॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण ४ थे ॥

॥ ईश्वरतनुत्रयकथन ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥

मग श्रीपरमपुरुषें ॥ आपुलेनि इच्छावशें ॥
द्विधा केली असेषें ॥ तिये पंचमहाभूते ॥ १ ॥
श्रीगणेशाय नमः - नंतर त्या परमपुरुषानें आपल्या इच्छामात्रेंकरून तीं सर्व पंचमहाभूते द्विधा करून सोडली. १
यांमध्यें एकीं भागाचा ॥ तया पंचविसां कळांचा ॥
लिंगदेह सर्वेश्वराराचा ॥ आरंभिता झाला ॥ २ ॥
त्यांमधील एका भागाचा, त्या पंचवीस कळांनी युक्त, असा सर्वेश्वराचा लिंग देह त्याने आरंभीं तयार केला. २
जी तत्वें पंचवीस ॥ ती हिरण्यगर्भाचे अंश ॥
लिंगशरीर साभास ॥ ऐक देवाचे ॥ ३ ॥
पंचवीस तत्वें म्हणून जी आहेत, तीं हिरण्यगर्भाचे अंश होत. आणि साभास लिंगदेह हा मात्र एक देवाची (सर्वेश्वराचा) होय. ३
श्रोत्र दिशा त्वचा पवन ॥ चक्षू सूर्य जिव्हा वरुण ॥
अश्विनौदेव तें घ्राण ॥ हिरण्यगर्भाचें ॥ ४ ॥
दिशा हे त्या हिरण्यगर्भाचे कान होत. वायु ही त्वचा; सूर्य हे चक्षु (डोळे) वरुण ही जीभ आणि अश्विनौ देव हें त्याचे प्राण (नाक) होय. ४
वाचा वन्ही पाणी सुरपति ॥ पाद वामन शिश्न प्रजापति ॥
गुदेंद्रिय तो निर्ऋति ॥ प्रसिद्ध जाणावा ॥ ५ ॥
अग्नि ही त्याची वाणी; इंद्र हे हात; वामन हे पाय; प्रजापति हे शिश्न आणि प्रसिद्ध नैर्ऋती तो गुदेंद्रिय समजावा. ५
जया ब्रह्मांडीं विहरण ॥ तेचि प्रसिद्ध पंचप्राण ॥
दशधा भेदें भिन्न ॥सप्तचकें सप्तस्कंध जे ॥ ६ ॥
सर्व ब्रह्मांडांत विहार करणारे ते सुप्रसिद्ध पंचप्राण होत. ते दशविध भेदांनी वेगवेगळे झालेले आहेत. त्यास 'सप्तचक्र' व सप्तस्कंद अशा संज्ञा आहेत. ६
प्रथम जाणावा अवस्कंथ ॥ वापूभूमीपासून प्रसिद्ध ॥
मेघपर्यत स्वतःसिद्ध ॥ ओळखावा ॥ ७ ॥
पहिला आवस्कंध होय. भूमीपासून तो मेघापर्यंत जो प्रसिद्ध व स्वतःसिद्ध वायु तो 'आवस्कंध' समजावा. ७
प्रवस्कंध दुसरा ॥ मेघापासूनि अवधारा ॥
सूर्यापर्यंत खरा ॥ व्यापुनी असे ॥ ॥ ८ ॥
दुसरा प्रवस्कंध. हें पहा ! हा वायु मेघांपासून सूर्यापर्यंत खरोखर व्यापून असतो. ८
तिसरा उद्वस्कंध ॥ सूर्यापासूनि विशद ॥
चद्रमापर्यंत भेद ॥ ओळखावा ॥ ९ ॥
तिसरा उद्वस्कंध. हा खरोखर सूर्यापासून तो चंद्रम्यापर्यत गेला आहे. ही त्याची खूण ध्यानांत ठेव. ९
सइस्कंध चवथा ॥ चंद्रमंडलापासोनि तत्वतां ॥
नक्षत्रपर्यत पहातां ॥ विस्तारला जो ॥ १० ॥
सहस्कंघ हा चवथा स्कंध समज. हा पाहू गेले तर चंद्रमंडळापासून नक्षत्रमंडळापर्यत पसरला आहे. १०
विवस्कंध पांचवा ॥ नक्षत्रापासूनि जाणावा ॥
शनीपर्यंत बरवा ॥ विस्तारला जो ॥ ११ ॥
विवस्कंध हा पांचवा. हा नक्षत्रांपासून जो सारखा पसरला आहे तो शनीपर्यंत म्हणून समज. ११
षष्ठम परास्कंध ॥ शनीपासूनि त्याचा वेध ॥
सप्तऋषींपर्यंत भेद ॥ प्रसिद्ध जाणावा ॥ १२ ॥
साहवा परास्कंध. त्याचा वेध शनीपासून सप्तऋषींच्या तार्‍यापर्यंत गेला आहे हीच त्याची प्रसिद्ध खूण. १२
परिवाहस्कंध सातवा ॥ सप्तऋषींपासूनि सुहावा ॥
ध्रुवपर्यंत जाणावा ॥ मिळोनि असे ॥ १३ ॥
पारिवाह हा सातवा स्कंध होय. हा सप्तऋषींपासून तो थेट ध्रुवापर्धत जाऊन भिडला आहे, हें लक्षांत असू दे. १३
अतःकरण तो विष्णु ॥ चंद्रमा तो मनु ॥
बुद्धी कमलासनु ॥ हिरण्यगर्भाची ॥ १४ ॥
विष्णु हे त्याचे अंतःकरण व चंद्रमा ते मन; आणि ब्रह्मदेव ही त्या हिरण्यागर्भाची बुद्धि होय ! १४
चित्त तो नारायण ॥ अहंकार गौरीरमण ॥
एव पंचवीस तत्वांचा गुण ॥ लिंगदेह प्रभूचा ॥ १५ ॥
नारायण हे चित्त; व पार्वतीपति (शंकर) हे अहंकार होत. अशाप्रकारें पंचवीस तत्वांचा जो गुण तोच त्या प्रभूचा-सर्वेश्वराचा लिंगदेह होय. १५
हें सूक्ष्मभूतांचें दळवाडें ॥ लिंगदेह ईश्वराचे फुडे ॥
तथापि विषयसुख नातुडे स्थूलदेहावीण ॥ १६ ॥
हा सूक्ष्मभूतांभा समुदाय हाच त्या ईश्वराचा स्पष्ट लिंगदेह होय. परंतु स्थूलदेहावांचून विषयसुख अनुभवावयाला येत नाहीं. १६
तया सस्थूळदेहाचें निर्माण ॥ नाहीं पंचीकृतभूतांवीण ॥
म्हणूनि भूतांचे पंचीकरण ॥ देवें आरंभिले ॥ १७ ॥
त्या स्थूल देहाचे ठायी उत्पत्ति, पंचीकृत भूतांशिवाय नाही. म्हणून देवानें भूतांच्या पंचीकरणास आरंभ केला १७
एकैक भूत पंचघा कीजे ॥ पांचही पांचां ठाई मेळीवजे ॥
हा पंचीकृत प्रकार बोलिजे ॥ वेदांतशास्त्रीं ॥१८॥
एकेक भूत पंचधा करावयाचे आणि पांचही पाचामध्ये मिळवाययाचीं, यालाच वेदांतशास्त्रांत 'पंचीकरण' असे म्हटलेले आहे. १८
तो पंचीकृत प्रकार ॥ करिता झाला जगदीश्वर ॥
तेथींचा सांगिजेल निर्धार ॥ तो ऐकिजसु ॥ १९ ॥
हें पंचीकरण जगदीश्वरानें निर्माण केले. तेथचा विचार आतां सांगण्यांत येईल, तो तूं ऐकून घे. १९
सर्वेश्वरें अवलोकिले ॥ गगन पंचधा विभागिलें ॥
तें अंतःकरणरूपें राहिलें ॥ आपणपेंची ॥ २० ॥
सर्वेश्वराने दृष्टि फेकतांच आकाशाचे पांच प्रकार झाले. पण ते स्वत: मात्र अंतकरणरूपानेंच राहिलें. २०
व्यानांशें वायूसीं ॥ श्रोत्रांशे तेजासीं ॥
वाचा आपीं शब्द पृथ्वीसीं ॥ गगन मिळतें झाले ॥ २१ ॥
व्यान अंशेंकरून वायूशीसी, श्रोत्र अंशेकरून तेजाशी, वाचा अंशाने उदकाशी, आणि शब्दरूपाने आकाश हे पृथ्वीशीं मिश्र झाले. २१
पवन मनोरुपें ॥ आकाशी समर्पे ॥
समानांशें आपणपे ॥ अधिष्ठिता झाला ॥ २२ ॥
वायु हा मनाच्या रूपाने आकाशांत मिळाला आणि आपण मात्र समानाच्या अंशेकरून अधिष्टित झाला. २२.
सत्वांशें पावकीं ॥ पाणींद्रिये उदकी ॥
स्पर्शांशें पृथ्वीयेसि कीं ॥ वायु मिळता ज्ञाला ॥ ॥ २३ ॥
त्वचा अंशाने तेजामध्ये, हस्त इंद्रियानी उदकांत आणि स्पर्शांशेंकरून वायु हा पृथ्वींत मिळाला. २३
तेज बुद्ध्याकारें ॥ आकाशी संचरे ॥
पवनीं प्रवेशे वारे ॥ उदानरुपे ॥ २४ ॥
तेज हे बुद्धीच्या रूपाने आकाशांत शिरले. आणि हे पहा ! तेच उदानाच्या रूपाने वायूंत प्रगट झाले. १४
चक्षुरूप राहिले आपणपां ॥ पादेद्रिय मिळालें आपा ॥
रूपांशें पृथ्वीसि पां ॥ तेज मिळतें झाले ॥ २५ ॥
पादइंद्रियाच्या रूपाने उदकास आणि रूपाच्या रूपाने तेज हे पृथ्वीशी सामील झाले. पण आपण मात्र चक्षुरूपच होऊन राहिलें. २५
उदक चित्तांशें ॥ आकाशी प्रवेशे ॥
पवनीं समरसे ॥ प्राणरूपें ॥ २६ ॥
उदक हें चित्ताशेंकरून आकाशांत प्रविष्ट झाले ! आणि प्राणरूपाने वायूमध्ये एकजीव हाऊन बसले. २६
जिव्हांशें तेजासी ॥ आपणपां स्थिरावले शिश्नेंसीं ॥
रसांशें पृथ्वीसी ॥ आप मिळतें झालें ॥ २७ ॥
उदक हें जिव्हा-अंशेकरून तेजाशी आणि रसरूपाने पृथ्वीशीं एकवटले. आणि त्यानें स्वतः शिश्नाच्या ठिकाणी ठाणे दिले. २७
अहंकारें धरणी ॥ प्रवेशली गगनीं ॥
अपानरूपें पवनी ॥ मिळती झाली ॥ २८ ॥
पृथ्वी ही अहंकाररूपाने आकाशामध्ये सामावली, आणि अपानाच्या रूपाने वायूप्रत संयोग पावली. २८
घ्राणेंद्रियें तेजासी मिळाली ॥ गुदेंद्रियेंये आपासीं प्रवेशली ॥
गंधरूपें निजस्थानीं राहिली ॥ धरित्री हे ॥ २६ ॥
ही पृथ्वी घ्राणेंद्रियाच्या रूपाने तेजामध्ये व गुदेंद्रियेंकरून उदकामध्ये संमिश्र होऊन स्वत: मात्र गंध हेंच आपले ठिकाण करून बसली. २९
यापरी पंचीकृतें ॥ स्थूल पंचमहाभूते ॥
गुणकर्मधर्भसहितें ॥ निपजतीं झाली ॥ ३० ॥
ह्याप्रमाणे ही पंचीकृत भूतें स्थूल पंचमहाभूते, गुण, कर्म, धर्म ह्यांसहवर्तमान, उदयास आली. ३०
कवच भूतांचे कवण ॥ कर्म धर्म गुण ॥
ते सांगेन विवंचून ॥ ऐक पां तूं ॥ ३१ ॥
कोणकोणत्या भूताचे गुण, कर्म, व धर्म कोणकोणते ते आतां विवरण करून सांगेन, ते तूं ऐक. ३१
सच्छिद्रता हा धर्म ॥ अवकाश प्रधान कर्म ॥
तच गुण बुझ वर्म ॥ आकाशींचें ॥ ३२ ॥
सच्छिद्रता (छिद्र असणे) हा आकाशाचा धर्म होय. अवकाश पोकळी हे त्याचे प्रधान (?) कर्म, आणि शब्द हा त्याचा गुण. हे त्याचें लक्षण तुला उमजलेले असूं दे.३२
शब्द स्पर्श हे गुण ॥ चाचल्यता हा धर्म जाण ॥
वहनादिक कर्म करण ॥ वायूचे पै ॥ ३३ ॥
शब्द आणि स्पर्श हे वायूचे गुण, चंचलता हा त्याचा धर्म, आणि वाहणे वगैरे त्याचे कर्म करणे होय. ३३
शब्द स्पर्श रूप ॥ हे तेजीं गुणत्रयाचा आरोप ॥
उष्णता, हा धर्म देख ॥ कर्म पचनादिक ॥ ३४ ॥
शब्द, स्पर्श आणि रूप ह्या तीन गुणांचा तेजाच्या ठिकाणी आरोप करितात. उष्णता हा त्याचा धर्म, आणि पचवणे-शिजवणे वगैरे त्याचे कर्म होय. ३४
शब्द स्पर्श रूप रस ॥ आपीं हे गुण समरस ॥
द्रवत्व धर्म बहुवस ॥ कूदनादिक ॥ ३५ ॥
शब्द, स्पर्श, रूप, व रस हे सर्व गुण उदकाचे ठिकाणी एकवटलेले आहेत. ओलेपणा, द्रवणे हाच त्याचा मोठा धर्म, आणि कूदन आदिकरून त्याचे कर्म होय. ३५
शब्द स्पर्श रस रूप गंध ॥ हे गुण पृथ्वीचे प्रसिद्ध ॥
कठीणत्व धर्मकर्म स्वत: सिद्ध ॥ धारणादिक ॥ ३६ ॥
शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे पृथ्वीचे प्रसिद्ध गुण आहेत. कठिणपणा हा तिचा धर्म, आणि धारणा आदिकरून तिचे स्वतःसिद्ध कर्म आहे. ३६
कारणभूतांचे गुण ॥ कार्यानुरूप वर्तती जाण ॥
जैसे जळींचे सार्द्रपण ॥ वतें तरंगासवे ॥ ३७ ॥
भूतांचे गुण हे कारण होत. ते कार्यानुरूप बदलत असतात. ज्याप्रमाणे पाण्याचे पाणीपण लाटांच्या अनुषंगाने बदलत असते. ३७
एकैक भूतीं एकएक ॥ विशेष गुण मुख्य नायक ॥
अन्य भूतांचे, आगंतुक ॥ पर्वती कारणत्वे ॥ ३८ ॥
एकेका भूतामध्यें एक एक विशेष गुण मुख्य अगदी सर्वात अग्रगण्य असतो. आणि बाकीच्या भूतांचे कारणरूपानें अगांतुरक आलेले असतात. ३८
शब्द गुण असे आकाशीं ॥ ह्मणूनि वेद्य श्रोत्रेंद्रियासी ॥
गगनापासूनि जन्म वायूसी ॥ म्हणूनि द्विगुण तो ॥ ३९ ॥
आकाशामध्ये शब्दगुण असतो. म्हणून तो श्रोत्रेंद्रिदियास जाणला जाण्यास योग्य आहे. आकाशापासूनच वायूचा जन्म आहे म्हणून त्याला दोन गुण प्राप्त झालेले आहेत. ३९
शब्द स्पर्श गुण वायोसी ॥ म्हणोनि वय श्रोत्रत्वचेसी ॥
वायूपासाव जन्म तेजामी ॥ त्यजूनि त्रिगुण ते ॥ ४० ॥
शब्द आणि स्पर्श हे दोन गुण वायूचे आहेत. म्हणून ते श्रोत्र आणि त्वचा ह्यांनी जाणले जाण्यास पात्र आहेत. आणखी वायूपासून तेजाची उत्पत्ति झाली. अर्थातच तेजाच्या ठिकाणी तीन गुण आले. ४०
शब्द स्पर्श रूप हे गुण तेजासी ॥
म्हणूनि वेद्य श्रोत्रत्वचाचक्षूंसी ॥
तेजापासाव जन्म आपासी ॥ तें चतुर्गुण गा ॥ ४१ ॥
तेव्हां शब्द, स्पर्श व रूप हे तीन तेजाचे गुण झाले. म्हणून ते श्रोत्र, त्वचा, व चक्षु (डोळे) ह्यांनी जाणण्याजोगे झाले. आतां तेजाने उदक उदयास आणिलें. म्हणून ते चौगुणित झाले. ४१
शब्द स्पर्श रूप रस गुण ॥ आपासी म्हणूनि दृश्यपण ॥
श्रोत्र त्वचा मधु जिव्हा जाण ॥ जळासि गा ॥ ४२ ॥
शब्द, स्पर्श, रूप, व रस हे गुण उत्पन्न झाले. म्हणूनच पाणी दृश्य-व्यक्त-स्वरूपास आलें. म्हणूनच श्रोत्र, त्वचा, चक्षु जिव्हा ह्यांच्या ठिकाणी त्याचे ज्ञान आले, असे समज. ४२
उदकापासूनि जन्मली ॥ म्हणूनि तगुणपचंके आथिली ॥
इंद्रियपंचकासी वेद्य झाली ॥ धरित्री हे ॥ ४३ ॥
उदकापासून जन्म पावली म्हणून पृथ्वीला गुणपंचक लागू झाले. आणि तिचे ज्ञान पांच इंद्रियांच्या ठिकाणी आले. ४३
आपुलेनि इच्छामात्रे ॥ पंचभूतें विचित्रें ॥
कालऊनि रसतन्मात्रें ॥ कर्दम केला ॥ ४४ ॥
स्वेच्छामात्रकेरून हा विलक्षण पंचभूतांचा तन्मात्रेमध्ये रस कालवून कर्दम (चिखल) केला. ४४
असो हीं सरळ महाभूतें ॥ सर्वेश्वरें केली पंचीकृतें ॥
मग स्थूळ देह अनंतें ॥ निर्मिला कैसा ॥ ४५ ॥
असो. ही स्थूल महाभूतें सर्वेश्वराने पंचीकृत केली. आणि मग त्या अनंताने स्थूल-जड-देह कसा निर्माण केला ते ऐका. ४५
महातेजाचेनि प्रभावे ॥ कर्दम शोषिला स्वभावें ॥
मग निर्मिले देइभावें ॥ ब्रह्मांड हें ॥ ४६ ॥
महातेजाच्या प्रभावाने तो फर्रम आपोआपच शोषला गेला. आणि मग देहभावाने हें ब्रह्मांड निर्माण केलें. ४६
देवतामय लिंगदेहे ॥, तयाचें स्थूळ शरीर गृह ॥
म्हणूनि देवें अवयवसमूह ॥ रचिले ब्रह्मांड हे ॥ ४७ ॥
लिंगदेह हा देवतामय आहे. स्थूल करीर हें त्याचे घर होय. म्हणून ईश्वराने हे ब्रह्माण्ड हाच अवयवांचा समूह तयार केला. ४७
सप्तपाताळ ते चरण ॥ तेथे त्रिविक्रमाचे अधिष्ठान ॥
तेथींची विवंचना सांगेन ॥ ते ऐक पा तूं ॥ ४८ ॥
सप्त पाताळ हे पाय होत. तेथे त्रिविक्रमाचे अधिष्ठान असते. तेथचा विचार आतां सांगतो तो ऐक. ४८
सातवे पाताळ ते तळ ॥ विराट पुरुषाचे पादतळ ॥
प्रपद तें रसातळ ॥ जाणावे पैं ॥ ४९ ॥
सातवे पाताळ ते तळ म्हणजे विराटपुरुषाचें पादतळ (तळवा) होय. रसातळ हे प्रपद म्हणजे पायाचा दुसरा भाग होय. ४९
गुल्फद्वय तें महातळ ॥ पोटरीया तळातळ ॥
सुतळ ते जानुयुगुल ॥ विश्वरूपाचे ॥ ५० ॥
महातळ ते दोन्ही घोटे, तळातळ त्या पोटर्‍या, आणि सुतळ ते त्या विश्वरूपाचे दोन्ही गुडघे होत. ५०
वितळ आणि अतळ ॥ हे जाणावे ऊरुयुगल ॥
कटिप्रदेशांत महीतळ ॥ ओळखावें ॥ ५१ ॥
नितळ आणि अतळ ते दोन्ही मांड्या आणि महीतळ हा कमरेचा भाग समजावा. ५१
तृण गुल्म लता ॥ त्या रोमावली समस्ता ॥
गंगादि ना सरिता ॥ त्या नाडिचक्रें ॥ ५२ ॥
गवत, झाडेंझुडपें, व वेली त्या सर्व केशपंक्ति होत. गंगा वगैरे निरनिराळ्या नद्या तीं नाडीचक्रें. ५२
सप्तही सागर ॥ ते देवाचें उदर ॥
तेथें वडवानळ तो जठर ॥ वह्नी जाणावा ॥ ५३ ॥
सातसमुद्र हें देवाचे पोट होय. आणि त्यांत वडवानळ ती जठरातील उष्णता समजावी. ५३
नाभिस्थान ते नभमंडळ ॥ ज्योतिलोंक तें वक्षस्थळ ॥
महर्लोक तें कंठनाळ ॥ विराटाचे ॥ ५४ ॥
नभोमंडळ ते नाभिस्थान ज्योतिर्लोरु तें वक्षस्थळ (ऊर) आणि महर्लोक ते त्या विराटाचे कंठनाळ (गळा) होय ५४
जनोलोक तें वदन ॥ तपो-लोक तें ललाटस्थान ॥
मस्तक ब्रह्मभुवन ॥ सत्यलोक पै ॥ ५५ ॥
जनलोक हे तोंड, तपोलोक ते कपाळ, आगी ब्रह्मभुवन जो सत्यलोक तें त्याचें मस्तक समजावे. ५५
इंद्रलोक ते हात ॥ इंद्रासी अधिष्ठान जेथ ॥
दिशांचा पोकळ पंथ ॥ तीं कर्णरंध्रें ॥। ५६ ॥
इंद्रलोक ते हात, हेंच देशाचे अधिष्ठान होय. दिशांचा पोकळ मार्ग तींच कर्णरंधें (कानाचीं भोके) ५६
तरणीचे मंडळ ॥ तें जाणावें नेत्रयुगुल ॥
तेथें चक्षुरिंद्रिय विशाल ॥ सूर्यासारखें ॥ ५७ ॥
सूर्यमंडळ हेच दोन्ही नेत्र. येथें सूर्यासारखें विशाळ चक्षुरिंद्रिय असतें. ५७
पुत्र कलत्र स्नेह दांत ॥ दम दाढा उद्यत ॥
वरुण लोक विख्यात ॥ ते जिव्हा जाणावी ॥ ५८ ॥
बायका मुलांचा लोभ तेच दांत, यम ह्याच भयंकर दाढा, आणि प्रसिद्ध वरुणलोक ती त्याची जीभ होय. ५८
प्रजापतिलोक तें शिश्न ॥ निरयलोक गुदस्थान ॥
जलवृष्टि रेत जाण ॥ विराटपुरुषाचें ॥ ५९ ॥
प्रजापति लोक ते त्याचें शिश्नक, नरकलोक तेंच त्याचें गुदस्थान, आणि जलवृष्टि तेच त्या विराट पुरुषाचे रेत समजावे. ५९
एकाचि देहामाझारीं ॥ जैसी कृमींची भरोवरी ॥
तेणें समस्तेंसी चतुरी ॥ एकचि बोलिजे ॥ ६० ॥
एकाच देहामध्ये ज्याप्रमाणें कृमींची गर्दी असते, एम त्या सर्वांना शहाणे एकच नांव देतात, ६०
तैशा चौर्‍यांयशीलक्ष योनी ॥ असती ब्रह्मांडभुवनीं ॥
तिहींसहित वेदपुराणीं ॥ ब्रह्मांड बोलिजे ॥ ६१ ॥
त्याचप्रमाणे द्या ब्रह्मांडभुवनांत चौर्‍यांशी लक्ष योनी दाटल्या आहेत, त्या सर्वासही वेदांत व पुराणात ' ब्रह्मांड ' असे म्हटले आहे. ६१
ऐसा हा ब्रह्मांडगोल ॥ पंचभूतांचा निखिल ॥
या भीतरींसकल ॥ जीवसमूह ॥ ६२ ॥
अशाप्रकारे हा ब्रह्मांडगोल निवळ पंचभूतांचा आहे. आणि ह्याच्या पोटात सारे जीवसमुदाय आहेत ६२
या भूगोला दशगुण ॥ बाह्यपृथ्वीचें आवरण ॥
पृथ्वीसी दशगुण वेष्टून ॥ आवरण उदकाचे ॥ ६३ ॥
सा भूगोलाच्या दसपट बाह्य पृथ्वीचें आवरण असते; आणि पृथ्वीला दसपटीनें उदकाच्या आवरणाचा वेढा असतो. ६३
उदका दशोत्तर ॥ धडाडित वैश्वानर ॥
तवा दशगुण समीर ॥ आवरण गा ॥ ६४ ॥
आणि त्याच्याही दसपटीने उदकाला धगधगीत तेजाचें आणि त्याला त्याच्याही दसपटीने वायूचें आवरण असते. ६४
तया दशगुण अधिक ॥ बाहेरी नभाचा कंचुक ॥
नभा दशगुण कौतुक ॥ अहंकाराचे ॥ ६५ ॥
त्याला आणखी दसपटीने बाहेरून आकाशाचा वेढा असतो; आणि मौज ही की, त्या आकाशाला दसपटीने अहंकाराचा वेढा असतो. ६५
अहंकारा दशगुण ॥ म-हत्तत्वाचें पांघरूण ॥
ऐसें है सप्तावरण ॥ ब्रह्मांड पै ॥ ६६ ॥
अहंकारालाही दसपटीनें महत्तत्वाचें पांघरूण असते. येणॅप्रमोणं हें ब्रह्मांड सप्त आवरणात्मक आहे. ६६
जैसा सप्तकंचुक पिंड ॥ तैसेंचि हें ब्रह्मांड ॥
म्हणूनि उभयतांचें कोड ॥ एकसारखे ॥ ६७ ॥
जसा सात पदरीं पिंड असावा, त्याप्रमाणेच हे ब्रह्मांडही आहे. म्हणून दोघांचीही गोष्ट एकसारखीच आहे. ६७
ऐसिया ब्रह्मांडाच्या कोटी ॥ उपजती मायादेवीच्या पोटीं ॥
असो हे तत्वसृष्टी परिपाठी ॥ तुज निरूपिली ॥ ६८ ॥
अशाप्रकारची कोटि ब्रह्मांडे त्या मायादेवीच्या पोटी जन्मास येतात. असो. हा तत्वसृष्टीचा प्रकार तुला कथन केला. ६८
हे ब्रह्मांड स्थूलशरीर ॥ श्रीप्रभूचा गा विस्तार ॥
तेथें सृष्टिरचनेचा उभार ॥ ते जागृती अवस्था ॥ ६९ ॥
हे पहा ! हे ब्रह्मांडरूप स्थूशरीर हा त्या श्रीसर्वेश्वराचाच पसारा आहे. तेथे सृष्टिरचनेची उभारणी ही जागृति अवस्था होय. ६९
स्थूलदेह ब्रह्मांड ॥ सृष्टिअवस्था प्रचंड ॥
या दोहोंचा अभिमानी अखंड ॥ जो ब्रह्मा सृष्टिकर्ता ॥ ७० ॥
ब्रह्मांड हा स्थूल देह, आणि सृष्टि ही त्याची प्रचंड अवस्था (जागृति) आहे. सृष्टिकर्ता जो ब्रह्मदेव तो ह्या दोहोंचा अखंड अभिमानी होय. ७०
प्रणवाची प्रथम मात्रा ॥ अकाराक्षर जे पवित्रा ॥
आतां दोहींच्या चरित्रा ॥ बोलतसे ॥ ७१ ॥
पवित्र अकार-अक्षर ही प्रणवाची (ओंकाराची) पहिली मात्रा होय. आतां त्या दोहोंची गोष्ट सांगतो. ७१
हिरण्यगर्भाख्य लिंगदेह ॥ जेथें हरी अभिमानी होय ॥
तेथें स्थिति अवस्था निःसंदेह ॥ स्वप्न बोलिजे ॥ ७२ ॥
हिरण्यगर्भ हाच प्रसिद्ध लिंगदेह, येथचा अभिमानी हरी (श्रीविष्णु) येथली स्थिति म्हणजे निःसंशय स्वप्न-अवस्था होय. ७२
हिरण्यगर्भ स्थिति अवस्वा ॥ या देहींचा अभिमानी भोक्ता ॥
जो विष्णु तारी बुडता ॥ भवसागर्री ॥ ७३ ॥
हिरण्यगर्भाची त्या स्थितीतील ही अवस्था असून त्या देहाचा अभिमानी व भोक्ता संसारसमुद्रांत बुडत असतांना भक्तांना तारणारा-श्रीविष्णु होय. ७३
या त्रपातें असे बोलत ॥ प्रणवींचा उकार जो विख्यात ॥
द्वितीय मात्रा ऐसा संकेत ॥ तेथें बोलिजे ॥ ७४ ॥
याच त्रयीला प्रणवांतील प्रसिद्ध उकार क्षणतात. त्यालाच द्वितीय मात्रा अशी संज्ञा आहे. ७४
देवाचा कारणदेह प्रकृती ॥ जेथें महाप्रळय सुषुप्ती ॥
या दोहींचा अभिमानी गौरीपति ॥ तेथें बोलिजे ॥ ७५ ॥
प्रकृति हा देवाचा कारण देह असून तेथे सुषुप्ति महाप्रळय ही होय. गौरीचे पति शंकर हेच त्या दोहोंचे अभिमानी होत. ७५
या तिहींचा उच्चार ॥ करी तृतीयमात्रा मकार ।
असो सकलही ओंकार ॥ विस्तारला ॥ ७६ ॥
ह्या तिहींचा उच्चार तोच मकार, व तीच तिसरी मात्रा होय. असो. अशाप्रकारें हा सर्वही ओंकार विस्तार पावला. ७६
विराट हिरण्य-गर्भ माया ॥ हे सर्वेश्वराचे देहत्रय ॥
उत्पत्ति स्थिति प्रळय ॥ अवस्थात्रय पै ॥ ७७ ॥
विराट, हिरण्यगर्भ व माया हेच सर्वेश्वराचे तीन देह होत. आणि उत्पत्ति, स्थिति व प्रळय द्या त्यांच्या तीन अवस्था होत. ७७
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ हे अभिमानी सुरवर ॥
अकार उकार मकार ॥ मात्रात्रय हें ॥ ७८ ॥
ब्रह्मा, विष्णु, व महेश हे श्रेष्ठ देव अभिमानी आहेत. अकार, उकार, मकार ह्या तीन मात्रा होत ७८
रज सत्व तम हें गुणत्रय ॥ प्रणवाचें पादत्रय ॥
असो हे उभवणी मायामय ॥ जेणें रचिली ॥ ७९ ॥
रज,सत्व, व तम हे तीन गुण हेच प्रणवाचे तीन पाद होत. असो. अशी ही मायिक उभारणी ह्याने केली. ७९.
हे कारणरूप उपाधी ॥ सर्वेश्वरीं वर्ते त्रिशुद्धी ॥
केवळ ब्रह्मीं विशुद्धीं ॥ ते आथीचिना !। ८० ॥
ही कारणरूप उपाधि सर्वेश्वरालाच निश्चयेंकरून असते. केवळ ब्रह्म मात्र अगदी शुद्ध असतें. तेथें मात्र ह्याचें नांव नाहीं. ८०
इा कारणोपाधिमिश्रित ॥ निरूपिला शबल तत्पदार्थ ॥
पश्रीमुकुंदमुनि त्वंपदार्थ ॥ आतां सांगिजेल ॥ ८१ ॥
हा कारण व उपाधि (यांशी संयोग पावलेल्या शबल तत्पदार्थ सांगितला आतां श्रीमुकुंद मुनी त्वंपदार्थाचें निरुपण करतील. ८१
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
ईश्वरतनुत्रयकथनं नाम चतुर्थप्रमकरणं समासं ॥

GO TOP