पदार्थांच्या ठिकाणी भ्रमाने, मोहाने आलेले तादात्म्य नष्ट होऊन भगवत्स्वरूपाशी अनन्यता निर्माण होते.
अनन्यतेकरिता भक्तिशास्त्रात चकोर, चातक, भृंग, मत्स्यक, कृपण, पतिव्रत इत्यादिकांची उदाहरणे घेतली जातात. चकोर अन्य सर्व पदार्थांचा त्याग करून चंद्रामृताचेच सेवन करीत असतो. हे प्रसिद्ध आहे. चातक हा नद्या, समुद्र, तळी इत्यादी भरलेले असले तरी तिकडे ढुंकूनही न पाहता मेघाकडेच सतत दृष्टी ठेवून असतो. मेघातून एखादा थेंब जरी प्राप्त झाला तरी त्यातच संतोष मानतो. कित्येक वेळा हा मेघाकडे टक लावून बसला असता त्यातून गारांचा वर्षाव होतो, या चातकाची चोच फुटण्याचाही प्रसंग येतो. पण याची अनन्यता नष्ट होत नाही. भृग हा मोठ मोठी काष्ठे आपल्या सामर्थ्याने कोरून टाकतो, पण कोवळ्या कमळात अडकून पडतो. तसेच अनन्यतेत मत्स्य हाही फार श्रेष्ठ मानला गेला आहे. पाणी हे मानव, पशुपक्षी इत्यादी सर्वांनाच पाहिजे म्हणून त्यास जीवन अशी संज्ञा आहे. पण ते पाण्याशी अनन्य नाहीत. जलाविना काही काळ इतर प्राणी भागवू शकतीलही. ते फक्त जलप्राशन करतील, पण जलात अखंड वास्तव्य करणार नाहीत. पण मत्स्य हा जलाविना क्षणभरही राहू शकत नाही, श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटले आहे, पाण्याहून तुपात पुष्कळ गुण अधिक आहेत. एखाद्या मासोळीस म्हटले की, तू तुपात राहा तर ती तयार होईल का ? तिला पाणीच पाहिजे. तुकाराममहाराज म्हणतात,
जीव जिती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
तसेच कृपणाचे उदाहरणही प्रसिद्ध आहे. त्याच्याजवळ धन असते. संसारात सर्वानाच धनाची गरज असते. धनाने अनेक वस्तूची प्राप्ती होत असते. पण साधन म्हणूनच त्याचा सर्वजण उपयोग करीत असतात. एखाद्या वेळी दुर्दैवाने काही आपत्ती आली तर तिच्यातून पार पडण्याकरिता प्रसंगवशात सर्व धनाचाही त्याग करण्यास ते प्रवृत्त होतात. पण कृपणाचे तसे नाही. तो धनास साध्य समजत असतो, प्राण गेला तरी तो धनाचा त्याग करीत नाही.
कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवो निघाली ठेवयापासी ।
मग नुसधेन देहेंसी । आपण असे ॥ - ज्ञानेश्वरी ११. ६३३
सर्वभावें लोभ्या आवडे हे धन । आम्हां नारायण तैशापरी ॥ तुकाराममहाराज.
भागवत एकादश स्कंधाच्या तेविसाव्या अध्यायात एका कृपणाचे विस्तृत चरित्र सांगितले आहे. त्यावरील आपल्या टीकेत श्रीएकनाथमहाराजांनी कृपणाचे व त्याच्या कृपणतेचे विस्तृत वर्णन केले आहे, ते मुळातच पाहणे योग्य आहे. तसेच अनन्यतेकरिता पतिव्रतेचें उदाहरणही घेतले जाते.
पतिव्रतेचें हृदय जैसे । पतीवाचूनि न स्पर्शे ॥ - ज्ञानेश्वरी
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥ तुकाराममहाराज
श्रीतुकाराममहाराजांचा अन्य आश्रयाचा त्याग कसा व किती झाला होता हे त्यांच्याच वचनावरून पाहा.
तुका म्हणे एक विठ्ठलचि खरा । येर तो पसारा वाऊगाची ॥
फळकट संसार । येथ सार भगवंत ॥
विटले हे चित्त प्रपंचापासुनी । वमन ते मनी बैसलेसे ॥
सर्वच भक्तांना अन्य आश्रय त्यागपूर्वक ही भगवदनन्यता प्राप्त झालेली असते, त्याचे कारण वरील विवेचनावरून लक्षात येण्यासारखे आहे. म्हणूनच 'अन्याश्रयाणां त्यागोऽनन्यता' असे अनन्यतेचे लक्षण नारदमहर्षीनी सांगितले आहे.
निरोधनाच्या दुसर्या परिभाषेत हे सांगितले आहे की, भगवदनन्यता व विरोधी गोष्टीत उदासीनता हाच निरोध होय. अनन्यता म्हणजे काय हे या सूत्रात सांगितले, तद्विरोधी गोष्टीत उदासीनता म्हणजे काय हे पुढील अकराव्या सूत्रात श्रीनारदमहर्षी सांगत आहेत.
GO TOP
|