|
शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’(२७५-२७६) वासना नष्ट झाल्यावर काय होते ते पुढील श्लोक २७५- २७७ यांमध्ये सांगितलेले आहे
जलादि-संपर्क-वशात् प्रभूत-दुर्गंध-धूतागरु-दिव्य-वासना ।
संघर्षणे नव विभाति सम्यग् विधूयमाने सति बाह्य-गंधे ॥ २७५ ॥ अंतःश्रितानंत-दुरंत-वासना-धूलि-विलिप्ता परमार्थ-वासना । प्रज्ञाति-संघर्षणतो विशुद्धा प्रतीयते चंदनगंधवत् स्फुटम् ॥ २७६ ॥
(दुर्गंधी) पाणी इत्यादींच्या संपर्काने निर्माण झालेल्या अतिशय दुर्गंधाने दबून गेलेला (धूत) चंदनाचा दिव्य सुवास, घर्षण करून नष्ट केला असता, स्पष्टपणे प्रगट होतो; त्याप्रमाणे अंतःकरणात आश्रय घेऊन असलेल्या आणि नष्ट करण्यास अवघड (दुरंत) अशा वासनारूपी धुळीने लडबडलेली (विलिप्त) परमात्मा (= प्रत्यगात्म) - विषयक वृत्ती (वासना) ही (बुद्धीच्या) विवेकाच्या (प्रज्ञाति) अतिशय घर्षणाने अतिशय शुद्ध होऊन, चंदनाच्या वासाप्रमाणे स्पष्टपणे प्रतीतीला येते.
एक चंदनाचे लाकूड दुर्गंधयुक्त पाणी इत्यादींच्या संपर्कात आले. त्यामुळे चंदनाचा मूळचा दिव्य सुगंध दबून जाऊन त्याला वाईट वास येऊ लागला. चंदनावरील हा बाह्य दुर्गंधाचा लेप घासून नष्ट केला तर त्या चंदनाचा मूळचा सुगंध प्रगट होतो. असाच प्रकार प्रत्यगात्म्याच्या बाबतीत होतो. अंतःकरणात अनेक वासना आहेत. त्या वासनारूपी धुळीचा लेप हा परमात्मविषयक बुद्धी-वृत्तीवर बसला आहे. साहजिकच ती वृत्ती दबून गेली आहे; ती प्रत्ययाला येत नाही. या स्थितीत ती धूळ जर ज्ञानाच्या घर्षणाने/पुसण्याने दूर झाली, तर प्रत्यगात्मविषयक वृत्ती माणसाच्या प्रतीतीला येते. म्हणजे असे - अंतःकरणात अनात्म-विषयक वासना आहेत. त्या वासनांनी 'प्रत्यगात्मा/परमात्मा म्हणजे मी' ही वृत्ती (श्लोक २७०) दबून गेली आहे. अशा स्थितीत 'मी म्हणजे प्रत्यगात्मा अथवा परमात्मा' या ज्ञानाचा सतत मारा (संघर्ष) झाला तर अनात्म-वासना (श्लोक २६९) नष्ट होऊन जाते, आणि मग 'मी म्हणजे परमात्मा, प्रत्यगात्मा आहे', अशी शुद्ध वृत्ती माणसाला प्रगटपणे जाणवू लागते. हाच भाग वेगळ्या शब्दांत पुढील श्लोक २७७ मध्ये सांगितला आहे. (२७७)
अनात्म-वासना-जालैस्तिरोभूतात्म-वासना ।
नित्यात्म-निष्ठया तेषां नाशे भाति स्वयं स्फुटम् ॥ २७७ ॥
अनात्म वासनांच्या जाळ्यांनी दडपून गेलेली '(मी प्रत्यग्) आत्मा आहे' , ही वासना म्हणजे वृत्ती, नेहमी केलेल्या आत्मनिष्ठेने नष्ट झाली असता, ती स्वतःच स्पष्टपणाने प्रकाशते.
गुरूकडून ज्ञान होण्यापूर्वी 'मी प्रत्यगात्मा आहे' ही वृत्ती होतीच. पण माणूस अज्ञानाने अनात्म वस्तूंना आत्मा मानू लागला; त्यांची जाळीच झाली. त्या जाळ्याखाली 'मी प्रत्यगात्मा आहे', ही वृत्ती लुप्तप्राप्त झाली. परंतु नंतर 'प्रत्यगात्मा मी आहे', अशी दृढ भावना/निष्ठा मनात घट्ट झाली आणि ती सतत (नित्य) टिकून राहिली, तेव्हा अनात्म-वासनांची जाळी नष्ट झाली, आणि 'प्रत्यगात्मा मी आहे' ही वृत्ती आपोआप स्वतःहून प्रगटपणे साधकाच्या मनात उमटली आणि ती चमकू लागली. हाच भाग वेगळ्या शब्दांत पुढील श्लोक २७८ मध्ये सांगितले आहे. (२७८)
यथा यथा प्रत्यगवस्थितं मनस्तथा तथा मुंचति बाह्य-वासनाम् ।
निःशेष-मोक्षे सति वासनामात्मानुभूतिः प्रतिबंध-शुन्या ॥ २७८ ॥
जसजसे मन हे प्रत्यगात्माच्या ठिकाणी स्थिर होत जाते, तसतसे ते बाह्य (= अनात्म) -विषयक वासना टाकून देते. अशाप्रकारे वासना या संपूर्णपणे मनातून दूर झाल्या असता (मोक्षे) आत्म्याची अनुभूती ही अडथळ्यांनी रहित अशी होते.
अनात्मा म्हणजे आत्मा अशा या अनात्म-वासना एकदम नष्ट होऊन जात नाहीत; कारण त्या कितीतरी काळ मनात घर करून बसलेल्या असतात. त्या दूर होण्यास 'मी अनात्मा नसून आत्मा आहे' ही वृत्ती हळूहळू मनात घट्ट होत जावयास हवी. जसजशी मनाची ही वृत्ती वाढत जाईल, तसतशा अनात्मवासना मनातून दूर होऊ लागतात आणि त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. तसे झाले की मी आत्मा/प्रत्यगात्मा' आहे, ही जाणीव कोणताही अडथळा/प्रतिबंध न येता मनात प्रकाशत राहते. हे कसे घडते ते श्लोक २७९- २८७ मध्ये सांगितले आहे. तसे घडण्यास अनात्म पदार्थांवरचा आत्म्याचा अध्यास (श्लोक २७०) दूर व्हावयास हवा. म्हणून या सर्व श्लोकांत 'स्वाध्यासापनयं कुरु' हा ध्रुवपदवजा चरण वापरला आहे. (२७९)
स्वात्मन्येव सदा स्थित्वा मनो नश्यति योगिनः ।
वासनानां क्षयश्चातः स्वाध्यासापनयं कुरु ॥ २७९ ॥
स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी नेहमी मन राहिले असता ते (ज्ञान -) योग्याचे मन नष्ट होते आणि वासनांचा नाश होतो. म्हणून (हे शिष्या) तू स्वतःचा अध्यास दूर कर.
येथे 'योगिन्' शब्दाने केवलाद्वैताचा 'ज्ञानयोगी' अभिप्रेत आहे. या योग्याने स्वतःचे मन स्वतःच्या अंतरात्म्यावर केंद्रित करावयाचे आहे. मनाच्या संकल्प/ विकल्पामुळे वासना उद्भूत होतात. मन हे प्रत्यगात्मावर एकाग्र झाले असता संकल्पविकल्प मावळतात; त्यामुळे मनातील वासनांचा नाश होतो. हे सर्व होण्याला मुमुक्षूने आपल्या अध्यासाचा नाश करावयास हवा. 'देह इत्यादी अनात्म पदार्थ म्हणजे मी/ आत्मा' असा अध्यास आहे (श्लोक २७० पहा). अनात्मा आत्मा वाटतो याचे कारण अज्ञान. कार्यकारणाचे अनन्यत्व लक्षात घेतले तर अज्ञान म्हणजेच अध्यास आहे. तेव्हा वासनांचा नाश घडवून आणण्यास मन हे आत्मरूप करण्याचा अभ्यास व्हावयास हवा. मनात संकल्प, विकल्प येतात याचे कारण मनावर सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचा प्रभाव आलटून पालटून पडतो. म्हणून या तीन गुणांचा प्रभाव नष्ट होऊन, गुणातीत झाल्यास अध्यास दूर होतो. (२८०)
तमो द्वाभ्यां रजः सत्त्वात् सत्त्वं शुद्धेन नश्यति ।
तस्मात् सत्त्वमवष्टभ्य स्वाध्यासापनयं कुल ॥ २८० ॥
(सत्त्व आणि रज या) दोघांच्या प्रभावामुळे तमोगुण नष्ट होतो. सत्त्वगुणाच्या प्रकर्षाने रजोगुण नष्ट होतो. पुढे शुद्ध सत्त्वगुणाने सत्त्वगुण नष्ट होतो. मग शुद्ध सत्त्वाचा अवलंब करून, हे शिष्या तू स्वतःच्या अध्यासाचा निरास कर.
सत्त्व आणि रज हे गुण वाढले की तमोगुण नष्ट होतो म्हणजे निष्प्रभ होतो अणि मग तो मनावर काही परिणाम करू शकत नाही. सत्त्वगुणाचा प्रकर्ष झाला की रजोगुण नष्ट होतो म्हणजे तो मनावर प्रभाव पाडू शकत नाही. सत्त्व हा गुणही शुद्ध सत्त्वगुणाने नष्ट होतो म्हणजे तो मनावर प्रभाव पाडू शकत नाही. मग या शुद्ध सत्त्वगुणाचा आश्रय घेतला की स्वतःचा अध्यास दूर करता येतो. सत्त्व-रज- तम या नेहमीच्या तीन गुणांपेक्षा शुद्धसत्त्व वेगळा आहे. त्याला भगवद्गीतेने 'नित्य सत्त्व' (२.४५) म्हटले आहे तर रामदासस्वामींनी त्याला 'चौथा गुण' म्हटले आहे. खरं म्हणजे शुद्ध तत्त्वाला 'गुण' म्हणता येत नाही; कारण तो तीनही गुणांच्या पलीकडे आहे. पण त्याची कल्पना यावी म्हणून त्याला 'शुद्ध सत्त्वगुण' असे म्हटले जाते. या शुद्ध सत्त्वाचा आश्रय घेतलेला गुणातीत पुरुष हा अध्यास नष्ट करू शकतो. (२८१) 'देहाला मी-माझे म्हणणे टाकले तर मी जगेन कसा ? मग मला मुक्ती कशी मिळेल ?' असा प्रश्न गृहीत धरून त्याचे उत्तर श्लोक २८१ मध्ये आहे.
प्रारब्धं पुष्यति वपुरिति निश्चित्यं निश्चलः ।
धैर्यमालंब्य यलेन स्वाध्यासापनयं कुल ॥ २८१ ॥
प्रारब्ध कर्म शरीराचे पोषण करीत आहे, असा निश्चय करून हे शिष्या तू निश्चल हो. आणि मग धैर्याचा अवलंब करून प्रयत्नपूर्वक स्वतःचा अध्यास दूर कर.
कर्मामुळे माणसाला जन्म-मरण आहे. माणसाचा वर्तमानकालीन देह आणि जीवन हे प्रारब्ध कर्मानुसार ठरलेले आहे. तेव्हा 'मी माझे' अशी देहावरील ममता टाकली तरी तो प्रारब्धकर्मानुसार मरेपर्यंत टिकून राहणार आहे. ही गोष्ट, हे शिष्या, तू निश्चितपणे समजून घे. तेव्हा शरीराची चिंता सोड आणि मनाने निश्चल हो आणि मग धैर्य धरून मन आत्म्यावर केंद्रित कर. तसे करण्याचा प्रयत्न कर आणि मग स्वतःचा अध्यास दूर कर. (२८२) 'मी जीव नसून परब्रह्म/परमात्मा/आत्मा आहे', असा ध्यास लागला तर वासनांमुळे आलेला अध्यास दूर होऊ शकतो.
नाहं जीवः परब्रह्मेत्येतद् व्यावृत्ति-पूर्वकम् ।
वासनान्येगतः प्राप्त-स्वाध्यासापनयं कुरु ॥ २८२ ॥
'मी जीव नाही; मी परब्रह्म आहे' (या निश्चयाने जीवपणाची) व्यावृत्ती करून, वासनांच्या वेगाने म्हणजे प्रभावाने प्राप्त झालेला स्वतःचा अध्यास दूर कर.
ब्रह्मावरील अध्यस्त जगातील शरीरांच्या उपाधीत असलेले ब्रह्म म्हणजे प्रत्यगात्मा. त्या प्रत्यगात्म्याचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीव. बुद्धीतील अहंकारामुळे जीव स्वतःला प्रत्यगात्म्यापासून वेगळे मानू लागला. खरे म्हणजे जीव म्हणून प्रत्यगात्म्यापेक्षा वेगळे असे तत्त्व नाही. जीव म्हणजेच प्रत्यगात्मा म्हणजे ब्रह्मच आहे. म्हणून देह इत्यादी अनात्म पदार्थ म्हणजे मी असे जो जीव मानतो, त्याचा निषेध केला तर 'मी ब्रह्म आहे', ही बुद्धी दृढ होईल. वासनांच्या प्रभावामुळे 'मी ब्रह्म आहे' या गोष्टीचा जीवाला विसर पडला आहे. म्हणून 'मी ब्रह्म आहे' या निश्चयाने माणसाने स्वतःचा अध्यास दूर करावयाचा आहे. (२८३)
श्रुत्या युक्त्या स्वानुभूत्या ज्ञात्वा सार्वात्म्यमात्मनः ।
क्वचिदाभासतः प्राप्त-स्वाध्यासापनय कुरु ॥ २८३ ॥
श्रुती, तर्क आणि स्वतःचा अनुभव यांच्याद्वारा 'सर्वकाही आत्मरूप आहे, हे जाणून, चुकीच्या योगे क्वचित आभासामुळे प्राप्त झालेला स्वतःचा अध्यास दूर कर.
श्रुती = उपनिषदे) सांगतात - हे सर्व ब्रह्म आहे, हे सर्व आत्मा आहे (सर्वं खल्विदं पब्रह्म/ ऐतदात्म्यमिदं सर्वम् । ) रज्जू-सर्प, शुक्ती-रजत इत्यादी दृष्टांताच्या आधारे तर्क केल्यावर कळते की ब्रह्मावर भासणारे विश्व हे ब्रह्मच आहे. ब्रह्मावर /प्रत्यगात्म्यावर मन केंद्रित केल्यास निदिध्यासाने 'मी ब्रह्म आहे' असा अनुभव येतो. अशाप्रकारे शृती, तर्क, आणि स्वतःचा अनुभव यांच्या आधाराने, 'दिसते ते सर्व ब्रह्म आहे', 'ब्रह्माखेरीज अन्य काही नाही', हे जाणून घ्यावे. वासनांच्या प्रभावाने कधीतरी जगाचा आभास खरा वाटून पुनः द्वैत/अध्यास भासत असेल, तर वरील तीन गोष्टींच्या आधाराने हा स्वतःचा अध्यास दूर करावयाचा आहे. (२८४)
अनादान-विसर्गाभ्यामीषन्नास्ति क्रियात्मनः ।
तदेकनिष्ठया नित्यं स्वाध्यासापनयं कुरु ॥ २८४ ॥
न घेणे (अनादान) आणि न टाकणे यांतील कोणतीच क्रिया जरासुद्धा आत्म्याची असत नाही. म्हणून त्या आत्म्याच्या ठिकाणी नित्य एकनिष्ठ असे मन धरून, स्वतःचा अध्यास दूर कर.
आत्मा क्रियारहित आहे. 'अनादान-विसर्ग' हे शब्द उपलक्षणेने सर्व क्रिया सूचित करतात. अक्रिय आत्म्याचे ठायी मन एकनिष्ठ करून माणसाने आपला अध्यास दूर करावयाचा आहे. मन आत्मरूप होऊन निश्चल झाल्यावर अविद्याजन्य विक्षेप/अध्यास टाकता येतो. 'अन्नादान-विसर्गाभ्यामीषन्नास्ति क्रिया मुनेः' असा जो पाठभेद दिला जातो, तो प्रस्तुत स्थळी अप्रासंगिक आहे. (२८५)
तत्त्वमस्यादि-वाक्योत्त्थ-ब्रह्मात्मैकत्व-बोधनः ।
ब्रह्मण्यात्मत्व-दार्ढ्याय स्वाध्यासापनयं कुरु ॥ २८५ ॥
'तत्त्वमसि 'इत्यादी वाक्यावरून निर्माण झालेल्या ब्रह्म आणि जीव यांच्या ऐक्याच्या ज्ञानाधारे, 'ब्रह्माचे ठिकाणी जीव आहे' (म्हणजे जीव ब्रह्म आहे) ही गोष्ट दृढ करण्यास, हे शिष्या, तू स्वतःचा अध्यास दूर कर.
'तत्त्वमसि', 'अहं ब्रह्मास्मि' इत्यादी उपनिषदांतील वाक्ये, जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगतात. या वाक्यावरून कळून येणारे जीव-ब्रह्माच्या ऐक्याचे ज्ञान दृढ व्हावे म्हणून स्वतःचा अध्यास दूर करावयाचा आहे. 'तत्त्वमसि 'वाक्याचा खुलासा श्लोक २४३ - २५१ मध्ये झाला आहे. श्लोक २४२ मध्ये 'अहं ब्रह्मास्मि' वाक्याचा खुलासा आहे. (२८६)
अहं-भावस्य देहेऽस्मिन्निःशेष-विलयावधि ।
सावधानेन युक्तात्मा स्वाध्यासापनयं कुरु ॥ २८६ ॥
या देहावरील अहंभाव संपूर्णपणे नष्ट होईपर्यंत सावधानपणे मन हे ब्रह्माशी संलग्न करून (युक्तात्मा) स्वतःचा अध्यास दूर कर.
सर्वसाधारणपणे 'देह म्हणजे मी' अशी समजूत असते. ती नष्ट झाल्यावरच 'मी ब्रह्म आहे' ही बुद्धी स्थिर होते. त्यासाठी सावधानपणाने आणि प्रयत्नपूर्वक मन हे आत्म्याशी जुडवावे लागते. तसे झाल्यावर अध्यास दूर होतो. जीव आणि ब्रह्म एकच आहेत हे ज्ञान दृढ झाले की 'मी देह आहे' हा अध्यास दूर होतो. 'युक्तात्मा' म्हणजे 'आत्म्याचे/ब्रह्माचे ठिकाणी मन एकाग्र करून' असाही अर्थ होईल. (२८७)
प्रतीतिर्जीव-जगतोः स्वप्नवद् भाति यावता ।
तावन्निरंतरं विद्वन् स्वाध्यासापनयं कुरु ॥ २८७ ॥
हे शहाण्या शिष्या, जीव आणि जग यांची प्रतीती ही स्वप्नाप्रमाणे (मिथ्या) आहे, हे कळेपर्यंत स्वतःचा अध्यास दूर करण्याचा सतत प्रयत्न कर.
अज्ञानजन्य अध्यासामुळे जीव आणि जग हे ब्रह्मापेक्षा वेगळे आहेत अशी प्रतीती माणसाला येत असते. पण ही प्रतीती स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. हे ज्ञान होईपर्यंत स्वतःचा अध्यास म्हणजे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने करावयास हवा. (२८८) 'मी ब्रह्म आहे' या ज्ञानाच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टी बाजूला सारून, मुमुक्षूने मनात आत्म्याचे चिंतन करावयास हवे.
निद्राया लोक-वार्तायाः शब्दादेरपि विस्मृतेः ।
क्वचिन्नावसरं दत्वा चिंतयात्मानमात्मनि ॥ २८८ ॥
निद्रा, लोकवार्ता, शब्द इत्यादी (विषय) यांच्यामुळे होणाऱ्या आत्म्याच्या विस्मरणाला जरासुद्धा अवकाश न देता, हे शिष्या तू मनामध्ये (आत्मनि) आत्म्याचे चिंतन कर.
खरे म्हणजे 'मी ब्रह्म/आत्मा आहे' हे सतत स्मरणात असावयास हवे. पण त्याचे काही कारणांनी विस्मरण होते. ही कारणे अशी - (१) निद्रा - निद्रेत अज्ञान असते. साहजिकच 'मी ब्रह्म/आत्मा आहे' हे स्मरण निद्रेत होऊ शकत नाही. (२) लोकवार्ता या शब्दाचे अनेक अर्थ पुढीलप्रमाणे होऊ शकतात - (i) लोकांशी वार्तालाप - माणसाला बोलण्याचे व्यसन असते. मन बोलण्यात गुंतले की आत्म्याची विस्मृती होते. (ii) जगात घडणाऱ्या गोष्टी - जगात नाना प्रकारच्या गोष्टी-संप, बंद, अतिवृष्टी, वादळ, अनावृष्टी, इत्यादींबद्दल बोलणे/विचार करीत राहिल्यावर आत्म्याचे स्मरण कसे होणार ? (iii) समजा आपला एखादा नातेवाईक परगावी/परदेशी गेला आहे. त्याची वार्ता जाणून घेण्यास जर मन गुंतले तर आत्मा कसा आठवणार ? (iv) लोकांच्या वार्ता/गप्पा ऐकण्यात वेळ गेला तर कुठला आत्मा ? (v) लोकांची निरनिराळी मते असतात. उदा., कुणी द्वैत खरे म्हणतो; कुणी प्रकृति-पुरुष मानतो; कुणी ईश्वर कर्ता म्हणतो; इत्यादी. या मतमतांचा विचार करण्यात मन गुंतले तर आत्म्याचा विचार कसा येणार ? (vi) लोकवार्ता म्हणजे जगातील शेती, व्यापार, त्यांचे विषयी चर्चा करीत बसल्यास आत्मा कसा आठवणार ? (viii) लोकांचा व्यवहार नानाप्रकारचा असतो. लोकांचे रीतिरिवाज इत्यादी भिन्न असतात. त्यांचा तपशील गोळा करण्यात वेळ गेला तर आत्म्याकडे लक्ष देण्यास वेळ कुठे राहील ? (३) शब्द, स्पर्श इत्यादी विषयः - मागे श्लोक ७८ मध्ये पाहिल्याप्रमाणे, शब्द इत्यादी पाच विषय आकर्षक आणि सुखकारक वाटतात. त्या पाचही विषयांच्या मागे लागल्यास आत्मा हा विषय बाजूलाच पडणार. 'मी आत्मा आहे' हे स्मरण होण्यात वरील तीन अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय सतत आत्मचिंतन होणार नाही. (२८९) देहावरील ममता दूर करून जीवाने ब्रह्मरूप व्हायचे आहे.
माता-पित्रोर्मलोद्भूत मल-मांस-मयं वपुः ।
त्यक्ता चांडालवद् दूरं ब्रह्मीभूय कृती भव ॥ २८९ ॥
(हे शिष्या) आईबापांच्या मळापासून उत्पन्न झालेले आणि मळ व मांस यांनी भरलेले हे स्थूल शरीर चांडाळाप्रमाणे दूर टाकून, आणि ब्रह्मरूप होऊन, तू कृतार्थ हो.
माणूस आपल्या देहाला 'मी-माझे' म्हणत असतो. देहाचा वियोग म्हणजे मरण. त्याला तो भीत असतो. देहावरील आसक्ती दूर झाल्याशिवाय आत्म्याविषयी ममता वाटणार नाही. म्हणून. गुरू शिष्याला सांगतो - समाजात ज्याप्रमाणे आपण वावरताना चांडाळाला दूर ठेवतो, त्याप्रमाणे देहाला दूर ठेव. जुन्याकाळी समाजात चांडाळ हा बहिष्कृत होता. त्याची सावलीसुद्धा अंगावर पडू नये अशी काळजी घेतली जात असे. चांडाळाप्रमाणे आपण देहाला दूर ठेवावे असे गुरू म्हणतो. त्याचा अर्थ असा - चांडाळ हा मळ इत्यादींनी युक्त असल्याने तो वर्ज्य आहे. तसाच स्थूल देह मलिन आहे. मुळात त्यांची उत्पत्ती ही मळातून झालेली आहे. आईबापांच्या मळातून - देह उत्पन्न होतो. पूर्वीच्या कल्पनेप्रमाणे स्त्रीचे रज आणि पुरुषाचे वीर्य- यांच्या संयोगातून स्थूल देह तयार होतो. स्त्रीचे रज/विटाळ हा तर घाणेरडा असतोच, आणि जननेंद्रियातून बाहेर पडणारे पुरुषाचे वीर्य हेही मळ आहे असे मानले जाते. आणखी असे - स्थूल देह हा हाडे, कातडे, मांस, रक्त इत्यादी घाणेरड्या पदार्थांनी भरलेला आहे. देह हा बाहेरून कितीही गोंडस दिसला तरी तो आतून 'मळाचे आगर' आहे. अशाप्रकारे देह हा घाणेरडा, मलिन आहे हे लक्षात घेऊन त्याला दूर ठेवावयाचे आहे. पण अशा देहातच आत्मा आहे आणि देह आहे तोवरच आत्मसाक्षात्कार करून घ्यावयाचा आहे. मग या देहाला दूर कसे ठेवता येणार ? याचे उत्तर असे - लाक्षणिक अर्थाने देहाला दूर ठेवायचे आहे. म्हणजे असे - 'मी देह आहे, देह माझा आहे' ही आसक्ती जर दूर झाली तर आपण देहापासून दूर झालो असा अर्थ होतो. म्हणजे देहाची आसक्ती टाकणे म्हणजे देह दूर करणे होय. 'घाणेरडा देह म्हणजे मी नव्हे' ही भूमिका पक्की झाली आणि 'मी शुद्ध आत्मा आहे' ही खात्री पटली, तर देहावरील आसक्ती दूर होऊ शकते. अशाप्रकारे देहावरील आसक्ती टाकून देऊन, 'मी ब्रह्म/आत्मा आहे' असा निदिध्यास करून आपण ब्रह्मरूपच होऊन जावयाचे आहे. एकदा का आपण ब्रह्म झालो की मग या जगात काहीही प्राप्तव्य उरत नाही. आपले जीवन कृतकृत्य-कृतार्थ-होते. असे गुरूला सांगावयाचे आहे. (२९०) देहाला दूर सारून जीवाने परमात्मात मिसळून जावयाचे आहे.
घटाकाशं महाकाश इवात्यानं परात्मनि ।
विलाप्याखंड-भावेन तूष्णीं भव सदा मुने ॥ २९० ॥
हे संयमी शिष्या, जसा घटाकाशाचा लय महाकाशात होतो, तसा प्रत्यग् आत्मा परमात्म्यात लीन करून, अखंड परमात्मस्वरूप होऊन, तू मौन धर, शांत हो.
घटाच्या उपाधीने महाकाशाला घटाकाश अशी संज्ञा येते. तो घट फुटला, घट ही उपाधी नष्ट झाली की आपोआपच घटाकाश महाकाशात लीन होते. तसे देहाची उपाधी दूर झाली की उपाधीमुळे झालेला प्रत्यगात्मा हा परमात्म्यात लीन होऊन जातो, परमात्म्याशी एकरूप होतो. आता देहाची उपाधी दूर करण्यास देहाचा नाश करावयाचा नाही. देहावरची आसक्ती दूर होणे म्हणजेच देहाची उपाधी दूर होणे असा अर्थ आहे. अशाप्रकारे देहाची उपाधी/आसक्ती दूर झाली की प्रत्यगात्मा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. मग एकच एक परमात्म-तत्त्व उरते. आता बोलायला काही शिलकच नाही. म्हणून मौनपणे राहावे असे गुरू म्हणतो. (२९१) परमात्मरूप झाल्यावर पिंड-ब्रह्मांडावरील आसक्ती गळून पडते.
स्व-प्रकाशमधिष्ठानं स्वयंभूय सदात्मना ।
ब्रह्मांडमपि पिंडांडं त्यज्यतां मल-भांडवत् ॥ २९१ ॥
सत् या स्वरूपाने स्वयंप्रकाशी आणि अधिष्ठानभूत (असे परमात्म-तत्त्व) आपणच होऊन, हे शिष्या घाणेरड्या भांड्याप्रमाणे ब्रह्मांड आणि पिंड या कल्पना व त्यावरील आसक्ती टाकून दे.
देहाची उपाधी/आसक्ती दूर झाली की प्रत्यगात्मा परमात्म्यात लीन होऊन जातो. (श्लोक २९०). हा परमात्मा सद्रूप आणि स्वयंप्रकाशी आहे आणि तो पिंड आणि ब्रह्मांड यांचे अधिष्ठान आहे. गुरू म्हणतो - हे शिष्या, तू जेव्हा स्वतःच परमात्मा होशील, तेव्हा परमात्मरूप अशा तुझ्या अधिष्ठानावर आरोपित असणारे पिंड आणि ब्रह्मांड हे तुला जाणवणारच नाहीत. तेव्हा ते दूर करण्याचा म्हणजे त्यांच्या वरील आसक्ती दूर करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मलभांड म्हणजे घाणेरडे भांडे अथवा घाणीने भरलेले भांडे. ते आपण दूर ठेवतो. त्याप्रमाणे पिंड-ब्रह्मांडाच्या कल्पना परमात्मरूप झालेल्याने मनातसुद्धा आणू नयेत. (२९२) स्थूल देहावरील आसक्तीप्रमाणे सूक्ष्म देहावरील आसक्तीही दूर करावयाची आहे.
चिदात्मनि सदानंदे देहारूढा महं धियम् ।
निवेश्य लिंगमुत्सृज्य केवलो भव सर्वदा ॥ २९२ ॥
चैतन्यस्वरूप आणि सदानंद-स्वरूप (अथवा - सत् आणि आनंद असे स्वरूप) असणाऱ्या अशा परमात्म्याच्या ठायी देहावरील अहंबुद्धीचा निवेश करून, लिंग (देहा)ची आसक्ती टाकून देऊन, हे शिष्या तू नेहमी केवळ (परमात्म स्वरूप) होऊन राहा.
परमात्मरूप झाल्यावर, देहावरील 'मी' ही जाणीव आता 'मी परमात्मा आहे' अशा स्वरूपात परमात्म्यात लीन करावयाची आहे. हे झाले स्थूल देहाच्या बाबतीत. लिंगदेहावरही आपली आसक्ती असते. उदा., मी म्हणजे इंद्रिये, मी म्हणजे मल, इत्यादी. लिंगदेहावरील ही आसक्तीसुद्धा 'मी परमात्मा आहे' या स्वरूपात परमात्म्यात प्रविष्ट करून टाकावयाची आहे. आता, स्थूल आणि सूक्ष्म या देहावरील आसक्ती, अहंबुद्धी दूर झाल्यावर 'प्रत्यगात्मा' हाच 'परमात्मा' होत असल्याने, फक्त परमात्माच उरला आहे. त्या परमात्मरूप स्थितीत साधकाने सतत राहवयाचे आहे. म्हणजे 'मी परमात्मा आहे' ही बुद्धीच सतत राहवयास हवी. (२९३) मग गुरू शिष्याला सांगतो - हे शिष्या, ज्या ब्रह्मावर जगाचा आभास होतो ते ब्रह्म मीच आहे, हे तुला कळले की तू कृतकृत्य होशील.
यत्रैष जगदाभासो दर्पणांतः पुरं यथा ।
तद् ब्रह्माहमिति ज्ञात्वा कृतकृत्यो भविष्यसि ॥ २९३ ॥
जेथे - ज्या ब्रह्मावर - जगाचा आभास हा आरशात प्रतिबिंब झालेल्या नगराप्रमाणे प्रतीत होत आहे, 'ते ब्रह्म मीच आहे' असे जाणून (= अनुभवून), हे शिष्या, तू कृतकृत्य होशील.
एखाद्या आरशात नगराचे प्रतिबिंब पडते. त्याप्रमाणे ब्रह्मावर जगाचा आभास होतो. प्रतिबिंब हे बिंब नसून ते बिंबाप्रमाणे भासते. प्रतिबिंबाप्रमाणे जग हे भासमान आहे. ज्या ब्रह्मावर जगाचा आभास होतो, ते ब्रह्म शाश्वत, नित्य सत्य आहे. 'ते ब्रह्म मी आहे', असा साक्षात्कार शिष्यास व्हावयास हवा. तरच तो कृतकृत्य होईल. कृतकृत्य म्हणजे कृतार्थ. कृतार्थ होणे म्हणजे जन्माचे सार्थक करून घेणे आहे. येथे ब्रह्मावरील जगाच्या आभासासाठी दिलेले आरशातील प्रतिबिंबाचे उदाहरण चमत्कारिक वाटते, ते योग्य वाटत नाही. (२९४) आपणच ब्रह्म आहोत हे कळल्यावर मिथ्या शरीराची आसक्ती सोडून द्यावी.
यत्र सत्य-भूतं निजरूपमाद्यं चिदद्वयानंदमरूपमक्रियम् ।
तदेत्य मिथ्यावपुरुत्सृजेच्च शैलूषवद् वेषमुपात्तमात्मनः ॥ २९४ ॥
आपले स्वतःचे (आत्मनः) जे सत्य असणारे स्वरूप (निज-रूप) आहे, जे आद्य/पुरातन, चैतन्यरूप, अद्वय, आनंदरूप आहे, जे अरूप/निराकार आणि क्रियारहित आहे, ते प्राप्त झाल्यावर (एत्य) नट ज्याप्रमाणे आपले (आत्मनः) स्वतःचे घेतलेले रूप (उपात्त) टाकून देतो, त्याप्रमाणे मुमुक्षूने मिथ्या असणारे शरीर टाकून द्यावे.
सत्य, अद्वितीय इत्यादी असणारे ब्रह्म हे मुमुक्षूचे स्वतःचे सत्य स्वरूप आहे; देह हे त्याचे खरे स्वरूप नाही; कारण ते ब्रह्मावर अध्यस्त असणाऱ्या जगातील भासमान शरीर आहे. ब्रह्मरूप झाल्यावर हे मिथ्या शरीर टाकून द्यावे याचा अर्थ इतकाच की 'मिथ्या शरीर म्हणजे मी' असा असणारा अहंकार सोडून द्यावा. जसे - आपले खरे स्वरूप लक्षात येताच नट हा घेतलेल्या पात्राचा वेष टाकून देतो. (२९५)
सर्वात्मना दृश्यमिदं मृषैव नैवाहमर्थः क्षणिकत्व-दर्शनात् ।
जानाम्यहं सर्वमिति प्रतीतिः कुतोऽहमादेः क्षणिकस्यं सिध्येत् ॥ २९५ ॥
हे दृश्य (स्थूल शरीर) संपूर्णपणे मिथ्याच आहे. ते क्षणिक असल्यामुळे 'ते मी नाही,' मी सर्व जाणतो 'ही प्रतीती याच क्षणिक असणाऱ्या अहंकार इत्यादीवरून कशी बरे सिद्ध होईल ?
ब्रह्मावर भासणाऱ्या मिथ्या जगातील स्थूल शरीर हे दृश्य आहे, ते जगाप्रमाणे मिथ्याच आहे. ते क्षणिक आहे; काही काळ टिकणारे आहे. याउलट 'मी' (अहं) हा सतत टिकणारा आहे. म्हणून दृश्य शरीर हे 'मी' असत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या माणसाच्या तीनही अवस्थांत 'मी सर्व जाणतो' अशी प्रतीती येत असते. ती प्रतीती क्षणिक असणाऱ्या अहंकारामुळे कशी बरे येईल ? या श्लोकात 'हे दृश्य' म्हणजे 'हे दृश्य विश्व' असा अर्थ नाही. कारण तसे घेतल्यास 'मी सर्व जाणतो' या वाक्याची संगती लागत नाही. ही गोष्ट पुढील २९६- २९७ श्लोकावरून स्पष्ट होते. (२९६) अहं हा सर्वसाक्षी आहे आणि तो प्रत्यगात्मा आहे असे श्रुती सांगते.
अहं-पदार्थस्त्वहमादिसाक्षी नित्यं सुषुप्तावपि भाव-दर्शनात् ।
ब्रूते ह्यतो नित्य इति श्रुतिः स्वयं तत् प्रत्यगात्या सदसद्-विलक्षणः ॥ २९६ ॥
(मी सर्व जाणतो या वाक्यात) 'अहं' म्हणजे देह (= मी) अथवा देहावरील अहंकार असा अर्थ नाही. तर तो 'अहं' हा अहंकार इत्यादीकांचा मूलभूत साक्षी आहे, कारण सुषुप्ती अवस्थेतसुद्धा त्या 'अहं' चे नित्य अस्तित्व दिसून येत असते. (त्या 'अहं' बद्दल श्रुती सांगते की तो जन्मरहित आणि नित्य आहे आणि तोच सत् व असत् पेक्षा वेगळा असणारा असा प्रत्यगात्मा आहे.
'मी म्हणजे देह नव्हे, मी म्हणजे इंद्रिये नव्हे' असा निषेध करीत आपण ज्या 'अहं' पर्यंत पोचतो, तो प्रत्यगात्मा आहे, आणि तो अज, नित्य आहे, असे श्रुति सांगते. प्रत्यगात्मा हा या शरीराच्या उपाधीत सापडलेला आहे. तो क्षणिक असणाऱ्या सत् आणि असत्पेक्षा वेगळा आहे. (२९७) हा प्रत्यगात्मा/अहंपदार्थ पुढीलप्रमाणे आहे -
विकारिणां सर्व-विकार-वेत्ता नित्याविकारो भवितुं समर्हति ।
मनोरथ-स्वप्न-सुषुप्तिषु स्फुटं पुनः पुनर्दृष्टमसत्त्वमेतयोः ॥ २९७ ॥
विकारी पदार्थांचे सर्व विकार जाणणारा (प्रत्यगात्मा) आहे; म्हणून तो स्वतः अविकारी असणे योग्य आहे. मनोरथ, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांमध्ये स्थूल आणि सूक्ष्म या दोहोंचे (एतयोः) क्षणिकत्व हे वारंवार स्पष्टपणे दृष्टोत्पत्तीस येत असते.
स्थूल देह आणि सूक्ष्म देह हे दोघेही विकार पावणारे आणि क्षणिक आहेत. ते दोन्ही देह म्हणजे 'अहं' नव्हे; कारण प्रत्यगात्मरूपी 'अहं' हा स्वतः निर्विकार/ न बदलणारा असेल, तरच तो त्या दोन देहांचे सर्व विकार जाणू शकेल. मनाचे संकल्पविकल्प, स्वप्न आणि सुषुप्ती यांमध्ये ते दोन्हीही देह नाहीत (असत्त्व) अथवा क्षणिक आहेत, हे पुनःपुनः कळून येत असते. उदा., जागृत अवस्थेत स्थूल देह कार्यप्रवण असतो. स्वप्न अवस्थेत सूक्ष्म देहातील मन/बुद्धी कार्यशील असते, तर सुषुप्तीमध्ये ते दोन्हीही देह हे अभावरूप झालेले असतात. पण या सर्व अवस्थांचा मूलभूतपणे साक्षी असणारा प्रत्यगात्मा मात्र न बदलणारा असतो. तो आहे तसाच विकाररहित चैतन्यरूपात असतो. (२९८) म्हणूनच स्थूल व सूक्ष्म देहावरची आसक्ती टाकून प्रत्यगात्मरूप व्हावयास हवे.
अतोऽभिमानं त्यज मांसपिंडे पिंडाभिमानिन्यपि बुद्धि-कल्पिते ।
काल-त्रयाबाध्यमखंड-बोधं ज्ञात्वा स्वमात्मानमुपैहि शांतिम् ॥ २९८ ॥
म्हणून मांसाचा गोळा असणाऱ्या (स्थूल देहावरील मी) असा अभिमान टाकून दे. तसेच बुद्धीने कल्पिलेल्या अहंकारावरील 'मी स्थूल देह आहे' असे म्हणणाऱ्या अहंकारावरील म्हणजे सूक्ष्म देहावरील अभिमान सोडून दे. तीनही काळांत न बदलता - बाधित न होता- अखंड ज्ञानस्वरूप (प्रत्यगात्मा म्हणजे मी आहे) हे जाणून - तोच आपला आत्मा आहे - असे जाणून, हे शिष्या तू शांतीप्रत जा.
स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्हीही देह बदलणारे, क्षणिक, भासमान आहेत. म्हणून हे शिष्या ते देह म्हणजे 'मी' असा अभिमान टाकून दे. मग तीनही काळांत आणि तीनही अवस्थांत न बदलता राहणारा, अविकारी, अखंड ज्ञानस्वरूप असा स्वतःचा प्रत्यगात्मा कळून येईल. तो कळल्यावर, हे शिष्या, तुला शांती प्राप्त होईल. (२९९) हेच पुन्हा सांगितले आहे -
त्यजाभिमानं कुल-गोत्र-नाम-रुपाश्रमेष्वार्द्र-शवाश्रितेपषु ।
लिंगस्य धर्मानपि कर्तृतादींस्त्यक्त्वा भवाखंड-सुख-स्वरूपः ॥ २९९ ॥
ओल्या प्रेताच्या आश्रयाने राहणारा असा कुल, गोत्र, नाम, रूप, आश्रम यांवरील अभिमान टाकून दे. तसेच लिंग शरीरांचे कर्तृत्व इत्यादी गुणधर्मसुद्धा टाकून दे. हे शिष्या तू अखंड सुख स्वरूपाचा हो.
येथे स्थूल देहाला 'ओले प्रेत' म्हटले आहे. दीर्घकालीन बेशुद्धीत गेलेला माणूस हा प्रेतवत्च असतो. श्वासोच्छवास आहे म्हणून तो जिवंत वाटतो. श्वासोच्छ्वास संपला की स्थूल शरीर हे प्रेतच आहे. म्हणजे ते प्रेताप्रमाणे त्याज्य आहे. प्रेताला कुणी घरी सांभाळून ठेवीत नाही. जिवंतपणीही स्थूल शरीर हे तुच्छ, प्रेतवत् असते. निद्रेतही स्थूल शरीर प्रेतवत् असते. स्थूल शरीराच्या आश्रयानेच कुल, गोत्र, नाम, रूप (= आकार व रंग), आश्रम यांचा निर्देश धर्मशास्त्रे सांगतात. स्थूलदेह एखाद्या विशिष्ट गोत्रात, कुळात जन्माला आलेला असतो, उदा., भारद्वाज, कौशिक इत्यादी गोत्रातील कुळे निरनिराळी आडनावे असणारी असतात. कुळात जन्मलेल्या स्त्री-पुरुषाला काहीतरी रूपरंग व आकार- असते आणि त्याला काहीतरी नाव दिलेले असते. हा देह चार वर्णांपैकी कोणत्यातरी वर्णात असतो. पहिल्या तीन वर्णांसाठी चार आश्रम धर्मशास्त्रे सांगतात (श्लोक २५६ ). अशा या स्थूलदेहाशी संबंधित अशा प्रत्येक गोष्टीवर माणूस अभिमान बाळगत असतो. लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरात इंद्रिये, प्राण, अंतःकरण असतात. इंद्रिये म्हणजे मी असा अभिमान माणूस बाळगतो. तसेच अंतःकरण हे कर्तृत्वाचा अभिमान धारण करते (श्लोक १०६) म्हणजे मी भोक्ता असा अभिमान बाळगत असते. स्थूल आणि सूक्ष्म देहावरील हे अभिमान टाकून द्यावयाचे आहेत. म्हणजे स्थूल व सूक्ष्म देह म्हणजे मी असा अभिमान टाकून द्यावयाचा आहे आणि तसे केल्यावर उरतो तो प्रत्यगात्मा. प्रत्यगात्मा हा अखंड आनंदस्वरूपी आहे. अभिमान टाकून आपण अखंड आनंदस्वरूपी प्रत्यगात्मा व्हावयाचे आहे. (३००) जो अहंकार टाकल्याशिवाय माणूस अखंड सुखस्वरूप प्रत्यगात्मा होत नाही, त्या अहंकाराविषयी श्लोक ३०० - ३१२ मध्ये अधिक सांगितले आहे.
संत्वन्ये प्रतिबंधाः पुंसः संसार-हेतवो दृष्टाः ।
तेषामेकं मूलं प्रथम-विकारो भवत्यहंकारः ॥ ३०० ॥
मुमुक्षू माणसाच्या बाबतीत, संसाराचे कारण असणारे आणि दिसून येणारे (दृष्टाः) इतर अनेक अंतराय/अडचणी असू देत. परंतु त्या सर्वांचे एकच मूळ म्हणजे अहंकार हा पहिला/मुख्य विकार आहे.
मुमुक्षू माणसाला मोक्षमार्गावर अनेक प्रतिबंधांना/अडचणींना तोंड द्यावे लागते. उदा., काम, क्रोध, इत्यादी विकार. ते सर्व प्रतिबंध संसाराचे म्हणजे जन्ममरणाचे कारण असणे शक्य आहे. पण त्या सर्व विकारांमध्ये/अडचणीत मूळ विकार आहे अहंकार. तो प्रथम म्हणजे प्रमुख प्रतिबंध आहे. म्हणून संत सांगतात - अहंकार असेपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही. येथे 'प्रथम' म्हणजे 'पहिला' असा अर्थ घेता येणार नाही. कारण केवलाद्वैत मतानुसार, अहंकार हा पहिला विकार नाही. तथापि, एका वेगळ्या दृष्टिकोनाने अहंकार हा पहिला विकार ठरू शकेल - बुद्धीमध्ये प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब पडताच अहंकार प्रगट होतो आणि तोच स्थूल देह, सूक्ष्म देह इत्यादींवर अभिमान धारण करून 'मी कर्ता, मी भोक्ता' असे मानू लागतो (श्लोक १०५- १०६) आणि या अहंकारामुळेच कर्मेंही बंधनकारक होऊन, अहंकार हा संसाराचे मुख्य कारण बनतो. 'संत्वन्ये' या ऐवजी 'संत्यन्ये'असा पाठभेद आहे. त्याचा अर्थ इतर प्रतिबंध 'आहेत' असा होतो. |