॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण ३ रे ॥

॥ तत्त्वसृष्टि कथन ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥



ऐके शिष्य शिरोमणी ॥ धन्यधन्य तुझी पाणी ॥
आठवे येथीच्या प्रश्नीं ॥ परमपुरुष तो ॥ १ ॥
श्रीगणेशाय नमः - हे शिष्यशिरोमणे ! ऐक. तुझी वाणी धन्य धन्य आहे ! ( कारण आजच्या या तुझ्या प्रश्नांनीं त्या परमपुरुषाचे स्मरण होते. १
स्वरुपांवरीं निर्गुणी ॥ उपटती जीवेश्वराच्या श्रेणी ॥
तेथींची करावी उपलवणी ॥ स्वानुभवें कीं ॥ २ ॥
त्या निर्गुण स्वरूपाच्या चांदव्यावर जीवेश्वरांच्या पंगतीच्या पंगती बसलेल्या आहेत. त्यांचा विस्तार करावयाचा म्हणजे स्वानुभवानेच केला पाहिजे. २
पाथरवटाची टांकी ॥ जरी झाली तिखी निकी ॥
तथापि करूं नये मौक्तिकी ॥ रंध्रशलाका ॥ ३ ॥
पाथरवटाची टांकी कितीही जरी तीक्ष्ण झाली तरी ती मोत्याला भोक पाडण्याची सळई करून काही उपयोगाची नाही. ३
तैशा देशवळा युक्ती ॥ घेऊं नये ब्रह्मसंविती ॥
तेथें विवेकाची संपत्ती ॥ निकी व्हावी लागे ॥ ४ ॥
त्याप्रमाणेच आपले प्राकृतज्ञान कांही ब्रह्मज्ञानाच्या उपयोगी पडावयाचे नाही. तर तेथे विवेकाचेच भांडवल भरपूर पाहिजे. ४
म्हणूनि विवेकाचे कान ॥ करूनि ऐक निरूपण ॥
अनुक्रमें तुझे प्रश्न ॥ सांगिजेती ॥ ५ ॥
म्हणून विवेकाचेच कान करून निरूपण ऐक. आतां तुझे पत्र ओळीनेच सांगत जाऊं. ५
जे ज्ञक्तिचक्रासी वेगळ ॥ जें ज्ञप्तिमात्र केवळ ॥
तें निजानंद निर्मळ ॥ परब्रह्म जाणावें ॥ ६ ॥
जें शक्तिचक्राच्या पलीकडचें, जें केवळ ज्ञप्तिमात्रच, तें निजानंद आणि निर्मळ स्वरूप परब्रह्म होय, हें लक्षांत असूं दे. ६
दृश्थ द्रष्टा दर्शन ॥ हे त्रिपुटी जेथें क्षीण ॥
तं परब्रह्म जाण ॥ अनिर्देश्य ॥ ७ ॥
दृश्य, द्रष्टा, आणि दर्शन, ही त्रिपुटीरी जेथे मावळते ते अनिर्देश्य, ज्याचा निर्देश करतां येत नाही, तें अनिर्वचनीय परब्रह्म हे ध्यानांत आण. ७
ज्ञाता ज्ञान ज्ञेय ॥ हें जेथें नाहीं त्रितप ॥
तें परब्रह्म अप्रमेय ॥ जाणावे पै ॥ ८ ॥
ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे त्रिकुट जेथे नाहीं, तेंच अप्रमेय परब्रह्म असें समज. ८
ज्ञान म्हणूं तरी नाहीं जाणिव ॥ अज्ञान म्हणूं तरी नाही नेणिव ॥
अभाव म्हणूं तरी नवल ठेवा । आनंदाची ॥ ९ ॥
ज्ञान म्हणावे तर जाणीवही नव्हे; अज्ञान म्हणून म्हणावयास जावे तर नेणिवही नव्हें. बरें; ही दोन्हीही नव्हेत ह्मणन अभाव म्हणावा तर आश्चर्य हे आहे की ती आनंदाची ठेव आहे. ९
अभाव म्हणिजे तें शून्य ॥ शून्यवादीयाचें मत ते जधन्य ॥
म्हणूनि जगीं तेचि गा धन्य ॥ ब्रह्मविद जे ॥ १० ॥
अभाव म्हणजे शून्य, म्हणून शून्यवाद्याचे मत अगदीं कुचकामाचें, निंद्य. ह्यासाठी जे ब्रह्मज्ञानी आहेत तेच जगांत धन्य होत. १०
आहे म्हणूं तरी केसेनि घ्यावें ॥ नाही म्हणूं तरी कैसेनि सांडावें ॥
असो हे ब्रह्म अनुभवावे ॥ जयाचें तेणेंचि ॥ ११ ॥
आहे म्हणावे तर घ्यावयाचें कसें ? नाही म्हणावे तर सोडावयाचे कसे ? कारण तुमच्या आजूबाजूला, वर, खालीं, व आतही तेच भरून राहिले आहे. असो. तर हे ब्रह्म जे आहे, ते ज्याचे त्यानेंच अनुभवावे. ११
जें निद्रिस्थातें चेववी ॥ चेइलीयातें जाणवी ॥
जागलीयाते भोगवी ॥ परी अक्रिय तें ॥ १२ ॥
जे निजलेल्यास चावळवते, चावळलेल्यास जागृती देते, आणि जागृताला भोग भोगावयाला लावते. आणि असे असून ते पुन्हा अक्रिय ! १२
स्फटिकशिळेचें पोट ॥ जैसे निरंतर निघोट ॥
तैसें चैतन्य एकदाट ॥ परब्रह्म तें ॥ १३ ॥
स्फटिक शिळेचे पोट जसे निरंतरचेंच निघोट, अगदी तुळतुळीत असते, तसेच एकदट भरून राहिलेले चैतन्य तेच परब्रह्म होय. १३
नातरी गगनाऐसें पोकळ ॥ व्यापक परी व्याप्यासि वेगळ ॥
निजप्रकाशें सोज्वळ ॥ आपण पैंची ॥ १४ ॥
किंवा आकाशाममाणें पोकळ व तसेच व्यापकही खरे पण व्यापले जाणारे मात्र नव्हे. आपल्या प्रकाशाने आपणच सोज्ज्वळ झाले ! १४
ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥ करितां शिणती निजव्यापार ॥
मग सविती विश्राममंदिर ॥ परब्रह्म ते ॥ १५ ॥
ब्रह्मा, विष्णु आणि शंकर आपआपले कर्तव्य करून थकले म्हणजे मग जेथे विश्रांतीचे स्थान म्हणून विसाव्यास येतात तेच परब्रह्म होय. १५
जेथें विद्या ना अविद्या ॥ जे अनुपम्य स्वसंवेद्या ॥
तें जाणावे सुविद्या ॥ ब्रह्मस्वरूप तूं ॥ १६ ॥
विद्या अविद्या रहित, उपमारहित, स्वत: जाणण्यास योग्य असे ब्रह्म तू जाण. १६
झाला पां सर्वेश्वरु ॥ धरिला जाणिवेचा अहंकारु ॥
तरी तोही नेणे पारु ॥ तया स्वरूपाचा ॥ १७ ॥
सर्वेश्वर जरी झाला तरी देखील तो जर जाणिवेचा अहंकार धारण करील तर त्याला सुद्धां त्या स्वरूपाचा अंत लागावयाचा नाही. १७
म्हणूनि अहंकार गळे ॥ आणि कल्पना मावळे ॥
तरीच ब्रह्म आकळे ॥ स्वानुभवासी ॥ १८ ॥
म्हणून अहंकार जेव्हां झडून जाईल, आणि कल्पना मावळेल तेव्हांच स्वानुभवपूर्वक ब्रह्माचे आकलन होईल. १८
ब्रह्मगोळकाचें सहस्त्र ॥ व्यापूनि सबाह्यांतर ॥
आसकेंचि उरलें निरंतर ॥ ब्रह्मरूप जे ॥ १९ ॥
हजारो ब्रह्मांडे, आंतून बाहेरून व्यापून टाकून जे निरंतर सर्वत्वाने उरलेले आहे, तेच परब्रह्मस्वरूप होय. १९
गगनीं नाथिलें अभाळ ॥ तैसें ब्रह्मीं मायापडळ ॥
ते विरालिया केवळ ॥ ब्रह्मचि असे ॥ २० ॥
आकाशांत नसतेंच मिथ्या नाशिवंत आभाळ उठते, त्याप्रमाणे ब्रह्मावर मायेचे पलट आलेले आहे. ते नाहीसें झालें की बाकी निवळ ब्रह्मच आहे. २०
ब्रह्मादिक सकळें ॥ रजस्वला व्याली ढिसाळें ॥
तिया मायादेवीसी नातळे ॥ परब्रह्म ते ॥ २१ ॥
ब्रह्यादि हे सर्व जगडंबर ही अस्पर्श्य मायादेवी प्रसवली आहे. तिचा विटाळही त्या परब्रह्माला खपत नाही. २१
तें ध्यानेंवीण ध्यायिजे ॥ चिंतणेवीण चिंतिजे ॥
जाणणेंवीण जाणिजे ॥ परब्रह्म तें ॥ २२ ॥
ते ध्यानाशिवायच ध्यायिले पाहिजे; चिंतनाशिवायच ते चिंतिलें पाहिजे; आणि ज्ञानाशिवायच ते जाणले पाहिजे, अशा प्रकारचे ते परब्रह्म होय. २२
हें परब्रह्म निर्गुण ॥ सर्वेश्वराचे निजस्वरूप जाण ॥
मूळमायेसी अधिष्ठान ॥ पूर्ण चैतन्य जें ॥ २३ ॥
हे निर्गुण पाब्रह्म सर्वेश्वराचे निजस्वरूप होय, हे ध्यानांत ठेव. जे मूळमायेचें अधिष्ठान पूर्ण चैतन्यच होय. २३
माया ब्रह्मींचा विवर्त ॥ ऐसें बोले वेदांत सिद्धांत ॥
जो उपनिषदाचा मथितार्थ । प्रमाणसिद्ध ॥ २४ ॥
माया हा ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेला विवर्त म्हणजे भास होय असा वेदांताचा सिद्धांत आहे. उपनिषदांचाही प्रमाणसिद्ध मथितार्थ तोच आहे. २४
वेदविरुद्ध मत ॥ ते पाखांड जाण निश्चित ॥
म्हणोनि सांडी ते अपसिद्धांत ॥ विवर्त ऐक ॥ २५ ॥
जे वेदाच्या विरुद्ध मत ते निश्चयेंकरून पाखंडमत असे समज. तै अपसिद्धांत होत, म्हणून ते टाकून दे. आतां विवर्त म्हणजे काय ते ऐक. २५
ब्रह्म निर्विकार जैसें ॥ तैसें असतचि असे ॥
तेथे अन्यथा आभास भासे ॥ तो तद्विवर्त गा ॥ १२ ॥
ब्रह्म जेसै निर्विकार असतें, तसे ते असतें तसेच असते, परंतु तेथे जो अन्यथा भास भासमान होतो, तोच याचा विवर्त होय. २६
निजाकारें विचरत । रविप्रकाशें असे वर्तत ॥
तेथें जळाभास भासत ॥ तो तद्विवर्त जैसा ॥ २७ ॥
सूर्य निजाकारानें व निजप्रकाशानें वावरतो व भ्रमण करीत असतो. तेथे जो जळाभास भासत असतो (म्हणजे पाण्यांत जे सूर्याचे बिंब प्रतिबिंब भासमान होतें ते किंवा मृगजळ.) तो त्याचा विवर्त समज. २७
नातरी जैसा दोरु ॥ तेथींचा न मोडे आकारु ॥
नाहीं तोचि आभासे थोरु ॥ महासर्प कैसा ॥ २८ ॥
नाहींतर एखादी दोरी घ्या. तिचा आकार कांही मोडत बदलत नाही खरा, पण तिचा एखादा महासर्प असावा असा नसताच भयंकर भास होतो. २८
ब्रह्म ते उपमारहित ॥ तेथें कायसे पां दृष्टांत ॥
परी एकदेशी होय उचित ॥ बुझावया उद्देश ॥ २९ ॥
ब्रह्म हें तर उपमारहित आहे. तेथें दृष्टांत काय होत ? परंतु उद्देश समजण्याकरितां एकदेशी दृष्टांत देणे उचित होय. २९
असो आदिब्रह्मींचा विवर्त ॥ तेथें गुणसाम्य ऐसा संकेत ॥
अनुवादे सांख्यसिद्धांत ॥ अतिचतुर जो ॥ ३० ॥
असो. आदिब्रह्मींचा हा जो विवर्त ह्यालाच ज्ञानपूर्ण असे जें सांख्यशास्त्र त्यांत 'गुणसाम्य' अशी संज्ञा आहे. ३०
हे गुणत्रयाची साम्यता ॥ ईश्वराची उन्मनी अवस्था ॥
तेचि चैतन्यें अधिष्ठीता ॥ बोलिजे महामाया ॥ ३१ ॥
ही जी तिन्ही गुणांची साम्यता तीच ईश्वराची उन्मनी अवस्था होय. आणि तीच चैतन्याची अधिष्ठात्री महामाया असें म्हणतात. ३१
महामायेचें लक्षण ॥ ते शुद्धसत्वात्मक जाण ॥
स्वस्वरूपाचें अनुसंधान ॥ परवद्य तें ॥ ३२ ॥
शुद्ध सत्व हे महामायेचें लक्षण असे समज. आणि स्वस्वरूपाचे अनुसंधान ते परब्रह्म होय. ३२
सत्वगुणाची क्षोभक दशा ॥ महामाया येणें नांवे ऐसा ॥
आभासें मिथ्याभूत ठसा ॥ तो ब्रह्यविवर्त गा ॥ ३३ ॥
सत्वगुणाचा क्षोभ तोच महामाया ह्या नांवानें मिथ्याच भूतांचा ठसा भासमान होतो. आणि बाबा; तोच ब्रह्मींचा विवर्त. ३३
मी ब्रह्म येणें आकारे ॥ ज्ञानरुप स्फुर्ती स्फुरे ॥
ती ओळखावी चतुरें ॥ महामाया ॥ ३४ ॥
मीच ब्रह्म या भावनेनें ज्ञानरूप स्फुरण होऊं लागते, तीच चतुर पुरुषाने महामाया म्हणून समजावी. ३४
ब्रह्म जैसें परिपूर्ण ॥ तदाकारे स्फुरण ॥
तये मायेसी मर्यादा कवण ॥ करील बारे ॥ ३५ ॥
ब्रह्म हे जसें परिपूर्ण आहे तसें त्याच आकाराचे स्फुरण ती माया होय. तेव्हां बाबारे, त्या मायेची तरी मर्यादा कोण करणार. ३५
मायेची दुर्घटता ॥ तेचि हे जाणावी जाणतां ॥
जे केवळ भासे तद्वत्ता ॥ नाथिलीची ॥ ३६ ॥
मायेचा दुर्घटपणा हाच जाणिवेचा भास होय. तत्वत: पाहिले तर तो केवळ मिथ्या आभास असतो. ३६
म्हणूनि दुर्घटत्व हे भूषण ॥ मायेसी नव्हे दूषण ॥
ती ब्रह्मीं असे घटमान ॥ तरी माया नव्हेती ॥ ३७ ॥
म्हणून दुर्घटपणा हे मायेला दूषण नसून उलट भूषणच आहे. ती ब्रह्माच्या ठिकाणी जरी घटमान होणारी आहे, तरी ती माया नव्हे. (नव्हेशी म्हणजे नसल्यासारखीच आहे. मिथ्या आहे. भास आहे.) ३७
हे न घडते ठाईं घडे ॥ मग दाखवी आपुले पवाडे ॥
जे भोजें नाचवी कोडें ॥ ब्रह्मादिकांतें ॥ ३८ ॥
ही न घडत्या ठिकाणी घडते, उत्पन्न होते, आणि मग आपला महिमा दाखवीत असते. ब्रह्मादिकांना तर मौजेनें व कौतुकाने नाचवीत असते. ३८
सृष्ट्यादि व्यापार ॥ जो करी जगदीश्वर ॥
तोही मायेचा बडिवार ॥ ऐसा जाण तूं ॥ ३९ ॥
जगदीश्वर जे वृष्टि आदिकरून व्यापार (घडामोडी) करतो तोही तूं मायेचाच महिमा असे समज. ३९
हे असंभवनीय ॥ माया अनिर्वचनीय ॥
मिटवाच परी वाय ॥ आभासतसे ॥ ४० ॥
माया ही स्वत: असंभवनीय (कधीही न होणारी) व अनिर्वचनीय (कशी आहे हें सांगतां न येण्यासारखी) आहे. आणि हा सारा मिथ्याच पसारा भासमान झालेला आहे. ४०
तू ऐसें म्हणसी ॥ माया अनिर्वचनीय कैसी ॥
तरी उत्तरार्धी बुझसी ॥ अनायासें ॥ ४१ ॥
माया ही अनिर्वचनीय कशी ? असे जर तं म्हणत असशील तर ते तुला उत्तरार्धात सहज समजून येईल. ४१
अहो ब्रह्म आपणातें ॥ मी ब्रह्म ऐसे न म्हणते ॥
तरी ब्रह्मींचे काय उणें होतें ॥ ब्रह्मपण गा ॥ ४२ ॥
अहो; ह्या ब्रह्मानें जर मी ब्रह्म असे म्हटले नसते, तर ब्रह्माचे ब्रह्मपण का नाहीसे झाले असते ? नाही. ४२
म्हणूनि मिथ्या भूत माया ॥ विश्व मायामय जाणूनियां ॥
तरी ब्रह्म ते अद्वय ॥ कां न म्हणावे ॥ ४३ ॥
म्हणून भूतमाया ही मिथ्या आहे, आणि विश्व हे मायामय आहे, हें जाणून तरी ब्रह्माला अद्वैत कां म्हणूं नये ? ४३
जे मिथ्यात्वें कार्य असे ॥ साचासारखें आभासे ॥
गगनीं गंधर्वनगर जैसे ॥ नाथिलेंची ॥ ४४ ॥
आकाशांत ज्याप्रमाणे खोटेंच गंधर्वनगर उठते त्याचप्रमाणे हे मिथ्यात्वाने कार्य झालेले असून ते खर्‍यासारसें भासत आहे, एवढेच. ४४
ऐसी माया उठिली ॥ ते परब्रह्मीं अधिष्ठिली ॥ ॥
ते प्रकृती बोलिली ॥ सांख्यमतें ॥ ४५ ॥
अशाप्रकारे मूळमाया ही उत्पन्न होऊन ती परब्रह्माच्या ठिकाणी अधिष्ठित झाली आहे. तिलाच सांख्यमतांत 'प्रकृति' असें नांव आहे ४५
हे माया मूलप्रकृती ॥ परमपुरुषाची निजशक्ती ॥
तियेसी तेणेंसी संगती ॥ ते अवधारिजो ॥ ४६ ॥
ही माया मूळप्रकृति, हीच परमपुरुषाची निजशक्ति होय. तिची आणि त्याची संगति कशी आहे ती श्रवण करावी. ४६
घट जो जो निपजे ॥ तो तो आधींच गगने व्यापिजे ॥
तैसें जें जें तत्व निपजे ॥ तें तें व्यापिजे चैतन्यें ॥ ४७ ॥
जो जो घट उत्पन्न होतो, तो तो प्रथमच आकशाने व्यापिलेला असतो, त्याप्रमाणे जे जें तत्व निपजतें, ते ते चैतन्यानें व्यापलेलें असते. ४७
नातरी उठतिया तरंगांतें॥ ॥ जळ आधींच व्यापूनि वर्ते ॥
तैसें स्फूर्तिये मायेतें ॥ व्या-पिलें परब्रह्में ॥ ४८ ॥
किंवा उठलेल्या लहरीला, पाणी आधींच व्यापून असते, त्याप्रमाणे त्या स्फुरद्रूप मायेला परब्रह्म व्यापून आहे. ४८
जेणे मायेतें व्यापिलें ॥ ते सगुण ब्रह्म बोलिलें ।!
येर जे अशेष उरले ॥ तें केवळ ब्रह्म ॥ ४९ ॥
मायेला व्यापून असलेले जें ब्रह्म त्याला 'सगुणब्रह्म’ असें म्हणतात. आणि बाकी जें सर्व उरलेले ते 'केवळ ब्रह्म’ होय. ४९
जेणे माया अधिष्ठिजे ॥ ते ब्रह्म मायोपाधिक बोलिजे ॥
माया शबल ऐसे म्हणिजे ॥ तयेतेंचि गा ॥ ५० ॥
ज्याच्या योगाने माया अधिष्ठित झाली ते 'मायोपाधिक ब्रह्म' असे म्हणतात. अरे ! 'शबल माया' असे त्यालाच नांव आहे. ५०
तें ब्रह्म सगुण ॥ तोचि परमात्मा जाण ॥
परमपुरुष ऐसी खूण ॥ तेथेंचि बोलिजे ॥ ५१ ॥
तें सगुण ब्रह्म तोच परमात्मा हे ध्यानांत ठेव. परमपुरुषाची खूण ती तीच होय. ५१
परमपुरुषाचे लक्षण ॥ तें मूळप्रकृतीशी भिन्न ॥
हें कीजेल कथन ॥ तें ऐक पां तूं ॥ ५२ ॥
परमपुरुषाचे लक्षण मूळप्रकृतीहून भिन्न आहे हें आतां सांगण्यांत येईल, तिकडे तूं लक्ष दे. ५२
मूळप्रकृतीआंतु ॥ पुरुषसाक्षित्वें असे वर्ततु ॥
तियेतें असे जाणतु ॥ निजप्रकाशें ॥ ५३ ॥
मूळप्रकृतीमध्यें पुरुष हा साक्षित्वानें रहात असतो. तिला तूं निजप्रकाशानें (आत्मानुभवानें) ध्यानांत आण. ५३
ते साभास तो निराभास ॥ ते प्रकाश्य तो स्वमप्रकाश ॥
तथापि अनादि सहवास ॥ तया प्रकृतिपुरुषांसी ॥ ५४ ॥
ती साभास; तो निराभास आहे. ती प्रकाशली जाणारी; तो स्वयंप्रकाश आहे. तथापि त्या प्रकृतिपुरुषांचा अनादिकालापासून सहवास आहे. ५४
ते वेद्य तो वेत्ता ॥ ते ज्ञेय तो ज्ञाता ॥
परी नवल अभिन्नता ॥ तया दोघांची ॥ ५५ ॥
ती देव तो वेत्ता; ती ज्ञेय तो ज्ञाता होय. परंतु आश्चर्य हे की, ती दोघेंही अभिन्न (अगदी एक) आहेत. ५५
पुरुष प्रकृतीतें जाणे ॥ आपुलेनि सर्वज्ञपणें ॥
तियेंसी नेणवे परी साजणें ॥ तेणें पुरुषेंसी ॥ ५६ ॥
पुरुष प्रकृतीला आपल्या सर्वज्ञपणानें जाणतो, पण तिला मात्र तो पुरुष ऐकून सुद्धां माहित नाही. ५६
हा अनादिसिद्ध रोळू ॥ जो प्रकृतिपुरुषांचा मेळू ॥
एकावीण एकासी वेळू ॥ फिटे क्षणभरी ॥ ५७ ॥
हा अनादिसिद्ध नियम चालत आला आहे. पण हा प्रकृतिपुरुषाचा मेळ असा आहे कीं,एकाशिवाय दुसर्‍याला एकक्षणभरही वेळ गमत नाही. ५७
वर्णव्यक्तिरहिते ॥ प्रकृतिपुरुषें दोघें अमूर्ते ॥
त्याचिया खरूपनिर्धारातें ॥ जाण स्वानुभवे ॥ ५८ ॥
ज्यास वर्णही नाही, व जी व्यक्ति-ही नव्हेत असे हे जे अमूर्त प्रकृतिपुरुषाचे जोडपे त्याच्या स्वरूपाचा निश्चय करावयाचा सणजे तुला स्वानुभावानेंच केला पाहिजे. ५८
हा पुरुष परमात्मा ॥ स्वयंज्योति विज्ञानात्मा ॥
येणें अनुग्रहीत जीवात्मा ॥ तो जाणे पुरुषातें ॥ ५९ ॥
हा पुरुषच परमात्मा होय. स्वयंज्योति (स्वयंप्रकाश) व विज्ञानात्मा (चिदात्मा) तोच. जीवात्मा हा याचा 'अनुगृहित' होय. तो फक्त पुरुषाला जाणतो. ५९
प्रकृतीचेनि दृश्यपणें ॥ द्रष्ट्या पुरुषा लागे जाणणे ॥
अनुभवी तो या खुणे ॥ जाणेल गा ॥६०॥
प्रकृति दृश्याकारास आल्यामुळें द्रष्ट्या पुरुषास जाणाणे भाग आले. अरे ! जो अनुभवी आहे त्यालाच ह्याची खूण पटेल. ६०
ज्ञानविग्रही परमेश्वर ॥ सर्वात्मा निर्विकार ॥
तवा स्वरूपाचा विसर ॥ कदांचि नाही ॥ ६१ ॥
हा ज्ञानाचा निश्चय करणारा परमेश्वर सर्वात्मा व निर्विकार असून ह्याला कधींच स्वरूपाचा विसर म्हणून नाहीं. ६१
प्रवृत्तिनिवृत्ति मायेची ॥ करावया समर्थ हाचि ॥
तेथे हरिहरब्रह्मादिकांची ॥ मात कायसी ॥ ६२ ॥
मायेची प्रवृत्ति निवृत्ति करणारा समर्थ हाच ! तेथें हरि हर ब्रह्मादिकांची काय कथा ? ६२
ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥ हे श्रीप्रभूचे अवतार ॥
तथापि ते आज्ञाधार ॥ तया परेशाचे ॥ ६३ ॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर हे त्या प्रभूचेच अवतार खरे, तथापि ते त्या परमात्म्याचे आज्ञाधारक होत. ६३
मायेचे गुणत्रय ॥ ते ब्रह्मादि देवत्रय ॥
करिती सृष्ट्यादिक कार्य ॥ आज्ञे श्रीपतीचिया ॥ ६४ ॥
मायेचे तीन गुण तेच ब्रह्मादि तीन देव होऊन सुष्टीची घडामोड करीत आहेत, पण कोणाच्या आज्ञेने ? त्या श्रीपतीच्याच. ६४
आणीक यांचा व्यापार ॥ करावयास समर्थ नव्हे इतर ॥
म्हणूनि गोसावी सर्वेश्वरा ॥ ब्रह्मादिकांसी ॥ ६५ ॥
आणखी ह्यांची ही घडामोड चालवावयाला इतर कोणीही समर्थ नाहीं. म्हणून सर्वेश्वर हा ब्रह्मादिकांचा स्वामी आहे. ६५
अहो समस्त मायेतें ॥ सगुण ब्रह्म चेष्टवितें ॥
म्हणूनि सर्वेश्वर आणिकाते ॥ ह्मणूंचि नये ॥ ६६ ॥
अहो ! सगुण ब्रह्म हेंच सर्व मायेला चालविते. म्हणून सर्वेश्वर त्यालाच म्हणावें. इतरांना म्हणूंच नये. ६६
तेणें सर्वेश्वरें अवलोकिली ॥ माया महत्तत्वातें व्याली ॥
सृष्टि व्हावयाची इच्छा झाली ॥ तें महत्तत्व गा ॥ ६७ ॥
माया महतत्व प्रसवली, हे त्या सर्वेश्वरानेंच पाहिलं ! आतां महतत्त्व ते कोणते ? म्हणशील तर सृष्टि व्हावी अशी झालेली जी इच्छा तेंच महतत्त्व होय. ६७
जें मायेचे शुद्धत्व ॥ तेंचि ओतीव महत्तत्व ॥
जेथ रजतमाचे गूढत्व ॥ व्र्ते सत्वगर्भी ॥ ६८ ॥
मायेचें शुद्धत्व हेच अस्सल महत्तत्व असे समज. आणि तेथेंच सत्त्वाच्या पोटामध्ये रज व तम ही छपून बसली होती. ६८
हे गुणक्षोभिणी माया ॥ देवाचे कारणदेह जिया ॥
घडविलें महाप्रळया ॥ रुद्राकरवीं ॥ ६९ ॥
ही जी गुणक्षोभिणी माया तिने महाप्रळय करणार्‍या रुद्राकडून ईश्वराचा कारणदेह निर्माण केला. ६९
तें सर्वेश्वरें अधिष्ठित ॥ विविध अहंकारा प्रसवत ॥
मायागुणीं चेष्टित ॥ प्रगटली ॥ ७० ॥
ती सर्वेश्वराने अधिष्टित झाली असून त्रिविध अहंकार प्रसवली आणि गुणांनी चाळणा उसन्न होऊन माया प्रगट झाली ( दृश्याकारास आली) ७०
सात्विक राजस तामस ॥ त्रिविध अहंकार जाणजस ॥
तेथें शक्तित्रयाचा विकास ॥ दिसे अनुक्रमे ॥ ७१ ॥
सत्विक राजस व तामस हा त्रिविध अहंकार लक्ष्यांत आण तेथें अनुक्रमानेंच तीन शक्तींचा विकास झालेला दिसतो. ७१
सात्विक अहंकारीं ज्ञानज्ञक्ती ॥ राजसीं वतें क्रियाशक्ती ॥
तामसी असे द्रव्यशक्ती ॥ निरंतर पै ॥ ७२ ॥
सात्यिक अहंकाराच्या ठिकाणी ज्ञानशक्ति, राजसामध्ये क्रियाशक्ति आणि तामसामध्ये निरंतरचीच द्रव्यशक्ति असते. ७२
सवेश्वरु अवलोकित ॥ द्रव्यशक्तीसमवेत ॥
तामस अहंकार प्रसवत ॥ पंचमहाभूतें ॥ ७३ ॥
सर्वेश्वर पहात असतो, आणि तामस अहंकार द्रव्यशक्तिसहवर्तमान पंचमहाभूतांना जन्म देतो. ७३
तामस अहंकार गगनाने ॥ गगन व्यापिलें पवनातें ॥
तो पवन दहनातें ॥ प्रसवता झाला ॥ ७४ ॥
तामस अहंकाराने आकाशास व्यापून टाकले; आकाशाने वायूस व्यापलें; आणि तो वायु तेज व्याला. ७४
दहन व्यापिला उदकाते ॥ उदक व्यापिलें पृथ्वीते ॥
या परी पंचमहाभूते ॥ जनितीं झाली ॥ ७५ ॥
तेजानें उदक व्यापून टाकले, व उदकाने पृथ्वी व्यापली, त्याप्रमाणे पंचमहाभूतें निर्माण झालीं. ७५
ज्ञब्दविषय गगनीं ॥ स्पर्शविषय पवनी ॥
रूप बारे दहनी ॥ विशेष गुण ॥ ७६ ॥
आकाशाचा विषय शब्द, वायूचा स्पर्श, आणि बाबा रे ! तेजाचा विशेष गुण म्हणजे रूप होय. ७६
आपाचा विषय रस ॥ पृथ्वीचा गंध जाणजस ॥
कार्यकारण भावें प्रवेश ॥ दिसे अन्यगुणांचा ॥ ७७ ॥
उदकाचा विषय रस, आणि पृथ्वीचा गंध हे ध्यानांत ठेव. आतां इतर गुणांचा त्यात कार्य कारण संबंधाने प्रवेश झालेला दिसतो. ७७
तंव चैतन्यनाथ अधिष्ठित ॥ क्रियाशक्ति समायुक्त ॥
राजस अइंकार प्रसवत ॥ पंचदशतत्त्वें ॥ ७८ ॥
नंतर चैतन्यनाथ जो आत्मा तो अधिष्ठान होऊन क्रियाशक्तिसहवर्तमान राजस अहंकाराने पंधरा तत्वे उत्पन्न केली. ७८
व्यान उदान समान ॥ प्राण आणि अपान ॥
एवं पंचदश तत्वांचा गुण ॥ एकत्र संभूत ॥ ७९ ॥
व्यान, उदान, समान, प्राण, आणि अपान अशाप्रकारे पंधरा तत्त्वांचा गुण एके ठिकाणी मिळाला. ७९
श्रोत्र त्वक् चक्षु जिव्हा घ्राण ॥ हे ज्ञानेंद्रियपंचक जाण ॥
कर्मेंद्रियपंचक सांगेन ॥ ते ऐक पां तूं ॥ ८० ॥
कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे ज्ञानेंद्रियपंचक असे समज. जातो कर्मेंद्रियपंचक सांगतो ते तूं ऐक. ८०
वाचा पाणी पाद ॥ चौथें शिश्न पांचवे गुद ॥
हे कमेंद्रिय पंचकवृद ॥ तुज निरूपिलें ॥ ८१ ॥
वाणी, हात, पाय, चवथे शिश्न व पांचवे गुद हा कमेंद्रिय पंचकाचा समुदाय तुला सांगितला. ८१
मग सात्विक अहंकारें ॥ ज्ञानशक्तीचे सहाकारे ॥
अंतःकरणपंचक बारे ॥ जन्मले कैसे ॥ ८२ ॥
मग सात्विक अहंकाराने ज्ञानशक्तीच्या साहाय्याने बाबारे ! अंतःकरणपंचक कसे निर्माण केले, ते ऐक. ८२
एकचि अंतःकरण ॥ चतुर्धा भेदें भिन्न ॥
मन बुद्धि चित्त अहंकार जाण ॥ येणेंचि न्याये ॥ ८३ ॥
अंतःकरण एकच पण ते चतुर्विध भेदाने निरनिराळें झाले. मन, बुद्धि, चित्त, अहंकारही ह्याच प्रकारे ध्यानांत आण. ८३
सात्विक अहंकार तत्वें जनिलीं ॥ तीं भोगसाधनें बोलिलीं ॥
कर्ता भोक्तामोठा म्हणितलीं ॥ तत्त्वविदीं ॥ ८४ ॥
सात्विक अहंकारापासून जी तत्वे निर्माण झाली त्यांनाच भोगसाधने म्हणतात. तत्त्ववेत्यांनीं त्यांनाच कर्ता, भोक्ता अशी नांवे दिलेली आहेत. ८४
राजसअहंकारतत्वें जनित ॥ श्रोत्रादि त्वचेचा संघात ॥
तो साधनशब्दे विख्यात ॥ सकलविषयीं ॥ ८५ ॥
राजस अहंकारापासून जन्मलेली तत्वें ह्मणजे श्रोत्र (कर्ण) आदिकरून त्वचेचा समूह होय. तो सर्व विषयाचें साधन म्हणून प्रसिद्धच आहे. ८५
तामस अहंकाराची सृष्टी ॥ ते भोग्य साध्य ऐसी गोष्टी ।
कार्य भोग्य हे परिपाठी ॥ तेथेंचि वर्तें ॥ ८६ ॥
भोग्या साध्य अशा ज्या गोष्टी ती तामस अहंकाराची सृष्टि होय. त्यालाच 'भोग्य’ 'कार्य' असें म्हणण्याचा प्रघात आहे. ८६
एवं अहंकारें त्रिविधे ॥ तत्वें जनिलीं विविधे ॥
तियें त्रिपुटी येणें शब्दे ॥ बोलिजेती ॥ ८७ ॥
अशाप्रकारे त्रिविध अहंकारापासून विविध (नानाप्रकारचीं) तत्वें उदयास आलीं. तिलाच त्रिपुटी असें म्हणतात ८७
ज्ञाता ज्ञान ज्ञेय । भोक्ता भोगणे भोग्य ॥
कर्ता कारण कार्य ॥ ऐसी हे त्रिपुटी ॥ ८८ ॥
ज्ञाता, ज्ञान, आणि ज्ञेय; भोक्ता, भोगणें, आणि भोग्य; कर्ता, कारण आणि कार्य अशा प्रकारची ही त्रिपुटी आहे. ८८
अंतःकरण भोक्ता ॥ इंद्रिपांसी भोगसाधनता ॥
पंचभूतांसी भोग्यता ॥ विषयरूपत्वें ॥ ८९ ॥
अंतःकरण हा भोक्ता, इंद्रियें ही भोगाचें साधन, आणि विषयाच्या रूपानें पंचभूतांकडे भोग्यता आली आहे. ८९
एकैक भोक्ता साधक ॥ तिहीं साधनांचा मेळापंचक ॥
करूनि प्रपेशला निःशंक ॥ एकैक भूतीं ॥ ९० ॥
एकेक साधक भोक्ता, त्या त्या साधनसमूहाची पंचकडी जमवून निःशंकपणें एकेका भूतामध्ये प्रविष्ट झाला आहे. ९०
त्या परस्परानुप्रवेश ॥ सांगिजेल तो ऐकिजस ॥
ऐकृनि धरीजस ॥ निजमानसीं ॥ ॥ ९१ ॥
त्यांचा परस्परांमध्ये कसा प्रवेश होतो, तो आतां सांगण्यांत येईल. तो ऐकून तूं आपल्या मनामध्ये नीट ठेव. ९१
अंतःकरण व्यानाधारें ॥ श्रोत्र इंद्रियांचेनि द्वारे ॥
वाचासहित संचरे ॥ शब्दगुण आकाशीं ॥ ९२ ॥
अंतःकरण व व्यान वायु ह्यांच्या आधारानें कमेंद्रियाच्या मार्गाने वाणीसहवर्तमान आकाशाच्या ठायी शब्द गुण प्रवेश कारतो. ९२
मन समानाचेनि योगे ॥ त्वचेंद्रियाचेनि भोगें ॥
पाणींद्रियसहित रिघे ॥ स्पर्शगुण पवनीं ॥ ९३ ॥
मन व समानवायूच्या योगेंकरून त्वगिंद्रियाच्या (त्वचेच्या) भोगसाधनानें हस्तेंद्रियासहवर्तमान स्पर्शे गुण वायूंत शिरतो. ९३
बुद्धि उदानाचेनि बडिवारें ॥ चक्षु इंद्रियाचेनि आधारे ॥
पादेंद्रियसहित बारे ॥ रूपगुण तेजीं ॥ ९४ ॥
बुद्धि आणि उदान ह्यांच्या जोरावर, नेत्रैंद्रियाच्या साहाय्यानें, पादेंद्रियांसहवर्तमान रूपगुण तेजांत जाऊन बसतो. ९४
चित्त प्राणाचेनि बळे ॥ जिव्हेंद्रियाचेनि मेळें ॥
शिश्नसहित मिळे ॥ रसगुण आपीं ॥ ९५ ॥
चित्र आणि प्राण ह्यांच्या सामर्थ्याने, जिव्हेंद्रियांचें पाठबळ मिळून शिश्नेंद्रियासहवर्तमान उदकामध्ये रसगुण समाविष्ट होता. ९५
अहंकार अपानी वसे ॥ प्राणाचेनि सहवासे ॥
वायूसहित प्रवेसे ॥ गंधगुण पृथ्वीसी ॥ ९६ ॥
अहंकार हा अपानाच्या ठिकाणी असतो. त्याच्यायोगाने व प्राणाच्या समागमाने वायूसहवर्तमान गंधगुण पृथ्वीत मिळतो. ९६
एवं विषयरूप भूतांसी ॥ चारी चारी एकासी ॥
पाचांचीं पंचवीस ऐसीं ॥ जाहली महाभूतें ॥ ९७ ॥
अशाप्रकारे विषयरूप भूतांना एकेकास आणखी चार चार मिळून अशींच पांचांची पंचवीस महान भूतें झाली. ९७
पंचविषय पंचभूतें ॥ तिथे तामसाहंकारजनितें ॥
ह्मणोनि तत्त्वें समस्तें ॥ मिळाली तेथेंचि पै ॥ ९८ ॥
पांच विषय व पांच भूतें ही तामस अहंकारापासून उत्पन्न झालेली होत. म्हणून सर्व तत्त्वें तेथेंच येऊन मिळाली. ९८
होती अतिसूक्ष्में अव्यक्तें ॥ जी पंचमहाभूतें ।
ती पावलीं स्पष्टदशेतें ॥ परस्परानुमेळें ॥ ९९ ॥
जी पंच-महाभूतें अव्यक्त अतिसूक्ष्म-स्थितीत होतीं, तीच परस्परांचा मिलाफ होऊन स्पष्ट व्यक्त स्थितींत आली आहेत. ९९
एवं परस्परानुप्रवेश ॥ जे तत्वेंसी पंचधा सहवास ॥
हा ईश्वरइच्छा मायाविकास ॥ विस्तार झाला ॥ १०० ॥
अशा प्रकारें तत्वांचा पांच प्रकारे योग होऊन परस्पर मिलाफ झाला, आणि हाच मायेचा विकास ईश्वरेच्छेने विस्तार पावला. १००
या प्रसंगानंतरें ॥ श्रीमुकुंदमुनीचे दातारें ॥
प्रपंच विस्तारिला सर्वेश्वरें ॥ कैसा तो अवधारिजे ॥ १०१ ॥
आतां पुढील प्रसंगीं (पुढील प्रकरणी) श्रीमुकुंद मुनींचा दाता जो सर्वेश्वर त्यानें प्रपंचाची मांडणी कशी केली, ते श्रवण करावें. १०१
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
तत्त्वसृष्टिकथनं नाम तृतीयप्रकरणं समाप्तं ॥

GO TOP