ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

सुवर्णबिन्दुरक्ष्योभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः ।
महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधिः ॥८६॥


८००. सुवर्ण-बिन्दु
सुवर्ण-बिन्दु हे आठशेवें नाम गणले आहे. परंतु इथून नवीन श्लोक सुरू होत आहे. नवीन श्लोकापासून नवीन शतक गणतां आल्यास चांगलें. प्रत्येक शतक नवीन श्लोकानें सुरू होऊन श्लोकसमाप्तीबरोबरच तें संपेल अशी रचना वा गणना करता आल्यास ती सुरूप होईल. पण ही दशशतक-रचना नसून एक सहस्ररचना असल्यामुळे शतकांचे असे सर्ग इथे पडत नाहीत. त्यामुळे शतक मधूनच सुरू होऊन मध्येच समाप्त होते. सुवर्ण-बिन्दु आणि अक्षोभ्य ही दोन नामें क्रमानें आली आहेत. हा क्रम साभिप्राय दिसतो. बिन्दुपदाच्या विरोधानें नव्हे तर पार्थक्यानें सिन्धुवाची अक्षोभ्य पद आलें आहे. बिन्दु तरल आहे तर सिन्धु अचलप्रतिष्ठ आहे. पण इथें तर हा बिन्दु सुवर्ण हटला आहे. आणि सुवर्ण तर आहे एक घनिष्ठ द्रव्य. परमात्मा हा सुवर्णबिन्दु म्हटला आहे. त्यांत सुवर्णानें त्याचे आकर्षकत्व आणि बिन्दूनें त्याचे सूक्ष्मत्व द्योतित केले आहे. योगी एकाग्रतेसाठी बिन्दुध्यान करतात, नादानुसंधात करतात. नयनमनोयोगपूर्वक करावयाच्या ध्यानाचें आलंबन तो बिन्दु होय. हा बिन्दु परमात्मस्वरूपच हाय. तो स्थूलांतून सूक्ष्मांत, सुक्ष्ातून अव्यक्तांत, अव्यक्तांतून निर्गुणांत योग्याला वाहून त्या परमात्मसंज्ञक अमृत-सिन्धूत नेऊन सोडतो. बिन्दूचे हे बिन्दुत्व होय, तरलत्व होय, प्रदाहित्व होय. या बिन्दूच्या साहाय्यानें योगी सिन्धु गांठतो त्यामुळे तो बिन्दु त्याला सोन्यासारखा किंमती वाटल्यास नवल काय ? त्याला त्यानें सुवर्ण बिन्दु म्हणणे युक्तच आहे.

शतक नववें

८०१. अक्षोभ्य
न क्षोम्यः अक्षोभ्यः । जो मुळीं क्षोभच पावत नाहीं तो म्हणावयाचा अक्षोभ्य. सामान्यतः शान्तीला अक्षोभ्य हे विशेषण जोडले जाते. कित्येक लोक उथळ असतात. थोड्याशा कारणानें ते क्षुब्ध होतात आणि परत लवकरच शान्तहि होऊन जातात. दुसरे काही गंभीर असतात. ते सहसा क्षुब्ध होत नाहीत. याहूनहि एक तिसरी कोटी आहे. त्या पराकोटीचे लोक मुळी कधीं क्षोभच पावत नाहीत. पहिले क्षुद्र जलाशयासारखे, दुसरे समुद्रासारखे तर तिसरे आकाशा सारखे म्हणावयाचे. परमात्मा हा तिसऱ्या कोटीचा. सृष्टीच्या सर्गप्रलयांचा यत्किंचित्हि परिणाम होऊं शकत नाहीं त्यावर, "जगें येवोत जावोत तो अभंग जसा तसा' असतो. याच लक्षणाला अनुसरूच "अक्षरं ब्रह्म परमम्" "निर्दोषंहि समं ब्रह्म" इत्यादि वचनें आली आहेत. जो मुळी क्षोभच पावत नाही त्याला शान्त म्हणणे म्हणजे त्यावर आधी अशान्तीचा आरोप करण्यासारखेच होय. म्हणून परमात्म्याला शान्त म्हणण्याऐवजी अक्षोभ्य म्हटले आहे. तो अक्षुब्धहि म्हटला नाही. कारण समुद्र हा अक्षुब्ध दिसला तरी तो प्रलय काळी प्रक्षुब्ध होतो. एरव्हींहि तो क्षुब्धच असतो, पण त्याच्या सखोलतेमुळे व विशालतेमुळे तसें दिसत नाही इतकेंच, म्हणजे तो क्षोभ्य आहे. पण परमात्मा हा मुळीं क्षोभ पावणेच शक्य नाही. म्हणून तो अक्षोभ्य म्हणावयाचा. तो अविकार शान्त म्हणजेच निर्दोष सम असतो. त्याच्या साम्यांत, त्याच्या सहज स्थितींत केव्हांहि चलबिचल व्हावयाची नाहीं; त्याच्या आंतहि नाही आणि बाहेरहि नाही. कारण त्याला मुळी आंत बाहेरच नाही. तो 'पाठ ना पोट अवघा निघोट' आहे.

८०२. सर्ववागीश्वरेश्वरः
सर्वेषां वागीश्वराणां ईश्वरः सर्ववागीश्वरेश्वरः । जो समस्त वाक्पतींचा पति तो म्हणावयाचा सर्ववागीश्वरेश्वर. वाणी चार मानिल्या आहेत. परा पश्यन्ती मध्यमा आणि वैखरी. आपले सर्व व्यवहार वैखरीनें चाललेले असतात. अर्थात् वैखरी म्हणजे व्यक्त वाणी. या व्यक्त वाणीचे भेद असंख्यच आहेत. त्यांपैकी एक म्हणजे आपली मातृभाषा. तिच्या व्याकरणावर व शब्दसंपत्तीवर आणि तद्वारा साहित्यावर ज्याचे प्रभुत्व असेल त्याला वाक्‌प्रभु म्हणता येईल. असे वाक्‌प्रभु हे गौरवानेच वाक्‌प्रभु म्हणावयाचे. कारण वैखरी च्या अंशांशाचेच ते प्रभु असतात. पुनः वैखरी ही वाणीचा एक पाद होय. तिचे तीन पाद तर निगूढच राहतात. म्हणून अन्वर्थकतेनें वागीश्वर कोणी विरळाच म्हणावा लागेल. तो कोण ? विचार उच्चार आणि आचार हे आत्मप्रकाशनाचे उत्तरोत्तर स्थूल प्रकार आहेत. या तिहींवरहि ज्याचें पूर्ण प्रभुत्व आहे तोच वागीश्वर म्हणावयाचा, या तिन्ही विधांत आत्मनिष्ठारूप वा सत्यनिष्ठारूप एकता ज्यानें संपादिली तो वागीश्वर. तो सत्याचा विचार करतो, सत्याचा उच्चार करतो, सत्याचाच आचार करतो. मनानें असत्याचे चिंतन, वाणीनें असत्याचे उच्चारण आणि देहानें असत्याचे आचरण त्याच्याकडून होत नाही, असे जे वागीश्वर त्या सर्वांचा ईश्वर तो अव्यक्त अक्षर परमात्मा होय. कारण त्याच्याच आधारानें मन चिन्तन करीत असते, वाणी उच्चारण करीत असते आणि देह आचारण करीत असतो.

"केनेषितं पतति प्रेषितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः ।
केनेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षुः श्रोत्रं कउ देवो युनक्ति ॥ "

परा पश्यन्ती मध्यमा आणि वैखरी अथवा मन प्राण वाणी आणि इन्द्रिये यांचा प्रेरक व नियन्ता तो परमात्मा आहे. म्हणून तो सर्ववागीश्वरेश्वर म्हटला आहे. परा व पश्यन्ती अथवा मन व प्राण हे अन्तर्गत आहेत. मध्यमा व वैखरी अथवा वाणी आणि इन्द्रिय बहिर्गत आहेत.

८०३. महाह्रद
महाश् च असौ ह्रदश् च महाह्रद । जो मोठा असून ह्रद आहे तो महाह्रद म्हणावयाचा. ह्रद म्हणजे डोह. मराठी डोह शब्दहि संस्कृत ह्रद वरूनच वर्णव्यत्यासानें आलेला आहे. महाह्रद पदापासून सुरू होणाऱ्या श्लोकार्धात महाचे सूत्र आहे. त्यांतहि दोन दोन पदांची जोडी आहे. महाह्रद पद अथांग खोली दाखवितें तर महागर्त पद अनुलंघ्य अंतर दाखवितें. एक जलीय आहे, तर दुसरें स्थलीय आहे. दुसऱ्या जोडींत महाभूत पद भूशृंगाचा संकेत करतें तर महानिधि पद भूगर्भाचा. एक प्रकट तर दुसरें गूढ. परमात्म्याला महाह्रद म्हणण्यांत काय आशय ? सरीसृप पशु पक्षी इत्यादि सर्व जीव वणव्याच्या वा सूर्याच्या तापापासून आपला बचाव करण्यासाठी जलाचा आश्रय करतात. जलांतील जीव उथळ जलाशयें सोडून खोल जलाशयांत आश्रय घेतात.हिमालयाच्या जंगलांतील वणव्यांत सांपडलेला गजेन्द्र आपल्या कळपाला घेऊन गंगेच्या पात्रांत जाऊन उभा राहतो. खोल जलांत जाऊन डुंबतो. डबक्यांतला जीव तलावांत जातो, तीरावरील डोहांत शिरतो, अशा प्रकारें जल आणि त्याचीहि खोली जीवाचें शरण आहे, सुखधाम आहे. परमात्मा हा तसा आध्यात्मिक आधिदैविक व आधिभौतिक या त्रिविध तापांपासून जीवाला वाचविणारा व निरुपाधिक आन्तरिक परम शीतलता देणारा आहे. म्हणून त्याला महाह्रद म्हटले आहे. महाह्रदप्रमाणें परम आल्हाद देणारा म्हणून तो महाह्रद म्हणावयाचा. महिम्‍नांत म्हटले आहे "यदालोक्याल्हादं ह्रद इव निमज्यामृतमये, दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस् तत् किल भवान् ।

८०४. महागर्त
महांश् च असौ गर्तश् च महागतः । जो महान् म्हणजे खोलच खोल आणि गर्त म्हणजे खड्डा आहे तो म्हणावयाचा महागत. परमात्म्याला. मागील नामांत खोलच खोल डोह म्हटलें तर इथे खोलच खोल खड्डा म्हटले आहे. एका बाजूनें तो अथांग जीवन आहे तर दुसऱ्या बाजूनें तो सर्व जीवनाचा अन्त आहे.खोल खड्डयांत पडलेला प्राणी जसा तिथेच गडप होऊन जातो त्याप्रमाणेंच या परमात्म्याच्या ठायीं ही विश्वें गडप होऊन जातात. त्यांचा कुठे मागमूसहि लागत नाही. दरीत पडलेल्या वरीचा शोध कसा लागायचा ? कुठे ती तळहीन खोली आणि कुठे हे अकिंचित् विश्व ! तो परमात्मा 'शान्तं शिवं अद्वैतम्' म्हणून वर्णिला . आहे. त्याच्या ठाईं त्याच्या त्या निःस्पंद अगाधतेत सृष्टीची सारी धडपड,खटपट यातायात शान्त होते, सगळे अशिव, सगळे पाप भस्म होऊन जाते, मंगल होऊन जाते. श्मशानांत सारें सडकें कुजकें दुर्गन्ध जळून निर्मळ होते, उज्वल होतें सुंदर होतें. तिथे द्वैत उरत नाही, तिथे दुजा नाही दुजाची छाया उरत नाही, त्याचे नांव नाही. सगळे एकाकार. तें जें शान्त शिव तत्त्व तेंच इथे महागर्त म्हणून संबोधिलें आहे. त्यांत विश्व आणि त्याची सारी हालचाल त्याचें सारें अमंगल आणि अशुभ, त्याचें सारें द्वैत, भय नि भांडण समाप्त होते. उरतें तें एक अचिन्त्य नि अगाध खोलच खोल तत्त्व. तोच महागर्त होय. गर्त शब्द रथपर्याय म्हणूनहि नैरुक्तिकांनी दिला आहे. तदनुसार महागर्त म्हणजे महारथ. पण संदर्भावरून इथे रथ हा अर्थ अभिप्रेत दिसत नाही. कदाचित् गर्त शब्द मूलतः कर्त असा असावा.

८०५. महाभूत
महाश् च असौ भूतश् च महाभूतः । जो महान् असून भूत म्हणजे सत्व होय तो महाभूत म्हणावयाचा. पंचमहाभूतें वेगळी. ती सगळी कल्पांन्तीं अव्यक्तांत लीन होतात. म्हणून अव्यक्त हे त्या महाभूतांहूनहि महान् होय. पण तेहि अक्षरांत लीन होते. आणि अक्षर असतें 'स्वे महिम्नि प्रतिष्ठित.' तें कोणांतच लीन होत नाही. म्हणून तेंच एक महाभूत होय. तें चिन्मय असल्यामुळे त्याला पुरुष संज्ञा आहे. इतर महाभूतें जड होत. म्हणून ती नपुंसक लिंगानें निर्देशिली जातात. महाभूतः आणि महाभूतानि यांमधील हे अन्तर लक्षणीय आहे. हाच आशय गीतेंत असा आला आहेः
अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंञ्ज्ञके ॥ गीता ८ - १८
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमे ऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ गीता ८ - १९
परस्तस्मात्तु भावो ऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ गीता ८ - २०
अव्यक्तो ऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ गीता ८ - २१
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वं इदं ततम् ॥ गीता ८ - २२

इथे आलेले भाव आणि पुरुष शब्द लक्षात घ्या. ते पुंल्लिंग असून नपुंसक भूत आणि अव्यक्त या शब्दांच्या पार्थक्यानें आलेले आहेत. लिंगाबरोबरच वचनाचेहि अंतर लक्षणीय आहे. ती अनेक आहेत. हा एकच आहे. अव्यक्त प्रकृति आणि अव्यक्त पुरुष याच्यांमधील अंतर प्रकृतीचे भाव सर्व क्षर आहेत तर परमात्मा हाच एक अक्षर आहे असे म्हणून दाखविलें आहे. अव्यक्त संज्ञा प्रकृति व पुरुष या दोहोंनाहि. असली तरी अक्षर ही संज्ञा केवल एका परमात्यालाच आहे. आणि तोच महाभूत. कारण तोच अव्यक्तासगट सर्व व्यक्तांना गिळून उरतो.

८०६. महानिधि
निधीयते अस्मिन् इति निधिः । महांश्च असौ निधिशच् महानिधिः । निधि म्हणजे सांठा. ज्यांत सर्व सांठलें आहे तो सांठा होय, निधि होय, जो महान् म्हणजे सर्वांत मोठा निधि तो म्हणावयाचा महानिधि. परमात्मा हा असा महानिधि आहे. कारण तो अक्षर आहे, अव्यक्त आहे. अक्षर असल्यामुळे तो अखूट आहे. त्याच्या खाणीतून कितीहि काढा त्याचे अक्षय भांडार रितें होण्याचें नांव नाहीं. जितक्या जितक्या म्हणून व्यक्ति म्हणजे प्रकटनें होतात ती सर्व त्या अक्षर आणि अव्यक्त भावांतून, त्या महानिधींतूनच येतात. आणि ती सगळी निहित होतात, शेवटीं गडप होतात तीहि त्यांतच. समुद्रांतून वाफ उठते, मेघ बनतात, ते वर्षतात, नद्या नाले वाहतात आणि हे सर्व प्रवाह शेवटी येऊन मिळतात समुद्रांत. त्या प्रमाणें जें कांहीं या सृष्टीत दिसतें तें सगळे नामरूपात्मक मूलतः त्या अव्यक्त अक्षर संज्ञक महानिधींतूनच येते आणि शेवटी आपलें नाम व रूप हारवून त्यांतच विलीन होतें. असा तो परमात्मा नामरूपाचा महानिधि आहे. सर्व नामें व सर्व रूपें त्यांतूनच निघून त्यांतच निमाली आहेत. आरंभी आणि अंती असतो तो एक अनाम नि अरूप महानिधि-संज्ञक परमात्मा. मध्यंतरी जे भासमान होतें तें सगळे हे नामरूपात्मक विश्व नाहींसेंच आहे. म्हणजे आहे एकच. दुसरें मुळीं नाहींच. "एकं सत् नेह नानास्ति किंचन' हा सर्व वेदान्त-सिद्धांतच सहस्रनाम प्रतिपादीत आहे, जो गीतेनें पुढील शब्दांत ग्रथित केला आहे.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस् तत्त्व-दर्शिभिः ॥ गीता २ - १६

"महाह्नदो महागर्तो महाभूतो महानिधिः" या श्लोकार्धात परमात्म्याचें हें दिक्कालाद्यनवच्छिन्नत्वरूप महत्त्वच परोपरीनें गाईलें आहे. परमात्मतत्त्व अगाध आहे, अनन्त आहे, असीम आहे, अक्षय आहे. असा त्याचा आशय. वस्तूला खोली लांबी रुंदी या त्रिपरिमाणांनी मापलें जातें शिवाय द्रव्यहि असतें वस्तूचें. हे चतुर्विध लक्षण लसून तें परमात्मतत्त्व सर्वविलक्षण आहे असें ही चार महापदें सुचवीत आहेत. परमात्मा हा सर्वथा अप्रमेय आहे.


कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः ।
अमृताशोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः ॥८७॥


८०७. कुमुदः
कुं पृथिवीं उदति क्लेदयति आर्द्रयति इति कुमुदः । जो भूमीला भिजवतो तो कुमुद म्हणावयाचा. परमात्मा संवत्सररूपानें या भूतधात्री धरेला वृष्टीनें भिजवितो, आपलें तेज तिच्या ठाई बीजरूपानें पेरतो आणि शेवटी पिकाची कापणी करतो. अशा प्रकारें तो आपल्या विश्वकुटुंबाचे भरण पोषण करीत आहे. ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे. हे एक जीवन-चक्र आहे. आणि 'कुमुदः कुंदरः कुंदः' या पदत्रयीनें तेंच व्यक्त केलें आहे. "तपाम्यहं, अहं वर्ष निगृहणाम्युतसृजामि च' या गीतावचनांत तेंच संवत्सरचक्र वा जीवनचक्र निर्दिष्ट झाले आहे. तिथें तें उन्हाळा (तपामि) (वर्ष निगृह्णामि) (हिवाळा) आणि पावसाळा (वर्ष उत्सृजामि) अशा उलट क्रमानें आले आहे. इथे कुमुदः कुंदरः कुंदः मधे ते पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा वा पेरणी निंदणी कापणी अशा सरळ क्रमानें आले आहे. पावसाळ्यांत जलवृष्टि होते, तर हिवाळ्यांत दववृष्टि होते, पण भूमि भिजल्या शिवाय पेरणी नाही. त्यानंतर पिकाच्या वाढीसाठी वृष्टिनिग्रहाची गरज असते. तोच हिवाळा. त्यानंतर पीक पिकण्यासाठी उष्णाची गरज असते. तोच उन्हाळा. कुमुदः कुंदरः कुंदः या तीन पदांत कुं हें द्वितीयान्त पद घेतले आहे. शंकराचार्य कु-मुदः असा विभाग करतात. त्यांना मुद् णिजन्त म्हणजे प्ररणार्थकहि घ्यावा लागला आहे. त्यालाहि हरकत नाहींच. कुं धरणिं भारावतारणं कुर्वन् मोदयति इति कुमुदः । असें त्यांनी व्युत्पादिलें व प्रतिपादिले आहे. भारावतारण क्वचित् क्वचित् होते. परंतु मेघवृष्टि नित्य नियमित होते. तिनें तो परमात्मा या धरणीला मुदित करतो म्हणून तो कुमुद असे म्हणणे सयुक्तिक आहे. कुं उदति वा कुं मोदयति घ्या अर्थात अंतर नाही. मेघालोकनानें सर्व जीव सुखावतात. वृष्टीनें तृप्त होतात. म्हणून पर्जन्य रूपानें परमात्मा हा कुमुद म्हटला आहे.

८०८. कुन्दरः १
कुन्दर नामाची व्युत्पत्ति अनेक प्रकारे करता येते (१) कुन्दं राति, (२) कुन्दं लाति, (३) कुं दारयति अशा तीन व्युत्पत्ति शंकराचार्यांनी दिलेल्या आहेत. कुन्दपुष्पतुल्यानि शुद्धानि धर्मानुबन्धीनि फलानि राति वदाति इति कुन्दरः । कुन्दपुष्पतुल्यानि शुद्धानि फलानि लाति आदत्ते इति वा कुन्दरः, रलयोर् एकत्वस्मरणात् । कुं धरां दारयामासहिरण्याक्ष-जिघांसया । वाराहं रूपमास्थाय' इति वा कुन्दरः । शिवाय र हा युक्तार्थक प्रत्यय घेऊन धीर वीर प्रमाणें कुंद-बहुल वा कुन्दयुक्त या अर्थानें कुन्दर वा कुन्दल शब्द लावतां येईल, परंतु प्रकरणानुसार अर्थ घ्यावयाचा असतो. सैन्धव म्हणजे मीठ व घोडा असे दोन्ही अर्थ होत असले तरी भोजनप्रकरणीं मीठ अर्थ घेणेच योग्य, युद्धप्रकरणी घोडा अर्थ घेणेच प्रशस्त. त्या प्रमाणें इथे 'कुमुदः कुन्दरः कुन्दः' या कु म्हणजे भू प्रकरणांत जो अर्थ प्रकृत असेल तोच घेणे प्रशस्त. तदनुसार "कुं भूमि लांगलादिना बीज-वपनार्थ दारयति इति कुन्दरः"ही व्युत्पत्ति ग्राह्य व्हावी. परमात्म्याचा वराहावतार हा नैमित्तिक आहे, पण त्याचा कृषकावतार नित्य आहे. नित्य धर्म नैमित्तिक धर्मानि तात्पुरता बाधित होऊन मागे पडत असला तरी खरें व स्थायी महत्त्व नित्य धर्मालाच आहे. त्याची उपेक्षा अयोग्य. नैमित्तिका चा आदर योग्यच आहे. त्याला असाधारण महत्त्व मिळणेहि स्वाभाविक आहे. पण म्हणून नित्याचा विसर पडणे वा त्याचे महत्त्व कमी लेखणे क्षम्य नाही. म्हणून जगज-जीवनदायी अन्नधान्याच्या निर्मितीसाठी भूमि-विलेखन करणारा तो परमात्मा कुंदर म्हटला आहे. वराहानें रदाग्रानें धरा उचलली आहे. ती दीर्ण केली असे म्हणतां येत नाही म्हणून वराहापेक्षां हलधर कृषक च खरा कुंदर होय.

८०८. कुन्दर २
विष्णुसहस्रांत प्रकरण वा सूत्र कल्पिणे सयुक्तिक असले तरी प्रत्येक नाम हे स्वतंत्र आहे. तसे त्याचे चिंतन करायचे म्हटलें म्हणजे मागे पुढे काय आहे, हे पहाण्याचे कारण नाही. तसा विचार केल्यास कुन्दर नाम वेदवेदान्त-रहस्य प्रकट करणारे आहे असे दिसून येते. "आदित्यानां अहं विष्णुः" म्हणजे अदितिपुत्रांत, प्राचीपुत्रांत, देवांत, ज्योतिर्गणांत मी विष्णु आहे. अर्थात् विष्णु हे आदित्याचें, सूर्याचेच एक नाम झाले. आणि त्या विष्णूची जी नामें तींहि त्याचीच म्हणजे सूर्याचीच झाली. कुंदर हेहि त्यापैकीच. अर्थात् तेहि सूर्यवाचकच. कुं कुहकं, कुत्सितं अन्धकारं, आविद्यान्धकारं दारयति इति कुन्दरः असें तें मी लावतों. हे रहस्य सूर्योपस्थान करीत असतां, गायत्री-जप करीत असतां, मला लाभले आहे. तसा मला साक्षात्कार झाला आहे. "तत् सवितुर् वरेण्यं भर्गः" म्हणजे तें अंधकाराला विदीर्ण करून प्रकट होणारें, अज्ञानाला जिंकून प्रकाशमान होणारें, विजयी तेज 'धीमहि म्हणजे आपण ध्याऊ या. या वेदरहस्याचाच अनुवाद गीतेनेहि "आदित्यवर्ण तमसः परस्तात् ' असा केला आहे. भागवतानें तो "धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि' असा व शंकराचार्यांनी "तं संसार-ध्वान्त-विनाशं हरिमीडे." असा केला आहे. वैदिक ऋषि आध्यात्मिक सत्याचे आकलन करून उपासनेसाठी तें अतीन्द्रिय तत्त्व सूक्ष्म आणि स्थूल रूपानें निरूपीत. आत्मविषयक तें अचिन्त्य सत्य जपासाठी त्यांनी गायत्री मंत्रांत ग्रथित केले आणि त्याची उपासना सूर्योपस्थानानें करावी असा धर्म लावून दिला. आम्ही देहप्राणमनोरूप तीन कर्मपथांनी व्यवहार करीत असतो. त्या तिहींसाठी तीन गोष्टी त्यांनी लावून दिल्या आहेत. देहानें उपस्थान, प्राणानें जपयुक्त प्राणायाम आणि. मनानें ध्यान. त्यांची ही त्रिविध धर्मकल्पना परिपूर्ण आहे. या वैदिक धर्मांत संपूर्ण जीवनाचा तामस अनुपयोग व राजस दुरुपयोग टाळून सार्थक सदुपयोग शिकविला आहे.

८०८.. कुंदर ३
'उद्‌भवः सुन्दरः सुन्दः' प्रमाणें 'कुमुदः कुन्दरः कुन्दः' हे वचन आले आहे. या वचनांत सुन्द सुन्दर, कुन्द कुन्दर अशा जोड्या आल्या आहेत. त्यावरून 'मधु मधुर' या शब्दांप्रमाणें हे समानार्थक शब्द होत, असे दिसते. मधु हे मूलतः नाम आहे, मधुर हे त्या मधून युक्त या अर्थी विशेषण आहे. अर्थात् मधूनें युक्त म्हणण्यापेक्षां साक्षात् मधु म्हणणे हे अधिक गौरवाचें होय. तदनुसार आधीं कुंदर म्हणून मागाहून कुन्द म्हटले आहे. तसेंच सुन्दर आणि सुन्द. पण ह्या दोन जोड्या सुन्दर कुन्दर, सुन्द कुन्द परस्पर विरुद्ध दिसतात. सुन्दर सुन्द वा कुन्दर कुन्द या क्रमिक नामांत जसा उत्कर्षक्रम दिसून येतो, तरतम भाव दिसून येतो तसा सुन्द सुन्दर, कुन्द कुन्दर या जोड्यांतहि तो आहे. या जोड्यांत जो आपाततः विरोध दिसतो तो सुरूप कुरूप अशा स्वरूपाचा नाही, तर बाहय सौन्दर्य विरुद्ध अन्तःसौन्दर्य अशा स्वरूपाचा आहे. बाह्य सौन्दर्यांत रूपसौन्दर्यानें नटलेलें तें सुन्दर म्हटलें तर अन्तःसौन्दर्यानें गुणसौन्दर्यानें कोंदलें आहे तें कुन्दर म्हणावयाचे. पण पळसाचे वा कण्हेरीचे फूल सुवर्ण असते, रंगीत असते पण सुगन्ध नसते. उलट कुन्दाचे वा मोगऱ्याचे फूल सुवर्ण नसतें, रंगीत नसतें पण सुगन्ध असतें. दोन्ही सुन्दर आहेत एक रूपसुन्दर आहे, तर दुसरें गुणसुन्दर आहे. एक नेत्रवेधक आहे तर दुसरें चित्तवेधक आहे. या दोहोंत अधिक सुन्दर कोणतें ? जे हृदयाला संतोष देतें तें. तेंच कुन्दर, कुन्द पुष्प बाह्यतः निर्मल, अन्तरतः समुज्जवल अशा आदर्शाचे प्रतिमान आहे. म्हणून ज्ञानदेवता सरस्वतीचे रूप 'या कुन्देन्दुतुषारहार-धवला' असें वर्णिलें आहे. अर्थात् कुन्दवत् अन्तर्बाह्य निर्मलोज्वलजें आत्मज्ञान त्यानें युक्त तो कुन्दर अथवा 'कुन्दं राति ददाति तें आत्मज्ञान जो देतो तो कुन्दर. अथवा 'कुन्दं लाति आदत्ते' तें आत्मज्ञान जो ग्रहण करतो तो कुन्दर. अन्तःसौन्दर्यच खरें सौन्दर्य होय. म्हणून समर्थ म्हणतात "वस्त्रे शृंगारे शरीर| चातुर्ये शृंगारें अन्तर । दोहोंमध्ये कोण थोर । बरें पहा ॥ "

८०९. कुन्द
कुन्दः कुन्दोपमसुन्दरः । कुन्दोपमसुन्दराङ्गत्वात् स्वच्छस्फटिकवत् निर्मलः कुन्दः कुं पृथिवीं कश्यपाय अदात् इति वा कुन्दः । शंकराचार्यांनी अशा प्रकारें त्रिधा व्युत्पादिला आहे हा शब्द. आणि तें यथास्थितच आहे. कुं पृथिवीं द्यति खण्डयते इति कुंदः । यावर त्यांनी मार्मिक टिप्पणी दिली आहे. "कुं शब्देन पृथ्वीश्वरा लक्ष्यन्ते' परमात्मा पृथ्वीला म्हणजे तिला भारभूत झालेल्या राजांना खच्ची करतो, म्हणून तो कुंद म्हणावयाचा. अशा लक्षणा घेऊन परमात्मा हा कुमुद पदाच्या चिंतनात म्हटल्याप्रमाणें पृथ्वीची म्हणजे पृथ्वीवरील पिकांची कापणी करतो म्हणून तो कुंद, तो वर्षण करून भूमीला भिजवतो, कर्षण करून तिला पेरतो आणि वृष्टि व ओल यांचे आकर्षण करून म्हणजे सुकवून तापवून तिला तोडतो. सूर्यरूपानें परमात्माच हे असें सृष्टिरूप यज्ञचक्र चालवीत आहे. त्याच्याच प्रेरणेनें हे सर्व होत असते. शेतकरी ते नांगरतो वखरतो, पेरतो लावतो, आणि शेवटी सवंगतो कापतो. हे सर्व परवश होऊन म्हणजे परमात्म्याच्या प्रेरणेला वश होऊनच होय. परंतु परमात्म्याची ही प्रेरणा अत्यन्त व्यापक म्हणजेच अव्यक्त असल्यामुळे ढोबळ बुद्धीच्या जीवाच्या लक्षात येत नाही. तो समजतो की हे सर्व आपण च आपल्याच इच्छेनें करतो आहो. वस्तुतः तो निमित्तमात्र आहे. चांगले किंवा वाईट सर्व परेच्छेनें होत असते. "मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्"या वचनांत भगवंतानें हें रहस्य सांगून टाकले आहे. ते लक्षात घेऊन ज्ञानी कोणत्याहि कर्माचे कर्तृत्व आपल्या अंगाला चिकटू देत नाहीत. हेच ज्ञान कुन्दोपम अंतर्बाह्य सुंदर आहे, निर्लेप आहे. आणि परमात्मा हा केवलज्ञानस्वरूप असल्यामुळे तो कुन्द म्हटला आहे. कुन्द म्हणजे भूदानी हा अर्थहि स्पष्टच आहे. परमात्म्यानें परशुरामावतारांत सर्व पृथ्वीचें दान केले होते. म्हणून तो कुंद म्हणजे भूदानी होय. हरिवंशांत म्हटले आहेः
सर्वपापविशुद्ध्यर्थं वाजिमेधेन चेष्टवान्
तस्मिन् यज्ञे महादानें दक्षिणां भृगुनन्दनः
मारीचाय ददौ प्रीतः काश्यपाय वसुंधराम् ॥

भूदानयज्ञ आज त्याचाच नवा अवतार आहे. भूदान हे महादान होय. इतर दानें अल्पच.

८१०. पर्जन्य
पर्जन्यवत् आध्यात्मिकादि तापत्रयं शमयति, सर्वान् कामान् अभिवर्षति इति वा पर्जन्यः । पावसामुळे ताप शमतो आणि सर्व पिकें पिकतात. जिकडे तिकडे सर्व आबादीआबाद होते. त्या प्रमाणें परमात्म्याच्या प्रसादानें सर्व ताप आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक शांत होतात, सर्व खळमळ बाह्य तसा आभ्यन्तर धुतला जातो आणि सर्व दैवी गुणांची अभिवृद्धि होते, जीव निजधन-संपन्न होऊन स्वे महिम्नि प्रतिष्ठित होतो. म्हणून परमात्म्याला पर्जन्य म्हणावयाचे. अशा लाक्षणिक अर्थानें परमात्मा पर्जन्य आहे हे तर ठीकच आहे, पण आधिभौतिक अर्थानें, सरळ शब्दार्थानेहि तो पर्जन्य आहे. पाऊस जर आला नाहीं तर नद नदी तडाग वापी कप भरणार नाहीत. प्यायला पाणी आणि खायला अन्न मिळायची पंचाईत होईल. असें ज्याचे निरतिशय महत्त्व आहे तो पर्जन्य, तो पाऊस परमात्माच होय. अव्यक्त परमात्म्याचे हे व्यक्त गमक आहे. त्याची ती खूण आहे. गीतेनें म्हटलें आहे.
अन्नाद्भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्नसंभवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो, यज्ञः कर्म-समुद्भवः ॥ गीता ३ - १४
कर्म ब्रह्मोद्‌भवं विद्धि, ब्रह्माक्षर-समुद्‌भवम् । गीता ३ - १५.१

अक्षरब्रह्मापासून भूतापर्यंतच्या या मालिकेत आम्हांला गोचर केवळ पर्जन्य, अन्न आणि भूतेंच आहेत. अक्षर, प्रकृति आणि कर्म ही अगोचर च आहेत, गूढच आहेत. अक्षर ब्रह्मापासून त्रिगुणात्मिका प्रकृति वा त्रैगुण्य-विषय वेद कसे झाले आणि त्यांचे स्वरूप व तात्पर्य काय आणि त्यांपासून कर्म कोणतें आणि कसे झाले आहे की ज्यापासून पर्जन्याची सृष्टि होते हा सगळा विषय, हे त्रिक निगूढच आहे. परंतु तेथून पुढील त्रिक मात्र प्रकट आहे. आणि त्यांत पहिला आहे पर्जन्य, म्हणून पर्जन्य हा परमात्म्याचा पहिला आविर्भाव होय, अवतार होय. "अप एव ससर्जादौ' इत्यादि वेदोपनिषद्-वचनें वरील विधानाला उपोद्बलक आहेत, असें म्हणता येईल. ही अभिधा झाली. लक्षणेनें तर तो परमात्मा सर्व तापोपशमन व सर्वकामाभिवर्षण करीत असल्यामुळे उघड च पर्जन्य होय.

८११. पावन
"पर्जन्यः पावनोऽनिलः" या चरणांत पर्जन्य व अनिल म्हणजे पाणी आणि वारा या दोहोंच्या दरम्यान पावन पद आले आहे. म्हणून त्याचा आशय पावक असा आहे असे म्हणता येईल. पावन आणि पावक एकाच पूधातूची रूपे आहेत. पर्जन्य हा यज्ञांतून होतो असें गीता सांगत आहे. हा यज्ञ सूर्याग्निस्वरूप वा तेजोरूपच आहे. पुनः हा यज्ञ गीतेच्या मताप्रमाणें कर्म-संभव आहे. तें कर्म सर्व हालचालींचा चालक जो वायु तद्रूप म्हटले तर ते सयुक्तिक नाहीं असें कोण म्हणेल ? हे कर्म, ही प्रेरणा त्रिगुणात्मिका अव्यक्त प्रकृतींतून येते. आणि ही प्रकति अक्षर ब्रह्माच्या ठाई निहित असते. असे हे गीतोक्त यज्ञचक्र आहे. "पर्जन्यः पावनोऽनिलः' या चरणांत मला पूर्व पूर्व कार्याची उत्तरोत्तर कारणभूत् तत्त्वें पर्जन्य यज्ञ आणि कर्म दिसत आहेत. "आकाशात् वायुः, वायोः तेजः, तेजसः आपः" या क्रमाशीहि ती जुळती आहेत. "पुनाति इति पावनः" पावक म्हणजे अग्नि जसा सर्व कांहीं जाळून साफ करतो, आणि त्यामुळेच त्याला पावक म्हटले जाते, त्या प्रमाणें परमात्मा हा सर्व संगाचा मलाचा पापाचा सफाया करतो म्हणून तो पावन म्हटला आहे. गीतेनें म्हटलेच आहेः
ययैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥ गीता ४ - ३७
नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते। गीता ४ - ३८.१

ज्ञान हे परम पवित्र आहे आणि परमात्मा हा चिन्मात्रमूर्ति म्हणजे केवल ज्ञानस्वरूप आहे. म्हणून तो पावन म्हटला गेला यांत नवल काय ? देहाद्यभिमान धरून जीव नाना कर्में करतो आणि त्यांच्या बऱ्या वाईट फळांचा भोक्ता म्हणवतो. हा कर्तृत्व-भोक्तृत्वरूप लेप समूळ नाहीसा होतो आत्मज्ञानानें, म्हणून तें पवित्र व तत्स्वरूप परमात्मा पावन म्हटला आहे.

८१२. अनिल (निल)
इलति चेष्टते इति इलः । न इलः अनिलः, अव्यक्तम् । अथवा अनः सर्वक्रियाकारकः प्राणः तेन युक्तः अनिलः, अव्यक्तम्" अशा दोन प्रकारें अनिल पद व्युत्पादिले जाईल. अर्थात तादृश भेद नाही. दोहोंचाहि अर्थ अव्यक्त म्हणजे गुणसाम्यरूप प्रकृति. परमात्मा हा निर्गुण निष्क्रिय निराकार आहे. तर प्रकृति वा अव्यक्त हे सगुण क्रियागर्भ निराकार आहे. आणि हा सगळा विसर्ग सगुण सक्रिय साकार आहे. या आकाराचा आविर्भाव म्हणजे आगति जशी आणि ज्या क्रमानें होते तशी आणि त्याच्या उलट क्रमानें गति होते. गति होते म्हणजे तिरोभाव. प्रथम वायु-पक्षी या देहपंजरांतून मोकळा होतो. नंतर तो उडून त्या अव्यक्तांत लीन होतो आणि तिथून ज्ञानसंपन्न झालेला असल्यास तो त्या अमृतांत-निर्गुण निष्किय निराकारांत विलीन होतो. हाच आशय "वायुः अनिलं अमृतम्' या ईशवचनांत आला आहे. तिथे म्हटले आहे की मनुष्य मेला म्हणजे त्याचा व्यष्टिगत प्राण समष्टिगत वायूंत प्रथम मिसळतोः नंतर तो समष्टिगत वायु अनिलांत म्हणजे अव्यक्तांत कालान्तरानें लीन होतो. आणि तें अव्यक्त शेवटी यथाकाल म्हणजे ज्ञानोत्पत्तिरूप कल्पान्तीं अमृतांत विलीन होते आणि इकडे या देहाची राख होते. जीविताचा हा असा इत्यर्थ आहे. यांत अनिल हे जें एक मधले वा उपान्त्य पद आहे तें सृष्टिकारणभूत अव्यक्त तत्त्व आहे. तेहि परमात्म्याचे एक रूप आहे. म्हणून परमात्म्याला अनिल म्हटले आहे. अमृत म्हणजे निगुण तत्त्व. हे देवळांतील अचल-प्रतिष्ठ देवता आहे, तर अनिल ही उत्सव-मूर्ति आहे. व्यवहारासाठी तीच देवता. तीच प्रतिबिंबवत् आविर्भूत होते. तीच तिरोहित होते. बिंबवत् तें अमृत, ते निगुण तत्त्व सदैव चयापचयरहित अविकृतच राहते. निल असाहि पाठ घेतां येईल. पण गरजेचा नाही.

८१३. अमृताश
अमृतं अश्नाति इति अमृताशः । अथवा अमृता आशा यस्य सः अमृताशः । अशा दोन प्रकारे लावतां येईल. जो नित्य स्वानन्दामृताचें अशन करतो तो अमृताश होय. जीवाच्या अंतरांत सदैव शाश्वत जीवनाची अभिलाषा राहिली आहे. मृत्यूची म्हणजे आत्मनाशाची अभिलाषा कोणीहि करीत नाही. आपण सदैव सुखी असावे अशीच अभिलाषा जीव करीत असतो. ही जी अभिलाषा ती अमृताचीच अभिलाषा होय. ती ज्याला आहे तो अमृताश म्हणावयाचा. ही अभिलाषा आत्मविषयक असल्यामुळे ती त्याची सदैव कृतार्थच आहे. इतर सर्व आशा अनात्मविषयक असल्यामुळे त्या त्याच्या कधीच पूर्ण वा सफल व्हावयाच्या नाहीत. त्या सर्व आशा खण्डिताशा हताशा वा मृताशाच होत. ' बाह्य वस्तु असुख असते आणि आरंभी असुख न वाटली तरी तिचा अवश्यंभावी वियोग झाला म्हणजे ती असुखावह झाल्यावांचून राहत नाही. अशा प्रकारें असुखता हे त्या बाह्य वस्तूचे स्वरूपच होय. कामरूप राक्षस मेले म्हणजे त्यांचे भयानक स्वरूप प्रकट होई तसें हें बाह्य कामरूप पदार्थ नाहीसे झाले म्हणजे त्यांचे असुखरुप प्रकट होतेच. जे आरंभींच नकोसे वाटतात ते तर असुख आहेतच, पण जे आरंभी हवेसे वाटतात तेहि अंती असुखच असल्याचे प्रत्ययास येतें. सारांश असुखतेंत अनित्यता आणि अनित्यतेंत असुखता भरलेलीच आहे. एकाच वस्तूच्या ह्या दोन बाजू होत. "अनित्यं असुखं लोकं इमं प्राप्य भजस्व माम्" या भगवंताच्या कळकळीच्या उपदेशांत म्हणून दोन्ही दोषांचा एकत्र व लागोपाठ उल्लेख केला आहे. तथापि खरी कसोटी नित्यत्वच आहे हे "अनित्यं" ला पहिले स्थान देऊन सूचित केलें आहे. तें जें नित्य तेंच अमृत होय. त्या अमृतांत नित्यत्व व सुखत्व दोहोंचा एकपद उल्लेख आहे. अमृतस्वरूप जो स्वानंद तो नित्य सेवन करीत आहे तो परमात्मा. अमृतात्मा अमृताश होय आणि त्याचा उपासकहि.भगवंतानें म्हणूनच 'भजस्व माम्' म्हटले आहे. "यज् ज्ञात्वामृतमश्नुते" त्याला जाणल्यानें अमृतभोजी होतो.

८१४. अमृत-वपु . .
मृतं मरणं, तद्रहितं वपुः अस्य इति अमृतवपुः । अमृत म्हणजे मोक्ष हेच ज्याचें वपु म्हणजे रूप होय तो अमृतवपु म्हणावयाचा. परमात्मा निराकार आहे. त्याला वपु म्हणजे शरीर कुठलें ? त्याचे शरीर म्हणजे त्याची ओळखण ज्या वरून आम्हांला पटेल ती सर्व लक्षणे म्हणजेच त्याचे रूप. त्या नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव परमात्म्याचे गीतेनें असें वर्णन केलें आहेः
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ गीता १३ -१३
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निगुणं गुणभोक्तृ च ॥ गीता १३ -१४
बहिर्अन्तश्च भूतानां अचरं चरममेव च ।
सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ गीता १३ -१५
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ गीता १३ -१६
ज्योतिषां अपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ॥ गीता १३ -१७

या सर्व लक्षणांत शेवटचे लक्षण 'हृदि सर्वस्य धिष्ठितम्, हे विशेष लक्षणीय आहे. तो अमृतवपु परमात्मा सर्वांच्या हृदयांत समान वसला आहे आणि तो ज्ञानस्वरूप आहे. हे ज्ञानस्वरूपहि अमानित्वादि ज्ञानलक्षणे अंगी बाणवून घेऊन आकळावयाचे आहे. म्हणून त्याला म्हटले आहे – ज्ञानगम्यं ज्ञेयं ज्ञानम्. अर्थात् अमानित्वादि साधनभूत ज्ञानाच्या योगें जाणावयाचें साध्यभूत ज्ञान. हे जे साध्यभूत, ध्येयभूत ज्ञान तेंच अमृत होय. आणि त्याची जी हीं लक्षणे दिली तीच त्याचे वपू म्हणजे लक्षणीय विशेष होत, अंगें होत. परमात्मा असा हा अमृत-वपु म्हटला आहे. जगांत जें कांहीं भूतजात आहे तें सारें मामात्मक आहे. देह मर्त्य आहे, आत्मा अमर्त्य आहे. परंतु परमात्मा हा असा आहे की तिथे हा भेद नाही. तो केवळ अमृत आहे. तिथें मृत म्हणजे मरणधर्मी शरीर नाही. म्हणून तो अमृतवपु. 'अमृताशोऽमृतवपु : या क्रमांत कार्यकारणभाव सुचविला आहे, जो अमृत सेवन करतो तो अमृतस्वरूप होतो. जो विटणारे अन्न खाणार त्याचा देह मृतच होणार.

८१५. सर्वज्ञ
सर्वं जानाति इति सर्वज्ञः । जो सर्व जाणतो तो सर्वज्ञ म्हणावयाचा. पण खरोखर या विश्वांतील यच्चयावत् स्थूल सूक्ष्म व्यक्ताव्यक्त सर्व वस्तु जाणणे हे कोणा एका व्यक्तीला, मग ती किती का मोठी असे ना, शक्य आहे का ? तत्त्वतः आणि व्यवहारतःहि हे अशक्यच म्हणावे लागेल. तत्त्वतः अशक्य, कारण विश्व अनन्त आहे. व्यवहारतः अशक्य, कारण व्यक्तिशक्तीच्या आवाक्याबाहेरचे आहे. मग परमात्मा सर्वज्ञ कसा ? दुन्दुभीच्या ध्वनिलहरी सहजासहजी मोजता येत नाहीत आणि धरतांहि येत नाहीत. परंतु दुन्दुभिच ताब्यात घेतला म्हणजे सर्व ध्वनिलहरी पकडल्या असें होतें. कारण त्या ध्वनिलहरींचे मूळ कारण तुम्ही हस्तगत करता. त्याप्रमाणें सर्वज्ञानाचें मूळ कारण चिदात्मा आहे. आणि चिद्रूपता हा त्याचा स्वभावच असल्यामुळे तो सहजच सर्वज्ञ आहे. कोणतीहि वस्तु वा घटना त्यानें जाणल्यावांचून मुळी असूच शकत नाहीं, अस्तित्वात येऊ शकत नाही. अस्तित्वमात्र ज्ञानाधीन असल्यावर ज्ञानाला ठाऊक नाहीं असें कांहीं मुळीं संभवतच नाही. आणि त्यामुळे तो चिन्मात्रमूर्ति, तो ज्ञानस्वरूप परमात्मा सर्वज्ञ म्हणावयाचा. विश्व अनन्त असो की सान्त असो तें चित्सत्ताधीन आहे. आणि ही चित्-सत्ता दिक्-काल-कार्यकारणभावादिकांनी अपरिच्छिन्न आहे म्हणजे सर्वतोनन्तरूप आहे. त्यामुळे तत्त्वतः व व्यवहारतःहि तो परमात्मा सहजच सर्वज्ञ आहे. सर्वज्ञतेसाठी त्याला कांहीं खटपट नाहीं करावी लागत. इथे अभूततद्‌भाव नाही. आधीं असर्वज्ञ असून काही प्रयत्नानंतर तो सर्वज्ञ होतो असें नाहीं. तो स्वभावतःच सर्वज्ञ आहे, मूळचाच सर्वज्ञ आहे.

८१६. सर्वतोमुख
'अमृताशोऽमृतवपुः' ही जशी एक जोडी आहे, तशीच 'सर्वज्ञः सर्वतोमुखः' हीहि एक जोडीच आहे. दोहोंतहि कार्यकारणभाव सूचित झाला आहे. अमृत सेवन करतो म्हणून तो अमृतवपु होतो, तसा तो सर्वज्ञ आहे म्हणून तो सर्वतोमुख म्हणावयाचा. जिकडे माणसाचे तोंड असते तिकडचे त्याला दिसते, पाठीमागचे त्याला दिसत नाही. तिकडे वळून पाहूं - लागल्यास इकडचे दृष्टीआड होतें. एकसमयावच्छेदें 'करून तो सर्वत्र पाहूं शकत नाही. पण परमात्मा तसा देहाधीन नाही. देहाधीन ज्ञान हे असेंच एकांगी असावयाचे. परमात्मा विदेह आहे म्हणून तो सर्वज्ञ आहे. सर्वतोमुख आहे. ही सर्वज्ञता सर्वतोमुखता त्याला चतुर्मुख कल्पून व्यक्त केली आहे. पण चतुर्मुखाला वर खाली आणि आंतबाहेर एकरूदम पहाता येणार नाहींच. म्हणून त्याला सर्वतोमुख म्हणणेच योग्य. समोर मागें, डावीकडे उजवीकडे, वर खाली आणि आंत बाहेर, अशा ह्या अष्ट दिशा आहेत. या आठी दिशांत आणि भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालांत जो जाणतो आहे, पाहतो आहे तो सर्वज्ञ होय आणि तोच सर्वतोमुख, त्यालाच वेदांत 'सहस्रशीर्षाः पुरुषः सहस्राक्षः' म्हटले आहे. तोच क्रम 'सर्वज्ञः सर्वतोमुखः' मध्येहि आहे. शीर्ष ज्ञानाचें आणि अक्षि साक्षित्वाचें उपलक्षण आहे. तो विदेह पुरुष तो परमात्मा देहावयवांनीं वर्णिला आहे. कारण वाणी ही व्यक्ताच्याच भाषेत बोलू शकते. ती अव्यक्ताचें सूचन च करू शकते. यथार्थ वर्णन करायला ती असमर्थच आहे. पण ती वाणीच असल्यामुळे, आपल्या वर्णनव्यवसायापासून, विरक्त वा विरत होऊं शकत नाहीं; कारण तो तिचा स्वभाव आहे. म्हणून हे एकाचे सहस्रनाम. पण ह्या अनल्पजल्पानें समाधान न होऊन शेवटी तिनें ॐ नमः म्हणून डोके टेकलें आहे. मौनच महत्तम प्रवचन आहे.


सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छशत्रुतापनः।
न्यग्रोधोदुम्बरोऽश्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः ॥८८॥


८१७. सुलभ
सुखेनैव अनायासेन लभ्यते इति सुलभः ।जो सुखानें म्हणजे कष्टांवांचून लाभतो तो सुलभ म्हणावयाचा. परमात्मा हा सुलभ कसा ? तो तर योग्यांनाहि दुर्लभ म्हटला आहे. ज्ञान्यांनाहि काहीं तो सहज मिळत नाही. म्हटलेच आहे'-बहुना जन्मनां अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते'. आणि वेदपाठ, तप, यज्ञ, दान हीं तर उघडच महाकठिण कर्मेंच होत. ही सगळी आत्मदर्शनाची वा भगवत्-प्राप्तीची साधनें निःसंशय सोपी नाहींत.प्रेमभक्ति हे साधन यांच्याहून सो म्हटले जाते. पण तें प्रेम ती भक्तिहि कांहीं सोपी नाही. हृदयांत तो ओलावा उत्पन्न झाला पाहिजे ना ? तो प्रेमपूर जीवन नौका सहज वाहून नेईल. पण खडकाळ जमिनीवरून नौका सरंकवणे किती कष्टाचें ! सारांश, कोणतेहि साधन करा, त्या वेगवेगळ्या साधनांत कांहीं उजवें डावें खुशाल असू द्या, परंतु ती सर्व सुलभ म्हणतांच येत नाहीत. ती अनायास नाहीत त्यांत सायास आहे, अशा सायासांनी जो लाभावयाच तो परमात्मा सुलभ कसा म्हणता येईल ? पण खरोखर तो अत्यन्त सुलभ आहे. कारण तो निजरूप आहे एखादी बाहेरची वस्तु मिळवणे कठिण सोपें म्हणत येईल. पण जी वस्तु तुम्ही स्वतःच आहांती मिळविफ सोपें कठिण म्हणणे याला कुठे वाव आहे ? स्मरणकरतांच ती तुम्हाला मिळते इतकी ती सुलभ आहे. किंबहुना एवढेहि कष्ट नकोत. तुम्ही विसरून गेलतरी तुम्हांला ती सदैव प्राप्तच आहे. याहून अधिक सुलभ दुसरें कांही असू शकत नाही म्हणून तो निजरूप परमात्मा सुलभ म्हटला आहे.

८१८. सुव्रत
शोभनं व्रतं यस्य सः सुव्रतः । ज्याचें व्रत शोभन आहे तो सुव्रत म्हणावयाचा. व्रत म्हणजे वर्तन, आचरण, नियम. ज्याचे वर्तन स्वाभाविक असतं, स्वभावानुरूप असते, त्याला सुव्रत म्हणतां येईल. म्हणजे त्याचे वर्तन शोभन आहे असे म्हणता येईल. एखाद्या माणसाला दूषण द्यावयाचे झाल्यास म्हटले जातें, काय तूं माणूस आहेस का जनावर ? त्यांतहि अगदी निबुद्धता आणि अमंगलता सुचवायची झाल्यास म्हटले जाईल ः माणूस आहेस का गाढव ? आपल्या स्वाभाविक कार्यात अदक्ष आणि अपटु कारागिरास म्हटले जाईल, सुतार आहेस का हजाम ? म्हणजे अशोभनता ही अनौचित्यांत आणि अनौचित्य अस्वाभाविकतेंत भरलें आहे. ज्याचा जो सहज धर्म त्याला अनुसरून त्याचे वर्तन असल्यास तो सुव्रत म्हटला जाईल. एखादा प्रौढ माणूस बालिशता करू लागल्यास त्याला काय पोरकट माणूस आहे असे म्हटले जाईल. म्हणजे त्याच्या वयापासून जी अपेक्षा आहे तिला तो उतरत नाही. याप्रमाणें सर्वच विषयांत जो स्वाभाविक वर्तन करणारा आहे तोच सुव्रत म्हणावयाचा. परमात्मा हा असा सुव्रत आहे. "सत्यं वद, धर्मं चर, स्वाध्यायात् मा प्रमदः" अशा धर्माच्या आज्ञा त्याला कराव्याच लागत नाहीत. सत्य दया स्वाध्याय इत्यादि सद्गुण व सदाचार त्याच्या अंगीं उपजतच आहेत. मुरलेले आहेत. सत्य बोलायचे नाही तर दुसरे काय बोलायचे ? दया नाहीं करायची तर दुसरे काय बरे करायचे ? स्वाध्याय नाहीं करायचा तर दुसरे काय करायचे ? असा त्याला प्रश्नच पडेल ? फुलाला जसें सुवास देणेच ठाऊक तसे हे सारे त्याला असते. म्हणून तो सुव्रत होय. या अशा सुव्रत परमात्म्याचे व्रत जे घेतात, म्हणजे त्या परमात्म्याला जे आवडेल तेंच करायचे, दुसरें वर्ण असा जे नियम घेतात तेहि सुव्रत होत. कारण त्यांचा तो नियम स्वस्वरूपानुसंधानरूपच होय. इतर सारें वागणे तविपरीत म्हणून वृजिन होय, पापरूप होय, अशोभन होय.

८१९. सिद्ध .
सृष्टीत तीन वस्तु आढळतातः जीव जगत् आणि ईश्वर. पैकी जीव आणि जगत् या दोन वस्तु असिद्ध आहेत, अपूर्ण आहेत. त्यांच्या ठाई अनित्यत्व व असुखत्व आढळते. अनेक दोष भरलेले आढळतात. परंतु तिसरी वस्तु जो परमात्मा तो मात्र निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, म्हणून तोच एक सिद्ध होय । त्याला अनवाप्त असें कांहीं नाहीं आणि म्हणून अवाप्तव्यहि कांहीं उरत नाही. असा तो कृतार्थ असतो, कृतकृत्य असतो. परंतु जीव व जगत् ह्यांची स्थिति सदैव याच्या विपरीतच असते. सदैव त्यांना दैन्यानें ग्रासलेलें आहे. अनिष्ट-निवारण आणि इष्टसंपादन या कार्यात तीं सदैव धडपडत च आहेत. त्यांना विश्राम कसा तो नाहींच. जिथे दैन्य आहे तिथे तृष्णा आहे. तृष्णा आहे तिथे कर्म आहे. कर्म आहे तिथे अशान्ति आहे. आणि अशान्ति म्हणजेच अस्वस्थता आणि अस्वस्थता म्हणजेच असिद्धि. परमात्मा हा आप्तकाम वा पूर्णकाम अथवा अकाम असल्यामुळे तो सिद्ध आहेच, पण तो साध्य नाहीं वा साधकहि नाहीं या अर्थानेहि तो सिद्धच आहे. सिद्ध म्हणजे स्वतःसिद्ध. प्रमाणांनी सिद्ध करावयाचा पदार्थ तो नव्हे. अथवा साधनांनी सिद्ध करावयाचाहि पदार्थ तो नव्हे. जगांत जे पदार्थ आढळतात ते आप्य, कार्य, संस्कार्य वा विकार्य असे असतात. परंतु आत्मा या कोणत्याहि कोटींत पडत नाही. म्हणून तो म्हणावयाचा सिद्ध. आत्मा म्हणजे निजरूप आप्य म्हणजे बाहेरून कुठून मिळवावयाचे नाही. तें घट-पटवत् कार्यहि नव्हे. अशुद्ध खनिजांतून शोधून सोनें काढावें तसें तें संस्कार्यहि नाहीं अथवा दुधाचे दही बनवावें तसें तें विकार्यहि नव्हे. कोणतीहि क्रिया त्यावर संभवत च नाही म्हणून तो म्हणावयाचा सिद्ध. अर्थात् सिद्ध म्हणजे (१) अक्रिय, (२) स्वतःप्रमाण आणि (३) साधन- निरपेक्ष स्वयंभू.

८२०. शत्रुजित्
शत्रून् जयति इति शत्रुजित् । जो शत्रूंना जिंकतो तो शत्रुजित. शत्रु मित्र मध्यस्थ तटस्थ, त्याच प्रमाणें परका आणि आप्त असले संबंध संभवतात. आणि तद्नुसार त्यांचे परस्पर व्यवहार होत असतात. परंतु ज्याला देहाभिमान नाही आणि देहहि नाहीं त्या परमात्म्याला हे देहौपाधिक संबंध संभवत नाहीत. मग तद्नुसार होणारा व्यवहार तरी कुठून होणार ? शत्रु च नाही, मग त्याला जिकणार काय ? हा युक्तिवाद बिनतोड आहे. परंतु देही जीवांच्या दृष्टीनें तो परमात्मा शत्रुजित् म्हटला जातो. तो स्वतः तसे जाणत नाही वा वागत नाही. सूर्य अन्धकाराचा हन्ता, तमोनुद्, म्हटला जातो. आणि तसा तो असल्याचे आपण प्रत्यहींच पहातच आहों. आणि म्हणूनच तर आपण त्याला तें नांव दिले आहे. पण तुम्ही जर सूर्याला म्हटले की "बा सूर्या, तूं अन्धकारान्तक आहेस, तुझा जयजयकार असो !" तर तो म्हणेल, हे तुम्ही काय बोलतां ? अहो, अन्धकार कसा असतो तेंच मुळी मला ठाऊक नाही, आणि तुम्ही मला खुशाल अन्धकारान्तक म्हणून गौरवीत आहांत. कमाल आहे तुमची ! जरा चिमूटभर अन्धकाराचा नमूना तरी दाखवा मला. परंतु तसे करणे कधी तरी शक्य आहे का ? तात्पर्य, शत्रुजित् इत्यादि सारी त्या परमात्म्याची गौरवपर नामें आमच्या दृष्टीनें होत. त्याच्या दृष्टीनें ती सर्व कल्पित आणि जल्पित मात्र होत. पण ते कसेंहि असले तरी आमच्या दृष्टीनें सर्व शंभर टक्के सत्य आहे. सूर्य अंधाराचा नाश करतो याबद्दल कोणाला काही शंका आहे का ? परमात्माहि तसाच शत्रुजित् आहे. त्याच्या विरुद्ध जें जें उभे होईल तें तें परास्त होईल. त्याचा टिकाव लागावयाचा नाही. तो परमात्मा नरसिंहवत्हिरण्यकशिपूसारख्या शत्रूना लीलया जिंकतो. त्या चित्सूर्यापुढे सारें अज्ञान त्याच्या विकार-रोग-शत्रु-गणांसह पार नामोहरम होते. म्हणून तो परमात्मा शत्रुजित् म्हटला आहे. 'सत्यमेव जयते नानृतम्' या उपनिषद्वचनांत परमात्म्याचे हे शत्रुजित्त्वच स्पष्ट केले आहे.

८२१. शत्रु-तापन
'शत्रुजित् शत्रुतापन' ही एक जोडी आहे. परस्परपूरक नामें आहेत ही. दोहोंचे तात्पर्य एकच आहे. पण अर्थच्छटा भिन्न आहेत. रणांगणावर जो शत्रूंना जिंकतो तो म्हणावयाचा शत्रुजित् आणि एरव्ही प्रत्यक्ष युद्ध चालू नसतांना ज्याचा शत्रूना वचक आहे, धाक आहे, जरब आहे तो म्हणावयाचा शत्रुतापन. जो शत्रुपक्षाला अनुकूल, पोषक, सहायक वर्तन करतो तो शत्रुनंदन म्हटला जातो. कारण त्याच्या वागणुकीनें शत्रूंनाच आनंद होत असतो. त्याच्या उलट हा शत्रुतापन होय. त्याच्या नांवानें रूपानें गुणानें कर्मानें शत्रु सदैव रडत राहतो, कण्हत राहतो. परमात्मा हा असा शत्रुतापन आहे. सूर्योदयाबरोबर अंधार नेस्तनाबूद होतो. पण सूर्याचे नांव ऐकूनच अरुणोदय होत आहे असें पाहूनच, दिवाभीत आणि कोल्ही आपले तोंड काळे करतात. त्याप्रमाणें नित्यशुद्ध बुद्ध मुक्त परमात्मा प्रकट झाला म्हणजे अज्ञानाचे पुरतें वाटोळे होते. पण दैवी गुणांचा अरुणोदय झाला तरी कामक्रोधादि मनोविकार, आणि तज्जनित शीतज्वरोन्मादादि शरीररोग व दंभ-हिंसादि सामाजिक अनर्थ दूर होतात. अशा प्रकारें तो परमात्मा शत्रुजित् तसा शत्रुतापन आहे. शत्रूना अटकेत ठेवणे, त्यांना धाकांत ठेवणे, त्यांना सेवक करून ठेवणे आणि शेवटी त्यांना भक्त करून सोडणे म्हणजे त्यांना नाहीसे करणे होय. ज्ञानानें हृदय अनासक्त, बुद्धि स्थिर, मन निःसंकल्प, इन्द्रियें शान्त आणि शरीर निरोग व सत्प्रवृत होते. आणि अशा प्रकारें तें अंतर्गत म्हणजे मनोविकार बहिर्गत म्हणजे शरीरज रोग आणि त्यांचे प्रतिबिंबरूप सृष्टिगत व समाजगत शत्रु यांचे म्हणजेच आधि व्याधि उपाधींचे नियंत्रण नियमन आणि निर्मूलन करतें. परमात्मा हा असा सहज शत्रुतापन आहे. त्यासाठी त्याला सायास नाहीं करावे लागत.

