ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

अमृतांशूद्भवो भानुः शशविन्दुः सुरेश्वरः
औषधं जगतः सेतुः सत्यधर्म पराक्रमः ॥३१॥


२८३. अमृतांशूद्भव
अमृतांशु म्हणजे सुधांशु चंद्र. त्याचा उद्भव म्हणजे उत्पत्ति ज्याच्यापासून झाली तो अमृतांशुद्भव परमात्मा होय. समुद्रमंथनातून देवासुरांनी जें मथित काढले त्यांपैकी चंद्र में एक मथित होय. दुधादह्यांत लोणी अव्यक्त रूपांत असतें तें मंथन करून आपण व्यक्त रूपांत आणतों. दुधादह्यांत लोणी असते म्हणून तें प्रकट होते. तसें हें विश्व परमात्म्याच्या क्षीरसागरांत अव्यक्त रुपाने होते ते व्यक्त दशेस आले आहे, अव्यक्ताच्या पृष्ठावर व्यक्त नवनीतवत तरंगत आहे. अग्रत म्हणजे जीवन. तेच ज्याचे अंशु म्हपाजे किरण तो अमृतांशु होय. षोडशकलांनी युक्त असें हें विश्वजीवन हाच अमृतांशु. तो ज्याच्या पासून उत्पन्न झाला तो अव्यक्ताक्षर रूप परमात्मा अमृतांशूद्भव म्हणावयाचा, या विश्वजीवनाला चंद्र म्हणण्यांत हेतु आहे. चंद्रांत ' सतत’ वृद्धिक्षय दिसून येतो. एक कला लोपते दुसरी प्रकटते ती हि लोपून परत नवी येते. याप्रमाणे चयापचय . सतत चालू आहे. म्हणून हे विश्वजीवन अमृतांशु होय. जीवन म्हणून ते अमृत म्हटलें. चयापचयशील म्हणून तें चंद्र म्हणावयाचे. समुद्राच्या पोटांत काय काय साठले आहे ते कळत नाही म्हणून तो अनाकलन, अव्यक्त आणि तो कधी आटावयाचा नाही, घटावयाचा नाही म्हणून अक्षर. चयापचयशील विश्वजीवनाचे उत्पत्तिस्थान म्हणजे अथांग आणि अखूट जलनिधि महणजे अव्यक्ताक्षररुप परमात्मा होय. ह्या अव्यक्ताक्षर महोदधीला क्षीरसागर म्हणावयाचे. कारण तो व्यक्तनवनीत-गर्भ आहे. नीर मंथून क्षीरज नवनीत हस्तगत होत नाही. ही सृष्टि सन्मूलक आहे असन्मूलक नाही. "असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्" ह्या नास्तिकवादाला इथे थारा दिलेला नाही. तो स्वभावतःच खंडित आहे.

२८४. भानु (अभानु )
भानु म्हणजे प्रकाशक." तमेव भान्तं अनुभाति सर्वम् " त्याच्या चित्-प्रकाशाने हे सारे विश्व प्रकाशमान होते. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति या तिन्ही लोकांची प्रतीति ज्याच्या सत्तेने होते तो सर्वसाक्षी परमात्मा विश्वभानु होय, त्या चित्सूर्यापुढे हा स्थूल सूर्य दर्यामे खसखस आहे. म्हणून त्या परमात्मतेजाला कोटिसूर्यसमप्रभ म्हटले आहे. म्हटलें आहे "दिवि सूर्यसहस्रस्य भवेद् युगपद् उत्थिता । यदि भाः सदृशी सा स्यात् भासस् तस्य महात्मनः ॥ " परंतु तेजांच्या ह्या कोटीच भिन्न आहेत. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणून सहस्र, लक्ष आणि कोटि कोणतीहि संख्या तिथें अकिंचित्करच होय. आत्मतेजाची बरोबरी कोणतेहि जड तेज करूंच शकत नाही. खरोखर ते निरुपम आहे, अनुपम आहे, अप्रतिम आहे.

इथें अभानु: असाहि पाठ घेतां येईल तरी अर्थात फरक पडावयाचा नाही. न भानुः प्रकाशक: यस्मात् स अभानु: असा त्याचा विग्रह होईल. भौतिक सूर्य हा भूलोक, अंतरिक्षलोक आणि नक्षत्रलोक सर्वांचे प्रकाशन करतो म्हणून त्याची उपमा चित्सूर्याला दिली जाते :" यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकं इमं रविः । क्षेत्र क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ " परंतु वस्तुतः सूर्य कृत्स्न-प्रकाशक नाहींच. तो केवल पृष्ठभागच प्रकाशित करतो, तो हि संपूर्ण नाहीं. जेवढा तदभिमूख असेल तेवढाच. असा अकृत्स्नप्रकाशक भानु नाहीं परमात्मा, म्हणून तो अभानु होय. परमात्म्याहून अधिक प्रकाशक कृत्स्न-प्रकाशक कोणी नाही म्हणून हि तो अभानु होय.

सूर्य दिवसां प्रकाशतो, चंद्र रात्री. परंतु रात्रंदिवस निरस्त निरुदय अखंड प्रकाशणारा एक परमात्माच आहे. म्हणून तो भानु होय. नित्यभानु होय.

२८५. शशबिन्दु
शशबिन्दु म्हणणे शश-लांछन चंद्रमा, सूर्य आणि चंद्र ही जोडी आहे. पूर्वी हि ती येऊन गेली आहे. पण तिथे ती चंद्रांशु भास्करद्युति अशी गुणवाचक आली आहे. इथे ती प्रत्यक्षच आली आहे. सूर्य ही पराक्रमाची मूर्ति आहे, देवता आहे, चंद्र ही सौंदर्याची मूर्ति आहे, देवता आहे. शारीरिक आणि आंतरिक असा उभयविध ओजोगुण जिथे जिथे प्रकटतो तिथे तिथे सूर्यतत्व जाणावें. जिथे जिथे शारीरिक आणि आंतरिक श्रीगुण प्रकटतो तिथे तिथे चंद्रतत्त्व ओळखावें. प्रखर पराक्रम आणि बुद्धिमत्ता हे सूर्यतत्त्व होय. मनोज्ञ रूप आणि मनोज्ञ गुण, शुचिता प्रांजलता, प्रेमळता इत्यादि, हे चंद्रतत्त्व होय. मानवी जीवन या दोन तत्त्वांनी संपूर्ण होतें. जीवनाच्या नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. या दोन तत्त्वांचे प्रतिनिधि म्हणणे पुरुष आणि स्त्री. ही जोडी होय. दोहों मिळूनच मानवजीवन पूर्ण होते. त्यांत प्रधान आणि गौण असा भेद नाही. हा उभयपप्रधान द्वंद्व समास आहे. ज्याचा ठाईओज आणि श्री ही शंभर टक्के प्रकटतात तो पूर्णावतार होय. तो पुरुषोत्तम होय. आतापर्यंत जितके अवतार होऊन गेले ते सर्व पुरुषच आहेत. परंतु पुरुषच असले पाहिजेत, स्वी असू शकणार नाही, असें नाही. "वन्दे मातरम्" म्हणून आम्ही जिचे नमन आणि स्तवन करतो ती शक्तिदेवी अशी पूर्णावतार आहे, पुरुषोत्तमच आहे.

सूर्य प्रकाशक आहे, तर चंद्र प्रकाशित आहे. म्हणून इथे शशबिंदु नामाने प्रकाश्य विश्व असा अर्थ घ्यावयाचा. भानु हा विश्वभानु आहे तसा शशबिंद म्हणजे चंद्र हा विश्वचंद्र आहे, विश्वरूप प्रकाश्य आहे जे जे चित-तेजाने चेततें, प्रकाशित होतें तें तें सा चित्त होय, चंद्रउप होय.

२८६. सुरेश्वर:
सुखं रान्ति ददति इति सुराः । तेषो ईश्वर प्रभुः सुरेश्वरः ।
जे सुख देतात ते सुर आणि त्या सुरांत श्रेष्ठ तो सुरेश्वर होय. सद्गुण सुखास कारण होतात आणि अवगुण दुःखास. माणन सद्गुण हेच सुर म्हणावे. सर्वच सुख सारखे नसते. कांहीं सुख आभासिक तर काही खरे असते. इथें जें खरें सुख आहे तें घ्यायचे, ज्याचा परिणाम सुखावह तें खरें सुख म्हणायचे. ज्याचा परिणाम दुःखारुप तें सुख नसून सुखाचें सोंग म्हणावें. म्हणून म्हटलें आहे

अभ्यासाद् रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति । गीता १८ -३६.२
यत् तद् अग्रे विषमिव परिणामेश्मृतोपमम् ।
तत् सुखं सात्विकं प्रोक्तं आत्मबुद्धि प्रसादजम् ॥ गीता १८ - ३७


मी देह नसून नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव आत्मा आहे असे भान जसजसें होत जाते तसतसे सुख म्हणजे दुःखनिवृत्तिरूप निजानुभव माणसाला होत असतो. या परम सुखाचा स्वामी तो सर्वांचा स्वात्मा परमात्मा होय. म्हणून तो सुरेश्वर म्हटला आहे. ’ सर्वं परवशं दुःखम् । ' में जें पराधीन तें तें सर्व दुःखरूप होय. दुःखाची अशी व्याख्या असल्यामुळे आणि स्वात्म्याहून अधिक स्वाधीन दुसरे काही नसल्यामुळे विवेकाने अनात्ममात्राचा त्याग हेच परम सुख होय. हाच अलभ्य लाभ आहे. हा ’ सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ' अलभ्य आहे. कारण तो सर्वदा सर्वोपलब्धच आहे. हे लक्षात न येणे हीच माया होय. हीच मोहिनी.

या श्लोकार्धात अमृतमंथनाची आख्यायिका आली आहे असें म्हणता येईल. त्यांतील समुद्र, चंद्र, सूर्य, अमृत आणि मोहिनी रूप धारी सुरेश्वर विष्णु ही बरीच मुख्य पात्र इथे गोळा झाली आहेत. मोहिनीने असुरांना वंचित करून सुरांना अमृतलाभ करून विला आहे. जे विषयसुख मोहिनीना भुलले ते असुर आत्मसुखामृताला मुकले. हेच भगवंताचे मोहिनी रूप होय. जो भगवंताला भजतो तो सुर मोहिनीला न भुलता 'अमृ्तत्त्वाय कल्पते'.

२८७. औषध
औषध म्हणजे रोगहर द्रव्य, जें जें रोगहरण करते, तें तें सारे औषधच होय. अशा प्रकारे पाहूं जाता " नास्ति मूलमनौषधम्" असें म्हणावे लागते. म्हणजे असंख्य रोग आणि त्यांची असंख्य औषधे झाली. पण हा शाखाभेद झाला. मूल तर एकच असले पाहिजे. हे मूल कोणते ? तें तोडले की सर्वच शाखा तोडल्या जाणार. निसर्गोपचारक सर्व रोगांचें गूळ विजातीय द्रव मानतात आणि त्याच्या निष्कृतीचा उपचार करतात. इथें एक रोगमूल शोधलें जातें आणि त्याचा एक मूलोपचार होतो. स्थूलाचें सूक्ष्म, व्यक्ताचें अव्यक्त कारण मानावे लागते. म्हणून भौतिक रोगांचे मूळ आध्यात्मिक वा आंतरिकच होय. ते सूक्ष्म आणि अव्यक्त असे सर्व रोगांचे मूळ कारण उर्फ निदान म्हणजे अज्ञान होय. हे अज्ञान म्हणजे अध्यास होय. अतद् चा तद् वर आरोप. हें हि विजातीय द्रव्यच म्हणावयाचें. हे विजातीय द्रव्य दूर केले म्हणजे स्वगत स्वास्थ्य अनामय स्वरुप, प्रकट होते. म्हणून अध्यास-निराकरणरुप स्वरुपोलब्धि-विचार हे औषध झाले. यालाच तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचे तत्त्वतः ज्ञान म्हणतात, ते जागून ज्ञाता तज्ज्ञ नाहीं होत, तर तद्रूपच होतो. " भवति ब्रह्मैव, न ब्रह्मविद् " विष्णुसहस्रांतील प्रत्येक नाम हें असें तत्त्वदर्शन असल्यामुळे ते औषधच आहे. तें एकच सहस्रावधि रोगांचे निर्मुलन करते मग सहम्रावधि नामें कशाला ? .ती रुचिभेदासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे ईश्वराचे अनन्तत्व द्योतित करण्यासाठी होत, अमृताच्या एका बिंदूनेच अमरत्व प्राप्त होते तरी परमात्मा हा अमृत-सिंधु होय. बिंदूत जेवढें सामर्थ्य आहे, त्यातून सिंधूत अधिक नाही. तो बिंदुच सामर्थ्यांचा सिंधु होय. म्हणून इथे इयत्ता नाही. इथे आहे केवळ केवलता. परमात्मा भवमहारोगाचे औषध असल्यामुळे तो सर्वच रोगांचे औषध होय, प्रधानमल्लनिवर्हणन्यायाने औषध म्हणजे नुसतें रोगहर द्रव्यच नव्हे, तर मुख्यतः औषध म्हणजे ओषधिज अन्न होय. त्याचे औषधवत् सेवन हेच रोग-निवारण आहे. औषधवत् म्हणजे हित मित नियमित.

२८८. जगतः सेतु
सेतु म्हणजे बांध, पाळ "स एष सेतुर्विधरणः, एषां लोकाना असंभेदाय !" हा परमात्मा हे लोक फुटून जाऊं नयेत म्हगून त्यांना एकत्र धरून ठेवणारा बांध आहे, असे म्हटले आहे श्रुतीने. हा बांघ कोणता ? ही पाळ कोणती ? कोणी म्हणतात, काम ही ती पाळ आहे. हे जग कामहेतुक' आहे. कामप्रेरणेने ते टिकून आहे. जीवांचे सर्व संबंध हे काममूलक आहेत. कामपूर्तीसाठी ते एकमेकांना धरून आहेत. दुसरे कोणी म्हणतात, हे जग सर्व आर्थहैतुक आहे. त्याच्या सर्व संबंधांच्या मुळाशी, व्यवहारांच्या मुळाशी अर्थ हेतु आहे. तुमची काममूर्ति ही अर्थाधीन आहे आणि धर्मपूर्ति हि तदधीनच. म्हणून हे जग अर्थमूल आहे, अर्थप्रधान आहे. अर्थच त्याचा सेतु आहे. दुसरे कित्येक धर्मवादी म्हणतात धर्मच जगाचा सेतु आहे. अर्थ काम ह्या प्रेरणा नाहीत असें आम्ही म्हणत नाही. त्या प्रबल नाहीत, असे हि आमचे म्हणणे नाही. परंतु त्या नियामक नाहीत किंवा शाश्वत हि नाहीत. जगांत जे थोर झाले ते कामाढ्य वा अर्थाध्य लोक नव्हते, तर ज्यांनी अर्थकमांना तिलांजलि दिली ते धर्मप्राण ऋषि मुनिच होत. त्यांच्याच चरणी सेठ सावकर आणि राजे महाराजे नम्र होत आले आहेत. धर्मचिंतनासाठीं धनसंपत्ति आणि राजवैभव सोडून वनवासी झाले आहेत. अर्थात् धर्मच लोकांना एकत्र टिकवून धरणारा बांध आहे. धर्म नसेल तर आई मुलाला, मुलगा आईला पोसणार पाळणार नाही. समर्थ असमर्थाला जगू देणार नाही. परंतु जग जगत आहे, कारण धर्म सर्वाचें धारण करीत आहे. अर्थात् जीवनाचा हेतु नि जगाचा सेतु धर्मच आहे. वस्तुतः हे तिन्ही पुरुषार्थच आहेत आणि त्यामुळे ते तिन्ही सेतूच होत. भारा एका बंधाने बांधला जात नाही. त्याला दोन तीन बंध बांधावे लागतात तेव्हां तो नीट बांधला जातो. जीवनाचा भारा हि तसाच एकामागून एक अनेक बंधांनी सूबद्ध झाला आहे. हे तिन्ही पुरुषार्थ काम अर्थ आणि धर्म जगाचे सेतु होत. त्याच्यावर जग टिकत आहे. एक ढिला पडला तर दुसरा आवळून धरतो. जीवनाला तो सुटू देत नाही, फुटू देत नाही. अशा प्रकारें पुरुषार्थमात्र जगाचा सेतु होय, बांध होय. आणि कोणत्याहि पुरुषार्थाचा आश्रय स्वतः पुरुष म्हणजे आत्मा असल्यामुळे अन्ततो गत्वा परमात्मा हाच या जगाचा सेतु होय. सेतु म्हणजे उत्तारण-साधन पूल. म्हणून तो मोक्षस्वरूप मोक्षदाता आहे.

२८९. सत्यधर्म-पराक्रम
सत्यधर्म हाच ज्याचा पराक्रम आहेतो परमात्मा सत्यधर्मपराक्रम होय. सत्यधर्म हा स्वरूपतःच अपराजेय आहे. त्यामुळे त्याचा विरोध करणारा प्रत्येक पराजित झाल्याशिवाय रहायचाच नाही. अशी ही सत्याची सत्ता आहे. सत्याची सत्ता म्हणजेच सत्य-धर्म, जगांत एक सत्याचीच सत्ता चालते. असत्याची सत्ताच असू शकत नाही. मग ती चालणार कशी ? म्हणूनच म्हटले आहे :

" नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस् तत्त्वदर्शिभिः ॥ " गीता २- १६

"सत्यमेव जयते नानृतम्" याचाही आशय हाच. ईश्वर हा सत्यस्वरूप आहे. त्यामुळे त्याचा धर्म म्हणजे तत्त्व आणि पराक्रम म्हणजे कार्यरुपाने होणारा आविष्कार सत्य म्हटला आहे. ज्याचें अव्यक्त आणि व्यक्त रूप सत्य आहे तो सत्य-धर्म-पराक्रम होय.

ईश्वरानें जो आदेश दिला आहे, ईश्वरनिष्ठांनी जो उपदेश दिला आहे तो धर्म होय. त्यांनी त्याच्या सिद्धीसाठी, स्थापनेसाठी जो उद्योग केला आहे तो पराक्रम होय. वेद, उपनिषदें, गीता, मनुस्मृति, भागवत इत्यादि वाङ्मय धर्म होय.परमेश्वराने धर्मसंस्थापनेसाठी असंख्य गृहस्थागृहस्थ सत्पुरुषांसह वेळोवेळी अवतार घेऊन जो आधर्माचा पाडाव आणि धर्माची स्थापना केली अर्थात् दुष्टांना शासन करून धर्मनिष्ठ सज्जनांना सत्तेवर आणलें तो सगळा उद्योग म्हणजे पराक्रम होय. त्या ईश्वरी पराक्रमाचे, धर्मसंस्थापनेचे पोवाडे म्हणजे पुराणे होत. ईश्वराचे नवच अवतार झाले आहेत आणि खरे म्हणजे नवनवच अवतार होत आले आहेत आणि होत राहणार आहेत. परमात्मा हा असा नवावतार आहे. नवाची ही खुबी दशमध्ये नाही शतमध्ये नाहीं नि दशशत मध्येहि नाही. नवेतर कोणत्याच संखोंत नाही ती. तो नित्य नवावतार आहे.

भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः ।
कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥३२॥


२९०. भूतभव्यभवन्नाथ
पूर्वी भूतभव्यभवत्-प्रभु हें नाम येऊनच गेलें आहे इथें तेंच प्रभुऐवजी नाथ शाब्दाच्या फरकाने आले आहे. दोहोंत तसा काही भेद नाही. परंतु नाथ शब्दानें भूत भव्य भवत् हें अनाथ आहे असें सूचित होत आहे. पूर्वी होऊन गेलेलें जीवन, वर्तमान जीवन आणि आगामी जीवन म्हणजेच भूत, भवत् आणि भव्य जीवजात होय. या समग्र जीवनाचा पालक पिता तो परमात्मा आहे. जगांत दोनच कोटी दिसून येतात, एक जीव आणि दुसरी अजीव, दोहोंचा हि स्वामी परमात्मा आहे. जगांत जे धनी आहेत त्यांचे हि धन द्विविध आहे एक स्थावर आणि दुसरे जंगम, जमीनजुमला ही स्थावर मालमत्ता झाली. हयगजरथपदाति ही जंगम मालमत्ता झाली. परमात्माहि तसाच स्थिर-जंगमांचा स्वामी आहे. नाथ शब्दानें जीव-संघाचें, भूतकालीन भविष्यत्कालीन आणि वर्तमानकालीन जीवजाताचे. स्वामित्व सचित होते. प्रभु शब्दाने भूत भव्य भवत् भुवनांचें, अजीवजाताचें स्वामित्व सूचित होते. लोक शब्द जीवजात आणि (भुवनरुप अधिष्ठानजात वा) अजीवजात या दोहोंचा हि निर्देश करतो. अशा प्रकारें परमात्मा हा उभयविध धनाचा धनी आहे. केव्हां केव्हां धन शब्द चराचरांना समाविष्ट करून घेतो, केव्हां केव्हां चर वर्जनपूर्वक केवळ स्थावर वा अचर संपत्तीचा तो वाचक असतो. तसा जेव्हां तो केवळ स्थावर वा अजीव संपत्तीचा वाचक असतो तेव्हा त्याच्या बरोबर जन शब्द जोडला जातो समग्र धनाचा उल्लेख करण्यासाठी. उदाहरणार्थ " सकळ जनधनाचा कोण संतोष आहे " इत्यादि लोकशब्द हि तसाच विशिष्ट वा समग्र अथनिं वापरला जातो. सारांश प्रभु शब्दाने भुवनाधिपत्य सूचित होते तर नाथ शब्दाने जीवजातपालकत्व सूचित होते असें समजावयाचे. भूत भव्य भवत् या कालक्रमांत वर्तमान (भवत्) हा निकट आणि मुख्य म्हणून तो मुख्य अशा उत्तरपदाला जोडून घेतला आहे. आणि भूत व भविष्यत् मागे पुढे राहणारे काळ बाजूला काढले आहेत, असा सूक्ष्म विवेक समजून घ्यावयाचा आहे.

२९१. पवन
पू म्हणजे शुद्ध करणे, स्वच्छ करणे, ह्या धातुपासून पवन शब्द आला आहे. अर्थात् पवन म्हणजे स्वच्छ, पवित्र करणारा. प्राण रक्त शुद्ध करतो. वार्यानें भूस उडून दाणा चोख होतो म्हणून मुख्यतः वार्याला पवन हे नाम मिळाले आहे. वायूने धूळ धूर उडून जाऊन भूमि आणि अग्नि स्वच्छ व उज्ज्वल होतात. वायूच्या योगे आकाश निरभ्र आणि पाणी निर्मल (नि:शैवाल) होते. स्वतः वायु निर्गध आहे. तो दुर्गंध आणि दुःसह सुगंध हि दूर करून सौम्यता आणतो, सर्वांस सुखवितो. म्हणून हि तो पवन होय, पवित्रता-करण होय. दुःखमात्र मल होय, दोष होय. तो दुःखदोष पवन उडवून लावतो. तो स्वतः अनिकेत निःसाङ्गपणे सर्वत्र संचरत राहतो आणि त्यामुळे हि तो पवन म्हटला आहे, पवन म्हटला आहे. तो अनिकेत परिव्राजकच आहे. परिव्रज्येमुळे तो निर्मल राहतो आणि इतरांना हि निर्मल करतो. असा तो उभयतः अन्तर्बाह्य, निर्मल आहे, निर्मल करणारा आहे. म्हणूनच गीतेंत म्हटलें आहे: "पवनः पवतां अस्मि" शोधन करणाऱ्या तत्त्वांत मी पवन आहे. भूमि, जल, अग्नि आणि आकाश ही चारी महाभूते पवित्रता देणारी, शुद्धि करणारी आहेत. परंतु ह्यांना हि विशुद्धि देण्याचे कार्य वायु करतो. म्हणूनच तो भगवविभूति महणून गौरविला आहे. खरोखर तो नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्त-स्वभावच आहे. त्यामुळेच तर ईशोपनिषदांत जीवाची उत्क्रांति ' वायुः अनिलं अमृतम् ’ अशा शब्दांत सूचित केली आहे. त्यांत पवनत्वच मुख्यतः प्रकट झाले आहे. मेल्या देहाचा लेप चिकटा गेला, मग उरला तो केवळ निर्मल निश्चल पवन. तिथे मृत्यूचा लव नाहीं, लेश नाही. म्हणून तोच अमृत. असा हा पवन परमात्याहून वेगळा कोण बरें असणार ? तो परमात्माच पवन होय, जो सर्वांतर्यामी वास करून त्यांना पवित्र करीत असतो. सर्व देह आणि देहकारण हे भुसकट उडवून लावतो आणि त्यांतील दाणा आत्मा वेगळा काढून तो तुमच्या हाती देतो. म्हणून पवन हा परमात्माच होय. परमात्माच पवन होय. .

२९२. पावन
पवते इति पवनः । पावयति इति पावनः ।
पवन म्हणजे पवित्र करणारा तर पावन म्हणजे पवित्र करविणारा. पवन नामाच्या विवरणांत आपण पाहिले की पवन हा भूमि, जल, प्रकाश आणि आकाश यांना निर्मल आणि उज्वल करतो. पण तो त्यांनाच निर्मल करीत नाही. त्यांना इतरांना हि निर्मल करण्याची प्रेरणा देतो. प्रसन्न भूमि आपल्या प्रसन्नतेने सर्वानाच प्रसन्न करते-जीवाना आणि अजीवांना. ते हि उलट आपल्या प्रसन्नतेने इतरांना वा परस्परांना प्रसन्न करतात. सदर प्रमाणेच जल,प्रकाश आणि आकाश यांची प्रसन्नता सर्वत्र परावर्तित होते, प्रतिबिंबित होते आणि सर्वांच्या सार्वत्रिक प्रसन्नतेला कारण होते. असा तो परमात्मा आपल्या स्वाभाविक पवित्रतेने सर्वत्र पवित्रता पेरीत आणि प्रेरीत जातो. म्हणून तो पावन.
उपनिषदांत म्हटलें आहे :" भीषा अस्मात् वातः पवते ". ह्याच्या धाकानें वायु वाहतो. म्हणूनहि तो पावन म्हणजे पळायला लावणारा, धावायला लावणारा होय. ज्याचा जो स्वभाव आहे तो त्याला बदलता येत नाही. गीतेत म्हटल्याप्रमाणे " स्वभावजेन कौत्तेय निबद्धः स्वेनकर्मणा ". प्रत्येक जीव, प्रत्येक भूत आपल्या स्वभावधमनि बद्ध आहे. हा जो स्वभाव तो त्या परमात्म्याचा आदेशच होय, कारण तो परमात्मा सर्वान्तर्यामी आहे. सर्वांचा स्व आहे, सर्वस्व आहे. "ठेविलें अनन्तें तैसेंचि रहावें । चित्ती असों द्यावें समाधान" याचाहि अर्थ हाच आहे. स्वाभाविक प्रेरणा ही ईश्वरी आज्ञा होय. तिच्या विरुद्ध जो वागेल तो ईश्वराचा मत्सर करणारा होय.

ये मे मतं इदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते ते ऽपि कर्मभिः ॥ गीता ३ -३१

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥ गीता ३ - ३२


हा स्वभाव हा ईश्वराचा धाक होय, त्याच्या धाकानें जो तो आपआपल्या स्वभावधर्मानुसार वागत असतो. तसे वागायचा जो इनकार करील त्याचा तो व्यवसाय म्हणजे निश्चय मिथ्या होय. अवश होऊन जे स्वभावानुसरण तोच परमात्म्याचा धाक होय. त्याच धाकाने सूर्य प्रकाशतो, अग्नि जळतो, वारा वाहतो, मेघ वर्षतात, पर्वत स्थिर राहतात. या सर्व क्रियांचा कारक तो परमात्मा आहे, म्हणून पवन हि तो आहे आणि पावन हि तो आहे. तो कर्ता हि आहे आणि करविताहि आहे. मागील पवन आणि पुढील अनल या पदांवरून इथे पावन म्हणजे शुद्धिकारक तीर्थजल असा अर्थ अभिप्रेत दिसतो. जल मृगाला पळवितें म्हणून व तें व्युत्पत्तीने हि पावन तर आहेच, हे सर्व पावनजात परमात्माच आहे. कारण सर्व मळांत अविद्या हा महामल होय आणि तो पळवून लावणारा ज्ञानस्वरूप परमात्माच होय.

२९३. अनल
पवन, पावन आणि अनल हा क्रम वात, कफ, पित्त या व्यष्टिगत आयुर्वेदीय विदोषांची वा समष्टिगत वायु, जल आणि अग्नि या अन्तस्तत्त्वांची आठवण करून देतो. पंचमहाभूतांपैकी हीच तीन पिंडगत वा ब्रह्मांडगत अशी उत्पातकारी तत्त्वे आहेत. आकाश आणि भूमि ही दोन महाभूतें आद्य आणि अन्त्य होत. या दोन अंतस्थ तत्त्वांच्या पुटांत वायु, जल आणि अग्नि ही विरल, तरल आणि प्रबळ अशी तत्वे अंतर्भूत होतात. म्हणून त्यांना मी अंत:स्थ तत्त्वे म्हणतो. ही तत्त्वे आकाशाच्या ठाई बीजरूपाने अव्यक्त तर भूमीच्या ठाई फलरूपाने व्यक्तविली आहेत. या तीन तत्त्वांच्या समाधानावर प्रकृतीचे स्वास्थ्य अवलंबून आहे. आकाश आणि पृथ्वी ही टोकाची तत्वें क्रमशः अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत स्थूल अशी असल्यामुळे ती स्थिप्राय आहेत. परंतु या दोन्ही टोकांमधली तत्त्वे चंचल आहेत. त्यांच्या चयापचयामुळे प्रकृति आंदोलत राहते. म्हणून या तीन अंत:स्थ धातूंची समाहितता वा समधातुता म्हणजेच स्वास्थ्य होय, आयुर्वेदाची तिवई या तीन तत्त्वांवरच उभी आहे. या तीन तत्त्वांवरच त्याची उभारणी झाली आहे. आयुर्वेदांत कफ, वात, पित्त असा स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतर तत्त्वांचा वा धातूंचा क्रम आहे. तरल जल तत्त्वापेक्षां विरल वायुतत्त्व हे उघडच सूक्ष्म आहे आणि त्याहि पेक्षा सूक्ष्म अग्नितत्त्व आहे. ते विरलतर आणि तरलतर आहे. परंतु ह्या तत्त्वांचे आचार्य आविष्कार जल, वायु आणि अन्न होत. ते मात्र द्रवरूप, वायुरूप आणि घनरूप असे परस्परविभिन्न त्रिविध आहेत आणि त्यांत जो क्रम आहे तो यादृच्छिक आहे. त्यांचा क्रमच लावायचा झाला तर अन्न, जल, वायु असा लावावा लागेल. आणि तो स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतर असा म्हटला पाहिजे. इथे अनल झणजे बाह्य ब्रह्मांडगत अग्नितत्त्व आणि आभ्यंतर पिण्डगत कायाग्निरूप पित्त तत्त्व होय. शरीरांत जेन्हां अन्नेन्धन अग्नि प्रदीप्त असतो तेव्हांच प्राणांचें चलनवलन विशेष होतें. तो मंद पडला की प्राण हि मंद पडतो. त्याचें चलनवलन क्षीण होते. म्हणून अग्नि हा अनल म्हणजे अगवान् प्राणवान् म्हटला आहे. ज्या आत्मतेजाच्या आश्रयाने प्राण राहतो ते उघडच अनल म्हणावयाचे. म्हणून परमात्मा हा अनल होय.

भौतिक सृष्टींत जाळाचें फुरफुरणे आणि उन्हाळयांतील वावटळ आणि वादळ अग्नीचे अनलत्व, प्राणकर्षकत्व प्राणप्रचुरत्व सिद्ध करतात.

२९४ कामहा
"कामहा....... प्रभुः" ह्या श्लोकार्धात काम ही जी एक मूल मानवी वृत्ति आहे तिच्या विषयी एकसमग्रदर्शनच आले आहे. काम इष्ट, अनिष्ट आणि मिश्र त्रिविध असू शाकेल. या त्रैविध्यामुळे त्याबाबत त्रिविध विचार संभवतो. इष्ट असेल त्याचा स्वीकार, अनिष्ट असेल त्याचा परिहार आणि मिश्र असेल तिथे इष्टापर्यंत स्वीकार आणि पुढे अस्वीकार वा परिहार.काम ही जर मूल वृत्ति मानली तर तिचा संपूर्ण परिहार म्हणजे निर्मूलन अशक्यच म्हणावें लागेल. म्हणून जे कामाचा समूळ त्याग करु जातात त्यांच्या ठाई अनेक विकृति निर्माण होतात. रोगोपचारांत असें वारंतार अनुभवास येते. जिथे निदान न करता केवळ बाहा रोग लक्षणे दूर करण्याचा प्रयल केला जातो तिथे अनेक नवनवे रोग उत्पन्न होतात. परंतु जिथे रोगाचे निदान करुन मुळांतून रोग नाहीसा करण्यासाठी नवी विकृति निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाते तिथे रोगनिर्मूलत न झाले तरी रोगनिरोध होतो. निदान रोग-नियंत्रण होते. त्यालाच उपचार म्हणावयाचे. तसें न करणे म्हणजे-" मर्ज बढता गया जो जो दवा की " अशी गत ओढवून घेणेच होय. मग काम-हा म्हणजे काय ? तर अनिष्टकाम-हा, धर्मबाह्य कामाचे अनात्मकामाचे निर्मूलन करणारा.

भगवान् आत्मकाम आहे. जो कोणी अनात्मकाम सोडत नाहीं, भगवान् कालरूपाने त्याला तो सोडायला लावत असतो. भगवंताचें कालरूप हेच काम हा आहे. कालरुप भगवानच काम-हा आहे. परंतु आत्मकामना ही सदैव राहणारच, त्या आत्मकाभनेचाच विविध आविष्कार म्हणजे नानाविध काम होत. ते सर्व काम हि पर्यायाने जीवाला आत्मकाम आणि आप्तकाम करून सोडीत असतात. कारण "आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवति" हा आहे सिद्धांत.

२९५. कामकृत
कालरूप भगवान् शेवटी सर्वस्वाचा अपहार करतो, पण दरम्यान तो जीवांचे आप्यायन हि करीत जातो. चंद्राच्या कला प्रथम एकैकश वाढत जातात आणि त्यांची पूर्णिमा झाल्यानंतर त्या त्याच क्रमाने घटत जातात. हे सर्व कालाचेंच कर्तत्व होय. जीवांचे हितसेंच आहे कालबळाने सो वाढत जातो आणि क्षीण होतो परंतु हे कालकृत कौतुक अज्ञानामुळे तो ओळखीत नाही आणि वृथा अहंकार बाळगतो की मी वाढलों मी घटलों आणि त्या योगें हर्षशोकाभिभूत होत राहतो. माणसाने जर काळाचे हे सर्वकर्तृत्व ओळखलें आणि त्याबरोबरच आपलें अकर्तृअभोक्त स्वरुप हि, तर तो आत्मज्ञ झाला आणि सर्व अभिभवांतून सुटला.

काम-हा आणि काम-कृत्ही अशी जोड कल्पना आहे. जो कामकृत्तोच कामहा हि आहे. या कल्पनेत इष्टानिष्ट काम असा विवेक नाही. सर्वच काम निपटून कढणारा तो कामहा. तसाच सर्वच काम पुरविणारा तो कामकृत्होय. हा लौकिक वा तात्त्विक विचार झाला. व्यावहारिक विचारात कामाचा इष्टानिष्टविवेक होतो. तो हि क्रमाने निष्कामता वा आत्मकामता साधायलाच उपकारक होतो. अर्थात तत्त्वज्ञानोपकारीच असतो तो. नयातू तापमानापकारीच असतो तो. तो प्रथम जिज्ञासा उत्पन्न करुन मागाहून तिची पूर्तिहि करतो. तत्वज्ञान करन देत असतो. तत्वज्ञानाने एकाच वेळी सर्वकाम-पूर्ति आणि आत्मोपलब्धि होत असते.

सर्वकाम-निवृत्ति हे आहे आलोपलब्धीचे स्वरूप, ह्याला शास्त्राध्ययन, संसारानुभव, आत्मचिंतन आणि शेवटी प्रयाणसाधना आप आपल्या परी हातभार लावीत असतात. चार आश्रमांची योजना एवढ्याचसाठी आहे. सोपानाच्या सर्व पायऱ्या वरच्या भूमिकवर जायलाच सहायक होत असतात. काम हि कामोल्लघनाला उपकारक हि होतो. ही एक प्रकारे समचिकित्सा होय. गृहस्थाश्रम समचिकित्सा तर वानप्रस्थाश्रम विषमचिकित्सा होय, आहेत दोन्ही हि चिकित्साच.

२९६. कान्त
कान्त म्हणजे कामनाविषय झालेला 'प्रिय आवडता. स्त्रीला पुरुष हा कान्त होतो, पुरुषाला स्त्री कान्त होते. स्त्रीपुरुष परस्परांना कान्त मानून भजतात खरे, परंतु खरोखर कान्त कोण असतो ? स्त्रीला पुरुष कान्त वाटतो तो, तो तिची कामनापूर्ति करीत असतो म्हणून होय. पुरुषाला स्त्री कान्त वाटते ती हि, ती त्याची कामनापूर्ति करीत असते म्हणूनच होय. पुरुषाला सुख मिळते म्हणून स्त्री सुखी होत नाही किंवा स्त्रीला सुख मिळतें म्हणून पुरुष सुखी होत नाही, तर स्त्रीच्या योगें पुरुषाला आणि पुरुषाच्या योगे स्त्रीला सुखख मिळत असते इणून ती सुखी होत असतात. अर्थात् कान्त हा ्स्त्री वा पुरुष नसून त्यांचा त्यांचा स्वात्माच खरा कान्त झाला. स्त्री-पुरुषांना परस्परांपासून दृष्ट कामलाभ न झाला तर ती असंतुष्ट आणि रुष्ट होतात आणि प्रसंगी परस्परांच्या प्राणाचे पिपासु हि. अर्थात् आलोतर कोणीहि आणि काहीहि कान्त नाही. एक स्वात्माच खरा कान्त आहे. त्यासाठी सर्व काही कान्त वाटत असते. हेच उपनिषदांनी गर्गीयाज्ञवल्क्यसवादांत, परोपरीने विवरिलें आहे: "न वा अरे पत्युः कामाय पति: प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति न वा अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति । " इत्यादि. मीच जर मला अप्रिय आलो तर जगातील काणताहे वस्तु मला प्रिय होऊ शकणार नाही. आणि क्षणभर मानलें की अशी एखादा वस्तु प्रिय होऊ शकते तर ती वस्तुच आत्मा होईल. तुमचें परमप्रेमास्पद परम कान्त असे जे काही आहे तेच तुमचें निजरुप आहे, तोच आत्मा, तोच परमात्मा. म्हणून तो कान्त म्हटला आहे. हेच परमात्म्याचें कान्तरूप आठवून संतांनीं तें परोपरीने आळविले आहे:

रूप पाहता लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो ह्या विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठली आवडी ॥
सर्व सुखाचे आगर | बाप रखुमादेवीवर ॥


२९७. काम
काम्यते इति कामः, जो कामिला जातो तो काम. जो कामना करतो तो कामी होय. भगवान् हा पूर्णकाम आहे. त्याला कशाची हि कमतरता नाही. ज्याला कशाची तरी कमतरता, उणीव भासते तो तिची कामना करतो. जो पूर्णकाम आहे तो कशाची कामना करणार ? म्हणून तो निष्काम होय, निरिच्छ होय. जगांत ज्याच्या जवळ काहींच नाही असा कोणी नाही. त्याच प्रमाणे ज्याला कशाची हि ददात नाही असा हि कोणी नाही. त्यामुळे प्रत्येक जणच धनी आहे आणि अधिकाची कामना करणारा कामी हि आहे. हा जो प्रत्येकाच्या ठाई काम आहे तो काय आहे ? तो म्हणजे अ-पूर्णाला पूर्ण होण्याची ओढ होय, जो पर्यंत ती पूर्णता प्राप्त होत नाही, तो पर्यंत ही ओढ, हा काम राहणारच, ज्या अर्थी समग्रता, संपूर्णता हे परमात्मस्वरूप आहे त्या अर्थी त्याचा प्रत्येक अंश हि तदवयवभूत तोच आहे. म्हणून कोणत्या हि गोष्टीचा काम हा शेवटी पूर्णाचाच काम म्हणजेच परमात्याचा काम होय. म्हणूनच म्हटले आहे, हे देवा, तू.गाय इच्छणाराची गाय होतोस, घोडा इच्छीणाराचा घोडा होतोस "गोकामस्य गवायसे अश्वकामस्य अश्वायसे." सारांश, ज्याचा जो काम तो हे देवा, तूंच होतोस. अशा प्रकारे काममात्र परमात्म-स्वरुपच आहे. म्हणून तो काम होय. जीवाला आपली ही कामना पूर्णाची आहे, अपूर्णाची नाही हे कळत नाही. म्हणून तो शकलें गोळा करीत बसतो आणि सकळास मुकतो. ज्ञानी सकलास भजतो आणि पूर्ण कुंभ मिळवतो.

२९८. कामप्रद
मागील नामचिंतनात म्हटलेंच आहे की तो पूर्णात्मा 'गोकामाला गो आणि अश्वकामाला अश्व" होऊन भेटत असतो म्हणून, त्याना अर्थ, तो तो काम होऊन प्रभु भक्तांचा काम पुरवीत असतो. म्हणजे तो काम हि आहे आणि कामप्रद हि आहे. इतरत्र म्हणजे जीवाच्या व्यवहारांत दाताआणि दान द्रव्य वेगवेगळी असतात. परंतु परमात्याच्या बाबत असा भेद नाही. तोच दाता हि आहे आणि दानविषय हि आहे.

परमात्मा परम वत्सल पिता आहे. तो आपल्या अपत्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे भातुकें देत असतो. त्याला कोणी हेय नाही, सर्वसमान उपादेय आहेत. सर्वांचा तो समादर करतो. "चींटी को तो कन का का, हाथी को मनका देननहारा" आहे तो. तो सर्वात्मा सर्वांचा प्रियचिकीर्षु आहे. "नहि गणयति क्षुद्रो जन्तुः परिग्रह फल्गुताम्" असे तो म्हणत नाही, त्याला जीवाचा स्वाभाविक विकास हवा आहे. म्हणून तो त्यांना विकासानुकल क्रीडनकें देत असतो. तो महान मनोविज्ञानी आहे. विरोधाने कामनिरोध होणार नाही तर दर्शनानेच तो होईल हे त्याला पुरतें प्रऊक आहे. म्हणून तो बरें वाईट न म्हणतां सर्वांचे सर्व काम पुरवीत असतो. त्या कामांच्या अनुभवाने त्यांची निःसारता लक्षात आली म्हगजे जीव आपोआपच त्यांच्यापासून विरत होईल, नुसत्या निषेधाने तें व्हायचे नाही. हे जाणून तो ते ते काम पुरवीत असतो आणि त्यांच्या पासून होणारा अपाय ज्यच्या त्याच्या अनुभवास पूर्ण आणून देत त्यांना स्वेच्छया त्यांपासून तो प्रतिनिवृत्त करीत असतो. त्याला सबूरी आहे. विकर मावळेल आणि सत्य प्रकाशित होईल याची त्याला पूर्ण खात्री आहे.

२९९. प्रभु
परमात्मा हा समग्र संपूर्ण वा अंशी असल्यामुळे तो प्रभु होय. सर्व नद्यांचा पति समुद्र होय, सर्व किरणांचा स्वामी सूर्य होय. नद्या किरणें ही अंशल्प होत म्हणून ती अंशीला, समुद्राला, सूर्याला भेटायला धडपडत असतात पाण्याच्या उसळ्या आणि ज्वालांची धडपड आपल्या अंशीला भेटण्यासाठी चाललेली असते. त्याप्रमाणे सर्व जीवांची आणि जगतांची सारी धडपड प्रभूला, आपल्या समग्रतेला, संपूर्णतेला, भेटण्यासाठी चाललेली आहे. तुमचा कामनाविषय तुमच्यावर प्रभुत्व गाजवीत असतो. परमात्मा हा तसा सर्वांचा कामना-विषय असल्यामुळे तो सर्वांचा प्रभु होय. "कामहा कामकृत् कान्तः कामः कामप्रदः प्रभुः" या श्लोकार्धांतील हा शेवटचा शब्द आहे. तो त्या संगतींत वाचला म्हणजे त्याचा अर्थ होतो की तो कर्तुं अकर्तु अन्यथा कर्तुं समर्थ असा प्रभु आहे. तो काम आहे, कामकृत आहे, कामप्रद आहे, आणि कामहाहि तोच कान्त परमात्मा आहे. तो कामस्वरूप असल्यामुळे सर्व त्याचीच कामना करतात पण आपण त्या पूर्णात्म्याची कामना करीत आहोत हे ओळखत नाहीत. तोच त्यांचे नाना काम होऊन त्यांना ते देत असतो. अर्थात् तो नुसता कामप्रदच नाही तर कामकृतहि झाला आणि कामकृत व कामप्रद असल्यामुळे तो सर्वांचा कान्त झाल्यास नवल नाही. परंतु तो एवढ्यावरच थांबत नाही. सर्व कामांचा विघात हि तो करतो. कारण त्याला जीवाना सदैव कामनांची शितें वेचत ठेवावयाचे नाही. तो त्यांना आपल्या प्रमाणे पूर्ण आणि पूर्णकाम पाहूं इच्छितो. म्हणून तो जीवांना सर्व कामांचे अनित्यत्व आणि दुःखरुपत्व सतत प्रत्ययास आणून देत राहतो आणि अशा प्रकारें तो त्यांना आत्मवान् बनवून आपले प्रभुत्व प्रगट करीत असते.. "आपुली पदवी सेवकास द्यावी । तो एक गोसावी पांडुरंग । " प्रभु म्हणजे स्वामी आपल्या सेवकांना विपुल भृति आणि वेतन देऊन सुखी करतील, परंतु ठेवतील सेवकच, त्यांना स्वामी नाही होऊ देणार. परंतु परमात्मा हा असा प्रभु आहे कीं तो सेवकांना सेवक राहूंच देत नाही. त्यांना तो आपल्यासारखेच प्रभु करतो. म्हणून तो प्रभु. असा प्रभु दुसरा नाहीं.

युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः ।
अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् ॥३३॥


३००. युगादिकृत
विष्णु सहनांत भगवंताचें विश्वेश्वरत्व द्योतित करण्यासाठी वारंवार स्थल आणि काल यांचा तो स्वामी आहे अशा आशयाची नामें येतात. त्यांपैकीच युगादिकृत् आणि पुढील युगावर्त ही नामें होत. विश्वांत आपल्याला हीच दोन परिमाणे, दिक् आणि काल, दिसून येतात. कोणती हि घटना कुठल्या तरी काळी आणि कुठल्या तरी स्थलीं झालेली असते. जिला काल नाहीं आणि स्थल हि नाही अशी घटना संभवत नाही. म्हणून ही दोन परिमाणे ह्या व्यक्त विश्वाची झाली. आणि त्यांचा जो स्वामी तो अव्यक्ताक्षर विश्वेश्वर होय. तो स्वतंत्र आहे. दिक् कालांच्या बधनांत तो येत नाही. म्हणून त्याला अनन्त असे म्हणतात. देशतः हि अनन्त आणि कालतः हि अनन्त. ज्या घटना, ज्या गोष्टी देशकालबद्ध आहेत त्यांनाच कार्यकारणभाव लागू होतो. परंतु जी वस्तु विकलातीत आहे तिला कार्यकारणभाव लागू पडत नाही. ती अमुक एका कारणापासून झाली आणि तिचे अमुक एक कार्य आहे असे म्हणता येत नाही. तसे दाखवितां आल्यास ती हि सावयव आणि साद्यन्त ठरेल, परमात्मा हा तसा नाही. म्हणून तो सर्व दिशांचा, लोकांचा आणि सर्व कालांचा स्वामी आहे. त्यानेच युगादि म्हणजे युगारंभ केलेला आहे असे म्हणावयाचे. कारण दुसरा कोणी तो करूच शकत नाही. जो कोणी तो करील तो अव्यक्त आणि अक्षरच असणार आणि अशी अव्यक्ते आणि अक्षरें अनेक मानण्यांत कांहीं मतलब नसल्यामुळे एक परमात्माच सर्वेश्वर म्हटला पाहिजे, यांतच कल्पना-लाघव आहे.

शतक चवथे

३०१. युगावर्त
युगादिकृत आणि युगावर्त ही जोड कल्पना आहे. जो युगाचा आरंभ करतो तोच त्याची समाप्ति हि करतो. तो कालस्वरूप परमात्मा क्षणलवनिमेषादि आणि युगमन्वन्तर कल्पान्तावधि कालांशांची कलना म्हणजे गणना करीत असतो. तो त्यांचा आरंभ हि पाहतो आणि समाप्ति हि पाहतो आणि अशा प्रकारे त्यांची कलना करीत असतो. म्हणून तो युगादिकृत म्हणजे कालारंभ करणारा तसा युगावर्त म्हणजे कृतादि युगांची आवर्तनामागून आवर्तनं करणारा अर्थात त्यांची मोजदाद करणारा म्हटला आहे. शेतकरी जसा पेरणी करतो आणि कापणी हि करतो आणि हा क्रम चालवीत राहतो. त्याप्रमाणे परमात्मा कालांशांची पेरणी करतो, त्यांची कापणी करतो आणि अशी कालांची पिकांमागून पिके घेत राहतो. त्याने आता पर्यंत किती कला म्हणजे कालांश सवंगले ते कोण सांगू शकेल ? म्हणून त्याला नुसतें युगावर्तच म्हणावयाचे. युगांची किती आवर्तनं त्याने केली ती त्याची त्यालाच ठाऊक ! युगचतुष्कापैकी सध्या अंतिम कलियुग चालू असून त्याची २७ युगे झाली आहेत आणि २८ वें चालू आहे. अशी गणकांची गणना आहे. या गणनेत पुनः मानव कालगणना आणि दैव कालगणना हा हि भेद आहे. " सहस्रयुगपर्यन्तं अहर्यद्ब्रह्मणो विदुः । रात्रि युगसहस्रान्ता तेऽहोरात्रविदो जनाः ॥ " अर्थात् मानवाची सहस्रयुगे झाली म्हणजे ब्रह्मादेवाचा कुठे एक दिवस होतो आणि तेवढींच युगे म्हणजे त्याची रात्र असें हें अनाद्यनन्त कालचक ज्याच्या प्रेरणेने सतत फिरतेंच आहे तो परमात्मा युगावर्त होय.

३०२. नैकमाय
माया म्हणजे वस्तु-स्वरूपाचे अदर्शन, अवास्तव दर्शन, वास्तव दर्शन एकच असणार. कारण वस्तु एक आहे. परंतु तिची अवास्तव दर्शनं वा अन्यथा दर्शन नैक म्हणजे एकरुप नसणारी अशी कैक असणार. म्हणून परमात्मा हा नैकमाय म्हटला आहे. "इन्द्रो मायाभिः पुरुरुप ईयते" असें वेदवचनच आहे. इन्द्र म्हणजे परमात्मा हा आपल्या मायाशक्तीच्या योगे बहुरूप दिसतो. जसा नट नाना मुखवटे घालून नाना सोगेंआणतो तसा तो एकच परमात्मा आपल्या स्वरुपापलापकारी शक्तीमुळे नानारूप दिसतो. परमात्मा म्हणजे वस्तु ही तिच्यावर भासमान होणा-या नानारूपांचा आधार असल्यामुळे तिला मायावी वा नैकमाय म्हणायचे, परंतु तत्वतः ती वस्तु स्वरूपापलापकारी नव्हेच. द्रष्टयाचा तो दृग्भ्रम होय, ज्याचा आरोप त्या वस्तूवर केला जातो. अंधारांत एक खुंट आहे. तो कोणाला भूत वाटेल, कोणाला पुरुष, कोणाला स्त्री. पण खुंट हा सदैव खुंटच असतो. तथापि, त्या नाना मिथ्या आरोपांचा आश्रय तो होत असल्यामुळे त्याला नैकमाय म्हणावयाचे. या नैक आरोपांत स्वरुपाचे अदर्शन हा सर्वत्र समान असलेला प्रकार तो तिरोभाव होय आणि त्यांत जो अन्यथा दर्शनाचा प्रकार तो विक्षेप भाव होय. या मायेच्या द्विविधतेमुळे हि परमात्मा हा नैकमाय म्हणता येईल. मायावी अदृश्य होतो आणि अदृश्य होऊन नाना भयानक सोंगें हि आणतो. अशा द्विविध रूपाने तो आपली माया दाखवीत असतो. म्हणून तो नैकमाय होय. ज्याला साक्षात्कार हवा आहे, दर्शन हवें आहे त्याला हा मायामय अन्तरपट दूर सारावा लागतो.

३०३. महाशन
महत् अशनं यस्य सः महाशन: । ज्याचे खाणे मोठें तो महाशन होय, वैश्वानररूप परमात्मा सर्व अन्न पचवून सामील असतो म्हणून तो महाशन म्हणावा. प्राणिमात्राच्या ठाई जो जठराग्नि वास करतो आहे तोच वैश्वानर होय. तो विश्वांतील अन्नजात पचवीत आला आहे आणि पुढे हि तोच पचविणारा आहे. म्हणून तोच महाशन म्हणावयाचा. या वैश्वानर परमात्याला मी आहुति देत आहे, असें म्हणून जो जेवतो वा जेववितो तो यज्ञकर्ता होय. त्याचें तें उदरभरण नोहे, ते यज्ञकर्म जाणिजे. या यज्ञकार्याला समिधा आणि आज्य पुरविणारें जे शेतकरी, कामकरी इत्यादि ते हि त्या भावनेने कार्य करतील, तर यज्ञकर्तेच म्हणावे. त्यांचें तें अन्नोत्पत्तिरुप कर्म " तदर्थीय" असल्यामुळे ते हि यज्ञकर्मच होय. यज्ञात मुख्यतः आज्याहुति द्यायची असते. त्यासाठीच जेवतांना भातावर अन्नशुद्धि घालावी लागते. "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म" हयाची ती खूण आहे. हा जीवयज्ञच खरा यज्ञ आहे. यज्ञ सोडून इतर जे काही केले जाते तें बन्धन आहे असें गीता कण्ठरवाने सांगते आहे. ह्या यज्ञाबरोबरच प्रजा निर्माण करुन ब्रह्मदेवाने त्यांना ह्या जीवयज्ञाच्या योगें समृद्ध व्हा, हा तुमचे सर्व काम पुरवील असे म्हटले आहे. या यज्ञाचा भोक्ता सर्वान्तर्यामी साक्षात् परमात्मा आहे. त्याहून अधिक मोठा भोक्ता दुसरा कोण असू शकेल ? त्याने स्वतःच गीतेत म्हटले आहे

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापान-समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ गीता १५ - १४


असा तो विश्वान्तर्यामी वैश्वानर महाशन होय.

३०४, अदृश्य
दृश्य म्हणजे इन्द्रियगोचर, जें जें इन्द्रियगोचर आहे त्याहून परमात्मा भिन्न आहे. म्हणून तो अदृश्य म्हणावयाचा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गन्ध हे जे पंच विषय ते पंच इन्द्रियें श्रोत्र, त्वक्, नेत्र, जिह्वा आणि नासिका वा घ्राण यांच्या पंचायतींत चर्चिले जातात. त्यांच्याविषयी बरावाईट निर्णय ते पंच करतात. परंतू आत्म्यासमोर ह्या पांचांची पांचावरच धारण बसते. त्यांचे तिथे काहीच चालत नाही. "किमिदं यक्षम्" हें काय अद्भुत ? पांचा मुलखावेगळे ? ते त्यांना कळत नाही, आकळत नाही. असें तें अतीन्द्रिय आहे. अगोचर आहे. नुसते अदृश्य म्हणजे नेत्र-विषय न होणारें तर कितीतरी दाखविता येईल. पण तें कांहीं परमात्मतत्त्व नहे. तें तर 'नेति नेति' म्हणूनच निवडावे लागते. "तदेव ब्रह्म त्वं विद्धि, नेदं यदिदं उपासते". इन्द्रियें ज्याची उपासना करतात त्याहून तें वेगळेच आहे, आगळेच आहे. पंच आपल्या विषयांबाबत निर्णय देतात आणि आपल्या अविषयाबाबत हि. आपल्या विषयाबाबत ते युक्तायुक्त निर्णय देतात आणि अविषयाबाबत निर्णय देतात की हा आमचा विषय नव्हे. वरिष्ठ न्यायालयांत जा. हा निर्णय सुद्धा कमी महत्त्वाचा नाही. हे वरिष्ठ न्यायालय म्हणजे बुद्धि होय. गीतेत म्हटलेंच आहे "बुद्धिग्राह्यं अतीन्द्रियम्" पण ही बुद्धि म्हणजे तर्क नहे. तर स्वानुभवक्षम प्रज्ञा होय. निष्पंक आणि तिष्कंप. असा जो बुद्धिमान् तोच अदृश्याला पाहतो.

३०५. अव्यक्तरुप (व्यक्तरुप)
अदृश्य आणि अव्यक्तरूप ही जोड कल्पना आहे. अदृश्य पदाचा आशय अव्यक्तरूप हे पद पूर्ण करते. परमात्मा अतीन्द्रिय आहे एवढेच नहे तर तो वाङ्मन यांच्या हि अतीत आहे, हे अव्यक्तरुप पद सूचित करतें. जें इन्द्रियांना गोचर नाहीं तें मन चिंतूं शकते किंवा नाही हा एक स्वतंत्र प्रश्न आहे. पण घटकाभर मानलें की मनाची अशी शक्ति आहे तर ते आत्मतत्त्व त्या मनोमताहून भिन्न आहे असे अव्यक्तरूप हे पद सूचित करीत आहे. जें जें मनांत येतें तें तें सारें व्यक्तच होय. कारण अद्यक्त हे अचिन्त्य आहे. दृश्य हें निर्देश्य आहे तर अदृश्य हे चिन्त्य आहे. परंतु जें निर्देश्य नाही आणि चिन्त्य हि नाहीं तेंच अव्यक्त होय. म्हणून अव्यक्तरूप या पदाने इथें तें अचिन्त्य आहे, मनसगोचर आहे असे सुचविले आहे. इथे "अव्यक्तरूप" ऐवजी " व्यक्तरुप " असा हि पाठ संभवतो. आणि शंकराचार्यांनी तो तसा घेतला हि आहे. परंतु त्याने अर्थात फरक पडण्याचे कारण नाही.

इथे व्यक्त याचा अर्थ एवढाच की "ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो"-योग्यांना जो ध्यानाने हृदयांत व्यक्त होतो, अनुभवतो तो. जो अनुभवतो तो अव्यक्त कसा म्हणावा ? म्हणून तो व्यक्तरूप होय. अथवा जें सारेंव्यक्त आहे ते त्या परमात्म्याचेच रूप म्हटलें पाहिजे. कारण त्याहून वेगळे इथे काही नाहीच. म्हणून हि तो व्यक्क्तरुप होय.

