ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

भारभृत्कथितो योगीयोगीशः सर्वकामदः ।
आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः ॥९१॥


८४७. भारभृत्
अनन्त (वराहादि) रूपेण भूगोलस्य भारं बिभर्ति इति भारभृत् । परमात्मा हा अनन्तशेषाच्या रूपानें ह्या पृथ्वीचा भार आपल्या डोक्यावर धारण करून आहे म्हणून तो म्हणावयाचा भारभृत्. 'कोऽतिभारः समर्थानाम्' या न्यायानें परमात्म्यानें हा सगळा विश्वाकार धारण केलेला असला तरी तो त्याला काही भार नाहीं. झाडाला फुलाचा भार होत नाहीं तसा ह्या विश्वाचा परमात्म्याला भार नाही. तें त्याच्या डोक्यावरील फूल आहे. शोभा आहे. परंतु अनीश जीवाला तो भारच आहे. त्यानें तो भार घेण्याचा प्रयत्न केला तर तो चिरडूनच जाईल. सर्व सामर्थ्य त्या परमात्मशक्तीचे आहे. तीच विश्वोत्पत्तिस्थिति-लय-समर्थ आहे. तें सामर्थ्य दुसऱ्या कोणांतहि नाही. आम्हीहि जे काही करायला समर्थ होतों तेंहि सामर्थ्य त्या परेशाचेच असते. परंतु आम्हांला तें त्या शक्तीच्या अतिसूक्ष्मतेमुळे आणि सर्वव्यापकते मुळे जाणवत नाही. भगवान् कृष्णानें गोवर्धन-धारण केले तेव्हा सर्व गोपाळांनी आपआपल्या काठ्या त्याला टेकू म्हणून लावल्या होत्या. त्या सर्वांच्या नरशक्तीच्या समुच्चयानें बनणाऱ्या बळाहून अधिक बळ तिथे कार्य करीत होते. तेंच नारायणीय बळ होय. तेंच ईश्वरी बळ होय. त्याच सर्वगत आणि सर्वातिरिक्त शक्तीनें तो पर्वत उचलला होता. त्या शक्तीचें नांव कृष्ण. तोच भारभृत्. प्रत्येक जीवानें एक देह धारण केला आहे. हा देहभार कोण बरें धारण करीत आहे कोणी असद्वस्तु तो धारण करू शकत नाही. कारण तो वदतो-व्याघात होय. कोणी अचिद्वस्तु धारण करू शकत नाही. कारण अचित् हेतुमत् असू शकत नाही. कोणी अनानन्द वस्तु तो धारण करू शकत नाही. कारण कोणीहि दुःखासाठी झटत नसतो. तात्पर्य देहभार काय किंवा विश्वभार काय एका सच्चिदानंद परमात्म्यानेच धारण केलेला आहे. तें तदितर कोणाला शक्यच नाही.

८४८. कथित
कथित हे नाम प्रथित असे असावें. कथित हा पाठ प्रामादिक असावा-जरी शंकाराचार्यांनी तो तसाच घेतला आहे. गीतेत आलेच आहे-"अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः" परमात्मा लोकांत म्हणजे व्यवहारांत आणि वेदांत म्हणजे शास्त्रांतहि पुरुषोत्तम म्हणजे तिन्ही पुरुषांत उत्तम म्हणून प्रथित आहे, प्रसिद्ध आहे. पण "स्थितस्य गतिश् चिन्तनीया" या न्यायानें कथित पदाचा विचार केला पाहिजे. कथित म्हणजे आख्यात, ज्याच्या विषयी काही तरी विधान केलें गेलें आहे असा-मग तें विधान कांहीं का असेना. परमात्मा हा वेद-प्रतिपादित म्हटला जातो. वेदप्रतिपादितच कां ? कारण इतर विषय अन्य शास्त्रे प्रतिपादूं शकतात पण परमात्म्याचे प्रतिपादन वेदेतर .प्रमाणें करू शकत नाहीत. तिथे प्रत्यक्ष वा अनुमान हे प्रमाण चालत नाही. परंतु इथें कथित पदानें वेदादिशास्त्र-प्रतिपादित हा एवढाच अर्थ घ्यावयाचा नाही, तर निरुपपद प्रयोगामुळे सर्व(-पद) प्रति पादित असा अर्थ घ्यावयाचा. तुम्ही कोणतेहि पद उच्चारा, त्याचा अर्थ परमात्मा आहे. शब्दांच्या नाम आणि धातु अशा दोन; नाम, धातु, उपसर्ग आणि निपात अशा चार; अथवा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि उद्गारवाची अशा आठ जाति कल्पिल्या जातात. त्या सर्वांनी पृथ्क् पृथक् वा संभूय जो अर्थ व्यक्त केला जातो तो सर्व एका परमात्याचेच कथन करतो, सरळ वा पर्यायाने. जसे सर्व जलौघ समुद्रालाच मिळतात त्याप्रमाणें सर्व पर्नें सरळ वा पर्यायानें त्याचे कथन वा प्रतिपादन करीत असतात. कारण सर्व पदांचा आणि अर्थाचा आश्रय एक सद्वस्तु च असू शकते. अगदी शशशंग म्हटले तरी त्याला सत्तेचा आधार आहे. ससा आहे आणि शृंगहि आहे. शशशृंग नसलें म्हणून काय झाले ?

८४९. योगी
जो युक्त आहे तो योगी म्हणावयाचा. पण युक्त कुणाशी ? स्वरूपाशी. सर्व जीव हे वियोगी आहेत. त्यांचा आपल्या स्वरूपाशी वियोग झाला आहे. सत् चित् आनंद हे आहे त्यांचे स्वरूप. पण ते अभिमानी बनून मी अमुक वर्ण जाति कुल आकृति रंग वस्त्र विद्या नातें इत्यादींचा आहे असें म्हणत असतात. मी ब्राह्मण, ऋग्वेदी, देशस्थ, उंच, गोधूमवर्ण, मध्यम वयाचा, वेदवेदान्तशास्त्री, अमक्याचा पुत्र, अमक्याचा पिता इत्यादि म्हणवीत असतो. पण असे म्हणतांना वस्तुतः मी वियोगी होत असतो, आपल्या निजरूपास पारखा होत असतो. अनात्मवस्तूचा आपल्यावर आरोप करून घेत असतो. मला जन्मच नाहीं, मग नामरूप गुणकर्म कुठले ? मी ना पुत्र ना पिता. हे सगळे अनात्म-संबंध होत. ते घेऊन मी सुखदुःखाचें ओझें कां वाहावें ? असे भारवाही होण्यांत काय हशील ? हासिल कांहींच नाही, पण अज्ञानामुळे जीव भारवहन करीत असतो आणि कुंथत असतो. परंतु योगी म्हणजे स्वरूपयोगी यांतून मुक्त असतो. त्याला हे कसलेंच ओझें नाही. त्याचा देहगेहाशी संबंध मद्यप्याचा जसा आपल्या वस्त्राशी तसा असतो. एखाद्या दारू पिऊन झिंगून पडलेल्या माणसाच्या अंगावर वस्त्र दैवयोगानें असले तर असतें, नसले तर नसते. त्याची शुद्ध त्याला नाही. पिसें नेसलें की नागवें लोकीं येऊन जाणावें ? योगी हा तसा सदैव 'आत्मन्येव आत्मना तुष्ट' असतो. त्याला देह गेहाची शुद्ध नसते. असा योगी हा परमात्मस्वरूपच होय. परमात्मा तर विदेहच आहे. त्याचा देहाशी दुख्नहि संबंध पोंचत नाही. म्हणून पुढील पदांत त्याला योगीश म्हटले आहे. योगीश म्हणजे योग्यांचा राजा, सर्वोच्च योगी.

८५०. योगीशः
योगिनां ईशः योगीशः । योग्यांचा ईश तो योगीश म्हणावयाचा. योग्यांचा ईश या पदाचे दोन अर्थ होऊं शकतील. १ योग्यांचा शिरोमणि २ योग्यांचा आराध्य. परमात्मा हा दोन्ही अर्थांनी योगेश आहे. परमात्मा हा केवळ आत्मनिष्ठ असल्यामुळे मुळीं अनात्मस्पर्शच त्याला नसल्यामुळे तो योगिशिरोमणि होय.
लघुत्वमारोग्यमलोलुपत्वं वर्ण-प्रसादः स्वर-सौष्ठवं च ।
निद्राल्पता मूत्रपुरीषमल्यं योग-प्रवृत्तिं प्रथमां वदन्ति ॥

अर्थात् देहाचे आरोग्य ही योगाची पहिली पायरी होय. इन्द्रियें प्राण आणि मन यांचे वशित्व ही मधली पायरी होय. आणि देहासकट विश्वाची विस्मृति व केवळ आत्मनिभृतता उर्फ समाधि ही अन्तिम पायरी होय. परमात्मा हा सदैव या योग निद्रेत निमग्न आहे, समाधिस्थ आहे. म्हणून तो योगीश म्हणजे योगिशिरोमणि म्हणावयाचा. आणि तोच योग्यांचें, साधकांचे आराध्यहि होय. कारण तोच परम आदर्श आहे. म्हणूनहि तो योगीश म्हणजे योगिजनांचे परम ध्येय म्हणावयाचा, उपास्य म्हणावयाचा. प्रजा आपल्या योगक्षेमासाठी राजाकडे पहात असते, त्या प्रमाणें सगळे योगी योगीशाकडे आपल्या "योग'क्षेमासाठी पाहत असतात. नखांच्या गुंडाळ्या आणि जटांच्या चुंबळी असें योग्याचे प्राचीन दर्शन बीभत्स आहे. अर्वाचीन दर्शन क्लुप्तनख व क्लृप्तकेश असें सुमृष्ट राजस आहे. पण ही दोन्ही बाह्य आहेत. अन्तस्तत्त्व वेगळेच आहे. तें आहे आत्मनिष्ठता. ती जियें जितक्या मात्रेनें आहे तिथे तितका योग आहे. योगीशाच्या ठाईं योगाची पूर्ण मात्रा असते आणि म्हणून तो योगेशहि म्हणवतो.

८५१. सर्वकामद
सर्वान् कामान् ददाति वा द्यति वा इति सर्वकामदः । जो सर्व काम पुरवून जीवाचे सर्व काम खंडित करतो तो सर्वकामद म्हणावयाचा. काम म्हणजे अभिलाष. जीवाचें समग्र जीवन अभिलाषमय च आहे, काममयच अहे. किंबहुना काममयता हेच जीवन आहे. ज्याला कसलाहि काम नाहीं तो कामोपलब्धीचे साधन हा देह धारण करीलच कशाला ? सारांश जीव म्हटला म्हणजे तो कामार्थी असावयाचाच. हा कामच नसावा असाहि एक काम आहे आणि त्यालाच मुमुक्षा असें म्हणतात. सारांश, काममुक्ति केव्हांहि शक्य नाही. शक्य व इष्ट आहे केवळ कामशुद्धि. ती जर जीव करीत गेला तर तो काममुक्त होतो. कामनेचे स्वरूप नीट समजून घेणे जरूर आहे. त्याशिवाय ती नियमित नियंत्रित आणि निलित होणार नाहीं. जोवर तिचे वैयर्थ्य पटलें नाहीं तोंवर ती सुटत नाही. ज्या क्षणीं तें पटते त्या क्षणी तिची मिठी गळून पडते आणि जीव तींतून मुक्त होतो. असें अनात्ममात्रा विषयीं जेव्हां होते तेव्हां केवळ आत्मनिष्ठ झालेला पुरुष सर्वकाममुक्त होतो. त्यालाच आत्मकाम वा आप्तकाम म्हणावयाचे. ही दशा एकाएकी बळेच आणतां येत नाही. कामोपभोग, तज्जनित सुख-दुःखानुभवं, तदुत्थ विषादोदय, शास्त्राध्ययन, गुरुबोध आणि आत्मप्रतीति या क्रमानें काम-निवृत्ति होते आणि जीवाला शांतिलाभ होतो. या कृतार्थ जीवनाची जी शास्त्रीय परिकल्पना तिचें नांव आहे वर्णाश्रमधर्म. तद्वारा परमात्मा हा सर्वकामद झाला आहे. अर्थात् तद्द्वारा तो सर्व काम पुरवतो आणि त्या कामांतून जीवाला सोडवितो. पुढील पद आश्रम एवढ्या साठींच आलें आहे.

८५२. आश्रम
आ किंचित् श्रम्यते अस्मिन् इति आश्रमः ! जिथे जीव बेताचा परिश्रम करून सफल होतो तो म्हणावयाचा आश्रम, परमात्मा हा आश्रमस्वरूप आहे. या आश्रमांत जीवाला आपले सर्व काम सिद्ध करून घेता येतात. या आश्रमाची काय कल्पना आहे ? नदीला घाट असले म्हणजे ती सुखगाह्य होते. तिचा यथेष्ट उपयोग होतो. त्याप्रमाणें जीवनालाहि बन्धन पाहिजे, शिस्त पाहिजे म्हणजे तें सुखावह होतें, सुफल होतें. श्रम हा श्रम नाहीं, जर मन निवान्त असेल, विश्रान्त असेल. मनाला विसांवा देण्याची ही युक्ति म्हणजे आपले दैनंदिन जीवन, आपला आयुष्यक्रम स्वैर न ठेवतां नियमबद्ध ठेवणे होय. सर्व आश्रमांचे हे सार आहे. "काय करूं कसं करूं" ही चिंताच श्रम होय. ती गेली म्हणजे श्रम हा खेळ आहे, विनोद आहे. आश्रमधर्मानें जीवनाला असें आनन्दमय करून सोडलें आहे. जीवाच्या विकासाला अनुसरून शास्त्रकारांनी वर्णधर्माची व आश्रमधर्माची योजना केली आहे. स्वाभाविक वृत्तीला अनुसरून वर्णधर्म आणि स्वाभाविक वयोविकासाला अनुसरून आश्रमधर्म कल्पिलेले असल्यामुळे शरीर कार्य-व्यापृत व मन चिन्तामुक्त राहते आणि स्वाभाविक विकास होऊन जीवन सफळ होतें. एखादें वन जसें स्वाभाविक विकास पावून यथा काल अंकुरित, पल्लवित, पुष्मित आणि फलित होते त्या प्रमाणें (चतुर्) आश्रमधर्मानुसार वागून मनुष्य-समाजहि होतो. हा धर्मच सूक्ष्म निरीक्षणानें आणि जीवनाच्या खोल चिन्तनानें वैदिक ऋषींनी चतुराश्रमांत व्यवस्थापिला आहे. ही आश्रम-व्यवस्थाच आश्रम होय. आणि ती सत्य मूलक, सत्य-प्रधान आणि सत्य-फला असल्यामुळे परमात्म-स्वरूप होय.