८२२. न्यग्रोध (न्यग्रोधोदुम्बर)
'न्यग्रोधोदुम्बरो ऽश्वत्थः' हा चरण वृक्षवाची आहे आणि हे वट उदुंबर आणि अश्वत्थ वृक्ष पूज्य मानिले आहेत. पूज्य कां ? कारण ते भगवद्-विभूति होत. भगवद्-विभूतीचे लक्षण काय ? गीतेंत तें सांगून ठेवले आहे.
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ गीता १० - ४१

जिथे जिथे शोभारूप वा बलरूप ईश्वरी तेजाचा आविर्भाव झालेला आढळेल तें तें सत्त्व म्हणजे जडचेतन भूत विभूतियुक्त म्हणून जाणावें. हे तीन वृक्षविशेषहि असेच विभूति युक्त आहेत, म्हणून ते भगवद्‌रुप म्हणून इथें उल्लेखिलें आहेत.
न्युक् नीचैरपि रोहति इति न्यग्रोधः | जो वरून खालीहि वाढतो पारंब्यांच्या रूपानें तो म्हणावयाचा न्यग्रोध. सर्व बीजें कंद कलमें अंकुर रूपानें भूम्यादि कवचांचा उद्‌भेद करून वाढतात. परंतु वड हा असा वृक्ष आहे की तो वरूनहि खाली पारंब्या सोडून वाढतो. हे त्याचे वैशिष्ट्य लथून त्याला न्यग्रोध म्हटले आहे. परमात्म्यांतहि हे वैशिष्ट्य आढळून येते. तो सर्वोपरि आहे. आणि हा विश्वविस्तार त्याच्यापासूनच झालेला असून तो त्याच्या खालच्या बाजूला पसरलेला आहे. म्हणून तोहि न्यग्रोध म्हणावयाचा. गीतेंत १५ व्या अध्यायांत 'ऊधर्वमूलं अधःशाखं अश्वत्थं प्राहुरव्ययम् । ' म्हणून याच न्यग्रोधाचे वर्णन आले आहे. पण तिथे वडाची साल पिंपळाला चिकटविली गेली आहे. वडाचें रूप व अश्वत्याचें नाम असा प्रकार झाला आहे. पारंबी.धरून जसा माणूस झाडावर चढतो तसें साधकानें या विश्वविस्ताराला धरून, शिडी प्रमाणें त्याचा उपयोग करून घेऊन त्याचे ऊर्ध्व-मूळ जो परमात्मा त्याला गांठावें, खालच्या विस्तारांत च गुरफटून राहूं नये हे तात्पर्य, पूर्वी जंगलें विपुल व वस्ती तुरळक होती. तेव्हां कुठल्या गांवाला जायचे झाल्यास जंगलाचे अंतर कापून जावे लागत असे. अंतर कापणे हा प्रयोगहि जंगल तोडून मार्ग तयार करण्याचाच द्योतक आहे. परमात्मा हा तसा या संसाराटवीच्या पलीकडे आहे. त्याला भेटायला जायचे तर या संसाररूप जंगलाला वैराग्याच्या कुन्हाडीनें पार सोडून टाकलें पाहिजे असें गीतेचा १५ वा अध्याय सांगत आहे.

८२३. उदुम्बर
'न्यग्रोधो दुम्बरः' ही दोन पदे आहेत. पण न्यगरोध या पदाचा विसर्ग लोप पावून पुढील पदाच्या उकाराशी त्याचा संधि झाला आहे. नियमानुसार असा संधि निषिद्ध आहे. परंतु निरंकुशाः कवयः या न्यायानें इथे कविकुंजरानें व्याकरणाचा अंकुश जुमानलेला नाही. न्यग्रोधाच्या पारंब्या हे जसे त्याचे वैशिष्ट्य आहे तसे उंबराचेहि वैशिष्ट्य आहे. इतर वृक्षवनस्पतींची फुले व फळे वेगवेगळी दिसतात पण उंबराचे फूल वेगळे दिसत नाही. त्याचे फूल आणि फळ एकच. त्याचे फळ पुष्पगर्भ असते. फळाच्या आंत पुष्पराजि गुंडाळलेली असते. फूल आधी येतें मागाहून फळ धरतें असा सृष्टिक्रम आहे; परंतु उंबरांत जणूं तो लुप्त आहे, गुप्त आहे. हे विश्वहि उंबरासारखेच आहे. कोणत्या फुलापासून हे विश्वोदुम्बर उत्पन्न झाले आहे ते कळत नाही. तेंहि पुष्पगर्भ आहे. त्याचे कारणभूत पुष्प, तो परमात्मा, त्याच्या पोटांत लपला आहे. विश्व दिसते, पण त्याचे कारण तो परमात्मा दिसत नाही. म्हणून तो विश्वरूप परमात्मा उदुम्बर म्हटला आहे. उंबरांत जशी असंख्य पुष्पकें गुप्त असतात, तशी असंख्य विश्वें अव्यक्त परमात्म्याच्या पोटांत सांठवलेली आहेत. म्हणून तो स्वरूप परमात्मा उदुम्बर म्हटला आहे. परस्परांना गिळून प्रकटणारी ही स्वरूप-विश्वरूपें उदुम्बर रूपानें निर्देशिलीं आहेत. तें फळ म्हणाल तर फळ आहे, फूल म्हणाल तर फूल आहे. तें व्यक्तहि आहे आणि अव्यक्तहि आहे. तें व्यक्ताव्यक्त, आहेहि आणि नाहींहि. तें व्यक्ताकार दिसणारे फळ नाही. अव्यक्त पुषच आहे ,कारणरूपच आहे. पण कार्यरूप नाही म्हटलें म्हणजे कारण तरी कसे म्हणतां येईल ? म्हणून ते कारणहि नव्हे, अव्यक्तहि नव्हे. अशा प्रकारें कोणताहि क्रियाकारकवान् शब्द त्याचे यथार्थ वर्णन करूंच शकत नाही. हा सगळा आशय उदुम्बर पद व्यक्त करतें. तें उदुम्बरवत् पूर्ण आहे. म्हणून तो परमात्मा उदुम्बर म्हटला आहे." चरन् वै मधु विन्दते । चरन् स्वादु उदुम्बरम् " जो गृहासक्त आहे त्याला हे मधु हे उम्बर मिळत नाहीं, जो प्रव्रजन करतो, ग्रामसेवा सोडून अरण्यसेवन करतो, त्यालाच तें मधु ते उंबर मिळते.

८२४. अश्वत्थ
अश्वत्थ म्हणजे पिंपळ. "अश्वत्थः सर्व वृक्षणाम्' ह्या वचनानुसार पिंपळ हा भगवद्-विभूति आहे. लोकांतहि तसा त्याचा मोठा मान आहे. कोणत्या गुणामुळे खरोखर हा भगवद् विभूति म्हणून गौरविला गेला आहे ? वृक्षापासून १ फल २ पुष्प, ३ गृहोपयोगी काष्ठ, ४ इन्धन, ५ औषधिद्रव्य वा अन्य रंग तेल इत्यादि उपयुक्त पदार्थ आणि ६ छाया असे मुख्य लाभ होतात. परंतु अश्वत्थापासून यांच्यापैकी एकहि गुण उत्कटत्वानें लाभतो असें म्हणता येत नाही. फल-वृक्षांत आंबा, पुष्म-वृक्षांत बकुळ, काष्ठ-वृक्षांत शाक साग, इंधनवृक्षांत खदिर, औषधी द्रव्यादि वृक्षांत निम्बचन्दनादि आणि छाया वृक्षांत वट सुप्रसिद्ध आहे. पिंपळ शोभा- वृक्ष म्हणावा तर तो तसाहि खास दिसत नाही. अशोक सुरू इत्यादि वृक्षांकडेच तो मान जाईल. मग पिंपळाचे वैशिष्ट्य कोणते ? त्याचे चलपर्णत्वच त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याची पतंगाकार पानें इवल्याशा वायुलहरीनेहि सळसळतात. ती जणू सदैव नाचतच असतात. तो जणूं साक्षात् चैतन्यच आहे. जिथे अश्वत्थ आहे तिथे वायुवीजन होत राहतें. शिवाय तो यज्ञीय वृक्ष आहे. त्याच्या समिधा यज्ञांत लागतात. आणि म्हणूनच तो विभूति म्हणून गौरविला आहे. आपल्या चंचल पर्णांनी तो जणूं कुजबुजतो की हें जें सारें वैभव आहे तें चंचल आहे. तें अचंचल परमात्म्याच्या ठाई समर्पण करून कृतार्थ व्हा. तो पदार्थ जीवनाचा आदर्श आहे. नित्यदान आणि त्याग याचा आदर्श आहे. तो रोजच्या रोज पानें गाळत असतो, काटक्या अर्पत असतो. वैराग्याचा तो संदेष्टा आहे. तो आरण्यक आहे, ग्राम्य नव्हे. या अश्वत्थानेच बुद्धाला बोध दिला आहे. म्हणून त्याला बोधिवृक्ष म्हणतात. खरोखर तो असा मुनि होय. देशिक होय. 'गुरोस्तु मौनं व्याख्यानम्' हे वचन त्याला किती अन्वर्थकतेनें लागू पडते. असा हा अश्वत्थ परमात्म-रूप आहे. अश्वत्थ हे पद कपित्थ, गोष्ठ इत्यादि वर्गाचे आहे. कपित्थ म्हणजे कविठ कपीचे वसतिस्थान. गोष्ठ गाईचे तसे अश्वत्य अश्वाचे.

८२५. चाणूरान्धनिषूदन
"चाणूर नामानं अन्ध्र निषूदितवान् इति चाणूरान्ध्रनिषूदनः" ज्यानें चाणूर नामक आन्ध्राला, अनार्याला, ठार केलें तो म्हणावयाचा चाणूरान्धनिषूदन. हा ऐतिह्य वा पौराणिक स्वरूपाचा उल्लेख आहे. परमात्मा हा दिक्कालादिकांनी अपरिच्छिन्न अव्यक्त अक्षर स्वरूप असतां त्याला तिहासिक व्यक्ति मानणे म्हणजे त्याला पदच्युत करण्यासारखेच होय. हे अज्ञान होय, प्रमाद होय. गीतेंत ह्याचा स्पष्ट निषेध केला आहे.
"अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां अबुद्धयः ।
परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्" ॥ गीता ७ - २४

अर्थात् परमात्मा हा परमार्थतः केव्हांहि व्यक्ति मानता येत नाही. ह्या बरोबरच व्यक्तींनाहि निव्वळ व्यक्ति मानणे हेहि चूकच आहे. कारण त्या व्यक्ति वस्तुतः अव्यक्तच होत. अव्यक्तांतूनच त्यांचा उद्‌भव झाला आहे आणि अव्यक्तांतच त्यांचा अंत होतो आहे. अशा स्थितीत मध्यंतरी भासमान होणाऱ्या त्यांच्या आकाराला, व्यक्तीला खरेंच व्यक्त मानणे म्हणजे सत्याला मिथ्या मानणेच नव्हे काय ? राजाला रंक मानण्यासारखेच हे आहे. अर्थात् अव्यक्त परमात्मरूप असलेल्या ह्या सर्व व्यक्तींना मातृ पितृ भ्रातृ रूप वा शत्रु मित्र तटस्थ मध्यस्थ रूप मानणे हाहि महान् मोह होय, प्रमाद होय. महान् अपराध आहे हा. अव्यक्त हा व्यक्तीभूत होतो असे मानणे अथवा व्यक्तमात्राला वस्तुतः अव्यक्त न मानणे असा हा दुहेरी प्रमाद आहे. उभयत्र वस्तूला वस्तु न मानता अवस्तु मानणे हाच प्रमाद होतो. व्यक्ताला वस्तुतः अव्यक्त म्हणून न ओळखण्यांत परमात्म्याचा अवमान होतो. या तथ्याकडे गीतेनें लक्ष वेधून घेतले आहे भगवान् म्हणतात
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावं अजाननन्तो मम भूतमहेश्वरम ॥ गीता ९ - ११

वरील आणि या श्लोकांत "परं भावं अजानन्तः' हा भाग समानच आहे. इथे चाणूरान्धनिषूदन पदांत जरी व्यक्ताचा वास असला, तरी असुर-हनन रूप स्थूल कर्म दिसत असले तरी, तें सर्व अव्यक्तकृत आहे असे ओळखावयाचे. "मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्' या वचनांत हाच भाव स्पष्ट केला आहे. विश्वांत जें कांहीं बरें वाईट होतें तें सर्व अव्यक्तकृत होय. व्यक्ति केवळ निमित्त होत. हा सर्व आशयच चाणूरान्धनिषूदन पदांत निहित आहे. अव्यक्त मूळ असल्यामुळे त्याचे कर्म हे सदैव पूर्वमेव' असते व्यक्तीचे वर्णन सदैव पिष्टपेषणच.


सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधा सप्तवाहनः ।
अमूर्तिरनघोऽचिन्न्त्यो भयकृद्भयनाशनः ॥८९॥


८२६. सहस्रार्चि
सहस्राणि अर्चीषि यस्य सः सहस्रार्चिः| ज्याच्या ज्वाला सहस्रावधि आहेत तो म्हणावयाचा सहस्रार्चि, तेजोनिधि सूर्य सहस्रांशु म्हटला जातो. अंशु म्हणजे किरण. परंत हे त्याचे किरण कोणी मोजले का आहेत ? तथापि त्याला असंख्य-किरण-माली म्हणून सहस्रांशु म्हटले जाते. सहस्रांशु आणि सहस्रार्चि एकच. पण अंशु पद मुख्यतः प्रकाशकिरणावाची आहे, तर अर्चिस् पद तापांशवाची आहे. अर्थात् सहस्रार्चि म्हणजे अमितदाहकशक्तिसंपन्न. आमच्या परिचयाचे तेजःपुंज म्हणजे भूमीवर उपलब्ध होणारा अग्नि, अन्तरिक्षगत विद्युत् आणि आकाशस्थ सूर्य होय. या तिहींच्याहि ठाईं दाहकता आणि प्रकाशकता आहे आणि ती उत्तरोत्तर गणित श्रेष्ठीनें नव्हे, अगणित श्रेष्ठीनें वाढत गेली आहे. तेंच अगणितत्व सहस्र पदानें अभिप्रेत आहे. गीतेंत 'दीप्तानलार्कद्युति अप्रमेयम् या वचनांत हाच आशय व्यक्त झाला आहे. त्यांत अनलार्क हा मध्यमपदलोपी समास आहे. अनलार्क म्हणजे 'अनलेन विद्युताच सहितः अर्कः' असा भाव. परंतु अग्नि विद्युत् सूर्य एकत्र केले आणि त्यांचें तें एकवटलेलें तेज दशशत-गुणित केले तरी तें चित्तेजाची कधी तरी आणि नखभर तरी बरोबरी करू शकेल काय ? तें शक्यच नाही. जड-चेतनांची बरोबरी कशी होणार ? म्हणून गीता म्हणते
दिवि सूर्य सहस्रस्य भवेदद्युयुगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ गीता ११ - १२

आमच्या जवळ त्या परमात्म-तेजाचे वर्णन करायला समर्थ शब्द नाहीत, म्हणून आम्ही त्याला सहस्रार्चि म्हणतों. सहस्र आणि अर्चि हे आमच्या आटोक्यांतील शब्द आहेत. त्यांनीच आम्ही त्या अप्रमेय तेजाची वाखाणणी करतो, ज्याचें ध्यान गायत्री मंत्रांत आले आहे.

८२७. सप्त-जिह्व
"सहस्रार्चिः सप्त-जिह्वः सप्तधाः सप्त-वाहनः" हा श्लोकार्ध तेजस्तत्त्वाचे निरूपण करणारा आहे. पैकी सहस्रार्चि हे पद त्या तेजाच्या अनन्तत्वाचें, सर्वातिशायित्वाचे वर्णन करतें, तर "सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः" हीं पदें त्याच्या विशिष्टत्वाचे वर्णन करतात. तो तेजोनिधि परमात्मा सूर्यरूपानें सहस्रार्चि आहे तर अग्निरूपानें तोच 'सप्त-जिह्वः सप्तधाः सप्तवाहनः'हि आहे. अग्नीच्या सप्त जिहवा उपनिषदांतील पुढील श्लोकांत दिल्या आहेतः
काली कराली च मनोजवा च
सुलोहिता. या च सुधूम्रवर्णा ।
स्फुलिगिनी विश्वरुची च देवी
लेलायमाना इति सप्त जिह्वाः ॥

काली म्हणजे शिव आणि शान्त स्वरूप अव्यक्त अग्निदेवाच्या अंकावर नाचणारी व्यक्ताकृति ज्वाला. कराली म्हणजे उग्ररूपिणी ज्वाला. मनोजवा म्हणजे अव्यक्त व अतिवेगवती ज्वाला. सुलोहिता म्हणजे -तांबडी भडक निधूम ज्वाला. सुधूम्रवर्णा म्हणजे सधूम ज्वाला. स्फुलिंगिनी म्हणजे तडतडणारी ठिणग्या विखुरणारी ज्वाला. आणि विश्वरुची म्हणजे नाना वर्णांची ज्वाला, काळी निळी,हिरवी, पिवळी, लाल तांबडी आणि पांढरी ज्वाला. या सर्व ज्वाला देवी म्हणजे तेजोरूप होत. आणि लेलायमान म्हणजे लपलपणाऱ्या होत, गतिमान होत. या सात जिभांनी तो जातवेदा परमात्मा जातमात्राचे म्हणजे विश्वाचे वेदन म्हणजे रसन आणि ग्रसन करीत आहे. जिह्वा हें ज्ञानेंद्रिय आहे. त्याच बरोबर तें कर्मेंंद्रियहि आहे. जिह्वेच्या साहाय्यानें शब्दोच्चारण होतें. अग्नीच्या ज्वाला चटपट कडकड इत्यादि ध्वनिहि करतात. वेदाचे सात छंद ह्याहि सात जिभा च होत. त्यांच्या साहाय्यानें वेद बोलत असतात. वेद जगत्-प्रकाशक आहेत. म्हणून तेहि अग्निस्वरूपच होत. अशा प्रकारें अग्निस्वरूप व वेदस्वरूप वा उभयस्वरूप परमात्मा हा सप्तजिह्व होय.

८२८, सप्तैधाः
सप्त एधांसि यस्य सः सप्तधाः| ज्याच्या सात समिधा आहेत तो यज्ञात्मा अग्नि सप्तधा म्हणावयाचा. "सप्त ते अग्नें समिधः सप्त जिह्वाः" असें श्रुतीचें वचन आहे. तदनुसारच सप्तजिह्वः सप्तैधाः ही नामें आलेली आहेत. वेद आणि यज्ञ म्हणजे मंत्र व तंत्र होत. ते परस्परसंबद्ध आहेत. मंत्र उच्चारावयाचा व तंत्र आचारावयाचें, मंत्राचा विनियोग नुसता 'जपे नाहीं, तो 'क्रतौ यज्ञकर्मणि' च आहे. कारण 'वेदाहि यज्ञार्थमभिप्रवृत्ताः' आणि जप म्हणजे तरी काय आहे ? तीहि एक सूक्ष्म क्रिया च आहे, तोहि एक यज्ञच आहे, ज्यांत यज्ञपुरुष मंत्रात्माच आहे. आणि हव्यवाट्, हवन होता आणि हवि इत्यादि सर्व यज्ञसामग्री मंत्रात्मक च आहे. म्हणूनच गीतेंत "यज्ञानां जपयज्ञो ऽस्मि" म्हटले आहे. पण हा जप कसा करायचा ? मनुष्य माळ हाती घेतो, स्मरणी हातीं घेतो व एक एक मणि ओढीत असतो. यज्ञांत तीच क्रिया होते. मनानें ईश्वराचे स्मरण करायचे, मुखानें त्याचे नाम घ्यायचे आणि हातांनी त्याला समर्पण करायचे अशी ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची दोन प्रकट अंगें म्हणजे मंत्रोच्चार व हवन होत. छन्दोवाणी सप्तधा आहे तशी यज्ञाहुति सप्तधा आहे. सात समिधा अग्नींत होमिल्या जातात. कोणत्या ह्या सात समिधा ?
"अर्क: पलाशः खदिरः, अपामार्गोऽथ पिप्पलः । औदुम्बरः शमी चैव समिधः सप्त कीर्तिताः ॥ " रुई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, उंबर आणि शमी ह्या त्या समिधा. मंत्रानें देवाचें ध्यान करावयाचे, वाणीनें त्याचे स्तोत्र गावयाचे आणि हातांनी यज्ञाग्नीत एक एक आहुति, एक एक समिधा समावयाची. अशा प्रकारें आपलें अंतर्बाह्य सर्व जीवन ह्या परमात्म्याशी निगडित करून टाकायचे. देहें प्राणें मनें त्या परमात्म्याशी एकजीव होऊन जायचे. असे होण्याची जी प्रक्रिया तिचें नांव यज्ञ होय. या प्रक्रियेंत पंच प्राण आणि मन व बुद्धि त्या परमात्मतेजांत, त्या ब्रह्माग्नींत होमावयाची आहेत. म्हणून तो परमात्मा सप्तैधाः म्हटला आहे.

८२९. सप्त-वाहन
सप्त वाहनानि वाहाः यस्य सः सप्तवाहनः । अथवासप्तकं वाहनं यस्य सः सप्तवाहनः । सात घोडे वा घोड्यांचे सप्तक हे ज्याचें वाहन आहे तो सूर्य म्हणावयाचा सप्तवाहन. या पासूनच सातवाहन हें. राजाचें नांव आलेले आहे. वेदांत तेजोनिधि परमात्म्याचे च परोपरीनें वर्णन केलेले आहे. आणि म्हणून तो सप्तच्छन्दोमय वेद परमात्म्याचे वाहन होय. परमात्मा चित्सूर्य आहे आणि उपासनेसाठी भौतिक सूर्य त्याचे प्रतीक म्हणून मानिला आहे. तोहि सप्तवाहन आहे. त्याचे सप्तवर्ण किरण हेच त्याचे वाहन होय. सूर्यकिरण सप्तवर्णात्मक आहे म्हणून त्याला सप्तिः असें म्हणतात. आणि त्यावरून सप्तवाहन प्रमाणें सप्तसप्ति हेहि एक सूर्यनाम प्रसिद्ध आहे. पण सप्ति म्हणजे तर घोडा. किरण आणि घोडा यांच्यांत काय साम्य ? किरण पुढें दौडतो, अति वेगानें दौडतो म्हणून तो घोडा होय. पवनः "पवतां आस्मि' 'वेगवतांत मी वायु असे म्हटले आहे. पण वेगवंतांत किरणाची बरोबरी दुसरा कोण करू शकेल ? मिनिटांत प्रकाशकिरण हजारों मैल जातो. म्हणून तो अति वेगवान् वाहन होय. तो आपल्या तेजोदेवतेला वाहून नेतो. जिथे किरण पोंचला तिथे किरणमालीहि पोंचला च आहे.
सप्तच्छन्दोमय वेद वा सप्तकिरणमाली सूर्य हा परमात्मस्वरूप आहेच पण त्याबरोबरच हा पुरुष म्हणजे जीवहि सप्तवाहन आहे. अंतःकरण, प्राण आणि पंचेद्रियें हें सप्तक त्या जीवाचें वाहन होय. यांच्या योगे तो या विश्वांत संचार करीत आहे. म्हणून तोहि सप्तवाहन होय. वेद सूर्य जीव हे तिन्ही सप्तवाहन असून परमात्म्याचे प्रतीक होत. परमात्मा वस्तुतः सर्वव्यापी आहे. त्याला वाहन कशाला ? तथापि तो आम्हांला सप्त वाहनांतून येऊन भेटतो म्हणून आम्ही त्याला सप्तवाहन म्हणतों इतकेंच.

८३०. अमूर्ति
न मूर्तिर् यस्य सः अमूर्तिः । ज्याला मूर्ति नाहीं तो अमूर्ति म्हणावयाचा. ज्याला मूर्ति नाही असे पदार्थ जगांत किती तरी आहेत. आकाश, मन, बुद्धि, अहंकार, प्रकृति आणि तिचे गुण हे सर्व अमूर्त भावच होत. त्यांना आकार नाहीं, अवयव नाहींत. जे सावयव आहेत तेच मूर्त वा मूर्तिमान् म्हणावयाचे. परमात्मतत्त्व हे साकार सावयव नाही. जें साकार सावयव असतें तें दृष्ट असते. आणि "यत् दृष्टं तत् नष्टम्" असा सिद्धांत आहे. परमात्मतत्त्व अविनाशी असल्यामुळे तें दृष्ट नाहीं, साकार सावयव नाहीं. वायुहि दिसत नाही, पण तो सावयव आहे. त्याचे अवयव आम्हांला स्पर्श करतात. स्पर्श करतात त्या अर्थी तो सावयव आहे आणि साकारहि आहेच. त्याचा आकार दृग्गोचर होत नाही याचे कारण तो आकार स्थूल नसून सूक्ष्म तरल विरल आहे हेच होय. वायु अच्छाय अनणु म्हणता येणार नाही. त्याचा छायालेख घेता येईल. त्याचा भार मोजतां येईल. आणि ज्याला भार आहे, त्याला अनणु म्हणजे निरवयव आणि अच्छाय म्हणजे अरूप कसें म्हणतां येईल. तेव्हां परमात्मा हा अमूर्ति आहे याचा वरवरचा' अर्थ तो स्थूल नाहीं, गोचर नाही एवढाच घ्यावयाचा नाही. त्याचा खोल अर्थ तो अव्यक्त निर्गुण अक्षर स्वरूप आहे असा आहे. जो मूर्तिमान् म्हणजे सदेह आहे त्याला जन्म आहे, त्याला वासना आहे, त्याला कर्म आहे, त्याला कर्माचे पाप-पुण्य आहे. परमात्मा या सर्वांतून मुक्त आहे. परमात्मा जर अमूर्ति आहे, तर जे लोक त्याची मूर्ति कल्पितात आणि तिची पूजा करतात त्यांचे काय ? ते काय भ्रांत म्हणावयाचे ? परमात्मा हा वस्तुतः अव्यक्त अक्षर स्वरूप आहे ही ओळख जर त्यांना नसेल तर ते मूर्तिपूजक भ्रांतच होत. भगवंतानें त्यांच्या बद्दलच म्हटले आहेः "न तु मां अभिजानन्ति तत्वेनातश् च्यवन्ति ते" परमात्याविषयीं लोकव्यवहाराबाबत ज्ञानदेवांनी योग्यच म्हटले आहे: "देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु".

८३१. अनघ
परमात्मा अमूर्ति म्हणजे अदेह आहे. म्हणून त्याला जन्म नाहीं. जन्म नाही म्हणून कर्महि नाही. आणि कर्म नाही तर त्या कर्माचे पापपुण्य कुठून असणार ? असा परमात्मा हा अनघ म्हणजे निर्मल आहे, निर्लेप आहे. ईशोपनिषदांत त्याचे वर्णन : "अकार्य अव्रणं अस्नाविरं आणि अपापविद्धं" अशा विशेषणमालिकेनें केले आहे. शेवटी अपापविद्ध म्हणून त्याला एका पदांत गौरविले आहे. त्यांत त्याचे सारे वैशिष्ट्य आहे. कोणत्याहि पापाचा वेध त्यावर चालत नाही. पण जो देह धारण करतो तो जीव पापांतून सुटू शकत नाही. जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोष-परंपरेंत तो सांपडलाच आहे. तेव्हां या चक्रांत न सांपडण्याची जी युक्ति तेच अनधत्व होय. आणि ती युक्ति म्हणजे आत्मज्ञान होय. म्हणूनच म्हटले आहे गीतेतः
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि|| गीता ४ - ३६

ज्यानें ज्ञानानें आपलें स्वरूप ओळखलें, ज्यानें आपण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त-स्वभाव आहों हे अनुभवलें तो सर्व पापांतून सुटला. तो अनात्म देहाशी. आणि तत्कृत कर्मांशी आणि कर्मजनित गतींशी आपला कसलाहि संबंध मानत नाहीं. नट वा बहुरूपी ज्याप्रमाणें आपण घेतलेल्या राजाच्या सोंगानें सुखी व भिकाऱ्याच्या सोंगानें दुःखी होत नाही, पण त्या दोन्हींहि स्थितीत आत्मत्वानें सुखदुःख रहित असतो तद्वत् तो सदैव स्वरूपस्थित असतो. त्याला सुखदुःखादि अनात्मभावरूप अघाचा स्पर्शच होत नाही. म्हणून परमात्मा हा अनघ होय. जो त्या निजरूप परमात्म्याचे स्मरण करतो तोहि त्या परमात्मपदाला, अनघ पदाला पोचतो.

८३२. अचिन्त्य
परमात्मा हा 'अमूर्ति अनघ अचिन्त्य' असें एका चरणांत सूचित केले आहे. त्यांत हेतु आहे. स्थूल सूक्ष्म आणि सुसूक्ष्म असा त्यांत क्रम दर्शविला आहे. तो अमूर्ति म्हणजे देहरहित आहे. देहरहित आहे इतकेंच नव्हे तर तो कर्मरहितहि आहे. आणि केवळ कर्मरहितच नव्हे तर तो अचिन्त्य म्हणजे गुणरहितहि आहे. त्याच्या विषयी मनानें कसलेहि चिन्तन करतांच येत नाही. पाऱ्याचा रवा जसा चिमटींत धरतां येत नाही, त्याप्रमाणें आत्मतत्त्व मनानें स्पर्शतां येत नाही. तिथें मनाचा लाग नाही. म्हणून तो परमात्मा अचिन्त्य म्हणावयाचा. आपण एखाद्याचे नांव ऐकून असतो. त्याबरोबर त्याच्या आकृतीची वर्णाची मुद्रेची कल्पना आपण करतो. त्याचे गुण स्मरतों, कर्म वाखाणू लागतो. अशा प्रकारें नामरूपगुणकर्मांच्या योगें समग्र निरूपण आपण आपल्याशी करीत असतो. तद्वारा च आपल्याला त्याचा परिचय होत असतो. परंतु परमात्म्याचा असा परिचय करून घेता येत नाही कारण तो नामरूप-गुणकर्म-रहित आहे. जो जन्मतो त्याचे नामकरण होते. ज्याला जन्मच नाही त्याचे नांव काय सांगणार ? रूप काय वर्णणार ? गुण काय सांगणार आणि पोवाडे ते तरी काय गाणार ? म्हणून त्या परमात्म्याचे वर्णन श्रुति निषेधमुखानें करीत असते. तो अज आहे, अकाय आहे, अक्रिय आहे, अचिन्त्य आहे.
"एतद् वै तद् अक्षरं गार्गि ब्राह्मणा अभिवदन्ति अस्थूलं अनणु, अन्हवं अदीर्घ, अलोहितं, अस्नेहं अच्छायं अतमः ! बृहदारण्यक ३ । ८ । ८
'अमूर्तिरनघोऽचिन्त्यः' हा त्याचाच अनुवाद होय, संक्षेप होय. माणसाला जसे आपल्याच खांद्यावर बसतां येत नाही त्याप्रमाणें आत्मतत्त्व आपल्यालाच विषयत्वानें जाणूं शकत नाही. तें विषयी आहे. "विज्ञातारं अरे केन विजानीयात्' असें श्रुति आक्षेपिते. अचिन्त्य पदाचा तोच अभिप्राय आहे. परमात्मतत्त्वाविषयी कुठलाहि मनोव्यापार संभवत नाहीं ते सारे तिथे कुंठित होतात. तें परमात्मतत्त्व स्मरण-विषय होत नाही आणि विस्मरणविषयहि. असें. तें अचिन्त्य आहे.

८३३. भयकृत्
भयं करोति इति भयकृत् । जो भिववितो तो भयकृत् म्हणावयाचा. आपल्याहून जो बलवान् आहे, जो आपला निग्रहानुग्रह करू शकतो त्याचे भय वाटत असतें. चतुष्पदांना द्विपद मानवाचे भय आहे. मानव प्रजेला राजाचे, राजांना अधिराजाचें, अधिराजांना सम्राटाचे भय आहे. अशा प्रकारें वरिष्ठाचे भय कनिष्ठाला सर्वत्र आहे. सर्वांहून वरिष्ठ आणि बलिष्ठ तो परमात्मा आहे. सर्व सत्ता त्याची आहे. त्यामुळे तो सर्वांना भयकृत् म्हटला आहे. त्याच्या आज्ञेत हे सारें विश्व वागत आहे. सगळे अधिकारी देव मानवादि त्याच्या दिलेल्या अधिकारानुसार वर्तत आहेत. त्याच्या धाकानें सूर्य नियमित प्रकाशतो, वारा वाहतो, मेघ वर्षतात, भूमि पिकते. सर्वांचा स्वभाव हा ईश्वरदत्त अधिकार आहे. त्याचे अतिक्रमण कोणी करू शकत नाहीं, जो करील त्याला भय आहे. वर्णाश्रम-धर्महि स्वाभाविक आहेत. जो त्यांचें अतिक्रमण करील त्याला भय आहे. यालाच अनुलक्षून म्हटले आहे"स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मों भयावहः."अर्जुनाला गीतेंत भगवंतानें युद्धाचे घोर कर्म करायला नाहीं सांगितले, त्याला स्वधर्म पाळायला सांगितले आहे. अर्जुन स्पष्ट आज्ञा मागतो
ज्यायसी चेत्कर्ममस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ गीता ३ - १
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ गीता ३ - २

याचे उत्तर भगवंतानें शेवटी दिले आहेः
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैव व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ गीता १८ - ५९
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत् ॥ गीता १८ - ६०
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन् सर्व भूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ गीता १८ - ६१
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत
तत्प्रसादात्परां शान्ति स्थान प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ गीता १८ - ६२

तात्पर्य, ईश्वरदत्त स्वभाव ही ईश्वरी आज्ञा आहे. तिला अनुसरून वागले पाहिजे. त्या स्वभावरूप ईश्वराशेचे भय सर्वांना आहे. त्यांतून कोणीहि सुटूं शकत नाही. म्हणून तो परमात्मा भयकृत् होय.

८३४. भय-नाशन
भयं नाशयति इति भयनाशनः ।जो भय नाहींसें करतो तो भय-नाशन म्हणावयाचा. परमात्मा केवळ भयकृत् च नाहीं, भयनाशनहि आहे. जो परमात्याच्या आज्ञेत वागतो त्याचे भय तो परमात्मा नाहींसें करतो. परमात्म्याची आज्ञा कोणती ?
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ गीता ३ - ३०

सर्वकर्तृत्व त्या परमात्म्याचे आहे हे ओळखून कोणताहि स्वार्थ मनांत न आणतां भागास आलेलें कर्तव्य माणसानें करीत असावें. त्या कर्माच्या फळाची आशा धरूं नये. अशा प्रकारें निष्काम स्वधर्माचरण केल्यानेच भय-नाश होतो; जो कर्मच करणार नाही असा हेका धरील, अथवा कर्मफलाच्या लोभानेच कर्म करील त्याला भय आहे. "यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म-बन्धनः". तो कर्तृत्वभोक्तृत्वाच्या परधर्मात सापडेल. कर्तृत्व-भोक्तृत्वरहितता हा स्वधर्म आहे, आत्म-धर्म आहे. कर्तृत्वभोक्तृत्व हा अनात्म-धर्म आहे. परधर्म आहे. तें ओझें जो आपल्या डोक्यावर घेतो तो कष्टी झाल्यावांचून कसा राहील ? पण जो हे परक्याचे ओझें उचलतच नाहीं त्याला ते डोक्यावरून उतरविण्याचेहि श्रम होत नाहींत. ह्याचंच नांव संन्यास. हा मनसा करावयाचा आहे. आणि हा सर्वकर्म-संन्यास आहे. त्यांत निवडानिवड नाही. काही कर्में करायची, कांहीं टाकायची, असा प्रकार नाही. हा कर्ममात्राचाच संन्यास आहे. ही स्थूल क्रिया नाहीं. वस्तूचें दान, फलवासनेचा त्याग आणि सर्वकर्मांचा संन्यास ही स्थूल, सूक्ष्म. आणि सूक्ष्मतर प्रक्रिया आहे. वस्तुतः संन्यास हा साक्षात्कार आहे. ती मुळी क्रियाच नाही. हा आत्मसाक्षात्कारच भयनाशन आहे. कारण त्यानंतर द्वैत उरत नाही. "तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः । द्वितीयाद् वै भयं भवति । भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात्' इत्यादि वचनें अद्वैताचे, एकत्वाचे अभयत्व प्रतिपादितात. द्वैतरूप अज्ञानच भय आहे आणि ते आत्मज्ञानानें नाश पावते. म्हणून ज्ञानस्वरूप परमात्मा हा भयनाशन होय.


अणुर्बृहत्कृशःस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् ।
अधृतः स्वधृतः स्वास्यः प्राग्वंशो वंशवर्द्धनः ॥९०॥


८३५. अणु
अणुर बृहत् कृशः स्थूलो, गुणभृन् निगुणो महान् । या श्लोकांत परस्पर विरोधी विशेषणांच्या जोड्या आल्या आहेत. त्या परमात्म्याची व्यापकता दाखविण्यासाठी होत. तो अणु म्हणजे अतिसूक्ष्म आहे आणि त्याच बरोबर तो बृहत् म्हणजे अति विशालहि आहे. तो कृश आहे आणि त्याचबरोबर तो स्थूलहि आहे. तो गुणभृत् आहे त्याच बरोबर निर्गुण आहे, सारांश, त्याला कोणत्याहि एकाच विशेषणानें विशिष्ट करणे म्हणजे त्याचे सर्वात्मकत्वहिरावून घेण्यासारखे आहे. म्हणून त्याला परस्पर विरोधी विशेषणांच्या जोड्यांनी आळवून शेवटीं महान् म्हणून संबोधिलें आहे. हा महान् एकेरी बृहत् पदानें विशिष्ट महान् हून वेगळा आहे. यांत अणुबृहत् दोहोंचाहि समावेश आहे. अणूचा निषेध करणारा बृहत् नाहीं हा. तसा कोणाचाहि निषेध जर तो करील तर तो संकुचित होऊन अव्यापक होऊन महान् या पदवीस पात्र होणार नाही. सर्व निषेधांचा निषेध करून शेष राहणारा असा हा अशेष आहे. त्यालाच महान् म्हणावयाचे. हा महान् इतका महान् आहे की तो आपल्या अतिसूक्ष्मत्वामुळेच आणुत्वामुळे आकळतां येत नाही. म्हणून उपनिषदांनी म्हटले आहे ः "अणोः अणीयान्' तो परमात्मा अणूहून अणु आहे. 'किती अणु, किती सूक्ष्म' असे विचाराल तर म्हणावे लागेल की तो अनणु आहे. अणूचा आशय हाच. आतां त्याला तुम्ही अणु म्हणा की बृहत् म्हणा, तो तुमच्या आकलनांत येत नाही आणि म्हणून तो महान् म्हणावयाचा. गीतेनें हाच भाव "सूक्ष्मत्वात् तद् अविज्ञेयम्' या शब्दांत व्यक्त केला आहे.

८३६. बृहत्
बृहत् म्हणजे विशाल, ऐसपैस, लांबरुंद. जें व्याप्य आहे तें बृहत् म्हणतां येत नाही. व्यापकालाच बृहत् म्हणता येईल. आकाश असें बृहत् आहे. त्यानें सर्व व्यापिलेलें आहे. तें असीम आहे. परमात्मा हा तसा व्यापक आहे. तो सर्वांच्या आंत बाहेर व्यापून आहे. आकाश शब्दगुण आहे. म्हणजे त्याला व्यावर्तक क्तित्व आहे. परंतु परमात्मा हा अव्यक्त आहे, निर्गुण आहे. त्यामुळे तो सर्वांहून व्यापक आहे. त्याला व्यापील असें दुसरे कोणतेंहि तत्त्व नाहीं. म्हणून तोच एक बृहत् होय. अणु जसा सूक्ष्मत्वामुळे पकडतां येत नाही, आकळतां येत नाही, तसा बृहत्हि त्याच्या अतिविशालत्वामुळे पकडतां येत नाही, आकळतां येत नाही. जसा पाऱ्याचा रवा चिमटीनें धरतां येत नाही, तसा डोंगरहि कवट्यांत धरतां येत नाही. सूक्ष्म म्हणून वा स्थूल म्हणून त्याची इयत्ता वा परिमिति तुम्हांला करतांच यावयाची नाही. म्हणून म्हटले आहेः "अणोः अणीयान्, महतो महीयान्." परस्परविरोधी विशेषणांनी विशेषिलेली ही वस्तु, हे आत्मतत्त्व एकच आहे. तें एकसमयावच्छेदे करून अणोः अणीयान् नि महतो महीयान् आहे. पहा, आकाश हे किती सूक्ष्म आहे आणि त्याच बरोबर तें किती विशालहि आहे ? या दोहोंत कांहीं विरोध येत नाही. त्याप्रमाणें परमात्मतत्त्वहि सर्व परस्पर-विरुद्ध विशेषणांची संवाद-भूमि आहे. ऋषींच्या आश्रमांत वाघ आणि गाय सहज वैर विसरून एकत्र नांदतात त्याप्रमाणें या परमात्म्याच्या ठाई सर्वांचे सर्व विरोध मावळतात. सर्व विश्व इथे एकनीड होते. "यत्र विश्वं भवत्येकनीडम्' सर्वांचें तें माहेर आहे. तो परमात्मा इतका विशाल आहे, इतका बृहत् आहे की कोणालाहि तिथें मतजाव नाही, कोणाचाहि निषेध नाहीं. तिथे सर्वांचेच स्वागत आहे आणि समान स्वागत आहे.

८३७. कृश
कृशता हा दोष म्हटला जाईल. पण ती कृशता जर सत्कारणी आली असेल तर तो गुणच ठरेल. गुरूपासकाचे वर्णन करतांना ज्ञानदेवांनी म्हटले आहे की तो "गुरुदास्यें कृश, गुरुप्रेमें सपोष" असतो तो आचार्योपासक गुरुदास्यानें कृश झालेला दिसतो, पण त्याच बरोबर गुरुप्रेमानें वस्तुतः तो पुष्ट झालेलाहि असतो. बाह्यतः तो कृश दिसला तरी ती त्याची कृशता वस्तुतः आंतरिक पुष्टिच असते. तपस्येनें देह कृश होतो, पण वस्तुतः ती आत्मबलाची पुष्टिच होय. ज्ञानदेवांनी म्हटले आहेः जयाचे मनीं आलस्य । देहीं अति कार्य शमदमी सौरस्य । जयासि गा ॥ परमात्म्याचा भक्त कसा असतो ? देहगेहाच्या विषयी त्याच्या मनांत अति आळस भरलेला असतो आणि तत्परिणामी त्याचा देह अति कृश होतो. पण इकडे जसजशी त्याची कृशता वाढत असते तसतशी शमदमादि षट्संपत्ति वाढत जाते. त्याच्या त्या आत्मसंपत्तीचे जणूं मापच त्याची ती कृशता असते. भक्ताची, दासाची ही स्थिति तर स्वतः परमात्म्याची ती काय वर्णावी ? तो इतका कृश आहे की त्याचा मुळी देहच लोप पावला आहे, तो विदेहच आहे. ज्या अज्ञानापासून देह संभव व्हायचा त्या उपादानाचाच अभाव असल्यामुळे तो कृश आहे. लाकडाची बाहुली लाकूडच नसल्यास जितकी कृश होईल तितका तो कृश आहे.

८३८. स्थूल
परमात्मा इतका कृश आहे की तो विदेहच म्हणावा लागतो. तसा तो इतका स्थूल आहे की तो विश्वात्मकच म्हणावा लागतो. विश्वाहून स्थूल दुसरें काय बरें आहे ? आणि तें विश्व परमात्म्याहून जर वेगळे म्हणतां येत नाही तर तो परमात्मा स्थूल स्थविष्ठ कसा नव्हे ? चिमट्याच्या दोन भुजा असतात. त्या भुजांनी तो वस्तु पकडतो. अणु बृहत्, कृश स्थूल, गुणभृत् निर्गुण ह्या जोड्याहि तशाच पकडीच्या आहेत. त्यांच्या पकडींत सर्व वस्तु पकडल्या जातात. एकाच तीराची जशी नदी संभवत नाहीं त्या प्रमाणें ही सृष्टिरूप नदीहि ह्या जोड्यांवाचून संभवत नाहीं. सर्व वस्तु उभयगुण-संपुटित आहेत. एखादा मनुष्य कृश नाहीं स्थूल नाहीं, जसा असावा तसा बेतशीर आहे, असे म्हटले तरी ते कृश स्थूल शब्दांच्या साहाय्यानेच म्हणावे लागते. त्या अर्थाला डावलून तो भाव प्रकट करतांच येत नाही. अशी ही सर्वंकष पकड़ हेच त्या परमात्म्याचे स्वरूप. जो सर्वात्मक आहे, त्याच्या पकडीतून कोण कसा सुटणार ? परमात्म्याची ही. व्याप्ति, ही विश्वात्मकता दाखविण्यासाठीच त्याला जोडीनें अणु-बृहत्, कश-स्थूल, गुणभृत्- निगुण म्हटले आहे. तोच सर्व आहे, सर्व तोच आहे, हे अन्वयव्यतिरेकानें प्रत्ययास आणून देणे हे आहे शास्त्राचे प्रयोजन. त्याच्या सिद्धीसाठी शास्त्र परोपरीनें झटत असतें. वेद उपनिषदें गीता ब्रह्मसूत्रे भारत भागवतादि इतिहास पुराणे यांनी आपआपल्या परीनें हाच एक सत् चा संदेश उपदेश आदेश दिला आहे. सहस्रनामहि तोच सहस्रधा देत आहे.

८३९. गुणभृत्
गुणान् सत्त्व-रजस्-तमांसि बिभर्ति इति गुणभृत् । जो सत्त्व रज आणि तम हे तीन गुण धारण करतो तो गुणभृत् म्हणावयाचा. सृष्टीची उत्पत्ति स्थिति आणि लय परमात्मा रज सत्त्व आणि तम या त्रिगुणांचा अवलंब करून करीत असतो. सृष्टीच्या उत्पत्तिकाळी रजःप्रधान ब्रह्मदेवाचे रूप धारण करून तो हा सृष्टि-विसर्ग करतो. सत्त्वप्रधान विष्णू रूपानें त्या सृष्टि-विसर्गाचें तो पालन करतो आणि प्रलय काळीं तमःप्रधान रुद्र रूप धारण करून तो सृष्टीचा संहार करतो, या विसर्गाचे विसर्जन करतो. अशा प्रकारें गुणाधारें ही सृष्टीची स्थित्यंतरें सतत चालूच असतात. एक लाट उठते, ती काही काळ टिकते आणि शेवटी ती निमते. हा जसा अखंड क्रम समुद्रांत चालला असतो. तसा प्रकृतींत गुणांचा हा सृष्टयुत्पत्ति स्थिति लय रूप खेळ अखंड चालू आहे. आणि तटस्थ परमात्मा कमरेवर हात ठेवून तो केवळ पहात आहे. वस्तुतः तो गुण-कर्माना या म्हणत नाहीं की जा म्हणत नाही. ती गुण कर्में आपल्या स्वभावानुसार येत असतात आणि जात असतात. परंतु सगळी कर्में गुणाधीन आणि गुण प्रकृती-अधीन आणि ती आत्माश्रित असल्यामुळे त्या आत्म्याला गुणभृत् म्हणजे सूत्रधार म्हटले जाते. हा एक आरोप आहे. तमोगुणाची ऊर्मि येते तेव्हां मी निद्राधीन होतो. ती ओसरते तेव्हां सत्त्वाधीन होऊन जागृतीच्या अधीन होतो. ती सत्त्वोर्मिहि क्षीण होऊन रजोगुणोर्मीसरशीं मी नाना कर्में करू लागतो. अशा प्रकारें सारें कर्तृत्व प्रकृतीच्या गुणांचे आहे. आत्मा अकर्ता आहे. तरी आपण मी झोपतों, मी जागतो, मी काम करतो असें मिथ्या आरोपण करीत असतो. त्याला अनुसरूनच परमात्मा गुणभृत् म्हणावयाचा. एरव्हीं तो तर निरगुण आहे. पुढील पद तेंच सांगत आहे.

८४०. निर्गुण
निर्गुण म्हणजे गुणशून्य. मागें शून्य म्हणून एक नाम आले आहे. त्याचा आशय हाच. तो परमात्मा आत्मपूर्ण आणि गुणशून्य आहे. विश्वांत जी काय • घडामोड होते ती प्रकृतीच्या गुणानुसारच होत असते. षवी। ह्या सगळया जगद्व्याल घडामोडींचा ज्याच्यावर कांहीं एक परिणाम होत नाही, तो परमात्मा निर्गुण म्हणावयाचा. वायूच्या गुणानें समुद्रांत लहान मोठे तरंग उठतात, परंतु आकाशांत ते उठू शकत नाहींत. कारण तें आकाश जल-शून्य आहे. अति सूक्ष्म आहे. परंतु शब्दरूप स्पंद तिथेहि उठतात. परमात्मा त्या आकाशाहूनहि सुसूक्ष्म आहे. त्याच्या ठाईं इवलीशीहि हालचाल कोणत्याहि कारणानें होऊं शकत नाही. ती हालचाल, तो संद, तो विकास सर्व गुण-जनित होय. आणि आत्मतत्त्व हे केवळ निष्किय निःस्पंद निरविकार आहे. कारण तें गुणशून्य आहे. गुण आणि त्यांची कर्में यांचा संपर्क त्याला केव्हांहि होऊं शकत नाही. तें जर गुणविशिष्ट झाले तर तें जगांतील इतर वस्तूं प्रमाणेंच नश्वर ठरेल. पण तें तर शाश्वत आहे. तें षड्भाव-रहित आहे. "जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते' असे म्हणतां येत नाही. आणि याचे कारण तें निर्गुण आहे, प्रकृतीच्या गुणांच्यापलीकडचे आहे, हे होय. गुणांचे साम्राज्य सर्वत्र आहे, त्यांतून देव दानव मानव कोणीच सुटलें नाहीं. "न तद् अस्ति पृथ्वियां वा दिवि देवेषु वा पुनः । सत्वं प्रकृतिजैर् मुक्तं यद् एभि ः स्यात् त्रिभिर् गुणैः । " हे गुण म्हणजे च यमपाश होत. यांतून मुक्त फक्त एक आत्मतत्त्व आहे. त्या गुणाधार परंतु निरगुण आत्मतत्त्वाचे नमन महिम्नांत असें केलें आहे
बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमोनमः
प्रबलतमसे तत्संहारे हराय नमोनमः ।
जनसुखकृते सत्त्वोरिक्तौ मृडाय नमोनमः
प्रमहसि पदे निस्वैगुण्ये शिवाय नमोनमः ॥


८४१. महान्
परमात्मा हा निगुण असल्यामुळे तो महान् होय. जे सगुण आहे तें सक्रिय आहे, जें सक्रिय आहे तें साकार आहे, साकार आहे तें सावयव आहे आणि सर्व सावयव हे षड्भाव-ग्रस्त आहे. अशा सदोष व विकारशील वस्तूला महान् म्हणता येत नाही. तर जें निर्दोष आहे आणि निर्विकार आहे, तेंच महान् होय. म्हणून त्यालाच ब्रह्म अशी संज्ञा आहे. वडील महान् म्हटले जातात, मुलगा लहान म्हटला जातो. कारण हे महान् होय, कार्य हे सदैव लहानच म्हणावयाचे. हा व्यक्त विश्वाकार कितीहि मोठा दिसत असला तरी तो त्या अव्यक्ताहून लहान च म्हणावा लागेल. कारण तें अव्यक्त व्यक्ताचें मातृस्थान आहे. आणि तें अक्षर पितृस्थान आहे. त्या अक्षराच्या पलीकडे दुसरे कोणतेंहि तत्त्व नाहीं म्हणून तेंच महान् होय. तें सर्वाधार असल्यामुळे त्यालाच 'महतो महीयान् म्हटले आहे. हे विश्व पांचभौतिक आहे. पृथ्वी आप तेज वायु आकाश हीं ती पांच भूतें होत. यांतील पहिलेच तत्त्व पृथ्वी म्हणजे मोठे म्हटले आहे. परंतु या पांचींत तें सर्वांत लहान आहे. उत्तरोत्तर तत्वें मोठमोठी आहेत. आकाश त्या सर्वांत मोठे आहे. परंतु मनोबुद्धि-अहंकार ही तत्वें त्या आकाशाहूनहि मोठी आहेत. कारण ती सुसूक्ष्म आहेत. परंतु ही तत्त्वे कितीहि सूक्ष्म आणि विशाल असली तरी ती गुणजनित आहेत, गुणात्मक आहेत. प्रकाश-प्रवृत्ति-मोह-वश आहेत. म्हणून ती समर्याद आहेत, सीमित आहेत. आत्मतत्त्वच गुणातीत असून तेंच एक महान् या पदवीस पात्र आहे. इतर तत्त्वे सापेक्ष महान् आहेत, पण हे आत्मतत्त्व निरपेक्ष केवल महान् होय.

८४२. अधृत (अ-धृत, 'अ-धृत)
न धृतः अधृतः । जो कोणी धरलेला नाहीं तो म्हणावयाचा अधृत. परमात्मा हा सर्वाधार होय. परंतु स्वतः तो निराधार आहे. निराधार म्हणजे ज्याला आत्मभिन्न दुसऱ्या कशाचा आधार नाही असा. अधृतचा हा आशय स्पष्ट करण्यासाठीच पुढील पद 'स्व'-धृत आले आहे. स्वधृत म्हणजे स्वाधार. भागवतांत म्हटले आहे "विश्वास कारण, अकारण जें स्वतः पै" परमात्मा हा ह्या विश्वाचे कारण आहे खरा, परंतु त्याला कोणी कारणभूत नाही. तो अकारण आहे, स्वयंभू आहे. परमात्मा हा महान् आहे, कारण तो अधृत आहे, स्वधूत आहे. जो परतंत्र आहे, पराधीन आहे तो महान् कसा म्हणता येईल ? 'महान् अधृतः स्वधृतः ही आनुपूर्वी हा आशय व्यक्त करीत आहे. "अ' नें ध्रत तो अ-धृत असाहि अर्थ करतां येईल. अ हे नञ् समासाचे द्योतक व्यावृत्ति-कारक अव्यय आहे. त्यानें धरलेला, म्हणजे अतद्-व्यावृतीनें जो निश्चित केलेला, तो परमात्मा अ-धृत म्हणावयाचा, वेदोपनिषदांत ठाई ठाई नेति नेति गान गाइलें आहेः
एतद् वै तद् अक्षरं गार्गि ! ब्राह्मणा अभिवदन्ति अ-स्थूलं, अन्-अणु, अ-हस्वं अ-दीर्घ, अ-लोहितं, अ-स्नेहं, अच्छायं, अ-तमः । बृहदारण्यक ३|८|८
यांतील अ-स्थूलादि प्रत्येक पद अ-घटित आहे, अ-धृत आहे. आणि तें ब्रह्मवाचक आहे. म्हणूनहि तो परमात्मा अ-धृत म्हणावयाचा. "अक्षराणां अकारोडऽस्मि' या भगवद्वचनाप्रमाणें अ ही अक्ष र-विभूति आहे. सर्व वर्णमालेचा तो आदि आहे. आणि म्हणून समस्त वाङ्मयाचाहि. त्यानें म्हणजे पर्यायानें वाङ्मयानें धारण केलेला म्हणूनहि परमात्मा हा अ-धृत म्हणावयाचा. अशा प्रकारें अधृत पद त्रिधा व्युत्पादिले जाईल ः (१) न धृत तें अधृत, (२) व्यावर्तनानें धृत तें अधृत आणि (३) शब्द-शक्तीनें धृत तें अ-धृत.

८४३. स्वधृत
स्वेन, आत्मना, धृतः इति स्वधृतः । आपणच आपल्याला धारण करतो म्हणून तो परमात्मा स्व-धृत आहे म्हणावयाचा. धारक तत्त्वें अनेक आहेत. पृथ्वी हीहि एक धारकच आहे. सर्व जीवांची ती धानीच होय. म्हणून तिला धरणी, धरा म्हणतात. परंतु ती नुसती धारकच नाहीं, धृतहि आहे. तिला शेषानें धारण केले आहे. हा व्यक्त विश्वकदंब ज्या अव्यक्ताच्या भूमिकेवर फुलला आहे ती अव्यक्त भूमिकाच तो शेष होय. आणि तोच स्वधृत होय. त्याला दुसऱ्या कुणीं धारण केलेले नाही. तो स्वाधार आहे. तो स्वप्रतिष्ठित आहे. अशेष व्यक्ताकार मावळल्या नंतर जो शेष राहतो तो अव्यक्त संझना परमात्माच अधृत आणि स्वधूत होय. त्याला दुसऱ्या कोणाचा आधार नाही, पण तोच सर्वांचा आधार आहे. पिंड-ब्रह्मांडांत सर्वत्र हेच आढळून येते. इंद्रियांचा आलंब मन. मनाचा आलंब प्राण. प्राणाचा आलंब जीवात्मा. हे झालें पिंडांत-ब्रह्मांडांतहि तेंच. सर्व भूतांचा आलंब महाभूतें. पंच महाभूतांचा आलंब प्रकृति. प्रकृतीचा आलंब परमात्मा. आत्मा-परमात्मा हा दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही. तो स्वाधार, स्वालंब आहे. जगांतील सर्व तत्वे दुसऱ्या तत्त्वांना आधार देतात आणि स्वतःहि दुसऱ्या तत्वांचा आधार घेतात. ती त्या आपल्याहून सुसूक्ष्म व व्यापक तत्त्वांच्या ठाईं प्रतिष्ठित असतात. पण परमात्मतत्त्वच एक असे आहे की जें 'स्वे महिम्नि' प्रतिष्ठित आहे. तो परमात्मा आपल्याच बळावर प्रतिष्ठित आहे. तो पराश्रित नाही, स्वाधित आहे. म्हणून तो म्हणावयाचा स्वधृत. स्वधृतचा आणखीहि एक वेगळा पण विरोधी नसलेला अर्थ संभवतो. स्व म्हणजे स्वजन. स्वजनांनी म्हणजे भक्तांनी जो आपल्या हृदयांत धरला आहे तो भगवान् स्वधृत होय. अभक्तांना तो कळतच नाहीं मग आकळणार कुठून ? वश होणार कुठून ?

८४४. स्वास्य
सु शोभनं आस्यं मुखं यस्य सः स्वास्यः । ज्याचे आस्य म्हणजे मुख शोभन आहे तो म्हणावयाचा स्वास्य. जे पराधीन असतात त्यांची मुखमुद्रा शोभन राहू शकत नाही. कारण त्यांना सदैव भय असते. परंतु जे स्वाधीन आहेत, त्यांना तृष्णा भय क्रोध या विकारांना बळि पडावे लागत नाही. परमात्मा हा संपूर्ण स्वधृत स्वाधीन असल्यामुळे त्याला कशाची तृष्णा नाही. तृष्णा नाही म्हणून तृष्णा-विषय मिळविण्याची चिंता, मिळाल्यावर तो जाईल वा कमी होईल याचे भय, गेल्यास वा कमी झाल्यास क्रोध इत्यादि विकारांचा स्पर्श नाही. असा केवळ निर्विकार असल्यामुळे तो सदैव प्रसन्नवदन असतो. अंनात्म विषयांचे चिंतन करणारा जीव पराधीन होतो. संग, काम, क्रोध, संमोह, स्मृतिविभ्रंश आणि बुद्धिनाश अशा अनर्थ-परंपरेला तो प्राप्त होतो. त्याचे मुख प्रसन्न राहणार कसे ? तें अंतरांतील नाना विकारांसरशीं नानावर्णाकृति वेडेंविदरें होत राहतें. राक्षसांची तोंडे सदैव वेडींविदरी भयानक असतात. कारण राक्षसांची तोंडे म्हणजे काम, क्रोध, लोभांचे पुतळेच. उलट देव सर्व सुमुख सुंदर. कारण दैवी गुणांचे ते अवतारच, परमात्मा तर केवळ निर्दोष सकळ गुणालंकरण. मग तो स्वास्य कसा बरे नसेल ? जो स्वस्थ आहे, निर्विकार आहे, नीरोग आहे तोच स्वास्य म्हणावयाचा. निष्पाप बालक आणि महापुरुष यांच्या ठाईंहि स्वास्यता दिसून येते. इतर स्त्रीपुरुषांचे चेहरे गोरेगोमटेहि विकार-विकृत आणि भयावहच असतात. स्वास्थ्य आणि स्वास्यता याचे रहस्य स्थितप्रज्ञाच्या श्लोकांत गीतेनें विशद केलें आहेः "विधेयात्मा प्रसादं अधिगच्छति.'

. ८४५. प्राग्वंश
वंशात् प्राक् प्राग्वंशः । जो वंशाच्या आधींचा तो म्हणावयाचा प्राग्वंश. वंशाच्या आधी कोण असतो ? मूळ पुरुष, मुळापासूनच वंश-विस्तार होतो. म्हणून तो मूळभूत पुरुषच प्राग्वंश म्हणावयाचा. परमात्मा हा असा या जगद्-वृक्षाचा मूळ पुरुष होय. त्याच्या पासूनच हा सर्वतोदिश विश्वविस्तार झाला आहे.
अथवा प्राक् प्राक्तनः वंशः प्राग्वंशः । अथवा वंशाचे दोन भाग केल्यास एक प्राचीन वंश व दुसरा अर्वाचीन वंश म्हटला जाईल. आपण जो हा विश्वविस्तार पाहतो आहों तो अर्वाचीन होय. अर्वाचीन म्हणजे व्यक्त क्षर. आणि जो अव्यक्त आहे, अक्षर आहे जो म्हणावयाचा प्राचीन. आपण काळाचे दोन भाग करीत असतो "तिहासिक व प्रागैतिहासिक." तशाच सारखा हा विभाग झाला. विश्वाचा जितका विस्तार आपण पाहूं कल्पू शकतों तो सगळा अर्वाचीन होय. आणि जो आमच्या चर्मचक्षूच्या आणि कल्पनाचक्षूच्याहि पलीकडचा आहे तो प्राचीन होय. परमात्मा हा उभयात्मक आहे, पण इथें तो आधी प्राग्वंश म्हटला आहे. आणि तेंच योग्य होय. आधी मोठ्याचे नि मुळाचंच नांव घ्यायला पाहिजे. अव्यक्त स्वरूप हे मूळ आहे. आणि तें अपरिमितहि आहे. अव्यक्ताच्या अफाट सागरांत व्यक्ताकार हा तृणवत् आहे. मग तृणाचे नांव आधीं घेणार की सागराचें ? उघडच महान् वस्तुच आधी डोळ्यांत भरणार नि तिचाच उच्चार होणार. "प्राग्वंशो वंशवर्धनः" या पदांमध्येहि तसेंच झालें आहे. आधीं प्राग्वंश मागाहून वंशवर्धन.

८४६. वंशवर्धन
वंशं वर्धयति इति वंशवर्धनः । जो वंश वाढवतो तो वंश-वर्धन म्हणावयाचा.वृध्‌ वर्ध धातूचे दोन अर्थ होतात.-१ वाढवणे, २ तोडणे, तासणे दोन्ही अर्थांनी परमात्मा वंशवर्धन आहे. हा सृष्टीचा वेल तो वाढवीत आहे म्हणून तो वंशवर्धन होय. सुप्त-गुप्त-चेतन दगडापासून सर्वचेतन ब्रह्मदेवापर्यंत चौऱ्यांशी लक्ष योनींचा विस्तार त्या परमात्म्यानें आत्मशोधांत केला आहे. तो एकएका योनींतील सुखदुःखाचा आंबट गोड अनुभव घेत जिथे त्याला अमृतानुभव आला त्या मनुष्ययोनीपर्यंत आला आणि तिथेच त्याचा वंश सुफळ होऊन कुंठित झाला. कणिस येऊन तें पक्व झालें म्हणजे यवगोधूमादि ओषधींचा अंत होतो. त्या कृतार्थ होऊन वाळतात. आत्मज्ञान हे सर्वजन्म सफळ करणारे आणि म्हणून त्या सर्व जन्मांतून मुक्त करणारें, त्या सर्वजन्मांचा अंत करणारे होय. आणि परमात्मा हा केवळ ज्ञानस्वरूप असल्यामुळे, सर्व साधनांचाच फलरूप असल्यामुळे तो सर्व वंशाचा अंत करणारा होय. त्यानंतर कोणताहि उच्चावच जन्म घेण्याचेच प्रयोजन राहत नाही. म्हणून वंश खुंटवणारा या अर्थानंहि तो परमात्मा वंशवर्धन होय. संस्कृत वर्धकि व मराठी वाढी हे शब्द याच अर्थानें व धातूपासून आलेले आहेत. बांगडी वाढणे या प्रयोगांतहि तो त्याच अर्थानें आलेला आहे. वंश-वर्धन प्रमाणें तंतुवर्धन हे नामहि सहस्रांत अन्यत्र आलेले आहे. तिथें तें तंतु-च्छेदन अशा अर्थानेच घेतले आहे. शिवाय वाढ ही शेवटीं कुठे तरी थांबायचीच असते. म्हणजे तिचा अवश्यंभावी परिणाम अन्तच होय. म्हणून वाढणे म्हणजे संपणे हा अर्थ सुव्यवस्थितच होय. तथापि आम्हांला सृष्टीचा आदि आणि अंतहि दिसत नाही. दिसतो तो केवळ सृष्टीचा वृद्धि-विस्तार. म्हणून त्या परमात्म्याला म्हटले आहे प्राग्वंश आणि वंशवर्धन. ह्या सृष्टिरूप मध्याच्या दोन्ही टोकांना तो परमात्मा आहे. त्याच्या पासूनच हा सृष्टि-प्ररोह झाला असून त्याचे पर्यवसानहि त्यांतच व्हावयाचें आहे.




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP