शुक्ल यजुर्वेद
पञ्चमोऽध्यायःविनियोग - चतुर्थ अध्यायांत ऋत्विजांसहवर्तमान यजमानाच्या शालाप्रवेशापासून सोम विकत घेऊन त्याचा शालेंत प्रवेश करीपर्यंतचे मंत्र आलेले आहेत. आतां पाचव्या अध्यायांत अतिथ्येष्टींतील हविर्ग्रहणादिकांचे मंत्र सांगतात. अतिथ्येष्टींत 'अग्नेस्तनूः' इत्यादि पांच मंत्रांनी पांच वेळां हविर्ग्रहण करावें.


अ॒ग्नेस्त॒नूर॑सि॒ विष्ण॑वे त्वा॒ सोम॑स्य त॒नूर॑सि॒ विष्ण॑वे॒ त्वा ऽति॑थेराति॒थ्यम॑सि॒
विष्ण॑वे त्वा श्ये॒नाय॑ त्वा सोम॒भृते॒ विष्ण॑वे त्वा॒ऽग्नये॑ त्वा रायस्पोष॒दे विष्ण॑वे त्वा ॥ १ ॥


अर्थ - हे हविर्द्रव्या, तूं अग्नीचें शरीर आहेस. सर्व यज्ञव्यापी सोमाच्या संतोषाकरितां तुझें मी ग्रहण करतो. तूं सोम नांवाच्या सोमराजाच्या भृत्याचें शरीर आहेस. सर्व यज्ञव्यापी सोमाच्या संतोषाकरितां तुझें मी ग्रहण करतो. अतिथि नांवाचा जो सोमाचा सेवक त्याचें तूं आतिथ्य आहेस. सर्वव्यापी सोमाच्या संतोषाकरितां तुझें मी ग्रहण करतो. स्वर्गांतून सोम आणणाऱ्या सर्वव्यापी श्येनसंज्ञक सोमसेवकाच्या संतोषाकरितां तुझें मी ग्रहण करतो. तूं सर्वव्यापी सोमाचे संतोषाकरितां आहेस. ॥ १ ॥

विनियोग - 'अग्नेर्जनित्रं' या मंत्रानेंअग्निमन्थनाचें शकल घेऊन वेदीवर ठेवावें 'वृषणौ' या मंत्रानें दोन दर्भ शकलावर ठेवावे. 'उर्वश्यसि' या मंत्रानें दर्भावर अधरारणी ठेवावी. 'आयुरसि' या मंत्रानें उत्तरारणीनें आज्यस्थालीला स्पर्श करावा. 'पुरूरवा असि' या मंत्रानें अधरारणीवर उत्तरारणी स्थापन करावी. गायत्रेण इत्यादि तीन मंत्रांनी अरणी-मंथन करावें.


अ॒ग्नेर्ज॒नित्र॑नमसि॒ वृष॑णौ स्थ उ॒र्वश्य॑स्या॒युर॑सि पुरू॒रवा॑ असि ।
गा॒य॒त्रेण॑ त्वा॒ छन्द॑सा मन्थामि॒ त्रैष्टु॑भेन त्व॒ छन्द॑सा मन्थामि॒ जग॑तेन त्वा॒ छन्द॑सा मन्थामि ॥ २ ॥


अर्थ - हे शकला, तूं अग्नीच्या उत्पत्तीचे आधारस्थान आहेस. हे दर्भांनो, तुम्ही अरणींत अग्नि उत्पन्न करण्यास समर्थ आहां. हे अधरारणे, तूं पुरूरव्याच्या उर्वशी प्रमाणें अधोभागी राहणारी आहेस. हे स्थालींतील घृता, तूं उत्पन्न होणाऱ्या अग्नीला आयुष्य देणारें आहेस. हे उत्तरारणे, तूं पुरूरव्याप्रमाणें अधरारणीच्या वर आहेस. हे अग्नि १. गायत्री, २. त्रिष्टुभ् व ३. जगती छंदाच्या अधिष्ठातृ देवतांच्या योगानें तुझें मी मंथन करतो. ॥ २ ॥

विनियोग - 'भवतं नः' या मंत्रानें मंथनोत्पन्न अग्नि आहवनीयांत स्थापन करावा.


भव॑तं नः॒ सम॑नसौ॒ सचे॑तसावरे॒पसौ॑ ।
मा य॒ज्ञँहिँ॑सिष्टं॒ मा य॒ज्ञप॑तिं जातवेदसौ शि॒वौ भ॑वतम॒द्य नः॑ ॥ ३ ॥


अर्थ - हे निर्मथ्याहवनीयरूपी अग्निदेवतांनो, तुम्ही आमच्यावर एक चित्तानें अनुग्रह करा. तसेंच आम्हीं अपराध केला तरी तुम्ही आमच्यावर रागावूं नका. आमच्या यज्ञकर्माची व यजमानाची हिंसा करू नका. तसेंच आज (अनुष्टानाचे दिवशी) आमचें कल्याण करा. ॥ ३ ॥

विनियोग - 'अग्नावग्निः' या मंत्रानें स्थालींतूल स्रुव्यानें होम करावा.


अ॒ग्नाव॒ग्निश्च॑रति॒ प्रवि॑ष्ट॒ ऋषी॑णां पुत्रो अ॑भिशस्ति॒पावा॑ ।
स नः॑ स्यो॒नः सु॒यजा॑ यजे॒ह दे॒वेभ्यो हव्यँ सद॒मप्र॑युच्छ॒न्त्स्वाहा॑ ॥ ४ ॥


अर्थ - मथ्यमान अग्नि आहवनीयांत प्रविष्ट होऊन हविर्द्रव्य भक्षण करतो. तो अग्नि ऋषितुल्य ऋत्विजांच्या पुत्रासारखा आहे. तसेंच तो यज्ञवैकल्यनिमित्त प्रत्यवायापासून रक्षण करणारा आहे. अशा हे अग्ने, तूं आमच्याकरितां सुखकर हो व देवाशीं उत्तम रीतीनें युक्त होऊन या यज्ञस्थानांत आम्हीं इंद्रादिकांना दिलेले हविर्द्रव्य त्यांच्याकडे न चुकतां पोंचव. हें घृत तुल सुहुत असो. ॥ ४ ॥

विनियोग - 'आपतये त्वा' या मंत्रानें व्रतपात्रांत ध्रुवास्थ आज्य दोन एळां स्थालींतून स्रुव्यानें ग्रहण करावें.


आप॑तये त्वा॒ परि॑पतये गृह्णामि॒ तनूनप्त्रे॑ शाक्व॒राय॒ शक्व॑न ओजि॑ष्ठाय ।
अना॑धृष्टमस्यनाधृ॒ष्यं देवाना॒मोजोऽन॑भिशस्त्यभिसस्ति॒पा
अ॑नभिशस्ते॒न्यमञ्ज॑सा स॒त्यमुप॑गेषँ स्वि॒ते मा॑ धाः ॥ ५ ॥


अर्थ - हे आज्या, तुला मी सर्वव्यापी वायूकरितां ग्रहण करतो. तो वायु सर्वव्यापी विश्वोत्पादकाचा नातू आकाशाचा पुत्र सर्व करण्यास समर्थ व बलवान आहे. हे आज्या, आतांपावेतों कोणी तुझा तिरस्कार केला नाहीं व पुढेंही कोणी करणार नाहीं. तूं देवांचे अनिंद्य तेज असून ऋत्विजांना परस्परनिंदेपासून परावृत्त करणारें व अनिंद्य अशा स्वर्गाप्रत नेणारें आहेस. हे आज्या, मी सरळ मनानें तुझी शपथ घेतों. तूं मला चांगल्या यज्ञकर्मांत स्थापन कर. ॥ ५ ॥

विनियोग - 'अग्ने व्रतपा' या मंत्रानें आहवनीय अग्नींत समिधेचा होम करावा.


अग्ने॑ व्रतपा॒स्व्ते व्र॑तपा॒ या तव॑ त॒नू॒रीयँ सा मयि॒ यो मम॑ त॒नूरे॒शा सा त्वयि॑ ।
स॒ह नौ॑ व्रतपते व्र॒तान्यन्यु॑ मे दीक्षां दीक्षाप॑ति॒र्मन्य॑ता॒मनु॒ तप॒स्तप॑स्पतिः ॥ ६ ॥


अर्थ - हे व्रतपालन करणाऱ्या अग्ने, तूं माझ्या यज्ञाचा पालक आहेस. तुझें शरीर माझे ठायीं प्राप्त होवो व माझें शरीर तुझ्या शरीरांत प्रविष्ट होवो. असें झालें म्हणजे व्रतपालन करणाऱ्या हे अग्ने, आपणा दोघांची (अग्नियजमानांची कार्यें एकदमच चालू होवोत. व्रतांविषयीं जितका माझा आदर आहे तितकाच तुझाही असो व दीक्षेचा पालक आणि तपाचा पालक जो सोम तो माझी दीक्षा व तप मान्य करो. ॥ ६ ॥

विनियोग - 'अँशुः' या मंत्रानें सोमवृद्धि करावी. 'एष्टा रायः' या मंत्रानें सोम पाट्यावर ठेवून झांकावा.


अँ॒शुरँ॑शुष्टे देव सो॒माप्य॑यता॒मिद्रा॑यैकधन॒विदे॑ ।
आ तुभ्य॒मिन्द्रः॒ प्याय॑ता॒मा त्वमिन्द्रा॑य प्यायस्व ।
आप्या॑यया॒स्मान्त्स्वखी॑न्त्स॒न्या मे॒धया॑ स्व॒स्ति ते॑ देव सोम सु॒त्याम॑शीय ।
एश्टा॒ रायः॒ प्रेषे भगाय ऋ॒तुमृ॑तवा॒दिभ्यो॒ नमो॒ द्यावा॑पृथि॒वीभ्या॑म् ॥ ७ ॥


अर्थ - हे सोमा, तुझे सर्व अवयव सोमरूपी मुख्य धनाला जाणणाऱ्या इंद्राकरितां वाढोत. तुझ्या पानाकरितां इंद्र वाढो. व त्याच्या पानाकरितां तूंही वाढ. हे सोमा, तुझे मित्र जे आम्ही ऋत्विज त्यांना धन व बुद्धि देऊन वाढव. हे सोमा, तुझें कल्याण असो. तुझ्या कृपेनें आम्ही तुझें कंडण करूं. सर्व धनें आम्हाला इष्ट आहेत. हे सोमा, तूं पाठविलेल्या ऐश्वर्याकरितां आम्हांला द्रव्य मिळो. तूं सत्यवादी अग्निहोत्याकरितां अमोघ फलात्मक कर्म संपादन कर. द्यावापृथिवींच्या अभिमानी देवतांना नमस्कार असो. ॥ ७ ॥

विनियोग - 'या ते' या मंत्रानें स्रुव्यानें उपसद्धोम करावा.


या ते॑ अग्नेऽयःश॒या त॒नूर्वर्षि॑ष्टा गह्वरे॑ष्ठाआ ।
उ॒ग्रं वचो॒ अपावधीत्त्वे॒षं वचो॒ अपावधी॒त्स्वाहा॑ ।
या ते॑ रजःश॒या त॒नूर्वर्षि॑ष्टा गह्वरे॑ष्ठाआ ।
उ॒ग्रं वचो॒ अपावधीत्त्वे॒षं वचो॒ अपावधी॒त्स्वाहा॑ ।
या ते॑ हरिश॒या त॒नूर्वर्षि॑ष्टा गह्वरे॑ष्ठा ।
उ॒ग्रं वचो॒ अपावधीत्त्वे॒षं वचो॒ अपावधी॒त्स्वाहा॑ ॥ ८ ॥


अर्थ - (लोहमय, रजतमय व सुवर्णमय अशी अग्नीची तीन शरीरें आहेत.) हे अग्ने, देवांना आवडणाऱ्या फलांची वृष्टि करणारे व असुरांच्या विषम प्रदेशांत राहणारे जे तुझे लोहमय शरीर आहे त्या शरीरानें तीव्र व देवनिंदक राक्षसवाक्य नष्ट केलें अशा लोहमय शरीराच्या अग्नीला हें हवि सुहुत असो. तसेंच हे अग्ने, पूर्वोक्त गुणांनी विशिष्ट असे तुझे रजतमय व सुवर्णमय शरीर पूर्वोक्त तीव्र व उग्रवाक्य नष्ट करते झालें त्या तुला हे हवि सुहुत असो. ॥ ८ ॥

विनियोग - 'तप्तायनी' इत्यादि चार मंत्रांनी स्फ्यानें चार रेघा चात्वालावर ओढाव्या. 'विदेदग्निः' या मंत्रानें चात्वालावरील मृत्तिका खणावी. 'अग्ने अंगिरः' या मंत्रानें खणलेल्या मातीवर प्रहार करावा. 'योस्याम् या मंत्रानें उत्तर वेदीवर माती टाकावी. अशीच क्रिया पुनः दोन वेळां करावी. 'अनुत्वा' या मंत्रानें चतुर्थ वेळी आहरण प्रक्षेपण करावे.


त॒प्ताय॑नी मेऽसि वि॒त्ताय॑नी मे॒ऽस्यव॑तान्मा नाथि॒तादव॑तान्मा व्यथि॒तात् ।
वि॒देद॒ग्निर्मभो॒ नामा ऽग्ने॑ अङ्‍गिर॒ आयु॑ना॒ नाम्नेहि॒ योऽस्यां पृ॑थि॒व्यामसि॒ यत्तेऽना॑धृष्टं॒
नाम॑ य॒ज्ञियं॒ तेन॒ त्वा द॑धे वि॒देद॒ग्निर्नभो॒ नामा ऽग्ने॑ अङ्‍गिर॒ आयु॑ना॒ नाम्नेहि॒ यो द्वि॒तीय॑स्यां
पृथि॒व्यामसि॒ यत्तेऽना॑धृष्टं॒ नाम य॒ज्ञियं॒ ते॒न त्वा द॑धे वि॒देद॒ग्निर्नभो॒ नामा ऽग्ने॑ अङ्‍गिर॒ आयु॑ना॒
नाम्नेहि॒ यस्तृ॒तीय॑स्यां पृथि॒व्यामसि॒ यत्तेऽना॑धृष्टं॒ नाम॑ य॒ज्ञियं॒ तेन॒ त्वा द॑धे । अनु॑ त्वा दे॒ववी॑तये ॥ ९ ॥


अर्थ - हे पृथ्वी, तूं माझ्यावर अनुग्रह करून क्षेत्र नसल्याबद्दलचा माझा शोक दूर कर. मला वित्त देणारी हो, व भिक्षेपासून आणि स्थानभ्रंशापासून माझें रक्षण कर. हे मृत्तिके, नभोनामक अग्नि तुला जाणो. हे गतिमान् अग्ने, तूं आयु या नांवानें संबोधिला गेल्यावर ये. हे अग्ने, तूं या पृथ्वीवर राहतोस. तुझें यज्ञयोग्य व अतिरस्कृत अग्नि असें जें नांव आहे त्यायोगें मी तुझे स्थापन करतो. हे मृत्तिके, नभोनामक अग्नि तुला जाणो. हे गतिमान् अग्ने, तूं आयु या नांवानें संबोधिला गेल्यावर ये. हे अग्ने, तूं या अंतरिक्षावर राहतोस. तुझें यज्ञयोग्य व अतिरस्कृत अग्नि असे जे तुझे नांव आहे त्यायोगें मी तुझें स्थापन करतो. हे मृत्तिके, नभोनामक अग्नि तुला जाणो. हे अग्ने, तूं आयु या नांवानें संबोधिला गेल्यावर ये. हे अग्ने, तूं द्युलोकारवर राहतोस. तुझें यज्ञयोग्य व अतिरस्कृत अग्नि असे जे तुझे नांव आहे त्यायोगें मी तुझें स्थापन करतो. हे मृत्तिके, देवांचे संतोषाकरितां मी तुझे पूर्वीप्रमाणेंच आहरण करतो. ॥ ९ ॥

विनियोग - 'सिँह्यसि' ह्या मंत्रानें वेदीवरील माती सारखी करावी. 'सिँह्यसि' इत्यादि प्रत्येक मंत्रानें उत्तर वेदीवर जलसिञ्चन करून बारीक वाळू पसरावी.


सिँ॒ह्य॒सि सपत्नसा॒ही दे॒वेभ्यः॑ कल्पस्व सिँ॒ह्य॒सि सपत्नसा॒ही
दे॒वेभ्यः॑ शुन्धस्वस्व सिँ॒ह्य॒सि सपत्नसा॒ही दे॒वेभ्यः॑ शुम्भस्व ॥ १० ॥


अर्थ - हे उत्तरवेदे, तूं सिंहिणीसारखी होऊन शत्रूंचा पराजय करती झालीस म्हणून देवावर उपकार करण्यास समर्थ हो. हे उत्तरवेद, तूं सिंहिणीसारखी होऊन शत्रूंचा पराजय करती झालीस म्हणून तूं देवांवर उपकार करण्याकरितां शुद्ध हो. हे उत्तरवेदे, तूं सिंहिणीसारखी होऊन शत्रूंचा पराजय करती झालीस म्हणून वाळूच्या पसरण्यानें सुशोभित हो. ॥ १० ॥

विनियोग - वेदीवर उभे रहून 'इंद्रघोषस्त्वा' या मंत्रानें प्रत्येक दिशेकडे जलसिंचन करावे. 'इदमहं' या मंत्रानें वेदीच्या बाहेर जलसिंचन करावे.


इ॒न्द्र॒घो॒षस्त्वा॒ वसु॑भिः पु॒रस्ता॑त्पातु॒ प्रचे॑तास्त्वा रु॒द्रैः
प॒श्चात्पा॑तु॒ मनो॑जवास्त्वा पि॒ट्रुभि॑र्दक्षिण॒तः पा॑तु
वि॒श्वक॑र्मा त्वाऽऽदि॒त्यैरु॑त्तर॒तः पा॑त्वि॒दम॒हं त॒प्तं
वर्ब॑हि॒र्धा य॒ज्ञान्निः सृ॑जामि ॥ ११ ॥


अर्थ - हे उत्तरवेदे, इंद्र शब्दानें बोलला जाणारा देव अष्टवसूंसह पूर्व दिशेकडे तुझें रक्षण करो. तसेंच प्रज्ञावान् वरुण एकादश रुद्रांसह पश्चिमेकडे, मनाप्रमाणें वेगवान यम पितृगणांसह दक्षिणेकडे व द्वादशादित्यांसह विश्वकर्मा उत्तर दिशेकडें तुझें रक्षण करो. असुरनिवारक म्हणून तापलेलें हें अवशिष्ट जल यज्ञाचे बहिर्भागी सिंचन करतो. ॥ ११ ॥

विनियोग - जुहूंत पांच वेळां घृत घेऊन 'सिँह्यसि' या मंत्रांनी होम करावा. 'भूतेभ्यस्त्वा' या मंत्रानें स्रुचा उचलावी.


सिँह्य॒सि॒ स्वाहा॑ सिँह्य॒स्यादित्यवनिः॒ स्वाहा॑
सिँह्य॒सि ब्रह्म॒वनिः॑ क्षत्र॒वनिः॒ स्वाहा॑
सिँह्य॒सि सुप्रजा॒वनी॑ रायस्पोष॒वनिः॒स्वाहा॑
सिँह्यस्या स्वाहा॑ व॑ह दे॒वान् यज॑मानाय॒ स्वहा॑ भू॒तेभ्य॑स्त्वा ॥ १२ ॥


अर्थ - हे उत्तरवेदे, तीं सिंहसदृश आहेस. तुला हें हवि सुहुत असो. हे उत्तरवेदे, तूं आदित्यांना प्रसन्न करणारी सिंहसदृश आहेस, तुला हे हवि सुहुत असो व तूं ब्राह्मण जातीला आणि क्षत्रिय जातीला प्रसन्न करणारी सिंहसदृश आहेस, तुला हे हवि सुहुत असो व पुत्रपौत्रादि प्रजा आणि सुवर्णादि धन देणारी तूं सिंहसदृश आहेस, तुला हें हवि सुहुत असो. व तूं सिंहसदृश आहेस, या यजमानावर उपकार करण्याकरितां देवांना आण; तुला हे हवि सुहुत असो. जरायुज, अंडज, स्वेदज व उद्‌भिज अशा चतुर्विध प्राण्यांचे हिताकरितां मी स्रुचा उचलतो. ॥ १२ ॥

विनियोग - देवदारु वृक्षांच्या परिधींनी 'ध्रुवोसि' वगैरे मंत्रांनी उत्तर वेदीच्या मध्यभागाचें परिधान करावें. 'अग्नें पुरीषम्' या मंत्रानें गुग्गुळ वगैरे द्रव्य वेदीच्या मध्यभागावर ठेवावें.


ध्रु॒वो॒ऽसि पृथि॒वीं दृँ॑ह ध्रुव॒क्षिद॑स्य॒न्तरिक्षं
दृहाच्युत॒क्षिद॑सि॒ दिवं॑ दृँहा॒ग्नेः पुरी॑षमसि ॥ १३ ॥


अर्थ - हे मध्यम-परिधि-देवते, तूं दृढ आहेस म्हणून पृथ्वीला दृढ कर. हे उत्तरपरिधिदेवते, तूं अविनाशी यज्ञांत राहणारी आहेस म्हणून द्युलोकाला दृढ कर. हे गुग्गुळ इत्यादि वस्तुसामग्री, तूं अग्नीला पूर्ण करणारी आहेस. ॥ १३ ॥

विनियोग - 'युञ्जते' या मंत्रानें चार वेळां घेतलेल्या घृताचा होम करावा.


यु॒ञ्जते॒ मन॑ उ॒त यु॑ञ्जते॒ धियो॒ विप्रा॒ विप्र॑स्य बृ॒हतो वि॑प॒श्चितः॑ ।
वि होत्रा॑ दधे वयुना॒विदेक॒ एनम॒ही दे॒वस्य॑ सवि॒तुः परि॑ष्टुतिः॒ स्वाहा॑ ॥ १४ ॥


अर्थ - मोठ्या वेदवेत्त्या यजमानाचे होम करणारे ऋत्विज, आपल्या मनाची व इंद्रियाची यज्ञकर्मांतच स्थापना करतात व लौकिक विषयांतून त्यांना काढून घेतात. हे ऋत्विजांचे मनोनियमन एका सर्वसाक्षी परमात्म्यानेंच केलें. कारण कीं, त्या अंतर्यामी ईश्वराची सर्वदा बोलली जाणारी ही मोठी स्तुति आहे. हें हवि सुहुत असो. ॥ १४ ॥

विनियोग - शकटाच्या दक्षिण चक्राचे मार्गावर सोनें घालून 'इदं विष्णुः' या मंत्रानें होम करावा.


इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दम् । समू॑ढमस्य पाँसु॒रे स्वाहा॑ ॥ १५ ॥


अर्थ - सर्वव्यापी देवानें वेगवेगळ्या तऱ्हेनें या जगाचें आक्रमण केलें, ते असे की त्यानें अग्नि, वायु व सूर्याच्या रूपानें भूमि, अंतरिक्ष व द्युलोक या तिघांवर क्रमानें आपलें पद ठेवलें (व्यापले). भूम्यादि लोकरूप रजःकण ज्यांत आहेत अशा विष्णूच्या पावलांत हें सर्व जग अंतर्भूत झाले आहे. त्याला हें हवि सुहुत असो. ॥ १५ ॥

विनियोग - शकटाच्या उत्तर चक्राच्या मार्गावर प्रतिप्रस्थात्यानें 'इरावती' या मंत्रानें होम करावा.


इरा॑वती धेनुमती॒ हि भू॒तँ सू॑यव॒सिनी॒ मन॑वे द्श॒स्या ।
व्य॑स्कभ्ना॒ रोद॑सी विष्णवे॒ते दा॒धर्थ॑ पृथि॒वीम॒भितो॑ म॒यूखैः॒ स्वहा॑ ॥ १६ ॥


अर्थ - हे द्यावापृथ्वींनो, तुम्ही अन्नयुक्त, बहुधेनुयुक्त, पुष्कळ भक्ष्य पदार्थांनी युक्त, व यजमानाला यज्ञसाधनें पुरविणाऱ्या अशा व्हा. हे विष्णो, तूं या द्यावापृथिवींना अडवून धरलें आहेस. व पृथिवीला स्वतेजानें सर्व बाजूंनी धारण केलेंस; अशा तुज विष्णूप्रत हें हवि सुहुत असो. ॥ १६ ॥

विनियोग - प्रतिप्रस्थात्यानें यजमान पत्नीस बोलावून आणावे. नंतर तिनें अक्षाच्या कण्याच्या दोन्ही अग्र भागांना होमावशिष्ट आज्य माखावे. 'प्राची प्रेतं' इत्यादि यजमानाकडून बोलवावें. कण्याचा शब्द होत असतां 'स्वा गोष्ठम्' असें यजमानाकडून बोलवावें. 'अत्र रमेथाम्' मंत्रानें वेदीसमीपस्थ शकटांचे अभिमंत्रण करावें.


दे॒व॒श्रुतौ॑ दे॒वेष्वा घो॑षतं॒ प्राची॒ प्रेत॑मध्व॒रं क॒ल्पय॑न्ती ऊ॒र्ध्वं य॒ज्ञं न॑यतं॒ मा जि॑ह्व्रतम् ।
स्वं गो॒ष्ठमा व॑दतं देवी दुर्ये॒ आयु॒र्मा निर्वा॑दिष्टं प्र॒जां मा निर्वा॑दिष्ट॒मत्र॑ रमेथां॒ वर्ष्म॑न् पृथि॒व्याः ॥ १७ ॥


अर्थ - देवसभेंत प्रसिद्ध असलेल्या अक्षधुरांनो, हा यजमान यज्ञ करणार आहे असें तुम्ही देवसभेंत उंच स्वरानें कळवा. हे दोन शकटांनो, हे यज्ञकर्म करण्यास समर्थ असे तुम्ही पूर्व दिशेकडे जा. या यज्ञाला वर देवाकडे पोंचवा व तुम्ही चालतांना वांकडे होऊं नका. प्रकाशमान अशा गृहसदृश शकटरूपी देवतांनो, तुम्ही आपल्या शब्दानें या यजमानाचा गोठा पुष्कळ पशूंनी युक्त होईल असे सांगा. ज्यायोगे यजमानाच्या आयुष्याचे व प्रजेचे निराकरण होईल असा असा शब्द करूं नका. हे शकटांनो, भूमीचें शरीर असलेल्या अशा या देवयजनस्थलीं तुम्ही रममाण व्हा. ॥ १७ ॥

विनियोग - दक्षिणशकटाचा अग्रभाग धारण करण्याकरितां आधारभूत असे काष्ठ 'विष्णोर्नुकम्' या मंत्रानें स्थापन करावें. 'विष्णवे त्वा' या मंत्रानें काष्ठ जमिनींत रोवावें.


विष्णो॒र्नुकं॑ वी॒र्या॒णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजाँ॑सि ।
यो अस्क॑भाय॒दुत्त॑रँ स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यो विष्ण॑वे त्वा ॥ १८ ॥


अर्थ - विष्णूचेच पराक्रम मी सांगतो. ज्या विष्णूनें पृथ्वी, अंतरिक्ष व द्युलोक स्थानें निर्माणे केलीं, तसेंच ज्या विष्णूनें वर असलेले द्युलोकरूपी देवाचें सहवासस्थान पडूं नये म्हणून अडवून धरले, तो विष्णू तीन लोकांमध्ये अग्नि, वायु, सूर्य रूपानें तीन पावलें ठेविता झाला व महात्मे त्याची स्तुति करतात. हे काष्ठा, विष्णूच्या संतोषाकरितां तुला आम्ही जमिनींत पुरतो. ॥ १८ ॥

विनियोग - प्रतिप्रस्थात्यानें उत्तर शकटसंबंधी काष्ठ 'दिवो वा' या मंत्रानें रोवावें.


दि॒वो वा॑ विष्ण उ॒त वा॑ पृथि॒व्या म॒हो वा॑ विष्ण उ॒रोर॒न्तरि॑क्षात् ।
उ॒भा हि हस्ता॒ वसु॑ना पृ॒णस्व प्र् य॑च्छ॒ दक्षि॑णा॒दोत स॒व्याद्विष्ण॑वे त्व ॥ १९ ॥


अर्थ - हे विष्णो, द्युलोकांतून तसेंच भूलोकांतून व विस्तीण अशा अंतरिक्ष लोकांतून आणलेल्या द्रव्यानें तूं आपले दोन्हीही हात पूर्ण भरून घे. नंतर ते डाव्या व उजव्या हातांतील द्रव्य आम्हाला दे. हे काष्ठा, विष्णूच्या संतोषाकरितां तुला आम्ही जमीनींत पुरतो. ॥ १९ ॥

विनियोग - छप्पराला स्पर्श करून 'प्रतद्विष्णुः' हा मंत्र म्हणवावा.


प्र तद्विष्णु॑ स्तवते वी॒र्ये॒ण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः ।
यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यन्ति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ २० ॥


अर्थ - तो प्रसिद्ध विष्णु पर्वतावरील प्राणिहिंसक अशा भयंकर सिंहाप्रमाणें शौर्य या गुणानें स्तुति केला जातो. त्या विष्णूच्या विस्तीर्ण अशा तीन पादप्रक्षेपस्थानी सर्व भुवनें राहतात. ॥ २० ॥

विनियोग - 'विष्णोरराटम्' इत्यादि दोन मंत्र म्हणवावे. मोठ्या दाभणांत घातलेल्या दोरीनें द्वारशाखा शिवाव्या. 'विष्णो ध्रुवोसि' या मंत्रानें दोरीला गांठ बांधावी. 'वैष्णमसि' या मंत्रानें हविर्धान मंडपाला स्पर्श करावा.


विष्णो॑ र॒राट॑मसि॒ विष्णोः॒ श्नप्त्रे॑ स्थो॒
विष्णोः॒ स्यूर॑सि॒ विष्णो॑र्ध्रु॒वो॒ऽसि । वै॒ष्ण॒वम॑सि॒ विष्ण॑वे त्व ॥ २१ ॥


अर्थ - हे दर्भमय मालाधारवंशा, तूं विष्णुमूर्तिभूत अशा हविर्धान मंडपाच्या ललाटस्थानी आहेस. हे पूर्वद्वारस्थ स्तंभानो, तुम्ही विष्णुसंज्ञक हविर्धान मंडपाचे ओष्ठसंधि आहांत. हे रज्जु, तूं विष्णुसंज्ञक हविर्धान मंडपाला शिवणारी आहेस. हे रज्जुग्रंथि, तूं हविर्धान मंडपाची दृढ अशी गांठ आहेस. हे हविर्धान मंडपा, तूं विष्णुदेवता संबंधी आहेस म्हणून विष्णूप्रीत्यर्थ तुला मी स्पर्श करतो. ॥ २१ ॥

विनियोग - यज्ञस्तंभाकरितां खड्डा करतात त्याप्रमाणें चार खड्डे करावें. 'देवस्य त्वा' या मंत्रानें अभ्रिसंज्ञक काष्ठनिर्मित खणण्याचें साधन ग्रहण करावें. 'इदमहम्' या मंत्रा खड्ड्यावर रेघा ओढाव्या. रेघा ज्या क्रमानें ओढल्या त्याच क्रमानें खड्डे खणावे.


दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् ।
आ द॑दे॒ नार्य॑सी॒ दम॒हँ रक्ष॑सां ग्री॒वा अपि॑ कृन्तामि ।
भ्रु॒हन्न॑सि बृ॒हद्र॑वा बृह॒तीभिन्द्रा॑य॒ वाचं॑ वद ॥ २२ ॥


अर्थ - हे अभ्रे, सवितृदेवाच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनी व पुष्याच्या हस्तांनी मी तुझें ग्रहण करतो. तूं कर्मोपयोगी असल्यानें यजमानांची संबंधिनी आहेस. मी ह्या खड्ड्यावर रेघा ओढतो. त्यायोगें मी यज्ञविघातक राक्षसांचा कंठच्छेद करतो. हे उपरवाख्य खड्ड्या, तूं मोठा आहेस व खणत असतां तुझ्यांतून मोठा शब्द निघतो. म्हणून तूं इंद्राच्या संतोषाकरितां प्रौढ, ध्वनियुक्त वाणी बोल. ॥ २२ ॥

विनियोग - 'इदमहम्' या मंत्रानें खणण्याच्या क्रमानें खड्ड्यांतून माती बाहेर काढावी. 'उत्कृत्यांकिरामि' या मंत्रानें चारही खड्ड्यांतून माती बाहेर काढावी.


र॒क्षो॒हणं॑ वलग॒हनं॑ वैष्ण॒वी मि॒दम॒हं तं व॑ल॒गमुत्कि॑रामि॒ यं मे॒ निष्ट्यो॒
यम॒मात्यो॑ निच॒खाने॒दम॒हं तं व॑ल॒गमुत्कि॑रामि॒ यं मे॑ समा॒नो यमस॑मानो
निच॒खाने॒दम॒हं तं व॑ल॒गमुत्कि॑रामि॒ यं मे॒ सब॑न्धु॒र्यमस॑बन्धुर्निच॒खाने॒दम॒हं
तं व॑ल॒गमुत्कि॑रामि॒ यं मे॑ सजा॒तो यमस॑जातो निच॒खानोत्कृ॒त्यां कि॑रामि ॥ २३ ॥


अर्थ - ती पूर्वोक्त वाणी राक्षसांचा नाश करणारी व वलगांचा नाश करणारी आहे (वलग म्हणजे कोणाला तरी मारण्याकरितां केलेले व जमिनींत पुरून ठेवलेले अस्थि, केश, नख वगैरे करणी पदार्थ.) तसेंच ती विष्णुसंबंधिनी वाणी आहे. कोणत्यातरी निमित्तानें रागावलेला पुत्र अगर अमात्य मला पीडा करण्याकरितां ज्या वलगाला (करणी पदार्थाला) खड्ड्यांत पुरता झाला त्याला मी बाहेर काढतो. तसेंच धनकुलादिकांनी माझ्यासदृश अगर कमी अधिक असलेला असा पुरुष व माझा संबंधी अगर असंबंधी पुरुष आणि माझा सख्खा भाऊ अगर त्याहून वेगळा पुरुष माझ्या पीडेकरितां ज्या वलगाला म्हणजे करणी पदार्थाला खड्ड्यांत पुरता झाला त्याला मी बाहेर काढतो. माझ्या शत्रूंनी जी करणी केली तिला आम्ही उचलून दूर टाकतो. ॥ २३ ॥

विनियोग - 'स्वराडसि' इत्यादि चार मंत्रांनी चारही खड्ड्यांमध्ये यजमानाचा हस्तस्पर्श करावा.


स्व॒राड॑सि सपत्न॒हा सत्र॒राड॑स्यभिमाति॒हा
ज॑न॒रडसि स्क्षो॒हा स॑र्व॒राड॑स्यमित्र॒हा ॥ २४ ॥


अर्थ - हे प्रथम खड्ड्या, तूं स्वयं शोभायमान असल्यामुळें शत्रुघाती हो. हे द्वितीय खड्ड्या, तूं द्वादशाहादि सत्रामध्यें शोभणारा असल्यामुळें शत्रुघाती हो. हे तृतीय खड्ड्या, तूं यजमानाच्या ठिकाणी शोभणारा असल्यामुळें राक्षसनाशक हो. हे चतुर्थ खड्ड्या, तूं सर्वत्र शोभणारा असल्यामुळें शत्रुनाशक हो. ॥ २४ ॥

विनियोग - 'रक्षोहणः' या मंत्रानें चारही खड्ड्यांवर जलसिंचन करावें. प्रत्येक खड्ड्यांत राहिलेले पाणी टाकावे. त्यावर दर्भ पसरावे. खड्ड्यांवर सोमकंडणाचे पाटे ठेवावे व त्यांच्याभोंवती माती पसरून खड्ड्यांचे छिद्र बुजवावे. नंतर दोन पाट्यांवर एक लाल वर्णाचे चर्म 'वैष्णवमसि' या मंत्राने पसरावे. त्या चर्मावर पांच वरवंटे 'वैष्णवास्थ' या मंत्रानें ठेवावें.


र॒क्षो॒हणो॑ वो वलग॒हनः॒ प्रोक्षामि वैष्ण॒वान्
रक्षो॒हणो॑ वो वलग॒हनोऽव॑नयामि वैष्ण॒वान्
रक्षो॒हणो॑ वो वलग॒हनोऽव॑स्तृणामि वैष्ण॒वान्
रक्षो॒हणो॑ वां वलग॒हना॒ उप॑ दधामि वैष्ण॒वी
र॒क्षो॒हणौ॑ वां वलग॒हनौ॒ पर्यू॑हामि वैष्ण॒वी वैष्ण॒वम॑सि वैष्ण॒वा स्थ॑ ॥ २५ ॥


अर्थ - राक्षसनाशक, साक्षस व करणी यांचा नाश करणाऱ्या विष्णुदेवताक खड्ड्यांनो, मी तुमच्यावर जलसिंचन करतो. हे पूर्वोक्त विशेषणयुक्त खड्ड्यांनो, मी तुमच्यावर अवशिष्ट जलसिंचन करतो. हे पूर्वोक्त विशेषणयुक्त खड्ड्यांनो, मी दर्भांनी तुमचें आच्छादन करतो. जे पाटे राक्षस व करणी यांचे नाशक व वुष्णुदेवताक आहेत, त्या दोघांना मी खड्ड्यावर ठेवतो व पूर्वोक्त विशेषणयुक्त अशा तुम्हा दोघांच्या भोंवती माती पसरतो व झांकतो. हे चर्मा, तूं विष्णुसंबंधी आहेस. हे पाषाणांनो, तुम्ही विष्णुसंबंधी आहांत. ॥ २५ ॥

विनियोग - यानंतर उंबराची फांदी जमिनींत पुरावी. तिच्याकरितां खड्डा खणण्यापासून दर्भ पसरण्यापर्यंतच्या क्रिया मंत्रांनीच कराव्या. 'देवस्य त्वा' या मंत्राने अभ्रिसंज्ञक काष्ठ ग्रहण करावे. 'यवोसि' या मंत्रानें पाण्यांत यव टाकावे. 'दिवे त्वा' या मंत्रानें शाखेच्या अग्र, मध्य व मूल भागांवर जलसिंचन करावें. 'शुन्धन्ताम्' या मंत्रानें अवशिष्ट जल खड्ड्यांत ओतावें. 'पितृषदनमसि' या मंत्रानें खड्ड्यांवर दर्भ पसरावे.


देवस्य॑ त्वा सवितुः प्र॑सवेऽश्विनो॑बाहुभ्यां॑ पूष्नो हस्ता॑भ्याम् ।
आ द॑दे नार्य॑सीदमहँ रक्ष॑सां ग्रीवा अपि॑ कृन्तामि ।
यवो॑ऽसि यवयास्मद्‍द्वेषो॑ यवयारा॑तीर्दिवे त्वाऽन्तरि॑क्षाय त्वा
पृथिव्यै त्वा शुन्ध॑न्ताँल्लोकाः पि॑तृषद॑नाः पितृषद॑नमसि ॥ २६ ॥


अर्थ - हे अभ्रे, सवितृदेवाच्या प्रेरणेनें, अश्विनीकुमारांच्या बाहूंनी, व पूष्याच्या हस्तांनी तुझें मी ग्रहण करतो. तूं कर्मोपयोगी असल्यानें यजमानाची संबंधिनी आहेस. मी या खड्ड्यावर रेघा ओढतो त्यायोगें राक्षसांचा कंठच्छेद करतो. हे धान्यविशेषा जवा, तूं पृथक् करणारा आहेस म्हणून आमचे शत्रू व अदान म्हणजे दान न देणे अर्थात् द्रव्य नसणें ही आमच्यापासून दूर कर. हे उंबराच्या अग्रभागा, द्युलोकाच्या प्रीतीकरितां, हे मध्यभागा, अंतरिक्ष लोकांच्या प्रीतीकरितां व हे मूलभागा, पृथ्वीलोकाच्या प्रीतीकरितां तुजवर मी जलसिंचन करतो. पितृगण ज्यांत राहतात असे लोक या उदकसिंचनानें शुद्ध होवोत. हे दर्भांनो, तुमचे ठिकाणी पितर राहतात म्हणून तुम्ही पितरांचे स्थान आहांत. ॥ २६ ॥

विनियोग - 'उद्दिवम्' या मंत्रानें उंबराची शाखा शेंडा वर करून धरावी. 'द्युतानः' या मंत्रानें उंबराची शाखा खड्ड्यांत ठेवावी. 'ब्रह्मवनि त्वा' या मंत्रानें चारही खड्ड्यांत बाजूंनी माती लोटावी. 'ब्रह्मदृँह' या मंत्रनें शाखेला पक्की करावी.


उद्दिवँ॑ स्तभनान्तरिक्षं पृण दृँह॑स्व पृथिव्यां
द्यु॑तानस्त्वा॑ मारुतो मि॑नोतु मित्रावरु॑णौ ध्रुवेण धर्म॑णा ।
ब्रह्मवनि॑ त्वा क्षत्रवनि॑ रयस्पोषवनि पर्यू॑हामि ।
ब्रह्म॑ दृँह क्षत्रं दृँहायु॑र्दृँह प्रजां दृँ॑ह ॥ २७ ॥


अर्थ - हे औदुंबर शाखे, तूं द्युलोकाला वर अडवून धर, अंतरिक्षलोकाला पूर्ण कर व पृथ्वीला दृढ कर. हे औदुंबरशाखे, प्रकाशमान असा वायु तुला खड्ड्यांत स्थिर रीतीनें धारण करो. तसेंच मित्रावरुण देव तुला स्थिर रीतीनें खड्ड्यांत ठेवोत. हे उंबराच्या शाखे, तुझ्याभोंवती मी माती लोटतो. तूं ब्राह्मण व क्षत्रिय जातींना प्रसन्न करणारी आहेस. तसेंच सुवर्ण देणारी आहेस. हे औदुंबरशाखे, तूं ब्राह्मण जातीला, क्षत्रिय जातीला, आयुष्याला व पुत्रादि प्रजांना दृढ कर. ॥ २७ ॥

विनियोग - औदुंबरशाखेला स्पर्श करून यजमानाकडून 'ध्रुवासि' हा मंत्र म्हणवावा. उंबराच्या विशाखामध्यें म्हणजे शाखेला जेथून दोन फांद्या फुटतात त्या ठिकाणीं 'घृतेन' या मंत्राने स्रुव्यानें होम करावा. 'इंद्रस्य छदिः' या मंत्रानें सदोनामक मंडपावर गवताची चटई पसरावी.


ध्रुवासि॑ ध्रुवाऽयं यज॑मनोऽस्मिन्नयत॑ने प्रजया॑ पशुभि॑र्भूयात् ।
घृतेन॑ द्यावापृथिवी पूर्येथामिन्द्र॑स्य छदिर॑सि विश्वजनस्य॑ छाया ॥ २८ ॥


अर्थ - हे औदुंबरशाखे, तूं स्थिर आहेस म्हणून तुझ्याप्रमाणें हा यजमान आपल्या घरांत पुत्रादिकांसह व गाई वगैरे पशूंसह स्थिर राहो. या होमलेल्या घृतानें द्यावापृथिवी पूर्ण होवोत. हे तृणमय चटई, तूं इंद्राचें आच्छादन आहेस. म्हणून सदोमंडपस्थ सर्व लोकांची छाया हो. ॥ २८ ॥

विनियोग - चारही बाजूंनी 'परित्वा' या मंत्रानें भिंतीप्रमाणे आच्छादन करावें.


परि॑ त्व गिर्वणो गिर॑ एमा भ॑वन्तु विश्वतः॑ ।
वृद्धायुमनु वृद्ध॑यो जुश्टा॑ भवन्तु जुष्ट॑यः ॥ २९ ॥


अर्थ - स्तुत्य अशा सदोभिमानी इंद्रा, स्तोत्रशस्त्ररूपी वाणी तुला सर्व बाजूंनी कटरूपानें आच्छादन करोत. हे इंद्रा, तुझे यजमान मोठाले आहेत व तुझ्या स्तुति प्रातःसवन, माध्यंदिनसवन व तृतीयसवन या क्रमानें वाढत जातात. म्हणजे उच्च स्वरयुक्त होतात. आमच्या सेव तुला प्रिय होवोत. ॥ २९ ॥

विनियोग - नंतर 'इंद्रस्य' इत्यादि तीन इंद्र मंत्रांनी पूर्वीप्रमाणें परिषीवण, ग्रंथीकरण व ग्रंथीस्पर्शन करावें. 'वैश्वदेवमसि' या मंत्रानें अग्नीध्रसंज्ञक अग्निस्थानाला स्पर्श करावा.


इन्द्र॑स्य स्यूरसीन्द्र॑स्य ध्रुवोऽसि ।
ऐन्द्रम॑सि वैश्वदेवम॑सि ॥ ३० ॥


अर्थ - हे रज्जु, तूं सदोभिमानी इंद्राची शिवणारी आहेस. हे रज्जुग्रंथि, तूं सदोमंडपाची दृढ अशी गांठ आहेस. हे सदोमंडपा, तूं इंद्रदेवतासंबंधी आहेस. हे अग्नीध्रा, तूं सर्वदेवसंबंधी आहेस. ॥ ३० ॥

विनियोग - यानंतर सोळा धिष्ण्यमंत्र आहेत. अग्नीकरितां केलेल्या मातीच्या लहान लहान ओट्यांना धिष्ण्य म्हणतात.


विभूर॑सि प्रवाह॑णो वह्नि॑रसि हव्यवाह॑नः ।
श्वात्रो॑ऽसि प्रचे॑तास्तुथोऽसि विश्ववे॑दाः ॥ ३१ ॥


अर्थ - विभु व प्रवाहण ही अग्निध्रीय धिष्ण्याची नांवे आहेत. हे अग्निध्रीय धिष्ण्या, तूं पुष्कळ प्रकारानें होणारे व हविर्द्रव्याला सर्वत्र पसरविणारे आहेस. हे होतृधिष्ण्या, तूं यज्ञकर्म करणारे व देवांकडे हविर्द्रव्य नेणारे आहेस. हे मैत्रावरुण धिष्ण्या, तूं क्षिप्रगमनवान मित्र व प्रज्ञावान वरुण एतद्रूपी आहेस. हे ब्राह्मणाच्छंसि धिष्ण्या, तूं तुथ म्हणजे देवांना दक्षिणा वांटून देणाऱ्या पुरुषस्वरूपी व सर्वज्ञ आहेस. ॥ ३१ ॥

विनियोग - वेदीच्य दक्षिणभागी मार्जालीय (पात्र धुण्याची जागा) करावे व तेथें यज्ञपात्रें धुवावी. सदोद्वाराच्या पूर्वभागी उभे राहून 'सम्राडसि' इत्यादि आठ मंत्रांनी क्रमेकरून आहवनीयादिकांचा निर्देश करावा.


उशिग॑सि कविरङ्‍घा॑रिरसि बम्भा॑रिरवस्यूर॑सि दुव॑स्वञ्छुन्ध्य्य्र॑सि
मार्जालीयः॑ सम्राड॑सि कृशानुः॑ परिषद्यो॑ऽसि पव॑मानो नभो॑ऽसि
प्रतक्वा॑ मृष्टोऽसि हव्यसूद॑न ऋतधा॑माऽसि स्वर्ज्योतिः ॥ ३२ ॥


अर्थ - हे पोतृधिष्ण्या, तूं सुंदर व विद्वान आहेस. हे नेष्टृधिष्ण्या, तूं पापनाशक व सर्वधारक आहेस. हे अच्छावाकधिष्ण्या, तूं अन्नाची इच्छा करणारे व हविर्युक्त आहेस. हे मार्जालीयस्थाना, तूं शुद्ध करणारे व मार्जन करणारे आहेस. हे उत्तरवेदिगत आहवनीया, तूं उत्तम शोभणारा व पयोव्रतानें क्षीण झालेल्या यजमानाचें अनुसरण करणारा आहेस. हे बहिष्पवमान देशा, तूं ऋत्विजांच्या सभेंत स्तुत्य व शुद्ध आहेस. हे चात्वाला, तूं छिद्ररूपि आहेस व तुझेभोंवती ऋत्विग् गमन करतात. हे शामित्रा, (पशुहननाच्या जागेला शामित्र म्हणतात) पशु मारणें यज्ञांत विहित असल्यानें तूं शुद्ध व हृदयादि हविर्द्रव्याचें शिजविणारें आहेस. हे औदुंबरशाखे, तूं सामगायनाचे स्थान व सूर्याप्रमाणें प्रकाशणारी आहेस. ॥ ३२ ॥

विनियोग - पत्नीशालेच्या पश्चिमभागी असलेला पूर्वींचा जो गार्हपत्य अग्नि त्याला प्राजहित म्हणतात. 'वागासि' या मंत्रानें सदस्थानाला स्पर्श करावा. 'ऋतस्य' या मंत्रानें दोन सदोद्वारशाखांना स्पर्श करावा. 'अध्वनाम्' या मंत्रानें सूर्याचे दर्शन करावें.


समुद्रोऽसि विश्वव्य॑चा अजोऽस्येक॑पादहि॑रसि बुध्न्यो
वाग॑स्यैन्द्रम॑सि सदोऽस्यृत॑स्य द्वारौ मा मा सन्ता॑प्तमध्व॑नामध्वपते
प्र मा॑ तिर स्वस्ति मेऽस्मिन्पथि दे॑वयाने॑ भूयात् ॥ ३३ ॥


अर्थ - हे ब्रह्मासना, तुझे ठायी सर्व देव येतात व तूं कृत आणि अकृत कर्माचें अवेक्षण करणारे आहेस. हे शाला-द्वारस्थ अग्ने, तूं आहवनीयरूपानें गमन करणारा व एकटाच सर्व जगाचे रक्षण करणारा आहेस. हे प्राजहिता, तूं नष्ट न होणारा व मूळचा आहेस. हे सदस्थाना, तूं वाग्‌रूपी व इंद्रदेवताक आहेस. हे द्वारशाखांनो, तुम्हाला पीडा न होवो. हे मार्गपालका सूर्या, मार्गांत असलेल्या मला तूं वाढव. व देवयान मिळवून देणाऱ्या यज्ञकर्मांत माझे कल्याण होवो. ॥ ३३ ॥

विनियोग - 'मित्रस्य' या मंत्रानें ऋत्विजांचे दर्शन करावें 'अग्नयः' या मंत्रानें धिष्ण्यांकडे पाहवें.


मित्रस्य॑ मा चक्षु॑षेक्षध्वमग्न॑यः सगराः सग॑रा स्थ सग॑रेण नाम्ना रौद्रेणानी॑केन
पात मा॑ऽग्नयः पिपृत मा॑ऽग्नयो गोपायत॑ मा नमो॑ वोऽस्तु मा मा॑ हिँसिष्ट ॥ ३४ ॥


अर्थ - हे ऋत्विजांनो, मित्राचे डोळ्यानें म्हणजे स्नेहाने मजकडे पहा म्हणजे मला मित्र समजा. हे अग्निसंज्ञक व स्तुत्य धिष्ण्यांनो, तुम्ही अग्नि व धिष्ण्य या नांवांनी स्तुत व्हा. तुम्ही उग्र अशा सैन्यानें माझें रक्षण करा. हे अग्नींनो, धनादिकांनी मला पूर्ण करा. व माझे निरंतर रक्षण करा. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही माझी हिंसा करूं नका. ॥ ३४ ॥

विनियोग - दधिमिश्रित आज्य 'ज्योतिरसि' या मंत्रानें पांच वेळा ग्रहण करावे. जुहुप्रमाणे होमाला उपयोगी पडणाऱ्या स्रुचेला प्रचरणी म्हणातात. 'त्वम् सोम' या मंत्रानें प्रचरणीनें होम करावा. 'जुषाणो' या मंत्रानें दुसरी आहुति द्यावी.


ज्योति॑रसि विश्वरू॑पं विश्वे॑षां देवनँ॑ समित् । त्वँ सो॑म तनूकृद्‍भ्यो
द्वेषो॑भ्योऽन्यकृ॑तेभ्य उरु यन्तासि व॑रूथँ स्वहा॑ जुषाणो अप्तुराज्य॑स्य वेतु स्वहा॑ ॥ ३५ ॥


अर्थ - हे आज्या, तूं प्रकाशक सर्वरूपी व सर्व देवांना प्रदीपक आहेस. हे सोमा, तूं शरीरनाशक राक्षस व अन्यकृत दुर्भाग्यरूपी पीडांचे नियमन करणारा आहेस म्हणून तूंच आमचें विस्तृत बल आहेस. तुला हे हवि सुहुत असो. शरीर प्राप्त करणारा व संतुष्ट होणारा असा सोम आज्य ग्रहण करो. त्याला हे हवि सुहुत असो. ॥ ३५ ॥

विनियोग - 'अग्ने नय' हा मंत्र यजमानाकडून म्हणवावा.


अग्ने न॑य सुपथा॑ राये अस्मान्विश्वानि देव वयुना॑नि विद्वान् ।
यूओध्यस्मज्जु॑हुराणमेनो भूयि॑ष्ठां ते नम॑ उक्तिं विधेम ॥ ३६ ॥


अर्थ - सर्व ज्ञानांनी युक्त असलेल्या हे प्रकाशक अग्ने, यज्ञफलप्राप्ती करितां आम्हाला चांगल्या मार्गानें ने. कुटिल (इष्टकर्म प्रतिबंधक) असे आमचे पाप दूर कर. आम्ही पुष्कळ नमस्कारात्मक वाक्यें बोलूं म्हणजे तुला नमस्कार असे पुष्कळ वेळा उच्चारु व नमस्कार करूं. ॥ ३६ ॥

विनियोग - सदोमंडपाचे उत्तरेकडून शालामुखीय अग्नि व पाषाण, द्रोणकलश आणि सोमपात्र ही नेऊन अग्नीध्र मंडपांत स्थापन करावींत. तेथील अग्नींत 'अयं नः' या मंत्रानें होम करावा.


अ॒यं नो॑ अ॒ग्निर्वरि॑वस्कृणोत्व॒यं मृधः॑ पु॒र ए॑तु प्रभि॒न्दन् ।
अ॒यं वाजा॑ञ्जयतु॒ वाज॑साताव॒यँ शत्रू॑ञ्जयतु॒ जर्हृषाणः॒ स्वाहा ॥ ३७ ॥


अर्थ - हा अग्नि आम्हाला द्रव्य देवो व हाच संग्रामांचा नाश करून पुढें जावो. हाच अग्नि शत्रूंची अन्नें आम्हाला भक्षणाकरितां देवो. म्हणून अत्यंत आनंदित होणारा हा अग्नि आमच्या शत्रूंना जिंको. हे अग्ने तुला हे हवि सुहुत असो. ॥ ३७ ॥

विनियोग - 'उरु विष्णो' या मंत्राने अहवनीयांत होम करावा.


उ॒रु वि॑ष्णो॒ वि क्र॑मस्वो॒रु क्षया॑य नस्कृधि ।
घृ॒तं घृ॑तयोने पिब॒ प्रप्र॑ य॒ज्ञप॑तिं तिर॒ स्वहा॑ ॥ ३८ ॥


अर्थ - हे विश्वव्यापक आहवनीय अग्ने, तूं शत्रूंवर पुष्कळ पराक्रम कर व ब्रह्मगृहांत राहण्याकरितां आम्हाला विस्तीर्ण कर. हे घृतोत्पन्न अग्ने, होमलेले घृत पी व यजमानाची अतिशय वृद्धि कर. तुला हे हवि सुहुत असो. ॥ ३८ ॥

विनियोग - शकटावर कृष्णाजिन पसरून त्यावर 'देव सवितः' या मंत्रानें सोम ठेवावा. कृष्णाजिनावर बांधलेल्या सोमाला मोकळें करून 'एतत् त्वम्' या मंत्रानें त्याचें उपस्थान करावें. 'स्वाहानिः' या मंत्रानें हविर्धान मंडपाच्या बाहेर निघावें.


देव॑ सवितरे॒ष ते॒ सोम॒स्तँ र॑क्षस्व॒ मा त्वा॑ दभन् । ए॒तत्त्वं दे॑व सोम दे॒वो दे॒वाँ२
उपा॑गा इ॒दम॒हं म॑नु॒ष्या॒न्त्स॒ह रा॒यस्पोषे॑ण॒ स्वाहा॒ निर्व॑रुणस्य॒ पाशा॑म्नुच्ये ॥ ३९ ॥


अर्थ - हे प्रकाशक सवित्या, तुला हा सोम अर्पण केला त्यचें पालन कर. सोम रक्षण करणाऱ्या तुझी राक्षस हिंसा न करोत. हे सोमदेवा, तूं प्रकाशक होऊन तुझ्या अनुयायी देवाकडे प्राप्त झाला आहेस. यजमान असा मीही आतां पशु वगैरे द्रव्यांसह माझ्या अनुयायांकडे प्राप्त झालो आहे. देवांनो सोमरूप अन्न सुहुत असो. या सोमप्रदानानें मी वरुणपाशांतून मुक्त झालों आहे. ॥ ३९ ॥

विनियोग - 'अग्ने व्रतपाः' या मंत्रानें आहवनीयांत समिधेचा होम करावा.


अग्ने॑ व्रतपा॒स्त्वे व्र॑तपा॒ या तव॑ त॒नूर्मय्यभू॑दे॒षा सा त्वयि॒ यो मम॑ त॒नूस्त्वय्यभू॑दि॒यँ सा मयि॑ ।
य॒था॒य॒थं नौ व्र॒तपते व्रतान्यनु॑ मे दी॒क्षां दी॒क्षाप॑ति॒रमँस्तानु॒ तप॒स्तप॑स्पतिः ॥ ४० ॥


अर्थ - हे अग्ने, तूं स्वतः सर्व व्रतांचा पालक आहेस. म्हणून आतां माझ्या व्रताचें पालन करणारा हो. हे अग्ने, व्रतप्रार्थनेच्या वेळी तुझें जे शरीर मजकडे होतें ते तुजमध्ये होवो. माझे जे शरीर तुजमध्यें होते ते मजकडे येवो. हे व्रतपालका अग्ने, आपापली कर्में ज्याची त्याच्याकडे येवोत. म्हणजे अनुष्ठानाचे कर्म मजकडे येवो व पालनाचे कर्म तुजकडे असो. आणि दीक्षेचा व तपाचा पालक अग्नि माझे नियमाचा आणि तपाचा अंगिकार करिता झाला. ॥ ४० ॥

विनियोग - यूपाहुतीकरितां चार वेळां घृत घेऊन 'उरुविष्णो' या मंत्रानें आहवनीयांत होम करावा.


उ॒रु वि॑ष्णो॒ वि क्र॑मस्वो॒रु क्षया॑य मस्कृधि ।
घृ॒तं घृ॑तयोने पिब॒ प्रप्र॑ य॒ज्ञप॑तिं तिर॒ स्वाहा॑ ॥ ४१ ॥


अर्थ - हे विश्वव्यापका आहवनीयाग्ने, तूं शत्रूवर पुष्कळ पराक्रम कर, व ब्रह्मगृहांत राहण्याकरितां आम्हाला विस्तीर्ण कर. हे घृतोत्पन्न अग्ने, होमलेले घृत पी व यजमानाची अतिशय वृद्धि कर. तुला हे हवि सुहुत असो. ॥ ४१ ॥

विनियोग - यूपाहुतीचें अवशिष्ट आज्य बरोबर घेऊन यूप तोडण्याकरितां रानांव जावें व तेथें यूपवृक्षाला 'अत्यन्यान्' या मंत्रानें स्पर्श करावा. 'विष्णवेत्वा' या मंत्रानें स्रुव्यानें यूपाला स्पर्श करावा. 'ओषधे' मंत्रानें यूपवृक्षावर दर्भ ठेवावा. 'स्वहिते' या मंत्रानें कुऱ्हाडीचा प्रहार करावा.


अत्य॒न्याँ२ अगां॒ नान्याँ२ उपा॑म॒र्वाक् त्वा॒ परे॒भ्योऽवि॑दं प॒रोऽव॑रेभ्यः ।
तं त्वा॑ जुषामहे देव वनस्पते देवय॒ज्यायै॑ दे॒वास्त्वा॑ देवय॒ज्यायै॑
जुषन्तां॒ विष्ण॑वे त्वा । ओष॑धे॒ त्राय॑स्व॒ स्वधि॑ते॒ मैनँ॑ हिँसीः ॥ ४२ ॥


अर्थ - हे पुरोवर्ति यूपवृक्षा, यूपार्ह अशा कांही वृक्षांना ते सुलक्षणी नसल्यामुळें मी ओलांडून आलो व यूपानर्ह अशाही कांही वृक्षांना मी सोडून आलों, व लांब असलेल्या वृक्षांच्या अलिकडे असलेल्या तुला मी प्राप्त झालो. हे दीप्यमान वृक्षा, अशा तुझे देवयागाकरितां आम्ही सेवन करतो. हे वृक्षा, परशूच्या भितीपासून माझें रक्षण कर. हे परशो, या यूपाची हिंसा करूं नकोस. ॥ ४२ ॥

विनियोग - यूपवृक्ष पडत असतां 'द्यांमालेखीः' हा मंत्र म्हणावा व त्याकडे पहावें. 'अयंहि' या मंत्रानें यूपाचें शोधन करावें.


द्यां मा ले॑खीर॒न्तरि॑क्षं॒ मा हिँसीः पृ॒थिव्या सम्भ॑व ।
अ॒यँ हि त्वा॒ स्वधि॑ति॒स्तेति॑जानः प्रणि॒नाय॑ मह॒ते सौभ॑गाय ।
अत॒स्त्वं दे॑व वनस्पते श॒तव॑ल्शो॒ वि रो॑ह स॒हस्र॑वल्शा॒ वि व॒यँ रु॑हेम ॥ ४३ ॥


अर्थ - हे यूपवृक्षा, तूं द्युलोकाची व अंतरिक्षलोकाची हिंसा करूं नकोस. पृथ्वीशी एक हो. हे तोडलेल्या वृक्षा, अत्यंत तीक्ष्ण अशा कुऱ्हाडीनें मोठें सौभाग्य जे यज्ञ, त्याकरितां तुला आणले, म्हणून तोडण्याला तूं भिऊं नको. हे प्रकाशमान वृक्षा, या तुझ्या बुंध्यापासून तुला शेकडों अंकुर उत्पन्न होऊन तूं वाढोस व आम्हीही पुत्रपौत्रादिकांनी हजारों शाखायुक्त होऊन वाढूं. ॥ ४३ ॥

॥ पञ्चमोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP