शुक्ल यजुर्वेद
चतुर्थोऽधायःविनियोग - तिसऱ्या अध्यायांत अग्निहोत्र, अग्न्युपस्थान व चातुर्मास्याचे मंत्र झाले. चतुर्थ अध्यायाच्या पहिल्या मंत्रापासून आठव्या अध्यायाच्या बत्तिसाव्या मंत्रापर्यंत अग्निष्टोमाचे मंत्र सांगितले आहेत. चतुर्थ अध्यायांत यजमान संस्कारासंबंधी व सोम विकत घेण्यासंबंधी मंत्र सांगितले आहेत. प्रथम यजमानानें सोळा ऋत्विजांचे वरण करावें. (वरणी द्यावी). नंतर अग्निसमारोप करून होमशालेंत जावें. 'इमा आपः' या मंत्रानें उजव्या बाजूचे केस पसरून भिजवावे. यूपच्छेदाच्या वेळेप्रमाणेंच येथेंही तृणाचें अंतर्धान करावें व क्षुऱ्याचें स्थापन दोन मंत्रांनी करावें.


एदम॑गन्म देव॒यज॑नं पृथि॒व्या यत्र॑ दे॒वासो॒ अजु॑षन्त॒ विश्वे॑ ।
ऋ॒क्सा॒माभ्याँ॑ सन्तर॑न्तो॒ यजु॑र्भी रा॒यस्पोषे॑ण॒ समि॒षा म॑देम ।
इ॒मा आपः॒ शमु॑ मे सन्तु दे॒वीरोष॑धे॒ त्राय॑स्व॒ स्वधि॑ते॒ मैनँ॑ हिँसिः ॥ १ ॥


अर्थ - आम्ही पृथ्वीवरील देवयज्ञाचें आधारभूत असें जे स्थान त्याप्रत आलों आहों. त्या ठिकाणी सर्व देव संतोषानेंच स्थित झाले आहेत. ऋग्‌यजुःसाम मंत्रांनी सोमयज्ञ करणारे आम्ही धनाच्या पुष्टीनें व इच्छिलेल्या अन्नानें संतुष्ट होऊं. डोकें भिजविण्याकरितां त्यावर घातलेलीं हीं शुद्ध जलें मला (यजमानाला) सुखकर होवोत. हे कुशा, तूं वस्तऱ्यापासून यजमानाचें रक्षण कर. हे वस्तऱ्या, तूं या यजमानाचा नाश करूं नकोस. ॥ १ ॥

विनियोग - 'आपो अस्मान्' या मंत्रानें स्नान करावें. 'उदिदाभ्यः' या मंत्रानें पाण्यांतून बाहेर निघावे. 'दीक्षातपसोः' या मंत्रानें रेशमी वस्त्र नेसावें.


आपो॑ अ॒स्मान्मा॒तरः॑ शुन्धयन्तु घृ॒तेन॑ नो घृत॒प्वः॒ पुनन्तु ।
विश्वँ॒ हि रि॒प्तं प्र॒वह॑न्ति दे॒वीरुदिदा॑भ्यः॒ शुचि॒रा पूत ए॑मि ।
दी॒क्षा॒त॒पसोस्त॒नूर॑सि॒ तां त्व॑ शि॒वाँ श॒ग्मां परि॑ दधे भ॒द्रं वर्णं॒ पुष्य॑न् ॥ २ ॥


अर्थ - जगाचें निर्माण करणारीं व आईप्रमाणें त्याचे पालन करणारी जलें क्षौर केलेल्या अशा आम्हां यजमनांना क्षौरासंबंधी दोषापासून दूर करोत. तसेंच वाहणाऱ्या जलानें पवित्र करणाऱ्या जलदेवता आम्हाला वाहणाऱ्या जलानें पवित्र करोत, व प्रकाशमान जलें आमचे सर्वच पाप दूर करोत. स्नानानें बाह्यतः व आचमनानें अंतःशुद्ध झालेलों मी जलाचे बाहेर पडतोच. हे रेशमी वस्त्रा, तूं दीक्षणीय इष्टि व उपसद इष्टींचे शरीर आहेस. म्हणजे दीक्षा व तपोभिमानी देवतांना शरीराप्रमाणें तूं आवडणारे आहेस. तुझ्या नेसण्यानें उत्तम कांति वाढविणारा मी दीक्षा व तप यांचे देवतांस शरीराप्रमाणें प्रिय असलेल्या व कोमलत्वानें अत्यंत सुखकारक अशा तुला धारण करतो. ॥ २ ॥

विनियोग - प्राचीनशालेंत पूर्वभागीं दर्भावर उभें राहून हातांत लोणी घेऊन तें 'महिनाम् पयौसि' या मंत्रानें डोक्यापासून पायापावेतों सर्व शरीरास लावावें 'वृतस्य' या मंत्रानें त्रैककुत् पर्वतावरील काजळ डोळ्यांत घालावें. त्रैककुत् पर्वतावरचे काजळ न मिळाल्यास दुसरें कोणतेंही काजळ डोळ्यांत घालावें.


म॒हीनां॒ पयो॑ऽसिवर्चो॒दा अ॑सि॒ वर्चो॑ मे देहि ।
वृ॒त्रस्य॑सो क॒नीन॑कश्चक्षुर्दा अ॑सि॒ चक्षु॑र्मे देहि ॥ ३ ॥


अर्थ - हे नवनीता, तूं गाईचे दुधापासून उत्पन्न झालेलें आहेस. तूं फार स्निग्ध असल्यानें कांतिप्रद आहेस म्हणून मला (यजमानाला) कांति दे. हे कज्जलदेवते, तूं वृत्रासुराच्या डोळ्यांतील काळें बुबुळ आहेस. (इंद्रानें वृत्रासुलाला मारलें त्यावेळी त्याचें बुबुळ गळून पडलें तेंच काजळ झालें असें तैत्तिरीय श्रुतींत आहे). तूं बुबुळ असल्यानें डोळ्याचें तेज वाढविणारे आहेस म्हणून माझी दृष्टि उत्तम कर. ॥ ३ ॥

विनियोग - 'चित्पतिर्मा पुनातु' इत्यदि सात अक्षरांनी कुशपवित्रांनी शुद्धि करावी म्हणजे पाणी शिंपडावे.


चि॒त्पति॑र्मा पुनातु वा॒क्पति॑र्मा पुनातु दे॒वो मा॑ सवि॒ता पु॑ना॒त्वच्छि॑द्रेण॒ पवित्रे॑ण॒ सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑ ।
तस्य॑ ते पवित्रपते प॒वित्र॑पूतस्य॒ यत्का॑मः पु॒ने तच्छ॑केयम् ॥ ४ ॥


अर्थ - मनाची अभिमानिनी ज्ञानाधिपति देवता, वाणीची अभिमानिनी बृहस्पति देवता व अंतर्यामी सविता देवता माझी (यजमानाची) शुद्धि करो. त्यांनी ती शुद्धि छिद्ररहित अशा वायुरूपी अगर आदित्य मंडलरूपी पवित्रानें व सूर्य किरणांनी करावीं. हे पवित्रांनाही पवित्र करणाऱ्या देवा, पवित्रानें शुद्ध झालेल्या या यजमानाचें अभीष्ट पूर्ण होवो, व मी अध्वर्यु ज्या सोमयागाच्या इच्छेनें आत्मशुद्धि करतों त्या सोमयागाचें अनुष्ठान करण्याचें सामर्थ्य मला प्राप्त होवो. ॥ ४ ॥

विनियोग - अध्वर्युनें 'आवो देवासः' या मंत्र यजमानाकडून बोलवावा.


आ वो॑ देवास ईमहे वा॒मं प्र॑य॒त्य॒ध्व॒रे ।
आ वो॑ देवास आ॒शिषो॑ य॒ज्ञिया॑सो हवामहे ॥ ५ ॥


अर्थ - हे देवांनो, आमचा यज्ञ प्रवृत्त झाल्यावर आम्ही तुम्हांकडे स्पृहणीय असें यज्ञफल मागतो. तसेंच हे देवांनो, यज्ञसंबंधी फलें देण्याकरितां आम्ही तुम्हांस बोलावतो. ॥ ५ ॥

विनियोग - 'स्वाहा यज्ञम्' वगैरे तीन मंत्रांनी दोन्ही हाताच्या दोन कनिष्ठिका अंगुली मिटून घ्याव्या व 'स्वाहा वातान्' या मंत्रानें दोन्ही हातांच्या मुठी वळाव्या.


स्वाहा॑ य॒ज्ञं मन॑सः॒ स्वाहो॒रोर॒न्तरि॑क्षा॒त्स्वाहा॒
द्यावा॑पृथि॒वीभ्याँ॒ स्वाहा॒ वाता॒दार॑भे॒ स्वाहा॑ ॥ ६ ॥


अर्थ - माझ्या चित्तानें मी यज्ञाशीं संलग्न होतों तो यज्ञ विस्तीर्ण अशा अंतरिक्षांतील व द्युलोक आणि पृथ्वीलोकांत व्यापून राहिला आहे. वायुप्रसादानें मी यज्ञाचा आरंभ करतो. अशा प्रकारानें यज्ञ सिद्ध झाला आहे. ॥ ६ ॥

विनियोग - यापुढें होमाचे सहा मंत्र आहेत.


आकू॑त्यै प्र॒युजेऽग्नये स्वाहा॑ मेधायै॒ मन॑से॒ऽग्नये॒ स्वाहा॑
दी॒क्षायै॒ तप॑से॒ऽग्नये॒ स्वाहा॑ सर॑स्वत्यै पूष्नेऽग्नये॒ स्वाहा॑ ।
आपो॑ देवीर्बृहतीर्विश्वशम्भुवो॒ द्यावा॑पृथिवी॒ उरो॑ अन्तरिक्ष बृह॒स्पत॑ये ह॒विषा॑ विधेम॒ स्वाहा॑ ॥ ७ ॥


अर्थ - यज्ञ करावा अशी मानसिक इच्छा उत्पन्न करणाऱ्या अग्नीला हे हविर्द्रव्य दिलें जावो. धारणाशक्ति उत्पन्न करणाऱ्या मनाच्या अभिमानी देवतेला हें हविर्द्रव्य दिलें जावो. यज्ञदीक्षेचे नियम सिद्ध होण्याकरितां शरीरस्थ तपोभिमानी देवतेला हें हवि सुहुत असो. मंत्रोच्चारणशक्ति सिद्ध होण्याकरितां वागिंद्रिय-पोषक जो अग्नि त्याला हे हवि सुहुत असो. प्रकाशमान, पुष्कळ व जगाचें कल्याण करणाऱ्या हे जलांनो, हे द्यावा-पृथिवींनो, हे विस्तीर्ण अशा अंतरिक्षा, तुम्हां सर्वांना व बृहस्पतीला मी हवि देतो. ते सुहुत असो. ॥ ७ ॥

विनियोग - 'शर्मासि' या मंत्रानें कृष्णजिनाच्या दक्षिण जानूवर आरोहण करावें.


विश्वो॑ दे॒वस्य॑ ने॒तृर्मर्तो॑ वुरीत स॒ख्यम् ।
विश्वो॑ रा॒य इ॑षुध्यति द्यु॒म्नं वृ॑णीत पु॒ष्यसे॒ स्वाहा॑ ॥ ८ ॥


अर्थ - सर्व मनुष्यें फलदायी व प्रकाशक अशा सवित्याच्या मैत्रीची इच्छा करतात व ते धनाकरितां आणि प्रजापालनानें अन्नाकरितां ज्याची प्रार्थना करतात अशा त्या प्रेरक सूर्याला हें हवि सुहुत असो. ॥ ८ ॥

विनियोग - नंतर 'ऋक्‌सामयोः' या मंत्रानें कृष्णाजिनाच्या काळ्या व पांढऱ्या रेघांना स्पर्श करावा.


ऋ॒क्सा॒मयोः॒ शिल्पे॑ स्थ॒स्ते वा॒मार॑भे॒ ते मा॑ पात॒मास्य य॒ज्ञस्यो॒दृचः॑ ।
शर्मा॑सी॒ शर्म॑ मे यच्छ॒ नम॑स्ते अस्तु॒ मा मा॑ हिँसीः ॥ ९ ॥


अर्थ - हे कृष्णाजिनांवरील काळ्या व पांढऱ्या अशा रेखांनो, तुम्ही ऋग्वेद व सामवेदाच्या अभिमानी देवतांच्या चातुर्यरूपी आहां. तुम्हाला मी स्पर्श करतो. ह्या यज्ञाचा शेवटचा मंत्र संपेपर्यंत तुम्ही माझें रक्षण करा. हे कृष्णाजिना, तूं रक्षण करणारे आहेस म्हणून माझें रक्षण कर. मी तुला नमस्कार करतो. माझी हिंसा करूं नकोस. ॥ ९ ॥

विनियोग - नंतर 'ऊर्गसि' या मंत्रानें मेखलाबंधन करावें तदनंतर 'सोमस्य नीविरसि' या मंत्रानें नीविबंधन करावें. यापुढें 'विष्णोः शर्म' या मंत्रानें डोक्याला वस्त्र गुंडाळावें. त्यापुढें कृष्ण्मृगाचें शृंग वस्त्राचे प्रांतभागीं बांधावें. यज्ञाचे वेळीं खाजवायचें झाल्यास या शृंगानेंच खाजवावें नंतर 'सुसस्याः' या मंत्रानें शृंगानें भूमि खणावी. तदनंतर दंड द्यावा व 'उच्छ्र्यस्व' या मंत्रानें दंड उंच उचलावा.


ऊर्ग॑स्याङ्‍गिर॒स्यूर्ण॑म्म्रदा॒ ऊर्जं॒ मायि॑ धेहि ।
सोम॑स्य नी॒विर॑सि॒ विष्णोः॒ शर्मा॑सि॒ शर्म॒
यज॑मान॒स्येन्द्र॑स्य॒ योनि॑रसि सुस॒स्याः कृ॒षीस्कृ॑धि ।
उच्छ्र॑यस्व वमस्पत ऊ॒र्ध्वो मा॑ पा॒ह्यँह॑स॒ आस्य य॒ज्ञस्यो॒दृचः॑ ॥ १० ॥


अर्थ - हे मेखले, तूं अन्नरूपिणी अंगिरस ऋषीशीं संबंध असलेली व उत्तम कांबळ्याप्रमाणें मऊ आहेस. मला अन्नरस दे. हे मेखले, तूं सोमदेवतेची आवडती ग्रंथी आहेस. हे वस्त्रा, तूं व्यापक अशा यज्ञास सुखकर आहेस म्हणून यजमानाला सुख दे. हे शृंगा, पूर्वीं ज्याप्रमाणें तूं इंद्राचें उत्पत्तिस्थान झालास त्याप्रमाणें आतां या यज्ञाचें उत्पत्तिस्थान हो. हे शृंगा, यजमानाच्या शेतजमिनी धान्यानें युक्त कर. हे वृक्षावयव दंडा, तूं उंच हो व तसा होऊन हा यज्ञाचा शेवटचा मंत्र म्हटला जाईपर्यंत पापापासून माझें रक्षण कर. ॥ १० ॥

विनियोग - नंतर यजमानानें 'व्रतं कृणुत' हा मंत्र म्हटल्यावर मौन धारण करावें. 'दैवींधियं' या मंत्रानें आचमन करावें. 'ये देवा' या मंत्रानें व्रतग्रहण करावें.


व्र॒तं कृ॑णुता॒ग्निर्ब्रह्मा॒ग्निर्य॒ज्ञो वन॒स्पति॑र्य॒ज्ञियः॑ ।
दैवीं॒ धियं॑ मनामहे सुमृडी॒काम॒घिष्ट॑ये
वर्चो॒धां य॒ज्ञवा॑हसँ सुती॒र्था नो॑ अस॒द्वशे॑ ।
ये दे॒वा मनो॑जाता म॒नोयुजो॒ दक्ष॑क्रतव॒स्ते
नो॑ऽवन्तु॒ ते नः॑ पान्तु॒ तेभ्यः॒ स्वाहा॑ ॥ ११ ॥


अर्थ - हे सेवकांनो, गाईचें दूध काढा. हा श्रौत अग्नि वेदत्रयरूपी व यज्ञस्वरूपी आहे. खैराचा वृक्षही यज्ञाचें साधन असल्यानें यज्ञरूपीच आहे. आम्ही आगामी यज्ञाच्या सिद्धिकरितां तदनुष्ठानयोग्य व देवतोद्देशानें प्रवृत्त आणि चांगली सुखकारक तेजोयुक्त व यज्ञसंपादक अशी बुद्धि धारण करूं. अशी ती सुखानें प्राप्त होणारी बुद्धि नेहमीं आमच्या स्वाधीन असो. मनापासून उत्पन्न झालेलीं, मनाशीं युक्त, संकल्पित विषय सिद्ध करणारीं जीं चक्षुरादि इंद्रियें तीं आमच्या यज्ञांतील विघ्नें दूर करून आमचें पालन करोत. त्या इंद्रियदेवतांना हें हवि सुहुत असो. ॥ ११ ॥

विनियोग - 'श्वात्राः पीता' या मंत्रानें नाभीला स्पर्श करावा.


श्वा॒त्राः पी॒ता भ॑वत यू॒यमा॑पो अ॒स्माक॑म॒न्तरु॒दरे॑ सु॒शेवाः॑ ।
ता अ॒स्मभ्य॑मय॒क्ष्मा अ॑नमी॒वा अना॑गसः॒ स्वद॑न्तु दे॒वीर॒मृता॑ ऋता॒वृधः॑ ॥ १२ ॥


अर्थ - हे क्षीररूपी जलांनो, आम्ही पान केल्यावर तुम्ही शीघ्र जीर्ण व्हा. म्हणजे तुमचेंमुळें आम्हांस अजीर्ण न होवो. व तुम्ही आमच्या उदरांत गेल्यावर आम्हाला सुख द्या. महान व लघु अशा, रोगांनी रहित, अपराध हरण करणाऱ्या, यज्ञवृद्धीला कारणीभूत, प्रकाशक व मरण निवृत्त करणारीं जलें आमच्या उपकाराकरितां स्वादिष्ट होवोत. ॥ १२ ॥

विनियोग - मूत्र करण्यापूर्वी 'इयं ते' या मंत्रानें भूमीवरून माती, गवत वगैरे उचलून, 'पृथिव्या संभव' या मंत्रानें हातांत घेतलेल्या मातीच्या ढेकळास मूत्रस्थानी ठेवावें.


इ॒यं ते॑ य॒ज्ञिया॑ त॒नूर॒पो मु॑ञ्चामि॒ न प्र॒जाम् ।
अँ॒हो॒मुचः॒ स्वाहा॑कृताः पृथि॒वीमा वि॑शत पृथि॒व्या सम्भ॑व ॥ १३ ॥


अर्थ - हे यज्ञपुरुषा, हे भूमि, ही माती तुझें यज्ञयोग्य शरीर आहे. मी मूत्ररूपी जल टाकतो. प्रजोत्पत्तिनिमित्तभूत जें रेत त्याचा त्याग करीत नाहीं. पापाला दूर करणाऱ्या, पूर्वी पान केल्यानें मूत्ररूपी बनलेल्या हे जलांनो, तुम्ही पृथ्वींत प्रवेश करा. हे ढेकळा, तूं पृथ्वींत मिळून जा ॥ १३ ॥

विनियोग - 'अग्ने त्वम्' हा मंत्र म्हणून शयन करावें.


अग्ने॒ त्वँ सु जा॑गृहि व॒यँ सु म॑न्दिषीमहि ।
रक्षा॑ णो॒ अप्र॑युच्छन् प्र॒बुधे॑ नः॒ पुन॑स्कृधि ॥ १४ ॥


अर्थ - हे अग्ने तूं चांगल्या तऱ्हेने जागा रहा. आम्ही यजमान सुखानें निजतो. तूं न चुकतां आमचें रक्षण कर व पुनः आम्हाला जागृत कर. । १४ ॥

विनियोग - जागा झालेल्या यजमानाकडून 'पुनर्मनः' हा मंत्र म्हणवून घ्यावा.


पुन॒र्मनः॒ पुन॒रायु॑र्म॒ आऽग॒न् पुनः॑ प्रा॒णः पुन॑रा॒त्मा म॒ आऽग॒न् पुन॒श्चक्षुः॒
पुनः॒ श्रोत्रं॑ म॒ आऽग॑न् । वै॒श्वा॒न॒रो अद॑ब्धस्तनू॒पा अ॒ग्निर्नः॑ पातु दुरि॒ताद॑व॒द्यात् ॥ १५ ॥


अर्थ - माझें (यजमानाचें) मन, आयुष्य, प्राण, जीव, नेत्र व कर्ण हीं सर्व झोपेंत लीन झाली होती. तीं आतां शरीरांत प्राप्त झाली. अशा रीतीनें सर्व इंद्रियें आल्यानंतर सर्वोपकारक अहिंस्य व आमचें शरीर रक्षण करणारा हा अग्नि अपकीर्तिपसून व पापापासून आमचें रक्षण करो. ॥ १५ ॥

विनियोग - राग आल्यास वा व्रतविरुद्ध भाषण केल्यास यजमानानें 'त्वमग्ने' हा मंत्र म्हणावा व यज्ञाचे वेळीं प्राप्त झालेल्या द्रव्याला स्पर्श करून 'रास्वेयत्' हा मंत्र म्हणावा.


त्वम॑ग्ने व्रत॒पा अ॑सि दे॒व आ मर्त्ये॒ष्वा । त्वं य॒ज्ञेष्वीड्यः॑ ।
रास्वेय॑त्सो॒मा भूयो॑ भर दे॒वो नः॑ सवि॒ता वसो॑र्दा॒ता वस्व॑दात् ॥ १६ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं देवांत आणि मनुष्यांत व्रताचे पालन करणारा आहेस. व यज्ञामध्यें स्तुत्य आहेस. हे सोमा, एवढे द्रव्य दे व आणखी आण. कारण यज्ञाची देवता असलेला व धन देणारा सवितादेव आम्हाला पूर्वींही धन देता झाला. ॥ १६ ॥

विनियोग - 'एषा ते' या मंत्रानें ध्रुवापात्रातींल घृत जुहूंत चार वेळां घेऊन त्यांत दर्भांत बांधलेले सोनें घालावें. 'द्युरसि' या मंत्रानें होम करावा.


ए॒षा ते॑ शुक्र त॒नूरे॒तद्वर्च॒स्तया॒ सम्भ॑व॒ भ्राजं॑ गच्छ ।
जूर॑सि धृ॒ता मन॑सा॒ जुष्टा॒ विष्ण॑वे ॥ १७ ॥


अर्थ - हे प्रकाशमान अग्ने, हें घृत तुझें शरीर आहे व त्यांतील सुवर्ण हें तुझें तेज आहे. तर त्या शरीराशीं एक होऊन प्रकाशमान हो. मनानें धारण केलेल्या व यज्ञाला आवडणाऱ्या हे वाणी, तूं वेगयुक्त आहेस. ॥ १७ ॥

विनियोग - 'शुक्रमसि' या मंत्रानें जुहूंतील सोनें वर काढून वेदीवर तृण ठेवावें.


तस्या॑स्ते स॒त्यस॑वसः प्रस॒वे त॒न्वो॒ य॒न्त्रम॑शीय॒ स्वाहा॑ ।
शु॒क्रम॑सि च॒न्द्रम॑स्य॒मृत॑मसि वैश्वदे॒वम॑सि ॥ १८ ॥


अर्थ - अशा त्या अमोघ वाणीच्या प्रेरणेनें मला शरीराची दृढता प्राप्त होवो. हें हविर्द्रव्य सुहुत असो. हे हिरण्या, तूं प्रकाशक, आल्हादक, अविनाशी व सर्वदेव संबंधी आहेस. ॥ १८ ॥

विनियोग - 'चिदसि' इत्यादि दोन मंत्रांनी 'सोमक्रयणी' संज्ञक (जी गाय किंमत म्हणून देऊन विकत घेतात ती गाय) गाईचें अभिमंत्रण करावें.


चिद॑सि म॒नासि॒ धीर॑सि॒ दक्षि॑णासि क्ष॒त्रिया॑सि य॒ज्ञिया॒स्यदि॑तिरस्युभयतःशी॒र्ष्णी ।
सा नः॒ सुप्रा॑ची॒ सुप्र॑तीच्येधि मि॒त्रस्त्वा॑ प॒दि ब॑ध्नीतां पू॒षाऽध्व॑नस्पा॒त्विन्द्रा॒याध्य॑क्षाय ॥ १९ ॥


अर्थ - हे सोमक्रयणी गाई, तूं अंतःकरणाच्या ज्या चित्त, मन व बुद्धि या तीन वृत्ती त्याप्रमाणे आहेस. तसेंच तूं दक्षिणास्वरूपी आहेस. देवांत क्षत्रियरूपी जो सोम तत्स्वरूपी यज्ञार्ह व देवमाता अदितिरूपिणी आहेस. आणि वाणीस्वरूपी असल्यामुळें तूं उभयतः शीर्ष्णी अर्थात सर्वतोमुखी आहेस. अशा तऱ्हेची तूं पूर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख हो. म्हणजे आम्ही सोम विकत घेण्यास जाऊं ते वेळीं पूर्वाभुमुख हो व सोम विकत घेऊन परत फिरल्यावर आमच्या मागें येत असतां तूं पश्चिमाभिमुख हो. आणि सूर्य तुझ्या उजव्या पायाचें बंधन करो. म्हणजे तूं चुकणार नाहींस व सूर्य यज्ञाचा अध्यक्ष जो इंद्र त्याच्या निमित्तानें मार्गापासून तुझें रक्षण करो. ॥ १९ ॥

अनु॑ त्वा मा॒ता म॑न्यता॒मनु॑ पि॒ताऽनु॒ भ्राता॒ सग॒र्भ्योऽनु॒ सखा॒ सयू॑थ्यः ।
सा दे॑वि दे॒वमच्छे॒हीन्द्रा॑य॒ सोमँ रु॒द्रस्त्वा व॑र्त्तयतु स्व॒स्ति सोम॑सखा॒ पुन॒रेहि॑ ॥ २० ॥


अर्थ - सोम आणण्याकरिता प्रवृत्त झलेल्या तुला तुझे आईबाप, सोदरभ्राता, तुझ्याच कळपांत असलेला तुझा मित्र व वत्स हे आज्ञा देवोत. हे सोमक्रयणी देवी, तूं इंद्राकरितां सोम मिळविण्यास जा व सोम विकत घेतल्यावर उभ्या असलेल्या तुला रुद्र आमच्याकडे परत पाठवो. सोम जिचा मित्र आहे अशी तूं सोमासहवर्तमान पुनः आमचेकडे सुखानें ये. ॥ २० ॥

विनियोग - उत्तरेकडे जाणाऱ्या सोमक्रयणीची 'वस्व्यसि' या मंत्रानें स्तुति करावी.


वस्व्य॒स्यदि॑तिरस्यादि॒त्यासि॑ रु॒द्रासि॑ च॒न्द्रासि बृह॒स्पति॑ष्ट्वा
सु॒म्ने र॑म्णातु रु॒द्रो वसु॑भि॒रा च॑क्रे ॥ २१ ॥


अर्थ - हे गाई, तूं वसु, अदिति, आदित्य, रुद्र व चंद्ररूपी आहेस. तुला बृहस्पति सुखानें खेळवो व रुद्र अष्ट वसूंसह तुझें रक्षण करण्याची इच्छा करो. ॥ २१ ॥

विनियोग - गाईच्या सातव्या पावलाच्या स्थली सुवर्ण ठेवून 'अदित्यास्त्वा' या मंत्रानें होम करावा. स्फ्य घेऊन 'अस्मे तमस्व' या मंत्रानें भूमीवर तीन रेघा ओढाव्या. 'अस्मे ते बंधु' या मंत्रानें गोपद उचलून स्थालींत ठेवावें. 'त्वे रायः' या मंत्रानें यजमानाला गोपद समर्पण करावें. 'मे रायः' या मंत्रानें यजमानानें गोपद ग्रहण करावें. 'मा वयं' या मंत्रानें अध्वर्यूनें आपल्या शरीराला स्पर्श करावा. नेष्ट्यानें 'तोतो रायः' या मंत्रानें यजमानपत्नीला गोपद द्यावें.


अदि॑त्यास्त्वा मू॒र्द्धन्नाजि॑घर्मि देव॒यज॑ने पृथि॒व्या इडा॑यास्प॒दम॑सि घृ॒तव॒त् स्वाहा॑ ।
अ॒स्मे र॑मस्वा॒स्मे ते॒ बन्धु॒स्त्वे रायो॒ मे रायो॒ मा व॒यँ रा॒स्पोषे॑ण॒ वियौ॑ष्म॒ तोतो॒ रायः॑ ॥ २२ ॥


अर्थ - हे आज्या, अखण्डित पृथ्वीच्या शिरोरूप देवयजन स्थानामध्यें मी तुझा होम करतों. हे स्थानविशेषा, गाईच्या पदानें चिन्हीत असल्यानें तूं तद्रूपी आहेस. तें पद घृतयुक्त करण्याकरितां मी होम करतो. हे गाईच्या पावला, तूं आमच्यांत रसमाण हो. हे गोपदा, आम्ही तुझे बंधु आहोंत. हे यजमाना, तुझ्या ठायीं धन अथवा पशु असोत. आम्ही धनवृद्धिरहित होऊं नये. यजमानपत्नीचे ठायीं गोपदरूपानें द्रव्य व पशु राहोत. ॥ २२ ॥

विनियोग - सोमक्रयणी गाय जिच्याकडे पाहते अशा यजमानपत्नी कडून 'समख्ये' हा मंत्र म्हणवावा. यजमानपत्नी सोमक्रयणीपासून वर मागून घेते.


सम॑ख्ये दे॒व्या धि॒या सं दक्षिणण्यो॒रुच॑क्षसा ।
मा म॒ आयुः॒ प्रमो॑षी॒र्मो अ॒हं तव॑ वी॒रं वि॑देय॒ तव॑ देवि स॒न्दृशि॑ ॥ २३ ॥


अर्थ - हे सोमक्रयणी, प्रकाशमान, दक्षिणेस योग्य व विस्तीर्ण दर्शन करणारी अशा त्वां मजकडे बुद्धिपूर्वक पाहिलेंस. तूं माझें आयुष्य खण्डित करूं नकोस. मीही तुझें आयुष्य खण्डित करणार नाहीं. आणि हे देवी, तुझी कृपादृष्टी असल्यावर मला वीरपुत्र होईल. ॥ २३ ॥

विनियोग - यजमानाकडून 'एष ते' इत्यादि चार मंत्र म्हणवावेत. 'आस्माकोऽसि' या मंत्रानें सोमाला स्पर्श करावा.


ए॒ष ते॑ गाय॒त्रो भा॒ग इति॑ मे॒ सोमा॑य ब्रूतादे॒ष ते॒ त्रैष्टु॑भो भा॒ग इति॑
मे॒ सोमा॑य ब्रूतादे॒ष ते॒ जाग॑तो भा॒ग इति॑ मे॒ सोमा॑य ब्रूताच्छन्दोना॒मानाँ॒
साम्रा॑ज्यं ग॒च्छेति॑ मे॒ सोमा॑य ब्रूतादास्मा॒को॒ऽसि शु॒क्रस्ते॒ ग्रह्यो॑ वि॒चित॑स्त्वा॒ वि चि॑न्वन्तु ॥ २४ ॥


अर्थ - हे अध्वर्यो, तूं सोमाला असें सांग कीं हे सोमा, तुझा अंश गायत्रीकरितां आहे, व्यर्थ नाश करण्याकरितां नाहीं. तसेंच हा दुसरा अंश त्रिष्टुप् छंदाकरितां, तिसरा जगती छंदाकरितां व चौथा उष्णिगादि छंदाकरितां आहे. त्या सर्व छंदांचे आधिपत्य तूं प्राप्त कर. हे अध्वर्यो, हें सर्व तूं सोमाला सांग. हे सोमा, आम्हीं विकत घेतल्यानें तूं आमचा झालास. शुक्रपात्र तुझें स्थान आहे. विवेकपूर्वक ग्रहण करणारे सारासारविवेक पूर्वक तुझें ग्रहण करोत. ॥ २४ ॥

विनियोग - सोम बांधण्याकरितां दुहेरी व चोहेरी दोरी पसरावी. व त्यावर दहा वेळां 'अभित्यं' या मंत्रानें सोम मोजून घ्यावा. 'प्रजाभ्यस्त्वा' या मंत्रानें पागोट्यानें सोमाला बांधावें. नंतर पागोट्यानें बांधलेल्या सोमाचा श्वास बंद होऊं नये म्हणून 'प्रजास्त्वा' या मंत्रानें सोमाच्या मध्यभागी थोडी जागा अंगुलीनें मोकळी करावी (थोडें छिद्र पाडावें).


अ॒भि त्यं दे॒वँ स॑वि॒तार॑मो॒ण्योः॒ क॒विक्र॑तु॒मर्चा॑मि स॒त्यस॑वँ रत्न॒धाम॒भि प्रि॒यं म॒तिं क॒विम् ।
ऊ॒र्ध्वा यस्या॒मति॒र्भा अदि॑द्युत॒त्सवी॑मनि॒ हिर॑ण्यपाणिरमिनीत सु॒क्रतुः॑ कृ॒पा स्वः॑ ।
प्र॒जाभ्य॑स्त्वा प्र॒जास्त्वा॑ ऽनु॒प्राण॑न्तु प्र॒जास्त्वम॑नु॒प्राणि॑हि ॥ २५ ॥


अर्थ - द्यावापृथ्वींत असणारा, बुद्धिमत्तेचीं कार्यें करणारा, अमोघ प्रेरणा करणारा, रत्न देणारा, सर्वथा प्रेम ठेवण्यास योग्य, मनन करण्यास योग्य व पूर्वीं घडलेलें सर्व पाहणारा असा जो सविता देव त्याची मी पूजा करतो. ज्या सवित्याची अपरिमेय कांति गगनाभिमुख झाली असतां नक्षत्रविशिष्ट आकाशांतील सर्व वस्तूंना प्रकाशित करते, सोम्याचे दागिने ज्याच्या हातांत आहेत व उत्तम संकल्प करणाऱ्या अशा त्या सूर्यानें कल्पनेनें सोमाला मोजलें. हे सोमा, प्रजांवर उपकाराकरितां मी तुला बांधतो. हे सोमा, श्वासोच्छ्वास केल्यावर सर्व प्रजा श्वासोच्छ्वास करोत व प्रजेच्या श्वासोच्छ्वासानंतर तूं श्वास घे. तात्पर्य, प्रजा व तूं एकमेकांच्या धोरणानें श्वासोच्छ्वास करा. ॥ २५ ॥

विनियोग - सुवर्णाला स्पर्श करून 'शुक्रं त्वा' हा मंत्र म्हणवावा. सोनें घेऊन सोम विकणाऱ्याच्या हातांत पुनः पुनः सोनें देऊन काढून घ्यावें व 'सग्मे ते' या मंत्रानें त्याला निराश करावा. 'अस्मे ते' या मंत्रानें पुनः गाय सोम विकणाऱ्या पुढें ठेवावी. अजेला (मेंढीला) स्पर्श करून 'तपसस्तनूः' हा मंत्र म्हणवावा.


शु॒क्रं त्वा॑ शु॒क्रेण॑ क्रीणामि च॒न्द्रं च॒न्द्रेणा॒मृत॑म॒मृते॑न ।
स॒ग्मे ते गोर॒स्मे ते॑ च॒न्द्रणि॒ तप॑सस्त॒नूर॑सि प्र॒जाप॑ते॒र्वर्णः॑
पर॒मेण॑ क्रीयसे सहस्रपो॒षः पु॑षेयम् ॥ २६ ॥


अर्थ - हे सोमा, दीप्यमान, आल्हादक व अविनाशी अशा तुला मी दीप्यमान, आल्हादक व अविनाशी सुवर्णानें विकत घेतो. हे सोम विकणाऱ्या, सोमाचें मूल्य म्हणून दिलेली गाय यजमानाकडे परत येवो व हें सोनें मात्र तुजकडे राहो. हे सोम विकणाऱ्या, तूं गायच घे व आम्ही दिलेले सोनें आम्हाला परत दे. हे अजे, तूं तपाचें व प्रजापतीचें शरीर आहेस. हे सोमा, उत्तम अजासंज्ञक पशु देऊन मी तुला विकत घेतलें आहे. तुझ्या प्रसादानें पुत्रपशु वगैरेंनी माझी वृद्धि होवो. ॥ २६ ॥

विनियोग - डाव्या हातानें अजा देऊन उजव्या हातानें सोम घेतांना 'मित्रो नः' हा मंत्र म्हणावा. 'इंद्रस्योरुम्' या मंत्रानें यजमानाच्या उजव्या मांडीवर वस्त्र पसरून त्यावर सोम ठेवावा. सोम विकणाऱ्याकडे पाहून 'स्वान भ्राज' हा मंत्र म्हणावा.


मि॒त्रो न॒ एहि॒ सुमि॑त्रध॒ इन्द्र॑स्यो॒रुमा वि॑श॒ दक्षि॑ण मु॒शन्नु॒शन्तँ॑ स्यो॒नः स्यो॒नम् ।
स्वान॒ भ्राजाङ्‍घा॑रे॒ बम्भा॑रे॒ हस्त॒ सुह॑स्त॒ कृशा॑नवे॒ते वः॑ सोम॒क्रय॑णा॒स्तान्‍र॑क्षध्वं॒ मा वो॑ दभन् ॥ २७ ॥


अर्थ - हे सोमा, रविरूपी व उत्तम मित्र धारण करणारा असा तूं आम्हांकडे ये. हे सोमा, स्पृहणीय व सुखकारक असा तूं तुझी इच्छा करणाऱ्या व सुखकारक अशा यजमानाच्या उजव्या मांडीवर बैस. १. स्वान (शब्द करणारा) २. भ्राज (देदीप्यमान) ३. अङ्घारि (पापनाशक) ४. बम्भारि (विश्वपोषक) ५. हस्त (सर्व आनंदी) ६. सुहस्त (चांगल्या हाताचा) ७. कृशानु (दुर्बलांचा पोषक) हे सात सोमाचे रक्षण करणारे देव आहेत. हे स्वानादि सप्त देवांनो, सोम विकत घेण्याकरितां आणलेले सुवर्णादि पदार्थ तुमच्यापुढें ठेवले आहेत. त्यांचे रक्षण करा. वैरी तुमची हिंसा न करोत. ॥ २७ ॥

विनियोग - सोम घेतलेल्या यजमानाकडून 'परिमाग्ने' हा मंत्र म्हणवावा.

परि॑ माऽग्ने॒ दुश्च॑रिताद्‍बाध॒स्वा मा॒ सुच॑रिते भज ।
उदायु॑षा स्वा॒युषोद॑स्थाम॒मृताँ॒२ अनु॑ ॥ २८ ॥


अर्थ - हे अग्ने, पापापासून माझें निवारण कर व पुण्यकर्मांत माझी स्थापना कर. पुष्कळ व यागादि योग्य आयुष्य प्राप्त व्हावें म्हणून सोमादि देवांना अनुलक्षून मी उठलों आहे. ॥ २८ ॥

विनियोग - डोक्यावर सोम घेऊन 'प्रतिपन्थाम्' या मंत्रानें शकटाकडे जावें.


प्रति॒ पन्था॑मपद्महि स्वस्ति॒गाम॑ने॒हस॑म् ।
येन॒ विश्वाः॒ परि॒ द्विषो॑ वृ॒णाक्ति॑ वि॒न्दते॒ वसु॑ ॥ २९ ॥


अर्थ - आम्ही सुखानें प्राप्य , चोरादिरहित अशा व ज्या मार्गानें गेलेला मनुष्य सर्व चोरादिकांचा संबंध सोडतो व द्रव्य मिळवितो त्या मार्गाला प्राप्त झालों आहोंत. ॥ २९ ॥

विनियोग - शकटांत कृष्णमृगाजिन 'अदित्यास्त्वगसि' या मंत्रानें अंथरावें. 'अदित्यै सदः' या मंत्रानें कृष्णाजिनावर सोम ठेवावा. सोमाला स्पर्श करून 'अस्तभ्नात्' या मंत्राचा उच्चार करवावा.


अदित्य॒स्त्वग॒स्य दि॑त्यै॒ सद॒ आसी॑द ।
अस्त॑भ्ना॒द्द्यां वृ॑ष॒भो अ॒न्तरि॑क्ष॒ममि॑मीत वरि॒माणं॑ पृथि॒व्याः ।
आऽसी॑द॒द्विश्वा॒ भुव॑नानि स॒म्राड्‍विश्वेत्तनि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ ॥ ३० ॥


अर्थ - हे कृष्णाजिना, तूं अखण्डित अशा पृथिवीची त्वचा आहेस. हे सोमा, तूं पृथ्वीच्या या स्थानावर बैस. श्रेष्ठ वरुण द्युलोक व अंतरिक्ष पडूं नये म्हणून अडवून ठेवता झाला व तो पृथ्वीचा मोठेपणा जाणतो. तसेंच उत्तम शोभणारा असा तो वरुण सर्वच भुवनांना व्याप्त करतो. द्युलोकस्तंभनादिक हीं सर्व वरुणाची नियमित कार्यें आहेत. ॥ ३० ॥

विनियोग - 'वनेषु व्यन्तरिक्षं' या मंत्रानें वस्त्रानें सगळीकडून सोमास बांधावें.


वने॑षु॒ व्यन्तरि॑क्षं ततान॒ वाज॒मर्व॑त्सु॒ पय॑ उ॒स्रिया॑सु ।
हृ॒त्सु क्रतुं॒ वरु॑णो वि॒क्ष्वग्निं दि॒वि सूर्य॑मदधा॒त् सोम॒मद्रौ॑ ॥ ३१ ॥


अर्थ - वरुणानें वनांत झाडांवर आकाश पसरलें. तसेंच त्यानें घोड्यांत शक्ति, गाईंत दूध, हृदयांत संकल्पशक्तियुक्त मन, प्रजेंत जठराग्नि, द्युलोकांत सूर्य व पर्वतावर सोमवल्ली स्थापन केली. ॥ ३१ ॥

विनियोग - सोमाचें चिन्ह म्हणून 'सूर्यस्य चक्षुः' या मंत्रानें कृष्णाजिन पुढें ठेवावें.


सूर्य॑स्य॒ चक्षु॒रारो॑हा॒ग्नेर॒क्ष्णः क॒नीन॑कम् ।
यत्रैत॑शेभि॒रीय॑से॒ भ्रज॑मानो विप॒श्चिता॑ ॥ ३२ ॥


अर्थ - हे कृष्णाजिना, तूं सूर्याच्या नेत्रावर व अग्नीच्या डोळ्याच्या बाहुलीवर आरोहण कर. ज्या स्थानामध्यें सर्वज्ञ अशा सूर्य व अग्नीनें प्रकाशित होऊन घोड्याकडून तूं वहन केला जाशील. ॥ ३२ ॥

विनियोग - 'उस्रावेतम्' या मंत्रानें गाडीला दोन बैल जोडावे.


उस्रा॒वेतं॑ धूर्षाहौ यु॒ज्येथा॑मन॒श्रू अवी॑रहणौअ ब्रह्म॒चोद॑नौ ।
स्व॒स्ति यज॑मानस्य गृ॒हान् ग॑च्छतम् ॥ ३३ ॥


अर्थ - जोकड धारण करण्यास समर्थ, अश्रुरहित (उत्साही) रस्त्यांत शिशु वगैरेंची हिंसा न करणाऱ्या व ब्राह्मणांना यशाची प्रेरणा करणाऱ्या अशा हे दोन बैलांनो, तुम्ही या व स्वतः शकटास जोडले जा आणि सुखानें यजमानाच्या घरीं जा ॥ ३३ ॥

विनियोग - 'भद्रो मे' असें यजमानाकडून म्हणवावें.


भ॒द्रो मे॑ऽसि॒ प्रच्य॑वस्य भुवस्पते॒ विश्वा॑न्य॒भि धामा॑नि ।
मा त्वा॑ परिप॒रिणो॑ विद॒न् मा त्वा॑ परिप॒न्थिनो॑ विद॒न् मा त्वा॒ वृका॑ अघा॒यवो॑ विदन् ।
श्ये॒नो भू॒त्वा परा॑ पत॒ यज॑मानस्य गृ॒हान् ग॑च्छ॒ तन्नौ॑ सँस्कृ॒तम् ॥ ३४ ॥


अर्थ - हे सोमा, मज यजमानाच्या कल्याणाकरितां तूं कल्याणकारक रूप धारण केलेंस. हे अध्वर्यु वगैरेंच्या पालन करणाऱ्या पत्नीशाला, हविर्धान वगैरे सर्व स्थानांप्रत तूं गमन कर. सर्वत्र गमन करणारे व यज्ञांत विघ्न करणारे चोर आणि दुसऱ्याच्या वाईटावर असलेले रानांतील कुत्रे अगर दुर्जन तुला न जाणोत. म्हणजे त्यांचे टप्प्यांत तूं न येवो. आणखी तूं श्येनपक्ष्याप्रमाणें शीघ्रगामी होऊन यजमानाच्या घरी जा. तेथें आपणाकरितां सर्व सामग्रीयुक्त स्थान तयार केलें आहे. ॥ ३४ ॥

विनियोग - यज्ञशालेच्या पूर्वभागी प्रतिप्रस्थाता अग्निषोमीय पशु घेऊन उभा असतो. त्याला स्पर्श करून 'नमो मित्रस्य' हा मंत्र म्हणवावा.


नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तँ स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शँसत ॥ ३५ ॥


अर्थ - सर्व जगाचा द्रष्टा, तेजोरूपी, प्रकाशक, सर्व जग ज्याला दुरूनच पहातें असा, देवांवर अनुग्रह करण्याकरितां उत्पन्न झालेला, विज्ञानघन, द्युलोकाला पुत्रा सारखा आवडता असा जो सूर्य त्याला नमस्कार. हे ऋत्विजांनो, तुम्ही त्या सूर्याचें ह्या यज्ञानुष्ठानानें सेवन करा व त्याची स्तुति करा. ॥ ३५ ॥

विनियोग - गाडी उभी करण्याकरितां उपयोगी पडणाऱ्या काष्ठावर ' वरुणस्योत्तम्भनम्' या मंत्रानें गाडी ठेवावी. 'वरुणस्य स्कम्भसर्जनी' या मंत्रानें शम्या (शिवळा) वर काढून घ्यावा. उंबराच्या घडवंचीवर सोम ठेवावा व 'वरुणस्य ऋतसदन्यसि' या मंत्रानें तिला स्पर्श करावा. 'वरुणस्य ऋतसदनमसि' या मंत्रानें सोम ठेवावा.


वरु॑णस्यो॒त्तम्भ॑नमसि॒ वरु॑णस्य स्कम्भ॒सर्ज॑नी स्थो॒
वरु॑णस्य ऋअत॒सद॑न्यसि॒ वरु॑णस्य ऋत॒सद॑नमसि॒
वरु॑णस्य ऋत॒सद॑न॒मा सी॑द ॥ ३६ ॥


अर्थ - हे काष्ठा, तूं सोमाला उंच करणारें आहेस. हे शम्यांनो, तुम्ही वस्त्रांत बांधलेल्या सोमाला आडविणाऱ्या म्हणजे इकडे तिकडे जाऊं न देणाऱ्या आहां. हे आसंदि (घडवंची), तूं सोमाची यज्ञांतील बसण्याची जागा आहेस. हे कृष्णाजिना, तूं यज्ञांतील सोमाचें स्थान आहेस. हे सोमा, तूं यज्ञांतील तुझें आसन जें कृष्णाजिन त्यावर सुखानें बैस. ॥ ३६ ॥

विनियोग - 'या ते' हा मंत्र यजमानाकडून म्हणवावा.


याते॒ धामा॑नि ह॒विषा॒ यज॑न्ति॒ ता ते॒ विश्वा॑ परि॒भूर॑स्तु य॒ज्ञम् ।
ग॒य॒स्फानः॑ प्र॒तर॑णः सु॒वीरोऽवी॑रहा॒ प्र च॑रा सोम॒ दुर्या॑न् ॥ ३७ ॥


अर्थ - हे सोमा, तुझ्या प्रातःसवनादि स्थानांप्रत प्राप्त होऊन तुझ्या रसरूपी हविर्द्रव्यानें ऋत्विक् याग करतात. ऋत्विज् ज्या ज्या स्थानांवर याग करतील तेथें तेथें तूं प्राप्त हो. आणखी हे सोमा, गृह वाढविणारा, आपत्ति दूर करणारा, पुत्रपौत्र देणारा व त्यांचे पालन करणारा (नाश न करणारा) असा तूं गृहांप्रत प्राप्त हो. ॥ ३७ ॥

॥ इति चतुर्थोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP