॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण ५ वे ॥

॥ लिंगदेह निरुपण ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥तंव बोलिला शिष्यांचा राणा ॥ जीव ईश्वरब्रह्माचे लक्षण ॥
रा‍उळें निरूपिलें पूर्ण ॥ मज कृपाबिद्धि ॥ १ ॥
तेव्हा शिष्यराजशिरोमणी म्हणाले- देवांनीं कृपा करून जीव, ईश्वर, व ब्रह्म ह्यांचें लक्षण मला पूर्णपणे सांगितले. १
आतां जीवसृष्टीची कथा ॥ सांगावी श्रीगुरुनाथा ॥
माझी फिटे संदेहव्यथा ॥ आत्मविषयींची ॥ २ ॥
आतां श्रीगुरुराजांनीं जेणेंकरून माझी आत्म्याविषयींची संशयरूप बाधा नाहीशी होईल, अशा प्रकारे जीवसृष्टीचा प्रकार कथन करावा. २
ऐसी शिष्याची विनवणी ॥ श्रीगुरुराजें ऐकूनी ॥
मग प्रेमभावे आलिंगुनी ॥ बोलता झाला ॥ ३ ॥
अशी शिष्याची विनंति ऐकून श्रीगुरुराजांनीं प्रेमभावाने आलिंगन दिले व बोलू लागले. ३
बा रे तुझिया प्रश्नें ॥ झाले सुखाचें पारणे ॥
तरी ऐक सावधानपणें ॥ बोलिजेल जें ॥ ४ ॥
बाबारे ! तुझ्या प्रश्नाने आनंदाचे पारणे झाले. तर आतां जें सांगूं तें सावधान चिचानें श्रवण कर. ४
हां गा आपुला अलंकार ॥ चोख करी जो सोनार ॥
तयाचा उपकार ॥ न विसरीजे पै ॥ ५ ॥
अरे ! असे पहा. आपला दागिना जो सोनार चोख घडवून देतो त्याचा उपकार न विसरण्यासारसाच म्हटला पाहिजे ( कारण, उत्तम दागिना असला म्हणजे त्याची वरचेवर वरचेवर आठवण होते व खाली ठेवावासा वाटत नाही.) ५
तैसें आपुलें निजसुख ॥ तुवां स्मरविलें देख ॥
जे स्फुरले उन्मेष ॥ मज ईश्वराविषयीं ॥ ६ ॥
त्याचप्रमाणें हे पहा ! आपल्या स्वात्मसुखाची तूं मला आठवण दिंलीस. तेणेकरून मला ईश्वरविषयक ज्ञानानी स्फूर्ति झाली. ६
घरोघरी रेटम काहाणी ॥ एक पुसे एक वाखाणी ॥
तया ब्रह्मसुखाची शिराणी ॥ हतदैवांसि कैची ॥ ७ ॥
घरोघर भाकडकथा चाललेल्या असतात. एक पुसत असतो; एक वाखाणणी करीत असतो. परंतु कपाळकरंट्यांना त्या ब्रह्मसुखाची इच्छा कोठची व्हायला ? नाहीच व्हावयाची. ७
आत्मयाचें परिज्ञान ॥ हें तत्पदार्थ शोधन ॥
एतदर्थी संन्यासादिक साधन ॥ श्रुती बोलती ॥ ८ ॥
आत्म्याचे परिज्ञान हेच तत्पदार्थाचें शोधन होय. ह्याविषयीं श्रुतीने संन्यासादिक साधन सांगितलेले आहे. ८
तत्पदार्थ ईश्वरेंदीण ॥ त्वंपरार्था नाही वर्तन ॥
ह्मणूनि पुनरपि कथन ॥ ऐक तत्पदीचें ॥ ९ ॥
तत्पदार्थ जो ईश्वर त्याच्याशिवाय त्वंपदार्थ कांही असावयाचा नाही. म्हणून तत्पदाचें पुन्हां एकवार निरुपण ऐक. ९
जो परमात्या महाविष्णु ॥ आदिपुरुष भगवानु ॥
जो सच्चिदानंदतनु ॥ पूर्वी निरूपिला ॥ १० ॥
पूर्वी सांगितलेला जो महाविष्णु परमात्मा, जो आदिपुरुष भगवान्, सत् चित् आनंद हेच ज्याचे शरीर; १०
जो सर्वात्मा सर्वसाक्षी ॥ सर्वेश्वर सर्वकुक्षी ॥
जो कांहींच नुपेक्षी ॥ निजभक्तातें ॥ ११ ॥
जो सर्वात्मा, सर्वसाक्षी, ईश्वर, आणि सर्व बाजूंस असणारा, जो आपल्या भक्तांकडून कशाचीच अपेक्षा करीत नाहीं; ११
जो देव अतिलाघवी ॥ नाही न ब्रह्मगोल दाखवी ॥
गेले ह्मणोनी लपवी ॥ जेथींचें तेथें ॥ १२ ॥
जो अतिशय मायिक लीला करणारा, नसतीच ब्रह्मांडे डोळ्यांसमोर उभी करणारा; आणि गेले म्हणजे जो जेथल्या तेथें गडप करून टाकणारा; १२
जयासी कानावीण ऐकणे ॥ डोळयावीण देखणे ॥
जिव्हेवीण चाखणे ॥ सर्व रसातें ॥ १३ ॥
कानांशिवाय ज्याचें ऐकणे, डोळ्यांशिवाय पाहणे, जिभेशिवाय सर्व रस चाखणे, १३
पायांवीण सर्व चालणें ॥ इ।तांवीण देणेंघेणें ॥
नवा जीवातें उद्धारणे ॥ इच्छामात्रे ॥ १४ ॥
पायांशिवाय चहूंकडे फिरणे, व हातांशिवाय-च त्याचे देणें घेणें चालते. आणि इच्छामात्रेंकरून जीवाचा उद्धार करतो. १४
जो जवळीची परी अतिदूरी ॥ दूरस्थ परी जीवाभीतरीं ॥
जयाची सत्ता निजव्यापारीं ॥ वर्तें इंद्रियग्राम ॥ १५ ॥
जो जवळच असून अतिशय दूर, दूर रहातो परंतु असतो जीवामध्येच ! ज्याच्या सत्तेने इंद्रियग्रामसमूह आपआपल्या व्यापारास प्रवृत्त होतात. १५
प्रतिग्रामीं अवभासक ॥ जैसा तरणीच एक ॥
तो सर्व जीवां प्रकाशक ॥ परमात्माचि पै ॥ १६ ॥
एकच सूर्य जसा प्रतिग्रामीं प्रत्येक गावात प्रकाशमान होतो, त्याचप्रमाणे तो एक परमात्माच सर्व जीवांना प्रकाश ज्ञान देणारा आहे १६
तोचि शबल तत्पदार्थ ॥ ज्ञानविग्रह अमूर्त ॥
सर्वव्यापक परी मूर्तिमंत ॥ भक्तांकारणें ॥ १७ ॥
तोच शबल तत्पदार्थ होय. अमूर्त अव्यक्त परंतु ज्ञानाने व्यक्त-स्पष्ट होणारा; सर्व बह्मांड-स्थिरचर व्यापून उरणारा खरा, परंतु भक्तांसाठी सगुण रूप धारण करणारा. १७
नट नाट्या धरितां ॥ आपणयातें न भुले सर्वथा ॥
तैसैं नाना अवतार घेतां ॥ न भुले स्वस्वरूप ॥ १८ ॥
नटनाट्य सूत्र हलवणारा, पण आपण मात्र अगदी अलिप्त. नानाप्रकारचे अवतार धारण करतो तरी स्वस्वरूप कांहीं चळत नाहीं. १८
सगुणरूप मायिक ॥ पेसे मानूनियां देख ॥
जे न भजती कौतुक ॥ ते मूढ जाणावे ॥ १९ ॥
हें पहा ! सगुणरूप हें मायिक असें समजून जे त्याचे आवडींने भजन करीत नाहींत, ते मूढ होत. १९
सोंग संपादितां तोषलेपणें ॥ नटासी दीजेती अलंकारभूषणें ॥
सोंग मिथ्या परि पावणे ॥ नटासीचि ॥ २० ॥
सोंग उत्तम उठले म्हणजे रवूष होऊन नटाच्या अंगावर अळंकार भूषणें टाकलीं तर सोंग जरी मिथ्या हें खरे, तरी तीं सर्व नटालाच पोचतात. २०
तैसें कीर मायिक अवतरण ॥ तेथे कीजे मजें भजन ॥
तें होय समर्पण ॥ जगदीश्वरी ॥ २१ ॥
तसेंच मायारूप जरी असलें तररी तेथे जें भजन घडते, तें जगदीश्वरालाच समर्पण होतें. २१
ह्मणूनि सर्वेश्वराचें भजन ॥ कांहीच नव्हे अप्रमाण ॥
जें भक्तासी कैवल्यसाधन ॥ ज्ञानद्वारें ॥ २२ ॥
ह्मणून सर्वेश्वराचें भजन हें मुळींच अप्रमाण नाहीं. भक्तांना ज्ञानमार्गाने तेंच कैवल्याचे साधन आहे. २२
श्रवण कीर्तन स्मरण ॥ पादसेवन अर्चन वंदन ॥
दास्य सख्य आत्मनिवेदन ॥ हे भक्ति नवविधा पै ॥ २३ ॥
श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद-सेवन, अर्चन, वंदन दास्य, सव्य व आत्मनिवेदन ही नवविधा ( नऊप्रकारची) भक्ति होय. २३
नवलक्षण भजनें ॥ सर्वेश्वर आभारलेपणे ॥
ज्ञान देऊनि बंधनें ॥ तोडी निजसेवकांचीं ॥ २४ ॥
ह्या नऊप्रकारच्या भजनानें सर्वेश्वर ऋणी होऊन आपल्या भक्तांची बंधनें ज्ञानाच्या द्वारे तोडून टाकतो. २४
तो देव परमात्मा ॥ ब्रह्म होईना जीवात्मा ॥
प्रपंच ठाईंचा अनात्मा ॥ तो देव कैसेनी ह्मणावा ॥ २५ ॥
तो देवच परमात्मा-परब्रह्म होय. जीवात्मा हा कांहीं ब्रह्म नव्हे. प्रपंच हा तर मूळचाच अनात्मा. त्याला देव कसें बरें समजावे ? २५
ब्रह्म तो ईश्वर कां न ह्मणावा ॥ ऐसा साक्षेपी बोल ऐकावा ॥
तत्त्वतः अद्वैत परी जाणावा ॥ भेद औपाधिक ॥ २६ ॥
ब्रह्म तो ईश्वर कां नव्हें ? ह्या आक्षेपाचे उत्तर ऐकावें. तात्त्विकरीत्या अद्वैतच आहे है खरे, पण भेद हा उपाधीने झाला आहे असे समजावे. २६
अहंता ममता प्रयत्‍नरहिता ॥ इच्छादि शक्तिचक्रें विवर्जिता ॥
ते ब्रह्म तूं आधीच तत्वता ॥ ईश्वर कैसेनि ॥ २७ ॥
अहंता, ममता, व प्रयत्‍नरहित, ज्याच्यामागे इच्छादि शक्तिचकें नाहीत, तें ब्रह्म तत्त्वतः पाहुं गेलें तर तूं मूळचाच आहेस, हें खरे. पण बाबा ! तूं ईश्वर कसा समजावास ? २७
इच्छादि शक्तिचक्राचा नियंता ॥ जो सृष्टि स्थिति संहारकर्तो ॥
षड्गुणैश्वर्याचा अशिष्ठिता ॥ तो ईश्वरू जाणावा ॥ २८ ॥
इच्छा आदिकरून माया शक्तिचक्राचें नियमन करणारा; जो सृष्टि ( उत्पत्ति,) स्थिति, व लय करणारा; षड्गुणैस्वर्याचा अधिष्ठाता असा आ ईश्वर समजावा. २८
जो अविद्याकर्में वेष्टितु ॥ अज्ञानवशें स्वस्वरूपीं भूलतु ॥
जो जीव सुखदुःखीं व्याकुळितु ॥ तो ईश्वरु कैसेनि गा ॥ २९ ॥
जो अविद्या, वासना व कर्म ह्यांनी वेढलेला असल्यामुळे ज्याला स्वस्वरूपाचें विस्मरण झालें आहे, जो सुखदुःखाने व्याकुळ होतो असा जीव, त्याला ईश्वर कसें म्हणावें तो जीवात्माच होय. २९
जीवासी तत्त्वज्ञानेंवीण ॥ नाहीं बंधविच्छेदन ॥
ते करावी सोडवण । ईश्वरेंचि कीं ॥ ३० ॥
जीवाला तत्त्वं पदार्थाचें ज्ञान झाल्याशिवाय त्याचें भवबंध तुटणर नाहींत आणि ही त्याची सोडवण ईश्वरच करतो. ३०
ब्रह्म तें निर्गुण निराकार ॥ तेथ नोहे उपदेश वेव्हार ॥
अविद्योपाधि जीव इतर ॥ स्वयें अज्ञानाचिये ॥ ३१ ॥
ब्रह्म हे निर्गुण आहे, तेथें उपदेश वगैरे कोणताही व्यवहार होऊं शकत नाही. इतर जे जीवात्मे आहेत ते अविद्येच्या उपाधीनें पछाडलेले व स्वतःसंबंधी अज्ञानी आहेत. ३१
तरलेनि बुडतु तारावा ॥ प्रबोधलेनि निद्रिस्तु चेववावा ॥
तेवीं नित्यमुक्तें प्रभुनें सोडवावा ॥ जीवसंघु हा ॥ ३२ ॥
जो तरलेला आहे त्यानें बुडणार्‍याला तारावें, जो जागा आहे त्यानें निजलेल्याला उठवावें. त्याप्रमाणें नित्यमुक्त अशा प्रभूनें सर्व जीवांना मुक्त करावें. ३२
अविद्या बंधन कीरु मिथ्या ॥ परि जीवासी पढियासे सत्त्या ॥
जैसी लटिकीची स्वप्नावस्था ॥ सुषुप्तासि होये ॥ ३३ ॥
अविद्येचें बंधन हे खचित खोटें आहे. परंतु जीवाला तें खरें व आवडणारे आहे. ज्याप्रमाणें झोपी गेलेल्याला स्वप्नांतला सर्व खोटा प्रकार खरा वाटतो त्याप्रमाणें. ३४
जरि अविद्याबंधन साच होते ॥ तरि ज्ञानाचेनि बापेंहि न लोटते ॥
देवासि थोर सायस पडते ॥ बंधमोक्षाचे ॥ ३४ ॥
अविद्येचें बंधन खरे असते त ज्ञानाच्या बापाकडूनही ते नाहीसें झाले नसतें आणि त्या परिस्थितींत देवाला जीवात्म्याची बंधनापासून सुटका करण्यास फार कष्ट पडले असते. ३४
अगा जें अज्ञान कैसें ॥ केवळीं नाहीं तेचि आभासे ॥
शुद्ध चैतन्या लावि पिसें ॥ जीवदशेचें ॥ ३५ ॥
अरे, ते अज्ञान कसे आहे असें म्हणशील तर तें हे. जे नाही तेंच आहे असें भासतें व जें अशुद्ध चैतन्यरूपी ब्रह्मालाही जीवदशेचें वेड लागतें ते. ३५
तेया आज्ञानाची स्थिति ॥ जो वोळखे गा निरुती ॥
तेयातें न बाधे हे संसृति ॥ म्हणौनि आईक तूं ॥ ३६ ॥
त्या अज्ञानाचे स्वरूप जो पूर्ण ओळखतो त्याला ह्या संसाराची बाधा होत नाहीं, ते तूं आतां ऐक. ३६
जो देवु शक्तिचक्राचा गोसावी ॥ सृष्तिसंकल्पे मायावी ॥
अपार जीवसृष्टि होवी ॥ यैसें इच्छिता जाला ॥ ३७ ॥
जो शक्तिचक्राचा स्वामी, मायेनें सृष्टि उत्पत्तीचा संकल्प करणारा "आपण अपार सृष्टीच व्हावे" अशी इच्छा करता झाला. ३७
प्रपंचाचें अनुसंधान करितां ॥ किंचित् स्वरूपीं जाला दुश्चित्ता ॥
तेथेहि उठिलिया अनंता ॥ अज्ञानशक्ति ॥ ३८ ॥
सृष्टीच्या निर्मितीचा विचार करतां करतां त्या अनुसंधानांत त्याचें स्वस्वरूपाच्या ठिकाणीं किंचित् दुर्लक्ष झाले तोंच अनंत अशा अज्ञानशक्ति उत्पन्न झाल्या. ३८
स्वस्वरूपीं दुश्चितेपण ॥ तेंच अज्ञानाचें लक्षण ॥
तेणें चैतन्यासि अवतरण ॥ भरे अहंकाराचे ॥ ३९ ॥
स्वस्वरूपासंबंधी दुर्लक्ष होणें हेंच अज्ञानाचे लक्षण होय. त्यामुळेंच चैतन्यामध्यें अहंकाराचे वारें शिरते. ३९
अवयव हस्तपादादिक ॥ एकाच देहाचे अंश अनेक ॥
तैसे अज्ञानसंगें आसक ॥ अंश मायादेवीचे ॥ ४० ॥
हात पाय वगैरे जसे एकाच देहाचे अनेक अवयव असतात, त्याचप्रमाणें अज्ञानाच्या योगानें मायादेवीचेही असंख्य अंश झालेले आहेत. ४०
एकाच बुद्धीच्या अनेक वृत्ती ॥ तेवीं मायेच्या अनेक शक्ती ॥
जाणिवनेणिवेच्या प्रतीति ॥ जगप्रसिद्ध कीं ॥ ४१ ॥
एकाच बुद्धीच्या जशा अनेक वृत्ति असतात, तशाच मायेच्याही अनेक शक्ति आहेत. जाणिवेचे व नेणिवेचे अनुभव जगप्रसिद्धच आहेत.
मायादेवीचा गोसावी ॥ ज्ञानशक्ती मायावी ॥
प्रविष्ट झालिया जीवात्मभावीं ॥ तोचि बोलिजे ॥ ४२ ॥
ह्या जीवात्मभावांत जी मायिक ज्ञानशकि प्रविष्ट झाली तिलाच 'मायदेवीचा स्वामी' म्हणतात. ४२
जैसा मुख्य एक सविता ॥ प्रतिबिंबासी तरी अनेकता ॥
तेंसी ईश्वर असे अनेक द्वैतता ॥ उपाधिभेंदें ॥ ४३ ॥
जसा मुरूय एक सूर्य असून प्रतिबिंबे अनेक असतात त्याचप्रमाणे एका ईश्वरामध्ये उपाधिभेदानें अनेक द्वैते आहेत. ४३
जेवीं मुख्य सूर्यमंडल ॥ तें असे निश्चळ ॥
प्रतिबिंबसूर्य तें व्याकुळ ॥ तरंगवशें ॥ ४४ ॥
ज्याप्रमाणे मुख्य सूर्यमंडळ आहे तें निश्चळ असून प्रतिबिंबित सूर्यलहरीच्या योगाने चंचल दिसतो. ४४
तैसे नित्यानंदभरित ॥ ईश्वर असे वर्तेत ॥
जीवसंगें व्याकुळ होत ॥ अज्ञानवशें ॥ ४५ ॥
त्याचप्रमाणे ईश्वर हा नित्य आनंदपूर्ण असून जीवाच्या संगतीने अज्ञानगभ्रमांत पडून विव्हळ होत आहे. ४५
तळीं पाणी असतचि असे ॥ तदंश तरंगांसी जन्ममरण दिसे ॥
तैसा देव परी विनाशे ॥ जीवसंगे हा ॥ ४६ ॥
तळ्यांतलें पाणी असते तसेंच असतें, परंतु त्याचेच अंश जे तरंग ( लाटा) त्यांना उत्पत्ति व नाश आहे असे दिसते. तसाच हा देव खरा पण जीवाच्या संगतीनें नाश पातवतो असे वाटते. ४६
तरंगाच्या जन्ममरणीं ॥ जेवीं न घेपिजे पाणी ॥
तैसी जीवधर्माची घाणी ॥ ईश्वरीं नलगे ॥ ४७ ॥
लाटांच्या उत्पत्तिनाशानें जसें पाणी घ्यावयाचें नाही, तसाच जीवधर्माचा मळही ईश्वरास लागत नाही. ४७
पाणीयासी कीजे वेगळें ॥ तरंगचि नाहीं कवणिये काळें ॥
परी तरंगधर्म ते जळें ॥ त्यजिलेचि कीं ॥ ४८ ॥
पाणी निराळें केलें मणजे कोणत्याही काळीं तरंग हा तर नाहीच, परंतु पाण्यानें लाटांचा धर्मच टाकला म्हणावयाचा. ४८
तैसे परमात्म्याचिये सत्ते ॥ सकल जीव असती पर्वत ॥
परी जीवधर्में कदाचित ॥ न घेपिजे तो ॥ ४९ ॥
त्याचप्रमाणें परमात्मा आहे ह्मणून सारे जीव आहेत. परंतु जीवघर्म त्याच्या अंगी मुळीच लावूं नये. ४९
आतां असो हे शब्दरचना ॥ चैतन्यें अधिष्ठितां अज्ञाना ॥
तत्क्षणीं विपरीतज्ञाना ॥ तेथेंचि आभास ॥ ५० ॥
असो. आतां हे शब्दजाल राहू दे. चैतन्यामध्ये अज्ञानाचें अधिष्ठान आलें की, तेथें लगोलग विपरीतज्ञान भासूं लागलेंच ! ५०
रज्जुविषयीं जें अज्ञान ॥ तयासी द्रष्टाचि अधिष्टान ॥
सर्पाकारें विपरीत ज्ञान ॥ उठिलें तेथेंचि पैं ॥ ५१ ॥
दोरी विषयीचे र्जे अज्ञान, तेथें द्रष्ट्याचेंच अधिष्ठान असतें. परंतु तेथेंच सर्पभ्रमानें विपरीतज्ञान उद्‌भवते. ५१
म्हणूनि अज्ञान अन्यथाज्ञान ॥ उभयांसी चैतन्य अधिष्ठान ॥
जडवर्गासि स्वतंत्रपण ॥ ते ठाईंच नाही ॥५२॥
म्हणून अज्ञान व अन्यथाज्ञान (विपरीत ज्ञान) या दोहोंसही चैतन्य हेंच अधिष्ठान आहे. जडवर्गाला स्वतंत्रपणा हा मुळांतच नाही. ५२
रूजू आपणाते नेणे ॥ नाहीं सर्पाकार जाणणें ॥
ह्मणूनि अज्ञान अन्यथाज्ञानें ॥ अजडीं आत्मरूपीं ॥ ५३ ॥
दोरी ही आपल्यास ठाऊक नाहीं, आणि ती सर्परूप आपण समजलो म्हणून अज्ञान व विपरीतज्ञान सूक्ष्म आत्मरूपांतच असतें. ५३
सूर्यरश्मीचे मेघ होती ॥ ते सूर्यातेंचि आवरिती ॥
परी सूर्याते लोपवूं न शकती ॥ दिवसपणातें ॥ ५४ ॥
सूर्यकिरगांपामूनच मेघ होतात, पण ते सूर्यालाच झाकतात. तरी ते सूर्याला-किंवा दिवसाला नाहीसे करूं शकत नाहीत. ५४
तैसें आपुलीया अध्रिष्ठानातें ॥ अज्ञान आवरी आत्मयातें ॥
साक्षित्व लक्षणीं प्रकाशातें ॥ कवण निवारी ॥ ५५ ॥
त्याचप्रमाणे आपल्याच अधिष्टानाला-आत्म्याला अज्ञान हें शनु आहे; परंतु त्याचा जो साक्षित्वाच्या रूपाने प्रकाश आहे तो कोण नाहीसा करणार ! ५५
आत्मा आपणयाते कीर नेणे ॥परी सर्वांतें साक्षित्वें जाणे ॥
इएं निवारावें कवणें ॥ विचारीपा ॥ ५६ ॥
आत्मा आपणाला जाणत नाहीं, परं_तु तो सर्व कांहीं साक्षित्वानें जाणतो आहे. तेव्हां ह्याचें निवारण कोण करील, त्याचा विचार तूंच कर क्षणजे झाले. ५६
अज्ञान अविद्या आवरिका ॥ बिपरीतज्ञान विक्षेपिका ॥
हा द्विविधा संसारदायका ॥ जीवात्मयासी ॥ ५७ ॥
अज्ञान अविद्या आवरण घालणारी, व विपरीत ज्ञान ही मधली अडचण दोन्ही मिळून जीवात्म्याच्या मागे संसार लावून देणारी होत. ५७
अविद्याप्रकृतीचा प्रवेश ॥ ह्मणूनि प्रकृति ऐसा निर्देश ॥
जीव परमपुरुषाचा अंश ॥ म्हणूनि पुरुष तो ॥ ५८ ॥
अविद्या हाच प्रकृतिचा आरंभ, व म्हणूनच अविद्येला प्रकृति अशी संज्ञा आहे. जीव हा परमपुरुषाचा अंश होय. म्हणून त्याला पुरुष असें म्हणतात. ५८
स्वरूपपरिपूर्णत्वाकारणे ॥ परमपुरुष ऐसें बोलणें ॥
हें बृहदारण्यकातें पुसणे ॥ नामनिर्वचन ॥ ५९ ॥
स्वरुपाच्या परिपूर्णत्वासाठी परमपुरुष असें म्हणावयाचें. हा नांवाचा विचार ’बृहदारण्यकांत' पहावा.५९
स्थूलदेह तोचि पुर ॥ तेथें जीव निद्रिस्थ निरंतर ॥
ह्मणूनि तो पुरुष हें उत्तर ॥ व्याकरणसिद्ध ॥ ६० ॥
स्थूल देह तेंच पुर ह्मणजे वस्तीचे ठिकाण, तेथें जीव हा निरंतर झोप घेत पडला आहे. ह्मणून तो 'पुरुष' हे व्याकरणसिद्ध उत्तर होय. ६०
ऐशीं प्रकृतिपुरुषांचीं द्वंद्वें ॥ उठली अनादिसिद्धें ॥
हें भगवद्‌गीतेत गोविंदे ॥ निरूपिलें असे ॥ ६१ ॥
अशीं प्रकृतिपुरुषांचीं द्वंद्वे अनादिसिद्ध उद्‌भवलेलीं आहेत. हें श्रीमद्‌भगवद्‌गीतेंत श्रीकृप्णांनीं सांगितलेले आहे. ६१
ब्रह्म तें तंव नित्य शुद्ध ॥ ब्रह्मविवर्त अनादिसिद्ध ॥
मायामय जीवसृष्टि विविध ॥ हेही अनादीची ॥ ६२ ॥
ब्रह्म हें तर नित्य व शुद्ध आहे. ब्रह्माच्या ठिकाणीं उत्पन्न झालेला विवर्तही अनादिसिद्ध आहे आणि ही विविध मायिक सृष्टि ही देखील अनादीच आहे. ६२
निरूपिलें जें अज्ञान ॥ तें जीवाचे देह कारण ॥
असो हे व्याले अन्यथा-ज्ञान ॥ लिंगदेहातें ॥ ६३ ॥
अज्ञान म्हणून जे सांगितले तेच जिवाला देह प्राप्त होण्याचे कारण असते. असो. आणि विपरीत ज्ञान हें लिंगदेहाला व्यापून टाकितें. ६३
अविद्यादर्पणीं प्रतिबिंबत ॥ प्रविष्ठ जीव स्वरूपें अनंत ॥
हिरण्यगर्भ तेथें संचरत ॥ लिंगरूपे ॥ ६४ ॥
अविद्यारूप आरशामध्ये प्रतिबिंबित झालेलीं, अनंत जीवस्वरूपे प्रकट झालेली आहेत. आणि तेथे लिंग (वासना) रूपाने हिरण्यगर्भाचा शिरकाव झालेला आहे. ६४
सूर्य दर्पणी प्रतिबिंबता ॥ सरसीच चाले प्रकाशता ॥
तैसा लिंगदेह प्रगटतां ॥ विलंब नलगे ॥ ६५ ॥
सूर्य आरशामध्ये प्रतिबिंबित झाला की, त्याबरोबर लगेच प्रकाशही येतोच. त्याप्रमाणे लिंग म्हणजे वासना व देह हीही बरोबरच प्रगट होतात. ३५
निर्विषय प्रथम स्फुरण ॥ तें जाणावे अंतःकरण ॥
संकल्प- विकल्पात्मक मन ॥ ओळखावे पै ॥ ६६ ॥
पहिले निर्विषय स्फुरण तेंच अंतःकरण होय. आणि संकल्प विकल्पात्मक ते मन म्हणून समजावे. ६६
स्फुरतपदार्थाचा आकार ॥ तेथींचा कीजे निर्धार ॥
ऐसा निश्चयात्मक वृत्यंकुर ॥ ते बुद्धि जाणावी ॥ ६७ ॥
स्फुरण झालेल्या वस्तूच्या रूपाचा निश्चय केला पाहिजे, असा वृत्तीचा अंकूर ती बुद्धि समजावी. ६७
चित चेतव्यलक्षण ॥ जे वृत्तीचे स्फुरण ॥
अनुसंधानात्मक जाण ॥ चित्तरूपें ॥ ६८ ॥
चित्तरूपाने अनुसंधानात्मक जे वृत्तीचें स्फुरण तेंच चित्ताचे चैतन्य (स्फूर्ति) लक्षण होय. ६८
देहीं अहंभावातें उठवी ॥ पदार्थममतेतें धरवी ॥
तो अहंकार जीवातें भोगवी ॥ सुखदुःखातें ॥ ६९ ॥
देहामध्ये मीपणाची प्रेरणा करतो, पदार्थांत ममता धरावयाला लावतो तो अहंकार होय. हाच जीपाला सुखदुःख भोगणे भाग पाडतो ६९
प्रकृतिपुरुषाच्या संयोगी ॥ अंतःकरणपंचकाच्या अंगीं ॥
स्फुरतीये चंचलतेच्पा वेगीं ॥ झाले पंचप्राण ॥ ७० ॥
प्रकृतिपुरुषांचा संयोग होऊन अंतःकरण पंचकाच्या ठिकाणी स्रुरण पावलेल्या चंचलतेच्या वेगाने पंचप्राण झाले. ७०
कवण प्राणाचे करण ॥ कैसें स्वरूप लक्षण ॥
कवण व्यापार कवण स्थान ॥ ते जाणावें पै ॥ ७१ ॥
कोणत्या प्राणाचे कोणते व कसकसे स्वरूप आहे ? त्यांचा व्यापार काय काय ? त्यांचे व्यापार काय काय ? व त्यांचे स्थान कोणकोणतें ? ते समजून ध्यावे. ७१
आपादतल मस्तक देहातें ॥ व्यापूनि भोगवी भुक्तरसातें ॥
देहींचिया सर्व नाडीते ॥ व्यापिलें व्याने ॥ ७२ ॥
व्यान हा देहामध्ये पायाच्या तळव्यांपासून मस्तकांपर्यंत भरून राहिलेला असून भुक्तरस सेवन करतो आणि देहांतील सर्व नाड्या व्यापून टाकतो.७
समान नाभिदेशीं वसे ॥ परी देहाचे सर्वसंधीं पैसे ॥
तेणें नलवती आपैसे ॥ हस्तपादादिक ॥ ७३ ॥
रइसमान हा नाभि (बेंबी) प्रदेशी वास करतो खरा, पण तो सर्व संधींत पसरलेला असतो. त्याच्यामुळेच हातपाय वगैरे हे लवतात. ७३
उदानाचे कंठस्थान मंदिर ॥ करी इच्छादि व्यापार ॥
स्वप्न दावी नानाविकार ॥ निद्रिस्थासी ॥ ७४ ॥
कंठस्थान हे उदानाचें घर होय. तो इच्छादिव्यापार चालवितो आणि निजलेल्यास नाना विकारांनी युक्त असे स्वप्र पाडतो. ७४
अपानासी गुदस्थानीं वैसणें ॥ सदा अधोगती चालणे ॥
मलमूत्र विसर्ग करणें ॥ व्यापार तयाचा ॥ ७५ ॥
अपानाची बैठक अपानमार्गींच असते. त्याची गति ह्मणजे नेहमीच अधोगति ( खालीच.) मलमूत्रोत्सर्ग करणे हा त्याचा व्यापार होय. ७५,
नासामार्गीं प्राणासी रिघनिघ ॥ प्रवेशनिर्गमांची लगबग ॥
क्षुधातृषेची लगलग ॥ होय तयाचेनी ॥ ७६ ॥
या।)। हा नाकावाटें आतबाहेर येत जात. असतो. त्याची आत येण्याची व वाहेर जाण्याची घाई उडालेली असते. त्याच्याच मुळें तहान व भूक ही लागतात. ७६
अंतःकरणवृत्ती शब्दोमुरव ॥ तें श्रोत्रेंद्रिय ओळख ॥
तयातें कर्णरंध्रींप्रीं बैसक ॥ तेधून घेई शव्दातें ॥ ७७ ॥
शब्दाकडे वळलेली जी अंतःकरणाची वृत्ति तेंच श्रोत्रेंद्रिय असे समज. त्याची बैठक कानाचे ठिकाणी असते; व तेथून तें शब्द ग्रहण करते. ७७
स्पर्शविषयातें निवडिती ॥ जे मनाचिया वृत्ती ॥
तें त्वगिंद्रय ऐसी स्थिती ॥ ओळखावी ॥ ७८ ॥
ज्या मनाच्या वृत्तीं स्पर्श विषयाची निवड करतात, तें त्वक्-त्वचा-इंद्रिय ही खूण समजावी. ७८
जे वृत्ति बुद्धीच्या पोटीं ॥ स्वरूपग्रहणोन्मुख उठी ॥
तें चक्षु डोळ्याचे वाटीं ॥ बैसूनि घे रूपातें ॥ ७९ ॥
जी वृत्ति बुद्धीच्या पोटांत स्वरूप ग्रहण करण्यासाठीं उद्‌भवते तें चक्षु इंद्रिय होय. ते डोळ्यांच्या वाटींत बसून रूप ग्रहण करतें. ७९
रसग्रहणोत्सुख चित्तवृत्ती ॥ तेचि नर्तकी मिरवती ॥
यमुखरंगी होय नाचती ॥ रसभावें ॥ ८० ॥
रस ग्रहण करण्यास प्रवृत्त झालेली जो चित्तवृत्ति तीच शोभती जिव्हा होय. तीच रसभावेंकरून मुखरंगाच्या ठिकाणी लुव लुव नाचणारी होय ८०
अहंकारगजाच्या कुंभस्थानीं ॥ घ्राण मुक्ताफळ झालें सुपाणी ॥
गंधमकाशाची फुलावणी ॥ ते नासापुटी ॥ ८१ ॥
अहंकाररूप हत्तीच्या गंडाम्थळावर प्राण (इंद्रिय) हे पाणीदार मोती उत्पन्न झालें. गंध (सुवास) ज्ञानाचा प्रफुल्लितपणा तो नासापुटांत येतो. ८१.
शब्द बोलूं पहाती ॥ जे अंतःकरणाची वृत्ति ॥
ते वागिंद्रिय मुखें करिती ॥ बोले मातृकाक्षरीं ॥ ८२ ॥
जी अंत:करणाची वृत्ति शब्द उच्चारूं पाहते, ते वागिंद्रिय होय. तें तोंडाच्या द्वाराने अक्षरोच्चार करूं लागतें. ८२
मनींची एक वासना ॥ करी ग्रहणोपादानकल्पना ॥
व्पापारार्थ होती आरोहणा ॥ पाणींद्रिये करिती ॥ ८३ ॥
मनांतील एक वृत्ति, उपादान कल्पना ग्रहण करते. ती पाणींद्रियांकडून हातांना व्यापारास प्रवृत्त करते. ८३
बुद्धीचावृत्तिविशेष ॥ अध्वसंक्रमण दोष उन्मेष ॥
होऊनि गगनासन्मुख ॥ चेष्टवीत चरणांतें ॥ ८४ ॥
बुद्धीची आणखी एक विशेषप्रकारची वृत्ति असते. तिला खालीं चालण्याची जी उणीव असते, तिची जागृति होऊन नाकासमोर जाण्याची पायांस चाळणा देते. ८४
आन्मया कृष्णाच्या परीं ॥ झाला चित्त-रुक्मिणीच्या उदरी ॥
शिश्न मन्मथाची चाड धरी ॥ रतिसुखाची ॥ ८५ ॥
आत्मारूप कृष्णाच्या घरी, चितरूप रुक्मिणीच्या पोटीं जन्मास आलेल्या मन्मथाची अर्थात् रतिसुखाची शिश्न इच्छा करते. ८५
अहंकारबीजाचा अंकुर ॥ करूं पाहे मलोत्सर्ग व्यापार ॥
गुदस्थानी बैसोनि निर्धार ॥ पायु इंद्रियें करी ॥ ८६ ॥
अहंकाररूप बीजाचा एक अंकूर, मलमूत्र विसर्जन व्यापार करूं पाहतो तो निथयेंकरून गुदस्थानीं बसून पायु इंद्रियाकडून ते काम करवितो. ८६
अंतःकरणपंचकवृत्ति ॥ शब्दादिविषयाकार- स्फूर्ती ॥
तेचि पंच विषय बोलिजेति ॥ लिंगदेहाचे ॥ ८७ ॥
अंतःकरण पंचकाची वृत्ति, शब्द वगैरे विषयरूपाने स्फुरण तेच लिंगदेहाचे पांच विषय म्हटलेले आहेत. ८७
एव पंचवीस कळांचा ॥ सूक्ष्मदेह जीवाचा ॥
हिरण्यगर्भ तेथींचा ॥ अधिदैवत पै ॥ ८८ ॥
येणेप्रमाणें जीवाचा सूक्ष्म देह पंचवीस कळांचा आहे. हिरण्यगर्भ हा तेथचा अधिदैवत आहे. ८
इंद्रियें सर्वेश्वराचीं ॥ तीं अधिदैवतें जीवाचीं ॥
हे जाणावी विवंचना तेथींची ॥ अधिभूतसहित ॥ ८९ ॥
सर्वेश्वराचीं इंद्रिये तीं जीवाची अधिदैवते होत. अधिभूतासहवर्तमान हा तेथला विचार समजून घ्यावा. ८९
अध्यात्म अंतःकरण ॥ अधिभूत निर्विकल्पस्फुरण ॥
तेथींचे अधिदैवत जाण ॥ वैकुंठनाथ ॥ ९० ॥
अंतःकरण हें अध्यात्म, निर्विकल्प स्फुरण ते अधिभूत् होय. तेथील अधिदैवत श्रीवैकुंठनाथ (विष्णु) होत. ९०
मन अध्यात्म निश्चित ॥ मंतव्य अधिभूत तेथ ॥
चंद्रमा-अधि-दैवत ॥ जाणावें पैं ॥ ९१ ॥
मन हे निश्वयेंकरून अध्यात्म, मंतव्य (विचारस्फुरण) तें अधिभूत व तेथचे अधिदैवत चंद्रमा हे ध्यानांत असूं दे. ९१
बुद्धि अध्यात्म जेथ ॥ बोद्धव्य अधिभूत तेथ ॥
ब्रह्मा अधिदैवत ॥ जाणावे पैं ॥ ९२ ॥
जेथें बुद्धि ही अध्यात्म आहे तेथें बोद्धव्य (ज्ञानवृत्ति) हे अधिभूत आणि ब्रह्मा हे अधिदैवत समजावे. ९२
चित्र अध्यात्म जेथ ॥ चेतव्य अधिभूत ॥
वासुदेव अधिदैवत ॥ जाणावे पै ॥ ९३ ॥
चित्त हे अध्यात्म, चेतव्य (चित्तवृत्ति) हे अधिभूत, आणि तेथेही वासुदेव अधिदैवत जाणावे. ९३
अहंकार अध्यात्म जेथ ॥ अहंकृतत्व अधिभूत ॥
श्रीरुद्र अधिदैवत ॥ निरंतर पैं ॥ ९४ ॥
अहंकार हे जेथे अध्यात्म आले तेथे अहंकर्तुत्व हे अधिभूत, आणि श्रीरुद्र (शंकर) हे निरंतरचेंच अधिदैवत होय. ९४
श्रोत्र अध्यात्म जेथ ॥ श्रोतव्य अधिभूत ॥
दिशा अधिदैवत ॥ सर्वथैव गा ॥ ९५ ॥
जेथें श्रोत्र हे अध्यात्म आहे तेथे श्रोतव्य (श्रोत्रवृत्ति) हे अधिभूत आणि दिशा हे सर्वथैव अधिदैवत होय. ९५
त्वचा अध्यात्म जेथ ॥ स्पर्शत्व अधिभूत ॥
वायु अधिदैवत ॥ प्रसिद्ध जाणावा ॥ ९६ ॥
त्वचा ही जेथे अध्यात्म आहे, तेथे स्पर्शत्व हे अधिभूत, आणि प्रसिद्ध वायु हे अधिदैवत असे समजावे. ९६
चक्षु अध्यात्म जेथ ॥ द्रष्ट्टत्व अधिभूत ॥
सूर्य अधिदैवत ॥ विख्यात पै ॥ ९७ ॥
चक्षु हे जेथें अध्यात्म आहेत, तेथें द्रष्ट्टत्व हे अधिभूत, आणि सूर्य हें विख्यात अधिदैवत होय. ९७
जिव्हेंद्रिय अध्यात्म जेथ ॥ रसयितव्य अधिभूत ॥
वरुण अधिदैवत ॥ ओळखावे ॥ ९८ ॥
जिव्हेंद्रिय जेथे अध्यात्म आहे, तेथें रसयितव्य हें अधिभूत, व वरुण हेँ अधिदैवत असें ओळखावें. ९८
घ्राणेंद्रिय अध्यात्म जेथ ॥ गंधत्व अधिभूत ॥
अश्विनौदेव अधिदैवत ॥ विख्यात पैं ॥ ९९ ॥
घ्राणेंद्रिय जेंथें अध्यात्म आहे तेथें गंधत्व हें अधिभूत आणि अश्विनौदेव हें प्रख्यात अधिदैंवत होय. ९९
वाचा अध्यात्म जेथ ॥ वक्तव्य अधिभूत ॥
वैश्वानर अधिदैवत ॥ जाणावें पै ॥ १०० ॥
वाचा जेथे अध्यात्म झाली, तेथे वक्तव्य हें अधिभूत, आणि वैश्वानर (अग्नि) हें अधिदैवत जाणावें. १००
पाणींद्रिय अध्यात्म जेथ ॥ ग्रहीतृत्व अधिभूत ॥
इंद्र अधिदैवत ॥ निभ्रांत पै ॥ १०१ ॥
हस्तेंद्रिय जेथें अध्यात्म झाले, तेथें ग्रहीतत्व हें अधिभूत, आणि इंद्र हे निःसंशय अधिदैवत होय. १०१
पादेंद्रिय अध्यात्म जेथ ॥ गंतव्य अधिभूत ॥
त्रिविक्रम अधिदैवत ॥ बुझावे गा ॥ १०२ ॥
जेथें पादेंद्रिय अध्यात्म आहे, तेथे गंतव्य हे अधिभूत, आणि त्रिविक्रम हे अधिदैवत हें लक्षांत आणावे. १०२
उपस्थेंद्रिय अध्यात्म जेथ ॥ आनंदयितव्य अधिभूत ॥
प्रजापति अधिदैवत ॥ जाणावें गा ॥ १०३ ॥
उपस्थेंद्रिय जेथे अध्यात्म आहे तेथे आनंदयितव्य हे अधिभूत, आणि प्रजापति हे अधिदैवत ओळखून ठेवावे. १०३
पायु अध्यात्म जेथ ॥ विसर्ग अधिभूत ॥
निर्ऋती अधिदैवत ॥ प्रसिद्ध जाणावें ॥ १०४ ॥
पायू हे जेथे अध्यात्म, तेथे विसर्ग हे अधिभूत, आणि नैर्ऋती हे प्रसिद्ध अधिदैवत समजलास ना ? १०४
अज्ञान अध्यात्म जेथ ॥ विकारयितव्य अधिभूत् ॥
पुरुष अधिदैवत ॥ निभ्रांत पै ॥ १०५ ॥
अध्यात्म अज्ञान हे जेथें आहे, तेथे विकारयितव्य हें अधिभूत, आणि पुरुष हें निःसंदेह अधिदैवत होय. १०५
जडत्व कारण प्राणासी ॥ तेवींच विषयपंचकासी ॥
अध्यात्मादीक तयासी ॥ विभाग नाहीं ॥ १०६ ॥
जडत्व हें प्राणाला तसेंच विषयपंचकालाही कारण होय ह्मणून त्याला अध्यात्म आदिकरून भेद नाही. १०६
आणीक ऐक कौतुक ॥ हा लिंगदेह जाण पुर्यष्टक ॥
प्रकार होऊनि ऐक ॥ निरूपिजेल ॥ १०७ ॥
आणखी एक मौज अशी आहे की, हा लिंगदेह आठ पुरांचा बनलेला आहे. तो सांगण्यांत येईल, तर एकाग्र चित कर. १०७
अविद्या काम कर्मे ॥ हें पुरत्रय एसें वर्म ॥
अंतःकरणपंचक नाम ॥ चतुःपुराचें ॥ १०८ ॥
अविद्या, वासना, आणि कर्म ही पहिली तीन पुरें ध्यानात ठेव. अंतःकरण पंचक हें चवथ्या पुराचें नाव होय. १०८
ज्ञानेंद्रियाचे पंचक ॥ ते पांचवें दुर सम्यक ॥
षष्ठ पुर ओळख ॥ कर्मेंद्रियपंचक ॥ १०९ ॥
ज्ञानेंद्रियपचंक ते पांचवें सम्यक् (उत्तम) पुर होय. पाच कर्मेंद्रियें ही साहवें पुर होय. १०९
पंचप्राण पुर सातवे ॥ विषयपंचक तें आठवे ॥
हे पुर्यष्टक जाणावें ॥ महानुभावी ॥ ११० ॥
पंचप्राण ते सातवे. आणि पांच विषय ते आठवे पुर होय. महानुभावांनी हेच 'पुर्यष्टक' असें समजावे. ११०
द्रष्ट्याचे द्रष्टेपण ॥ तेंचि पुर्यष्टकाचें दहन ॥
जाहालिया निरसे बंधन ॥ जीवात्मयाचें ॥ १११ ॥
द्रष्ट्याचें द्रष्टेपण (आत्मानुभव जागृति तें या आठ पुरांचें दहन (जळणे) होय. ते झाले म्हणजे जीवात्म्याचे बंधन नाश पावते. १११
असो हा शब्दविस्तार ॥ सांगीतला लिंगदेहविचार ॥
आतां स्थूलदेहाचा विस्तार ॥ म्हणे मुकुंदराज ॥ ११२ ॥
असो ही शब्दांची लांबण पुरे. आतापर्यंत लिंगदेहाचा विचार सांगितला. मुकुंदराज म्हणतात आतां स्थूल देहाचें विवरण करूं. ११२
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
लिंगदेहनिरूपणं नाम पञ्चमप्रकरणं समाप्तम् ॥

GO TOP