परमात्मा आहे तो आहे. त्याला तुम्ही व्यक्त म्हणा की अव्यक्त महणा. नामान्तराने नामधारकांत काय फरक पडावयाचा आहे ? कित्येक मुलें बापाला नावा म्हणतात, कित्येक आबा म्हणतात. कांहीं हि म्हटले तरी बाप तो बापच राहतो. "तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एक गोविंदु रे ॥ "

३०६. सहस्रजित्
जीवाचें जीवन म्हणजे दोन प्रभावी शक्तींचा खेळ आहे. एक पुरुषकार आणि दोन म्हणजे दैव. दिवस आणि रात्रि मिळून जसें संपूर्ण दिनमान होते त्याप्रमाणे पुरुषकार आणि दैव मिळून जीवाचें जीवमान बनलेले आहे. कधी दिवस मोठा कधी रात्र मोठी असा दिनमानांत चयापचय होत राहतो. तसा जीवनांत हि पुरुषकार आणि दैव यांचा वाटा न्यूनाधिक होत राहतो. कोणाचा वाटा किती आणि किती महत्त्वाचा हे कोण सांगू शकेल ? एवढे बरीक खरें की जशी नदी एकाच तीराची असू शकत नाही, तसें जीवन हि एका पुरुषकारानेच वा एका दैवानेच बनत नाही. या दोन्ही तीरांमधूनच वाहते ते. आणि म्हणून या दोन्ही क्षेत्रांत माणसाला आपली कसोटी द्यावी लागते, दिली पाहिजे. त्याने आपला पुरुष-प्रयत्न म्हणजेच पुरुषकार आजमावून पहावा, आपले दैव आजमावून पहावें. आपला पुरुषकार आजमावण्याच्या क्षेत्राला म्हणतात युद्ध तर दैव आजमावण्याच्या क्षेत्राला म्हणतात द्यूत. आणि या दोन्ही क्षेत्रांत जो फक्कडपणे खेळतो तो खरा जीवनजौहरी. दैव जर अटळ आहे तर त्याला टाळा कां आणि भ्या तरी कशाला ? होऊन जाऊं द्या दोन हात | असें म्हणून जो पुरुषकाराच्या वा दैवाच्या क्षेत्रांत खेळाडू प्रमाणे हार-जीत सम करून उतरतो तो खरा वीर पुरुष होय. हा असा पुरुष सहस्रजित्होय, अनन्तजित् होय, सहब्रजित् आणि अनन्तजित् ही नामें युद्धांत आणि द्यूतांत म्हणजेच उभयविध अशा जीवनांत खेळणाऱ्या पुरुषरुप परमात्म्याची आहेत. अनन्तजित् च्या विरोधात सहस्रजित् म्हणजे सान्तजित असें हि म्हणता येईल. परंतु सहस्र शब्द लाक्षणिक अर्थाने घेतल्यास तो सर्वजित् आहे. परमात्मा मितामित सर्वजित् आहे.

३०७. अनन्तजित्
जीवन हे पुरुषकाराचे क्षेत्र आहे का दैवाचे ? का दोहोंचें ? का आणखी तिसऱ्यााचेंच ? याचा निर्णय तत्त्वज्ञांनी केला आहे. त्यांचा निर्णय हा की जीवन हें चिरंतनाचे अधिकारक्षेत्र आहे, क्षणिकाचे नाही. आणि चिरंतन, शाश्वत, नित्य वस्तु धर्म आहे, हे मर्त्य जीवन वा त्याच्यांतील सुखदुःख नव्हे. ते क्षणिक आहे, अशाश्वत आहे, अनित्य आहे. महाभारताचे हे सार आहे. महाभारतांत जीवनाचे अंतरंगआणि बहिरंग यथातथ्य चितारले आहे. महाभारतांत द्यूत आले आहे म्हणून महाभारत में आर्याच्या अवनतीचे, अपकर्षाचे र्‍हासाचे चित्र आहे असे समजणारे ऐतिह्यवेत्ते महाभारताचे रहस्यच समजले नाहीत. मनुष्याचे जीवन हे दैव आणि पुरुषकार या दोन आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेलें आहे. ती दोन्ही एकमेकांवर कडी करीत मनुष्याच्या जीवनाचा पट विणीत असतात. मनुष्य प्रयत्न करीत असतो पण त्याचे फळ दैवाधीन असते. ते कधी अनुकूल कधीं प्रतिकूल असते. कधीं यश येईल कधी अपयश येईल अशा अनित्य आणि अनिश्चित म्हणजेच अध्रुव तत्त्वाच्या हाती आपले मोलाचे जीवन कसे देता येईल. त्याला काहीतरी मार्गदर्शक ध्रुवतत्त्व हवें. तें कोणतें तें महाभारत दाखवून देत आहे. तें ध्रुवतत्व म्हणजे धर्म होय. ते सूत्र जो घरून ठेवतो तो त्या सुताने स्वर्ग गांठतो. जीवनाच्या युद्धांत वा द्यूतात मग तो हरो की जिंको, हारजीत दोन्ही समानच निरर्थक आहेत. जीवनाचे तारक तत्त्व त्या दोहोंहून वेगळेच आहे आणि ते आहे सत्य म्हणजेच धर्म, धर्मराजाने द्यूतात आणि युद्धांत हि त्याचा त्याग केला नाही म्हणून तो स्वर्गात गेला. बाकीचे सारे यशस्वी नि अयशस्वी नरकास गेले. म्हणून धर्मराज हा अनन्तजित् होय. बाकीचे सारे सान्तजित्च. म्हणूनच धर्मराजाचा शंख अनन्तविजय आहे. तोच महाभारताचा नायक आहे.

इष्टोऽविशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः ।
क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः ॥३४॥


३०८ इष्ट
परमात्मा हा सर्वांचा स्वात्मा असल्यामुळे तो सर्वांना इष्ट वाटतो. प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे. परंतु हा असा प्यारा जीव हि मनुष्य केव्हा केव्हां देतो, आत्महत्या करतो, ते का ? ते हि तो आपल्या जीवासाठीच करीत असतो. त्याला जेव्हा हे जीवन असह, अनिष्ट वाटू लागतें तेव्हा तो त्याचा त्याग करतो. तो ज्याचा त्याग करतो तें अनिष्ट असते आणि बाह्य असते; अ-स्व असते, अनात्म असते. आपला त्याग कोणाला कधीं करता येणे शक्य नाहीं. केळीच्या खांबाच्या गाभ्यावर सोपटांची अनेक वेष्टणे असतात. तशी जीवाची अनेक वेष्टणे आहेत, कोश आहेत आणि त्यांचा तेवढा त्याग जीव करीत असतो. परंतु त्यांचा जो गाभा तो स्वतः त्याचा त्याग कोण कसा करणार ? तोच तो निजात्मा होय जो सर्वाचे सर्वस्व आहे, सर्वांचे इष्ट आहे. म्हणून तो इष्ट होय, प्रेष्ठ होय.

जो मनुष्याला श्रेष्ठ आणि प्रेष्ठ असतो त्याचेंच यजन म्हणजे भजन पूजन मनुष्य करीत असतो. असा श्रेष्ठ आणि प्रेष्ठ एक परमानन्द स्वरुप परमात्माच होय, म्हणून हि तो इष्ट म्हणजे यजिला गेलेला आहे .स्वर्गातील अमर हि ज्याचे यजन करतात त्या परमात्म्याचे यजन कोण मर्त्य करणार नाहीं ?

अशा प्रकारें परमात्मा हा प्रिय हि आहे आणि पूज्य हि आहे. तो परम प्रिय आहे, परम पूज्य आहे, तो स्वतत्त्व म्हणून परम प्रिय आहे. परतत्त्व म्हणून परम पूज्य आहे.

३०९, विशिष्ट (अविशिष्ट)
परमात्मा हा विशिष्ट म्हणजे वेगळा आणि आगळा आहे. ज्याच्यांत कांहीं अनन्य साधारण आणि महनीय असे वैशिष्टय असते त्याला विशिष्ट म्हणावयाचें. परमात्म्याचे वेगळेपण आणि आगळेपण काय वर्णावे ? त्याच्या सारखें दुसरें कांहीं नाहींच म्हणून त्याला "हे नव्हे हें नव्हे" असें व्यावर्तन करीत करीत जगावेगळे 'ते' महणावे लागते. हे झाले त्याचे वेगळेपण आणि त्याचे आगळेपण हि तसेंच आहे. तो नित्य आहे, हे जग अनित्य आहे. तो विज्ञाता आहे, हे विज्ञात आहे. तो आनन्दस्वरूप आहे. हे दुःखरुप आहे. अशा प्रकारें "कः केन संबन्धः" असा तो आगळा आहे. परमात्म्याच्या अशा वेगळेपणामुळे आणि आगळेपणामुळे तो विशिष्ट म्हणावयाचा.
इथे अविशिष्ट असा हि पाठ घेणे शक्य आहे. आणि खरोखर तो परमात्मा 'अणोः अणीयान् आणि महतः महीयान् ' नाहीं काय ? तो कोणाहून वेगळा आणि आगळा मुळी नाहीच. गोच्या ठाई गोत्व आणि अश्वाच्या ठाई अश्वत्व तोच आहे. मुंगीच्या ठाईं आणि हत्तीच्या ठाई जीव रूपाने तोच अविशिष्ट नांदत नाही काय ? रोजच्या रोज सुषुप्तींत सर्वजीव त्याच्या ठाई एकरूप होत नाहीत काय ? तिथे अणुमहत् साध्वसाधु इत्यादि कसले हि वेगळेपण वा आगळेपण अणुमात्र तरी राहते का ? त्यामुळे जो विशेष दिसतो तो सगळा निर्विशेषच होय, "आत्मैव इदं सर्वम्, नेह नानास्ति किंचन" इथे दुजें काही नाहीच. एकच एक सर्वत्र भरून राहिले आहे. त्यामुळे तो परमात्मा अविशिष्ट आहे. उपनिषदांनी त्याचे अविशिष्टत्व परोपरीने गाइलें आहे.

अग्निर्यथैको भुवन प्रविष्टो रुपं रुपं प्रतिरुपो बभूव ।
एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूमं प्रतिरुपो बहिश्च ॥


३१०. शिष्टेष्ट
शिष्ट म्हणजे अनुशिष्ट, विद्याविनयसंपन्न, त्यांनी जो यजिला, त्यांना जो प्रिय तो शिष्टेष्ट म्हणावयाचा. असंस्कृत आणि अशिक्षित लोकांचे प्रेम पूजा-विषय हे मूढ आणि घोर स्वरुपाचे तामस आणि राजस असे असतात. ज्यांची श्रद्धा, बुद्धि आणि दृष्टि विशुद्ध आहे त्यांचे श्रद्धेय ज्ञेय आणि दर्शन मान्य समजावें. तेंच इष्ट म्हणजे शिष्टेष्ट होय. अशिष्टेष्ट म्हणजे अनिष्टच ! माणसाला दोन डोळे आणि एक दृष्टि असते. तिच्या मार्गदर्शनास अनुसरून माणूस चालत असतो. त्याच प्रमाणे माणसाचे, वा जीवाचे म्हणा, श्रद्धा आणि बुद्धि हे दोन डोळे आहेत आणि त्या उभयांच्या समुच्चयाने बनणारी जी दृष्टि तें आहे जीवाचे मार्गदर्शक तत्त्व, त्यालाच मी दर्शन म्हणतो. या दर्शनास अनुसरूनच माणूस व्यवहारांत वागत असतो. म्हणून आपले दर्शन विशुद्ध ठेवणे आणि तसे ते नसल्यास ज्यांचे दर्शन विशुद्ध आहे असे आपल्याला वाटते त्यांच्या दर्शनानुसार वागणे हेच मी मनुष्याला हिततम मानतो. हाच निर्णय गीतेने " तस्मात् शास्त्र प्रमाणं ते कार्याकार्य-व्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तु इहार्हसि" या शब्दांत दिला आहे. आपलें दर्शन संशयित, शास्त्राचे दर्शन निःसंशय म्हणून तेंच मान्य करायचे हे ठीक, पण त्यात शास्त्र हे अमूर्त आणि त्याच्या वचनांचा अर्थ नेहमीच स्पष्ट नसतो वा स्थिर नसतो त्यामुळे परत संशयच्छेदाचा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी सर्व संशयांचा छेद करणारा जो धर्मपुरुष तोच शिष्ट होय, आणि त्याला में इष्ट असतें तेंच भगवन्‌मत जाणावें, तेच भगवत्स्वरूप. तेच शिष्टेष्ट, शास्त्र ज्ञापक पण अमुर्त, शिष्ट वा गुरु आज्ञापक आणि मूर्त, म्हणून तोच शरण्य.

३११. शिखण्डी
शिखण्ड म्हणजे तुरा. आणि शिखण्डी म्हणजे तुरेवार, मोर, कोंबडा हे पक्षी तुरेदार आहेत. बैल वशिण्डवाला आहे. असे जे मूर्धन्य वैशिष्ट्य पशुपक्षांत आढळते त्यांत त्यांचा आत्मगौरव, ऐट, मस्ती दिसून येते. माणसाला देवाने असे शारीरिक शृंग कांही दिले नाही, पण बुद्धिवैभव दिले आहे. त्याच्या बळावर त्याने आपल्या पोशाखांत पशुपक्ष्यांचे अनुकरण करून फेटा पगडी हे शिरोभूषण निर्माण केलें. पगडीत नुसताच तुरा काढला आहे तर फेट्यांत तुरा आणि शेमला हि. तुरा पक्ष्यांचे अनुकरण आहे, तर शेला पशुंचें. पशुपक्ष्यांचे शेपटे व तुरे कसे फडकतात डोलतात ! माणसाला त्यांचा हेवा वाटल्यास नवल नाही. माणसाने ते आपल्या पोशाखांत आणले. पण मोरपिसांतील तो डोळा, काय त्याचे ते विविध रंग आणि छ्या ! त्याचे रंग, रूप, चैतन्य सारेच अद्भुत ! त्याचे अनुकरण कसे करायचे ? तेव्हां ते मोरपीस च सरळ खोवलें आपल्या केशाकलापांत वा शिरोवेष्टनांत. ही ऐट उसनी भासली तरी ती उसनी नाही. त्यांत सृष्टीशी आत्मीयता आहे. आपल्या भोवतालच्या सृष्टीचे प्रेम आणि गौरव आहे. गोपाल कृष्णानें हें सृष्टीचे प्रेम आणि गौरव हें सृष्टितादात्म्य यथेष्ट अनुभवले आणि उमटविलें. खरोखर तो सृष्टीशी एकरूप झाला होता. तो वनमाली गुंजावतंस वेणुवादक गोपाल | मोरपीस आपल्या डोक्यांत खोवून तो शिखण्डी झाला, हयांत नवल काय ? रानफुलांचे कौतुक करणाऱ्या कृष्णाची सर गुलाबाचें रक्तफूल कोटाच्या गुंडीघरांत लावणाऱ्याला कशी येणार ? एक सृष्टीचा बालक आहे, दुसरा पालक म्हणवतो आहे. सृष्टीशी तादात्य आत्मीयत्व न अनुभवतां जो तिचे फूल धारण करतो तो उसनी ऐट करतो आहे. ती लूट आहे. परंतु जो सृष्टीचा बालक होऊन तिचे स्तन्य पितो, तिच्या अंगावर नाचतो, तिचे गीत गातो, तिची फुले आणि पिसे डोक्यांत खोवतो तो सृष्टीचाच एक नवा नवा आणि हवा हवा वाटणारा कोंब होय. सर्व सृष्टि त्याची आहे आणि तो सृष्टीचा आहे. आणि तोच शिखण्डी म्हणावयाचा. कारण माता आपल्या बालकाला स्वलंकृत करीत असते, शिखण्ड-मण्डित करीत असते. ती त्याला राजा म्हणते आणि राजवत् नटवते, सजवते, या विश्ववृक्षाचा मूलकंद तो परमात्मा आहे आणि वृक्षागावर येणारी नवी पालवी, त्या कंदाचाच तुरा होय, शिखण्ड होय. म्हणून परमात्मा हा शिखण्डी म्हणावयाचा.

३१२, नहुष
नह ( ४. उ ) मढवणे आच्छादणे या धातूपासून नहुष शब्द व्युत्पादिला जातो. नहुष प्रमाणे करुष, पुरुष असे उष प्रत्ययान्त अन्य हि काही शब्द आढळतात. धात्वर्थानुसार नहुषचा अर्थ होईल, मढविणारा, व्यापणारा. या विश्वांत आकाशाने सारें आंतून बाहेरून व्याप्त आहे, पिनद्ध आहे. आकाश असें व्यापक असले तरी व्याप्य व्यापक असें अंतर तिथे गृहीत आहे. परंतु जियें व्याप्य आणि व्यापक असें द्वैत शिल्लक नाही तिथे किती अधिक ठोस व्यापकता आहे म्हणावी ? परमात्मा हा तसा अपिनद्धा आहे. व्यापक आहे. सोने जसें अलंकाराला आतून बाहेरुन व्यापून असते तसा परमात्मा या विश्वाकाराला आंतून बाहेरुन संनहन करून राहिला आहे. हा कर्तृवाचक अर्थ झाला. कर्म वाचक म्हणूनहि नहुष शब्द लावता येईल.

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति मां एभ्यः परमव्ययम् ॥ गीता ७ - २५


असें जें गीतेंत म्हटले आहे ते परमात्याचे नहुषत्व म्हणजे निगूढत्व च सांगण्यासाठी होय. परमात्मा हा जगाला अंधार आहे. अंधाराच्या पडद्याआड काय आहे हे आपल्या दृष्टीला दिसत नाहीं तसा परमात्मा हा या विश्वाकार पडद्याने परिपूर्ण झाकून टाकला आहे. त्याचे परिपूर्ण पिधान झाले आहे. दर्शनीय आणि दृष्टि यांच्या दरम्यान येणाऱ्या अंतरायामुळे दर्शनीय अंशतः वा समग्र झांकले जाते. यालाच पिधान म्हणतात. विश्वाकार योगमायेनें परमात्म्याचे सामग्रेण पिधान केलें आहे, अंशतः नव्हे. रज्जूवर सर्वाभास होतो तो आंशिक कधी असत नाहीं, तो समग्रच होतो. अर्धी रज्जू साप दिसते आहे आणि अर्धी दोरी दिसते आहे असे होत नाही. त्या प्रमाणे परमात्मा हा संपूर्णच या समग्र विश्वाकाराने झाकून टाकला आहे. हा विश्वकाराचा भास सगळाचा सगळा नाहींसा होईल तेहाच तो नहुष, तो योगमायासमावृत त्रैगुण्य-पिनद्ध हिरण्यपात्र-पिहित परमात्मा दृग्गोचर होईल.

३१३. वृष
'संतत संपत सुख के कारण ' ही सुखकारणे जो वर्षतो तो वृष म्हणजे वर्णाश्रमधर्म होय. पण धर्म नुसतीच संतति संपत्ति देत नाही तर तो वस्तुतः मानवाचें जीवित जेणे करून कृतार्थ होते तो परमपुरुषार्थ म्हणजे मोक्ष हि मिळवून देतो. अशा प्रकारे अभ्युदय आणि निःश्रेयस ह्या दोन्ही ऋद्धिसिद्धि जो यजिला असतां वर्षतो तो वृष म्हणजे धर्मरूप परमात्मा होय, वर्णधर्म मुख्यतः अभ्युदय आणि आश्रमधर्म निःश्रेयस साधून देतो असे म्हणता येईल, वर्णधर्माच्या योगे सामाजिक स्वास्थ्य तर आश्रमधर्माच्या योगें वैयक्तिक स्वास्थ्य संपादिले जाते. व्यवस्थित समाजांतील स्वतंत्र व्यक्ति आणि स्वतंत्र व्यक्तीचा व्यवस्थित समाज जिथे नांदतो तिथेच धर्म भरभराटतो. समाजाचे तत्त्व व्यवस्था म्हणजे सर्वसुखावह नियंत्रण नियमन होय, व्यक्तीचे तत्व स्वातंत्र्य म्हणजे सर्वतंत्र-स्वतंत्र उन्मुक्त जीवन होय. ही दोन दिशांना ताणणारी ढवळया पवळ्याची जोडी मानव-जीवनाच्या रथाला जुंपली आहे. ह्यांच्या संगतींस श्रेय आणि विसंगतींत विनाश ठेवला आहे. समाजाच्या नियमनाचे लक्ष्य व्यक्तीचे संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे तर व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे लक्ष्य समाजाचे संपूर्ण हित म्हणजेच सर्वभूतहिते रति असलें पाहिजे. याचा आशय हा आहे की, व्यक्ति समाजव्यापी झाली पाहिजे, ती एकदेशी राहता कामा नये. आणि समाजाने व्यक्तीच्या स्वैरतम आकांक्षांना अनन्त आकाश मोकळे करुन द्यायला पाहिजे. म्हणजे व्यक्ति ही समाजाला निजात्मा झाली पाहिजे, परकी वा नियम्य राहतां कामा नये. सारांश दोहोंचे अद्वैत हेच धर्माचे स्वरूप आहे. तेच त्यांचे लक्ष्य आहे. आणि तोच सर्व पुरुषार्थाची वृष्टि करणारा वृष आहे. खरोखर ही 'अद्वैत-कुसरी विरळा जाणे '. मानवाने जीवनाचा क्षीरसागर मंथून जे अमृत हस्तगत केलें तें हेच अद्वैतामृत होय. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति, आत्मारामो भवति । यत् प्राप्य न किंचित् वाञ्छति न शोचति.'

३१४, क्रोध-हा
परमात्मा हा क्रोधाचे हनन करणारा आहे. मनुष्य वा जीव जो क्रोध करतो तो एखाद्या वस्तूविषयीं त्याला राग म्हणजे आसक्ति असते आणि ती वस्तु त्याच्यापासून दुरावू नये वा कोणी हिरावू नये म्हणून त्याला चिन्ता वा भय वाटत असते म्हणून होय. हा क्रोध म्हणजे क्षोभ वा चलविचलपणाच होय. "क्रोध कामांत ठेविला" (कामात् क्रोधोऽभिजायते) म्हणून जे स्थितप्रज्ञाच्या लक्षणांत विकारप्रतीत्यसमुत्पादाच्या विवरणांत वर्णिले आहे ते ह्याचमुळे होय. हा क्रोध ज्याचा गेला तो स्थितप्रज्ञ झाला. स्थितप्रज्ञच्या विरुद्ध क्षुब्ध वा कम्पित-चित्त होय. म्हणून रामदामनी स्थितप्रज्ञाचे लक्षण " करी वृत्ति जो संथ तो संत जाणा " असे बाळबोध पण नेमकें केलें आहे. राग म्हणजे आसक्ति, तिच्या पोटीं भय म्हणजे चिंता आणि तिच्या पोटीं क्रोध म्हणजे चित्तोक्षोभ वा का उत्पन्न होतो. असे हे विकरणसूत्र आहे. याचाच विस्तार ’ ध्यायतो विषयान् पुंसः' इत्यादि श्लोकद्वयांत गीतेने केलेला आहे. हा क्रोध परमात्मा कसा नाहीसा करतो ? परमात्म्याला आणि त्याच्या भक्ताला आत्मभिन्न दुसरी वस्तुच उरत नसल्यामुळे त्याला कोणत्याहि वस्तूचा अभिलाष आणि राग मुळी उत्पन्नच होत नाही. आत्म्याच्या ठाई काम आणि राग संभवत: कुंठित होतात. मीच मला कसा इच्छू आणि चिकटूं ? हे अद्वैत जर बिंबलें तर " अतृणे पतितो वह्नि स्वयमेवोपशाम्यति " या न्यायाने तो क्रोध आपोआप निर्बीज होईल. परमात्मा स्वभावतःच शान्तिरूप असल्यामुळे तो क्रोध-हा म्हटला जातो-जसा प्रकाश हा स्वभावतःच तिमिरहा आहे तसा. जीव क्रोधाचे फार तर दमन वा नियमन करतात. पण त्याचे निर्मुलन वा हनन एक परमात्माच करतो. तो काम-हा आहे म्हणून क्रोधहा आहे. कारण त्यागाने कार्यत्यागी म्हटला गेला आहे. अज्ञान हे निदान आहे. काम हे पूर्वचिह्न आहे, क्रोध फलित आहे.

३१५. क्रोधकृत्‌(क्रोधकृत्‌कर्ता)
'कामहा कामकृत्' प्रमाणेच 'क्रोधहा क्रोधकृत्' ही जोड कल्पना आहे. त्याचे विवेचन हि सदृशच होईल.

परमात्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे सर्वच काम-क्रोधादि विकारांचा हन्ता आहे. त्याच प्रमाणे तो सद्वस्तु असल्यामुळे सर्व विकारांचा आभासांचा आधार हि आहे. म्हणून तो एकाच दमांत क्रोध-हा आणि क्रोधकृत, कामहा आणि कामकृत् म्हटला गेला आहे.

परमात्मा आपल्या भक्तांचा क्रोध ज्ञानदृष्टि घेऊन नाहींसा करतो. म्हणून तो क्रोधहा. ज्यांना अशी ज्ञानदृष्टि नाहीं त्या अज्ञानी जीवांना, आसुर लोकांना तो रागें भरतो म्हणून तो क्रोधकृत. जाणत्या मुलांवर आईबाप रागावत नाहीत, तर त्यांना बोध देऊन त्यांचा राग दूर करतात. नेणत्या मुलांना समज नसते. त्यांनी व्रात्यपणा केल्यास आईबाप त्यांना ताडन करतात. बोध देऊन आणि ताडन करून एकच कार्य केले जातें.उन्मार्गापासन निवारण. परमात्मा हि तसाच क्रोध वरतो हि आणि आवरतो हि. पण दोहोंच्या योगे एकच हितसाधन होते. म्हणूनच म्हटलें आहे. "क्रोधोऽपि देवस्य वरेण तुल्यः" आई बाप न मारून आणि मारुनही प्रेम करीत असतात, परमात्मा हि तसाच क्रोध करून आणि न करून कृपाच करीत असतो.

जो आपल्या क्रोधावर क्रोध करतो तो क्रोधहा होतो. जो आपल्यावर क्रोध करतो, जो आपले अहित चिंतितो, जो आपल्या विकारांना पोसतो तो क्रोधकृत होतो. अशा क्रोधकृत्‌उन्मार्गगामी आत्मघातक्यांचा (म्हणजे आसुरांचा) घातक तो कोधकृतकर्ता म्हणावयाचा. कोधकृतांचे कर्तन करतो म्हणून तो क्रोधकृत-कर्ता, परमात्मा हा असुरांचा आणि आसुरांचा कर्दन काळ म्हणून प्रसिद्धच आहे. इथे दोन पदांचा एक सामासिक शब्द कल्पिला आहे. क्रोध-हा, क्रोधकृत आणि कर्ता या तीन पदाऐवजी क्रोधहा, आणि क्रोधकृत्-कर्ता अशी दोनच पदें कल्पिली तर परमात्मा हा क्रोधाला मारतोच, पण क्रोध करणाऱ्याला हि ठार करतो असा अर्थ झाला.

शिशुपालाचे डोकें भगवान् कृष्णाने आपल्या चक्रानें कृत केले म्हणून तो द्वेषकृत-कर्ता झाला. पण इथे तर क्रोध-कृत-कर्ता आहे. अतः कर्ता हे पद स्वतंत्र घेणे बरें

३१५. (क्रोधकृत्‌) कर्ता इथे कर्ता हे पद स्वतंत्र मानले तर त्याची मागे आलेल्या कर्ता पदाहून काही वेगळी व्याख्या करावी लागेल. त्याच अक्षरराशीची पुनरावृत्ति त्याच अर्थाने झाली असें मानल्यास तो अक्षरराशि गतार्थ होईल. अर्थात तोच अक्षरराशि पुन्हा आल्यास तो वेगळया कारणाने वेगळ्या अभिप्रायानेच येणार.

कृत म्हणजे कर्तन करणे, कातणे, काटणे या धातूवरुन कर्ता हा शब्द आलेला आहे. कोणत्या हि कच्च्या मालापासून जो कलाकुसरीचा पक्का माल चक्रावर चढवून तनूकरणाने तयार केला जातो तो कर्तनरुपच म्हणावयाचा. कापसापासून सूत कातणे, मातीच्या गोळ्यापासून मडकें कांतणे, लाकडापासून भोवरा कांतणे आणि लोखंड, पितळ इत्यादि धातु खरादावर म्हणजे लेथ वा यंत्र यावर चढवून त्यांच्यापासून तकलीची चकती चरख्याची नाभि आदि वस्तु तयार करणे हे सगळे कर्तनच होय. कर्तनांत त्या त्या उपादानाला फिरफिरवून त्याला इष्ट आकार दिला जातो करणांच्या वा उपकरणांच्या द्वारें, कांतण, कुंभार, सुतार, लोहार हे सर्व असे कर्ते होत. परमात्मा हि तसाच कर्ता आहे आणि विश्व हे त्याचे कर्म आहे. कर्तन आहे. तो विश्वकर्ता हें समस्त विश्व कांतीत आहे. नवे नवे धागे तो कांतीत आहे आणि विश्वपट नित्य नवा विणला जात आहे. सारे ग्रहगोल फिरत आहेत, सारे अणु फिरत आहेत आणि नवनवीं रुपे तयार होत आहेत. या सर्वांना यंत्रारुढ करून आकार देणारा तो परमात्मा, तो विश्वकर्मा कर्ता होय.

हा कर्ता शब्द मागील कृ धातूवरून आलेल्या कर्ता पदाहून वेगळा आहे. हा कृत्‌पासून आलेला आहे म्हणून त्यांत 'त्', द्वित्व राहील : कर्त्ता

३१६. विश्वबाहु
परमात्मा हा सर्वांतर्यामी देही असल्यामुळे सर्व देहांच्या सर्वबाहूंचा तो स्वामी म्हणावयाचा. तो सर्व देहांचा आणि त्यांच्या सर्वच अवयवांचा स्वामी आहे. हा वृक्षशाखान्याय झाला. ज्याचा वृक्ष त्याच्याच साऱ्या शाखा हें पुनः सांगण्याची गरज नाहीं, तरी गौरवासाठी शाखा पत्र-पुष-फलादिकांची गणना करावी तसे हे आहे. परमात्मा हा देही असल्यावर मग त्याला विश्वमुख विश्वबाहु, विश्वोदर, विश्वपाद म्हणण्याची आवश्यकता राहात नाही. तरी गौरविण्यासाठी सहनशीर्षा, सहस्राक्ष, सहस्रपात् अशी सहस्र सहस्र नामें घेतली जातात. ती सर्व एका देही आत्म्याचाच गौरव करतात. परमेश्वराचें गौरव अनन्तपार आहे. ते संख्येनें वा परिमाणानें कसें मोजतां मापतां येईल ? पण विश्वरूपाच्या दर्शनानें चकित झालेली बुद्धि आणि वाणी परमात्म्याचा महिमा आपल्या. शक्तीनुरुप वर्णिल्यावांचून राहू शकत नाही आणि म्हणून मग त्यांतून वेदापासून मौनापर्यंतचें बहुविध वाङ्मय निर्माण होते. सर्व आध्यात्मिक वाङ्मयाचा मूल स्रोत हें आश्चर्यचकित दर्शनच आहे. ह्या वाड्मयाच्या अनेक विधा आहेत. त्या श्रोत्यांच्या अधिकारानुरूप ऐसपैस वा संक्षिप्त, गंभीर वा ललित, शास्त्रीय वा लौकिक, कूट वा सुबोध आणि मिश्र रूप धारण करतात. वेद कूट आहेत. पुराणें ऐसपैस आहेत. उपनिषदें गंभीर आहेत, सूत्रे संक्षिप्त आहेत, भाष्ये शास्त्रीय आहेत, गीता मिश्र आहे, स्तोत्रें ललित आहेत, आख्याने लौकिक आहेत, इतिहास सुबोध आहेत. आणि सर्वांचे प्रयोजन परमात्मदर्शन आहे. विष्णुसहस्रनामें ही ह्या सर्वांचे सार आहे. त्यांत ह्या सर्व वि०धा आणि सर्व रस व कस सामावला आहे.

३१७. महीधर
धरणीधर नाम पूर्वी येऊन गेलें आहे, इथे ते महीधर म्हणून आले आहे. दोहोंत नाममात्रच फरक आहे. तथापि सूक्ष्म पाहिले तर पृथ्वीची जी अनेक नामें आहेत ती पृथ्वीचा एक एक विशेष सांगणारी अशी आहेत आणि त्या दृष्टीने ती एक असून विविध आहेत, विशिष्ट आहेत. विशेषांमुळेच ती विशिष्ट आणि विविध झाली आहेत. कवीच्या लोकरचनेत लघुगुरूंच्या पूर्तीसाठी ती बनविलेली नाहीत. विशिष्ट गुणव्यक्तीकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यतः ती आहेत.आणि शाब्दे परे च निष्णात कवि त्यांचा तसा प्रयोग करतांना आढळतात. वेचक शब्द, हृद्य रचना, चमत्कृति आणि अलौकिक अनुभूति ह्यांच्या रसायनाचें नांव काव्य आहे. पण ह्या काव्यरचनेचे मूल आणि स्थूल द्रव्य शब्दच आहे. त्याची साभिप्रायता महत्त्वाची आहे. सब घोडे बारा टक्के असें नाहीं. गो म्हणजे जी गमनशील आहे अशी पृथ्वी. भू म्हणजे जी भावनशील आहे ती भूतभावन पृथ्वी. धरणी म्हणजे सर्वांना धारण करणारी चराचरधात्री क्षमा म्हणजे सर्वांचे सर्वविध जीवन सहन करणारी. पृथ्वी म्हणजे पृथु, विशाल, ऐसपैस असलेली. मही म्हणजे महान्, महनीय असलेली. असे हे शब्द एका पृथ्वीचेच वाचक असून ते विविध गुणांचे द्योतक आहेत. पृथ्वी ही चराचर जीवांची माता असल्यामुळे ती महनीय आहे पूजनीय आहे. म्हणून ' तिला मही म्हणावयाचे. तिचे पाणिग्रहण आणि धारण सूर्याने केले आहे. माणून तो महीधर होय. "सूर्य आत्मा जगतस् तस्युषश्च " म्हणून श्रुति आहे. भूमि माता आणि सूर्य पिता आहे. "गां आविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा" म्हणून म्हटले आहे तें सूर्यनारायणाचें पितृत्वच प्रकट करते. म्हणून महीधर म्हणजे सूर्यनारायणच होय. अथवा मही म्हणजे महत् ब्रह्म वा प्रकृति आणि तिला धारण करणारा परम पुरुष तो महीधर म्हणावा. अव्यक्त प्रकृति ही सर्व व्यक्त विकृतीहून मोठी असल्यामुळे ती मही होय. आणि तिचा हि आधार अव्यक्त आणि अक्षर असा पुरुषच होय म्हणून परमात्मा हा महीधर म्हणावा.

अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः ।
अपां निधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः ॥३५॥


३१८. अच्युत
परमात्याची जितकी म्हणून नामें आहेत ती निर्गुणपर वा सगुणपर अशी विविध आहेत. सगुण हि अव्यक्त आणि व्यक्तअसें द्विविध, तसेंच व्यक्त हि निराकार आणि साकार असे द्विविध आहे. पुनः साकार हे सूक्ष्म आणि स्थूल असे द्विविध होईल. निर्गुण सगुण, अव्यक्त व्यक्त, निराकार साकार, सूक्ष्म स्थूल ही अशी परमात्म्याची अष्टधा प्रकृति झाली. हिलाच अष्टभुजा म्हणावयाचे. सर्व नामें नि रुपें हिचीच. तो परमात्मा तर सर्व असून सर्वातीत आहे, अतिसर्व आहे.

परमात्याची जी निर्गुणपर नामें आहेत त्यात अच्युत हे नाम सुप्रसिद्ध आहे. शंकराचार्यांचें तें लाडके आहे.

संध्येची नामावली केशव नामाने सुरू होत असली तरी त्याच्याहि आधी शंकराचार्य अच्युत नाम ठेवतात आणि "अच्युतं केशवं राम-नारायणम् । कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । ' म्हणून आळवतात. संपूर्ण अच्युताष्टक रामकृष्णापर आहे, पण सगुणाच्या डोक्यावर शंकाराचार्यांनी निर्गुण ठेवून दिले आहे. म्हणूनच ते अच्युत नामाने आरंभ करतात, त्याच नांवाने ते अष्टक प्रसिद्ध आहे. यांत च शांकरी मेख आहे.

अच्युत म्हणजे जो आपल्या सहज स्थितीपासून ढळला नाही तो कूटस्थ परमात्मा. अच्युतभाव म्हणजे तुरीय भाव, हा भाव सर्वभावांची क्रीडाभूमि होय, ते सर्व भाव गतागतकारी अन्तवन्त होत आणि अच्युतभाव त्यांच्या गतागतांचा सनातन साक्षी आहे. आणि असा तो कूटस्थ नित्य असल्यामुळेच शंकराचार्य त्याचंच प्रातःस्मरण करतात, प्रथम स्मरण करतात. सर्वारंभी ज्याचे स्मरण करावयाचें तो हाच अच्युत होय, तोच वेदांत ॐ म्हणून आणि लोकांत गणेश म्हणून स्मरला, उच्चारिला आणि पूजिला जातो आहे. जगाच्या खोखोच्या खेळांतील तो आदि-अंतींचा खुंट आहे. म्हणून तो अच्युत.

३१९. प्रथित
जो अच्युत तोच प्रथित आहे. प्रथित म्हणजे प्रसिद्ध कुठे आहे तो प्रसिद्ध ? तो वेदांत म्हणजे शास्त्रात प्रसिद्ध आहे आणि लोकांत हि प्रसिद्ध आहे. अर्थात् सर्वत्र तो प्रसिद्ध आहे.

यस्मात्क्षरमतीतोऽहं अक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ गीता १५ - १८


शास्त्रांत तो प्रकृति आणि जीव या दोन्ही क्षराक्षर पुरुषांहून श्रेष्ठ म्हणून पुरुषोत्तम या संज्ञेनें प्रसिद्ध आहे तर लोकांत तो मध्यम पुरुष तूं आणि प्रथम पुरुष तो या दोन्ही पुरुषांहून अन्तरतर म्हणून श्रेष्ठ सर्वान्तयामी मी या पदाचा वाच्य, उत्तम पुरुष म्हणून प्रसिद्ध आहे. पण हा व्याकरणाचा तात्त्विक उत्तम पुरुह सोडून दिला तरी. लोकांत परमेश्वर म्हणून तर तो प्रसिद्ध आहेच. या जगाचा कर्ता कोण ? कोण चालवितो हे सारे विश्व ? या विश्वाचा संहार कोण करतो ? या सगळ्या प्रश्नांचे जगाला ठाऊक असलेलें एकच उत्तर आहे " परमेश्वर ". म्हणून तो लोकप्रसिद्ध आहे हे उघड आहे. लोकप्रसिद्ध हा समास सप्तमी-तत्पुरुष तसा तृतीया-तत्पुरुष हि आहे. परमात्मा लोकांत प्रसिद्ध आहे आणि लोकांमुळे हि प्रसिद्ध आहे. शास्त्रांत हि "जन्माद्यस्य यतः" म्हणून लोकावरूनच त्याचे अनुमान केलें आहे. तो वेद-प्रसिद्ध आहे. कारण वेदच त्याचे प्रतिपादन करतात. वेद म्हणतात म्हणून तो आहे म्हणावयाचा. नाहीतर तो आहे कशावरुन ? जगाला कांहीं तो कुठे उपलब्ध होत नाही. लोक आहे म्हणून तो असला पाहिजे, लोक नाहीसे होतील आणि नहते म्हणून हि तो असलाच पाहिजे. असा तो लोकप्रसिद्ध आहे आणि वेदाचा तर तो मुळी विषयच आहे. म्हणून तो वेद-प्रसिद्ध उघडच आहे. असा तो अति प्रसिद्ध आहे, प्रथित आहे.

३२०. प्राण
"प्राणः प्रजानां उदयत्येष सूर्यः" हा पहा सर्व जगाचा प्राण उगवत आहे असें सूर्याला पाहून ऋषि म्हणत आहे. सूर्याला जगाचा प्राण कां म्हटले ? कारण तो जगाचें जीवन-सूत्र आहे. जीवनाची सर्व हालचाल त्याच्यामुळे होत आहे. त्याच्या स्पंदनाबरोबर जग स्पंदते. म्हणून तो प्राण म्हटला. परमेश्वर हा तसा या विश्वाचा प्राण आहे. विश्वांतील यच्चयावत् जीवन हे त्यांच्यामुळे आहे. म्हणजे चालतें आहे, उषा आणि संध्या या जणू दोन नाकपुड्या आहेत. त्यांतून आत बाहेर ये जा करणारा हा सूर्य प्राण होय. परमात्मा हि तसा युगादि आणि युगान्त यांच्यांतून ये जा करणारा या विश्वाचा प्राण आहे. प्राण हा नासाभ्यन्तरचारी आहे. तो आहे की गेला हे पाहण्यासाठी मुमूर्षु जीवाच्या नाकाशीं सूत धरतात. काल हे या विश्वाचे नाक आहे. त्यांतून आत बाहेर संचार करणारें जें जीवनसूत्र, तोच प्राण, तो परमात्म्याहून वेगळा काय असू शकेल ? म्हणून परमात्मा प्राण म्हणावयाचा. सगळी देहेन्द्रिय आणि मनोवृत्ति झोपल्या तरी जो जागा राहतो तो प्राण होय. तो जागा राहतो म्हणून स्वप्नसुषुप्तींतहि देहेन्द्रियमनोवृत्तीचे धारण होते आणि सकाळी उठल्यानंतर त्यांचे व्यापार पूर्ववत् चालू होतात. तोच जीवनाचा अंगार फुंकून फुंकून फुलवत राहतो, त्याला विझू देत नाही. जें पिंडी तें ब्रह्माण्डी, दोन्ही कडे एकच एक प्राण स्पंदत आहे आणि त्याच्या स्पंदनाबरोबर सारें चराचर स्पंदन करीत आहे. हे स्पंदन थांबलें की देहपात होतो पिण्डाचा आणि ब्रह्माण्डाचा हि. हे स्पंदन स्वलीन होतें नष्ट होत नाही. कल्पान्तीं ब्रह्माण्ड अव्यक्तांत अक्षर पुरुषाच्या ठाई लीन होते. त्यावेळी पुरुष योगनिद्रित असतो म्हणजे प्राणशक्ति स्तम्भन करून असतो. याच स्थितीचे वर्णन नासदीय सूक्तांत-" आनीद् अवातं स्वधया तदेकम् " असें केलें आहे.

३२१. प्राणद
जो प्राण आहे, तोच प्राण पुरविणारा प्राणद हि आहे. परमात्मा हा अग्निवत् सर्वव्यापी आहे. पण अग्नि मन्थन करुन प्रकट करावा लागतो. तो हि तेव्हांच प्रकटतो जेव्हां त्यांत प्राण संचरतो. निर्वात स्थितीत किती हि मन्थन केले तरी तो प्रकटणार नाही. म्हणून प्राणद हाच खरा जन्मदाता म्हणावयाचा. तोच खरा मातापिता आहे. मातापिता जीवाला जन्म देतात खरे, पण ते जीवांत प्राणसंचार नाही करू शकत. म्हणून प्राणद परमात्माच सर्व व्यक्तींचा मातापिता होय. प्राणच जीव होय आणि तो देणारा परमात्मा होय.

" प्राणेन आत्मना अनुप्रविश्य " अशी श्रुति आहे. आणि " वायुः अनिलं अमृतम् " अशी हि श्रुति आहे. या दोन्ही जीवाचें प्राणरूपत्व च सिद्ध करतात. त्या श्रुति जीवाचा प्रवेश आणि निर्गम हे दोन्ही अन्त किंरूप आहेत तें सुचवितात. त्यावरून त्याचे प्राणरूपत्व सिद्ध होते. त्याचा मध्य तर उघडच प्राणरूप आहे. विज्ञानाने अद्भुत प्रगति केली असली तरी त्याला प्राण निर्माण करता आलेला नाही आणि कधी काळी करतां येणे शक्य हि नाही. कारण तें ईश्वरी रहस्य आहे. तें त्याच्याच अधीन आहे, जीवाचा तिथे लाग नाही. मानव जर प्राण निर्माण करू शकला तर तोच प्राणद होईल. तो अमर होईल. परंतु अनीश्वराला ही ईश्वरी किमया केव्हां हि हस्तगत होणे नाही. म्हणून तो परमात्माच प्राणद होय.

प्राण आणि प्राणद अशा जोड्या विष्णसहस्रांत कित्येक आल्या आहेत : वसु वसुप्रद, काम कामप्रद, सिद्धि सिद्धिद इत्यादि. जो स्वयं धनरुप धनी आहे तोच धनद होणार, दरिद्र काय देणार ? बिचारा दारिद्र हि देऊ शकत नाहीं, धन काय देईल ?

३२२. वासवानुज
वासव म्हणजे इंद्र आणि वासवानुज म्हणजे उपेन्द्र होय. उपेन्द्र हें नाम पूर्वी येऊनच गेलें आहे. इथे वासवानुज पदानें काय विशेष सांगावयाचे आहे ? वसु अष्ट आहेत. त्यांचा जो स्वामी तो वासव म्हणावयाचा. हे अष्ट वसु कोणते ? पंच ज्ञानेंद्रिये आणि तीन मन, बुद्धि व अहंकार असे हे अष्ट वसु आहेत. यांच्या ठाई प्राणरूप जीव वसति करून राहतो म्हणून तो वासव म्हणावयाचा. अथवा वसु म्हणजे धन, त्या अष्टविध धनाचा धनी म्हणून वासव, हा जीव हे पूर्व रूप होय, साधनेच्या दृष्टीने परमात्मा हे साधनेने सिद्ध करावयाचे उत्तर रूप होय. म्हणून परमात्मा हा वासवानुज, वासवाच्या पाठचा भाऊ म्हणावयाचा. वासवानुज पदानें हाच विशेष सांगितला आहे. काठीची दोन टोकें जशी नित्य संबद्ध असतात तशी ही पूर्वोत्तर रूपें होत. त्यांचे हे नित्य संबध्दत्व उपनिषदाच्या पुढील वचनांत, " सयुजौ " म्हणजे जुळे या पदानें प्रदर्शित केलें आहे : " द्वा सुपर्णा सयुजा सखाया " ह्या वचनांत ते नुसतेजुळेच नाही तर सनाम हि आहेत असे म्हटले आहे, " सखाया " म्हटले आहेत. जीवात्मा परमात्मा दोन्ही आत्माच आहेत. सधूम हि अग्निच, निधूम हि अग्निच. पण सधूम हे पूर्व रूप आहे, निधूम हे उत्तर रूप आहे. अग्नि जेव्हां निधूम होऊन आपल्या पूर्ण तेजाने तळपतो तेव्हांच तो " स्वे महिम्नि प्रतिष्ठित" होतो. तसाच जेव्हां जीव निर्वासन होऊन आपल्या विशुद्ध म्हणजेच शिव रुपास प्राप्त होतो तेव्हांच तो " स्वे महिम्नि प्रतिष्ठित" होतो. सधूम अग्निवत् जीव आहे. निधुम अग्निवत् जीवन्मुक्त, आणि निरिन्धन शान्त अग्निवत् परमात्मा, जीव सदेह आणि देहाभिमानी, जीवन्मुक्त सदेहपण निरभिमान आणि परमात्मा विदेह उपशान्त स्वरूप असा आहे. व्यवहारांत अग्रज हा ज्येष्ठ मानला जातो, वरिष्ठ समजला जातो. परंतु इथे परमार्थांत तर अनुजच श्रेष्ठ नि वरिष्ठ होय. कारण ते उत्तर रूप आहे. उत्तम आहे.

३२३ अपां-निधि
अप् म्हणजे पाणी अपां निधि म्हणजे समुद्र होय. तो सर्व जलांचे, सर्व प्रवाहांचे, मायपोट आहे. सर्व प्रवाह त्यांतून उद्भूत होतात आणि त्यांतच संगत होतात. समुद्राच्या पोटांत काय काय भरलें आहे आणि किती किती भरले आहे हे कोणाला सांगता येत नाही. परमात्मा हा तसा सर्व संग्रह आहे. तो सर्वांचा उद्भव आहे आणि सर्वांचा विलय हि तोच आहे. हा समस्त संसारप्रवाह त्याच्यापासून निघालेला असून शेवटीं तो त्यांत च विलीन होतो. गीतेत म्हटल्याप्रमाणे "अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त-मध्यानि भारत । अव्यक्तनिधनानि एव" ही सर्व भूतें जी व्यक्त दिसत आहेत ती सर्व अव्यक्ताच्या पोटांतून आलेली आहेत आणि शेवटीं अव्यक्तांतच गडप व्हावयाची आहेत. ते जें अनन्तपार अव्यक्त तोच अपांनिधि होय. मनुनें याच सृष्टिपूर्व अव्यक्ताचे वर्णन पुढील शब्दांत केले आहे आसीद् इदं तमोभूतं अप्रज्ञातं अलक्षणम् ।
अप्रतयं अविज्ञेयं प्रसुप्तमिव सर्वतः ॥


हा जो सृष्टिपूर्व अव्यक्तार्णव तोच सृष्टिप्रलयोत्तर हि एकजिनसी दिसावयाचा. मध्यंतरी त्यावर सृष्टीचे तरंग आणि बुडबुडे क्षणकाल दिसतात इतकेंच. तेहि त्याच्या पृष्ठ भागावरच. असा हा एकार्णव परमात्म्याहून वेगळा काय असणार ? परमात्याचीच ती प्रकृति होय. प्रकृति 'म्हणजे सहज 'स्थति. मूल स्थिति. प्रकृति आणि प्रकृतिमंत ही आपण वेगळी करू शकत नाही. औष्ण्य ही अग्नीची प्रकृति होय. प्रभा ही सूर्याची प्रकृति होय. उष्णतेविना अग्नीची, प्रभेविना सूर्याची आपण कल्पनाच करू शकत नाहीं. परमात्माहि तसा अव्यक्त-प्रकृति आहे. या प्रकृतीला स्त्री आणि प्रकृतिमंताला पुरुष म्हणून कवींनी जाळी विणली आहेत आणि त्यांत ते स्वतः हि फसले आहेत. अर्धनारी नटेश, वामांकारूढ-सीतामुखकमल-मिलल्लोचन राम इत्यादि दर्शनं, काव्ये आणि चित्रे हयांतूनच. मर्यादा पुरुषोत्तम राम जर सीतेला मांडीवर घेऊन दरबारांत बसतो तर आम्ही स्त्री-पुरुषांचे स्वैर चित्रण केलें तर सनातनी लोकांनी, कोल्हेकुई का करावी, असे कुतर्क कविब्रुव करू लागतात.

३२४. अधिष्ठान
सत् चित् आनन्द हा ब्रह्माचा त्रिविध निर्देश आहे. हे ब्रह्म या जगदाभासाचे अधिष्ठान आहे. म्हणून परमात्म्याला अधिष्ठान म्हणावयाचें. ॐ सारखें जिथे एकच नाम आहे तिथे प्रश्न नाही. पण जिथे सत् चिद् आनंद अशी अनेक नामें आहेत तिथे त्यांच्या क्रमाचा विचार करावा लागतो. "आणि त्यांत ज्याला प्राथम्य मिळेल तेच खरें अधिष्ठान म्हणावे लागेल. आनंद हा चेतनाचा धर्म आहे. अचेतनाचा नव्हे. म्हणून जिथे आनन्द तिथे तदुपादानभूत चैतन्य असलेच पाहिजे. म्हणून चेतन गृहीत झाले. पण चेतन वा अचेतन हे सन्मूलकच असू शकेल, असन्मूलक कदापि नाही. म्हणून सर्वादि सत् मानावे लागते. अशा प्रकारे सत् हेच सर्वाधिष्ठान होय. तें सत् चिद्रूप नसेल तर तिथे अनुभूति, प्रत्यय, जाण असू शकणार नाही. म्हणून तेंच -चित् हि मानावे लागत, आणि ते चित् आत्मतुष्ट न मानल्यास तें पराधीन राहील आणि "पराधीन सपनेहुं सुखी " या न्यायाने तें सदैव दुःखी राहील. परंतु चेतन ' हा सदैव सुखाकांक्षीच असल्यामुळे तें चित् सुखरूप वा आनन्दरुपच मानावे लागते. म्हणून त्यालाच आनंद हि म्हटले आहे. अशा प्रकारें विश्वाधिष्ठान ब्रह्म हे सच्चिदानंदस्वरूप होय, लांबी रुंदी उंची ही जशी वस्तूची त्रिपरिमाणे तशी सत् चित् आनन्द ही ब्रह्माची त्रिपरिमाणे होत. लांबीचा वा रुंदीचा वा उंचीचा एक कण घेतला तर त्यांत अन्य दोन परिमाणांचा हि कण आल्यावांचून राहत नाही. अर्थात् तिन्हीं अभिन्न एकरूप होत. तसाच हा सच्चिदानंद ब्रह्माचा प्रकार आहे. तिन्ही अभिन्न एकरूप होत. हा यांत्रिक समुच्चय नाहीं अथवा हे रासायनिक मिश्रण हि नाही. हे आहे आध्यात्मिक ऐक्य. ह्यांत त्रिदल बिल्वपत्रवत् स्वगत भेदाला हि थारा नाही. असत्ता जडता आणि दुःखरूपता यांच्या व्यावृत्तीसाठी ती तीन पदें योजिलेली आहेत, वस्तुत्रैविध्यासाठी नहे. अपांनिधिपदानें अव्यक्त प्रकृति आणि त्यापुढे लगेंच अधिष्ठान पदाने अक्षर पुरुष इथें अभिप्रेत आहे.

३२५. अप्रमत्त
अप्रमत्त म्हणजे आपल्या कर्तव्यांत प्रमाद न करणारा हा जो प्रमाद होतो तो कां ? तो मोहामुळे होत असतो. या मोहाचे स्वरूप काय ? अहंता ममता हे आहे या मोहाचे स्वरूप. हा देह म्हणजे 'मी' आणि या देहाचे संबंधी ते 'माझे'अशा धारणेतून जी निष्पन्न होते ती वृत्ति, विचार आणि वर्तन ही सगळी मोहाची संतति होय. या मोहमृगजळाच्या पुरांत सारे विश्व जरी बुडाले असले तरी परमात्मा त्या पासून पूर्ण अलिप्त आहे. कारण तो देहरहित आणि देहाभिमानमुक्त असल्यामुळे त्याला " मी आणि माझें" यांचा दुरूनहि स्पर्श होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच तो अप्रमत्त म्हटला आहे. तो सर्वांना स्वकर्मानुसार बरे वाईट फळ देतो. त्यांत कुठें हि अणुमात्र देखील पक्षपात होत नाही. फलदानांत जसा तो अप्रमत्त' आहे, तसा तो ज्ञानदानांत हि अप्रमत्त आहे. कालरूपाने तो सर्वांचे सर्वस्व हरण करीत असतो आणि जीवांना त्यांच्या संग्रहाचें नश्वरत्व आणि दुःखरुपत्व पटवून आत्मज्ञानप्रवण करीत असतो. हे खरें त्याचे कर्तव आहे. ज्ञान अज्ञानाचा निरास करील नाहीतर काय करील ? प्रकाश तमाचा लोप करूनच प्रकाशत असतो. तसा परमात्मा अज्ञान-विध्वंस करूनच'स्वे महिम्नि' प्रतिष्ठित’ होत असतो. विराजमान होत असतो. आणि हा अज्ञानविध्वंसन कार्यात तो सदैव अप्रमत्त असतो. जीव हा सदैव प्रमत्त आहे, तसा परमात्मा हा सदैव अप्रमत्त आहे. म्हणूनच म्हटले आहे भागवतांत :

प्रमत्तमुच्चैरितिकृत्यचिन्तया प्रवृद्धलोभं विषयेषु लालसम् ।
त्वमप्रमत्तः सहसाभिपद्यसे क्षुल्लेलिहानोऽहिरिवाखुमन्तकः ॥


अप्रमत्त कालस्वरूप परमात्म्याचे आणि प्रमत्त लोभाभिभूत जीवाचे किती समर्पक चित्र रेखाटले आहे हे ! उंदीर खमंग पदार्थ खायला धडपडतो आहे आणि जिभल्या चाटणारा सर्प त्याला गट्ट करायला टपून बसला आहे. उंदराच्या तोंडांत पदार्थ पडण्याआधी तोच सर्पाच्या तोंडांत पडतो आहे. असा हा जीव प्रमत्त आणि परमात्मा तद्विलक्षण अप्रमत्त आहे.

३२६. प्रतिष्ठित
परमात्मा कोणाच्या ठाई प्रतिष्ठित आहे ? ज्या प्रतिष्ठेवर तो प्रतिष्ठित असेल ती त्याहून वरिष्ठ म्हटली जाईल. आधेयापेक्षां आधार मोठा म्हटला पाहिजे. पृथिवी आप तेज वायु आकाश ही तत्त्वे एकाहून एक मोठी अशी आहेत. अर्थात् ती पूर्वपूर्वाचा आधार होत. पण त्या आकाशाला हि आपल्या एका कोपऱ्यांत जिरविणारे जें बृहत्तम तत्त्व तेंच ब्रह्म होय. त्याला आधार कुठला ? तें निराधार म्हणायचे का ? नाही. तें निराधार नाही. तें स्वाधार आहे. ते आपल्याच पायावर उभे आहे. गोत्व गाईच्या ठाईं प्रतिष्ठित आहे आणि गाय गोत्वाच्या ठाई प्रतिष्ठित आहे. तसे परमात्मत्व परमात्म्याच्या ठाई प्रतिष्ठित आहे आणि परमात्मा आपल्या परमातमत्वांत प्रतिष्ठित आहे. जो आपल्या स्वत्वांत प्रतिष्ठित नाही तोच अप्रतिष्ठित होय, परमात्मा हा परप्रतिष्ठित नाहीं तो स्वप्रतिष्ठित आहे. जो स्वातिष्ठित म्हणने स्वत्वप्रतिष्ठित आहे तोच सुप्रतित होय.

परमात्मा हा प्रतिजीव रतिदेह प्रतिव्यक्ति प्रत्यगात्मरूपानें स्थित असल्यामुळे - तो प्रतिष्ठित म्हणावा. अन्तर्यामी म्हणून सर्वत्र स्थित असल्यामुळे तो प्रतिष्ठित होय. प्रतिव्यक्ति स्थित असलेला हा अन्तरात्माच ब्रह्माची हि प्रतिष्ठा म्हटला आहे:

ब्रह्मणो हि पप्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ गीता १४ -२७


आत्मोपलब्धि हीच सर्व उपलब्धींचा आधार होय म्हणून च तो आत्मा म्हणजे निजात्मा परमात्म्याचा आणि तद् द्वारा मोक्षाचा, त्याच प्रमाणे शाश्वत धर्माचा आणि तद्द्वारा परमसुखाचा आधार होय. आणि असे त्याचें गौरव असल्यामुळे तो प्रतिष्ठित म्हणावयाचा. प्रत्यगात्मा सर्वोपलब्धीचा मूलाधार म्हणून प्रतिष्ठित तर परमात्मा सर्वान्तर्यामी म्हणून प्रतिष्ठित.

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP