!DOCTYPE HTML PUBLIC "-//W3C//DTD HTML 4.01 Transitional//EN" "http://www.w3.org/TR/html4/loose.dtd"> सत्संगधारा - श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा



ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्‍ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ।
ब्रह्मविद्‍ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ॥७१॥


६६१. ब्रह्मण्य
हा ७१ वा श्लोक संपूर्णच ब्रह्मपर आहे, ब्रह्माचा पाढा आहे. प्रिय जनाचें नांव आलें म्हणजे जसें त्याच्या प्रेमाचे भरतें येऊन प्रेमी त्याच्या विषयीं अनावर बोलत सुटतो तसे इथे सहस्राला झाले आहे. ब्रह्म हे त्याचे परब्रह्म आहे. त्याचे दैवत आहे. याहून मोठे परायण दुसरें नाहीं, याहून मोठे दुसरें दैवत नाही. म्हणूनच प्रास्तविक भागांत आले आहे- "परमं यो महद् ब्रह्म परमं यः परायणम्" इत्यादि.या ब्रह्माच्या प्रेमापाईं वेद अक्षरशः घोष करीत आहेत, शिवसनकादिक मौन सेवीत आहेत, संत जय जय करीत आहेत आणि सारें विश्व कळत नकळत आपल्या सर्व क्रियाकलापासह त्यांत प्रविष्ट होत आहे. सर्वांच्या सर्व प्रवृत्ति आणि निवृत्तिहि त्यांतच समाविष्ट होत आहेत. गीतेंत यथार्थच म्हटले आहेः
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ गीता ११-२८

या श्लोकांतील नरलोक-वीराः या पदा ऐवजी मी म्हणेन विश्वाची सगळी प्रवृत्ति. आणि ही प्रवृत्ति सगळी असल्यामुळे त्यांतच त्याची निवृत्तिहि येऊन जाते. असें जें हें सर्वंकष ब्रह्म त्याचा जोहितकर्ता, उपासक तो ब्रह्मण्य होय. परमात्मा हा पहिला ब्रह्मण्य आहे. कारण तो चिद्रूप आहे. चित्तत्त्वच जाणू शकतें, केव्हांहि अचित् नाही. म्हणून स्वतः ब्रह्मच ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्मोपासक म्हटले आहे. तें में अक्षर पर ब्रह्म त्याच्या उपासनेनें ज्यांनी आपलें संपूर्ण जीवन ब्रह्ममय करून टाकले आहे ते लोकहि गौरवानें आणि तात्पर्यानं ब्रह्म म्हटले जातात. अशा ब्रह्ममूर्ति ब्राह्मणांचे जे उपासक तेहि ब्रह्मण्य होत. भगवान् कृष्ण असे ब्रह्मण्य होते. शिवाजी महाराज ब्रह्मण्य होते. सर्वांनी असें ब्रह्मण्य व्हावयाचे आहे. ब्रह्माधिगमाचा तो सोपा उपाय आहे. असे सगुणोपासक देवाला फार आवडतात. पुत्राहून पौत्र अधिक प्रिय असतो त्या न्यायाने.

६६२. ब्रह्मकृत्
ब्रह्म करोति इति ब्रह्मकृत्. जो ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्तोत्र, वेदमन्त्र करतो तो ब्रह्मकत् म्हणावयाचा. जो ब्रह्माचें परमत्व जाणतो तो ब्रह्माची स्तुति करणार नाही तर काय करील ? ते त्याला अपरिहार्य आहे. पण वेदमंत्रांच्या ऋषींना तर द्रष्टे म्हटले जातें, कर्ते नव्हे ? बरोबरच आहे तें. कारण, कर्तृत्व सगळे प्रकृतीचे आहे आणि ऋषि तर आत्मरूप झालेले. त्यांच्या ठाई कर्तृत्व कसें असणार ? म्हणून त्यांना मंत्रकर्ते न म्हणतां मंत्रद्रष्टे म्हटले जाते. शिवाय, कवि काव्य करतो त्यांत आपण ज्याची प्रशंसा करतो ती त्याची प्रतिभा वा दर्शनच असते, त्याची शब्दरचना नव्हे. शब्दाकार तर त्याच्या त्या प्रतिभेनें वा दर्शनानेच धारण केलेला असतो. म्हणून कवीला द्रष्टा म्हणण्यांत त्याचा खरा गौरव आहे, कर्ता म्हणण्यांत नव्हे. कर्ता म्हणण्यांत खरोखर त्याचा अवमान आहे. जेव्हां कवि कलाकार गायक तन्मय होऊन काव्य कलाकृति गायन करतो तेव्हां ते परम सुंदर होतें. आणि हे आपण केलें असें त्याला वाटत नाहीं तें आपल्या हातून झालें असें तो म्हणतो. कसें झालें हें त्याला कळतच नाही. ही जी अहंमुक्ति, कर्तृत्वमुक्ति तेंच ब्रह्म आहे. तीच महान् कला आहे. आणि तिचा कर्ता तो परमात्मा आहे. सर्वांत मोठे काव्य सर्वांत मोठे चित्र वा शिल्प, सर्वात मोठे गायन म्हणजे हें विश्व आहे. तें गुणानें आणि परिमाणानेहि सर्वांत मोठे म्हणून ब्रह्म होय आणि त्याचा कर्ता तो ब्रह्मकृत्. अक्षर ब्रह्म हे कारण होय. तें स्वयंभू आहे. त्याचा कर्ता कोणी संभवत नाही. परंतु शब्दब्रह्म वेद वा कार्यब्रह्म हे विश्व कृतच असू शकते. आणि त्याचा कर्ताहि कोणी असलाच पाहिजे आणि तो सर्वशक्तिमान् आणि सर्वज्ञच असला पाहिजे, हे उघडच आहे. अर्थात् तो कोणी सामान्य जीव संभवत नाही म्हणून तो परमात्माच कर्ता आहे या शब्द-ब्रह्माचा नि कार्यब्रह्म विश्वाचा. त्याचाच उल्लेख पुढील पद ब्रह्मा म्हणून करतें.

६६३. ब्रह्मा
ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. या समस्त सृष्टीचा शब्दसृष्टीचा नि भूतसृष्टीचा तोच कर्ता होय. 'ब्रह्मकृत् ब्रह्मा' हे वाक्य तो अर्थ व्यक्त करीत आहे. सृष्टीतील प्रत्येक पद सापेक्ष आहे. या सापेक्षतेला अनुसरून तें ब्रह्म सर्वकारण म्हणून ब्रह्मा म्हटलें गेलें. वस्तुतः तें कारणहि नाही. तें आहे केवल. त्याच्या बाबत कोणताहि शब्द आपल्या सापेक्षतेमुळे यथार्थाक्षर होऊं शकत नाही, तोकडा पडतो. तथापि या कार्यब्रह्माच्या अपेक्षेनें त्याला संबोधावयाचे म्हणजे त्याला कारण म्हटले पाहिजे. आणि तो सर्वकारणभावच इथें ब्रह्मा म्हणून म्हटला आहे. म्हटलेंच आहे "ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव, विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता । स ब्रह्मविद्यां सर्वविद्याप्रतिष्ठा, अर्थर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह ॥ " तो आदिदेव ब्रह्मा झाला आणि त्यानें हे विश्व निर्मिलें आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी त्याला वेद उपदेशिले आणि जीवनासाठी यज्ञाची योजना केली. असे त्याचे कर्म अन्यून परिपूर्ण आहे. गीतेतहि याचा उल्लेख आहेः (१) "सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वम् एष वो ऽस्त्विष्टकामधुक् ॥ (२) "ब्राह्मणास् तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा । " इथें ब्राह्मणाः म्हणजे ब्राह्मणादि चतुर्वर्णात्मक समस्त प्रजा असा आशय. त्याच प्रमाणें यज्ञ म्हणजे नुसतें हवन नव्हे तर यज्ञादि वर्णाश्रमधर्म होय. विश्वाभिमानी विश्वकर्ता या नात्यानें परमात्मा ब्रह्मा तर अकर्ता या नात्यानें तोच ब्रह्म होय.
चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म-विभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्ययम् ॥ गीता ४-१३

या गीतेच्या श्लोकाचा हाच आशय आहे.

६६४. ब्रह्म
ब्रह्मा हे अर्वाचीन पद आहे. तर ब्रह्म हे प्राचीन पद आहे. अभिमानमूलक कर्तृत्व भोक्तृत्व जिथे संभवत नाहीं तें निर्गुण निराकार पद प्राचीन म्हणजे मूळ होय. सगुण साकार हे अर्वाचीन म्हणजे मागाहूनचे आहे, बुंधा शाखा पत्र पुष्प फल इत्यादि रूप आहे. पण ज्या प्रमाणें जिथे मूळ तिथेच बाह्य शाखा पत्र पुष्प फलादि वृक्ष-विस्तार संभवतो आणि जिथे तो विस्तार आहे तिथे वृक्षमूलहि असलेंच पाहिजे, त्याप्रमाणें सगुण निर्गुण ही नित्यसंश्लिष्ट आहेत, एकवटली आहेत. जिथे दार्शनिक तत्त्वविचार कर्तव्य असतो तिथें तें ब्रह्म म्हणजे अक्षर ब्रह्म समजावयाचे. जिथे व्यावहारिक धर्मविचार म्हणजे लोकजीवनाचा विचार कर्तव्य असतो तिथे ब्रह्म म्हणजे सगुण समजावयाचें. तोच ब्रह्मा, तोच ईश्वर. तो गुणकर्म-विभागशः सर्व जीवांचे नियंत्रण करीत असतो. त्यानें दिलेला आदेश म्हणजेहि ब्रह्म होय. त्यालाच वेद म्हणतात. त्यानें लावून दिलेला आचारहि ब्रह्म होय. त्यालाच (यज्ञादि वर्णाश्रम) धर्म म्हणतात. अशा प्रकारें ब्रह्म पद हे अनेक अर्थानी येतें पण तें असा विवेक करून घेतलें असतां परस्परविरुद्ध वा व्यामिश्र न राहतां विविध पण अविरुद्ध व सुसंगत असेंच असल्याचे दिसून येईल. जीव देहसापेक्ष असल्यामुळे त्याला सगुणाचा विचार टाळतां येत नाही. आणि अन्तिम तत्त्व निर्गुणच असू शकतें म्हणून तें त्याला विसरतां येत नाही. यामुळे सगुण-निर्गुणाची जोडी ही सदैव सर्वत्र असावयाचीच. इथेहि ती तशी आढळते ब्रह्मा ब्रह्म म्हणून..

६६५. ब्रह्म-विवर्धन
अक्षर ब्रह्म ज्ञेय आहे, शब्दब्रह्म अध्येतव्य आहे. यज्ञब्रह्म आचरणीय आहे, जगद् ब्रह्म सेव्य आहे. पण विवर्धनीय ब्रह्म कोणतें ? विवर्धनीय ब्रह्म आहे तप. जसजसें तप करावें तसतसें ब्रह्म वाढते. जसजसें सोनें तापवावें तसतसें हीण जळून खाक होते आणि विशुद्ध सोनें प्रकट होते. हे निखळ सोनें हस्तगत होणे म्हणजेच ब्रह्म वाढणे होय. वस्तुतः ब्रह्म वाढायची घटायची वस्तु नाहीं. तें कूटस्थ आहे. अर्थात त्याची वाढ म्हणजे साधकाच्या जीवनांत त्याच्यावरील पटलांची आवरणांची विक्षेपांची उत्तरोत्तर घट होय. सूर्य हा सदैव समानच प्रकाशमान आहे. परंतु जसजसा अंधार कमी होतो तसतसा सूर्य म्हणजे सूर्यप्रकाश वाढला असें म्हणावयाचे. तप हे तसें अज्ञानपटलाचे निवारण आहे. तें वाढवावें तितकें थोडें आहे. म्हणून ज्यांचा परमार्थनिश्चय झाला आहे ते ब्राह्मण सदैव तपःस्वाध्याय-निरत राहतात. तपानें ते दोष क्षीण करीत जातात आणि स्वाध्यायानें ध्येयाचे आकलन करीत जातात. गन्तव्य गांठायचे म्हणजे आधीं गन्तव्याचा निश्चय झाला पाहिजे. स्वाध्यायानें तो होतो. पण गन्तव्य नुसतें अवगत झाल्यानेच अधिगत होत नाहीं. त्यासाठी अभिक्रम करावा लागतो. हा अभिक्रम म्हणजे गन्तव्याभिमुख प्रवासच तप होय. त्या स्वाध्यायपूर्वक तपाच्या योगें ब्रह्म अवगत आणि अधिगत होते. म्हणून वेदाध्ययानाला आणि तपश्चर्येला मिळून ब्रह्मचर्य म्हटले जाते. या ब्रह्मचर्याची वाढ म्हणजेच ब्रह्मविवर्धन होय. ब्रह्मचर्याचे उद्दिष्ट ज्या अर्थी तें अक्षर ब्रह्मच आहे त्या अर्थी त्या परमात्म्याला ब्रह्म-विवर्धन म्हणजे ब्रह्मचर्याची वृद्धि करणारा असे म्हटले आहे. "तपो ब्रह्म । तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व । " असें उपनिषद्वचन आहे. नैष्ठिक ब्रह्मचर्याच्या तपानें उत्तरोत्तर ब्रह्माचा शोध घ्यावा. या निरंतर शोधाचा प्रेरक म्हणून तो परमात्मा सहजच ब्रह्म-विवर्धन म्हटला आहे.

६६६. ब्रह्मविद्
ब्रह्म वेत्ति, विन्दते वा इति ब्रह्मविद् । जो ब्रह्म जाणतो वा मिळवतो तो ब्रह्मविद् म्हणावयाचा. ब्रह्माचे मुख्यतः तीन अर्थ होतील. (१) अक्षर ब्रह्म (२) वेद (३) तप. तपानें आत्मशुद्धि करून आणि वेदानें म्हणजे जपानें आत्मबुद्धि दृढ करून साधक अक्षर ब्रह्माला यथाकाळी प्राप्त करून घेतो. इथें विद् म्हणजे जाणणे आणि विन्द् म्हणजे मिळवणे एक होऊन जातात. ही दोन नाहीत. जसें खडी साखरेचा स्वाद जाणणे आणि चाखणे ह्या दोन क्रिया नाहीत त्याप्रमाणें. अतद्-व्यावृत्ति आणि तद्बुद्धि दोहों मिळून ब्रह्मलब्धि. अतद्-व्यावृत्तिपूर्वक तन्निश्चय करावयाचा असतो. तो तपानें नि जपानें होतो. लक्ष्य-वेध करतांना धन्वी काय करतो ? तो एकाग्र होतो. म्हणजे शून्याग्रता व अनेकाग्रता वा करतो आणि लक्ष्यगत दृष्टीनें शरसंधान करून लक्ष्यवेध करतो. ह्याला अनुलक्षून रूपकाच्या भाषेत म्हटलें आहे "प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते । अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत् । ” ब्रह्मविद् हा अशा प्रकारे मोठा निशाणबाज आहे. क्षत्रियाच्या धनुर्विद्येहून ही ब्रह्मविद्या कमी पराक्रमाची अपेक्षा करीत नाही. पराक्रमाची पराकाष्ठा आहे ही. धनुर्विद्या-विशारद वीर म्हटला तर हा ब्रह्मविद्याविशारद महावीर म्हटला जाईल. कारण ही अत्यन्त सूक्ष्म वस्तु आहे. साध्य साधन आणि साधक तिन्ही अन्त्यन्त सूक्ष्म आणि अन्तरङ्ग विषय आहेत. वस्तु जितकी स्थूल तितकी ती सोपी. उलट जितकी ती सूक्ष्म तितकी ती कठिण. म्हणून ब्रह्मविद् हा खरोखर परमवीर होय. इथे येरा गबाळाचे काम नाहीं. जातीचा हवा. तेंच पुढील पद ब्राह्मण म्हणून स्पष्ट करीत आहे.

६६७. ब्राह्मण
ब्रह्मण उपासकः ब्राह्मणः । ब्रह्माचा जो उपासक तो ब्राह्मण, ब्रह्म म्हणजे अक्षर ब्रह्म, वेद आणि तप या तिहींचा तो अनन्य पर्युपासक असतो. कांकी तो त्याचा स्वभाव असतो. तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. त्याचा जीवनमंत्र असतो. "ब्राह्मणस्यहि देहो ऽयं क्षुद्रकामाय नेष्यते । कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च । " "नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामान् अर्हते विङ्भुजां ये| तपो दिव्यं पुत्रका येन सत्त्वं शुध्येत् यस्मात् ब्रह्म-सौख्यं त्वनन्तम् ॥ " विष्ठेतील कृमींनाहि जे क्षणिक व दुःखपर्यवसायी तुच्छ भोग मिळत असतात त्यांच्या प्राप्तीसाठी माणसानें खटपट करणे हे माणुसकीला शोभणारें नाही. त्यानें दिव्य तप करून सत्त्वशुद्धि कमवावी आणि तद्द्वारा अनन्त ब्रह्मसौख्य मिळवावें हेच योग्य होय. हेच शोभिवंत होय. असा उत्तुंग ध्येयवाद ज्यानें अंगीकारिला तो ब्राह्मण म्हणावयाचा. आपल्या विषयीं हीन भावना करून आत्म्याची अवगणना करायची आणि मग आपल्याजोगा हीन आदर्श पत्करायचा हा महान् अपराध होय. हे अघोर महापातक होय. पृथग्जन हाच प्रमाद करतात आणि त्याची कटु फळे भोगीत राहतात. त्यांच्यातील "स्वयंधीर पंडितमन्यमान" म्हणजे स्वतःच आपल्याला मोठे विद्वान् आणि पंडित म्हणवून घेणारे पण वस्तुतः मूढ लोक उपदेशीत असतात, "उगाच सिंह-गर्जना करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या बेताचा बें बें आवाज करा" "उगाच काळी चार मध्ये गाण्याचा प्रयत्न करू नका. आपली काळी दोन पट्टीच बरी"
तात्पर्य
बिकट वाट वहिवाट नसावी, घोपट मार्गा सोडूं नको ।
ंसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको ।

असा त्यांचा उपदेश असतो. पण हा अवनतीचा मार्ग आहे.. उन्नतीचा मार्ग वेगळा. तो "उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत' अशी ललकारी देतो. तो माणसाला "तत् त्वं असि" चा प्रत्यय आणून देतो. याहून माणसाला अधिक बलवान् करणारा विचार दूसरा नाही. आणि ब्राह्मण याच बळाचा उपासक असतो. तो याहून खालच्या पायरीवर राहूं इच्छीत नाही. त्यासाठी ब्राह्मणाला कितीहि कष्ट पडले तरी ते तो स्वेच्छेनें व मोठ्या आनंदानें झेलतो, पण हलके पत्करीत नाही. "मत्तेभेन्द्र-विभिन्न-कुम्भ-कवल-ग्रासै क-बद्धस्पृहः । किं जीर्णं तृणमत्ति मानमहतां अग्रेसरः केसरी ॥ " ब्राह्मणाचा हा असा बाणा असतो आणि म्हणून ते या लोकांत अवतरलेलें ब्रह्मच होत, परमात्मस्वरूप होत.

६६८. ब्रह्मी
ब्रह्मैव स्वं यस्य सः ब्रह्मी । ब्रह्मच ज्याचें धन होय तो ब्रह्मी म्हणावयाचा. इन् प्रत्यय स्वामित्ववाचक आहे. त्यामुळे ब्रह्म हें स्व म्हणजे धन झालें. कोणी धनाढ्य असतात, तसा ब्रह्मी हा ब्रह्माढ्य होय. ब्रह्म म्हणजे वेद आणि वेदार्थ दोन्ही. त्या उभयविध धनानें संपन्न झाला तो ब्रह्मी म्हणावयाचा. आधीं तो नुसता वेदाक्षरेंच घोकतो. मग त्यांचा सांगोपांग अर्थहि समजून घेतो. अर्थ म्हणजे आधी शब्दार्थ आणि मग पदार्थहि. त्यासाठी त्याला ब्रह्मचर्य म्हणजे गुरुकुलवास करावा लागतो आणि पुढे आजीवन गुर्वाज्ञेंत रहावें लागते. असें तप म्हणजे भोगवर्जन करून तो वेदाध्ययन करीत राहतो तेव्हा त्याला ब्रह्मवर्चस् प्राप्त होतें. ब्रह्मवर्चस् म्हणजे निष्ठापूर्वक आजीवन निरंतर साधना करून संपादिलेला जो शुद्ध उच्चार, शुद्ध आचार, शुद्ध विचार रूप संस्कार, त्याच्या योगें आलेलें व्यक्तिमत्त्व वा अधिकार होय. श्रीमंत जसा आपल्या वैभवानें मिरवतो तसा हा ब्रह्मवर्चस्वी पुरुष 'आपल्या ब्रह्माच्या तेजानें तळपत असतो. हे ब्रह्मवर्चसच ब्रह्मस्व होय. हे ज्याच्या कमाईचे आहे, मालकीचे आहे तो ब्रह्मी म्हणावयाचा. धनी जसा धनाला जपत असतो तसा ब्रह्मी हा आपल्या ब्रह्माला जपत असतो. धनी आपल्या धनाचा -हास होणार नाही, त्याची वृद्धिच होत राहील यासाठी सतत झटत असतो तसा हा ब्रह्मी आपल्या ब्रह्माची म्हणजे तपाची काळजी घेत राहतो. तो सतत त्याची वाढ करीत जातो. वेदी द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी होतो. दशग्रंथी होतो. शतग्रंथी होतो, सर्वज्ञ होतो, ब्रह्मच होतो.
६६९. ब्रह्मज्ञ
ब्रह्मी हा मुख्यतः ग्रंथी होय, तर ब्रह्मज्ञ हा ग्रंथार्थज्ञ होय. ब्रह्मी म्हणजे शाब्द ब्रह्मांत निष्णात तर ब्रह्मज्ञ पर ब्रह्मांत निष्णात समजावयाचा. "शाब्दे परे च निष्णात" तो आचार्य म्हणावयाचा. अलीकडे आचार्य शब्द फार सवंग झाला आहे. आणि त्या आचार्यावर ' पुनः प्राचार्य आहे ! हा महान् शब्द-शक्तीचा अपमान आणि अपव्यय होय. एकः शब्दः सम्यग् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्ग लोके कामधुक भवति" असें महर्षि म्हणतात. म्हणून नेमकेपणा पाहिजे. "वागर्या नियताः सर्वे वाङ्मूला वाग्विनिःसृताः । तां तु यः स्तेनयेद् वाचं स सर्वस्तेयकृत् नरः" जो शब्दांचा गैरवापर करतो तो चोर होय. नव्हे महाचोर होय, शब्दशक्तीचे हे महत्त्व ओळखून शब्दांचा नेमका आणि नेटका उपयोग करायला शिकणे परमावश्यक होय. "सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञानें परिसमाप्यते" या न्यायानें वेदाध्ययन- कर्माचे पर्यवसानहि ज्ञानांतच व्हायला पाहिजे. ब्रह्मी आणि ब्रह्मज्ञ ही जोडी हेच सांगत आहे. तुम्ही ब्रह्मी म्हणजे वेदी चतुर्वेदी झालां, दशग्रंथी झाला आणि क्रम-जटा-घनान्त जरी पढला तरी जोवर आत्मज्ञान झाले नाही तोवर तें कर्म व्यर्थ म्हणजे निष्कळच म्हणावे लागेल. याचा अर्थ तें वेदाध्ययन योग्य दिशेनें व्हायला पाहिजे. वेदानुवचन आणि यज्ञयागादि काम्य कर्में आडवाट आहे, वेदान्त-विचार ही योग्य दिशा आहे. त्या दिशेनें तें झाल्यास सफल होऊन ब्रह्मी ब्रह्मज्ञ होतो. वस्तुतः आत्मज्ञानी हा न ब्रह्मी न ब्रह्मज्ञ होतो, तो तर ब्रह्मच होतो. ब्रह्मी म्हणजे ब्रह्माची वेदाची अक्षरें बाळगणारे आणि ब्रह्मज्ञ म्हणजे त्या वेदाचें तात्पर्य जाणणारे. पण आत्मज्ञ पुरुष वेदाच्या अक्षराचे ओझें बाळगत नाहीं वा त्याचा अर्थ इतिहास- भूगोलाच्या माहितीप्रमाणें जाणत नाही. तो तर तें ब्रह्मच आपण आहों असें अनुभवता होतो आणि अनुभवतां अनुभवतां अनुभवत आहों मेंहि विसरून जातो. ही दशा ज्ञानदेव अशी वर्णितातः
जाणोनियां नेणपण अंगी बाणलें । नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माये ।
आत्मज्ञानाची गति जाली निवान्त । प्रबोधतत्त्व मी पावलें वो माये ॥


६७०. ब्राह्मणप्रिय
ब्राह्मण-प्रिय हा समास तत्पुरुष आणि बहुव्रीहि दोन्ही घेता येईल. ब्रह्म म्हणजे वेदस्वरूप परमात्मा ब्राह्मणांना प्रिय आहे म्हणून तो ब्राह्मण-प्रिय होय. उलट ब्राह्मण म्हणजे ब्रह्माचे उपासक ब्रह्माला, परमात्याला, प्रिय झाल्यास नवल काय ? म्हणूनहि तो ब्राह्मण-प्रिय म्हणावयाचा. इथे मुख्यतः बहुव्रीहि घ्यावयाचा. गीतेंत १२ व्या अध्यायांत सगुणोपासक व निर्गुणोपासक भक्तांच्या मार्गांची तुलना करून शेवटी उभय भक्तांची
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी । " गीता१२-१३

इत्यादि लक्षणे दिली आहेत आणि आठव्या श्लोकांत उपसंहार करतांना म्हटले आहे की हे असे भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहेत. 'भक्तास् ते ऽतीव मे प्रियाः' ब्राह्मण-प्रिय पदहि तोच आशय व्यक्त करीत आहे. ब्रह्माचे म्हणजे वेदाचे तसेच अक्षर- ब्रह्माचे जे उपासक ब्राह्मण ते परमात्म्याला प्रिय होत. वेदाचेंच अध्ययन, वेदाचेच अध्यापन, वेदोक्तच बोलणे, वेदोक्त च चालणें वेदानुसारच जातकर्म, वेदानुसारच मृतकर्म, असे जे केवळ वेदमय झाले, ब्रह्ममय झाले, त्या ब्राह्मणांहून श्रेष्ठ तर राहोच पण तत्तुल्यहि कोणी नाहीं असें भगवंत म्हणतात न ब्राह्मणैस्तुलये भूतमन्यत्
पश्यामि विप्राः किमतः परं नु ?

त्यामुळे ब्राह्मण भगवंताला अत्यंत प्रिय होत. उलट ब्रह्माहून पर या विश्वांत दुसरें कांहींच नाहीं असा ब्राह्मणांचा निश्चय आहे. म्हणून ब्राह्मण केवल ब्रह्मपरायण होऊन राहतात. अशा प्रकारें बहुव्रीहि व तत्पुरुष दोन्ही अर्थांनी तो परमात्मा ब्राह्मणप्रिय आहे. अक्षर ब्रह्म निरगुण आहे. शब्द ब्रह्म सगुण आहे. पण भौम ब्रह्म म्हणजे ब्राह्मण साकार आहे. त्याच्या मुखानेंच आम्हांला वेद आणि वेदार्थ कळावयाचा. म्हणून त्याहून श्रेष्ठ या विश्वांत खरोखर दुसरें कांहीं नाही. म्हणून मी चंडिदासाच्या शब्दांत म्हणेनः "शुनो रे मानुष भाई । सबार उपरे मानुष सत्य । ताहार उपरे नाई" ब्राह्मण हा मनुष्याचा आदर्श आहे. एवढ्याच साठी बुद्धदेवानें आपल्या धर्मपदांत शेवटचा वर्ग ब्राह्मणवर्ग केला आहे.


महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः ।
महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महायज्ञो महाहविः ॥७२॥


६७१. महाक्रम
मागील ७१ व्या श्लोकांत ब्रह्माचा पाढा होता. या ७२ व्या श्लोकांत यज्ञाचा पाढा आहे. पुढील श्लोकांत स्तुति-स्तोत्राचा पाढा आला आहे. आधीं देवता-दर्शन मग तिचें यजन आणि शेवटीं स्तुतिस्तोत्राच्या गजरांत पूजाविधीची समाप्ति. या तीन श्लोकांतील हा असा क्रम आहे. भारतीय आर्यांचे प्राचीन आणि अर्वाचीन जीवन गंगौघवत् एका उद्देशानें, एका प्रेरणेनें अखंड वाहत आहे. ओघ इकडे तिकडे वा कमी अधिक भलें होवो, पण त्यांत कुठलाहि फरक पडलेला नाहीं. वैदिक काली वरुणेन्द्ररुद्र देवता होत्या, त्यांचे यज्ञयाग होत, त्यांची सूक्तें गाइली जात. आज आम्ही रामकृष्णादिक देवतांना भजतों, त्यांना धूप दीप दाखवितों आणि त्यांची भजनें व धून गातों. यजनपूजनांत कालौघाबरोबर काही अंतर येणे स्वाभाविक आहे, पण निर्मळ भक्तिभाव तोच आहे. देवता तेव्हांहि अनेक होत्या आजहि आहेत, पण 'एकं सत्' चीच उपासना होत होती नि होत आहे. वेदाचीं पदें मोजलेली आहेत आणि त्यांचा क्रमहि निश्चित झाला आहे. संहितेत तो बद्ध आहे. हा क्रम चार दोन वेद-पदांचा नाहीं, सहस्रावधि पदांचा आहे. म्हणून तो वेदात्मा महाक्रम होय. त्याच प्रमाणें यज्ञांतील क्रियांचाहि क्रम निश्चित आहे. तोहि साधा नाही. गुंतागुंतीचा आहे. त्यामुळेहि तो यज्ञात्मा महाक्रम म्हणावयाचा. सृष्टीचा क्रम घेतला तरी तोहि लहान सहान म्हणतां यावयाचा नाही. त्रैगुण्य नि पंचीकरण कांहीं साधी व स्वल्प प्रक्रिया नव्हे. तीहि गुंतागुंतीची व सुदीर्घ आहे. निर्गुण ब्रह्मापासून साकार साहंकार पांचभौतिक सृष्टि आणि परत त्या साकार साहंकाराचा निर्गुण निराकारांत विलय हा क्रम साधा सोपा नि लहान सहान कसा म्हणता येईल ? म्हणून तो विश्वात्मा महाक्रम म्हणावयाचा. क्रम म्हणजे अनुक्रम, तसा क्रम म्हणजे पदक्षेपहि अर्थ आहे. पदक्षेप या अर्थी परमात्मा त्रिविक्रम आहे. त्यानें तीन पदक्षेपांत तिन्ही लोक व्यापून टाकले आहेत. त्यामुळे तो महाक्रम म्हणावयाचा.

६७२. महाकर्मा
कर्माची महत्ता त्याच्या परिमाणावरून नि परिणामावरून मापली जाईल. दोन्ही दृष्टींनी परमात्म्याचे कर्म महान् ठरतें. परिमाणाच्या दृष्टीनें सर्वाश्चर्यमय या अनन्त विश्वाहून मोठे दुसरें काय आहे ? आणि हे सृष्टिकर्म कोण अनीश करूं शकेल ? गीतेनें म्हटलेंहि आहे-"भूतभावोद्‌भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः" हा विसर्ग, ही महान् विसृष्टि परमात्म्यानें केली आहे. म्हणून तो परमात्मा महाकर्मा म्हणावयाचा. महाकर्मा म्हणजे च विश्वकर्मा. परमात्म्यानें ही सृष्टि कशासाठी निर्मिली आहे ? या सृष्टिकर्माचे फलित काय ? सर्व जीवांना, आब्रह्मस्तम्बपर्यंत सर्वजीवांना, आपआपल्या कर्मानुसार आणि ज्ञानानुसार भोग आणि मोक्ष मिळावा हे फलित आहे. मुंगीला कणभर आणि हत्तीला मणभर खाद्य तो पुरवितो. जीव आपले जीवन जगत असतांना उत्तरोत्तर त्यांची भोगवासना चढत आणि वाढत जाते आणि तदनुसार योनि पालटत जाते. शेवटी ते ज्ञान-क्षम मनुष्य योनीला प्राप्त होऊन परम पुरुषार्थरूप मोक्षलाभ करून घेतात. मोक्षाहून मोठा भोग दुसरा नाही. अशा प्रकारे कर्माचें साफल्य ज्ञानांत होतें हें तें महाफल होय. हे महाफल ज्या कर्माचे ते करणारा तो महाकर्मा म्हणावयाचा. अशा प्रकारें उभयविध दृष्टीनें परमात्मा महाकर्मा होय. पण जो त्याचे अनुकरण करील तोहि महाकर्मा होईल. परमात्मा हे सर्व महाकर्म करतो पण त्यांत त्याला स्वतःला कांहीं अवाप्तव्य असत नाही. तो सूर्यवत् निर्हेतुक रागद्वेष न करतां सहज म्हणजे प्रकृतिनियत आणि म्हणून जन्मतः प्राप्त कर्म करतो आणि आजीवन करीतचं राहतो. तसें जो करील तोहि महाकर्मा म्हटला जाईल. कारण त्याचें तें कर्म महाफल होय. अशा कर्मालाच यज्ञ असें म्हटले आहे. हा यज्ञ लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व करूं शकतात. वर्णाश्रमधर्माचें हें रहस्य आहे. स्वधर्मनिष्ठाच मोक्ष-दायिनी आहे.

६७३. महातेजा
महत् तेजः यस्य सः महातेजाः । महान् आहे तेज ज्याचें तो महातेजा म्हणावयाचा. "महाक्रमो...महा हविः" हा संपूर्ण श्लोक यज्ञाचा पाढा असो अगर नसो परंतु तो महा चा पाढा खास. प्रत्येक पद महत्पूर्वक आले आहे. या महत् ची व्याख्या काय ? कशाला महत् म्हणावयाचें ? जें परिणामानें आणि परिमाणानें मोठे ते मोठे म्हणावयाचे. ही व्याख्या बुद्धिगम्य आहे. परंतु सर्वांत सोपी आणि अचूक व्याख्या ही की जें जें ईश्वराचें, परमात्म्याचें तें तें सर्व मोठे होय. कारण, परमात्म्याहून मोठे दुसरें कांहीं नाहींच. आणि त्यामुळे त्याशी संबंद्ध तें सर्व मोठे होय. जगांत सर्वांत अमंगल म्हणजे स्मशान. तिथून जाऊन आल्यावर सचैल स्नान करून शुद्ध व्हावे लागते. पण तिथलीच राख शिव आपल्या अंगाला फासतो आणि मग तीच राख न राहतां विभूति बनते. तें परम वैभव होतें. "भवअंग भूति मसान की सुमिरत सुहावनि पावनी” ती विभूति कुबेर शिरोधार्थ करतो. आपली सगळी दौलत त्या राखेवरून तो ओवाळून टाकतो. ही महत्ता हे गौरव त्या तुच्छ राखेला कुठून आलें ? शिवाच्या स्पर्शानं. तुच्छ नि निरुपद्रवी कोळसा अग्नि संस्पर्शानें अंगार बनतो, देवता बनतो. साधी तांब्याची तार विद्युत्-संस्पर्शानें तार रहात नाहीं ती विद्युतच होते, तद्वत् कोणताहि तुच्छातितुच्छ आचार उच्चार विचार ईश्वरी संस्पर्शानें महान् होतो. त्याचे पार रूपच पालटून जाते. देवासमोर लावलेलें नीरांजन, त्याचे तेज किती ? पण ते आम्ही घेतों आणि धारण करतो, आत्मसात् करतो. कारण तें महान् आहे. अर्थात् ईश्वरी आहे. ईश्वराप्रीत्यर्थ केलेला रावाचा यज्ञ महातेजा होय. त्या महायज्ञाइतकेंच देवासमोर पेटविलेलें रंकाचें नीराजनहि महान् आहे, महातेज आहे. कारण, ईश्वर महान् आहे आणि सर्व प्रकाशक आहे. आणि सूर्य चंद्र अग्नि इत्यादि महान् तजें तदिद्ध तत्प्रतीक असल्यामुळे तो महातेजा म्हटला आहे. सर्व प्रकाशकत्व चेतनाचे आहे म्हणून तो चिद्घन परमात्मा महातेजा म्हणावयाचा.

६७४. महोरग
उरसा गच्छति इति उरगः| महांश्च असौ उरगश्च इति महोरगः । जो पोटावर सरपटतो तो उरग म्हणावयाचा. जो मोठा सर्प तो महोरग म्हणावयाचा. "सर्पाणां अस्मि वासुकिः" म्हणून वासुकि हा महोराग भगवविभूति वर्णिला आहे. तो भगवविभूति का मानला गेला ? अमृतमंथनाच्या वेळी तो दोर बनून त्यानें अमृत मिळविण्यांत साहाय्य केलें म्हणून. पण हें अमृत कोणते ? आणि ते कसे मिळवायचे ? देवांनी मिळविले आणि ते अमर झाले. पण त्याचा आम्हांला लाभ काय ? आम्हीहि ते मिळवावें आणि अमर व्हावें हाच त्या आख्यायिकेचा बोध, "अप्रमादो ऽमृतपदं प्रमादस्तु मृतेः पदम्' असें भगवान् बुद्धानें म्हटलें आहे. जो गाफिल राहिला तो मेला, अमृतास मुकला. जो सदैव डोळ्यांत तेल घालून जागला तो जगला. अमृत झाला. सर्प कधी झोपत नाहीं, डोळे मिटत नाही. तो अष्टौप्रहर जागत असतो. तो अरण्यांत एकान्तवास करतो. तो प्राणायाम करतो. तो मौन सेवन करतो. तो सदाशुचि असतो. असा योगयुक्त असल्यामुळे तो अमृतभाक् झाला आहे. आणि अशा त्याच्या योगस्वरूपतेमुळे संयममूर्तित्वामुळे शंकरानें त्याला सर्वांगीं भूषण म्हणून धारण केले आहे. अर्थात् ज्याच्या ठाईं जितका अधिक संयम तितका तो महोरग म्हणावयाचा. परमात्मा हा तर साक्षात् संयम आहे. म्हणून तो महोरग म्हटला आहे. मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन ही जी जीवोत्क्रांति तींत सर्प आणि गरुड यांचीहि गणति व्हायला पाहिजे. ती कच्छपाच्या सोबतच व्हायला पाहिजे. सर्प हा कच्छपाप्रमाणें जलचर व स्थलचर दोन्ही आहे. गरुड नभश्चरांचा शिरोमणि आहे "वैनतेयश्च पक्षिणाम्' म्हणून भगवद्विभूति मान्य आहे. जीवोत्क्रांतींतील उरगांचे स्थान महोरगपद सूचित करीत आहे. मूलहि लहानपणी उरगच असते. मानवी विकासांतहि उरगत्वाला असें स्थान आहे. सर्व जीवांशी असें हे आपले नाते आहे. रांगतें मूल माती चाटतें तें वराहत्व होय. गर्भस्थ असतांना तें मत्स्य कच्छ असतें. तीक्ष्ण नखदन्तायुधत्व म्हणजे नरसिंहत्व होय. त्याचे जावळ म्हणजे केसरित्व होय. पुढे त्याचे बटुत्व म्हणजे वामनत्व होय. पुढे तो नर बनतो आणि मग नारायण. असे हे मनुष्याचे दशावतार होत.

६७५. महाक्रतु
महान् क्रतुः यस्य सः महाक्रतुः । अथवा महांश्च असौ क्रतुश्च महाक्रतुः । ज्याचा क्रतु मोठा तो महाक्रतु म्हणावयाचा. अथवा मोठा क्रतु तो महाक्रतु म्हणावयाचा. एक समास बहुव्रीहि तर दुसरा कर्मधारय होय. दोन्ही प्रकारें परमात्मा हा महाक्रतु होय. पण ऋतु म्हणजे काय ? ऋतु म्हणजे यज्ञ हा सर्व सामान्य अर्थ झाला. पण यज्ञांत आणि ऋतूंत काय अन्तर कोणताहि यज्ञ व्हायचा झाला म्हणजे आधी त्याचा संकल्प व्हावा लागतो. संकल्पाशिवाय यज्ञ होऊं शकत नाही. म्हणून यज्ञ हा क्रतु म्हटला गेला अर्थात् सर्व यज्ञांचा यज्ञ वा मूल यज्ञ म्हणजे क्रतु होय. पण संकल्प व क्रतु यांत काय अंतर ? संकल्प क्रियान्वित होईलच असें नाहीं, क्रतु हा सदैव क्रियेत परिणत होतो. तो केव्हांहि मनांतच जिरत नाही तर क्रियारूपानें अवश्य प्रकटतो, साकार होतो. तो वांझोटा विचार नाही, तर अमोघ विचार होय. परमात्म्याच्या मनांत आलें, सृष्टि व्हावी आणि ही विश्वसृष्टि झाली. ही सर्वाश्चर्यमय अनन्तपार सृष्टि त्या परमात्म्याच्या क्रतूचे फलित आहे. म्हणून तो परमात्मा महाक्रतु म्हटला आहे. हा झाला बहुव्रीहि विचार. कर्मधारय विचारानें प्रत्येक व्यक्ति प्रत्येक जीव म्हणजे एक क्रतु आहे. क्रतूमुळे तो जन्माला आला आहे. क्रतूमुळे तो जगत आहे. क्रतूसाठीच तो देहान्तर करणार आहे. या त्याच्या क्रतुमयतेमुळे जीव हा क्रतू म्हटला आहे. जीवाचे क्रतु हे अल्प असतात, परंतु परमात्म्याचा क्रतु लहान म्हणतां यावयाचा नाही. कारण, त्याचे फलित हे विश्व महान् आहे. त्यांत सर्व चराचरांचे क्रतु समाविष्ट आहेत. परंतु कोणा एकाच्या मोठ्यांतील मोठ्या जीवाच्याहि क्रतूंत परमात्माचा ऋतु सामावणार नाही. म्हणून तो महाक्रत होय. सकलक्रतु होय. जीव शकलक्रतु होय.

६७६. महायज्वा
यज्वा म्हणजे यजनशील. महायज्वा म्हणजे परम यजनशील. "नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम" अयज्ञ पुरुषाला हा लोक देखील लाभत नाही तर मग परलोक कुठला, असें गीता बजावते आहे. म्हणजे प्रत्येकाला यज्ञ कर्तव्य आहे आणि त्यावांचून त्याचे इहपरजीवन चालू शकत नाही. या यज्ञाची केन्द्रीय कल्पना काय ? केन्द्रीय कल्पना ही की माझा लाभ काय असें मनांत न आणतां दुसर्‍यासाठी त्याग करावयाचा. थोडक्यांत म्हणजे आपल्यासाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी जगावयाचें. जो असा यज्ञ करतो तो सुटतो, जो यज्ञहीन जगतो तो बांधला जातोः. "यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः" यज्ञजीवनाच्या विरुद्ध देहभावना खाली खाली खेचीत असते. ती उत्तरोत्तर क्षीण करीत करीत पार नाहींशी करून टाकणे म्हणजे यज्ञमय होणे होय. देहधारी जीव कितीहि निःस्वार्थ झाला, कितीहि परार्थेकजीवित झाला तरी देह आहे तोंवर कांहीं ना कांहीं स्वार्थ त्याला चिकटून आहे असेच म्हणावें लागेल. आणि म्हणून तो अल्पयज्वाच म्हटला जाईल, परंतु परमात्मा हा देहबुद्धीसकट देहमुक्त असल्यामुळे तोच एक केवल यज्ञमय जीवन जगणारा होय आणि म्हणून त्याहून मोठा यज्वा दुसरा नाहीं. वेदशास्त्रे विधिनिषेधमय आहेत. "अमुक कर, अमुक करूं नको' असें ती सांगतात. त्यांच्या ह्या विधिनिषेधाचें सूत्र यज्ञवृत्ति आहे. जें यज्ञाला साधक तें कर, जें यज्ञाला बाधक तें करूं नको, हा इत्यर्थ. निरहंकार आणि देहमुक्त ज्ञानी पुरुषाला कर्तव्यप्राप्ति होत नाही. ती साहंकार आणि देहवंत अज्ञानी पुरुषालाच होते. त्यानें आपला स्वभावप्राप्त धर्म म्हणजेच स्वधर्म फलनिरपेक्षवृत्तीनें आचरावा. तत्परिणामी जिज्ञासा उत्पन्न होऊन आत्मज्ञानाच्या योगें यथाकाळी तो देहबुद्धि आणि देह दोहोंतूनहि मुक्त होतो. असा मुक्त पुरुषच महायज्वा म्हणावयाचा. परमात्मा हा सहजच तसा आहे. आम्हांला प्रयत्नपूर्वक तसें व्हायचे आहे. जीवन + अहंभाव = यज्ञ असें हे समीकरण यांतून निष्पन्न होतें.

६७७. महायज्ञ
महायज्ञ हे पद इतर महापदपूर्वक आलेल्या पदांप्रमाणें बहुव्रीहि वा कर्मधारय आहे. "महान् यज्ञो यस्य सः महायज्ञः । अथवा महांश्च असौ यज्ञश्च महायज्ञः असा त्याचा अनुक्रमें विग्रह होतो. दोन्ही रीतींनी महायज्ञ पद लावतां येतें, आशयांत कांहीं फरक पडत नाही. विश्वजीवनरूप यज्ञ ज्याचा चालला आहे तो परमात्मा उघडच महायज्ञ होय. सर्वाचे यज्ञ त्याच्या महायज्ञाचे अंशभूत च होत, म्हणून परमात्माच एक महायज्ञ म्हणावयाचा. कोणतेंहि शकल तें केवढेहि मोठे असले तरी सकलाची वा समग्राची बरोबरी करूच शकत नाही. त्याहून तें अल्पच म्हटले जाईल. म्हणून समग्रच एक महान् होय. आणि तेंच बृहत् वा ब्रह्म म्हटले आहे. जो नैमित्तिक यज्ञ तो राजसूय वाजपेय अश्वमेध इत्यादि अल्प म्हणावयाचा. परंतु जो नित्याचा यज्ञ तो महायज्ञ म्हणावयाचा. हव्य कव्य काकबलि वैश्वदेव अतिथिपूजन हे पंच महायज्ञ म्हटले आहेत. कारण ते नित्यच करावयाचे आहेत. आणि समग्रतेचे सार्वदशिकता हे जसें एक अंग आहे तसें सार्वकालिकताहि दूसरे अंग आहे. म्हणून नित्ययज्ञ वा जीवनरूप यज्ञ हा महायज्ञ होय. आणि तो समग्रतेमुळे परमात्मस्वरूपच होय. अशा प्रकारें देशतः आणि कालतः तो परमात्मा महायज्ञ म्हटला आहे. सर्व यज्ञांचे फलित कल्मषक्षपण आहे. आणि तें होतें निःशेष, आत्मज्ञानाने. म्हणून जो आत्मज्ञानी निरहंकार परार्थंकजीवित पुरुष तोच महायज्ञ म्हणावयाचा. अशा पुरुषाचे समग्र जीवन यज्ञमय म्हटले आहे. "तस्य एवं विदुषः यज्ञस्य, आत्मा यजमानः, श्रद्धा पत्नी, शरीरं इध्मं, उरो वेदिः, सर्ववेदसं वै एतत् सत्र, यत् मरणं तद् अवभृथः.” त्याचे जीवन तो यज्ञ, मरण ती यज्ञाची सांगता. अशा यज्ञमय जीवनाचे उदाहरण दधीचि ऋषि होते, महात्मा गांधी होते.

६७८. महाहवि
महत् हविः यस्य सः महाहविः । अथवा महत् च अदः हविश्च महाहविः । मोठा हवि ज्याचा तो महाहवि, अथवा, मोठा हवि तो महाहवि म्हणावयाचा. हवि म्हणजे आज्य, होमद्रव्य. यज्ञांत जी आज्याची आहुति दिली जाते ती परिमाणानें मोठी अशी कितीशी असणार ? सम्राटाचाहि यज्ञ असला तरी तो समारम्भ समाप्त होणारच. म्हणजे त्यांतील आज्य परिमितच म्हणावयाचे. परंतु ज्या यज्ञाला आरंभ नाही आणि अन्तहि नाहीं तो यज्ञ महान् होय आणि त्यांतील होमद्रव्यहि तसेंच महत् वा अपरिमित होय. परमात्म्याचा हा सृष्टिरूप यज्ञ तसाच आहे. तो केव्हां आरब्ध झाला आणि केव्हां समाप्त व्हावयाचा हे कोणालाहि सांगता येत नाही. तो आपला अनाद्यनन्त चालूच आहे. आणि त्यांत होमिलें जाणारें द्रव्य म्हणजे हा व्यक्ताकारहि अपरिमित आहे. गंगा सागरांत मिळतच मिळत आहे. तसा हा व्यक्ताकार अव्यक्तांत सारखा होमिला जात आहे. त्यांत खंड नाही. अव्यक्तमूर्ति परमात्म्याचे हे सृष्टिरूप यजन चालले आहे. हा सगळा व्यक्ताकार त्या अव्यक्ताक्षर परमात्म्याच्या प्रचंड चिदग्नींत होमिला जात आहे आणि अव्यक्तसात् होत आहे. याच यज्ञीय अग्नीला उद्देशून तो ऋग्वेदाचा ऋषि म्हणतो आहेः अग्निं ईळे पुरोहितम् । यज्ञस्य देवं ऋत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥ स नः पितेव सूनवे| अग्नें सूपायनो भव । सचस्वा नः सुअस्तये ॥ शेवटी हा अग्निच आपला सखा साथी मार्गदर्शक आहे हे ओळखून तो त्याला परोपरीनें आळवीत आहे. सदैव आमच्या जवळ रहा म्हणून त्याला विनवीत आहे. त्याला घरी दारी श्मशानी सांभाळीत व कवटाळीत आहे.

स्तव्यः स्तवप्रिय स्तोत्रं स्तुतिः स्तोता रणप्रियः
पूर्ण पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः ॥७३॥


६७९. स्तव्य
ज्या चित्सूर्याच्या अंशापासून ही चराचर सृष्टि उत्पन्न झाली आहे, ज्याच्या प्रेरणेनें ती जगत आहे आणि ज्यांतच शेवटी ती विलीन व्हायची आहे त्या परमात्म्याहून अधिक स्तुत्य दुसरे काय असू शकेल ? म्हणून तो परमात्मा स्तव्य म्हटला आहे. सर्व जलौघांचे परायण जसा समुद्र तसा स्तुतिमात्राचा विषय एक तो परमात्मा आहे. तुम्हांला या जगांत जें जें प्रशंसनीय आढळतें तेंतें सारेंत्या आत्मशक्तीपासून उत्पन्न झालेलें, त्या आत्मशक्तीच्याच प्रेरणेनें टिकून असलेलें आहे. अशा स्थितीत तुम्ही एखाद्या बीराची विद्वानाची कलावंताची श्रीमंताची वा सेवकाची जी स्तुति करतां ती सगळी त्या परमात्मशक्तीचीच होय. या सगळ्या व्यक्ताकाराच्या मागे उभ्या असलेल्या त्या अव्यक्त सूत्रधाराची होय. क्रांतदर्शी कवि त्याला आपल्या दिव्य दृष्टीनें पाहत असतात. सामान्य जीव त्याला पहात नाहीत. ते आपल्या आईबापांना जन्मदाते समजतात, गुरुंना ज्ञानादाते मानतात, धन्याला अन्नदाते म्हणतात. परंतु या सर्व स्तुतीचें भाजन खरोखर तो अव्यक्तमूर्तिच असतो. आईबाप, गुरु, स्वामी इत्यादि जे हे सारे देव म्हणजे पूज्यहितकर्ते त्यांना केलेला नमस्कार त्या परमात्म्यालाच पोचतो. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेव-नमस्कारः केशवं प्रति गच्छति ॥ परंतु हे रहस्य जे ओळखीत नाहीत. अर्थात् जे स्थूल आई-बापांना वगैरेच आपण नमस्कार करीत आहो असे समजतात "तत्त्वेनातश् च्यवन्ति ते" ते तत्वज्ञानापासून च्युत होतात. त्यांना तें महत् फळ मिळत नाही. वेदांत नाना देवतांच्या रूपानें ह्या परमात्म्याचीच परोपरीनें स्तुति केली आहे. पहिल्याच मंत्रांत त्याला ईड्य म्हटले आहे.ईड्य म्हणजेच स्तव्य.

६८०. स्तवप्रिय
परमात्मा हा स्तव्य म्हणजे स्तवार्ह आहे इतकेंच नव्हे तर तो स्तवप्रियहि आहे. त्याला आपली स्तुति आवडते. परंतु महद्गुणांत तर आत्मस्तुति नि परनिन्दा अमान्य आहेत. होय, खरे आहे. पण तिथे आत्मपरभाव म्हणजे देहभाव होय, अनात्मभाव होय. जो आत्मरूप झाला तो परक्या देहाची, अनात्म्याची स्तुति कशी करील ? त्याच प्रमाणें ज्याला सर्वत्र अभेद झाला, तो देहभेदानें परकेपणाचा आरोप कुणावर .. करणार आणि स्वतःचीच निन्दा कशी करणार ? . त्यामुळे तो "तुल्य-निन्दास्तुतिर् मौनी" असतो. तो आत्मनिष्ठ पुरुष असत् म्हणजे नसल्या देहाची स्तुति करू शकत नाही आणि त्याची निन्दा करणेहि साप म्हणुन दोरीला बडवण्यासारखें व्यर्थ समजतो, मूर्खपणाचे समजतो. आणि म्हणून तो मौन सेवन करून · राहतो, आत्मचिन्तनांत मग्न असतो. जें असत् आहे, जें बोलून चालून मुळीं नाहींच, त्या नसल्याची स्तुतिनिन्दा म्हणजे नसती उठाठेव होय. ती कोणीहि शहाणा माणूस करू शकणार नाही. पण जें सत् आहे, तें सदैव अनिन्द्य होय. त्याचा निषेध होऊं शकत नाही. त्याचे गुणगौरवच होणार. आणि परमात्मा हीच एक सद्वस्तु असल्यामुळे तोच एक स्तव्य आहे आणि सताला सत्यच स्वभावतः प्रिय असणार म्हणून तो स्तवप्रिय म्हटला आहे. पण हा स्तव असा आहे की तो स्तुति केली तरी होतो नि निन्दा केली तरी होतो. गुलाब सुंदर आहे, गुलाब कांटेरी आहे. ही दोन वाक्ये स्तुतिपर निन्दापर आहेत. पण दोन्ही गुलाबाचें अस्तित्वच, त्याची सत्ताच, प्रकट करतात. आणि हीच ती त्याची सत्ख्याति स्तव होय. आणि ती त्या सद्रूप परमात्म्याला प्रिय आहे.
एखाद्यानें घरांतून ओ देणे आणि मी घरी नाही हो असें म्हणून ओ देणे दोहोंचा अर्थ एकच. त्याप्रमाणें.

६८१. स्तोत्र
जो स्तवार्ह आहे, जो स्तवप्रिय आहे तो परमात्मा स्तोत्रहि म्हटला आहे. कारण, तोच स्तोत्राचा विषय झालेला आहे. स्तोत्र म्हणजे विधान, वाक्य. कोणतेंहि विधान कोणाला तरी उद्देशूनच होऊं शकते. उद्देश्यच जर नसेल तर वाक्यप्रयोग होऊं शकणार नाही. म्हणून "प्राधान्येन व्यपदेशा भवन्ति' या न्यायानें उद्देश्यच वाक्य म्हणावयाचें. तेंच वाक्याचे उत्तमांग होय. सर्व विधानांचे उद्देश्य सद्वस्तुच संभवतें, असद् वस्तु नव्हे. म्हणून तो सन्मूर्ति परमात्माच वाक्यात्मक स्तोत्र होय. याच अभिप्रायानें ज्ञानदेव म्हणतातः
ॐ नमो जी आद्या ! वेद-प्रतिपाद्या ।
जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।

हे आत्मदेवा, तुझें प्रतिपादन करण्यासाठी वेद झाले आहेत. तूं प्रतिपाद्य नसतास तर वेद-वाणी प्रवृत्तच झाली नसती.तूं आद्य आहेस. इतर सारें तझें अनुगत आहे, त्वदुत्य आहे. सर्व वाणीचा विषय तं आहेस. परमात्म्याचे हे आद्यत्व आणि वागविषयत्व. नव्हे वाग्विषयीभूतत्व प्रकट करण्यासाठी वेदमंत्राच्या प्रत्येक उच्चारापूर्वी ॐकाराचा घोष केला जातो. तो ॐ कारच परमात्मा आहे. तोच आद्य वेद आहे. तोच प्रणव म्हणजे उत्तम स्तोत्र आहे. हा ॐकार , हा आद्य वेद, हा प्रणव शंखांतून प्रकटला आहे. कारण तो अव्यक्त ध्वनि आहे. तो अवर्ण घोष आहे. म्हणून सर्व वर्णगणापूर्वी त्याचा उच्चार केला जातो. त्या गणपतीला नमस्कार केला जातो ॐ नमः म्हणून. हाच ओनामा होय. समस्त वर्णात्मक स्तोत्र शेवटी त्यांतच समाप्त व्हायचे. म्हणून शेवटीहि त्याचाच घोष होतो ॐ नमः म्हणून. सहस्राच्याहि शेवटी तसा तो झाला आहे. असा तो परमात्मा सर्ववर्णप्रतिपाद्य अक्षर-स्वरूप ॐकार म्हणून स्तोत्र म्हटला आहे. स्तूयते अनेन इति स्तोत्रम् ।

६८२. स्तुति
स्तोत्र स्तुति आणि स्तोता ही तीन पदें इथे क्रमानें आली आहेत. या त्रयीच्या आरंभी स्तव्य आणि स्तवप्रिय ही जोडीहि आली आहे. या पदपंचकानें असें सुचविलें आहे की तो परमात्मा स्तवन-क्रियेला आवश्यक सर्वच अंगे आहे. प्रथम तो स्तुतिपात्र आहे. इतकेच नव्हे तर ती स्तुति त्याला आवडते असें म्हटले आहे. कित्येक थोर पुरुषांना आपली स्तुति आवडत नाही. कारण ते स्तोत्याच्या मताप्रमाणें आपल्याला स्तुतियोग्य समजत नाहीत. म्हणजे स्तुतिपात्राहून, त्या परमात्म्याहून, आपल्याला वेगळे समजतात. आणि त्या अर्थानं खरोखरच ते स्तव्य नव्हत. परंतु स्वतः परमात्म्याला असा अनात्माभिमान नसल्यामुळे तो स्तव्य तर आहेच पण स्तवप्रियहि आहे. त्याला स्तुतीचा स्वीकार करतांना संकोचाचें कांहीं कारण दिसत नाही. अशा स्तव्यस्तवप्रियत्वानंतर म्हणजे स्तुतिक्रियेला योग्य अधिष्ठान लाभल्यानंतर स्तुतिक्रियेची आवश्यक अंगें (१) ज्या, साधनानें स्तुति व्हायची ती शब्दरचना म्हणजे स्तोत्र (२) तें स्तोत्र समर्पिण्याची क्रिया आणि (३) ती स्तुतिक्रिया करणारा स्तोता यांची आवश्यकता असते. ती सर्व आवश्यकता तो परमात्मा पुरविणारा आहे. कारण तो स्वयंपूर्ण आहे, सर्वतंत्रस्वतंत्र आहे. "स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिः स्तोता' या पदपंचकानें हा सर्व आशय प्रकट केला आहे. ॐ कार हे एकाक्षर ब्रह्म म्हणजे स्तोत्र होय. त्याचा विस्तार म्हणजे सर्व वेद आणि सगळे वाङ्मय म्हणावयाचे. त्या समस्त वैदिक लौकिक वाङ्मयानें तो स्तव्य नि स्तवप्रिय परमात्माच स्तविला जात आहे. ही स्तुति म्हणजे स्तवनक्रिया वागरूपानें सतत होत आहे कावळ्याच्या कोकलण्यापासून तो कविकोकिलाच्या कूजनापर्यंत.सर्व वाणी त्या परमात्म्याचीच स्तुति करीत असतात. सर्व क्रिया कर्तृरूपच होत. स्तुति ही एक क्रियाच आहे. त्यामुळे सर्वकर्ता जो परमात्मा तद्रूपच ती होय. म्हणून तो परमात्मा स्तुति म्हटला आहे.

६८३. स्तोता
"स्वतन्त्रः कर्ता" म्हणजे वाक्यांत जी अनेक पदें येतात त्यांत जें पद स्वतंत्र असतें तें कर्ता होय. क्रियापद त्या कर्त्यांच्या अनुरोधानें आणि इतर पदें त्या क्रियापदाच्या अनुरोधानें बदलत असतात. पण ते स्वतः इतर कोणाच्या तंत्रानें बदलत नाहीं तें स्वतंत्र पद कर्ता म्हटले जाते. व्याकरणांतल्या प्रमाणें व्यवहारांतहि जो स्वतंत्र पुरुष असतो तो कर्ता म्हटला जातो. कुटुंबांत पुरुष कर्ता असतो, तदधीन स्त्री असते आणि इतर मंडळी त्यांच्या कलानें रहात असतात. जगद्व्यवहारांतहि असें पाहतां एक तो चेतन परमात्माच कर्ता होय. प्रकृति आणि जीव तदधीन आहेत. कर्तृत्व सगळे त्या चेतन परम पुरुषाचे म्हटलें म्हणजे वस्तुसत्तेचें ज्ञान, त्या वस्तूच्या गुणगौरवाचे भान आणि गौरवबोधजनित त्या वस्तूविषयीं स्तवन-प्रवृत्ति त्याचीच म्हटली पाहिजे हे उघड आहे. परमात्माच हा अशा प्रकारें स्तोता होय. दुसरा कोण बरें अनात्मा जड मूढ स्तोता बनू शकेल ? स्तोतृत्वाला वस्तूपलब्धि, वस्तुगुणगौरव-बोध, गौरवबोधजनित स्तवनप्रवृत्ति आणि स्तवनक्षम वाक्पाटव हवें. ते सगळे त्या परमात्म्याच्या ठाईं आहे. त्यानेच आत्मज्ञान करून देणारे वेदोपनिषदादि आरण्यक वाङ्मय निर्मिलें आहे. त्यांतूनच उपनिषदें ब्रह्मसूत्रे आणि गीता ही प्रस्थानत्रयी निघाली. या आरण्यक वाङ्मयांतून भाव आणि शब्द घेऊन अनुभवी संत आणि आचार्य यांनी जी संस्कृत प्राकृत प्रासादिक स्तोत्र-रचना केली आहे तीच सरस्वती होय. तिचें दर्शन प्रयागांत होत नाही. कलियुगांत गुप्त झालेली सरस्वती ती हीच होय. त्या परमात्मस्वरूप स्तोत्याच्याच कृपेनें ह्या आध्यात्मिक सरस्वतीचे दर्शन होतें.

६८४. रणप्रिय
रणप्रियता हें दूषण की भूषण ? वस्तुतः तें दूषणच म्हटले पाहिजे. शान्ति हीच मानवाची चिर अभिलाषा असू शकते. आणि अन्ती सर्व वैरविरोध विझून शान्तिच व्हायची आहे. प्रपंचाच्या पूर्वी शान्तिच होती आणि शेवटीहि शान्तिच व्हायची आहे. अर्थात् शान्ति ही प्रकृति असून वैरविरोध ही विकृति आहे. मग तो परमात्मा रणप्रिय कां म्हटला जावा ? वस्तुतः तो मिथ्याआरोप आहे. सूर्य का कुठे अंधाराशी लढायला जातो ? का सत्य असत्याला आह्वान देऊन त्याशी द्वंद्व करतें ? प्रकाशाचा अंधकाराशी स्वभावतःच विरोध आहे. सत्याचा असत्याशी स्वभावतः विरोध आहे. आणि सत्याच्या ह्या असत्याशी असलेल्या स्वभावसिद्ध विरोधालाच परमात्म्याचे रणप्रियत्व म्हणावयाचे. इतरांचा विरोध नैमित्तिक व तात्कालिक असतो. पण हा सत्याचा असत्याशी नित्य आहे, निरंतर आहे. यालाच उद्देशून तुकाराम म्हणतो "रात्रंदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन"परमात्मा एकमेवा- द्वितीय असल्यामुळे तो निर्बुद्व आहे. त्याला झगडा नाही. जिथें द्वितीय म्हणजे आत्मभिन्न दुसरा उपस्थित होतो तिथे द्वंद्व आले, झगडा आला. आणि हे जग म्हणजे तर द्वंद्वांचा नुसता बाजारच आहे. त्यांत प्रत्येकाचे दुसऱ्याशी भांडण चालले आहे. दुसऱ्याशी भांडण तर समजण्यासारखे आहे, पण आपलेंच आपल्याशी भांडण होत असतें. जिभेला मसालेदार तिखट पदार्थ हवेत, तर पोटाला ते नकोत. इन्द्रिया इंद्रियांत असा झगडा चालला आहे. या सगळ्या इन्द्रियांचा पुनः मनाशी झगडा, शेवटी मनासकट देहाचा आत्म्याशी झगडा. याचाच उल्लेख तुकाराम करतो. असें हें जीवनाचे रणांगण आहे. आणि त्यांत मुमुक्षु वीर लढत असतो आणि परमात्म-कृपेनें विजयीहि होत असतो. परमात्म्याला हे रण आवडते म्हणून तो रणप्रिय म्हटला आहे.

६८५. पूर्ण
पूर्णता गौरवास्पद आहे. न्यूनता लघुत्वसूचक आहे. परमात्म्याच्या ठाई पूर्णता आहे. त्याच्यांत कसलीच उणीव नाही. म्हणून तो पूर्ण होय. जसें गोडीचंच नाव गूळ, तसें पूर्णतेचेच नांव परमात्मा आहे, म्हणून त्याला पूर्ण म्हणावयाचें. जगांत आपण पाहतों की एक. वस्तु आज पूर्ण आहे, तर उद्यां ती न्यून होते. आज पौर्णिमा आहे तर उद्यां कला कमी होत अमावास्येला नाहीशी होऊन परत वाढू लागते. म्हणजे जगांतील पूर्णिमा वा पूर्णता ही खरी पूर्णता नव्हे. ती क्षयग्रस्त आहे. "क्षयान्ता निचयाः सर्वे, पतनान्ताः समुछ्रयाः । संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम् ॥ हाच या व्यक्त विश्वाचा कायदा आहे, स्वभावधर्म आहे. किंबहुना चयापचय हेच या जगाचें स्वरूप आहे. अर्थात् इथे पूर्णता म्हणजे केवलस्वरूप पूर्णता तुम्हांला पहायला मिळायची नाही. ती त्या निगुण निराकार अव्यक्ताच्या ठाईंच निहित आहे. तिवें चयापचय नाही, अखंडैकरूपता आहे, कूटस्थता आहे. म्हणून ते पूर्ण होय. त्यांत वाढ होऊं शकत नाहीं किंवा त्यांतून घटहि करतां येत नाही. ईशोपनिषदाच्या शान्तिमंत्रांत ह्या पूर्णाचें पूर्ण वर्णन आले आहे. "तें पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण निष्पन्न होतें. . पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शेष राहते." असें हें पूर्ण जो जाणतो तो कुठल्याहि विपत्तीनें खचत नाहीं आणि केवढ्याहि संपत्तीनें फुगत नाही. दोन्ही समानच मिथ्या असल्याची, वरवर दिसणारे आभासिक असल्याची खूणगांठ त्यानें बांधलेली असते. वस्तुतः जे आहे ते परिपूर्ण आहे या विषयीं तो सुप्रतीत असतो. त्यामुळे त्याला शान्ति शान्ति आणि शान्तिच असते. कुठलाहि क्षोभ असत नाही. उद्यां राज्य मिळणार म्हणून तो हरखून जाऊन टिया बडवीत नाही किंवा राज्याऐवजी वनवास नशिबी आला म्हणून कपाळ पिटीत नाही. कुठल्याहि हानिलाभाचा त्याच्यावर कांहीहि परिणाम होत नाही. तो सदैव आत्मकाम आणि आप्तकाम असतो. पूर्णकाम असतो. पूर्णोपाससनेचें हे फळ आहे.

६८६. पूरयिता
"पूर्णः पूरयिता" ही जोडी एकच भाव विशद करते. पूरयिता हा पूर्ण पदाचाच विस्तार आहे. पूरयिता हे पद परिपूर्णता सूचित करीत आहे. जी आपल्या ठाई कोंडून पडली आहे ती कसली पूर्णता ? जी भरभरून ओसंडून वाहते आहे ती अतिरिक्तताच खरी पूर्णता म्हणावयाची. तो समुद्र पूर्ण आहे, पण झरा हा परिपूर्ण होय. कारण तो पूरयिता आहे. ज्या गंगाप्रवाहानें (गंगा-) सागर बनविला तो गंगेचा झरा पूर्णतर होय. तो समुद्रवत् केवल आदाता नाही, तर दाता आहे. झऱ्याला सतत देणेच ठाऊक. झऱ्याच्या पूर्णतेचा, त्याच्या दातृत्वाचा त्याच्या महोदारतेचा उद्घोष त्याचे पाणी पिऊन तृप्त होणारे जीवजन, तृणवन आणि पक्षिगण कंठरवानें सतत करीत आहेत. त्याच्या दातृत्वानें सर-सरोवर आणि सागरोपसागर भरलेले आपण पाहतोच आहो. असा जो केवळ पूर्ण नव्हे तर पूर्णयिता आहे तोच खरा पूर्ण वा परिपूर्ण म्हणावयाचा. ज्याला कुणापासून कशाची अपेक्षा नाही. तो पूर्ण होय आणि असा निरपेक्ष असून जो विश्वाला सर्वतोपरी परिपूरित करीतच चालला आहे, त्यांत कुठे खंड म्हणून नाहीं, तो पूरयिता म्हणावयाचा. बदरिकाश्रमांत नरनारायण ऋषि तपश्चर्या करीत बसले आहेत. त्यांचा तपोभंग करण्यासाठी इन्द्रानें कामदेव वसंत आणि देवस्त्रिया इत्यादींचें सैन्य पाठविले होते. पण ते ऋषि पूर्णकाम होते. त्यांना कशाचीच ददात नव्हती. उलट त्यांनीच ज्या वरस्त्रियांचे अमिष देव दाखवीत होते. त्यांच्याहून अतिशय सुंदर अशा अप्सरा त्यांना दाखविल्या. त्यांच्या रूपानें व गंधानें देव हतप्रभ झाले. तेव्हां नारायणानेच त्यांना त्या अप्सरांपैकी एक देवलोकास घेऊन जाण्यासाठी सांगून अनुगृहीत केलें. हे त्या परमात्म्याचें पूरयितृत्व होय. परमात्मा स्वतः निरपेक्ष असल्यामुळे पूर्णकाम आहे आणि सर्व पुरुषार्थाचा दाता असल्यामुळे पूरयिता म्हटला आहे. पूरयिता म्हणजे सर्वकामपूरयिता.

६८७. पुण्य
पुण्य म्हणजे पावन, पवित्र. सहस्राच्या प्रास्ताविक भागांत "पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम्' म्हणून त्याचे गौरव आलेच आहे. तो परमात्मा सर्व शुद्धिकारक तत्त्वांत, म्हणजे पुण्यांत, परम श्रेष्ठ आहे. तो परम पवित्र आहे. शुद्धि म्हणजे मलापनयन. शरीराचा मल दूर करायला मृद् जल अग्नि इत्यादि उतरोत्तर पावन तत्त्वे आहेत. त्यांच्यायोगे आपण गात्र-शुद्धि तशीच वस्त्रपात्रादि-शुद्धि करीत असतो.
परंतु अन्तःशुद्धि त्यांच्या योगे होत नाही. मनाचा मल धुवायला त्यांचा उपयोग होत नाही. तो मनाचा मल म्हणजे मनोविकार होत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणि तज्जनित आसुर दुःशील यांच्या योगें सगळे जग जळत आहे. यांतून, या संसारतापांतून, या भूतद्रोहाच्या वणव्यांतून वाचवून शान्ति देणारें में आत्मज्ञान तेंच पुण्य होय. आणि परमात्मा हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो सहजच पुण्य म्हटला आहे. सर्व प्रमाद, अपराध, पातकें स्वरूपाच्या अज्ञानामुळेच होत असतात. म्हणून ते अज्ञान महापाप होय, महामल होय. आणि तें पाप दूर करणारे आत्मज्ञान परम पवित्र होय, परम पुण्य होय. त्या आत्मज्ञानाचा प्रसार घरोघर व्हावा अशी तळमळ संतांना लागून राहिली आहे याचेहि कारण हेच होय. सामाजिक सुखशान्तीचा आधार राजाची बाहय दण्डनीति नसुन ऋषींचे आंतरिक आत्मज्ञान आहे, तन्मूलक धर्मनीति आहे, सदाचार आणि सद्व्यवहार आहे. हे वैदिक दर्शन आहे. भारतीय समाजशास्त्र या आधारावरच रचलेलें आहे. भारतीय शिक्षणशास्त्रहि याच बुनियादीवर उभे आहे. परंतु आधुनिक काळांत पाश्चात्त्यांच्या आक्रमणामुळे या सगळ्याचा विसर पडला आहे. आणि भारतीय नेतृत्व भ्रान्त झाले आहे. देहासक्ति आणि देहपरायणता हे त्याचे फलित आहे. हीच आसुर संस्कृति.


६८८. पुण्यकीर्ति
पुण्यकीर्ति म्हणजे पुण्यश्लोक. ज्याची कीर्ति म्हणजे नामस्मरण पावन आहे तो पुण्यकीर्ति होय, पुण्यश्लोक होय. "पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरः । पुण्यश्लोका च वैदेही, पुण्यश्लोको जनार्दनः ॥ ' असें पुण्यश्लोक पुरुषांचे स्मरण आपण करीत असतो हे पुरुष पुण्यश्लोक कशानें झाले ? त्यांच्या धर्मनिष्ठेमुळे, धर्ममय जीवनामुळे. निष्ठा तत्त्वदर्शनरूप असते. धर्म आचारस्वरूप असतो. ज्याला गन्तव्याचाच पत्ता नाही त्याला मार्गाचा शोध कसा लागणार ? आणि मार्ग माहीत नसतांना तो मार्गक्रमण कसे करूं शकेल ? त्यासाठी तपस्या, साधना कशी करणार ? ज्यांचा परमार्थनिश्चय झाला आहे आणि त्यासाठीच ज्यांनी आपलें समग्र जीवन समर्पिलें आहे तेच पुरुष पुण्यश्लोकपदवीस पात्र होत. प्राचीन काळीच असे पुरुष होऊन गेले असें नाहीं. आधुनिक काळांतहि असे पुरुष झाले नि आहेत. रामकृष्ण अरविंद गांधी स्वाइटझर विनोबा हे असेच पुण्य पुरुष होत. चिंचीचें नांव घेतल्याबरोबर जसें तोंडास पाणी सुटते, तसें ह्यांची नांवें घेतल्याबरोबर पुण्य जीवनाचा रस निर्माण होतो, मनुष्य पुण्यजीवनाकडे वळतो. म्हणून हे पुण्यश्लोक होत. पण ह्या महापुरुषांना हें स्वच्छ तत्त्वदर्शन आणि त्याच्या प्राप्तीसाठी लागणारी अनन्यता कोण देतो ? कोणाच्या नामस्मरणानें त्यांना हे बळ मिळतें ? हे बळ तो आदर्शमूर्ति अन्तर्यामी परमात्माच देत असतो. म्हणून तोच एक, खरा पुण्यकीर्ति म्हणावयाचा. त्याच्या अंशमात्रानें हे सारे महापुरुष पुण्यश्लोक म्हटले जातात.

६८९. अनामय
न आमयः अस्मिन् इति अनामयः । ज्याच्या ठाई कसलाहि आमय म्हणजे रोम संभवत नाहीं तो निर्गुण निराकार निरुपद्रव परमात्मा अनामय म्हणावयाचा. जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोष ही उपद्रव-मालिका ही अनर्थ-परंपरा देहानुषंगी आहे, देहाबरोबर ती येते. पण देहांतून सुटका झाली तर तीच काय पण तिची छायाहि उरणार नाही. म्हणून आमचा आदर्श हा देहनिरपेक्ष आहे. आम्ही देही असलो तरी आमचा आदर्श देहबद्ध नाही. या "नरदेहाचेनि साधनें । सच्चिदानन्दपदवी घेणे' हे आमचे उद्दिष्ट आहे. देहातीत आरोग्य देहांत गुंतून कसे साधणार ? देहासक्ति तर त्या आरोग्याचा उघड उघड विरोध आहे. म्हणून त्या परम आरोग्याचा उपाय परम वैराग्य आहे.हें परम वैराग्य आत्मज्ञानानेच लाभतें. आधी अंधकार मावळतो आणि मग उषःकाल होतो असें म्हणता येणार नाही. कार्य-कारणांची अशी गल्लत करता कामा नये. आत्मज्ञान कारण आहे, वैराग्य त्याचे कार्य आहे. कारणाधीन कार्य असते, कार्याधीन कारण नव्हे. तेव्हां आत्मज्ञानाचा उदय झाला म्हणजे देहासक्तीचा अंधकार नाहीसा होतो. ही ब्राह्मी स्थिति होय. आसक्ति मावळून देहहि गळाला की आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला म्हणून समजावें. हेच ब्रह्मनिर्वाण. आणि हेच अनामय पद म्हणावयाचे. "नहि सशरीरस्य सतः प्रियाप्रिययोर् अपहतिर् अस्ति' जोवर शरीर आहे तोवर उपद्रव, कांहीं अनुकूल कांहीं प्रतिकूल वेदना, होतच राहणार. साम्याचा अनुभव, तो अमृतानुभव, अज्ञान आणि अज्ञानजनित देह या दोहोंतून परिमुक्त पुरुषालाच संभवतो. अनामय पद देहमुक्ति आणि अमृतपद तदुत्तर आत्मानुभव सूचित करणारे आहे. "पदं गच्छन्त्यनामयम्" "अमृतत्वाय कल्पते' इत्यादि गीतेच्या वचनांत ती आली आहेत.


मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः ।
वसुप्रदो वासुदेव वसुर्वसुमना हविः ॥७४॥


६९०. मनोजव
मनसः जव इव जवः यस्य सः मनोजवः । ज्याचा जव म्हणजे झेप मनासारखी आहे तो मनोजव म्हणावयाचा. वेग हे तारुण्याचे लक्षण आहे. आमचा बलवंताचा आदर्श म्हणजे मारुति. त्याचे वर्णन मनोजव मारुततुल्यवेग असें आलें आहे. म्हातारा हा वृत्तीनें नाउमेद आणि शरीरानें गलितगात्र असतो. त्याच्या मनांत ना स्फूर्ति, ना शरीरांत त्राण ! पण तरुण कसा असतो "आशिष्ठो द्रडिष्ठो बलिष्ठः " त्याच्या मनांत अपार स्फूर्ति आणि शरीरांत विजेसारखी चपळाई असते. त्याच्या देहामनांत नुसता संचार असतो. परमात्मा हा तर चिर तरुण आहे. त्याच्या ठाईं जराहि निराशा निरुत्साह नाहीं की आळस ढिलेपणा नाही. "आंग मनापुढे घे दौडा" अशी तडफ त्याच्या ठिकाणी आहे. त्याच्या मनांत येण्याचा नि तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश की ती गोष्ट अमलांत आलीच म्हणून समजा. तो भूः म्हणाला आणि हा भूलोक झाला. परमात्मा हा असा सत्यसंकल्प असल्यामुळे तो मनोजव म्हटला आहे. आमचें मन कुठेहि निमिषार्धात जाते. याहून अधिक वेगाची कल्पना आम्हांला करता येत नाही. शब्दाचा वेग, प्रकाशाचा वेग एकापेक्षा एक वरचढ आहे. पण वेगांत मनाची बरोबरी करणारी वस्तु दुसरी नाही. म्हणून मनाची उपमा दिली. वस्तुतः ती उपमा अगदींच तोकडी आहे. गन्तव्याहून म्हणजे पोंचायच्या स्थळाहून अधिक वेग कोणत्या गन्त्याचा असू शकेल ? मन हे काही झाले तरी गन्तृ आहे, वाटसरू आहे. तें गन्तव्य जेआत्मतत्त्व त्याहून, मुक्कामाहून अधिक चपळाई करूं शकत नाही. म्हणून उपनिषदांनी म्हटले आहे "अनेजत् एकं मनसो जवीयः" तें आत्मतत्त्व एकच एक आणि हालचाल न करणारें (अर्थात् सर्वव्यापी) असून मनाहून वेगवान् आहे.

६९१. तीर्थकर
तीर्थकर म्हणजे तीर्थ करणारा. पण तीर्थ म्हणजे काय ? तीर्थ शब्दाचे तीन अर्थ होतात (१) पुण्योदक (२) विद्या (३) सोपान वा पूल. आणि तिन्ही अर्थानी हे पद लावता येईल. विष्णुपदापासून म्हणजे आकाशापासून गंगेचा म्हणजे जलप्रवाहाचा उद्गम झालेला असल्यामुळे भगवान् विष्णू हा तीर्थकर म्हटला आहे. आधीं तें तीर्थ ब्रह्मदेवानें आपल्या मेघरूप कमंडलूंतून विष्णुपदावर ओतलें. तिथून तें विष्णुपदावनेजन पर्वताकार शंकरानें आपल्या शिरावर धारण केलें. आणि तिथून मग तें जलचर सगरपुत्रांच्या उद्धारासाठी जीवनासाठी भगीरथाच्या मागोमाग म्हणजे निम्नानुसरणानें प्रवृत्त झाले आणि सागरास मिळाले आहे. असें हे तीर्थ परमात्म्याच्या व देवांच्या कृपेनें लाभलेलें आहे. म्हणून तो परमात्मा तीर्थकर होय. मानवाचेच केवळ नव्हे तर सर्वच जीवांचे जीवन जीवनाधीन आहे, तीर्थाधीन आहे.
आणि हे तीर्थ, हा जीवनाचा जिव्हाळा, जीवनाची ही ओल परमात्म्यापासून लाभलेली म्हणून तो तीर्थकर म्हटला आहे. पण एवढ्यानें जीवितसाफल्य होत नाही. तें विद्येनेच होते. म्हणून विद्या हेच खरें तीर्थ म्हणावयाचे. विद्येवांचून जें जीवन तें जीवन नसून तो नुसता जीवनाकार आहे. खरें जीवन ज्ञानमय आहे. ते ज्ञान, ती विद्या परमात्म्यापासूनच गुरुद्वारा माणसाला मिळते. त्या बळावरच तो आज आकाशाला गवसणी घालूं पहात आहे. त्यानें आश्चर्यकारक प्रगति केली आहे. म्हणून तो ज्ञानदाता तीर्थकर म्हटला आहे. पण एवढ्यानेहि खरें वा पुरें साफल्य लाभत नाहीं. तें आत्मज्ञानानेच लाभते. तेच ज्ञान सोपानरूप आहे. भवनदीच्या पार उतरवणारे आहे. म्हणूनहि किंबहुना म्हणूनच तो परमात्मा तीर्थकर म्हणावयाचा. तीर्थकरचेच दुसरे रूप तीर्थंकर होय. त्या एकटया परमात्म्यापासूनच आमचे जीवन, आमचें ज्ञानमय पोषण आणि आत्मज्ञानपूर्वक साफल्य होते. म्हणून आपण सर्व सतीर्थ आहों आणि तो परमात्मा आमचा तीर्थरूप आहे, तीर्थकर आहे.

६९२. वसुरेता
वसु रेतः यस्य सः वसुरेताः| वसु हे ज्याचें रेत म्हणजे वीर्य होय, गमक होय तो वसुरेता म्हणावयाचा. पण वसु म्हणजे काय ? वसु म्हणजे हिरण्यरत्नादि धन.हिरण्यगर्भ शब्द वसुरेताचा समानार्थक म्हणता येईल. परमात्मप्रतीक सूर्य हा हिरण्यगर्भ आहे, वसुरेता आहे. सगळी धातु-संपत्ति त्याच्या ठाईं एकवटली आहे. त्याच्यापासूनच ती सूर्यमालेतील ग्रहांना अंशतः लाभली आहे. असल्या सूर्यमाला या अनन्तकोटि ब्रह्माण्डांत किती आहेत कोण सांगू शकेल ? या सर्वांच्या ठाई जें उपादानभूत - वसु आहे तें परमात्म्याचें रेत होय, परमात्म्याचे वीर्य नि गमक होय. मुलगा बापाचे गमक असतो म्हणूनच तो मूलगः म्हणावयाचा. "मूलं गमयति बोधयति इति मूलगः" मूल पाहिलें म्हणजे त्याचा बाप असला पाहिजे हे अनुमान सहजच होते. तसें वसु म्हणजे व्यक्त द्रव्य पाहिलें म्हणजे त्याचा स्वामी तो जो अव्यक्त परमात्मा तो असला पाहिजे असें सहजच अनुमान होते. म्हणून वसु म्हणजे हा द्रव्यात्मक व्यक्ताकार ज्याचें रेत म्हणजे गमक आहे तो अव्यक्त अक्षर परमात्मा वसुरेता म्हणावयाचा. कोळयाचें जाळें पाहून जसे त्याचे निमित्त व उपादान दोन्हीहि कारणे असलेल्या कोळ्याचं सहजच अनुमान होतें तसें हें जगद्प वसु पाहून त्या जगत्कर्त्याचे अनुमान होते. रेतस् शब्द वीर्यवाचक आहे. वीर्य म्हणजे. निर्माण-क्षमता. ही क्षमता विविध आहे- उपादानरूप आणि निमित्तरूप. उपादान द्रव्यरूप, तर निमित्त शक्तिरूप आहे. दोन्ही मिळून क्षमता होते. ही द्विविध क्षमता परमात्म्याच्या ठाई आहे. म्हणूनच हा व्यक्ताकार त्यानें निर्मिला म्हणावयाचा. रेतस् शब्द चिन्ह वा गमक म्हणूनहि येतो-"मनसो रेतः प्रथम यदासीत्' इत्यादि उदाहरणे आहेत. हे दोन्ही अर्थ इथे एकवटले आहेत.

६९३. वसुप्रद
वसुप्रद म्हणजे फलप्रद. जीव कांही संकल्प करतो. त्या संकल्पानुसार कर्म करतो. पण त्या कर्माचे फल मिळणें न मिळणे त्याच्या अधीन नाही. परमात्म्याचा अनुग्रह होईल तरच ते मिळणार. म्हणून परमात्मा हा वसु म्हणजे कर्मफल देणारा म्हटला आहे. सगळी कर्में परमात्म्याच्या व्यापक योजनेनुसार यथाकाळ फळत असतात. ही योजना जीवाला कळत नाहीं त्यामुळे जीवाची कर्में कधी फळतात तर कधी जळतात. जेव्हां परमात्म्याच्या व्यापक योजनेस ती धरून असतात तेव्हां ती फळतात, जेव्हां ती प्रतीप जातात तेव्हां जळतात. "दैवं चैवात्र पञ्चमम्"म्हणून जे म्हटले आहे ते हेच होय. दैव म्हणजे देवचिकीर्षित, दैवी योजना. परमात्मा फलदाता असला तरी तुम्ही कांहीं न करतांच तुम्हाला तो देतो असे नव्हे. तसें केल्यास तुम्ही भिकारी ठरतां. परमात्मा जीवांना स्वाभिमानशून्य भीक मागणारे मानीत नाही, तर स्वाभिमानी मजूर मानतो. चाकरी करा, भाकरी खा. जो मजुरी न करतां खाईल तो चोर ठरेल. भीक मागणे अनाचार आहे. चोरी करणे दुराचार आहे. ही दोन्ही टोंकें वर्ण्य करून काम करून पोट भरणे हा मधला मार्गच सदाचार होय. याचंच नांव यज्ञ आहे. जो असा प्रामाणिक धंदा म्हणजे यज्ञ करतो त्याला परमात्मा इष्ट फळ देतो. त्याची इह लोकीं शरीरयात्रा चालते. तो राजमान्य होतो. राजा त्याचे रक्षण करतो. जो असा प्रामाणिक उद्योगधंदा करीत नाही. त्या भिकाऱ्याची लोकांत मानहानि होते. आणि चोर समाज-बहिष्कृत होऊन राजदंडित होतो. मरणोत्तर त्यांना सद्गति मिळत नाही. ते नरकास जातात. अर्थात् परमात्मा हा इष्टकामधुक आहे. इष्टफलदाता आहे. इथे इष्ट पद श्लिष्ट आहे. इष्ट पद क्लिष्ट आहे. इष्ट म्हणजे इच्छा, इष्ट म्हणजे यज्ञकर्म. परमात्मा जशी इच्छा, जसें कर्म, तसें फळ देतो.

६९४. वसुप्रद
वसुप्रद हे पद लगेंच मागे येऊन गेलेले असून तें परत आले आहे. सहस्रांत आवृत्त पदें अनेक आहेत, पण याच्या सारखें निरन्तर म्हणजे लागोपाठ द्विवार आलेले पद दुसरे नाही. आधीचें वसुप्रद पद मागील चरणाच्या किंबहुना श्लोकार्धाच्या शेवटी आलेलें असून हे पुढील श्लोकार्धाच्या आरंभी आलेलें आहे. त्यामुळे इथे दामयमक साधले गेले आहे. कवनांत अशी रचना पुष्कळदा सहज होत असते. तशीच ही आहे. पण टीकाकाराला त्यांत साभिप्रायता दिसते आणि तो त्याच पदाचे वेगळे विवरण करतो. कारण शक्यतों सबंध रचना साभिप्राय आणि अर्थपूर्ण आहे, निर्दोष व गुणसंपन्न आहे, असे दाखवून देणे हेच तर त्याचे काम ! शिवाय मूळ शब्दरचना ही अव्यक्तवत् असते. तिच्यांतून कितीहि व्यक्त अर्थ काढला तरी तो योग्यच आहे. तो काढून घेतल्यावर मूळ अव्यक्त स्थानीय शब्द परत पूर्ववत्च अन्यून पूर्ण राहतो. दुसऱ्या टीकाकारालाहि तो कामधुकच होतो. हवा तो आणि हवा तितका अर्थ खुशाल दोहून घ्यावा. शब्द हवा तितका अर्थ वहन करील पण अनर्थ अणुमात्रहि सहन करणार नाही, एवढे मात्र लक्षात असूं द्यावें. परमात्मा उपनिषदांत वसुदान म्हटला आहे. वसुदान म्हणजेच वसुप्रद. मागील पदाच्या चिंतनांत आपण पाहिले की परमात्मा हा वसुप्रद म्हणजे कर्मफलप्रद आहे. इथे तेंच पद त्याहून उच्च अथनि ज्ञानफल-प्रद या अनि आले आहे. परम पुरुषार्थ, मोक्ष या अर्थानें आले आहे. वसु म्हणजे द्रव्य, अर्थ. जो परम अर्थ होय तोच इथे वसु पदानें घ्यावयाचा. मागील पदांत त्रिवर्ग, धर्म अर्थ, काम, घेतला आहे. वसु शब्दाचें धन, फल आणि आत्मलाभ असे सामान्य आणि विशिष्ट अर्थ होतात. यथावसर ते घ्यावयाचे.

६९५. वासुदेव
"पुरुष एव इदं सर्वम्" "ईशावास्यं इदं सर्वम्' वासुदेवः सर्वम् (इति)" ही क्रमानें वेद उपनिषदें आणि गीता यांत आलेली वचनें आहेत. आणि ती सर्व समानार्थक आहेत. एकच भाव आणि एकच भाषाहि या वचनांत आलेली आहे. वैदिक धर्माचा हा मूलमंत्र आहे. आजतागायत तो अक्षुण्ण चालत आला आहे आणि पुढेहि चालत राहील. त्यांतच आमचें सारें दर्शन आणि आमचा धर्म सांठवलेला आहे. या तीन वचनांत जसें एकत्व आहे तसें कांहीं भिन्नत्वहि आहे. बाष्प, जल आणिहिम ही तिन्ही एकाच वस्तुची जशी उत्तरोत्तर स्थूल रूपें होत तशी आत्मा, ईश्वर आणि अवतार ही निर्गुण सगुण आणि साकार एकाच परमात्म्याची रूपें होत. 'दहवंतास अव्यक्तीं सुखें बोध घडे चि ना" म्हणून उपासनेसाठी सगुण-साकाराची कास धरली जाते. पण तिथेहि निरगुणमाहात्म्याचे विस्मरण चालणारे नाही. राजानें भिकाऱ्याचे सोंग घेतलें तरी त्याला मनोमन ओळखणारे त्याच्याशी राजा म्हणूनच व्यवहार करतील. तद्वत् सगुण साकार अवताराशी बा व्यक्तीशी वागतांना तो निगुण निराकार अव्यक्त भाव आहे हे ओळखूनच वागायला हवें. हा माझा पुत्र मित्र शत्रु म्हणून विषम व्यवहार करतां कामा नये. वासुदेवानें गीतेंत स्वमुखानें हेच तर सांगितले आहेः "अव्यक्तं व्यक्तिमापनं मन्यन्ते मां अबुद्धयः । परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् अर्जुनहि आपण व्यक्ताकारानें फसलों आणि त्या निरगुण निराकार सर्वव्यापी विश्वरूपाचा अवमान केला या बद्दल क्षमा मागतो आहेः "सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तदेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि|यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहार-शय्यासन-भोजनेषु । एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत् क्षामये त्वां अहमप्रयेयम् ॥ " म्हणून 'वसुदेवस्य अपत्यं पुमान् वासुदेवः' अशी जरी व्युत्पत्ति असली तरी तो व्यक्त वासुदेवहि तो अव्यक्त परमात्माच होय, जो प्रतिवसु म्हणजे प्रतिव्यक्ति वसला आहे. अर्थात् वासु म्हणजे वसु-अधिष्ठात्री देवता.

६९६. वसु
वसति सर्वं अस्मिन् इति वसु । अथवा सर्वस्मिन् वसति इति वसु । हें समस्त विश्व ह्याच्या ठाई वसतें म्हणून हा वसु म्हणावयाचा. अथवा हा सर्वांच्या ठाई वसला आहे म्हणून वसु म्हणावयाचा. साभासाचें अधिष्ठान जशी रज्जू तसा परमात्मा हा या विश्वाभासाचे अधिष्ठान होय. म्हणून तो बसु म्हणजे विश्वावसु म्हणावयाचा. शंकराचार्यांनी आपल्या प्रातःस्मरणांत या वसूचें असें स्मरण केलें आहेः "यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्ती रज्जवां भुजंगम इव प्रतिभासितं वै । ' रज्जूची सत्ता नसेल तर सर्पाभासहि होऊं शकणार नाही. म्हणून परमात्म्याची जी चित्सत्ता आहे तिच्या अधिष्ठानावर हे सर्व विश्व उभे आहे. ज्यांच्या आश्रयानें वसति होते त्यांना वसु म्हटले आहे. हे असे वसु अष्ट मानिले आहेत (१) सूर्य म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कालसाधन, (२) अग्नि म्हणजे शीत-भय-निवारण आणि पाकयज्ञ, (३) जल म्हणजे स्नानपानादि-साधन आणि औषध, (४) भूमि म्हणजे वसतीस योग्य आणि सुपीक क्षेत्र. त्याचबरोबर गोचरभूमि व श्मशानभूमिहि, (५) वायु म्हणजे स्वच्छ वाहता आणि वर्षावह पदन, (६) आकाश म्हणजे निरभ्र चंद्रतारकाखचित खुलें आकाश, (७) धुव म्हणजे दिग्देशसाधन आणि उत्तर गोलार्धातील ' इष्टतर निवसन आणि (८) राजा म्हणजे दर्शनसंपन्न नेता. हे अष्ट वसु जिथे उपलब्ध असतील तिथें वसाहत करावी. या सर्वांत मुख्य नेताच आहे. म्हणून विशेषेकरून तो वसु म्हणावयाचा. Where there is no vision, people perish. याचाहि आशय हाच आहे. मानवाला आपले जीवन सफळ करायचे असेल तर त्यानें दर्शनसंपन्न महापुरुषाचा संश्रय केला पाहिजे. भूतमात्राच्या ठाईं अंतरात्मरूपानें परमात्मा वास करीत असल्यामुळे तो वसु म्हणजे विश्वावसु होय. "अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो, रूपं रूपं प्रतिस्पो बहिश्च । एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा, रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च

६९७. वसुमना
वसौ मनो यस्य सः वसुमनाः । वसंत धनांत ज्याचें मन आहे तो वसुमना म्हणावयाचा. सर्व जीवांचे मन वसूंत लागलेले आहे. जिथे ज्याचें धन तिथे त्याचे मन. ब्राह्मणांना विद्या हेच धन वाटते, म्हणजे तें सर्वस्व वाटते. म्हणून ब्राह्मण हा विद्याधन म्हणावयाचा. क्षत्रीयांना मानच धन वाटते. वैश्यांना गोभूहिरण्यरत्नादिच धन वाटते तर शूद्रांना दोन वेळ खायला मिळणे हेच धन होय. ज्याला जें धन वाटतें तिथे त्याचे मन असते. त्याच्या सर्व क्रिया, सर्व जीवन तत्परायण असतें. लोहाला चंबक खेचन घेतें तसें वित्त चित्ताला खेंचून घेते. कारण ते जीवनाधार आहे. आणि जीवनाची उपेक्षा कोणीहि करू शकत नाही. जे महाभाग जीवावर उदार होतात ते देखील जीवनाचा गाभा, जीवनाचे उत्तमांग राखण्यासाठीं च होतात, म्हणजे ते खऱ्या जीवनासाठी वरवरच्या वा स्थूल जीवनाचा त्याग करतात. शरीरावर प्रहार होऊं लागले तर हाताचा बलि देऊन डोक्याचा बचाव केला जातो, त्याप्रमाणें जीवनाच्या गाभ्यासाठी मनुष्य वरवरच्या जीवनावरणांचा त्याग करीत असतो. अर्थात् ज्याचा त्याग तो दुसऱ्या कशाहि साठी करूं शकत नाहीं तेंच खरें त्याचे वित्त होय आणि त्या आत्मवित्तालाच इथे वसु म्हटले असून तो परमात्मा ह्याच अर्थानें वसुमना आहे. सगळे जीवहि वस्तुतः म्हणजे अन्तिम विश्लेषणांत ह्याच अर्थानें वसुमना आहेत. पण त्याची जाणीव त्यांना नसते इतकेंच. सामान्य नीतिवचनें आणि गीतेसारखीं परमार्थवचनेंहि हीच गोष्ट आपआपल्यापरीनें सांगतात. "आत्मानं सततं रक्षेत् दारैरपि धनैरपि" आणि "मय्येव मन आधस्व" ही वचनें ह्या आत्मधनाचीच जोपासना करायला सांगत आहेत. त्याचीच चिंता करायला सांगत आहेत.

६९८. हवि
हवि हे यज्ञाचे एक अंग आहे. पुरुषाप्रमाणें वेद षडंग कल्पिला आहे, तसा यज्ञहि षडंग कल्पिला जाईलः (१) हुतभुक् यज्ञपुरुष (२) हुतवह अग्नि (३) हवन-द्रव्य म्हणजे हव्य (४) हवनोपकरणे (५) होता आणि (६) हवनक्रिया वा हवि. आता या सर्वांत महत्त्व कशाला असेल तर तें हवनक्रियेला होय. कारण हवनक्रिया केली असता सर्व उपस्थित होतात. पण हवनक्रिया न केली तर इतर सारे असून नसल्यासारखेच होत. हवन करावें तेव्हांच यज्ञदेवता हुतभुक् म्हटली जाईल, तेव्हांच अग्नि हुतवह होईल. तेव्हांच हुतद्रव्य हव्य म्हटले जाणार, तेव्हांच कुण्ड-भाण्ड-सृक्-सुवादि हवनोपकरणे म्हटली जाणार आणि तेव्हांच यज्ञकर्ता होता म्हटला जाणार, तत्पूर्वी नव्हे. म्हणजे यज्ञाचे मर्म यज्ञकर्म आहे, हवि आहे. आणि म्हणून परमात्मा यज्ञकर्म आहे, हवि आहे. आणि म्हणून परमात्मा हवि म्हटला आहे. वस्तुतः तर तो यज्ञपुरुष आहे. परंतु यज्ञक्रियेमुळेच सर्व यज्ञांगें निर्वर्तित होत असल्यामुळे त्या यज्ञक्रियेला, हविर्हवनाला, विशेषेकरून यज्ञत्व येते. म्हणून तो यज्ञात्मा परमात्मा हवि म्हटला आहे. पण हविशब्दानें तर हवनक्रियेऐवजी मुख्यतः हवनद्रव्यच अभिप्रेत आहे असे नव्हे का ? तसे म्हणतां येईल, पण हव्य आणि हवि यांत अंतर आहे. हव्य म्हणजे हविर्द्रव्य आज्य-तिल-तण्डुलादि आणि हवि म्हणजे हविभाग आहुति जी स्वाहाकाराबरोबर अग्नींत अर्पिली जाते. आणि त्यामुळे हवि म्हणजे हवन, अर्पणक्रिया, स्वाहाकार असा अर्थ निष्पन्न होतो. परमात्मा हा यज्ञपुरुष असल्यामुळे कोणत्याहि यज्ञांगानें त्याचे स्मरण होऊच शकतें. इथे तें हवि पदानें केलें आहे.


सद्‍गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायण: ।
शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः ॥७५॥


६९९. सद्गति
"सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्‌भूतिः सत्परायणः" या श्लोकार्धात सद्‌रुप परमात्मा गाइला असून त्याला सत्योपासक कसा पोचतो त्याचे सूत्रहि आले आहे. प्रथम परमात्मा हा सद्गति आहे. 'सती गतिर्यस्य सः सद्गतिः' ज्याचें ज्ञान सद्प आहे तो सद्गति म्हणावयाचा. जीवाचें ज्ञान बहिर्मुख असल्यामुळे तो असद्गति होय, अनात्मगति होय. परमात्माच एक नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे. आणि म्हणून तो सद्गति सद्बोध म्हटला आहे. अर्थात् सद्गति म्हणजे आत्मज्ञ. सतांगतिः म्हणजे सज्जनांची अन्तिम निष्ठा म्हणूनहि तो सद्गति म्हटला जाईल. सत् म्हणजे आस्तिकच त्याला प्राप्त करून घेऊ शकतात. जो 'परमात्मा नाहींच' म्हणून बसला तो त्याच्या प्राप्तीचा प्रयास कसा करणार आणि त्याला पावणार तरी कसा ? त्याची सद्गति व्हायची नाही, दुर्गतिच होणार.'अयं लोको नास्ति परः' असेंच जो मानून बसला त्या नास्तिकाची सद्गति कशी होईल ? शरीराच्या मरणाबरोबरच आपणहि मेलों, संपलों असेंच तो मानणार. मग त्याला सद्गति कुठली ? आणि या जगांतहि तो नीतीनें कशाला वागणार ? "यावत्‌ जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः" असेंच तो म्हणणार. ज्याला सबोध नाहीं, तो सत्कृति कशी करणार ? जो आत्मा मानतो, ईश्वर मानतो, परलोक मानतो, जो कर्मफल मानतो तो सत्कृतीची सदाचाराची चाड बाळगील. पण जो देहात्मवादी आहे तो सद्गति म्हणजे आस्तिक नव्हे, मग सत्कृति म्हणजे सदाचार तो कसा होणार ? तो सदाचाराची चाड कां बाळगील ? सत्कृति वा सदाचार हे आस्तिकतेचे प्रमाण आहे. नुसतें मी आस्तिक आहे हो असें कंठरवानें सांगणे नव्हे. उलट तो खरा नि पुरा सदाचारच नव्हे की ज्याच्या मुळाशी आस्तिकता नाही, सद्दर्शन नाही.

७००. सत्कृति
परमात्म्याची गति म्हणजे ज्ञान जसें आत्मनिष्ठ असल्यामुळे सद्रूप आहे, तशी त्याची कृतिहि आत्मनिष्ठ असल्यामुळे सद्रूपच आहे, रज्जूला जसा आपल्या ठाईं सर्पाभास होणे शक्य नाही, तसा परमात्म्याला आपल्या ठाई जगदाभास आत्मभिन्नत्वानें होणे शक्य नाही. तथापि जगदुरूप ही परमात्म्याची कृति तदधिष्ठित म्हणजेच सदधिष्ठित असल्यामुळे ती सत्कृति होय आणि तो परमात्माहि सत्कृति म्हणावयाचा. रज्जूत्वानें सर्पाभास सत् म्हणावयाचा.
एरव्हीं तो सर्पत्वानें मिथ्या आहेच. "बह्म सत्यं जगद् - मिथ्या " या वेदान्तडिण्डिमघोषाचे हेच तात्पर्य · आहे. हे तात्पर्य लक्षून जें वर्तन, जो व्यवहार, जी कृति घडेल ती सत्कृति होईल. म्हणूनच म्हटले आहे "
न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभा मतिः ।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे ॥

ज्याला सद्वस्तूची आत्मतत्त्वाची ओळख पटली आहे तो देहात्मबुद्धि बाळगून 'मी माझा' ही भेदभावाची भाषा सोडील. कपटहिंसा लोभ इत्यादि असद्‌भावांनी अभिभूत होणार नाही. त्यांच्या आहारी जाऊन पशुवत् कोणाशीहि वैर विरोध करणार नाही. सर्वत्र विवेकयुक्त समतेचा व्यवहार करील. असा साम्ययोगी पुरुषच सत्कृति म्हणावयाचा. ही सत्कृति सद्दर्शनमूलच असेल. किंबहुना सर्वत्र समदर्शन हीच सत्कृति होय. कारण कोणतीहि कृति देहाधित असल्यामुळे तिच्यांत वैषम्य-नैपुण्यादि दोष कमी अधिक मात्रेत येणारच येणार. कुठे बसायचे झाल्यास ती जागा झाडून बसावें लागणार. तसें करतांना तिथल्या जीवांना मुंग्या वगैरेंना हुसकवून द्यावे लागणार. पाणी प्यायचे झाल्यास गाळावें लागणार. खायचे म्हणजेहि इतर जीवांचा द्रोह होणार. या सूक्ष्म आणि दूरच्या गोष्टी सोडून मानवव्यवहार घेतला तरी त्यांत या समळ्या विषम प्रकारांना टाळता येत नाही. अनिच्छन्नपि देहानुषंगामुळे भूत-द्रोह होतो. म्हणून देहभाव विसरून आत्मचिन्तन करणे, आत्मनिष्ठ होणे हीच सत्कृति म्हणावयाची आणि तींत परमात्म्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी असूच शकत नाही म्हणून तो सत्कृति.

शतक आठवें

७०१. सत्ता
सद्गति म्हणजे सद्दर्शन आणि सत्कृति म्हणजे सदाचार यांच्या योगें साधकाचे जीवन उत्तरोतर सद्रूप बनत जाते. शेवटी देहादि सर्व असत् गळून जाऊन, जळून जाऊन तो निखळ "सत्ता" म्हणजे सद्‌भाव बनतो. त्याच्या ठाई असताचा लवलेशहि राहत नाही. "सा काष्ठा सा परा गतिः" ही चरम आणि परम स्थिति होय. इथे नाम रूप गुण कर्म कशाचाच संपर्क असत नाही. असतें तें केवळ असते पण, त्यालाच सत्ता म्हणावयाचे. पण हे असतेपणहि नसतेपणाच्या कल्पनेवांचूनचें केवलस्वरूप असतेपण समजावयाचे. कारण तें अद्वितीय आहे. नसतेपणाच्या विरोधात उभे राहणारे किंवा दुसऱ्या असतेपणाच्या वेगळेपणानेहि उभे ठाकणारे असतेपण तें नव्हे. आणि तेंभावरूप असल्यामुळेच तर त्याला सत्ता म्हणावयाचे. म्हणून त्याला वेगळे विरोधी या दोन कल्पांबरोबर अभावरूप वा शून्यहि म्हणतां यावयाचें नाहीं. वस्तूमात्राचे होणारे जे हे तीन कल्प, त्यांपैकी कशांतच त्याची गणना होऊं शकत नाही म्हणून ती "सतताते असतेपण खरोखर निरुपमच होय. त्याला साम्यानें विरोधानें वा अभावानेहि दुसऱ्याच्या जोडीस उभे करतांच येत नाही. त्याला प्रतिपक्ष कल्पिताच येत नाही असें तें एकमेवाद्वितीय आहे, केवलस्वरूप आहे. तें सजातीय विजातीय भेदरहित एकमेवाद्वितीय असले तरी एकाच देहाचे जसे मुंडके धड हातपाय असे विभाग असतात तसे स्वगत भेदहि त्यांत असू शकतील म्हणावें तर तेहि नाही. एकनाथांनी म्हटल्याप्रमाणें तो सन्मात्र परमात्मा "पाठ ना पोट अवघा निघोट" असा "सर्वांगीं देखणा सर्वावरिष्ठ" आहे. ही परमात्मसत्ता "वैदिक ऋषींनी "यतेमहि स्वराज्ये व्याचिष्ठे बहुपाय्ये' इत्यादि मंत्रांत स्वराज्य म्हणून संबोधिली आहे. तिच्या संपादनासाठी त्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली आहे. आणि या सत्तेसाठी सर्वांनी खुशाल स्पर्धा करावी. तिथे कुणास कुणाचे भय नाहीं, कशाचे भय नाही. ती अकुतोभय आणि सर्वतोभद्र आहे. अनतिस्पृहणीय आहे.

७०२. सद्‌भूति
चंदनाचा वृक्ष जसा सर्वांगी चंदन असतो तसा परमात्मा हा सत् आहे. त्याचे बीज पत्र पुष्प फळ सारे सत् आहे. हा सारा विस्तार, ही भूति सद्रूपच आहे. म्हणून तो परमात्मा सद्‌भूति म्हणावयाचा. सूर्य प्रकाश-स्वरूप असतो आणि त्याची प्रभाहि प्रकाशमयच. तद्वत् परमात्मा हा सद्रूप आहे आणि त्याची भूति म्हणजे विश्ववैभवहि, प्रभावळहि सत्‌स्वरुपच. प्रकाशाशी जसा अंधाराचा सांधा कुठेहि केव्हांहि जुळूच शकत नाहीं तद्वत् सताशी असताचा संपर्क होऊं शकत नाही. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधकार. त्याचा प्रकाशाशी संबंध कसा असणार ? पण तर्ककुशल या असंबंधालाच विरोध-संबंध म्हणून मोकळे होतील. पण सताचा असताशी एवढाहि संबंध नाही. तो सद्रूप परमात्मा सदसद्विभागाला गिळून विराजमान आहे. ही जी त्याची अतिसदसत् सत्ता ती त्याची भूति म्हणावयाची.
एका बीजापोटी फळे कोटि-कोटि होतात. ही त्या बीजाची भूति होय. तशी सताची भूति म्हणजे हा विश्वाकार विवर्त होय, असेंहि म्हणता येईल. पण विवर्ताच्या योगे मूळ वस्तु वाढत नाहीं वा घटत नाही. तद्वत् सन्मात्र परमात्मा सद्‌भूतिरूप विश्वाकाराच्या योगें वाढत वा घटत नाही. तो कूटस्थनित्य अविकृतच राहतो. वस्तुतः ही अविकृतताच त्या सद्पाची भूति . होय. पण अज्ञानानें विवर्ताला, या विश्वाकाराला भूति म्हटले जाते. जनकासारखे ज्ञानी या सद्‌भूतीच्या बळावरच 'मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन' असे आत्मप्रत्ययाचे बोल बोलत असतात. अशा प्रकारें खरोखर ती सद्‌भुति किंचनमात्र जरी अहंता ममता उरली असेल तर त्याला तो अकिंचन-धन, तो सद्‌भूति परमात्मा, भेटावयाचा नाही.

७०३. सत्परायण
सन् च असौ परायणं च सत्-परायणः ! सत् असून जो परायण म्हणजे परम गति होय तो परमात्मा सत्परायण म्हणावयाचा. असत् ही वस्तुतः गतिच असू शकत नाही, मग परम गति कशी असणार ? सर्वांचा निषेध एक वेळ होऊं शकेल, पण सत् चा निषेध होऊं शकत नाही म्हणून तेंच पर अयन, परम गति होय. सत्‌च परमात्मा असून तोच पर म्हणजे श्रेष्ठ अयन वा गति होय म्हणून त्याला सत्परायण म्हणावयाचें. आपण गाढ झोपतों तेव्हां कुठे जातो ? तेव्हा हे विचित्र विश्व विलीन होऊन जाते आणि मी मनुष्य, ब्राम्हण, पुरुष, अमुक, असा इत्यादि अहंभावहि नाहींसा होऊन जातो. उरतें तें एक सत्. आणि तें उरतें म्हणूनच त्याला सत् म्हणावयाचे. त्यांतच सारें पिण्ड तसें ब्रह्माण्ड प्रत्यह आणि प्रतिकल्प विलीन होत असते. म्हणूनच तें म्हणावयाचें परायण. सर्वांची गति त्यांतच होते. त्यांतच सारे विलीन होते. हे जें चराचर दिसतें तें सारेंच नाहीसे होते म्हणून तें सत् या पदास पात्र नव्हे, तर जें अव्यक्त अक्षर आहे,ज्यांत हे चराचर लीन होतें तेंच सत् होय. ते स्वतः कुणांतच लीन होत नाहीं तर सदैव स्वे महिम्नि प्रतिष्ठित असते. सदैव स्वरूपस्थित असते. हे जे सत्, हें जें परायण त्यालाच जे अनन्य भावें शरण गेले तेच या लोकी सत्पुरुष होत. त्या सत् पुरुषांच्या ठाईंच ती परमात्मसत्ता आविर्भूत होते. म्हणूनहि तो परमात्मा सत्परायण म्हणजे सत्पुरुष ज्याचे उत्कृष्ट स्थान होय असा म्हटला आहे. अशा सत्पुरुषाहून श्रेष्ठ या जगांत कांहीं नाही. तुकारामानें आपल्या साध्या सोप्या पण मार्मिक मराठींत हेच असें सांगितले आहे. "तीर्थी धोंडा पाणी ! देव रोकडा सज्जनीं !"

७०४. शूरसेन
मागील श्लोकार्धात निर्गुण निराकाराचे तर "शूरसेनो युदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः” या श्लोकार्धात सगुण साकाराचे नामसंकीर्तन केलें आहे. निर्गुण निराकार हेच चरम आणि परम तत्त्व आहे. पण ते आहे अचिन्त्य आणि अनिर्देश्य. त्याचे आकलन सहसा होत नाही. म्हणूनच म्हटलें आहेः "अव्यक्ताहि गतिर्दुःखं देहवद्‌भिरवाप्यते".
पण त्या अचिन्त्यवैभव निर्गुण निराकाराचा संकेत सगुण साकार महापुरुषांच्या जीवनावरून होत असतो. म्हणून अवतार आणि महात्मे यांचे मोल आम्हा देहवंतांना विशेष आहे. त्यामुळेच तुकाराम म्हणतोः "देव सारावे परते । संत पूजावे आरतें" ज्ञान आणि वैराग्य यांचा अलौकिक आदर्श आपल्या जीवनानें लोकांत प्रत्यक्ष दाखविणारे सत्पुरुष नसते तर शास्त्र प्रत्यक्ष प्रमाणाच्या अभावीं लटकी ठरली असती. म्हणून गीतेइतकेंच रामायणाचे महत्त्व आहे. किंबहुना रामायणावरून जितका गीतेचा बोध गळी उतरतो तितका प्रत्यक्ष गीतेवरून उतरत नाही, म्हणून रामायणाचे महत्त्व विशेष आहे. रामायणाचे म्हणजे महापुरुष-चरिताचे इथे या श्लोकार्धात भगवान् कृष्णाचे स्मरण केलें आहे भगवान् कृष्ण हा शूरसेनाच्या जनपदांत आणि कुळांतहि जन्मलेला. म्हणून तो शूरसेन म्हटला आहे. सिंहवत् सेन हे पद गौरवार्थानं नामांना जोडले जाते. जसें शूरसेन वीरसेन हरिषेण भीमसेन इत्यादि. मथुरामंडल हे शूर नांवाच्या आणि अन्वर्थक म्हणजे पराक्रमी लोकांचें जनपद होतें. सुंदर स्त्रिया आणि पराक्रमी पुरुष यांच्या बद्दल प्रसिद्ध होतें. आजहि आहे असे म्हणता येईल. त्यांच्यांत भगवान् कृष्ण हा सुंदर गुणी तसाच ज्ञानी' पराक्रमी पुरुषोत्तम जन्मला. "हनुमदादि शूराणां सेना यस्य सः शूरसेनः" असाहि विग्रह होऊं शकेल. पण तो इथे अप्रस्तुत.

७०५. यदुश्रेष्ठ
भगवान् कृष्ण हा शूरसेन जनपदांत जन्मलेला म्हणून शूरसेन तसा त्या जनपदांतील यदुकुलांत जन्मलेला म्हणून यादव होय. यादवांत त्याच्या योग्यतेचा दुसरा कोणी नव्हता. म्हणून तो यदुश्रेष्ठ म्हटला आहे. आपल्या मार्गदर्शनासाठी जसा आपल्या हातचा दिवाच आपल्याला मोठा तसा ज्या त्या जाती जमातीला तिच्यांतील थोर पुरुष असतो. त्यानें आपल्या क्षेत्रांत हे नेतृत्व केलें म्हणजे त्याचे थोरपण, त्याचे नेतृत्व सार्थक झालें म्हणावयाचें. जग अफाट आहे, त्याचे नेतृत्व करण्याचा आव माणसानें का आणावा ? त्यानें आपल्या भोवतालचे मर्यादित क्षेत्रच आपले जग मानून संतोष कां करूं नये ? तेवढ्यात त्यानें आपलें पुरुषोत्तमत्व प्रकट केलें म्हणजे तो जगाचाहि पुरुषोत्तम झाला. त्यानें आपल्या काळी पुरुषोत्तमत्व प्रकट केलें की तो सर्व काळचा पुरुषोत्तम झाला. खरोखर माणसाला एवढेच करणे शक्य आहे. त्यानें ही आपली मर्यादा ओळखावी. जो आपल्या काळांतला आणि कुळांतला उत्तम तोच सर्वोत्तम होय. भगवान् कृष्ण असा होता म्हणून त्याची धर्मराजाच्या राजसूय यज्ञांत अग्रपूजा झाली. त्या काळच्या समाजांत तो ज्ञानानें पराक्रमानें शीलानें गुणानें नि रूपानेहि अप्रतिम होता. म्हणून तो अग्रगण्य ठरला. मुख्य म्हणजे त्याचा प्रभाव. हा प्रभावच ईश्वरावतारत्व होय. प्रत्येक युगांत ईश्वर असा अवतार घेत असतो. त्या अवताराचे गमक त्याचा तो अलौकिक प्रभावच होय. त्याच्या विरुद्ध जो उठेल तो पडेल, जो त्याची आज्ञा शिरोधार्य करील तो वाचेल, वागेल. भगवान् कृष्ण हा असा अवतार होता. त्याचा प्रभाव अनुल्लंघ्य होता.

७०६. सन्निवास
सतां निवासः सन्निवासः । जो सज्जनांचा निवास म्हणजे आश्रय होय तो सन्निवास म्हणावयाचा. तत्पुरुष वा बहुव्रीहि कोणताहि समास कल्पिला तरी अर्थात तादृश भिन्नता नाही. तात्पर्य एकच. परमात्माच सर्वसज्जनांचा आश्रय होय, शरण्य होय. सन्मात्राचाहि आश्रय तोच होय. कांकी में कांहीं परमात्म्याला सोडून राहील तें सहजच लटके पडेल. कारण परमात्मा हा स्वतःच सन्मूर्ति होय, सत्तामात्रशरीर होय. सतां निवासो- यस्मिन् सः सन्निवासः । अशा सप्तमी बहुव्रीहीऐवजी "सन्त एव निवासो यस्य सः सन्-निवासः" असा षष्टी बहुव्रीहिहि घेता येईल. सत्परायण पदाच्या चिन्तनांत हा विचार विशद झाला आहे. म्हणून इथे त्याचे अधिक विवेचन करण्याची आवश्यकता नाही. श्रीनिवास श्रीनिकेतन इत्यादि समास सामान्यतः सप्तमी बहुव्रीहि घेतले जातात आणि सन्निवास हे पदहि तसेंच आहे. आणि संत व भगवंत यांत अंश-अंशिभाव असल्यामुळेहि तें तसें सप्तमी बहुव्रीहि घेणेच श्रेयस्कर. तथापि कार्यात कारणाचा अन्वय असतो या नात्यानें षष्ठी बहुव्रीहि घेणे शक्य आहे. गीतेत म्हटलेच आहे "ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् " परंतु तिथेहि आधी भक्त भगवंतात राहतात असें विधान करून मागाहून गौरवानें भगवंतहि भक्तांत राहतो असे विधान केलें आहे, हे चिन्त्य आहे. पण सन्निवास हे पद इथे सगुण पक्षीय आहे. म्हणून सज्जनांचा आश्रय सज्जनांचा पाठीराखा असा त्याचा विशिष्ट अर्थ इथे अभिप्रेत आहे. "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" या श्लोकांतला साधु-परित्राता दुष्ट-दमयिता आणि धर्मसंस्थापक परमेश्वरी अवतार होय असा त्याचा आशय आहे. पांडवांचा कैवारी, कौरवांचा शास्ता आणि धर्माला म्हणजे न्यायाला व धर्मराजाला सिंहासनावर प्रतिष्ठापित करणारा भगवान् कृष्ण हा तत्कालीन अवतार होय भगवंताचा.

७०७. सुयामुन
सु शोभनो यामुनः सुयामुनः । सुन्दर जो यामुन तो सुयामुन भगवान् कृष्ण, यमुनेच्या तीरावर ज्यांनी वसति केली ते यामुन म्हणावयाचे अर्थात् यामुन म्हणजे यमुनातीरवासी. त्यांत जो ज्ञानानें तपस्येनें प्रभावानें शोभायमान तो सुयामुन म्हणावयाचा. हा असा शोभिवंत यमुनातीर-निवासी म्हणजे भगवान् कृष्ण होय. त्यानें तिथे यमुनेच्या पुळिणावर, यमुनातीरावरील मधुकुंजांत, यमुनेच्या काळ्या जळांत गोपगोपींसह स्वच्छंद विहार केला, गाईगुरांसह तो रमला; यमुनेच्या जळचरांशी, तिच्या तीरावरील मर्कटादि वनचरांशी, आकाशांतील काकपिकादि खेचरांशीं तो समरसला आणि आपले वेगळेपण आपलें थोरपण पार हरवून बसला. अशा त्या सर्वभूतात्मभूत झालेल्या गोपाळ कृष्णाहून अधिक सुशोभन दुसरा कोण बरें आहे ? "पाण्डित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत' या उपनिषद्वचनाचा त्याचे चरित्र म्हणजे पदार्थपाठच होय. असा महाज्ञानी जेव्हां एखाद्या समाजांत जन्मतो आणि वावरतो, त्यांत अगदीं मिसळून जातो तेव्हां तो समाज पार्थिव राहत नाहीं त्याचे दिव्य रूपांतर होते. तिथे आनंदीआनंद नांदतो. तिथे भूवर वैकुंठ अवतरतें. यमुनातीरी गोकुलांत असेंच झाले होते. तेथील मृत्कण मृण्मय राहिले नव्हते. ते चिन्मय झाले होते. तेथील सारें विश्व चिद् रसांत विलीन झाले होतें, विरघळून गेलें होते. तिथे अद्वैतामृताचा एकार्णव हेलावत होता. यमुनेच्या काळ्या पाण्यानें कृष्ण काळा झाला नव्हता तर त्या कृष्णाच्या सान्द्र चैतन्यानें सारे कृष्णमय झालें होते. म्हणून भक्त गातातः
रात्र काळी घागर काळी । यमुना जळें ही काळी वो माये । विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी । कृष्णमूर्ति बहु काळी वो माये ॥




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP