शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(२५०) - (२५१) जहती-अजहती लक्षणा लौकिक वाक्यात सुसंगत अर्थ देते. त्याप्रमाणे ती 'तत्त्वमसि' या वैदिक वाक्यात इष्ट अर्थ देते, असे या पुढील श्लोक २५०-२५१ मध्ये सांगितले आहे

स देवदत्तोऽयमितीह वैकता विरुद्ध-धर्मांशमपास्य कथ्यते ।
यथा तथा तत्त्वमसीति वाक्ये विरुद्ध-धर्मानुभयं च हित्वा ॥ २५० ॥
संलक्ष्य चिन्मात्रतया सदात्मनोरखंड-भावः परिचीयते बुधैः ।
एवं महावाक्य-शतेन कथ्यते ब्रह्मात्मनोरैक्यमखंडभावः ॥ २५१ ॥
'तो हा देवदत्त आहे' येथे या वाक्यात (तो आणि हा या दोन) विरुद्ध धर्मांच्या अंशांचा त्याग करून, (देवदत्तरूपी पुरुषाची) एकता सांगितली जाते, त्याप्रमाणे तत्त्वमसि या वाक्यात ('तत्' आणि 'त्वं' पदांच्या दोन वाच्यार्थातील मायोपाधिक आणि पंचकोशापाधिक हे) विरुद्ध अंश सोडून, केवळ चैतन्यरूप या स्वरूपात (चिन्मात्रतया) असणाऱ्या त्या दोन आत्म्यांचा (सत्-आत्मनोः) अखंड भाव म्हणजे एकत्व याचा शहाण्या माणसांना परिचय होतो; म्हणजे प्रत्यय येतो. अशा प्रकारे (भाग-लक्षणेच्याद्वारा) शेकडो महावाक्ये ही ब्रह्म आणि जीवात्मा यांचे ऐक्य आणि अखंडभाव सांगतात.


व्यवहारात आपण म्हणतो 'तो हा देवदत्त आहे' (सोऽय देवदत्तः) येथे 'स' म्हणजे भूतकाळात पाहिलेला म्हणजे भूतकालविशिष्ट देवदत्त, आणि 'अयं' म्हणजे आत्ता पाहिलेला म्हणजे वर्तमानकाठ्यविशिष्ट देवदत्त असा अर्थ आहे. म्हणून या वाक्यात 'सः 'आणि 'अयं 'या शब्दांच्या वाच्यार्थांत 'भूतकालविशिष्ट 'आणि 'वर्तमानकालविशिष्ट' हे विरुद्ध अर्थ सोडून, नुसता 'देवदत्त' इतकाच अर्थ घेतला जातो, आणि अशाप्रकारे 'देवदत्त एकच आहे' म्हणजे देवदत्ताचे एकत्व आपणास कळून येते, ते भागलक्षणेने. याचप्रमाणे 'तत्त्वमसि' वाक्यात भागलक्षणा घेऊन, तत् आणि त्वं पदाच्या वाच्यार्थांतील 'मायोपाधिक' आणि 'पंचकोश उपाधिक' हे विरुद्ध अंश सोडून देऊन, केवळ 'चैतन्य'(= ब्रह्म) इतकाच अर्थ घ्यावयाचा आहे. अशाप्रकारे भागलक्षणेने 'तत्' आणि 'त्वं' या दोन्ही पदांवरून 'अखंडैकरस ब्रह्म/ चैतन्य' हा अर्थ कळून येतो. म्हणजेच जीव आणि ब्रह्म यांचे एकत्व कळून येते.

वरील श्लोक २५१ मध्ये 'सदात्मनोः' म्हणजे सत् ब्रह्म आणि आत्मा म्हणजे जीवात्मा असा अर्थ आहे. चैतन्यरूपाने ते दोघेही एकच आहेत. म्हणजे ब्रह्म हे अखंडैकरस आहे आणि जीवही अखंडैकरस आहे, म्हणून ते दोघे एकच आहेत. याच श्लोकात 'ब्रह्मात्मनोः' मध्ये ब्रह्म आणि आत्मन् म्हणजे जीवात्मन् असा अर्थ आहे.

'तत्त्वमसि 'हे उपनिषदांतील एक महावाक्य आहे. ते जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य दाखविते. याचप्रमाणे शेकडो महावाक्यांत जीव ब्रह्मांचे ऐक्य अभिप्रेत आहे, असे दाखवून देता येते. येथे 'शेकडो' ही अतिशयोक्ती आहे.


(२५२) - (२५३) ब्रह्मावर भासणारे विश्व मिथ्या असल्याने, त्यातील देह इत्यादींना 'मी' म्हणणे चूक आहे, तर 'मी ब्रह्म आहे' असे म्हणावयास हवे, असे श्लोक २५२- २५३ सांगतात.

अस्थूलमित्येतदसन्निरस्य सिद्धं स्वतो व्योमवदप्रतर्क्यम् ।
अतो मृषामात्रमिदं प्रतीतं जहीहि यत् स्वात्मतया गृहीतम् ॥ २५२ ॥
ब्रह्माहमित्येव विशुद्ध-बुद्ध्या
विद्धि स्वमात्मानमखंड-बोधम् ॥ २५३ ॥
'अस्थूलम्' इत्यादीप्रकारे ब्रह्म आहे हे सांगणारे) हे (श्रुतीचे वचन) (ब्रह्मावर भासणाऱ्या) असत् (जगा चा निषेध करून (निरस्थ), स्वतःसिद्ध, आकाशाप्रमाणे (व्यापक, असंग) आणि तर्काचा विषय न होणाऱ्या ब्रह्माचा बोध करून देते. आणि म्हणून जे (यत्) स्वतःचा आत्मा या स्वरूपात, (हे शिष्या), तू मानीत आहेस (गृहीत), ते हे प्रतीतीला येणारे (विश्व), मिथ्याभूत असल्याने, त्याचा त्याग कर (जहीहि) आणि मग अतिशय शुद्ध झालेल्या बुद्धीने 'मी ब्रह्म आहे' अशा पद्धतीने स्वतःच्या अखंड ज्ञानरूप असणाऱ्या आत्म्याला जाणून घे.


'अस्थूलं' इत्यादी श्रुतीचे वचन म्हणजे बृहदारण्यक उपनिषदातील (३. ८. ८) वचन आहे. या वाक्यात याज्ञवल्क्य गार्गीला सांगतो की अक्षर ब्रह्म हे 'अस्थूल, अनणु' इत्यादी आहे; ते विश्वापेक्षा संपूर्णपणे वेगळे आहे. आता, ब्रह्म हे एकमेव सत् आहे, तसे विश्व नाही; म्हणून ते असत्, मिथ्या आहे. म्हणून या श्रुति- वचनांच्या आधाराने, असत् अशा विश्वाचा निषेध/निरास करावयाचा आहे. तसे केल्यावर जे उरते ते स्वतः सिद्ध असणारे ब्रह्म आहे. ते आकाशाप्रमाणे व्यापक, असंग आहे ते तर्काने कळत नसल्याने ते अप्रतर्क्य आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांनी कळतात त्यांच्याविषयी तर्क करता येतो; ब्रह्म हे प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांनी कळणारे नाही; म्हणून ते तर्काचाही विषय होत नाही. गुरू शिष्याला म्हणतो, 'हे शिष्या, या असत् जगात तू देह, इंद्रिये इत्यादींपैकी कशाला तरी 'मी' म्हणजे स्वतःचा आत्मा मानीत आहेस. पण ते खरे नाही.' इदं' शब्दाने बोधित होणारे आणि प्रत्ययाला येणारे हे विश्व ब्रह्मावर अध्यस्त असल्याने ते खरे नाही, ते मिथ्या आहे. खरे फक्त सत् ब्रह्म आहे. आणि हे जे ब्रह्म आहे, तेच, हे शिष्या, तुझा आत्मा आहे. तेव्हा अखंड ज्ञानरूप असणारा तुझा आत्मा हा अखंड ज्ञानस्वरूप ब्रह्मच आहे. म्हणून हे शिष्या, 'मीच ब्रह्म आहे' असे तू जाणून घे.


(२५४)

मृत-कार्यं सकलं घटादि सततं मृन्मात्रमेवाहितं
तद्‌वत् सज्जनितं सदात्मकमिदं सन्मात्रमेवाखिलम् ।
यस्मान्नास्मि सतः परं किमपि यत् सत्यं स आत्मा स्वयं
तस्मात् तत्त्वमसि प्रशांतममलं ब्रह्माद्वयं यत् परम् ॥ २५४ ॥
मातीचे कार्य असणारे घट इत्यादी सर्वकाही हे नेहमीच 'केवळ माती' या स्वरूपातच स्थित असते. त्याप्रमाणे सत् (अशा ब्रह्मा)पासून उत्पन्न (जनित) होणारे हे सर्व (विश्व) केवळ सत् (ब्रह्म)च आहे. आणि ज्याअर्थी सत् ब्रह्मापेक्षा वेगळे (पर) असे काहीही नाही, त्याअर्थी जे सत्य (ब्रह्म) आहे ते म्हणजेच स्वतः (हे शिष्या, तुझा प्रत्यक्) आत्मा आहे. म्हणून जे परब्रह्म अतिशय शांत, निर्मळ आणि अद्वय आहे, ते (हे शिष्या) तू आहेस (यात शंका घेण्याचे कारण नाही).


मातीपासून बनलेले पदार्थ हे मातीपेक्षा भिन्न नसतात. त्याप्रमाणे सत् अशा ब्रह्मापासून निर्माण झालेले विश्व हे ब्रह्मापेक्षा वेगळे नाही. येथे हे लक्षात घ्यावे - ब्रह्मापासून विश्वाची साक्षात् उत्पत्ती केवलाद्वैत वेदांतात मान्य नाही. म्हणून सत् ब्रह्मापासून निर्माण झालेले विश्व याचा अर्थ अविद्येने ब्रह्मावर अध्यस्त असणारे विश्व असा आहे. (श्लोक २३२ - २३३).

सत्य असणारे ब्रह्म हे केवळ एकमेव एक आहे. साहजिकच ब्रह्माप्रमाणे असणारा सच्चिदानंद प्रत्यगात्मा हा ब्रह्मच आहे. म्हणून 'तत्त्वमसि' हे वाक्य त्या दोहोंचे एकत्व सांगणारेच आहे. प्रत्यगात्म्याचे स्वरूप मागे श्लोक २१३, २१९ इत्यादींमध्ये आलेले आहे.


(२५५) ब्रह्मावर अध्यस्त असणारे विश्व हे मिथ्या आहे. म्हणून गुरू शिष्याला सांगतो - हे शिष्या, तुझा प्रत्यगात्मा म्हणजे तत्त्वमसि वाक्याने सूचित होणारे ब्रह्मच आहे, हे तू जाणून घे.

निद्रा-कल्पित-देश-काल-विषय-ज्ञात्रादि सर्वं यथा
मिथ्या तद्वदिहापि जाग्रति जगत् स्वाज्ञान-कार्यत्वतः ।
यस्मादेवमिदं शरीर-करण-प्राणाहमाद्यप्यसत्
तस्मात् तत्त्वमसि प्रशांतममलं ब्रह्माद्वयं यत् परम् ॥ २५५ ॥
झोपेत म्हणजे स्वप्नात कल्पिलेले देश, काल, विषय, ज्ञाता इत्यादी हे सर्व अज्ञानाचे कार्य असल्याने मिथ्या असते; त्याप्रमाणे येथे = जगात जागृती अवस्थेतसुद्धा स्वअज्ञानाने कल्पिलेले सर्व जग मिथ्या आहे. असे असल्यामुळेच हे शरीर, इंद्रिये, प्राण, अहंकार (अहं) इत्यादी सर्व काही असत् आहे. म्हणून जे परब्रह्म अतिशय शांत, निर्मल, आणि अद्वय आहे, ते ब्रह्म (हे शिष्या) तू आहेस.


झोपेत अज्ञान असते, त्यातच स्वप्न पडते. स्वप्नात काय वाटेल ते दिसते; पण जागृत झाल्यावर ते मिथ्या आहे हे कळते, त्याप्रमाणे जागृती अवस्थेतसुद्धा भासणारे देश, काल, इत्यादी मिथ्या आहेत, कारण ते स्वतःच्या अज्ञानाचे कार्य आहेत म्हणजे अज्ञानाने ब्रह्मावर आरोपित आहेत. केवळ अधिष्ठानरूप ब्रह्म सत्य आहे, असे असल्याने जगात जे शरीर, इंद्रिय इत्यादी भासते ते ते सर्व असत् , मिथ्या आहे. मग सत्य आहे काय ? सच्चिदानंद प्रत्यगात्मा म्हणजेच ब्रह्म फक्त सत्य आहे. प्रत्यगात्मा म्हणजे ब्रह्म म्हणजेच 'तत्त्वमसि' इतकेच सत्य आहे.


(२५६) यापुढे श्लोक २५६- २६५ मध्ये, जगातील सर्वांपेक्षा वेगळे असणारे ब्रह्म म्हणजे प्रत्यगात्मा आहे, ही गोष्ट 'ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि' हा ध्रुवपदवजा चरण वापरून सांगितली आहे.

जातिनीति-कुल-गोत्रं-दूरगं नाम-रूप-गुण-दोष-चर्जितम् ।
देश-काल-विषयातिवर्ति यद् ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २५६ ॥
जाति, नीति, कुल, गोत्र यांचेपेक्षा दूर/वेगळे असणारे, नाम-रूप आणि गुणदोष यांनी रहित असणारे, देश, काल, विषय यांच्या पलीकडे असणारे असे जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म हे शिष्या तू आहेस, असे मनात (आत्मनि) जाणून घे/चिंतन कर.


जाति म्हणजे जन्म अगर विशिष्ट, जात, वर्ग. नीति म्हणजे आचार-विषयक नियम, अथवा राजनीती. गोत्र मोठे असते, त्याचा एक भाग कुल असते. जगातील पदार्थांचे रूप, रंग, आकार, त्यांना ठेवलेले नाव, त्यांचे गुण आणि दोष, तसेच मर्यादित व अमर्याद प्रदेश, तीन काळ, ज्ञानाचे सर्व विषय या सर्वांहून ब्रह्म वेगळे आहे. असे हे ब्रह्म म्हणजे जीवात्मा किंवा प्रत्यगात्मा असा विचार शिष्याने करावा.


(२५७)

यत्र परं सकल-राग-गोचरं गोचरं विमल-बोध-चक्षुषः ।
शुद्ध-चिद्‌घनमनादि वस्तु यद् ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २५७ ॥
जे श्रेष्ठ आहे, जे सर्वांच्या प्रेमाच्या (राग) टप्प्यात येणारे आहे, शुद्ध ज्ञानरूपी नेत्राला जे गोचर आहे, जे शुद्ध व केवळ चैतन्य आहे, जे अनादी असून सत्-स्वरूप वस्तू आहे, ते ब्रह्म........... चिंतन कर.


ब्रह्म हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ, सर्वांच्या पलीकडचे आहे. ते सर्वांच्या प्रीतीचा विषय आहे, कारण आत्मा = ब्रह्म हा सर्वांना प्रियतम असतो. विषयरहित असे जे शुद्ध ज्ञान तोच कोणी एक डोळा, त्या डोळ्याला दिसणारे असे ज्ञानगम्य ब्रह्म आहे. ते शुद्ध चैतन्याचा गोळा आहे. ते अनादी, आरंभरहित, कारणरहित असून, ते सदोदित असणारी वस्तू आहे. 'सकल-वागगोचरं' असा पाठभेद आहे. त्याचा अर्थ सर्व वाचांच्या टण्यात न येणारे, अनिर्वचनीय, असा अर्थ होईल.

'विमल-बोध-चक्षुषः गोचरम्' म्हणजे विमल ज्ञानरूपी डोळा ज्याला प्राप्त झाला आहे, अशा माणसाला गोचर/दिसणारे, असाही अर्थ होईल.


(२५८)

षड्भिरूर्मिभिरयोगि योगि-हृद्-भावितं न करणैर्विभावितम् ।
बुद्ध्यवेद्यमनवद्यमस्ति यद् ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २५८ ॥
ज्याचा सहा ऊर्मीशी संबंध नाही, योगिजन ज्याचे मनात चिंतन करतात, जे इंद्रियांना दृश्य नाही, जे बुद्धीला कळत नाही, जे निर्दोष/ अनिंद्य आहे, ते ब्रह्म....... चिंतन कर.


सहा ऊर्मीः (१) क्षुधा, तृष्णा, दुःख, मोह, जरा आणि मृत्यु. (२) काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा विकार. (३) जन्म, वृद्धी, अपक्ष इत्यादी यास्काने सांगितलेले सप्त विकार. या सहा ऊर्मींशी ब्रह्माचा संबंध येत नाही. पाच ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी यांना ब्रह्म कळणारे नाही.

'षड्भि......... भावितम्' असा एकच समास मानला तर 'सहा ऊर्मींशी संबंधित नसणारे असे जे ब्रह्मयोगी लोक आपल्या मनामध्ये चिंतितात' , असा अर्थ होईल. येथे 'योगि' शब्दाने केवलाद्वैत वेदांताला अभिप्रेत असणारा 'योगी' घ्यावयाचा आहे.


(२५९)

भ्रांति-कल्पित-जगत्-कलाश्रयं स्वाश्रयं च सदसद्-विलक्षणम् ।
निष्कलं निरुपमानवद्धि यद् ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २५९ ॥
भ्रांतीने कल्पिलेल्या जगाच्या काही अंशांचे (कला) जे ब्रह्म आश्रय ( = अधिष्ठान) आहे, जे स्वतःच्या आश्रयाने असते, जे सत् आणि असत् पेक्षा वेगळे आहे, जे निरवयव आणि निरुपम/उपमानरहित आहे, ते ब्रह्म........... चिंतन कर.


जगाचे अधिष्ठान ब्रह्म आहे तसेच जगातील देह इत्यादी जे भाग आहेत, त्यांचेही अधिष्ठान ब्रह्मच आहे. किंवा - जगरूपी कलेचे (art) अधिष्ठान (म्हणजे पट (Canvass) ब्रह्म आहे. ब्रह्माला कशाचाही आधार नाही; ते स्वतःच स्वतःचा आश्रय आहे; ते निराश्रय आहे. केवलाद्वैत वेदांतातील अज्ञान ज्या अर्थी सदसद् - विलक्षण आहे, त्या अर्थाने ब्रह्म तसे नाही. तर जगातील बरे- वाईट, स्थूल-सूक्ष्म, व्यक्त अव्यक्त, खरे-खोटे, इत्यादी सापेक्ष कल्पनांपेक्षा ते भिन्न आहे. ब्रह्म हे एकमेव एक असल्याने त्याला उपमा देण्यास दुसरा पदार्थच नाही.


(२६०)

जन्म-वृद्धि-परिणत्यपक्षय-व्याधि-नाशन-विहीनमव्ययम् ।
विश्व-सृष्ट्यवन-विघात-कारणं, ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २६० ॥
जन्म, वाढ, परिणाम, अपक्षय, रोग आणि नाश यांनी रहित, अक्षय विश्वाची उत्पत्ती, रक्षण (अवन) आणि नाश यांचे कारण असणारे ब्रह्म तू आहेस, असा हे शिष्या तू मनात विचार कर.


विश्वातील पदार्थांना उत्पत्ती, वृद्धी, अपक्षय इत्यादी विकार असतात. ते ब्रह्माला नाहीत. यास्काने दिलेल्या सप्त विकारातील 'अस्ति' हा विकार न सांगता येथे 'व्याधि' सांगितलेली आहे.


(२६१)

अस्त-भेदमनपास्त-लक्षणं निस्तरंग-जलराशि-निश्चलम् ।
नित्य-मुक्तमविभक्त-मूर्ति यद् ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २६१ ॥
ज्यातून भेद लयाला गेला आहे (अस्त), नाशरहित असणे (अनपास्त) हे ज्याचे लक्षण म्हणजे स्वरूप आहे, तरंगरहित जलाशयाप्रमाणे जे निश्चल आहे, जे नित्य आणि मुक्त (अथवा नित्य मुक्त) आहे, ज्याचे स्वरूपाचा (मूर्ती) विभाग करता येत नाही. (म्हणजे भागरहित, अवयवरहित स्वरूप असणारे), असे जे ब्रह्म आहे, ते तू आहेस असा (हे शिष्या) मनात विचार कर.


सजातीय, विजातीय आणि स्वगत यातील कोणताही भेद ब्रह्माला नाही. सतत असणे/सत् हे त्याचे स्वरूप आहे. जलाशय म्हणजे सरोवर, समुद्र. तरंगरहित जलाशयाप्रमाणे ब्रह्म निश्चल आहे. अविभक्त-मूर्ती म्हणजे सर्व मर्यादांनी-परिच्छेदांनी रहित - असाही अर्थ होईल. स्थळ, काळ आणि वस्तू असे तीन परिच्छेद असतात.


(२६२)

एकमेव सदनेक-कारणं कारणांतर-निरास-कारणम् ।
कार्य-कारण-विलक्षणं स्वयं ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २६२ ॥
ब्रह्म हे एकच एक आहे तरी ते अनेकांचे कारण आहे. इतर कारणे दूर करण्यास (म्हणजे इतर कारणांचा निरास करणारे) कारण आहे, आणि जे स्वतः कार्य-कारणापेक्षा वेगळे आहे, असे ते ब्रह्म हे शिष्या तू आहेस, असा मनात विचार कर.


अनेक पदार्थांनी युक्त असे विश्व आहे. अशा त्या अनेकात्मक विश्वाचे विवर्त- कारण ब्रह्म आहे. विश्वाच्या स्वतःखेरीज अन्य कारणांचा ब्रह्म हे निरास करते. विश्वाची काल, नियती, स्वभाव इत्यादी अनेक कारणे मानली जात; त्यांचा निरास ब्रह्म करते. अज्ञान हे कारण आणि त्याचे कार्य या दोहोपेक्षा वेगळे असे ब्रह्म आहे.


(२६३)

निर्विकल्पमनल्पमक्षरं यत् क्षराक्षर-विलक्षणं परम् ।
नित्यमव्यय-सुखं निरंजनं ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २६३ ॥
जे ब्रह्म विकल्परहित, लहान नसणारे, अविनाशी, क्षर आणि अक्षर यांपेक्षा संपूर्णपणे (परं) निराळे, नित्य, नाशरहित असे सुख हे स्वरूप असणारे आणि निरंजन/ निर्लेप/ असंग आहे, ते ब्रह्म हे शिष्या तू आहेस, असा मनात विचार कर.


मानवी मनात नाना विकल्प येतात. ब्रह्मात कोणतेही विकल्प नाहीत. ते लहान नसणारे म्हणजे सर्वव्यापक आहे. त्याचा नाश होत नाही. क्षर-रूप जीव आणि अक्षररूप ईश्वर यांच्यापेक्षा ते वेगळे आहे. म्हणजे असे - नाशवंत देहाच्या उपाधीत असणारा जीव हा क्षर आहे; त्याच्या अपेक्षेने बराच काळ असणारा ईश्वर हा अक्षर आहे. अविनाशी सुख/आनंद हे ब्रह्माचे नित्य स्वरूप आहे. ते कशालाही चिकटत नाही आणि त्यालाही काही चिकटत नाही म्हणून ते असंग आहे. 'पर' हा शब्द स्वतंत्र घेतल्यास, परमोच्च/श्रेष्ठ असा अर्थ होईल.


(२६४)

यद् विभाति सदनेकधा भ्रमान्नाम-रूप-गुण-विक्रियात्मना ।
हेमवत् स्वयमविक्रियं सदा ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २६४ ॥
सत् असणारे ब्रह्म हे सोन्याप्रमाणे एक असून, भ्रमामुळे ते नाम, रूप, गुण या विकारांच्या स्वरूपात अनेक आहे असे भासते, पण ते स्वतः (स्वयं) नेहमी विकाररहित असते. ते ब्रह्म तू आहेस असा हे शिष्या मनात विचार कर (२६४ ).


जरी सोने हे एकच असते तरी ते कुंडल, अंगठी, बांगडी इत्यादी भूषणांच्या अनेक नावांनी, रूपांनी, गुणांनी, विकारांनी, भ्रमामुळे नाना प्रकारचे भासते. त्याप्रमाणे सत् असणारे एकच ब्रह्म हे देव, मनुष्य, पशु, पक्षी, दगड इत्यादी भिन्न नावांनी, रूपांनी, गुणांनी श्रमामुळे विकार पावल्यासारखे वाटते आणि अनेक झाले असे वाटते. परंतु ते सदा सर्वकाळ निर्विकार, नामरूप-गुण-रहित असते.


(२६५)

यच्चकास्त्यनपरं परात् परं प्रत्यगेक-रसमात्म-लक्षणम् ।
सत्य-चित्-सुखमनंतमव्ययं ब्रह्म तत्त्वमसि भावयात्मनि ॥ २६५ ॥
सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याने (परात्पर) ज्याच्या तोडीचे दुसरे काही नाही (अनपर) जे एकरूप (अशा) प्रत्यगात्म स्वरूपाचे आहे, जे सच्चिदानंद आहे, जे अनंत आणि अव्यय आहे आणि जे नेहमी प्रकाशत असते, ते ब्रह्म (हे शिष्या) तू आहेस असा मनात विचार कर.


विश्वात अनेक श्रेष्ठ वस्तू आहेत; त्या सर्वांपेक्षा ब्रह्म श्रेष्ठ आहे. साहजिकच त्याच्यासारखे, त्याला समान असे अन्य काही नाही; ते एकमेव एक आहे. (मानवी देहात) एकरूपात असणारा प्रत्यगात्मा हे त्याचेच स्वरूप आहे. ते सच्चिदानंद अनंत, नाशरहित आहे. चैतन्य हे स्वरूप असणारे ब्रह्म सतत ज्ञान या स्वरूपात चमकत असते.


(२६६) विश्वापेक्षा वेगळे असे ब्रह्माचे स्वरूप तसेच त्याचे स्वतःचे स्वरूप सांगून झाल्यावर गुरू शिष्याला सांगतो की, तू जर माझ्या म्हणण्याचा विचार करशील तर तुला संशयरहित असे ब्रह्माचे ज्ञान होईल.

उक्तमर्थमणि मयात्मनि स्वयं भावयेः प्रथित-युक्तिभिर्धिया ।
संशयादि-रहितं करांबुवत् तेन तत्त्व-निगमो भविष्यति ॥ २६६ ॥
हे शिष्या आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टींचा तू जर मनात (आत्मनि) स्वतःच योग्य त्या तर्कांनी आणि बुद्धीने विचार करशील, तर तळहातावर असणाऱ्या पाण्याप्रमाणे (ब्रह्म) या तत्त्वाचे संशय इत्यादींनी रहित असे ज्ञान तुला होईल.


येथे 'प्रथित' म्हणजे योग्य, माझ्या वचनाला अनुसरून असणाऱ्या, विचार करताना बुद्धीचाही सहभाग हवा, तळहातावरचे पाणी चट्‌दिशी जाणवते त्याप्रमाणे तुला चट्दिशी ब्रह्माचे ज्ञान होईल.

या श्लोकात 'मननाचे' महत्त्व सांगितले आहे. योग्य तर्क आणि बुद्धी यांचा वापर करून, गुरूच्या म्हणण्याचे मनन केल्यास शिष्याला सुलभपणे 'ब्रह्म' या सत्य तत्त्वाचे ज्ञान होईल.


(२६७)

संबोध-मात्रं परिशुद्ध-तत्त्वं विज्ञाय संघे नृपवच्च सैन्ये ।
तदाश्रयः स्वात्मनि सर्वदा स्थितो विलापयं ब्रह्मणि विश्वजातम् ॥ २६७ ॥
सैन्यात ज्याप्रमाणे राजा असतो, त्याप्रमाणे (भूते, शरीरे, इंद्रिये इत्यादींच्या) समूहात (संघे) केवळ शुद्ध ज्ञानरूप आणि (सर्वमलरहित) अत्यंत शुद्ध असे (आत्मतत्त्व आहे, जे जाणून, त्या संघाताचा आश्रय होऊन आणि स्वतःच्या आत्म्यात नेहमी स्थित असणारा असा तू ब्रह्माचे/आत्माचे ठिकाणी संपूर्ण विश्वाचा लय कर (विलापय).


सैन्यामध्ये राजा हा मुख्य व प्रेरणा देणारा असतो. त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म भूते, शरीरे, इंद्रिये इत्यादींच्या समूहात ज्ञानरूप आत्मा हा मुख्य आणि प्रेरणा देणारा आहे. तो आत्मा म्हणजे अत्यंत शुद्ध असे ब्रह्मतत्त्व आहे. हे कळल्यावर साधक- शिष्याने त्या सर्वांचा आधाराअधिष्ठान असणाऱ्या आत्मरूपाने नेहमी असावे. तसे झाल्यावर विश्व हे स्वतंत्र म्हणून राहत नाही. विश्व हे ब्रह्मच आहे ही खात्री पटते.

ब्रह्मामध्ये विश्वाचा लय करणे या गोष्टीत अपवादाची प्रक्रिया अभिप्रेत आहे (अपवादासाठी प्रस्तावना पहा).


(२६८) हे ब्रह्म-तत्त्व/आत्मतत्त्व मानवी शरीरात कुठे आहे आणि तद्‌रूप झाल्यावर काय होते हे आता गुरू सांगतो.

बुद्धौ गुहायां सदसद्-विलक्षणं ब्रह्मास्ति सत्यं परमद्वितीयम् ।
तदात्मना योऽत्र वसेद् गुहायां पुनर्न तस्यांग गुहाप्रवेशः ॥ २६८ ॥
सत् आणि असत्‌पेक्षा वेगळे, सद्‌रूप (सत्य), सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय असे ब्रह्माआत्मा बुद्धीरूपी गुहेत असतो. सद्‌रूप होऊन (तदात्मना) जो माणूस त्या (अत्र) (बुद्धिरूपी) गुहेत राहतो, त्याचा, हे नाळा (शिष्या) (अंग), पुनः गुहेमध्ये प्रवेश होत नाही.


'सदसद्-विलक्षण 'या शब्दाचे स्पष्टीकरण श्लोक २५९ खाली आलेले आहे. ब्रह्म हे अंतरात्मा/प्रत्यगात्मा या स्वरूपात बुद्धिरूपी गुहेत असते. ते ब्रह्म/आत्मा होऊन जो कोणी बुद्धिरूपी गुहेत राहतो, त्याला पुनः गुहेत प्रवेश नाही म्हणजे त्याला पुनर्जन्म घेऊन पुनः बुद्धिरूपी गुहेत आत्म्याचा शोध घेण्याचे कारण नाही. कारण आत्मरूप/ब्रह्मरूप झालेला तो जन्ममरणातून सुटून जातो.

गुहा म्हणजे पर्वतातील गूढ ठिकाण; त्यात असणारी वस्तू सहजपणे न कळणारी. तसा आत्मा सहजपणे न कळणारा आहे. आत्मा/ब्रह्म हे शरीरात 'गुहा- हित' आहे असे उपनिषदे सांगतात. येथे बुद्धी शब्दाने 'पंचकोश' अभिप्रेत आहेत; पाच कोशांखाली आत्मा दडलेला असतो.

या श्लोकात 'अंग-गुहा-प्रवेशः' असे 'अंग' शब्द 'गुहा' शब्दाला जोडूनही घेता येतो. तसे केल्यास 'शरीरातील (अंग) गुहेत प्रवेश' असा अर्थ होईल.


(२६९) आत्मा कळल्यावर वासनांचा नाश व्हावयास हवा. वासनांचा नाश म्हणजेच मोक्ष असे पुढील श्लोक २६९ सांगतो.

ज्ञाते वस्तुन्यपि बलवती तासनानादिरेषा
कर्ता भोक्ताप्यहमिति दृढा यास्य संसार-हेतुः ।
प्रत्यग्-दृष्ट्यात्मनि निवसतां सापनेया प्रयत्‍ना-
न्मुक्तिं प्राहुस्तदिह मुनयो वासना-तानवं यत् ॥ २६९ ॥
ब्रह्म/आत्मा या वस्तूचे शाब्दिक ज्ञान झाले तरी सुद्धा माणसाच्या (अस्य) संसाराचे कारण असणारी, अनादी, 'कर्ता व भोक्ता मी आहे', या स्वरूपात दृढमूल असणारी वासना असतेच. म्हणून 'मी म्हणजे प्रत्यगात्मा आहे 'ही दृष्टि बळकट धरून राहणाऱ्या पुरुषाने प्रयत्‍नपूर्वक ती वासना दूर करावयास हवी.' वासनांचा जो नाश/क्षय तो म्हणजेच मुक्ति' , असे येथे (= या जगात) मुनिलोक सांगतात.


'जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे' असे एका महाराष्ट्रीय साधूने म्हटले आहे. वासना म्हणजे दृढ इच्छा. या दृढ इच्छेमुळे 'मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे,' अशी माणसाची भूमिका होते आणि मग वासनेच्या संगानेआणि अहंकाराने केली जाणारी कर्मे ही माणसाच्या जन्ममरणाला कारण ठरतात. ही वासना मनात असते. ती मनात संकल्प-विकल्प रूपाने प्रगट होते. मनाचे संकल्प-विकल्प जर संपले तर वासना संपली असा अर्थ होतो. म्हणजे संकल्प-विकल्प-नाश=मनोनाश = वासनाक्षय. वासनेचा हा क्षय विद्यमान जीवनात होणे हीच जीवन्मुक्ती आहे, असे व्यास इत्यादी मुनी आणि संत-सज्जन सांगतात.

ही वासना आत्म्याच्या शाब्दिक ज्ञानाने नष्ट होत नाही. तिचा नाश करण्यास खूप प्रयत्‍न आवश्यक आहेत. हा प्रयत्‍न म्हणजे मनाने वारंवार आत्मस्वरूपात लीन होणे होय. म्हणजे 'मी प्रत्यगात्मा आहे' , असा सततचा ठोका मनावर बसणे होय. देह, इंद्रिये इत्यादी मी नसून 'मी अंतरात्मा आहे', ही जाणीव सतत व्हावयास हवी. अशाप्रकारे मनोनाशाचा अभ्यास झाला की विद्यमान जीवनातच वासना-क्षय होतो आणि वासनेअंती येणारे जन्ममरण थांबते. वासनाक्षयाने जन्म-मरण-रूप संसार संपून जातो. जन्ममरणातून सुटका हाच मोक्ष असल्याने, वासनाक्षय म्हणजे मोक्ष असे साक्षात्कारी संत सांगतात.


(२७०) देह इत्यादी अनात्म पदार्थांना मी-माझे म्हणणे हा अध्यास आहे. हा अध्यास दूर व्हावयास हवा.

अहं ममेति यो भावो देहाक्षादावनात्मनि ।
अध्यासोऽयं निरस्तव्यो विदुषा स्वात्मनिष्ठया ॥ २७० ॥
देह इंद्रिये इत्यादी अनात्म वस्तूंचे ठिकाणी 'मी आणि माझे' , असा भाव (= मनोवृत्ती) म्हणजेच अध्यास आहे. स्वतःच्या आत्म्याचे ठायी राहून हा अध्यास शहाण्या माणसाने दूर करावयाचा आहे.


देह इत्यादी अनात्म वस्तूंना आत्मा मानून, त्यांना 'मी-माझे' म्हणणे हा अध्यास आहे. यामुळेच माणसाला बंध येतो (श्लोक १३९ ). या बंधनातून सुटण्यास आत्मानात्मविवेक उपयोगी आहे (श्लोक १५४ ). मी अनात्मा नसून मी म्हणजे प्रत्यगात्मा आहे, ही भूमिका दृढ करून हा अध्यास दूर करता येतो.


(२७१) अध्यास कसा दूर करावयाचा हे श्लोक २७१ - २७२ मध्ये सांगितले आहे.

ज्ञात्वा स्वं प्रत्यगात्मानं बुद्धि-तद्‌वृत्ति-साक्षिणम् ।
सोऽहमित्येव सद्‌वृत्त्यानात्मन्यात्म-मतिं जहि ॥ २७१ ॥
आपली बुद्धी व तिच्या वृत्ती यांपेक्षा वेगळा असून त्यांचा साक्षी असा आपला प्रत्यगात्मा आहे आणि तो म्हणजे 'मी आहे' अशी योग्य वृत्ती (सद्-वृत्ती) धारण करून, अनात्म्याला आत्मा मानणे (ही वृत्ती, हे शिष्या) तू टाकून दे.


सध्या आपण देह इत्यादी अनात्म वस्तूंना 'मी-माझे' असे म्हणून त्यांना आपला आत्मा मानीत आहोत. पण हे योग्य नाही. ज्या प्रत्यगात्म्याचे संदर्भात आपण 'मी- माझे' म्हणतो, तो प्रत्यगात्मा बुद्धी व तिच्या वृत्ती यांच्यापेक्षा भिन्न आहे, तो त्यांचा साक्षी आहे आणि हा प्रत्यगात्मा म्हणजेच 'मी' अशी योग्य वृत्ती व्हावयास हवी. अशी वृत्ती झाल्यावर देह इत्यादी अनात्म पदार्थांना आत्मा मानणे हे सोडून द्यावयास हवे.


२७२

लोकानुवर्तनं त्यक्ता त्यक्ता देहानुवर्तनम् ।
शास्त्रानुवर्तनं त्यक्ता स्वाध्यासापनयं कुरु ॥ २७२ ॥
लोकांचे अनुसरण, देहाचे अनुसरण आणि शास्त्रांचे अनुसरण सोडून देऊन (हे शिष्या) तू स्वतःचा अध्यास दूर कर.


देहाला आत्मा मानून, धर्मशास्त्रांना अनुसरून लोक देहाला आत्मा मानून व्यवहार करतात. तसेच अज्ञानी लोकही देह म्हणजे आत्मा असे समजून वागत असतात. आपण स्वतःही देहाला आत्मा मानून व्यवहार करीत असतो. हा सर्वच व्यवहार अध्यासावर आधारलेला आहे (तपशीलासाठी ब्रह्मसूत्रावरील शंकराचार्यांचे अध्यासभाष्य पहा.) हे लोकांचे इत्यादी अनुकरण सोडून 'प्रत्यगात्मा म्हणजे मी', अशी वृत्ती धारण करणे म्हणजे स्वतःचा अध्यास दूर करणे होय अध्यास म्हणजे अनात्म्याला आत्मा मानणे. श्लोक २७० पहा.) 'मी प्रत्यगात्मा आहे', ही जाणीव ठेवणे म्हणजेच अध्यास दूर करणे होय.

'लोकानुवर्तन' याचा वेगळा अर्थ शंकराचार्यांना अभिप्रेत असावा असे पुढील श्लोक २७३ वरून वाटते. तेथे त्यांनी 'लोक-वासना' असा शब्द वापरला आहे. लोकवासना म्हणजे 'लोकेषणा' आणि ही लोकेषणा देहाला आत्मा मानण्यावरच अवलंबून आहे. तेव्हा लोकेषणेसाठी आचार करू नये, असा अर्थ होईल. येथे 'शास्त्र' शब्दाने वेदांतशास्त्राखेरीजची धर्म-शास्त्रे इत्यादी अभिप्रेत आहेत.


(२७३) श्लोक २७२ मध्ये सांगितलेल्यो तीन प्रकारच्या आचारातील अनुकरण सोडल्याशिवाय आत्म्याचे ज्ञान होत नाही, असे श्लोक २७३ सांगतो.

लोक-वासनया जंतोः शास्त्र - वासनयापि च ।
देह-वासनया ज्ञानं यथावन्नैव जायते ॥ २७३ ॥
माणसाचे ठिकाणी असणारी लोकवासना, शास्त्रवासना आणि देह-वासना यांच्यामुळे आत्म्याचे यथायोग्य ज्ञान उत्पन्न होत नाही.


अनात्म्यावरील आत्म्याच्या अध्यासाने तसे अनुकरण करण्याची वासना होते. या वासना आहेत तोपर्यंत आत्म्याचे योग्य ज्ञान होत नाही.


(२७४) या तीनही प्रकारच्या वासना बेडीप्रमाणे आहेत. त्यांतून सुटावयास हवे असे पुढील श्लोक २७४ सांगतो.

संसार-कारागृह-मोक्षमिच्छोरयोमयं पाद-निबंध-शृंखलम् ।
वदंति तज्ज्ञाः पटू वासना-त्रयं योऽस्माद् विमुक्तः समुपैति मुक्तिम् ॥ २७४ ॥
तज्ज्ञलोक असे सांगतात की, वर उल्लेखिलेला तीन वासनांचा समूह म्हणजे संसाररूपी तुरुंगातून सुटू इच्छिणाऱ्या पुरुषाच्या पायाला बांधलेल्या बळकट (पटु) अशा लोखंडी साखळ्या आहेत. जो कोणी त्यातून सुटतो तो मोक्षाप्रत जातो.


सध्या मनुष्यप्राणी संसारात आहे. हा संसार हा एक तुरुंग आहे आणि या तुरुंगात प्राण्यांच्या पायाला शृंखला आहेत. या शृंखला म्हणजे लोकवासना, शास्त्रवासना आणि देहवासना. तुरुंग आणि तीन शृंखला यांतून जो सुटतो तो सरळ मोक्षाप्रत जातो.


GO TOP