ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

भूतावासो वासुदेवः सर्वासुनियलोऽनलः ।
दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥७६॥


७०८. भूतावास
मागील श्लोकांत सगुण पक्ष आल्यानंतर परत या श्लोकार्धात निरगुणाकडे गति झाली आहे. नदीला जसे दोन तीर असतात आणि प्रवाह कधीं या तीराकडून तर कधी त्या तीराकडून वाहतो त्या प्रमाणेंच विचार-प्रवाहाचेहि आहे. तो कधीं सगुणाकडे तर कधी निर्गुणाकडे वळतो. वस्तुतः तो उभयकूल-विशिष्ट दिसत असला तरी अकूलच असतो. कूल तद्बाह्य आहेत. तो आपला स्वस्थ असतो. केवल स्वरूप असतो तो. कोणत्याहि कूलाकडून प्रवाहित झाला तरी प्रतिकूलाला सोडून असत नाही. त्याला पर्यायानें धरून असतो. अर्थात् सगुण सदैवच निर्गुणगर्भ असते आणि निर्गुण सगुणगर्भ असतें. सगुणाला सदैव निगुणाची मर्यादा असते आणि निर्गुणाला सगुणाचा जिव्हाळा ओलावा रेखा असते, गालबोट असते.
परमात्मा हा भूतांचा आवास आहे, आश्रय आहे. भूतें व्यक्त आहेत. त्या व्यक्ताचा आश्रय अव्यक्त आहे. अव्यक्तांतून ही सगळी भूतें येतात, काही काळ या जगाच्या रंगभूमीवर वावरतात आणि परत ती त्या अव्यक्ताच्या पडद्याआड नाहीशी होतात. म्हणून तो परमात्मा भूतावास म्हणजे भूतांचा आश्रय म्हटला आहे. "भूतानां आवासः” वा "भूतानां आवासः अस्मिन्" असा विग्रह करून या सामासिक पदाचें चिंतन केलें. आता "भूतानि आवासः यस्य सः भूतावासः" असा षष्ठीबहुव्रीहि घेऊनहि अर्थ करता येईल. म्हटलेच आहे-"ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति' अर्थात् ईश्वर हा हृदयांत जीव रूपानें स्थित आहे. म्हणूनहि तो भूतावास म्हणावयाचा. या भूतावासाला पाहत असल्यामुळेच प्रह्लादानेंहिरण्यकशिपूला म्हटले की तो परमात्मा जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र विराजमान आहे.

७०९. वासुदेव
मागील पदांतील (आ) वास पदाचें दाम म्हणजे सूत्र पकडून हे वासुदेव पद स्फुरलें आहे. म्हणजे हे दामयमक आहे. आणि त्याचा आशयहि पूर्व पदासारखाच आहे. "भूते भूते आवसति इति भूतावासः" भूतमात्राच्या ठाईं तो परमात्मा वसला आहे म्हणून तो भूतावास म्हणावयाचा. आणि वासुदेव म्हणजेहि तेंच. "ईशावास्यं इदं सर्वम्" या वेद वाक्याचा अनुवाद वासुदेव पद करतें. वासुदेव म्हणजे हे सारे जग वसविणारा. जगांत जे काही आहे ते सर्व ईश्वरानें वसविलेलें आहे. वसविणारा म्हणून वासु आणि ईश्वर म्हणजे देव. असें हें निरुक्त आहे. ही व्युत्पत्ति नव्हे. निरुक्त कल्पनाप्रधान वा भावप्रधान असते, व्युत्पत्ति ही शब्दनिष्ठ असते, व्याकरणविषय असते. निरुक्ति कल्पनाप्रधान वा भावप्रधान असली. तरी तिलाहि शब्दाचा आधार लागतोच. पण ती शब्दबद्व नसते. स्वैर अर्थानं त्या शब्दांचा ती उपयोग करून घेते. तिची शब्दावर अर्थ बसविण्याची प्रक्रिया स्वैर असते. व्याकरण-व्युत्पत्तीनें जिथे इष्ट अर्थ संपादितां येत नाही तिथे निरुक्ति उपकारक होते. (१) वसुदेवस्य अपत्यं पुमान् वासुदेवः (२) वासयति इति वासुः । वासुश्च असौ देवश्च इति वासुदेवः (३) वासयति आच्छादयति इति वासुः माया । वासोः मायायाः देवः पतिः इति वासुदेवः । इत्यादि प्रकारें वासुदेव शब्दाची व्युत्पत्ति लावली जाते. आणि ती ठीकच आहे. एवढे मात्र खरें की एक व्यक्तिवाचक वासूदेव आहे आणि दुसरा सर्वान्तर्यामी परमात्मवाचक आहे. हे दोन्ही कुठे फुटतात, कुठे एकवटतात. "अविभक्तं विभक्तेषु विभक्तमिव च स्थितम्" असे ते आहेत. नदीचे अनेक प्रवाह होतात आणि परत ते एक होतात, तसे हे अर्थ आहेत. ते एक असून अनेक होतात, अनेक होऊनहि एकच असतात असा हा वासुदेव-महिमा आहे. 'वासुदेवः सर्वम्' हा गीतेचा मंत्र आहे. ती गीता- सावित्री आहे.

७१०. सर्वासुनिलय
सर्वेषां असूनां निलयः सर्वासुनिलयः । जो सर्वप्राणांचा आश्रय आहे तो परमात्मा सर्वानिलय म्हणावयाचा. जी कांही हालचाल या जगांत दिसते ती सगळी प्राणलक्षण होय. "यत्र यत्र घूमस् तत्र तत्र वहनिः" त्या प्रमाणें 'यत्र यत्र गतिस्-तत्र तत्र प्राणः” असा न्याय आहे. हा सर्व हालचालींचे निमित्त असलेला प्राण अखेर कुठे विसावतो अथवा कुठून प्रकटतो ? वायु आकाशांत विलीन होतो आणि तिथूनच तो उद्‌भूत होतो. प्राण हाहि तसाच आकाशवत् अव्यक्त परमात्म्याच्या ठाईं विलीन होतो. तेव्हां त्याची गति कुंठित होते. मग तो कोणत्याहि लोकाला जात नाही. तो वैकुंठवासी होतो, स्वस्थ होतो. पण ही परम गति होय. "यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम' म्हणून तिचेच वर्णन केले आहे. गुणबद्ध जीव गुणानुसार भ्रमत राहतो. "ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृतस्था अधोगच्छन्ति तामसाः" म्हणून गीतेनें गुणानुसार त्रिधा गति दाखवून दिली आहे. पण जो गुणातीत झाला त्याला आत्मगतीवांचून दुसरी गति नाही. ही जी आत्मगति उर्फ गतिनिरोध तोच सर्वासुनिलय परमात्मा होय. कल्पान्ती सर्व सृष्टितत्त्वें प्राणाबरोबर परमात्म्याच्या ठाईं विलीन होतात. म्हणून तो सर्वासुनिलय म्हणावयाचा, कल्पारम्भी परत ती सृष्टितत्त्वं परमात्म्याच्या प्राणाबरोबर बाहेर पडतात. यालाच अनुलक्षून नारदानें म्हटले आहे-"मरीचिमिश्रा मुनयो प्राणेभ्योऽहं च जज्ञिरें" पिंण्ड घ्या की ब्रह्माण्ड घ्या दोहोंकडे एकच सूत्र आहे. आत्म्याच्या ठाई सर्व प्राण, सर्व शक्ति निहित होतातः "वायुः अनिलं अमृतम् । अथ इदं भस्मान्तं शरीरम्' मुक्त पुरुषाचे प्राण अनिल म्हणजे निःस्पन्द होऊन अमृत म्हणजे चयापचरहित होऊन बसतात. कल्पान्तीं सर्वांचेच प्राण परमात्याच्या ठाईं विलीन होतात. पण कल्पारंभी ते पुनः गुणकर्मानुसार जन्म घेतात. त्यांचे हे यातायात ज्ञानानें मुक्ति होईपर्यंत चालूच राहते.

७११. अनल
परमात्मा हा अनल म्हणजे अग्निस्वरूप आहे. ऊब ही जीवनाचे गमक आहे. ज्या शरीरांत ऊब नाही, जे प्रेतवत् थंड झाले आहे, गार पडले आहे, तें मृत समजले जाते. त्यामुळे अग्नि म्हणजे जीवन होय. परमात्मरूप अग्नि हा सर्वांना प्रकाशकत्वामुळे सत्ता आणि औष्ण्यामुळे जीवन देणारा होय. अग्नीच्या दाहकता आणि प्रकाशकता ह्या दोन शक्ति होत. आणि परमात्म्याच्या ठाईं जो चिदग्नि आहे त्याच्याहि त्या दोन शक्ति आहेत म्हणून परमात्मा हा अनल म्हणावयाचा. जें कांहीं प्रकाशित होत आहे तें सारें त्या चित् तेजानेच होत आहे. त्याच्या प्रकाशावांचून कोणतीहि वस्तु असल्याचे कळू शकत नाही. अर्थात् तिला सत्ता लाभते, जीवनाचा उबारा लाभतो तो त्या चित्तेजामुळेच होय. इथे अग्नीचे प्रकाशकत्व आणि जीवनदातृ उष्णत्व वा सत्तादातृत्व एकवटलें आहे असे म्हणता येईल. अर्थात् अग्नीच्या दोन शक्ति म्हणण्यापेक्षां अग्नीची दुहेरी शक्ति म्हणणे बरें. परमात्म्याच्या चिद्रूप अग्नीत जणू हे विश्व उजळत आहे आणि जळत आहे. "तेजोभिरापूर्य जगत समग्रं, भासस् तवोग्राः प्रतपन्ति विष्णों” असें ह्या विश्वाच्या चिन्मय रूपाला पाहून अर्जुन म्हणत आहे. प्रत्येक वस्तु त्या प्रचंड चित्तेजानें जळत आहे, उजळत आहे, असें त्या अनल परमात्म्याचे विश्वरूप दर्शन अर्जुनाला होत आहे. अनल पद अन+ल अथवा अन्+अलम् अशाहि प्रकारे लावता येईल. जिथें अग्नि आहे तिथे प्राण आहेच. प्राणाशिवाय अग्नीचे अस्तित्व संभवत नाहीं. म्हणून तो अनल म्हणजे अनवान् म्हटला आहे. परमात्मा हा जीवनस्वरूप अग्नि आहे. आणि त्याच्याशी प्राण हा सदैव युक्त असतो. प्राण गेला की अग्नि शमला असे समजले जाते. "केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः" या प्रश्नाचे उत्तर चिग्नि असें आहे. त्या चित्स्वरूप अग्नीनें प्रेरिलेला प्राण हालचाल करीत असतो. "दुष्पूरेणानलेन च' या गीतावचनांत अनलाचे अनलम्पण व्यक्त झाले आहे. ते तिथे कामाग्नीसंबंधानें आलेलें आहे. पण अग्नि सर्व काहीं भस्म करून परत अधिक भक्षायला सिद्ध असतो म्हणून तो अनल होय. परमात्मस्वरूप चिद्ग्नीलाहि हे विश्वाचे पेटवण पुरत नाही. त्याला पुरुन तो उरतो म्हणून तो अनल.

७१२. दर्पहा
'दर्पहा दर्पदो दृप्तः' हे एक त्रिक असून तिन्ही पदें मिळून एक विचार प्रकटला आहे. एकएकटें पद घेतल्यास तो विचार एकांगी होईल. असा एकांगी विचार होऊं नये. विचाराची समग्रता आकळली जावी याची सहनाला भारी चिंता आहे. त्यामुळे ठाई ठाई आपाततः विरोधी पदांची एककें द्विकें तशीच त्रिकें आलेली आहेत. वस्तुतः ती विरोध-दर्शक वा पृथक्त्वदर्शक वा अभावदर्शक नसून व्यापक समग्रतादर्शक आहेत. हे समग्र दर्शनच भगवदर्शन वा आत्मदर्शन होय, विश्वरूपदर्शन होय. कोणतेंहि एकांगी दर्शन हें सम्यग्दर्शन असू शकत नाही आणि म्हणून ते आत्मदर्शनहि म्हणतां यावयाचें नाहीं. कारण आत्मा एक आहे, अन्यून आहे, परिपूर्ण आहे. त्यांत विजातीय, सजातीय वा स्वगत कसलाहि भेद नाहीं.. तो एकरस आहे. म्हणून सर्वविरोधपरिहाररूपच तो आहे. सर्व समन्वयरूपच तो आहे. अर्थात् त्याचे दर्शनहि तसेंच. इथे कांहीं एककें द्विकें त्रिके नमूद करूं या; कृताकृतः, भोजनं भोक्ता, वामनः प्रांशुः, निमिषोऽ निमिषः, कामहा कामकृत्, क्रोधहा क्रोधकृत्, एको नैकः, दण्डो दमयिता दमः, नियन्ता नियमो यमः, शब्दातिगः शब्दसहः इत्यादि. या विचित्र पदपदावलीवरून परमात्म्याची व्याप्ति त्याची समग्रता व्यक्त केली गेली आहे. इथे दर्पदो दर्पहा दृप्तः या पदत्रयांत तीच लक्षित आहे. तो परमात्मा दर्प-हा म्हणजे दर्पाचे हनन करणारा आहे. "अहंकारं बलं दर्प कामं क्रोधं च संश्रिताः । मां आत्म-परदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः" असे जे असुर म्हणजे आसुर गुणांनी प्रेरित आणि विश्वकंटक "कोऽन्योऽस्ति सदृशो मया" म्हणणारे बलदृप्तहिरण्यकशिपु रावण कंसादि त्यांचा तो निःपात करतो, असे दिसते. पण वस्तुतः तो त्या व्यक्तींचा नव्हे त्या शक्तींचा नाश करणारा आहे. म्हणून तो दृप्त-हा न म्हणतां दर्प-हा म्हटला आहे. रामानें रावणाला पाडले पण त्याचें और्ध्वदैहिक विभीषणाकडून यथासांग करवून घेतलें !

७१३. दर्पद
परमात्मा असुरांचा दर्प चूर्ण करतो, तर देवांचा दर्प वाढवतो. दर्प म्हणजे बळाचा उत्सेक, असुरांच्या बळाचा उद्रेक जगाच्या दुःखाला नि नाशाला कारण होतो, म्हणून तो परमात्मा सहन करीत नाही, त्याचे हनन करतो. परंतु देवांच्या बलाचा उद्रेक जगाच्या कल्याणाला आणि समृद्धीला कारण होतो, म्हणून त्याचा तो पाठपुरावा करतो. त्या दैवी बलाचें आप्यायन करतो, गुणन करतो. शंकर म्हणजे महादेव. त्याच्या बलाचा उद्रेक त्याच्या हलाहलपानांत दिसून येतो. याच्यायोगें काय झाले ? जगावरील महान संकट टळलें. लोक बचावले आपल्या बुद्धि, बल, संपत्ति आणि श्रम या चतुरंग बलाचा म्हणजे सर्व शक्तींचा निष्काम भावनेनें लोककल्याणार्थ विनियोग करण्यांतच आपलें परम श्रेय आहे या श्रद्धेचे साधनेचे आणि निष्ठेचें नांव आहे देवत्व. त्याचा महान् आदर्श म्हणजे भगवान् शंकराचें चरित्र होय. त्यामुळेच तो-महादेव झाला आहे. असा देवांचा दर्प, दैवी संपत्तीवरील आत्यंतिक विश्वास तो परमात्मा वाढवीत असतो. महात्मा गांधींचा हा असा विश्वास त्यानें इतका वाढविला होता त्यानें इतका वाढवला होता की अखेर त्या पाई त्यांचे बलिदान झाले. या दर्पामुळेच मनुष्य गडद निराशेंतहि आशा बाळगून राहतो आणि आपला विश्वास जतन करतो. त्यांचे त्यागमय जीवन व बलिदान हे त्यांच्या या निष्ठेचे प्रमाण होय, साक्ष्य होय. परमात्मा दर्प-हाहि आहे. आणि दर्प-दहि आहे. जसा वैद्य एखाद्या रोग्याला उपवास करायला सांगतो तर दुसऱ्याला पुष्टिवर्धन (टॉनिक) घ्यायला सांगतो. पण त्यांत कांहीं विसंगति वा विरोध नसतो. त्यांत एकच सूत्र तो अनुसरत असतो. तसेंच परमात्म्याचे आहे. ज्याचा दर्प नाहीसा करणे इष्ट त्याचा तो नाहींसा करतो आणि ज्याचा दर्प वाढवणे इष्ट त्याचा तो वाढवतो. आणि अशा आपाप्ततः विरुद्ध क्रिया पूर्ण सुसंगत ठरतात व्यापक तत्त्वांच्या अधिष्ठानावर. आणि तें अधिष्ठानच तो परमात्मा होय.

७१४. दृप्त
ज्याच्यांत अपरंपार बळ आहे. तें बळ ज्याच्यांत मावत नाहीं, तो म्हणावयाचा दृप्त. असा दृप्तच दुसऱ्याचा दर्प जिरवू शकतो आणि दुसऱ्याला हिंमत देऊ शकतो. म्हणून परमात्मा "दर्पहा दर्पदो दृप्तः" म्हटला आहे. दृप्त नरसिंहाने हिरण्यकाशिपूचा दर्प जिरवला आणि भक्त प्रह्लादबाळाचा दर्प, आत्मविश्वास सतत वृद्धिंगत केला. प्रभु रामचंद्रानें रावणाचा दर्प खर-दूषण-त्रिशिरादि राक्षसांना वधन आणि प्रत्यक्ष त्याला व कुंभकर्णाला ठार करून जिरवला आणि नल नील हनुमदादि वानरांचा दर्प समुद्रोल्लंघन, लंकादहन, सीताशुद्धि, सेतुबंधन इत्यादि सुयशाच्या योगें वृद्धिंगत केला. हे दुहेरी कार्य तो स्वतः दृप्त होता, आत्मशक्तिसंपन्न आणि आत्मशक्तिमत्तेच्या प्रत्ययानें परिपूर्ण होता म्हणूनच करू शकला हे उघडच आहे. दर्प, दर्पण (म्हणजे दृप्तीकरण) आणि दर्पहनन या सर्वांचा आधार एक आत्मशक्तिच आहे हे जो ओळखतो तो 'दर्पहा दर्पदो दृप्तः चे रहस्य ओळखतो असें म्हणावयाचें. यासंबंधी केनोपनिषदांतील आख्यायिका सहज आठवते. 'दर्पहा दर्पदो दृप्तः' या वचनावर ती चांगला प्रकाश टाकते. देवांना एकदा ब्रह्मानें विजय मिळवून दिला, तर त्यांना वाटले "अस्माकमेव अयं विजयः, अस्माकमेव अयं महिमा." हे झालें दर्पद रूप. त्यानंतर त्यानें अग्नि वायु इत्यादि एकएका देवाला बोलावून त्याच्यापुढे गवताची काडी टाकून ती जाळायला उडवायला सांगितलें. पण आत्मशक्तीवांचून त्यांना तें करतां आले नाही. अशा प्रकारे त्यांचे मानमर्दन वा दर्पदलन केले. हे झालें दर्पहारूप. आणि इतकें सर्व करून त्या देवांना तें यक्ष बुचकळ्यांत टाकून निघून गेले. हे झाले त्याचे दृप्त रूप. परमात्मा हा असा 'दर्पहा दर्पदो दृप्तः' आहे. तो नुसताच दर्पहा वा दर्पद वा दृप्त नाही. हे असंशय आणि समग्र ज्ञानच मोचक आहे. तें ज्याला झालें "असंमूढः स मर्येषु सर्वपापैः प्रमुच्यते."

७१५. दुर्धर
परमात्मा हा अव्यक्तमूर्ति असल्यामुळे त्याला सहजासहजी आकळतां येत नाही. "अव्यक्ताहि गतिर् दुःखं देहवद्‌भिर् अवाप्यते' म्हणून गीता म्हणतच आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की व्यक्त हे फार सुलभ आहे. "क्लेशोऽधिकतरस् तेषां अव्यक्तासक्त-चेतसाम्"या वचनांतील अधिकतर या पदाकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यक्ताच्या उपासनेंत क्लेश नाहीत असें नाही. त्यांत क्लेश आहेतच, पण अव्यक्तोपासनेत ते अधिक आहेत असे म्हटले आहे. तुम्ही सगुणोपासना करा की निगुणोपासना करा, दोन्हीकडे भरपूर क्लेश आहेत. आकाशवत् निराकार आणि निर्गुण परमात्मा "अच्छेद्यो ऽयं अदाह्योऽयं अक्लेद्योऽशोष्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुर अचलोऽयं सनातनः । " असें मानणे सुलभ आहे, परंतु देहधारी अवतार, वा प्रतीकरूप शालग्राम हा तसा मानणे सुलभ नाहीं. पण सगुणोपासनेत साकारोपासनेत आपण तसे मानून चालत असतो. इतकेच नव्हे, तर सगुणसाकारोपासनेत परमात्म्याचा अवमान होतो. "अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाषितम् । परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ " हे भय निर्गुणोपासनेत राहत नाही. अर्जुनाला व्यक्ताच्या अवज्ञानाबद्दल असत्काराबद्दल क्षमा मागावी लागली आहे. सारांश, सगुण घ्या की निगुण घ्या परमात्मा हा आकळायला सोपा नाही. तो दुर्धरच आहे. ज्ञानदेव योगी होते. त्यांना जीवनकळा साधली होती. पण नामदेव भक्त होते. त्यांना नामामृत गोडी साधली होती. ते यात्रेला निघतांना विठ्ठलाकडे गेले. त्याची परवानगी घेतली तेव्हां निघाले. हे देवभक्तांचे हार्द पाहून ज्ञानदेव विरघळून गेले. त्यांच्या योगानें अव्यक्तोपासनेनें नामदेवाच्या सगुणोपासनेला भक्तीला साष्टांग नमस्कार घातला. त्यांना ती कठिण वाटली आहे. सारांश कोणत्याहि प्रकारे सगुण वा निर्गुण भक्ति ही सुळावरील पोळी आहे. म्हणून तो परमात्मा दुर्धर होय.

अथ

'अथ' हे कांहीं सुबन्त नाम नाही. ते आहे एक अव्यय, सहस्रांत प्रायः अशी पदें नाहींतच. 'च' हे अव्यय ६ सहा वेळां आले आहे. एव हे अव्यय दोन वेळां आलें आहे. खरे म्हणजे दोन्ही ठिकाणी 'एव च असें आलें आहे. ' अथो ', ' ननु 'इत्यादिकांप्रमाणें 'एवच' हे एक संयुक्त पद मानणे शक्य असल्यास स्वतंत्र 'च' दोन कमी होतील. 'अथ' हे इथे एकदांच आले आहे. ही अशी तीन अव्ययें पादपूरण म्हणून नऊ वेळा आलेली सोडली तर बाकीची सर्व सुबन्त पदें आहेत. सहस्रनामाचे खरोखर हे एक वैशिष्ट्यच म्हटलें पाहिजे. सहस्र संख्या सांभाळण्यासाठी कोणतीं पदें सविशेषण एक नाम मानावीं, कोणती पादपूरण मानावीं, कोणती 'कथितः सारखी आख्यातवत् मानावी हा विचाराचा मुद्दा आहे आणि सहस्रमित म्हणजे केवळ सहस्र न समजतां पस्तूरीसह अष्टदशादि संख्याधिक सहन मानणे योग्य वाटल्यास तसेंहि करणे शक्य आहे आणि मग अथ हेहि कदाचित् एक स्वतंत्र पद मानले जाऊ शकेल. कारण 'अथ' आणि 'ॐ' हे दोन अव्यय शब्द मांगलिक मानले आहेत. अथ हें पद आरंभसूचक आहे. परमात्मा हा सर्वादि सम्भिक असल्यामुळे तो अथ म्हणावयाचा. 'ॐ' हे जसें एक महत्त्वाचे एकाक्षर परमात्मवाचक नाम आहे तसें 'अथ' हे द्व्यक्षर नाम आहे. 'ॐ' प्रमाणें ते एकाक्षर नसले तरी द्व्यक्षर द्विमात्र आहे. आणि 'ॐ' हे 'अर्थ' प्रमाणें द्व्यक्षर नसले तरी द्विमात्र आहे. दोहोंचे वजन सारखेंच आहे. 'ॐकारपूर्वक वेद मंत्राचा उच्चार होतो तर अथकारपूर्वक शास्त्रादिकांचा आरंभ होतो. 'अथातो ब्रह्मजिज्ञासा । ' 'अथातो भक्ति व्याख्यास्यामः । ' 'अथ शिक्षा प्रवक्षामि । ' इत्यादि, नवीन ग्रंथ, नवीन प्रकरण, नवीन मुद्दा मांडतांना अथ चा प्रयोग होतो. अशा प्रकारें 'अथ ' हें मंगल नाम म्हणता येईल, जरी तें सुबन्त नाही.

७१६. अपराजित (अ-पराजित, अपर-अजित )
न पराजितः अपराजितः । ज्याला कोणी पराजित केलें नाहीं तो अपराजित म्हणावयाचा. परमात्म्याला पराजित कोण करणार ? जो पराजित करणारा तो हि तोच आहे. त्यामुळे अपराजित हा अपर-अजितच म्हणावयाचा. स्वतःच स्वतःची पराकाष्ठा रिकॉर्ड) मोडणाराला पराजित कसे म्हणता येईल ? तो त्याचा नवा विजयच होय. ज्यानें स्वपरभेद मानिला त्याला द्वंद्व-भय राहणार, पराभव संभवणार. परंतु ज्याला परका काय पण , दुसराहि नाही त्याला एकमेवाद्वितीयाला पराभव कसा संभवेल, त्यावर मात कोण करील ? ज्यानें आपल्याला देहादिकांच्या अभिमानानें पृथक् करून घेतले त्यानें आपले प्रतिद्वंद्वी निर्माण केले. त्याला त्यांच्या पासून भय उत्पन्न होणार, त्याला आपला पराभव पहावा लागणार. तुमच्या विरोधांत दुसरा उभा राहणे हाच पराभव. ज्याला विरोध करायलाच मुळी दुसरा कोणी उरला नाही, त्याला सर्वभूतें आत्मरूप झाली ! त्याचा पराभव संभवत नाही. बापाला मुलाकडून झालेली आपली हार हार वाटत नाहीं, भूषण वाटते. ती हार तो हारवत् मिरवतो. कारण पुत्र कोणी दुसरा तो मानीत नाही. त्याला तो आपला आत्माच मानतो. तद्वत् ज्याला हे सारे जग आत्माच झाले त्याला पराभव कुठला ? परमात्माच या विश्वरूपानें नटला असल्यामुळे त्याला दुजा कोणी नाहींच, प्रत्येकच तो आहे. मग त्याला पराभव देणार कोण आणि दिला असे मानले तर पराभव त्याला विभव वाटेल विजय वाटेल-जसा रामानें केलेला आपला पराभव परशुरामाला वाटला. ज्यानें पराभवालाहि विजयरूप देण्याची युक्ति हस्तगत केली तोच अपराजित. राजकोटच्या प्रकरणांत गांधींनी आपला विजय फेकून दिला. कारण तो अनात्म-विजय होता. "दुःखं शेते पराजितः” हे गांधी ओळखत होते.


विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् ।
अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्ति शताननः ॥७७॥


७१७. विश्वमूर्ति
या सत्त्याहत्तराव्या श्लोकांत मूर्तिपदाचे सूत्र आहे. ह्या सूत्रांत जितके आणि जसे मणि ओवतां आले तेवढे ओवले आहेत. परमात्मा अव्यक्त अमूर्तिमान् आहे इथपासून तो विश्वमूर्ति आहे इथपर्यंत भरारी मारलेली आहे. विचारानें विचार समग्रतेला कव घालणारा असल्यामुळे त्यांत परस्पर-विरोधी दोन्ही टोकें येतात, आणि त्या दोन्ही टोकांच्या दरम्यान संभवणारी सर्व विविधता येते. या श्लोकांत आपल्याला हे समग्र दर्शन होतें. "विश्वं मूतिर् यस्य सः विश्वमूर्तिः अथवा विश्वा मूर्तयः यस्य सः विश्वमूर्तिः" असा विग्रह होईल या सामासिक पदाचा, दोहोंचा तात्पर्यार्थ एकच. हे दिसणारे आणि न दिसणारें समग्र विश्वच त्या परमात्म्याची मूर्ति होय, आकृति होय, तनू होय. समग्र हे परमात्म्याचे रूप मानल्यानंतर या समग्र रूपांतील विविध अवयव कोणते त्याचीहि कल्पना कवींनी आपआपल्या रुचीप्रमाणें वा गरजेप्रमाणें केली आहे. "शिरीं शृंगारला स्वर्ग, उरी आकाश मोकळें । पदीं पैसावली पृथ्वी, लोकरूपास त्या नमो' अशी त्रिलोकात्मक वा सप्तलोकात्मक वा चतुर्दश लोकात्मक विश्वमूर्तीची कल्पना केली आहे. आणि कौशल्यानें रेखाटली व रंगविली आहे. ध्यान समग्राचें करावयाचे, गान समग्राचे करावयाचे, पूजा समग्राची करावयाची, एवढयासाठींच खण्डितमुर्तीच्या पूजेचा शास्त्रांत निषेध केला आहे. विश्वमूर्ति पदहि परमात्म्याची ही समग्रता, ही अखण्डता विशद करीत आहे.

७१८. महामूर्ति
महती मूर्तिर् यस्य सः महामूर्तिः मोठी आहे मूर्ति ज्याची तो महामूर्ति म्हणावयाचा. जे आमच्या बुद्धीच्या शक्तीच्या आवाक्या बाहेरचे असतें तें आपल्याला महान् वाटते. तें अनुपेक्षणीय, आदराई, विस्मयावह वाटते. त्याच्या महत्तेनें आपण दबतों, त्याला शरण जातो. परमात्मा हा तसा महान् आहे. आकाशाहून मोठे या जगांत काय आहे ? तें आकाशचं परमात्म्याची मूर्ति म्हणजे शरीर आहे. "आकाश शरीरं ब्रह्म" असें उपनिषद्वचन आहे. शरीर हे सगुण साकार हवें. आकाश हे तसे शब्दगुण आणि अतिविशाल आहे. त्याच्या विशालतेचे आकलन होऊं शकत नाही आमच्या दृष्टीला वा कल्पनेला. म्हणून त्याला आपण असीम म्हणतो. परंतु कल्पान्ती जेव्हां ही सकल सृष्टि अव्यक्तलीन होते तेव्हां तें आकाशहि नाहीसें होतेंच. कारण ते सगुण साकार सावयव आहे, सीमित आहे. परमात्म्याचे हे आकाशरूप शरीर जसे आकारयुक्त तसें वर्णयुक्तहि विर्णिले आहे. आकाश निळे दिसते. म्हणून परमात्मा हा निळा सांवळा म्हटला आहे. तो निर्गुण निरञ्जन परमात्मा अशा प्रकारें आकाश-शरीरत्वामुळे सगुण सांवळा झाला आहे. आकाश-शरीरत्वामुळेच त्याला महत्ताहि आली आहे. एरव्हीं जो अव्यक्त आहे, त्याला महान् तरी कसे म्हणावयाचें ? अणुत्व महत्त्व लघुत्व गुरुत्व हे सर्व व्यक्ताचे गुणधर्म होत. म्हणून अव्यक्त अक्षर परमात्म्याचे वर्णन श्रुति "अणोरणीयान् महतो महीयान्" अशा दिलक्षण शब्दांनीं करते. त्यायोगें सर्वच विशेषणांचा छेद उडतो आणि उरतो तो केवलस्वरूप परमात्मा निशून्य निरुपम निरञ्जन निर्वाण".

७१९. दीप्तमूर्ति
दीप्ता तेजोमयी मूर्तिर्यस्य सः दीप्तमूर्तिः । दीप्त म्हणजे ज्योतिर्मयी मूर्ति आहे ज्याची तो दीप्तमूर्ति म्हणावयाचा. परमात्मा हा चिन्मात्रमूर्ति असल्यामुळे तो दीप्तमूर्ति होय. हे सर्व विश्व चित्- प्रभेनें प्रकाशित झालेले आहे. सूर्य चंद्र आणि अग्नि यांची प्रकाशकताहि त्या चित्प्रभेचीच प्रकाशकता होय. चित्सत्तेवांचून स्वतंत्रपणे त्यांच्या ठाई प्रकाशकता संभवतच नाही. म्हणूनच तर गीतेनें म्हटले आहेः यद् आदित्यगतं तेजो जगत् भासयतेऽखिलम् । यत् चन्द्रमसि यच् चाग्नौ तत् तेजो विद्धि मामकम् ॥ असें असल्यामुळे तो परमात्मा, तो चिन्मात्रमूर्ति च एक दीप्त आहे, इतर सारें अदीप्त, अप्रकाश, अंधभूत होय. तें सारें प्रकाश्य आहे, प्रकाशक नव्हे. या दीप्तमूर्ति परमाल्याची पूजा आम्ही सूर्यात चंद्रांत अग्नींत करतों, दीपांत करतो. सूर्य उगवला म्हणजे त्याला आम्ही नमस्कार करतो. दिवा लावला म्हणजेहि आम्ही त्याला नमस्कार करतो. हा नमस्कार न त्या सूर्याला आहे, न त्या दिव्याला; तो आहे त्यांच्या रूपानें . प्रकाशलेल्या चिद्वस्तूला. तो नमस्कार सूर्यनारायणाला आहे, दीपनारायणाला आहे. वस्तुतः तें जें सूर्यगत वा दीपगत प्रकाशक चित् तत्त्व आहे तेच माझ्या ठाईं अक्षिगत प्रकाशक तत्त्व आहे. तोच अक्षिपुरुष होय. "योऽसौ, असौ पुरुषः सोऽहं अस्मि" या मंत्रांत हेच तादात्म्य वर्णिलें आहे. "तत् त्वं असि" या महावाक्यांतहि तेंच प्रतिपादिले आहे. जिथे जिथे दीप्ति आहे तिथे तिथे तो दीप्तमूर्ति उभा आहे आणि जें दीप्त नाहीं, प्रकाशित नाही, असे मुळी कांहीं या विश्वात नाहींच.

७२०. अमूर्तिमान्
परमात्मतत्त्व हे अव्यक्त अज अव्यय असल्यामुळे त्याला मूर्तिमान् म्हणता येत नाही. तें व्यक्त म्हटल्यास जन्मणारें व मरणारें असें नाशवंत ठरेल. पण तें तर आहे अक्षर. म्हणून तो परमात्मा सूर्य अग्नि दीप इत्यादि रूपांत दिसत असला तरी ह्या रूपाहून मूर्तीहून तो वेगळा आहे, हे ओळखून त्याला अमूर्तिमान् म्हटले आहे. लहान-मोठे सरळ वांकडे जसें इन्धन असेल तसा म्हणजे तत्तदाकार अग्नि दिसतो, पण त्या आकारांहून मूर्तीहून तो वेगळाच असतो, तद्वत् परमात्माहि ह्या अनंत रूपांत मूर्तीत प्रकटलेला दिसतो खरा, पण तो त्या मूर्तीहून वेगळाच आहे. त्या मूर्तीत आणि त्याच्यांत मुळी कसलेहि साम्य नाही. अमूर्तिमान् पद हे साम्य आणि वैषम्य प्रकट करीत आहे. तो मूर्तिमान् दिसतो, पण मूर्तिमान् नाही. "अग्निर् यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च । एकस् तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च । "मागील पदांत म्हटले आहे तो विश्वमूर्ति आहे, महामूर्ति आहे, दीप्तमूर्ति आहे. आणि इथे या पदानें जणू त्यावर बोळा फिरवला आहे अमूर्तिमान् म्हणून. परंतु वस्तुतः, तसें नाहीं. दोन विरुद्ध विधानांनी त्याची व्याप्ति दाखवून दिली आहे. तो परमात्मा मूर्त तसा अमूर्तहि आहे असें तीं विधानें सांगत आहेत. "रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च " हा चरणहि ती व्याप्तिच व्यक्त करीत आहे. साकार आणि निराकार दोन्ही तोच आहे. अग्नि केव्हां सेन्धन केव्हां निरिन्धन दिसतो तद्वत् परमात्मा. दोन्ही रूपांत जो त्याला ओळखतो तोच ओळखतो म्हणावयाचा. "तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा"

७२१. अनेकमूर्ति
अनेकमूर्ति म्हणजे अनेक वस्तु नव्हे. परमात्मा एक आहे, पण त्याच्या मूर्ति अनेक आहेत. कोणतीहि व्यक्ति ही पृथगात्मता घेऊनच जन्मास येते. मृत्तिका एक आहे, पण घट-शरावादि मूर्ति वा आकार अनेक आहेत. तद्वत् चित् वस्तु एक आहे, पण त्या चिद्वस्तूचे विलास वा तरंग म्हणजे हे चराचर जगत् अनेक आहे. नाम रूप गुण कर्म इत्यादि भेदांनी ह्या व्यक्ति वा मूर्ति भेदिल्या आहेत. "भेदूनी अभेद, अभेदुनि भेद" अशी या जगद्-ब्रह्माची स्थिति आहे. त्यामुळे केव्हां एका पक्षावर तर केव्हां दुसऱ्या पक्षावर भार दिला जातो आणि "एकत्वेन पृथ्क्त्वे न बहुधा" त्याचे वर्णन केले जाते. इथे त्याचें जगद्रूप वैचित्र्य लक्षून त्याला अनेकमूर्ति म्हटले आहे, तर पुढील अव्यक्त ह्या पदांत वैचित्र्य विसरून एकतत्त्वावर वा एकत्वावर भर दिला आहे. एक, अनेक, असंख्य, अनन्त, शून्य वा केवल अशा विचित्र विशेषणांनीं तो परमात्मा संबोधिला जातो. कारण त्या प्रत्येक विशेषणानें एक विशिष्ट पैलूच तेवढा प्रामुख्यानें पुढे मांडला आहे. अनेकमूर्ति पदांतून एक दुसराहि भाव दोहून घेतां येईल. अतत्त्वार्थवत् आणि असहिष्णु अशा एकवादाचा त्यांत निषेध आहे. एक विष्णुच परम देव, दैवत आहे, शिव नव्हे; एक अल्ला, एक पैगंबर, एक कुराण खरें इतर सारें झूट. असें तत्त्वशून्य व्यक्तिपरत्व म्हणजे एकनिष्ठता नव्हे. तर "अनेकीं सदा एक देवासि पाहे' तीच खरी म्हणजे तत्त्वदर्शी एकनिष्ठा होय. यावेगळी एकनिष्ठा म्हणजे तत्त्वच्युति होय. तिचेच नांव अंधश्रद्धा. तिच्या योगेंच वैर विरोध विग्रह पेटून जग कष्टी झाले आहे. एकाचे अनेकमूर्तित्व तें ओळखील तर सुखी होईल.

७२२. अव्यक्त
या मूर्तिसूत्रांत अनेकमूर्ति, शतमूर्ति, विश्वमूर्ति अशी पदें आली आहेत, त्याच बरोबर अमूर्तिमान्, अव्यक्त अशीहि पदें आली आहेत. आणि त्यांचे तात्पर्य काय तेहि आपण पहिल्या विश्वमूर्ति पदाच्या चिंतनांत पाहिले आहे. निर्गुणांतून सगुण, अव्यक्तांतून व्यक्त, सूक्ष्मांतून स्थूल अशी सृष्टि होते. म्हणजे सर्व दृश्य व्यक्त सगुण सृष्टीचा मूळ आधार तें अव्यक्त अक्षर ब्रह्म होय. तो मूलाधार हे अव्यक्त व्यक्त करीत आहे. अमूर्तिमान आणि अव्यक्त ही दोन पढ़ें समानार्थक दिसत असली तरी त्यांत सूक्ष्म भेद आहे. लोष्ट स्थूल आहे, मृत्कण सूक्ष्म आहे, पण दोन्ही दृश्य आहेत, मूर्त आहेत. मृद् जल अग्नि ही उत्तरोत्तर सूक्ष्म तत्त्वे असली तरी ती दृश्य आहेत, पण वायु हे तत्त्व तसें दृश्य नाही. पण दृश्य वा मूर्त नसले तरी ते गोचर आहे, व्यक्त आहे. आकाश हे मूर्तहि नाहीं, व्यक्तहि नाही पण तें सगुण आहे. शब्दगुणावरून त्याचा परिचय होतो. एरव्हीं तें शून्यच आहे. परंतु ब्रह्म हे या सर्वांहून पलीकडचे आहे. तें निरगुण आहे. म्हणजेच केवल अचिन्त्य. या अचिन्त्यालाच केव्हां अमूर्तिमान् केव्हां अव्यक्त म्हणून संबोधिले जातें, जरी त्यांत वर पाहिल्याप्रमाणें अंतर आहे. प्रकृति ही अव्यक्त आहे, पण इथें अव्यक्त असें नपुंसक पद नसून अव्यक्तः असें पुंल्लिंग पद आहे. आणि तें, परमात्मवाचक आहे. अव्यक्त हे प्रकृतिवाचक पद असून ते अलीकडचें तत्त्व आहे. त्या पलीकडचें तें अव्यक्त आणि अक्षर पद तेंच इथे अभिप्रेत असून ते परमात्मावाचक आहे. "परस् तस्मात् तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात् सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ " अशा भाषेत गीतेनें त्या परात्पर अव्यक्त परमात्म्याचे वर्णन केलें आहे. त्या अव्यक्ताचे अक्षर हे व्यावर्तक अनन्यसाधारण लक्षण आहे.

७२३. शतमूर्ति
अनेकमूर्ति म्हटले काय आणि शतमूर्ति म्हटले काय, तात्पर्य एकच. परमात्म्याच्या मूर्ति अगणित आहेत. पण हे अगणितपण गणितानेच सांगावे लागते. सहन हे स्वतःच संख्याबद्ध सांख्य आहे. त्यामुळे सहस्रांत पदोपदीं संख्यान येतें "अनेकमूर्ति, चतुरमूर्ति शतमूर्ति सहनमूर्धा इत्यादि. या सर्व संख्याबहुव्रीही, तात्पर्य एक असले तरी आपआपलें वैशिष्ट्यहि आहेच. येथील शत ही संख्या केवल शंभर आंकड्याची वाचक नाहीं, ती समग्रता-वाचक आहे. सगळ्यांच्या सगळ्या मूर्ति त्या परमात्म्याच्याच आहेत असा आहे ह्या शतमूर्ति पदाचा आशय. शतमख, शतपथ, शतभिषक् शतगुण इत्यादि पदांत शतशब्द पूर्णता-समग्रतावाचक आढळतो. तसाच तो इथे घ्यावयाचा. त्याची शंभर वर्षे भरली, त्याचे शंभर अपराध झाले. इत्यादि प्रयोगहि आपण त्याच अर्थानें आजहि करीत आहोंच. अनेकमूर्ति पदांत निषेधमुखानें सांगितले की या परमात्म्याची काही एकच मूर्ति नाही, तर शतमूर्ति पदांत विधिमुखानें सांगितले की त्याच्या शंभर मूर्ति आहेत, शेंकडों मूर्ति आहेत. ह्या शतमूर्ति कोणत्या ? विभूतियोगांत त्या सांगितल्या आहेत. पण तिथेहि त्या व्यायशीच देऊन गणक थकून गेला आहे. आणि "नास्त्यन्तो विस्तरस्य मे" म्हणून त्यानें गणनेबाबत असमर्थता प्रकट केली आहे. जें जें श्रीमत् वा ऊर्जित तें तें भगवद्विभूति म्हणून ओळखावें हें सूत्रहि तिथेच देऊन ठेवले आहे. त्याला अनुसरून शतपूर्ति करून घ्यावी. मूर्ति म्हणजे देह सर्व त्या देहीचे आत्म्याचे होत म्हणूनहि तो शतमूर्ति म्हणावयाचा.

७२४. शतानन
शतं शतानि वा आननानि यस्य सः शताननः । ज्याला शेंकडों मुखें आहेत तो शतानन म्हणावयाचा. आनन म्हणजे मुख हे वाग्द्वार असल्यामुळे, त्याला वक्त्रच म्हणत असल्यामुळे तें वाणीचे प्रतीक होय. अर्थात् शेंकडों वाणी ज्याच्या आहेत तो शतानन म्हणावयाचा. निरनिराळ्या योनींच्या निरनिराळ्या वाणी आहेत. मनुष्य पशु पक्षी यांच्या वाणी भिन्न आहेत. इंग्लंडमधील आणि भारतांतील पशुंची व पक्ष्यांची बोली सारखीच आहे, पण मनुष्यांची मात्र वेगळी आहे. हे वेगळेपण वाणीचे न म्हणतां भाषांचें म्हणावयाचे. वाणीत बोली व भाषा दोहोंचाहि अंतर्भाव होतो. बोली स्वाभाविक आहे. तर भाषा संपादित आहे. आणि मानवांतच ती आढळते, हा भेद आहे. अशा प्रकारें बोली आणि भाषा यांची संख्या अगणित आहे. या अगणिततेचेच दुसरें नांव शत, शेंकडों, असंख्य. ज्या अर्थी सर्व वाणींचा आधार प्राण आणि प्राणाचा आधार जीवात्मा आहे त्या अर्थी जीवात्मभूत सर्वांतर्यामी परमात्मा हा सर्व वाणींचा स्वामी होय. म्हणून तो शतानन म्हटला आहे. विविध कामें करणारे विविध देह धारण करणारा म्हणून जसा परमात्मा हा शतमूर्ति म्हणावयाचा तसा विविध वाणी बोलणारा म्हणून तो शतानन म्हणावयाचा. रावण हा दशानन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला खरोखरच दहा तोंडे होती का ? का तो दहा भाषा बोलू शकत होता म्हणून दशानन म्हटला गेला ? दुसराच कल्प संभवनीय दिसतो. दशवाग्-बलसंपन्न म्हणून दशानन. तसा परमात्मा हा सर्व वागब्ल-संपन्न म्हणून शतानन म्हटला आहे.


एकोनैकः सवः कः किं यत्तत्पदमनुत्तमम् ।
लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः ॥७८॥


७२५. एक
"एको नैकः' अशी इथे पदांची जोडी आलेली आहे. त्यांतहि ‘एक पद आधी आले आहे. मागाहून 'नैक पद आले आहे. हा कमहि चिन्त्य आहे. "एकमेवाद्वितीयं ब्रह्म' इत्यादि उपनिषद्वाक्यांत परमात्म्याचे एकत्व म्हणजे द्वितीयासहिष्णू एकत्व प्रतिपादिले आहे. "एकं सत्' हे वेदवचनहि प्रसिद्धच आहे. हे जे द्वैतासहिष्णु एकत्व तें या जगांत कुठे दिसत नाही. जगांत दिसतें तें सर्वत्र द्वैतच दिसतें. तम प्रकाश, सदसत्, चराचर, चेतनाचेतन, स्त्री-पुरुष इहपर इत्यादि द्वंद्व, द्वैत वा सद्वितीयताच सर्वत्र दिसून येत नाही काय ? जगांतील हे द्वैत-प्राधान्य लक्षूनच तर संस्कृत भाषेनें द्विवचन घडवलें आहे. मनुष्य वा जीव आधी एकटा असतो. मग तो लग्न करून दोन होतो आणि पुढे तीन चार इत्यादि बहु होतो. या कौटुम्बिक म्हणजे घरोघरच्या अनुभवाला अनुलक्षून संस्कृत भाषेनें तीन वचनें केली आहेत. ही अशी अनेकवचनें जगांत दिसत असली आणि जग म्हणजेच अनेकवचन असले तरी त्याचे मूळ एक वचनच आहे हे विसरतां येत नाही आणि ते एकवचन स्वतःसिद्ध आहे. हें जें स्वतःसिद्ध एकवचन तोच एक होय, तोच परमात्मा होय. त्या एकापासून अनेक होतें. आणि त्या एकांतच ते परत लीन होतें. आदौ अन्ते एकच जर असते तर मध्येहि, दिसणारे अनेक हे एकच होय हे उघड आहे. म्हणून वेदाचा सिद्धान्त 'एकं सत् त्याचा अर्थ, एकच एक आहे आणिक काही वेगळे नाही.

७२६. नैक
परमात्मा एक आहे तसा तो नैक म्हणजे बहुहि आहे. कारणरूपानें तो एक आहे, कार्यरूपानें तो बहु आहे. हे एकत्व आणि नानात्व ज्ञानदेव दृष्टान्तानें असें विवरितातः "विश्वालंकाराचे विसुरे । आहाति नाना आकारें । तरी घडिले एकें चि भांगारें । परब्री । " हे वैचित्र्यपूर्ण जग म्हणजे सोन्याचे नाना नग होत. पण ते ब्रह्मरूप एका सोन्याचेच घडलेले आहे. मृद्-घट, जल-तरंग इत्यादि वेदान्तप्रसिद्ध दृष्टांतांनी हेच विशद केले आहे. एकत्व आणि अनेकत्व यांचा समन्वय श्रुतीनें असा केला आहे खरा, पण तिला द्वैताचे अगदीं वावडें आहे. कार्यकारणांत अद्वैत आहे. कार्याचे अनेकत्व हे मुळी मिथ्याच आहे. आहे तें एक कारणच. त्यामुळे त्यांचा मुळीच विरोध नाही. पण कोणी जर म्हणूं लागला की या चेतन जगाचे कारण जडचेतन उभयरूप आहे, द्वैतरूप आहे, तर तें श्रुतीला मुळींच मान्य नाही. "एकं सत्' हा तिचा सिद्धान्त आहे. "नेह नानास्ति किंचन" हा त्या सिद्धांतापासून निष्पन्न होणारा उपसिद्धान्त आहे. तो कारणगत द्वैताचा निषेध करतो. कार्यरूपानें दिसणारें नानात्व त्याच्या लेखीं नानात्व नव्हे. म्हणून नैक त्याला मान्य होऊं शकते. त्याचा समन्वय होऊं शकतो. पण या जगाचे कारण ब्रह्माबरोबरच अब्रह्महि आहे अशा विचाराचा नुसता वासहि श्रुतीला सहन होणारा नाहीं. इस्लाम मध्येहि मुख्य सिद्धान्त हाच आहे आणि त्याबाबत मुळी तडजोड होणारी नाही. अल्लाशी दुसऱ्या कशाची जोड देणे याला ते महान् अपराध, महापातक समजतात. त्याला ते शिरकत असें म्हणतात. हा इस्लामी वेदान्त-सिद्धांतच आहे. त्यांत आम्हांला नवीन काही नाही. कारणांत विजातीय सजातीय स्वगत कसला भेद संभवत नाही. तसा संभव कल्पिणे म्हणजेच द्वैत होय आणि याचा श्रुतीनें स्पष्ट भाषेत व वारंवार निषेध केला आहे. हे एवढे द्वैत वगळून ती कार्यगत नैकता खुशाल गिळते.

७२७. सव
सूयते अस्मिन् इति सवः ज्यांत सोम रस गाळला जातो तो सोमयाग सव म्हणावयाचा. गीतेच्या पुढील श्लोकांत वैदिक धर्माचे स्वरूप थोडक्यांत संगृहीत झाले आहे. "विद्या मां सोमपाः पूतपापाः यज्ञै रिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकं अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ॥ " वेदाचे मंत्र घोकावे, यज्ञयाग करावा, त्यांत सोमरस प्यावा आणि इहलोकीं स्त्रीपुत्र गायबैल धनधान्य यांनी समृद्ध होऊन सुखानें जगावें व परलोकी स्वर्गीय सुखाची अपेक्षा बाळगावी. असा त्यांचा जीवनाचा आदर्श होता. पण खा प्या मजा करा- असा हा केवळ ऐहिक जीवन जगणाऱ्या लोकायतिकांचा आदर्श नाही. ते स्वर्ग मानीत आहेत. आणि तो स्वर्ग पुण्यकर्मांनीच मिळतो असेहि मानीत आहेत. म्हणजे हा एक नैतिक आदर्श आहे. सत्कर्माचे फळ स्वर्ग, स्वैरकर्माचे फळ नरक असे ते मानीत आणि इथेच म्हणजे वेदार्थाबाबत वेदविधानाबाबत औपनिषदिक ऋषींनी त्या यज्ञकर्मवादी पूर्वमीमांसकांना पछाडलें आहे. कर्मवाद्यांची वेदार्थ-मीमांसा ठीक नाहीं असें ज्ञानवाद्यांनी सिद्ध केलें आहे. वेदांचे तात्पर्य काय हे ठरविण्याच्या या लढ्यांत कर्मवादी पूर्वमीमांसकांना ज्ञानवादी उत्तरमीमांसकांनी परास्त केले आहे. त्यांनी जो वेद पिळला, जो वेदार्थ छानला तो उपनिषदांत ब्रह्मसूत्रांत आणि गीतेंत उत्तरोत्तर विशद झाला आहे. हाच अन्तिम सब होय. परंतु नखशिखान्त जसा एकच पुरुष असतो तसा कर्ममीमांसेपासून सुरू होऊन ज्ञानमीमांसेपर्यंत पोंचलेला हा सवहि एकच होय. कां की दोहोंचाहि इष्ट तो एक परमात्माच आहे. म्हणून तो सव म्हटला आहे.

७२८. क(स्वस्तिक)
"कः" म्हणजे कोण. परमात्मा हा अमुक आहे असें ठाम विधान करता येत नाही. कारण तो अव्यक्त आहे, त्यामुळे त्याच्याविषयीं जिज्ञासा, कुतुहलच । राहते. तें जें परम जिज्ञास्य, तो जो सदैव अविज्ञात, | तोचं कः म्हणजे कोण म्हणून म्हटला आहे. "कोणाचें हे रूप, हा देह कोणाचा ?" असा सदैव ज्याचा शोधच चालला आहे, पण जो कोणाला अद्याप गवसला नाहीं तो जो "परमे व्योमन्" दडून बसलेला पण ज्यानें सर्वांना चाळा लावला आहे, कोण म्हणून ज्याची जो तो पृच्छा करतो आहे त्याला दुसरें नांव काय देणार ? त्याचे नांव कोणच. या क में उपनिषदांना इतकें झपाटलें आहे की एक सबंध उपनिषद या क च्या नांवानें झालें आहे केनोपनिषद्. "केनेषितं पतति प्रेषितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः । केनेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षुःश्रोत्रं क उ देवो युनक्ति ॥ " वेद प्रश्नोत्तर करतात "कस्य वयं मनामहे चारु नाम । " हा प्रश्नहि आहे आणि उत्तरहि आहे. कोणाचें बरें नाम आम्ही घ्यावें-प्रश्न. कोणाचें बरें नाम आम्हीं घ्यावें-उत्तर. पहिल्या वाक्यांत कोणाचें हे पद प्रश्नार्थक सर्वनाम आहे, तर दुसऱ्या वाक्यांत तें नाम आहे. पहिल्या वाक्यांत बरें क्रियाविशेषण आहे तर दुसऱ्या वाक्यांत तें विशेषण आहे. इतर सर्व नामांची किंमत ज्ञात आहे, पण क या नामाची किंमत अज्ञात आहे. म्हणून तो परमात्मा क आहे. क हे बैजिक नाम आहे. क हे पहिले व्यंजन असल्यामुळे तें परमात्म्याचे पहिले नाम व पहिलें रूप होय. त्यालाच स्वस्तिक असे म्हणतात. स्वस्तिक म्हणजे कल्याणरूप; हे चिह्न एकसमयावच्छेदें नाम आहे, रूप आहे, चिह्न आहे. तें व्यक्ताव्यक्तवाचक आहे.

७२९. किम्
कः का किम् ही पुंस्त्रीनपुंसक सर्वनामें किम् या प्रातिपदिकाची रूपें मानिली जातात. कारण समासांत प्रातिपादिक म्हणून किम् चा स्वीकार झाला आहे. वस्तुतः मूळ सर्वनाम क आहे. त्याची पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग रूपें म्हणजे कः का किम्. या रूपांतील अ आ अम् (इथे इम्) हे लिंग-प्रत्यय होत-जसे मराठींत आ ई एं हे प्रत्यय आहेत. नदीमातृकः नदीमातृका नदीमातृकम् या शब्दांत आपल्याला ते प्रत्यय आढळून येतात. किम् प्रमाणेंच यत् तत् ही सर्वनामें होत. ती क्रमानेच पुढे आली आहेत. त्यांचीहि प्रातिपदिकें किम् या नपुंसक रूपाप्रमाणें यत् तत् ही नपुंसक रूपेंच मानिलीं आहेत. वास्तविक य त ही अक्षरेंच क प्रमाणें मूळ प्रातिपादिक सर्वनामें म्हटलीं पाहिजेत. ती तशी मानिली जात नाहीत याची अनेक कारणे असू शकतील. सामान्यतः सर्वनामें ही वर्तमान कालीन भाषेच्या इतर नामांहून फार प्राचीन असतात आणि म्हणून त्यांचे मूळ त्यांची रूपें ही नियमित असत नाहीत, हे त्या . कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे असे म्हणता येईल. कः च्या चिन्तनांत मुख्यतः किम् चाच ऊहापोह येऊन गेला आहे. कः आणि किम् ही सर्वनाम दृष्ट्या एकच होत. तथापि कः पुंलिंगत्वामुळे सगुणपर तर किम् हें नपुसंकत्वामुळे निर्गुणपर आहे असे मानतां येईल. "किं तत् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तं अधिदैवं किमुच्यते । " इत्यादि किं-पूर्व विचारणा अथवा जिज्ञासावृत्ति, तज्जनित ज्ञानमय जीवन आणि तत्फलित अज्ञान-निवृत्ति हे परमात्म्याचेच स्वरूप होय. म्हणून तो किम् म्हटला आहे. किम् जिम् इत्यादि नांवेंहि आहेतच जगांत कितीहि विचारणा केली आणि कांहींहि उत्तर मिळालें तरी शेवटीं किम् परत उरतेंच. तें जें अतिप्रश्न तत्त्व तेंच किम् होय.

७३०. यत्
कः किम् यत् तत् ही पदें सर्वनामें असल्यामुळे त्यांच्यांत धातु शोधणे अनावश्यक तसेंच अयुक्त आहे. त्यामुळे 'कनति इति कः । पृच्छ्यते इति वा कायते इति वा किम् । यतते इति यत् । तनोति इति तत् । इत्यादि व्युत्पत्ति विरसच म्हणावयाची. यत् म्हणजे जें, हे संबंधवाचक सर्वनाम आहे. त्याचा अनुसंबंधीशी संबंध जोडला जाऊन त्याविषयी काहीं विधान होते. अर्थात् यत् नें ज्याचा निर्देशक होतो तें आधीं गृहीत धरले जाते. हा स्वतःसिद्ध वस्तुनिर्देशक म्हणावयाचा. ब्रह्म ही ती स्वतःसिद्ध वस्तु आहे. म्हणून यत् हे ब्रह्मवाचक होय. "यद् अक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति, विशन्ति यद् यतयो वीतरागाः । यत् इच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति, तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ " अशा प्रकारें 'यत्' में ज्याचें संबन्धन होतें, तें पूर्वसिद्ध व स्वतःसिद्ध तत्त्वच यत्पदवाच्य होय. अर्थात् तें परमात्मतत्त्व होय. कारण तेंच आद्य आहे. तेंच स्वतःसिद्ध आहे. इतर सर्वांची सिद्धि त्याच्याच अभ्युपगमानें होते. त्याच्याच अभ्युपगमानंतर होते. 'किम्' पदानें जिज्ञासा केली जाते, तर 'यत्' पदानें त्याचा संबन्ध दाखविला जातो; त्याचा संकेत केला जातो. "अथातो ब्रह्म-जिज्ञासा" आतां आपण ब्रह्म जाणून घेऊया. असे म्हटलें म्हणजे 'किं तद् ब्रह्म कोणतें ब्रह्म अशी पृच्छा केली जाते. त्याचे उत्तर "जन्मादि अस्य यतः" असे 'यत् नें दिले जाते. ज्याच्या पासून या जगाचा जन्म, ज्याच्या आधारें त्याची स्थिति, आणि अन्तीं ज्यांत त्याची परिणति वा लय होतो तें ब्रह्म होय. अशा प्रकारें किम् यत् आणि तत् हे एक सूत्र आहे. या त्रिकाच्या योगें प्रश्नोत्तरोपनिषत् पूर्ण होतें. किंबहुना ब्रह्मसूत्र सिद्ध होते. म्हणून ही तिन्हीं पदें मिळून व स्वतंत्रपणे ब्रह्मवाचक होत.

७३१. तत्
ॐतत् सत् । तत् त्वं असि| तत्सवितुर वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । इत्यादि महावाक्यांत ज्या तत् चा उल्लेख आहे तें तत् परमात्मवाचक होय, हें सांगायला नकोच. सर्व नामें आणि सर्वनामें परमात्मवाचकच आहेत. कारण पदें वस्तूचाच निर्देश करतात, अवस्तूचा नव्हे. आणि वस्तु जर आत्मभिन्न दुसरी नाहींच तर तीं पदें दुसऱ्या कोणत्या वस्तूचा निर्देश करणार ? तथापि सर्व पदांत तत् हे पद शिरोमणि आहे. तें युगपत् अवस्तूचा निषेध आणि वस्तूचे विधान करतें. अतद्व्यावृत्तिपूर्वक तद्बोधन करतें. "तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यद् इदं उपासते" जे वाणीनें वा मनानें आपण उच्चारतों चिन्तितों तें सारें अतत् आहे, अवस्तु आहे. वस्तु ह्या सर्व आवरणाच्या पलीकडे आहे. म्हणून ती तत् होय. तो तदुपासक औपनिषदिक ऋषि म्हणतोः "हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये" हे जे सारें इन्द्रिय-गोचर रमणीय वाटते आहे, गोड गोड वाटते आहे तें सारें झांकण आहे. निजधनापासून दूर राखणारा अंतराय आहे. तें सारें झांकण आहे, तें दूर केल्याखेरीज त्याच्या आड दडलेलें तें सत्य स्वरूप हस्तगत होत नाही. मी तर 'त्या' सत्याचा उपासक आहे, ह्या इन्द्रियगोचर आणि म्हणून गोड वाटणाऱ्या भुलविणाऱ्या असत्याचा नाही. हे आत्मदेवा, म्हणून तूं हे बाह्य भुलावणे दूर सार आणि मला आपलें तेंह्या भुलावण्यापलीकडचे खरे रूप दाखव. आत्मदर्शन दें.

७३२. (अनुत्तम) पद
'पदं अनुत्तमम् हे सविशेषण विशेष्य एक नाम आहे. 'किं यत् तत् पदमनुत्तमम् हे एक सूत्र आहे. त्या सूत्रांतील सर्व पदांचे प्रतिपाद्य, सर्वांचे उद्दिष्ट सर्वांचे विशेष्य पदं हे पद आहे. पद्यते इति पदम् "जें गांठले जाते, ज्या मुक्कामाला पोंचलें जातें तें पद म्हणावयाचे. आणि ज्याच्या पलीकडे कांहीं गन्तव्य उरत नाहीं, तो जो शेवटचा मुक्काम त्याला म्हणावयाचे 'अनुत्तमं पदम्.' त्याहून उत्तम वरचे पलीकडचें, श्रेष्ठ दुसरें पद नाही.हिमालयाचें जें 'अत्युच्च शिखर गौरीशंकर त्याला पोंचल्यावर जसें त्यावर पुढे कुठे जायचें चढायचें रहात नाही, तसें ह्या अनुत्तम पदाला पोचल्यावर सर्व गति कुंठित होते. सर्व प्रवास समाप्त होतो. हे वैकुंठ, हे अनुत्तम पद म्हणजे किम् नें ज्याची विचारणा केली जाते, यत् नें ज्याचे संबंधन होते, तत् में ज्याचे निर्देशन होतें तें नित्य शुद्ध बुद्ध अव्यक्त अक्षर होय. जेथून पुनरावर्तन आहे तें पद स्वर्गादि चरम वा परम म्हणता येत नाही. तर "यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमम्" जिथे पोंचल्यावर माघारें फिरणें नाहीं तें शाश्वत स्थानच परम पद होय. त्याहून उत्तम श्रेष्ठ दुसरें पद नाहींच, म्हणून त्याला अनुत्तम पद म्हटले आहे. इतर जीं पदें म्हणजे गति वा लोक आहेत ते आहेत. थोर थोर पुण्यकर्मानेच त्यांची प्राप्ति होते, तथापि ते सगळे अनित्य आहेत. परमेष्ठिपद म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक घेतला तरी तोहि ब्रह्मदेवाच्या आयुष्याबरोबरच संपणारा आहे. तिथली सारी सुखेंहि त्याबरोबरच संपणारी आहेत. आणि जी संपून दुःख देतात त्यांना सुखें तरी कसें म्हणावयाचें ? तीहि परिणामी दुःखच देणारी होत. म्हणून हे सगळेच लोक उच्चहि तुच्छ च होत. ते उत्तम नव्हेत मग अनुत्तम म्हणजे सर्वोत्तम कुठून असणार ? ते सगळे अनित्य आणि असुख होत.

७३२. अनुत्तम (पद)
चतुर्दश भुवनांची वा पदांची कल्पना केली गेली आहे. ही काय कल्पना आहे ? उच्चतर आणि निम्नतर चेतन अवस्थांची चढती आणि उतरती भांजणी आहे ही. या उतरंडीत सर्वांत वरचे पद तें पारमेष्ठ्य वा सत्यलोक होय, सर्वांत खालचें पद तें अन्धतामिम्र नरक म्हणूया. अन्धतामिम्र म्हणजे चेतनावस्थेची निम्रतम भूमिका होय. तिथे जणूं अस्मिता अहंताच लोप पावली आहे. असे नव्हे तर तिचा जणूं मुळी उदयच झालेला नाहीं, जाणीवच आलेली नाही. आणि पारमेष्ट्य म्हणजे जिथे जाणिवेची चतुर्दशी झाली आहे अशी चेतनावस्था. तिथे सर्वज्ञता आहे. उदुत्तर भूमिका चैतन्याच्या शुद्ध शुद्धतर आविर्भावानें प्राप्त होते आणि हा आविर्भाव तीव्र आणि तीव्रतर तपोबलानें होतो. निरुपाधिक चैतन्य हे अनुत्तम पद होय. तिथेच शुद्ध चैतन्याची पूर्णिमा होते. चतुर्दशीलाहि चंद्रबिंब पूर्ण दिसते, पण तिथे एक कळा न्यून असते. तिथे क्षुद्र संकुचित देहात्मभाव नाही पण विश्वात्मभाव आहे, अत्यन्त व्यापक व शुद्ध अहंता अस्मिता आहे, परंतु हीहि उपाधिच आहे. तीहि गेली की चैतन्याची पूर्णिमा झाली. तिथे निखळ चैतन्य नांदते. त्यामुळे देहात्मभावाचे अज्ञान तिथे नाहींच, पण विश्वात्मभाव असून त्याची जाणीव, त्याचे ज्ञानहि तिथे नाही. हेच अतिज्ञान अनुत्तम पद होय. 'सा काष्ठा सा परागतिः' ह्यालाच अनुलक्षून म्हटले आहे. ज्ञानदेव या संज्ञेचा अनुभव असा वर्णितात ः "जाणोनियां नेणपण अंगी बाणलें । नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माये| आत्मज्ञानाची गति झाली निवांत प्रबोधतत्त्व मी पावलें वो माये । " हे "प्रज्ञानं ब्रह्म"

७३३. लोकबन्धु
"एको नैकः सवः कः किं यत् तत् पदमनुत्तमम्" या श्लोकार्धात निर्गुण तत्त्वविचाराच्या पैलतीराकडून सहनाचा प्रवाह वाहिला आहे. "लोकबन्धुर् लोकनाथो माधवो भक्तवत्सलः" या पुढील श्लोकार्धात तो सगुण लोककल्याणाच्या ऐलतीराकडून प्रवाहित झाला आहे. आमचे जीवन हे व्यक्ताव्यक्त-स्पर्शी असल्यामुळे कोणताहि समग्र विचार उभय-स्पर्शीच असू शकतो. आपले चालू जीवन व्यक्त आहे पण त्याचे मूळ अव्यक्त आहे. तरु पत्र-पुष्म-फल-समृद्ध होऊन सफळ व्हायचा तर त्याच्या मुळाची निगा विशेष केली पाहिजे. त्याची उपेक्षा करून साफल्याची आशा करता येत नाही. त्याच बरोबर मुळ पृष्ट नि हृष्ट म्हणजे शोभिवंत व्हायचे तर शाखापर्णसंभारहि सांभाळलाच पाहिजे. म्हणून व्यक्ताचा विचारहि उपेक्षणीय नाही. अव्यक्ताचा विचार, शाश्वताचा विचार म्हणजे तत्त्वज्ञान होय. व्यक्ताचा विचार, प्रस्तुताचा विचार म्हणजे लोकधर्म होय. प्राचीन समाजनेते ऋषिमुनि अव्यक्तासक्त होते तर अर्वाचीन समाज नेते व्यक्तासक्त आहेत. पण या दोहोंपैकी एकाचीहि उपेक्षा करून चालणार नाही. केन्द्रपरिधिवत् ते अभिन्न आहेत. केन्द्रावांचून परिधि असू शकत नाही आणि परिधीवांचून केन्द्रहि असू शकत नाही. परिधिच नसेल तर केन्द्राला केन्द्र कोण म्हणेल ? जेव्हां परिधिरहित केन्द्र दिसतो तेव्हां तो निभृतपरिधि केन्द्र असतो, इतकेंच. पण याचा लोकबन्धु पदाशी संबंध काय ? संबंध हा की तें पद लोकधर्माचा, लोकजीवनाचा विचार करणारे आहे. लोकबन्धु म्हणजे लोकाचाहितकर्ताः समस्त लोक जीवन सुखी कसे होईल याचा विचार आणि आचार पाहणारा. वर्णाश्रमधर्म-प्रतिपादित परमात्मा लोकबन्धु झाला आहे. तो संपूर्ण समाजाचा विचार करतो. एकाद्या व्यक्तीच्या संकुचित स्वार्थाचा विचार तो करीत नाही, तर समग्र समाजाच्या समग्रहिताचा तो विचार करतो; म्हणून परमात्मा हा लोकबन्धु म्हटला आहे. आज विनोबा हे असे लोकबन्धु आहेत असें म्हणतां येईल.

७३४. लोकनाथ
लोकानां नाथः लोकनाथः । लोकांचा नाथ म्हणजे स्वामी तो लोकनाथ म्हणावयाचा. पण लोक म्हणजे काय ? लोक्यते इति लोकः । जो पाहिला जातो तो सगळा लोक होय. अर्थात् हा सगळा व्यक्ताकार म्हणजेच लोक. या लोकांत काय येत नाहीं ? सारेंच त्यांत अंतर्भूत होतें. तृणकांडापासून ब्रह्माण्डापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. सचराचर समस्त सृष्टि त्यांत अंतर्भूत आहे. अशा या लोकाचा तो परमात्मा नाथ आहे, नियंता आहे. त्याच्या अधीन हे सारे विश्व आहे. लोक व्यक्त आहे, तो अव्यक्त आहे. लोक क्षर आहे, तो अक्षर आहे. "अव्यक्तो. ऽक्षर इत्युक्तः". हा जो अव्यक्त आणि अक्षर पुरुष तोच या विश्वांत अंतरयामी रूपानें प्रविष्ट होऊन त्याचे नियमन करीत आहे, त्याला चालवीत आहे. म्हणून तो म्हणावयाचा लोक-नाथ. या लोकनाथालाच पुढील ध्यानांत सर्वलोकैक-नाथ म्हटले आहे
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्
विश्वाधारं गगन-सदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर ध्यान-गम्यम्
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

हा लोकैकनाथ परमात्मा योग्यांनाच ध्यानानें गम्य होतो. कारण तो अव्यक्त आणि अक्षर आहे. पण ज्यांना तें अव्यक्त अक्षररूप न आकळलें तरी परम श्रद्धेनें जे त्याचे नाम-रूप-गुण-कर्म आठवून त्याची सगुण भक्ति करतात त्यांना तो परमात्मा कधी अंतर देत नाही. त्यांच्यासाठी तो अवतार ग्रहण करतो. तो दुर्जनांचे पारिपत्य करून सज्जनांचा कैपक्ष घेतो आणि या भूतलावर धर्माचे राज्य स्थापतो. त्याला हा उद्योग वारंवार करावा लागतो. कारण जनता विषयासक्तींत सांपडून देवाला विसरून जाते आणि अधर्म बळावतो. अधर्म बळावला म्हणजे त्याच्या पारिपत्यासाठी त्याला अवतार ग्रहण करावा लागतो. आणि अशा प्रकारें तो आपल्या भक्तांना आणि अभक्तांना दाखवून देतो की हा लोक कांहीं अनाथ नाही. परमात्मा त्याचा नाथ आहे. परमात्मा नाथ असल्यामुळे भक्त निश्चिंतपणे धर्माचरणच करीत राहतात आणि द्रोही दुष्टांचा दुष्टावा त्यांच्या नाशालाच कारण होतो.

७३५. माधव
माधव हे पद इथे तिसऱ्यांदा आले आहे. पूर्वी ८ व्या व १८ व्या श्लोकांत तें आलेले आहे, वारंवार आले आहे त्यामुळे तें सहनाचे आवडतें नाम आहे, असें म्हणावयाचें. मा म्हणजे लोकमाता लक्ष्मी तिचा धव म्हणजे पति तो- माधव. अथवा मा म्हणजे प्रमा, बुद्धि. तिचा पति तो मा-धव. "यो बुद्धेः परतस् तु सः" म्हणून म्हटलेच आहे गीतेनें. या प्रकारे माधव शब्दाची व्युत्पत्ति आणि विवरण पूर्वी येऊनच गेलें आहे; आता इथें तो शब्द भिन्न प्रकारे व्युत्पादावा लागेल. "मधोः अपत्यं पुमान् माधवः” मधु कुळांत जन्मला म्हणून माधव म्हणावयाचा. यदु पासून जसा यादव तसा मधु पासून माधव. परंतु यदुप्रमाणें मधु प्रसिद्ध नाही. वंशज पूर्वजाचें नांव चालवतो. आधी तो पूर्वजांच्या नावानें प्रसिद्ध होतो. मागाहून तो आपल्या नांवानें पूर्वजांना कीर्तिमंत करतो, सुप्रसिद्ध करतो. कालांतरानें पूर्वजच वंशजाच्या दिगन्त कीर्तीमुळे लोपल्यासारखा होतो आणि लोक त्याला ओळखीनासे होतात. तसेंच मधुविषयीं झालेलें दिसते. माधव सुप्रसिद्ध, पण मधु अप्रसिद्ध ! पण फळावरूनच झाड प्रसिद्ध असते, होय ना ? तर मग प्रसिद्ध फळाचे झाड प्रसिद्ध नाहीं तरी कसें म्हणायचे ? शिवाय मधु हा मधुरा (म्हणजेच आजची मथुरा) नंगरी, यमुनातीरीचें मधुवन इत्यादि नांवांत सुप्रसिद्धच आहे. मधुराजाचा प्रदेश मधुरामंडल हा मधुकुल्यांनी व घृतकुल्यांनी पूर्ण होता. मथुरेचा पेढा आजहि प्रसिद्ध आहे. खवा आणि साखरेचा रवा म्हणजे पेढा ना ? जिथे विपुल दूध दुभतें आणि मधु शर्करा आहे तो देश मधु आणि तिथे जन्मला तो माधव म्हणावयाचा. पण हे चिंतन खरोखर 'माधवो मधुः या पदांच्या विवेचनांत अधिक सयुक्तिक झाले असते. इथें तर 'लोकबन्धुर् लोकनाथों' इत्यादि सूत्र आहे. तदनुसार माधव म्हणजे लोकमातृस्वामी असा अर्थ प्रतीत होतो. पुढील पद भक्त-वत्सलहि त्यालाच अनुसरून लोक-वत्सल अशाच आशयाचे होय, असें म्हणतां येईल.

७३६. भक्तवत्सल
"लोकबन्धुर् लोकनाथो मा-धवो भक्तवत्सलः" हा श्लोकार्ध श्लोकाचा झोक पहातां "लोकबन्धुर् लोकनाथो लोकेशो लोकवत्सलः" असाच म्हटला पाहिजे. परमात्मा हा या विश्वावर आपल्या अपत्या प्रमाणें प्रेम करतो म्हणून तो लोकवत्सल होय. पण इथें तर भक्तवत्सल म्हटलें आहे ? तो भक्तवत्सल असल्याचे कृतज्ञतेनें भक्त म्हणतो इतकेंच, वस्तुतः तो लोकवत्सलच आहे. कारण "समोऽहं सर्वभूतेषु न मे देष्योऽस्ति न प्रियः । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् । " असें भगवद्वचन प्रसिद्ध आहे. अग्नि सर्वांना समान आहे, पण जो त्याच्या जवळ बसेल त्याला तो अधिक उष्णता व प्रकाश देईल, हे उघड आहे. तसा परमात्मा हा लोकवत्सल म्हणजे सर्वांना समान आहे, पण त्याच्याकडे येणाऱ्यांना तो विशेष उपकर्ता होतो. असा तो भक्तवत्सल म्हणविला जातो. "न मे भक्तः प्रणश्यति" असें त्याचे अभिवचन आहे. पण तें खरें करून घेणे हे भक्तांच्या स्वाधीन आहे. भक्त जर परमात्म्याकडे न वळता. त्याच्यापासून दूर दूर गेला तर ? तर तो अभक्त झाला आणि मग त्याचे क्षेम नाही. म्हटलेंच आहे भगवंतानें "अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्मनि" 'मृत्यूची धरिती वाट संसारीं मज सोडुनी' भक्त आपला संसार आणि आपला मोक्ष कसलीच चिंता करीत नाही. तो केवळ ईश्वर-परायण होऊन राहतो. आणि अशा भक्ताची सगळी चिंता परमात्मा वाहतो. "योगक्षेमं वहाम्यहम्' अशी त्याची प्रतिज्ञाच आहे. हेच त्याचे भक्तवात्सल्य होय. भगवंताचे हे भक्त-वात्सल्य भक्त-शिरोमणि तुकारामानें असें सांगितलें गाइलें आहे. "देवाची ते खूण आला ज्याचे घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी' इत्यादि.


सुवर्णवर्णो हेमांङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी ।
वीरहः विषमः शून्यो धृताशीरचलश्चलः ॥७९॥


७३७. सुवर्णवर्ण
"सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी" या ७९ व्या श्लोकाच्या पूर्वार्धात सहस्र सूक्ष्माकडून स्थूलाकडे अथवा आभ्यन्तराकडून बाह्याकडे वळलें आहे, असे म्हणता येईल. निर्गुण, सगुण, साकार अशी ही गति झाली आहे. सहस्रकारानें गीतेचे अनुसंधान ठेवले आहे असें "आदित्यो ज्योतिरादित्यः" हे सहन-वचन-"आदित्यानां अहं विष्णुः, ज्योतिषां रविरंशुमान्' या गीतावचनाला अनुसरून आहे यावरून म्हणता येईल. तथापि मुख्यतः त्याचा आधार वेदोपनिषदेंच आहेत. सहस्राच्या प्रास्ताविक भागांत ह्या नामांना "ऋषिभिः परिगीतानि" म्हटले आहे. ऋषिभिः हे पद मंत्रद्रष्ट्या वैदिक ऋषींचे वाचक आहे. आणि "परिगीतानिः" हे पद जरी मुख्यतः सामगायनाचा निर्देश करीत असले तरी तें भगवद्गीता उपनिषदें यांचेहि सूचन करीत आहे, असे म्हणता येईल. म्हणून प्राचीनांची परिपाटीं आधीं श्रुतीचा आधार देण्याची आहे. तो न मिळाल्यास, वा मिळूनहि अधिक विशदीकरणासाठी, मागाहून स्मृतीचा आधार देण्याची आहे. आणि ती योग्यच आहे. सुवर्णवर्ण, हे पद वेदांत "हिरण्यवर्ण' असे येतें. सुवर्ण हे वेदांत हिरण्याइतकें प्रसिद्ध नाही. त्यांत "हिरण्यवर्णा हरिणी, "हिरण्मयेन पात्रेण" इत्यादि वचनें येतात. सुवर्ण हे मागाहून रूढ झालेले आहे. पण हिरण्यवर्ण वा हिरण्मय पुरुष वा सुवर्णवर्ण म्हणजे काय ? सुवर्णस्य वर्ण इव वर्णो यस्य सः सुवर्णवर्णः हा विग्रह तर स्पष्टच आहे. पण अर्थ स्पष्ट नाही. काय तो आत्मा सोन्याच्या चांदीच्या वर्णाचा आहे ? सोन्यासारखा पिवळा का चांदी सारखा पांढरा आहे ? तो निरञ्जन परमात्मा तर "रक्त-श्वेत-कृष्ण-पीतप्रभाभिन्न चिन्मय" म्हणून वर्णिला आहे. तेव्हां सुवर्णवर्ण या पदाचा अर्थ दीप्तवर्ण असा समजावयाचा. ज्वलद्वर्णाला निकटचा म्हणून तो सुवर्णवर्ण म्हटला आहे.

७३८. हेमाङ्ग
हेमेव अगानि यस्य सः हेमाङ्गः । ज्याची अंगें सोन्यासारखी आहेत तो हेमाङ्ग म्हणावयाचा. इथे अंग शब्द वस्तुतः अवयववाची नाहीं, तो शरीरवाची आहे. म्हणून "हेमेव अङ्गं वपुः यस्य सः हेमाङ्गः" असें म्हणणे बरे. मराठीत अंग शब्द शरीरवाची आहे. अंग धुणे, अंग ठणकणे, अंगी लागणे इत्यादि प्रयोगांत तो शरीरवाची आहे, हे उघड आहे. आणि तो संस्कृतांतूनच आलेला आहे. "अगं गलितं पलितं मुण्डम्"इत्यादि वचनांतून तो आढळतोहि. शंकारचार्यांनी तो तसा घेतलाहि आहे. पण विष्णु तर मेघवर्ण वर्णिला आहे ? तो हेमाङ्ग कसा म्हणावयाचा ? परमात्मा चिद्घन आहे. त्याचे तें स्वरूप लक्षून त्याला हेमाङ्ग म्हणणे योग्यच आहे. अथवा "हेम-सहितानि अलंकृतानि अगानि यस्य सः" असा विग्रह करावयाचा. लक्ष्मीनें च ज्याच्या ठाई वसति केली तो सहजच हेमाङ्ग झाला. हे त्याचे लक्ष्मीकान्तत्व दाखविण्यासाठी तो सर्वांगीं सुवर्णालंकृत वर्णिला जातो. त्याच्या अंगप्रत्यंगातून लक्ष्मी ओसंडते आहे. नीलमण्याच्या सर्वांगांतून जसे त्याचे बहुमूल्य व शोभा प्रकट होते. तसें मेघवर्ण विष्णूच्या अंगांगांतून हेमाङ्गत्व प्रकटत आहे. नीलमणिच आहे तो. मेघवर्णामुळे नील, अनर्घतेमुळे मणि. हा नीलमणि विष्णुच सर्वांगी सुवर्ण म्हणजे समुज्जबल असल्यामुळे हेमाङ्ग म्हटला आहे. स्यमंतक मणि प्रतिदिन एक तोळा सुवर्ण देत असे. पण हा हेमाङ्ग असा आहे की ह्याच्या अंगांगांतून निरंतर सुवर्णाची नदीच वाहते आहे. हवें तितकें सुवर्ण लुटा आणि लुटवा. सगळी किंमत आणि शोभा चेतनाला आहे, मढ्याला नव्हे. म्हणून तो चिद्घन परमात्मा हेमाङ्ग होय.

७३९. वराङ्ग
वरं सुन्दरं, अगं वपुः यस्य सः वरागः । ज्याचें अंग म्हणजे शरीर वर म्हणजे सुन्दर आहे तो वराङ्ग म्हणावयाचा. कोणतें अंग सुंदर म्हणावयाचें ? सौंदर्याची कसोटी काय ? तारुण्य आरोग्य नैर्मल्य वेशभूषौचित्य हे मौलिक सौंदर्य होय. यांनी युक्त तो सुंदर म्हणावयाचा. या सोबतच जर त्याच्या ठाईं अव्यंगता सौष्ठव वर्णलावण्य हा गुणगण असेल तर त्याला विशेष सुदंर म्हणावयाचे. यावर जर त्याच्या ठाईं अनिन्द्यता दैवीगुण ज्ञान या आन्तरिक दिव्यतेचा प्रभाव वसत असला तर तो परम सुन्दर म्हणावयाचा. पहिला गुणगण हे गणिताच्या भाषेत साधे सौंदर्य होय. दुसरा सौंदर्यवर्ग आणि तिसरा सौंदर्यघन होय. परमात्मा वराङ्ग म्हटला आहे याचे कारण तो परम सुंदर आहे हे होय. बाह्य हा जर अंतराचा प्रकाश मानला तर बाह्य कुरूपता ही अंतराच्या कुरूपतेचाच आविष्कार म्हणावयाचा. आणि अन्तर जर सुंदर मानले तर त्याचा बाह्य आविष्कार हा कसाहि असला तरी तो सुंदर म्हणावा लागेल. या दुहेरी कसोटीनें अन्तराचे सौन्दर्य हे बैजिक ठरतें, मौलिक ठरतें, अपरिहार्य ठरते आणि या जगद्वैचित्र्यांत निर्णायक व तारक तत्त्व तेंच आहे. बाह्य सौन्दर्य भ्रामकच होय. राक्षस नानारूपें धारण करीत आणि फसवीत. पण मरतांना त्यांचे खरेंहिडीस रूप प्रकट होई. त्यांची ती माया म्हणावयाची. जग हेहि तसेंच मायिक आहे. त्यांतील सर्व सौन्दर्य हे तसेंच भ्रामक आहे. तें खरें नाहीं. जें खरें नाहीं त्याला सुंदर तरी म्हणण्यांत काय अर्थ ? त्याचे हिडीसपण म्हणजे त्याचे अनित्यत्व व असुखत्व होय. ते शेवटी प्रकट झाल्याशिवाय रहात नाही आणि मग त्याचे आकर्षण कुणाला वाटेल ? शेणामातीच्या बनविलेल्या चित्रीव फळानें कोणाच्या तोंडाला पाणी सुटेल ? परमात्मा हा मृण्मय नाहीं चिन्मय आहे. त्यामुळे त्याला वराङ्‌ग म्हटले आहे. परमात्म्याची मूर्तिहि शेवटीं बोळवावीच लागेल.

७४०. चन्दनाङ्गदी
चन्दन म्हणजेच चन्दन-लेप आणि अंगद म्हणजे केयूर वा बाजूबंद या दोहोंनी युक्त तो चन्दनाङ्गदी. "सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्‌ग चन्दनाङ्गदी' हा श्लोकार्ध एखाद्या सुखवस्तु संपन्न विलासी गृहस्थाचें चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करणारा आहे. शरीराची कांति सुवर्णगौर आहे, सर्व अंगें सुरेख आहेत, सुवर्णालंकार अंगकांतीला आणि शरीरसौष्ठवाला खुलवीत आहेत आणि या सोन्यांत सुगंध म्हणजे चंदनाची उटीहि बाहेर शोभा आणि आंत शीतलता देत आहे. याहून अधिक सुखरूप तें काय असायचे ? परमात्म्याचे सुखरूपत्व मनुष्य आपल्या मापानें मापतो आहे. त्याचें सारें स्पृहणीय, सारें भोग्यजात त्यानें रेखाटलें आहे. आणि परमात्माच स्पृहणीयतम म्हटला असल्यामुळे सर्व उच्चावच स्पृहणीयांचा त्याच्या ठाई सहजच समावेश आहे. मग त्या निराकार निरञ्जनाला "सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश् चन्दनाङ्गदी" म्हटले तर त्यांत गैर काय आहे ? "नभः पतन्त्यात्मसमं पतत्रिणः" कावळा आपल्या कुवतीप्रमाणें आकाशांत उडतो. हंस आपल्या शक्तीनुसार भरारी मारतो. कावळा म्हणतो, आकाश ४०० कोस पसरले आहे, हंस म्हणतो खुळा रे खुळा ! अरे, ते ४००० कोस पसरले आहे. हे माप आकाशाचें नाहीं, हंसकाकांच्या अनुमानशक्तीचे आहे. हे वर्णनहि असेंच हंसकाकीय आहे. मानवी सुखकल्पनेचे आहे आणि जोवर जीव देहबद्ध आहे तोवर त्यानें कितीहि उंच उडी मारली तरी उड्डाणभूमि देहच राहणार हे नाकारता येणार नाही. अनुभवाचें साधनच देहेन्द्रिय असल्यामुळे त्यांच्याच भाषेत त्याला आपल्या अत्युच्च आकांक्षांचे आणि अनुभवाचे वर्णन करणे भाग आहे. परंतु हे जरी खरे असले तरी त्याच्या योगें तो परमात्मा व्यक्त आहे, सगुण आहे, साकार आणि साहंकार आहे असे म्हणतां यावयाचें नाहीं. चंदनाची उटी लावण्याचे सोपस्कार तो घेतो असली भ्रांति होऊं नये. पूजा करतांना हे प्रकार आपण करतों, पण ते उपासनेसाठी करतो. हे रहस्य विसरतां कामा नये. समर्थ म्हणूनच म्हणतात "सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा । "

७४१. वीरहा
त्रिसुपर्णात ब्रह्महत्या, वीरहत्या आणि भ्रूणहत्या या तीन घोर हत्या म्हणजे हत्यांचा उल्लेख आला आहे. घोर कर्म आहे हत्या म्हणजे. परंतु ब्रह्महत्या, वीरहत्या, भ्रूणहत्या हे तर आत्महत्येसारखें महाघोर पातक होय. भ्रूणहत्या म्हणजे बीजाचा वा अंकुराचा नाश. ब्रह्महत्या म्हणजे मार्गदर्शक तारक ज्ञानाचा नाश होय. आणि वीरहत्या म्हणजे समाज-संरक्षक प्रजा-संरक्षक बलाचा नाश होय. म्हणून त्या तिन्ही हत्या अनर्थावह होत. पण इथे तर त्या परमात्म्याला वीरहा म्हणजे वीराची हत्या करणारा म्हटले आहे हे कसे ? इथे वीरहा म्हणजे एकटदुकट वीराची हत्या करणारा असा अर्थ नाही. तो सर्वच वीरांना वीरगति देणारा आहे म्हणून तो वीरहा होय. जगांत जी महायुद्धे होतात ती कालरूप परमात्म्याच्या प्रेरणेनेंच होत असतात. तें ईश्वरी सूत्र सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो त्या महायुद्धांची कारणे राजेलोकांचा लोभ स्पर्धा इत्यादि म्हणतो. परंतु त्या लोभ-द्रोहादि गुणांचा प्रकोप राजे लोकांच्या ठाई घडवून आणणारा जो काल तोच खरोखर वीरहा होय. गीतेंत भगवान् स्पष्टच म्हणत आहेत
कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ गीता ११-३२

"मयैवैते निहताः पूर्वमेव, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् । " वर्षाकाल आला म्हणजे तृणधान्ये अंकुरून वाढू लागतात, शरद् ऋतूंत ती भरतात, आणि हेमन्त-शिशिरांत त्यांची संवंगणी होते. हे सर्व काल-कर्तृत्व आहे. महान नरसंहारहि असाच कालकृत आहे. तो माणसाच्या म्हणण्यानें होत नाहीं. म्हणून तो कालस्वरूप परमात्मा चन्दनांगदी म्हणावयाचा, वीरहा म्हणावयाचा. शंकराचार्यांनी "धर्मत्राणाय वीरान् असुरमुख्यान्हिरण्यकशिपु" प्रभृतीन् रागादींश्च हन्तीति वीरहा", असें भाष्य केलें आहे. पैकी प्रतिपक्षीयवीर-हा अर्थ पूर्वी घेतलाच आहे. त्याचें आध्यात्मिक स्वरूप तें रागद्वेषादि होय.

७४२. विषम (अविषम)
विगतः समः यस्य सः विषमः । ज्याला सम म्हणजे जोड नाहीं तो विषम म्हणावयाचा. परमात्मा हा सर्व-विलक्षण असल्यामुळे तो विषम होय. परमात्म्याहून वरचढ कोणी नाहीच, पण त्याच्या बरोबरीचाहि कोणी नाही, इतकेच नव्हे तर तत्तुल्यहि कोणी नाही. खरोखर तो निरुपम आहे. त्याच्यासारखा तोच आहे. म्हटले च आहे श्रुतीनें . "न तस्य प्रतिमा अस्ति' तसेंच स्मृतीनेहि म्हटलें आहे "न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो, लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः " अर्जुन म्हणतो, हे विश्वरूपा, हे प्रभो ! तुझ्या सारखाहि कोणी नाही, मग तुझ्याहून वरचढ कुठून असायचा ? खरोखर या तिन्ही जगांत अप्रतिम आहेस तूं. तुझा प्रभाव अचिन्त्य आहे. या विश्वांत परमात्मसत्तेहून वेगळी दुसरी सत्ताच नाही. मग तुलनेला वावच कुठला ? चिदचिद् विभाग कल्पून बोलायचे म्हटले तर चित् ची बरोबरी अचित् कशी करणार ? कोणत्याहि दृष्टीनें पहा तो परमात्मा विषम म्हणजे अगदी मुलखावेगळाच आहे.
"अविषमः असाहि पाठ घेतां येईल परमात्मा सर्वान्तर्यामी सर्वात्मभूत सर्वांचा निजात्माच असल्यामुळे तो सहजच अविषम म्हणजे सर्वांना समान, सर्वांना सानुकूल झाला आहे. "द्वितीयाद् वै भयं भवति' दुसरा असेल तर वाद विरोध विग्रह होईल. पण जिथें अभेद आहे, अद्वैत आहे, जैक्य आहे तिथे वादच खुंटला. तिथे सर्व संवादच. वैषम्याला विरोधाला विग्रहाला तिथे कायमचा पूर्णविराम मिळाला.
परमात्मा हा समदृक् आहे. तो सर्वत्र एकत्व म्हणजे आत्मत्व पाहतो, तसाच तो विषमदृक विषम-लोचनहि आहे. त्याच्या समदृष्टीची आत्मदृष्टीची बरोबरी दुसरी कोणतीहि नि कोणाचीहि दृष्टि करू शकत नाही. म्हणून तो विषम तसा अविषम म्हटला आहे.

७४३. शून्य
'शून्य म्हणजे अभावरूप नव्हे, तर सर्वविशेषरहित म्हणून शून्य. परमात्मा हा शून्य आहे म्हणजे तो सर्वविशेषरहित आहे-शून्यासारखा आकाशासारखा. आकाशालाहि शून्य म्हटले जाते, पण तें "शून्यम्" आहे. परमात्मा हा शून्यः म्हटला आहे. आकाश हे शून्य म्हटले असले तरी ते अवकाशरूप शब्दगुण आहे. सविशेष आहे. तसा हा परमात्मा नव्हे. त्याला कोणत्याहि पदानें विशिष्ट करता येत नाही. त्याला आहे-नाहीं सुद्धां म्हणतां येत नाहीं. "न सत् तन् न असत् उच्यते" असा तो परमात्मा केवळ निर्विशेष आहे. म्हणून तो म्हटला आहे शून्य. शून्यवादी बौद्धांचे शून्य तरी दुसरें काय आहे ? तें वस्तुतः वेगळे नाही. पण ते त्याला अभावरूप समजतात, अवस्तु समजतात. ही त्यांची गैर समजूत आहे. शून्य जर आहे तर ते अवस्तु कसे ? सर्व निषेधून जें शेष राहतें तेंच शून्य होय. त्याचा निषेध कसा होणार ? त्यालाच वैदिकांनी ब्रह्म म्हटलें आहे. त्याचाच गौरव ते "निषेधशेषो जयताद् अशेषः" म्हणून करतात. त्यालाच शुन्यवादी शून्य म्हणतात. आणि त्यांचा हा शून्यवाद परमात्म्याला शून्यः म्हणून वैदिकांनी पचवून टाकला आहे. त्यांचे शून्य अभावरूप कल्पिलें आहे, तर हा 'शून्य' भावरूप आहे. अगस्त्य ऋषींनी वातापि पचवून जसा ढेकर दिला तसा वैदिकांनी शून्य गिळून दिलेला ढेकर म्हणजेच हा 'शुन्यः' होय. या शून्यानें अभावरूप शून्य गिळलें आहे म्हणून ज्ञानदेव त्याला निशून्य म्हणतात. तो "निशून्य निरुपम निर्वाण' असे त्याचें वर्णन करून त्याची ती निशून्यता "तो पदपिंडा अतीतु, भवभावविरहितु बाप रखुमादेवीवरु हृदयांतु रया" या शब्दांत विशद करतात. तो शून्य म्हटलेला परमात्मा निशून्य आहे. कारण तो हृदयांत विराजमान आहे, तो आत्मप्रत्यय-सार आहे. आत्मप्रत्ययाचा निषेध कोण कसा करणार ? जो करील तोहि तोच होय.

७४४. घृताशी
< b>घृताः विगलिताः आशिषः यस्य सः घृताशीः । गळाल्या आहेत आशी म्हणजे प्रार्थना कामना ज्याच्या तो घृताशी म्हणावयाचा. स्वरूपाच्या अज्ञानामुळे जीवाला काम कर्म नि वासना यांच्या चक्रांत सांपडावें लागते. मी अमुक वर्णाचा, अमुक गुणांचा, अमुक कर्माचा, अमुक पुरुष असा अभिमान बाळगून मनुष्य कांहीं संकल्प करतो, त्यांच्या सिद्धीसाठी कर्में करतो. त्या कर्माच्या फळांची वासना धरतो आणि अशा प्रकारें इहलोकीं आयुष्य संपवून परलोकी प्रस्थान करतो. तिथून मरण समयींच्या वासनेनुसार इहलोकीं 'परत जन्म घेतो आणि परत संकल्प कर्म आणि तत्फलवासना यांच्या प्रवाहांत सांपडून संसरत राहतो. हे सर्व अविद्याकृत संसरण अविद्यानिवृत्ति होईपर्यंत यांबू शकत नाही. ही अविद्या-निवृत्ति केवळ ब्रह्मविद्येनें, अध्यात्मविद्येनेच होते. या अध्यात्मविद्येचा परम गुरु तो परमात्मा आहे. अर्थातच तो संसारातुन मुक्त आहे. म्हणून तो घृताशी म्हणावयाचा. लोणी जसें अग्नि संपर्कानि विरघळू लागते तसें आत्मज्ञानाच्या आचेपुढे कामसंकल्प टिकत नाहीत. ते सुटूंच लागतात. पातळ होऊन गळून जातात. ज्याची ममता अहंता गेली, ज्यानें आपलें गुणातीत सत्‌-चित्सुख-स्वरूप ओळखलें आहे त्या पूर्णकाम पुरुषाला कोणती कामना, कोणती आशी चिकटं शकेल ? त्याच्या सर्वच आशी घृत झाल्या, विरघळून गेल्या. कोणत्याहि वासनेचा चिकटा वा गंध त्याला उरला नाही.
निर्विष्टविषयस्नेहः स दशान्तं उपेयिवान् ।
आसीद् आसननिर्वाणः प्रदीपार्चिरिवोषसि ॥

अशी त्या विदितात्म पुरुषाची स्थिति होते. मग त्या निर्वाणस्वरूप परमात्म्याविषयी काय बोलावयाचें ? तो तर महापुरुष होय, पुरुषोत्तम होय.

७४५. अचल
न चलः अचलः । जो चळत नाहीं तो अचल म्हणावयाचा. पर्वत चळत नाही म्हणून त्याला अचल म्हटले जाते. मग पर्वत नि परमात्मा एकच झाले म्हणावयाचे ! नाही, पर्वत चळत नाहीं तो नदी नद वन उपवन यांच्या तुलनेनें होय. नदीचा प्रवाह इकडचा तिकडे होतो, वनहि तोडले जाऊन इकडचे तिकडे सरकतें. परंतु पर्वत जिथला तिथे राहतो. म्हणून त्याला अचल म्हटले जाते. परंतु तोहि भूकंपानें चळतो. प्रलयांत कुलाचलहि नुसते चळतच नाहीत तर नाहीसेच होतात. म्हणून त्यांचे अचळपण हे नांवाचेच आहे. परमात्मा जो अचल आहे तो तसा सापेक्ष अचळ नाही. तो स्वभावतःच अचळ आहे. तो आपला स्वभाव सोडू शकत नाही. व्यक्तमात्र चल आहे; क्षर आहे. तो अव्यक्त आणि अक्षर आहे. म्हणून तो अचळ म्हटला आहे. व्यक्तमात्र षड्भावग्रस्त आहे. तो 'जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते' या षड्भावांतून मुक्त आहे. म्हणून तो अचळ म्हटला आहे. तो चयापचयरहित कूटस्य आहे. त्याच्यावर सर्गप्रलयांचा कांहीं परिणाम होत नाहीं. सर्गकालीं तो वाढत नाही तर प्रलय-काली तो घटत नाही. त्याच्यावर सुखदुःखांचा परिणाम होत नाही. त्याला कोणत्याहि द्रव्यानें वा क्रियेनें सुख होत नाहीं वा दुःख होत नाही. सर्वत्र तो समच असतो. स्तुति-निन्देचाहि त्यावर काहीं एक परिणाम होत नाही. स्तुतीनें तो गौरव पावत नाही किंवा निन्देनें लघुत्व. "धिक्कारितां धिक्कारवेना महापुरष". सारांश, कोणत्याहि शक्तीची मात्रा त्यावर चालत नाही. म्हणून तो अचलवत् अचल म्हटला आहे. तो सदैव 'स्वे महिमि' प्रतिष्ठित आहे, अचल-प्रतिष्ठ आहे...

७४६. चल
ज्याला अचल म्हटलें त्यालाच चल कसें म्हणावयाचें ? आणि तेंहि पुनः एकाच दमांत ? होय, आत्मतत्त्व हे असेंच आहे. त्यांत सर्व विरोध रुद्ध होतात, मावळतात. चलन म्हणजे काय ? चलन म्हणजे देशतः आणि कालतः व्यापन. परमात्मा हा अनन्त आहे. त्यानें सर्व दिशा व्यापून टाकल्या आहेत आणि सर्व काल व्यापून टाकला आहे, आतां त्याला काही व्यापायचे उरलें नाही म्हणजे तो आतां कुंठित झाला आहे असे म्हणतां यावयाचें नाही. तसें म्हटल्यास तो सावयव होईल, समर्याद होईल. पण तो तर अखण्ड आहे, अनंत आहे. याचाच अर्थ असा की त्याचे व्यापन अखण्ड चालू आहे. काल सारखा चालला आहे, दिशा सारख्या विस्तारत आहेत. हे अनन्तत्व म्हणजे चलत्वच नव्हे काय ? हेंच "प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम्' म्हणून वर्णिलें आहे. परमात्मा हा सर्वतोनन्तरूप आहे, याचाच अर्थ असा की देशतः कालतः आणि वस्तुतः त्याची सारखी वाढ होत आहे. आजहि तो अनन्तच आहे आणि पूर्वीहि तो अनन्तच होता. कारण त्याचा अन्त कधी कुणाला लागला नाही. इतकेच नव्हे तर लागणे शक्यहि नाही. कारण तो अव्यक्त आहे, निर्गुण निराकार आहे, अक्षर आहे. आणि त्याचे हे अव्यक्तत्व व अ-क्षरत्व म्हणजेच त्याचे सर्वतोऽनन्तत्व, प्रतिक्षणवर्धमानत्व होय. आणि हे त्याचे अकुंठत्व म्हणजेच त्याचे चलत्व होय. त्याला कुंठा नाहीं अंत नाही म्हटलें म्हणजे सारखी त्याची प्रगति होत आहे हे उघड होय. व्यक्ताच्या गतीला मर्यादा अटक संभवते, अव्यक्ताला ती संभवत नाही. म्हणून परमात्मा हा चल म्हणावयाचा. मण्डलांत दोन परस्पर विरुद्ध आणि सुदूर टोके जशी एकत्र मिळतात तसें चलाचलत्व परमात्म्याच्या ठाई एकाकार झालें आहे.


अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् ।
सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा धराधरः ॥८०॥


७४७. अमानी
"अमानी मानदो मान्यः" हे एक त्रिक आहे. या त्रिकांत तुम्हांला सन्मान्य व्हायचे असेल तर स्वतः मानाची अपेक्षा करूं नका. मानापानाच्या जागा सोडून सेवेची कामें करा. हलकी सलकीं उष्टी खरकटी काढण्याच्या सारखी सेवेची कामें आवडीनें उचला. बहुमानाच्या जागा दुसऱ्यांना द्या. थोरामोठ्यांचें स्वागत करणे, नजराणा आहेर घेणे असली उंची गौरवाची कामें मानप्रिय शिष्टांना विशिष्टांना द्या. असा सदाचार तुम्ही पाळल्यास लोकांना तुम्हीं मान्य व्हाल. आणि जेव्हां अग्रपूजेचा प्रसंग येईल तेव्हां भल्या भल्यांना बाजूला सारून अमानी मानद कृष्णा प्रमाणें तुमची सन्मान्य म्हणून, अग्रपूज्य म्हणून पूजा होईल. या त्रिकांत जणूं भगवान् कृष्णाचे अनुकरणीय असें चरित्र-रहस्यच सांगितले आहे. भगवान् कृष्ण जो इतका लोकप्रिय झाला आहे त्याचे रहस्य खरोखर त्याच्या ह्या अमानी मानद असण्यामध्येच नाहीं काय ? या अमानी मानद कृष्णानें गीतेंत ज्ञानाची जी वीस लक्षणे सांगितली आहेत त्यांत पहिले लक्षण अमानित्व हे दिले आहे, हे इथे स्मरणीय आहे. देहाद्यभिमानांतून सर्वदोषमूल अज्ञान अंकुरतें. म्हणून मान नसणें हें ज्ञानाचे पहिले लक्षण झाले. परमात्मा हा सदैव आत्मत्वानेच वर्तत असल्यामुळे त्याला देहाद्यभिमान आतळत नाही, शिवत नाही. आणि म्हणून म्हटले आहे की त्यानें जरी तिन्ही लोक मारून टाकले तरी तोहिंसा करीत नाही वा त्या हिंसाकर्माच्या पापानें बद्ध होत नाही. पापी ठरत नाही. कारण त्याच्या ठाई बालकाप्रमाणें अहंकार नसतो, फलहेतु वा उद्देश नसतो.

७४८. मानद
परमात्मा हा अमानी असला तरी तो मानद आहे, मान देणारा आहे. सर्वांना तो आत्ममान देतो आत्मीय पाहतो, आत्मरूप पाहतो आणि म्हणून कोणाचाहि तो तिरस्कार वा अवहेलना करीत नाही.
शत्रु-मित्र-अरि-उदासीन-मध्यस्थ-द्वेष्य-बन्धुषु ।
साधुषु अपि च पापेषु सम-बुद्धिर् विशिष्यते ॥

परमात्मा हा सर्वांना समबुद्धीनें म्हणजे आत्मरूपानें पहात असतो. त्याला हा शत्रु, तो मित्र, हा मध्यस्थ तो उदासीन, हा द्वेष्य म्हणजे रागाचा, तो बन्धु म्हणजे लोभाचा, अथवा हा पुण्यशील तो दुराचारी असला कुठलाहि भेदभाव नाही. तो सर्वांना आत्मत्वानेंच पाहतो. त्यांच्या वरील इष्टानिष्ट उपाधींना तो ओळखीत नाही. त्या "उपाधींमाजी गुप्त ! जे चैतन्य असे सर्वगत' तें तेवढें तो पाहतो. ह्याचंच नांव मान-द, मान देणारा. जो दिव्यांतील ज्योतीला पहात नाहीं तो दिवा काय पाहतो ? दिव्याची कदर करतो ? प्रत्येक जीव किंबहुना वस्तु म्हणजे पांढरा, निळा, काळा, जांभळा,हिरवा, पिवळा, तांबडा, नारिंगी दिवा आहे. ह्या नाना रंगांच्या दिव्यांत एकच एक निरज्जन ज्योत तेवत आहे. त्या ज्योतीला जो ओळखतो, तोच दिव्याचा मान करतो म्हणावयाचा. तोच मानद म्हणावयाचा. बाह्य रंगानें जो त्यांच्यांत उच्च-नीचता कल्पितो तो वस्तूचा, आत्म-प्रकाशाचा अवमानच करतो म्हटला पाहिजे. परमात्मा असा अवमान करीत नाही. तो सर्वत्र एक तत्त्वच पाहतो. अनात्म परतें सारून आत्मत्वच पाहतो. त्यामुळे तो केव्हांहि आत्मावमानकारी न होतां मानदच होतो. जो मानार्हाचा मान करतो तोच मानद म्हणावयाचा. तो अमानाई अनात्म वस्तूची सदैव मान-खंडनाच करीत असतो. म्हणूनहि, म्हणजे "मानं द्यति खण्डयति इति मानदः" अशाहि व्युत्पत्तीनें तो मानद होय. शंकरानें दक्षाला मान दिला नाही. ह्याचे रहस्य सतीला ते समजावून सांगतात.
प्रत्युद्गम-प्रश्रयणाभिवादनं
विधीयते साधु मिथः सुमध्यमे ।
प्राज्ञैः परस्मै पुरुषाय भूयसे
गुहाशयायैव न देहमानिनें ।"

मानं सत्कारं ददाति इति मानदः । मानं अभिमानं द्यति खण्डयति इति मानदः ।

७४९. मान्य
असा जो अमानी आणि मानद तोच मान्य म्हणजे सर्वमान्य होय, विश्वाच्या मानास पात्र होय. जगांत राज-मान्य लोक-मान्य इत्यादि नाना मान्यता आढळतात, परंतु जो युगपत् सर्वांनाच मान्य आहे असा कोण आहे ?.जगांत हा याला मान्य नाहीं, तो त्याला मान्य नाही, असा परस्परविवाद चालू असतो. हे सगळे विचार बाह्य उपाधींना घल होतात. परंतु स्वाल्याविषयी मात्र कोणाचाहि विरोध असत नाहीं. तो प्रत्येकालाच मान्य आहे. "मी मला आवडत नाही, मान्य नाही' असे कोणी स्वप्नांतहि. कधीं म्हणत नाही. तो जो सर्वांचा स्वात्मा, निरुपाधि परमात्मा, "यत्र विश्वं भवति एकनीडम्" तोच मान्य म्हणजे सर्वमान्य होय. जाग्रद्दशेतील व्यवहारांत प्रत्यक्षच परस्पर-भेद विरोध विग्रह आपण पाहतो. स्वप्रदेशांतहि त्याचे लोण पोंचलेलें असतें. तिथेहि नानात्व आणि तज्जनित भय-भावना विद्यमान असते. स्वप्नांत चोर आपलें धन लुटीत नसला, वाघ आपल्याला फाडून खात नसला तरी प्रत्यक्षवत् आपल्याला त्याचे भय सतावीतच असते. आपण चोर चोर, वाघ वाघ, म्हगून ओसणावत असतो, परंतु सुषुप्तींत हे सगळेच भयावह द्वैत मावळतें. तिथे वाघ आणि बकरी, साप आणि मुंगूस आपले भिन्नत्व टाकून देऊन एकच होऊन जातात. तिथे साप साप रहात नाहीं. वाघ वाघ रहात नाही. सर्व एकाकार होऊन जातात. एकजीव होऊन जातात. असें जें तें परम ऐक्य तेंच मान्य होय. मानार्ह होय. तेंच अग्रपूज्य होय.. त्या परम साम्य पदाहून अधिक मान्य, अधिक पूज्य, दुसरें कांहींच नाहीं. सुषुप्तींत हे भाग्य लक्षित होते. पण सुषुप्ति ही स्वतः एक दशा आहे. म्हणजे अस्थायी वृत्ति आहे. तिच्या पलीकडे, सर्व वृत्तींच्या पलीकडे, नित्य विराजमान जें तुरीय तेंच घ्यावयाचे आहे. तेंच सर्वमान्य होय.

७५०. . लोकस्वामी
परमात्मा हा मान्य म्हणजे सर्वमान्य आहे. कारण शेवटी सर्व विश्व त्याच्याच ठाईं लीन होते. त्याच्या विरुद्ध तें कांहीं करूं शकत नाही. ही त्याची सर्वकष सत्ता लौकिक भाषेत लोकस्वामी म्हणून प्रकट केली आहे. हा लोकस्वामी लोक-रक्षणासाठी वारंवार अवतरतो. पण त्याला सर्व जण ओळखू शकत नाहीत. कामक्रोधपरायण विश्वद्रोही लोक आपली दंडेली चालू दिली जाते असें पाहून आपणच या लोकांचे स्वामी आहोत अशी गैर समजूत करून घेतात. या विश्वांत एक अचिन्त्य अदृश्य शक्ति सर्व विश्वाचें संगोपन व नियमन करीत आहे हे ते अनेकदा आपल्या दंडेलीला यश मिळाले असें पाहून विसरून गेलेले असतात. आपल्याला मिळालेल्या क्षमेची ते जाणीव बाळगीत नाहीत. परंतु जेव्हां त्यांचे शत अपराध पूर्ण होतात तेव्हां ती परमेश्वरी शक्ति त्यांचा शिरच्छेद करून त्यांचा निग्रह करते आणि सज्जनांवर म्हणजे जीव-वत्सल जनांवर अनुग्रह करते. ईश्वर अपराधी जनांना आपले जीवन सुधारण्याला भरपूर वाव देत असतो. तो निग्रहानुग्रहाची उतावीळ करीत नाही. पण योग्य समयीं तो दुष्टांचा निग्रह करून साधुपरित्राण व भक्तानुग्रह केल्यावांचून रहात नाही. पण एवढा धीर ज्यांना नसतो ते देवाला बोल लावीत असतात, देव झोपला आहे, का मेला आहे म्हणून. परंतु देव कधी झोपतहि नाही व मरतहि नाही. तो सगळे कांहीं पहातो आहे, पण त्याची दया अपार आहे. तो क्षमाशील आहे. तो वाट पहातो. पण जेव्हां पाप असह्य होते तेव्हां तो आपलें सुदर्शन चालवतो. जेव्हां तो ताप असह्य होतो तेव्हां तो कृष्णमेघ सहन धारांनी कृपावृष्टि करतो. जगाचे पाप धुतलें जातें, ताप शमतो आणि सर्वत्र शान्ति नि सुख नांदतें. ज्ञानदेवांनी मागितलेलें प्रसाददान तो लोकस्वामी सर्व लोकांना बहाल करतो. तेव्हा मग "खळाची व्यंकटी सांडे तया सत्कर्मी रति वाढे| भूतां परस्परें पडे । मैत्र जीवींचें । दुरिताचे तिमिर जाए । विश्वी स्वधर्म-सूर्यो पाहे| जो जे वांछी तें तो लाहे । प्राणिजात ॥ "

७५१. त्रिलोकधृक् (त्रिलोकधृत्)
परमात्मा प्रजावत्सल असल्यामुळे तो लोकस्वामी म्हटला आहे. वात्सल्याच्या पोटींच दुष्ट-निग्रहणहि येते. त्यामुळे त्याला प्रजाद्रोही कामक्रोधपरायण लोभी असुरांवर वारंवार शस्त्र धरावें लागतें. धर्म-संस्थापनार्थ केलेलें हें. निग्रहानुग्रहरूप अवतार-कार्य स्थूल रूपानें वर्णिलेले असले तरी तें सूक्ष्म आहे. त्याचे स्वरूप आध्यात्मिक आहे. प्रजेचा द्रोह काम क्रोध लोभ मोह मद मत्सर इत्यादि आसुर गुणगणाकडून होत आहे. त्यांचा निग्रह ब्रह्मचर्य म्हणजे सत्य आणि संयम यांच्या नेतृत्वाखाली दैवी गुणगणांकडून होतो. हे आध्यात्मिक समाजशास्त्र आहे. याची उपेक्षा करून केवळ बाह्य अमुक एक राज्यपद्धति कायम केल्यानें, लोकसत्ताक वा साम्यवादी वा अन्य कोणती, कार्यभाग सिद्ध व्हावयाचा नाही. म्हणून ज्ञानदेवासारखे तत्वज्ञ आणि सर्व भूताहितेरत महापुरुष दैवी संपदेचा संदेश देऊन मोकळे होतात. दैवी गुणांच्या जोपासनेनें सर्वांचे सर्वकाळ सर्व मनोरथ पूर्ण होतील असें त्यांचे दर्शन आहे. परमात्माहि लोकांचे स्वामित्व करतो, त्रिभुवनांचा प्रतिपाळ करतो, तोहि या गुणांना अनुसरूनच होय.
"नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोडें । आणुनी निराळे द्यावें हातीं ॥ इन्द्रियांचा जय साधुनिया मन । निर्विषय कारण असें तेथें ॥ "
असा तुकोबांनी त्याचाच अनुवाद केला आहे. त्रीन् लोकान् धारयति इति त्रिलोकधृक् वा त्रिलोकधृत् । इथें त्रिलोक म्हणजे तीन लोक वा बहु लोक एवढाच अर्थ नाही. तर तीन म्हणजे समस्त असा अर्थ अभिप्रेत आहे. तो परमात्मा समस्त विश्वाचा धर्ता आहे. हे समस्त चराचर जगत्, हें समस्त व्यक्त विश्व त्या परमात्म-संज्ञक अव्यक्तार्णवांत कमलवत विराजमान आहे. तो अव्यक्त अक्षर परमात्मा त्याचा मूलकंद आहे. म्हणून तो म्हटला आहे त्रिलोकधृक्.

७५२. सुमेधा
सु शोभना मेधा प्रज्ञा अस्य इति सुमेधाः । ज्याची मेधा म्हणजे बुद्धि शोभन आहे तो सुमेधाः म्हणावयाचा. 'सुरीचे शोभनत्व तिच्या स्वकर्मक्षमतेत छेदनपटुतेंत आहे. तसें बुद्धीचे शोभनंत्व तिच्या तत्त्वग्रहणक्षमतेंत आहे. हेमचंद्रानें बुद्धीचे गुण असे गणले आहेतः--
शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा ।
ऊहापोहोऽर्थ-विज्ञानं तत्त्वज्ञानं च धी-गुणाः ॥

बुद्धीचे असे सप्त गुण गणले असले तरी त्यांत मुख्य तत्त्व-ज्ञानच आहे. इतर सर्व गुण तदुपकारक म्हणून गुण गणले गेले आहेत. तत्त्वज्ञान करून देणे हाच तिचा कार्यभाग. तेव्हां सुमेधाः म्हणजे ज्याची मेधा त्याचा अचूक वेध घेते, तें हस्तगत करते, तो. परमात्मा हा स्वतःच जेय तत्त्व आहे आणि तें स्वतत्त्व तो स्वतःच आकळतो म्हणून तो सहजच सुमेधाः म्हटला गेला. बुद्धि हे मानवाचे निरुपम उपकरण आहे, शस्त्र आहे. त्या साधनानेच त्यानें सर्व सिद्धि मिळविली आहे. म्हणून त्याची सर्वांत मोठी सिद्धि म्हणजे ही बुद्धि सिद्ध करणेच होय. मानवाचा सर्वोत्तम आदर्श स्थितप्रज्ञच. सुमेधाः पदानेहि तोच अभिप्रेत आहे. योगिजन सर्वात्मना आत्मशुद्धीसाठी झटत असतात. ती आत्मशुद्धि म्हणजे वस्तुतःबुद्धिशुद्धिच होय. कारण आत्मा स्वतः शुद्धच आहे. बुद्धीची शुद्धि झाली म्हणजे ती स्थित होते आणि बोध-स्वरूपच आत्मा भेटतो. या बुद्धिबोधांच्या ऐक्यालाच आत्मशुद्धि म्हणावयाचे, तत्वज्ञान म्हणावयाचे. परमात्मा हा आत्मभिन्न कांहींच ओळखीत नसल्यामुळे तो स्वदृक् होय आणि जो स्वदृक् तो सुमेधाः ।

७५३. मेधज
मेधे अध्वरे जायते इति मेधजः । जो मेधांत म्हणजे यांत उत्पन्न होतो तो मेधज म्हणावयाचा. यज्ञानें जेव्हां मनुष्याची पूर्ण शुद्धि होते, जेव्हां तो यज्ञक्षपितकल्मष होतो, तेव्हां आत्मदर्शन होते. पण आत्मदर्शन हे काही कर्मफल नव्हे, तर तें ज्ञानफल आहे. होय ज्ञानफलच आहे तें, पण तें ज्ञान एकाएकी होत नाही. स्ववर्णाधमधर्माचरणरूप कर्म, यजन पूजन ध्यान वाक्य-विचारणरूप उपासना वा विकर्म आणि शेवटी सर्वसंन्यासपूर्वक प्रयाणसाधना करावी तेव्हां कुठे तें ज्ञान वा अकर्म निष्पन्न होते. असा जीवन-मेध करावा तेव्हां कुठे ती आत्मशुद्धि होते, तें मेधाजनन होतें जिचें फळ तो परमात्मा आहे. म्हणून तो मेधज म्हणावयाचा. मेधाजननरूप जो यज्ञ तोच मेध होय. आणि तिथेच म्हणजे त्या मेधेत, त्या प्रशेंत तो परमात्मा प्रकाशतो.
"नाविरतो दुश्चरितात नाशान्तो नासमाहितः । नाशान्तमानसो वापि प्रज्ञानेनैनमाप्नुयात् ॥ "
या उपनिषदवचनांत तर प्रज्ञानानेहि त्या परमात्म्याला प्राप्त करून घेता येणार नाहीं म्हणून म्हटले आहे, हे कसे ? त्याचा आशय हा की कोण्या बौद्धिक प्रकर्षानें कोणाला तो अमृतानुभव लाभावयाचा नाही. ज्या ज्ञानांत, विषयमृगतृष्णाशमन नाहीं तें आत्मज्ञान नव्हे. ज्या प्रकाशानें नैश अंधकार नाहीसा होत नाहीं तो सूर्यप्रकाश नव्हे. एक वेळ असें मानणे शक्य आहे की एखाद्याला तीव्र वैराग्य झालें पण आत्मज्ञान नाही. पण हे मानणे शक्य नाहीं की आत्मज्ञान झाले आहे पण वैराग्य मात्र नाही. कारण ज्ञानाचा तो सहज परिणाम आहे. अरुणोदय जसा सूर्योदय निकट असल्याचे सूचित करतो तसा वैराग्यप्रधान दैवी गुणोत्कर्ष आत्मज्ञानोदय निकट असल्याचे सूचित करतो. परंतु सूर्योदयाचे चित्र जसें दिवस करीत नाही तसें कोरें शाब्दिक पाण्डित्य विकारशमन करीत नाही आणि ज्ञानाचे तर लक्षण आहे "तत् ज्ञानं प्रशमकरं यद् इन्द्रियाणाम्' अशा ज्ञानाग्नींत विकार-हवन करून होणाऱ्या यज्ञांतून जो प्रकट होतो तोच मेधज होय.

७५४. धन्य
धन्य म्हणजे कृतकृत्य. ज्याला कांहीं अनवाप्त वा अवाप्तव्य आहे त्याला कर्तव्य उरलेच आहे. त्याला कृतकृत्य म्हणतां यावयाचें नाही. पण ज्याला मिळालें नाहीं असें कांहीं नाहीं आणि मिळवावयाचेहि कांहीं उरलें नाहीं त्या सर्वकर्तव्यताप्रहाणि झालेल्या ज्ञानी पुरुषालाच धन्य म्हणावयाचे. परमात्मा हा असा पूर्णकाम असल्यामुळे तो धन्य होय. या धन्य दशेचा ज्यांनी निश्चय केला आहे, त्यासाठीच ज्यांचे सर्व चिंतन, सर्व भाषण आणि सर्व कर्म चालले आहे ते धन्य होत. "ते धन्या भुवि परमार्थनिश्चितेहा, शेषास् तु भ्रम-निलये परिभ्रमन्ति" ज्यांनी असा परमार्थ-निश्चय केला नाही आणि जे देहे प्राणे मनें त्यास वरले नाहीत ते भ्रान्त होत, वंचित होत. या धन्य आणि धिक्कृत जनांविषयीं बायबलांत येशूचे उद्गार असे आहेतः "तेव्हां तो आपल्या शिष्यांकडे दृष्टि लावून म्हणाला. अहो दीनांनो, तुम्ही धन्य आहां. कारण देवाचें राज्य तुमचे आहे. अहो जे आतां भुकेले आहां ते तुम्ही धन्य आहां. कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे आतां रडत आहां ते तुम्ही धन्य आहा. कारण तुम्ही हंसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांस दूर करतील, निंदितील आणि तुमचें नांव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य आहां. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे (या नंतर अशिष्यांना उद्देशून तो म्हणाला) अहो तुम्हां धनवंतांस धिक्कार असो, कारण तुम्हांला आपलें सांत्वन मिळून चुकले आहे. अहो जे आतां तृप्त झालां आहां, त्या तुम्हांस धिक्कार असो, कारण तुम्हांला भूक लागेल, अहो जे आतां हंसतां आहां त्या तुम्हांस धिक्कार असो. कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हां सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुम्हाला धिक्कार असो । " या येशूच्या वचनांचे आणि इतरहि सत्पुरुषांच्या वचनांचे तात्पर्य हेच की ज्यांनी परमार्थनिश्चय केला नाही आणि जे या संसारांत रमले आहेत ते शोचनीय होत. उलट ज्यांनी परमार्थनिश्चय केला आहे आणि तदर्थ जे या संसारांत अनासक्त झाले आहोत ते धन्य होत. सद्वस्तूचा निश्चय न होणेच शोचनीय आहे आणि त्याचा निश्चयच धन्य. (बायबल = लूक ६-२०-२६).

७५५. सत्यमेधा
"सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा धराधरः" या श्लोकार्धात मेधा-सूत्र आले आहे. त्या मेधाबलानेच मनुष्याचे जीवन धन्य होते. आणि सर्वोपजीव्य सर्वफलदात्री धरेला धारण करण्यास तो समर्थ होतो. सर्व विद्या कला व्यापार उद्योग मेधाधीन आहेत. मेधा नसेल तर ते सगळे यथावत् होणार नाहीत आणि त्यांचे फल तितक्या अंशानें लाभणार नाही. आंधळ्या माणसाजवळ रत्न असले तरी ते जसें त्याला दिसत नाही आणि हस्तगत होत नाही त्याप्रमाणें त्याला या विश्वात साठलेली सर्व संपत्ति माणसाजवळ असून ती त्याला मेधाशक्तीच्या अभावी दिसत नाही आणि हस्तगत करता येत नाही. म्हणून म्हटले आहे "सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यन्ध एव सः" आणि हे सर्वप्रकाशक शास्त्रहि त्यालाच उपयोगी की ज्याला आपली कांहीं बुद्धि आहे, स्वतंत्र मेधा आहे. आणि म्हणूनच म्हटले आहे
"यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् ।
लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति । "

ही स्वयंप्रज्ञाच प्रज्ञा, मेधा, बुद्धि म्हणावयाची. ती ज्याला नाही त्याचे शास्त्रज्ञान मोरपिसांसारखें दृष्टिहीन होय. तो डोळस दिसत असला, शास्त्र पढला असला तरी तो दृष्टिहीन होय. परमात्मा हा चिद्रूप असल्यामुळे तो परम मेधावी तर आहेच. आणि त्याची ही मेधा सत्य म्हणजे अवितथ, अव्यर्थ, अमोघ आहे. तिचा निर्णय अचूक असतो. तिच्या निर्णयांत संशयाला आणि आंशिकतेला वा असमग्रतेला मुळीं वाव असत नाही. तिचे दर्शन निःसंशय आणि समग्र असते. बुद्धीचे सत्यत्व वा वैशारद्य तें हेच होय. डोळस मनुष्य जसा आडवाटेला जात नाही आणि चांचपडत वा ठेचाळत नाही तर थेट निर्विघ्न मुक्काम गांठतो त्या प्रमाणें जो ज्ञेय गांठतो तो सत्यमेधा म्हणावयाचा. परमात्मा हा सहजच सत्यमेधा आहे. साधकाला बुद्धीची शुद्धि करून ते पद पटकवायचे आहे.

७५६. धराधर
धरां धारयति इति धराधरः । जो धरेला पृथ्वीला धारण करतो तो धराधर म्हणावयाचा. या धरेला मी धारण केले आहे असे कोणी म्हणूं शकत नाही. तें परमात्म्याचे कर्म आहे. तोच म्हणूं शकतो "गां आविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा"-'धरारूपें धरीतसें' प्रत्येक देहाची एक अभिमानिनी देवता असते. तीच त्याचें धारण करीत असते. तशी या धरेची जी अभिमानिनी देवता तीच या धरेला धारण करीत आहे. ही अभिमानिनी देवता प्रतिव्यक्ति वेगळी दिसत असली तरी वस्तुतः ती सर्व चिच्छक्ति होय. सूर्यबिंब एक आहे, त्याची प्रतिबिबें असंख्य आहेत. त्या प्रत्येक प्रतिबिंबांत जें तेजोरूप आहे तें सारें स्पष्टच त्या सूर्याचे आहे. तद्वत् एकच एक आत्मसत्ता आहे. तिची सारी ही यच्चयावत् दिसणारी रूपें प्रतिबिंबमात्र होत. सूर्य नसेल तर त्याची प्रतिबिंबें पडणार नाहीत. म्हणून सूर्य हा जसा सर्वप्रतिबिंबधर होय तसा तो परमात्मा सर्वजीवनिकायरूप या धरेचा धर्ता होय, धराधर होय. अखिल विश्वाचा विचार वेगळा. ते फार मोठे आहे. पण आम्हां सर्व जीवांचे जीवन या पृथ्वीशी निगडित आहे. तीचं आमची धात्री आहे. तिच्याच कुशींतून आम्ही जन्मलों, तिच्याच मांडीवर आम्ही खेळतो आहों आणि शेवटी तिच्याच पदराखाली निजणार आहों. अशी ही धरा आहे. सर्व जीवन, समग्र जीवन तिनें धारण केले आहे. ती आमची माता आहे, आणि पिता तो परमात्मा आहे. त्यालाच पुढील नामांत तेजोवृष म्हटले आहे. तो तेजोवृष तो सूर्यभगवान् या धरेच्या ठाईं आपलें ओज ओतून, तिला जीवनधारणक्षम बनवितो. त्यामुळे तो या धरेचा धर वा वर होय. सृष्टीच्या आरंभी अव्यक्तार्णवांत बुडालेली ही भूमि वराहरूपानें परमात्म्यानें उद्धरिली म्हणूनहि तो धराधर म्हणावयाचा.




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP