॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण ६ वे ॥

॥ स्थूल देहकथन ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥अनादि अज्ञाने भ्रमला ॥ जीव लिंगशरीरें आवरला ॥
शुभाशुभकर्मे बांधिला ॥ जाहाला परवश तो ॥ १ ॥
अनादि अज्ञानानें जीव भ्रमात पडला, लिंगशरीरांत गुरफटला गेला; आणि शुभ व अशुभ कर्मांनी जखडून टाकला गेला. येणेंप्रमाणें तो ( सर्वस्वी) परतंत्र होऊन बसला. १
पुण्यपापाचें फळ ॥ सुखदुःख पावतु केवळ ॥
स्वर्ग नर्क अविचळ ॥ भोगी कर्मवशें ॥ २ ॥
सुख व दुःख हे केवळ पुण्याचे व पापाचे फळ मिळते. आणि हा कर्मानुरूप अखंड स्वर्ग किवा नरक भोगीत असतो. २
मनुष्यदेह पावोनी ॥ संत असंत कर्मे अर्जुनी ॥
संसारीं पावे नाना योनी ॥ श्वानसूकरादिक ॥ ३ ॥
मनुष्याचा देह प्राप्त होऊन बरी वाईट कर्मे करून संसारामध्ये श्वानसूकरादिक नानाप्रकारच्या योनीत जातो. ३
पुण्याचेनि अधिकपणें ॥ स्वर्गसुख भोगणे ॥
पाप अधिक तरी जाणें ॥ निरयासी आधीं ॥ ४ ॥
पुण्यांश अधिक झाला तर स्वर्गसुख भोगावे; आणि पापांश अधिक झाला तर प्रथम नरक लोकाची वाट धरावी. ४
आधीं कर्मफल भोगीतु ॥ पुण्यपाप समतुल्य करितु ॥
मग मष्ययोनी पावतु ॥ जननीये गर्भीं ॥ ५ ॥
आधी कर्मफल भोगतो, पुण्य व पाप समसमान करतो व मग आईच्या उदरीं येऊन मनुष्ययोनि पावतो. ५
पितृदेहीं संचरे ॥ कवणी जीव श्वासरंध्रें ॥
कवणी एक जळपानद्वारें ॥ कर्माधीन होय ॥ ६ ॥
आधी पित्याच्या देहांत संचरत असतो. जीव कर्माधीन होतो आणि कोणी श्वासमार्गानें, तर कोणी पाणी पिण्याच्या द्वारानेच पितृदेहांत प्रवेश करतो. ६
कवणी एक वृष्टीसरिसा ॥ धान्यांवरी पडे अष्टादशा ॥
लीन होय माजी अन्नरसा ॥ षड्‌विधासि गा ॥ ७ ॥
कोणी पावसाबरोबर अठरा प्रकारच्या धान्यांवर पडून षड्रस अन्नाच्या रसामध्यें लीन होतात. ७
सुषुप्तीचिया माळिका ॥ मूढदशा पावे सम्यका ॥
अन्नरसासरिसे एका ॥ पडती पितृदेहीं ॥ ८ ॥
सुषुप्तीची माळ लागून खर्‍या ज्ञानवंताला मूढावस्था प्राप्त होते, आणि एका अन्नरसाबरोबर पितृदेहामध्ये प्रवेश करितो. ८
जठराग्नीचेनि संपर्के ॥ षट्‌धातूंचेनि परिपाकें ॥
पावे तिसरेनि सप्तकें ॥ शुक्रदशेतें ॥ ९ ॥
जठराग्नीचा संस्कार व षड्धातूंचा पाक घडून तिसर्‍या आठवड्यात तो शुक्रावस्थेला जाऊन पोहोचतो. ९
पंचभूतांचें धान्य निपजे ॥ तयाचा अन्नरस आपजे ॥
अन्नरसातें शुक्र बोलिजे ॥ पंचभूनात्मक ॥ १० ॥
पंचमहाभूतांचेच धान्य होऊन त्याचाच अन्नरस उत्पन्न होतो. पंचभूतात्मक अन्नरसालाच शुक्र असें म्हणतात. १०
पितयाचें रेन ॥ आणि मातेचें शोणित ॥
जननीगर्भीं होय मिश्रित ॥ ऋतुकाळीं ॥ ११ ॥
पित्याचे रेत आणि मातेचे शोणित, स्पर्शकाळी जननीच्या गर्भात मिश्रित होते. ११
प्राणापानाचेनि मेळें ॥ योनिमुखीं पितृरेत उसळे ॥
तेथें लिंग देह मिसळे ॥ मनोमेळें ॥ १२ ॥
प्राण व अपान त्यांच्या योगा योनिमुखीं पितृरेत उसळते, व तेथें मनाचा योग होऊन लिंगदेहही त्यास सामील होतो. १२
जरी अधिक पितयाचें रेत ॥ उणें होय मातेचें शोणित ॥
तरी पुत्र निपजे निश्चित ॥ जननीये गर्भीं ॥ १३ ॥
पितृरेत अधिक व मातृशोणित कमी असें असलें म्हणजे निश्चयेंकरून जननीच्या गर्भात पुत्र उत्पन्न होतो. १३
स्त्रीरक्ताचेनि अधिकपणे ॥ कुमारीसी उपजणें ॥
शुक्रशोणिताचेनि समतुल्यपणें ॥ नपुंसक होय ॥ १४ ॥
स्त्री शोणित अधिक झालें ह्मणजे कन्या होते; आणि शुक्रशोणित समसमान झाली म्हणजे नपुंसक निपजतो. १४
पितयाचिया रेताचिया ॥ तिन्ही धातू सारखिया ॥
अस्थि शिरा मज्जा येणे नांवें तिया ॥ निपजती पैं ॥ १५ ॥
पितुरेताच्या हाडे, शिरा, व मज्जा अशा तीन सारख्या धातू उत्पन्न होतात. १५
मातेच्या शोणिताचिया ॥ तिनी धातू सारखिया ॥
त्वचा मांस रक्त ऐसिया ॥ जननीचे गर्भीं ॥ १६ ॥
मातेच्या शोणितापासून जननीच्या गर्भामध्यें त्वचा, मांस व रक्त अशा तीन सारख्या धातु उत्पन्न होतात. १६
ऐमसें स्थूल देह जीवाचे ॥ निपजे सहा धातूंचे ॥
षट्कोशिक नाम याचे ॥ ऐसें बोलिजे ॥ १७ ॥
याप्रमाणें जीवाचा जड देह सहा धातूंचा बनतो. म्हणून त्याला 'षट्कोशिक' असें नांव आहे. १७
असो हा शुक्रशोणिताचा मेळ ॥ एक अहोरात्रें होय निश्चळ ॥
पांच अहोरात्रें सुढाळ ॥ बुद्‌बुदाकार ॥ १८ ॥
असो. हे शुक्रशोणिताचे मिश्रण एक दिवस ब एक रात्र गेली म्हणजे स्थिर होते. पांच दिवस व रात्री गेल्या म्हणजे त्याला सुंदर बुडबुड्याचा आकार येतो. १८
पक्षदिवशीं अंडाकार ॥ मासा निपजे शिर ॥
भुजा वक्षस्थळ हा विचार ॥ होय दोमासीं ॥ १९ ॥
पंधरवड्यानें अंडाकृति होते. महिन्याने शिराची आकृति दिसूं लागते. दोन महिन्यांनी हात हृदय वगैरे गोष्टी होतात. १९
तीमासीं उदर कटी पृष्ठी ॥ चौथ्या समग्र पाददृष्टी ॥
पांचव्या अस्थि शिरांची दाटी ॥ गर्भासि होय ॥ २० ॥
तिसर्‍या महिन्यात पोट पाठीचा भाग व कमर; चौथ्यांत पूर्ण पाय व दृष्टि, आणि पाचव्यांत अस्थि व शिरा ह्यांची गर्भाच्या ठिकाणी गर्दी उडते. २०
षण्मासीं त्वचा रोम ॥ सातव्या नखें केशोद्‌गम ॥
तेव्हांच प्रगटती चितधर्म ॥ स्मरणादिक ॥ २१ ॥
साहाव्या महिन्यांत त्वचा व केश, सातव्यांत नखे व केसांची वाढ होते. पाच महिन्यांत स्मरण आदिकरून चित्ताचे धर्म प्रगट होतात. २१
वरील दोघांसीं अतिशोच्यता ॥ तंव गर्भासी उठली प्रसूत व्यथा ॥
मग तो पावे मूर्च्छावस्था ॥ बाहेर पडे ॥ २२ ॥
पुढल्या दोन महिन्यांत अतिशय दुःख होऊं लागते. इतक्यांत गर्भा-ला प्रसूतिवेदना होऊं लागतात. मग त्याला मूर्च्छा प्राप्त होते व तो बाहेर पडतो. २२
व्यथेचेनि अतिभरें ॥ जातिस्मरत्व विसरे ॥
कोहंकोहं दीर्घस्वरें ॥ रुदन करी ॥ २३ ॥
अत्यंत तीव्र वेदना होऊं लागल्या म्हणजे आपले मूळचे ज्ञान विसरून जातो, आणि 'कोहं' 'कोहं’ मी कोण; मी कोण ? म्हणून मोठ्यानें गळा काढून रडूं लागतो. २३
ऐसा पंचीकृत पंप भूतांचा ॥ स्थूल देह जीवात्मयाचा ॥
कवण अंश कवण धूतांचा ॥ तो तूं ऐक पां ॥ २४ ॥
त्याप्रमाणें जीवात्म्याचा जड देह पंचीकृत भूतांचा बनलेला आहे आतां कोणत्या भूताचा कोणकोणता अंश ते ऐकून घे. २४
रोम आणि त्वचा मांस ॥ अस्थि नाडी कठिनांश ॥
पंचीकृत पृथ्वीचे साभास ॥ जाणावे पैं ॥ २५ ॥
केश, कातडी, आणि मांस, अस्थि व नाड्या हे कठीण भाग पृथ्वीचे अंश होत. २५
लाळ मूत्र शोणित ॥ मज्जा आणि पांचवें रेत ॥
हे द्रवांश आपाचे सत्य ॥ स्थूल शरीरीं ॥ २६ ॥
लाळ, मूत्र, शोणित (रक्त), मज्जा आणि पांचवे रेत हे ह्या जड शरीरांतील द्रवांश उदकाचे होत, हे उघड आहे. २६
क्षुधा आणि तृषा निद्रा ॥ आलस्य संग शिष्येंद्रा ॥
हे उष्णांश बुझ समग्रा ॥ तेजाचे पै ॥ २७ ॥
हे शिष्यराजा ! तहान, भूक, झोप, आळस, संग हे सगळे उष्णांश तेजाचे समज. २७
धावन वलन आकुंचन ॥ प्रसरण आणि निरोधन ॥
हे चलनांश पांचही जाण ॥ पंचीकृत वायूचे ॥ 2८ ॥
चलन, वलन, आकुंचन, प्रसरण, व निरोधन हे पांचही चलनांश पंचीकृत वायूचे होत. २८
काम क्रोध शोक मोह भय ॥ हे व्यापकांश पाहे ॥
पंचीकृत नभाचे नि:संशय ॥ जाण स्थूल शरीरीं ॥ २९ ॥
काम, क्रोध, शोक, मोह व भय हे वा जड देहांतील पंचीकृत आकाशाचे निःसंशय पांच व्यापशांश होत. २९.
ऐसें हें स्थान शरीर ॥ लिंग देहाचे बिढार ॥
तेथें असती षड्‌विकार ॥ ते ऐक पां तूं ॥ ३० ॥
येणेप्रमाणे हे जड शरीर हेच लिग देहाचे वसतिस्थान आहे. तेथे सहा विकार ( स्थिति) असतात, ते तूं ऐक. ३०
प्रथम विकार जायते ॥ दुजा अस्ति तिसरा विवर्धते ॥
तुरीय विपरीणमते पचंम अपक्षीयते ॥ सहावा विनश्यति हे ॥ ३१ ॥
पहिला विकार 'जायते' दुसरा 'अस्ति,' तिसरा 'विवर्धते' चवथा 'विपरिणमते,' पांचवा 'अपक्षीयते,' व साहवा 'विनश्यति’ होय. ३१
जायते ह्मणजे न होउनी होणे ॥ अस्ति ह्मणजे नसूनि असणे ॥
विवर्धते ह्मणजे पावणे ॥ अभिवृद्धीतें ॥ ३२ ॥
'जायते' म्हणजे नुसते होणें अस्तित्वांत येणे, 'अस्ति' ह्मणजे नुसते असणे 'विवर्धते' ह्मणजे वृद्धि पावणे, ३२
विपरिणमते तें तारुण्य ॥ अपक्षीयते वार्धक्यपण ॥
विनश्यति ह्मणजे मरण ॥ षड्‌विकार हे ॥ ३३ ॥
'विपरिणमते' म्हणजे तारुण्य येणे, 'अपक्षीयते' ह्मणजे वार्धक्य, आणि 'विनश्यति' ह्मणजे मरण, असे हे सहा विकार होतात. ३३
निरूपिले साहाही विकार ॥ इहीं युक्त स्थूळ शरीर ॥
तेथे जागृती निरंतर ॥ अवस्था वर्ते ॥ ३४ ॥
हें जड शरीर ह्या सहा विकारांनीं युक्त असते आणि येथे निरंतर जागृति ही अवस्था असते. ३४
स्थूल देह जागृती अवस्था ॥ या दोहींचा अभिमानी विश्व निरुता ॥
या तिहींस आकार व्यवस्था ॥ पुढें जाणावी ॥ ३५ ॥
स्थूल देह आणि जागृति अवस्था, ह्या दोहोंचा अभिमानी खरोखर विश्व आहे. आणि या तिहींच्या रूपाचा प्रकार पुढीलप्रमाणें:- ३५
नेत्रस्थान भोग स्थूळ ॥ रजोगुण षड्‌धिमेळ ॥
प्रणवाचा आद्यचरण सकळ ॥ ऐसे बुझावें ॥ ३६ ॥
नेत्रस्थान तो स्थूल भोग होय, व रजोगुणाचे सहा प्रकारचें मिश्रण, हा सर्व प्रणवाचा पहिला चरण असे समजावे. ३६
मणवाचा प्रथम चरण ॥ हा पड्‌धि पैं गुण ॥
तेथींचा अर्थ कैसा कवण ॥ तो अवधारिजो ॥ ३७ ॥
प्रणवाचा पहिला चरण हा षड्‌विध गुण होय. त्याचा अर्थ काय व कसा तें श्रवण करावें. ३७
पंचीकृत भूतांविण ॥ नाहीं पिंडब्रह्मांडाचें वर्तन ॥
उत्पत्ती जागृती जाण ॥ तिहींविण नाही ॥ ३८ ॥
पंचीकृत भूतांवांचून पिंडब्रह्मांडाचें अस्तित्व नाही. आणि त्या दोहोंशिवाय उत्पत्ति व जागृति हीही नाहीत. ३८
उत्पत्ती जागृती वीण ॥ बह्मा विश्व अभिमानी कवण ॥
तिहींवीण आकार हे खूण ॥ वोलूंचि नये ॥ ३९ ॥
उत्पत्ति जागृति शिवाय ब्रह्मा व विविश्व हे अभिमानी तरी कशाचे ? व त्यांच्याशिवाय अकार हे नांवच काढू नये. ३९
हे सकळही जेथें नाही ॥ तेथें नेत्रस्थान तें कायी ॥
स्थूल भोग तोही ॥ अघटमान ॥ ४० ॥
आणि जेथे ह्यापैकी कांहींच नाही तेथे नेत्रस्थान काय आणि कसले ? स्थूल भोगच मुळी अघटमान असणे अशक्य ! ४०
रजोगुणाचेनि अभावें ॥ मागील कांहींच न संभवे ॥
ह्मणूनि सकळही जाणावें ॥ प्रथम चरण ॥ ४१ ॥
रजोगुण नसला तर मागचे कांहींच संभवत नाही. म्हणून हे सर्वही प्रथम चरण समजावे. ४१
जीवाचें लिंगशरीर ॥ तें स्वप्नावस्थेचे विहार ॥
तैजस अभिमानी निरंतर ॥ तवा दोहींचा पै ॥ ४१ ॥
जीवाचा लिंगदेह हेच स्वप्नावस्थेचे स्थान होय. तैजस हा त्या दोहोंचा निरंतर अभिमानी असतो. ४२
तैजस स्वप्नावस्था लिंगशरीर ॥ या तिहीं उकार विस्तार ॥
कंठस्थान तें मंदिर ॥ यात्रितयाचे ॥ ४२ ॥
तेजस, स्वप्नावस्था, व लिंगदेह या तिहींचा विस्तार उकार होय. ह्या तिहींचे स्थान ते कंठस्थान होय. ४३
सुखदुःखमिश्रित ॥ तेथें भोग प्रविविक्त ॥
सत्वगुण असे प्रसवत ॥ वया पंचकातें ॥ ४३ ॥
तेथे सुख-दुःखमिश्रित गुप्त भोग असतात. ह्या पंचकाला सत्वगुण प्रसवते. ४४
तेणेंशीं सहित षट्क ॥ जो लिंगदेह प्रवर्तक ॥
द्वितीय चरण ऐसी व्याख्या ॥ बुझ प्रणवाची ॥ ४५ ॥
षटकासहवर्तमान जो लिगंदेहाचा प्रवर्तक, ताच प्रणवाना द्वितीय चरण असें म्हणसात. ४५
प्रणवाचा द्वितीय चला ॥ कैसेनि हा समस्तगुण ॥
ऐशा साक्षेपीं युक्तीची खूण ॥ ने ऐक पां तूं ॥ ४६ ॥
हा सर्द गुण हाच प्रणवाचा द्वितीय चरण कसा होतो, ह्या आक्षेपयुक्त कल्पनेचे समाधान तूं ऐक. ४६
नघडे सूक्ष्मभूतांवीण ॥ हिरण्यगर्भ लिंगदेहाचे वर्तन ॥
तीहींवीण कैंचे संभवन ॥ स्थिती स्वप्नावस्थेची ॥ ४७ ॥
सूक्ष्मभूतांशिवाय हिरण्यगर्भ व लिंगदेह ह्यांस अस्तित्वच नाही. मग त्याच्याशिवाय स्वप्नावस्था कशी संभवेल ? ४७
जेथे स्थिती अवस्थाचि नाहीं ॥ तेथें अभिमानी कवणाचा काई ॥
ह्मणूनि विष्णु तैजस दोघेही ॥ अभिमानी कैसे ॥ ४८ ॥
जेथे स्थिति ही अवस्थाच नाही तेथे कोण कशाचा अभिमानी होणार ? म्हणून विष्णु व तेजस हे दोघेही तेथे कसे अभिमानी होणार ! ४८
तिहींदीण कंठस्थानासी योग ॥ नाहीं प्रविविक्त भोग ॥
तेथें सत्वगुणाचा प्रसंग ॥ केवीं बोलावा ॥ ४९ ॥
ह्यावांचून कंठस्थान व गुप्तभोग हेही संभवत नाहीत. मग तेथें सत्वगुणाचे नांव कशाला ! ४९
येणें समस्तेंवीण सर्वज्ञा ॥ नाहीं द्वितीय चरण ऐसी संज्ञा ॥
म्हणूनि तोचि तो अवज्ञा ॥ कवणें करावी ॥ ५० ॥
हे सर्व जाणत्या ! हा सर्वांशिवाय द्वितीय चरण अशी संज्ञाच नाही. म्हणून तोच तो होय, नाही काय म्हणून क्षणावें. ५०
अज्ञान जें कारणशरीर ॥ ते सुषुप्तीचें क्रीडामंदिर ॥
तया दोहींचा निरंतर ॥ प्राज्ञ अभिमानी ॥ ५१ ॥
अज्ञान हें कारण शरीर असून तेंच सुषुप्तीचें क्रीडामंदीर आहे. ह्या दोहोंचा निरंतरचा अभिमानी प्राज्ञ होय ५१
पहा सुषुप्ती अज्ञान ॥ हे त्रय मकार जाण ॥
तयासी हृदय-स्थान ॥ जाण पै गा ॥ ५२ ॥
प्रज्ञा, सुषुप्ती, व अज्ञान ही त्रयी हाच मकार होय. हृदय हें त्याचें स्थान हे ध्या- नांत ठेव. ५२
आनंदभोग हृदयींचा ॥ हा विस्तार तमोगुणाचा ॥
तृतीय चरण प्रणवींचा ॥ हें सकळही गा ॥ ५३ ॥
हृदयांतील आनंदभोग हा तमोगुणाचा विस्तार होय. हे सर्व मिळून प्रणवाचा तृतीय चरण समजलासना ? ५३
हे सकळहि तृतीय चरण ॥ हा अर्थ केवीं गय घटमान ॥
ऐशा आक्षेपीं जाण ॥ सांगिजेल जें ॥ ५४ ॥
हे सर्व तृतीय चरण कसें होतें ? हा आक्षेपावर उत्तर देऊं तें ध्यानांत ठेव. ५४
प्रसिद्ध महामायोविण ॥ नाहीं माया अविद्येचें अधिष्ठान ॥
प्रळय सुषुप्ती रुद्र प्राज्ञ अभिमान ॥ हे कवणासिपां ॥ ५५ ॥
प्रसिद्ध महामायेशिवाय माया-अविद्येचें अधिष्ठान नाही. प्रळय, सुषुप्ति, रुद्र, प्राज्ञ, अभिमान हे कोणाला तूं समजतोस ? ५५
जरी अभाव या त्रितयासी ॥ तरी मकार ही संज्ञा कवणासी ॥
तेथें हृदयस्थान हें कवणासी ॥ इहींविण ॥ ५६ ॥
ह्या त्रितयाचाच जर अभाव झाला तर मकार संज्ञा तरी कोणाला ? तेथे ह्यांच्याशिवाय हृदय हें स्थान तरी कोणाला ? ५६
तिहीं अभिमानांविण ॥ या समस्तांशी असंभावन ॥
आनंद भोग तो कवण ॥ तेथे तमोगुण कैंचा ॥ ५७ ॥
त्या अभिमानांवांचून ही सर्व असंभनीयच होत. तेथे आनंदभोग तो कसला ? व तमोगुण तरी कसला ? ५७
येणें षड्‌विधेंविण ॥ तृतीय चरण बोलिजे कवण ॥
ह्मणूनि तेंचि तें हें अममाण ॥ कांहींच नव्हे ॥ ५८ ॥
वा षड्‌विधावांचून तृतीय चरण तो कसला म्हणावयाचा ? म्हणून तेंच ते होत. यांत असंबद्ध असे कांहींच नाही. ५८
एवं तिनी मात्रा प्रणवाचिया ॥ प्रपंचाकारें विस्तारलिया ॥
ऐशा श्रुती अथर्वणशाखेचिया ॥ बोलत असती ॥ ५९ ॥
अशाप्रकारे प्रणवाच्याच तिन्ही मात्रा प्रपंचरूपाने विस्तार पावल्या आहेत. असे अथर्वणशाखेचा वेद म्हणतो. ५९
एवं स्थूल लिंग कारण ॥ हे जीवाचें देहत्रय जाण ॥
जागती खप्र सुषुप्ती पूर्ण ॥ अवस्थात्रय गा ॥ ६० ॥
येणेप्रमाणे स्थूळ, लिंग, व कारण हेच जीवाचे तीन देह होत; आणि जागृति, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्था होत. ६०
विश्व तैजस प्राज्ञ ॥ अभिमानी त्रयसर्वज्ञ ॥
अकार उकार मकार ही संज्ञ ॥ मात्रात्रयीं गा ॥ ६१ ॥
विश्व, तेजस, प्राज्ञ, हे सर्वज्ञ असे तीन अभिमानी होत. आणि अकार, उकार, व मकार ही मात्रात्रयी होय. ६१
नयन कंठ हृदय ॥ हें अवस्थेचें स्थानत्रय ॥
स्थूल प्रविविक्त आनंदज्ञेय ॥ भोगत्रय पै ॥ ६२ ॥
नयन, कंठ, व हृदय ही अवस्थेची तीन स्थाने आणि स्थूल, प्रविविक्त (सूक्ष्म) व आनंद हे तीन भोग समजावे ६२
रज सत्व तम हे गुण ॥ अविद्येचे प्रसिद्ध जाण ॥
आद्य द्वितीय तृतीयचरण ॥ प्रणवाचे ॥ ६३ ॥
सत्व, रज, तम हे जे अविद्येचें प्रसिद्ध तीन गुण, तेच प्रणवाचे क्रमाने तीन चरण होत. ६३
असो ही सुषुप्ती अज्ञानाची ॥
जागृती स्वप्न ही अवस्था अन्यथाज्ञानाची ॥
ऐसी संसृती अविद्येची ॥ जीवात्मयासी ॥ ६४ ॥
असो. सुषुप्ति ही अज्ञानाची, जागृति स्वप्न ही अवस्था अन्यथा (विपरीत) ज्ञानाची होय. अशाप्रकारें जीवात्म्याला अविद्येचा संसार लागला आहे. ६४
जीवासी अविद्या असाधारण ॥ ह्मणोनी संसारासी कारण ॥
नानायोनी संसरण ॥ तें गुणकर्मयोगें ॥ ६५ ॥
जीवाला अविद्या ही असाधारण ( नसतीच) होय. म्हणून तीच संसाराला कारण आहे. आणि नानायोनीत जावे लागते तें गुण व कर्म यांच्यामुळे आहे. ६५
एकवि अवस्थेआंत ॥ गुणत्रयाची ऐक मान ॥
जेणें नानायोनीसी हेत ॥ कर्मद्वारें ॥ ६६ ॥
एकाच अवस्थेमध्ये गुणत्रयाची गोष्ट कशी आहे ती ऐक. तेच कर्माच्या द्वारे नानायोनींला कारणभूत होतात. ६६
गुणत्रयाची वृत्ती ॥ सारखी चेष्टेचित्तवृत्ती ॥
मग इंद्रिये व्यापार करिती ॥ चित्तानुसारे ॥ ६७ ॥
त्रिगुणांची वृत्ति चित्तवृत्तीला एकसारखी नाचवीत असते. मग चित्ताच्या अनुरोधानें इंद्रिये व्यापार करूं लागतात. ६७
सत्वगुण चित्तीं प्रगटे ॥ ते वेळीं पुण्यवासना उठे ॥
इंद्रिये करूनी आदटे ॥ परी अंतीं होती शांत ॥ ६८ ॥
जेव्हा सत्वगुण चित्तांत प्रगट होतो, तेव्हां तेव्हां पुण्यवासना होऊन इंद्रिये उचंबळू लागतात, पण ती अखेर शांत होतात. ६८
निपजती कर्में सात्विके ॥ जी उत्तम योनि दायके ॥
तियें पुरविती कौतुकें ॥ स्वर्गसुखाची ॥ ६९ ॥
त्यामुळे सात्विक कमें घडतात. ती उत्तम योनी प्राप्त करून देणारी असतात. त्यामुळे स्वर्गसुखाची हौस पुरी होते. ६९
रजोगुण उठे चित्तीं ॥ ते वेळीं अभिलाषीं पावे स्थिती ॥
मग इंद्रियें प्रवर्तती ॥ विषयोद्यमीं ॥ ७० ॥
चित्तांत रजोगुण उठला कीं, मनांत अभिलाष उत्पन्न होतो; आणि मग इंद्रिये विषयाच्या प्रयत्नास प्रवृत्त होतात. ७०
कर्मे निपजती राजसे ॥ जिथे विषयांचेनी अध्यासें ॥
रजोयोनी कर्मवशें ॥ पावे अनुक्रमें ॥ ७१ ॥
तेथे राजस कर्में निपजतात; आणि त्या विषयांच्या ध्यासाने कर्मानुरूप ओळीनेच रजोयोनी प्राप्त होते. ७१
चित्तीं तमोगुणाचा होय अवतार ॥ ते वेळीं उठे क्रोधज्वर ॥
पापवासनेचें अभ्यंतर ॥ वर्ते इंद्रियग्रामीं ॥ ७२ ॥
चिंत्तांत तमोगुणाचा अवतार (अवतारच तो !) झाला की, क्रोधज्वर अंगी भरलाच ! आणि इंद्रियसमूहांत आंतून पापवासना खेळू लागते ७२
कर्में निपजती तामसे ॥ जे हीनरूप होती आपैसें ॥
मूढयोनींत कर्मवशें ॥ जीव जन्म पावे ॥ ७३ ॥
येथे तामस कमें निपजतात. ते आपोआपच हीनरुप होऊन कर्मानुसार जीव मूढ योनीत जन्म पावतात. ७३
जे वेळीं जो गुण उठी ॥ तो येरा दोहींतें आणि तळवटीं ॥
तेथें विषयपरिपाठी ॥ ते सर्वथा नाहीं ॥ ७४ ॥
ज्या ज्या वेळी जो जो गुण उठतो, त्यावेळी तो तो दुसर्‍या दोघांना खाली आणतो, एवढेच. तेथे (मुळांत) विषयाचे बिलकुल नांव नाहीं. ७४
हे गुणत्रयाचें बंधन ॥ जीवासी पडलें गहन ॥
तंववरी नचुके जन्ममरण ॥ कल्पकोटी ॥ ७५ ॥
जोपर्यंत ह्या त्रिगुणांच्या बेडीने जीव अगदी जखडला गेला आहे, तोपर्यंत कोटी कल्प गेले तरी जन्ममरण कांही चुकावयाचें नाही. ७५
ही गुणत्रयाची व्याख्या ॥ जे त्रिगुणसृष्टी असंख्या ॥
जेथे महाप्रळयीं सौख्या ॥ नाही स्वरूपाचे ॥ ७६ ॥
हीच त्रिगुणांची व्याख्या होय. त्रिगुण सृष्टि ही असंख्य आहे. तेथे महाप्रळय झाला तरी सुद्धां स्वरूपसुख म्हणून जें आहे ते नाहीच. ७६
जंव जीवासी मलिनदशा ॥ तंव न चुके गर्भवासा ॥
आणिक नटके सहसा ॥ तुर्या भूमी पै ॥ ७७ ॥
जिवाची जोपर्यंत मलिन दशा आहे, तोपर्यंत गर्भवासही चुकावयाचा नाही; आणि तुर्यावस्था ही सहसा तिकडे ढुंकून पहावयाची नाही. ७७
ते तुर्या दशा कैसी ॥ तुज निरूपिजेल ऐसी ॥
तरी अवधान निजमानसीं ॥ दृढ करावे ॥ ७८ ॥
आतां ती तुर्यावस्था कसी असते तेही तुला सांगण्यांत येईल. तर नीट चित्त दे. ७८
स्वरूपाचे अनुसंधान ॥ तोचि देह महाकारण ॥
तेथे तुर्या अवस्था जाण ॥ सर्वसाक्षिणी ॥ ७९ ॥
स्वरूपाचे अनुसंघान, तोच महाकारण देह होय. आणि तेथेंच तुर्या ही सर्व साक्षिणी अवस्था समजावी ७९
तेंचि साक्षित्व आइक ॥ तुज सांगिजेल कौतुक ॥
जेणें तरले जनकादिक ॥ भवसागरीं ॥ ८० ॥
आतां साक्षित्व कसे असतें त्याची मौज तुला सांगतो. ऐक, तेणेंकरून जनकादिक हा भवसमुद्र तरून गेले. ८०
मी जागृती ना स्वप्न ॥ सुषुप्ती ना कल्पना कवण ॥
हे अवस्थात्रय मी न ॥ ना मज आथी ॥ ८१ ॥
मी जागृतिही नव्हे व स्वप्नही नव्हे; मी सुषुप्ती नव्हे कीं, कोणतीही कल्पना नव्हें; मी हे अवस्थात्रयही नव्हे; त्याचा माझ्याकडे कांही संबंध नाहीं. ८१
मी स्थूल ना लिंगदेह ॥ अज्ञान ना तत्कार्य मोह ॥
निर्विकार विदेह ॥ परमात्मा मी ॥ ८२ ॥
मी जडही नव्हे व लिगही नव्हे; अज्ञानही नव्हे, किंवा हें त्याचें कार्य ( अविद्येचे उठलेलें अ!भाळ) ही मी नव्हे. मी निर्विकार, विदेह, परमात्मा तो मी. ८२
मी विश्व ना तेजस ॥ प्राज्ञ तोही परवश ॥
हे अभिमानी मी उदास ॥ अभिमानशून्य ॥ ८३ ॥
मी विश्वही नव्हे, तैजसही नव्हें. पाज्ञ ह्मणावा तर तोही परतंत्र आहे. हे अभिमानी आहेत व मी उदास-अभिमानरहित-आहे. ८३
नयन कंठ हृदय ॥ मज नाहीं स्थानत्रय ॥
स्थानमानरदित अद्वय ॥ ते परब्रह्म मी ॥ ८४ ॥
नयन, कंठ, हृदय ही तीन जी स्थाने तीही मला नाहींत. तर स्थान मान शून्य, अद्वय, (केवळ एकीएक) असें जे परब्रह्म ते मी. ८४
मी स्थूल ना प्रविविक्त ॥ आनंदही नोव्हे सुषुप्त ॥
असो हे मी गुणातीत ॥ परब्रह्म मी ॥ ८५॥
मी स्थूलही नाही व प्रविविक्तही (सूक्ष्मही) नाहीं; मी आनंदही नव्हें की सुषुप्तीही नव्हे. असो तर ह्यापैकीं कोणीही मी नव्हें. मी गुणातीत परब्रह्म जें तें मी. ८५
या परी स्वरूपातें ॥ स्वयें बुझणे निरुतें ॥
तये अवस्था तुर्येतें ॥ बुझीजसू ॥ ८६ ॥
येणेंप्रमाणें आपलें आपणच स्वरुपाला निश्चितपणें जाणणें तीच तूं तुर्यावस्था म्हणून समज. ८६
दर्पेची परिपक्वता ॥ तेचि उन्मनी अवस्था ॥
निंबोळियांस मधुरता ॥ जैशी पक्वदशें ॥ ८७ ॥
ज्याप्रमाणें लिंबे पक्वदशेस आली म्हणजे त्यांस माधुर्य प्राप्त होतें त्याचप्रमाणे तूर्येचीही परिपक्वदशा पूर्ण-श्रेष्ठ पायरी तीच उन्मनी अवस्था होय. ७
तुर्या न शुद्धवासना ॥ तेथें हाचि कडवटपणा ॥
उन्मनी बुझ निर्वासना ॥ म्हणूनि गोड ते ॥ ८८ ॥
तुर्या ही शुद्ध वासना होय. परंतु तेथे वासना हाच कडवटपणा असतो. आणि उन्मनी अवस्था अगदीं वासनारहित असते हें ध्यानांत ठेव. म्हणूनच ती उन्मनी गोड असें समज. ८८
जैसी साखर उदकीं विरे ॥ परी तेथींची मधुरता उरे ॥
तैसी तुर्या खरूपीं मुर ॥ ते उन्मनी गा ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणें साखर पाण्यांत विरते पण तेथें तिचा गोडपणा राहतो त्याचप्रमाणे तुर्यास्वरूपांत मुरून जी उरली ती उन्मनी अवस्था होय. ८९
अवस्था पंचम नास्ति ॥ ऐसी वदे वेदश्रुती ॥
द्युपनि तुर्येची परिणाम स्थिति ॥ ते उन्मनी कीं ॥ ९० ॥
पांचवी अवस्थाच नाही, असे श्रुतीचे म्हणणें आहे. म्हणून नुर्येची परिपूर्णावस्था ती उन्मनी असे म्हणावयाचें. ९०
त्वंपदार्थाची शोधणूक ॥ ते येथें झाली सार्थक ॥
तदात्मा तो शिष्यटिळक ॥ बुजसी उतरार्धी ॥ ९१ ॥
त्वंपदार्थ शोधनाचे येथे सार्थक झाले. हे, शिष्यतिलका ! तोच तदात्मा हे सुटी उत्तरार्धी समजेल. ९१
असो ही अवस्थातुर्या ॥ आणि शरीर मायामय ॥
तेथींचा अभिमानी निश्चय ॥ तो प्रत्यगात्मा ॥ ९२ ॥
असो. तर ही तुर्यावस्था; आणि येथे माया हेंच शरीर होय. येथचा अभिमानी निश्चयेंकरून प्रत्यगात्मा हा होय. ९२
हेच तुर्या गा मैत्रा ॥ प्रणवींची अर्धमात्रा ॥
यांचे स्थान पवित्रा ॥ ब्रह्मरंध्र ॥ ९३॥
मित्रा ! हीच तुर्या प्रणवाची अर्धमात्रा होय. याचें पवित्रस्थान ब्रह्मरंध्र होय. ९३
आनंदाभास भोग ॥ या साहांचा समयोग ॥
ऐसा निपजला प्रसंग ॥ शुद्धसत्त्वें ॥ ९४ ॥
शुद्ध सत्वाने आनंद आभास, व भोग, (द्विगुणित) ह्या सहांचा संयोग होई असा प्रकार झाला. ९४
या समस्तांचा गुण ॥ तो प्रणवाचा चतुर्थ चरण ॥
स्वरूपीं निर्गुण ॥ नादात्मक तो ॥ ९५ ॥
ह्या सर्वांचा गुण तोच प्रणवाचा चवथा चरण होय. तो निर्गुण स्वरूपामध्ये नादरूपानें असतो. ९५
प्रणवाचेनि चतुर्थ चरणें ॥ हे सर्व कैसेनि होणें ॥
ऐशा आक्षेपीं शाहाणें ॥ आईक तूं ॥ ९६ ॥
प्रणवाच्या चतुर्थ चरणी हे सर्व घडते. ह्या प्रश्नाचें समर्पक उत्तर तूं ऐकून घे. ९६
गुणसाम्य व्यतिरेकें ॥ महामाया आत्मज्ञानाची नावचि देखे ॥
तरी सर्वसाक्षित्व तुर्या कें ॥ अवस्थाद्वय गा ॥ ९७ ॥
हे पहा गुणसाम्यव्यतिरेकानें महामाया ही आत्मज्ञानाची नावच आहे. तर सर्वसाक्षित्व तुर्यालक्षणेंकरून दोन अवस्था झाल्या आहेत. ९७
या अवस्थेचेनि संबंधे ॥ अभिमानी येणें शब्दे ॥
परमात्मा प्रत्यगात्मा ऐसीं द्विविधें ॥ नांवें ब्रह्मासचि कीं ॥ ९८ ॥
सा अवस्थांमुळे अभिमानी या शब्दांनी परमात्मा व प्रत्यगात्मा अशी दोन नांवें ब्रह्मासच पडलीं आहेत. ९८
न भासे जैं महामाया ॥ तैं कैचें साक्षित्व आणि तुर्या ॥
तीवीण परमात्मप्रत्यगात्मया ॥ अभिमानित्व कैंचें ॥ ९९ ॥
मायेचा भास जर नाहीसाच झाला तर मग कोठचें साक्षित्व आणि कोठची तुर्या ! तिच्याशिवाय परमात्मा व प्रत्यगात्मा त्यांस तरी अभिमानित्व कसले ? ९९
येणें पूर्वोक्तेंविण ॥ कवणाचें मूर्ध्निस्थान ॥
आनंदाभास भोग करण ॥ बोलेचि गा ॥ १०० ॥
ह्या पूर्वोक्ताबवांचून मूर्ध्निस्थान तें कोणाचे ? आनंदाभास भोग तो कशाचा ? सांग बरें. १००
येणें शुद्धपंचकेंविण ॥ शुद्धसत्वाचा विस्तार तो कवण ॥
म्हणून हे सर्व चतुर्थ चरण ॥ प्रणवाचा पै ॥ १०१ ॥
ह्या शुद्धपंचकावांचून शुद्ध सत्याची गोष्ट कसली ? म्हणून हा सर्व प्रणवाचा चतुर्थ चरण होय. १०१
जेथें वर्णाचा नाहीं उधार ॥ ध्वनिमात्राचा व्यवहार ॥
म्हणून अर्धमात्रा ऐसा निर्धार ॥ जाणिजस तूंचि ॥ १०२ ॥
जेथे वर्णाचा उच्चार नाही, केवळ ध्वनि मात्र असतो म्हणून अर्धमात्रा निश्चयानें तीच. असा निश्चय तुझा तूंच कर. १०२
तथापि चतुर्थ चरण ॥ येणें शब्दे बोले योगिजन ॥
तेथे परमात्माचि सगुण ॥ निरूपिजे पै ॥ १०३ ॥
तथापि योगीजन म्हणतात की चतुर्थ चरण ह्या शब्दानें तेथे सगुण परमात्माच घेतला पाहिजे. १०३
मग नादासी होय विश्रांती ॥ मायेसी होय उपशांति ॥
उरे केवळ ज्ञप्ती ॥ ब्रह्म सत्तामात्र जें ॥ १०४ ॥
मग नादही विश्रांति घेतो, मायाही थंड होते, मग केवळ ज्ञप्ति म्हणजे केवळ सत्ता मात्र ब्रह्म तेवढेच राहते. १०४
असो या महाकारणव्यतिरिक्त ॥ कांहींच नाहीं कार्यजात ॥
म्हणूनि प्रपंचासी भिन्नत्व ॥ नाहीं परब्रह्मीं ॥ १०५ ॥
असो. त्या महाकारणावेगळें कार्यजात म्हणून कांही नाहींच ह्मणून परब्रह्माच्या ठिकाणीं प्रपंचाला वेगळेपणा नाही. १०५
परब्रह्माचिया सत्ता ॥ कारण प्रपंचासी अस्तिता ॥
तेणें होय विद्यमानता ॥ सूक्ष्म प्रपंचासी ॥ ॥ १०६ ॥
परब्रह्माच्या सत्तेने कारण प्रपंचाला अस्तित्व येतें आणि त्यामुळेंच सूक्ष्म प्रपंचालाही अस्तित्व येतें. १०६
स्थूलप्रपंचाविण ॥ स्थूलप्रपंचासी नाहीं वर्तन ॥
म्हणूनि कार्यचि कारण ॥ जाण येणें न्यायें ॥ १०७ ॥
सूक्ष्म प्रपंचाशिवाय स्थूल प्रपंचही नाही. म्हणून कार्यच कारण हा न्याय ध्यानांत आण. १०७
ह्मणूनि अकार तोचि उकार ॥ उकार तोचि मकार ॥
मकार तोचि अनाक्षर ॥ परमात्मा पै ॥ १०८ ॥
म्हणून आकार तोच उकार, उकार तोच मकार, व मकार तोच अनाक्षर (वर्णरहित) परमात्मा होय. १०८
ऐसें आपणया आपण बुझे ॥ तो जीव शुद्ध बोलिजे ॥
ब्रह्मसाक्षात्कार पाविजे ॥ तेणेंचि पैं ॥ १०९ ॥
त्याप्रमाणें आपणच आपल्याला जाणतो, तो जीव शुद्ध जमे म्हणतात. ब्रह्म साक्षात्कार घ्यावा, असा त्यानेंच. १०९
असो हे ईश्वरोपाधि समष्टि ॥ जीवोपाधि वोलिजे व्यष्टि ॥
ऐसी व्यष्टीसमष्टीची गोष्टी ॥ ते पादत्रय पै ॥ ११० ॥
असो. त्या ईश्वरोपाधीला समष्टी व जीवाच्या उपाधीला व्यष्टि म्हणतात. हे व्यष्टिसमष्टीचे प्रकार हेच तीन पाद होत. ११०
एवं शबल त्वंपदार्थ ॥ प्रणवाचे पादत्रय यथार्थ ॥
अर्धमात्रा शोधिलीया ऐक्यार्थ ॥ होती असि पदी ॥ १११ ॥
अशा प्रकारे शबल त्वं पदार्थ, प्रणवाचें यथापादत्रय, आणि अर्धमात्रेचा विचार पाहिला सणजे असिपदाचे ठिकाणी ऐक्यार्थ होतो. १११
तो शोधनक्रम कैसा ॥ ऐसें म्हणसी गा वत्सा ॥
तरी उत्तरार्धी स्वेच्छा ॥ बुझसी तूं ॥ ११२ ॥
आतां तो अर्धमात्रेचा शोधन (विचार) क्रम कसा आहे म्हणशील तर हे वत्सा ! तें तूं उत्तरार्धी हवें तसे समजून ११२
ऐसी श्रीगुरूची वाणी ॥ ऐकोनि शिष्यशिरोमणी ॥
करितां झाला विनवणी ॥ श्रीमुकुंदराज म्हणे ॥ ११३ ॥
श्रीमुकुंदराज म्हणतात. ''अशी श्रीगुरूंची वाणी ऐकून शिषयशिरोमणि विनंति करूं लागला.'' ११३
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
स्थूलदेहकथनं नाम षष्ठप्रकरणं समाप्तम् ॥

GO TOP