|
शुक्ल यजुर्वेद विनियोग - पहिल्या व दुसऱ्या अध्यायांत दर्शपौर्णमास इष्टींचे मंत्र सांगितले. यापुढे या अध्यायाचे आठ मंत्र आधानासंबंधी आहेत. चार ऋत्विजांनी पुरेसा भात शिजवून भांड्यांत तुपाकरितां आळे करून त्यांत तूप ओतावें व त्या तुपांत समिधा भिजवून घेऊन त्यांचा पहिल्या तीन ऋचांनी होम करावा. स॒मिधा॒ग्निं दु॑वस्यत घृ॒तैर्बो॑धय॒ताति॑थिम् । अस्मि॑न् ह॒व्या जु॑होतन ॥ १ ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो, तुम्ही काष्ठरूप समिधेनें अग्नीची सेवा करा व अतिथ्यकर्मानें पूज्य अशा अग्नीला पूर्णाहुतिसंबंधी घृतानें प्रज्वलित करा. नंतर प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्यें नानाप्रकारच्या हविर्द्रव्यांचा सर्व बाजूंनी होम करा. ॥ १ ॥ सुस॑मिद्धाय शो॒चिषे॑ घृ॒तं ती॒व्रं जुहोतन । अ॒ग्नये॑ जा॒तवे॑दसे ॥ २ ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो तुम्ही अग्नीमध्यें सुसंस्कृत घृताचा होम करा. तो अग्नि चांगला प्रदीप्त झालेला व प्रकाशमान आणि सर्व ज्ञानांचा उत्पादक आहे. ॥ २ ॥ तं त्वा॑ स॒मिद्भि॑रङ्गिरो घृ॒तेन॑ वर्द्धयामसि । बृहच्छो॑चा ॒यविष्ठ्य ॥ ३ ॥ अर्थ - प्रत्येक यज्ञांत गमन करणाऱ्या व नेहमीं तरुण राहणाऱ्या हे अग्ने, तुला आम्ही समिधांनी व संस्कारयुक्त घृतानें वाढवितो. तूं अतिशय प्रकाशित हो. ॥ ३ ॥ विनियोग - 'उष त्वा' या मंत्राचा जप करावा. उप॑ त्वाग्ने ह॒विष्म॑तीर्घृ॒ताची॑र्यन्तु हर्यत । जु॒षस्व॑ स॒मिधो॒ मम॑ ॥ ४ ॥ अर्थ - हे अग्ने, हविर्युक्त व घृतांत बुडविलेल्या समिधा तुला प्राप्त होवोत. त्या समिधांची इच्छा करणारा तूं मजकडे येणाऱ्या त्या माझ्या तीन समिधांचे सेवन कर. ॥ ४ ॥ भू र्भुवः॒ स्वः द्यौरि॑व भू॒म्ना पृ॑थि॒वीव॑ वरि॒म्णा । अर्थ - भूः, भुवः, स्वः या तीन व्याहृतींचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य अथवा आत्मा, प्रजा आणि पशु असा आहे. या अर्थाच्या व्याहृतींनी प्रार्थना करून अग्नीचें स्थापन करावें. तात्पर्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा आत्मा, प्रजा व पशु हे सर्व माझ्या स्वाधीन होवोत. देवांच्या यज्ञाला साधनीभूत अशा हे पृथ्वी तुझ्या पृष्ठावर हुत अन्न भक्षण करणारा गार्हपत्यादि अग्नि मी स्थापन करतो. त्यायोगें मला भक्ष्य व भोज्य अन्न प्राप्त होवो. तुझ्या पृष्ठावर अग्नि स्थापन करून द्युलोक ज्याप्रमाणें नक्षत्रबहुत्वानें विशिष्ट आहे त्याप्रमाणें मी पुष्कळ पुत्र पशु वगैरेंनी युक्त होवो. तसेंच विस्तृत असल्यानें जशी सर्व प्राण्यांचा आश्रय देते त्याप्रमाणें मी सर्व प्राण्यांना आश्रय होवो. विनियोग - 'आयं गौः' इत्यादि तीन मंत्रानीं आहवनीयाचे उपस्थान करावें व नंतर दक्षिणाग्नीचे आधान करावें. आयं गौ पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन् मा॒तरं॑ पुरः । पि॒तरं॑ च प्र॒यन्त्स्व॑ ॥ ६ ॥ अर्थ - यज्ञ सिद्धिकरितां निरनिराळ्या यजमानांच्या घरी जाणारा, लोहित, शुक्ल वगैरे वर्णांच्या ज्वालांनी युक्त असा हा अग्नि आहवनीय, गार्हपत्य व दक्षिणाग्नि स्थानांवर आरोहण करता झाला. व पूर्वदिशेकडे आहवनीयरूपानें पृथ्वीवर बसला. तसेंच आदित्यरूपानें स्वर्गांत संचार करणारा हा पितृभूत अशा द्युलोकाप्रतही प्राप्त होता झाला. ॥ ६ ॥ अ॒न्तश्च॑रति रोच॒नास्य प्रा॒णाद॑पान॒ती । व्य॑ख्यन् महि॒षो दिव॑म् ॥ ७ ॥ अर्थ - सर्व शरीरामध्यें प्राण व अपान वायूंना प्रेरणा करणारी ह्या अग्नीची ही वायु नांवाची एक अनिर्वचनीय शक्ति द्युलोक व पृथ्वीलोक यांमध्यें शरीरांत संचार करीत आहे. यजमानांना यागकर्तृत्व स्वरूप देणारा हा अग्नि त्यांना द्युलोकरूपी उपभोगस्थान प्रकाशित करता झाला. ॥ ७ ॥ त्रिँ॒शद्धाम॒ विरा॑जति॒ वाक् प॑त॒ङ्गाय॑ धीयते । प्रति॒ वस्तो॒रह॒ द्युभिः॑ ॥ ८ ॥ अर्थ - निरलस अशा यजमानांच्या अनुष्ठानानें आहवनीयादि अग्नीचें स्थान (यज्ञशाला) महिन्यांतील तीसही दिवस विशेषेंकरून शोभते (प्रकाशते). एखादा पक्षी ज्याप्रमाणें एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाप्रत जातो त्याप्रमाणें अग्निसुद्धां गार्हपत्यांतून आहवनीयामध्यें जातो. अशा तऱ्हेनें अग्नीची पक्षिरूपानें स्तुति केली जाते, आणि रोज प्रकाश पावतो म्हणूनही त्याची स्तुति केली जाते. ॥ ८ ॥ विनियोग - नऊ व दहा हे मंत्र अग्निहोत्र होमाचे आहेत. ब्रह्मवर्चसाची इच्छा करणाऱ्या अग्निहोत्र्यानें 'अग्निर्वचः' या मंत्रानें सायंकाळी व 'सूर्यो वर्चः' या मंत्रानें प्रातःकाळी होम करावा अथवा 'ज्योतिः सूर्यः' हाही प्रातःकालचा मंत्र आहे. अ॒ग्निर्ज्ज्योति॒र्ज्ज्योति॑र॒ग्निः स्वाहा॒ सूर्यो॒ ज्योति॒र्ज्ज्योतिः॒ सूर्यः स्वाहा॑ । अर्थ - जो हा अग्निदेव आहे तेंच दृश्यमान असें ज्वालेचें स्वरूप आहे व जें दृश्यमान ज्वालारूपी आहे तोच अग्नि आहे. अग्नि आणि ज्वाला यांचा केव्हांनी वियोग नसल्यामुळें त्यांचे एकत्व सांगितलें आहे. ज्योतिरूपी अग्नीला दिलेलें हवि सुहुत असो. (सूर्यो ज्योतिः हा प्रातःकालचा होममंत्र आहे). ज्योति व सूर्य एकच आहेत. म्हणून ज्योतिरूपी सूर्याला दिलेलें हें हवि सुहुत होवो. तसेंच वर्चस् (तेज) आणि अग्नि तसेंच वर्चस् आणि सूर्य एकच आहेत. ज्योति आणि वर्चस् हेही एकच आहेत. म्हणून त्या अग्नीला व सूर्याला दिलेलें हवि सुहुत असो. ज्योति आणि सूर्य एकच आहेत म्हणून दिलेलें हवि सुहुत असो. ॥ ९ ॥ विनियोग - अथवा 'सजूः' ह्या मंत्रानें होम करावा. स॒जूर्दे॒वेन॑ सवि॒त्रा स॒जू रात्र्येन्द्र॑वत्या । जुषा॒णो अ॒ग्निर्वे॑तु॒ स्वाहा॑ । अर्थ - प्रेरक अशा सवितृ परमेश्वरावर आणि इंद्रयुक्त रात्रीदेवतेवर सारखी प्रीति करणारा जो अग्नि तो आमच्यावर तशीच प्रीति करो. आमच्या कर्मांत येऊन आहुति भक्षण करो. हे अग्नीला दिलेले द्रव्य सुहुत असो. (हा मंत्र रात्रीं म्हणावा व उत्तरार्ध सूर्याचा मंत्र आहे तो सकाळीं म्हणावा). प्रेरक अशा सवितृ परमेश्वरावर आणि इंद्रयुक्त उषा देवतेवर सारखी प्रीति करणारा जो सूर्य तो आमच्यावर तशी प्रीति करो. आमच्या कर्मांत येऊन आहुति भक्षण करो. हें सूर्याला दिलेलें द्रव्य सुहुत असो. ॥ १० ॥ विनियोग - सायंकाळी आहुतीचा होम झाल्यावर या मंत्रापासून सदतिसाव्या मंत्रापर्यंतच्या मंत्रांनी आहवनीय व गार्हपत्य अग्नीचें उपस्थान करावें. उ॒प॒प्र॒यन्तो॑ अध्व॒रं मन्त्रं॑ वोचेमा॒ग्नये॑ । आ॒रेऽअ॒स्मे च॑ श्रृण्व॒ते ॥ ११ ॥ अर्थ - यज्ञाप्रत प्राप्त होणारे आम्ही दुरून व जवळून ऐकणाऱ्या अशा अग्निकारणें मंत्र म्हणतो. ॥ ११ ॥ अ॒ग्निमूर्द्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्याऽअ॒यम् । अ॒पाग्ं रेताँ॑सि जिन्वति ॥ १२ ॥ अर्थ - द्युलोकाचें मस्तक असलेला व बैलाच्या वशिंडाप्रमाणें आदित्यरूपानें सर्वांच्यावर राहणारा जगत्कारण व पृथ्वीपालन करणारा असा हा अग्नि वृष्टीच्या रूपानें पडणाऱ्या जलांचा परिणाम म्हणजे व्रीहि यवरूपी धान्य यांस वाढवितो. ॥ १२ ॥ उ॒भा वा॑मिन्द्राग्नीऽआहु॒वध्या॑ उ॒भा राध॑सः स॒ह मा॑द॒यध्यै॑ । अर्थ - हे इंद्राग्निदेवतांनो, मी तुम्हांला बोलावण्याची इच्छा करतो. व एका कर्मांत तुम्ही हा हविर्भाग ग्रहण करून संतुष्ट व्हा अशी इच्छा करतो. तुम्ही धन देणारे आहांत म्हणून धन देणाकरितां तुम्हाला मी बोलावतो. ॥ १३ ॥ अ॒यं ते॒ योनि॑र्ऋत्वियो॒ यतो॑ जा॒तो अरो॑चथाः । अर्थ - हे आहवनीय अग्ने, सायं-प्रातःकाली उत्पन्न होण्याला योग्य असा गार्हपत्य अग्नि तुझें उत्पत्तिस्थान आहे. तूं गार्हपत्यापासून उत्पन्न होऊन कर्मकालीं प्रकाशित झालास म्हणून हे अग्ने, तूं त्या गार्हपत्याला आपलें उत्पत्तिस्थान समजून कर्माचे शेवटी त्यांत प्रवेश कर. आणि तदनंतर याग करण्याकरितां आमचें द्रव्य वाढव. ॥ १४ ॥ अ॒यमि॒ह प्र॑थ॒मो धा॑यि धा॒तृभि॒र्होता॒ यजि॑ष्ठोऽअध्व॒रेष्वीड्यः॑ । अर्थ - हा आहवनीय अग्नि ह्या स्थानामध्यें मुख्य असून आधान करणाऱ्या यजमानानें स्थापन केला आहे. हा अग्नि देवांचे आव्हान करणारा व सर्वोत्तम तऱ्हेनें याग करणारा आहे. यज्ञांत ऋत्विज त्याची स्तुति करतात. भृगुकुलोत्पन्न पुत्रवान् मुनी प्रत्येक यजमानाकरितां अरण्यामध्यें ह्या अग्नीला प्रदीप्त करते झाले. हा अग्नि निरनिराळ्या कर्मांत उपयोगी पडणारा असल्यामुळें आश्चर्यकारक व व्यापक आहे. ॥ १५ ॥ अ॒स्य प्र॒त्नामनु॒ द्यु॒तँ॑ शु॒क्रं दु॑दुह्रे॒ अह्व॑यः । पयः॑ सस्र॒सामृषि॑म् ॥ १६ ॥ अर्थ - ह्या अग्नीची फार प्राचीन कालापासून असलेली जी कांति तिचें अनुसरण करून म्हणजे अग्नीच्या दीप्तीकडे लक्ष देऊन दोहन करणारे लोक संकोचरहित होऊन जिचें दूध हजारों कामांत उपयोगी पडतें अशा गाईचें शुद्ध दूध काढते झाले. ॥ १६ ॥ त॒नू॒पा अ॑ग्नेऽसि त॒न्वं॒ मे पाह्यायु॒र्दा अ॑ग्ने॒ऽस्यायुर्मे देहि वर्चो॒दा अ॑ग्नेऽसि॒ वर्चो॑ मे देहि । अर्थ - हे अग्ने, तूं स्वभावतःच अग्निहोत्र्याच्या शरीराचें पालन करणारा आहेस म्हणून माझ्या शरीराचें पालन कर. तसेंच तूं आयुष्य व तेज देणारा आहेस म्हणून मला आयुष्य व तेज दे. आणि हे अग्ने, माझ्या शरीरेंद्रियांत जें न्यून असेल तें तूं पूर्ण कर. ॥ १७ ॥ इन्धा॑नास्त्वा श॒तँ हिमा॑ द्यु॒मन्तँ॒ समि॑धीमहि । अर्थ - हे अग्ने, शंभर वर्षेपर्यंत आम्ही तुला प्रकाशित करीत राहूं तुझ्या कृपेनें आम्ही प्रकाशित होऊं. आम्हाला अन्न व बळ मिळेल व कोणीही आमची हिंसा करणार नाही. कारण तूं प्रकाशमान, अन्नबल देणारा, शत्रूंचा नाश करणारा व कोणालाही अहिंस्य असा आहेस. चंद्रनक्षत्रादिक विविध पदार्थ धारण करणाऱ्या हे रात्री आम्ही कल्याणकारक रीतीनें तुझ्या समाप्तीला प्राप्त होऊं म्हणजे सर्व रात्रभर आम्हाला चोरांची व राक्षसांची पीडा न होवो. ॥ १८ ॥ विनियोग - उपस्थानाच्या वेळीं मागील मंत्रापर्यंत उभें रहावयाचें आहे. 'संत्वम्' (पुढचा) या मंत्रापासून बसून उपस्थान करावें. सं त्वम॑ग्ने॒ सूर्य॑स्य॒ वर्च॑सागथाः॒ समृषी॑णाँ स्तु॒तेन॑ । अर्थ - हे अग्ने, तूं रात्रीच्या वेळीं सूर्याच्या तेजानें युक्त झाला आहेस. तसेंच ऋषींच्या स्तोत्रांनी व प्रिय आहुतींनी युक्त झाला आहेस. ज्याप्रमाणें ह्या तीन वस्तूंनी युक्त झालास त्याप्रमाणें मीही तुझ्या प्रसादानें आयुष्य, वैदिक तेज, पुत्रादिक प्रजा आणि धनवृद्धीनें युक्त व्हावें म्हणजे आयुष्यादि मला प्राप्त होवो. ॥ १९ ॥ विनियोग - 'अंधस्थ' व 'रेवती' या दोन मंत्रांनी गाईंच्या समीप गमन करावें. अन्ध॒ स्थान्धो॑ वो भक्षीय॒ मह॑ स्थ॒ महो॑ वा भक्षी॒योर्ज॒ अर्थ - हे गाईंनो, तुम्ही अन्नरूपी आहांत म्हणून तुमच्या प्रसादानें मी क्षीरादि अन्न भक्षण करीन. तसेंच तुम्ही पूज्य आहांत म्हणून तुमच्या प्रसादानें मला पूज्यत्व प्राप्त होवो. तुम्ही बलरूपी आहांत म्हणून तुमच्या प्रसादानें मला बल प्राप्त होवो. तसेंच तुम्ही धनपोषण करणाऱ्या आहांत म्हणून तुमच्या प्रसादानें माझ्या धनाचें पोषण होवो. ॥ २० ॥ रेव॑ती॒ रम॑ध्वम॒स्मिन्योना॑व॒स्मिन् गो॒ष्ठेऽस्मिँल्लो॒केऽस्मिन् क्षये॑ । इ॒हैव स्त॒ माप॑गात ॥ २१ ॥ अर्थ - हे धनयुक्त गाईंनो, ह्यापुढें असलेल्या अग्निहोत्र-हविर्द्रव्याच्या दोहनस्थानामध्यें दूध काढण्याचें जागीं स्वस्थ चित्तानें रहा व दोहन झाल्यावर यजमानाच्या गुरचराईच्या जागीं सुखानें संचार करा. रात्री यजमानाचे घरीं गोठ्यांत शांत रीतीनें रहा, दुसरीकडे जाऊं नका. ॥ २१ ॥ विनियोग - 'सरँहिता' या मंत्रानें गाईला स्पर्श करावा. 'उषत्वा' या मंत्रानें गार्हपत्यासमीप जाऊन उपस्थान करावें. सँ॒हि॒तासि॑ विश्वरू॒प्यूर्जा मावि॑श गौप॒त्येन॑ । अर्थ - हे गाई, तूं यज्ञकर्मानें संयुक्त आहेस. शुक्लकृष्णादि बहुरूपानें युक्त अशी तूं क्षीरादि रस मला दे, व माझे स्वामित्व पतकर. रात्रींसुद्धां उपासकांच्या घरीं निवास करणाऱ्या म्हणजे रात्रंदिवस यज्ञशालेंत राहणाऱ्या हे अग्ने गार्हपत्या, प्रत्येक दिवशीं आम्ही यज्ञ करण्याकरितां श्रद्धायुक्त अंतःकरणानें तुजकडे प्राप्त होतो व तुला नमस्कार करतो. ॥ २२ ॥ राज॑न्तमध्व॒राणां॑ गो॒पामृ॒तस्य॒ दीदि॑विम् । वर्ध॑माँ॒ स्वे दमे॑ ॥ २३ ॥ अर्थ - आम्ही प्रकाशमान, यज्ञाचे रक्षण करणारा आणि सत्यवचन प्रकाशित करणारा आमच्या घरामध्यें चातुर्मास्यादि यज्ञस्वरूपानें वाढणारा जो अग्नि त्याप्रत प्राप्त होऊं. ॥ २३ ॥ स नः॑ पि॒तेव॑ सूनवेऽग्ने॑ सूपाय॒नो भ॑वे । अर्थ - हे अग्ने गार्हपत्या, ज्याप्रमाणें बाप निर्भय रीतीनें मुलाकडे जातो त्याचप्रमाणें तो पूर्वोक्तगुण असा तूं आम्हाला सुखानें प्राप्त हो. आणि आमच्या कल्याणाकरितां तूं उत्तम कर्मानें युक्त हो. ॥ २४ ॥ अग्ने॒ त्वं नो॒ अन्त॑म उ॒त त्रा॒ता शि॒वो भ॑वा वरू॒थ्यः॒ । अर्थ - हे गार्हपत्या अग्ने, तूं सर्वदा आमच्याजवळ रहा. आमचे पालन कर व शांत होऊन आमच्या पुत्रादिकांचे रक्षण कर. तूं सर्व लोकांचे आश्रयस्थान आहेस. आहवनीयादि रूपानें गमन करणारा व धनदाता म्हणून ज्याची कीर्ति आहे अशा हे अग्ने, तूं निर्मल स्वभावाचा होऊन आमच्या होमशालेंत प्राप्त हो. आणि अत्यंत प्रकाशयुक्त द्रव्य आम्हाला दे. ॥ २५ ॥ तं त्वा॑ शोचिष्ठ दीदिवः सु॒म्नाय॑ नूनमी॑महे॒ सखि॑भ्यः । अर्थ - ज्वालायुक्त व सर्वप्रकाशक अग्ने, पूर्वोक्त गुणविशिष्ट अशा तुजकडे आम्ही आमच्या मित्राच्या कल्याणाची निश्चयेंकरून याचना करतो. तो तूं आमचा अभिप्राय जाणून आमचे बोलावणें ऐक व सर्व शत्रूंपासून आमचें रक्षण कर. ॥ २६ ॥ विनियोग - 'सोमानम्' या नऊ मंत्रांचा आहवनीयाजवळ पूर्वाभिमुख उभे राहून जप करावा. इड॒ एह्यदि॑त॒ एहि॒ काम्या॒ एत॑ । अर्थ - हे इडे (मनुदुहिते), हे अदिति (दयामाते), तुम्ही सर्व प्रार्थनीय आहांत. तुम्ही आमच्या होमस्थानाप्रत या. तुमचा अपेक्षित काम धारण करण्याचा जो धर्म तो माझे ठायीं असो. म्हणजे तुमच्या कृपेनें मी अभीष्ट फल धारण करावें. ॥ २७ ॥ विनियोग - 'इडएहि' या मंत्रानें गाईचे समीप उभें राहावें व 'काम्याएत' या मंत्रानें स्पर्श करावा. सो॒मानँ॒ स्वर॑णं कृणु॒हि ब्र॑ह्मणस्पते । अर्थ - हे ब्रह्मणस्पते वेदपालका, ज्याप्रमाणें तूं दीर्घतमसंज्ञक पित्यापासून व उशिक्संज्ञक मातेपासून झालेला जो कक्षीवान् नांवाचा ऋषि त्याला तूं सोमयागयुक्त व स्तुतियुक्त करता झालास त्याप्रमाणें मलाही तसा कर. ॥ २८ ॥ यो रे॒वान्यो अ॑मीव॒हा व॑सु॒वित्पु॑ष्टि॒वर्द्ध॑नः । अर्थ - द्रव्यवान, रोगनाशक, धन जाणणारा, पुष्ट करणारा व शीघ्र कार्य करणारा असा जो ब्रह्मणस्पति तो आमचें सेवन करो म्हणजे आम्हांप्रत प्राप्त होवो. ॥ २९ ॥ मा नः॒ शँसो॒ अ॑ररुषो धू॒र्तिः प्रण॒ङ् मर्त्य॑स्य । अर्थ - केव्हांही हविर्दान न करणाऱ्या माणसाचें आमच्यासंबंधी चालत असलेले अनिष्ट चिंतन व हिंसा आमचा नाश न करो. के ब्रह्मणस्पते, वेदपालक अग्ने आमचें रक्षण कर. ॥ ३० ॥ महि॑ त्री॒णामवो॑ऽस्तु द्यु॒क्षं मि॒त्रस्या॑र्य॒म्णः । अर्थ - मित्र, अर्यमा आणि वरुण या तिघांनी आमचें रक्षण करावें. तें रेक्षणसामर्थ्य फार मोठे आहे व त्यांत सुवर्णादि द्रव्यें निवास करतात. तें अन्यांकडून तिरस्कार करण्याला अशक्य असो. ॥ ३१ ॥ न॒हि तेषा॑म॒मा च॒न नाध्व॑सु वार॒णेषु॑ । अर्थ - घरामध्ये राहणाऱ्या तसेंच चोर व व्याघ्र यांच्या भयानें युक्त अशा मार्गामध्यें राहणाऱ्या यजमानांना उपद्रव देण्याला पापाची बढाई मारणारा शत्रु समर्थ होत नाहीं. कारण मित्र, अर्यमा व वरुण या तीन देवांनी त्या यजमानाचें रक्षण केलें आहे. ॥ ३२ ॥ ते हि पुत्रासो॒ अदि॑तेः॒ प्र जी॒वसे॒ मर्त्या॑य । ज्योति॒र्यच्छ॒न्त्यज॑स्रम् ॥ ३३ ॥ अर्थ - कारण कीं ते मित्र, अर्यमा व वरुण अखंडित-शक्ति अशा अदितीचे पुत्र आहेत. म्हणून ते यजमानाला उष्कळ दिवस जिवंत राहण्याकरितां निरंतर तेज देतात. ॥ ३३ ॥ क॒दा च॒न स्त॒रीर॑सि॒ नेन्द्र॑ सश्चसि दा॒शुषे॑ । अर्थ - हे इंद्रा, तूं केव्हांही नाश करणारा नाहींस व हविर्दान करणाऱ्या यजमानाचें तूं सेवन करतोस म्हणजे त्याला प्राप्त होतोस. आणि धनवान इंद्रा, प्रकाशमान अशा तुला दिलेलें पुष्कळ द्रव्य लवकरच त्या हविर्भाग देणाऱ्या यजमानाला प्राप्त होतें. ॥ ३४ ॥ तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि । अर्थ - त्या प्रकाशक प्रेरक अशा आदित्यांतर्गत पुरुषरूपी ब्रह्माचें सर्वांनी प्रार्थना करण्यास योग्य असें जें सर्व संसारनाशक तेज आहे त्याचें आम्ही ध्यान करतो. तो सविता आमच्या बुद्धीला सत्कर्मानुष्ठानाची प्रेरणा करो. ॥ ३५ ॥ परि॑ ते दू॒डभो॒ रथो॒ऽस्माँ२ अ॑श्नोतु वि॒श्वतः॑ । अर्थ - हे अग्ने, ज्यायोगें तूं सर्व हविर्दान करणाऱ्या यजमानांचे रक्षण करतोस तो तुझा अविनाशी रथ आमचें (यजमानांचे) रक्षण करो. ॥ ३६ ॥ विनियोग - 'भूः र्भुवः स्वः' या मंत्रानें गार्हपत्य व आहवनीय या दोन्ही अग्नीचें उपस्थान करावें. यजमान ज्या वेळीं ग्रामांतराला जाण्याची इच्छा करतो त्यावेळी त्यानें 'नर्य' इत्यादि मंत्रानें तिन्ही अग्नींचे उपस्थान करावें. भूर्भुवः॒ स्वः सुप्र॒जाः प्र॒जाभिः॑ स्याँ सु॒वीरो॑ वी॒रैः सुपोषः॒ पोषैः॑ । अर्थ - हे अग्ने भुः भुवः स्वः या तीन व्याहृतिरूपी असा तूं आहेस. म्हणून तुझ्या प्रसादानें मी बंधुभृत्यादि प्रजेनें युक्त व अनुकूल प्रजावान होईन. तसेंच शास्त्रमार्गवर्ती अशा पुत्रांनी युक्त होईन व हिरण्यादि द्रव्यानें पुष्टिमान होईन. हे मनुष्यांचे हित करणाऱ्या गार्हपत्य अग्ने, माझ्या प्रजेचें रक्षण कर. अनुष्ठान करणाऱ्यांनी स्तुति करण्यास योग्य अशा हे आहवनीय अग्ने, माझ्या प्रजेचें रक्षण कर. हे अथर्व म्हणजे सर्वदा राहणाऱ्या दक्षिणाग्ने, आमच्या अन्नाचें रक्षण कर. ॥ ३७ ॥ विनियोग - प्रवासांतून आल्याबरोबर इतर कोणाचीही भेट न घेतां हातांत समिधा घेऊन अग्निशाळेंत जाऊन 'आगन्म' इत्यादि तीन मंत्रांनी आहवनीयादि तीन अग्नींचे उपस्थान करावें. आ ग॑न्म वि॒श्ववे॑दसम॒स्मभ्यं॑ वसु॒वित्त॑मम् । अर्थ - हे सर्व प्रकाशमान आहवनीय अग्ने, आम्ही परगांवाहून तुझ्या हेतूनें आलों. तूं सर्वज्ञ व सर्व धनवान आहेस व आमच्याकरितां धन मिळविणारा आहेस. हे अग्ने, तूं आम्हाला कीर्ति व बल दे. ॥ ३८ ॥ अ॒यम॒ग्निर्गृ॒हप॑ति॒र्गाहप॑त्यः प्र॒जाया॑ वसु॒वित्त॑मः । अर्थ - हा पुढें असलेला गार्हपत्य अग्नि घराचा पालक आहे व पुत्रपौत्रादिक प्रजेकरितां अतिशय द्रव्य मिळविणारा आहे. हे गार्हपत्य अग्ने, तूं आम्हाला यश व बल दे. ॥ ३९ ॥ अ॒यम॒ग्निः पु॑री॒ष्यो॒ रयि॒मान् पु॑ष्टि॒वर्ध॑नः । अग्ने॑ पुरीष्या॒भि द्युम्नम॒भि सह॒ आ य॑च्छस्व ॥ ४० ॥ अर्थ - हा दक्षिणाग्नि पशूंना हितकारक, धनवान व पोषण करणारा आहे म्हणून हे पशुहित करणाऱ्या दक्षिणाग्ने, आम्हाला कीर्ति व बल दे. ॥ ४० ॥ विनियोग - नंतर 'गृहामा' इत्यादि तीन मंत्र म्हणून आपल्या राहत्या घरांत यावे. गृहा॒ मा बि॑भीत॒ मा वे॑पध्व॒मूर्जं॒ बिभ्र॑त॒ एम॑सि । अर्थ - हे गृहांनो, पालक यजमान गांवी गेला अशा समजुतीनें आतां तुम्ही भिऊं नका, व कोणी शत्रु येऊन तुमचा नाश करील म्हणून आपल्या अंगाचा थरकांप करून घेऊं नका. कारण आम्ही बळ धारण करणाऱ्या अशा तुम्हांपत प्राप्त झालों आहों. ज्याप्रमाणें तुम्ही बल धारण करतां त्याप्रमाणें मीही बल धारण करून उत्तम मनाचा व चांगल्या बुद्धीचा होऊन दुःखरहित अंतःकरणानें तुम्हाला प्राप्त होतों. ॥ ४१ ॥ येषा॑म॒ध्येति॑ प्र॒वस॒न्येषु॑ सौमन्॒असो ब॒हुः । अर्थ - देशांतरांत जात असतांना यजमान ज्या घराचे स्मरण करतो व ज्या घराविषयीं त्याला अतिशय प्रीति असते त्य घरांना आम्ही बोलावतो. ती गृहें (त्या गृहदेवता) आम्हाला कृतज्ञ समजोत. म्हणजे आम्ही कृतघ्न होणार नाहीं असे गृहदेवतांनी समजावे. ॥ ४२ ॥ उप॑हूता इ॒ह गाव॒ उप॑हूता अजा॒वयः॑ । अर्थ - ह्या गृहामध्यें धेनु, बैल, बकऱ्या, मेंढ्या आमच्या अनुज्ञेनें सुखानें राहोत. तसेंच अन्नाचा विशेष रस आमच्या घरांत आमच्या अनुज्ञेनें समृद्ध असो. हे गृहांनो, तुम्हाला मी प्राप्त होतों. तुम्ही आमच्या द्रव्याचें रक्षण करा व आमच्या सर्व अनिष्टांची शांति करा. मी अत्यंत सुखाची इच्छा करणारा आहें म्हणून मला ऐहिक आणि पारलौकिक असें दोन्ही तऱ्हेचें सुख प्राप्त होवो. ॥ ४३ ॥ विनियोग - प्रतिप्रस्थात्यानें पत्नीला नेत असतां 'प्रघासिनः' हा मंत्र तिच्याकडून म्हणवावा. प्र॒घा॒सिनो॑ हवामहे म॒रुत॑श्च रि॒शाद॑सः । अर्थ - आम्ही मरुद्गणांना बोलावतो. ते मरुत्देव प्रघासी नामक आहेत. म्हणजे प्रघास नांवाचा हविर्भाग भक्षण करणारे आहेत. हे मरुत्गण शुक्रज्योति इत्यादि संज्ञक आहेत व ते हिंसा करणारांचे नाशक आहेत. त्याचप्रमाणे त्यांना करंभ नांवाचे यवमय हविर्द्रव्य आवडतें. ॥ ४४ ॥ विनियोग - यवपिष्टाची बनविलेलीं करंभपात्रें सुपांत घेऊन यजमानपत्नीनें अथवा यजमान व यजमान पत्नी ह्या दोघांनी दक्षिणाग्नींत 'यद्वामे' या मंत्रानें होम करावा. यद्ग्रामे॒ यदर॑ण्ये॒ यत्स॒भायां॒ यदि॑न्द्रि॒ये । अर्थ - गांवांत तसेंच रानांत रहात असतां व सभेंत बसलो असतां आणि इंद्रियांच्या प्रीतीनें आम्ही जें पाप केलें तसेंच नोकरादिकांना मारण्यानें आम्हांकडून जें पाप घडतें त्या सर्व पापांचा ह्या आहुतीनें आम्ही नाश करूं. हें हविर्द्रव्य आम्हीं देवतेला दिलें असो. ॥ ४५ ॥ विनियोग - यजमानानें 'मोषूणः' या मंत्राचा जप करावा. मो षू ण॑ इ॒न्द्राय॑ पृ॒त्सु दे॒वैरस्ति॒ हि ष्मा॑ ते शुष्मिन्नव॒याः । अर्थ - हे इंद्रा, ह्या संग्रामामध्यें देवांसहवर्तमान असलेला तूं आमचा थोडाही नाश करूं नकोस. हे बलवान इंद्रा, तुझा या यज्ञांत पृथक् भाग आहे. वृष्टि करून जलसिंचन व हवियोग्य अशा तुझी यवमय करंभपात्रानें केलेली होमक्रिया तुझी पूजाच आहे. त्या पूजेनें युक्त होऊन तूं आमच्यावर कृपा कर. आमची स्तुतिरूपी वाणी मरुत्देवांना नमस्कार करते. ॥ ४६ ॥ विनियोग - 'अक्रन्कर्म' हा मंत्र यजमानपत्नीकडून म्हणवावा. अक्र॒न् कर्म॑ कर्म॒कृतः॑ स॒ह वा॒चा म॑यो॒भुवा॑ । अर्थ - वरुणप्रघास कर्म करणारे ऋत्विज सुखकारक मंत्ररूप स्तुतीनें तें कर्म करते झाले. यजमान व यजमानपत्नीसहवर्तमान असलेल्या हे ऋत्विजांनो, तुम्ही देवाकरितां वरुणप्रघास कर्म करून स्वगृहाप्रत जा. ॥ ४७ ॥ विनियोग - अवभृथ कर्मामध्यें 'अवभृथ' या मंत्रानें यजमान व यजमानपत्नींनी जलांत स्नान करावें. अव॑भृथ निचुम्पुण निचे॒रुर॑सि निचुम्पु॒णः । अर्थ - हे अवभृथा यज्ञा,(या यज्ञांत वरुणप्रघास कर्माचे शेवटी पालथी पात्रें पाण्यानें बुडविली जातात. म्हणून यांना अवभृथ असें म्हणतात. तसेंच ऋत्विज या यज्ञांतील कर्म मंदस्वरानें करतात म्हणून याला निचुंपुण म्हणतात). जरी तूं अतिशय गमनशील आहेस तरीही मंदगमन करणारा हो. मी त्यायोगें आमच्या इंद्रियांनी हविर्भागांचे स्वामी जे देव त्यांचे ठायीं केलेलें पाप पाण्यामध्यें बुडवितो. तसेंच आमचे साहाय्य करणारे जे ऋत्विज त्यांनी यज्ञ पाहण्याकरितां येणाऱ्या लोकांची अवज्ञा करून जें पाप केलें तेंही मी पाण्यांत बुडवितो. हें आम्ही टाकलेले पाप तुला व्याप्त न करो म्हणून तूं हळू गमन कर. आणि हे अवभृथ यज्ञा, तुझ्या प्रसादानें पुष्कळ विरुद्ध फल देणारा आमचा वध न होवो म्हणजे आम्हाला विरुद्ध फल तेणारें पाप न लागो. ॥ ४८ ॥ विनियोग - 'पूर्णादर्वि' या मंत्रानें दर्वीनें स्थालींतून ओदनाचें ग्रहण करावें. (हें साकमेधांतील कर्म आहे.) पूर्णा द॑र्वि॒ परा॑ पत॒ सुपू॑र्णा॒ पुन॒रा प॑त । अर्थ - अन्नदान साधनभूत अशा हे काष्ठनिर्मित दर्वी (पळी), तूं स्थालींतून अन्न घेऊन पूर्ण हो. पूर्ण अशी तूं उचलल्यावर इंद्राप्रत जा. तेथें कर्मफलानें पूर्ण होऊन पुनः आमचेकडे ये. हे इंद्रा, तूं आणि मी असे दोघे किंमत देऊन एकमेकांकडून हविस्वरूपी अन्न व हविर्दान फलरूपी रस विकत घेऊं म्हणजे हे इंद्रा, मी तुला हवि देतों व तूं मला फल दे. अशा रीतीनें एकमेकांमध्यें देवघेव करूं. ॥ ४९ ॥ विनियोग - 'देहिमे' या मंत्रानें त्या ओदनाचा होम करावा. दे॒हि मे॒ ददा॑मि ते॒ नि मे॑ धेहि॒ नि ते॑ दधे । अर्थ - हे यजमाना, तूं मजकारणें (इंद्राकारणे) प्रथम हवि दे व मी पुष्कळ अपेक्षित फल तुला देईन. हें इंद्रवाक्य ऐकल्यावर यजमान म्हणतो, किंमत देऊन विकत घेण्यासारखें हे फल हे इंद्रा, तूं मला दे व मूल्यभूत हविर्द्रव्य मी तुला देतों. हें हवि सुहुत असो. ॥ ५० ॥ विनियोग - साकमेधांतील पितृयज्ञकर्मांमध्यें सर्वांनी यज्ञोपवीती होऊन 'अक्षन्नमीमदंत' इत्यादि दोन मंत्रांनी आहवनीयाचें उपस्थान करावें. अक्ष॒न्नमी॑मदन्त॒ ह्य॑व प्रि॒या अ॑धूषत । अर्थ - पितृयज्ञ नांवाच्या कर्मांत जे पितर आहेत ते आम्हीं दिलेले हवि भक्षण करते झाले. कारण ते संतुष्ट होऊन आमची भक्ति पाहून आपली मान संतोषानें हलविते झाले. आणि स्वयंप्रकाश युक्त ब्राह्मण धारणाशक्तीनें युक्त होऊन व नवीन बुद्धि धारण करून स्तुति करते झाले. अहो या यजमानानें पुष्कळ गोड अन्न आम्हाला दिलें. याची स्तुति भक्ति स्तुत्य आहे, म्हणून हे इंद्रा, हिरव्या वर्णाचे दोन घोडे तूं आपल्या रथाला लवकर जोड व तृप्त होऊन पितरांसहवर्तमान गमन कर. ॥ ५१ ॥ सु॒स॒न्दृशं॑ त्वा व॒यं मघ॑वन्वान्दिषी॒महि॑ । अर्थ - हे इंद्रा, सर्वांवर अनुग्रह करणाऱ्या अशा तुझी आम्ही स्तुति करतों. अशा तऱ्हेनें आम्हीं स्तुति केलेला तूं कामना करणाऱ्या यजमानाकडे अवश्य गमन करतोस, व जातांना स्तोत्यांना द्यावयाची द्रव्यें आपल्या रथांत भरून नेतोस. हे इंद्रा, तूं आपले हरित वर्णाचे घोडे रथाला जोड. ॥ ५२ ॥ विनियोग - 'मनो न्वाह्वामहे' इत्यादि तीन मंत्रांनी सर्वांनी गार्हपत्याचें उपस्थान करावें. मनो॒ न्वाह्वा॑महे नाराशँ॒सेन॒ स्तोमे॑न । अर्थ - पितृयज्ञाच्या अनुष्ठानानें चित्त परलोकांत गेल्यासारखें होतें. म्हणून नाराशंस नांवाच्या स्तोत्रानें त्याला आम्ही बोलावतो. [नाराशंस ह्याचा अर्थ - मनुष्याची योग्य स्तुति तें नराशंस. तत्संबंधी जें स्तोत्र ते नाराशंस. हें स्तोत्र दोन प्रकारचें आहे. दैव व मानुष. देवाची ज्यायोगें स्तुति करतात ते दैव. व ज्यायोगें मनुष्याची स्तुति करतात तें मानुष]. तसेंच आम्ही पितरांना मननीय अशा स्तोत्रांनीही पितृलोकगमनाचें आव्हान करतो. ॥ ५३ ॥ आ न॑ एतु॒ मनः॒ पुनः॒ क्रत्वे॒ दक्षा॑य जी॒वसे॑ । अर्थ - आमचें मन यज्ञाचा संकल्प करण्याकरितां व कर्मामध्यें उत्साह प्राप्त होण्याकरितां पुनः प्राप्त होवो. आणि पुष्कळ दिवस वांचण्याकरितां व चिरकाल सूर्याचें अवलोकन करण्याकरितां तें मन पुनः आम्हाला प्राप्त होवो. ॥ ५४ ॥ पुन॑र्नः पितरो॒ मनो॒ ददा॑तु॒ दैव्यो॒ जनझ् । अर्थ - हे पितरांनो, तुमच्या आज्ञेने दैवी पुरुष आमचें मन पुनः आम्हाला देवोत. त्यानंतर प्रसादानें जिवंत असा पुत्र व पशुसमुदाय आम्हाला प्राप्त होवो. ॥ ५५ ॥ विनियोग - 'वयःसोम' या सोमदेवताक गायत्री मंत्राचा जपांत विनियोग आहे. व॒यँ सो॑म व्र॒ते तव॒ मन॑स्त॒नूषु॒ बिभ्र॑तः । अर्थ - हे सोमा, तुझें कर्म करणारे आम्ही तुझ्या शरीरामध्यें चित्त स्थापन करूं व तुझ्या प्रसादानें पुत्रपौत्रादि संपन्न होऊन सेव्य वस्तूंचें सेवन करूं. ॥ ५६ ॥ ए॒ष ते॑ रुद्र भा॒गः स॒ह स्वस्राम्बि॑कया॒ तं जु॑षस्व॒ स्वाहै॒ ष ते॑ रुद्र भा॒ग आ॒खुस्ते॑ प॒शुः ॥ ५७ ॥ अर्थ - हे रुद्रा, तूं आपल्या अंबिका नांवाच्या बहिणीसह आम्ही दिलेला पुरोडाश (हविर्द्रव्य) सेवन कर. आम्ही दिलेले हवि सुहुत असोत. हे रुद्रा, हा आम्ही दिलेला पुरोडाश तूं सेवन करावा. तसेंच मूषक नांवाचा पशु तुला आम्ही समर्पण केला आहे. ॥ ५७ ॥ विनियोग - 'अवरुद्रमदीमहि' इत्यादि दोन मंत्रांचा जप करावा. अव॑ रु॒द्रम॑दीम॒ह्यव॑ दे॒वं त्र्य॑म्बकम् । यथा॑ नो॒ वस्य॑स॒स्कर॒द्यथा॑ नः॒ श्रेय॑स॒स्कर॒द्यथा॑ नो व्यवसा॒यया॑त् ॥ ५८ ॥ अर्थ - मनांत रुद्राचें व त्र्यंबकाचें ध्यान करून किंव इतर देवतांहून वेगळें करून आम्ही रुद्राला अन्न खाऊं घालतो. तो रुद्र आम्हाला निवसनशील (राहणारे) व ज्ञातीमध्यें श्रेष्ठ करो. तसेंच त्यानें आम्हाला सर्व कार्यांमध्यें निश्चययुक्त करावें म्हणून आम्ही त्याला जप करतो. ॥ ५८ ॥ भे॒ष॒जम॑सि भेष॒जं गवेऽश्वा॑य॒ पुरु॑षाय भेष॒जम् । अर्थ - हे रुद्रा, तूं औषधाप्रमाणें सर्वोपद्रवनिवारक आहेस म्हणून आमच्या गाय, घोडा व नौकर यांना सर्वव्याधिनिवारक औषध दे व मेंढा आणि मेंढी यांच्या प्राणांना हितकारक असें औषध दे. ॥ ५९ ॥ विनियोग - ज्याप्रमाणें पितृमेधांत तीन वेळां पुत्रादिकांनी उलटी प्रदक्षिणा करावयची असते व देवतापूजेच्या वेळी तीन वेळं सुलटी प्रदक्षिणा करावयाची असते, त्याप्रमाणें येथें सर्वांनी 'त्र्यंबकम्' या मंत्रानें अग्नीला तीन उलट्या व तीन सुलट्या प्रदक्षिणा घालाव्या. त्याप्रमाणेंच यजमानाच्या घरच्या कुमारिकांनीही त्र्यंबकम् या उत्तरार्धांतील मंत्रानें अग्नीला तीन प्रदक्षिणा घालाव्या. अर्थ - दिव्यगंधयुक्त, मरणरहित, धनधान्य वाढविणारा त्रिनेत्र जो रुद्र त्याची आम्ही पूजा करतो. त्यायोगें आम्ही अपमृत्यूपासून व संसारमृत्यूपासून मुक्त होऊं. ज्याप्रमाणें काकडीचें फळ अतिशय पक्व झाल्यावर आपल्या देंठापासून तुटतें त्याप्रमाणें आम्ही मृत्यूपासून सुटूं. अभ्युदय व निश्रेयसरूपी अमृतापासून मात्र आमचा संबंध सुटूं नये. (पुढील वाक्य कुमारिकांचे आहे) पति मिळवून देणारा सुगंधविशिष्ट त्रिनेत्र जो इंद्र त्याची आम्ही पूजा करतो. कांकडीचें फळ पिकल्यावर देंठापासून सुटतें त्याप्रमाणें आम्ही आई, बाप, भाऊ वगैरे माहेरच्या मंडळींपासून, त्या कुलापासून व घरांपासून दूर जाऊं. मात्र आम्ही त्र्यंबकप्रसादानें पतीपासून दूर न जावें म्हणजे पतिगोत्रांतच रहावें. ॥ ६० ॥ विनियोग - व्रीहि व यव इत्यादिकांच्या गाठोड्या बांधून बांबूच्या कावडीच्या दोन्ही शिंक्यांत हविर्द्रव्याचे अवशिष्ट घालून ती कावड उंच वृक्षावर, बांबूवर अथवा वारुळावर 'एतत्ते' या मंत्रानें ठेवावी. ए॒तत्ते॑ रुद्राव॒सं तेन॑ प॒रो मूज॑व॒तोऽती॑हि । अव॑ततधन्वा॒ पिना॑कावसः॒ कृत्ति॑वासा॒ अहिँ॑सन्नः शि॒वोऽती॑हि ॥ ६१ ॥ अर्थ - हे रुद्रा, हें तुझें अवसनांवाचें हविःशेष भोज्य आहे (अवस म्हणजे प्रवासांत तळ्याजवळ वगैरे मुक्काम केला असतां खावयाचें भात वगैरे अन्न) त्यासहवर्तमान तूं धनुष्याची दोरी सोडून (एका टोकाची दोरी सोडून) मुंजवान पर्वताच्या पलिकडे जा. (मुंजवान नांवाचा पर्वत रुद्राची निवासभूमि आहे) तसेंच प्रवासांत जातांना तूं तुझें पिनाक नांवाचे धनुष्य सर्व बाजूंनी झांकून घे. म्हणजे प्राणी धनुष्य पाहून भिणार नाहींत. हे रुद्रा, तूं कातड्याचें वस्त्र पांघरून हिंसा न करतां आमच्या पूजेनें संतुष्ट होऊन मुंजवान पर्वत ओलांडून जा. ॥ ६१ ॥ विनियोग - यजमानानें 'त्र्यायुष्यम्' या मंत्राचा जप करावा. त्र्या॒यु॒षं ज॒मद॑ग्नेः क॒श्यप॑स्य त्र्यायु॒षम् । अर्थ - जमदग्नि व कश्यप आणि इंद्रादि देव यांनी बाल्य, तारुण्य व वार्धक्य यांमध्यें जशीं चांगली चरित्रें केलीं तशी आमच्या हातून होवोत. ॥ ६२ ॥ विनियोग - 'शिवोनानासि' या मंत्रानें लोहक्षुराचे (वस्तऱ्याचें) ग्रहण करावें व 'निवर्तयामि' य मंत्रानें मुंडण करावें. शि॒वो नामा॑सि॒ स्वधि॑तिस्ते पि॒ता नम॑स्ते अस्तु॒ मा मा॑ हिँसीः । अर्थ - हे वस्तऱ्या, तू शांत नांवाचा आहेस. तुझा पिता वज्र आहे. मी तुला नमस्कार करतो. हिंसा करूं नकोस. हे यजमाना, पुष्कळ दिवस वांचण्याकरितां, अन्नभक्षणाकरितां, संततिकरितां, द्रव्यवृद्धीकरितां व चांगले अपत्य होण्याकरितां आणि उत्तम सामर्थ्य प्राप्त व्हावें म्हणून मी तुझें मुंडन करतो. ॥ ६३ ॥ ॥ तृतीयोऽध्यायः ॥ |