ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः ।
हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥२१॥


१८९. मरीचि
मरीचि म्हणजे तेज:शलाका, प्रकाशाचा किरण. ही बाह्य सृष्टि निर्माण झाली त्यापूर्वी तिच्या जातकर्माचे जे निरीक्षक व व्यवस्थापक देवाने नियुक्त केले होते ते म्हणजे सप्तर्षि आणि चार मनु होत. हे सर्व ईश्वराचे मानस भाव होत. पैकी सप्तर्षि हे सृष्टीत जन्मलेल्या जीवांच्या मुक्तीची चिंता वाहणारे होत. ' त्यांनी सृष्टिबाळाच्या जीवनाची अशी पूर्ण व्यवस्था लावून दिली आहे. त्या सप्तर्षी पैकी एक आणि प्रथम तो मरीचि होय. सूर्य हा सहस्ररश्मि म्हटला जातो. सहस्र ही संख्या अनन्ताचें उपलक्षण होय, अर्थात् सहस्र-रश्मि म्हणजे असंख्य-रश्मिच होय, सहस्र अनन्ताचे तसा सूर्य हि अनन्ताचे म्हणजे परमात्म्याचे गमक होय. अनन्ताच्या अनन्त किरणांची संख्येने गणति शक्य नसली तरी मानव बुद्धि हार मानायला तयार नाही. तिने त्यांची विधेनें गणति केली आहे. सूर्य-किरण सप्तविध आहे, सप्तवर्ण आहे. हे सात वर्णच सप्तर्षि होत. कां की ते सर्व दर्शनशक्ति-संपन्न आहेत. त्यांच्यापैकी प्रथम वर्ण जो तांबडा तो मरीचि होय. प्रथम तांबडे फुटते, आणि मग सूर्योदय होतो. अशा प्रकारे ताम्रवर्ण हा सृष्टीचा आरंभक वर्ण आहे आणि म्हणून तोच मरीचि म्हणावयाचा. "मरीचिर मरुतां अस्मि'म्हणून ४९ मरुद्गणांपैकी जो प्रमुख मरुत् भगवद्-विभूति म्हणून म्हटला आहे तो या मरीचीहून वेगळा. तथापि तो हि सप्त सप्तकांपैकी असून सप्तसप्तांत प्रथम होय. मरीचि शब्द मृ-धातुज भासला तरी तो प्राणद आहे. मृग-मरीचिका इत्यादि शब्दांत त्याचें तेजःस्वरूप प्रकट आहे. परमेश्वरी तेजापासून ही सर्व सृष्टि निर्माण झाली आहे आणि तिचा मूलस्तंभ मरीचि आहे. सर्व सृष्टि वर्णमय आहे आणि तिचा पहिला वर्ण मरीचि आहे. सर्व संगीत सप्त-स्वरात्मक तसें सर्व जगत् सप्तवर्णात्मक आहे. आणि मरीचि त्याचा आद्य आहे. म्हणून परमेश्वराला मरीचि म्हटले आहे.

१९०. दमन
दमन म्हणजे दान्त, विनीत, शिक्षित करणारा. सर्व दमन म्हणजे सर्व प्रजांना स्वधर्मानुसार वागायला शिकविणारा. भरत हा सर्व-दमन होता. तो सर्व प्रजांना आपआपल्या स्वधर्मात नियमित करीत होता. परमात्मा हि तसा त्या सबंध विश्वाला, त्यांतील वस्तुमानाला, आपल्या स्वभावाने बांधून गुणकर्म-विभागश: मार्गाधारे वर्तवीत आहे. त्याला आडवाटेला जाऊ देत नाही. वळू ठेचून शिकवावयाचा 'असतो. त्याला दम्य म्हणतात. तो जेव्हां ठेचला व शिकवला जाऊन तयार होतो तेव्हांच तो धुर्य बनतो. सर्व जग दम्य आहे, परमात्मा हा दमन आहे. ह्या दमनापाशीं शंकराचार्यानी प्रार्थिलें आहे:

अविनयमपनय विष्णो दमय मनः शमय विषय-मृगतृष्णाम् ।
भूतदयां विस्तारय, तारंय संसार-सागरतः ॥

हे विष्णो, हे सर्व-दमना, माझा अविनय, माझा बेशिस्तपणा, स्वैराचार घालवून लाव. अर्थात् माझी इन्द्रिये दान्त, मन शान्त, आणि हृदय भूतदयेनें कोमल-कान्त कर. इन्द्रियांचे चापल्य आणि मनाचे चांचल्य दूर करून बुद्धि भूतदया-विस्तारस्वरूप स्वधर्मनिष करणे हेच विनयाधान होय. तेंच संसारांत तारक.

१९१. हंस (अहंस)
नीरक्षीरविवेकाबद्दल हंसाची ख्याति आहे. "हंस: शुचिसद्' पवित्रतीर्थ-सेवी म्हणून हि तो प्रसिद्ध आहे. तसाच तो शुभ्र आहे. परमात्मा हा तसा ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र, सदैव निरस्तकुहक असल्यामुळे परम विवेकी आणि पवित्र हृदयांत वास्तव्य करणारा, ज्ञाननिर्धूत-कल्मष यज्ञ-क्षपितकल्मष अनन्य-भक्तांच्या मानस-सरोवरांत विहार करणारा, म्हणून शुचिसद् होय.

"अहंसः" असाहि पाठ घेणे शक्य आहे. अहन् स: या पदांची ती संहिता आहे. परमात्मा हा अहिंसक आहे. "न हिनस्ति आत्मना आत्मानम्". जिथे एकमेवाद्वितीय असें एकत्व आहे, तिथे कोण कुणाला मारणार ?

अहम् आणि स: असा हि द्विपदात्मक पाठ कल्पिता येईल. हृदयांत संस्फुरणारें में अहम्‌रूप स्वतत्त्व तें परमात्माच होय. सः म्हणजे तदरूपाने ओळखले जाणारे परतत्त्व हि परमात्माच आहे. आणि असें असल्यामुळे 'सोऽहं'-भावानें उपासिले जाणारे व उपासना करणारे तत्त्व हि तो परमात्माच आहे.

१९२. सुपर्ण
द्वा सुपर्णा सयुजा सखाया, समानं वृक्ष परिषस्वजाते ।
तयोरन्य: पिप्पलं स्वादु अत्ति, अनभ्नन्न् अन्यो अभिचाकशीति ॥

"दोन जुळे आणि एकाच नांवाचे पक्षी एकाच वृक्षाचा आश्रय करून रहात आहेत. त्यांच्या पैकी एक त्या वृक्षाचे फळ चाखतो, दुसरा मात्र ते न चाखतां नुसते पाहतो" असा एक उपनिषत्-श्लोक आहे. सुपर्ण हे नाव घेतांच तो आठवतो. देहसंज्ञक कर्माच्या वृक्षावर जीवेश्वर हे दोन चेतन रात्रिवासास राहतात. त्यांतील जीव कर्माचे (कर्तृत्व) भोक्तृत्व घेतो, ईश्वर तें न घेता नुसता साक्षी राहतो. हा जो दुसरा अकर्ता अभोक्ता केवळ साक्षिरूप चेतन तोच हा सुपर्ण होय. पक्षी झाडाला कायमचा बांधलेला नसतो. तो तिथे रैन-बसेरा करून आकाशांत भरारी मारतो. तो सरपटणारा भूचर नाही, तर गगनविहारी आहे. तो बद्ध नव्हे, मुक्त-स्वभाव आहे. म्हणून त्याला सुपर्ण म्हणजे पक्षिराज म्हटले आहे. बिंबप्रतिबिंबवत् ईश्वर आणि जीव हे जुळे आहेत. परंतु बिच स्वतंत्र आहे. प्रतिबिंब अस्वतंत्र, तें सदैव बिब-परतंत्र राहतें. म्हणून देवालयांत विष्णुपुढें गरुड हा अंकित म्हणून सदैव उभा असतो. विष्णु सेव्य, सुपर्ण गरुड सेवक, सुपर्ण-स्वामी म्हणून विष्णुसदैव गरुडारुढच असावयाचा, गरुडवाहनच असावयाचा. दोहोंची जोडी कधी फुटावयाची नाही.

१९३. भुजगोत्तम
सुपर्णाच्या चिंतनांत म्हटलें की परमात्मा मुक्त-स्वभाव असल्यामुळे तो आकाशांत भरारी मारणारा आहे, भूमीवर लोळणारा, सरपटणारा नाही. परंतु लगेच पुढे त्याला सरपटणाऱ्यांचा सरदार म्हटले आहे, भुजगोत्तम म्हणून ! " तुका म्हणे जें जें बोला तें तें साजे या विठ्ठला " हेच खरें ! भरारी मारणारा, तसा तो सरपटणारा हि आहे. सर्प पन्नग असल्यामुळे आपल्या पावलांची चाहूल लागू देत नाही. तो अनिमेष नेत्रांनी पाहत असतो. पापण्या नसल्यामुळे त्याचे डोळे कधी बंदच होत नाहीत. तो लांबलचक असतो. तो अदृश्य असतो, तो काळा असतो. आणि विशेष म्हणजे तो भक्ष्याला पार गट्ट करून टाकतो. तो कात टाकून चिरतरुण आणि प्राणायामाने चिरंजीव झाला आहे. हे सर्व गुण परमेश्वराच्या ठाई आहेत. परमेश्वर काल-स्वरूप आहे. तो अनादि आणि अनन्त असल्यामुळे सुदीर्घ आहे. तो अदृश्य आणि अव्यक्तगति आहे. चिद्रूपत्वामुळे तो निरंतर साक्षि -भूत आहे. भूतकाळाची कात टाकून तो सदैव नवा नवा होत असतो. असा तो अजर आणि अमर आहे. सर्पाप्रमाणेच तो निर्भय स्वजात-भक्षीहि आहे. शेवटी हे सारें स्वजात विश्व तो गिळून टाकतो. त्याचे नांवनिशाण राहू देत नाही. आणि ह्याचे काही एक . सुखदुःख त्याला नाही. अशा ह्या परमेश्वराला भुजगोत्तम कां न म्हणावें ? सर्पाला भोगी म्हणतात, पण खरोबर तो महायोगीच होय. परमात्मा हि तसाच महायोगी आहे. म्हणून तो भुजगोत्तम, परमात्मा हा योग-स्वरूप असल्यामुळे त्याची योगमयता दाखविण्यासाठी त्याच्या अंगाअंगावर सर्पाची लेणी लेवविली आहेत. शेष-शायी विष्णु योगशायी होय, भुजगभूषण शिव योगीश्वर होय. भुजगशयन विष्णु योगेश्वर होय.

१९४. हिरण्यनाभ
कमलाच्या कंदाच्या नाभीतून म्हणजे डोळयांतून कमलनाल फुटते आणि त्यावर कमल फुलते. म्हणून कमलकंद हा पद्मनाभ होय. त्याप्रमाणे ज्याच्या नाभीतून हिरण्य उत्पन्न होतें तो हिरण्यनाभ म्हणायाचा. अर्थात् हिरण्य हे एक पीक आहे. ती एक उद्भिज्ज वस्तु आहे. ती खनिज वस्तु नाही. असे हे उद्भिज्ज सोने म्हणजे जीवनाधार असणारें अन्नधान्य होय, ते या काळीच्या कुशीतून फुटते म्हणून हा मृत्कणच हिरण्यनाभ होय, सोने पिकवणारा होय. या कुजणाऱ्या रुजणार्या मृत्कणाच्या ठाई ही जी अन्नोत्पादन-क्षमता आहे ती सौर शक्तीच्या अनुग्रहानेंच होय. आणि हें सौर सामर्थ्यहि परमेश्वरी कृपेचेच फळ असल्यामुळे मूलत: परमेश्वरच हिरण्यनाम म्हटला आहे. ज्याला हिरण्य म्हटले जातें तें खनिज हिरण्य हा सौरशक्तीचाच घनीभूत अंश-विशेष होय. म्हणूनच म्हटले आहे.-"सूर्य आत्मा जगतस् तस्थुषश्‌ च" पण आता या दोन्ही हिरण्यांत, उद्भिज्ज आणि खनिज हिरण्यांत, उद्भिज्ज हिरण्य म्हणजे अन्नधान्य हेच खरें हिरण्य होय. असें इसापाचा कोंबडा कंठरवाने सांगत आला आहे. पण 'तें एक रामदासें हि ऐकिलें नाही. तेहि ' प्रपंची पाहिजे सुवर्ण ' म्हणून लिहून चुकले आहेत. अशी आहे हिरण्याची मोहिनी, ही भुलीची भारणी !

१९५. सु-तप (सु-तपाः)
ज्या ज्या योगें कोणाला कष्ट होतात, कोणाची हिंसा होते, तें तप नसून तो ताप होय, अविचार होय. ज्याच्या योगें आत्मशुद्धि होते आणि सुखवृद्धि होते तें तप होय, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इत्यादि यम आणि शौच, स्वाध्याय, संतोष, शरीरश्रम इत्यादि नियम हें नवविध वा बहुविध म्हणा, तप होय. तें काया वाचा मने आणि निरलसपणे निष्काम भावानें व श्रद्धापूर्वक आचरिलें जाते तेव्हां तें सुतप म्हटले जाते. असें सुतप आचरीत नरनारायण बदरिकाश्रमांत बसले आहेत. मानवाचें कर्तव्य काय ते आपल्या उदाहरणानेच, शब्दाने नव्हे, ते सांगत आहेत. वस्तुतः परमात्मा अव्यक्तमूर्ति आहे. पण मानवाला मानवाकृतिच मानवणारी आहे रुचणारी आणि पचणारी आहे म्हणून तो नराकृति नारायण आजतागायत सुचिर तपश्चर्या करीत

नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामान् अर्हते, विङ्भुजां ये ।
तपो दिव्यं पुत्रका, येन सत्त्वं शुध्येद्यस्मात् ब्रह्मसौख्यं त्वनन्तम् ॥

हा संदेश नव्हे, आदेश देत आहे. असा तो परमात्मा 'सुतपाः' होय.

१९६. पद्मनाभ
परमेश्वर हिरण्यनाभ तसा पद्मनाभ हि आहे. हिरण्य जड आहे. पद्य चेतन आहे. परमात्मा या जडचेतन समस्त विश्वाचाजनक आहे. त्याच्याचपासून हे सारें चराचर विश्व निर्माण झाले आहे. सर्व उद्भिज्जांमध्ये कमळ हे परम सुंदर होय, जसें सर्व खनिजांमध्ये हिरण्य, त्यांच्या स्वजातिशिरोमणित्वामुळेच परमेश्वराला पद्मनाभ आणि हिरण्यनाभ म्हटले आहे. अर्थात् पर्यायाने ती जड़-चेतनांचे प्रतिनिधित्व करतात. आणि अशा प्रकारें परमेश्वर हा स्थावरजंगमांचा जनक म्हटला जातो. पद् धातु गति-वाचक आहे आणि त्यापासूनच पद्य शब्द साधलेला असल्यामुळे तें चराचराचा प्रतिनिधि होतें. जगत् हि गतिशील असल्यामुळे आणि तें हि गतिवाचक गम् धातुपासून व्युत्पादिलें असल्यामुळे त्याला लक्षणेनें पद्म असें म्हणतात. आणि ज्या अर्थी हे लोकपद्म अव्यक्त जलाशयाच्या तळाशी असलेल्या विष्णुरूप कमल कंदाच्या नाभीतून फुटलें आहे आणि व्यक्ताच्या पृष्ठावर येऊन फुललें आहे त्याअर्थी तो अव्यक्ताच्या बुडाशी खोल दडी मारून बसलेला व्यक्तमूल अक्षर परमात्माच पद्मनाभ होय.

१९७. प्रजापति
आईबाप मुलाला जन्म देऊन मोकळे होत नाहीत, ते मूल स्वावलंबी होईपर्यंत त्याचे पालन-पोषण हि करीत असतात. त्याचे जनक पालक हि होतात. त्याच प्रमाणे परमात्मा या जगाचा जनक असून तो त्याचा प्रजापति म्हणजे वत्सल पिता हि झाला आहे. लोकपद्माला जन्म देऊन ब्रह्मदेवाच्या रूपाने त्याचा अधिष्ठाता, त्यांतील जीव-निकायांचा पालक हि, तो झाला आहे. अशा प्रकारें 'पद्मनाभ: प्रजापतिः' हा क्रम साभिप्राय आहे. खरे म्हणजे 'पुरुष एव इदं सर्व यद् भूतं यच् च भव्यम् । ' या मंत्रांत म्हटल्याप्रमाणे तो परमात्मा समग्न विश्व-जीवनाचा स्वामी आहे. नामदेवाने म्हणूनच गाइलें आहे:

जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल विठ्ठल ।
जनक विठ्ठल जननी विठ्ठल सोयरा सांगाती विठ्ठल विठ्ठल ।

प्रजा शब्द संस्कृतांत सिकता, अक्षता इत्यादि शब्दांप्रमाणे नित्य-बहुवचनी असतो. कारण हे शब्द गणवाचक आहेत. वाळूच्या वा अक्षतेच्या एका दाण्यानें वालुका वा अक्षता हा समूहात्मक पदार्थ बनत नाही. त्याचप्रमाणे प्रजा ही एका योनीने वा जीवानें बनत नाही म्हणून प्रजाति म्हणजे सर्व जीवयोनींचा आणि त्यांतील सर्व व्यक्तींचा पति होय. राजाला हि प्रजापति म्हणतात. कारण तो हि सर्व वर्णाचा पति असतो, कोणा एकाच वर्णाचा नव्हे. पण प्रजापति पद हें मानवमर्यादित नाही. त्यांत जीवमात्र समाविष्ट आहे. म्हणून परमात्माच प्रजापति होय.

अमृत्युः सर्वदृक् सिंह सन्धाता सन्धिमान्स्थिरः ।
अजो दुर्मर्षणो शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥२२॥


१९८. अमृत्यु
"मृत्युः सर्वहरः" म्हटला आहे. परंतु परमात्मा हा अमृत्यु आहे, त्याला मृत्यु नाही. त्याचे काहीएक मृत्यु हरू शकत नाही. वस्तुत: तो मृत्युचा मृत्यु आहे, मृत्यूचेंच तो हरण करतो. "जें आपुलें साचें, तें कल्पान्ती हि न वचे" तें जें सर्वांचे स्वतत्त्व तेच अमृत्यु होय, त्याचा अपहार कोण कसा करणार ? व्यक्ताला अव्यक्त गिळते, क्षराला अक्षर गिळते आणि उरतें केवळ अव्यक्त आणि अक्षर असें एक आत्मतत्त्व. तेंच अमृत्यु होय. त्यालाच अमृत असें म्हणतात.

मृत्यु हा सर्वांचे निराकरण करून अतिसर्व जें अनिराकृत परमात्मतत्त्व ते दाखवून देतो. म्हणून त्याला आचार्य, परमदेशिक म्हटले आहे. नचिकेता म्हणूनच त्याच्याकडे जातो आणि " वक्ता चास्य त्वादृगन्यो न लभ्यः " म्हणून म्हणतो. त्याच्यापासून तो आत्मविद्या मिळवितो. सर्व अनात्म जगताचें अनित्यत्व आणि म्हणून परिणामी दुःखरूपत्व पटवून देणारा मृत्यूसारखा दुसरा कोण आहे ? अतद्-निराकरणाने तद्-दर्शन करवून देणारा तो परम कृपाळु आहे. अशा प्रकारे ज्ञानप्रदत्वामुळे मृत्यु हा सर्व जीवांचा परमंहितकर्ता होय. तो भयंकर नसून वस्तुतः अभयंकर आहे, शुभंकर आहे. परमात्मतत्त्व अभावात्मक नाही. परंतु जगांतील सर्व भावांहून ते विलक्षण आहे. त्याचे हे विलक्षणत्व दाखविण्यासाठी निषेधमुखाने त्याचे वर्णन करावे लागते म्हणून त्याला अमृत्यु म्हटले आहे. जोवन म्हटलें म्हणजे आमच्या मर्त्य जीवनाचे रूप आपल्या समोर येणार, पण तें जीवन क्षुधातृषातुर नाही. मृत्युग्रस्त नाही. माणून त्याला अमृत्यु म्हटले आहे. त्यामुळेच त्याचे यथार्थ आकलन होते. " क्षुधातृषा हरे निजभाव जेणें तरे । तें जीवन दीधलें बाप रखुमादेवीवरें ". तसलें जीवन म्हणजे अमृत्यु होय. तोच परमात्मा.

१९९. सर्वदृक
' जायते अस्ति वर्धत विपरिणमते अपक्षीयते नश्यति बा म्रियते ’ हे वस्तूंचे षट् विकार होत. हे सर्वचे सर्व जो पाहतो तो स्वतः अविक्रिय आत्मा सर्वदृक होय.

भूत, भविष्य, वर्तमान हे तिन्ही काळ जो स्वत: कालावच्छिन्न न होता पाहतो, तो अकाल सर्वदृक होय.

अध-ऊर्ध्व-मध्य वा अवान्तर दिग्भेद अनन्तत्वामुळे ज्याच्या ठाई संभवत नाहीत आणि म्हणून जो सर्व सान्त दिग्देश पाहतो तो दिग्दिगंताना सान्तत्वाने पाहणारा अखण्ड मण्डलाकार अनन्त परमात्माच सर्वदृक् होय.

सूर्य तसा डोळा साऱ्या जगाला पाहतो, पण स्वत:ला पाहूं शकत नाही. अशाला सर्वदृक् कते म्हणता येईल ? म्हणून जो सबाहयाभ्यंतर पाहतो, तो स्वदृग्‌ च सर्वदृक् होय.

कार्यमात्र कारणाधीन असते. कारण एक, त्याची कायें अनेक. जो एका कारणाला पाहतो, तो समस्त कार्याना पाहतो. म्हणून जो कारणदृक् तोच सर्वदृक्होय. ब्रह्म हे जगाचे कारण असल्यामुळे तें जो पाहतो तो सर्वदृक् होय.

२००. सिंह
नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जित-सत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता ॥ सुभाषितसंग्रह

सिंह हा आपल्या स्वाभाविक महत्तेनेच वनराज झाला आहे. मृगेन्द्र झाला आहे. तसा परमात्मा हा स्वभावत:च परमात्मा आहे. सर्वश्रेष्ठ आहे. त्या श्रेष्ठतेसाठी त्याला काही एक करावयाची गरज नाही. त्याची सर्वश्रेष्ठता कृतक नाही. " न तत्समोऽस्त्यभ्यधिक: कुतोऽन्य: ?" त्याचें नाम, रूप, गुण, कर्म सर्व अनन्यसाधारण आहे. तो पंचानन असुर-यूथपांचा लीलेनें फडशा पाडतो, असे म्हणणे म्हणजे त्याचा गौरव करणे नव्हे. त्याच्या नामानेच पापतापांच्या गजघटा बारा वाटा पळ काढतात. त्याचे रूप अतिभयंकर आहे. हिंसातिहिंस्र प्राणी हि त्याच्याकडे आपली हिंस्रता टाकून अतिलीन होऊन येतात. सुषुप्तीत सर्व जीव, सिंह व्याघ्र हि, त्याच्याच कुशीत निर्भय होऊन झोपत असतात. त्याचे गुण अनन्त आहेत. त्याच्यासारखा गुणी कोणीच नाही. कारण प्रत्यगात्मरूपाने तो सर्वान्तर्यामी, सर्वांच्या सर्व गुणांचा एकमात्र स्वामी आहे. त्याचे कर्म, त्याचा पराक्रम, विश्वविदित आहे. या विश्वाची उत्पत्ति स्थिति गति दुसरा कोण करतो ? असा तो परमात्म-सिंह अनात्म-गजयूथ-पंचानन गाजतो आहे !

सर्वदृक् म्हणजे सर्वाध्यक्ष नंतर सिंह पद आलें आहे त्यामुळे त्याचा अर्थ सर्वशास्ता असा होतो. राजा सिंहासनावर बसत असतो. अर्थात् सिंह म्हणजे सर्वशास्ता, सर्वेश्वर.

शतक तिसरे
२०१. संधाता
जागृति, स्वप्‍न, सुषुप्ति या तिन्ही अवस्थांतून रोजच्या रोज जीव जात असतो. बाल्य, कौमार, यौवन, वार्धक्य हा कायापालट हि जीवाचा आयुष्यभर चालला असतो. जन्मून मरणे आणि मरुन परत जन्मणे असा देह-देहान्तर-प्राप्ति प्रकारहि अखंड सुरूच असतो. या सर्व परस्पर-भिन्न जीवदशांना जोडणारा, त्यांच्या पालटाने न पालटणारा, तोच हा मी असें अनुस्यूत प्रत्यभिज्ञान करून देगारा जो सूत्रात्मा तोच संघाता होय.
जीवात्मा म्हणून जीवाच्या भिन्न दशांनाच तो जोडत नाही, तर चिदात्मा म्हणून परस्परभिन्न जीवांना हि तो जोडतो. अग्नि, विद्युत् आणि सूर्य सगळे एकच तेजोरूप होय. तो तूं मी सर्वच पुरुष होय, जीव हि पुरुष, शिव हि पुरुष, शेवटी जीव आणि अजीव, जड आणि चेतन हा भेदहि अभेदच होतो. चेतन पुरुषापासूनच नखलोमादि अचेतन जड पदार्थ निर्माण होतात. आणि कार्यमात्र कारणरूप असल्यामुळे हे सारेच चेतन ठरते. ’नेह नानास्ति किंचन । ' 'पुरुष एव इदं सर्वम् । ' असा परम पुरुष वृत्ति, अवस्था, देह-देहान्तरें, पुरुष-भेद आणि प्रकृति-पुरुषभेद इत्यादि कुठल्याहि औपाधिक भेदांनीं छिन्न-भिन्न न होणारा परमात्मा सर्वत्र संधाता आहे. तो कुठे फट राहू देत नाही. त्याचे संधान कुठे नाही असें नाहींच. तो सर्वत्र एकसंध आहे.

२०२. संधिमान्
परमात्मा सर्वत्र सम असल्यामुळे त्याचा कोणाशी कधी विग्रह होत नाही. इतकेच काय, पण कोणाशी कधी अवग्रह हि होत नाही. त्यामुळे तो सदैव आणि सर्वत्र सन्धिमान् आहे. जगांत दोघांमध्ये काही कारणाने विग्रह होतो आणि कालांतराने ते संधि करतात. हा संधि हि कालांतराने मोडतो आणि ते परत अवगृहीत आणि विगृहीत होतात. अशा प्रकारें जगाच्या व्यवहारांचे स्वरूप संधिविग्रहयुक्त आहे. परमात्म्याचे तसे नाही. तो सदैच संधिमानच आहे. .

वासे बहूनां कलहो भवेद् वार्ता द्वयोरपि ।
एक एव चरेत् तस्मात् कुमार्या इव कङ्कणः ॥ भाग, ११.९.१०

हे अवधूत-सूत्र त्याने पक्कै पकडले आहे. या विश्वांत तोच एकमेवाद्वितीय वसतो आहे. त्यामुळे द्वितीयापासून होणारें भय, वार्ता वा विग्रह त्याला नाही. त्यामुळे तो नित्य संधिमानच आहे. सर्वत्र त्याचे मैत्र आहे.

विश्वांत परमात्मा ओतप्रोत भरला आहे.. परमात्म्यांत सारें विश्व एकवटलें आहे तंतुपटवत.' कारणरूपानें तो संधाता आहे, कार्यरूपाने संधिमान् आहे. कार्याचा कारणाशी नित्य संधि असतो. कारणाला सोडून कार्य कधी राहू शकत नाही. कारण स्वतंत्र आहे. तें स्वरूपाने राहील वा कार्यरूपाने राहील. परमात्मा सर्वत्र संधाता आहे, अनुस्यूत आहे. तसें सारे विश्व त्याच्या ठाई 'सूत्रे मणिगणा इव ’ प्रोत आहे, संहित आहे, एकवटले आहे, म्हणून तो संघिमान्.

२०३. स्थिर
ज्या कोणाशीच वैर विग्रह नाही तो सर्वांचा सखा, सर्वांना जोडणारा आणि सर्व ज्याला जोडले आहेत असा, संधाता आणि संधिमानच, स्नेही आणि स्निग्धच, स्थिर म्हणजे अचल-प्रतिष्ठ या पदवीस पात्र होय. ज्याचें कोणाशी वैर आहे, विग्रह आहे, तो केवढा हि पराक्रमी असो, तो गोत्यांत आल्याशिवाय राहत नाही. तो गोंधळतो, गडबडतो. जगांत निष्कंप स्थिर असे जर काही असेल तर तें एक प्रेमनिधान आत्मतत्त्वच होय, जें जगांत आत्मव्यतिरिक्त दुसरें कांहीं पाहतच नाही आणि म्हणून जें सर्वत्र समदृष्टीने केवळ प्रेमाचाच व्यवहार करतें.

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मान ततो याति पर गतिम् ॥ गीता १३-२८

समदर्शन म्हणजे सर्वत्र आत्मदर्शन, त्याचा विनियोग सम-व्यवहार म्हणजे निरपवाद अहिंसा, तिचे फलित परमसाम्य म्हणजे निष्कंप स्थिरता होय. समदर्शनमूलक अहिंसामय निष्कंप स्थिति ज्यानें स्वभावत:च साधली आहे, तो परमात्माच स्थिर होय.

२०४. अज
अज म्हणजे जन्मादि-विकाररहित या अर्थाने नञ्समासरूप अज शब्द पूर्वी येऊन गेलाच आहे. आता हा दुसरा अज कोणता ? हा अज म्हणजे अव्यक्त अक्षरब्रह्म त्यापासून होणारा जो प्रथम जंतु ब्रह्मदेव तो होय. तो 'अ-जात असल्यामुळे अज होय. हा उपपद तत्पुरुष होय. नञ्समास म्हणूनहि त्याची व्यवस्था लावता येतेच. ही जी सबंध जीव-सृष्टि आहे ती बाहयसर्गान्तर्गत असल्यामुळे आणि तिच्यांत तो समाविष्ट होत नसल्यामुळे, त्याला अज म्हणजे न जन्मणारा असे म्हटले जाते. इथें ज म्हणजे जन्मलेला जीव एवढाच अर्थ नाहीं तर ज म्हणजे जन्य, जात असाहि अर्थ घ्यावयाचा आहे. ब्रह्मदेव अज आहे, म्हणजे तो जन्य नसून जनक आहे, असा अर्थ. त्या अर्थाने त्याला स्वयंभू आणि प्रजापति अशी हि दुसरी नांवें आहेत. सृष्टीचे मूल तत्त्व हे तत्वत: स्वयंभू आणि विश्वजनक असेंच मानावे लागते. तसें न मानल्यास जन्य-जनक संबंधाची अनर्थ-परंपरा संपणारच नाहीं.

कारण हें अव्यक्त आणि अक्षर आहे. त्या अर्थानं परमात्मा ' न जायते इति अज ! ' आहे. त्या अर्थाने अज शब्द पूर्वी येऊन गेला आहे. आता इथें तो कार्य हे सदैव अव्यक्ताक्षररूप कारणापासूनच झालेलें असते आणि ते कारण-भिन्न नसते म्हणून अ-जात, अव्यक्ताक्षरजनित म्हणून अज अशा तत्पुरुष समासाच्या अर्थानं आला आहे. परमात्मा कारण आहे आणि तो कार्य हि आहे. आणि दोन्ही अर्थानी तो अ-जच आहे.

अजति गच्छति ह्या व्युत्पत्तीने कुदत, बागडत जाणारा बोकड हा प्राणी हि तो आहे. सर्वात्मकच तो आहे, त्याअर्थी अज हि तो आहेच. अजाप्रमाणे विश्वांत स्वच्छंद चरतो आगि संचरतो म्हणून अज.

२०५. दुर्मर्षण
"अमर्षशून्येन जनस्य जन्तुना, न जातहान न विद्विषादरः । " भारवि : किरातार्जुनीय २-८

ज्याची उपेक्षा करावी असा तो निर्वीर्य निरुपद्रव नाही. त्याला तुम्ही शत्रु म्हणा वा मित्र म्हणा, कोणत्याहि नात्याने तुम्हांला त्याची उपेक्षा, अवज्ञा करता यायची नाही. तो तुमची उपेक्षा, अवज्ञा, अपराध सहन करणार नाही. तुमच्या उपेक्षेचे फळ तुमच्या पदरी तो घातल्याशिवाय राहणार नाही. घरांत रानांत कुठे हि असो अग्नीची उपेक्षा करता येत नाहीं, अपराध करता येत नाही. "होतारमपि जुह्वानं स्पृष्टो दहति पावकः” हवन हि करणाराने चुकून हि हात लावल्यास त्याला चटका दिल्याशिवाय तो राहत नाही. परमात्मा हा तशी खडतर देवता आहे. तो तूमची उपेक्षा हि सहन करीत नाही आणि सलगी हि सहन करीत नाही. तुम्ही अदबीने आपली मर्यादा सांभाळूनच त्याची मर्जी संपादन केली पाहिजे. अग्नीची उपासना न करावी तर अंधार, थंडी आणि श्वापदादिकांचे भय यांचे निवारण होत नाही. अतिसलगी करावी, त्याला खिशांत ठेवू म्हणावें, तर तो आपल्याला सचैल जाळून टाकतो. परमात्मा हा तसा दुर्मर्षण आहे, दुर्धर्ष आहे.

२०६. शास्ता
शस्त्रपाणि राजा अधार्मिकांचे शासन आणि धार्मिकांचे पालन करीत असतो. शास्त्रपाणि गुरु शिष्यांचे अनुशासन करीत असतो. संन्यासी आत्मसंयमन करून आत्मनिष्ठ होऊन राहतो. हे शिष्ट, अनुशिष्ट आणि विशिष्ट उत्तरोत्तर वरिष्ठ होत. आणि त्यांचे शासक अनुशासक आणि विशासक त्यांच्याहून वरिष्ठ होत. या सर्वांच्या नियंत्रणाचे नियमनाचे संयमनाचें जें सूत्र, जो ईश्वरभाव, तोच शास्ता होय. परमात्मा सर्वत्र विराजमान आहे. त्याचे राज्य, त्याचे शासन, अव्याहत अप्रतिहत चालू आहे. पण त्याचे भान कुणालाच होत नाही. कारण त्याचे शासन अतिव्यापक आणि अतिसूक्ष्म असें आहे. "सूक्ष्मत्वात् तत् अविज्ञेयम्". तसेच "हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्' म्हणूनहि. नृपत्व-गुरुत्वरूप अभिमानाच्या सोनेरी मुखवट्याने ईश्वराचे शासन झांकलें आहे, म्हणून हि ते दिसून पडत नाही, अभिमानाचा तो मुखवटा दूर केला, म्हणजे तिथे ईश्वर च असल्याचे आढळून येते. परमात्याचे हें जें अतिसूक्ष्म व सर्वव्यापी ईशन वा शासन आहे, त्यामुळेच त्याला ईश्वर आणि शास्ता असे म्हटले जाते.

२०७. विश्रुतात्मा
विश्रुत म्हणजे प्रसिद्ध, आणि आत्मा म्हणजे नामरूप, ज्याचें नामरूप प्रसिद्ध आहे, तो परमात्मा विश्रुतात्मा होय. कुठे आहे विश्रुत त्याचे नामरूप ? लोकांत आणि वेदांत म्हणजे शास्त्रांत हि. "अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः" लोकांत परमात्मा पुरुषोत्तम ह्या नांवाने आणि वेदांत, शास्त्रांत, पुरुषोत्तम ह्या रूपानें तो प्रथित आहे. लोकांत पुरुषोत्तम रामचंद्र म्हणून आणि शास्त्रांत पुरुषोत्तम अक्षर म्हणून तो परमात्मा प्रथित आहे. "स्थित-प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी: किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ' याचे उत्तर व्यावहारिक वा लौकिक क्षेत्रांत रामायण उर्फ रामचरित होय. तात्त्विक क्षेत्रांत स्थितप्रज-दर्शन अथवा वेदान्त-विचार होय. हेच सगुण आणि निर्गुण ब्रह्म होय, तत्त्वविचार सात्त्विक आचारांत आणि सात्त्विक आचार तत्त्वविचारांत परिणत होतो. दोन्ही मिळून मानव-जीवनाची परिपूर्णता लक्षित होते. देहनिरपेक्ष आदर्श देहसापेक्ष मानवाला जीवनात उतरवावयाचा आहे. तसें करतांना, आत्मरूप असि उपसतांना, देहाचा कोश फाटणारच. दाणा काढावयाचा म्हणजे टरफल काढून अलग करावेच लागते. असे जे करतात तेच विश्रुतात्मे होतात. परमात्मा स्वभावत:च विश्रुतात्मा आहे. साधक देहकोशांतून आत्मासि प्रवृढ करून विकोश करून विश्रुतात्मा होतो.

२०८. सुरारि-हा
हा सुर म्हणजे कोण ? ' सु शोभनं राति लाति इति सुरः ' जो शोभनमात्र घेतो-देतो तो सुर होय. उलट जो असु म्हणजे अशोभनच घेतो-देतो, तो असुर होय. आतां सु कशाला म्हणायचे ? जे आपल्या प्रतिष्ठेला शोभेल तें सु आणि जे तसे नसेल ते असू होय. आत्म्याने अंनात्म्याचा आरोप स्वीकारुन अनात्मवत् वागणे हेच असु होय. तें जो पतकरीत नाही आणि सदैव आत्मनिष्ठ राहतो तोच शोभिवंत होतो. पुरुषासारखा पुरुष असून जो स्त्रीप्रमाणे म्हणजे अनात्मवश वागतो त्याचा समाजांत उपहास होतो. एखादी स्त्री स्त्रीत्व म्हणजे वात्सल्य विसरून वागू लागल्यास, म्हणजे अनात्मवश वागू लागल्यास तिचा हि समाजांत तसाच उपहास होतो. थोडक्यांत स्व म्हणजे सु आणि सु म्हणजे स्व होय. जें स्वराज्य नव्हे तें सुराज्य असू शकत नाही, तसेंच सुराज्य हे स्वराज्यच असावें लागेल, परराज्य नव्हे. आतां हे जे आत्मनिष्ठ सुर त्यांचे शत्रु ते सुरारि होत. आत्मनिष्ठेचे परिपंथी जे रागद्वेष तेच देवशत्रु होत. परमात्माच त्यांचा नायनाट करतो. म्हणून तो सुरारि-हा. अनात्मभावाचें, रागद्वेषादि विकारांचे हनन ही ऐशी कृपा होय. कोणीहि अनीश, कोणीहि जीव, अहंकाराने तशी फुशारकी मारू शकत नाही. असुरपीडित गोद्विजदेव शेवटी विष्णूलाच शरण जातात आणि तो त्यांचा कैपक्ष घेतो तेव्हांच त्यांचे रक्षण होते आणि असुरांचे पारिपत्य होते. हा 'पुरा' आणि 'नव:' असा पुराणा इतिहास आहे. सुरारिहाचे हें अध्यात्म-रामायण शंकराचार्यांनी असें विवरिलें आहे.

तीर्त्वा मोहार्णवं हत्वा रागद्वेषादि-राक्षसान् ।
योगी शान्तिसमायुक्तः आत्मारामो विराजते ॥ शंकराचार्य-आत्मबोध-५.

गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।
निमिषोऽनिमिषः स्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥२३॥


२०९. गुरु
ज्याच्या ठाई कसले हि गौरव आहे तो गुरु होय, ज्याच्या ठाई लघुत्व नाहीं, तुच्छत्व नाही, हलकटपणा नाहीं, तो गुरु. दाणा आणि टरफल यांत दाणा गुरु होय, टरफल तुच्छ होय. जो प्रत्येक वस्तूंतील सार घेतो आणि असार टाकून देतो, तो गुरूपासक, तो गौरव-ग्राही, गुरु होय. गौरवग्राही पुरुष दाणा आणि टरफल अलग करून दाणा घेईल आणि टरफल फेकून देईल म्हटले; परंतु तो टरफलाचे हि गौरव ओळखतो, आणि तें हि मग गोग्रास म्हणून सांठवून ठेवतो. असें गौरवग्रहण करीत करीत त्याला सारें जगच गुरु होते. तो बहुव्रीहि जगद्गुरु होतो. हें जें वस्तू वस्तूच्या ठाई असलेलें गुरुत्व, तो परमेश्वरी भाव असून तोच खरा गुरु आहे, त्याच्या तुलनेत इतर सारे जग लघुच होय. म्हणून परमात्मा हाच एकमात्र गुरु म्हणावयाचा, जगांत में कांहीं गुरुत्व आहे तें सारें त्याचे आहे. प्रत्येक वस्तूला लाभलेलें गौरव म्हणजे त्या वस्तूचें स्वत्व होय आणि ते स्वत्व, तो स्वभाव, ईश्वरदत्त होय, किंबहुना, स्वतः ईश्वरी भाव होय. म्हटलेंच आहे विभूतियोगांत " अहं आत्मा गुडाकेश सर्वभूताशय-स्थितः " राहतों आत्मरूपाने सर्वांच्या हृदयांत मी' अर्थात् प्रत्येक वस्तूच्या ठाई असलेलें स्वत्व हीच भगवंताची पहिली विभूति असून तीच त्या प्रत्येकाची शरण्य आहे, गुरु आहे. "सर्व-धर्मान् परित्यज्य मां एकं शरणं व्रज" म्हणून जो आदेश दिला आहे, तो हि याच स्वतत्त्वाला अनुलक्षून होय. त्यालाच सर्वभावें शरण जाऊन चर वा अचर प्रत्येक व्यक्ति सर्व पापांतून मुक्त व्हावयाची आहे. दगडाने आपलें ईश्वरदत्त दगडपण सोडू नये. सर्वभावें दगडच होऊन रहावें. त्यातच त्याची पाप-मुक्ति आहे. 'स्वभाव-नियतं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम् । गी. १८.४७

२१०. गुरुतम
गुरु शरणागत शिष्याच्या नेत्रांत ज्ञानांजन घालून त्याला निर्मल दृष्टि देत असतो. या नव्या दृष्टीमुळे त्याचे परम कल्याण होत असते. म्हणून 'नास्ति तत्त्वं गुरोः परम् ' असें गुरूचे गौरव गाइलें जातें. जगांत असे गुरु कोण आहेत ? जगांत माणसाचा जन्म झाल्यावर त्याला लाभलेले आईबाप हेच त्याचे पहिले गुरु होत. ते त्याला शौचाचार आणि सदाचार शिकवितात. विद्यागुरु त्याला नाना विद्या-कला शिकवितात. सद्गुरु त्याला जीवनसाफल्याचा मंत्र देतात. मानवी जीवन उत्तरोत्तर शुद्ध आणि समृद्ध करून ते सफल करण्याचे हे उपाय आहेत. अंडांतून अंडज बाहेर आलें म्हणजे त्याला नवेंच जग दिसतें. तसें प्रत्येक वेळी एक एक कवच फोडून मनुष्य नव्याने जन्मतो, नवीन जगांत दाखल होतो. त्याला नवीन दृष्टि येते, नवीन सृष्टि दिसते. हेच द्विजत्व होय. प्रथम भौतिक निसर्गसृष्टि, मग मानवी विद्याकला-सृष्टि आणि शेवटीं आध्यात्मिक दिव्य सृष्टि पाहण्यास लागणारी दृष्टि त्याला येते. अशी दृष्टि देणारे हे गुरु सर्वच थोर होत. ते एकापेक्षा एक वरचढ आहेत. परंतु या सर्वांहून हि एक श्रेष्ठ गुरु आहे आणि तो म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठाईं असलेला त्याचा अंतर्यामी, अंतरात्मा. तो जीवाला क्षणभर हि सोडीत नाही. सतत त्याच्या जवळ राहून त्याला सत् काय, असत् काय, काय घ्यावें, काय टाकावें, काय करावें, काय करूं नये, हे सांगत असतो, शिकवीत असतो, प्रेरीत असतो. हाच सर्वांतर्यामी परमात्मा परम गुरु होय, " गुरुणां गुरुः " होय, गुरुतम होय. कारण तोच अंतिम निर्णय करणारा आहे. सर्वांत अधिक वजन त्याच्याच शब्दाला आहे.

२११. धाम
क्रियते इति कर्म, तसें धीयते इति धाम. अग्नीचें आधान करण्यांत येते म्हणून अग्नि म्हणजे तेज हे धाम होय. अग्रीच्या आश्रयाने वसति होते. म्हणून घराला धाम म्हणू लागले. अर्थात् धाम म्हणजे प्रथम अग्नि आणि मागाहून तदाश्रयाने होणारी वसति वा तदाश्रयभूत घर होय. ज्याच्या आश्रयाने हे समस्त चराचर विश्व राहतें तें जें आत्मतेज, तें जें चित्तत्त्व, तेच खरोखर धाम होय. ज्याच्या आश्रयाने अग्नि राहतो, तोच खरा अग्नि होय. म्हणून परमात्म्याला धाम म्हटले आहे. जिथे अग्नि राहतो तें हि लक्षणेने धामच म्हटले जाते आणि म्हणून जिथे जिथे परमात्म्याचा वास आहे ती सर्व धामेंच होत. देवाची जी प्रसिद्ध आणि जागृत स्थाने आहेत त्यांनाच आपण धाम असे म्हणतों. भारताच्या चार दिशांना चार धामें आपण मानतो. बदरी, रामेश्वर, पुरी आणि द्वारका ही उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या चार दिशांना असलेली चार धामें होत. भगवंताचा तिथे विशेष वास आहे. वस्तुत: चराचर वस्तु, त्या प्रत्येकीत भगवंताचें धाम म्हणजे तेज असल्यामुळे, भगवद्धामच होत, भगवंताचे वसतिस्थानच होत. म्हणूनच प्रल्हादानें म्हटलें, स्तंभांत हि परमेश्वर आहे.' अशी एक हि वस्तु नाही, असा एक हि आवास नाही, ज्यांत परमात्मा वसलेला नाही.

पुरुष एव इदं सर्वम् । पुरुषसूक्त, ऋग्. १०
ईशावास्यं इदं सर्वम् । ईशावास्य, यजु. ४०.१
वासुदेवः सर्वम् । गीता ७.१०

२१२. सत्य
'सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म अशी श्रुति आहे. जें कधी काळी मिथ्या होत नाही तें सत्य होय. या सर्वाश्चर्यमय सृष्टीचे मूलकारणच सत्य होय. ज्याच्या आश्रयाने सर्व सत्ये सत्य म्हणून प्रतीत होतात तें 'सत्यस्य सत्यम् ब्रह्मच सत्य होय. सत्य हे सर्व सत्य म्हणून प्रतीत होणाऱ्या पदार्थांचे आधारभूत असते म्हणून सत्य म्हणावयाचेंच, पण मिथ्या म्हणून म्हणावयाचे त्या मिथ्या-प्रत्ययाचेहि आधारभूत तत्त्व सत्यच होय. रज्जू या पदार्थाचें आधारभूत तत्त्व सत्य होय. त्या सत्यामुळेच, रज्जूला रज्जूत्व वा सत्यत्व आहे. परंतु त्या रज्जूवर अंधारांत होणारा साभास हि जो आम्हांला सत्यच भासत असतो त्याचे हि आधारभूत तत्व सत्यच असते. अर्थात् सत्य तें होय जे सत्य असत्य दोहोंचे हि आधारभूत असून ह्या दोहोंहून भिन्न असते. हे सत्यानृतमूल, सर्वमूल सत्य परमात्मा होय. परमात्मा सर्व काही होऊ शकतो परंतु केव्हां हि तो असत्य होऊ शकत नाही. म्हणून तो सत्य, वस्तुतः तोच एक सत्य असून बाकी सारें असत्य होय. कारण, त्या सर्वांना आलटून पालटून सत्यासत्य संज्ञा प्राप्त होत असतात. जागृतींतील सृष्टि स्वप्नांत मिथ्या होते, स्वप्नांतील जागृतींत मिथ्या होते आणि ह्या दोन्ही सुषुप्तीत मिथ्या होतात. या सर्व पालटांबरोबर जे पालटत नाहीं अनन्त आणि या सर्व पालांचे प्रष्टा म्हणून ज्ञानस्वरूप असणारें जें तत्त्व तेच सत्य, तोच परमात्मा "सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म."

२१३. सत्यपराक्रम
पराक्रम करणारे पराक्रमी पुरुष अचाट कर्में करीत असतात आणि तत्परिणामी त्यांचा पराक्रम सिद्ध होत असतो. परंतु परमेश्वराला आणि त्याच्या भक्ताला असला खटाटोप करावा लागत नाही. सत्य हाच त्याचा पराक्रम असतो. आपल्या सत्यानेच तो आपल्या प्रतिपक्षावर विजय मिळवीत असतो. सत्य हीच त्याची मुत्सद्देगिरी असते आणि असत्यवर्जन आणि तदंतर्गत सर्व अहिंसादि संयम हीच त्याची बहादुरी असते. या दुहेरी आत्मबलाने तो आपल्या प्रतिपक्षाला दोन्ही समितीत- रणाच्या भट-सभेत आणि मुत्सद्देगिरीच्या भट्टसभेत, मात देऊन समितिंजय होत असतो. सत्य आणि अहिंसादि संयम हे कृष्णार्जुन जिथे आहेत "तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानीति मतिर्मम ' असें मी म्हणेन. "यतो धर्मस्ततो जयः" असेंहि म्हटले आहे. आणि धर्म कुणीकडे असतो ? जिथे कृष्णार्जुन तियें ! धर्मराजाकडे कृष्णार्जुन होते म्हणूनच तो विजयी झाला. आमच्या सत्य आणि अहिंसादि संयम या कृष्णार्जुनांकडे धर्म आहे. अर्थात् सत्य आणि संयम हाच विविध धर्म होय. म्हणून त्यांचा सदैव विजयच आहे. परमात्मा सत्य-पराक्रम आहे. या सत्याला पर कोण ? कोणी व्यक्ति ? नाही. त्याला पर म्हणजे प्रतिपक्षी असत्यच. त्यावर तो आपल्या सहज सत्याने विजय मिळवीत असतो. या सत्य-पराक्रम परमात्म्याचाच एक भक्तमहात्मा हि आधुनिक काळांत होऊन गेला.तो हि सत्य-पराक्रमच. म्हणून त्याचे हि इथे स्मरण केलें. भक्ताच्या स्मरणाशिवाय खरोखर देवाचे स्मरण हि अपरेंच राहते.

२१४. निमिष
अनिमिष म्हणजे ज्यांचे डोळे कधीं मिटत नाहीत ते नित्यसाक्षी देव, अर्थात् जे अनिमिष नाहीत, ते निमिष होत. निमिष म्हणजे वारंवार स्वरूपानुसंधान विसरून अस्वाभाविक वर्तन करणारे मानवादि जीव होत, कर्तृत्व-भोक्तृत्वादि अहंकार धरणे म्हणजेच निमिषण होय. म्हणजेच स्वभाव सोडून परभाव अंगीकारणे होय. परमात्माच, ते शुद्ध चेतनच, अनिमिष असून कर्तृत्वभोक्तत्वोपाधि जीवच निमिष होत. आणि " ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातनः " म्हटले असल्यामुळे निमिष हे एक परमात्म-नाम झालें.

निमिषणोन्मिषण ही क्रिया आहे. परमात्मा अक्रिय असल्यामुळे तो तींतून मुक्त आहे. पाहणे ही क्रिया कितीहि लघु असली तरी ती क्रियाच आहे आणि म्हणून ती करतांना श्रम होणारच, यकवा येणारच. म्हणूनच पापण्या मधून मधून मिटत असतात, विसांवा घेत असतात. आणि झोपेत दीर्घकाल मिटून राहत असतात. परंतु परमात्म्याचे पाहणे ही क्रिया नसून तो स्वभाव आहे. परमात्मा हा नित्यदर्शन-स्वभाव असून तो दर्शन-क्रियामुक्त असल्यामुळे तो निमिष म्हणजे डोळे न उघडणारा म्हटला आहे. ही त्याची अक्रियावस्था आणि दर्शनशीलता त्याला योगनिद्रित चित्रित करून दाखविली जाते. डोळे मिटलेले असतात, म्हणून ती निद्रा आणि दर्शनस्वरूप अखंड स्वरूपानुसंधान असते म्हणून तो योग. परमात्मा हा सदैव योग-निद्रितच असतो म्हणून तो निमिष,

२१५. अनिमिष
निमिष, पल, घटिका या वा मास ऋतु अयनें ह्या ज्याच्या कला होत तो वत्सरात्मा वा संवत्सरात्मा काल अनिमिष होय. तो कधी डोळे मिटत नाहीं, झोपी जात नाही. तो सर्व चराचराची यच्चयावत् हालचाल पहात असतो. त्यांची नोंद घेत असतो. त्यांची गणना वा कलना, करीत असतो. म्हणून त्याला काल म्हटले आहे. "काल: कलयतां अस्मि' असा तो अनिमिष काल भगवद्-विभूति वर्णिला आहेच.

हे कालस्वरूप, परमात्म्याच्या सर्वसाक्षित्वाचा एक आविर्भाव होय. चिन्मात्र परमात्मा जीवाच्या जागृति, स्वप्न, सुषुप्ति या तिहींचा साक्षी आहे, तसा तो जगताच्या उत्पत्तिस्थितिलयांचा हि द्रष्टा आहे. म्हणून तो तुरीय म्हटला आहे. तोच अनिमिष,

भूचर सर्प, जलचर मत्य आणि खेचर तारे हे सारे अनिमिष होत. सर्पाणां वासुकिश्चाहम् " झषाणां मकरश्चाहम् " आणि "ज्योतिषां रविरंशुमान्' म्हणून ज्या भगवद्-विभूति वर्णिल्या आहेत अनिमिष पदाने त्यांचे हि स्मरण होतें.

२१६. स्रग्वी
स्रक म्हणजे माला आणि स्रग्वी म्हणजे मालाधारी. मालाधारण कोण करीत नाही ? मग परमात्याला स्रग्वी म्हगण्यांत काय विशेष ? सर्व जण जी माला धारण करतात ती थोड्याच वेळांत कोमेजून जाते. शिवाय ती असते उपरी, अंगभूत नसते. आणि बासी होते. परंतु परमात्मा जी माला धारण करतो ती कधीं न कोमेजणारी आणि बासी न होणारी आहे आणि परमात्म्यापासून ती कधीहि वियुक्त न होणारी आहे. सौरी प्रभा ही सूर्याची किरणमाला होय. चांदी आभा ही चंद्राची माला होय. त्या मालांनी ते नित्य शोभायमान असतात. म्हणून त्यांना अंशुमाली म्हटले जाते. परमात्मा हि तसा आपल्या आत्मप्रभेच्या प्रभावळीने विरोचमान आहे. ती त्याची अनपहार्य अशी अंगभूत स्वरूप-शोभा आहे. सूर्य म्हटला म्हणजे तो सदैव सौरी प्रभेने मंडितच असावयाचा, तसा परमात्मा हा सदैव आत्मप्रभेनें, आपल्या सत्-चित्-आनंदमयी प्रभावळीने, विरोचमानच असावयाचा. म्हणून तो स्रग्वी. त्याच्या मालेची फुलें कधी निर्माल्य होत नाहीत. त्याचा चित्प्रकाश कधी अचित् होत नाही. कधी मळत वा मावळत नाही,

२१७. उदारधी (वाचस्पति उदारधी)
शंकराचार्य 'वाचस्पति उदारधी' ही दोन पर्दे मिळून एकच नाम समजतात. ते घेऊनहि वाचस्पति पदाचें में ध्यान मागें केलें तें समर्पकच होय. कारण दुसऱ्याच्या मनींचे आर्त आपले मानण्याहून अधिक उदार बुद्धि दुसरी काय असू शकेल ? " काहके मनकी कोउ न जानत, लोगन के मन हांसी " दुसऱ्याच्या मनातील व्यथा कोणी जाणत नाही. त्याला परदुःख शीतलच ! परंतु परमात्मा हा सर्वांतर्यामी प्रत्यगात्मा असल्यामुळे त्याला प्रत्येकाचें दुःख स्वत:चेच दु:ख वाटते आणि त्यामुळे तो तन्निवारणार्थ तळमळत आणि घडपडत असतो. इतकी प्रगाढ सहानुभूति दुसन्या कोणाला वाटते ? आई, बाप, गुरु हे हितचिंतक आणि हितकर्ते खरे परंतु त्यांना वाटणारी सहानुभूति ही स्वत: माणसाला अंतर्यामी वाटणाऱ्या स्वानुभूतीइतकी कशी वाटणार ? ती कांहीं झालें तरी सहानुभूतिच, स्वानुभूति नव्हेच. म्हणून सर्वभूतांचा आत्मभूत असलेला सर्वांतर्यामी परमात्मा हाच उदारधी होय. भावनेची इतकी उदारता इतरत्र कुठेच आढळणार नाही. ही उदारता प्रगाढतेंत आणि व्यापकतेंतहि समानच उदार आहे. स्वानुभूतीइतकें खोल आणि सर्वानुभूतीइतकें विशाल वा व्यापक दुसरे काय असूं शकेल ? या दोन्ही अर्थानी परमात्मा उदारधी आहे. दोन्ही वस्तुत: एकच आहेत.

वाचस्पति हें नाम दोनदां आलें आहे . पण त्याला जोइन दोन वेगवेगळी विशेषणे घेऊन ती दोन वेगळी नामै कल्पिली आहेत. (१) वाचस्पति उदारधी, (२) वाचस्पति अयोनिज, (क. ५७३)

अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान्न्यायो नेता समीरणः ।
सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् ॥२४॥


२१८. अग्रणी
अग्रे नयति इति अग्रणी: । अशी अग्रणीची व्युत्पत्ति आहे. प्रत्येक वस्तूची दोन अग्रे मानता येतील. एक मूळ आणि दुसरे फळ. पैकी मूळ अग्र असले तरी तें भूमिगत असल्यामुळे त्याला अग्र न म्हणतां फळालाच तेवढें अग्र म्हटले जाते. आणि म्हणून समग्र शब्दाने मुळापासून तो थेट शेंड्यापर्यंत वा फळापर्यंत असा भाव व्यक्त केला जातो. बीजाची परिणति फळांत होते, म्हणून फळच शेंडा होय. अशा प्रकारें अग्रणी म्हणजे फळापर्यंत पोचविणारा, प्रत्येक गोष्ट सफल करणारा, असा अर्थ होईल. परमात्मा अग्रे नेतो, पुढे नेतो म्हणजे तो सफलतेला नेऊन पोचवतो, असें समजावयाचें. कर्म करणे माणसाच्या हातचें आहे, पण त्याचे फळ त्याच्या हातचे नाही. ते परमेश्वराच्याच हाती सुरक्षित आहे. त्याचा अनुग्रह होईल तेव्हांच ते मिळेल. ज्याअर्थी फळसिद्धीशिवाय कर्म हीन होय, त्याअर्थी कर्महि माणसाच्या स्वाधीन म्हणतां येत नाही. म्हणून कर्म-हेतूंमध्ये म्हणजे कर्माच्या निष्मादक कारणांमध्ये दैवहि एक कर्मकारण मानले आहे. त्याचप्रमाणे मुळांत देखील कर्म दैवतंत्रच आहे. जेव्हां ईश्वरी संकल्प असतो तेव्हांच कर्म स्फुरतें. निद्रा मालवते तेव्हांच जागृति पालवते आणि जागृतींतच कर्म स्फुरत असते. जागृति, स्वप्न, सुषुप्ति हे भाव स्वतंत्र नाहीत; ते प्रकृतींतच आहेत आणि प्रकृति ही ईश्वरतंत्र आहे. सारांश, कर्म-मीमांसा केली तेव्हां दिसून आलें की संकल्प, साधना आणि सिद्धि तिन्ही ईश्वराधीन आहेत. म्हणून परमात्मा हा अग्रणी होय. तोच प्रथम संकल्प-स्फूर्ति देतो. नंतर तदनुसार जीवाला प्रयत्न करायला लावतो आणि शेवटी हवा प्रयत्नाला तोच सिद्धीस नेतो. अशा प्रकारे केवळ फलदाता म्हणूनच नव्हे तर आरंभापासून सतत पुढे पुढे नेत असल्यामुळेहि तो अग्रणी होय. सामान्य अर्थाने प्रत्येक वर्ण, जाति, कल यांचा जो नायक तो अग्रगी म्हटला जाईल. तेंहि परमात्म्याचे एक रूप होय.
समाजांत भिन्न भिन्न वर्णाचे व व्यावसायिकांचे संघ असतात. त्यांच्यांत जे विवाद वा प्रश्न वेळोवेळी उत्पन्न होतात त्यांचा निर्णय त्यांचे पंचायतन म्हणजेच पंचायत करीत असते. या पंचायतनाचा जो मुख्य, म्हणजे सरपंच तोच अग्रणी म्हणावयाचा.

२१९. ग्रामणी
ग्रामं सन्मार्गेण नयति इति ग्रामणी: । जो सबंध गांवाला सन्मार्गास घेऊन जातो तो ग्रामणी होय. कुटुंब म्हणजे व्यक्तिग्राम होय. हा नात्याने वा रक्त-संबंधाने बांधलेला असतो. कुटुंबापेक्षा मोठा तो कुटुंबग्राम होय. हा सर्व वर्णाचा आणि सर्व कारु-नारूंचा मिळून बनलेला असतो. जनपद ग्राम-ग्राम होय. ग्राम रक्त-संबंधाने नव्हे, तर परस्परोपकारित्वाने बांधलेला असतो. गांवाच्या सुखसोई आणि अडी-अडचणी सर्वांना समान असतात. कुलनायक आपल्या कुलाच्या सुखजीवनासाठी झटत असतो. ग्रामनायक गावांच्या सुखजीवनासाठी झटत असतो. गांवांतील सर्व कुटुंबांना सर्वतोपरी सुखी समृद्ध आणि सफल करावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा असते. इमारतीचा कुठलाहि भाग, वीट, दगड विरला, फुटला, सुटला तर तेवढ्याने सबंध इमारतच तितक्या अंशानें कमजोर होते. त्याप्रमाणे सबंध गांवाची इमारत, सबंध ग्रामसमाज गांवातील कोणतेंहि घटक कुटुंब दुःखी, कष्टी, व्यसनी वा पतित झाल्याने कमजोर होतो. अशी व्यापक आत्मीयता बाळगून जो 'अवघेचि सुखी असावे ऐसी वासना" बाळगतो तो ग्रामणी होय. कुटुंब व्यक्त, पण संकुचित असतें. जनपद अतिविशाल आणि अव्यक्त. ग्राम हा ह्या दोघांचा सुवर्णमध्य होय. तो व्यक्त असून संकुचित नाही. त्यामुळे तोच सेव्य. तो जो हाताळतो तो कुटुंब आणि जनपद दोहोंचेंहि हितसाधन करतो.

आज असा एक ग्रामणी भारतांत सर्वत्र संचरत असून तो ग्रामस्वराज्य संकल्पून विश्वोदय संपादीत आहे. परमात्म्याचा हा एक अवतार आहे. परमात्मा तर तत्त्व-ग्रामाचा नेता आहे. तो अष्टधा प्रकृति आणि षोढा विकृति या सबंध तत्त्वग्रामाचा नेता आहे. कारण त्या सर्वाचा तो मुख्य आहे.

अग्रणी हा आपल्या पंचायतीच्या द्वारे आपापल्या वर्णाचे वा व्यवसायाचे नियमन करीत असतो, तर ग्रामणी हा सर्व वर्णांचा व व्यवसायांचा मिळून बनलेला जो समग्र ग्रामसमाज त्याचे नियमन करीत असतो. लोकजीवनाचा पट मूलत: वर्णव्यवसायांच्या आणि ग्रामराज्याच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेला आहे.

२२०, श्रीमान्
श्रीमान् हे पद पूर्वी दोनदा येऊन गेले असून परत तें आतां तिसऱ्यांदा आले आहे. त्यावरून परमात्म्याची त्रिविध श्रीमत्ता प्रकट होते. सत्ता, संपत्ति आणि शोभा अशा त्या तीन विधा होत. परमात्मा सद्रूपअसल्यामुळे तो सदैव सत्तासंपन्न असतो. सर्व सद्गुणसंपत्ति वा सर्व स्वत्व हें सताचेच असावयाचे म्हणून तो संपत्तिमान् आहे. आणि सर्व शोभा, सर्व प्रकाश में सरुद्प आहे त्याचाच असू शकतो, असताचा नव्हे, म्हणून सदरूप परमात्माच कधीहि न लोपणारा, सदैव प्रकाशमान् म्हणून श्रीमान् होय. हे समस्त विश्व परमेश्वराची त्रिविध श्री होय. त्याच्या अस्तित्वाचे, त्याच्या स्वामित्वाचे आणि त्याच्या सर्वाश्चर्यमय मोहकतेचें तें गमक आहे. राजा सत्ताधारी, सर्व संपत्तीचा स्वामी आणि ऐश्वर्य-द्योतक छत्रचामरादि राजवैभवाने व राजतेजाने युक्त तळपत असतो. तेंच राजाचे राजत्व होय, तशी परमेश्वराची श्रीमत्ता म्हणजे त्याचे सर्वेश्वरत्व होय. त्याच्याशी कोणाची तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्या ऐश्वर्याची इयत्ता सांगणाऱ्याची गति इसापाच्या बेडकीसारखी व्हायची.

२२१. न्याय
राजा अपराध्याला अपराधानुरूप निगृहीत वा दंडित करीत असतो, आणि सेवा करणाराला सेवानुरूप अनुगृहीत करीत असतो. त्यामुळे त्याला न्यायी म्हटले जाते. परमात्मा हा न्यायी किती म्हणावा ? तो तर न्यायस्वरूपच आहे. तो राजाप्रमाणे मागाहून न्याय-निवाडा करीत बसत नाही. त्याने कर्माबरोबरच त्याचे फळ हि जोडून दिले आहे. जसें करावे, तसे भरावें. तद्द्वारा तो परभारेंच न्याय देत असतो. किंबहुना न्याय देणे ही भाषाहि बरोबर नाही. कर्मकर्ताच आपल्याला हवा तो न्याय घेत असतो. ज्याला सुख हवे त्याने सत्कर्म करावें. तें न करणे म्हणजे दु:खाचा न्याय मागणेच होय. अशा प्रकारे परमेश्वरांचा न्याय हा स्वायत्त न्याय आहे. त्यापेक्षा अचूक आणि सुलभ न्याय दुसरा नाही, कर्म म्हणजे केवळ कायिक कर्म नव्हे, तर सर्व प्रकारचे कायिक, वाचिक, मानसिक कर्म. तुम्ही जी कोणती गानसिक, वाचिक, कापिक हालचाल कराल ती सर्व क्रिया होय आणि तिचे फळहि अवश्यंभावी आहे. जितकी क्रिया सूक्ष्म तितकें तिचे वीर्य उग्र. कायिक कर्मापेक्षा वाचिक आणि वाचिकापेक्षा मानसिक कर्म हे महत्तर होय आणि त्याचें फळ हि तसेंच गुरुतर आहे. सद्वृत्ति ही सर्वांत मोठी सत्कृति होय.

२२२. नेता
पूर्वी नेता हे पद येऊन गेले आहे. तिथे तें "योगविदां नेता' असें आलें आहे. इथे तें निरुपपद प्रयोगावरून सर्वांचा नेता अशा अर्थी आले आहे, असें समजावयाचें, परमात्मा हा कोणा व्यक्तीचा नेता नाहीं, तो स्वत: नीतीचाच नेता आहे. नीति कोणती ? जो नेत्याचा मार्ग ती नीति. माणूस चालतो तेव्हा त्याच्या चालण्याने पायवाट तयार होते. ह्या वाटेचा नेता तो माणूसच असतो. इंग्रजीत 'Allroads lead to Rome' अशी म्हण आहे. वस्तुत: रोड म्हणजे मार्ग हे नेत नसतात, ते स्वत:च नीत असतात. म्हणूनच त्यांना नीति असें नांव मिळालेले आहे. ही नीति जो तयार करतो, तोच नेता होय. परमात्यानेच सर्व मार्ग तयार केलेले आहेत. म्हणून तोच नेता होय. सत्य-स्वरूप परमाल्याची जी पायवाट ती नीति असून तिचा तो नेता आहे. आणि तिने जाणाऱ्या सर्व सत्यधर्मा अनुयायींचाहि पर्यायानें तो नेता म्हणावयाचा. सत्योपासक ह्या सत्यस्वरूप नेत्याला सत्यमार्गदर्शनासाठी प्रार्थीत आला आहे. 'हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ " "अग्ने नय सुपथा राये” हे मार्गप्रकाशक देवा ! आम्हांला तूं त्या परमानंदाकडे सुनीतीने, सरळ मार्गानं घेऊन जा."

२२३. समीरण
सं, सर्वे, सर्वतः, सम्यग् स्वं प्रति ईरयति इति समीरण: । अंतर्यामिरूपाने परमात्मा सर्वांना समान प्रेरणा देत आहे, सर्व प्रेरणा देत आहे, म्हणून तो समीरण, सर्व जीव आपल्यावर नि:सीम प्रेम करीत असतात. ही प्रेरणा सर्वांना समान असते. 'आत्मनस् तु कामाय सर्व प्रियं भवति । ' तो जें जियें जितकें प्रेम करीत असतो, तें तिथे तितकें सर्व आपल्यावरच प्रेम करीत असतो. कारण अशेष प्रेमाचे भाजन तो सर्वांतर्यामी स्वात्मा आहे. चुंबक कांही एक हालचाल न करतां लोहखंडाला जसा चोहोंकडून आपल्याकडे खेचीत असतो तसा हा सर्वांतर्यामी परमात्मा सर्वांना सगळीकडून समान आपल्याकडे खेचीत असतो, प्रेरीत असतो. म्हणून तो समीरण. कांहीं नद्या पश्चिम-वाहिनी तर कांहीं तद्-विरुद्ध पूर्ववाहिनी विसतात. परंतु त्या सर्व शेवटी एका सागरालाच जाऊन मिळतात. त्या प्रमाणे जगांत जो अनुकूल वा प्रतिकूल विविध कर्मप्रवाह दिसतो, तो सारा आत्मप्रेमप्रेरित आत्माभिगच असतो.

२२४. सहस्रमूर्धा
सहस्रमूर्धा ते सहस्रपात् हा श्लोकार्ध सरळ किंचित् पाठान्तराने पुरुषसूक्तांतून उचलला आहे. विष्णुसहस्राचे हे वेदमूलत्व होय, वेद वस्तुतः सर्वमूलच आहे. कारण तो अक्षरस्वरूप आहे. समग्र भारतीयतेचें तें माहेर आहे. धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृति, साहित्य, संगीत, कला किंबहुना भूत भविष्य आणि वर्तमान या सर्वांचा तो मूल-म्रोत आहे.

परमात्मा सहनमूर्धा आहे. सहस्रमूर्धा म्हणजे सहस्रबुद्धि, परमात्म्याची बुद्धिशक्ति, ज्ञानशक्ति अगणित आहे. कारण तो स्वत: चितस्वरूप आहे. सर्व चैतन्य, सर्व बोध, तद्भव आहे. एके काळी सहस्र ही संख्येची परिसमाप्ति असावी म्हणूनच अगणित, असंख्यात, अमित आणि पर्यायाने अनन्त त्या अर्थी सहस्रशब्द रूद झाला, तो आजतागायत तसा आहे. अगणित लोक या अर्थी हजारों लोकं असा प्रयोग आपण आज हि करतो. सहस्रश्मि सूर्य, सहस्रवर्त्मा सामवेद इत्यादि प्रयोग प्राचीन आहेतच. वेदांहून प्राचीन दुसरें लिखाण नाही, त्यांत सहस्रशब्द या लक्षणार्थाने विपुल आलेला आहे.

मुख म्हणजे वदन वाशक्तीचे उपलक्षण आहे, मूर्धा बुद्धि-शक्तीचें. चतुर्मुख, षण्मुख, दशमुख, सहस्रमुख हे सर्व वाशक्तीचे चढते प्रकार होत. द्विशिरा त्रिशिरा ही नामें आहेत. पण त्यांचा बुद्धीशी संबंध नसून द्विविभक्त त्रिविभक्त शिर असलेले असा बाहय कपालाकृतीशी संबंध आहे. बहुशिरा शब्द विष्णु-सहस्रांत पूर्वी येऊनच गेला आहे. तो हि वेगळा. बहु आणि सहन त्याचप्रमाणे शिर आणि मूर्धा, वेगळे आहेत, वेगळया अर्थानं घ्यावयाचे आहेत.

२२५. विश्वात्मा
परमात्मा व्यक्त नाही. व्यक्तमात्र त्या अव्यक्त अक्षर पुरुषाचे रूप आहे. म्हणून त्याला विश्वात्मा म्हणजे विश्वरूप म्हणावयाचे. हे विश्वच त्याचे रूप आहे. त्यांतील सर्व शिरें त्याची आहेत, सर्व बाहू त्याचे आहेत, सर्व उदरें त्याची आहेत, सर्व पाद त्याचे आहेत. म्हणून त्या अव्यक्त आणि अक्षर पुरुषाला सहनमूर्धा, सहस्राक्ष आणि सहमपात् म्हटले आहे. मूर्धा आणि पाद हे आद्यन्त होत. नेत्र मध्याचा, मधल्या सर्व अवयवांचा आणि तत्शक्तींचा, प्रतिनिधि आहे. वेदवचनांत पुरुष शब्द आला आहे. पण तो जो सहनशीर्षा, सहस्राक्ष आणि सहनपाच पुरुष, तो म्हणजे हा विश्वरूप परमात्मा होय हे येथील विश्वात्मा शब्द स्पष्ट करतो. म्हणून इथे हि त्याच्या सर्वशक्तिमत्तेचे द्योतन करण्यासाठी त्याला सहतनूर्धा सहस्राक्ष आगि सहस्रपाद म्हटले आहे. विश्वरूपाच्या पोटांत द्विपाद चतुष्पाद इत्यादि सर्वच समाज येतात. म्हणून त्यांचे सूचन करण्यासाठी पुरुषसूक्तांत "गावो ह जज्ञिरे तस्मात् तस्मात् जाता अजावयः" तसें । "ब्राह्मणोऽस्य मुखमासीत्' इत्यादि विवरण आलें आहे. म्हणूनच विश्वनामाने च आरंभ.

२२६. सहस्राक्ष
परमात्मा सहस्राक्ष आहे, सहस्रनेत्र आहे. अर्थात् तो सर्वसाक्षी आहे. परमात्म्याचे कर्तृत्व-भोक्तृत्वोपाधि जीवाहून भिन्नत्व सहस्राक्ष शब्द सूचित करतो. तो सहस्रविध कर्माचा म्हणजे सर्व कर्मांचा आणि फलांचा साक्षिमात्र आहे.

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफल-संयोग स्वभावस्तु प्रवर्तते । गीता ५-१४

नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ गीता ५- १५


तो प्रभु म्हणजे स्वरूपावस्थानक्षम आणि विभु म्हणजे सर्वव्यक्ति-व्यापक परमात्मा कोणाला कर्म करायला लावीत नाही, की त्या कर्माचे फळ हि देत नाहा, स्वभावत: सर्व घडत असतें.जीव हें न जाणतां आपल्याला कर्ताभोक्ता मानून फसतो आहे. जगाचे सर्व व्यवहार त्याच्या समोर चालले असतात, पण त्याचे शुभाशुभ वा सोयरसुतक त्याला नाही, तो केवळ साक्षी आहे.

सूर्य ही परमात्म्याची प्रतिमा आहे." सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च " म्हणून त्याला हि विश्वात्मा सहस्राक्ष आणि सहस्रपात् म्हणतां येतें. तो सर्वज्ञ असल्यामुळे सहममूर्धा हि तो आहेच.

२२७. सहस्रपात्
सर्व द्विपादांचे आणि चतुष्पादांचे आणि बहुपादांचे पाद हे त्या सर्वांतर्यामी अव्यक्त अक्षर परमात्याचेच पाद होत. कारण व्यक्तमात्र अव्यक्ताचाच प्रकाश होय तो. म्हणून तो परमात्मा अपाद, एकपाद, द्विपाद, बहुपाद आणि सहस्रपान वा अनन्तपाद आहे असें कसेंहि म्हटले तरी ते त्याला साजणारे आहे. "तुका म्हणे जें जें बोला । तें तें साजे या विठ्ठला". अपाद वा पादोदर सरीसृप, एकपाद वृक्ष, द्विपाद मानव, बहुपाद पशु आणि सहसपाद घोण इत्यादि जीवजन्तु त्या अव्यक्त आणि अक्षर महापुरुषाचीच रूपं होत. एकदा त्याची ओळख पटल्यानंतर मग फसगत होत नाही. "तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः ।" ज्ञानदेव म्हणतात, "अनन्तरूपें अनन्त वेशे देखिलें त्यासी| बापरखुमादेवीवरी, खूण बाणली कैसी."

सहस्रपात् नाम परमेश्वराचे सर्वगतत्व द्योतित करते. पायाच्या ठाई गति असते. त्या गतिशक्तीचे अधिष्ठान परमात्माच असल्यामुळे त्याला सहस्रपात् म्हणजे अनन्तगति वा सर्वगत म्हणणे युक्तच आहे.

आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः ।
अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥२५॥


२२८. आवर्तन
आवर्तन म्हणजे आवृत्ति करवणारा, ही सबंध सृष्टि सारखी आवृत्त होत आहे. सर्गामागून सर्ग होत आहे. कल्पामागून कल्प जात आहे. आणि त्या त्या स्थलकालांत असंख्य जीव पुन: पुन: जन्मत आहेत, ब्रह्मदेवापासून तो मशकापर्यंत. अशा प्रकारे परमात्मा हा ह्या सर्व-भूतांचा आवर्तन आहे. त्यांना आपआपल्या कर्मानुसार संसरवीत आहे. परमात्मा स्वत: अनावृत्त कूटस्थ आहे. तो येत नाहीं नि जात नाही. तो अठ्ठावीस युगे लोटली तरी विटेवर आपला उभा आहे. हा सारा सृष्टि-प्रवाह, ही भयानक भवनदी, ही भीमा, त्याच्या चरणासमोरून वाहत आहे आणि तो तिचा साक्षिभूत उभा आहे.

आवर्तन हे विशेषण न घेतां नाम घेतल्यास परमात्मा हा आवर्तनशील जगरुद्प आहे असेंहि म्हणता येईल. कारणाहून कार्य अभिन्न असते म्हणून कार्य हे हि कारणच म्हटले जाते. तसा कार्यरूपाने हे आवर्तनशील विश्व तो परमात्माच आहे. परमात्मा कारण आणि कार्य तसा करण हि आहे. विश्वाचे आवर्तन करविणारें जे प्रधान करण तें हि तोच आहे. प्रकृतिच प्रधान करण आहे. कारण

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथात्मानं अकर्तार स पश्यति ॥ गी. १३.२९


प्रकृतीच्याच तंत्राने हे सारे आवर्तन घडत असते. म्हणून तो परमात्मा स्वत: अकर्ता असल्यामुळे प्रकृतिद्वारा आवर्तन आहे. अशा प्रकारें परमात्मा हा कारण-रूपानें कार्यरूपाने आणि करण-रूपाने आवर्तन आहे.

२२९. निवृत्तात्मा (अनिवृत्तात्मा)
परमात्मा हा निवृत्तिस्वरूप असल्यामुळे तो .निवृत्तात्मा होय. अकर्ता, अभोक्ता, केवल साक्षिभूत तो आहे. आधी प्रवृत्त होऊन मागाहून तो त्या प्रवृत्तीपासून निवृत्त झाला असें नाहीं. तो मूळचाच निवृत्त आहे. प्रवृत्तिमात्र तद्बाह्य आहे. प्रवृत्ति तद्बाह्य आहे खरी, पण तिचा निषेधहि तो करीत नाही. कारण निषेध करणे हि प्रवृत्तिच होईल. तेव्हा तो सर्वतोव्यापी प्रवृत्तीच्यासकट, तिच्या भर बाजारांत, अगदीं स्वस्थ आहे. तो गुणातीत आहे. गुणांच्या पकडीत तो येतच नाहीं.

प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥ गी. १४ - २२

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते ॥ गी. १४.- २३.


रत्नकिरणांप्रमाणे त्याची समदृष्टि गुण-वायूच्या गतागतानें इंगित होत नाहीं, कंपित होत नाही, जागृति, स्वप्न, सुषुप्ति वा उत्पत्ति, स्थिति, लय या व्यष्टिसमष्टींच्या भावांची आवर्तने म्हणजे अनिवार प्रवृत्ति होय. परमात्मा हा तद्विलक्षण असल्यामुळे तो निवृत्तात्मा म्हटला आहे. वस्तुतः तो प्रवृत्तिविलक्षण तसा निवृत्ति-विलक्षण हि आहे. तो उभयकोटी-विलक्षण आहे. हे उभय-कोटी-विलक्षणत्वच वास्तविक निवृत्ति असून निवृत्तात्मपदाने त्याचाच निर्देश केला आहे.

इमें अनिवृतात्मा असा हि पाठ करिषतां येतो. "सर्व खलु इदं ब्रह्म' असे असतांना खरोखर तो परमात्मा कोणापासून निवृत्त होणार ? तो आपल्यापासून कसा काय निवृत्त होऊ शकेल ? त्यामुळे तो अनिवृत्तात्माच होय.

परमात्मा हा अशा प्रकारे निवृत्तात्मा आहे, तसा अनिवृत्तात्माहि आहे.

२३०. संवृत
(सं)- वृ धातूचे मुख्यतः दोन अर्थ होतात. (१) कुंपण घालणे, (२) पसंत करणे, निवडणे आणि ह्या दोन्ही अर्थानी परमात्म्याला संवृत म्हटले आहे.

परमात्मा हा सर्वथा सुरक्षित आहे. कोणीकडून हि त्याचा भेद होऊ शकत नाही. त्याच्यांत प्रवेश होत नाही. त्याच्यांत विवर मिळत नाही. असा तो निगूढ आहे. सबंध बंद आहे. म्हणूनच वेदांना नेति नेति म्हणावे लागले आहे. ' यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ' म्हणून उपनिषदें त्याचे संवृतत्वच परोपरीने गात आहेत. " आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनं, आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः । आश्चर्यवचैनमन्य शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ गी-२.२९ म्हणुन गीतेने त्या परमात्म्याचे संवृतत्वच निरूपिले आहे. दर्शन, वचन, श्रवण इत्यादि स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतर ज्ञानोपाय तिथे हार खातात. त्यांची काही मात्रा चालत नाही. श्रद्धाच ठेवावी लागते. असा तो परमात्मा मोठे कोडे आहे. परम आश्चर्य आहे. आणि असें जें परम आश्चर्य त्याच्या भोवती जर सारे जग गोळा झाले तर त्यांत काय आश्चर्य ? सर्वांना त्याचे कुतूहल आहे. सर्वांना तो अगदी हवा हवासा वाटतो. सर्व जण त्याचे सर्वात्मना संवरण करतात. त्याच्यावरून त्रिभुवन ओवाळून टाकतात. देहे प्राणे मनें त्यालाच वरतात. असा तो परमात्मा सर्वांचा कंठमणि आहे. सर्वांच्या गळ्यांतील ताईत आहे. जीवांचा जिवलगच तो आहे. तो वित्ताहून, पुत्राहून, प्राणाहून प्रिय आहे म्हणून हि तो संवृत म्हणावयाचा.

परमात्मा हा अशा प्रकारें उभयथा संवृत आहे. तो तत्त्वतः संवृत म्हणजे अप्रतर्क्य, व्यवहारतः संवृत म्हणजे परम प्रिय होय.

२३१. संप्रमर्दन
परमात्मा हा सर्वांचा गर्व चूर करतो. म्हणून तो संप्रमर्दन होय.

ब्रह्म ह देवेभ्यो विजिग्ये | तस्य ह विजये देवा अमहीयन्त
अस्माकमेव अयं विजयः, अस्माकमेव अयं महिमा इति ।


देवांसाठी ब्रह्माने विजय मिळविला. देवांना वाटलें, आपलाच हा विजय आहे, आपलाच हा महिमा आहे. तेव्हा ब्रह्म यक्षरूपाने प्रकटलें आणि त्याने देवांचा गर्व चूर केला. अशी आख्यायिका उपनिषदांत आली आहे. पुराणांतील दशावतार म्हणजे हि संप्रमर्दनाचाच पोवाडा आहे. खरें युद्ध आध्यात्मिकच आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हा षड्वर्गच मर्दितव्य आहे. त्यालाच नरम करावयाचे, नामोहरम करावयाचे आहे. परमात्माच तें करतो. म्हणून तो संप्रमर्दन. हें आध्यात्मिक सत्य देवासुर-युद्धाच्या रूपकाने वेदोपनिषदांत आणि पुराणांत शतशोऽथ सहनशः वर्णिले आहे. हा सनातन इतिहास आहे. इतिहास म्हणजे "इति ह आस "असें गतकाळी घडलें अशी नोंद, पुराणांत ती कायमची करून ठेवली आहे. " सत्यमेव जयते नानृतम् " हीच घटना पुनः पुनः घडत असते. सत्य हे सर्वविजयी सर्वेश्वर होय. तोच सत्येश्वर विष्णु. त्याचेच अवतार होतात आणि त्या त्या अवतारांत तो अनृताच्या त्या त्या रुपांचा विनाश करतो. तोच शिव, तोच शक्ति, तोच गणपति आणि तोच सूर्य. वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य आणि सौर आपआपल्या दैवतपुराणांत आपआपल्या देवतेचा जो पोवाडा गातात, तो ह्या सत्येश्वराचाच होय. भारतीयांनी इतिहास लिहून ठेवला नाही असा प्रवाद आहे. आणि तो खोटा नाही. पण त्याचे कारण त्यांच्या लेखी इतिहास मिथ्या, इतिहासाचे तात्पर्य पुराण सत्य, हे आहे. सारासार-विवेकाने त्यांनी सनातन इतिहासरूप सत्याचे पुराण सार म्हणून ग्रहण केले आहे आणि असार म्हणून स्थूल इतिहास अपास्त केला आहे.

२३२ (अ) अहःसंवर्तक (अहर्, अहन्, अहस्)
अहर् म्हणजे दिवस (१) एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काल (२) या दिवसाचा एक पक्ष म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ (३) या अहोरात्रांत करावयाचें यज्ञकार्य, या तिन्ही अर्थांनी अहर् शब्द प्रयुक्त होतो. 'आह्निक म्हणजे प्रत्यह करावयाचे संध्योपासनादि नित्य धर्मकृत्य. द्वादशाह म्हणजे बारा दिवस चालावयाचा नैमित्तिक यज्ञ, अग्निहोत्र म्हणजे आमरण चालावयाचें सत्र. अशा प्रकारें नित्य आणि नैमित्तिक धर्मक्रुत्यांनी संपूर्ण सुबद्ध जीवन हा वैविकांचा जीवनाचा आदर्श आहे. यज्ञ हे कालानुसार होत. त्यामुळे कालाचे सूक्ष्म ज्ञान यखणे भाग होते. कर्माचा काळ चुकल्यास ते कर्म सफल होत नाही. काळच त्या कर्माचा रस पिऊन टाकतो. ज्या नक्षत्रामध्ये ज्या धान्याची पेरणी करावयाची, ती तशी न केली तर ते नीट पिकत नाही, हा अनुभव आपल्याला आहेच. तेच जीवनांतील समस्त क्रियांना लागू आहे. म्हणून कालोपासना म्हणजे प्रत्येक क्रिया यथाकाल करणे होय. तो नेमक कर्माचा काळच अ-हन् म्हणजे कर्मफळ न मारणारा वा अ-हर म्हणजे कर्मफळ न हरणारा होय. भगवान्काळच " क्रतु-फलविधान-व्यसनी " आहे. म्हणून तो अ- हन् वा अ-हर् म्हटला आहे. " अह (अह्नोति) व्यापने ", या धातूपासून अहस शब्द व्युत्पादिला तरी तो वरील निरुक्तीशी अविरोधीच होय. काल हा कर्माला आणि त्याच्या फळाला म्हणजेच समग्र जीवनाला व्यापून असतो, म्हणून तो अहस् होय. अहस, अहन्, अहर, अहो, अह अशी विविधरुपे या नामाची आढळतात. अह, हस, हुन्, हृ इत्यादि धातु त्यात संभवतात. हस्धातू घेतल्यास काल हा न हसणारा,, कोणत्याहि कारणाने प्रसन्न (आणि म्हणून खिन्नहि) न होणारा आहे-परमात्माच असा सर्वव्यापी, कशाने हि मनोविकार न पावणारा, कुगाचे हि हनन न करणारा, कशाचेहि हरण न करणारा आहे. म्हणून तो अह, अहस्, अहन् आणि अहर्‌ होय.

२३२ (आ). अहःसंवर्तक (संवर्तक)
प्रवर्तक म्हणजे बाहेर जगांत विष्वक् प्रसृत करणारा. संवर्तक म्हणजे त्याच्या विपरीत बाहेर जगांत प्रसृत झालेल्या पसाऱ्याला आपल्या ठाईं अंतरांत सम्यक संवृत करणारा. सूर्य उदयकाली किरण प्रवर्तित करतो. अस्तसमयीं ते खेचून गोळा करून घेतो, संवर्तित करतो. ऊर्णनाभ कोळी तंतु ताणतो, पसरवतो आणि परत तो गिळून घेतो. त्याप्रमाणे परमात्मा हे जग आपल्यांतून विस्तारतो आणि परत आपल्यांत संवर्तित करून घेतो, गिळून घेतो. हा संहर्ता वा समाहर्ताच संवर्तक होय.

आरंभी ब्रह्मचारी वेदाध्यायनासाठीं घर सोडून गुरुकुलवास करतो. वेदाध्ययन संपल्यावर त्याचे समावर्तन होतें. तो शेवटी गुरुकुल सोडून परत आपल्या घरी येतो. परमात्मा हि सर्व जीवांना त्याच प्रमाणे ज्ञानार्जनासाठी जगांत पाठवतो. तें ज्ञानार्जन झाले म्हणजे परत त्यांना आपल्याकडे घेऊन जातो. भूतांच्या विद्यालाभार्थ तो परमात्मा भूतांचा प्रवर्तक तसा विद्यालाभोत्तर त्यांचा तो संवर्तक वा समावर्तक होतो.

शंकराचार्य अहः आणि संवर्तक ही दोन पदें न घेता दोहों मिळून एक पद घेतातः सहस्रसंख्येच्या निर्वाहासाठी तसें करणे आवश्यक आहे. अहः शब्द पूर्वी येऊन गेला असल्यामुळे इथे पुनः अहः हे पद स्वतंत्रपणे घेण्याची गरज नाहींच. पण " उद्वृतो हि ग्रन्थः समधिकं व्याचष्टे " अथवा " अधिकस्याधिकं फलम् " या न्यायाने अहः आणि संवर्तकः ही दोन पदें घेऊन विवरण केलें.

अहः-संवर्तक हे एक पद घेतल्यास परमात्मा हा अहन् चा म्हणजे दिवसाचा संहर्ता आहे असा अर्थ करावा लागेल.अर्थात् तो शेवटच्या दिवसाचा शेवट आहे, कालान्तक आहे. अथवा स्थलकालात्मक ही जी व्यक्त सृष्टि तीच त्या अव्यक्त परमात्म्याचा प्रकाश होय, दिवस होय. तिचा तो संहार करतो म्हणून तो अहःसंवर्तक म्हणावयाचा. अहःसंवर्तक म्हणजे दिवसाची धमाल संपवून रात्रीची निःशब्द शांति आणि सुख देणारा.

२३३. वह्नि
वहन करतो तो वह्नि होय, परमात्मा हा कशाचे वहन करतो ? तो जीवनाचे वहन करतो. जिथे जिथे परमात्मा तिथे तिथे जीवन आहे. ' यत्र यत्र धूमः, तत्र तत्र वह्निः’ असा तार्किकांचा न्याय आहे. आध्यात्मिकांचा न्याय ' यत्र यत्र वह्निः, तत्र तत्र जीवनम् " असा आहे. मनुष्य मेला म्हणजे त्याची तिरडी स्मशानात घेऊन जातात. तिच्यासमोर अग्निघट घेऊन मृताचा मुलगा वा निकट आप्त चालत असतो. का ? तो आपल्या त्या अग्निवहनाने सुचवीत असतो, "बाबा रे आज वर में जीवन वहन करणारा हा अग्नि आतां हि तुझा साथी आहे आणि सारथि आहे. तो तुला परलोकाला घेऊन जाईल." परमात्मा हा जीवाचा सखा आहे. तो त्याला केव्हांहि सोडीत नाही. तो त्याचा हात धरून,साथ करून, त्याला नेत असतो. म्हणून तो 'वह्नि'. तुकारामानें जें म्हटले आहे "जेथे जातो तेथे तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया" ते या वह्निला, परमात्म-वह्नीलाच उद्देशून होय, तुका वाण्याच्या वाणींत वेद बोलतो तो असा. वह्नि पदाचेंच रहस्य तुकारामाने आपल्या वचनांत प्रकट केले आहे. जंगलांतून वाट काढायची ती जंगल जाळून साफ केले म्हणजे होते. त्यामुळे अग्नि हा अग्रणी झाला आहे. तो पुढे चालतो, वाट करतो तेव्हां त्याच्या मागून लोक जातात. अग्नि हा नुसता मार्गदर्शक नाही, तर पथिकृत माणजे मार्ग काढणारा, तयार करणाराहि आहे. त्यावरुन तो अनुयायांना घेऊन जातो. म्हणून तो वह्नि होतो. परमात्मा अग्नि म्हणजे अग्रणी आहे आणि तोच वह्नि म्हणजे नेता आहे. म्हणून इह जीवनांत काय आणि पर जीवनांत काय तो सदैव आपल्यापुढे राहतो आणि त्याच्यामागून आपण जातो. त्याचे द्योतक तिरडी समोर चालणारा अग्रणी अग्नि आणि मागून येणाऱ्या जीवाचे लोकांतरास वहन करणारा वह्नि होय.

२३४. अनिल
अन् म्हणजे स्वासोच्छवास करणे, यावरुन अनिल महणजे अनन-शील, अनप्रचुर, दमदार, चळवळ्या असा अर्थ निष्पन्न होतो. क्रिया असंख्य आहेत, परंतु त्या सर्व विविध क्रियांमध्ये क्रिया-सामान्यरूप क्रियात्व में आहे तें एकविधच आहे आणि तेंच अनन होय. अर्थात अनन महणजे क्रियांची क्रिया वा क्रियानिधान.

जिथें जीवन आहे, तिथे प्राणन आहे, जिथे प्राणन आहे तिथे क्रिया आहे, म्हणून क्रिया वा हालचाल ही सजीवतेची, प्राणित्वाची खूण मानिली जाते. जियें प्राण आहे, जीव आहे, तिथे सत्ता आहेच. आणि म्हणून अनिल म्हणजे सद्रुप सर्वशक्ति परमात्मा, जो सर्व क्रियांचें अधिष्ठान होय, त्या परमात्म-तत्त्वाचे वर्णन नासदीय सूक्तांत "आनीत् अवातं स्वधया तदेकम् " असें केलें आहे. ते परमात्म-तत्त्व वायूवांचून व स्वशक्तीच्या बळाने स्पंदत होते, श्वासोच्छ्वास करीत होते, असे म्हटले आहे.

ईशोपनिषदांत "वायुः अनिलं अमृतम्' असें वचन आलें आहे. त्याचा अर्थ असा की शेवटी हा प्राणवायु त्या अनिलांत लीन होतो आणि तद्वारा अमृतांत विलीन होतो. अर्थात् अनिल ही एक मधली पायरी आहे. कूटस्थ चैतन्य, तदाश्रित अव्यक्त प्रकृति, आणि तत्-सृष्ट व्यक्त जीव आणि जगत, असा हा अवरोह आहे. आरोहांत व्युत्क्रमाने त्यांनाच वायु, अनिल आणि अमृत अशा संज्ञा मिळाल्या आहेत. वस्तुतः जो अमृत पुरुष आहे तोच अनिल आणि तोच वायु म्हणून प्रकटला आहे. निर्गुण सगुण आणि साकार अशीच ती क्रमिक रुपें आहेत. अक्षरांतून क्षराकडे जातांना वा क्षरांतून अक्षराकडे जातांना मधली अपरिहार्य अशी जी पायरी ओलांडावी लागते, ती म्हणजे अव्यक्त होय. आणि तीच अनिल.

प्राण व्यष्टिरूप आहे, अनिल समष्टिरुप आहे. व्यष्टिरुप असल्याने प्राण सनिलय आहे. समष्टिरूप असल्यामुळे अनिल अनिलय आहे. आणि म्हणून शंकराचार्य अनिल पदाचें भाष्य अनिलय असें करतात. वस्तुतः निलयाचा अनिल पदाशी तसा काहीच संबंध नाही,

अशा प्रकारें अनिल म्हणजे सर्वाधिष्ठानभूत कूटस्थ चैतन्य, सर्वकार्यकारणभूत मूल प्रकृति आणि प्रतिदेह वसणारा देही प्राणाभिध जीव होय.

२३५. धरणीधर
धरणी म्हणजे धरित्री, जीवमात्राला धारण करणारी पृथ्वी, तिला कोण धारण करतो ? तंबूला जसा धारण तसे गुरुत्वाकर्षणानें पर्वत धरणीला ताणून धरतात, म्हणून ते धरणीधर होत. पाण्याला जसा बांध तसे ते भूमीचे बांध होत. भूमि त्यांच्यामुळे फुटत नाही. सुबद्ध आणि सुदृढ राहते. अर्थात् पदार्थमात्राच्या ठाई वसणारी जी ऐशी गुरुत्वशक्ति तोच धरणीधर होय. म्हटलेंच आहे, "गां आविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा". अथवा पदार्थमात्राला भिन्न व्यक्तित्व देणारा, त्या त्या व्यक्तींचा धारक जो अहंकाररुप भगवदाविरभाव तोच धरणीधर होय.

भगवान् वराह हा हि धरणीधर होय. त्याने भू-गोल आपल्या दन्ताग्राने उचलला आहे. उत्खात केली करणाऱ्या सूकराच्या सुळ्यावर ठेकूळ चिकटून यावे तसे त्या अव्यक्त महासागराच्या अगाध जलांत संचार करणाऱ्या भगवान् महासूकराने ही जीवनिकाय पृथ्वी बाहेर काढली आहे, व्यक्त पदवीस आणली आहे.

गोवर्धनधारी भगवान् कृष्ण हि धरणीधर म्हणता येईल, इंद्रियांचे संवर्धन करणारा हा देह म्हणजेच गोवर्धन होय. गोवर्धन म्हणजे गोचर भूमि, तिचे धारण करणारा तो धरणीधर, देही आत्मा. प्रत्यगात्मस्वरूप परमात्मा हा इंद्रियधारिणी देह-धरणीचा धारक आहे. म्हणून तो धरणीधर म्हणावयाचा.

भूमिरापो ऽनलो वायुःखं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ गीता ७ - ४

अपरेय इतस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ गीता ७ - ५


भूतमात्राला, चराचर जीवांना धारण करणारी ही जी ऐशी प्रकृति तीच धरणी होय. आणि तिचा हि धारक तो घरणीधर म्हणावयाचा. अर्थात् धरणीधर म्हणजे प्रधानपुरुषेश्वर होय, जीवजगत्-स्वामी परमात्मा होय.

अशा प्रकारें भूमिगत प्रभविष्णु विष्णुशक्ति, म्हणजे गुरुत्वशक्ति, अहंकारसंज्ञक जीव, व्यक्ताचें व्यक्तीकरण करणारा अव्यक्तसंचारी अक्षर पुरुष आदिवराह, देहधारी आत्मा आणि विश्वधारक परमात्मा हे विशिष्ट पण परस्परविरोधी किंबहुना एकमय भाव, अर्थात् विरुप सरूप आणि एकरूप भाव म्हणजे धरणीधर होय.

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP