नारद भक्तिसूत्रे

तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषूदासीनता च ॥ ९ ॥


अर्थ : आणि (निरोध म्हणजे) त्या भगवंताचे ठिकाणी अनन्यता आणि त्याच्या प्रतिकूल विषयाचे ठिकाणी उदासीनता ठेवणे.


विवरण : मागील सातव्या व आठव्या सूत्रांत भक्तीचे लक्षण निरोध स्वरूपा हे सांगितले व निरोध म्हणजे लौकिक व वैदिक न्यास असे म्हटले आहे. त्या निरोधाचेच पुन्हा विशेष रूपाने या सूत्रात व्याख्यान केले आहे. वरील सातव्या व आठव्या सूत्रांत निरोधांची निषेधात्मक व्याख्या सांगून या नवव्या सूत्रात निरोधाचे विधायक स्वरूप सांगितले आहे. निरोधाचे पर्यवसान त्या प्रियतम भगवंताच्या ठिकाणी अनन्यता निर्माण होण्यात झाले पाहिजे. भक्ती ही अनेक प्रकाराने होऊ शकते म्हणजे केली जाते. पुढे सूत्रातच गौणी व परा या रूपाने तिचे भेद सांगितले आहेत. आणखीही भक्तीचे प्रतिपादन करणार्‍या ग्रंथांतून भक्तीचे अनेक प्रकार सांगितले आहेत. (त्याचा विचार छप्पन-सत्तावन्नाव्या सूत्रात येणार आहे.) तरी खरी भक्ती म्हणजे अनन्यता हीच आहे. श्रीमद्‍भगवद्‍गीतेमध्येही 'पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया' (८-२२), 'अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते' (१२-६) "अनन्याश्‍चिंतयंतो मां" (९-२२), भक्त्यात्वनन्यया शक्य' (११-५४) असे पूर्ण अनन्यतेचेच महत्त्व प्रतिपादन केले आहे. या अनन्यतेचे "नित्ययुक्त" "सततयुक्त" या शब्दाने स्वरूप प्रतिपादिले आहे. पण ती अनन्यता निर्माण होणे सुलभ नाही. जन्मजन्मांतरीच्या गुणवासना, संस्कार, विषयासक्ती, विकार हे त्या अनन्यतेस विरोध करीत असतात. नामस्मरण, ध्यान, पूजा, सेवा इ. करीत असताही चित्तवृत्ती बहिर्मुख होऊन परमात्मस्वरूपाशी अनन्य राहू शकत नाही. कित्येकवेळी हे विकार इतक्या चोरपावलाने येतात की, ते आले केव्हा व चित्तवृत्ती परमात्मस्वरूपापासून दूर झाली केव्हा हे लक्षात येणेही कठीण जाते. भक्तिमार्गात ही मोठी आपत्ती आहे. श्रीतुकाराममहाराज म्हणतात,
त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी । अवघी ती परी विटंबना ॥

जेव्हा एखादा वृक्ष लावला जातो तेव्हा त्याच्या मुळापासून लहान लहान फणगारे बाहेर पडतात. पण त्यामुळे तो वृक्ष शक्तिहीन होतो. त्या उपशाखा वाढून त्या वृक्षास क्षीण करीत असतात. अशा वेळी कुशल माळी त्या वृक्षाच्या लहान लहान शाखा छाटून टाकतो. नंतर तो वृक्ष पूर्णत्वाने वाढीला लागलेला दिसतो. याचप्रकारे एखादा भाविक भक्तिमार्गाने चालू लागला तर त्याच्या भक्तीमुळेच त्याला सन्मान, प्रतिष्ठा, लाभ, प्रसिद्धी, पूजा, कीर्ती, यश आदीची प्राप्ती झालेली दिसून येते. या लहान लहान शाखा त्याच्या मूळ भक्तिचाच नाश करणार्‍या सिद्ध होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. श्रीएकनाथमहाराजांनी आपल्या चिरंजीवपदात या विषयाचा स्पष्ट विचार केला आहे -
जनस्तुती लागे मधुर । म्हणती हा उद्धरावया हरीचा अवतार ॥

अशा रीतीने शब्द विषय आत शिरतो. मग हळूहळू ते लोक नाना प्रकारची फळे, मेवामिठाई, नैवेद्य, इत्यादी समर्पण करतात की रसविषयाचा अंतःकरणात प्रवेश होतो. अशाप्रकारे पाचही विषयांचा प्रवेश होतो. त्यामुळे तो भक्त विषयात गुरफटून जाण्याचा संभव असतो. अनादिकालीन विषयभोगाचे अनंत जन्माचे संस्कार, विषयांच्या ठिकाणी असणारी आकर्षणशक्ती, मोह-शक्ती त्याला आपल्याकडे खेचीत असते. तसेच सर्वच विषयांचा त्याग करू म्हटले तरी शक्य नाही. कारण देह निर्वाहाकरिता, शरीराचे योग्य प्रकारे संचलन होण्याकरिता, मन, प्राण, बुद्ध्यादिकाच्या कार्यक्षमतेकरिता काही तरी विषयांचे सेवन अपरिहार्य होते. केवळ 'रस' विषयाबद्दल श्रीज्ञानेश्‍वरमहाराज म्हणतात,
येरां इंद्रियां विषय तुटे । तेथ नियमूं नये रस हटे ।
जे जीवनचि हें न घटे । येणेंविण ॥ - ज्ञा. २ - ३०७

गीतेतही युक्ताहार-विहार साधकाकरिता सांगितला आहे. म्हणूनच सूत्रात 'तद्‍‍विरोधिषूदासीनता' म्हणजे ज्या विषयापासून साधक भक्ताला भक्तिमार्गात प्रतिबंध होण्याचा संभव आहे, त्यांना विरोधी म्हटले जाते. राजस, तामस विषय हे बहुधा विरोधी असतात. तसेच अशा विरोधी असणार्‍या काही विषयांचा त्याग करताही येतो. पण काहींचा त्यागही करता येत नाही, कारण ते अंगभूत असतात. काही अंतरात असतात. कित्येक वेळा देहातच काही व्याधी निर्माण होऊन देहतादात्म्यसंबंधामुळे साधकाचे मन तिकडे खेचले जाते. भक्त प्रल्हाद भगवंताशी अनन्यच होता. त्याचा जन्मदाता पिताच त्याला विरोध करीत होता. भरत हा श्रीरामचंद्राच्या ठिकाणी अनन्यच होता. पण त्याची माताच विरोधी होती, अशीही उदाहरणे आहेत. श्रीतुकाराममहाराजांच्या धर्मपत्नीस त्यांचे भजन आवडत नव्हते. अशा वेळी प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा त्याग करू शकत नव्हता, भरत कैकयीचा त्याग करू शकत नव्हता किंवा श्रीतुकाराममहाराजांनीही पत्नीचा त्याग केला नाही. जेव्हा विरोधी विषय त्यागयोग्य नसतात, पण बाधक होत असतात, तेव्हा त्याच्यापासून भक्ताने आपला बचाव करण्याचा उपाय 'उदासीनता' हा नारद महर्षी सांगतात. ज्या ज्या विरोधी गोष्टी असतील त्याचा भक्त विरोध करू शकत नाही. कारण ज्या ज्या गोष्टीचा आपण विरोध करीत असतो त्या त्या गोष्टी मनात अधिक येऊ लागतात. म्हणजे चित्तात अनेक वेळा अनेक विकार उठत असतात. श्रीतुकाराममहाराज म्हणतात -
काय काय करितों या मना । परी नायकें नारायणा ।
करूं नये त्याची करी विवंचना । नेऊ पतना आदरिलें ॥ - तु. महाराज.

असे होत असले तरी त्यांचा विरोधभावाने विचार घोळवू नये. अशा वेळी तिकडे उपेक्षेने पाहून परमात्मभावनेचाच विचार जागृत ठेवणे, म्हणजेच उदासीनता ईश्वरविरोधी गोष्टीत यत्किंचितही रस न वाटणे अथवा त्या गोष्टीचा विरोधीभावाने मनात द्वेषविचार न येणे असाही उदासीन पदाचा अभिप्राय होऊ शकतो. उदासीन शब्दाचा अर्थ पाहिल्यास 'उत-आसीनता.' उत म्हणजे वर; आसीनता म्हणजे राहणे, जाणे. कमळ चिखलाच्यावर, गुलाब काटयावर राहूनच खुलत असतो. ज्या ज्या विरोधी गोष्टी आहेत त्यांना त्यांना विचाराने खाली घालून भक्ताने त्याच्यावर (पलीकडे) गेले पाहिजे.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारूनि ॥ - तु. म.

जे भगवद्‌भक्तीच्या विरोधी आहेत, त्यांचा भक्त विरोध करील, शत्रुत्व करील तर त्याचेच कार्य आपण केल्यासारखे होईल. कारण विरोध करीत रहाण्यात मन भगवद्‍‍विमुख होण्याचा संभव आहे. तसेच त्यांच्याशी विरोध करीत बसण्यात भक्ताचा वेळ व्यर्थ जाण्याचा संभव आहे. तसेच विरोधामुळे प्रतिकूल विकारांचा वेग वाढण्याचाही संभव असतो. म्हणून 'तद्विरोधिषूदासीनता' असे म्हटले आहे. भगवद्‌भाव वाढविण्याच्या प्रयत्नांत विरोधी गोष्टीविषयी औदासीन्य सहजच निर्माण होते. या प्रकारे सावधानतेने वर्तन करीत राहणे हेही एक निरोधाचेच स्वरूप आहे, असे या सूत्राच्या द्वारे सिद्ध केले आहे.

या नवव्या सूत्रात त्या भगवंताच्या ठिकाणी अनन्यता ठेवावी असे सांगितले. त्या अनन्यतेचे विशेष स्वरूप स्पष्टरूपाने पुढील दहाव्या सूत्रात श्रीनारदमहर्षी सांगतात.


GO TOP