८५३. श्रमण
श्राम्यति इति श्रमणः| जो सुखनिःस्पृह होऊन परमार्थासाठी झटतो तो म्हणावयाचा श्रमण, वस्तुतः जो म्हणून आश्रम-धर्म पाळतो तो प्रत्येकच ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ वा संन्यासी श्रमण होय. कारण, प्रत्येक जण कांहीं तरी प्राप्तव्य प्राप्त करून घेण्यासाठी झटत असतो, श्रमत असतो. पण त्या सर्वांत ज्याला परम अर्थाचें स्वच्छ ज्ञान आहे आणि त्यासाठी ज्यानें आपले सर्व जीवन समर्पिले आहे असा जो संन्यासी तोच श्रमण म्हणून प्रथित आहे. कारण सर्वांत श्रेष्ठ प्राप्तव्यासाठी सर्वांत अधिक परिश्रम तोच करतो. म्हणून श्रमण ही पदवी त्याचीच.इतर श्रमतात पण श्रम-फलापासून वंचित राहतात म्हणून ते नुसते श्रमी होत. ज्ञानावांचून केलेला सर्वश्रम व्यर्थ होय. उलट ज्ञाननिष्ठायोग्यता लाभावी म्हणून केलेला प्रत्येक श्रम सार्थक होय. चारी आश्रमांची योजना ज्ञानसिद्धीसाठीच आहे. सत्यज्ञान म्हणजेच आत्मज्ञान हे त्याचे केंद्र असून त्या भोवती चार आश्रमांची चार वर्तुळे आहेत. ब्रह्मचर्याश्रम हें दूरस्थ वर्तुळ आहे. तर संन्यासाश्रम हे निकटस्थ वर्तुळ आहे. आणि म्हणून संन्यासाला सर्वांत अधिक मान. त्याचे गौरव सर्वाधिक. सत्याचा शोध म्हणजे परम अर्थाचा शोध होय. त्यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केलें आहे असें वैदिक अवैदिक तपस्वी श्रमण पदवीस पात्र आहेत. श्रमण पद त्यासर्वांचे समावेशक आहे. वैदिकावैदिक श्रमणांचा उल्लेख श्रमण-ब्राह्मण अशा जोड नांवानें केला जातो. इथें श्रमण पदांत सर्वांचाच समावेश आहे वैदिक जैन बौद्ध आणि अन्य. "सो ब्राह्मणो सो समणो स भिक्खू' या धम्मपदाच्या वचनांत वेदानुयायी, जिनानुयायी आणि बुद्धानुयायी यांना क्रमानें ब्राह्मण श्रमण व भिक्षु म्हणून संबोधिले आहे. तथापि सत्याचा शोध आणि त्यासाठी जीवन-समर्पण हे सर्वत्र समानच आहे. म्हणून ते सगळेच श्रमण होत. परमात्मा हा श्रमण म्हटला आहे. कारण श्रमण श्रमून जे मिळवतात तें आत्मज्ञान त्यानें सहजच मिळविले आहे. तोहि सारखा श्रमतच आहे, पण काही मिळवण्यासाठी नव्हे तर श्रमणे हेच जीवन आहे, जीवनाधार आहे, महान् सत्य आहे म्हणून. जीव ज्ञान नाही म्हणून श्रमत असतो, ईश्वर ज्ञान आहे म्हणून श्रमत असतो. तुम्ही ज्ञानी असां की अज्ञानी, श्रम अपरिहार्यच आहे.

८५४. क्षाम
श्रमण पदानंतर क्षाम पद आले आहे. तें सुचवितें कीं श्रमण हा क्षामच असावयाचा. क्षाम म्हणजे क्षीण. जो पिंडपोषक आहे तो अज्ञान व निर्दय संसारी जीव क्षाम कसा होणार ? तो गलेलठ्ठच असावयाचा. परंतु ज्यांना परमात्म्याचा ध्यास लागला आहे आणि त्यासाठी जे आपली देहेन्द्रियमनोबुद्धि चंदनाप्रमाणें घासत आहेत ते मुमुक्षु, ते श्रमण क्षामच असावयाचे. गोरक्षनाथ आपल्या दोहयांत शिष्यांना तोतयाची व गुरूची खूण सांगतातः
मोटे मोटे कुल्हे राते राते नेत | नहिं रे पूता गुरुसों भेंट ॥
दुबरे दुबरे गात निर्मल निर्मल नेत । भई रे पूता गुरुसों भेंट ॥

बेटा, मोठ्या मोठ्या ढुंगणांचा व तांबड्या तांबड्या डोळ्यांचा साधु भेटला म्हणजे समजून चल की हा गुरु नव्हे. परंतु तुला जर कृशकाय व निर्मल दृष्टीचा सत्पुरुष भेटला तर समजून चल की भेटला रे भेटला गुरु ! महाभारतांतहि ब्राह्मणाचे म्हणजे ब्रह्मपरायण विज्ञात्या पुरुषाचे वर्णन असेंच आले आहे.
" येन केनचिदाच्छन्नः येन केनचिदाशितः । यत्रक्वचनशायी च तं देवा ब्राह्मणं विदुः ॥ " असा ब्राह्मण "कृश" व "धमनि-संतत' च असावयाचा, क्षामच असावयाचा. महावीर, बुद्ध हे श्रमण असेच क्षाम होते. त्यांनी देहाचा पडदा, ज्याच्या आड तो अत्यंत क्षाम, केवळ विदेह परमात्मा उभा आहे, पार झिरझिरित करून टाकला होता. परमात्मा हें महाभूत आहे. ते ज्याला झडपते त्याचा तें अस्थिपंजर करून सोडते. म्हणून त्याला क्षाम म्हणजे क्षीण करणारा म्हटले आहे. "तत् करोति तद् आचष्टे इति णिचि पचाद्यचि कृते संपन्नःक्षामः" असें भाष्य शंकराचार्यांनी केले आहे. म्हणजे क्षाम हे कर्मणि नव्हे तर कर्तरि अ प्रत्यय, लावून सिद्ध केलेलें रूप होय. क्षाम करणारा म्हणून क्षाम हा त्याचा अर्थ. परमात्मा हा क्षामहि आहे आणि क्षाम करणाराहि आहे, म्हणून तो क्षाम म्हणावयाचा.

८५५. सुपर्ण
"आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः" या श्लोकार्धात एक विकासक्रम, एक परिणति सूचित केलेली आहे. ब्रह्मचर्य गार्हस्थ्य वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांत आचार्योपासन अतिथिसेवा अध्यात्मचिंतन आणि प्रयाणसाधना यासाठी जीवनभर श्रमून क्षाम व्हायचें परिग्रहाचे व आसक्तीचे सर्व ओझें फेकून देऊन हलकें व्हावयाचे आणि मग देहपंजरांतून सुटून ज्ञान व वैराग्य या दोन सुंदर पंखांनी परमात्म्याच्या लहरीवर आपल्याला लोटून द्यायचे, केवळ तदधीन होऊन रहायचे हे वैदिक जीवन-दर्शन या श्लोकार्धात आले आहे. सुपर्ण हे पद उपनिषदाच्या पुढील सुप्रसिद्ध वचनांत आले आहे.
(द्वौ) सुपर्णी सयुजौ सखायौ, समानं वृक्षं परिषष्वजाते ।
तयोर एकः पिप्पलं स्वादु अत्ति, अनश्नन् अन्यो अभिचाकशीति ॥ "

या देहरूप एकाच वृक्षाच्या आश्रयानें दोन जुळे भाव एक सांसारिक व दुसरा असांसारिक राहतात. त्यांनाच सुपर्ण म्हटले आहे. (सुपर्ण म्हणजे गरुड) सुपर्ण कां ? कां की ते गगन-विहारी आहेत. या वृक्षावर ते कायमचे राहणारे नाहीत. कांहीं काळासाठी वसतीस आलेले आहेत. ते जुळे आहेत इतकेच नव्हे तर ते सनाम आहेत, सखे आहेत. एक फळभक्षी आहे, दुसरा केवळ साक्षी आहे. असे मोठे मार्मिक रूपक उपनिषदाच्या वरील श्लोकांत आले आहे. ज्ञान झाले की सांसारिक भाव नाहीसा होतो व उरतो तो केवळ असांसारिक नित्य शुद्ध बुद्ध मुक्त भाव. तो भाव आपल्याच ठाईं स्वानंद-गगनांत मुक्त विहार करीत राहतो. तो पंजरबद्ध होऊन राहत नाही. तसा तो राहत नाही म्हणून सुपर्ण म्हणावयाचा. पंजरस्थ राहिल्यास तो सुपर्ण न म्हटला जातां अपर्ण वा अपक्षच म्हटला जाईल. "शोभनानि पर्णानि छन्दांसि संसारतरुरूपेण अस्य इति सुपर्णः" असें भाष्य शंकराचार्यांनी केले आहे. पण इथें आचार्य द्वौ सुपौँ' हे उपनिषद्वचन विसरले आहेत असे दिसते. त्यांचे लक्ष 'छन्दासि यस्य पर्णानि या गीतावचनाकडे आहे. तेंच त्यांनी उद्धृतहि केलें आहे.

८५६. वायु-वाहन
वायुर् वाहनं अस्य इति वायु-वाहनः । वायु ज्याचें वाहन आहे तो म्हणावयाचा वायु-वाहन. परमात्मा हा वास्तविक सर्वव्यापी आहे. त्याला वाहनाची गरजच नाही. परंतु जीवमात्र उपहत असल्यामुळे त्याला वाहनाची गरज असू शकते. इथें जीवरूपानें देही झालेला जो परमात्मा त्यालाच वायुवाहन म्हटलें आहे. कां की सामान्यतः प्राणाबरोबरच चैतन्य लोप पावतें, असा आपला अनुभव आहे. जोवर प्राण आहे तोंवर तें चैतन्य, तो जीव देहांत वास्तव्य करून आहे असे आपण म्हणतों. वस्तुतः चैतन्याच्या मागोमाग, जीवाच्या मागोमाग प्राण व इन्द्रियें जातात. परंतु त्याची स्पष्ट खूण प्राण-प्रयाणच होय. म्हणून त्याला वायु-वाहन म्हणावयाचे. आणि या स्थूल दर्शनाला अनुसरूनच ईशोपनिषदांतहि आले आहे. 'वायुः अनिलं अमृतम्' म्हणजे तो प्राणवायु तो प्राणात्मा जीव त्या निःस्पंद अमृत तत्त्वांत, परमात्म्यांत लीन होवो. समाधींत प्राणापान व हृदयगति सर्व बंद असते परंतु तरी तिथे जीवात्मा सुखरूप असतो. अर्थात् तो वायुवश नाही तर प्राणेन्द्रियेच तद्वश आहेत. राजा निघाला म्हणजे त्याचा लवाजामाहि निघतो, परंतु लवाजमा निघाला म्हणजे राजा निघालाच असे नव्हे. असें जरी असले तरी ज्या अर्थी प्राण गेले म्हणजे जीव गेला असें आपण म्हणतो त्या अर्थी तो वायु- वाहन होय. वस्तुतः घटाकाश मठाकाशांत विलीन होत नाहीं तें एकच एक अखंड आहे. पण उपाधीमुळे आपल्याला जन्म-मृत्यूचा भास होतो. तद्वत् प्राण रूपानें जीव चळवळ करीत असतो ती त्या निःसंपद अमृतांत, त्या परमात्मरूप महावायूंत विलीन होवो, असें म्हटले जाते. वस्तुतः ही भाषा उपाधिकल्पित आहे. तथापि जोंवर उपाधि आहे तोवर ती भाषाहि राहणारच. म्हणून तो परमात्मा, तें निरुपाधि चैतन्य वायु-वाहन म्हणावयाचे.


धनुर्धरोधनुर्वेदो दण्डो दमयिता दमः ।
अपराजितः सर्वसहो नियन्तानियमोऽयमः ॥९२॥


८५७. धनुर्घर
धनुः धारयति इति धनुर्धरः । जो धनुष्य धारण करतो तो धनुर्धर म्हणून प्रसिद्ध आहे. धनुष्य तर इतरहि धारण करणारे धनुर्धर होतेच, पण राम धनुर्धर म्हणून जो प्रसिद्ध आहे तो त्याच्या यज्ञरक्षणार्थ धनुर्धारणामुळे होय. केवल धर्मपालनासाठीच जो शस्त्र धारण करतो तो शस्त्रधारी ईश्वरी अवतार होय. ईश्वराचे अवतार-कार्य धर्मसंस्थापन हे आहे. आणि त्यासाठीच जो शस्त्र धारण करतो तो ईश्वराचें कार्य करणारा होय. धर्म-संस्थापनेसाठी केवल शस्त्रच धारण करावे लागते असे नाही, तर तें त्यागावेंहि लागू शकते. म्हणून शस्त्र-धारण वा शस्त्र-संन्यास ही क्रिया महत्त्वाची नाही, हेतु महत्त्वाचा आहे. त्या हेतूच्या सिद्धीसाठी ज्याची प्रत्येक क्रिया आहे तो धर्मात्मा ईश्वरी अवतार होय. राम असा होता. त्यानें म्हटले आहेः
नाहं अर्थपरो देवि लोकं आवस्तुमुत्सहे ।
विद्धि मां ऋषिभिस् तुल्यं केवलं धर्ममाश्रितम् ॥

म्हणून "रामः शस्त्रभृतां अहम्' असा भगवद्विभूति म्हणून प्रभु रामचंद्राचा गौरव झाला आहे. परशुरामहि शस्त्रभृतां वरः होता. परंतु ब्राह्मण असल्यामुळे शस्त्र-धारण हे त्याचे वर्गीय कर्तव्य नव्हते. दुसरें त्यानें एकवीस वेळां ज्या क्षत्रिय निरमूलनाच्या मोहिमा केल्या त्या धर्म्य म्हणतां येत नाहींत. म्हणून तो भर्गव राम शस्त्र-विद्येचा परम आचार्य असला तरी "रामः शस्त्रभृतां' या वचनानें त्याचा उल्लेख झालेला नाही. शिवाय त्यालाहि राघव रामानें, धनुर्धर रामानें प्रणामानें व प्रभावानें तेजोभंग करून तपश्चर्येचा आपला वर्णधर्म पाळायला पाठवून दिले आहे. धनुर्धर रामाची हीहि धर्म-संस्थापनाच होय. परमात्मा हा असा 'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां । ' धनुर्धर आहे.

८५८. धनुर्वेद
"धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः' हा श्लोकाध संबंधच दण्डनीतिपर आहे. दण्डनीति म्हणजे काय ? दण्डनीति म्हणजेहिंसा नव्हे, तर स्वैरहिंसेचा प्रतिबंध दण्डनीति होय. समाज हा बहमुखी आणि इष्टानिष्ट अनेक प्रवृत्तींचा आश्रय असतो. त्यांतील अनिष्ट प्रवृत्तींचे नियमन व नियंत्रण आणि इष्ट प्रवृत्तींचे संगोपन व संवर्धन करणे हा धर्मशास्त्राचा व राजनीतीचा विषय आहे. धर्मशास्त्र हे त्याबाबतचे तज्ज्ञमत होय, तें कायदे कानू करणारे अंग आहे. राजनीति हे त्याची अंमलबजावणी करणारें अंग आहे. अशी ही द्विदल व्यवस्था आहे. पैकी अंमलबजावणी करतांना जी अपरिहार्यहिंसा करावी लागते तिचे नांव दण्ड होय. ती नियमानुसार व परिमित असते आणि विशिष्ट हेतूच्या सिद्धीसाठी असते. तिला धर्मज्ञांची संमति व सामान्य जनांची मान्यता असते.हिंसा ही अहिंसाच होऊन जाते. इथे अहिंसा म्हणजेहिंसेचा अभाव नव्हे तर अल्पभाव होय, अहिंसातुल्यता होय. आदर्श अहिंसेचाच आहे, पण तो अमलात आणतांना ज्या मर्यादा येतात त्याबाबत अगतिकता आहे. ज्यांना हा सामाजिक धर्महि पाळतां येत नाही, ते अहिंसेची गोष्ट च बोलू शकत नाहीत. पण ज्यांनी हा सामाजिक धर्म उत्तम प्रकारे पाळला आहे आणि ज्यांना अनुत्तम धर्म अहिंसामय संन्यास पाळावयाचा आहे त्यांना कोणत्याहि समाजांत तशी मोकळीक असतेच. आज ही जे Conscientious objectors कान्शन्सस आब्जेक्टर्स आहेत, त्यांना त्या कायद्यांतून मुक्त करण्यांत आलेले आहे. परंतु जे मर्यादित अहिंसेचा सामाजिक धर्महि पाळू शकत नाहीत त्या अपराधी लोकांना संन्यासांत स्थान नाही. ती अतिसामाजिक गति आहे. हे सर्व जो जाणतो तो धनुर्वेद होय शस्त्रास्त्रे त्यांचा विनियोग आणि मर्यादा जाणणारा होय. "धनुर्विद्यां वेत्ति इति धनुर्वेदः" परमात्मा हा धर्म-संस्थापक असल्यामुळे तो सहजच धनुर्वेद म्हणजे दण्ड-नीतिज्ञ म्हटला आहे.

८५९. दण्ड
परमात्मा हा दण्डस्वरूप आहे. कारण त्याला सर्व प्रजांचें शासन करावयाचे आहे. त्यांना धर्ममार्गावर चालवावयाचे आहे, अधर्ममार्गापासून वारायचे आहे. हा दण्ड ज्ञान आणि करुणा यांच्या पोटीं उत्पन्न झाला आहे. जे काय श्रेय व्हायचे आहे तें धर्माचरणापासूनच होय. हे निश्चित ठाऊक असल्यामुळे आणि ज्यांना हे ज्ञान नाही त्यांच्या कळवळ्यामुळे सर्वत्र दण्डशक्ति प्रवृत्त होत असते. आई बाप आपल्या मुलांना, गुरु आपल्या शिष्यांना, राजा आपल्या प्रजेला, देवदेवता प्राणिमात्राला शासन करीत असतात. अमुक कर, तमुक करूं नको. असे केल्यास तुझें भलें होईल. तसें केल्यास तुझें अकल्याण होईल, असे सांगून तसें वागायला त्यांना प्रेरित करीत असतात आणि तसें न वागल्यास त्यांना दण्ड होत असतो. हा दण्ड जितका अप्रत्यक्ष आणि सहज तितका तो अधिक परिणामकारक होतो. अग्नीला हात लावल्यास तो भाजतो. म्हणजे मर्यादा-उल्लंघन होतांच त्याचे शासन मिळते. त्यांत विलंब नाही. हातोहात अपराध आणि दण्ड होत असतो. पण ही भौतिक गोष्ट झाली. सामाजिक गोष्टींत राजपुरुष अपराध शोधील आणि दण्ड करील तेव्हां तो व्हायचा. नैतिक गोष्टींत तर तो त्याचा त्यालाच कळायचा. त्याचे प्रायश्चित्त्य त्यानेच घ्यायचे. अशा स्थूल सूक्ष्म नि सूक्ष्मतर दण्डाच्या परी आहेत. पण मर्यादा-भंगाबरोबर दण्ड हा ठेवलेला च आहे. अपराधावांचून दण्ड नाही. पण धर्माचे नीट ज्ञान नसल्यामुळे अथवा असूनहि मोहामुळे जीवाच्या हातून सतत प्रमाद होत राहतो, अपराध होत राहतो, पाप होत राहते. आणि त्याचे शासनहि अर्थातच मिळत 'असते. आरोग्याच्या नियमांच्या भंगाखेरीज रोगोद्‌भव होत नाही, तसा धर्ममर्यादांचा भंग झाल्याखेरीज दण्ड होत नाही. दण्ड ज्या अर्थी भोगावा लागत आहे त्याअर्थी धर्ममर्यादाभंग झाला आहे, हे उघड आहे. मग तो कशास्वरूपाचा वा केव्हां झाला हा तपशील आपल्याला न का कळेना. म्हणून मनुष्याचे कर्तव्य हे की त्यानें धर्मज्ञान करून घ्यावे व तदनुसार धर्माचरण करावे आणि हेच नित्य निरंतर करीत रहावें. दण्डांतून सुटण्याचा दुसरा मार्ग नाहीं.

८६०. दमयिता
दण्ड आहे तिथें दण्डाधिकारी हा असलाच पाहिजे. मातापिता, गुरु, राजा, देवदेवता हे सगळे दण्डाधिकारी होत. यांच्या द्वारा तो दमयिता परमात्मा उन्मार्गगामी' लोकांचे दमन करीत असतो. "दण्डो दमयतां अस्मि' असें दण्डाचे विभूतित्व गीतेनें गाइलें आहेच. पण तो दण्ड अबक्त आहे. व्यक्त आहे दमयिता. म्हणून तोहि परमात्मस्वरूपच होय. वस्तुतः धर्म म्हणजे कायदा हाच शासन करीत असतो. त्याची अंमलबजावणी तेवढी राजा करीत असतो, आपल्या सेवकांकरवी करवीत असतो. पण ही राजव्यवस्था नसेल तर राज्य चालावयाचें नाही. म्हणून धर्मसंविधान, धर्मशास्ता आणि धर्मशासनतंत्र हे समग्रच परमात्मस्वरूप म्हटले आहे. त्यालाच इथें "दण्डो दमयिता दमः" या पदत्रयीनें संबोधिलें आहे. धर्मतत्त्व निर्गुण आहे, संविधान सगुण आहे आणि शास्ता व शासनतंत्र साकार आहे. बीज, प्ररोह आणि फल हा जसा एकाच तत्त्वाचा विस्तार आहे तसा "दण्डो दमयिता दमः" हाहि एकाच विचाराचा विस्तार आहे. एकाच विचाराची ती तीन अंगें होत. त्यांचा परस्परांत समावेश होतो आणि आवश्यकतेप्रमाणें त्याची गणना एकानेक होते. कुठे नुसतेच दण्ड पद येईल, कुठे दमयिताच येईल. कुठे, दमच येईल. कुठे "दमयिता दमः" अशी दोन पदें येतील, कुठे, "दण्डो दमयिता दमः" अशी तिन्ही येतील. पण सर्वत्र विचार एकच आहे. विचाराची अंगें अनेक असली तरी तो एक समग्र आहे, हे लक्षात घेतलें म्हणजे कोणतें अंग उल्लेखिलें आहे वा कोणत्या अंगाला महत्त्व दिलें आहे ही बाब गौण ठरते. जाळ्याचे कोणतेहि अंग स्पर्शिलें तरी संबंध जाळें स्पर्शिलें जातें व कर्षिलें जातें. विचाराचेहि तसेंच आहे.

८६१. दम
दण्डसंविधान, दण्डधर आणि दण्डनक्रिया या क्रमाचा निर्देश "दण्डो दमयिता दमः" हा पदक्रम करीत आहे. तदनुसार दम म्हणजे दमनक्रिया. क्रिया महत्त्वाची आहे. संविधान आहे, शास्ता आहे पण त्याचे शासन, त्याची अंमलबजवणी जर होत नसेल तर तें राज्य असून नसून सारखेंच. त्याला राज्य म्हणतां येत नाही. कारण "राज्यं किम् ? आज्ञाफलम्" राजाज्ञेचे पालन होणें हेंच राज्य होय. नाही तर दारूबंदीचा कायदा करायचा आणि त्याचा अंमल मात्र कुठेच नसावयाचा, याला का राज्य म्हणायचे ? हे राज्य नसून राज्याचे सोंग होय. धर्माचे पालनच सर्वांत महत्त्वाचे आहे. तें झालें म्हणजे कृतकृत्यता झाली.
पठकाः पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्र-चिन्तकाः ।
सर्वे व्यसनिनो मूर्खा यः क्रियावान् स पण्डितः ॥

शास्त्राज्ञेचे, वेदाज्ञेचे परिपालन महत्त्वाचे आहे, नुसतें शास्त्राचे पठन पाठन वा चिन्तन व्यर्थ आहे. "वेदस्योपनिषत् सत्यं, सत्यस्योपनिषद् दमः" वेदशास्त्राचे रहस्य सत्य होय आणि त्या सत्याचेहि रहस्य दम म्हणजे इन्द्रियनिग्रह होय. इन्द्रियनिग्रहाधीन प्रज्ञेची स्थिरता आहे आणि प्रज्ञास्थैर्याधीन सत्योपलब्धि आहे. म्हणून सर्वांत महत्त्वाची गोष्ट दम होय, इन्द्रियनिग्रह होय. ज्याच्यांत कांहीं दम नाहीं त्याच्यांत कांहीं राम नाही. म्हणूनच गीतेत स्थितप्रज्ञाच्या श्लोकांत वारंवार "वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता" असा निष्कर्ष काढला आहे. असे हे इन्द्रियशासन सर्वांत महत्त्वाचे आहे. ते जो करतो तो राजा होय. म्हणून चाणक्यानें म्हटले आहे. "राज्यमूलं इन्द्रियजयः" स्वतः राजाच दारू पितो त्याच्या राज्यांत दारूबंदी होणार कशी ? यथा राजा तथा प्रजा. म्हणून दम पाहिजे. तोच परमात्मा.

८६२. अपराजित
न पराजितः अपराजितः । ज्याला कोणी पराजित केलें नाहीं तो अपराजित म्हणावयाचा. जो दान्त आहे, दमवन्त आहे त्याच्यावर कोणाची हुकूमत चालू शकत नाही. परंतु जो इन्द्रियाधीन आहे त्यावर शब्द स्पर्श रूप रस गन्ध हे विषय हुकूमत चालवतात. असा इन्द्रियाधीन जीव कुरंग मातंग पतंग मीन भृंगवत् विषय-लोलुप होऊन तदधीन होऊन बसतो, पराभूत व पराजित होऊन बसतो. परंतु जो जितेन्द्रिय आहे, विजितात्मा आहे, तो स्वामित्वें विषयीं वर्ते'. तो सर्व व्यवहारांत स्वतंत्रपणे वागत असतो. त्याची बुद्धि इन्द्रिये असन्मार्गानें जात नाहीत. म्हणून तो अपराजित म्हणावयाचा.
कान्ता-कटाक्ष-विशिखा न लुनन्ति यस्य चित्तं, न निर्दहति कोप-कृशानु-तापः ।
कर्षिन्ति भूरि विषयाश्च न लोभ-पाशैर्लोकत्रयं जयति कृत्स्नमिदं स धीरः ॥

भर्तृहरीच्या या श्लोकांत म्हटल्याप्रमाणें असा विधेयात्मा धीर पुरुष सर्वत्र अपराजित राहून त्रिभुवनविजयी होतो. पुढील सर्वसह पदानें तेंच सांगितले आहे.
विश्वांत ज्या सत्ता आहेत त्यांत सर्वांत वरचढ सत्ता म्हणजे देवांची. त्यांचा अधिपति इंद्र तो कोणालाहि आपल्याहून वरचढ होऊं देत नाहीं. अर्थात् आपल्या इन्द्रियविषयाचा अतिक्रम कोणी करूं लागल्यास त्याला तो आपल्या मारसेनेनें परास्त करतो. नरननारायण ऋषींनाहि त्यानें असेंच एकदा आपली मारसेना पाठवून जिंकायचा प्रयत्न केला. परंतु तो आत्मनिष्ठ नारायण मदनाच्या पंच बाणांनी, त्याच्या प्रलोभनांनी जराहि चळला नाही उलट हंसला आणि, त्यांनाच उर्वशी देऊन इन्द्राला लज्जित केलें. म्हणून तो परमात्मा सदैव अपराजितच होय.

८६३. सर्वसह
सर्वान् सहते जयति इति सर्वसहः । जो सर्वांना जिंकून घेतो तो म्हणावयाचा सर्वसह. इथे सह हा धातु प्राचीन वैदिक अर्थानें आला आहे. आज सह धातु, सहन करणे, प्रतिकार न करता स्वीकारणे अशा अर्थानें वापरला जातो. वैदिक अर्थाचाच तो एक भिन्न प्रकार आहे. नरनारायणापुढे देवेन्द्रानें पाठविलेल्या सुरसुन्दरींनी नाना हावभाव केले पण त्याचा त्या ऋषीवर काहीं एक परिणाम झाला नाही. त्याचे चित्त आकृष्ट झालें नाहीं, व्यथित झालें नाहीं, मोहित झालें नाही. अर्थात् तें अविकृत राहिले. याचा तरी अर्थ काय ? ऋषीनें तें सारे सहन केलें, गिळून टाकलें, जिरवून टाकले. त्यापासून होणारी अपेक्षित विक्रिया होऊं दिली नाही, हाच. वस्तुतः हेच जिंकणे होय, परास्त करणे होय. ज्यानें ती मारसेना पाठविली होती ती अकृतकार्य होऊन परत त्याच्याकडे गेली. परत गेली इतकेच नव्हे, तर नारायणानें दिलेली उर्वशी हा अनुग्रह घेऊन गेली. कोणा पक्षकारानें न्यायाधीशाकडे लाच म्हणून एक सोन्याची सुरई पाठविली. त्यानें ती रत्नजडित करून त्याच्याकडे परत केली. तसें हें झाले. न्यायाधीशाची निोभता आत्मतृप्तता आणि उदारता असे उत्तरोत्तर उत्कर्ष यांतून प्रकट झाले. तसेंच ते नारायणाच्या उदाहरणांतहि झालेले दिसून येतात. नारायणाप्रमाणें भगवान् बुद्धाच्या मार-विजयांत ही खुबी, हा निर्विकारतेचा प्रकर्ष आढळत नाही. सुभाषित आहे- अक्रोधेन जयेत्क्रोधं, असाधु साधुना जयेत् ।
जयेत् कदर्यं दानेन, सत्येनालीकवादिनम् ॥

परमात्माहि असाच सर्वसह म्हणजे सर्वजयी आहे. त्यानें आपल्या निर्विकारतेनें आत्मनिष्ठतेनें आणि उदारतेनें सर्वांना जिंकून घेतले आहे. ज्याला जे हवें त्याला तें तो देत आहे, पण त्याला त्याची स्पृहा नाही, हेवा नाही. असा तो समुद्रवत् वितृष्ण आत्मतृप्त आणि महोदार असल्यामुळे सर्वसह होय.

८६४. नियन्ता
"दण्डो दमयिता दमः । " या पदत्रयी प्रमाणेंच "नियन्ता नियमो यमः' ही पदत्रयी आहे. यम् आणि दम् या धातूंच्या अर्थात जो काय भेद असेल तेवढाच. दण्ड् वा दम् धातु हा मुख्यतः राजनीतीचा शब्द आहे, यम् हा मुख्यतः आध्यात्मिक क्षेत्रांतील शब्द आहे. असे असले तरी दोन्ही धातु परस्परांऐवजी वापरले जातात. नियन्ता पद आत्म-नियमन सुचवितें, दमयिता पद पर-दमन सुचविते. नियन्ता हा आपलें नियमन विशिष्ट नियमांनी करीत असतो. ते नियम स्थूल असतात. त्यांचे जें सूक्ष्म तत्त्व ते यम म्हटले जातात. या यम-नियमांची परिगणना आणि व्याख्या पतंजलीनें आपल्या योगसूत्रांत केली आहे. या यमनियमांचा विवेकपूर्वक अवलंब करावा. मनूनें त्याबाबत पुढील प्रमाणें मोलाची सूचना देऊन ठेवली आहे.
यमान् सेवेत सततं न नित्यं नियमान् बुधः ।
यमान् पतत्यकुर्वाणो नियमान् केवलान् भजन् ॥

अशा विवेकशीलतेनें जो यम-नियमांच्या योगें आत्म-नियमन करतो तोच नियन्ता म्हणावयाचा. असा नियन्ता आपल्या देहेन्द्रियमनोबुद्धींना सन्मार्गावर चालवून सुखरूप निजधामास पोचतो. परमात्मा हा तर सदैवच निजधामी वास्तव्य करून सुखरूप आहे. म्हणून तो सहजच नियन्ता होय. आम्हीं संसाराटवीत भटकलों आहों. आम्हांला आत्म-नियमन करून तें निजधाम गांठावयाचे आहे. अशा नियंत्याला च उपनिषदांत रथी म्हटले आहे.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।
बुद्धि तु सारथि विद्धि मनः प्रग्रहमेव च ।
इन्द्रियाणि हयान् आहुः विषयान् तेषु गोचरान् ।


८६५. अनियम (नियम) .
नियमयति इति, नियम्यते अनेन इति वा, नियमः । जो नियमन करतो वा ज्याच्या योगें नियमन केलें जातें तो नियम म्हणावयाचा. नियन्ता हा नियमांच्या साहाय्यानें आत्मनियमन करीत असतो. पैकीं यम हे ज्ञानांगभूत असल्यामुळे नित्य आहेत. नियम हे जितक्या अंशानें आणि जोवर यमोपयोगी म्हणून आवश्यक तितक्या अंशानें व तोंवर सेव्य होत. शम दम शौच संतोष स्वाध्याय ईश्वर-प्राणिधान हे नियम म्हणून सांगितले आहेत. यांच्या बरोबरच अनेक उपनियमहि कल्पिले जातील ते सर्व नियमच म्हणावयाचे. गांधींच्या एकादश व्रतांत आपल्याला ते दिसून येतात.
अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह ।
शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भय-वर्जन ॥
सर्व धर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श-भावना ।
ही एकादश सेवावीं नम्रत्वें व्रतनिश्चयें ॥

अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे पांच यम होत. उरलेले नियमोपनियम. हे नियमोपनियम देशकाल-परिस्थिति-सापेक्ष आहेत. त्यांची संख्या, स्वरूप आणि त्यांचे महत्त्व आवश्यकतेप्रमाणें बदलेल. विनोबा त्यांत अनिन्दा हें एक नवें व्रत, नवा उपनियम जोडत आहेत. अशा प्रकारे नियमोपनियम चंद्रकलेप्रमाणें परिवर्तनशील आहेत, परंतु यम हे चन्द्रवत् सदै व स्थिर स्थायी आहेत. शंकराचार्यांनी यम नियम ही पदें अयम अनियम अशीहि कल्पिली आहेत. पण तशी कल्पना करण्याचे खास प्रयोजन नाहीं आत्मा आत्मज्ञान यांना यम नियम अविरोधी असल्यामुळे तशी कल्पना करण्याची गरज नाही. तसे करणे ओघाच्या विरुद्धहि आहे. कृत्रिमहि. म्हणून नियम हा आत्मज्ञानोपकारक म्हणून परमात्मस्वरूप म्हटला आहे.

८६६. अयम (यम)
यमयति इति यमः । जो यमन म्हणजे अत्यंत व्यापक असें नियमन करतो तो यम म्हणावयाचा. परमात्मा या विश्वाचे जे नियमन करीत आहे तें स्थूल दण्ड घेऊन जसे शासक करतात तसें करीत नाही. तो सुसूक्ष्म किंबहुना अव्यक्त तत्त्वांच्या योगें नियमन करीत आहे. ती जी सूक्ष्म तत्त्वें तींच यम होत. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह ही ती तत्त्वें होत. यांचे उल्लंघन केल्यानें जीव दुःखभाक् होतो. त्यांचे परिपालन केल्यानें तो दुःखसंयोगापासून बचावतो. इथें किरकोळ दुःखाचा विचार नाही. इथे दुःख म्हणजे दुःखमात्र, मुख्य दुःख म्हणजे देहयोगच होय. त्या देहयोगानें जीव सुखदुःखांचा अनुभव करीत असतो. ती दोन्हीहि इथे दुःखच समजावयाची आहेत. कारण ती दोन्हीहि स्पर्शजच आहेत, विषयेन्द्रियसंनिकर्षांतूनच उत्पन्न होत आहेत. आणि खरें सुख हे स्वतंत्र असते, तें विषयेन्द्रिय-पराधीन नसते. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ हे अस्पर्शज आत्मसुख ज्यायोगें हस्तगत होतें तो यम होय. हा परम आनन्दमय आहे. कारण तो सर्व अनात्म धर्माचा अन्तक आहे. यम म्हणजे अन्तक, मृत्यु असे आपण मानतों. त्यामुळे तो भयंकर अशी कल्पना केली गेली आहे. पण तो अन्तक अनन्ताचा का अन्त करणार आहे ? जें अविनाशी आत्मतत्त्व तिथे त्याची मात्रा चालत नाही. किंबहुना त्या आत्मतत्त्वाचा लाभ करून देणे आणि तदितर सर्वांची हानि करणे हेच तर त्याचे कार्य आहे. अशाहितकाला का भ्यावें ? तो तर अध्यात्मविद्येचा महान् आचार्य आहे. नचिकेता त्याच्या कडे गेला होता आणि त्यानें त्याच्या पासून ती हस्तगत केली. कठोपनिषदांत ही आख्यायिका आली आहे. तेव्हां यम म्हणजे सर्व दुःखांचा अन्त करणारा अध्यात्मविद्येचा परम गुरु तो परमात्मा होय. आणि त्याला पोचवणारे जे धर्म तेहि पर्यायानें यमच होत. फळावरून च तर झाडाची ओळख होते. बदामाचे फळ धरणारे झाड बदामच तद्वत्. पण संयमस्वरूप परमात्म्याचे फळ ज्याला येतें तो वृक्ष यम च होय. आणि तोहि परमात्मस्वरूपच होय.


सत्त्ववान्सात्त्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः ।
अभिप्रायः प्रियार्होऽर्हः प्रियकृत्प्रीतिवर्धनः ॥९३॥


८६७. सत्त्ववान्
सत्त्वेन युक्तः सत्त्ववान् । जो सत्त्वानें युक्त तो सत्त्ववान्. म्हणावयाचा पण सत्त्व म्हणजे काय ? सत्त्व म्हणजे सत्त्वं, चांगुलपणा, भलेपणा, निष्ठा. सत्त्वपरीक्षा या शब्दप्रयोगांत आपल्याला तो त्या अर्थानें आढळतो. जो आपल्या ब्रीदाला जागतो, प्राण गेला तरी ते सोडीत नाहीं तो सत्त्ववान् म्हणावयाचा. शिबिराजा सत्त्ववान् होता. शरणागताला अभय देणे हे त्याचे ब्रीद होते आणि ते त्यानें स्वतःचे मांस देऊन राखलें.याचा अर्थ, तो आपल्या अंगीकृत कार्यापासून, कर्तव्यापासून, आपल्या धर्मापासून ढळला नाही. अशाला म्हणतात सत्त्ववान्. अग्नीचा धर्म उष्णता. तो केव्हांहि तो सोडत नाही. मिठाचा धर्म खारटपणा, तो तें केव्हांहि सोडत नाही. त्याप्रमाणें जो आपलें सत्त्व सोडीत नाहीं तो सत्त्ववान् म्हणावयाचा. हे सत्त्व सत्त्व- गुणाच्या उत्कर्षानें माणसाच्या ठाईं येते. म्हणूनहि त्याला सत्त्व म्हटले आहे. तमोगुण जडता आहे, रजोगुण अस्थिरता आहे. सत्त्वगुण प्रकाश आहे. तिथें तमोगुणाची जड़ता नाही, पण स्थिरता आहे. तिथें रजोगुणाची चंचलता नाही, पण क्रियाशीलता आहे. आणि प्रज्ञेची प्रभा तर आहेच आहे. त्यामुळे सत्त्व हेच बळ होय. सत्त्वांत प्रज्ञा, भावना आणि आरोग्य यांचा म्हणजे सर्व इष्ट तत्त्वांचा संगम आणि समुच्चय आहे. याहून अधिक कार्यक्षमता. अधिक मोठे बळ दुसरे कोणतें असू शकेल ? या सत्त्वाचाहि आश्रय तो निर्गुण परमात्मा असल्यामुळे तो सत्त्ववान् म्हणावयाचा. आणि सत्त्ववान्च त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणूनच म्हटले आहे "नित्यसत्त्वस्थो भव."

८६८. सात्त्विक
सात्त्विक म्हणजे सत्त्वगुणमय, सत्त्वगुणप्रधान. ही सृष्टि म्हणजे त्रैगुण्य होय. तो स्रष्टा परमात्मा निस्त्रगुण्य आहे, निर्गुण आहे. तरी तो सात्त्विक म्हटला आहे. कारण रजोगुण-कार्य जें सृष्टिविसर्ग, विश्वोत्पत्ति तें एक टोक आहे. तमोगुण-कार्य त्यासृष्टीचा संहार हे दुसरे टोक आहे. आणि या दोहोंच्या दरम्यान आहे. सत्त्वगुण-कार्य सृष्टिस्थिति. ती आम्हांला प्रत्यक्ष व इष्ट आहे. म्हणून आमच्या दृष्टीनें सत्त्वच प्रधान आहे. तेव्हां सृष्टिस्थितीची जी अधिदेवता तीच आमची विशेषतः उपास्य म्हणावयाची. तिलाच इथे सात्त्विक म्हटले आहे. त्या सत्त्वमूर्तीला च भगवान् विष्णु असें पारिभाषिक नांव आहे. पण आम्हांला गुणोपासना करायची आहे की निगुणोपासना ? उपासना तर सद्वस्तूची करायची आहे, आणि ती सद्वस्तु आहे निरगुण, परंतु या गुणप्रवाहांत केवळ निरगुणाची उपासना कशी करायची ? इथला अणुरेणु गुणमय आहे. तुमची देहेन्द्रियमनोबुद्धि गुणमय आहेत. अशा या गुणांच्या प्रवाहांत निगुणाचे दर्शन कसे व्हायचे ? तें दर्शन सत्त्वगुणांतच होऊं शकते. देह तमोगुणाचा पुतळा, इन्द्रियें मन रजोमय आणि बुद्धि तेवढी सत्त्वस्पृष्ट आहे. त्या बुद्धिरूप सत्त्वाणूची शुद्धि म्हणजे सत्त्व-शुद्धि होय. ती झाली म्हणजे तिथे त्या निरगुणाचे प्रतिबिंब पडतें. तें पडावे म्हणून जो प्रयास करावयाचा तीच साधना होय, उपासना होय. ही सत्त्वशुद्धि प्रत्येक गोष्ट सात्विकच सेवन करायची या निश्चयांतून होते. सत्त्वोदय सत्त्ववृद्धि आणि सत्त्वोत्कर्ष या क्रमानें ती पूर्ण होते. जेव्हां पूर्ण होते तेव्हां "सत्त्वशुद्धौ धुवा स्मृतिः" या वचनाप्रमाणें साधकाला ध्रुव म्हणजे कायमचा आणि स्मृति म्हणजे आत्मप्रत्यय होतो. साधक विज्ञानी होतो. निर्गुण परमात्मा अशा प्रकारें सत्त्वांत प्रकटत असल्यामुळे तो सात्त्विक म्हटला जातो.

८६९. सत्य
सत्य म्हणजे सत्यस्वरूप. अग्नि जसा औष्ण्य स्वरूप आहे तसा परमात्मा हा सत्यस्वरूप आहे. सर्वांचा मूल आधार तें सत्य आहे. सर्वांचा म्हणजे तिन्ही पुरुषांचा. माझ्या समोर जो दिसतो आहे त्याचा, जो दिसत नाहीं त्याचा आणि जो दिसतो वा दिसत नाही म्हणजे म्हणतो त्याचाहिं. ते सत्य म्हणजे तो सत्स्वरूप परमात्मा ती सद्वस्तु तूं तो नि मी या तिन्ही पुरुषांचा आधार आहे. आणि हे अद्वैत, हे ऐक्य जो पाहतो त्याला सत्याचे दर्शन झालें, परमात्म्याचा साक्षात्कार झाला म्हणावयाचे. सर्व उपासकांची अभिलाषा हीच असते. म्हणून त्यांची सनातन प्रार्थना आहेः
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥

हे विश्वपोषका, या विश्वाचें जें सत्य आहे तें या मोहक मायेच्या मुखवट्यानें झांकलेलें आहे. तो मुखवटा दूर सारून आपलें तें सत्य मुख मज सत्याच्या उपासकाला, सत्यच ज्याचा धर्म आहे आणि सत्यच ज्याचे कर्म आहे, त्या मला दाखव.
हा सत्यदेव कसा आहे ? सत्य हेच त्याचे स्वरूप आहे. त्याचे नांवहि सत्यच आहे आणि रूपहि 'स' आणि 'त्य असेंच आहे. सारांश, नाम रूप गुणकर्म सर्व सत्यच आहे त्याचे. त्या सत्यदेवाचे कर्म म्हणजे ही सृष्टि होय. हीहि सत्यच आहे. कारण ती सत्यमूलक, सत्यस्वरूप आणि सत्यफल आहे. एथपर्यंत तर ठीकच आहे. पण या सत्याचे आराध्यहि सत्यच आहे म्हणून पुढील पद आले आहे-सत्यधर्म-परायणः. तो परमात्मा सत्यस्वरूप आहे इतकेच नव्हे तर सत्योपासकहि आहे. तोच देव आहे. तोच भक्त आहे आणि नाम म्हणजे उपासनाहि तोच आहे.

८७०. सत्यधर्म-परायण
सत्यधर्मः परायणं यस्य सः सत्यधर्म-परायणः । सत्यधर्मच परम अयन म्हणजे गति आहे ज्याची तो सत्यधर्म-परायण म्हणावयाचा. सत्य हे स्वतः अनन्त आहे आणि म्हणून त्याचा शोधहि अनन्तच आहे. गंगेचे प्राप्तव्य सागर आहे. तो मिळाल्यावरहि ती जशी सागराला मिळतच राहते त्याप्रमाणें सत्यच 'ज्याचे प्राप्तव्य आहे आणि सत्याचा शोध ज्याचा सतत चालूच आहे तो म्हणावयाचा सत्यधर्म-परायण. जोवर सत्याहून वेगळे आपले जीवन शिल्लक आहे
तोंवर तें त्या सत्याच्या शोधासाठीच आहे हे उघड आहे. म्हणून देहेन्द्रियमनोबुद्धीचा प्रवाह सतत सत्याभिमुख वाहता ठेवणे म्हणजे सत्यधर्म-परायणता होय, अभिषेकपात्रांतील सर्व जलबिंदु जसे एकवटून अखंड धाराप्रवाह शिवाभिषेक करीत राहतात त्या प्रमाणें आपल्या सर्व शक्तींचा एकवटलेला जीवनौष सत्याला अखंड समर्पित होत राहतो, आपल्या जीवनाचा एक अंशहि आणि एक क्षणभरहि इतरत्र जात नाही तेव्हां सत्यधर्म-परायणता साधली म्हणावयाची, अभिषेक-पात्राचा हा दृष्टांत जसा परायणता म्हणजे काय तें विशद करतो तसा दीप ज्योतीचा दृष्टांतहि गीतेत आला आहेः
यथा दीपो निवातस्थो नेगते सोपमा स्मृता ।
योगिनो यत-चित्तस्य युजतो योगमात्मनः ॥ गीता ६ - १९

परमात्मा हा असा अखण्ड आत्मसमाधिस्थ आहे. म्हणून तो सत्यधर्मपरायण म्हटला आहे. 'सत्यः सत्यधर्मपरायणः ही दोन पदें तो परमात्मा आत्मस्वरूप व आत्मनिष्ठ आहे असे सांगत आहते. बाह्यार्थ जोवर तुमचे अभिलषित आहे तोवर भय आहे. तोवर अपूर्णता आहे. परमात्मा हा निर्भय आणि परिपूर्ण आहे. वैदिक धर्म म्हणजे सत्यधर्म होय. सत्यच साध्य आणि सत्यच साधन. वेदोपनिषदें इतिहास पुराणे यांत परोपरीनें या सत्याचा च महिमा गाइला आहे.
१. "एकं सत् । "-वेद्
२. "सत्येन लभ्यः । "-उपनिषत्
३. "सत्येषु यतितयं वः सत्यंहि परमं बलम् । "-महा-भारत.


८७१. अभिप्राय
अभिप्रेयते इति अभिप्रायः । काय वाक् मनः-प्रवृत्ति ज्याला उद्देशून चालतात तो परमात्मा अभिप्राय म्हणावयाचा. काय वाक् आणि मन हे तीन कर्म-पथ आहेत. आमच्या सर्व क्रिया या तीन मार्गांनी चालतात. त्या कोणत्या रोखानें चालतात ? त्यांचे अन्तिम गन्तव्य काय असते ? क्रिया म्हटली म्हणजे तिला हेतु आलाच. एक वेडा सोडून दिला तर प्रत्येकाच्या कृतीला काही उद्देश्य असतो. वेड्याच्याहि कृतीला उद्देश असतो, पण तो आम्हांला समजत नाही आणि त्यालाहि. पण त्याचेहि वागणें निरुद्देश वा निरभिप्राय असू शकत नाही. तात्पर्य प्रत्येक जीवन म्हणजे एक साभिप्राय कर्मच आहे. तात्पर्य प्रत्येक व्यक्ति समाज विश्व या एकापेक्षा एक मोठ्या संस्था आहेत आणि त्यांचे जीवन साभिप्राय आहे. प्रत्येक जण आपआपल्या हेतूनें जगत आहे. पण त्या सर्वांचे अन्तिम प्रयोजन एकच असते. ते प्रत्येकाला स्पष्ट कळत नाही. कारण तें विश्वप्रयोजन आहे. त्या विश्वप्रयोजनाचे अंगभूत असें तें व्यक्तींचे प्रयोजन असते. त्याला वास्तविक स्वतंत्र अर्थ नसतो, पण व्यक्ति तशी कल्पना करीत असते. तिच्या त्या वृथा अहंकाराला पूर्ण वाव देऊन विश्वप्रयोजन सिद्ध होत असते. घड्याळांत अनेक लहान मोठी चक्र आपआपले काम करीत असतात. त्यांचे आपलें विशिष्ट काम असते. पण ती सगळी वेगवेगळी आणि आपापतः असंबद्ध वाटणारी कामें घड्याळाच्या मुख्य कामाची अंगभूतच असतात. तद्वत् या विश्वरचनेचें आहे. तिचा अभिप्राय तो परमात्मा आहे, त्याची इच्छा आहे. त्याच्या इच्छेनें तुम्ही इच्छा करतां, कामें करता. पण त्या कर्माचे फळ त्या परमात्म्याच्या हातांत आहे. तुमच्या हातांत नुसतें करणेंच आहे. आणि तेंच करावयाचे आहे.कशासाठी ? परमात्म्यासाठी. म्हणून तो परमात्मा म्हटला आहे अभिप्राय.

८७२. प्रियार्ह
प्रियं अर्हति इति प्रियार्हः । जें जें प्रिय आहे त्याला त्याला जो पात्र होय तो म्हणावयाचा प्रियाह. जगांत जितक्या म्हणून प्रिय वस्तु आहेत त्यांत सर्वांत प्रिय आपला आत्मा आहे. त्याहून अधिक प्रिय कोणी नाही.
त्याला प्रिय म्हणण्यांत स्वारस्य नाही. कारण तो तर निजात्माच आहे. प्रियाप्रिय निजेतर वस्तूला म्हटले जातें म्हणून निजवस्तूला प्रियार्ह म्हणावयाचे. हे स्वात्मा सर्व प्रिय वस्तूंस पात्र होय. सर्व प्रिय आप त्यालाच अर्पण करीत असतो. आपला देह है आपल्याला फार प्रिय आहे. इतका की त्याला आपण आत्मा मानून बसतो. सर्व प्रियोपचार त्यालकरीत असतो. म्हणजे तो प्रियार्ह झाला. परंतु हा असा देहहि अनेकदां माणसाला नकोसा होतो. ते गतार्थ होतो. त्याच्या पासून माणसाला सुखाची आशा रहात नाही आणि मग तो आत्महत्या करून बसतो तो देह फेकून देतो. याचा अर्थ असा झाला की त्या देहाहून वेगळा असा दुसराच प्रिय आहे, ज्याच्या साठी हा देह होता. तो जो देहभिन्न स्वात्मा, ज्याच्यासाठी हा देह आणि देहानुबद्ध सारें माणसाला प्रिय होते तो च प्रियार्ह होय. मैत्रेयी-याज्ञवक्य-संवादांत हा विषय विशद झाला आहे. त्याचे ध्रुवपद आहेः "आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति" तात्पर्य तो सर्वांचा निजात्मा असणारा परमात्मा हाच प्रियार्ह होय. त्याच्यासाठीच सारे प्रिय होते. "न वा अरे पत्यु कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पति प्रियो भवति । न वा अरे जायायाः कामाय जाया प्रिय भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति । "

८७३. अर्ह
पप्रियार्हःऽर्ह प्रियकृत् प्रीतिवर्धनः" या प्रियप्रवाहांत मधेच अर्ह पद आलें आहे बेटासारखे प्रियाहून वेगळा त्याचा आशय आहे, हे उघड आहे कोणता तो आशय ? अर्ह हे पद निरुपपद आहे त्यामुळे सर्वार्ह असा त्याचा आशय प्रतीत होतो. परमात्मा प्रियार्ह तर आहेच पण जें जें प्रियतर आहे त्यालाहि तो अर्ह आहे, पात्र आहे. कारण तो स्वत प्रियतम आहे. सर्व कल्याणांचें तो निधान आहे. हे मंगलांचे माहेर आहे. कारण, तो सर्वाधार सद्वर आहे. सर्व अर्ह, सर्व मूल्य आहे त्या सद्वस्तूचें. सत् नसेल तर सारे मूल्य त्या सत् चे असत् होणार. मरायला टेकलेल्या माणसाला कशांत गोडी वाटत नाही, कारण "आप मुए पीछे डूब गई दुनिया" आपण मेल्यावर आपल्याला जग मेलेंच ! त्याचा उपयोग कोणता ? सद् वस्तु आत्मा असेल तर त्याच्या आधारानें सारे जग आहे. तो नसेल तर काहींच नाहीं, म्हणून तो परमात्मा सर्वार्ह होय. जें काय मूल्य आहे तें सारे त्याचे आहे. असताला मुळी कांहीं मूल्यच नाही. स्वप्नांतल्या आराला आणि हाराला काय किंमत ? आर गिळील म्हणून भय नको किंवा हार मिळाला म्हणून हर्ष नको. पण सद् वस्तु जर मिळाली, आपला आत्मा जर उपलब्ध झाला तर मग काय मिळायचे राहिलें ? सारेंच मिळाले. म्हणून तो परमात्मा अर्ह होय.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस् तत्त्वदर्शिभिः ॥ गीता २ - १६


८७४. प्रियकृत्
प्रियं करोति इति प्रियकृत् । जो आपलें प्रिय करतो तो प्रियकृत् म्हणावयाचा. परमात्मा हा असा जीवाचा प्रियकृत् आहे. तो आपलें प्रिय करीत असतो. परका माणूस आपलें कितीसें प्रिय करणार ? जोवर त्याचा कांहीं स्वार्थ साधत असेल तोंवरच तो आपलें भलें करील. म्हणजे त्याचे अनुकूल वर्तन हे वस्तुतः आम्हांला अनुकूल नसून त्याला स्वतःलाच तें अनुकूल असते. आईबाप हे पुत्रावर निरपेक्ष प्रेम करतात असें समजले जाते. परंतु त्यांतहि स्वार्थ मुळीच नसतो असें म्हणता येत नाही. पुत्र आपल्याला सद्गति देईल, जगांत आपले नांव चालवील, संकटांत व्याधींत वार्धक्यांत आपल्याला साहाय्य करील अशी अपेक्षा त्यांची असते. म्हणजे हेहि पुत्रावर प्रेम नसून आपल्यावरच प्रेम म्हटले पाहिजे. सारांश, जगांत कोणी कोणाचा प्रियकर्ता नाहीं जो तो आपला प्रियकर्ता आहे. म्हणून हा जो सर्वांचा निजात्मा परमात्मा तोच एक प्रियकृत् होय. तो आपल्यावर जे प्रेम करीत असतो, आपलें जें प्रिय करीत असतो ते स्वभाव म्हणून करीत असतो. त्याचे कुठलें निमित्त वा कारण नाही. तो अकारण, अहैतुक आपलें प्रिय करीत असतो. म्हणून तो म्हणावयाचा प्रियकृत्. हा जो हृदयस्थ प्रियकृत् परमात्मा त्याला अग्निरूपानें यज्ञकुंडांत दैदिक ऋषि परोपरीनें आळवीत आले आहेत. ते त्याला म्हणतातः
स नः पितेव सूनवे अग्नें सूपायनो भव ।
सचस्वा नः सुअस्तये ॥

हे (जीवनाची ऊब देणाऱ्या) अग्निदेवा बाप मुलासाठी जशा नित्य नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येतो तशा आमच्यासाठी घेऊन ये आणि आमच्या क्षेमासाठी सदैव आमच्या जवळ रहा. अशा प्रकारें आमचा योगक्षेम चालविणारा तूं आमचा प्रियकृत् आहेस.

८७५. प्रीति-वर्धन
परमात्मा हा पितृवत् प्रियकृत् आहे तसा तो पुत्रवत् प्रीति-वर्धनहि आहे. तो पुराण पुरुष परमात्मा आम्हांला रक्षण पोषण आणि शिक्षण देऊन आमचे प्रिय करीत असतो. इकडे चिरंजीव जीव आपल्या बाललीलांनी, तरुण पराक्रमांनी आणि वृद्ध तपोज्ञानानें त्या परमात्म्याच्या आमच्यापासूनच्या आशा सफळ करून त्याची प्रीति वाढवीत असतो. हा जो प्रीति वाढविणारा जीवात्मा आहे तो कोण आहे ? तोहि परमात्माच आहे. मानव-समाजाच्या आशा त्याच्या येत्या पिढया सफल करीत असतात. अशा प्रकारे मानव-समाज, किंबहुना हा समस्त विश्वाकार अनादि कालापासून विकास पावत आला आहे. मागील पिढी पुढील पिढीला रक्षण पोषण नि शिक्षण देऊन प्रियकृत् होत असते आणि येती पिढी आपल्या मागील पिढ्यांना आपल्या आदर्शाभिमुख पराक्रमांनी संतोषवीत त्यांच्या आशा पल्लवित करीत राहते. हेच प्रीति-वर्धन होय. हे प्रीति-वर्धन करणारा कोण आहे ? मानवाचा तो अमर आशावान् आत्मचंडोलच होय. जीवात्मा कधीच निराश होत नाही. तो आपल्या उद्दिष्ट कार्यांत या जन्मीं सफळ झाला नाही तर पुढील जन्मीं त्याचा ध्यास घेऊन तें कार्य तो तडीस नेतो. समाज आणि व्यक्ति दोहोंच्याहि बाबतींत आपण हे पाहतो. भरत आणि भगीरथ यांची उदाहरणे ही व्यक्ति आणि समाज यांच्या अमर आशेची उदाहरणे होत. हा जो आशिष्ठ द्रढिष्ठ बलिष्ठ आत्मा तोच प्रीति-वर्धन होय. तोच परमात्मा.


विहायसगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग्विभुः ।
रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः ॥९४॥


- ८७६. विहायस-गति
"विहायस-गति" पासून नवीन श्लोक (९४ वा) सुरू होत आहे. या श्लोकांत अग्नि आणि सूर्य या दोन तेजांचा प्रामुख्यानें विचार केला आहे. पूर्वार्धांत अग्नीचा आणि उत्तरार्धात सूर्याचा. तेज इथून तिथून एक आहे पण त्याचे जे विशेष आविर्भाव ते अग्नि आणि सूर्य इथें उल्लेखिले आहेत. विहायसगति हे पद उभयांना समान आहे. "विहायस आकाशः गतिः यस्य सः विहायस गतिः । " विहायस म्हणजे आकाश हे ज्याचे गति म्हणजे पर्यवसान आहे तो म्हणावयाचा विहायस-गति. तेजोरूप परमात्मा हा विहायस-गति आहे. अग्नीच्या ऊर्ध्वगामी ज्वाला आकाशात उठतात, तिथेच त्या चळवळ करतात आणि शेवटी निमतातहि तिथेच. म्हणून तो विहायस-गति होय. अग्नि हा मूळचा दिव्य. तो आमच्या दाराशी अतिथि म्हणून आला आहे. तो 'अतिथिर् दुरोणसद्' आहे. त्याची आम्हाला चांगली बडदास्त राखली पाहिजे. आम्ही जेव्हां स्वर्गात त्याच्या कडे जाऊं तेव्हां तो आमची सोबत आणि सोय करील. तोच आमचा पथ-प्रदर्शक आहे. त्याला त्या विहायसाच्या परमानन्दाच्या, सर्व वाटा ठाऊक आहेत. म्हणून आम्ही त्याला म्हणतोंः हे देदीप्यमान प्रभो, विश्वांतील सर्व वाटा तुला ठाऊक आहेत. आम्हांला सरळ वाटेनें निजधामाकडे त्या परमानन्दाकडे घेऊन चल, आड वाटांपासून आमचे निवारण कर. तुला आम्ही नम्र वाणीनें पुनः पुनः विनवीत आहोत. विहायस-गति म्हणजे अव्यक्तगति. परमात्मा हा अव्यक्त-गति आहे. तो त्याच्या कर्माचा आणि ज्ञानाचा प्रतीक आहे. एवढ्याच सावी तिरडीसमोर गृह्याग्नि घेऊन चालतात. त्याचा पुढचा प्रवास यथाकर्म यथाश्रुत व्हावयाचा आहे. ह्याचे ते द्योतक आहे. चिद्रूप परमात्मा विहायस- गति म्हणजे अव्यक्तगति आहे. आणि तद्रूप च असलेला जीवात्माहि, त्याचे प्रतीक अग्नि विद्युत् सूर्य रूप तेजहि, विहायस-गतिच आहे.

८७७. ज्योति
द्योतते इति ज्योतिः । जें स्वयं प्रकाशमान होय ते तेज म्हणजे ज्योति. जगांत जी सगळी तेजें आहेत ती स्वयंप्रकाशमान नाहींत. ती पेटवावी लागतात, त्यांना इन्धन पुरवावे लागते. परंतु आत्मज्योति अशी आहे की ती पेटवावी लागत नाही. किंवा तिला इंधनहि पुरवावें लागत नाही. "तेल न बाती बुझ नहीं जाती-आत्मज्योति' दिव्याला तेलवात लागते, तो पेटवावा लागतो आणि तेलवात संपली वा मोठा वारा आला की तो विझतो. अग्नि विद्युत् सूर्य ही तिन्ही सारखींच. अग्नींत साधे तेलवात वा सनकाडी हे पेटवण असते आणि तें पेटवून द्यावे लागते. विजेत सूर्यांत त्याऐवजी धातूंचे अणू जळतात इतकेंच. आणि कालान्तरानें ही सगळी विझतातहि. परंतु आत्मज्योति ही अशी नाही. तें निरिन्धन निरिद्ध वा अज्वालित तेज आहे, जे कधीच विझत नाही "न तद् भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः" ती स्वयंप्रकाश आत्मज्योति सूर्य चंद्र अग्नि यांनी प्रकाशित होत नाही तर आकाशगत सूर्यादि तेजें अन्तरिक्षमत चन्द्र-विद्युतादि तेज आणि भूलोकींची दीप-प्रदीपाव भौम तेजें त्या आत्मज्योतीच्या प्रकाशानें प्रकाशित होत आहेत ः "तस्य भासा सर्वमिदं विभाति". सर्व ज्ञान ज्याच्या योगें होतें तो जो ज्ञाता, तो जो उपलब्धा तोच ज्योति होय. त्या ज्योतीनें हे सारे जग पेटलें आहे. "तेजोभिरापूर्य जगत् समग्रं भासस् तवोग्राः प्रतपन्ति विष्णो' असें जें अर्जुनानें म्हटले आहे तें ह्याच ज्योतीला उद्देशून. सर्व दिशा सर्व काल सर्व वस्तु या चिदग्नींत जणूं पेटून उठल्या आहेत. त्या जणूं सारख्या जळत आहेत. पाजळत आहेत. विश्ववणवा पेटवून ती मौज पाहणारा जो परमात्मा तोच ज्योतिबा होय. त्याचें तें विश्वरूप आम्हांला अनाकलनीय व असह्य आहे. म्हणून आम्ही त्याला विनवितों. "अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे । तदेव मे दर्शय देव रूपं. प्रसीद देवेश जगन्निवास ॥ किरीटिनं गदिनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव । तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ त्या उग्र विश्वरूपाचें जें सौम्य चतुर्भुज रूप तें म्हणजे हा आमच्या घरी यज्ञकुंडांत मंदमंद हसणारा अग्नि होय. तोच ज्योति.

८७८. सुरुचि
सु शोभना रुचिः दीप्तिः यस्य सः सुरुचिः । शोभन आहे ज्याची रुचि म्हणजे दीप्ति तो म्हणावयाचा सुरुचि, अग्नि हा सप्तजिह्व म्हटला आहे. काळी निळी लाल पिवळीहिरवी ढवळी नि चित्रविचित्र अशी अग्नीची सप्तवर्णः ज्वाला आपण पाहतों. सूर्यकिरणांचा सप्तरंगी पिसारा इन्द्रधनुष्यहि आपल्या दृष्टीचे विलोभन होऊन बसले आहे. अशाच प्रकारे विजेच्या चमका नि चन्द्राच्या कलाहि आपलें मन हरण करून घेतात. प्रत्येक कलेची शोभा कांहीं न्यारीच असते, प्रत्येकीची चमक कांही औरच असते. अशा प्रकारें भौम दिव्य व आन्तरिक्ष तेजाचे हे आविर्भाव सुरुचि होत. ही भौतिक तेजें सुरुचि म्हणजे विरोचमान, अत्यन्त दीप्तिमन्त, आहेतच
परंतु ज्या तेजाची ही प्रकाशनें होत तें तेज सर्वांत सुरुचि होय. कारण तें अणुरेणंत विराजमान आहे. त्यानेच हे सर्व विश्व प्रकाशमान आहे. त्याची चमक कांहीं न्यारीच आहे. तें तेज सूर्याप्रमाणें दिवसांच वा चन्द्राप्रमाणें केवळ रात्रींच अथवा अग्नीप्रमाणें केवळ जवळच अथवा सूर्याप्रमाणें दूरच विरोचमान होणारें नाही. ते नित्य निरंतर नि अत्रतत्र सर्वत्र विरोचमान आहे. किंबहुना त्या तेजाच्या नाना वर्णाकृति म्हणजे हे विश्व होय. सिनेमाला चलच्चित्रपट म्हणतात. वास्तविक तो ज्वलच चित्रपट आहे. प्रकाशाच्या त्या चालत्या बोलत्या आकृति आमच्या समोरील पटफलकावर प्रक्षेपित होत असतात. विद्युत्-प्रवाह थांबला की त्यांचे अदर्शन होते. अर्थात प्रकाश-तरंगमयच त्या आहेत. त्याप्रमाणें हे सारें विश्व नानावर्णाकृति चिविलास मात्र होय. ज्या चिदग्नीचे हे सारे रंगतरंग तो सुरुचि म्हणावयाचा.

८७९. हुतभुक्
हुतं भुङ्क्ते इति हुतभुक् ।जो हवन केलेलें खातो तो म्हणावयाचा हुतभुक् । अग्नीत हवन होते म्हणून तो अग्नि हुतभुक् होय. यज्ञाग्नीत समिधा आणि होमद्रव्यांच्या आहुति होमिल्या जातात. हा बाह्य स्थूल अग्नि होय आणि ती होमद्रव्येहि स्थूलच होत. परंतु याहून एक वेगळा शारीर अग्नि आहे. त्या जठराग्नीतहि अन्नाच्या आहुति द्याव्या लागतात. हा आयुर्हाम आयुष्यभर चालत राहतो. यांत होमिली जाणारी अन्नेहि स्थूलच आहेत आणि ती परिमित आहेत. या स्थूल सूक्ष्म यज्ञाग्नीहून आणि जाठराग्नीहून वेगळा व आगळा एक. चिदग्नि आहे. त्यांत या साऱ्या विश्वाचा होम होत आहे. अग्नि हा सर्वभक्षक म्हटला जातो. पण तो वायूला जाळू शकत नाही, आकाशाला जाळू शकत नाही. पण अग्नि नुसता जाळणारा नाहीं, जाणणाराहि आहे. या जाणण्यालाच जाळणे वा भक्षिणे असें लक्षणेनें म्हटले जाते. आणि म्हणून त्याला 'जातवेदाः' म्हटले आहे. "जातमात्रं वेत्ति इति जातवेदाः" तो चिदग्निच असा जातवेदाः आहे. त्यालाच सर्वभक्षक म्हणावयाचे. · आणि तोच हुतभुक् आहे. त्यालाच अनुलक्षून गीतेंत म्हटले आहेः
भोक्तारं यज्ञ-तपसां सर्वलोक-महेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ गीता ५ - २९

देहें प्राणें मनें जें कांही आम्ही करतों तें सर्व या चिदग्नींतच होमिलें जातें. ते सर्व तप त्याच्याच साठी होत असते. जाग्रत्स्वप्नसुषुप्ति या तिन्ही लोकांचा तो महेश्वर आहे. अध्यक्ष आहे. तो सर्व भूतांचा समान सुहृत् म्हणजे सर्वांचे समान भलें इच्छिणारा आहे. त्याला जाणल्यानेच शान्तिलाभ होतो. मुळाला पाणी दिले म्हणजे सर्व झाड तुष्ट पुष्ट होते. त्याप्रमाणें या हुतभुक् परमात्म्याचे यजन केलें म्हणजे सारे विश्व यजिलें जातें. सर्वजग त्याचेच हवन करीत असते. पण त्याची जाणीव त्याला नाही.

८८०. विभु
विभववान् भवति इति विभुः | जो विभवशाली होय तो विभु म्हणावयाचा. जीव नि जगत् ही उपाधिविशिष्ट आहेत. म्हणून ती एकदेशी होत. परमात्मा हा निरुपाधि असल्यामुळे तो विभु म्हणजे सर्वव्यापी आहे. जीव विशिष्ट अभिमान बाळगून संकुचित झाला आहे. परंतु ज्यानें असा कुठलाच अभिमान वा अहंकार बाळगला नाही त्याला मर्यादा कुठली ? घराला चार भिंती आहेत, वर छप्पर आहे खाली जमीन आहे म्हणून ते घर म्हटलें जाते. त्याच्या ह्या मर्यादा आहेत, परिसीमा आहेत. त्यामुळे त्याला लांबी रुंदी खोली आहे. मोजमाप आहे. परंतु जिथें ही उपाधि नाहीं त्या आकाशाला भिंती नाहीत, परिमिति नाही. तें असीम आहे, अपार आहे. त्याच्या वैभवाला पारावार नाही. म्हणून तें विभु म्हटले जाते. घटाका नि मठाकाश असा त्याचा तुकड़ा पडत नाही. तें घट. मठांच्या आंत बाहेर अखंड एकच एक संच आहे. परमात्माहि तसाच आहे " तो एकवर एकला । रचला ना वेंचला| आदि-अंतीं संचल अनन्तपणें । " असें ज्ञानदेवानें त्या परमात्म्याचे विभुन्द वर्णिलें आहे. आकाश तत्त्वच विभु आहे असे नाही. अग्नि तत्त्वहि तसेंच आहे. आणि इस "हुतभुक् विभुः" असा अनुक्रम असल्यामुळे वि. पदानें अग्निवत् विभुत्व अभिप्रेत आहे, असे म्हणावया उपनिषदांत म्हटलेच आहेः
अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च ।
एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च ॥

हे विश्व म्हणजे त्या चिदग्नीचा प्रकाश होय. या विविध तेजोमूतींतून आत बाहेर तो एकच एक तेजोमय प्रभु संचला आहे. तोच सर्वव्यापकत्वामुळे विभु म्हटला आहे.

८८१. रवि
पूर्वार्धात अग्निस्वरूप तेजाचा प्रामुख्यानें विचार आला आहे. इथून पुढे उत्तरार्धात सूर्यरूप तेजाच विचार होत आहे. "रविर् विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः"रौति रावयति इति रविः जो रव करत रव करायला लावतो, तो रवि म्हणावयाचा. 'मित्र जनान् यातयति वाणः' अशी श्रुति प्रसिद्धच आहे तो जगन्-मित्र सूर्य पूर्वाचलावर येऊन जणूं सः लोकांना हाका मारतो. उठा, जागे व्हा, आप आपल्या कर्तव्यास लागा, असेंच जणूं तो उच्च रवा सांगत सांगत फिरत असतो, (आपले कर्तव्य करी असतो) आणि फिरत फिरत सांगत असत सूर्योदयाबरोबर सारे जग जागे होते आणि त्या बोलणे चालणे सुरू होते, हे आपण प्रत्यहीं पाहतच आहों. त्यामुळे तो उघडच रवि आहे. हांकारे करणारा आहे आणि हांकारे करवणाराहि आहे. सूर्योदयाबरोबर दिशा फांकतात, वारा वाहूं लागतो, जळें प्रसन्न होतात, झाडांची पानें उघडतात, फुले उमलतात. पक्षी किलबिल करू लागतात. गाई गुरे हंबरतात, सारे जग जगू लागते. "सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च" सूर्य हा या चर व अचर सृष्टीचा प्राण होय, हे दर्शन सूर्योदयाबरोबर आपल्याला होतें. पण हा रवि म्हणजे बोलका बोलतांना तर काहीं दिसत नाही मग तो रवि कसा ? जो जितका वरचा अधिकारी तितकी त्याची क्रिया सूक्ष्म आणि कर्म म्हणजे क्रियाफळ मोठे असे आपण जगांत पाहतों. साधा शिपाई आरडा-ओरडा करतो, धावपळ करतो. त्याचा वरिष्ठ नायक त्याला हलकेच तोंडी हुकूम देतो. त्याचाहि वरिष्ठ दलपति त्याला लेखी आज्ञा देतो. त्याचाहि वरिष्ठ सेनापति योजना करतो. प्रधानमंडळ कार्यनिश्चय करतें. राजा संकल्प मात्र करतो. अशा प्रकारें वरवर क्रिया सूक्ष्म व कार्यक्षमता तीव्र होत गेलेली आपण पाहूतों. परमात्म-शक्तीच्या बाबतींत हे किती तरी पटीनें अधिक लागू आहे. म्हणून रवीला हांकारे करण्याची गरजच नाही. तो नुसता येतो आहे असें कळलें की कार्य होते. बाहेर जसा तो रवि आहे तसा तो अंतरांतहि आहे. त्याचा तो आदेश गांधीसारखे महात्मे ऐकतात.

८८२. विरोचन
विशेषेण रोचते इति विरोचनः ।जो सर्वातिरिक्त तेजानें तळपतो तो म्हणावयाचा विरोचन. जितके ग्रह तारका नक्षत्रादि तेजःपुंज आपण पाहतो त्या सर्वांत सूर्य हा अतिशय देदीप्यमान आहे. म्हणून तो विरोचन म्हणावयाचा. एकच व्यक्ति असते, पणतिला अनेक नातीं संभवतात. ती पुत्र, पति, पिता, भ्राता, काका, मामा इत्यादि नात्यांनी नाना परी संबोधिली जाते. त्याचप्रमाणें तो परमात्मा आणि त्याचे आविर्भावहि. तो विश्वान्तर्यामी परमात्मा सूर्यरूपानें जगाला जागवितो म्हणून तो रवि म्हटला आहे. तो परमात्मा अंतर्यामीरूपानें प्रत्येक जीवाला सदसत् निवडून सांगत असतो. म्हणूनहि तो रवि होय. हे पाप आहे, हे करूं नको. हे पुण्य आहे, हे कर, असें तो प्रत्येक जीवाला सांगत असतो. हा अति सूक्ष्म आवाज कोणीहि बंद करूं शकत नाही. तो परमात्मा हा असा बोलका आहे म्हणून तो रवि म्हटला आहे. तसा तो परम प्रकाशक आहे म्हणून तो विरोचन होय. सूर्य दिवसां तळपतो पण रात्री तो मावळलेला असतो. रात्री चंद्र आपली चंद्रिका पसरवून राज्य करीत असतो, पण दिवसां तो निस्तेज होतो. परंतु परमात्म-तेजाला अशी दिवस रात्र ठाऊकच नाही. तो सदैव तळपतच आहे. अहोरात्र निरंतर तोच एक' तळपतो आहे. म्हणून तो म्हणावयाचा विरोचन. जितकी तेजें आहेत त्या सर्वांना उदयास्त आहेत, कलाक्षयवृद्धि आहे परंतु आत्मतेज हे असें आहे की त्याला चयापचय नाहीं, उदयास्त नाही. तें नित्य परिपूर्ण आणि निरन्तर प्रकाशमान आहे. म्हणूनच त्याला विरोचन म्हणावयाचे. बालसूर्य रवि आहे, तर प्रौढसूर्य विरोचन होय. म्हणून लागोपाठ रवि व विरोचन ही पदें आली आहेत.

८८३. सूर्य
(सूतेः सुवतेर् वा सूर्य शब्दो निपात्यते)

सूर्यति इति सूर्यः । जो जगाला प्रेरणा देतो तो सूर्य म्हणावयाचा. जगाच्या या प्रचंड यंत्राला कोण बरें चालना देत आहे ? कोणती बरे ती प्रेरक शक्ति आहे ? कोळसा तेल वायु वीज हे एकापेक्षा एक तरल विरल आणि अक्षय असे शक्तिस्रोत आहेत. दगडी कोळशाचें भांडार अद्याप कैक दशके पुरण्या इतके असले तरी हळू हळू ते संपुष्टांत येणार. तेलाचेंहि तसेंच. रॉकेल पेट्रोल इत्यादि खनिज तेलें जरी भरपूर असली, त्यांची नवी नवी भांडारें म्हणजे विहिरी सांपडत असल्या, तरी त्याहि कालान्तरानें आटणारच. इन्धन-वायु म्हणजे गॅसहि तसाच विपुल असला तरी तो सांठवू न ठेवता येत नाही. बराचसा तर उडूनच जातो. वीजहि हवी तितकी निर्मितां येत असली आणि तिचा साठा करून ठेवण्याचा प्रश्न नाहीं तरी तिची निर्मिति सुलभ नाही. परंतु या सर्व शक्तिस्रोतांचा मूल स्रोत सूर्य-शक्तिच आहे. सूर्याच्या ठाई जे अणुस्फोटन प्रतिक्षण होत आहे त्या पासून या सूर्यमालेतील सर्व ग्रहोपग्रहांना शक्तीचा पुरवठा होत आहे. हा सूर्यरूप मूल शक्तिस्रोतहि कधी तरी आटणारच आहे पण तो कल्पान्त मानवाच्या कल्पनेलाहि सुदूरच आहे. त्यामुळे सूर्यशक्ति अनन्त आहे असे म्हणायला हरकत नाही. या अनन्त आणि अपरिमित शक्तीनें हे विश्वचक्र चाललेलें आहे. आमचे विश्वचक्र म्हणजे आमची ही सूर्यमाला. इतर मालेचे आम्हांला तादृश ज्ञान नाही. म्हणून हा जो या ग्रहमालेचा चालक सूर्य तोच आमचा चालक म्हणावयाचा. त्याला अनुकूल में जीवन तेंच सफळ होणार. म्हणून सूर्योपासना हाच आमचा धर्म. सूर्योपासना म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे नव्हे, तर सूर्यशक्तीचा अधिकांत अधिक लाभ करून घेणे होय. जो रात्री जागून दिवसां झोप काढतो तो सूर्यशक्तीच्या विरुद्ध वागतो. निसर्गाच्या विरुद्ध वागतो. असा प्रतिकूल व्यवहार व्यक्तीच्या समाजाच्या आणि त्यांच्याहिताच्या नाशास च कारण होतो. सर्व अनर्थांचे मूळ हा अधर्म म्हणजे सूर्योपासनेची अनास्था च होय. सूर्य भौतिक आणि त्याची उपासनाहि भौतिक म्हणूं नये. कारण या भौतिकतेच्या मुळाशी अतिभौतिक आहे. तेंच पुढील नामांत सविता म्हणून संबोधिलें आहे.

८८४. सविता
बाह्य विश्वांत जो सूर्य म्हणविला तोच अन्तर्विश्वांत सविता म्हटला आहे. ब्रह्माण्डाची चालना सौर शक्ति करते तर पिण्डाची चालना- सवितृ-शक्ति करते. आणि नीट पाहिलें म्हणजे लक्षात येते की पिंड नि ब्रह्मांड आणि त्यांच्या चालक शक्ति सविता नि सूर्य ह्या तत्त्वतः एकच आहेत. देह नि विश्व ह्या त्यांच्या बाह्य उपाधि तेवढ्या भिन्न आहेत. त्याहि भिन्न आकारानेच. प्रकारानें त्याहि एकराशिच आहेत, पांचभौतिक आहेत. दोहोंच्याहि ठाई चालक तत्त्व एकच आहे. तें अतिभौतिक तात्त्व आध्यात्मिक आहे. ह्या अतिभौतिक आध्यात्मिक चालक तत्त्वाचंच आम्ही, गायत्रीमंत्रांत आवाहन करीत असतो. "तत् सवितुर्वरेण्यम् । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ " त्या सवितृ-देवाचें तें वरेण्य तेज आपण ध्याऊं या. अशा साठी की तेणेकरून आपल्या सगळ्या बुद्धिशक्ति प्रचोदित व्हाव्यात, संजीवित व्हाव्यात. पिण्डांत आणि ब्रह्माण्डांत कार्यासाठी जी शक्ति लागते ती ज्याच्या पासून येते त्या मूळ शक्तिस्रोताला जो विसरतो तो आत्मघात करून घेतो.. अशांनाच उपनिषदांनी "आत्महनः' म्हटले आहे. हे तेजोविमुख लोक अन्धतमांत जाऊन पडतात अशी त्यांची गति वर्णिली असून त्यांना असूर्य म्हणजे असर्य म्हटले आहे. त्याचेच तिसरे रूप आहे असुर.
असुर्या नाम ते लोकाः अन्धेन तमसाऽवृताः ।
तांस ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥

या असुरांचा दैत्यांशी नि राक्षसांशी काही संबंध नाही. जे सूर्योपासक ते सुर, जे दिव्योपासक ते देव. जे तसे नव्हेत ते असुर, अदेव. हा अध्यात्मयोग सूर्याला परमात्म्यापासून अवगत झाला आणि त्याच्यापासून तो जगांत प्रसार पावला, मानवी प्रजेंत प्रसृत झाला आहे, असें गीतेंत म्हटले आहे. त्याचा आशय हाच की भौतिक तेजहि आध्यात्मिक तेजाचाच प्रकाश होय, जडाचे मूल चेतन होय. चेतनापासूनच हे सारें चराचर वा जडाजड जगत् प्रसवलें आहे, म्हणून त्या चेतनाला म्हणावयाचें सविता.

८८५. रविलोचन
रविर् लोचनं यस्य सः रविलोचनः । रवि म्हणजे सूर्य हा ज्याचा डोळा आहे, तो म्हणावयाचा रविलोचन. " अग्निर्मूर्धा, चक्षुषी चन्द्रसूर्यो" अशी श्रुति आहे. अग्नि हे त्या परमात्म्याचे मुख असून चन्द्र व सूर्य हे त्याचे नेत्र होत. सूर्याला नेत्राची पदवी दिली याचे कारण काय ? कारण की तो परमात्मा सर्वसाक्षी आहे. त्याचे हे सर्वसाक्षित्व या जगांत उत्कटत्वानें सूर्याच्या ठाईं दिसून येते. तो या त्रिभुवनाला, भूमि अन्तरिक्ष आणि आकाश यांना, प्रकाशित करतो.
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकं इमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ गीता १३ -३३

असें गीतेत स्पष्टच म्हटले आहे. म्हणजे क्षेत्रज्ञ परमात्म्याला रवीचीच उपमा दिली आहे. मोरोपंतांनीहि आपल्या केकावलींत परमात्मा हा सर्वसाक्षी रविलोचन आहे असे म्हटले आहे, त्याचेहि इथे सहज स्मरण होते. त्यांनी म्हटले आहे -' नसेन दिसलों कसा ? नयन सर्वसाक्षी रवि । ' परमात्मा हा सर्व शक्तिमान् आहे. त्याच्या त्या सर्वशक्तिमत्तेचे यथार्थ उपमान या जगांत सांपडणे शक्यच नाही. पण दिग्दर्शनापुरती सूर्यादि उपमानें घेतली जातात. एकटा सूर्य नेत्र म्हणावा तर तो दिवसांच पाहतो. पण परमात्मा तर रात्रंदिवस निरंतर साक्षी आहे. म्हणून श्रुतीनें 'चक्षुषी चन्द्र-सूर्यो म्हटले आहे. त्यांत केवळ डोळे दोन असतात म्हणून चन्द्र-सूर्य या दोन ज्योति उल्लेखिलेल्या नाहीत,
परमात्म्याचे सर्वसाक्षित्व एकट्या सूर्यानें द्योतित होत नाही म्हणून 'चक्षुषी चन्द्रसूर्यो' म्हटले आहे. सूर्य समग्र विश्वाला प्रकाशित करतो खरा, पण सर्व काळ दिवसांप्रमाणें रात्रीहि तो प्रकाशित करतो असें म्हणतां येत नाही. हे वैगुण्य दूर करण्यासाठी चन्द्रहि जोडीस दिला आहे. म्हणजे तो परमात्मा या समग्र स्थळाचा तसा तसा समग्र काळाचा साक्षी आहे. उपमा ही केव्हांहि एकदेशीच असणार. पण तिचा आशय व्यापक घ्यावयाचा. तसा तो घेतला म्हणजे रविलोचन म्हणजे सर्वसाक्षी सनातन साक्षी असा अभिप्राय लक्षात येतो.


अनन्तो हुतभुग्भोक्तासुखदो नैकजोऽग्रजः ।
अनिर्विण्णः सदामर्षी लोकाधिष्ठानमद्भुतः ॥९५॥


८८६. अनन्त
नास्ति अन्तः यस्य सः अनन्तः । देशतः आणि कालतः ज्याला अन्त नाहीं तो म्हणावयाचा अनन्त. परमात्मतत्त्व हे दिक् काल निमित इत्यादींनी अपरिच्छिन्न असल्यामुळे तें अनन्त होय. परमात्मतत्त्व हे मुलखावेगळे आहे. मुलखावेगळे म्हणजे लोक- विलक्षण. या लोकाचें जें जें लक्षण तें तें त्याला लागू होत नाही. त्याहून ते वेगळें च आहे. सान्तता वा अन्तवत्ता हे आहे जगाचें लक्षण, जगांत अशी कोणती वस्तु आहे की जिला स्थल कालाची बन्धनें नाहीत, जी कार्यकारण-भावानेंनिगडित नाहीं ? स्थल, काल आणि कार्यकारण भाव यांचे फलित म्हणजे हा संसार आहे. या त्रैगुण्यांतून मुक्त अशी एकहि वस्तु, लहान वा मोठी दाखवतां यावयाची नाहींः परंतु परमात्मतत्त्व याहून अगदी वेगळेच आहे. त्याला देशाचे बन्धन नाही. म्हणजे तें इथे आहे नि तिथे नाही असे म्हणतां यावयाचे नाही. त्याला कार्यकारण भावाचे बन्धन नाही. म्हणजे अमुक एका कारणापासून ते झालें वा त्यापासून अमुक एक कार्य झालें असें म्हणतां येत नाही. हे त्रिविध लक्षण ज्याला लागू होतें तें लहान वा मोठे सारें अन्तवत् आहे, सान्त आहे. परमात्मा तद्-विलक्षण असल्यामुळे तो अनन्त म्हणावयाचा.
"अनन्तश् चास्मि नागानाम् " म्हणून ज्या विभूतीचा उल्लेख गीतेनें केला आहे, जिच्या नांवानें अनन्तचतुर्दशी साजरी होते, ती विभूति अनन्तनागहि वस्तुतः या अनन्ताहून वेगळी नाही. या अनन्त आत्मतत्त्वाचें तें रूपकरण आहे. उपासनेसाठी कल्पिलेलें तें आलंबनमात्र आहे. कारण "दहवंतास अव्यक्ती सुखें बोध घडेचि ना " तळाशी अव्यक्त राहिले आहे म्हणून शेषानें हें विश्व धारण केले आहे अशी आणि असल्याच अन्य उत्प्रेक्षा कवींनी केल्या आहेत. त्यांचे तात्पर्य न समजल्यामुळे लोक भ्रांत झाले आहेत.

८८७. हुतभुक्
"हुतं भुङ्क्ते इति हुतभुक् यज्ञाग्निः" या व्युत्पत्तीनें मागील ९४ व्या श्लोकांत हुतभुक् पद येऊन गेलें आहे. इथे ते परत आले आहे तें "हुतं होमं भुनक्ति रक्षति इति हुतभुक् यज्ञ-गोप्ता" अशा व्युत्पतीनें घ्यावयाचे. रामानें धनुर्बाण धारण करून विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केलें. हे जैतिहासिक सत्यच नाही, तें आध्यात्मिक सत्यहि आहे. तो हृदयस्थ परमात्मा आमचे सत्य संकल्प तडीस नेत असतो. तो आम्हांला सत्य संकल्पांची प्रेरणा देतो, संकल्प-साधनेचे बळ देतो, आणि सिद्धि देऊन कृतकृत्यताहि तोच देतो. इतकें सर्व करणे म्हणजे हुतभुक्त्व होय, यज्ञ-रक्षण होय.
सर्व गोष्टींचें मूळ निजात्माच आहे. अग्नीपासून जसे स्फुलिंग निघतात त्या प्रमाणें आत्मशक्तीपासून सर्व संकल्प उठत असतात. हे संकल्प टिकून राहतात आणि शेवटीं सफळ होऊन कृतकृत्य होतात. या सर्वांमागील धारक आणि पोषक शक्ति तो आत्माच असतो. तो आत्मा आत्मदर्शनावधि सक्रिय राहतो. हे आत्मदर्शन नित्यनवें होत राहते, त्याला अन्तच नाही. अन्त नाही याचे कारण आत्मशक्ति ही स्वतःच अनन्त आहे. अमुक एक दर्शन अन्तिम आहे असे म्हणतांच येत नाही. त्यामुळे आत्मदर्शन होऊन होतच राहणारे आहे.. गंगा सागराला मिळूनहि प्रतिक्षण मिळतच आहे. आत्मशक्ति अचिन्त्य आहे. त्या शक्तीचे दर्शन तिच्या कार्यावरून होते. पण अमुक एक कार्य अन्तिम, अमुक एक पराक्रम चरम असें म्हणतांच येत नाही. जे एकाला शक्य झाले नाही ते दुसरा करून दाखवितो आहे. अशा प्रकारें आत्मदर्शनाची ही प्रेरणा आणि सफलता निरन्त आहे, अनन्त आहे. रडारची कल्पना आजवर मानवाला नव्हती. पण जी मानवाला ठाऊक नव्हती ती वटवाघळाला अनादि कालापासून अवगत आहे आणि तदनुसार त्याचा संचार अप्रतिहत चालू आहे. अशा प्रकारें आत्मदर्शनाची इच्छा आणि दर्शनें अनन्तच आहेत. हे जें हुत आहे, हा जो जीवनयज्ञ आहे त्याचे रक्षण तो परमात्मा करीत आहे. म्हणून तो म्हटला आहे हुतभुक्.

८८८. भोक्ता
परमात्मा हा हुतभुक् म्हणजे.यज्ञगोप्ताच नाहीं नुसता, तर तो यज्ञभोक्ताहि आहे. वेदाभ्यास, तप, दान, यज्ञ यांच्या रूपानें होणारी जी सगळी साधना ती अखेर कोणाला पोंचते ? सगळ्या नद्या जशा अखेर समुद्रालाच मिळायच्या तशा सगळ्या साधना अखेर आत्मदेवाला च पावायच्या. त्यांना अन्य गति नाही. असे असल्यामुळे तो परमात्मा भोक्ता म्हटला आहे. सर्व धर्मकर्माचे फळ त्यालाच समर्पित होते. सर्व मार्ग जसे शेवटी मुक्कामाला च पोचायचे, तसे सर्व उद्योग त्यालाच प्राप्त व्हायचे आहेत. म्हणून तो परमात्मा या सर्व साधनांचा भोक्ता म्हटला आहे. गीतेत म्हटलेच आहे
भोक्तारं यज्ञ-तपसां सर्वलोक-महेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ गीता ५ - २९

तिथेच पुनः स्पष्ट आदेशहि दिला आहे
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥गीता ९ - २७

कायिक वाचिक मानसिक जी कोणती लहान मोठी क्रिया आम्ही करूं ती सर्व परमेश्वराला समावयाची आहे. तिचा भोक्ता तो परमात्मा आहे. याचे स्वच्छ भान जर आम्हांला राहिले तर आमच्या हातून अनुचित गोष्ट कधी तरी घडेल का ? आमच्या मनोवृत्तींचाहि तो परमात्मा साक्षी आहे, म्हणजे भोक्ता आहे हे जर आमच्या पक्कें लक्षात राहिले तर मग आम्ही कोणाविषयी दुर्भावना दुर्वासना कशी राखू ? असत् संकल्प कसा करूं ? परमात्मा हा भोक्ता म्हटल्यानंतर कोणत्याहि कर्मफळाची अभिलाषा आपण बाळगणे म्हणजे त्या कर्मफळाचा भोक्ता होऊं पाहणे होय. याचा गीतेनें निषेध केला आहे
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गो ऽस्त्वकर्मणि ॥ गीता २ - ४७


८८९. सुखद (अ-सुख-दः)
सुखं ददाति इति सुखदः । अथवा असुखं द्यति खण्डयति इति असुखदः ॥ जो सुख देतो तो सुखद म्हणावयाचा. हे पद "असुखदः' असेंहि घेतलें तरी अर्थ तोच. जो असुख खंडितो तो असुखद म्हणावयाचा. असुख म्हणजे दुःख हे सहज आहे, सुख प्रयत्नसाध्य आहे असे मानले जाते. दुःखासाठी कोणीहि जीव प्रयत्न करीत नाहीं सर्व जीव सुखासाठीच झटत असतात. परंतु वस्तुतः सुखासाठी झटण्याची गरज नाही. कारण सुख हा जीवाचा स्वभावच आहे. तें सहज आहे. झटायचें तें दुःखनिवारणासाठी. त्यालाच सुखाचा उद्योग म्हटलें जातें. पण हा विपर्यासच नव्हे काय ? म्हणून च म्हटले आहे "प्रतीकारं व्याधेः सुखमिति विपर्यस्यति जनः । " परमात्मा हा सुखद आहे याचा अर्थ तो सुखरूपच आहे.. जसजसा जीव अतत्त्याग करीत जातो तसतसे त्याला सुख होत जाते. संपूर्ण अतत्त्याग, संपूर्ण अनात्म-त्याग म्हणजेच पूर्ण सुख. असें सुख हे सहज आहे, स्वाभाविक आहे, किंबहुना स्वरूपच आहे. आणि असे असल्यामुळे तो परमात्मा सुखद म्हटला आहे.
परमात्मा हा स्वभक्तजन-सुखद आहे असेंहि सहजच म्हणता येईल. "न मे भक्तः प्रणश्यति' अशी त्याची प्रतिज्ञाच आहे. आणि त्यांत नवल कसलें ? जो अग्नीच्या जितका जवळ राहील तितका त्याचा अंधकार, त्याचें शीत आणि भय अधिक दूर होईल हे उघडच आहे. त्याप्रमाणें जो परमात्म्याचा जितका आश्रय घेईल, जितका त्याच्या संनिध राहील तितका तो अधिक सुखी होईल. हे सांगायला का पाहिजे ?
परमात्मा हा स्वभक्तजन-सुखद आहे. तसा तो अभक्तजन-असुखदहि आहे. जो अग्नीची अभक्ति करील, त्याच्यापासून दूर राहील, त्याला अंधकार शीत आणि भय यांची बाधा ही होणारच. त्याप्रमाणें जो परमात्मापासून दूर दूर जाईल, त्याची अभक्ति करील त्याला दुःख हे ठेवलेलेच आहे. अशा प्रकारें तो परमात्मा असुख-दहि आहे. असा एकूण तीन प्रकारे हा शब्द लावतां येतो. सुख-द, असुख-द (द्यति) आणि असुख-द. सुखद पदहि असुख-द पदाप्रमाणें द्विविध लावल्यास 'सुखं द्यति अभक्तानां वैभवं क्षिणोति इति सुखदः' चवथा प्रकार होईल. हे सर्वच अर्थ त्या परमात्म्याला लागू आहेत. कारण, तुकारामानें म्हटल्याप्रमाणें 'जें जें बोला तें तें साजे या विठ्ठला'.

८९०. नैकज
न एकजः अनेकजः । अनेकजः चे च दुसरें रूप नैकजः. अनेक हा नञ समास आहे खरा,पण त्यांत एकाचा निषेध तितका नाहीं जितका बहुत्वाचा बोध आहे. नैक पदांत बहुत्वाचा तितका बोध नाहीं जितका कोणा एकाचा निषेध आहे.
परमात्मा हा नैकज आहे म्हणजे तो कोणा एका पासून वसुदेवापासून झाला आहे असे म्हणतां येत नाही. याचा अर्थ तो अनेकांपासून झाला आहे असें नव्हे, तर तो स्वयंभू आहे असा समजावयाचा. तो एकाहि पासून झालेला नव्हे, म्हणून नैकज.
अथवा नैकज म्हणजे अमुक एका पासून झालेला म्हणतां येत नाही. त्याच्या संभवाला अनेकांचे किती एकांचे साहाय्य झालेले आहे असा अर्थ. दत्तात्रेयानें चोवीस गुरु केले होते. त्यांच्यापासून त्याला ज्ञान झालें. तसें परमात्म्याचे ज्ञान कोणा एकाच पासून होईल असें नाही. त्यासाठी अनेकांचे पाय धरावे लागतात. शास्त्र गुरु आणि आत्मा यांच्या द्वारा तें ज्ञान प्राप्त होते. शास्त्रांत आधी त्या परमात्म्याचे ज्ञान मिळते. पण त्या शास्त्रज्ञानांत परोक्षता आहे. त्यांत कांहीं संशय आणि अनिश्चयहि राहूं शकतो. तो संशय आणि अनिश्चय 'गुरुमुखानें जातो.. अनुभवीगुरूच्या शब्दांत जिवंतपणा असतो, प्रत्यक्षता असते. पण ही प्रत्यक्षताहि स्वानुभूतीहून वेगळीच राहते. जेव्हां मनुष्याला त्या गोष्टीचा स्वानुभव येतो, तेव्हांच त्याला पूर्ण ज्ञान होते. म्हणून परमात्मा म्हणजे त्याचे ज्ञान, हे नैकज म्हणावयाचे. शास्त्रावरून कळलें गूळ गोड असतो. गुरूनें सांगितलें खा. मी तो खाल्ला, तेव्हा मला पूर्ण व पक्कें ज्ञान झालें. हाच नैकज. हेच विज्ञान,

८९१. अग्रज
अग्रे जायते इति अग्रजः । अग्रज म्हणजे सर्वांच्या आधीं जन्मलेला. मागाहून झालेला तो अवरज म्हणावयाचा. जो पाठचा असतो त्याला म्हणावयाचे अनुज. असे हे तीन शब्द आहेत-अग्रज अवरज आणि अनुज, राम हा अग्रज होता. अग्रजालाच पूर्वज असेंहि म्हटले जाते. पण अग्रज आणि पूर्वज यांतहि सूक्ष्म भेद आहे. अग्रज म्हणजे लगेच आधींचा, आणि पूर्वज म्हणजे आधींचा खरा पण मध्यंतरी इतरहि आणखी कोणी होऊन गेलेला असला, एकाधिक अंतर असले म्हणजे मग तो पूर्वज म्हणावयाचा. रामाचे सगळे भाऊ रामाला अवरज आहेत. परंतु भरताला राम हा अग्रज आहे तर लक्ष्मण-शत्रुघ्नांना तो पूर्वज आहे. रामाला भरत, भरतांला लक्ष्मण आणि लक्ष्मणाला शत्रुघ्न अनुज होय. रामाला अनुज एकटा भरत, तर अवरज लक्ष्मण-शत्रुघ्न होत. म्हणजे तीन औवजी चार शब्द आहेत हे ः अग्रज आणि पूर्वज, अनुज आणि अवरज. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्र ही चारी त्यांची उदाहरणे होत. राम भरताग्रज पण लक्ष्मण-पूर्वज. भरत रामानुज पण लक्ष्मण शत्रुघ्न रामावरज. ह्या दृष्टीनें पाहतां "बोध्यं रामानुजयोर् दृष्टान्तेन" या साम्यसूत्रांतील रामानुजयोः हे पद किंचित् सदोष म्हणावे लागेल. भरत रामानुज आहे पण लक्ष्मण रामावरज आहे. दोघांना अवरज पद लावतां येईल, पण अनुजपद लावणे प्रशस्त म्हणतां येणार नाही. म्हणून रामानुजयोः ऐवजी रामावरजयोः असा सुधार सुचतो. परमात्मा हा सृष्टिपूर्वज आहे पण तो जीवाग्रज आहे. परमात्मा कांहीं आमचा पिता नाही. तो आमचा भ्राताच आहे. ज्या चैतन्याचा तो झाला आहे. त्याच चैतन्याचे आम्हीहि झालो आहों. तो आमचा वडील भाऊ आहे. आम्ही त्याच्या पाठचे आहों. पाठचे एवढ्याच साठी म्हणावयाचें की तो अनादि आणि अनंत आहे. तो निरुपाधि आहे आम्ही सोपाधिक म्हणून सादि सान्त. आणि म्हणूनच पाठचे. आणि आम्ही पाठचे म्हणूनच तो अग्रज म्हणावयाचा. एरव्हीं तो ना अग्रज ना अनुज ना पूर्वज ना अवरज. वस्तुतः तो तर अजच आहे.

८९२. अनिर्विण्ण
न निर्विण्णः अनिर्विण्णः । ज्याला निर्वेद प्राप्त झाला आहे तो म्हणावयाचा निरविण्ण. जो निरविण्ण नव्हे तो अनिर्विण्ण होय. पण निर्वेद म्हणजे काय ? हा एक फार मार्मिक शब्द आहे. श्लिष्ट शब्द आहे. उपनिषदांत आणि गीतेंत तो आला आहे. "ब्राह्मणो निर्वेदं आयात्, नास्ति अकृतः कतेन" उपनिषद्. "तदा गन्तासि निरवेदं श्रोतव्यस्य श्रुतस्यच' गीता. वेदांत नाना सकाम कर्में सांगितली आहेत, यज्ञ सांगितले आहेत. अर्थात हे जे सगळे सकाम कर्मकाण्ड त्याचंच नांव वेद होय. या वेदांतून सुटायला उपनिषदें गीता सांगत आहेतः
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ गीता २ - ४५

सारांश, त्रैगुण्यांतून सुटणे, संसारांतून सुटणे याचे नांव निर्वेद होय. हे केव्हां होतें ? जेव्हां ऐहिक आणि आमुष्मिक भोगांचें कांहीं कौतुक उरत नाहीं तेव्हां. हा कौतुकाभाव ही वितृष्णता, ही समता म्हणजे निर्वेद होय.
यावन् अर्थ उदपानें सर्वतःसंप्लुतोदके ।
तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ गीता २ - ४६

विज्ञानी ब्रह्मवेत्याला वेदांचे काय प्रयोजन ? नदीच्या पात्रांत सर्वत्र पाणीच पाणी झाले असतांना झिऱ्याचे काय काम ? अशा या सर्वत्र आणि सदैव समाधान पावलेल्या पुरुषाला कोणत्या गोष्टीचे कौतुक वाटायचे आहे. यालाच म्हणतात निरविण्ण. परंतु निर्विण्ण तो होणार ज्याला आधी सांसारिक गोष्टींचे कौतुक असेल. परमात्म्याला असेंहि कौतुक केव्हांच वाटले नाही. म्हणून तो अनिर्विण्ण म्हणावयाचा. जो जेवून ढेकर देत आहे त्याच्या तोंडाला पंचपक्वान्नांचे ताटहि पाहून पाणी सुटावयाचें नाही, मग आंबील पाहून कुठून सुटणार ? परमात्मा हा सदैव पूर्णकामच आहे. म्हणून तो अनिर्विण्ण होय. त्याला निर्वेद काय असतो तें माहीतच नाही.

८९३. सदामर्षी
सतः साधून् आमृष्यते क्षमते यः स सदामर्षी | सदा नित्यं मृष्यते इति वा सदामर्षी । अथवा न मृष्यते इति अमर्षी; सदैव अमर्षी सदामर्षी । मष धात दोन अर्थांनी येतो. एक अर्थ क्षमा करणे, दुसरा अर्थ धुणे, स्वच्छ करणे. पैकी पहिल्या अर्थी तो कमीच येतो आणि पुष्कळदा तर तो अकरणरूपानेंच असतो. उदाहरणार्थ "अमर्षशून्येन जनस्य जन्तुना न जातहार्दैन न विद्विषादरः । " या प्रसिद्ध वचनांत तो तसा आला आहे. दुसऱ्या अर्थाचे उदाहरण "अघ-मर्षण' हे प्रसिद्ध सूक्तनाम आहे. अघमर्षण सूक्त म्हणजे पाप धुऊन टाकणारे सूक्त. परमात्मा हा सज्जनांना क्षमा करीत असतो. त्यांना सहन करीत असतो. कारण त्यांच्या हातून चुका, अपराध, पापे झाली तरी ती हेतुपुरःसर नाहीत, अजाणतां होतात. ती झाल्याचे समजल्यावर त्याबद्दल ते पश्चात्ताप करतात. त्या बद्दल प्रायश्चित्त करतात आणि अनेक सत्कर्में करून त्यांची निष्कृति करतात. त्यामुळे परमात्मा त्यांना क्षमा करतो.
परमात्मा हा सज्जनांनाच क्षमा करतो, कारण सज्जन ईश्वर-कार्य करीत असतात. जगाची स्थिति हे ईश्वरी कार्य आहे. जग चालावें या साठी आवश्यक असलेली वृत्ति विचार, आणि वर्तन ईश्वराला आवडते. तेंच सज्जनत्व होय.
पण सज्जनांच्या रक्षणासाठींच दुर्जनांचे पारिपत्य करणे आवश्यकच आहे. म्हणून ईश्वर तेहि करीत असतो. त्यामुळे तो सदा अमर्षी आहे. तो दुर्जनता क्षणभरहि सहन करीत नाही. क्रियेची प्रतिक्रिया तत्काळ होतच असते. चांगल्याची चांगली वाइटाची वाईट, अशा प्रकारे जरी ईश्वर सज्जनांना क्षमावन्त व दुर्जनांना शास्ता वाटला तरी वस्ततःतो या निग्रहानुग्रहाहून पर आहे. हा निग्रहानुग्रह ज्याचा तोच करून घेत आहे. म्हणून तो परमात्मा वैषम्य-नैपुण्य दोषांतून मुक्त आहे. तो सर्वत्र सम आहे, सर्वत्र क्षमाशीलच आहे. तो सज्जनासज्जनांवर समानच वृष्टि करतो. सर्वांचे पापपुण्य समान धुऊन टाकतो म्हणून तो म्हणावयाचा सदामर्षी ।

८९४. लोकाधिष्ठान
लोकानां अधिष्ठानं अधिकरणम् लोकाधिष्ठानम् । परमात्मा हा या विश्वाचे अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे आधार भूमि. हा आधार त्रिविध आहे. दिक् काल आणि निमित्त. कोणतीहि वस्तु घ्या तिला या तिहींचा आधार हवाच. त्या शिवाय ती असूंच शकत नाही. कोणत्या तरी काळी, कोणत्या तरी स्थळी आणि कोणत्या तरी कारणापासून ती झालेली असते. हा त्रिविध आधार त्या परमात्म्याच्या ठाई एकवटला आहे. तोच अव्यक्त अक्षर परमात्मा सर्व निमित्त आहे, तोच काळ आहे आणि तोच दिशा आहे. त्या अव्यक्त नि अक्षर तत्त्वाच्या ठाईं हा विश्वाकार, हे सगळे चतुर्दश लोक अधिष्ठित आहेत. म्हणून त्याला म्हणतात विश्वाधार, म्हणून त्याला म्हणतात लोकाधिष्ठान, भागवतांत परमेश्वराचें हे लोकाधिष्ठानत्व व्यक्त करण्यासाठी विश्वरूपाचें वर्णन करतांना त्याच्या तळपायाच्या ठाईं अमुक लोक आहे आणि शीर्षाच्या ठाईं अमुक आहे अशी चतुर्दश लोकांची कल्पना केली आहे. कुठे ती सप्त लोकांची व कुठे त्रिलोकांची केलेली आढळते. भीष्मस्तवराजांतहि तशी ती आली आहे, ज्याचें तात्पर्य विनोबांनी मराठीत नमोदशकांत संगृहीत केलें आहे.. ' शिरीं शृंगारला स्वर्ग उरी आकाश मोकळे । पदीं पैसावली पृथ्वी लोकरूपास त्या नमो ॥
हा व्या विश्वाकार म्हणजे अव्यक्ताक्षर परमात्म्याची मूर्ति होय. आणि मूर्ति म्हटली म्हणजे तिला नाना अवयव आलेच. विश्वरूपाचे ते अवयव लोक रूपानेच वर्णावे लागतात. म्हणून तो परमात्मा लोकाधिष्ठान म्हटला आहे. निरगुणापेक्षेनें इथे नपुंसक लिंग आले आहे. अथवा छन्दोनुरोधानें. नाहीतर सदर पद लोकाधिष्ठानः असें पुंल्लिंग आले असतें.

८९५. अद्‌भुत
परमात्मा हा एका बाजूनें लोकाधिष्ठान म्हटला असला तरी तो त्यासर्व लोकांहून अगदी वेगळाच आहे. म्हणून तो अद्‌भुत होय, लोक-विलक्षण होय. लोकांचे कोणतेंहि लक्षण त्याला लागू होत नाही. त्याला व्यक्त म्हणावे तर तो त्याहून वेगळाच आहे. अव्यक्त म्हणावें तर तें व्यक्त सापेक्ष आहे. त्यामुळे त्याला अव्यक्तहि म्हणणे अ-यथार्थ होईल. व्यक्ताव्यक्त म्हणावें तर तें असंबद्ध आहे व द्वैतरूप आहे. व्यक्ताव्यक्त दोन्ही नाही म्हणावें तर त्याचा निषेध केल्यासारखे होईल, त्याची व्याप्ति मर्यादित केल्यासारखे होईल. सारांश, कोणत्याहि प्रकारे त्याचे यथार्थ वर्णन करतांच येत नाही. मग त्याला अद्‌भुत नाहीं तर काय म्हणायचे ? या अद्‌भुताचे अवतारहि अद्‌भुतच आहेत. त्यांना नर म्हणावें तर ते देव आहेत, देव म्हणावें तर नरवत् ते जन्मतात, कर्में करतात, हे अद्‌भुतच नव्हे काय ? नरसिंह हा अवतार सर्व अवतारांचे अद्‌भुतत्व प्रकट करणारा आहे. तो नर म्हणावा तर नर नाहीं, सिंह म्हणावा तर सिंह नाहीं उभयरूप म्हणावा तर तो त्या दोहोंहून वेगळा नि आगळाच आहे. तो दोन्ही नाहीं म्हणावें तर ते प्रत्यक्षाशी विसंगत आहे. अशा प्रकारें त्याचे यथार्थ वर्णन करतांच येत नाही. म्हणून तो अद्‌भुत. ध्रुवाच्या समोर शंखचक्रगदापद्मधर तो भगवान् विष्णु येऊन उभा राहिला. पण ध्रुवाचे डोळे समाधींत लावलेले होते. त्याला तो आंत, हृदयांत दिसू लागला. त्याला समजेच ना की तो प्रत्यक्ष पाहत आहे की स्वप्न पहात आहे ? त्यानें डोळे उघडले तों समोर तो भगवान्. आपण आंत पाहिलें तें रूप हेंच म्हणून परत डोळे मिटले तर आंत पुनः तेंच. पुनः उघडले, समोर तेंच. असा तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, प्रत्यक्षाप्रत्यक्ष आणि उभयभिन्न कांहीं अद्‌भुतच आहे. म्हणूनच तर उपनिषदें नि गीता गातात
"आश्चर्यो वक्ताः कुशलो ऽस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः ॥ "

"आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनं आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच् चैनं अन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद नचैव कश्चित् ॥ गीता २ - २९




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP