ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

सुप्रसादः प्रसन्नत्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः ।
सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः ॥२६॥


२३६. सुप्रसाद
इष्ट विषयाच्या लाभामुळे जीवाला हर्ष आणि अनिष्ट विषयांच्या आपत्तीमुळे अमर्ष होत असतो. तसेच या इष्टानिष्टांच्या अपायोपायांच्या आशंकेमुळे भय आणि उद्वेग हि होतच राहतात. चित्ताची जी ही व्याकुलता, कंपितता,आन्दोलितता तीतच सर्वदुःखें सामावली आहेत. सर्व दुखांचें तें माहेरच होय. तद्-विपरीत चित्ताच्या या वृत्तींच्या निरोधालाच योग असें म्हणतात. अर्थात् चित्ताचे निष्कंप समत्व म्हणजे योग होय. चित्ताच्या या समत्वाचेच दुसरें नांव प्रसाद आहे." प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते " अथवा "तं विद्यात् दुःखसंयोग-वियोग योगसंज्ञितम्' या गीतावचनांत हाच आशय व्यक्त झाला आहे.
आता हा जो योग, ही जी साम्यावस्था, अथवा निर्विकार प्रसन्नता तीच आत्म्याची प्रकृति आहे. म्हणून त्याला सुप्रसाद म्हटले आहे. परमात्मा हा सदैव सुप्रसादच असावयाचा. त्याच्या ठाई विकारजनित ज्वलन संभवत नाही. म्हणून तो निर्वाणरूप होय, शान्ति-स्वरूप होय, सदैव सहज-प्रसन्न होय, निरुपचार प्रसन्न असल्यामुळे त्याला सु-प्रसाद म्हटले आहे. तो निरतिशय-प्रसाद-रूप आहे.
परमात्मा हा प्रसाद-स्वभाव असल्यामुळे तो आपल्या भक्तांना सुलभ प्रसाद आहे. जो कोणी त्याची उपासना करतो तो " क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत् शान्तिं निगच्छति ". त्याचे क्लेश जीर्ण पर्णा प्रमाणे, लवकरच गळून पडतात आणि त्याला सर्वांगी प्रसन्नतेची नवी पालवी फुटते. " न मे भक्तः प्रणश्यति " अशी त्याची प्रतिज्ञाच आहे. त्यामुळे हि तो सुप्रसाद होय.
ज्याचें चित्त विकारांनी जाळत असते, त्याला चंदनाहि तापदायक होते. उलट ज्याचे विकार विझले, निर्वाण पावले, त्याला प्रह्लादाप्रमाणे अग्निहि शीतल होतो.

२३७. प्रसन्नात्मा
परमात्मा हा प्रसादस्वरूप आहे. हे मागील पदांत सांगितल्यानंतर लगेच पुन्हा त्याला प्रसन्नात्मा म्हणण्यांत काय तात्पर्य आहे ? सुप्रसाद पदाने अन्तःस्वरूप विशद केले आहे, तर प्रसन्नात्मा पद बाह्यरुप विशद करीत आहे. सुप्रसाद पद निर्गुणपर आहे, तर प्रसन्नात्मा पद सगुणपर आहे. परमात्मा प्रसादस्वरुपच असल्यामुळे त्याचा प्रकाश हि प्रसादमयच असणार. म्हणूनच त्याचे अंगप्रत्यंग प्रसन्न रेखाटले जाते. त्या प्रसन्नतेचे उपलक्षण म्हणून त्याच्या अंगप्रत्यंगांना कमलाची उपमा दिली जाते. कमल निर्मल उज्ज्वल सुंदर असते. तें आरक्त सुकुमार सुगंधी असते. तसे त्याचे रूप आहे. त्याची निरतिशय प्रसन्नता सुचविण्यासाठी त्याला कमलाकर म्हणतात. कमल-मुख, कमल-नयन, कमल-पाणि, कमल-पाद असातो कमलाकर आहे. त्याच्या अंगप्रत्यंगातून प्रसन्नताच ओसंडते आहे. या प्रसन्नात्मतेचे वर्णन करताना ज्ञानदेवाने म्हटले आहे

ते बोलणेचि सुकुमार | मुख मोहाचें माहेर ।
माधुर्या फुटले अंकुर | दंशन तैसे ॥


त्याचे नयन प्रसादवर्षी आहेत, त्याचें वदन प्रसादवर्षी आहे. त्याचे करचरण प्रसादवर्षी आहेत. असा तो प्रसन्नात्मा आहे.
सर्व देव सुरूप सुंदर वर्णिले आहेत, तर सर्व असुर वेडे-विद्रे. याचे कारण जसे अंतर तसे बाह्य, जसें बीज तसे फळ असा न्याय आहे. परमात्मा हा मंगल-स्वरूप आहे. म्हणून त्याला मंगलमूर्ति चित्रित केले जाते. असुर अमंगल वासनारूप असल्यामुळे ते वेडे-विद्रे आकारले आहेत, कुरूप, भयानक झाले आहेत. कारण, " जें कार्य तें धरिल की गुण कारणाचे ".

२३८, विश्वधृक् (धृत्, सृज्, सृट्)
विश्व म्हणजे केवळ ही चराचर सृष्टि नव्हे, तर सत्, असत्, सदसत् आणि नसत्-नासत् या चारी कोटींना आपल्या पोटांत सामावून घेणारेंजें बृहत् तत्त्व, ज्याला ब्रह्म म्हणतात, तें होय. विष्णु-सहस्राच्या प्रारंभींच तें स्मरलें आहे. अशा या विश्वाला तदितर कोण बरें धारण करणार ? स्वयंभू तसें स्वधृतच आहे. म्हणून विश्वधृत म्हणजे स्वधृतच होय, मग त्याला विश्वधृत् कां म्हटलें ? एवढ्यासाठी की स्वरुपांत विश्वरूपाचा अंतर्भाव होत नाही, पण विस्श्वात स्वरूपाचा होतो. चंद्र हा आपल्या सोळाहि कलांचा धारक आहे. तसा परमात्मा हा विश्वधृत आहे. तो आपल्या सत्, असत्, सदसत् आणि नसत्-नासत् या चारी म्हणजे समस्त कलांना धारण करणारा आहे. कोणतीहि कला दुसऱ्या कोणत्याहि कलेला धारण करू शकत नाही. पण सकल चंद्र समस्त शकलांना धारण करतो. म्हणून तो विश्वधृत् म्हणावयाचा.
विश्वसृक पाठ घेतल्यास तो विश्वाची सृष्टि करणारा आहे. जो विश्वाची सृष्टि करतो, तोच तिचे धारणहि करतो. चंद्रच चंद्रकलांना जन्म देतो आणि त्यांचे धारण हि करतो. म्हणून तो विश्वसृग् होय,
विश्वधृक्पाठ घेतल्यारा तो या विश्वाचें धर्षण करणारा आहे. या विश्वाचें जो उत्पादन करतो तोच त्याचें धारण करतो. आणि जो धारण करतो तोच त्याचे संहरण हि करतो. चंद्र चंद्रकला प्रकट करतो आणि त्यांना क्रमाने गिळून हि टाकतो. म्हणून तो विश्वावी उत्पत्ति स्थिति करणारा परमात्माच विश्वधृक् म्हणावयाचा. पुढील विश्वभुक् व विभु पदें पाहता हे पद विश्वसृक् मानणे योग्य होईल.

२३९. विश्वभुक्
भुज् धातु पालन आणि अभ्यवहार म्हणजे भोजन या अर्थी येतो. विश्वभुक् या दोन्ही अर्थानी लावतां येईल. विश्वाचे पालन तो परमात्मा करतोच, परमात्मा हा या विश्वाचे सृजन, पालन आणि संहरण तिन्ही करतो, तथापि पालन हें जीवमान जीवांना विशेष आवश्यक वाटल्यास नवल नाही. म्हणून परमेश्वराच्या सत्त्वमूर्ति, त्याचे विश्वपालक अवतार, त्याला ध्येय गेय अनुकरणीय होत. रजोमूर्ति स्रष्टा ब्रह्मदेव वा तमोमूर्ति संहर्ता हर हे परमेश्वराचेच आविर्भाव असले, तरी त्यांचे वारंवार अवतार होत नाहीत. सृष्टि केली की सृष्ट्याचे काम संपलें. संहार केला की संहर्त्याचे काम संपले. परंतु दरम्यान पालनाचे कार्य सुदीर्घ चालत राहते. त्यासाठी देवाला, पालनकर्त्या विष्णूला, वारंवार अवतार घ्यावे लागतात. त्यामुळे त्याची उपासना विशेष होय, इतरांची, त्रिमूर्तीपैकीं इतर दोघांची, तशी होत नाही. ते परमेश्वराचे आविर्भाव म्हणून वंद्य आहेत. पण आराध्य नाहीत. आराध्य एक सत्त्वमूर्ति विश्वभुक् विष्णुच. म्हणून त्याची सहन्न नामें, त्याची सहस्र रूपे, त्याची सहस्र कर्मेम गाइली चिंतिली, वर्णिली जातात. तो त्रिमूर्ति हि विश्वाप्रमाणे त्रैगुंण्यांत सांपडला आहे. आणि त्याची सत्त्वमूर्ति तेवढी आराध्य झाली आहे. रजस्तमोगुण वर्जनीय होत. गुणांचा अत्यय हि सत्त्वगुणाच्या आधारेच व्हावयाचा. तोच प्रपंच आणि परमार्थ दोहोंगधील पूल आहे. गीतेने म्हणूनच म्हटले आहे " निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो " अर्थात् निस्त्रैगुण्यपदवी गांठायची तर आधी नित्य-सत्त्वस्थ व्हायला पाहिजे. नित्य-सत्वस्थ व्हायचे तर रजस्तमोवर्जन-पूर्वक निरंतर सत्त्वोपासना केली पाहिजे. श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप ही सगळी सात्त्विकच सेवन केली पाहिजेत. गीतेचा सतरावा अध्याय हेच सांगतो. विश्वभुक् त्याचेच सूचन करीत आहे.

२४०. विभु
वि उपसर्ग आणि भू धातु यांच्यापासून विभु शब्द बनला आहे. वि उपसर्गाचे विगत आणि विविध या विशेष असे अर्थ होतात. आणि भू म्हणजे असणे, होणे, यावरुन विभु म्हणजे हें विश्व होणारा, विश्वाकार असणारा असा अर्थ होतो. उपनिषदांत म्हटले आहे : "अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रुपं एवं प्रतिरुपो बभूव । एकस्तथा सर्व भूतान्तरात्मा रुपं रुपं प्रतिरूपो बभूव । " अशा प्रकारें तो सर्वान्तर्यामी निराकार असून सर्वाकार झाला आहे, विश्वाकार झाला आहे. एक असून अनेक झाला आहे. असंख्यात झाला आहे. म्हणून त्याला विभु म्हणतात.
कोणत्याहि आकाराने तो बद्ध होत नाही. सीमित होत नाही. म्हणून तो विगतभाव, विगतदेह, वि-भु होय. तसेच ज्यांत प्रत्येक वस्तु दुसरीहून वेगळीच आहे, असें अनंत वैविध्य हेच ज्याचे स्वरूप आहे, ते अशेष विश्व जो बनला आहे तो विभु होय. अशा प्रकारें तो उभयथा हि विभुच आहे. परमात्याचें हें विभुत्व, हे अति-सर्व सर्वव्यापक वैभव, सूचित करण्यासास त्याला आकाश-शरीर म्हटले आहे. घटांत घटाकार आणि मठांत मठाकार दिसणारें आकाशा त्या आकारांनी सीमित न होणारें असें निराकार आणि निरवयव आहे. तसा परमात्मा हा सर्वाना आंतून आणि बाहेरून व्यापून आहे, पण त्याला मात्र कोणीच आंतून वा बाहेरुन व्यापलेले नाही. असा तो घनानन्त विभु आहे. एकमेवाद्वितीयच आहे तो. तिथे जग निरुद्ध आहे.
'विश्वसृड्, विश्वभुग्विभुः' ही तीन पदें क्रमशः त्याने जगदुत्पत्ति-स्थिति-निरोध-रूप वैविध्य प्रकट करतात. सहस्रसंख्येच्या गणितासाठी त्यांना मग तुम्ही एक गणा की अनेक म्हणा ! परमेश्वराचें वैभव, सगुण या निर्गुण कसे हि पहा, अपरंपार आहे.

२४१. सत्कर्ता
परमात्मा हा समदृक् असल्यामुलें तो सर्वांचा सत्कर्ता आहे. सर्वांचा समादर करणारा आहे. त्याला कोणी उच्च नाहीं कोणी तुच्छ नाही, सर्व समान आदरणीय आणि प्रिय आहेत, घाणीत लोळणाऱ्या कृमींत आणि कमलासनस्थ ब्रह्मदेवांत तो समानच विराजमान आहे. तो " साधुष्वपि च पापेषु " समबुद्धि आहे. तो रामांत आणि रावणांत समान रमला आहे. त्यामुळे तो सत्कर्ता होय, जो सर्वत्र स्वतत्त्वच पाहतो, आत्मरूपच पाहतो, तो कुणाचा अनादर करील ? त्याला अनादरविषयच नुरला. असा जो अननादर-विषय केवळ स्वदृक् परमात्मा तोच एक सत्कर्ता होय. इतर सारे द्वंद्वमोहमूढ होत. म्हटलेंच आहे :

इच्छा-देष-समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप || गीता ७-२७


ते परमेश्वराप्रमाणे असे म्हणू शकत नाहीत की " समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः", " न हि सशरीरस्य सतः प्रियाप्रिययोः अपहतिरस्ति " ज्याला देहाभिमान आहे तो प्रियाप्रियांतून सुटू शकत नाहीं परमात्मा विदेह आहे. त्याला देहाभिमान नाही, त्यामुळे तो कोणत्या हि देहीचा समानच समादर करतो. तो सर्व घटांत एक आत्मसूर्यच प्रतिबिंबित झालेला पाहतो. त्यामुळे अनादर-विषयच त्याला कोणी उरत नाही. जिकडे पहावे तिकडे त्याला एकच एक परमादरणीय आत्मतत्त्व दिसतें, आणि त्यालाच तो भजतो. "नमः पुरस्तात् अथ पृष्ठतस् ते । नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । " म्हणून तो आपल्याला नमस्कार करीत सुटतो. दुसरें कांहीं तो करूंच शकत नाही. आत्मा अनात्म्याला जाणतच नाही. तो सर्वत्र स्वरूप पाहून नमस्कारीत जातो, सत्कारीत जातो. म्हणून तो सत्कर्ता होय.

२४२, सत्कृत
परमात्मा सर्वत्र सत्कर्ता आहे, पण सत्कार-विषय हि त्याहून वेगळा नाही. ज्याचा सत्कार होतो, जो नमस्कारिला जातो, तो 'हा' देह वा देहाभिमानी नव्हे तर 'तो' आहे, तद्विलक्षण परमात्मा आहे. मूर्ख लोक नमस्कार आपल्याला केला जातो वा केला जात नाही असें मानून हृष्ट वा रुष्ट होतात. शंकराने दक्षाला नमस्कार केला नाही म्हणून तो रुष्ट झाला, तेव्हां नमस्कार कोणाला करतात तें शिवाने सतीला समजावून सांगितलें.

प्रत्युद्गम-प्रश्रयणाभिवादनं विधीयते साधु मिथः सुमध्यमे ।
प्राज्ञैः परस्मै पुरुषाय भूयसे गुहाशयायैव न देहमानिने ॥


परस्परांना थोरांकडून उत्थापन स्वागत अभिवादन दिलें जातें तें देहाभिमानी जीवांना नव्हे, तर त्यांच्या हृदयांत विराजमान असणाऱ्या त्या परमात्म्याला होय. दक्षाचा देहाभिमान चूर करण्यासाठी आणि त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी शंकराने त्याला नमस्कार केला नाही. इसापच्या गोष्टींतील देवमूर्तिवाहक गाढवाची हि अशीच गैर समजूत झाली होती. इतके सगळे लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत असें वाटून तो फुगला आणि ताठला. तो हलेच ना, तेव्हा त्याला बडग्यांचा मार पडला आणि त्याचा ताठा व गैरसमज दूर होऊन तो चालू लागला. सारांश सत्कृत होणारा हा देहाभिमानी "मी" नव्हे किंवा त्या देहाला माझा म्हणणारा स्वामित्ववादी हि नव्हे, तो तर निर्मम निरहंवादी सर्वांतर्यामी परमात्माच होय. जी वस्तु स्वतःच अनित्य आहे आणि दुःखरूप आहे तिचा सत्कार कोण करील ? तिचे भजन अनाठाई होणार. म्हणूनच म्हटले आहे गीतेत : "अनित्यं असुखं लोकं इम प्राप्य भजस्व माम् " आणि म्हणून विवेकी ज्ञाते त्याचाच सत्कार करतात, त्यालाच भजतात.

२४३. साधु
अज्ञान, तज्जनित विकार, विकार प्रेरित दुराचार जो साधतो म्हणजे मारतो तो साधु. अथवा ज्ञान, तज्जनित दैवी गुणसंपदा आणि दैवी गुण-प्रेरित सदाचार जो साधतो म्हणजे संपादितो तो साधु. साध्धातूच्या या दुहेरी अर्थानि साधु शब्द व्युत्पाविला जाऊ शकतो. परमात्मा हा ज्ञानस्वरूपच असल्यामुळे तो सहजच साधु होय, परमात्म्याला जी गोष्ट सहज-सिद्ध आहे, ती जीवांना प्रयत्नपूर्वक साधावी लागते. असा जो काया वाचा मनें प्रयत्न करतो तो यतिच साधु होय. सिद्ध या अर्थाचा साधुशब्द भविष्यद्-वृत्तिवाचक आहे. याच अर्थाने पुढील गीतावचनांत साधुशब्द आला आहे:

अपि चेत् सुदुराचारो भजते मां अनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः ॥ गीता ९-३०


अग्नीत जो पडला तो ओला सुका कसा हि असो अग्निसात होणार यात शंका कसली ? परमात्मा हा केवढा मोठा ज्ञानाग्नि म्हणावा ? त्यांत ज्याने झेप घेतली, तो तद्रूप झाल्याशिवाय कसा राहील ? त्याच्यांतील हीण जळून खाक होईल आणि सोने देदीप्यमान होऊन स्वे महिम्नि प्रतिष्ठित होईल.
परमात्मा निर्दोष आणि सर्वगुण-निधान असल्यामुळे साधु होय, त्याचा नारदासारखा स्वाभाविक भक्त तो हि साधु होय. आणि वाल्मीकीसारखा त्याचा सम्यग्-व्यवसित भक्ताचा भक्त हि साधु होय. परमात्मा वस्तुतः साधु होय. सिद्ध स्वभावतः साधु होय. साधक प्रयत्नतः साधु होय.

२४४. जह्नु
भानु सानु जानु या शब्दांप्रमाणे जह्नु हा शब्द नु प्रत्ययान्त दिसतो. पण कोणत्या धातूला लागतो आहे तो ? जह हें रूप हा धातूच्या अभ्यस्त रूपाचा अंश असू शकेल. तसे मानल्यास जलु म्हणजे त्यागशील असा अर्थ होतो. जनु राजा परम धार्मिक म्हणजे यज्ञशील होता. त्याच्या यज्ञाला गंगा वाहून घेऊन जाणार असें विसतांच त्याने तो सारा प्रवाह पिऊन टाकला आणि भगीरथाच्या विनवणीवरुन मागाहून तो सोडून दिला, अशी पुराण-प्रसिद्धि आहे. ह्या मुळे गंगा ही जनु कन्या झाली. तिला जाह्नवी हे नाम पडले. पण परमात्म्याचे स्वतःच जाझ्नु नाम असल्यामुळे त्याच्या पादोदक-प्रवाहाला जाह्नवी हे नाम पडलें असें कां न म्हणावें ? विष्णु-चरण म्हणजे आकाश, त्यावर ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून म्हणजे मेघांतून सांडलेलें पाणी तें विष्णु पादोदक गंगा होय. तें हिमालय-स्वरूप शिवाने आपल्या शिरी धारण केले आणि त्याच्या शिवालकांतून पुढे तें हरिद्वार ऊर्फ गंगाद्वार येथे बाहेर पडलें आहे. अशा प्रकारें गंगा भागीरथी ही त्यागमूर्ति आहे. त्यागांतून तिचा जन्म आहे, त्यागच तिचे स्वरूप आहे. त्यागांतच तिची परिणति आहे. "चरथ भिक्खवे चारिक बहुजन-हिताय बहुजन-सुखाय" हा बुद्धाचा संदेश वस्तुतः भारताचा आहे. हिमालयाचा आहे, गंगेचा आहे. गंगा सतत तो आचरीत आहे. उपदेशीत आहे. बहुजनहिताय बहजनसुखाय ती हिमालयाचे गुरुगह्वर आणि घनगहन सोडून जनपादातून विहार करीत चालली आहे. हजारों वर्षे झाली, तिच्या ह्या परार्थ-जीवनांत खंड पडला नाही.
जह्नु शब्दाची दुसरी हि व्युत्पत्ति संभवते. 'जं जनं ह्नुते, तिरोभावं नयति, इति जह्नुः । ' परमात्मा हा समस्त व्यक्त सृष्टीला कल्पान्ती गिळून टाकतो, म्हणून तो जह्नु होय.

२४५. नारायण
नारायण म्हणून कोणी व्यक्ति नाही. तो एक आदर्श आहे. तो नराचा, नर-समाजाचा परम आदर्श आहे. मानवाच्या ज्या नवनव्य भव्य दिव्य आकांक्षा, त्यांच्या हिमालयाचें जें सर्वोच्च शिखर, तें म्हणजे नारायण होय. परमात्मा कसा आहे, हे एक त्या परमात्यालाच ठावें. परंतु त्याच्याविषयी मानव-चिंतनाची उडी जिथवर गेली, तो टप्पा म्हणजे नारायण होय. त्यामुळे नराचा, नरसमाजाचा तो खास देव आहे. त्यामुळेच त्याला नारायण हें नामरूप प्राप्त झालें. तो देवाचा मानवासाठी झालेला आद्यावतार होय. 'नरस्य सामम्यं नारं तदेव अयनं यस्य स: नारायणः । ' अशी आहे नारायणाची व्युत्पत्ति. मानव मात्राच्या हृदयांत ज्या नवनव्य भव्य दिव्य आकांक्षांचा क्षीरसागर भरला आहे. त्याच्या तळाशी मुळाशी जो पहुडला आहे तो "तो" नारायण आहे. त्याच्याच सत्तेनें मानव उड्या मारीत चालला आहे.
नार आणि अयन या दोन शब्दांपासून नारायण हा सामासिक शब्द बनला आहे हे उघड आहे. त्यांतील पहिला शब्द हा किमर्थक आहे, त्याबाबत अनेक अटकळी कवीनी केल्या आहेत. त्यांपैकींच "आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नर-सूनवः" ही एक अटकळ आहे. आप म्हणजे नार हा अर्थ कसा झाला ? ह्या व्यक्त सृष्टीचे मूळ अव्यक्त असलें पाहिजे आणि अव्यक्ताच्या खोलीतच ह्या व्यक्ताचे अक्षर बीज वा कंद असला पाहिजे, अशा विचारसरणींतून नारायण शब्द निघाला आहे. आणि पृष्ठभागावरील सर्व दिसते, तसें जळांत लपलेलें, समुद्राच्या तळाशी छपलेलें दिसत नाही. म्हणून अव्यक्त-वाचक नार म्हणजे पाणी असा अर्थ केला गेला. व्यक्त लोक-पद्म अव्यक्त जलाशयांतून वर आलेले असून त्याचा जलाशयाच्या तळाशी असलेला अव्यक्त व अक्षर पुरुष हा कंद होय. हाच आशय पुढील लोकांत अभिप्रेत आहे

नारायणः परो ऽव्यक्तात् अण्डं अव्यक्त-संभवम् ।
अण्डत्यान्तस् त्विमे लोकाः सप्तदीपा च मेदिनी ॥


नारदशब्दांत हि नार हा शब्द आला असून तो नर-संपादित समस्त वित्ताचा, ज्ञान-धनाचा, वाचक आहे. नार म्हणजे नरतत्त्व, आदर्श तत्त्व होय.

२४६. नर
नर आणि नारायण ही अभेद्य जोडी आहे. जिथे नारायण आहे तिथे नर आहेच, आणि नर आहे तिथे नारायण आहेच. जिथे साधक आहे तिथे साध्य आहेच, आणि साध्य आहे तिथे साधक हि आहेच. ही दोन काठीच्या दोन टोकांसारखी असून ती काठीच्या रुपाने एकच होत. मनुष्य चेंडू फेकतो आणि आपणच धावत जाऊन तो पकडतो, त्याप्रमाणे नर आपले ध्येय नारायणरूप कल्पितो आणि त्या ध्येयाला साधनबळाने आत्मसात् करीत जातो. त्याचा हा स्वभाव आहे. चालतो मनुष्यच, पण त्याला चालवितो त्याचा मुक्काम. त्याप्रमाणे साध्य हें साधकाला आपली सारी बुद्धि-शक्ति एकवटून प्रयत्नवान् करीत असते. नर हे पूर्व रूप आहे, नारायण हे उत्तर रूप आहे दोन्ही परस्परसापेक्ष असल्यामुळे ती युगल वा यमल होत. या जोडीत प्रमुख कोण ? साध्य या दृष्टीने नारायण श्रेष्ठ आहे. पण तो नराहून वस्तुतः वेगळा नाही. नरच नारायण होतो. आणि ह्या साधक-दृष्टीने बीजभूत नरच महत्त्वाचा आहे. बीज असेल तर झाड होणार ! आत्मा आहे म्हणून परमात्मा आहे. आत्म्यामुळेच त्याची उपलब्धि होते. म्हणून ज्ञानदेव म्हणतातः " ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान " ह्या मुळेच गीतेत म्हटले आहे

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं अमृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ गीता १४-२७


नराचे म्हणजे आत्मतत्त्वाचे सर्वमूलत्व प्रतिपादणारा हाच आशय विनोबांनी असा गाइला आहे.

धर्मासि आधार सुखास मी चि ।
ज्ञानासि आधार मोक्षास मी चि |
प्रेमासि आधार ऐक्यास मी चि ।
तुझाहि आधार माझाहि मी चि ॥


असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः ।
सिध्दार्थः सिध्दसंकल्पः सिध्दिदः सिध्दिसाधनः ॥२७॥


२४७. असंख्य
संख्या म्हणजे गणना, संख्या म्हणजे ज्ञान, कोणत्याहि गोष्टीचें सम्यकु ख्यान वा ज्ञान त्या गोष्टीच्या अवयवांची, गुणांची, परिणामांची गणना करूनच होत असते. म्हणून सांख्य म्हणजे संख्याबद्ध वा सम्यक् संपूर्ण ज्ञान होय. परंतु परमात्मा हा अशा प्रकारे ज्ञान-विषय होत नाही. तो निरवयव असल्यामुळे त्याच्या अवयवांची, निर्गुण असल्यामुळे गुणांची, आणि अविक्रिय व अद्वितीय असल्यामुळे त्याच्या परिणामांची गणना करणे शक्य नाही. त्यामुळे तो असंख्येय होय. ज्या वस्तूंचे संख्यान होतें गणना होते त्या वस्तु परिच्छिन्न असतात. त्या दुसपासून वेगळया पडलेल्या असतात. त्यामुळे त्यांची मोजदाद होते. परंतु आकाशप्रमाणे जे एथून तेथून एकच एक आहे त्याची गणना काय करणार ? त्याला एक म्हणणे सुद्धां गैर वा गौण होय. कारण, जिथे मोजायला मुळी वावच नाही, तिथे एक तरी कसें गणायचे नि म्हणायचे ? बरे म्हटलेंच एक, तर त्या एकचा अर्थ संख्यावाचक न होतो केवलत्व-वाचकच होणार. असंख्येचा हाच आशय आहे. परमात्मा असंख्येय आहे, म्हणजे तो केवलस्वरूप आहे. त्याला एक म्हणता येत नाही, त्याला नैक म्हणता येत नाही. त्याला आहे म्हणता येत नाही, त्याला नाहीं म्हणतां येत नाही. कारण त्याच्याविषयी कोणते हि विधान करणे म्हणजे त्याला मर्यादित करणे होय, विशिष्ट करणे होय, पण तो तर आहे केवल निर्विशेष. असंख्य पदाने हेच निर्विशेषत्वरूप केवलत्व प्रतिपादिले आहे.

२४८. अप्रमेयात्मा
असंख्येय आणि अप्रमेय दोन्ही समानार्थकच आहेत. तथापि असंख्येय पदानें परमात्म्याचे वागविषयत्व प्रति-पादिले आहे तर अमेयात्मा पदानें त्याचे अचिन्त्यत्व, मनोऽविषयत्व सूचित केले आहे, असें म्हणता येईल, " यद्वाचा अनभ्युदितं, येन वाग्अभ्युद्यते । तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदं उपासते ॥ यन्मनसा न मनुते येन आहुर्मनो मतम् । तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदं उपासते ॥ "असे वाङ्मनाच्या आटोक्यापलीकडचे म्हणून परमात्मतत्त्व वर्णिले आहे. तें केवळ वाङ्मनाच्याच पलीकडचे नाही तर, बुद्धीच्या हि पलीकडचे आहे. ते 'बुद्धे: परत:' म्हणून हि म्हटले आहे. " न तद् भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः " या गीतावचनांत डोळा, मन आणि वाणी याच तीन प्रमाणांचा उल्लेख केला असून त्यांचा तिये लाग नाही असे म्हटलें आहे. यांनाच प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द प्रमाणे म्हणावयाचे. माणसाजवळ बाह्य ज्ञानसाधने म्हणजेच प्रमाणे डोळा, चित्त आणि शब्द हीच तीन आहेत. यांच्या पलीकडे ज्ञानसाधन नाहीच. आणि ही तिन्ही डोळा प्रत्यक्ष प्रमाण, मनोबुद्धि अनुमान-प्रमाण आणि वाक शास्त्र प्रमाण या आत्मतत्त्वाच्या बाबतींत लंगडी ठरतात. ती तिथे फारशी चालू शकत नाहीत. आणि म्हणूनच त्याला अप्रमेय म्हटले आहे. तथापि तो स्वसंवेद्य असल्यामुळे स्वतःप्रमाण होय. त्याच्या सिद्धीसाठी कोणत्याहि बाह्य प्रमाणाची गरजच नाही, तो स्वानुभूत्येकमान आहे. स्वतःप्रमाण आहे. केवल स्वानुभूति हेच त्याचे एकमात्र प्रमाण होय.

२४९. विशिष्टः (अविशिष्टः)
नानावर्णाकृति-गुण-कर्मवान् जीव आणि जगत् हीं विशिष्ट होत. त्यांच्यातील प्रत्येक दुसऱ्याहून वेगळा आणि विशिष्ट आहे. एक क्षण दुसऱ्या क्षणासारखा नाही. तसा एक कग हि दुसऱ्या कणासारखा नाही, इतकेच नव्हे तर तो या क्षणी आहे तसा दुसऱ्या क्षणी नाही, असें हें जगाचे वैभव आहे. परंतु परमात्मा त्याहून विशेष आहे. तो काल होता, तो आज आहे आणि उद्यां हि तसाच राहणार आहे. त्यांत कसली हि विक्रिया नाही, परिवर्तन नाहीं, विशेष नाही. अविक्रय कूटस्थता हाच त्याचा विशेष आहे. सर्व जग एकीकडे आणि तो एकीकडे, जगानें कोणते हि लक्षण त्याला लागावयाचे नाही. असा तो अगवी लोकविलक्षण, मुलखावेगळा आहे. हा त्याचा आगळेपणा हेच त्याचे वैशिष्टय.
परमात्म्याला आपण विशिष्ट म्हटलें खरें, पण खरें पाहता तो अविशिष्टच आहे. विशिष्ट होण्यांत काय विशेष आहे ? प्रत्येकच विशिष्ट आहे. परमात्याचा विशेष हा की तो तसा विशिष्ट होत नाही. विशिष्ट होणे म्हणजे मर्यादित होणे. त्याचे व्यावर्तन करणारा असा तद्व्यतिरिक्त दुसरा काही पदार्थच नाही. तो सर्व आहे. सर्व तो आहे. " आत्मैवेदं सर्वम् । नेह नानास्ति किंचन " असें असल्यामुळे तो परमात्मा अविशिष्टच होय, केवल-स्वरूप होय. "पानी तेरा रंग कैसा ? जिसमें मिलाया वैसा.” पाण्याला रंग नाही, अथवा सर्वच त्याचे रंग आहेत, तसा परमात्मा हा निर्विशेष विशेष होय. विशेष-शेष अशेष होय.

२५०. शिष्टकृत्
शिष्ट महणजे शासन. तें जो करतो, तो शिष्टकृत होय. परमात्मा हा सर्वांना शासन लावतो, शिक्षण देतो. कशा प्रकारे देतो तो हे शिक्षण ? सर्वांच्या हृदयांत अन्तरात्मख्याने यहून. तो सर्वान्तर्यामी, सर्वान्तरात्मा "गुरुणा गुरुः" आहे. विवेकवाणीनें तो सर्वांना सदसताचें ज्ञान देत असतो. ' हैं बरें, हें कर; हें वाईट, हे करू नको ' असे तो सतत मार्गदर्शन आणि शासन करीत आहे.
तोच अन्तर्यामी बाहेरून हि आई, बाप, गुरु, प्राज्ञ आणि राजा यांच्या रूपाने जीव-जगताचें शासन करीत आहे. " अस्ति व्यायान् कनीयस उपारे" जिथे धाकटा आहे, तिथे त्याच्याजवळ वडील हि आहेच. जिथे शिष्य, तिथे गुरु हि आहेच. जिथे अज्ञ, तिथे प्राज्ञ हि आहेच. जिथे प्रजा, तिथे प्रजापति हि आहेच. अशा प्रकारें तो समस्त जीवांचें शासन करीत असतो. आई, बाप, गुरु, प्राज्ञ आणि राजा हे सगळे आपल्या अधीन असलेल्यांना स्वभावतःच मार्गदर्शन व शासन करीत असतात. हा त्यांचा स्वभाव, त्यांची वत्सलता, हितैषिता, प्रजा-पालन परमात्म्याने त्यांच्या हृदयांत ठेवूनच दिले आहे. वासराला पाजल्याशिवाय गाईला राहवत नाही. बाळाला आगीपासून निवारस्याशिवाय आईला राहवतच नाही. शिष्याला ज्ञान भरवल्यावांचून गुरु-माउली राहूच शकत नाही. प्रजेच्या हिताचे कायदे करणे व त्यांचे पालन करतून घेणे हे राजसत्तेला, मायबाप सरकारला चुकत नाही. अशा प्रकारें परमात्मा हा अशिष्टांना शिष्ट करतो, शिष्टांना विशिष्ट करतो आणि विशिष्टांना निर्विशिष्ट करुन " स्वे महिम्नि " प्रतिष्ठित करीत असतो. त्याचें हें अनुशासन आणि शासन आहे, म्हणून जीव वृजिनार्णवांतून वांचून यथाकाल परमानंदास पात्र होतात. प्रत्येक जीव त्या शिव-पदवीस पात्र होईपर्यंत परमात्म्याचे शासन हे असेंच चालू रहायचे आहे.

२५१. शुचि
शुचि म्हणजे निर्मल, निर्लेप, निरंजन. परमात्मा निर्मल आहे खरा, पण तसा निर्मल नव्हे की जसे एखादें वस्त्र निर्मल असतें. वस्त्र मळते आणि धुतल्यावर परत तें निर्मल होते. परमात्मा हा तसा निर्मल नाही. तो अंबरासारखा शुचि आहे. अंबर म्हणजे आकाश मुळी मळतच नाही. तें सदैव निर्लेप राहून शुचि आहे. ढगांचे भारे आणि अंधारांचे ढिगारे त्यांत प्रत्यहीं येतात नि जातात, परंतु त्यांच्या योगें तें मळत नाही की चळत नाही. ते निष्पंक आणि निष्कंप राहते. परमात्मा हा तसा शुचि आहे. त्यावर सृष्टीची पटले येतात नि जातात. पण त्यांचा लेप त्याला लागत नाही. परंतु हे हि म्हणणे बरोबर नाही-'शिवतां होतसे ओवळे. पण त्याला मुळी कोणी दुसरा शिवायलाच नाही तर तो ओवळा होणार कसा ? म्हणून तो सदैव सोवळा आहे, शुचि आहे. त्याला शुचि म्हटल्या जाणाऱ्या आकाशाची हि उपमा जमायची नाही. कारण ति द्वैत आहे. आकाशांत आकाशेतर येतें जातें. इथे दुसरे येणारे जाणारें कांहीं नाहींच. त्यामुळे त्याच्या शुचितेला आकाशाची उपमा जुगत नाही. खरोखर तो निरुपमच आहे. अग्नि शुचि म्हटला जातो, पण तिथे धूर आहे; गंगा पवित्र म्हटली जाते, पण ती पावसाळ्यांत गढूळ होते. त्याच्या शुचितेची बरोबरी कोणी करूच शकत नाही. 'देऊ काशाची उपमा । दुजी तुज पुरुषोत्तमा ?' तो आपला आपल्यासारखा आहे. " तो एकवट एकला, रचला ना वेंचला, आदि-अंती संचला, अनन्तपणें । तो निर्शून्य निरुपम, निरंजन निर्वाण, ते दशा पितळेचे होन, केवीं पावती ?" म्हणेन मी.

२५२. सिद्धार्थ
"सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधन !"
हा सर्वध श्लोकार्ध वा द्विपदी सिद्धिविषयक आहे. त्या पैकी सिद्धार्थ हे प्रथम नाम होय. विष्णु-सहस्रातील नामें व्यक्तिवाचक नाहींत, गुणवाचक आहेत. म्हणून सिद्धार्थ है जरी भगवान बुद्धाचे एक नाम असले तरी में तें बुद्ध ह्या व्यक्तीचे वाचक नाही. पण बुद्धाला तरी सिद्धार्थ हें नाम कुठून ठेवले ? ते ज्याच्या वरून ठेवलें तोच सिद्धार्थ परमात्मा होय. थोराचे नांव पोराला, पूर्वजाचे वंशजाला ठेवले जाते. परमात्मा पूर्वजांचा हि पूर्वज व थोरांचा थोर आहे. म्हणून सर्व नामें ही वस्तुत: त्याचीच होत. सिद्ध आहेत सर्व अर्थ ज्याचे, तो सिद्धार्थ होय. सर्व अर्थ, सर्व काम आत्मभिन्न आहेत. जे जीव आत्मभिन्न अर्थाची कल्पना नि कामना करतात, ते असिद्धार्थ होत. आणि त्यांचे ते अर्थ अनर्थ होत. ते सिद्धहि झाले, तरी असिद्धच म्हटले पाहिजेत. कां की ते अनित्य आणि असुखच आहेत. म्हणून शंकराचार्य म्हणतात"अर्थमनर्थ भावय". लौकिक अर्थाने हि परमात्मा सिद्धार्थच आहे. कारण जो जो अर्थ तो मनांत आणतो तो तो घडून येतो. त्याने मनांत भूः भुव: स्व: आणलें आणि उच्चारिलें त्याबरोबर हे भूर्लोक भुवर्लोक स्वर्लोक निर्माण झाले. ह्यालाच ईक्षण असें पारिभाषिक नांव आहे. तो जेव्हां त्यांचे संहरण इच्छितो तेव्हा हे संपूर्ण विश्व त्याच्याठाई, जललहरी जलांत विलीन हाव्या तसे, विलीन होते. अशा प्रकारें तो कर्तुं अकर्तुं अन्यथाकर्तुं समर्थ असल्यामुळे त्याला सिद्धार्थ म्हणतात.

२५३. सिद्ध-संकल्प तत्त्वतः सिद्धार्थ तोच व्यवहारतः सिद्धसंकल्प होय. अल्पज्ञ आणि असमर्थ जीव हा सदैव असिद्ध-संकल्पच असावयाचा. त्याने एखादा संकल्प केला आणि तो सिद्धीस गेला असे दिसले, तर त्याचे कारण तो त्याचा संकल्प नसून सर्वज्ञ आणि सर्व समर्थ परमात्म्याचा तसा संकल्प असतो हे होय, परमात्याचा संकल्प जीवाला कळू शकत नाही. कुठं आगगाडीत दैववशात् चढलेल्या मुंगीला ती गाडी कुठे जायची आहे याचे जसें ज्ञान होणे शक्य नाही, तसें जीवाचे आहे. परंतु तरी देखील साखरेचा कण तिला कुठे तरी मिळतो आणि ती म्हणते, 'पहा, मी कण शोधून काढला !' जीवाचे संकल्प आणि सिद्धि ही तशी आहेत. कुठे तरी परमात्म-संकल्पाच्या रेषेवर जीवसंकल्पाची रेषा पडते आणि तिथे जीवाला सिद्धि मिळाल्याचा आनंद होतो. परंतु ही सिद्धि वस्तुत: आपली नसून परमात्मसंकल्याची आहे, हे तो समजू शकत नाही. घड्याळांतील प्रत्येक चाक आपल्या ठिकाणी फिरत असते परंतु ते स्वतंत्र नसते. त्याला गति चालक चक्राकडून मिळत असते. हें तें चाक जाणत नाही. त्याप्रमाणे जीव ईश-परतंत्र असून ईशाच्या चालकत्वाचा प्रत्यय त्याला जाणवत नाही आणि तो आपण स्वतंत्र आहों असें समजून नाचत असतो. पण त्याचा सूत्रधार वेगळाच असतो. ज्यांना ह्या सूत्राची आणि सूत्र-धाराची ओळख पटली, ते बुध म्हणजे तत्त्वज्ञ ईश्वर-परायण होऊन राहतात आणि "Thy will shall be done." "करिष्ये वचनं तव" म्हणतात. सिद्धि-असिद्धि त्यांना समान होते.

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ गीता १०-८


असे तत्त्वज्ञ भक्त संकल्प, साधन, सिद्धि सर्व ईश्वरार्पण करुन मोकळे होतात. अशाच्याच विषयी म्हटले आहे:

भोक्तारं यज्ञ-तपसां सर्वलोक-महेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ गीता ५-२९


२५४. सिद्धिद
संकल्प, साधन, सिद्धि हा समग्र प्रवाह परमात्माच आहे. हे या द्विपदींत प्रतिपादिले आहे. इथे तो सिद्धिदाता म्हटला आहे. कोणत्या हि संकल्पाची प्रेरणा ईश्वरापासूनच मिळते. त्या संकल्पाला सफल हि तोच करतो. मध्यंतरी साधक म्हटला जाणारा खरोखर निमित्तमात्र असतो. तसेच साधक जे साधन करतो तें क्रिया आणि करण हि तोच असतो. तिथे विजातीय काही नाही. फलदातृत्व ईश्वराचे आहे. फल जीवाधीन नाही. जीव फक्त कर्माचा अधिकारी आहे. हेच निमित्तमात्रत्व होय. आंब्याला फळ लागायचे तें यथाकाळच लागते. अर्थात् फळप्रद, सिद्धिद, काळ झाला. तसे जीव हे सर्व त्या फळवृक्षासारखे आहेत. जेव्हां ईश-कृपा होते तेव्हांच त्यांचे संकल्प सिद्ध होतात, त्यांचे जीवन सफल होतें. व्यावहारिक वा पारमार्थिक कोणती हि सिद्धि ही जीवाच्या अधीन नाही. तो किती हि प्रयत्न करो, जेव्हां परमात्मकृपा होईल तेव्हांच सिद्धि मिळायची. फळ झाडालाच लागते, तशी सिद्धि ही प्रयलान्तींच मिळायची. पण प्रयत्नामुळे मिळेल असें नाही. म्हणून म्हणतात भगवान् :

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन् सर्व भूतानि यन्त्रारुढानि मायया । गीता १८-६१

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात् परां शान्ति स्थान प्राप्यसि शाश्वतम् ॥ गीता १८-६२

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया । गीता १८-६३.१


२५५. सिद्धि-साधन
सिद्धि-साधन म्हणजे सिद्धि साधणारा. परमात्मा सिद्धि देतो, पण मिळवतो कोण ? जो सिद्धि मिळवतो तो हि परमात्माच असतो. कोण अनीश सिद्धि मिळतं शकेल ? ते काही सामान्य जीवा, नाना' उपाधि आधि व्याधि यांनी पदोपदी बेजार झालेल्या जीवाचें, काम नहे ! तेथे पाहिजे जातीचे, एरा गबाळाचे काम नोहे ! म्हणून जो सिद्धि साधतो तो साधक हि परमात्माच होय. तें अनात्म्याचे वा अनीशाचे काम नव्हे. ही सिद्धि अर्थात परम सिद्धि मोक्ष होय. त्याच्यान विषयी म्हटले आहे :

"मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः ॥ गीता ७-३


" कर्ता या अर्थी सिदि-साधन हे पद विवरिले, तसे करण या अर्थी हि ते विवरितां येईल. सिद्धीचे जें जें साधन ते हि तो परमात्माच आहे. परमात्मा हा ज्ञानस्वरुप आहे, प्रेम-स्वरूप आहे, सेवास्वरूप आहे. म्हणून त्याचे साधन हि ज्ञान, प्रेम, सेवा हे आहे. हे साधन जो अनन्यभावाने करीत राहतो तो परमात्म्याला साध्य करून घेतो. ' नदीमुखेनैव समुद्रमाविशेत् ' हाच न्याय इथे हि लागू पडतो. ज्ञान, प्रेम, सेवा यांच्या जोडीला निरोधाचें कां नाहीं नांव घेत तुम्ही ? असें जर कोणी म्हटलें, तर त्याला माझे उत्तर हें की निरोध चित्ताचा होतो, तें समुद्रस्थानीय परमात्याशी संगम पावत नाही. संगम जलाचा जलाशी होतो, आत्म्याचा परमात्म्याशी होतो. विजातीयाचा संगम होत नाही. शिवाय ज्ञान प्रेम सेवा यांच्या योगें चित्ताचा परोक्षरीत्या निरोधच होत असतो. त्या निरोधाचें जें अपरोक्ष शास्त्र त्याचे नांव योग होय. परमात्मा ह्या दृष्टीने निरोध-स्वरूप हि म्हटला जाईल. अनात्म्याला तिथे मज्जाव आहे. अशा प्रकारें परमात्मयोगाची साधनें हि परमात्माच होय. कारण तद्व्यतिरिक्त दुसरे काही त्याला प्राप्त करू शकत नाही. हिरकणीच हिऱ्याला काढू शकते.

वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः ।
वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः ॥२८॥


२५६. वृषाही
वृषाही हें नाम 'वृष + अहन् + इन् ' अशा प्रकारें व्युत्पादिले जाते. धर्मरूप दिवसांचा स्वामी' असा त्याचा अर्थ लावला जातो. धर्मख्य दिवसाने सर्वांचे कर्तव्य पथ यथावत् प्रकाशिले पातात. जो तो आपआपल्या कर्तव्यमागनि जाऊन इष्ट स्थळी पोचू शकतो. हा धर्म प्रकाशक दिवसनाथ परमात्मा होय. म्हणून तो वृषाही म्हटला आहे.

चतुष्पाद वृष जसा गोधनाची सृष्टि करून तद्वारा सुख-समृद्धीची वृष्टि करीत असतो तसा चातुर्वर्ण्यधर्म, चतुराश्रमधर्म लोकसंग्रह करून सुखसमृद्धीची, चारी पुरुषार्थांची, वृद्धि करीत असतो म्हणून त्याला वृष म्हटले आहे. किंबहुना धर्माचे लक्षण वृषाच्या म्हणजे वृषभाच्या ठाई आढळते म्हणून त्याला वृष म्हणू लागले. धर्म अव्यक्त तत्त्व आहे, वृष व्यक्त वस्तु आहे. व्यक्तीचे मूळ अव्यक्त मानले पाहिजे. तद्विपरीत नव्हे, वृषाही ऐवजी वृषाहिः असा पाठ घेणे शक्य आहे. सर्प अदृश्यरूपानें संचरला आहे. सर्प जसा धनाचे रक्षण करतो तसा धर्म हि आत्मधनाचे रक्षण करीत असतो. सर्पाचा अपराध केल्यास तो डंखतो तसा धर्माचा अपराध केल्यास, त्या बाबतींत प्रमाद केल्यास,तो हि पाप-फळ देऊन डंखतो. धर्म हा असा अहिवत् निग्रहानुग्रह-समर्थ असल्यामुळे त्याला वृषाहि म्हणता येईल. अहिराज अनन्त ऊर्फ शेष हा या भूगोलाला धारण करुन आहे तसा धर्म हा प्रत्येक वस्तूला धारण करून आहे म्हणूनहि त्याला वृषाहि म्हणावयाचे.

२५७. वृषभ
सिंह आरण्यक पशूत श्रेष्ठ, तसा ग्राम्य पशूत वृषभ श्रेष्ठ होय, पुरुष-सिंह तसा पुरुष पुंगव म्हणजे पुरुष-श्रेष्ठच. दोहोंत काही फरकच करायचा झाल्यास सिंह-पद पराक्रमवाचक आहे, तर वृषभपद धुरंधरत्ववाचक आहे, असे म्हणता येईल. एक रणवीर तर दुसरा सभावीर होय. परंतु इथे निरुपपद प्रयोग आहे. त्यामुळे परमात्मा हा वृषभ म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे असा आशय, तो सर्व क्षेत्रांत सर्व-श्रेष्ठ आहे. तो समरविजयी तसा सभाविजयी हि आहे. योद्धा आणि मुत्सद्दी दोन्ही तो आहे. सर्वच क्षेत्रांत तो सर्वातिशायी आहे. म्हणून तो वृषभ.
सिंह हा पंचानन आहे. चार नखर पंजे आणि दंष्ट्राराल मुख ह्या पांचांच्या योगे तो महाभयंकर झाला आहे, नखदंतायुध असल्यामुळे तो नुसता शक्तिमान्च नाही तर युवितमानहि आहे. सशस्त्र हि आहे. बैलाजवळ शिंगे आहेत, पण ती नस-दतांसारखी प्रभावी नाहीत. त्यामुळे तो नुसता बली आहे, शक्तिमान् आहे, युक्तिमान् नाही. पण बैलाची शक्ति विधायक आहे. सिंहाप्रमाणे विघातक नाही. बैल शिवाचं वाहन झाला आहे. अर्थात् तो कल्याणावह आहे. शेती गोपालन आणि वाणिज्य या सर्व कल्याणांचा तो आधार आहे. या सर्वांचे तो वाहन आहे. त्याच्या आधारें मानव जातीची संस्कृति आणि सभ्यता घडली आणि चढली आहे. म्हणून परमात्म्याला वृषभ म्हणण्यांत एक विशेष औचित्य आहे. वृषभ धेनूंच्या ठाई वीर्य-वृष्टि करुन गोधनाची सृष्टि करतो, तसा परमात्मा विश्व-जनक असल्यामुळे हे तो वृषभ होय.

२५८. विष्णु (वृष्ण)
विष्णु नाम पूर्वी अनेकदा येऊन गेलें आहे. इथे तें पुनः कां ? शंकराचार्य यास्काचार्याचा हवाला देऊन 'विष्णुर् विचक्रमणात्' अशी नवी व्युत्पत्ति इथे देतात. आणखी हि कांहीं देता येईल. परंतु हे पद चुकीचे वाचलें जात आहे. हे पद विष्णु ऐवजी वृणु तर नाही ना ? मागील संपूर्ण श्लोकार्ध सिध्धातुने सिद्ध झाला आहे: सिद्धार्थः सिद्ध-संकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः' तसा हा श्लोकर्ध वृष्धातुन्र सिद्ध झालेला आहे: "तृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः " त्यांत मधेच विष्णु कसा शिरला ? तो वृष्णुच अपेक्षित आहे आणि हे अनुमान जर योग्य असेल तर वृष्णु हा नवा पाठ स्वीकारावा. धात्वर्थानुसार त्याचा अर्थ होईल वर्षणशील. परमात्मा हा सतत कृपेचा वर्षाव करीत आहे. ती कृपा समजण्याची पात्रता मात्र पाहिजे. ती पात्रता म्हणजे अढळ विश्वास, परमात्मा मंगलस्वरूप आहे. त्यापासून प्राप्त होणारे सर्व काहीं मंगलच आहे. त्याने सुख दिले तर ती कृपा आहेच, पण दुःख दिले तर ती शिकवण आहे असे समजून भक्त सुदामवत सदैव आपला विश्वास जतन करीत असतो. भक्ताच्या जीवनांत सुखदुःखांचा विनियोग केवळ आपला विश्वास दृढ करण्याकडेच होतो. सुखाने तो शिथिल होत नाही किंवा दुःखाने विरत होत नाही. पेचखिळ्याचा प्रत्येक पेच ज्या प्रमाणे कसला असतां, खिळयाला अधिक घट्ट रोवतो त्याप्रमाणे सुखदुःखाचे पेच वा आटे भक्ताला आपल्या ईश्वरावरील विश्वासांत अधिक खोल आणि भक्कम रोवत असतात. ऊन-पावसाच्या योगे जसें पीक वाढत जाते तसा त्याचा विश्वास सुखदुःखांच्या योगे वाढत जातो.

२५९. वृषपर्वा
वृष म्हणजे धर्म वर्णाश्रमादि वा दर्शन-श्रवणमनन-निदिध्यासनादि ज्याला पोचायची पर्वे म्हणजे सोपानपदे आहेत तो वृषपर्वा, अथवा धर्म हीच ज्याची पेरें आहेत तो प्रतिपर्व-रसोदय परमात्मा वृषपर्वा म्हणावा. परमात्मा हाच मानवाचा परम पुरुषार्थ आहे तो मानवाला क्रमाक्रमाने चढून गांठावयाचा आहे. अनेक पारमिता पार करुण बुद्धाने बुद्धत्व गांठले. राजर्षि भरतप्रमाणे "बहूनां जन्मनां अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते" असें गीताहि म्हणतेच आहे. साधनेचे हे जे टपे तेच धर्म होत व त्याच पायऱ्या, दैवी गुण, स्थितप्रज्ञाची भाषा म्हणजे व्याख्या, ज्ञानलक्षणे हे सर्व ते टप्पे होत, पायऱ्या होत. या पायऱ्या जो चढून जाईल तो त्या परात्पर परमात्म-मंदिरांत यथाकाळ पोचेल.

आत्मदर्शन धर्मजीवन-वृक्षाचे उत्तर फळ होय त्याचा लाभ जेव्हां धर्मजीवनाचा वृक्ष पर्वश: वाढून परिणत होतो तेव्हांच होतो. जो वठला आहे, ज्याला अंकुर फुटून तो स्कंध-शाखा-प्रशाखा-पत्र-पुष्प क्रमाने कळला नाही, तो त्यास पात्र नाही. म्हणून परमात्मा हा वृषापर्वा म्हणावयाचा. फळाची पदवी मागील सर्व पायऱ्या क्रमशः चढल्याशिवाय कोणाला हि संपादिता यावयाची नाही. म्हणून तो वृषपर्वा.

आत्मदर्शन ही बैजिक (organic) विकासाची परिणति आहे. ती खनिजरचना ( inorganic) नाही. हे आत्मज्ञान-पर्यवसायी धर्मजीवनाबाबत मात्र खरे आहे. प्रत्यक्ष आत्मज्ञान हे जागरणवत् वा प्रान्तिनिवृत्तिवत् तात्कालिक (instantaneous) आहे, क्रमिक नाही.

२६०. वृषोदर
वृषः धर्मः उदरे यस्य सः वृषोदरः । ज्याच्या उदरीं वृष म्हणजे धर्मवाढत आहे तो वृषोदर परमात्मा होय. जलोदर मेघ जलवृष्टि करतो, वृषोदर परमात्मा भुक्तीमुक्तीची वृष्टि करणारा वृष म्हणजे धर्म प्रसवतो. सर्व धर्म त्याच्याच पोटी जन्मले आहेत. उदर म्हणजे नुसते पोट नव्हे, तर उदर म्हणजे जन्मस्थान, जन्महेतु सोदर म्हणजे ज्यांचे उदर अर्थात् जन्मकारण म्हणजे जननी-जनक समान आहेत ते. तदनुसार वृषोदर म्हगजे वृषाचे धर्माचे उदर म्हणजे उत्पत्ति स्थान असलेला परमात्मा होय. अशा प्रकारे वृषोदर हा समास बहुव्रीहि किंवा तत्पुरुष हि मानता येईल. अर्थात तादृश फरक नाही.

औचित्य हें धर्माचे स्वरूप आहे. एकच पुरुष पुत्र पति पिता गुरु स्वामी राजा या नात्याने वेगवेगळा वागत असतो. त्या त्या नात्याने त्याला जें वागणे योग्य तो त्याचा धर्म होतो. अर्थात सर्वत्र औचित्य पाळणे हा त्याचा धर्म झाला. या सर्व प्रसंगांत तो भिन्न भिन्न भूमिका अंगीकरीत असतो, तथापि त्याची मूल भूमिका त्याला विसरता कामा नये. ती त्याची मूल भूमिका कोणती ? मानव ही का त्याची मूल भूमिका ? मानवव्यवहारापुरती ती आहे असे म्हणता येईल. परंतु वास्तविक मूल भूमिका त्याची आहे आत्म्याची. तो आत्मा आहे. कोणत्या हि प्रकारे त्याने त्या भूमिकेशी अतिचार करता कामा नये, बेईमान होता कामा नये, असा जो पुरुष आत्मनिष्ठ झाला तो मग दुसऱ्या कोणत्याहि धर्माचा बांधला राहत नाही. भागवतांत म्हटल्याप्रमाणे:

"तो देवता पितर वा ऋषि आप्त भूतें,
ह्यांचा न सेवक नृपा न ऋणी असे तो ।
सर्वात्मना शरण जो चरणांस गेला,
सांडून सर्व शरणप्रद थीहरीच्या ॥ '


२६१. वर्धन
वर्धन म्हणजे वाढविणारा. ही जीवाजीव समस्त सृष्टि, हे सर्वतोनन्त विश्व कोण वाढवतो आहे ? परमात्मा. परमात्मा नाना नामरुपें घेऊन सृष्टींचा सारखा गुणाकार करीत चालला आहे. सोन्याचे असंख्य दागदागिने घडत आहेत, वाढत आहेत. आणि सोनेच ते घडवीत आणि वाढवीत आहे. तृण गुल्म लतौषधि वृक्षवनस्पतिरूप ही समस्त उद्भित्सृष्टि मृत्कण वाढवीत असतो. तसा तो परमात्मा चित्कण या सर्वाश्चर्यमय आणि सर्वतोनन्तरूप सृष्टीला वाढवीत आहे. तें विश्ववटोदर चिद्बीज या संसारवृक्षाला वाढवाढ वाढवीत चालले आहे.

वर्धकि म्हणजे वाढी वा सुतार. तो जसा एकाच लांकडांतून नाना विसरे तासून काढतो तसा परमात्मा हा हे विश्वरूप विसरे वाढत म्हणजे घडत आहे. म्हणून तो वर्धन म्हणजे वाढी म्हटला आहे. दोन्ही शब्दांत एकच वर्ध्‌ धातु आहे आणि त्याचा अर्थ हि एकच आहे. वस्तुतः लाकूड वा उपादान वाढते पण वाढत नाही. ते जेवढेचे तेवढेच राहते पण वाढतें तें नामरुप होय. नवीन आकार नवीन नांव तयार होते. नांगर, वखर, डवरा,जूं, चाक, शिवळ, बाहुला, बाहुली इत्यादि. परमात्मा हि तसाच उपादानभूत आत्मतत्त्वाचीच नाना रूपे आणि नामें तासून तयार करीत चालला आहे. म्हणून तो वर्धन म्हणजे वाढी म्हणावयाचा.

अशा प्रकारे वर्ध्‌ म्हणजे वाढणे, वाढवणे आणि घडणे या दोन्ही अर्थानी परमात्मा हा वर्धन आहे.

२६२. वर्धमान
वर्धन म्हणजे वाढवणारा, तर वर्धमान म्हणजे वाढणारा. वाढवला जाणारा. विष्णुसहस्रांत नामांच्या अनेक जोडया आलेल्या आहेत. त्या साम्य, वैषम्य, विरोध, पूरण, कार्यकारण इत्यादि नाना भाव लक्षून आलेल्या आहेत. सदर वर्धन आणि वर्धमान ही जोडी हि तशीच आहे. इथे कार्यकारण भाव लक्षित होतो. कारण रुपाने परमात्मा वर्धन आहे तर कार्य रूपानें तो वर्धमान संसार आहे.

वस्तुतः ब्रह्मांत वाढघट कांहींच होत नाही. तें कूटस्थ आहे. परंतु संसारधर्माचा आरोप त्यावर होतो आणि तें वाढतें वा वाढवतें म्हटले जाते. रज्जूवर सर्पाचा आरोप होतो आणि मग ती वस्तु मनोहर वा भयंकर म्हणून नाना धर्मानी युक्त संबोधिली जाते. परंतु वस्तुतः ती त्या बर्‍या वाईट कोणत्याही धर्माच्या आरोपांतून मुक्त आहे. कारण ते सर्व गुणधर्म परकीय आहेत.

या नामरुपात्मक जगाला ब्रह्माचा परिणाम मानायचे का विवर्त हा जटिल म्हणा की कुटिल म्हणा प्रश्नच आहे. त्याचे उत्तर देतां येत नाही, पण हा अनाख्येय संबंध चतुर लोक सुवर्णकंकणवत् विवर्तरुप आहे असे म्हणतात. सराफाला में निराकार सोनें आहे १००० रपये सोळा किंमतीचे आणि अलंकाराचा सोस करणाऱ्या माणसाला तेंच सोन्याचे अमूल्य करभूषण आहे. आकार मिथ्या म्हणावा तर निराकार सोन्याने मनगट भूषविता येत नाही आणि कोणा शायलाक सराफाला आकाराला धक्का न लावता आपलें सोनें वसूल करून घेऊन जायची परवानगी दिली तर त्याची काही मात्रा चालत नाही.

कार्यरूपाने संसार म्हणून परमात्मा वर्धमान आहे तसा कारण रुपाने ब्रह्म म्हणून हि तो वर्धमान म्हणता येईल. कारण ज्याला जन्म नाही तोच खरोखर वाढता आहे म्हटले पाहिजे. ज्याला जन्म आहे तो तर प्रतिक्षणीं घटतच असतो.

बुद्धाने सिद्धार्थ तर महावीराने वर्धमान हें नाम धारण करुन त्या नामाचे भाष्य आपल्या जीवनाने केले आहे.

२६३. विविक्त
विविक्त म्हणजे वेगळा अलिप्त. परमात्मा हा संसाराच घडामोडीपासून कोलाहलापासून पार दूर अलिप्त अस्पृष्ट असा शांत शिव अद्वैत आहे. तो एकवट एकला आहे. सर्गाचा उपसर्ग तिथे नाहीं अद्वैताचे एकान्त साम्राज्य आहे तिथे.

ज्ञानदेवाने याच विविक्त दशेचे वर्णन"कांट्याच्या अणीवर वसले तीन गांव, दोन ओसाड एक वसेचि ना" इत्यादि भारुडांत केलें आहे." जाणत्या बोध, नेणत्या विनोद " अशी आहे ही भारुड-रचना, ज्ञानदेवाची सर्वच रचना अशी उभय-सुखकर व सर्वहितकर आहे. त्यांनी म्हटलेंच आहे "अध्यात्मशास्त्रीं इये | एक अंतरंग चि अधिकारिये | एरु लोक वाक्चातुर्यें होईल सुखिया । "

परमात्मा विविक्त प्रपंचोपशमस्वरूप असला तरी तो उपशम प्रपंचास पचवून आहे. तो प्रपंचोपेक्षी आहे-जसा समुद्र नदीनद-वेग जिरवून अचलप्रतिष्ठ असतो तसा."समुद्री जळचरा भयनुपजे | आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा । " जलचर तरंगांच्या योगे समुद्र क्षोभ पावत माहीं आणि समुद्राच्या योगें जलचर तरंगांना भय वाटत नाही. दोन्ही एकमेकांत ओतप्रोत एकमय होऊन राहतात." अविभक्तं विभक्तेषु " असें तें परमेश्वरी विविक्तत्व आहे.

आवर्त बुद्बुद-तरंगमयान् विकारान् ।
धत्ते जलं सलिलमेव हि तत् समग्रम् ॥


आवर्त-बुबुद-तरंगादि विकारांनी पाण्याचे पाणीपण जराहि मोडत नाही. ती जशी सलिल-लीला आहे तशी विश्व ही सलील-लीला आहे. तिच्यायोगे त्याचे विविक्तत्व मोडत नाही.

२६४. श्रुतिसागर
सागर म्हणजे जलधि हा जसा जलौघमात्राचा निधि आहे, परमायन आहे, तसा परमात्मा हा श्रुतिमात्रांचे सर्व वेदान्तवचनांचे, पर्यवसान आहे, म्हणून तो श्रुतिसागर होय. म्हटलेंच आहे :"सर्वे वेदा यत् पदं आमनन्ति"सर्व वेदांचे नि वेदान्तवचनांचे तात्पर्य ब्रह्म आहे. ब्रह्मापाशी येऊन ती विराम पावतात.

ब्रह्म वा परमात्मा हा सर्व वेदांचें परम आणि चरम गन्तव्य आहे, तसा तो सर्व वेदांचें जगमस्थान हि आहे. सर्व जलवाह मेघ जसे समुद्रोत्थ आहेत तसे सर्व वेद, सर्व वेदान्त परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत. म्हटलेंच आहे :"मत्तः स्मृतिर्ज्ञानं अपोहनं च.”सर्व शास्त्रज्ञान , सर्व विज्ञान, आणि सर्व संशयच्छेदी गुरुमुखी ज्ञान ही सर्व ज्ञाने परमेश्वरापासूनच स्फुरलेली आणि लाभलेली आहेत. त्यामुळेहि त्याला श्रुतिसागर म्हणावयाचें.

श्रुति म्हणजे अपौरुषेय ज्ञान. तें ज्ञान म्हणजे सामान्य लौकिक ज्ञान नहे. त्याचा सागर परमात्म्याहून वेगळा दुसरा कोण होऊ शकेल ? परमात्मा सर्वच ज्ञानांचा सागर आहे. परंतु त्याला श्रुतिसागर म्हणण्यांत विशेष औचित्य आहे. पौरुषेय ज्ञान म्हणजे कामोपहत-चित्त देहबद्ध अल्पज्ञ जीवाचें भ्रांत शबल ज्ञान, अपौरुषेय ज्ञान म्हणजे निरुपाधि नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव परमात्म्याचे निखळ निभ्रांत अनन्त ज्ञान. निखळ ज्ञानाचा बिंदु म्हणजे मुक्त पुरुष आणि सिंधु म्हणजे परमात्मा आणि म्हणून तोच श्रुतिसागर होय.

सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः ।
नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः ॥२९॥


२६५. सुभुज
सु मुष्ठु शोभनाः पूजाः यस्य सः सुभुजः, याचे भुज म्हणजे बाहू चांगले (समर्थ) आहेत तो सुभुज गोय. सु म्हणजे चांगले. पण चांगले म्हणजे तरी काय ? तर चांगले म्हणजे पूर्ण समर्थ. हे सामर्थ्य गुणांनी आणि संख्येने सिद्ध होते परमात्म्याचे बाहू अनंत गुणयुक्त आणि संख्येनेहिअनंत आहेत. न तो सुभुज म्हणावयाचा. 'सहरशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात्' या पुरुषसूक्तात बाहूंचा उल्लेख नाही - 'सहस्रशीर्षा सहस्रपात्' हा साद्यन्तन उल्लेख सर्वावयावी समजावयाचा आहे. सहस्राक्ष पद मधल्या सर्व अवयवांचे वाचक समजावयाचे, परमात्मा ’अनंन्तबाहूदर्वक्त्रनेत्र ’ म्हणून गीतेने त्याचेच उपबृहण केले आहे. भुज पालने" वरुनच भुज शब्द आला आहे. अर्थात भुज म्हणजे पालक रक्षक होय. क्षितिभुज् म्हणजे पृथ्वीपालक, लोकरक्षक होय, लोभक्षक नव्हे. भूज् भोजने भक्षणे" ह अर्थ इथे नाही, अनन्त हस्तांनी परमात्मा विश्वाचे रक्षण करीत आहे. म्हणून रात्री हाडवैर्‍याना हि झोप घेतां येते. अहिनकुल, काकोलूक, करिहरि सगळे चे निश्चित झोपतात ते त्याच्या भुजबळाश्रयानेच होय, पालनाच्या अनुषंगाने दुष्टदमन हि करावे लागते. ते हि पालनच म्हणावयाचे. राजा क्षितीचे पालन असेंच करीत असतो. तो दुष्टांचे दमन करून धर्मनिष्ठांचे पालन करीत असतो. निग्रहानुग्रह मिळून पालन होते म्हणून परमात्मा द्विभुज. एका हातांत असुरनिग्रहकारी गदा तर दुसऱ्या हातांत सुरानुग्रहकारी चक्र त्यों धारण केले आहे. चतुर्भुज, अष्टभुज ही सर्वसमसंख्या-घटित बहुभुजनामें, द्विगुणितसंख्यक म्हणून द्विभुजच समजावयाची. 'निग्रहानुग्रहरूपच ती आहेत. द्विभुज म्हणजे समभुज माणजे सु-भुज.

२६६. दुर्धर
तारा चिमटीत धरता येत नाही. तो फुटफुटून निसटतो. तसें परमात्मतत्व हे वाङ्ममनोबुद्धीच्या परडीत सांपडत नाही. मुश्किलीनेच त्याचे आकलन होने मुश्किलीनेच त्याचे वर्णन होते, म्हणून तो परमात्मा दुर्धर होय. ही दुर्धरताच उपनिषदे आणि गीता यांनी नाना परीनें वर्णिली आहे:

(१) आश्चर्यो वक्ता कुशलोऽप्य लब्धा

(२) आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनं आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥


योगी ध्यानावस्थित होऊन तद्गतेन मनसा परमात्याला हृदयस्थ पाहतात. परंतु ध्यानमागनिं त्याला अशा प्रकारे स्वाधीन करणे कठिण आहे. म्हणून तो दुर्धर होय. ही अव्यक्त अक्षरोपासना कठिण आहे. म्हणून कोणी व्यक्त सगुण साकारची उपासना करून त्याला धरु पाहतात. पण तिथे हि तो अतिसुलभ काही नाही. परमेश्वराविषयीं तें प्रेम, तो जिव्हाळा तर उत्पन्न झाला पाहिजे ना ? निरोधाचा आणि भक्तीचा हि मार्ग अवघड म्हणून कित्येक विचाराचा ज्ञानमार्ग अंगीकरतात. ते ' तत् त्वमसि ’ महावाक्याचा खल करून त्याला गाठू पाहतात. विचाराने सोलसोलून तत्त्व हस्तगत केले पण त्याचा प्रत्यय बाणला पाहिजे ना ? ते कसे व्हायचे ? सारांश, कोणत्या हि यत्नानें तो वश होत नाही. तर 'यमेव एष वृणुते तेन लभ्यः ! ज्यावर तो अनुग्रह करतो त्यालाच तो लाभतो. म्हणून तो दुर्धर म्हटला आहे.

२६७. वाग्मी
वाचाल म्हणजे वायफळ बोलणारा, बडबड्या. वाग्मी म्हणजे वृथा न बोलणारा, सिद्धवाक्, ज्याचा शब्द व्यर्थ असत नाहीं तो वाग्मी होय. "राजा बोले दळ हाले, मिया बोले दाढी हाले" अशी म्हण आहे. राजाज्ञा जशी कधीं वायां जात नाही तसा ज्याचा प्रत्येक शब्द अमोघ असतो तो वाग्मी होय, रामबाण जसा लक्ष्यवेध करुन कृतकार्यच हायचा तसा त्याचा प्रत्येक शब्द इष्ट कार्य करूनच रहायचा. याच नांव अमोघता. याचेच नांव वाग्मिता.

"गच्छतः स्खलनं क्वापि भवत्येव न संशयः !" या न्यायाने जो बोलतो त्याचे बोलणे क्वचित् चुकायचेच. पण ज्यानें मौनच घेतले त्याची चूक होण्याचा, त्याचा बोल फोल होण्याचा संभवच उरला नाही. परमात्मा हा तसा वाग्मी आहे. तो मुळी बोलतच नाही. तो सर्वातर्यामी सर्वसाक्षी अशब्दच सर्व कार्य करवुन घेतो. अर्भक न बोलतांच सर्व आज्ञा करीत असते आणि त्यांची अंमलबजावणी हि तत्परतेने होत असते. त्याहून अधिक समर्थ बोल कोणते ? परमात्मा हा तसा वाग्मी आहे.

अर्थ-प्रकाशन हे शब्दाचे कार्य आहे. ते शब्दापेक्षा अशब्दच अधिक समर्थपणे करतो. शब्द समजास तसा गैरसमजास हि कारण होतो. म्हणून तो असमर्थ होय. बरें, नाना अर्थ प्रकट करणे हे जर शब्दाचे वैभव मानले तर तें मौनांत जितकें आहे तितकें कांहीं शब्दांत असू शकत नाही. मौनं सर्वार्थसाधनम्. म्हणून त्या हि दृष्टीने अशब्दच वीर्यवत्तर आहे. असा उभयथा हि परमात्मा हा वाग्मी होय. वेदासारखी वाणी त्याने निर्मिली म्हणून हि तो वाग्मी.

२६८. महेन्द्र
नागेन्द्र म्हणजे अधरलोक-नाथ, नरेन्द्र म्हणजे मध्यलोक-नाथ आणि सुरेन्द्र म्हणजे ऊर्ध्वलोक-नाथ, पण या तिहींचा हि नाथ कोण ? तर तो परमात्मा. म्हणून तो महेन्द्र म्हणावयाचा. महेन्द्र म्हणजे वैलोक्य-नाथ, विश्व-नाथ.

जलचरांचा स्वामी वरुण होय. भूचरांचा स्वामी यम होय. खेचरांचा स्वामी इन्द्र होय. या तिन्ही त्या त्या लोकांच्या व प्रजांच्या अभिमानी देवता होत. "झषाणां मकरश्चास्मि", "मृगाणां च मृगेन्द्रोऽहम्", "वैनतेयश्च पक्षिणाम्" व्या मकर, महिष आणि गरुड यांचा विभूति म्हणून गौरव केला आहे ती त्या देवतांची लांछनें होत. वरुण हा मकर-ध्वज, यम हा महिष-ध्वज आणि इन्द्र हा गरुड-ध्वज होय. पण महेन्द्र या तिहींचा हि स्वामी. त्याचे लान्छन्, त्याचे ध्वजचिन्ह,कोणते ? तर या तिहींना एकवटून बनलेला मकरमुख सपक्ष महिष उर्फ सिंह म्हणजे ड्रॅगन होय. आपल्या पुराणांत या अद्भुत सत्त्वाचा समावेश करून घेतला पाहिजे.
आपल्या ठाई हे तीन लोक, ही तीन दैवतें देह, प्राण आणि मन द्या तीन रुपानी नांदत आहेत. यांचा जो स्वामी तो सर्वेश्वर परमात्मा महेन्द्र होय.

असे हे अधिभूत, अधिदैव आणि अधि-आत्म आहे. प्रह्लादाने त्या हृदयस्थ महेन्द्राचे असें नमन केलें आहे :

" योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश्च हस्तचरण-श्रवणत्चगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॥ "


२६९. वसुद
जिथे तुमचें धन तिथे तुमचे मन, जिथें मन असे गुंतून राहतें, वसति करुन राहते, तें धन म्हणजे वसु होय. त्यामुळेच त्याला पसू है नाम. लहानपणी मुलाला शंखर्शिपलेच किमती वाटतात आणि तो त्यांचा संग्रह करतो. अर्थात् ते त्याचें धन असते. पण पुढे त्याला ती कांचखंडे तुच्छ वाटतात आणि मग ती तो फेकून देतो • आणि सोनें नाणे गोळा करू लागतो. कोणी ती गुच्छ समजून त्यांचा त्याग करतो आणि कीर्ति मिळवू लागतो. कोणी विरक्त पैसाअडका आणि नावलौकिक यांच्या उद्भ्रांत आणि अशांत जीवनापेक्षा स्वस्थ आणि शांत साधु जीवनाची महती ओळखून त्यांत रमतो. अशा प्रकारें जीवाचें धन सारखें बदलत जाते आणि त्या त्या धनांत त्याचे मन वसत असते. जीवाचा हा नवनवा अभिलाष तो परमात्मा पुरवीत असतो म्हणून तो वसु-द, वसु देणारा, म्हणावयाचा, परमात्मा हा अभिलषित-चिन्तामणि आहे. तो ज्या त्या जीवाला त्याचे त्याचे अभिलषित पुरवीत असतो. तो " चींटी को कन कन का, हाथी को मन का देननहारा" प्रभु आहे. त्या जगाच्या माउलीला सर्व मुलें सारखी आहेत. त्यांचे कोड ती सारख्याच जिव्हाळयाने पुरवीत असते. ती बाळाला खुळखुनुळा देते बालपाला माला देते आणि बाळाजीला ताळा देते आणि त्याची किल्ली. तिला पोर थोर सर्व सारखे. सर्वांचे आर्त ती पुरविते. परमात्मा महाकवीप्रमाणे ओळखतो की

"वैराग्ये संघरत्येको नीतौ भ्रमति चापरः ।
शृङ्गारे रमते कश्चिद् भुवि भेदाः परस्परम् ॥ "


आणि तदनुसार तो सर्वांची आवड पुरवीत असतो. "आवडीचे दान देतो नारायण." म्हणून तो वसुद.

२७०. वसु
"वसुः अन्तरिक्षसद्" अन्तरिक्षसद्जो आसीन आहे तो सूर्य वसु होय, त्याच्यांत हे सर्व विश्व वसले आहे आणि तो या विश्वांत वसला आहे. म्हणून तो वसु. - आम्ही सूर्यमालेतील एका ग्रहाचे निवासी. त्यामुळे तो सूर्य आमच्या जीवनाचा स्वामी आहे. तोच आमचा चराचरांचा उपजीव्य होय. म्हणून तोच आमचा वसु. ज्या द्रव्याच्या बळावर जीव आपली उपजीविका करतो ते द्रव्य त्याचे वसु म्हणावयाचे. सूर्य हा तसा आमचा वसु आहे. परंतु सूर्य हि आपल्या ग्रहमालेसकट ज्या तेजाची प्रदक्षिणा करतो आहे तें तेजच वस्तुतः खरें वसु म्हणावयाचे. आणि असें तें तेज सूर्यासकट आपल्या सर्वाच्या अन्तर्यामांत विराजमान आहे. तो जो आपला अन्तर्याम तोच अन्तरिक्ष होय आणि त्यांत नित्य विराजमान, नित्य आसीन जे तेज, में स्फुरदरूप आत्मतत्त्व, तेच आमचे, आमच्या पृथ्वीचे, पृथ्वी ज्याच्या ग्रहमालेतील एक ग्रह आहे त्या सूर्याचे गौरवामुळे नियन्तृ आहे. म्हणून वस्तुतः तेच एक वसु म्हणावयाचे.

वसु म्हणजे वसणारा, स्थिर राहणारा. परमात्मा तेवढा वसु म्हणजे स्थिर राहणारा असून बाकीचे सारे फिरणारे आहे. मेढ स्थिर राहते आणि गुरांची पांत चालत राहते. तसें ह्या विश्वांत मेढीप्रमाणे ध्रुव म्हणजे वसु एक परमात्मा असून त्याच्या भोवती हे सारे विश्व भ्रमत आहे.

अशा प्रकारें निवास करणारा, उपजीच्य असणारा आणि स्थिर अचल राहणारा म्हणून परमात्मा हा वसु म्हटला. त्याचा प्रतिनिधिभूत, सूर्य आणि त्याचेहि प्रतिनिधिभूत सुवर्ण वसु शब्दाने शब्दित होते. परंतु परम वसु तर तो एक परमात्माच होय.

२७१. नैकरुप
जगांत आपण नाना रूप पहात आहोत. ती सर्व वेगवेगळया पुरुषाची मानिली तर जगांत नानात्व मानावें लागेल. आणि जिथे नानात्व आलें तिथे भय आलें. स्वामित्वासाठी दोन कुत्रे भांडतात, दोन भिक्षुक भांडतात, दोन राजे भांडतात. पण जिथे दूसरा नाहींच तिथे भय कुणाचें ? " तत्र को मोहः कः शोक एकत्वं अनुपश्यतः" तिथे सर्व निर्द्वंद्व ! जग हे तसें निर्द्वंद्व आहे, आत्मरूप आहे हें जो ओळखतो त्याचे भय जाते. जो द्वितीयाची कल्पना करतो, त्याच्या मानगुटीस मात्र भूत बसते. जग जर आत्मरूप आहे तर जगांत दिसणारे नानात्व, हीं नाना रुपे त्या परमात्म्याचीच होत, दुसऱ्या कुणाची नाहीत हें ओघाने आलें. तो नैकरूप आहे, कारण नैकता आम्ही प्रत्यक्षच पाहत आहों आणि एका परमात्म्यावांचून दुसरा कोणी पुरुष इथे नाही, हे हि आम्ही ओळखून आहा. बहुरूप्याच्या खेळांत बहुरूपी एकदा पुरुषाचे सोंग आणतो एकदा स्त्रीचें, एका बाल होतो एकदा वृद्ध, एकदा भिकारी एकदा श्रीमंत. ही सगळी त्या एकाचींच रूपें असतात. म्हणून त्याला आपण बहुरुपी म्हणतो. तसा परमात्मा हा एकसमयावच्छेदे करून असंख्य रूपें धारण करुन नटला आहे. त्याचे हे बहुरूपत्व नैकरूपत्व महणजे सर्वाश्चर्यमय विश्व आहे. ज्याला हे विश्वरूपदर्शन झालें तो समबुद्धि होतो. त्याला मग हा पुरुष ही स्त्री, हा बाल हा वृद्ध, हा धनी हा दरिद्र, हा पुण्यवान् हा पापी असा कसला हि भेद उरत नाही. सर्वत्र तो एक परमात्माच विराजमान आहे असें पाहतो.

ज्याला देवाचें हें नैकरूपदर्शन झालें तो मग विष्णु, शिव, शक्ति, गणेश वा सूर्य हेच एक तेवढे देवाचें रूप असा ग्रह आणि आग्रह सोडून देतो. त्याला सर्वत्र देवाचा सुकाळ होतो.

२७२. बृहद्रुप
बृहत् म्हणजे विशाल. ज्याचें रुप विशाल होत जाणारे आहे तो बृहद्रुप होय, आकाशवत्. आकाश क्षितिजाला टेकलें आहे, तिथपर्यंत आकाश पसरले आहे, असे पाहणाराला वाटते. त्या क्षितिजाजवळ जाऊन पाहू लागावें तर तितकेंच आणखी पुढे सरकलेले दिसते. अशा प्रकारे ते सारखे वाढत जाते, विस्तारतच जाते. त्याची इयत्ता हाती लागत नाही. असे जें ब्रह्म ते बृहद्रुप होय. आणि त्याची छाया असललें हें जग हि तसेंच बृहद्रुप म्हणावयाचे. बृहताचें सारेंच बृहत्. त्याचें नाम बृहत, त्याचे रुप बृहत्, त्याचे कर्म बृहत्, त्याची छायाहि बृहत्. म्हणूनच तें बृहद्रुप म्हणावयाचें. ज्याची इयत्ता आपल्याला सांगता येत नाही त्याला आपण मोठे म्हणतो. एखाद्या वस्तूची इयत्ता सांगतां आली तर ती वस्तु मर्यादितच म्हणावी लागेल. मग ती वस्तु किती का मोठी असेना ! परमात्मा हा केवढा मोठा आहे हे सांगता येणे शक्य नाही एवढा मोठा तो आहे. ते सांगण्यासाठीच ही सहस्राची वटवट आहे. सहस्र वटवट करून आणि शेवटी आपली वटवट बंद करून एकच गोष्ट सांगते आणि ती ही की तो परमात्मा मोठा आहे,खूप मोठा आहे. खूप खूप मोठा आहे. इसापाची बेडकी आणि तिचे पिल्लू यांची गोष्ट इथे आठवते. चरत चरत डबक्याजवळ आलेला एक बैल बेडकीच्या पिलाला दिसतो. त्याने तो प्राणी पहिल्यानेच पाहिलेला असतो. तो आपल्या आईला सांगतो की एक भला मोठा प्राणी आला होता. आई त्याला आपले पोट फुगफुगवून 'एवढा मोठा !' 'एवढा मोठा !' म्हणून विचारते आणि ते पिल्लू आणखी खूप मोठा म्हणत जाते. शेवटी त्या प्रयत्नांत वेडकी पोट फुटून मरते. श्रद्धेचे पिल्लू वाणी मातेला ईश्वराचे महिमान, त्याचे बृहद्रुप दिसल्याचे सांगते आणि वाणी माता तोंड फाटेपर्यत वर्णन करन त्याची इयत्ता सांगू जाते. परिणाम व्हायचा तोच होतो.

२७३. शिपि-विष्ट
शिपिः पशुः, तस्मिन् विष्टः प्रतिष्ठितः धर्मः यज्ञः शिपि-विष्ट म्हणजे शिपींत शिरलेला. पण शिपि म्हणजे काय ? शिपि म्हणजे किरण, शिपि म्हणजे पाणी, शिपि म्हणजे त्वचा. पण ह्यांपैकी एक हि अर्थ मनास येत नाहीं माझ्या. शिपि म्हणजे शिबि वा शिबिका असा अर्थ घ्यावा. शिपिविष्ट म्हणजे मेण्यांत बसलेला. परमात्मा हा प्रकट नाही. तो गुहाशय आहे. "गूढमनुप्रविष्ट " आहे. तैल तिळांत आहे, वरुन दिसत नाहींच, पण तीळ फोडला तरी हि ते दिसत नाही. परंतु वैज्ञानिक प्रक्रियेने पिळून त्यांतील तेल प्रकट करता येते. परमात्मा हि तसाच सर्वांच्या अंतर्यामांत व्याप्त आहे, आविष्ट आहे. वरून तो दिसत नाहीच, पण अंतर्याम फोडला तरी नारळाच्या डोलासारखा वा बदामाच्या बीसारखा तो हाती लागत नाही.तो तर

" सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा, सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ।
अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुनो, यंपश्यन्ति यतय :क्षीणदोषा: ||"


या उपनिषद्-वचनांत म्हटल्याप्रमाणे सत्याच्या तपाने लाभतो. स्वान्त पुरांत स्वमहिमावृत असलेली आत्मसंदरी त्याच्याच द्रष्टीला पडते ज्याच्या गळ्यांत ती माळ पालरो. आणि ती कोणाच्या गळयांत माळ घालते ? तर जो कामरुप दुरासद शत्रूला ठार करून विजयी होतो त्याच्या, जो निरिच्छ होतो त्याच्या. "न मागे तयाची रमा होय दासी । " अज्ञान-जनित वासनामूलक देह-देहान्तरस्य अन्तराय साधक सत्यदर्शन-जनित असंग वा अनासक्ति-मूलक देहदेहान्तरनिरोधरूप स्वास्थ्यानेंदूर सारतो तेव्हा तो शिपिविष्ट भेटतो. " तस्य एष आत्मा विवृणुते तनु स्वाम्"

शिपि म्हणजे किरण असा अर्थ घेतल्याप्त शिपि-विष्ट म्हणजे प्रभावलिमण्डित. सूर्य हा जसा सदैव किरणमाली होय तसा परमात्मा हा सदैव आपल्या आत्मतेजाच्या प्रभावळीने मण्डित असतो. म्हणून तो शिपिविष्ट. शिपिविष्ट म्हणजे खल्वाट, अथवा कुछ हे अर्थ तर इथे केवळ अप्रस्तुतच होत. दोन्ही त्वगुरुग्ण होत. शिपिम्हणजे कातड्याची म्यान असा अर्थ घेतल्यास म्यानेत जसे खा तसा जो देहकोशांत लपटलेला आहे तो देही आत्मा असा अर्थ होईल. शिपि म्हणजे जल असा अर्थ घेतल्यास परमात्मा हा जलस्थानीय अव्यक्तांत लपलेला आहे असा अर्थ.

२७४. प्रकाशन
शिपिविष्ट आणि प्रकाशन ही जोडी वैधर्यान्रम्पनि जोडलेली आहे. शिपिविष्ट म्हणजे गूढ तर प्रकाशन म्हणजे प्रकट. प्रकट होणारा, प्रकट करणारा परमात्मा हा कारणरुपाने गूढ असला तरी कार्यरुपानें सारखा प्रकटतच आहे, प्रकाशतच आहे. बीज भूमिगत होऊन झाकलेले असलें तरी तें अंकुर, पाने, फुले, फळे यांच्यायोगें फांकलेलेंच नाही का ? बीजरूपाने झांकलेले आणि वृक्षरूपाने फांकलेलें. दोन्ही प्रकारे त्याचे वर्णन होईल. आणि परस्परविरुद्ध दिसले तरी ते अगदी यथार्थ होईल. तसेंच ह्या परमात्म्याचे आहे. तो कारणरुपाने शिपिविष्ट आहे, गूढ आहे. तर कार्यरूपानें तो प्रकट आहे, प्रकाशन आहे. कार्य हें सदैव कारणालाच प्रकट करीत असते. पण इथे तर कार्यकारण एक परमात्मा आहे. तो गूढ आपल्या आपल्या गूढतर शक्तींचा शोध घेत त्यांचे प्रकाशन करीत चालला आहे. किती हि प्रकाशन केले तरी गूढ ज्याअर्थी शिल्लकच राहते त्याअर्थी तो सदैव शिपिविष्टच आहे. अव्यक्ताच्या संपुटांत गुप्तच आहे. पण त्याचबरोबर तो व्यक्त हि आहे. एखादा अट्टल चोर असतो तो लपणांत जाऊन लपून बसत नाही, तर सावासारखा सर्वत्र वावरत राहतो. त्यामुळे लपणांत शोध घेऊन त्याचा शोध लागत नाही. जो सदैव तुमच्याजवळच वावरत असतो आणि तिथच मात्र तुम्ही त्याला पाहत नाही. परमात्मा हा तसा अट्टल चोर आहे. तो प्रकटून लपलेला आहे, लपून लपलेला नाही. तो जसजसा प्रकटत जातो तसतसा लपत असतो आणि लपलपून प्रकटत असतो. आतां ह्याला काय म्हणायचें तें तुम्ही पहा. शोधा म्हणून तो लपतो, लपून तुम्हांला तो आलपतो. ह्याला लपणे म्हणावें की प्रकटणे काही कळत नाही. 'समोर की पाठीमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसे ?" आतां ह्याला काय म्हणावें ? झांकलेले का फांकलेले ?

ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः।
ॠध्दः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ॥३०॥


२७५. ओजस्तेजोद्युति-धर
द्युति म्हणजे कांति. हा शारीरिक गुण आहे. तो माणसाच्या वर्णावर अवलंबून नाही. एखादा गौरवर्ण पुरुष निपाणी असू शकेल तर एखादा कृष्णवर्ण हि पाणीदार दिसून येईल. ( प्रायः गौरवर्ण कांतिहीन तर कृष्णवर्ण कांतिमान् दिसून येतो.) ही कांति केवळ आरोग्यावर अवलंबून नाहीं तर व्यक्तिमत्त्वावर आणि कौलिन्यावर म्हणजे जातिवंतपणावर हि अवलंबून असते. देशावर हि म्हणता येईल.

तेज म्हणजे तडफदारपणा, अन्यायासहिष्णुता. स्वतः न्यायनीतिनिष्ठ आणि न्यायनीतीचा कैवारीच तेज प्रकट करतो. ज्याला धर्माची, नीतीची चाड नाहीं तो मनुष्य क्लीब होय-मग तो हिंसक असो की अहिंसक असो. न्यायनीतीच्या प्रस्थापनेसाठी, म्हणजेच धर्मरक्षणासाठीं जो जिवावर उदार होतो तोच वीर होय-मग तो हिंसक असो की अहिंसक, धर्माच्या परित्राणांतच सर्वांचे परित्राण आहे. म्हणून धर्माचं, म्हणजे सत्याचे, म्हणजेच न्यायनीती, रक्षण हा राजधर्म होय. राजधर्म म्हणजे राजवत् सर्वश्रेष्ठ धर्म. सर्व धर्माचा राजाच असा धर्म. हा काही केवळ राजांचा म्हणजे क्षत्रियांचा धर्म नव्हे. तें सत्यपालनाचे, धर्मरक्षणाचे कर्तव्य प्रत्येक मानवाचा धर्म आहे. तो जो पाळतो तो राजाच होय. मग वणनि तो कोणी का असेना. असा जो धर्मगुरु राजा तोच तेजस्वी होय.

ओज म्हणजे सत्त्व, बल. सतीच्या ठाई, धर्मनिष्ठाच्या ठाई, सत्त्व असते. त्या सत्त्वाच्या बळावर तो अग्निदिव्य करतो. सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण होतो. श्रद्धावळसंपन्न पुरुष हनुमंताप्रमाणे संकटांचे सागर आणि अडचणींचे डोंगर पार करतो आणि कृतकार्य होतो. म्हणून म्हटलें : ' बंलं वाव विज्ञानाद् भूयः ' हे सत्त्व,हें श्रद्धाबळ सर्व ज्ञानविज्ञानाहून वरचढ आहे. हेच ओज, उत्तरोत्तर हे पूर्वपूर्वाचं कारण होय. ज्याच्या बाईं ओज आहे त्याच्या ठाई तेज येते. आणि ज्याच्या ठाई तेज आहे त्याच्या ठाई द्युति प्रकाशते. आणि ज्याच्या ठाईं ओज आहे त्याच्या ठाई तेज येते. आणि ज्याच्या ठाई तेज आहे त्याच्या ठाई द्युति प्रकाशते. आणि ज्या अर्थी आत्मा हा सर्वाधार आहे त्या अर्थी तो ओजस्‌ तेजो द्युतिधर म्हटला आहे.

२७६, प्रकाशात्मा
परमात्मा हा प्रकाशात्मा म्हणजे प्रकाशस्वरूप आहे. पण हा प्रकाश भौतिक प्रकाश नव्हे. भौतिक प्रकाश जड आहे. तो आपल्याला स्वतःला जाणायला समर्थ नाही. त्याला जाणणारा जो चित् प्रकाश तोच खरा प्रकाश होय, म्हणून म्हटले आहे

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ गीता १५ - १२


जड जडाला जाणूं शकत नाही म्हणून ते सारे चेतनाधीन होय, चेतन-परतंत्र होय. विजेनें विमानें गाड्या चालतात, शहरें प्रकाशित होतात, पण विजेचे बटन वीज वाबत नाही. तें चेतनाधीन आहे. तसें हे सारे विश्व चेतन परमात्याच्या अधीन आहे. त्याचे केलेलें आहे. त्याने प्रकाशित केलेले आहे. कार्यमात्र कारणाच्या अधीन असते. तसें हें विश्व परमात्मसत्तेच्या अधीन आहे. आणि ती जी परमात्म-सत्ता ती चेतन च असली पाहिजे. कारण त्याशिवाय हे जडचेतन विश्व तदधीन राहू शकत नाही. जड हे चेतनाधीन आणि चेतन हे स्वाधीन असते. म्हणून कारणस्वरूप परमात्मसत्ता ही चेतन आणि स्वतंत्र होय आणि तदधीन हे विश्व अस्वतंत्र होय.

अंधारांत माणसाला दिसत नाही. प्रकाशात दिसते. पण गडद अंधारांत हि रात्रीच्या मत्स्य, कच्छ, सर्प, व्याघ्र, दिवाभीतोलूक दिवसाप्रमाणे व्यवहार करीत असतात. ते कोणत्या प्रकाशाच्या आधारें ? तो प्रकाश हि सूक्ष्मतर भौतिक प्रकाशच असतो असें जड विज्ञानवादी म्हणतील. पण तें आपाततः खरे दिसले तरी तसे नाही. स्थूल सूक्ष्म कोणत्याहि प्रकाशाचें ब्रहण करणारा नेत्र रूप प्रकाश चेतन आहे. त्यामुळेच ते ग्रहण होते. शिवाय नेत्रहीन कोणत्या प्रकाशाच्या आधारें चालतो ? तो प्रकाश भौतिक नाही. महात्मा गांधींच्या अन्त्रपुच्छाच्या शस्त्र-क्रियेच्या वेळी एकाएकी सर्व दिवे गेले, पण शस्त्र-चिकित्सकाने शस्त्रक्रिया पार पाडली ? कोणत्या प्रकाशाच्या आधारें ? तो जो प्रकाश तो चितप्रकाश होय. परमात्मा तत्-स्वरूप आहे.

२७७. प्रतापन
विष्णुसहस्राचा उद्गाता भीष्म आणि लिपिकार व्यास दोघेहि मुनि होते. त्यांच्या मौननिःसृत वाणीत त्यांच्या मनाचे मननाचे अंत:प्रवाह सूक्ष्म दृष्टीला दिसून येतात. नामांचा क्रम कुठे सहज, साभिप्राय, असा द्विविध दिसून येतो. जिथे एकानामापुढे दुसरे नाम का आले याचा कांहीं विशेष हेतु सांगता येत नाही, तिथे तो सहज क्रम म्हणावयाचा आणि जिथे एखादा विशेष हेतु दृष्टीस पडतो, तिथे तो क्रम साभिप्राय म्हणावयाचा, जो क्रम साभिप्राय नाहीं तो सहज असेल,जो सहज नसेल तो साभिप्राय असेल. तिसरा प्रकार संभवत नाही. हे संभवनीय आहे, की एखाद्याला एखादा क्रम साभिप्राय वाटेल, तर दुसऱ्याला तो सहज. परंतु तो त्यालाहि दोहोंपैकी कोणतातरी एकच प्रतीत होईल. हेहि संभवनीय की एकालाच तो एकदा साभिप्राय वाटेल, तर अपरदा सहज. पण त्यालाहि एका वेळी एकच प्रतीति होईल. जसा ज्याचा दृष्टिकोन तसे त्याला दर्शन, अशी वस्तु ही अनेकदर्शनकल्प आहे. म्हणून एकांतवादी न होता अनेकांतवादी व्हावे लागते. विष्णुसहस्र त्याचाच पाठ देत आहे. विष्णुसहस्र म्हणजे एक कॅलेडस्कोपच आहे, चित्रदर्शनच आहे. पहावें तेव्हां नवें दर्शन, कवि म्हणतो " प्रतिक्षण नवी च दे रुचि " मी म्हणतो " प्रतीक्षण नवीच दे रुचि. " असो. इथें या विचाराचे प्रयोजन काय ? प्रयोजन हेच की प्रकाशात्मा.

ह्या नामानंतर प्रतापन हें नाम आले आहे आणि तें साभिप्राय आहे. प्रकाशात्मा म्हणजे तेजःस्वरूप. तेजाचे दोन वा दुहेरी आविर्भाव आहेत. एक प्रकाश आणि दुसरा ताप अथवा उष्णता. प्रकाशात्मा पदानंतर लगेच प्रतापन पद आले याचे कारण हेंच. तेजःस्वरूप परमात्मा प्रकाश हि देतो आणि प्रताप हि (बाहक औष्ण्य हि) देतो. तो ज्ञानशक्तिसंपन्न तसा कार्यशक्तिसंपन्न हि आहे. प्रकाश ही ज्ञानशक्ति होय, प्रताप वा ज्वलन ही कार्यशक्ति होय. परमात्म्याचे हे विविध रूप प्रकाशात्मा आणि प्रतापन या दोन पदांनी प्रदर्शित केले आहे. भौतिक तसें आध्यात्मिक तेजहि द्विविध शक्तिसंपन्न आहे. गीतेंत याच दोन आविर्भावांना श्रीमत् आणि ऊर्जित म्हटले असून ही द्विविध विभूति भगवत्तेजाची आहे असे म्हटले आहे.

२७८. ऋद्ध
ऋद्ध म्हणजे समृद्ध, परमात्मा कशाने समृद्ध आहे ? ऐश्वर्य आणि श्री, धर्म आणि यश, ज्ञान आणि वैराग्य या ऋद्धींनी तो समृद्ध आहे. या षटसंपत्तीलाच भग अशी संज्ञा असून ह्या भगानें जो नित्य संपन्न परमात्मा तो भगवान् म्हटला जातो. परमात्मा हा सचिदानंदविग्रह आहे. 'सत्' पासून ऐश्वर्य आणि श्री, 'चित्' पासून ज्ञान आणि वैराग्य आणि 'आनंद' पासून धर्म आणि यश हे भाव विगुणित झाले आहेत. त्यामुळेच तो परमात्मा ऋद्ध झाला आहे. द्विगुणित झाला आहे. भगवान् म्हटला गेला आहे. परमात्म्याचे जितके म्हणून गुण आहेत ते सारे ह्या तिहेरी मूळ भावांतून अंकुरले आहेत. शम, दम, उपरति, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा ही साधकाची षट्सपत्ति होय. सिद्धाची म्हणजे परमात्याची षट्संपत्ति भग म्हटली गेली तर साधकाची षट्संपत्ति भाग्य म्हटली जावी, ज्याने भगवान् भेटतो तें भाग्य म्हणावयाचे. परंतु ही तर वस्तुतः सिद्धीची सिद्धता झाली, कारण ऋद्धि म्हणजे ऐहिक सुखसमृद्धि, आणि सिद्धि म्हणजे मोक्षसिद्धि होय. भगवान् हा दोहोंचा हि स्वामी आहे. म्हणूनच तो 'भग'-वान् झाला. ऐश्वर्य हे भगवंताचें निजस्व आहे, सर्वस्व आहे. त्याचे धर्म आणि श्री हें ऋद्धिमूल युगल एक अंग होय; ज्ञान आणि वैराग्य सिद्धिमूल युगल दुसरे अंगहोय. पहिले वामांग तर हें दूसरें दक्षिणांग म्हणावयाचें. यश उभयांग-परिपाकरुप फलित होय. त्याची प्रभा होय, वृक्षरुपकानें बोलायचे तर भगवद् वृक्षाचा ऐश्वर्य हा मुलस्कंध होय. धर्म आणि शान या शाखा होत. श्री आणि वैराग्य हा पुष्पसंभार होय. आणि यश हा जनमन मोहून टाकणारा सौरभ होय. आणि देहधारी जीवांच्या दृष्टीने ऋद्धिसिद्धि असा विभाग होतो, परंतु निर्गुण परमात्म्याच्या दृष्टीने दोन्ही एकच.

२७९. स्पष्टाक्षर
ॐ कार हा अस्पष्टाक्षर म्हणता येईल. त्यांत अउम हे तीन, सर्व वर्णांचे प्रतिनिधि, लपले आहेत. अ कंठ्य उ ओष्ठ्य आणि म् नासिक्य आहे. आणि हीच तीन स्थाने कंठ, ओष्ठ व नांसिका आदिमध्यान्तवर्ती असल्यामुळे ती सर्व वर्णाचे प्रतिनिधि होतात. वाणीची हीच तीन पर्यन्तस्थाने होत. त्यामुळे ती सर्ववर्णाची आणि म्हणून वाणीची प्रतिनिधि म्हणावयाची. पण ती ॐकाराच्या नामांत (उच्चारांत) आदि रूपांत (लेखनांत) अशी बेमालूम एकवटली आहेत की ती स्पष्ट दिसून येत नाहीत म्हणून ॐकार हा अस्पष्टाक्षर म्हणावयाचा. अउम स्वतंत्र ऐकायला येत नाहीत, तसें त्यांचे रुपहि वेगवेगळे दिसत नाही. आद्य भाग 'अ' चा द्योतक तर शुंडाकृति भाग 'उ' चा द्योतक आहे आणि तारांकित चंद्रकोर 'म्' चा द्योतक होय. पण ती अक्षरें ॐकारांत बेमालूम एकवटली असल्यामुळे 'न रुपमस्येह तथोपलभ्यते' 'ह्याचे तसें रूप दिसे न येथे' असे म्हणावे लागते. ॐकार हा जरअस्पष्टाक्षर म्हणावयाचा तर स्पष्टाक्षर कोण ? सर्व वर्ण आणि त्या वर्णांपासून निर्माण झालेलें वाङ्मय हें स्पष्टाक्षर होय. सर्ववाङ्मय भगवद्रूप होय. जसें समग्र वृक्षरूप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ती बीजाचीच अभिव्यक्तिमात्र होय. त्याप्रमाणे सर्व वाङ्मय हें वक्त्याची अभिव्यक्ति मात्र होय. म्हणून तो परमात्मा स्पष्टाक्षर म्हणावयाचा. एकमात्र वक्ता तो आहे आणि उक्तमात्र स्पष्टाक्षर वाङ्मय हे त्याचे रूप आहे. इथे कलध्वनि आणि वर्णध्वनि असा भेद करण्याची गरज नाही. पक्ष्यांची चिवचिव ही आम्हाला जरी अव्यक्त, अस्फुट, अस्पष्ट वाटली तरी पक्ष्यांना ती स्पष्टच होय, स्पष्टाक्षरच होय, ज्याचा आशय श्रोत्याला कळतो ते सर्व स्पष्टाक्षर होय. ज्याचा आशय कळत नाही ते सुव्यक्ताक्षर हि अस्पष्टच म्हटले पाहिजे. अशा अव्यक्त गूढ वाणीचा प्रतिनिधि आणि प्रतीक ॐकार होय. म्हणून तो प्रत्येक मंत्रोच्चारापूर्वी म्हटला जातो. उम्कारपूर्वक उच्चारलेलें अक्षर, शब्द वा वाक्य मंत्रम होय. त्याचा अर्थ असा की त्या ॐकारापुढील उच्चारलेली अक्षरें गूढ आहेत त्यांचा अर्थ स्थूल, भौतिक वा व्यावहारिक नसून सूक्ष्म, अतिभौतिक, आध्यात्मिक आहे. ही गूढता तेवढी निरखून ती मंचाक्षरें प्रत्यक्षावगम निर्गुणगर्भ सगुणपर बनविणारा सष्टाक्षर शब्द म्हणजे 'हरि' होय. तोहि संपूर्ण 'अउम् ' प्रमाणे रामकृष्णहरि आहे. म्हणून मी म्हणतो स्पष्टाक्षर म्हणजे रामकृष्णहरि. सत्यस्वरूप राम, चैतन्यस्वरूप कृष्ण आणि आनंदस्वरूम हरि म्हणजे "दुःख, दुःखसमुत्पत्ति, दुःखांचा समतिक्रम । दुःखोपशमगामी तो आर्य अष्टांग मार्ग हि । " प्रतिपादणारा भगवान् बुद्ध. हरि: ॐ मध्ये हा स्पष्टाक्षर मंत्र आला आहे.

२८०. मन्त्र
मन्त्र म्हणजे मननसाधन, मनन करूनच ज्यांचा अर्थ लक्षांत यायचा तें अक्षर, तो शब्द, तें वाक्य म्हणजे मंत्र होय. मननाशिवाय त्याचा गूढ आशय, बाह्य लौकिक शब्दाच्या आणि अर्थाच्या कवचाच्या आंत दडलेला, उकलत नाही, उलगडत नाही. मंत्र मननाचें आलंबन बनून मननास प्रेरणा देतो. मननाने मनावयाचें, चिंतावयाचें मन्तव्यहि तोच होतो, मननक्रिया संपून सहज जपायचे जप्य हि तोच होतो. अशा प्रकारे मननपूर्व, मननगत आणि मननोत्तर मननाला आतून बाहेरून व्यापून राहणारा, जो परमात्मवाचक शब्द मंत्र तो परमात्मस्वरूपच होय. ज्याचा अर्थ प्रकट आहे, तो मंत्र होऊ शकत नाही. तो गूढ असेल, गूढार्थगर्भ असेल तरच तो मंत्र होईल.

परमात्याहून अधिक गूढ आणि गंभीर दुसरे काय असणार ? म्हणून तत्प्रतिपादक शब्द मंत्ररुपच होय. आणि "मौनं चैवास्मि गुह्यानाम्" म्हणून ज्या मौनाचा महागुह्य म्हणून, भगवद्विभूति म्हणून गौरव केला आहे ते मनच मंत्राचा गर्भ होय. ॐ हा सर्वात मोठा मंत्र होय. त्याला "ज्येष्ठराजं ब्रह्मणाम्" म्हटले आहे. सर्व मंत्रांचा, वेदवचनांचा, देवस्तुतींचा तो आद्य आहे, प्रयम आहे, धुर्य आहे, धुरीण आहे. कारण तो सर्व मंत्राहून गूढ आहे, सर्व वेदांहून अधिक बोलका आहे. नखशिखान्त समग्र वर्णन करणाऱ्या सर्व स्तोत्राहून अधिक समग्र आणि परिपूर्ण आहे आणि इतकें हिं असून अतिसक्षिप्त आहे, केवळ एकाक्षर, परमात्मवाचकता, गूढता, परमपावनता, सिद्धिदायकता इत्यादि सामर्थ्यामुळे मंत्र मंत्र म्हटला जातो. वेदाक्षरें अशी मानिली आहेत म्हणून त्यांना मंत्र ही पदवी मिळाली. तसा सामर्थ्यारोप ज्यांच्यावर केला जातो ती अन्य अक्षरे हि पर्यायाने मंत्र म्हटली जातात 'ॐ नमो भगवते वासुदेवाय" अशा सारखीं, सारांश आत्मसाक्षात्कार करून देण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठाई आहे ती अक्षरें वेदाची वा वेदेतर मंत्र होत.

स्पष्टाक्षर आणि मंत्र हीं दोन व्यावर्तक व पूरक जोडनामें होत, जोड कल्पना आहे ती दोन्ही मिळून एक नामहि मानणे शक्य आहे. अमंत्र अक्षर नास्ति.

२८१. चंद्रांशु
स्पष्टाक्षर आणि मंत्र ही दोन नामें ज्या प्रमाणे विरुद्धार्थवाची आहेत तशीच ही पुढील चंद्राशु आणि भास्करद्युति नामें. चंद्र शीतल आहे, आल्हादवकारक आहे. त्याची चंद्रिका सर्वांना सुखावह होते. परमात्म्याचे शील तसेंच लोकवल्लभ आहे. त्याचे अद्वेष मैत्री करुणा इत्यादि गुण लोकवल्लभ आहेत. त्याचे रुप लोकवल्लभ आहे. तें" प्रीतिरसायनं नयनयोर आनन्दनं चेतसः " आहे. डोळ्यांना सुखविणारे आणि हृदयाला आल्हाद देणारे. तसेंच त्याचे नाम, तें नुसतें राम नाही तर रामचंद्र आहे. तो चंद्रवत् रमणीय आहे. नामरूप गुणशील सर्व चंद्रवत्. त्याचे हे सर्व किरण चंद्रिकारूप परम प्रसादवर्षी होत. त्याचे तेज, तेज आहे पण दाहक नाही. तें रसप्रद आहे, पोषक आहे. सूर्यकिरणें रस शोषून घेतात, तर चंद्रकिरणें रसपरिपोष करतात. म्हणूनच म्हटले आहे:"पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः"

असा परमात्मा हा चंद्रांशु आहे. त्याचा प्रत्येक अंशु म्हणजे किरण चंद्रवत्शांति पुष्टि तुष्टि देगारा आहे. म्हणून तो चंद्रांशु म्हणावयाचा. चंद्रांशु म्हणजे सुधांशु. क्षुधातृषारुप रोग हरुन मृत्यूवर मात करणारे द्रव्य म्हणजे अमृत. तें ज्याच्या किरणाकिरणांतून पाझरतें आहे तो सुधांशु होय, चंद्राशु होय. "क्षुधातृषा हरे । निजभाव जेणें तरे | ते जीवन दिधलें बापरखुमादेवीवरें||" असें त्या परमात्मचंद्राचे आणि त्याच्या अमृतकिरणांचे वर्णन ज्ञानदेवाने ठीकच केलें आहे. चंद्राची ही वत्सलता जिथे जिथे प्रकटली आहे तिथे तिथे चंद्रांशु आहे. चंद्रांशुत्व म्हणजे मातृत्व होय, चंद्रांशु म्हणून परमात्मा हा वात्सल्यमूर्ति माता आहे असे इथे सुचविलें आहे. "मातेचिये खांदी बाळ नेगे शीण | भावना त्या भिन्न मुंडाविया" तुकारामाने म्हटल्याप्रमाणे चंद्रांशु परमात्म्याला आपण चकोरवत् भजावें.

२८२. भास्कर-द्युति
भास्करद्युति म्हणजे सूर्यवत् प्रखर तेजस्वी, चंद्रांाशुच्या विरुद्ध म्हणजे प्रतिपक्षी असा हा चंडांशु अर्थाचा शब्द आहे. परमात्मा हा मातेप्रमाणे सर्व "सौम्य" गुणांनी मंडित आहे तसा तो पित्याप्रमाणे भास्कर-गुणांनी प्रखर हि आहे. तो जीवाचे दुर्वर्तन दुर्विचार दुर्वृत्ति सहन करू शकत नाही. अपराधांची तो क्षमा करीत नाही. न्याय्य शासन करतो. तो न्यायनिष्ठुर आहे. मनुष्य मार्ग सोडून चालूं लागला म्हणजे तो त्या कृतीने आपल्या ध्येयापासून आपोआपच दूर जातो. यांतच न्याय आहे, यांतच न्याय्य शासन आहे परमात्मकृत. तुम्हीं निंबाचे बीं । पेरावे व त्याला अमृताचे फळ यावे असें होत नाहीं.

आंबा पेरला तरच आंब्याचे अमृत फळ तुम्हांला मिळेल. असा "करावे तसे भरावें" हा ईश्वरी न्याय आहे. ईश्वरी शासनाचा हा अचूकपणा चुकणाऱ्या जीवांना कडक वाटला तर त्यांत ईश्वराचा काय दोष ? वस्तुतः जीवाच्या, प्रमादशील जीवाच्या दुबळेपणाने ईश्वरी निर्दोष साम्याच्या कृपाळु न्यायावर वा न्याय्य कृपाळुतेवर केलेला तो आरोप आहे. मानवाच्या बाबतींत न्याय आणि दया वेगवेगळे गुण आहेत, परंतु ईश्वराच्या बाबतींत ते तसे वेगवेगळे नाहीत. त्याची दया तोच न्याय आहे, न्याय तीच दया आहे. धर्माचा सरळ राजमार्ग त्याने करून दिला आहे. हा त्याचा न्याय आहे. त्यावरून चालण्याचे वा त्यापासून दूर जाण्याचे स्वातंत्र्य त्याने जीवांना बहाल केले आहे. ही त्याची दया आहे. अशा प्रकारे तो चंद्रांशु तसा चंडांशु आहे. दयाळु न्यायी आहे, न्यायी दयावंत आहे.



॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP