शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(३०१)

यावत् स्वस्य संबंधोऽहंकारण-दुरात्मना ।
तावन्न लेश-मात्रापि मुक्ति-वार्ता विलक्षणा ॥ ३०१ ॥
जोपर्यंत दुष्ट स्वरूप असणाऱ्या अहंकाराशी आपला (स्वस्थ) संबंध आहे, तोपर्यंत वेगळ्या मुक्तीची लेशमात्रसुद्धा गोष्ट शक्य नाही.


बुद्धीत पडलेले प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव. या प्रतिबिंबामुळे चिदाभासामुठ्ये बुद्धीत प्रगट झालेल्या अहंकाराशी जीवाचा संबंध येतो आणि जोपर्यंत जीवाचा अहंकाराशी संबंध आहे, तोपर्यंत मुक्तीची गोष्ट काढू नये.

मुक्ती ही अहंकारापेक्षा वेगळी आहे. मुक्ती म्हणजे जन्म-मरणाचा अभाव, ब्रह्म होऊन जाणे. म्हणजे प्रत्यगात्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा अनुभव. याउलट अहंकारामुळे आसक्ती वाढून जन्म-मरणाचा बंध येतो.


(३०२)

अहंकार-ग्रहान्मुक्तः स्वरूपमुपपद्यते ।
चंद्रवद् विमलः पूर्णः सदानंदः स्वयंप्रभः ॥ ३०२ ॥
(राहू या) ग्रहापासून मुक्त झालेला चंद्र स्वतःचे मूळ स्वरूप प्राप्त करून घेतो. ते स्वरूप असते विमल, पूर्ण, सदा आनंद देणारे आणि स्वतः प्रकाशणारे. त्याप्रमाणे (अहकाररूपी ग्रहापासून) सुटलेला जीव स्वतःचे मूळरूप प्राप्त करून घेतो. आणि ते मूळ स्वरूप स्वच्छ, पूर्ण, सदानंद, आणि स्वयंप्रकाशी असते.


पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. एखाद्या पौर्णिमेला राहू हा ग्रह चंद्राला ग्रासतो. आणि ग्रहणामुळे चंद्राचे मूळ रूप दिसेनासे होते. त्या ग्रहणातून सुटल्यावर चंद्राला स्वतःचे विमल, पूर्ण इत्यादी रूप प्राप्त होते. त्याप्रमाणे अहंकारापासून सुटलेला जीव स्वतःचे मूळ रूप प्राप्त करून घेतो. म्हणजे तो विमल, पूर्ण, सदानंद स्वरूप, स्वयंप्रकाशी प्रत्यगात्मा/ब्रह्म होऊन जातो.

येथे अहंकारावर राहू या ग्रहाचे रूपक आहे. ग्रह म्हणजे पिशाच असा अर्थ घेतल्यास - पिशाचाने पछाडलेला माणूस काहीही करतो. परंतु पिशाचाने सोडलेला माणूस पूर्ववत् होतो. त्याप्रमाणे अहंकाररूपी पिशाचाने पछाडलेला माणूस बेताल होतो. पण अहंकारातून सुटलेला माणूस स्वतःचे मूळ प्रत्यगात्म स्वरूप प्राप्त करून घेतो.


(३०३)

यो वा पुरे सोऽहमिति प्रतीतो बुद्ध्या प्रक्‍ऌप्तस्तमसा निमूढया ।
तस्यैव निःशेषतया विनाशे ब्रह्मात्मभावः प्रतिबंध-शून्यः ॥ ३०३ ॥
तमोगुणाने अतिशय कृ झालेल्या बुद्धीने कल्पिलेला असा हा (अहंकार) (शरीररूपी) नगरात 'तो म्हणजे मी 'अशा स्वरूपात प्रतीतीला येत असतो, त्याचाच पूर्णपणे नाश झाला असता, प्रतिबंधरहित असे जीव-ब्रह्माचे ऐक्य प्रगट होते.


शरीराला नगर म्हणतात. शरीरात बुद्धी आहे. या बुद्धीत अहंकार प्रगट होतो. अज्ञानाचे सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण बुद्धीत आलेले आहेत. बुद्धीत प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब पडल्यावर तिच्यातील तमोगुणाने .अहंकार प्रगट होतो आणि तो 'मी म्हणजे देह 'या स्वरूपात प्रतीतीला येऊ लागतो. हा अहंकार जीकब्रह्माच्या ऐक्यात अडथळा आणतो. या अहकनाचा नाश होताच जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य प्रगट होते.


(३०४)

ब्रह्मानंद-निधिर्महाबलवताहंकार-घोराहिना
संवेड्यात्मनि रक्ष्यते गुणमयैश्चण्डैस्त्रिभिर्मस्तकैः ।
विज्ञानाख्य - महासिना श्रुतिमता विच्छिद्य शीर्ष-त्रयं
निर्मूल्याहिमिमं निधिं सुखकरं धीरोऽनुभोक्तुं क्षमः ॥ ३०४ ॥
गुणांनी युक्त अशा तीन फडांनी, अतिशय सामर्थ्य असणारा अहंकाररूपी भयंकर सर्प हा ब्रह्मानंदरूपी निधीला स्वतःच्या शरीराने (आत्मनि) वेष्टन (अथवा - शरीराखाली दडवून) त्या निधीचे रक्षण करीत आहे. सुतीचे साह्य असणाऱ्या आणि साक्षात्कार (विज्ञान) हे नाव असणाऱ्या प्रचंड तलवारीने (त्या सापाची) तीनही मस्तके/फडा तोडून टाकून व या सापाचा समूळ नाश करून, हा सुखकर निधी भोगण्यास (एखादाच) बुद्धिमान म्हणजे विवेकी पुरुष समर्थ होतो.


या श्लोकात एक रूपक आहे - ब्रह्मानंद म्हणजे निधी, त्याचे रक्षण करणारा साप म्हणजे अहंकार, तीन गुण म्हणजे सापाच्या तीन फडा, आणि विज्ञान म्हणजे प्रचंड तलवार.

पूर्वकाळी अशी एक समजूत होती - पूर्वजांनी लपवून ठेवलेला धनाचा साठा म्हणजे निधी हा कोणीतरी पूर्वज सापाचे रूप धारण करून रक्षण करीत असतो. किंवा एखादा साप द्रव्यनिधीचे रक्षण करीत असतो. तसेच काही विशिष्ट सापाला एकापेक्षा जास्त फडा असतात, अशीही एक समजूत होती.

या श्लोकातील कल्पना अशी आहे - ब्रह्मानंदाचे रक्षण अहंकार करीत आहे. तो सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी आच्छादन घालून रक्षण करीत आहे. याचा अर्थ असा की हा अहंकाररूपी साप अयोग्य माणसाला ब्रह्मानंद मिळू देत नाही. तीन गुणांनी मोहित झालेला माणूस ब्रह्मानंद मिळवू शकत नाही. तीन गुणांना बाजूस सारून गुणातीत होणारा पुरुष विज्ञानरूपी तलवारीने गुणांचा नाश करून अहंकाररूपी सापाला नष्ट करून ब्रह्मानंद प्राप्त करून घेऊ शकतो.

'श्रुतिमता 'शब्दाने श्रुतीच्या साहाय्याने असा अर्थ आहे. गुरू श्रुतीने सांगितलेले विज्ञानच शिष्याला सांगतो. 'श्रुतिमता 'शब्दाचे स्थानी 'युतिमता '(प्रकाशमान, तेजस्वी, लखलखीत) असा पाठभेद आहे आणि तो 'विज्ञानरूपी तलवारीचे 'विशेषण आहे.


(३०५)

यावद् वा यत् किंचित्- विष-दोष-स्फूर्तिरस्ति देहे ।
कथमारोग्याय भवेत्- तद्वदहंतापि योगिनो मुक्त्यै ॥ ३०५ ॥
अथवा जोपर्यंत शरीरात थोडादेखील विषाचा दोषासंचाराकार्य करीत असेल, तोपर्यंत (ते कार्य) आरोग्याला कसे बरे कारणीभूत होईल ? त्याप्रमाणे जोपर्यंत ज्ञानयोग्याच्या अंगात अहंकार असेल तोपर्यंत तो मुक्तीसाठी कसा बरे उपयुक्त ठरेल ?


येथे अहंकाराची तुलना विषाशी केली आहे. अहंकार असेपर्यंत माणसाला मोक्ष मिळत नाही. श्लोक ३०१ पहा.


(३०६)

अहमोऽत्यंत-निवृत्या तत्कृत-नाना-विकल्प-संहत्या ।
प्रत्यक्-तत्त्व-विवेकादिदमहमस्मीति विंदते तत्त्वम् ॥ ३०६ ॥
अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती, त्याच्यामुळे उद्भवलेल्या नाना प्रकारच्या विकल्पांचा संहार/नाश, आणि प्रत्यगात्मा या सत्य वस्तू चा विवेक, हे (सर्व) झाल्यानंतर, 'हे (ब्रह्म) मी आहे 'या स्वरूपात विवेकी पुरुषाला (स्वतःचे) सत्यस्वरूप (तत्त्व) प्राप्त होते.


अहंकार आणि त्याची कार्ये यामुळे आपणास प्रत्यगात्मा कळत नाही. अहंकार व त्याचे कार्य यांपेक्षा प्रत्यगात्मा वेगळा आहे हा विवेक व्हावयास हवा. त्यानंतर अहंकार व त्याची कार्ये नष्ट झाल्यावर, मगच मुमुक्षूला स्वतःचे खरेखुरे ब्रह्मस्वरूप प्राप्त होते.


(३०७)

अहंकारे कर्त-र्यहमिति मतिं मुंच सहसा
विकासत्यन्यात्म-प्रतिफल-जुषि स्वस्थिति-मुषि ।
यदध्यासात् प्राप्ता जनि-मृति-जरा-दुःख-बहुला
प्रतीचश्चिन्मूर्तेस्तव सुख-तनोः संसृतिरियम् ॥ ३०७ ॥
विकार हे ज्याचे स्वरूप आहे (विकारात्मनि), जो आत्म्याचे प्रतिबिंब (प्रतिफल) धारण करतो ('जुषि), जो स्वतःची - आत्म्याची) स्थिती चोरणारा आहे (पुषि) (म्हणजे आत्म्याचे स्वरूप झाकणारा आहे) आणि जो कर्ता आहे, अशा त्या अहंकाराच्या ठिकाणची 'मी' अशी बुद्धी ताबडतोब (सहसा) टाकून दे. कारण त्याच्या अध्यासामुळे (हे शिष्या), प्रत्यगू-रूप, चित् -स्वरूप आणि आनंदरूप (सुख-ततोः) अशा तुला जन्म, मरण, जरा, दुःख यांनी भरलेला हा संसार प्राप्त झाला आहे.


अहंकार हाच खरा कर्ता आणि भोक्ता आहे (श्लोक १०६) तो अहंकार म्हणजे मी ? आत्मा अशी बुद्धी हे शिष्या टाकून दे. अहंकारावर मीचा/आत्माचा अभ्यास केल्यामुळे माणूस दुःखरूप संसारात पडला आहे. संसार हे काही आत्म्याचे स्वरूप नाही. आत्मा हा प्रत्यगू-रूपाअंतरात्मरूप, चित्रस्वरूपी, सुखरूप आहे. हे शिष्या, ते आपले खरे स्वरूप आहे. पण अहंकाराच्या अध्यासामुळे ते खरे रूप बाजूला पडते आणि माणूस याच संसारात अडकून पडतो.

अहंकार हा विकाररूप आहे; तो बदलणारा आहे; त्याची कार्ये वाईट आहेत. अहंकार हा माणसापासून आत्म्याची खरी स्थिती चोरून नेतो म्हणजे लपवून ठेवतो. ती स्थिती तो माणसाला कळू देत नाही. अहंकारामुळे 'देह इत्यादी म्हणजे मी - आत्मा) 'अशी भावना झाल्याने या प्रत्यगात्म्याचे स्वरूप अहंकारामुळे झाकले जाते. 'या अहंकारात आत्म्याचे प्रतिबिंब पडते ', असे येथे म्हटले आहे. या संदर्भात हे लक्षात घ्यावे - खरे म्हणजे बुद्धीत आत्म्याचे प्रतिबिंब पडले की अहंकार जागृत होतो. हा अहंकार बुद्धीचाच एक भाग आहे. त्यामुळे बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब हे अहंकारात पडते, असे येथे म्हटले आहे.


(३०८)

सदैक-रूपस्य चिदात्मनो विभोरानंद-मूर्तेरनवद्य-कीर्तेः ।
नैवान्यथा क्वाप्यविकारिणस्ते विनाहमध्यासममुष्य संसृतिः ॥ ३०८ ॥
सदा एकच रूप असणाऱ्या, चैतन्य स्वरूप, सर्वव्यापक (विभोः), .आनंदस्वरूप, निर्दोष कीर्ती असणाऱ्या आणि विकाररहित अशा (हे शिष्या) तुला या अहंकाराच्या अध्यासाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे आणि कोठेही संसार (असू शकत) नाही.


गुरूच्या मते शिष्य हा ब्रह्मरूप आहे. म्हणून ब्रह्माच्या संदर्भात वापरले जाणारे शब्द हे शिष्याच्या संदर्भात या श्लोकात वापरले 'आहेत. आता ब्रह्म म्हणजेच प्रत्यगात्मा आहे, अहंकाराच्या अध्यासामुळे त्याला जन्ममरणरूप संसार येतो. अहंकाराचा अध्यास असा होतो - प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडताच अहंकार प्रगट होतो. मग चिव्याया/चित्रप्रतिबिंब/प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब, देह आणि साक्षी असणारा प्रत्यगात्मा यावर अहंकाराचा अभ्यास होऊन, 'देह म्हणजे मी ', 'चित्यतिबिंब म्हणजे मी ', आणि 'प्रत्यगात्मा म्हणजे मी 'असा अध्यास होतो (अहकारस्य तादात्म चिच्छाया-देह-साक्षिभिः ॥ शंकराचार्यकृत वाक्यसुधा, ८ ).

'अनवद्य-कीर्तेः' हा शब्द शिष्याला लागू पडेल. अनवद्य म्हणजे निर्दोष, कीर्ती म्हणजे स्वरूप 'असा अर्थ घेऊन ते ब्रह्माकडे घेता येईल.


(३०९)

तस्मादहंकारमिमं स्व-शत्रुं भोक्तुर्गले कंटकवत् प्रतीतम् ।
विच्छिय विज्ञान-महासिना स्फुटं भुंक्ष्वात्म-साम्राज्य-सुखं यथेष्टम् ॥ ३०९ ॥
म्हणून जेवणाऱ्याच्या घशात काटा असल्याप्रमाणे प्रतीत होणारा हा अहंकाररूपी स्वतःचा शत्रू आहे. विज्ञानरूपी प्रचंड तलवारीने त्याला संपूर्णपणे छटी छाटून टाकून, (हे शिष्या) तू आपल्या आत्मसाम्राज्याचे सुख यथेच्छ भोग.


'स्फुटं 'चा अर्थ 'उघडपणे 'असा घेऊन, तो शब्द 'भोतुः 'पूर्वी घेता येईल. या श्लोकात मुमुक्षू शिष्यावर राजाचे, अहंकारावर राजाच्या शत्रूचे, आत्मसुखावरा मोक्षसुखावर साम्राज्य भोगण्याच्या सुखाचे रूपक केलेले आहे.

'जेवणाऱ्याच्या घशातील काट्याप्रमाणे 'या शब्दांनी असे सांगावयाचे आहे की गळ्यातला काटा बाहेरून दिसत नाही पण तो आत मात्र त्रास देत असतो, त्याप्रमाणे अहंकार हा मुमुक्षूला प्रच्छन्नपणे त्रास देत असतो. विज्ञान हेही दृश्य नाही. अहंकाररूपी प्रच्छन्न शत्रू हा विज्ञानरूपी अदृश्य तलवारीने काटावयाचा आहे. अहंकार नष्ट झाला की मुमुक्षुरूपी राजाला मोक्षरूपी साम्राज्याचा यथेच्छ भोग घेता येतो.

'विज्ञानरूपी असि ' चा उल्लेख श्लोक ३०४ मध्ये आलेला आहे.


(३१०)

ततोऽहमादेविनिवर्त्य वृत्तिं संत्यक्त-रागः परमार्थ-लाभात् ।
तुष्टी समास्स्वात्म-सुखानुपूत्या पूर्णात्मना ब्रह्मणि निर्विकल्पः ॥ ३१० ॥
नंतर परमार्थाचा लाभ झाल्यामुळे ज्याने विषयांवरची आसक्ती पूर्णपणे टाकली आहे, अशा (हे शिष्या) तू अहंकार इत्यादी वृत्तींचा लय करून (विनिवर्त्य - मागे परतवून), आत्मसुखाच्या अनुभवाने निर्विकल्प होऊन, (त् ब्रह्माचे ठिकाणी संपूर्णपणे (पूर्णात्मना) शांत होऊन राहा (समास्व)


परमार्थ म्हणजे परमअर्थ, श्रेष्ठ पदार्थ. आत्मा (क्य ब्रह्म) हा सर्वश्रेष्ठ पदार्थ/वस्तू आहे. अहंकाराचा लय/नाश झाल्यावर परमार्थाचा म्हणजेच आत्म्याचा लाभ होतो. म्हणून विषयांतील आसक्ती संपूर्णपणे सोडून देऊन, मी-माझे इत्यादी वृत्ती मागे परतवून म्हणजे संपूर्ण घालवून, आत्म्याच्या अनुभवाच्या आधारे, शिष्याने निर्विकल्प होऊन, ब्रह्माशीआत्म्याशी संपूर्णपणे एकरूप होऊन रहावयाचे आहे. एकदा का ब्रह्मरूप/आत्मरूप झाले की बोलण्यास काही उरतच नाही.


(३११)

समूल-कृत्तोऽपि महानहं पुनर्वुल्लेखितः स्याद् यदि चेतसा क्षणम् ।
संजीव्य विक्षेप-शतं करोति नभस्वता प्रावृषि वारिदो यथा ॥ ३११ ॥
बलवान् असा अहंकार जरी मुळासकट कापून टाकला असला, तरी जर (यदि) मन त्याला एक क्षणभर उकरून काढील (म्हणजे त्याचे स्मरण करील (खुल्लेखित), तर तो पुनः जिवंत होऊन शेकडो विक्षेप करील. जसे पावसाळ्यात वादळीवारा ढगाला फिरवितो.


एखादा वृक्ष मुळासकट तोडला तर तो पुनः उगवत नाही. अहंकार मात्र तसा नाही. अहंकाराचा उच्छेद केला असला (श्लोक ३०९) तरी तो इतका बलवान् आहे की त्याला जराजरी संधी मिळाली तर तो उसळून पुनः वर येतो. म्हणजे असे - समजा चुकून क्षणभर मनात विचार आला की 'पूर्वी मी अमुक होतो 'इत्यादी, तर तेवढा बेसावधपणाचा क्षण अहंकाराला पुरतो आणि अहंकार पुनः जिवंत होऊन उसळतो आणि पूर्वीप्रमाणे तो नानाप्रकारचे विक्षेप, अडथळे, संकल्प-विकल्प निर्माण करून माणसाचा घात करतो. याचा अर्थ .असा की अहंकार हा सतत नष्ट या स्वरूपातच राहील वी काळजी जीवमुक्ताने घ्यावयास हवी. जसे - पावसाळ्यात वादळी वाऱ्याने जर मेघाला त्रास दिला तर तो अतिवृष्टी करील, महापूर आणील, झाडे जमीनदोस्त करील, इत्यादी प्रकारांनी तो माणसाला त्रास देत राहील.

हीच गोष्ट आणि एक वेगळे उदाहरण देऊन लोक ३१२ मध्ये कथन केली आहे.


(३१२)

निगृह्य शत्रोरहमोऽवकाशः क्वचिन्न देयो विषयानुचिंतया ।
स एव सजीवन-हेतुरस्य प्रक्षीण-जंबीर-तरोरिवांबु ॥ ३१२ ॥
अहंकाररूपी शत्रूचा निग्रहानाश वेल्यावर, विषयांचे चिंतन करून त्याला (पुन जिवंत होण्यास) अवकाश देऊ नये. (कारण.) अतिशय. क्षीण झालेल्या ईडलिंबाच्या झाडाला पाणी जसे पुनर्जीवन देते, त्याप्रमाणे (अहंकाराला दिलेला अवकाश) हाच त्याला पुनर्जीवन मिळण्याचे कारण आहे.


येथे एक लक्षात ठेवावे. अहंकार हा नष्टप्राय होतो, तो समूळ नष्ट केला जाऊ शकत नाही. त्याची निवृत्ती, निग्रह केला जाऊ शकतो; तो पुनः कार्यप्रवण होण्याची वाट पाहत असतो आणि जरा जरी संधी मिळाली की तो पुनः उफाळून वर येतो. म्हणून जीवमुक्ताने चुकून एक क्षणभर जरी विषयाचे चिंतन केले तर ते अहंकाराला पुरते. त्याचा लाभ घेऊन अहंकार पुनः ताज्या दमाने कार्यप्रवण होतो. जसे - सुकलेले लिंबाचे झाड पाणी मिळताच पुनः वाढते, आणि आपले कार्य सुरू करते.


(३१३) क्षणिक विषयांच्या चिंतनाने अहंकार पुनः जिवंत होतो आणि तो वासना वाढवितो. या वाढलेल्या वासना मोक्षाच्या आड येतात, असे श्लोक ३१३ पासून सांगितले आहे.

देहात्मना संस्थित एव कामी विलक्षणः कामयिता कथं स्यात् ।
अतोर्थ-संधान-परत्वमेव भेद-प्रसक्त्या भव-बंध-हेतुः ॥ ३१३ ॥
(अहंकारामुळे देहाला मी/आत्मा असे मागून) जो कोणी देहरूपानेच स्थित असतो, तो कामाने युक्त होतो (कामी). (देहापेक्षा स्वतःला) वेगळा समजणारा माणूस (विलक्षण) हा (विषयांची) इच्छा करणारा (कामयिता) कसा बरे होईल ? म्हणून (मी देह असे मानल्याने) 'मी चा जो अंतरात्म्यापासूनचा) भेट आणि त्याची आसक्ती (भेद-प्रसक्त्या), तीमुळे विषयांच्या अनुसंधानाची चटक हीच संसार-बंधाचे कारण आहे.


विषयचिंतनामुळे वासना वाढतात. वासना वाढल्या की त्यांची कार्ये वाढतात. वासनापूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी कर्मे केली जातात. ही कर्मे वाढली की विषय- वासनासुद्धा वाढतात. असा कार्य आणि वासना यांमध्ये परस्पर कार्यकारण संबंध निर्माण होतो. ही गोष्ट पुढील ३१ ४- ३१५ श्लोकांत कथन केली आहे.


(३१४) - (३१५)

कार्य-प्रवर्धनाद् बीज-प्रवृद्धिः परिदृश्यते ।
कार्य-नाशाद् बीज-नाशस्तस्मात् कार्यं निरोधयेत् ॥ ३१४ ॥
वासना-वृद्धितः कार्यं कार्य-वृद्ध्या च वासना ।
वर्धते सर्वदा पुंसः संसारो न निवर्तते ॥ ३१५ ॥
(बीजाचे) कार्य वाढल्यामुळे बीज वाढते असे दिसून येते. कार्याच्या नाशाने वीजाचा नाश होतो. म्हणून कार्याचा निरोध करावा. बीजरूपी) वासनेच्या वृद्धीने कार्य वाढते आणि कार्य वाढल्याने (बीजरूप) वासना पुनः वाढते. अशाप्रकारे माणसाचा संसार संपत नाही.


विषयांची वासना ही बीजरूप आहे. तिच्यामुळे विषयांच्या इच्छा आणि त्या इच्छांच्या पूर्तीसाठी क्रियाकर्म ही वासनेची कार्ये आहेत. वासनेमुळे विषयांची अभिलाषा इत्यादी वाढत जातात असे दिसून येते. ही कार्ये वाढली की विषय- वासनारूपी बीजही वाढते. उदा., वनस्पती, पीक, इत्यादी; वीजाचा अंकुर वाढला की बीज वाढते. आणखी असे -- बीजापासून वृक्ष वाढतो. तो वृक्ष फळरूपाने आणखी बीजे निर्माण करतो. गव्हाच्या एका बीजापासून गव्हाची अनेक बीजे तयार होतात. आता ही कार्येच जर वा दिली नाहीत, तर बीजेही वाढणार नाहीत. वासनावृद्धी आणि तिची कार्ये यांमध्ये परस्पर कार्यकारण संबंध आहे. जसे -कोंबडीतून अंडी आणि अंड्यातून कोंबडी. म्हणून वासना- वृद्धीने कार्याची वृद्धी आणि कार्यांच्या वृद्धीमुळे वासनांची वृद्धी होत राहते. हा कार्य-कारण-भाव वाढत गेला तर माणसाचा जन्म-मरण-रूप संसार कधीच संपणार नाही.


(३१६) - (३१७) म्हणून -

संसार-बंध-विच्छित्यै तद् द्वयं प्रदहेद् यतिः ।
वासना-वृद्धिरेताभ्या चिंतया क्रिया बहिः ॥ ३१६ ॥
नाभ्यां प्रवर्धमाना सा सूते संसृतिरात्मनः ।
त्रयाणां च क्षयोपायः सर्वावस्थासु सर्वदा ॥ ३१७ ॥
संसाराचा बंध तोडण्यासाठी (वासनारूपी बीज व त्याची कार्ये) या दोघांना संयमी मुमुक्षूने जाळून टाकावे. (कारण विषयांचे) चिंतन/अनुसंधान आणि त्याला धरून) बाहेर केलेली क्रिया, या दोहोंमुळे (ताभ्या) वाढणारी वासना ही माणसाचा स्वतःचा (आत्मनः) संसार निर्माण करते. म्हणून नेहमी आणि सर्व अवस्थांमध्ये या तिघांनाही नष्ट करण्याचा उपाय करावयास हवा.


विषयांचे चिंतन आणि तदनुसार क्रिया या दोहोंमुळे वासनेची वृद्धी होते व माणूस संसारात गुरफटत जातो. म्हणून संसाराचा बंध तोडण्यास, विषयांचे चिंतन, तदनुसार कार्य आणि त्यामुळे होणारी वासनांची वृद्धी या तीनही गोष्टींचा नाश सर्व अवस्थांत व्हावयास हवा. हा नाश कसा करावयाचा हे पुढील श्लोक ३१८ मध्ये सांगितले आहे.


(३१८)

सर्वत्र सर्वतः सर्व-ब्रह्म-मात्रावलोकनैः ।
सद्‌भाव-वासना-दार्ढ्यात् तत् त्रयं लयमश्नुते ॥ ३१८ ॥
सर्व ठिकाणी सर्व वेळी सर्व वस्तू ब्रह्मच आहेत असे पाहण्याने, त्या सत् (ब्रह्म- )भावाची वासना दृढ झाली की त्या तिघांचाही नाश होतो.


वासना, विषयांचे चिंतन आणि त्या चिंतनानुसार होणारी क्रिया या तिघांचाही नाश करण्याचा उपाय असा आहे - वासना बदलणे म्हणजे असे - आत्ता जी विषय-वासना आहे ती ब्रह्मवासना करणे. म्हणजे असे - सर्व काही ब्रह्म आहे. जग व जगातील विषय हे ब्रह्मावर आरोपित/अध्यस्त आहेत. सर्व जगाविश्व हे ब्रह्मच आहे, अशी वासना व्हावयास हवी. सर्व काही ब्रह्म आहे या ब्रह्मावलोकनाच्या अभ्यासाने सर्व काही ब्रह्मच आहे, ही वासना दृढ होते. आता सर्व काळी, सर्व ठिकाणी ब्रह्मच आहे हा विचार,'अभ्यास दृढ झाला की विषय वासना, विषयांचे चिंतन आणि चिंतनानुरूप कार्य या तिघांनाही जागाच उरत नाही. (येथे हे लक्षात घ्यावे - मोक्षाची इच्छा ही जशी लौकिक अर्थाने इच्छा नव्हे, त्याप्रमाणे ब्रह्म-वासना ही विषय-वासनेप्रमाणे बंधनकारक नसते.)

या तीन्हींचा लय कोणत्या क्रमाने होतो आणि शेवटी मोक्ष कसा मिळतो हे पुढील श्लोक ३१९ मध्ये सांगितले आहे.


(३१९)

क्रिया-नाशे भवेच्छिंता-नाशोऽस्माद् वासना- क्षयः ।
वासना-प्रक्षयो मोक्षः सा जीवम्युक्तिरिष्यते ॥ ३१९ ॥
सर्व काही ब्रह्म आहे या अवलोकनाने प्रथम विषयांतील) क्रियांचा नाश होतो. (मग) क्रियानाश झाल्यावर (विषयांचे) चिंतन नष्ट होते. त्या (चिंतनाच्या नाशा मुळे वासनांचा नाश होतो आणि वासनांचा संपूर्ण नाश म्हणजेच (संसार-बंधातून) सुटका आहे. ही 'सुटका/मोक्ष म्हणजेच जीवम्युक्ती आहे असे म्हटले जाते.


क्रिया होण्याला द्वैतानानात्व हवे. पण सगळे काही सर्वत्र एकाच ब्रह्माचे अद्वैत दिसत असेल तर क्रिया घडणार नाहीत. क्रिया नष्ट झाल्या की विषयांचे चिंतन नाही की वासनांचा नाश झालाच आणि असा वासनांचा नाश म्हणजेच मोक्षामुक्ती आहे.

वासनेमुळे माणूस विषयांचे चिंतन करतो आणि तदनुरूप विषयांच्या संदर्भात क्रिया करतो. विषय भिन्न असल्यामुळे क्रिया भिन्न होतात. आता विषय जर एकच म्हणजे ब्रह्म झाला तर अनेक क्रिया घडणार नाहीत. क्रियाच घडल्या नाहीत तर विषयांचे चिंतन कसे होणार ? आणि विषय-चिंतन जर थांबले तर वासना कशा वाढणार ? किंबहुना वासनाच राहणार नाहीत. अशाप्रकारे सर्व ब्रह्म आहे अशा बुद्धीमुळे वासनांचा नाश होतो आणि वासना-नाश म्हणजे संसारातून सुटका म्हणजेच मोक्ष. हा मोक्ष माणसाला विद्यमान चालू जीवनातच साधता येतो. त्याला जीवम्युक्ती म्हणतात.


(३२०)

सद्-वासना-स्फूर्ति-विजृंभणे सत्यसौ विलीनाप्यहमादिवासना ।
अतिप्रकृष्टाप्यरूण-प्रभायां विलीयते साधु यथा तमिस्त्रा ॥ ३२० ॥
(सर्व काही) सद् (ब्रह्म) आहे या (दृढ वासने) चे सुरण वाढत गेले की जरी ती अहमादि वासना अतिशय वाढली असली तरीसुद्धा (अपि) ती चांगल्याप्रकारे लय पावते. जसे - अरुणाचा प्रकाश पडला की अंधार चांगल्याप्रकारे नष्ट होतो.


सर्व काही सत् असणारे ब्रह्म आहे ही वासना/वृत्ती हळूहळू दृढ होऊ लागते/श्लोक ३१८ ). तसे झाले असता, अहंकार इत्यादी विषयीची भावना जरी खूप वाढलेली असली तरी तीसुद्धा लयाला जाते. जसे अरुणाचा उदय झाला की अंधकार नष्ट होतो.


(३२१) सर्व काही ब्रह्म आहे हा अनुभव आल्यावर दुःख राहत नाही.

तमस्तमः कार्यमनर्थ जालं न दृश्यते सत्युदिते दिनेशे ।
तथाद्वयानंदरसानुभूतौ नैवास्ति बंधो न च दुःख-गंधः ॥ ३२१ ॥
सूर्य उगवला असताना, अं धार आणि अं धारापासून कार्य म्हणून निर्माण झालेले अनर्थांचे समूह दृष्टीस पडत नाहीत. त्याप्रमाणे अद्वैत (अशा ब्रह्माच्या) आनंदाची गोडी (रस) अनुभवास आली असताना, बंध उरतच नाही आणि दुःखाचा वाससुद्धा राहत नाही.


अंधारामुळे निर्माण होणारी वाईट कर्मे/गोष्टी म्हणजे खड्यात पडणे, भिंतीला टक्कर होणे, काट्यावर पाय पडणे, इत्यादी.

सर्व काही ब्रह्म आहे हा अनुभव आला असताना, वासना संपलेली असल्याने (श्लोक ३१९- ३२०), वासनेअंती येणारा कर्मबंध संपून जातो आणि मग ब्रह्मानंदामुळे दुःखही नष्ट होऊन जाते. येथे जीवव्यहाचे दुःख नष्ट होते याचा अर्थ असा - प्रारव्यानुसार त्याच्यावर दुःखाचे प्रसंग येतातच. पण त्याला दुःखाची जाणीव होत नाही. दुःखाची बोच लागत नाही.


(३२२) सर्वत्र ब्रह्म पहात जीवन्मुक्ताने आपले आयुष्य व्यतीत करावे.

दृश्यं प्रतीत प्रविलापयन् सत् सन्मात्रमानंद-घन विभावयन् ।
समाहितः सत् बहिरंतरं वा काल नयेथाः सति कर्मबंधे ॥ ३२२ ॥
कर्माचा बंध असतानासुद्धा, आत आणि बाहेर सावध राहून (समाहित) प्रतीतीला येणारे दृश्य (विश्व) दृष्टिआड करून, सर्वत्र सद्‌रूप आणि आनंदघनरूप ब्रह्म आहे हे बघत, (हे शिष्या) तू काळ घालवावास.


विद्यमान जीवनात कर्मबंध आहेच. तो तसाच असताना मुमुक्षूने जीवमुत् ?) व्हावयाचे आहे. त्यासाठी आत-बाहेर सर्वत्र असणारी ब्रह्म-भावना ही टिकवून धरावयास हवी. तसे झाले असता भासमान दृश्य विश्व लयाला जाते म्हणजे दृष्टिआड होते आणि सर्वत्र ब्रह्मानंदाचाच अनुभव येतो. हा अनुभव घेत जीवमुक्ताने उर्वरित आयुष्य व्यतीत करावयाचे आहे.

येथे काहीजण 'बहिरंतरं वा' या शब्दांचा 'दृश्यं प्रतीतं' या शब्दांशी दूरान्वय घेऊन, 'आतील आणि बाहेरील प्रतीत होणाऱ्या दृश्याचा विलय करून', असा अर्थ करतात. पण ते बरोबर वाटत नाही. कारण या जीवमुक्ताच्या आत ब्रह्म भावना ही दृढ झालेली आहे.


(३२३) सर्व काही ब्रह्म आहे या ब्रह्मभावनेत प्रमाद येता कामा नये.

प्रमादो ब्रह्मनिष्ठायां न कर्तव्यः कदाचन ।
प्रमादो मृत्युरित्याह भगवान- ब्रह्मणः सुतः ॥ ३२३ ॥
(सर्व काही ब्रह्म आहे या) ब्रह्मनिष्ठेच्या बाबतीत कधीही प्रमाद करू नये. (कारण) प्रमाद म्हणजे मृत्यू असे भगवान् ब्रह्मपुत्र याने म्हटले आहे.


दृश्य विश्व भासमान असून सर्व काही ब्रह्मच आहे ही ब्रह्मनिष्ठा म्हणजे ब्रह्मभावना जीवम्युक्ताने सतत टिकवून धरावयास हवी. त्याबाबतीत प्रमादा चूक/निष्काळजीपणा होता कामा नये. प्रमाद झाल्यास, दृश्य विश्व सत्य आहे असे पुनः वाटू लागून वासना भडकू लागेल आणि पुनः कर्मबंधात पडावे लागेल. म्हणून प्रमाद म्हणजे मृत्यू असे ब्रह्मदेवाच्या पुत्राने म्हटले आहे. हा ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे सनछमार आहे. महाभारतातील उद्योगनामक पर्वात, धुतराष्ट्र व सनछमार यांचा संवाद आहे. त्यामध्ये सनछमार सांगतो - प्रमादो व मृत्युरहं व्रवीमि । पुराणांनुसार सनछमार हा ब्रह्मदेवाचा (ब्रह्मणः) मानसपुत्र होता. तो अत्यंत पूज्य/माननीय असल्याने त्याला येथे 'भगवान् 'असे म्हटले आहे. प्रमाद हा किती वाईट आहे याचे वर्णन यापुढे श्लोक ३३० पर्यंत केलेले आहे.


(३२४)

न प्रमादादनर्थोऽन्यो ज्ञानिनः स्व-स्वरूपतः ।
तो मोहस्ततोऽहंधीस्ततो बंधस्ततो व्यथा ॥ ३२४ ॥
ज्ञानी (मुमुक्षू) ने स्वस्वरूपाच्या- ब्रह्म भावनेच्या बाबतीत प्रमाद करणे यापेक्षा (भयंकर) दुसरा अनर्थ नाही. (कारण) प्रमादापासून मोह, मोहापासून अहंकार-बुद्धी, अहंकार-बुद्धीपासून (कर्म-) बंध, आणि (कर्म-) बंधापासून व्यथा/दुःख उत्पन्न होते.


स्वस्वरूप म्हणजे जे ब्रह्म सर्व काही आहे ते ब्रह्म आपणच आहोत असे ब्रह्म स्वरूप. या बाबतीत प्रमाद घडल्यास येणारी अनर्थ परंपरा येथे सांगितलेली आहे.


(३२५) ब्रह्मभावनेची विस्मृती झाल्यास, मन पुनः विषयांकडे वळते.

विषयाभिमुखं दृष्ट्‌वा विद्वांसमपि विस्मृतिः ।
विक्षेपयति धी-दोषैर्योषा जारमिव प्रियम् ॥ ३२५ ॥
(ब्रह्म भावनेच्या विस्मरणामुळे) शहाणा मुमुक्षू विषयांकडे आकृष्ट झाला आहे हे पाहून विस्मृती (= प्रमाद) त्यालासुद्धा बुद्धीच्या दोषांनी चंचल करते. जसे - स्त्री आपल्या प्रिय जाराला.


शहाण्या मुमुक्षूलाही प्रमादाने जर ब्रह्मभावनेचे विस्मरण झाले, तर त्याला पुनः विषय दिसू लागतात आणि त्याचे मन विषयांकडे धावून त्यात गुंतून पडते. तसे झाले की अहंकार, वासना इत्यादी बुद्धीचे दोष थैमान घालू लागतात. अशाप्रकारे ब्रह्मभावनेचे विस्मरण हे त्याला ब्रह्मभावनेपासून स्तुत करून चंचल/विक्षिप्त करते. जसे - एखादी स्त्री आपल्या प्रियकराला चंचल करते, अस्वस्थ करते.


GO TOP