ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

तेजोवृषो द्युतिधरः सर्वशत्रभृतां वरः ।
प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकश्रृङ्गो गदाग्रजः ॥८१॥


७५७. तेजोवृष
तेजो वर्षति इति तेजोवृषः सूर्यः । जो तेज वर्षतो तो तेजोवृष म्हणावयाचा. सूर्य हा तेजोवृष आहे. गाईच्या कळपांत जो गोपति वळू असतो त्याला वृष म्हणतात. सूर्यहि तसाच गोपति आहे. किरणें ही विश्वांत चरणाऱ्या गाई असून त्या किरणरूप - गाईंच्या ठाई तो आपला तेजोगर्भ आहित करीत असतो. हे असें गर्भाधान तो करतो, त्याचे पालन व नियमनहि करतो म्हणून तो पति म्हणावयाचा. तो भूमीच्या ठाई तेजोवृष्टि करून जीवसृष्टि करीत असतो. म्हणून तो वृष म्हणावयाचा. गीतेंत म्हटलेंच आहे "तपाम्यहमहं वर्ष निगृह्णाम्युत्सृजामि च । " "तापतों सूर्यरूपें मी सोडितों वृष्टि खेंचितों" म्हणजे उष्णकाल प्रावृट्काल आणि हिमकाल या कालत्रयानें घटित असलेला जो संवत्सररूप कालात्मा सूर्य तो या. समस्त सृष्टीचे संपूर्ण जीवन नियन्त्रित करतो आहे. म्हणून तो तेजोवृष म्हटला आहे. पण सूर्य हा इथे प्रतीकरूप आहे. तो तेजाळ खोंड, तो तेजोवृष त्या चित्सूर्याचे प्रतीक होय. सर्व सत्ता त्या चित्सूर्याची आहे. या विश्वांतील सगळी प्रतिबिंबें त्याच्या अधीन आहेत. सर्व प्रतिबिंबांचे अस्तित्व, त्यांचे जीवनमरण सर्व त्या बिंबाधीन आहे. प्रतिबिंबांच्या अधीन त्याचे कांहीं एक नाहीं. प्रतिबिंबांच्या गतागतानें त्याची समाधि कधीं डहुळत नाही. "जगें येवोत जावोत" त्या परमात्म्यावर त्याचा काही एक परिणाम होत नाही, आणि आपणहि त्या परमात्म्याचेच प्रतिबिंब आहों, त्याचे च किरण आहों हे जे ओळखतात त्यांच्यावरहि सृष्टीच्या सर्ग-प्रलयांचा कांहीं परिणाम होत नाही. त्यांची आत्मस्थिति अभंग राहते. येशूनें जे म्हटले आहे की मी देवाचा पुत्र आहे आणि देवाची इच्छा जगांत चालो, माझी नव्हे. त्यांत तो ह्या बिंबप्रतिबिंबन्यायाचा, या वेदान्ताचाच उल्लेख करीत आहे. यहूदी लोकांनी त्याला क्रूसावर खिळलें तरी त्याची आत्मनिष्ठा टिकली. तो थोडा चलबिचल झाला होता, पण सावरला. तीन दिवसांनी मी परत उठेन म्हणून जें त्याच्या तोंडी घातलें आहे तें वेदान्तविचार नीट न समजणाऱ्या त्याच्या शिष्यांची गफलत आहे. वास्तविक जो मेलाच नाहीं तो उठणार म्हणण्यांत अर्थ काय ? येशू आपलें तत्त्व प्रतिपादित होता. आणि गायत्री मंत्रांत तरी दुसरे काय सांगितलें आहे ? आम्हांला त्या परमात्मतेजाचे ध्यान करावयाचे आहे-ज्याला तेजोवृष म्हटले आहे "तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । "

७५८. द्युतिधर
द्युतिं अङ्गकान्ति धारयति इति द्युतिधरः । जो द्युति म्हणजे अंगकांति धारण करतो तो द्युतिधर म्हणावयाचा. मागील पदांत तेज शब्द आला आहे, इथे द्युति शब्द आला आहे. तेज हे दाहक आहे, द्युति आह्लादक आहे. सूर्य तेजस्वी आहे, अग्नि तेजस्वी आहे. पण चंद्र द्युतिमान् आहे,हिरा मोती द्युतिमान् आहे. अग्नीवर राख, सूर्यावर ढग आले म्हणजे ते द्युतिमान् दिसत नाहीत. त्यांची दीप्ति मंद होते, ते मलिन दिसतात. हे मालिन्य ज्यांच्यावर आलें नाहीं, जे लखलखीत आहेत, ते म्हणावयाचे द्युतिधर. राजा हा तेजस्वीहि असतो आणि द्युतिमान्हि असतो. राजाचे तेज म्हणजे त्याचा दरारा, त्याचे शत्रूंना, डाकू-लुटारूंना, दुष्टांना, उन्मर्गगामी लोकांना वाटणारें भय होय. त्याची द्युति म्हणजे त्याचे चंद्रवत् प्रियदर्शन होय, त्याचे राजस रूप होय, लावण्य होय. राजासारख्या अधिकारी पुरुषाच्या ठाई हें जें तेज आणि तजेला दिसतो तो परमात्म्याचा प्रतिनिधि म्हणून त्याला लाभलेला असतो. परमात्मा हाच वस्तुतः या चराचर सृष्टीचा राजा आहे, शास्ता आहे. म्हणून त्याला ईश्वर ही संज्ञा मिळाली आहे. राजा शिवाय आमचे चालत नाही. कोठल्या ना कोठल्या प्रकारचे शासन आम्हांला लागतेच. नाहीतर सर्वत्र अराजक माजावयाचे. मग विश्वाला नको का कुठलें शासन ? तें जें सर्वोच्च शासन तेंच ईश्वरी राज्य होय. तो परमात्मा या विश्वाचा अधिपति आहे त्याच्या आज्ञेचा भंग कोणी करू शकत नाही, असे त्याचे तेज आहे आणि त्याची सुषमा, द्युति इतकी मोहक आहे की कोणी त्याच्या कडे आकृष्ट झाल्यावांचून रहात नाहीं, पतंगवत् सर्व जीव त्याच्या द्युतीवर, त्याच्या अंगकांतीवर झडप घालत आहेत.

७५९. सर्वशस्त्रभृतांवर
सर्वेषां शास्त्रभृतां वरः सर्वशस्त्रभृतां वरः । अथवा सर्वाणि शस्त्राणे बिभर्ति इति सर्वशस्त्रभृत् । तेषां वरः, सर्वशस्त्रभृतां वरः । सर्वविध शस्त्र धारण करणारांमध्ये श्रेष्ठ तो म्हणावयाचा "सर्वशस्त्रभृतां वर'. परमात्मा हा शस्त्र धारण करणाऱ्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. कारण शस्त्र-धारणाचे प्रयोजन त्याच्या इतकें दुसरा कोणी पूर्ण करू शकत नाही. नखापासून चक्रापर्यंत सर्व आयुधे त्यानें धारण केली आहेत. त्यामुळे तो सर्वशस्त्रभृत् आहे. आणि आर्तत्राण हें शस्त्रधारणाचे प्रयोजन आहे आणि ते त्याच्या इतकें कोणी केले नाही. म्हणून दोन्ही प्रकारें तो सर्वशस्त्रभृतांवर होय, शस्त्रे ही भयानक समजली जातात. कारण ती मारक आहेत, संहारक आहेत. ही शस्त्रे कल्पिली आहेत प्रजारक्षणासाठी. तो उद्देश विसरून जेव्हां तीं प्रजेचे भक्षण करू लागतात, लोकांचे प्राण, धन, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य यांचा अपहार करूं लागतात, अर्थात् विपरीत उद्देशानें वापरली जातात तेव्हांच खरोखर ती भयानक होत. एरव्हीं तीं तारकच आहेत, मोठी स्पृहणीयच आहेत. आणि त्यांचें तें तारकत्व लक्षूनच परमात्मा सर्वप्रहरणायुध म्हणून गौरविला आहे. परंतु होतें काय की शस्त्रधारक आधीं आर्तत्राणासाठी शस्त्र उचलतात आणि मागाहून तो उद्देश विसरून आपल्याला धर्मसेवक न समजता राजे महाराजे म्हणूं लागतात, आणि मग प्रजेचें पीडन सुरू होते. अशा प्रजापीडकांचे परशुरामानें एकवीस वेळा निर्दालन केलें, पण तो राजा महाराजा होऊन बसला नाहीं. आणि जेव्हा रामाच्या भेटीत त्याच्या लक्षांत आलं की आपलें अवतारकार्य संपलें आहे, क्षत्रियांत धर्मावतार झाला आहे; तो तपस्येसाठी महेन्द्रपर्वतावर निघून गेला. त्यामुळे तो शस्त्रभृतांवर होय. शस्त्र परजावें केव्हां आणि केव्हां तें म्यान करावें हे ज्याला नेमकें समजतें उमजतें तोच सर्वशस्त्रभृतांवर होय. त्याची बुद्धि सदैव धर्मात स्थिर असते. तो स्थितप्रज्ञ असतो. जो वशी नाहीं त्याच्या हातांत असलेली शस्त्रेच अनर्थावह होत. राजा वा शासक हा परम धार्मिक असावा लागतो तो एवढ्याचसाठी. 'परमात्म्याहून अधिक धार्मिक कोणी नाही म्हणून तोच सर्वशस्त्रभृतांवर म्हटला आहे, आणि त्याचे अवतारहि. त्यांत राम राजमणि.

७६०. प्रग्रह
"प्रग्रहो निग्रहो व्यग्रः" या चरणांत वस्तुतः ग्रह धातूची रूपें यायला पाहिजेत. पण धातु नि अर्थ यांचे अनुसंधान राहिलेले नाही. त्यांची जागा अनुप्रासानेच बळकावली आणि "प्रग्रहो निग्रहो ग्राहः" अशा रचनेऐवजी "प्रग्रहो निग्रहो व्यग्रः" असा संचार झाला. या त्रिकांत ग्र चा नि ह चा नि ओ चा अनुप्रास साधला आहे. वचना पासून किमान अपेक्षा श्रुतिसुख आणि हृदयतोष यांची असते. या दोहोंपैकी जें एकहि देत नाहीं तें हेय होय. जें एक तरी देतें तें अहेय म्हणावयाचे. जे दोन्ही देतें तें मणिकांचनयोगाचे उपादेय होय. उत्तम अर्थ उत्तम शब्दांत उत्तम रीतीनें व्यक्त करणे हे कवि- कौशल होय. पैकी उत्तम अर्थ हा मणि म्हणजे रत्न असून उत्तम शब्दरचना हे कांचन म्हणजे कोंदण होय. दोहोंनाहि आपआपलें मोल आहे. रत्न स्वयंप्रकाशी आहे. ते कोंदणावांचूनहि मोलाचें आहे. पण कोंदणांत तें विशेष शोभते. त्याची शोभा फांकते आणि कोंदण हे तोलाचे ठरते. तें स्वतःहि सुवर्णच असते आणि आपल्या सुवर्णानें रत्नाची शोभा द्विगुणित करीत असल्यामुळे तोलाबरोबरच ते मोलाचेहि ठरतें. मोलाचे ठरलें तरी रत्नाचे मोल त्याला नाही हे उघड आहे. केवळ या चरणांतच नव्हे तर संपूर्ण श्लोकार्धातच ग र ओ वर्णांचा अनुप्रास आला असून इथे श्रुतिसुख-प्रधानतेचे सूत्र अनुसरले गेलें आहे, अर्थाचे नव्हे. पहा-"प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृंगो गदाग्रजः" आतां प्रग्रह म्हणजे काय ? ते पाहूं. प्रग्रह आणि निग्रह हे दोन्ही शब्द समानार्थकच आहेत. पण त्यांत ते एकार्थक नाहींत. प्रग्रह म्हणजे आत्मस्थ राहून बाह्याचा संपर्क टाळणारा. प्रगृह्य शब्द व्याकरणांत प्रसिद्ध आहे. "ईदूदेद् द्विवचनं प्रगृह्यम्" ई-ऊ--एकारान्त द्विवचनी रूपांचा सन्धि पुढील स्वराशी होत नाही असें तें सूत्र सांगते. तदनुसार प्रग्रह म्हणजे ब्राह्यसंपर्क वर्ज्य करणारा स्व-स्थ अस्पर्शयोगी परमात्मा.
"बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ "गीता ५ - २१

या श्लोकांतील बह्मयोग-युक्तात्मा तो प्रग्रह होय आणि असक्तात्मा तो निग्रह होय.

७६१. निग्रह
निगृह्णाति इति निग्रहः । जो निग्रह करतो म्हणजे उपसंहार करतो तो निग्रह म्हणावयाचा. जो विदेह आहे त्याला विषयस्पर्शाचे कारण नाही. पण जो सदेह आहे त्याला विषयस्पर्श हा होणारच आणि इन्द्रियांचा विषयांशी संयोग झाला म्हणजे तिथे त्या स्पर्शात रागद्वेष उत्पन्न होतात. हे रागद्वेष उत्पन्न होतात म्हणजे कुठून बाहेरून येतात असे नव्हे. तो इन्द्रियांचा स्वभावच आहे. त्यांच्या आहारी माणसानें जाता कामा नये, क्षुधेच्या आहारी जाऊन वा रसाच्या आहारी जाऊन माणूस अधिक खातो. हे त्यानें निग्रहपूर्वक टाळले पाहिजे. असा जो सर्व च विषयांत निग्रह करतो त्याला जीवनाची कला योग साधला म्हणावयाचा. "भोजनी न युक्त त्याग किंवा राग । युक्त ती निःसंग कार्य-दृष्टि" उपवास म्हणजे अनशन, कांहींच न खाणे कठिण नाही आणि अत्यशन अध्यशन अयुक्ताशन हे तर सर्वच जण करीत आहेत, पण कमी अधिक न खाणे, युक्ताहार करणे ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी निग्रह लागतो. मनावर इंद्रियांवर ताबा लागतो. त्यांना त्या त्या विषयांचे सेवन अमुक इतक्या मात्रेतच करूं द्यायचे, कमीहि नाही व ज्यास्तहि नाही ही गोष्ट अनासक्तियोगावांचून साधावयाची नाही. अशी ज्याला अनासक्ति साधली तोच निग्रह म्हणजे निग्रह करणारा म्हणावयाचा. प्रग्रह तर सहजच म्हणजे देहरहित असल्यामुळे स्वभावतःच या परीक्षेतून मुक्त आहे. पण निग्रह हा परीक्षा देऊन मुक्त आहे. तो सदेह असून आणि त्या कारणानें विषयीं वर्तणें त्याला टाळतांच येणारे. नसतांनाहि तो त्या विषयांत वाहवत नाही. त्या विषयौघांना तो तरून जातो. सांसारिकांप्रमाणें त्या विषयांत गटंगळ्या खात नाही, बुडत नाही. अर्थात् परमात्मा हा विदेह असो सदेह असो तो मुक्त आहे. म्हणून तो प्रग्रह निग्रह म्हणावयाचा. म्हणजे ह्या तीन कोटी झाल्या. एक मुक्ताची कोटी, तो विदेह आधींचाच परतीरस्थ आहे. त्याला ओघांत पडण्याचे नि त्यांतून उत्तीर्ण म्हणजे पार पडण्याचे प्रयोजनच नाही. दुसरी कोटी अनासक्ताची. तो युक्त आहे, तीरस्थ असून त्याला ओघ तरावयाचा आहे. तो प्रवाहांत उतरतो आणि अनासक्तीच्या बळानें उत्तीर्ण होतो. तिसरी कोटी ती आसक्तांची, प्रवाहांत उतरलेलेच आहेत. पण त्या प्रवाहांतून आपल्याला पैल तीराला पोचायचे आहे याचे त्यांना ज्ञान नाही. ज्ञान असले तर कर्तव्याचे भान नाही. भान असलें तर तेवढा निग्रह नाही. हे प्रवाहांत बुडतात.

७६२. व्यग्र
मागील चिंतनांत परमात्मा हा प्रग्रह म्हणजे मुक्त आणि निग्रह म्हणजे मुमुक्षु आहे असे म्हटलें आहे. इथें तिसरी कोटी जो बद्ध तोहि परमात्म्याचेच रूप आहे असें व्यग्र पद सुचवीत आहे. मुक्त हा समग्र आहे. मुमुक्षु हा एकाग्र आहे असें व्यग्र पद सुचवीत आहे. तर बद्ध हा व्यग्र आहे. मुक्त म्हणजे आप्तकाम वा पूर्णकाम होय. मुमुक्षु हा मुक्तिकाम होय. मुक्ति हेच एक टोक, एक दिशा त्याला असते. पण बद्ध ? तो आशापाशशतैर् बद्ध असतो. सर्व विषय त्याला चोहोबाजूंनी खेंचीत असतात आणि तो खेंचला जात असतो. त्याला अन्तरात्म्याचें जें एक टोक, ती जी प्रत्यक् दिशा, ती तेवढी लाभत नाही. बाकी सर्व दिशा त्याला मोकळ्या आहेत. तिकडे तो सारखा गुंतला आहे. व्यग्र आहे. एकीकडे क्षणभर गुंततो, तों दुसरीकडून खेचला जातो. तिथेहि जातो न जातो तो तिसरीकडून खेचला गेलाच. अशा प्रकारें तो सदैव व्यग्र असतो. त्याला एक दिशा नाहीं एक मार्ग नाही. "बहुशाखा ह्यनन्ताचश्च बुद्धयो ऽव्यवसायिनाम्" अनंत फाटे त्याला फुटतात. आणि तो त्यांनी उद्‌भ्रान्तासारखा धावत असतो. त्याला उसंत कशी ती नसते. त्याचा अमुक एक कर्तव्यनिश्चय झालेला नसतो. तो प्रवाह-पतित ओंडक्याप्रमाणें वाहत चाललेला असतो. ज्यांचा परमार्थ-निश्चय झालेला नाही अशा बद्ध जीवांची ही तन्हा. आज पैशाच्या मागे लागतील. म्हणतील, अर्थाहून सुखाचे साधन दुसरें नाहीं. उद्या म्हणतील कामसुख सार आहे. अर्थाचा उपयोग कामोपभोग च. परवां म्हणतील, कामसुख कामसुख किती दिवस ? मेल्यावर काय ? तेव्हां धर्माचीच कास धरली पाहिजे. त्याच्या योगानें स्वर्गलोकीं अमृतपान आणि गंधर्वगान लाभेल आणि अप्सरांचा संतत सहवासहि. म्हणून स्वर्गप्रद धर्मच खरा पुरुषार्थ ! अशा नाना वासनांच्या नादांत मनुष्य व्यग्र होऊन राहतो. ही व्यग्रता च अखेर माणसाला दमवते शमवते आणि मग तो स्वस्थ बसून विचाराच्या भूमिकेवर येतो. त्याच्यांत तत्त्व-जिज्ञासुता जागते. आणि एकदां का तो विचार करू लागला म्हणजे मग तो परमार्थ-निश्चयाला पोचतो. आणि म्हणून व्यग्र हाहि परमात्मा च आहे. तो भावी आहे इतकेंच. परमार्थाच्या सोपानावर जो चढला तो आगेमागें परमार्थाला पोचणारच आहे. म्हणून तो परमात्म-स्वरूपच होय.

७६३. नैकशृंग
नैकानि शृङ्गाणि यस्य सः नैकशृङ्गः । ज्याची शिंगें अनेकानेक आहेत तो नैकशृंग म्हणावयाचा.
वेदांत परमात्म्याचे वर्णन आले आहे"चत्वारि शृङ्गास्, त्रयो अस्य पादा, द्वे शीर्षे सप्त हस्तासो अस्य । त्रिधा बद्धो वृषभो रारवोति महोदेवो मां आविवेश । " तदनुसार नैकशृङग. ' हा अर्थ ठीकच आहे, परंतु नैकपद असंख्येयता सुचवीत आहे. आणि शृङ्गपद विशेष. तो परमात्मा असंख्य विशेषांनी नटला आहे. त्याचे विशेष, त्याचे गुणप्रकर्ष किती सांगावे ? जितके सांगावे तितके थोडेच. म्हणून तो नैकशृङ्ग म्हणावयाचा. प्रज्ञा, बल, अन्न आणि श्रम ही चार शिंगें होत. श्रद्धा, संकल्प आणि क्रिया हे तीन पाद होत. सत्य आणि संयम ही दोन डोकीं होत. शेतकी, सुतारी, लोहारी, चांभारी, विणकरी, कुंभारी आणि बुरुडी हे सात हात होत. भूत भविष्य आणि वर्तमान या तीन कालांच्या ठाईं तो बांधला आहे. तो सर्व सुखाची वृद्धि करीत आहे. सर्व पुरुषार्थांची सृष्टि करीत आहे. असा हा समाजपुरुष हा महादेव या मर्त्य लोकी गर्जतो आहे, नर्दतो आहे. आपण अठरा पगड जाती म्हणतों. अठरा पगड म्हणजे अठरा प्रकारच्या पगड्या धारण करणारे अठरा जातीचे लोक. एकएकाची जात त्याच्या पगडीवरून ठरत असे. पगडी म्हणजे माणसाचे शिंगच, वैशिष्ट्यच होय. समाज-पुरुष हा असा नैकशृंग आहे. पण ही सृष्टि कांहीं नुसती माणसांचीच बनलेली नाही. या सृष्टींत असंख्य जीव आहेत. आणि अजीवहि असंख्य आहेत. या सर्वांची मिळून ही सृष्टि बनली आहे. अशा स्थितीत तिची वैशिष्ट्ये किती म्हणून सांगावी ? ती का चार, चाळीस, चारशें, चार सहन सांगूनहि पुरी होणार आहेत ? म्हणून तो सर्वात्मा परमात्मा म्हटला आहे नैकशृंग.

७६४. गदाग्रज (अगदाग्रज)
गदस्य अग्रजः गदाग्रजः । गदाचा जो वडील भाऊ तो गदाग्रज कृष्ण. कृष्ण हा रामानुज आणि गदाग्रज होता. बलराम मोठा भाऊ व गद धाकटा भाऊ होता कृष्णाचा. म्हणून गदाग्रज म्हणजे कृष्ण. पण गदाग्रज म्हणण्यांत गदाचा जो गौरव करण्यांत आला आहे तशी त्याची खास कांहीं ख्याति नाही. शिवाय प्रास्ताविकांत म्हटल्याप्रमाणें विष्णूची ही नामें गौणानि विख्यातानि आहेत. ती गुणवाचक आणि प्रसिद्ध आहेत. तदनुसार गदाग्रज पद लावायचे तर गदाग्रज म्हणजे पथ्य आहार विहार असा अर्थ होईल. वडील भाऊ धाकट्या भावावर नियंत्रण ठेवतो. ज्येष्ठाच्या अन् शासनांत कनिष्ठ राहतो. पथ्य आहार विहार असला म्हणजे गद उर्फ रोग विकोपाला जात नाहीत, दबून राहतात, ते डोके वर काढीत नाहीत.
पथ्ये सति गदार्तस्य किमौषध-निषेवणैः ।
पथ्ये ऽसति गदार्तस्य किमौषध-निषेवणैः ॥ .

पथ्य आहारविहाराचे इतकें महत्त्व आहे की त्यावांचून औषधोपचार वेगळा नाहीं अथवा निरर्थक आहे असे म्हटले आहे. म्हणून परमात्मा हा पथ्य होय. अपथ्य होते तेव्हांच गदाची गदा येते. पण पथ्य असेल तर तें सुदर्शनचक्राप्रमाणें चोहोकडून आपल्या भक्ताचे संरक्षण करीत असते. त्याला गदाची पीडा, रोग-पीडा होऊं देत नाही. असा विचार केला असतां हें पद गदाग्रज ऐवजीं अगदाग्रज पढणेंच योग्य. सर्व अगदांचा अग्रज पथ्यच होय. शंकराचार्य निगदाग्रज असा पाठ कल्पितात. निः शब्द अध्याहृत घेतात आणि "निगदेन मन्त्रेण अग्रे जायते इति शब्दलोपं कृत्वा गदाग्रजः" अशी काहीतरीच ओढाताण करतात. त्यापेक्षां अगदाग्रज हा पाठ घेणेच सरळ आणि सयुक्तिक


चतुर्मूतिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः ।
चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् ॥८२॥


७६५. चतुर्मूर्ति
हा ब्यायशीवा श्लोक चतुर् चा पाढा आहे. एकपात् हा शब्द तेवढा वेगळा आला आहे. शेवटचा चरण "चतुर्वेदश् चतुष्पथः" असा चातुर्यानें चतुर्मय करता आला असता. परंतु इथे सहस्रांत चातुर्य नाही. भोळा भाव आहे, सहजता आहे, त्याला अनुसरून जें नाम आले मुखांत तें आले. " भोळिवेचे लेणें विष्णुदासा साजे । तेथें भाव दुजे हारपती । " चार आहेत मूर्ति ज्याच्या तो चतुर्मूर्ति म्हणावयाचा. मनुष्य-समाज हा चतुर्वर्णात्मक कल्पिला आहे. म्हणून श्वेत रक्त पीत आणि कृष्ण वा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णांच्या ज्या चतुर्विध मूर्ति तद्रूप तो परमात्मा म्हटला आहे. या व्यक्तविश्वांतील प्रत्येक च व्यक्ति चर वा अचर त्या अव्यक्त परमात्म्याची मूर्ति म्हटली जाईल. परंतु जिथें आत्मतत्त्व विशेषतः आकळलें जाते ती मनुष्ययोनिच परमात्ममूर्ति म्हणून गौरविली गेल्यास नवल काय ? ती चतुर्वर्णात्मक म्हणून तो परमात्मा चतुर्मूर्ति म्हटला आहे. अथवा विराट् सूत्रात्मा अव्याकृत आणि तुरीय या चार मूर्ति. अथवा व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त आणि नव्यक्त-नाव्यक्त या चार कोटीच चार मूर्ति आहेत. या चार कोटींच्या बाहेर पांचवी कोटी संभवत नाही. म्हणून. तो परमात्मा चतुर्मूर्ति म्हणावयाचा. अर्थात् चतुर्मूर्ति म्हणजे चतुर्विध मूर्ति. अथवा गुणानुसार सत्त्वमूर्ति विष्णु रजोमूर्ति ब्रह्मा तमोमूर्ति महेश आणि गुणातीत केवलस्वरूप अशा परमात्म्याच्या चार मूर्ति होतात म्हणून तो चतुर्मूर्ति. महिम्नाच्या पुढील श्लोकांत याच चार मूर्ति वर्णिल्या आहेत.
बहलरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमोनमः
प्रबलतमसे तत्संहारे हराय नमोनमः ।
जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमोनमः
प्रमहसि पदे निस्वैगुण्ये शिवाय नमोनमः ॥


७६६. चतुर्बाहुः
चत्वारो बाहवोऽस्य इति चतुर्बाहुः । परमात्म्याला चार बाहु आहेत म्हणून तो चतुर्बाहु म्हटला आहे. जीवाला एक दोनच बाहु आहेत. हस्तीला एक आहे. माणसाला दोन आहेत. इतर प्राण्यांना हात वा भुज नाहीत. ते अहस्त वा बाहुरहितच होत. म्हणजे हस्त वा बाहु हा अपूर्व विकास म्हटला पाहिजे. हा विकास ज्याच्या ठाईं पूर्ण झाला तो चतुर्बाहु म्हणावयाचा. पादप्राधान्यानें सृष्टीचा चराचर असा द्विविध विभाग केला जातो. परंतु तो प्राथमिक विभाग झाला. करवर्ग हा प्रगत विभाग होय. हस्तकौशल्य करांमध्ये; हस्त-भुजरहित प्राण्यांमध्ये कुठून आढळणार ? म्हणून करी, हस्तवान् हे प्रगत जीव होत. आणि ज्या अर्थी सर्व हस्तकौशल्य हातांत निहित आहे त्याअर्थी तो चतुर्बाहु म्हणजे सर्वविध कौशल्यसंपन्न म्हणावयाचा. अर्थात् इथें चतुर् पद हे सर्व-वाचक, संपूर्णता-वाचक समजावयाचे. आणि बाहु पद कौशल्यवाचक च घ्यावयाचे. पूर्वी पंधराव्या श्लोकांत चतुर्भुज हे पद येऊनच गेले आहे. बाहु आणि भुज ही पदें संरक्षक बलवाचकहि घेता येतील. तें संपूर्ण बल परमात्म्याच्या ठाईं निहित आहे म्हणूनहि तो परमात्मा चतुर्बाहु म्हणावयाचा.
पण जगांत सर्वत्र द्विबाहु लोकच आढळत असतो. ही चतुर्बाहु कल्पना चमत्कारिक नव्हे का ? हे सुचिह्न की कुचिह्न ? दोन बाहु दुसऱ्या दोन बाहूंशी जेव्हां विरोधविग्रहांत एकत्र येतात तेव्हांच ते कुचिह्न म्हणावयाचें. तो आसुर भाव होय. पण जेव्हां ते परस्परसहकार आणि संभूय उद्योग करतात तेव्हां तिथे मानव्य प्रकटते. हा सहकारच चतुर्बाहु होय. आणि हे सुचिह्नच म्हणावयाचे. पण हा सहकार जेव्हां पति-पत्नी गुरु-शिष्य देव-भक्त या जोडीतल्या प्रमाणें अभिन्नहृदय होतो तेव्हां तो दैवी होय. आणि हाच खरोखर चतुर्बाहु म्हणावयाचा.

७६७. चतुर्व्यूह
चतुर्व्यूह हे पद पूर्वी पंधराव्या श्लोकांत येऊनच गेलें आहे. ते परत इथे ब्यांयशीव्या श्लोकांत आले आहे. अर्थात् त्यानें सहस्रकाराला चांगलेच प्रभावित केले आहे, असे दिसते. ही व्यूहकल्पना काय आहे ? व्यूह आणि समूह ही दोन आज्ञार्थक क्रियापदें ईशोपनिषदांत आलेली आहेत. तिथे व्यूह म्हणजे पसर आणि समूह म्हणजे गोळा कर वा आवर असा अर्थ उघड आहे. त्याला अनुसरून व्यूह म्हणजे विस्तार असा अर्थ झाला. हा विस्तार आकारानें तसा प्रकारानेहि घ्यावयाचा. अर्थात् व्यूह म्हणजे विविध विस्तार, आणि चतुव्यूह म्हणजे चतुर्दिक् विस्तार. हे विश्वच चतुह होय. त्याचा हा चतुर्दिक् विस्तार अनन्तपार आहे. कोणत्याहि बाजूनें पहा तो व्यूह, तो विस्तार असीमच आहे. त्यांत जो शिरला तो हरवलाच. हा असीम विस्तार चार कोटींत पडतो-१ व्यक्त २ अव्यक्त ३ व्यक्ताव्यक्त आणि ४ नव्यक्त-नाव्यक्त. म्हणजे तो म्हणावयाचा चतुव्यूहया चतुयूहांतून, या चार कोटींतून कांहीं एक सुटलेलें नाहीं. "न तद् अस्ति पृथिव्यां वा अन्तरिक्षे ऽथवा दिवि| तत्त्वं व्यूहचतुष्केन मुक्तं यत् स्यात् जगत्त्रये ॥ ' असें गीतेचे शब्द घेऊन मी म्हणेन. व्यूह म्हणजे विस्तार हा अर्थ लक्षून संकर्षण वासुदेव प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चौघे व्यूह म्हटले गेल्यास नवल नाही. ते सर्व एकात्म होते. कृष्णाचे अवतारकार्य ह्या सर्वांनी मिळून पार पाडले. हा यदुवंशीय चतुव्यूह झाला. रघुवंशीय चतुव्यूह म्हणजे राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न होत. शिवाजी तानाजी सूर्याजी बाजी हा शिवचतुव्यूह होय. गांधी विनोबा महादेव कस्तुरबा, हा गांधी चतुव्यूह म्हणावयाचा. अशा प्रकारे समष्टीपासून व्यष्टीपर्यंत व्यूह कल्पना ऊहनीय होय. शंकराचार्य बृह्‌वृचोपनिषदाला अनुसरून शरीरपुरुष छंदःपुरुष वेदपूरुष व महापुरुष असे चतुर्व्यूह होतात, असें म्हणतात.

७६८. चतुर्गति
चतस्रः गतयः यस्य सः चतुर्गतिः । चेतनाच्या म्हणजे जीवाच्या चार गति कल्पिल्या जातात. आज जीव ज्या मर्त्य लोकांत आहे तीहि त्याची एक गतिच म्हणावयाची. वस्तुतः ती त्याची स्थिति आहे. इथे या स्थितीत म्हणजे कर्मभूमीत राहून तो जी कांहीं सदसत् कर्में करतो तदनुसार मरणोत्तर त्याला जी दशा प्राप्त होते तिला म्हणतात गति वा लोक. ह्या गति पुण्यापुण्य उभयविध आहेत. पुण्य गतीला स्वर्गलोक म्हणतात, अपुण्यगतीला नरकलोक म्हणतात. परंतु ह्या दोन्ही गति कर्मार्जित आहेत. पण जिथे कर्मच संपते, जी कर्मजित नाही पण आत्मज्ञान-जित आहे ती गति या उभय गतींहून वेगळी आणि उत्तम होय. तिलाच म्हणतात मोक्ष लोक. हा मोक्ष जीवाचें सहज निजधन होय. तें करावें मिळवावें सें नाहीं. . ते आहे. आत्मज्ञानानेच तें लब्धच उपलब्ध होते. अशा प्रकारें हें ऐहिक जीवन आणि मरणोत्तर च्या त्रिविध गति मिळून चार गति होतात. पांचवी गति नाही. म्हणून चेतनस्वरूप परमात्मा हा चतुर्गति म्हणावयाचा. पण कोणी म्हणेल, नास्तिकाला कसली आली गति ? तर तें म्हणणे फोल आहे. कारण गति ही वस्तुतन्त्र आहे. म्हणजे वास्तविक आहे. ती कल्पित नाहीं पुनर्जन्माची सिद्धि अनेक उदाहरणांवरून प्रकट आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान' दोहोंवरूनहि पुनर्जन्माची म्हणजे गतींचीहि सिद्धि होत आहे. जे अरबी धर्म पुनर्जन्म मानीत नाहीत ते बालबुद्धि आहेत. जन्म प्रत्यक्ष आहे. पुनर्जन्महि प्रत्यक्ष अनुभवसिद्ध आहे. त्या दोहोंच्या दरम्यान जीवाची अवस्थितिहि उघडच धरायला पाहिजे. उरला मोक्ष तो तर जीवाचें निजरूपच आहे. इतर गति सकारण आहेत, हा अकारण आहे. स्व-भाव आहे.

७६९. चतुरात्मा
चत्वारः आत्मानः अस्य इति चतुरात्मा । अथवा चतुरः आत्मा बुद्धिः अस्य इति चतुरात्मा । चार रूपं आहेत ज्याला तो चतुरात्मा म्हणावयाचा. अथवा चतुर आहे, स्वबोधक्षम आहे, बुद्धि ज्याची तो चतुरात्मा म्हणावयाचा. हा संपूर्ण श्लोक चाराचा पाढा असल्यामुळे दुसरी व्युत्पत्ति सहज नाही. ती चतुर कल्पना आहे. मग हे चार आत्मे कोणते ? जाग्रत् स्वप्न सुषुप्ति आणि तुरीया या दशांत उपलब्ध होणारा जो आत्मा तोच चतुरात्मा म्हणावयाचा. त्या आत्म्यांनाच विश्वं तैजस प्राज्ञ आणि तुरीय अशा संज्ञा मांडूक्योपनिषदांत दिल्या आहेत. चतुर् शब्दाबरोबर मूर्ति व्यूह आत्मा गति आणि भाव हे शब्द या श्लोकांत आलेले आहेत. ते विशिष्ट अर्थानं आले आहेत, हे उघड आहे. मूर्ति शब्द साकार देह, व्यूह शब्द परिवार, आत्मा शब्द अन्तःस्थिति, गति शब्द देहान्तर-प्राप्ति आणि भाव शब्द विभूति वा परिवर्तनें सामान्यतः सुचवितो, असें म्हणता येईल. तदनुसार त्यांचे वेगवेगळे अर्थ केले तरी ते सर्व परमात्मवाचक असल्यामुळे एकमेकांत सरमिसळ होऊं पहातात. त्याला व्यक्ताकारांत पाहूं जावें तो तो अव्यक्त दिसतो. अव्यक्त म्हणावें तो त्याचा हा व्यक्ताकार दृष्टीसमोर उभा राहतो. त्याला एक म्हणावें तर तो बहुधा भासू लागतो. त्याला बहु म्हणावें तर तो एकच एक आहे असे दिसते. त्याला दविष्ठ म्हणून शोधायला जावें तर तो हृदयांतच आढळतो. आणि नेदिष्ठ म्हणून हृदयगह्वरांत शोधावें तर तो बाहेर उभा असतो. असा तो कोणत्याहि एकाच रूपांत न सामावणारा मोठा फसवा आहे. परंतु भक्त त्याला चाराच्या कोंडीत पकडतात. त्याची ते विश्व म्हणून उपासना करतात. तो सत्, तो असत्, तो सदसत्, तो नसत्-नासत् आहे. बोला, आतां तो कुठे पळतो ? विश्व तैजस प्राज्ञ आणि तुरीय म्हटल्या नंतर मग तो कसा निसटतो ?

७७०. चतुर्भाव
भवति इति भावः , व्यक्तिः । चत्वारो भावा अस्य इति चतुर्भावः ।
जो होतो तो म्हणावा भाव. अर्थात् व्यक्ति. चार आहेत भाव म्हणजे व्यक्तीभाव ज्याचे तो म्हणावा चतुर्भाव. परमात्म्याचे भाव म्हणजे हे सर्व विश्वच आहे. या अनन्त भावांतून जे चिन्तनीय भाव ते भगवद्-विभूति म्हटले आहेत. गीतेच्या दहाव्या अध्यायांत अर्जुन पुसतोः "केषु केषु च भावेषु चिन्त्यो ऽसि भगवन् मया" 'कोण्या कोण्या स्वरूपांत करावें ध्यान मी तुझें ?' आणि भगवान् सांगतात
हन्त ते कथायिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः, कुरुषेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ गीता १० -१९
अहं आत्मा गुडाकेश सर्वभूताशय-स्थितः ।
अहं आदिश्च मध्यं च भूतानां अन्त एव च ॥ गीता १० -२०

या श्लोकांत थोडक्यांत सर्व भाव येऊन गेले आहेत आणि ते आहेत चारः १- आत्मा, जो अक्षर आहे. २- देह जो उत्पति स्थिति लय या तीन भावांनी युक्त आहे. असे हे चार भाव झाले. या चार भावांत सर्व येऊन गेले आहे. म्हणून परमात्मा चतुर्भाव होय. आत्मा हा स्वतः अ-भूत आहे. तो अज, अव्यय, अविनाशी आहे. इतर सर्व भूत आहे. तें जन्मतें, वाढतें-घटते आणि मरतें या चार भावांहून पांचवा भाव कांही आढळत नाही. म्हणून तो परमात्मा चतुर्भाव होय. ' अथवा चतुर्भाव म्हणजे अधिभूत अधिदैव . अधियज्ञ आणि अध्यात्म हे उत्तरोत्तर उन्नत अभिमान होत. अधिभूत म्हणजे तामस देहाभिमान, अधिदैव म्हणजे राजस इन्द्रियाभिमान, अधियज्ञ म्हणजे सात्विक अन्तःकरणाभिमान आणि अध्यात्म म्हणजे गुणातीत स्वरूपसंज्ञान असें म्हणता येईल. यांनाच जड, चेतन, अधिचेतन आणि अतिचेतन अशा संज्ञा द्यावयाच्या. या चार भावांहून वेगळा पांचवा भाव उपलब्ध होत नाही, म्हणून तो परमात्मा चतुर्भाव म्हणावयाचा.

७७१. चतुर्वेदविद्
चतुर्वेदान् वेत्ति इति चतुर्वेदवित् । जो चारी वेद जाणतो तो चतुर्वेदवित् म्हणावयाचा. परमात्मा हाच चतुर्वेदवित् आहे. कारण तोच वेदार्थ जाणतो, वेदतात्पर्य जाणतो. गीतेत म्हटलेंच आहे वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्
मी वेद-वेद्य आहे, मी वेदकर्ता आहे, मीच वेदज्ञ आहे. याचा आशय हा की तो चिन्मात्र परमात्मा सर्वकारण आहे. सर्व कारणांत चतुर्वेदवित्त्वहि येऊनच जाते. ज्ञान हीहि एक क्रियाच आहे. आणि कोणतीहि क्रिया म्हटली म्हणजे तिची तीन अंगें अपरिहार्य असतातः १ कारण २ कर्म, ३ कर्ता. तशी ज्ञानक्रियेची तीन अंगें म्हणजे १, वेद २, वेदन आणि ३ वेत्ता. ही तिन्ही अंगें तो परमात्माच आहे. तोच वेत्ता आहे, तोच वेद म्हणजे ज्ञानसाधन आहे आणि तोच वेदन म्हणजे ज्ञानक्रिया आहे. काशिवाय करण आणि कर्म निरर्थक होत. तो कर्ताच कर्माला कर्मत्व आणि करणाला करणत्व देण्यास समर्थ असतो. अशा प्रकारे कर्ताच सर्व-कारण म्हटला जातो. ज्ञानाक्रियेच्या बाबतीत तर हे विशेष लागू आहे. इतर क्रियांत कर्ता करण क्रियां आणि कर्मफल एकरूप होऊं शकत नाही. परंतु ज्ञानक्रियेत मात्र ती सर्व अंगें एकरूप होऊन जातात. ज्ञान ज्ञेय ज्ञाता ही त्रिपुटी तिथें उरतच नाही. ती अंगें, तो अंगागिभाव सर्व एकाकार होऊन जाते. जो ज्ञाता तोच ज्ञेय आणि जें ज्ञेय-ज्ञातृत्व तेंच ज्ञान. तिन्ही अभिन्न आणि एकरूप हेच वेदज्ञत्व होय. जो नुसती वेदाची अक्षरें घोकतो तो वेदज्ञ नव्हे. जो त्यांचा शब्दार्थ जाणतो तोहि वेदज्ञ नव्हे. तर जो वेदाचा आशय जगतो तोच वेदज्ञ. तोच चतुर्वेदवित्. ज्ञात्यांत पल्लवग्राही आणि मुलग्राही असे भेद केले जातात. जे पल्लव ग्राही ते खरे ज्ञाते म्हणजे ज्ञानी नव्हेत. जे मूलग्राही तेच ज्ञानी म्हटले जातात. हेच गीतेंत १५व्या अध्यायाच्या आरंभी "छन्दांसि यस्य पर्णानि यस् तं वेद स वेदवित्' म्हणून स्पष्ट केलें आहे. तिथे वेदमंत्रांना पानें म्हटले आहे. मूळ तो अक्षर परमात्मा होय. त्याला जो जाणतो तोच सर्व- वेदवित् म्हणजे चतुर्वेदवित् होय.

७७२. एकपाद्
एकः पादः अस्य इति एकपात् । एकच पाय आहे ज्याला तो एकपात् म्हणावयाचा. परमात्मा हा एकीकडे सहस्रपात् म्हटला आहे तर दुसरीकडे एकपात्. उपनिषदांत तो चतुष्पादहि म्हटला आहे. यांत काय हेतु आहे ? पाय म्हणजे आधार. ज्याला दुसऱ्याचा आधार लागतो तो परावलम्बी होय. तो परतंत्र होय. परमात्मा हा कोणावरहि अवलंबून नाही. तो स्वतंत्र आहे. त्याचा आधार तो स्वतःच आहे म्हणून तो एकपात् म्हटला आहे. आपल्या पायावर उभे राहतें, पांगुळगाड्याचा वा वडिलांच्या बोटाचा आधार ज्याला लागत नाहीं तें मूल चालायला स्वावलंबी झालें. तसा जो सर्वतंत्रस्वतंत्र झाला तो म्हणावयाचा एकपात्. परमात्म्यानें ही सृष्टि निर्माण केली तेव्हा त्यानें कशाचा आधार घेतला ?
किमीहः किंकायः स खलु किमुपायस् त्रिभुवनं
किमाधारो धाता सृजति किमुपादनमिति च"

त्यानें दुसऱ्या कशाचाच आधार घेतला नाही ही सर्व सृष्टि त्यानें आपल्याच आधारें निर्माण केली, कोळी जसा आपले जाळे स्वतःच निर्माण करतो त्या प्रमाणें. म्हणून तो परमात्मा सर्वतंत्रस्वतंत्र होय. एक आत्माच त्याचा आधार आहे म्हणून तो एकपात् होय. अविभाज्य न्यूनतम जो अंश तो एक होय. तो एक स्वात्माच ज्याचा पाद म्हणजे आधार आहे तो एकपात् म्हणावयाचा. "पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपाद् अस्यामृतं दिवि" या श्रुतींत परमात्मा चतुष्पाद म्हणजे सकळ कल्पिला असून त्याचा ही व्यक्त सृष्टि एक पाद म्हणजे एकचतुर्थांश म्हटली आहे. उरली ती अव्यक्त आणि अक्षर सृष्टि होय. ती अर्थात् त्रिपाद् म्हणजे तीनचतुर्थांश म्हणावयाची. सहस्रपात् पद परमात्म्याची सर्वव्यापकता व्यक्त करते. त्यांत सहन पद सर्व-वाचक असून पाद पद आक्रामकता-व्यापकता-वाचक होय, म्हणजे पाद पदाचे तीन अर्थ झाले (१) आधार, (२) चतुर्थ भाग, पाव, (३) चरण, व्यापन.


समावर्तोऽनिवृत्तात्मादुर्जयो दुरतिक्रमः ।
दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा ॥८३॥


७७३. समावर्त
सम्यक् आवर्तयति गुरुकुले प्रोष्य वेदाध्ययनं समाप्य स्वगृहं प्रत्यायाति इति समावर्तः । जो समावर्तन करतो तो समावर्त म्हणावयाचा. समावर्तन म्हणजे सोडमुंज. हा विधि गुरुकूलीं राहून व वेदाध्ययन संपवून म्हणजे विद्याविनयसंपन्न होऊन स्वगृहीं गृहस्थाश्रम स्वीकारण्यास परतण्याच्या वेळी केला जातो. अर्थात् समावर्त म्हणजे स्नातक होय. वेदविहित वर्णाश्रम धर्मानें व्यवस्थित आंखणी केली आहे. मानवजीवनाच्या साफल्यासाठी याहून अधिक सुंदर योजना आढळत नाही. नदीला जसे घाट बांधतात त्याप्रमाणें वैदिक धर्मसूत्रकारांनी स्मृतिकारांनी मानव-जीवनप्रवाहाला वर्णाश्रमरूपी घाट बांधले आहेत. या घाटांतून वाहणारा प्रवाह तीर्थरूप होतो. तिथे सुखानें वास करता येतो. सुखमय जीवन हवें तर आश्रमावांचून क्षणभरहि राहूं नये असे सांगितलें आहे. "अनाश्रमी न तिष्ठेत क्षणमेकमपि द्विजः". ब्रह्मचर्याश्रम हा पहिला घाट. अग्नि आणि आचार्य ह्या तेथील देवता. गृहस्थाश्रम हा दुसरा घाट. अग्नि आणि समाजप्रतिनिधि अतिथि ह्या तेथील देवता. वानप्रस्थाश्रम हा तिसरा घाट, अग्नि आणि निजात्मा ह्या तेथील देवता. संन्यासाश्रम हा चौथा घाट केवल आत्माग्नि तेथील देवता. अशा प्रकारें ज्याचा जीवनौष घाटबद्ध प्रवाहित झाला तो अनायास कृतार्थ होतो. म्हणून चारी आश्रम हे परमात्मस्वरूपच होत. इथे समावर्त पदानें ब्रह्मचर्याश्रम आणि पुढील अनिवृतात्मा पदानें गृहस्थाश्रम सूचित केला आहे. पुढील संपूर्ण श्लोक दुर् चा पाढा आहे.

७७४. अनिवृत्तात्मा (निवृत्तात्मा)
प्रवृत्ति आणि निवृत्ति ही दोन्ही धर्मांची अंगें आहेत. ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य ही प्रवृत्ति आहे. वानप्रस्थ आणि संन्यास ही निवृत्ति आहे. यांनाच उद्देशून गीतेनें म्हटले आहेः
आरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ गीता ६ - ३

जोवर मुलाला चालायला येत नाही तोवर पांगुळगाडा हे चालायला कारण म्हणजे साधन होतें. पण एकदा नीट चालायला येऊ लागले म्हणजे तो पांगुळगाडा गरजेचा राहत नाही. तो सोडून देणेच चालण्याला उपकारक होते. तसें समत्वयोगावर चढायला आरंभी कर्म उपकारक होतें. कर्माच्या आधारें मनाचा तोल सांभाळतां येतो. तामस व राजस कर्में टाकून द्यायची. सात्विक तेवढी करायची. तीहि फलाशारहित होऊन करायची. असा अभ्यास करता करता तो समत्वबुद्धिरूप योग लाभतो. तो लाभला म्हणजे मग कर्माची खटापट वा आयास उरत नाहीं कर्में अनायास होऊं लागतात. हाच शम होय. तो उत्तरोत्तर प्रसन्नतेंत वृद्धि करतो. वसंतागम झाला म्हणजे जशी जुनी पानें गळून जातात तशी त्याची सर्व कर्में गळून पडतात. आणि त्याला नव्या पालवीप्रमाणें शान्तीची अरुणारुण कोवळी कोवळी पालवी सर्वांगावर फुटते. शान्तीच्या फुलोऱ्यानें तो नुसता फुलून जातो. ही धन्य दशा एकाएकी लाभत नाही. क्रमाक्रमानें च ती येते. तोच क्रम "समावर्तो निवृत्तात्मा" ही पदें सुचवीत आहेत. आधी विधिवत् ब्रह्मचर्य संपवून तो गृहस्थाश्रमांत प्रवेश करतो. तिथे तो आपल्या किल्यांत राहून षड्रिपूंशी युद्ध करतो. हाच अनिवृत्तात्मा होय. युद्धांतून तो पळ काढीत नाही. पण त्यांत शत्रुना तोंड देतो म्हणून तो अनिवर्ती वीर होय, अनिवृत्तात्मा होय. शत्रु शमला म्हणजे मग हाहि निवृत्त म्हटला जातो. पण वस्तुतः तो अनिवृत्तच असतो. तो आपले शान्तीचे किल्लेकोट रचीत असतो. वैराग्याची ढाल आणि ज्ञानाची तरवार सदैव त्याच्या हातींच असते. वानप्रस्थाश्रमांत तो वैराग्याची ढाल बळकट करतो, संन्यासांत ज्ञानासि पाजळीत रहातो. म्हणून तो अनिवृत्तात्माच म्हणावयाचा. मेल्यावरच तो निवृत्त म्हणावयाचा.

७७५. दुर्जय
दुःखेन जीयते असौ इति दुर्जयः । जो मोठ्या कष्टानेंच वश होतो तो म्हणावयाचा दुर्जय. परमात्मा कोणी वेगळा नाही. तो निजरूप च आहे. पण तो निज असूनहि आमच्या विपरीत ज्ञानामुळे आणि तज्जनित वृजिनामुळे आम्ही त्याला ओळखतच नाही, त्याच्यापासून दूर दूर जातो. मग तो निज असूनहि पर झाल्यास नवल काय ? ज्ञानदेव म्हणतातः "महत्त्व अवघे विसरिजे । वित्पत्ति पन्हां सांडिजे । जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी ॥ " मनुष्याला आपल्या संस्कृतीचा, आपल्या सत्तेचा, आपल्या संपत्तीचा अभिमान असतो. त्या अभिमानानें तो आपल्याला जगाहून वेगळा आगळा समजतो. त्या भरांत तो जगाची व जगदीशाची अवज्ञा करतो. त्याला तो निरुपाधि निरभिमान सर्वात्मा परमात्मा कसा भेटणार ? तो त्याला वश कसा होणार ? त्याला तो दुर्जयच आहे. परंतु ज्यानें ममतेचे कुंपण मोडलें आहे आणि अहंतेचे बन्धन तोडलें आहे त्या निःसंग आणि निरहंकार पुरुषाला या विश्वांत कोण आपला नि कोण परका राहिला ? "तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः ?" त्याला सारें विश्वच आपलें झालें, आत्मरूप झाले आणि तोहि सर्वांचा झाला. तो कोणाचे निराकरण करीत नाही. कोणी त्याचे निराकरण करीत नाही, ही धन्य साम्यदशा सुलभ कशी म्हणता येईल. दुर्जयच आहे ती. म्हणून तो परमात्मा दुर्जय म्हटला आहे. जीवाला नाना अभिमान चिकटलेले आहेत. त्यांतून एखादा सुटलाच तर तो 'मी निरभिमान आहे' याच अभिमानांत अडकून पडतो. तात्पर्य कोणी तरी मी विशेष आहे या अभिमानाच्या मगर मिठीतून सुटणे सोपें नाहीं. म्हणून तो परमात्मा दुर्जय म्हणावयाचा. परमात्म्याचे जे अवतार या जगांत होतात तेहि दुरजय च होत. त्यांच्यावर कोणाला मात करता येत नाही. त्यांना सामान्य समजून असुर विरोध करतात आणि अग्नीवर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणें नष्ट होतात. म्हणून तो दुर्जय.

७७६. दुरतिक्रम
दुःखेन अतिक्रम्यते असौ इति दुरतिक्रमः| ज्याला मोठ्या मुश्किलीनें ओलांडतां येते. पार करता येतें तो म्हणावयाचा दुरतिक्रम. ज्याची बरोबरी करणेहि जिथे कठिण आहे, त्याचा अतिक्रम करणे, त्याला मागे टाकून पुढे जाणे कसे शक्य आहे ? जीवाचे दुःख विविध आहे. त्याची बरोबरी होते. आपल्या बरोबरीच्या पासून त्याला भय वाटते की हा आपल्यावर मात करील. मात न केली तरी आपणच कोणी विशेष आहों असें म्हणतां येत नाही. आपल्याच तोलाचे दुसरेहि आहेत, याचे त्याला वैषम्य वाटत राहतें. कोणी वरचढ असला तर त्याच्यापासूनहि जीवाला भय उघडच आहे. त्याचेहि म्हणजे वरचढपणाचेहि त्याला वैषम्य वाटत राहते. आणि आपल्या अर्जित संपत्तीचा कीर्तीचा अखेर नाश होतो याचेहि जीवाला वैषम्य वाटते. सर्व प्रकारच्या संपत्तीच्या बाबतींत हे त्रिविध दुःख जीवाला सलत राहते. परंतु परमात्म्याला या पैकी एकहि दुःख नाही. त्याची समता तर दूरच पण तुल्यताहि कोणाला येऊ शकत नाहीं. मग त्याचा अतिक्रम कोण करू शकेल ? त्यांचा वरचढ कोण होणार ? आणि तो स्वतः अविनाशी असल्यामुळे व त्याची सर्व सत्ता व संपत्तिहि तदधीन असल्यामुळे नाशाचे भय त्याला नाहींच असा तो परमात्मा अकुतोभय आहे. आणि जीव मात्र सर्वतो भयग्रस्त आहे. असा जीव मग तो कल्पायुषी, त्रिभुवनेश्वर आणि कुबेर का असेना तो परमात्म्याचा अतिक्रम काय करणार ? म्हणून तो परमात्मा दुरतिक्रम म्हणावयाचा. जीवानें त्याच्या पाया पर्यंत मजल मारली तरी खूप झालें.

७७७. दुर्लभ
दुःखेन लभ्यते असौ इति दुर्लभः । दुःखानें म्हणजे मोठ्या कष्टानें च जो लाभतो तो म्हणावयाचा दुर्लभ. क्षुद्र गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागत नाहीं. दगड धोंडे रस्त्यावर मिळतात. परंतु रत्नासाठी समुद्राच्या तळाला जावे लागतें, विवरांतून पाताळांत जावे लागते. परमात्मा हे असेंच सुदुर्लभ रत्न आहे. तो परम पुरुषार्थ परम पराक्रमानेच मिळावयाचा. योग्य मोल मोजल्याखेरीज क्षुल्लक वस्तुहि जगांत मिळत नाही, मग जी अनमोल वस्तु आहे ती कशी मिळेल ? तुकाराम महाराज म्हणतातः
नाहीं संतपण मिळत तें हाटी ।
हिंडतां कपाटी, रानी वनीं ।
नये मोल देतां धनाचिया राशी ।
नाहीं तें आकाशीं पाताळी तें ।
तुका म्हणे मिळे जीवाचिया साटीं ।
नाहीं तरी गोष्टी बोलों नये ।

या परमार्थासाठी जीवाचें मोल द्यावे लागते. तेव्हांच तो परमार्थ तें संतपण हस्तगत होते. जो आपला जीव वाचवू पाहील, जो अंगचोरपणा करील तो मरेल, जो मरेल तो वांचेल. सोक्रेटिस, ख्रिस्त, गांधी यांनी जीवाच्या मोबदल्यांत तें "रामरतन" तें अमर जीवन मिळवलें. आम्ही कातडी बचावायची धडपड करीत राहतो आणि जीव गमावून बसतो, त्या अमर जीवनाला पारखे होतो. तें अमर जीवन, तें - अमृत किती दुर्लभ आहे याचे वर्णन गीतेनें असें केलें आहेः "मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये । यततां अपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः । " लक्षावधि माणसांतून एखादाच पुरुष परमार्थाकडे वळतो आणि त्यांतूनहि एखादाच भाग्यवंत मुक्कामाला. पोचतो. असा तो परमात्मा दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणतात "बहुता जन्मांचा अभ्यासु । तरीचि होय सौरसु परब्रह्मीं ॥

७७८. दुर्गम
दुःखेन गम्यते अवगम्यते असौ इति दुर्गमः । जो कष्टानें आकळिला जातो तो दुर्गम म्हणावयाचा. हे पद सुगम च्या विरुद्ध अर्थाचे आहे. सुगम म्हणजे सुबोध तर दुर्गम म्हणजे दुर्बोध. जें गोचर आहे तें सारें पंचविषयात्मक सुगम आहे. त्याचे ज्ञान आपल्याला चटकन होऊं शकते. परंतु बाह्य विषयांचें ज्ञान करून देणारी करणे तितक्या सुलभतेनें पाहतां येत नाहीत. डोळयांनी सारे जग आपण पाहतों, पण आपले डोळे आपल्याला आरशाच्या साहाय्यावांचून पाहतां येत नाहीत. या करणांपेक्षा अन्तःकरणे आणखीच दुर्गम, त्यांची हालचाल आणि हेतु आपल्या लक्षात आणणें उडी मारून आपणच आपल्या खांद्यावर उभे राहण्या सारखें कठिण आहे. मग या अन्तःकरणांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्याहि, पलीकडे जो अन्तरतर आत्मा आहे तो किती दुर्गम म्हणावा ? खरोखर तो दुर्गम म्हणजे अगम्यच आहे. उपनिषदें विचारतातः "विज्ञातारं अरे केन विजानीयात्"अरे जो स्वतःच जाणणारा आहे त्याचे ज्ञेय म्हणून भेदानें ज्ञान होणार कसे ? सर्व ज्ञान क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेदानें होतें. ज्ञेयमात्र क्षेत्र होय आणि त्याचा ज्ञाता क्षेत्रज्ञ म्हणावयाचा. हा क्षेत्रज्ञ केव्हांहि क्षेत्रभूत होऊं शकत नाही. तो क्षेत्रभूत झाल्यास क्षेत्रज्ञ म्हणतां यावयाचा नाही. तो क्षेत्रज्ञ म्हणून नाहींसाच होईल. मी आपलें पात्र गात्र पाहतो. पात्र उपकरण आहे, गात्र करण आहे. यांचे गुणदोष पारखणारें अंतःकरण आहे. त्या अन्तःकरणाच्या दशा-प्रकाश, प्रवृत्ति, मोह - पाहणारा तो क्षेत्रज्ञ. तो जो मी सर्वसाक्षी, त्या मला आतां दुसरा कोण जाणणार ? म्हणून तो म्हणावयाचा दुर्गम.

७७९. दुर्ग
दुर्गम आणि दुर्ग दोन्ही पदें दुर् उपसर्ग आणि गम् धातु यांच्या पासून व्युत्पादिली जातात. परंतु रूढीनें त्यांच्या अर्थात भेद होतो. दुर्ग म्हणजे बिकट वाट, अवघड गड, डोंगरांतील वा समुद्रातील जिथे मोठ्या कष्टानेंच पोंचतां येईल असें स्थान परमात्म्याला पोंचायला मार्ग सोपा नाही. "क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथः तत्कवयो वदन्ति' कवि म्हणजे परमार्थाला पोंचलेले पुरुष तो परमात्म-प्राप्तीचा मार्ग वस्तऱ्याच्या धारेसारखा सूक्ष्म आहे असें म्हणतात. त्याची सूक्ष्मता वर्णितांना कवींची सूक्ष्मदृष्टिहि दिसून येते. वस्तरा बोथट असूं शकतो म्हणून ते म्हणतात "निशित' सहाणेवर धार लावलेल्या वस्तऱ्यासारखा तो दुर्ग आहे, अगदीं अरुंद आहे. त्यावर पाय ठरत नाही. चिंचोळ्या, निसरड्या अवघड वाटेनें जातांना माणसाचा तोल जाऊन तो सारखा मार्गच्युत होत असतो, त्यामुळे मुक्कामाला पोचणे संकटपूर्ण होय. म्हणून तो मुक्काम, तें गन्तव्य, दुर्ग म्हणावयाचे. जीवाचें, मानवाचे गन्तव्य तो परमात्माच आहे. आणि तो दुर्ग आहे. त्याला पोचण्याचा जो शुद्धीचा मार्ग आहे तो क्षुरधारेसारखा सूक्ष्म आहे. जरा गफलत झाली की तोल गेला आणि माणूस अशुद्धीत पडलाच. आणि अशा अशुद्ध जीवाला तो शुद्धीचा धवलगिरि परमात्मा कोठून भेटणार ? उत्तंकानें चूळ भरली नाहीं, पाय धुतले नाहीत तर त्याला ती सौंदर्याची पुतळी राणी समोर असून दिसं शकली नाही. जेव्हां तो शुद्ध झाला तेव्हांच त्याला तिचे दर्शन झालें व तो कृतकार्य झाला. हा शुद्धीचा मार्ग, जो त्या धवलगिरीला जाऊन पोहोचतो, अत्यंत बिकट आहे. म्हणून तो परमात्मा दुर्ग म्हटला आहे. याची शक्ति दुर्गा म्हणून प्रसिद्ध च आहे. शक्ति आणि शक्तिमान् अभिन्नच होत.

७८०. दुरावास
दुःखेन आवस्यते अस्मिन् इति दुरावासः । जिथे कष्टानेच वास होतो तें म्हणावयाचे दुरावास. मागील पदांत तो परमात्मा दुर्गम म्हणजे दुधिगम, दुर्ग म्हणजे दुष्प्राप्य अनअॅक्सेसिबल, अधृष्य आणि अनभिगम्य म्हणून म्हटला आहे. इथे त्या पुढे जाऊन म्हटले आहे की तो परमात्मा समजा जिथे मोठ्या कष्टानें कोणी पोंचलाच तर तिथें तो टिकू शकणार नाहीं, राहूं शकणार नाहीं-हिमालयाच्या अत्युच्च शिखराप्रमाणें.हिमालयाचें तें गंगावतरण स्थान, तेहिम-शृंग अत्यंत चिंचोळे आहे. तिथे दोन माणसें मुश्किलीनें उभी राहू शकतात, असे म्हणतात. पण तें शृंग कितीहि स्वल्प-विस्तर असले तरी तिथे पदक्षेप होऊं शकतो. तिथे भूमि आहे, तिला कांहीं लांबीरुंदी आहे. परंतु परमात्मा अमूर्त अव्यक्त निर्गुण, तिथे त्याहून वेगळ्या कोणालाच रहायला जागा नाहीं, अवकाश नाही, म्हणून तो दुरावास होय. स्वर्गात कुणाला सदेह जातां येत नाही. परमात्म्याच्या ठाईंहि तसा कोणी आपलें नामरूप घेऊन जाऊ शकत नाही. कोणत्याहि विजातीय तत्त्वाला तिथे पूर्ण प्रतिबंध आहे. दुधांत पाणी मिसळतां येतें. सोन्यांत तांबें मिसळतां येते. कारण तें द्रव व घन पदार्थ सजातीय आहेत. परंतु परमात्मसजातीय पदार्थच नाही मग तो त्यांत मिसळणार कसा ? घटाकाश मठाकाशांत मिसळत नाही. तें एकरूपच असतें. आत्मा परमात्म्यांत मिसळत नाही. तो अभिन्नच आहे. म्हणून गीतेंत म्हटले आहेः "मया ततं इदं सर्वं जगद् अव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्व भूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । भूतभृन् न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ " इथें तीन विधानें केली आहेतः(१) परमात्मा अव्यक्तस्वरूप आहे आणि सर्व व्यक्ति तदाधार आहेत. (२) पण तो अव्यक्तस्वरूप परमात्मा व्यक्तगत वा व्यक्ताधार नाही कारण, कार्य हे कारणाधीन असते, कारण कार्याधीन नव्हे. शेवटी म्हटले आहे (३) त्या अव्यक्त परमात्म्याचे ठाईं व्यक्त राहतें हे म्हणणेहि खोटें. कारण मुळी दोन नाहींच, एकच वस्तु आहे. 'नासतो विद्यते भावः' म्हणून तो परमात्मा दुरावास म्हटला आहे.

७८१. दुरारि-हा
दुरारिहा हें नाम वस्तुतः दुररिहा वा अरिदुराहा असें असायला पाहिजे होते. परंतु एक आ हा उपसर्ग अधिक जोडून दिला आहे. आणि धातूऐवजी नामाला जोडला आहे. म्हणजे दुर् आ उपसर्गद्वय झालें. नामाच्या बाबतींत ते अर्थात भर न घालतांच आले आहे. धातूला जोडून येणे ठीकच आहे. अशी उपसर्गद्वययुक्त, दुरा-युक्त, आणखीहि कांहीं पदें आलीं आहेत. उदाहरणार्थ दुराधर्ष दुरावास इत्यादि. अरिं हन्ति इति अरिहा । अरिहा हे पद समजण्यासारखे आहे. अरिहा म्हणजे शत्रुघ्र. पण दुरारि म्हणजे काय ? अरींतहि कांहीं परी आहेत की काय ? होय, आहेत. काही प्रकट शत्रु असतात, कांहीं प्रच्छन्न. जे प्रच्छन्न शत्रु असतात ते अधिक घातक समजले पाहिजेत. कुपापेक्षा अंधकूप हा अधिक भयावह म्हटला पाहिजे. कूप उघड दिसत असतो. तेव्हां मनुष्य त्यांत पडला तरी सावधगिरीनें पडतो. परंतु तो जर तृणाच्छन्न असला तर त्यांत मनुष्य असावधपणे पडतो. आणि त्यांतून तो वाचण्याची शक्यता कमी. म्हणून हा असा अंधकूपसा प्रच्छन्न शत्रु अधिक भयानक म्हटला पाहिजे. याहूनहि अधिक भयावह म्हणजेहितशत्रु होय. तो प्रच्छन्न तर खराच, पण तो नुसता प्रच्छन्न नाहीं, भ्रामकहि आहे. कपटी आहे. तोहित म्हणजेहितकर्ता म्हणून भासवतो आणि असतो मात्र शत्रु. अशाच्या पासून माणूस नुसता असावधच राहत नाही तर आपले मर्म त्याच्या हवाली करीत असतो. आणि म्हणून त्याचा घात पूर्णच होतो, हमखास होतो. अशा शत्रूलाच म्हणावयाचे दुरारि. कामक्रोधलोभादि विकार हे जीवाचे असेच शत्रु आहेत. ते येतातहित म्हणून आणि करतात मात्र घात. सर्वविकार कामरूप आहेत. ते कमनीय वाटतात, गोड वाटतात म्हणून त्यांना काम वा कामरूप म्हणावयाचे. पण त्यांचे वास्तविक स्वरूप ओळखलें तर तेच मार आहेत, घातक आहेत असे दिसून येते. गीतेत त्यांना काम म्हटले आहे, तर धर्मपदांत त्यांना मार म्हटले आहे. दुरारि पदांत दोहोंचा समावेश होतो असें म्हणता येईल. परमात्मा या दुरारीला ओळखून असतो म्हणून त्याचा तो नाश करतो. शत्रूला शत्रु म्हणून ओळखण्यानेच त्याचा नाश होतो. चोराला चोर म्हणुन ओळखतांच तो चोरी करू शकत नाही आणि तो चोरी करू शकला नाहीं म्हणजे चोर म्हणून त्याचा नाश झाला असेंच म्हटलें पाहिजे. मृगजळाला मृगजळ म्हणून ओळखल्यावर ते आपल्याला अपाय करू शकत नाही.


शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः ।
इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः ॥८४॥


७८२. शुभांग
शुभंग हे नाम पूर्वीहि येऊन गेलें आहे ६३ व्या श्लोकांत. इथे ८४ व्या श्लोकांत तें पुनः आलें आहे. · भगवान् विष्णूच्या प्रसिद्ध ध्यानांत तें "मेघवर्ण शुभांग" म्हणून आलेले आहे. अर्थात् तें विशेष महत्त्वाचे मानले आहे हे उघड आहे. आम्ही देही असल्यामुळे देहाचे आकर्षण आम्हांला सहज आहे. त्यामुळे परमात्म्यालाहि आम्ही देह कल्पितों. आणि त्याचे ध्यान करतो. परमात्म्याची मूर्ति नाम, गुण, कर्म कांही नाही म्हटले म्हणजे आमची सर्व इंद्रिये व्यर्थच झाली म्हणावयाची. मग तो तुकाराम " घेईं घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें । डोळे तुम्ही घ्या रे सुख | पहा विठोबाचें मुख । मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पाईं । तुका म्हणे माझ्या जिवा । नको सोडूं या केशवा । " असें कसें गाणार ? परमात्म्याचे रूप ध्यानासाठी आहे. म्हणून त्याला ध्यानच म्हटले जाते. त्याचे नाम स्मरणासाठी आहे. त्याचे गुण गानासाठीच आहेत. त्याचे कर्म कीर्तनासाठी आहे. " परमात्म्याचें ध्यान चरणापासून सुरू करून मुखावर स्थिर करावयाचे असते. " "'संचिन्तयेत् भगवतश् चरणारविन्दम्"म्हणून भागवतानें हा ध्यान-विधि दिला आहे. माणसाच्या मनाला मूर्तीची मोहिनी पडली आहे. रूप-सौंदर्यानें स्त्रीपुरुष वेडे झाले आहेत. हे कोणाला नाकारता येणार नाही. याचे कारण काय ? याची मीमांसा खुशाल करा, परंतु जें सत्य आहे तें सत्यच आहे. त्याचा कोणाला इनकार करता येणार नाही. कारण कांहींहि असो 'मनाचें मोहन मूर्तीमाजीं ' हे तथ्य आहे. आणि हे जर खरें आहे, म्हणजे मानवाचे जर हे चिर अभिलषित आहे, तर त्याच्या साक्षात्कारावांचून तो केव्हांहि स्वस्थ होणार नाही हेहि तितकेंच खरे आहे. साक्षात्कार हा शब्दच मुळी मूर्तीची स्थापना करणारा आहे. म्हणून तो परमात्मा भक्तांनी शुभांग म्हटला आहे. त्याचे अंग प्रत्यंग परम रमणीय आहे. परम सुंदर आहे. तें निर्दोष, गुणसंपन्न आणि अलंकृत आहे. "निर्दोषहि समं ब्रह्म."

७८३. लोकसारंग
" लोकानां सारं लोकसारं . आत्मलोकं गच्छति गमयति वा इति लोकसारंगः ।" स्वर्गादि सर्वलोकांचा सार तो लोकसार म्हणावयाचा. अर्थात् आत्मलोक, मोक्ष. त्याला जो जातो वा पोचवतो तो म्हणावयाचा लोकसारंग. ही व्युत्पत्ति ठीकच आहे. परंतु ती कृत्रिम वाटते. सारंग हा शब्द तुरंग, कुरंग प्लवंग, पतंग, तरंग यांच्या प्रकाराचा वा गणांतला आहे हे उघड आहे. तुरं कुरं प्लवं पतं तरं ही अव्ययें गमन-शैलीची वाचक आहेत. घोडा हरिण वानर पक्षी जललहरी यांच्या विशिष्ट गमन-शैलीला ती क्रियाविशेषणरूप अव्ययें योजिलेली आहेत. सारं हे क्रियाविशेषणहि तसेंच आहे. सारंग म्हणजे काळवीट, तो कुंपणे मोडून व वागुरा तोडून जातो आणि आपला कळपहि सोबत घेऊन जातो. यासाठी सर्व नेतृगुण लागतात "बुद्धि बल कौशल्य' सारं हे क्रियाविशेषण त्या तिहींचाहि समाहार करतें. काळवीट मोठा बुद्धिमान् असतो. तो पारध्यांचे कारस्थान ताडतो. त्यांनी निर्माण केलेले अडथळे मोडतो, जाळी तोडतो. ते सर्व अंतराय अंगच्या बळानें उल्लंघून जातो. तो किती उंच व लांब उडी घेतो ! आणि अशा उड्या घेत पाहता पाहतां निसटून जातो. पारध्यांना तो चकवतो आणि आपला कळप सुखरूप घेऊन जातो. परमात्माहि तसा सारंग आहे. तो या लोकांतून पुण्यापुण्य गतींच्या कोंडीतून नि जाळ्यांतून स्वतः सफाईनें निसटतो आणि आपल्या भक्तगणांना 'हि बचावून नेतो. तेव्हां "लोके सारंगवत् वर्तते इति लोक-सारंगः" अशी होईल या पदाची स्वाभाविक व्युत्पत्ति.

७८४. सुतन्तु
"सु शोभनः तन्तुर्यस्य सः सुतन्तुः' ज्याचा तन्तु म्हणजे धागा चांगला आहे तो सुतन्तु म्हणावयाचा. सुतन्तु आणि तन्तुवर्धन ही दोन नामें कापूस आणि कांतणे यांचे स्मरण करूण देणारी आहेत. कापूस हे उपादान म्हणजे कच्चा माल होय. तन्तुवर्धन ही क्रिया आहे आणि तिचा कर्ताहि. परमात्मा हा या विश्वाचे उपादान कारणहि आहे आणि निमित्त कारणहि आहे कोळ्याप्रमाणें, कोळी जसा आपल्याच मुखरसापासून तंतु निर्माण करतो, त्याचे जाळे विणतो आणि तें परत मिळून टाकतो. त्या प्रमाणें परमात्मा कल्पारंभी हे सृष्टिरूप सूत कांततो. कल्पभर त्याचे हे वैचित्रपूर्ण विश्व विणत राहतो. आणि कल्पान्तीं तें सबंध तो गुंडाळून घेतो. हा सबंध विचार सुतन्तु आणि तन्तुवर्धन या दोन नामांत सांठवला आहे. अति प्राचीन काळीच वस्त्रविद्येचा मानवाला शोध लागला आहे. आणि त्या परिभाषेत त्यानें तत्त्वज्ञान रचलें आहे. सूत्र शब्द आज धागा या अर्थानं नामशेष होऊन तत्त्वविचार या लाक्षणिक अर्थानंच अधिक प्रचलित आहे. सूत्र म्हटल्याबरोबर कल्पसूत्रे, ब्रह्मसूत्रे, व्याकरण-न्यायादि सूत्रे डोळ्यांसमोर उभी राहतात; सुताचा धागा डोळ्यासमोर येत नाही. समवाय संबंध सांगावयाचा झाला म्हणजे तंतुपटाचा दृष्टान्त आलाच. असे हे सूत्र तत्त्वज्ञानमय झालें आहे. त्यामुळे सुतन्तु आणि तन्तुवर्धन हे शब्दहि सूतावाचक न राहता ते परमात्मवाचक बनले आहेत. या सृष्टीचे सर्व कारण तो परमात्मा सुतन्तु म्हणजे सुंदर सूत कांतून त्याचा ताणा करणारा झाला आहे. सुंदर सृष्टिरूप हा विस्तार त्या परमात्म्याचा आहे. म्हणून तो म्हटला आहे सुतन्तु.

७८५. तन्तु-वर्धन
तन्तुं वर्धयति छेदति इति तन्तु वर्धनः । जो तन्तु वाढवतो म्हणजे छेदतो तो म्हणावयाचा तन्तुवर्धन, विश्लेषण वा व्यूहन आणि संश्लेषण वा समूहन ही एकाच प्रक्रियेची दोन अंगे आहेत. दोन्ही मिळून एक प्रक्रिया संपूर्ण होते. सुतन्तु पदानें व्यूहन आणि तन्तुवर्धन पदानें परिसमूहन निर्देशिलें गेलें आहे. अव्यक्तांतून हा सर्व व्यक्ताकार प्रकटून परत त्या अव्यक्तांतच जेव्हां तो विलीन होतो तेव्हां सृष्टि प्रक्रियेचे एक चक्र वा मंडळ पूर्ण होते. कालौघांत ज्या प्रमाणें संवत्सरामागून संवत्सरें, कालचक्राची ही मंडळे, होत राहतात त्या प्रमाणें विश्वविसर्गाच्या अनाद्यनन्त प्रवाहांत जगदुत्पत्तिस्थितिलयाची ही मंडळे सारखी चाललींच आहेत. परमात्म्याचे हे विश्वरूप जे ओळखतात ते कोणत्याहि परिस्थितीत गडबडून जात नाहीत. "सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च" 'जगें येवोत जावोत ते अभंग जसे तसे.' हे सर्व विश्व पुसून टाकले जाणार आहे. हे ज्यांना पुरतें कळलें आहे ते अधर्मानें अभिभूत होऊन असत्य वहिंसा ह्यांचा आश्रय करीत नाहीत आणि लोभमूलक पापें आचरून स्वपरद्रोह करीत नाहींत. सर्व तत्त्वज्ञानाचे पर्यवसान हेच आहे. तत्त्वज्ञान म्हणजे सत्यज्ञान. रज्जूसर्पाचें तत्त्वतः ज्ञान झालें, सत्य ज्ञान झाले म्हणजे माणूस त्या रज्जूला रज्जू म्हणून ओळखतो आणि सर्पभयांतून मुक्त होतो. सर्पभयांतून मुक्त असल्यामुळे तो भयभीताप्रमाणें पळापळ वा हाणामारी करीत नाही. ही निर्भय समत्वयुक्त आत्मवशता तत्त्वज्ञानाचा म्हणजे सत्यज्ञानाचा परिणाम आहे. हे तत्त्व-ज्ञान नसल्यामुळे जगांत सर्व गोंधळ उडाला आहे. आणि तत्त्वज्ञानावांचून तो नाहीसा होणे नाही. वेदोनिषदांचा नि गीतेचा म्हणजेच वेदान्ताचा हा डिण्डिम आहे.

७८६. इन्द्रकर्मा
इन्द्रस्य कर्माण्येव कर्माणि यस्य सः इन्द्रकर्मा । इन्द्राची कर्मेंच ज्याचे पराक्रम होत तो इन्द्रकर्मा म्हणावयाचा. वेदांत इन्द्र हे परमात्म्याचें नांव आहे. तिथे इन्द्र म्हणजे कोणी लहानमोठी देवता असा अर्थ नाही. तो पौराणिक इन्द्र मागाहून आलेला आहे. इन्द्रानें, परमात्म्यानें, कोणकोणते पराक्रम केले आहेत ? त्याचा सर्वांत मोठा पराक्रम म्हणजे गाईंना कोंडून ठेवणाऱ्या वृत्राचा नाश करून त्यानें त्यांना मुक्त केलें हा. हा पराक्रम आध्यात्मिक, आधिदैविक आणि अधिभौतिक अशा त्रिविध रूपांत वर्णिला जाईल. ज्या मोहावरणामुळे मनुष्याच्या आत्मिक शक्ति कोंडून पडल्या आहेत त्याचा भेद करणे हा इन्द्राचा खरा पराक्रम. आत्मज्ञानानेच मोहावरणघात होतो. हे आत्मज्ञान बाहेरून कुठून होत नाही. तें अन्तरात्म्यांतून येते. म्हणून तो सर्वान्तर्यामी इन्द्र वृत्रघ्न म्हटला आहे. हा इन्द्र वृत्राचा नाश करतो, तसा खोट्या साधकांनाहि तो कोल्हयाकुत्र्यांचे भक्ष्य बनवतो. बाह्य देखाव्यानें आत्मज्ञान सिद्ध होत नाही.
चित्रीं सूर्यबिंब काढू येईल चांग ।
प्रकाशाचे अंग काढितां नये ।
संन्यासाचें सोंग आणूं येईल चांग ।
वैराग्याचे अंग आणितां नये ।
ब्रह्मज्ञानमुखें बोलूं येईल चांग ।
अनुभवाचे अंग आणितां नये ।
ज्ञानदेव म्हणे गुरुकृपा चांग ।
तरी चि हे भाग्य येईल हाता ॥

अंगी बाणलेल्या पूर्ण वैराग्यानेच तें सिद्ध होते. हे विषयवैराग्य निर्मोहतेचा सहज परिणाम होय. पुनः निर्मोहता स्वच्छ आत्मज्ञानाचा अनपहार्य असा अवश्यंभावी परिणाम होय. याचे बाह्य अनुकरण करतां येत नाही. तथापि तळमळीच्या प्रयत्नांत असिद्धीची विरहव्यथा असते. ढोंगांत सिद्धि नसतेच पण तळमळहि नसते अशा ढोंग्यांची तो इन्द्र, तो परमात्मा कृमि, विष्ठा आणि भस्म अशी त्रिविध गति करतो. आधिदैविक अर्थानें इन्द्र, सूर्यात्मा इन्द्र, ध्रुवप्रदेशांत सुमारे दोन महिन्यांच्या सुदीर्घ रात्रीच्या कोंडवाड्यांतून किरणांना घेऊन येतो. आधिभौतिक वा ऐतिहासिक दृष्टीनें आर्यांचा नरेन्द्र असुर वृत्रावर विजय मिळवून आपलें राजेन्द्रत्व प्रस्थापित करतो. अशा प्रकारे कोणत्याहि दृष्टीनें पहा परमात्मा हा इन्द्रकर्मा आहे.

७८७. महाकर्मा
महान्ति कर्माणि यस्य सः महाकर्मा । महान् आहे कर्म ज्याचें तो म्हणावयाचा महाकर्मा. कोणी कितीहि मोठा असो आणि त्यानें कितीहि अचाट पराक्रम केलेले असोत, तो आपण च हे जग निर्माण केलें आहे अशी बढाई मारू शकणार नाही. अथवा या जगाचा प्रतिपाळ आपणच करतो आहों असाहि दावा करू शकणार नाही. अथवा या जगाचा संहार आपणच करणार आहों असेंहि म्हणू शकणार नाही. असें बोलणे दूर, पण तसे मनांतहि आणणे कोणाला शक्य होणार नाही. मग महान् कर्म कुणाचे ? तें ज्याचें आहे तोच ईश्वर. तोच महाकर्मा म्हणावयाचा. ' नर करनी करे तो नरका नारायण हो जाय ' अशी म्हण आहे. पण हा नराचा नारायण झाला तरी तो जगदुत्पत्तिस्थितिलय करण्याचे सामर्थ्य नाहीं राखीत. तें ईश्वराचे राखीव खाते आहे. तिथे जीवाचा प्रवेश नाही. त्याला जगद्-व्यापार वर्ज्यआहे. शत क्रतु करून कोणी इन्द्र झाला, तरी त्यानें इन्द्राणीची अभिलाषा धरायची नाही. तशी ती धरणे म्हणजे पतन पावणे होय. जगद्व्यापाराची अभिलाषा तशीच आहे. तें महाकर्म आहे. तें ईश्वरी कर्म आहे. जीवाला तिथे प्रवेश नाही. अधिकार नाही. कर्तुं अकर्तुं अन्यथाकर्तुं सामर्थ्य ज्याचें, तो ईश्वर होय. म्हणूनहि तो महाकर्मा म्हणावयाचा. जीवाला झोप म्हटल्याबरोबर झोपतां येत नाही. झोपू नको म्हटले तर अनावर झोप आवरतां येत नाही. वृद्धाचा तरुण बाल होतां येत नाही. पण ईश्वर काय करू शकत नाही ? "देवं करी तरी काय न होई । दगडाचेनि नई तरिजेल " म्हणून तो महाकर्मा. अवतारांच्या चरित्रांत ज्या अद्‌भुत गोष्टी आहेत त्या परमेश्वराचे हे महाकर्मत्व प्रकट करण्यासाठीच होत.

७८८. कृतकर्मा
'इन्द्रकर्मा महाकर्मा' ही जशी नामांची एक जोडी आहे तशीच "कृतकर्मा कृतागमः" हीहि एक जोडीच आहे. इन्द्र म्हणजे त्या त्या वर्गातील ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष. देवेन्द्र नरेन्द्र असुरेन्द्र गजेन्द्र कपीन्द्र इत्यादि पदांत इन्द्रपद त्या अर्थानं आलेलें आहे. इन्द्र हा निरुपपद प्रयोग सर्वेन्द्रत्व सुचवितो, थोरपण सुचवितो. थोरांची कर्में करणारा तो इन्द्रकर्मा तसा थोर थोर कर्में करणारा तो महाकर्मा म्हटला आहे. इथे "कृतकर्मा कृतागमः" या जोडींत' जीवनसाफल्याची दोन अंगें, संस्कार आणि शास्त्रज्ञान, सुचविली आहेत. संस्कारपुत जीवनांत जीवनाचे रहस्य आकळू लागते. आणि जेव्हां तें रहस्य गुरुमुखानें आत्मप्रत्ययानें त्याला अवगत होते तेव्हांच तो कृतागम होतो, गृहीतागम होतो. वर्णाश्रमधर्माचें हे तात्पर्य आहे. खनिजावर संस्कार केले म्हणजे तें निजरूपानें सिद्ध होते. चित्तत्त्व में जीवखाणींतून लाभले आहे तेहि तसेंच संस्कृत केलें म्हणजे सर्व विजातीय उपाधिरूप हीण जळून जाऊन निखळ स्वरूपानें सिद्ध होते. हे संस्कार दोन प्रकारचे आहेतः १. कर्मप्रधान आणि २. ज्ञानप्रधान.. कर्मप्रधान प्राथमिक वा पूर्व संस्कार होत, ज्ञानप्रधान अन्तिम वा उत्तर संस्कार होत. शरीर आणि शरीरी यांच्या अनुषंगानेच हा द्विविध भेद झाला आहे. वस्तुतः ते दोन्ही परिणामतः एकच आहेत. तेव्हां कृतकर्मा म्हणजे ज्यानें वेदविहित सर्व वर्णाश्रम-संस्कार संपादिले आहेत असा. शास्त्रानें सोळा संस्कार सांगितले आहेत. आत्मचन्द्राचे सौन्दर्य सोळाहि कलांनी प्रकटावें असा सोळा संस्कारांचा उद्देश आहे. सोळा संख्या तशी लाक्षणिकच म्हटली पाहिजे. दोषापनयन आणि गुणप्रकाशन हे संस्कारांचे विविध प्रयोजन आहे. संस्कारांनीं गुणाधान होत नाही. गुण हे स्वाभाविक आहेत. संस्कारांनी ते वीर्यवत्तर होतात. परमात्मा हा निर्दोष व सर्वसद्गुणसंपन्न असल्यामुळे तो सहजच कृतकर्मा आहे. जीवाला संस्कारांच्या योगें ती पदवी प्राप्त करून घ्यावयाची आहे.

७८९. कृतागम
कृतः संपादितः आगमः शास्त्रं येन सः कृतागमः । अथवा कृतः निर्मितः आगमः येन सः कृतागमः । परमात्म्याला दोन्ही अर्यांनी कृतागम म्हणावयाचे. कृतः म्हणजे अधीतः संपादितः हा अर्थ धात्वर्थाला सोडून वाटतो. कृतः निर्मितः हा अर्थ म्हणून घेणे योग्य असें वाटेल. तसा तो घेतां येतोच परंतु कृतः म्हणजे अधीतः संपादितः हा अर्थहि योग्यच आहे. कारण कृ धातु हा सर्वार्थक आहे. . सर्व धातु क्रियावाचक आहेत आणि क्रियामात्राचा कृ धातु वाचक आहे. त्यामुळे तो एक मूल धातु आहे. सर्व नामेंहि धातुज आहेत. त्यामुळे त्यांचा बोध कार हे पद करतें. जसें ॐकार, होकार, नकार, देकार इत्यादि, तेव्हां कृतागम म्हणजे कृतशास्त्राधीति, ज्यानें शास्त्राचे अध्ययन केलें आहे तो. ज्यांनी आपलें संपूर्ण जीवन संस्कारपूत केले आहे त्यांच्या ठाईं शास्त्राध्ययनाची पात्रता येते. ज्याची नीट झोप झालेली नाही, ज्याचा प्रातर्विधि आटोपलेला नाही, ज्याचा प्रातराश झालेला नाहीं तो छात्र विद्याध्ययनास पात्र होत नाहीं विद्येचा रस त्याच्या पात्रांतून गळून जाईल. त्या प्रमाणें ज्याला सत्य आणि संयम या दोहोंचा यथेष्ट संस्कार नाहीं तो आगमास, ज्ञानास पात्र होत नाही. शास्त्रानें बुद्धीचे डोळे उघडतात. गुरुमुखी विद्येनें ह्या डोळ्यांत दृष्टि येते आणि आत्मप्रयत्नानें दर्शन होते. यांनाच शास्त्रप्रतीति गुरुप्रतीति आणि आत्मप्रतीति म्हणावयाचें. या तिहींचा समुच्चय म्हणजेच आगम होय. कारण तेव्हांच सम्यग्ज्ञानाचा आगम होतो, लाभ होतो. आणि हा लाभ म्हणजेच कृतकर्मता नि कृतागमता होय. कारण त्यानंतर काही कर्तव्य रहात नाही. म्हणजेच कांहीं ज्ञातव्यहि रहात नाही. अर्थात् कांहीएक अनवाप्त वा अवाप्तव्य-रहात नाही. तो कृतकृत्य होतो, तो सर्वविद् होतो.


उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्‍ननाभः सुलोचनः ।
अर्को वाजसनः श्रृंङ्गी जयन्तः सर्वविज्जयी ॥८५॥


७९0. उद्‌भव
उद्‌भवति भूतमात्रं अस्मात इति उदभवः ज्याच्या पासून हे भूतमात्र उद्‌भूत होतें तो उद्‌भव म्हणावयाचा. भव, उद्‌भव, प्रभव, संभव इत्यादि भू धातूची कृदन्तें समानार्थकच आहेत. त्या सर्वांचा अर्थ उत्पत्ति वा उत्पत्ति-कारण असा आहे. गीतेच्या पुढील वचनांत आपल्याला ती आढळून येतात. 'भवोऽभावः' 'मृत्युः सर्वहरश्चाहं उद्‌भवश्च भविष्यताम् 'अहं सर्वस्य प्रभवः' 'संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत' इत्यादि. 'मृत्युः सर्वहरश्चाहं उद्‌भवश्च भविष्यताम्' या वचनांत परमात्मा हा सर्वांचा अंत तसा आरंभ म्हटला आहे. अंत जन्मलेल्याचा म्हणजे भूतांचा, आरंभ जन्मणाऱ्यांचा म्हणजे भावींचा. त्याला अनुसरून च आधीं मृत्यु आणि मग उद्‌भव पद आले आहे. हा क्रम साभिप्राय आहे. जीवांच्या वा सत्वांच्या दोनच कोटी होतातः १. उत्पन्न झालेले म्हणजे भूत आणि २. उत्पन्न व्हावयाचे म्हणजे भविष्यत्. (या क्षणीं उत्पन्न होत असलेलें म्हणजे भवत् हे पाहतां पाहतां भूतसात् होऊन जाते. म्हणून तें भूतांत च गणलें आहे.) परमात्मा हा भूतांना मृत्युरूप आणि भविष्यतांना उद्‌भवरूप आहे. अशी त्याची ही द्विविध रूपें, परस्पर-विरुद्ध रूपें परस्पर-विरुद्ध दिसली तरी ती एका अव्यक्त अक्षर परमात्म्याचीच होत. सर्व भूतें शेवटी त्या अव्यक्तांतच लीन होतात. सर्व (व्यक्त) होणारे त्या अव्यक्तांतूनच उद्‌भूत होते. म्हणून मृत्यु म्हटल्यानें भ्यायचे वा उद्‌भव म्हटल्यानें हरखायचे कारण नाही. या व्यक्तमध्य विश्वाचा आदि-अंत सदैव अव्यक्ताधीन च आहे.
उत् उत्तमः भवः जन्म यस्य सः उद्‌भवः| ज्याचा उत्तम आहे भव, मंगल आहे जन्म तो म्हणावयाचा उद्‌भव. अथवा उद्गतः निर्गतः भवः यस्य सः उद्‌भवः । ज्याचा भव उद्गत म्हणजे बाहेर पडला आहे, दूर झाला आहे. तो म्हणावयाचा उद्‌भव. शंकराचार्यांनी ह्या दोन व्युत्पति दिल्या आहेत. परंतु त्यांचे खास प्रयोजन नाही. उद्‌भव पद जगदुद्‌भव म्हणून सरळ लागणारेंच आहे. मुद्दाम आडवाटेला जाण्याचे कारण नाही.

७९१. सुंदर
मृदु मृदुल, बहु बहुल, पृथु पृथुल तशी मुख मुखर, सुंद सुन्दर, कुन्द कुन्दर ही रूपें होत. दोन्ही समानार्थक आहेत. व्द्यक्षर पद विशेषण आहे तसें त्र्यक्षर पदहि विशेषणच आहे. पण ते अतिशयवाचक आहे. मृदु म्हणजे मऊ, पण मृदुल म्हणजे खूपच मऊ अथवा मऊ मऊ. ल आणि र हे स्वार्थे प्रत्यय आहेत. स्वार्थे म्हणजे मूल अर्थानें आलेले, मूळच्या अर्थात बदल न करणारे-जसे बाल बालक. क, र, ल हे स्वार्थ प्रत्यय मूल पदाच्या अर्थात फरक करीत नसले तरी भावांत फरक करतात. बाल म्हणजे मुलगा व बालक म्हणजेहि मुलगाच, प्रौढ माणूस नव्हे. पण क प्रत्यय आत्मीयता, वात्सल्य इत्यादि भाव सुचवितो. राम तोच रामू, पण रामू पदांत वात्सल्य सूचित होतें, आत्मीयता सूचित होते. त्या प्रमाणें सुंद म्हणजे छान, तर सुन्दर म्हणजे छान-छान, अतिशय सुरेख,परम रमणीय, परमात्मा हा परम सुन्दर आहे. कारण त्याचें नाम रूप गुण कर्म सारेंच सुंदर आहे. जगांत असे निर्दोष परिपूर्ण सुन्दर कांहीं आढळत नाही. नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा, अशीच स्थिति प्रायः आढळून येते. पण नामहि सुन्दर नाही असे किती तरी लोक समाजांत आढळतात. दगड्या धोंड्या पुंज्या कचऱ्या लांडगे कोल्हे वनकुतरे बोकडे माकडे ही कसली नांवें ? सुंदर नांव ठेवणे तुमच्या हातचे आहे. त्याला पैसे पडत नाहीत, पण ती उच्च अभिरुचि पाहिजे ना ! रूप देवाचें देणे आहे, पण जें रूप देवानें दिलें तें स्वच्छ प्रसन्न नीट नेटके ठेवणे तुमच्या हाती आहे. पण नाहीं, माणूस मलिन दुर्मुख गबाळ राहतो. गुण चांगले अंगी बाणवून घेता येतात. पण आळसानें अनास्थेनें माणूस वाया जातो. तो आळस अनाचार व्यसन आणि पाप यांच्या आहारी जातो. कर्में पुण्य अशी करतां येतात. पण तो पाप आचरून नरकाला जातो. अशा प्रकारे माणूस सुन्दर परमात्म्याचा द्रोह करून आनंदलोकाला मुकत असतो. जो सुंदराची उपासना करील तो सुंदरच होईल. नाम रूप गुण कर्म सुन्दर बनेल, सर्व सुंदर, परम सुंदर होईल.

७९२. सुन्द
सुंद आणि सुंदर एकार्थकच मानल्यानंतर सुन्द पदाचे विवेचन परत करायला नको. सुंदर शब्द सुंद+र असा बनला आहे असे आपण पाहिलें आहे. पण सुंद शब्द कसा बनला आहे ? वैयाकरणांची पद्धति सर्व शब्द धातूंवरून व्युत्पादिण्याची असते. ते सुन्द् धातूवरून सुन्दः आणि सुन्दरः ही पदें आलीं म्हणतील. परंतु सर्वच शब्द धातूवरूनच निष्पादिले आहेत असे म्हणणे सत्याला धरून होणार नाहीं. उदाहरणार्थ उच्चावच हा शब्द पाहिला तर तो उत् + च आणि अव +च अशा केवळ निपातांच्या गटांचा बनला आहे असे आढळून येईल. म्हणजे व्युत्पादन आणि निपातन अशा दोन्ही प्रकारांनी वा त्यांच्या मिश्रणानें शब्द-सिद्धि होते असें म्हणावयाचे. इथे सुंद पदांत सु आणि द या दोन प्रतीकरूप अक्षरांनी शब्दसिद्धि केली आहे. अनुस्वार द्वितीयेचा प्रत्यय आहे. पैकी सु हा निपात व द हे धातुबीज होय, सुं सुखं ददाति इति सुन्दः जो सुख देतो तो सुंद, सुंदर वस्तूच्या दर्शनानें श्रवणानें स्पर्शानें आस्वादनानें वा अवघ्राणनानें जीवाला सुख होतें. इतकेच नव्हे तर त्याच्या स्मरणानेहि जीव सुखावतो. ' म्हणजे ज्याची कल्पनाहि सुखद आहे तें वस्तुतः किती सुंद म्हणावयाचें ? सुंद हे नाम आज प्रचलित नाही.. पण एके काळी तें होतें. तिलोत्तमा आणि सुन्दोपसुन्द यांची पौराणिक कथा प्रसिद्धच आहे. तिलोत्तमेच्या सौंदर्यानें सुंद आणि उपसुंद यांना मरणहि गोड झालें. सौंदर्याची गोडी ही अशी अद्‌भुत आहे. मोरोपंत म्हणतात "सुन्दाची उपसुन्दी . उपसुन्दाची गदा पडे सुन्दीं । तन्मरण-मुदुद्धासें गणपतिच्या कळ नुठेल कां तुन्दीं ॥ " सौंदर्याची मीमांसा करणे, त्याचे विश्लेषण करणे सोपें नाही. त्याची व्याख्या करता येत नाही. पण तिचें तात्पर्य सुंद पदाच्या 'सुखं ददाति इति सुन्दः' या व्युत्पत्तींत सांठलें आहे असे म्हणता येईल. परमानन्दरूप म्हणून परमात्मा उघडच सुन्द होय.

७९३. रत्ननाभ
पद्मनाभ पद प्रसिद्ध आहे तसें रत्ननाभ पद नाही. वस्तुतः पद्म वा रत्न कोणाच्या नाभीच्या ठाई असत नाही. मग हीं पदें कोणत्या अर्थानं घ्यावयाचीं ? नाभि पद योनि या अर्थानें घ्यावयाचें. योनि म्हणजे उत्पत्ति-हेतु. परमात्मा हा या लोकपद्माचा उत्पत्तिहेतु आहे. हे अष्टदल लोकपद्म त्या अव्यक्तगत अक्षरकंदापासून उगवलें आहे. म्हणून तो परमात्मा पद्मनाभ म्हटला आहे. तसाच तो रत्ननाभ आहे. रत्नमात्र त्या परमात्म्याच्या पासून आले आहे. म्हणून तो रत्ननाभ म्हणावयाची. पण रत्न म्हणजे काय ? चमकदार लालहिरव्या गारगोट्या ?, नाहीं. रत्न म्हणजे धन. पण धन म्हणजे तरी काय ? पिवळे ढवळे सोन्याचांदीचे दगड ? नाहीं. धन म्हणजे जीवनोपाय. इसापाचा कोंबडा खरा रलपारखी. तो उकिरड्यावर सांपडलेलें रत्न लाथाडून दाणा टिपतो. परमात्मा हा सकल जीवनोपाय आहे. म्हणून तो रत्ननाभ म्हटला आहे. परमात्म्यानें ही पंच महा भूतें जीवांच्या जीवनासाठी निर्मिलीं आहेत. तीच महारतें होत. त्यांचा जीवनोपकारक उपयोग करून घेणेंच रत्नपारखीपणा होय. तसा तो न करतां तथाकथित रत्नांच्या,हिर्‍यामाणकांच्या व सोन्यारुप्यांच्या पाई स्व-पर जीवनाचा द्रोह करणे म्हणजे गाजरपारखीपणा होय. गाजरपारखीशब्द गाजराचा अपमान करणारा आहे. सोनेरी गाजर सत्वयुक्त असून ते जीवनदायी आहे, उलट हिराहिरकणी खाल्यास प्राणान्त होतो. पण गाजर शिळे होतें, विटते, कुजतें, नाहीसे होते. आणि तें खाऊन लाभणारें भौतिक जीवनहि तसेंच नश्वर असते. रत्न असें नाहीं. तें टिकाऊ आहे. तसें जें आत्मतत्त्व त्याचे जें जीवन तें शाश्वत होय. तेंच खरें रत्न म्हणावयाचे आणि त्या चिरंतन जीवनाचा झरा आहे परमात्मा. म्हणून तो म्हटला आहे रत्ननाभ. ज्ञानदेव म्हणतातः
अमोलिक रत्न लाभलें रे तुज ।
कां रे ब्रह्मबीज नोळखसी ।
न फुटे न तुटे न भिये चोरा ॥
ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥


७९४. सुलोचन
सु शोभनें लोचनें अस्य इति सुलोचनः ! सुंदर आहेत डोळे ज्याचे तो सुलोचन म्हणावयाचा. पाहणे हे डोळ्याचे कार्य. तें जो उत्तम करील तो सुलोचन म्हटला जाईल. जागृतींत आमचे डोळे सारखी उघडझाप करीत असतात. आणि निद्रेत तर ते पार मिटलेले असतात. म्हणजे सतत ते पाहूं शकत नाहींच, पण त्यांच्या दृष्टीचा टप्पाहि फारच छोटा असतो. शिवाय जवळचे बरें, दूरचे अंधुक अंधकच त्यांना दिसते. निरनिराळ्या जीवांची दृक्शक्ति वेगळी वेगळी आहे, माणसाला जितकें लांबचें व स्वच्छ दिसतें त्यापेक्षां गृध्राला खुपच लांबचें व अगदी स्पष्ट दिसते. परंतु ही त्याची दृक्शक्ति कांहीं झालें तरी परिमितच आहे. परमात्म्याची दृशक्ति असीम आहे, अपरिमित आहे. तो तिन्ही लोक आणि तिन्ही काळ यांचा निरंतर साक्षी आहे आणि या सर्वसाक्षित्वाला अनुलक्षूनच त्याला सुलोचन म्हटले आहे. परमात्म्याचे हे सर्वसाक्षित्व सूर्याच्या ठाई दिसून येते. तो तिन्ही लोक स्वोक अन्तरिक्ष आणि भूलोक सारखा प्रकाशित करीत आहे. तोच काल प्रकाशित करीत होता, तोच आज करीत आहे, तोच उद्या प्रकाशित करणार आहे. त्यानेच मागील कल्पांत विश्वप्रकाशन केलें आहे. चालू कल्पांतहि तोच करीत आहे. आणि आगामी कल्पातहि तोच करणार आहे. वेदानें म्हटले आहे - "सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वं अकल्पयत्"या सर्वसाक्षित्वामुळे तो भगवन्नेत्र झाला. आणि हे लक्षूनच कदाचित पुढील पद अर्क असें आले आहे. पण हे सादृश्य आणि गौरवं इथेच संपतें. सूर्य सर्व विश्वाला प्रकाशित करीत असला तरी आपल्याला तो जाणत नाही म्हणून एक चित्सूर्य च सर्वसाक्षी होय. त्याला अज्ञात असें या सृष्टीत कधीं कांहीं घडूच शकत नाही. म्हणून तो चिदात्मा सुलोचन होय.

७९५. अर्कः
अर्च्यते इति अर्कः । जो पूजनीयतम ब्रह्मादिकांकडून अर्चिला जातो तो म्हणावयाचा अर्क, परमात्मा हा सर्व देवनमस्कृत, सर्व लोकनमस्कृत होय, म्हणून तो अर्क म्हटला आहे. त्या परमात्म्याचा प्रतिनिधि म्हणून सूर्यहि अर्क म्हटला जातो. तोहि देवदेव आहे.
" यस्योदयास्तसमये सुरमुकुट-निघृष्टचरणकमलोऽपि ।
कुरुतेऽञ्जलिं त्रिनेत्रः स जयति धानां निधिः सूर्यः ॥ "

ऋचांनी अर्चिला तो अर्क. यजूंनीं यजिला तो यज्ञ आणि सामांनी सामिला तो म्हणजे गाइला तो साम होय. तीन वेदांनी स्तविलेल्या वेद-पुरुषाची ही तीन नामें होत. अर्क हे त्यांत पहिले आणि ऋग्विषय होय. "ऋचांनी अर्चिती ज्यास यजूंनी यजिती जया || सामें सामावली जेथ वेदरूपास त्या नमो ॥ " असें जें वेदपुरुषाचें नमन महाभारतांत आले आहे तेहि परमात्म्याचे ऋग्विषयत्व आणि अर्कत्व द्योतित करीत आहे. असा हा अर्क विश्वाच्या अन्तर्यामांत परमात्मरूपानें, अंतरिक्षांत सूर्य रूपानें आणि नेत्रांत नेत्रज्योतीरूपानें विराजमान आहे. यालाच "हंसः शुचिसद् वसुरन्तरिक्षसद् आणि अतिथिर् दुरोणसद्" म्हटले आहे. तेंजें अर्चनीयतम परमात्म-तेज आहे, ज्याला इथे अर्क म्हणून म्हटले आहे, वेदसार गायत्रींत ज्याचें ध्यान करायला सांगितले आहे, तोच निरभ्र आकाशात प्रखर सूर्यरूपानें, साभ्र आकाशांत सगर्जन विद्युदरूपानें आणि घरी यज्ञकुंडांत दिव्यांत वा चुलींत सधूम अग्निरूपानें वसला आहे. आम्ही जेव्हा जेव्हां भवन-भास्कर दिव्याला वा भुवनभास्कर सूर्याला नमस्कार करतों तेव्हां तो नमस्कार त्या अर्चनीयतम अर्काला परमात्म्याला असतो. "सर्वदेव-नमस्कारस् तं अर्क प्रतिगच्छति."

७९६. वाजसन
वाजं अन्नं सनोति ददाति इति वाजसनः । जो अन्नदान करतो तो वाजसन म्हणावयाचा. कोणताहि यज्ञ असृष्टान्न होता कामा नये. मन्त्रहीन आणि अन्नदानहीन यज्ञ तामस म्हटला आहे. मन्त्र म्हणजे देवाचें नाम होय. आणि दान म्हणजे देवाचें काम होय. या दोहोंनी मिळून आस्तिकता होते. जो देवाचें नाम मात्र घेतो पण अन्नदान मात्र करीत नाही, तो भेटणाऱ्या भूतांत देवाला ओळखीत नाही हे उघड आहे. अशाला आस्तिक कसें म्हणावयाचें ? म्हणून प्रत्येक धर्मात म्हणजेच आस्तिक मतांत देवाच्या नामानें देवाचें कामहि झाले पाहिजे असा दण्डक आहे. कारण आस्तिकतेचें तें प्रत्यक्ष प्रमाण आहे. मंत्र वा नामग्रहण म्हणजे शाब्दिक प्रमाण होय. प्रत्यक्ष प्रमाण असल्यावर शाब्दिक प्रमाण देण्याची गरज मानलेली नाही. कोणी नैवेद्य वैश्वदेव श्राद्धतर्पण अतिथिअभ्यागत-पूजन करीत असल्यावर तो वैदिक आहे म्हणून नामोच्चार करावा लागत नाही. पण कोणी मन्त्रोच्चार करीत असला आणि यज्ञयाग श्राद्ध-तर्पण, दानधर्म कांहीं करीत नसला तर त्याला वैदिक वा आस्तिक केवळ मन्त्रोच्चारावरून वा नामोच्चारावरून मानतां येत नाही. , त्यासाठी दानधर्मरूप प्रत्यक्ष प्रमाण हवें. तेव्हां वाजसन हा आस्तिक होय आणि अवाजसन हा नास्तिक म्हणावयाचा. त्यालाच वेदांनी केवलादी म्हटले आहे.
"मोघं अन्नं विन्दते अप्रचेताः, सत्यं ब्रवीमि वध दूत् स तस्य । नार्यमणं पुष्यति नो सखायं केवलाघो भवति केवलादी ॥ केवलादी म्हणजे आप्पलपोट्या. जो देवांना पितरांना आप्तेष्टांना अतिथि-अभ्यागतांना आणि भूतमात्राला उपेक्षून त्यांच्यांत आपल्या कमाईचा संविभाग न करता केवळ आपलेंच पोट भरतो तो वास्तविक आत्मद्रोही होय. त्यालाच गीतेनें "अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति' म्हणून म्हटलें आहे. केवळ परार्थ जीवन हा उत्तम आदर्श होय. त्याचंच नांव यज्ञ. त्या खालोखाल म्हणजे यज्ञशेष-ग्रहण करून जगणे म्हणजेच संविभज्य जीवन होय. असंविभज्य जीवन म्हणजे केवलादिता होय. हे निंद्य, अधम होय. आणि परद्रोह करून जगणे म्हणजे अधमाधम जीवन होय. अशी ही जीवनाची चतुरुविध स्थिति आहे. माणसानें निदान परद्रोह आणि आप्पलपोटेपणा न करता जगायला शिकावें असें वाजसन पद सांगत आहे. हीच वाजसनेयी संहिता होय.

७९७. शृंगी
शृंगवान् तो शृंगी म्हणावयाचा. पण शृंगी आणि शृंगवान् या दोन पदांत इन् आणि मत् असे वेगवेगळे प्रत्यय आहेत. त्यांना अनुसरून काही वेगळा भाव त्यांत असला पाहिजे. इन् प्रत्यय मुख्यतः जातिवाचक आहे, तर मत्प्रत्यय व्यक्तिवाचक आहे. हस्ती म्हणजे ज्याला हस्त, सोंड असते असा प्राणी; हस्तवान् म्हणजे ज्याला विशेष कुशल हस्त आहेत असा कारागीर. म्हणजे इन् प्रत्यय नित्यत्व सुचवतो, तर मत् प्रत्यय गौरव सुचवितो असें म्हणावयाचे. तदनुसार शृंगी म्हणजे शृंगधर प्राणिवर्ग समजावयाचा. प्रत्येक प्राण्याला दैवानें काही विशेष दिलेले आहेत. ते विशेष त्या प्राण्यांना शोभाहि देतात आणि गौरवहि देतात. शृंग हा तसाच एक विशेष आहे. त्यावरून च शृंगार शब्द आला आहे. शृंगार म्हणजे शृंगाकारच होय. शृंगाच्या योगें प्राणी नजरेत भरतो. एडके, काळवीट, सांबर, बैल, गवे, म्हैसे, गेंडे यांची शिंगें किती सुंदर दिसतात. त्यांनी शिकारी आपले दिवाणखानें सजवितात. वनजारी म्हणजे वनचारी लोकांत तर स्त्रिया, ज्या शृंगाराच्या शौकीन म्हणून सर्वत्रच प्रसिद्ध आहेत, केसांत एक शृंगसदृश काडीच खोवून घेतात आणि आपल्याला शृंगी बनवतात. पण शृंग- हें केवळ भूषण नाही. तें शस्त्रहि आहे. म्हणून म्हटले आहेः
शृंगीणां च नखीनां च नदीनां शस्त्रपाणिनाम् ।
विश्वासो नैव कर्तव्यः सद्यःप्राणहराहि ते ॥

बैल शिंग केव्हां मारील त्याचा नेम नाही, म्हणून जपूनच रहावें. मांजर खेळत असले तरी खेळतां खेळा आपली वाघनखें काढून केव्हां ओरबाडील त्याचा नेम नाही. नदीचे पाणी चढून केव्हां गांव वाहून जाईल त्याचाहि भरवसा नाही. तसेंच शस्त्रधारी शिपाई केव्हां वरदळीवर येऊन मारील त्याचाहि नेम नसतो. म्हणून त्या सर्वांपासून फार जपूनच राहिलें पाहिजे, असा आशय. पण हा परमात्मा शृंगी म्हटला आहे तो प्राणहर म्हणून नव्हे, तर संरक्षक म्हणून होय. त्यानें प्रलय-पयोधिजलांत आपल्या शिंगाला बांधून मनूच्या तरणीचे तारण केलें, मनूला आणि वेदरूप प्राचीन ज्ञानाला प्रलयांतून वाचवलें म्हणून तो शृंगी म्हणून स्मरला आहे. एरव्हीहि वैशिष्ट्यरूप त्याची शिंगे असंख्यच आहेत. म्हणूनहि तो शृंगी होय.

७९८. जयन्त
जी जय् धातूपासून वर्तमानकालवाचक कृदन्त होतें जयत्, मग हे जयन्त कसे ? त्याचे पुंल्लिंग प्रथमा बहुवचनाचे रूप आहे तें. तेंच एकवचनाचे कल्पिलें आहे. मराठीत भगवान् आणि भगवन्त, श्रीमान् आणि श्रीमंत अशी दोन्ही नामें चालत आहेत त्याच प्रमाणें हे संस्कृतमध्येहि आहे. या सारखाच दुसरा शब्द सन्त हा आहे. भगवान् श्रीमान् सन् हे प्रथमेचे एकवचनी शब्द प्रायः विशेषणे होत आणि भगवन्त श्रीमन्त सन्त हे शब्द नामें होत. तसाच प्रकार जयन् म्हणजे जिंकता आणि जयन्त म्हणजे नित्यजयशील या शब्दांबाबतहि दिसतो. जयन्त सन्त हीं पदें प्रथमा एकवचनाची म्हणून आली आहेत, त्यांची व्यवस्था व्याकरण मग कशी का लावीना. व्याकरण हे प्रयोगशरणच आहे. तसा भाषाप्रयोग व्याकरण-शरण नाही. तो स्वतंत्र आहे. भाषेचें हें तन्त्र शोधून त्याची व्यवस्था व्याकरण लावत असते. शिवाय गच्छन्ती हसन्ती जयन्ती इत्यादि ईकारान्त स्त्रीलिंगी रूपें गच्छन्त हसन्त जयन्त अशी पुल्लिगी पदांची अपेक्षा करतात, असें म्हणता येईल. वसन्त, हेमन्त हे शब्दहि तसेच आहेत. श्रीमन्त भगवन्त हे शब्द "मत्-वत्" प्रत्ययान्त आहेत तसे हे नाहीत. ते शत्रन्तच आहेत. ही झाली शब्द-चिकित्सा. अर्थ सरळ आहे. जो नित्य जयशील आहे तो म्हणावयाचा जयन्त. जो आधी प्रतिपक्ष कल्पितो, त्यामुळे द्वंद्व वा प्रतिकार कल्पितो, आणि त्यांत प्रतिपक्ष-पराभव- . पूर्वक जय मिळवितो तो भले विजयी म्हणवो. परंतु तो जयन्त नव्हे. जयन्त हा सहज जयवन्त आहे. त्याला कोणी परका नाही. सर्व तोच आहे. त्यामुळे त्या अद्वितीयाला कुणाचें व कशाचेहि भय नाही आणि असें असल्यामुळे तो परमात्मा जयन्त म्हटला आहे. जयन्ताचे भक्तहि जयन्त होत. ते म्हणतात "नहि कोई बैरी नहि बेगाना सकलसंग हमरी बनी आई । जो प्रभु किन्हो सो भल मान्यो यह सुमति साधुते पाई । " आणि ह्यामुळे तेहि जयन्त झाले.

७९९. सर्वविद् (जयी)-१
सर्वविद् जयी अशी दोन पदें न घेतां तें एक जोडनाम कल्पिलें आहे सहस्रसंख्या-निर्वाहाकरिता. पण सहस्र संख्येचा इतका बाऊ करण्याचे कारण नाही. शेंकडे जर १०५, १०८, ११४, १२० असे शतातिरिक्त होऊं शकतात, तर सहस्रहि सहस्रातिरिक्त व्हायला हरकत कोणती ? चार आठ नामांच्या आधिक्यानें सहस्रत्व भंगण्याचे कारण नाहीं. अशी दृष्टि ठेवली म्हणजे "सर्वविज्जयी" असली अनर्थक नव्हे पण असंबद्ध जोडनामें कल्पिण्याचे कारण राहणार नाही. सृष्टि महोदार आहे. तींत मोजलेमापलेपणाची कंजूषी नाही. ती अमितं-द आहे. पारिजाताची स्वर्गीय फुलें म्हणजे तारे किती आहेत, त्याची मोजदाद नाहीं, तशीच त्याची अतिस्वर्ग म्हणजे भौम फुलें किती येतात नि किती गळतात त्यांचीहि गणति नाही. अशी ही प्रतिभेची लीला आहे. तिथे संख्याबन्धन नाहीं. सहस्राला तसेंच संख्येचे बन्धन नाहीं, केवळ निबन्धन आहे. म्हणून सर्वविद् आणिं जयी ही दोन स्वतंत्र पदें घ्यायला काहीच हरकत नाही. तशी घेतल्यास "सर्वं वेत्ति विन्दते वा इति सर्वविद्', आणि "जयवान् इति जयी' असें त्यांचे व्युत्पादन होईल. परमात्मा चिद्रूप असल्यामुळे सर्ववेत्ता आहे आणि ज्ञानाधीन च सर्व संपादन असल्यामुळे आणि ज्ञानपर्यवसायीच असल्यामुळे सर्ववित्तहि तोच आहे. अशा प्रकारें तो वेत्ति विन्दते या उभय अर्थानें एकसमयावच्छेदें करून सर्वविद् आहे. आणि त्यामुळेच तो जयीहि आहे. ज्ञानावांचून संपादन नाहींच आणि संपादनीयहि नाहींच. त्यामुळे ज्ञानावांचून इतर कांहीं जो संपादील तो मळी जयी नहे. कारण जयी म्हणजे वस्तु-जयी, शून्यजयी नव्हे.

७९९. (सर्वविद्) जयी-२
सर्वविद् आणि जयी ही दोन नामें आपापतः असंबद्धशी वाटतात. आणि म्हणून ती वेगळी वेगळी घ्यावी असे म्हटले. पण जरा अधिक खोल पाहतां या जोडनामांत सामाजिक संबंध दिसुन येतो. आणि त्या दृष्टीनें ती नामें सुसंबद्धच होत. चतुर्वर्णबद्ध समाजांत ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे वरिष्ठत्व आहे. आणि त्याचा संकेत सर्वविद् आणि जयी ही पदें करीत आहेत. ज्ञान हे ब्राह्मणाचें लक्ष्य तर दिगविजय हे क्षत्रियाचे लक्ष्य. ती दोन्ही संपादणारे सर्वज्ञ ब्राह्मण आणि चक्रवर्ती राजे हे परमेश्वरी आविर्भाव होत. कारण परमात्मा हाच परिभू आहे. त्यानें सर्व कवळिलेलें आहे. त्याच्या अधीनच हे सर्व काही आहे. त्याचे ज्ञान सर्वातिशायी आहे, त्याचे बल सर्वातिशायी आहे. परमात्म्याचे ज्ञान आणि बल सर्वातिरिक्त सर्वंकष असले तरी तें विभक्त नाही.तें एकवटलें आहे. आणि हेच रहस्य हे जोडनाम सांगत आहे. समाजांतहि जोवर ज्ञानाधीन बल राहते आणि बलयुक्त ज्ञान राहतें तोवरच जय असतो. जेव्हां राजसत्ता धर्मज्ञानाची अवज्ञा करते तेव्हां ती आसुरी होऊन स्वक्षयासच कारण होते. जेव्हां ज्ञान समाज-नियन्त्रणतन्त्रस्वरूप राजसत्तेची उपेक्षा करते तेव्हां तें अरण्यरुदन ठरतें. व्यासांना म्हणावे लागतेंः " ऊर्ध्वबाहर्विरौम्येष, नच कश्चित्शृणोति माम् । धर्मादर्थश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते ॥ " ज्ञानावर रडायची व सत्तेवर उन्मत्त होऊन स्वक्षय करून घ्यायची पाळी येऊ नये म्हणून दोहोंचा समुच्चय पाहिजे, समन्वय पाहिजे, असें हें जोडनाम सुचवीत आहे. खरे म्हणजे ज्ञान बल पोषण आणि परिचर्या या चारी तत्त्वांचें सत्कारपूर्वक सम्यक् सेवनच कल्याणप्रद आहे. एकाचीहि उपेक्षा असुखावहच होय. संतुलन पाहिजे तेंच तारक. प्रस्तुत मुख्य विचार हा की समाजनियंत्रणाचें आभ्यंतर व बाह्य तंत्र, ज्ञान व शासन यांपैकी एकाचीहि उपेक्षा होता कामा नये. आणि ती परस्परपूरक असावी किंवा असली पाहिजेत. ज्ञान सत्ताधिकारी पाहिजे, सत्ता ज्ञानाधीन पाहिजे, तरच 'जय जगत् होणार.




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP